Thursday, January 28, 2010

शंभर टक्के मराठी, दोनशे टक्के मुंबईकर!खमंग आणि रुचकर वडापाव

मध्यंतरीच्या काळात माझ्या ब्लॉगवर (http://ashishchandorkar.blogspot.com) "वडापाव'वर एक लेख लिहिला होता. त्याला वेगवेगळ्या ठिकाणहून काही प्रतिक्रिया आल्या होत्या. त्यातील सर्वात वेगळी आणि आनंददायक प्रतिक्रिया होती ती अमेरिकेतल्या संदीप नावाच्या एका ब्लॉग वाचकाची. संदीप म्हणतो, ""तुमचा लेख मला खूपच आवडला. तुमचा लेख वाचल्यानंतर मला अमेरिकेतील शिकागो शहरातील एका दुकानाची आठवण झाल्यावाचून राहत नाही. त्या ठिकाणी सुखाडिया नावाच्या माणसाने एक भव्य दुकान थाटलेय. "शॉपिंग मॉल'च म्हणा ना. तिथल्या "रेस्तरॉं'च्या "मेन्यू कार्ड'वर "बॉम्बे वडापाव'चा उल्लेख आहे. हा "बॉम्बे वडापाव' तीन डॉलर्सला मिळतो.''

शंभर टक्के मुंबईचा असलेला वडापाव आता फक्त महाराष्ट्रात किंवा भारतातच नव्हे; तर परदेशातही मिळू लागला आहे आणि तिथेही त्याचे नाव नुसते वडापाव असे न राहता "बॉम्बे वडापाव' असे नोंदले गेले आहे. त्यातच वडापावची लोकप्रियता लक्षात येते. तसेच वडापाव आणि मुंबई यांचे किती अतूट नाते आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. त्यामुळे मुंबईने महाराष्ट्राला काय दिले, असा प्रश्‍न विचारल्यानंतर अनेकांची अनेक उत्तरे असतील. कोणी म्हणेल बाळासाहेब ठाकरे, कोणी म्हणेल सुनील गावस्कर किंवा सचिन तेंडुलकर, कोणी म्हणेल "फायटिंग स्पिरीट', कोणी म्हणेल बॉलीवूडची मायानगरी इ.इ. पण मला विचारले तर माझे उत्तर असेल- मुंबईने महाराष्ट्राला "वडापाव' दिला.

महाराष्ट्राबाहेर मराठी पदार्थ म्हणून मान्यता पावलेला आणि अस्सल खवय्यांच्या पसंतीस उतरलेला सर्वाधिक लोकप्रिय पदार्थ म्हणजे वडापाव. अस्सल मराठमोळा आणि 100 टक्के मुंबईकर. अगदी दिल्लीपासून ते हैदराबादपर्यंत आणि अहमदाबादपासून ते कोलकत्तापर्यंत बॉम्बे वडापाव (शिवसेनेच्या भाषेत बोलायचे झाले तर मुंबई वडापाव) मिळू लागलाय. भारतातील बहुतांश राज्यात वडापाव मिळतो आहे. प्रांतानुरूप आणि तिथल्या चवीनुरूप काही किरकोळ बदल झाले आहेत. म्हणजे गुजरातमध्ये कापलेला कांदा, बीट आणि कोबी यांच्या सलाडबरोबर वडापाव "सर्व्ह' करतात. तर हैदराबादमध्ये "आलू बोंडा' म्हणून ब्रेडच्या स्लाईसबरोबर वडा दिला जातो. प्रत्येक ठिकाणची चव आणि स्वरूप वेगळे; पण वडापाव तोच अस्सल मराठमोळा.

साबुदाणा खिचडी, थालिपीठ, झुणका-भाकरी, मटारच्या करंज्या, खारी पॅटीस, झणझणीत मिसळ आणि इतरही अनेक पदार्थांच्या तुलनेत वडापाव हा अधिक झपाट्याने महाराष्ट्रभर रुजला आणि सामोसा किंवा कचोरीच्या स्पर्धेतही टिकला. बटाट्यापासून केलेले सारण हाच बटाटा वड्याचा खरा आत्मा. त्याची चव जितकी चांगली तितका वडापाव रुचकर. सोबतीला गोड किंवा तिखट अशी ओली चटणी, कांदा लसूण मसाला किंवा सुकी चटणी असा लवाजमा असतो. पण खरी चव असते ती नुसत्या वड्याचीच. मग तो किती झणझणीत आहे, त्यातील मसाला कसा आहे, त्यात लिंबाचा रस मिसळला आहे का, अशा अनेक गोष्टींवर वड्याची चव ठरते. मग तो वडा नुसता खाल्ला काय किंवा पावाबरोबर खाल्ला काय, एकदम जन्नत. बरोबर तळलेली लवंगी मिरची मात्र हवी. मग गोड-तिखट चटण्या असो किंवा नसो.

मुंबईतील छबिलदास जवळच्या "श्रीकृष्ण'चा अतिमहागडा वडा, कीर्ती कॉलेजजवळचा खमंग वडापाव (हा विक्रेता चुरापाव विकूनही पैसे वसूल करतो), हुतात्मा चौकातील (टेलिफोन एक्‍स्चेंजजवळचा) वडापाव, परळच्या भोईवाडा चौकातील वडापाव, सीएसटीसमोरचा आरामचा वडापाव, ठाण्यातील कुंजविहारचा वडापाव, कर्जतचा दिवाडकरचा वडा, पुण्यातील जोशींचा वडा, सहकारनगरचा कृष्णा किंवा कॅम्पातील फेमस वडापाव, औरंगाबादचा भोला वडापाव, कोल्हापूरचा दीपकचा वडा इ.इ. ही यादी आणखी खूप वाढत जाईल आणि अनेक जण त्यामध्ये नवे नवे स्पॉट्‌स नमूद करता येतील. थोडक्‍यात म्हणजे मुंबईत उगम
पावलेल्या वडापावची ओळख आणि चव सगळीकडे पोचलीय.

फार लवाजमा नसल्यामुळे अगदी गल्लोगल्लीच्या गाड्यांवरही वडापाव दिसू लागला. तयार करायला सोपा आणि ग्राहकही पुष्कळ त्यामुळे "वडापाव' लवकरच सर्वदूर पोचला. गरिबातील गरीबापासून ते गर्भश्रीमंतापर्यंत प्रत्येकाला खमंग वडापाव आवडतो. मग तो सचिन तेंडुलकर का असेना. वडाभाव हा त्याचा "वीक पॉईंट' असतो. त्यामुळे गल्लोगल्ली गाड्यांवर मिळणाऱ्या वडापावलाही "हायजिनिक' स्वरूप देण्याच्या नादात "वडापाव' दुकानांमध्ये गेला. मग तो "प्लॅस्टिक'चे ग्लोव्हज घालून तयार करण्यात येणारा जम्बो किंग वडापाव असो, गोली वडा असो किंवा शिवसेनेचा "शिववडा'. पुण्यातील जोशी वडेवाले असो किंवा रोहित वडेवाला. शिवसेनेनेही आता चौकाचौकांत "शिववडा'च्या गाड्या टाकून ब्रॅंडिंगचा प्रयत्न सुरू केला आहे. वडापावची देखील साखळी पद्धतीची दुकाने निघतील, याची कल्पना कोणीच केली नव्हती. पण आता ती वस्तुस्थिती आहे.

"फक्त एका रुपयात वडापाव' अशा जाहिरातीपासून सुरू झालेले मार्केटिंग आता "हायजिनिक वडापाव'पर्यंत येऊन पोचले आहे. पण कोणी कितीही आणि काहीही म्हटले तरी गाडीवर कढईतल्या उकळत्या तेलात तळले जाणारे गरमागरम खमंग वडे खाण्याची मजा काही औरच. मग थोडंसं तोंड भाजलं तरी त्याचं काही वाटत नाही. आणि एकदा तोंड खवळलं की दुसरा वडापाव खाल्ल्याशिवाय आपण तिथून हलत नाही. अशा वडापावची चव नेहमी आपल्या जिभेवर रेंगाळायला लावण्याचे श्रेय दुसऱ्या-तिसऱ्या कोणाचे नसून या मुंबापुरीचे आहे, हे विसरून चालणार नाही. त्यामुळेच मुंबई बाहेरच्या मंडळींना मुंबईत गेलो आणि वडापाव खाल्ला नाही तर चुकल्या चुकल्यासारखं वाटतं. ते त्यामुळेच.


(मुंबई सकाळच्या वर्धापनदिनानिमित्त निघालेल्या विशेष पुरवणीतील लेख...)

5 comments:

Anonymous said...

majaa aali vaachun... punha ekda vadapav khallyachaa anand aalaa... aataa kay svatach kara ani svatach kha chalu aahe pan maja yete... aaj banavala aahe :)

Italic font mule vachayala tras zala... :(

Anonymous said...

शंभर टक्के मराठी, दोनशे टक्के मुंबईकर!


ekdam jhakaaas!!!!!

chashmebaddur !!!!

Rupesh Dalavi

अमित भिडे said...

नेते, फार सुंदर लिहीलं आहे. वाचलं आणि लगेच आपल्या ऑफिसच्या खालचा वडापाव खाऊन आलो. वडापाव ही एक चळवळ आहे असं मला वाटतं.. शिवसेनेला मी राजकीय पक्ष कधीच मानायला तयार नाही. तसंच वडापाव हा नुसता पदार्थ नाही, ती एक चळवळ आहे. या वडापावने कितीतरी कुटूंबांना आधार दिला. आमच्या नात्यात वझे कुटूंब आहे. आज कल्याण शहरात वझे अनेक उद्योगांसाठी ओळखले जातात. मात्र त्यांची सुरूवात झाली त्यांच्या 'खिडकी वड्याने'.. घराच्या स्वयंपाकघरात वडे तयार करून वाड्याच्या खिडकीतून ते वडे विकत असत म्हणून ते खिडकी वडा...
तसाच आमच्या डोंबिवली एमआयढीसीतला उमेशचा वडा.. उमेशच्या वडिलांनी कंपनी बंद झाल्यामुळे बिल्डींगबाहेर वडापाव सुरू केला. उमेशही बाबांना मदत करायचा आणि आज उमेशचा वडा हा ब्रँड झालाय. १० लाख लोकवस्तीच्या डोंबिवलीत उमेशचा वडापाव प्रत्येकाला माहिती आहे. डोंबिवलीतला जिन्याखालचा गोऱ्यांचा वडाही लोकप्रिय. कानिटकरांचा वडापावही जबरदस्त.. त्यांची चटणी फेसम आहे.
मात्र डेंबिवलीत सर्वात जास्त कोण वडे विकतो माहित आहे... ठाकूर नावाचा भय्या.. ठाकूर वड्याच्या अनेक शाखा आता डोंबिवलीत आहेत. आणि विशेष म्हणजे वडापावबरोबर पुदीना चटणी, लसूण चटणी, कांदा यांच्या बरोबरीला तो मक्याच्या पोह्यांचा अप्रतिम चिवडा देतो. पावामध्ये हे मिश्रण आणि त्याच्या जोडीला वडा जाम मजा आणतो.. नेते आता हे नुसते सांगत नाही. तर तुम्हाला आमच्या
सा रम्या नगरी डोंबिवलीत वडापाव खाण्यासाठी आग्रहाचं आमंत्रण देतो.. वडापाव चळवळीला आपणही 'पोटभार'लावूया.

हेमंत पोखरणकर said...

direct कासोट्यालाच हात घातला की राव! means its a wkpoint.
नाशिकमध्ये मी १नं. M G RD. वरील खरेबाईंच्या वडापावला देईन. Krushnai, nr. CIRCLE talkies gets rush but ..2day no quality.

Unknown said...

i m working in saudi, reguraly reading u r blogs. Ithe saudi - al khobar city madhe 2 varshe adhi kolhapurchya marathi mansane deshi chowk navache chat che chote hotel suru kele hote, te tufan chalat ase, tyacha vada pav ikde khup famous zala hota. agdi arabi lok pan yet khayala. tya area madhil pakistani ani north indian chat hotels tyane changli fight dili hoti, pan te aata band zale aahe. lulu hyper market madhe vada pav bhetato pan tyala marathi touch nahi, beasan layer khup jad aste ani testy pan nasto. i miss vada pav realy.