Thursday, June 14, 2007

बांबूचं लोणचं, बदकाचं मटण आणि गोड दह्यात रसगुल्ला


आशिष चांदोरकर ः सकाळ वृत्तसेवा

गुवाहाटी, ता. 17 ः पानांमध्ये शिजवलेला भात, खास त्या भातासाठी बनविलेली "काली डाल', वांग्याचं भरीत आणि बांबूचं लोणचं, जोडीला बदकाचं सुकं मटण, रोहू माशाचे कालवण... इतकंच नाही तर जेवण झाल्यानंतर मातीच्या वाडग्यात लावलेलं गोड दही आणि त्यात गुलाबजामसदृश फिकट तपकिरी रंगाचा "आसामी रोशोगुल्ला'... आसाममधील या अस्सल ग्रामीण जेवणाची प्रथमच चव चाखायला मिळाली. तीदेखील ब्रह्मपुत्रा नदीवर तंरगणाऱ्या "अल्फ्रेस्को क्रूझ'वर!!!

आसाम पर्यटन महामंडळाने खास पत्रकारांसाठी "गुवाहाटी दर्शन' कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आसामचे वैशिष्ट्य असलेली कामाख्या देवी, संपूर्ण गुवाहाटीचे दर्शन ज्या डोंगरावरून होते त्या डोंगरावर वसलेली भुवनेश्‍वरी माता, आसामची ओळख करून देणारे वस्तू संग्रहालय, ईशान्य भारतातील हस्तकला कृतींचे प्रदर्शन आणि अखेरीस महाकाय जहाजावर फक्कड आसामी जेवण असा बेत पर्यटन महामंडळाने आखला होता.

"क्रूझ' हे ब्रह्मपुत्रेच्या महाकाय पात्रातून पाणी कापत चाललेले असले तरी आपण विशाल सागरातूनच चाललो आहोत, असा अनुभव आपल्याला येतो. जहाजाच्या डेकवर थंडगार वाऱ्याची झुळूक अंगावर घेत होत असलेला प्रवास स्वप्नवत वाटतो. अर्थात, आसामी नागरिकांना याचे विशेष काही वाटत नाही. ब्रह्मपुत्रेवरील प्रवास ही त्यांची सवय असते. कारण गुवाहाटी शहराच्या मध्यभागातून ब्रह्मपुत्रा वाहते. गुवाहाटी शहरात नदीवर एकही पूल नाही. त्यामुळे एका भागातून दुसरीकडे जाताना बोटींचाच वापर होते. ब्रह्मपुत्रेवर गुवाहाटी शहराबाहेर एकच पूल आहे. खालून रेल्वे आणि वरून रस्ता अशा पद्धतीने हा पूल बांधण्यात आला आहे. तो पूलही आपल्याला "क्रूझ'वरून दूरवर दिसतो.

कामाख्या देवी, ब्रह्मपुत्रेतून "क्रूझ' प्रवास, काझीरंगा आणि इतर अभयारण्यांची सफारी, उत्तर आसाममधील चहाचे मळे आणि चहा उद्योग तसेच दिग्बोई व दिब्रूगड येथील तेल उद्योग ही आसामची ठेव असून, त्या आधारे पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे आसाम पर्यटन महामंडळाचे दिलीप बरुआ यांनी सांगितले. आसाममध्ये येणारे बहुसंख्य पर्यटक हे पश्‍चिम बंगालमधीलच असतात. उर्वरित भारतातील राज्यांच्या तुलनेत गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांमधून येणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षणीय आहे. मुंबई आणि पुण्यातूनही अनेक सहली आसाम दर्शनासाठी येत असतात. पर्यटन कंपन्याही हळूहळू "आसाम दर्शन'ची पॅकेज करू लागल्या आहेत, असे श्री. बरुआ यांनी स्पष्ट केले.

वर्षभरात आसाममध्ये चार लाखांहून अधिक पर्यटक येतात. त्यापैकी 25 हजारांपेक्षा अधिक हे परदेशी पर्यटक असल्याचे सांगून श्री. बरुआ म्हणाले की, ""आसाममध्ये उल्फामुळे कायम हिंसाचार असतो, असे चित्र देशभर निर्माण झालेले असले तरी दर वर्षी पर्यटकांची संख्या पाच ते सहा टक्‍क्‍यांनी वाढतच आहे. त्यामुळे आसामबाबतचा गैरप्रचार कमी झाल्यास ही संख्या आणखी वाढेल. देशभरातील नागरिकांनी निर्धास्तपणे आसाममध्ये सहलीसाठी यावे, असे माझे आवाहन आहे.''

No comments: