Saturday, May 03, 2014

मोदी लाटेची लिटमस टेस्ट

काँग्रेस भक्कम असूनही लाट कमळाची

काँग्रेसचे नेते बेनीप्रसाद वर्मा यांचे गाव असलेला बाराबंकी मतदारसंघ हा उत्तर प्रदेशात नरेंद्र मोदी यांची लाट आहे किंवा नाही, हे सिद्ध  करू शकतो. लखनऊपासून साधारण पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या बाराबंकी गावात बेनीप्रसाद वर्मा राहतात. मात्र, सध्या ते लढत आहेत गोंडा येथून. फैझाबाद मार्गावर बाराबंकी गाव आहे. हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहे. रायबरेली आणि अमेठीपेक्शा बाराबंकी अधिक व्यवस्थित आणि नीटनेटके आहे. चकाचक रस्ते, पार्टी प्लॉट्स, हॉस्पिटल्स, मोठ्या इमारती, दुकाने आणि ब-यापैकी मोठा बस स्टॉप. तालुका कसा छान व्यवस्थित.



बाराबंकी मतदारसंघात काँग्रेसने विद्यमान खासदार आणि एससी-एसटी कमिशनचे अध्यक्ष पी. एल. पुनिया यांना पुन्हा निवडणूक रिंगणात उतरविले आहे. तर भारतीय जनता पार्टीने प्रियांकासिंह रावत यांना उमेदवारी दिली आहे. मोदी लाटेची लिटमस टेस्ट मी अशासाठी म्हटलं, की या मतदारसंघात पुनिया यांचे काम आणि नाव चांगले आहे. त्यांची वैयक्तिक प्रतिमा छान आहे. तसेच जनसंपर्क, लोकांच्या कामांचा निपटारा करण्याचा धडाका आणि सर्वांना उपलब्ध असलेला खासदार अशी प्रतिमा यामुळे पुनिया यांचा विजय निश्चित मानला जात होता. पुनिया हे बहन मायावती आणि नेताजी उर्फ मुलायमसिंह यांच्या सरकारमध्ये मुख्य सचिव राहिलेले आयएएस अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल लोकांमध्ये फार काही वाईट ऐकायला मिळत नाही. 



गंमत मात्र, अशी आहे की मोदी यांच्या लाटेमुळे त्यांच्या नाकीनऊ आले आहेत. प्रियांकासिंह रावत यांचा आणि मतदारसंघाचा थेट संबंध नाही. त्या मतदारसंघातील नाही की त्यांचे त्याठिकाणी काही काम आहे. प्रियांकासिंह यांचे पती रघुनाथसिंह रावत हे नागपूर येथे इन्कम टॅक्स ऑफिसर आहेत. त्यांचे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिका-यांशी चांगले संबंध आहेत. संघविचारांचे असल्यामुळे आणि रावत समाज उत्तर प्रदेशात एससी कॅटेगरीत मोडत असल्याने बाराबंकीमधून प्रियांकासिंह यांना रावत यांना तिकिट देण्यात आले आहे. मुळात प्रियांकासिंह या अगदीच नवख्या आहेत. संपूर्ण मतदारसंघात त्यांना कोणी फारसे ओळखतही नाही. तरीही संपूर्ण मतदारसंघात भाजपाची हवा पहायला मिळते. अनेक ठिकाणी कमल खिलेगा..., इस बार फूल... असे संवाद ऐकायला मिळतात. 



काँग्रेस नेते बेनीप्रसाद वर्मा आणि पी. एल. पुनिया यांच्यात विस्तवही जात नाही. इथले सहाच्या सहा आमदार समाजवादी पार्टीचे आहेत. पुनिया आणि वर्मा यांच्यातील भांडणामुळेच समाजवादी पार्टीला येथून मोठे यश मिळाले, असे म्हटले जाते. पुनिया यांना पाडण्यासाठी बेनीप्रसाद यांनी त्यांची ताकद प्रियांकासिंह यांच्यामागे लावली असल्याची चर्चा आहे. अर्थातच, लपून छपून. मतदारसंघात भारतीय जनता पार्टीची यंत्रणा आणि संघटना काँग्रेसइतकीच मजबूत आहे. गावागावांत भाजपाप्रमाणेच अभाविप, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हिंदू युवावाहिनी आणि मुख्य म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम जाणवण्याइतपत आहे. त्यामुळे उमेदवार नवखा असला तरीही पार्टीची यंत्रणा मजबूत आहे. त्याला मोदी लाटेची साथ मिळाल्याने प्रियांकासिंह रावत यांचे नशीब उजळून निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मोदी लाट नसती तर पुनिया यांनी भाजपच्या उमेदवाराला सहज पराभूत केले असते, अशी परिस्थिती. त्यामुळेच म्हटलं, की मोदी लाटेची लिटमस टेस्ट आपल्याला बाराबंकीमध्ये पहायला मिळणार आहे. 

बाराबंकी हे गाव साधारण दोन-अडीच लाखांचे. इथं वीज आणि रोजगाराची समस्या उग्र आहे. समाजवादी पार्टीने विधानसभा निवडणुकीदरम्यान दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. त्यामुळे लोक त्यांच्यावर नाराज आहेत. परिसरातील काही साखर कारखान्यांचे पुनरूज्जीवन करण्याचे आश्वासनही पार्टीने पाळेलेले नाही. त्यामुळेच यंदा समाजवादी पार्टीला लोक धडा शिकवतील, असं इथल्या काँग्रेस नि भाजपच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीच्या उमेदवारांची परिस्थिती इथं बिकट आहे. लढत आहे काँग्रेस आणि भाजपामध्येच.



बाराबंकी गावानंतर मग देवा आणि फतेहपूर या दोन गावांकडे निघालो. बाराबंकीहून फतेहपूर सुमारे ४१ किलोमीटर आणि देवा दोन्ही गावांच्या मध्ये. वाटेत जागोजागी पुदिन्याची शेती केली जाते. त्यामुळे बसमध्ये वा-याची झुळूक आली, की पुदिन्याचा गंध नाकामध्ये हळूवार शिरतो. असा अनुभव अधूनमधून येत असतो. पुदिन्याचा गंध घेत घेत आपण गावात येऊन पोहोचतो. देवा आणि फतेहपूर ही दोन्ही गावे मुस्लिमबहुल. फतेहपूरमधील एकूण २९ हजार मतदारांपैकी जवळपास १८ हजार मतदार मुस्लिम. मतदारसंघातच थोड्या बहुत प्रमाणात अशी परिस्थिती आहे. एकूण मतदारसंघातील मुस्लिमांची टक्केवारी सुमारे पंचवीस टक्क्यांपर्यंत आहे. त्यामुळंही भाजपची आणि पर्यायानं मोदी लाटेची कसोटी या मतदारसंघात आहे. हिंदू-मुस्लिम धुव्रीकरणाचा फायदा भाजपला होतो की काँग्रेसला, हे समजण्यासाठी देखील बाराबंकी एकदम योग्य मतदारसंघ आहे. 

फतेहपूरमध्ये काँग्रेसच्या बूथवर वीस-पंचवीस मुस्लिम कार्यकर्ते भेटले. त्यांचे नेतृत्त्व करीत होते, स्टार कॅम्पेनर अहमद सरकार. मुझफ्फरनगरच्या दंग्यानंतर मुस्लिम मोठ्या प्रमाणावर काँग्रेसकडे एकवटल्याचं त्यांच्याशी बोलण्यातन जाणवलं. लखनऊमध्ये चौक, आलमबाग, कैसरबाग आणि इतर काही मुस्लिम बहुल भागांमध्ये फिरताना जाणवलं होतं. लखनऊमध्ये मुस्लिम आता वेगळ्या पद्धतीनंही एकवटला असल्याची चर्चा सुरू आहे. म्हणजे शिया आणि सुन्नी यांच्यात बरेचदा मतदान कोणाला करायचे यावर एकमत नसते. म्हणजे सुन्नी बरेचदा काँग्रेसला मतदान करतात. तर अनेक शिया मुस्लिमांना भाजपबद्दल सॉफ्ट कॉर्नर असतो, असा आजवरचा अनुभव. पण मोदी फॅक्टरमुळे शिया-सुन्नी यांनी एकत्रितपणे काँग्रेसला एकगठ्ठा मतदान केले आहे, असे लखनऊमध्ये अनेकांशी बोलल्यानंतर ऐकायला मिळाले. अर्थात, त्यामुळे काँग्रेसला विजय मिळणार नाही, हे नक्की. कारण भाजपचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर आणि पूर्व लखनऊमधून मतदानाची टक्केवारी पंधरा टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे भाजप आश्वस्त आहे. 



सांगायचा हेतू असा, की मुस्लिम काँग्रेसकडे एकवटला आहे. मुझफ्फरनगरची दंगल हाताळण्यात समाजवादी पार्टीला अपयश आले. मुळात दंगल रोखली नाही. दंगलीवर लवकर नियंत्रण आणण्यात ते अपयशी ठरले आणि नंतर पुनर्वसनाचे कामही रेंगाळले. त्यामुळे मुस्लिम समाज मुलायमसिंह यांच्यावर जाम भडकला आला आहे. मोदी यांची पंतप्रधानपदासाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतरपासूनच मुस्लिम हळूहळू काँग्रेसकडे जाऊ लागला. त्यात आणखी एक कारण मिळाले मुझफ्फरनगर दंगल प्रकरणाचे. मुस्लिम दूर जाऊ लागल्यामुळेच आबू आसिम आझमी मुस्लिमांची डीएनए टेस्ट वगैरे करण्याची भाषा बोलत आहे. 

अहमद सरकार आणि फतेहपूर येथील अनेक मुस्लिम नागरिकांशी चर्चा केल्यानंतर खूप मुद्दे पुढे आले. एकतर सगळा मीडिया भाजपा आणि रास्वसंघाने विकत घेतला आहे, यावर मुस्लिम समाजाचा ठाम विश्वास आहे. दुसरे म्हणजे, नरेंद्र मोदी यांनी मुस्लिम समाजाच्या विकासासाठी विशेष कोणते आश्वासन दिले, आमच्यासाठी वेगळे काय करणार हे कुठे सांगितले, मग आम्ही त्यांना का पाठिंबा द्यावा, असे मुद्दे काही जणांनी व्यक्त केले. दुसरे म्हणजे अटलबिहारी वाजपेयी यांच्याबद्दल मुस्लिमांना विशेष आदर आहे. सौदी अरेबियाशी केलेल्या कुठल्याशा करारामुळे मुस्लिम नागरिकांना तिथं नोकरीसाठी जाण्यात सुलभता आली, असं त्यांचं म्हणणं होतं. शिवाय राजनाथ सिंह हे देखील मवाळ छबीचे आहेत. आम्हाला त्यांच्याबद्दलही आक्शेप नाही, असं काही तरुणांनी मत व्यक्त केलं. अहमद सरकार तर म्हणाले, की लालकृष्ण अडवाणी देखील आम्हाला चालतील पण मोदी नको. मी म्हटलं, अहो त्यांनी बाबरी मशिदीचे आंदोलन केले, ते तुम्हाला चालतील. सरकार म्हणाले, वो बहुत पुरानी बात हुई है... लेेकिन मोदी नही चाहिए. अगर वो हमारे पास आते, माफी माँगते, हात बढाते तो हम उन्हे भी सर्मथन देते. स्वीकार करते. मगर अब नाही....

मुस्लिमांना बाजूला ठेवून देशाचा विकास होणार नाही ध्यानात ठेवा. एकेक जण त्वेषाने आणि आवेषाने बोलत होता. गांधींना तुम्ही (म्हणजे हिंदूंनी) मारले, इंदिरा गांधींना मुस्लिमांनी नाही मारले, राजीव गांधी यांची हत्या मुस्लिमांनी नाही केली... तरी मुस्लिम दहशतवादी. प्रत्येक मुस्लिमाकडे दहशतवादी नजरेनं पाहणे सोडून द्या. आम्ही पण देशभक्त आहोत. भारताला आमचा देश मानतो. आमच्या देशभक्तीवर शंका घेणारे तुम्ही कोण... बापरे एका पाठोपाठ एक वाक्यांची सरबत्ती होत होती. अर्थात, त्यांचे काही मुद्दे बरोबर आणि पटण्यासारखेच होते. असंच आणखी इकडचं तिकडचंही बरंच काही बोलणं झालं. 



मुस्लिम समाज हा स्ट्रॅटेजिक व्होटिंग करतो हा इतिहास आहे. म्हणजे जो उमेदवार भाजपला पराभूत करण्याइतपत मजबूत असेल, त्यांना मुस्लिम मतदान करतात. बाराबंकीमध्ये त्यांनी काँग्रेसला मतदान केले, तर शेजारच्या सीतापूर मतदारसंघात बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराला त्यांनी मतदान केले. काँग्रेसकडून तेथे वैशाली अली उमेदवार आहेत. मात्र, त्या हाफ मुस्लिम आहेत. त्यांच्या विजयाची शक्यता कमी आहे. त्यामुळे तिथं बसपाच्या उमेदवारामागे मुस्लिम एकवटला आहे, अशीही माहिती मिळाली. 

थंडगार लिंबू सरबत पिऊन निघालो. लखनऊच्या दिशेनं निघालो असलो तरीही मनात विचार होता, त्या मुस्लिम मंडळींबरोबर केलेल्या चर्चेचा. त्यांच्या डोळ्यातील राग आणि शब्दाशब्दांमधून व्यक्त होणारी चीड अंगावर शहारे आणत होती. एखाद्याच्या देशभक्तिबद्दल आणि देशावरील निष्ठेबद्दल जर कुणी शंका घेत असेल, तर त्याला किती वाईट वाटू शकतं, याची कल्पनाही न केलेली बरी. अर्थात, मग बॉम्बस्फोट कोण घडवून आणतं, सुक्याबरोबर ओलंही जळतंच असं म्हणून सोडून द्यायचं का, सर्वांनाच एका तराजूत तोलून समाज किती गंभीर चूक करीत आहे, अशा अनेक गोष्टी मनात उमटत होत्या.  त्याच विचारत लखनऊपर्यंत येऊन पोहोचलो.

उत्तर प्रदेशमधील जातीय राजकारण, इथली आर्थिक नि सामाजिक परिस्थिती या विषयांवरही बरंच लिहायचं आहे. पुढील ब्लॉगमध्ये त्यावर लिहिण्याचा प्रयत्न करीन.

2 comments:

Anonymous said...

Ashish ji lekh faar sundar hota ,tumcha blog khup chaan aahe.asech lihit raha aani ajun mahiti aamhala det raha.raaybareli baddal suddha vachayala aavdel aamhala .dhanyavad.

DATTA JADHAV said...

मस्त चांगली माहिती मिळाली....