
आपण प्रवासाला गेलो किंवा नव्या शहरात गेलो, की तिथे आपल्याला चांगले-वाईट अनुभव येतात. अनुभव चांगले-वाईट असतात कारण परिस्थिती किंवा आपल्याला भेटलेली माणसं चांगली किंवा वाईट असतात. तमिळनाडूमध्ये गेलो होतो तेव्हा मलाही असेच काही चांगले-वाईट (वाईट फक्त एखाद दुसराच) अनुभव आले. त्यावर गेल्या बऱ्याच दिवसांपासून लिहीन म्हणत होतो. पण अखेर आज मुहूर्त मिळाला.
मदुराईचा दीपक
तमिळनाडू दौऱ्यात मला भेटलेला मस्त मित्र म्हणजे एन. बी. दीपक. हा स्वतः एका जाहिरात कंपनीमध्ये काम करतो. तंजावूर ते मदुराई एसटीमध्ये तो मला प्रथम भेटला. नंतर तो माझा मदुराईतील गाईडच बनला. एसटी स्टँडपासून ते मदुराई शहरात कोणत्या बसने जायचं, हे त्यानं मला सांगितलं. त्यालाही त्याच बसनं जायचं होतं, म्हणून तोही माझ्या बरोबरच निघाला. इतकंच नाही तर त्यानं माझं तिकिटही काढून टाकलं. (हा त्याला चांगलं म्हणण्याचा निकष नक्कीच नाही.) रात्री बारा वाजता मदुराईत चांगलं हॉटेल शोधण्यात त्यानं मला मदत केली. रात्री साडेबारा वाजता खायला कुठं मिळेल, काय मिळेल, यासाठी तो माझ्याबरोबर हिंडला. एका हॉटेलमध्ये घुसून त्यानं आमच्या दोघांच्या जेवणाची व्यवस्था केली.
दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्याबरोबर मदुराई मंदिरात आला. एम. के. अळगिरी यांच्या भेटीसाठी डीएमकेचे ऑफिस आणि त्यांच्या घरापर्यंत माझ्याबरोबर फिरला. संध्याकाळीही मदुराई मंदिरातील देवांची यात्रा निघते, तिथं मला घेऊन गेला. रात्री मला एस. टी. स्टँडवर सोडायला आला आणि कन्याकुमारीला पोहोचला का? असा फोनही दुसऱ्या दिवशी केला. ओळख फक्त एस.टी. मधली. तो तमिळ, मी मराठी. आमच्या दोघांचा दुरान्वयेही संबंध नाही. पण तरीही त्यानं माझ्यासाठी खूपखूप केलं. आपण महाराष्ट्रातच बसून म्हणतो, की ते तमिळ लोकांना मदत करत नाहीत. हिडीसफिडीस करतात. पण असेही काही तमिळ आहेत, की जे कायमचे तुमचे मित्र होतात. जसा दीपक माझा कायमचा मित्र झाला.
मदुराईबद्दल बोलताना दीपक म्हणला होता. मदुराई पीपल आर पासक्कारे पीपल. म्हणजे मदुराईचे लोक हे प्रेमळ लोक असतात. मला त्याचं बोलणं अगदी पटलं. कारण दीपक हाच माझ्यासाठी मदुराई पीपल होता. खरंच मदुराई पीपल आर पासक्कारे पीपल.
रेल्वे अधिकारी व्ही. अशोक
पु. ल. देशपांडे यांच्या चौकोनी कुटुंबात शोभून दिसेल असा रेल्वे अधिकारी चेन्नई-पुणे प्रवासादरम्यान माझा सहप्रवासी होता. एकदम पापभीरू म्हणजे तो कुर्डुवाडीपर्यंतच होता. पण तो माझ्या कायम लक्शात राहील असाच होता. व्ही. अशोक असं त्याचं नाव. अकदम टापटीप, वक्तशीर आणि नीटनेटका. पंढरपूर आणि तुळजापूरला देवदर्शनासाठी निघाला होता. एकटाच. पण दोन भल्या मोठ्या बॅगा, एक हँडबॅग आणि एक पाऊच बरोबर घेऊन आला होता. दोन्ही बॅगा साखळीबंद करून त्याची चावी एका छोट्या पाकिटात ठेवली. ते पाकिट पाऊचमध्ये ठेवलं आणि ते पाऊच कुठेतरी लपवून ठेवलं. बरं, डबा सेकंड एसीचा आणि हा एकटाच. इतकं मौल्यवान काय घेऊन जात असणार हा ते पांडुरंगालाच माहिती.
बरं, त्याच्याकडे कोरे कागद होते. पट्टी होती. रेल्वेचे दक्शिण, मध्य आणि पूर्व विभागाचे सविस्तर वेळापत्रक होते. त्यामुळे कुर्डुवाडी कधी येणार, पुणे कधी येणार, गुंटकल आणि वाडी कधी येणार, कशानंतर काय याची त्याला सविस्तर माहिती होती. रेल्वेचा माहितीकोष म्हणूनच तो वावरत होता आणि प्रत्येक सहप्रवाश्याला मदत करत होता. सक्काळी उठल्या उठल्या चहा घेतला आणि अर्ध्या तासानं दही खायला घेतलं. सकाळी साडेआठ वाजता दही खाल्लं, तेव्हा मला चक्करच यायची बाकी होती. बरं, दही खाल्लं ते खाल्लं आणि म्हटला नो क्वालिटी. रेल्वेच्या पॅण्ट्री कारचे खासगीकरण झाल्यानंतर कशी मजा गेली, यावर मला दर तासाभरानं सांगत होता. म्हटलं, कुठून यानं दही खाल्लं आणि हे सर्व ऐकण्याची वेळ माझ्यावर आली.
वाडीला एका चहावाल्यानं जेवण आणून देऊ का विचारल्यानंतर त्यानं दर विचारले. तेव्हा चहावाला म्हणाला, बाजरीका एक रोटी बीस रुपया. त्यावर हा पठ्ठा म्हणाला, बाबा क्या एक किलो का रोटी लाओगे क्या? नंतर दही मिलेगा क्या, असं त्यानं विचारलं. तेव्हा म्हणाला मिलेगा. आधा किलो लाऊ क्या? त्यावर तो म्हणाला, मेरे को अकेले को चाहिए. पुरे डिब्बे को खिलाओगे क्या? त्यानंतर पुढचा अर्धा तास मी एकटाच वेड्यासारखा हसत होतो. माझ्या हसण्याची मलाचा लाज वाटत होती. पण काय करणार. असा हा व्ही. अशोक कुर्डुवाडी येण्यापूर्वीच दारात जाऊन उभा होता आणि पाहता पाहता नजरेआड झाला.
च्यो रामास्वामी
तुघलक या साप्ताहिकाचे संपादक आणि जयललिता यांचे कट्टर समर्थक च्यो रामास्वामी यांना भेटण्याचा योग आला. तमिळमधील लेखक, कवी, कथाकार, पटकथाकार, पत्रकार आणि बरेच काही. सध्या तुघलकचे संपादक. टाइम्सचे गेस्ट हाऊस असलेल्या अल्वर पेठ भागाच्या जवळच ग्रीनवेस रेल्वे स्टेशनजवळ त्यांचं ऑफिस. दुपारी तीननंतर फोन करा, असं म्हणून त्यांनी मला भेटण्यास होकार दिला. तीन वाजता फोन केला तर फोन बंद. म्हटलं वामकुक्शी सुरु असणार. मग साडेचारला फोन केला. फोन उचलला आणि पाचची अपॉईण्टमेंट दिली.
ऑफिसात गेलो. सुरुवातीला समोरच महात्मा गांधीजींचा फोटो. स्वतः रामास्वामी दे दुसऱ्या मजल्यावर बसतात. मग त्यांच्या पीएनं फोन करुन बोलणं करून घेतलं आणि मला वर जाण्यास सांगितलं. वर गेलो तर मंगल पांडेंचा फोटो. खाली गांधी वर पांडे. एक अहिंसक दुसरा १८५७ च्या स्वातंत्र्यसमराची ठिणगी पडण्यास कारणीभूत ठरलेला. केबिनमध्ये गेलो. म्हणाले, टेक युअर सीट आणि माझ्यावरच प्रश्नांचा भडिमार सुरु केला. कुठून आला, कुठे कुठे गेला, काय काय पाहिलं, तुमचा अंदाज काय, काय होईल इइ. जयललिता येणार पण घासून येणार हा माझा अंदाज चुकीचा आहे, असं सांगून त्या निर्विवाद बहुमत मिळविणार हे त्यांनी निक्शून सांगितलं. वर, करुणानिधी सरकारच्या चार वाईट गोष्टीही सांगितल्या.
सिंहासन वाटावं, अशा खुर्चीवर मस्त मांडी घालून बसलेली वामनमूर्ती. डोक्याला केस नाही. भुवयाही नाहीत. त्यामुळे भुवया काजळानं किंवा काळ्या रंगानं कोरलेल्या. कमरेला लुंगी. वरती सिल्कचा सदरा आणि संपूर्ण केबिनमध्ये विविध स्वामींचे आणि शंकराचार्यांचे फोटो. काही फोटो च्यो रामास्वामी यांच्याबरोबर तर काही आशीर्वाद देताना. मला तर एखाद्या शंकराचार्यांच्या पीठात वगैरे तर आलो नाही ना, असंच वाटत होतं. बोलायला मस्त रोखठोक आणि फोटोसाठी पोझ द्यायला एक नंबर. अवघ्या पंधरा मिनिटांमध्ये आमची भेट आटोपली आणि चेन्नई दौरा सार्थक झाल्याचं वाटलं. लहानपणापासून तमिळनाडूतील एक्सपर्ट म्हणून ज्यांना एनडीटीव्ही आणि स्टार न्यूजवर पाहत आलो त्यांना प्रत्यक्श भेटलो.
गेस्ट हाऊसचा वॉचमन
टाइम्सच्या गेस्ट हाऊसचा वॉचमन हा माझा लोकल गाईड होता. वॉचमनचं नाव विचारलं होतं. पण आता लक्शात नाही. गेस्ट हाऊसपासून कुठे कोणती बस जाते. बसस्टॉप कुठे आहे. तिथून पुढे जाण्यासाठी कोणती बस उपयुक्त ठरेल, तिकिट किती असेल. किती मिनिटांनी बस येईल, याचा तो विकिपिडीयाच होता. त्याच्यामुळेच मला चेन्नईच्या बससेवेची जवळून ओळख झाली. कोणत्या पेपरमध्ये काय आलंय, कोणता पेपर कोणाचा आहे, चॅनलवर नेमक्या काय बातम्या सांगितल्या, हे त्याला अगदी इत्थंभूत माहिती असायचं. असा हा वॉचमन माझा चेन्नईतील गाईडच होता.
तंजावूरचा खडूस म्हातारा
तंजावूरला होतो तेव्हा आर्यभुवन नावाच्या एका हॉटेलमध्ये संध्याकाळी नाश्ता करण्यासाठी गेलो होतो. तिथं माझ्यासमोरच एक म्हातारा येऊन बसला. बरं, इतर अनेक टेबलं मोकळी होती तरी समोर येऊन बसला. बरं, विषय काढायचा म्हणून त्याला विचारलं तमिळनाडूत यंदा काय होणार? तेव्हा मला म्हटला, ओन्ली तमिळ. नो इंग्लिश. दिसायला तर एकदम टापटीप आणि सोज्वळ होता. पुण्यातील काही खवट म्हातारे असतात तसा तो होता. त्याला इंग्लिश येत असणार पण भडवा बोलला नाही. इडलीबरोबर झालेला अपमान गिळून आणि मनातल्या मनात त्याच्या आई-बहिणीचा उद्धार करून बाहेर पडलो.
आणखी बरेच जण भेटले पण लक्शात राहणारे हे इतकेच.