Thursday, June 14, 2007

"उल्फा' अतिरेक्‍याबरोबर दहा तास...

आशिष चांदोरकर ः सकाळ वृत्तसेवा
गुवाहाटी, ता. 8 ः संपूर्ण आसाम ज्या संघटनेच्या हिंसाचारामुळे होरपळून निघाला आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेवरील बहिष्कार मागे घ्यावा म्हणून खुद्द आसाम सरकारनेच ज्या संघटनेला दहा कोटी रुपयांची "ऑफर' दिल्याची चर्चा आहे, त्या "उल्फा' या अतिरेकी संघटनेच्या अतिरेक्‍यासह तब्बल दहा तास प्रवास करण्याची वेळ आल्याने गुवाहाटीला पोचण्यापूर्वीच "उल्फा"च्या दहशतीची धग अनुभवायला मिळाली. ती देखील वातानुकूलित डब्यामध्ये!
गुवाहाटीला जाण्यासाठी प्रस्तुत प्रतिनिधी सरायघाट एक्‍स्प्रेसच्या वातानुकूलित बोगीमधून प्रवास करीत होता. त्याच बोगीमध्ये दाढी आणि केस वाढलेली एक व्यक्ती; तसेच बारा ते पंधरा बंदूकधारी पोलिसांचा ताफा चढला. एखादा चोर किंवा दरोडेखोर असावा, अशी शक्‍यता सर्वांनाच वाटत होती. मात्र, पोलिसांच्या पहाऱ्यामध्ये ज्या व्यक्तीला नेण्यात येत होते, तो "उल्फा'चा अतिरेकी असल्याचे समजले आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या. बोगी वातानुकूलित असूनही सर्वांनाचा घाम फुटण्याची वेळ आली होती.
संबंधित अतिरेक्‍याला कोलकता येथे पकडले होते व त्याला न्यू जलपायगुडी येथे न्यायालयीन कारवाईसाठी नेण्यात येत होते. सामान्य डब्यामधून नेले तर हा कोण आहे, त्याला का पकडले आहे, कोठे नेण्यात येणार आहे, असे असंख्य प्रश्‍न उपस्थित होऊ शकतात. त्यामुळे अधिक लोकांपर्यंत ही माहिती पोचू नये, म्हणून त्याला वातानुकूलित बोगीमधून नेण्यात येत असल्याचे अतिरेक्‍याबरोबरच्या पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. त्याचे नाव सांगण्यास मात्र, अधिकाऱ्याने स्पष्टपणे नकार दिला.
वातानुकूलित बोगीच्या दोन्ही बाजूला दारांमध्ये बंदूकधारी पोलिस आणि दोन बोगींमधील जागेमध्येही पोलिस असल्याने बोगीला पोलिसांच्या गाडीचेच स्वरूप आल्यासारखे वाटत होते. अतिरेक्‍याला नैसर्गिक विधीसाठी नेण्यात आले, तेव्हाही पोलिसांनी आधी आत जाऊन सर्व काही ठीक असल्याची खात्री केली. त्यानंतरच त्याला आत पाठविण्यात आले. दोन मिनिटांचाही कालावधी झाला नसेल; पण तो आतच असल्याची खात्री करुन घेण्यासाठी पोलिसांची दारावर टकटक सुरू होती; पण पोलिसांच्या सुदैवाने काहीही विपरीत घडले नाही.
पोलिसांनी सांगूनही विचारणा करूनही उल्फाच्या त्या अतिरेक्‍याने अन्नाला स्पर्श केला नाही. तो फारसा कोणाशी बोलतही नव्हता. पोलिसच त्याची विचारपूस करीत होते. त्यांनाही तो जेवढ्यास तेवढे उत्तर देत होता. अखेरीस रात्री दोननंतर न्यूजलपायगुडी स्थानक आले आणि अतिरेक्‍यासह पोलिसांचा बंदोबस्त बोगीतून खाली उतरला. त्यानंतरचा प्रवास अगदी निर्धास्तपणे झोपून झाला. गुवाहाटीमध्ये आल्यानंतरही उल्फाच्या अतिरेकी कारवायांची धग किती असू शकते, याचा अंदाज पोलिस बंदोबस्तावरून येत होता. मात्र, रेल्वेच्या बोगीमध्ये आलेला अनुभव त्यापेक्षाही बोलका होता.

No comments: