Thursday, June 14, 2007

खऱ्या अर्थानं भारतात आल्यासारखं वाटतंय...

भारताच्या क्रीडा जगतातील नवजात अर्भक

आशिष चांदोरकर ः सकाळ वृत्तसेवा
गुवाहाटी, ता. 11 ः "आज खऱ्या अर्थानं भारताच्या मुख्य प्रवाहामध्ये सामील झाल्यासारखं वाटतं आहे...'' ही प्रतिक्रिया आहे प्रथमच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी झालेले खेळाडू आणि अधिकाऱ्यांची!
नागालॅंडहून वार्तांकनासाठी आलेल्या वार्ताहरांचाही काहीसा असाच सूर जाणवतो आहे. भारतीय ऑलिंपिक संघटनेचे (आयओए) अध्यक्ष सुरेश कलमाडी यांच्या पुढाकाराने गेल्या वर्षी नागालॅंडला "आयओए'चे सदस्यत्व प्रदान करण्यात आले. त्यामुळेच यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत नागालॅंडचा संघ पूर्ण ताकदीनिशी उतरतो आहे.
तायक्वांदो, वुशू, मुष्टियुद्ध, कुस्ती, सेपाकताक्रो (व्हॉलीबॉल व फुटबॉल यांचा संगम असलेला खेळ), तिरंदाजी, ऍथलेटिक्‍स, बॅंडमिंटन आणि वेटलिफ्टिंग अशा एकूण नऊ खेळांमध्ये नागालॅंडचे खेळाडू सहभागी होत आहेत. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी होण्यास मिळाल्यामुळे नागालॅंडचे खेळाडू आणि पदाधिकारी भलतेच उत्साहात आहेत. कुस्तीचे सामने असलेल्या तरुण राम फुकन स्टेडियमवर नागालॅंडच्या संघाची भेट झाली.
तेव्हा नागालॅंड ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष के. केडित्सू म्हणाले, ""कोणत्या शब्दात प्रतिक्रिया व्यक्त करू हेच समजत नाही. आता आम्ही भारताच्या क्रीडा जगतातील नवजात अर्भक आहोत. त्यामुळे सध्या तरी आम्ही खूप खूष आहोत. केवळ पदकांचेच नव्हे, तर सुवर्णपदकाचे खाते उघडण्याचा आमचा प्रयत्न आहे. इतकी वर्षं आम्ही खेळत होतो; पण राष्ट्रीय पातळीवर कोणीही आमची दखल घेत नव्हते. ही अडचण आता दूर होईल.''
"यापूर्वी सात वेळा मी राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत सहभागी झालेले आहे. पण इथला अनुभव खूपच निराळा आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमुळे आमच्या कामगिरीची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली जाईल आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकण्याची संधी आम्हाला मिळेल,'' अशी प्रतिक्रिया कुस्तीच्या 72 किलो गटात सहभागी झालेल्या वेलाखोलू हिने व्यक्त केली.
नागालॅंडमधून प्रसिद्ध होणाऱ्या "ईस्टर्न मिरर' या दैनिकाचा क्रीडा वार्ताहर कल्लोक डे वार्तांकनासाठी आला आहे. तो स्वतःही खेळाडू आहे. ""नागालॅंडच्या खेळाडूंना निसर्गाची देणगी असते. जेथे जेथे शरीराचा कस लागतो, तेथे नागा खेळाडू नेहमीच वरचढ ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. इतकी वर्षं आम्हाला प्रसिद्धी, संधी आणि प्रशिक्षणाची कमतरता भासायची. पण राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने ही कसर भरून निघाली आहे. यापूर्वीच्या पिढ्यांना जे मिळाले नाही, ते सध्याच्या खेळाडूंना मिळत आहे. त्याचा नक्कीच उपयोग होईल,'' असे डे याला वाटते.

No comments: