Monday, January 11, 2010

वेड लावणा-या कलाकृती...'आठवणी'चा समृद्ध व सुंदर खजिना...!

कलाकार हा जन्मजात असावा लागतो, असं म्हणतात. ते खरंही आहे. शाळा-कॉलेजातून अभ्यासक्रम पूर्ण करुन कलाकार होता येत नाही. कला ही उपजतच असावी लागते. ही आणि अशी अनेक वाक्य आपण प्रत्येकवेळी ऐकलेली असतात. पण जर अशा गोष्टींचा प्रत्यय आला तर आपला त्यावर चटकन विश्वास बसतो. असंच काहीसं माझं झालंय.

देव कोणाच्या हातात काय कला निर्माण करेल काही सांगता येत नाही, हे पाहण्याची संधी मला नुकतीच मुंबईत मिळाली. शशिकांत धोत्रे या अगदी उदयोन्मुख कलावंतानं साकारलेल्या चित्रांचं प्रदर्शन पाहिलं आणि मला ही गोष्ट मनोमन पटली. सोलापूरातल्या मोहोळ तालुक्यामधल्या एका छोट्याशा खेड्यात वाढलेल्या शशिकांत धोत्रे नामक चित्रकाराची ही गोष्ट. ही गोष्ट एखाद्या हिंदी किंवा मराठी चित्रपटात हुबेहूब शोभेल अशीच वाटते.वडार समाजात जन्माला आलेल्या शशिकांतचे वडील दगड फोडण्याचं काम करतात. आई गृहिणी आहे. रस्त्याच्या कडेला बसून दगड फोडण्याचं काम करणारे अनेक जण आपण आतापर्यंत पाहिले असतील. मोठे-मोठे दगड फोडून त्याचे बारीक दगड करण्याचं काम किती कष्टाचं असू शकतं याची आपण कल्पनाच केलेली बरी. तर असं वडार काम करणा-या घरात शशिकांतचा जन्म झाला. पण वडिल करतात ते दगड फोडण्याचं पारंपरिक काम करण्याची वेळ शशिकांतवर आली नाही. कारण देवानं त्याच्या हातामध्ये दगड फोडण्यासाठी लागणा-या सामर्थ्यापेक्षा चित्र साकारण्याचं कसब निर्माण केलं होतं.

शाळेत असताना चित्र काढण्यावरुन त्यानं अनेकदा शिक्षकांचा ओरडा खाल्ला होता. प्रसंगी मारही खाल्ला होता. शाळेतल्या अनेक भिंती शशिकांतनं चितारलेल्या कलाकृतींनी भरुन गेल्या होत्या. मग कधी त्या त्यानं स्वतःहून काढलेल्या होत्या. तर कधी शाळेतल्या काही कलासक्त शिक्षकांनी त्याच्याकडून करवून घेतल्या होत्या. पुढे दहावी-बारावीचा टप्पा पार करुन शशिकांत मुंबईच्या सुप्रसिद्ध जेजे महाविद्यालयात शिकण्यासाठी दाखल झाला. पण तिथं महिना-दोन महिने काढल्यानंतर शशिकांतनं तिथनं पळ काढला आणि स्वतःच कलेची आराधना करु लागला.शशिकांतच्या चित्रांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यानं ही चित्र फक्त पेन्सिलच्या सहाय्यानं काढली आहेत. भारतात अशा पद्धतीनं चित्र काढणारे चित्रकार खूप थोडे आहे. जगामध्ये मायकेल एंजेलो हा चित्रकार अशा पद्धतीनं चित्र काढायचा. शशिकांतनं काळ्या पेपरवर काढलेली ही चित्र पाहिली की डोळे दिपून जातात. एकेक चित्र काढायला साधारण सहा ते आठ दिवसांचा कालावधी लागतो. मुंबईतल्या तुलिका आर्ट गॅलरीमध्ये भरलेल्या प्रदर्शनात शशिकांतची दहा-बारा चित्र लावलेली आहेत. त्यापैकी एकही चित्र ७५ हजार रुपयांपेक्षा कमी नाही. तर प्रदर्शनातलं सर्वाधिक महागडं चित्र दीड लाख रुपयांना आहे. मुख्य म्हणजे प्रदर्शनातील सर्वच्या सर्व चित्र विकली गेलेली आहेत.

व्यक्तीचित्र रेखाटताना शशिकांतनं अगदी बारीक सारीक गोष्टींचा विचार करुन ते चित्र चितारलं आहे. गफ्फार नावाच्या त्याच्या लहानपणीच्या मित्राचं काढलेलं चित्र तर प्रचंड अफलातून आहे. त्याची बसण्याची लकब, पायावर जखमेची खूण, गोट्यांचे रंग, गोट्या खेळताना चेह-यावर असणारे भाव अशा सर्व गोष्टी त्यानं हुबेहूब हेरल्या आहेत. तन्वी साळकर या मैत्रिणीची दोन पोट्रेट काढताना त्यानं थोडंसं वेगळेपण जपलं आहे. एक चित्र लग्नापूर्वीचं तर दुसरं लग्नानंतरचं आहे. ही दोन्ही चित्र पाहिली की शशिकांतच्या कलेला दाद दिल्याशिवाय रहावत नाही. घराच्या खिडकीतून नव-याची वाट पाहणारी नवविवाहिती तर अफलातून आहे. (म्हणजे चित्र अफलातून आहे.) आपल्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा देणारे हे 'रिमेम्बरन्स' नक्की पहायला हवं.

एखाद्या खेड्यातनं आणि प्रचंड गरीबीतून वर आलेला शशिकांत आता चांगलाच लोकप्रिय झालाय. त्याला अनेक प्रतिष्ठित पारितोषिकांनी गौरवण्यात आलंय. येत्या काही महिन्यात तो लंडनलाही जाणार आहे. शशिकांतच्या भविष्यातील वाटचालीस माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा...

शशिकांत धोत्रेबद्दल अधिक माहितीसाठी क्लिक करा...

http://www.tulikaartsgallery.com/index.php?page=2&isArtist=315

4 comments:

Yawning Dog said...

vaa, tya linkvarchee chitre tar afalatoon ahet

Mahesh said...

मराठी ब्लॉगर्सचा पहिलावहिला ब्लॉगकॅम्प सिंहगड रोडवरील पु. ल. देशपांडे उद्यानात मोठ्या उत्साहात झाला, १६ जानेवारी १० ला त्याबद्दल सर्व मराठी ब्लॉगेर्सचे अभिनंदन :-) महेश

Unknown said...

MI TUMCHA KHUP AABHARI AAHE SIR KI TUMHI VADAR SAMAJATIL EKA MOTYACHI AAMHALA OLAKH KARUN DILIT THANKS SIR

अरविंद बनसोडे, पुणे said...

ग्रेट शशिकांत जी