
सुवर्णपदक विजेत्यास तीन लाख ?
आशिष चांदोरकर ः सकाळ वृत्तसेवा
गुवाहाटी, ता. 11 ः राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत देदीप्यमान कामगिरी करून पदक मिळविणाऱ्या खेळाडूंना गौरविण्यासाठी राज्य सरकारने अधिक रकमेची पारितोषिके जाहीर करावीत, अशी इच्छा स्पर्धेत सहभागी झालेल्या अनेक खेळाडूंनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केली.
"यजमान आसामसह, हरियाना, उत्तर प्रदेश, पंजाब, केरळ आणि कर्नाटकसह इतर अनेक राज्यांनी पदक विजेत्या खेळाडूंसाठी भरघोस रकमेची पारितोषिके जाहीर केली आहेत. महाराष्ट्र सरकारने याबाबत अजूनही काही घोषणा केलेली नाही. चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन म्हणून राज्य सरकारकडून पारितोषिक आवश्यक असून, ते वेळेवर दिले जावे इतकीच खेळाडूंची अपेक्षा आहे, अशी मागणी हिंदकेसरी योगेश दोडके याने या वेळी केली.
यजमान आसामने सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला तीन लाख, रौप्यपदक विजेत्या खेळाडूला दोन लाख, तर ब्रॉंझपदक विजेत्या खेळाडूला एक लाख रुपयांचे पारितोषक जाहीर केले आहे. आसामप्रमाणेच उत्तर प्रदेशनेही तीन लाख, दोन लाख आणि एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्याची घोषणा केली आहे, तर पंजाब आणि हरियानाने सुवर्णपदक विजेत्या खेळाडूस एक लाख, रौप्यपदक विजेत्या खेळाडूस 51 हजार आणि ब्रॉंझपदक विजेत्या खेळाडूस 31 हजार रुपयांचे बक्षिस देण्याचे जाहीर केले आहे. याच धर्तीवर महाराष्ट्रातील पदक विजेत्या खेळाडूंना भरघोस रकमेची पारितोषिके देण्यात यावीत, अशी खेळाडूंची मागणी आहे.
द्रोणाचार्य पारितोषिक विजेते कुस्ती प्रशिक्षक महासिंग यांनी याबाबत वेगळा तोगडा सुचविला. ते म्हणाले, ""यजमान राज्य किंवा सर्वाधिक रकमेचे पारितोषिक जाहीर करणाऱ्या राज्याइतकेच पारितोषिक इतर राज्यांनीही द्यावे; अथवा प्रत्येक राज्याने किती पारितोषिक द्यावे यासंदर्भात एकमताने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. जेणे करून इतर राज्यांकडून स्पर्धेत सहभागी होण्याच्या खेळाडूंच्या सवयीला आळा बसेल.''
"पदक विजेत्या खेळाडूंना पारितोषिके देण्याबाबत मंगळवारी निर्णय होण्याची शक्यता आहे. मंगळवारी जलसंपदामंत्री अजित पवार आणि राज्याचे अर्थमंत्री जयंत पाटील यांच्यासमवेत बैठक होणार असून, त्यात राज्याकडून अधिकाधिक रकमेचे पारितोषिक जाहीर व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. राज्य सरकारप्रमाणेच महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेच्या वतीने काही रक्कम पारितोषिकांसाठी देता येईल का, याबाबत अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा सुरू आहे,'' असे महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी दूरध्वनीवरून बोलताना सांगितले.
खेळाडूंनी पारितोषिकांची चिंता करू नये. सरकार व ऑलिंपिक संघटना त्यांना नाखूष करणार नाही. मंगळवारी त्यांना चांगली बातमी समजेल, असेही श्री. लांडगे यांनी नमूद केले.
No comments:
Post a Comment