इतके दिवस आम्ही "कागदी वाघ' होतो. नुसतेच शब्दांचे चेंडू! पण न कर्त्याच्या वारी मात्र, कॉम्प्युटर आणि कागदावरुन थेट मैदानावर पोचलो. तेव्हा आलेला अनुभव केवळ अवर्णनीय. मुख्य म्हणजे कार्यालयात बसून आणि दूरचित्रवाणीवर सामने पाहून याची खेच, त्याला सल्ले दे, त्याची अक्कल काढ, उगाचच कोणालाही उपदेशाचे डोस पाज, असं करीत पत्रकारिता करणारे पुण्यातले बहुतांश क्रीडा पत्रकार खडकीच्या रेंजहिल्स मैदानावर जमले होते. कारण होतं "आयटी'तले अधिकारी आणि क्रीडा पत्रकार (नुसतेच खेळ आवडणारे नव्हे तर मैदानावर उतरण्याची आवड असणारेही) यांच्याल्या फुटबॉल सामन्याचं. महाराष्ट्र क्रीडा मंडळाने रोहन बिल्डर्सच्या सहाय्याने आयोजित केलेल्या "इंटर आयटी' फुटबॉल स्पर्धेमध्ये पत्रकार आणि "आयटी'तले अधिकारी यांच्यात फुटबॉलचा सामना होता. 45 अधिक 45 असा एकूण 90 मिनिटांचा सामना नव्हता. तर फक्त 15 अधिक 15 असा फक्त अर्धा तास आम्ही मैदानावर होतो. पण अक्षरशः घाम निघाला. "अमुक संघाने सोप्या संधी दवडल्या...' किंवा "तमुक गोलरक्षक चेंडू अडवू शकला नाही...' याचा प्रत्यक्ष अनुभव आम्ही मैदानावर घेतला.
आमच्या संघात आशिष पेंडसे (जागो) आणि सिद्धार्थ केळकर हे दोघेच क्लब स्तरावर फुटबॉल खेळलेले. पण तरीही त्यांचा गेल्या अनेक महिन्यांपासून (कदाचित वर्षांपासून) सराव नव्हता. उर्वरित सर्व खेळाडू हौशे, नवशे आणि गवशे होते. पास मिळाल्यानंतर चेंडू अडविणे, किक मारणे, व्यवस्थित पास देणे हे या बेसिक गोष्टींमध्येच वांदा होता. अगदी माझ्यापासून सगळ्यांचा. माझी एकूणच प्रकृती पाहून सर्वांनीच मला "गोलपोस्ट' सांभाळण्यास भाग पाडले. पण मी देखील मनापासून गोलरक्षक बनण्यास उत्सुक होतो. कारण आपल्या आवडत्या खेळाडूंपैकी एक म्हणजे जर्मनीचा ऑलिव्हर कान. त्याचे काम किती अवघड आणि जिकिरीचे आहे, त्याचा अनुभव मला घ्यायचा होता.
पहिल्याच मिनिटाला माशी शिंकली. विजय जगताप हा "डी'मध्ये असताना त्याच्या हाताला चेंडू लागला आणि प्रतिस्पर्धी संघाला "पेनल्टी किक' बहाल करण्यात आली. गोल झाला हे योगायोगाने आलेच. 1984 ते 92 या कालावधीत भारताकडून खेळणाऱ्या संतोष कश्यप यांनी हा पहिला गोल केला. सद्यस्थितीत कौशिक हे महिंद्राचे "लेव्हल टू' प्रशिक्षक आहेत. कौशिक यांनीच पुढे आम्हाला वारंवार सताविले. खेळताना सराव किती महत्त्वाचा हे आम्हाला पटत होते. खेळात सुसूत्रता नव्हती, बचाव फळी भेदली जात होती, आक्रमकांना यश येत नव्हते ही बातम्यांमध्ये लिहिलेली वाक्ये आमच्या समोर घडत होती. (दुर्दैवाने फक्त आमच्या बाबतीच)
आम्हाला त्याचे काही दुःख नव्हते. कारण आम्ही फक्त खेळण्यासाठी मैदानात उतरलो होते. विजयासाठी प्रयत्न केले नाहीत, असे नाही. पण विजय मिळणे अवघड आहे, हे आम्हाला माहिती होतेच. त्यामुळे कमीत कमी गोलने पराभव हे उद्दिष्ट डोळ्यासमोर होते. आणखी एक म्हणजे आपल्या अंगात जी रग असते ती जिरविण्याचा खेळणे हा खूप चांगला पर्याय आहे. बऱ्याच वर्षांनंतर ती रग आज जिरली. पूर्वार्धात केळकर, सलील कुलकर्णी आणि पेंडसे यांनी काही सुरेख चाली रचल्या. दोन ते तीन वेळा चेंडू अगदी "गोलपोस्ट'जवळ नेण्यात आमच्या खेळाडूंना यश आले. पण "गोल' साध्य होत नव्हता. पूर्वार्धात आणखी दोन गोल झाले. (अर्थातच, आमच्यावर) त्यापैकी एक कौशिक यांनीच केला. तो मैदानी गोल होता. तर तिसरा गोल माझ्याच चुकीमुळे झाला. "डी'मधून चेंडू टाकताना किंवा "किक' मारताना थोडी गडबड होत होती आणि चेंडू प्रतिस्पर्धी खेळाडूंकडेच जात होता किंवा चुकीच्या दिशेला जात होता. त्यातच एकदा मी मारलेला चेंडू फार लांब न जाता जवळच उभ्या असलेल्या प्रतिस्पर्धी खेळाडूकडे गेला. कपाळाला हात लावण्यापलिकडे काहीच पर्याय नव्हता.
उत्तरार्ध आमच्यासाठी थोडा चांगला ठरला. बहुतांश वेळ "आयटी'च्या हाफमध्येच चेंडू होता. चार ते पाच वेळा गोल करण्याचे प्रयत्न आमच्याकडून झाले. त्यापैकी एक-दोनदा तर अगदी थोडक्यात गोल होता होता वाचले. त्यामुळे थोडा हुरुप आला. उत्तरार्धातील पहिला आणि सामन्यातील चौथा गोल थोडा गंमतशीर पद्धतीने झाला. प्रतिस्पर्धी खेळाडू चेंडू घेऊन आमच्या "डी'मध्ये आला. त्याला अडविण्यासाठी मी पुढे सरसावलो. तेवढ्यात त्याने मला चकवून चेंडू गोलपोस्टसमोर ढकलला. सुदैवाने तेव्हा तेथे त्यांचा कोणीच खेळाडू नव्हता. त्यामुळे आमच्या एका खेळाडूला चेंडू अडव, असे सांगितले. तेव्हा कदाचित आपण क्रिकेट नव्हे तर फुटबॉल खेळत आहोत, याचा त्याला विसर पडला आणि त्याने "डी'मध्ये चक्क हाताने चेंडू अडविला. आपण हे काय केलं, हे दोन क्षण त्यालाही कळलं नाही. पण दोन सेकंदांनंतर सारेच हास्यकल्लोळात बुडाले. इथेच आमच्यावर चौथा आणि शेवटचा गोल झाला.
गोलरक्षण करताना गडबडीत दोन-तीन सूर मारले. एकदा चेंडू अडविला आणि दुसऱ्यांदा प्रतिस्पर्धी संघातील एका खेळाडूला आडवा केला. "आयबीएम' कंपनीत काम करणारा तो खेळाडू पुन्हा आमच्या "गोलपोस्ट'कडे फिरकला नाही. 4-0 याच निकालावर सामना संपला. सामना हरलो पण हरल्याचे दुःख नव्हते. खेळल्याचे समाधान होते.
आमचा संघ ः आशिष पेंडसे (कर्णधार), सिद्धार्थ केळकर, मिकी आग्नेर, मायकेल जोसेफ, सलील कुलकर्णी, आनंद चयनी, हेमंत जाधव, विजय जगताप, आशिष फडणीस, निखिलेश पाठक, मुकुंद पोतदार (पोतोस्की), श्रीराम ओक, चंदन हायगुंडे आणि आशिष चांदोरकर (गोलरक्षक). "नॉन प्लेईंग कॅप्टन' ः राजेंद्र कानिटकर, व्यवस्थापक ः अमित डोंगरे, "नॉन प्लेईंग मॅनेजर' ः भास्कर जोशी, समर्थक ः मनिष कांबळे.
शब्द सुंदर तेथे राम... This place is to know various aspects that i present through my various news and articles.
Saturday, August 25, 2007
"कागदी वाघ' उतरले मैदानावर
Thursday, August 23, 2007
चक दे इंडिया...

"एकदा पाहिल्यानंतर वारंवार पाहण्याची इच्छा होणारा चित्रपट.' "चक दे इंडिया' या चित्रपटाचं परीक्षण करण्यास सांगितलं तर ते एका वाक्यात अशाप्रकारे करता येईल. हॉकी या अत्यंत वेगवान व जोशपूर्ण खेळावर आधारित हा चित्रपटही तितकाच वेगवान आणि जोशाने भरलेला आहे. एकदम वरच्या दर्जाचे संवाद आहेत. इतकेच नव्हे तर संघबांधणीपासून ते विजेतेपदापर्यंतच्या प्रवासापर्यंतचे अनेक प्रसंग खूपच उद्बोधक आहेत.
प्रसिद्धीमाध्यमे, सरकार, प्रायोजक व प्रेक्षक या चौकडीकडून भारतात हॉकीला किंवा अधिक स्पष्टपणे बोलायचं झालं तर महिला हॉकीला जी वागणूक मिळते, त्याचं यथार्थ चित्रण चित्रपटात करण्यता आलं आहे. सुदैवानं महिला हॉकीवरील चित्रपटाला मिळणारा विलक्षण प्रतिसाद पाहून भारावून जायला होतं. गल्लाभरु चित्रपटांची निर्मिती करण्यापेक्षाही काही जण वेगळा प्रयत्न करताना दिसतात आणि त्याला प्रेक्षकही उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त करतात, हे खूपच आनंददायी आहे.
मीररंजन नेगी यांच्या आयुष्यात घडलेल्या घटनांचे सादरीकरण चित्रपटात करण्यात आले आहे. 1982 च्या आशियाई स्पर्धेच्या वेळी नेगी हे भारताचे गोलरक्षक होते. "पेनल्टी शूटआऊट'मध्ये भारत पाकिस्तानकडून पराभूत होतो व त्याचं खापर नेगी यांच्यावर फुटतं. त्यांनी पाकिस्तानकडून पैसे खाल्ले आणि गोल अडविले नाही, असंही म्हटलं जातं. त्यांची कारकिर्द संपते. पुढे हेच नेगी 1998 साली भारताने जिंकलेल्या आशियाई सुवर्णपदकाचे खरे मानकरी ठरतात. 98 साली धनराज पिल्लेच्या नेतृत्त्वाखाली भारत बॅंकॉकला गेला होता. त्यावेळी नेगी हे भारताचे गोलरक्षण प्रशिक्षक होते. तेव्हा सुबय्या नामक गोलरक्षक संघात हवा, हा धनराजचा आग्रह होता. पण नेगी यांनी आशिष बल्लाळच कसा योग्य आहे, हे धनराजला पटवून दिले. अखेरीस सुबय्याऐवजी बल्लाळ मैदानात उतरला आणि दक्षिण कोरियाविरुद्धच्या सामन्यात "पेनल्टी शूटआऊट'मध्ये बल्लाळनेच भारताला तारले व नेगी यांचा निर्णय सार्थ ठरविला. हेच नेगी 2002 मधील राष्ट्रकुल स्पर्धेसाठी महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक बनले. त्या संघाने सुवर्णपदक जिंकण्याची कामगिरी करुन नेगी यांच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला.
"चक दे इंडिया'मध्ये त्याच मीररंजन नेगींची चित्तरकथा काहीशी नाट्यमय स्वरुपात दाखविण्यात आली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात "पेनल्टी स्ट्रोक'वर गोल न करता आल्याने कबीर खानची कारकिर्द संपुष्टात येते. एकतर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पराभव आणि त्यातूनही कबीर खान मुसलमान. त्यामुळे भारताच्या सर्वोत्तम "सेंटर फॉरवर्ड' कबीरला "गद्दार' ही पदवी बहाल करण्यात येते आणि तेथेच त्याची कारकिर्द संपते.
तब्बल सात वर्षे अपमान आणि अवहेलना सहन केल्यानंतर विश्वकरंडक स्पर्धेसाठी महिलांच्या हॉकी संघाचा प्रशिक्षक बनण्यासाठी तो हॉकी महासंघाच्या कार्यालयात अवतरतो. नाराजीनेच त्याला हॉकी संघाचे प्रशिक्षक करण्यात येते. तेव्हापासून सुरु होते एका खडतर पण आश्वासक प्रवासाची सुरवात. भारतात अजूनही खेळ म्हणजे फक्त "टाईमपास' हे गणित पक्के आहे. त्यातूनही एखाद्या मुलीला त्यात करियर करायचे असेल तर किती अडचणी येतात, त्याची आपण कल्पना करु शकतो. मुलगी अजूनही "चूल आणि मूल' हे अजूनही भारतीयांच्या मनात पक्के आहे. त्याला छेद देण्याचा प्रयत्न चित्रपटात करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर नामांकित क्रिकेटपटू त्याच्या हॉकीपटू प्रेयसीला किती तुच्छतेने वागवितो, ते देखील अत्यंत चपखलपणे चित्रित करण्यात आले आहे.
भारताचा संघ तयार करताना आंध्रप्रदेश, दिल्ली, महाराष्ट्र, काश्मीर, पंजाब, झारखंड या प्रांतांप्रमाणेच मिझोरम आणि मणिपूर या ईशान्येच्या राज्यांमधील खेळाडूचांही भारतीय संघात आवर्जून समावेश करण्यात आला आहे. झारखंड या प्रांताबद्दलचे अज्ञान, मिझोरम व मणिपूरमधील खेळाडूंना परदेशी नागरिकांप्रमाणे मिळणारी वागणूक व खेळाडूंनी ओळख करुन देताना स्वतःला फक्त राज्यापुरते सिमीत ठेवणे आदी छोट्या छोट्या प्रसांगांमधून चित्रपट प्रेक्षकांवर चांगली पकड निर्माण करतो.
संघबांधणी करताना खेळाडूंचे हेवेदावे, वरिष्ठ-कनिष्ठ वाद, खेळाडूंची "पोझिशन' अशा अनेक गोष्टींमुळे निर्माण झालेले तंटे सोडविण्याचे कबीर खानचे कसब वाखाणण्याजोगे आहे. प्रत्येक "फॉरवर्ड'ला आपल्या नावावर गोल होण्याची असलेली इच्छा आणि त्यामुळे हातच्या निसटणाऱ्या संधी हे काही नवीन नाही. पण "तुम्ही पुढे गेला नाहीत तरी चालेल पण चेंडू पुढे गेला पाहिजे,' अशा एकेका वाक्यातून कबीरने दिलेले धडे प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवितात. कर्णधारपदावरून वरिष्ठ खेळाडूंचे प्रशिक्षकासमवेत उडणारे खटके आणि बहिष्काराचे अस्त्र, प्रायोजकांअभावी महिलांच्या संघाऐवजी पुरुषांच्या संघाला विश्वकरंडक स्पर्धेसाठी पाठविण्याचा हॉकी महासंघाचा हट्ट, कर्णधार होण्यासाठी प्रशिक्षकाशी शरीरसंबंध ठेवण्यास तयार होणारी वरिष्ठ खेळाडू हे प्रसंग सत्यपरिस्थितीची दाहकता दाखवून देतात. अखेरीस पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, वंग अशा भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या महिला खेळाडूंची मोट बांधण्यात कबीर खान यशस्वी होतो.
प्रत्यक्ष सामन्यांवेळी भारतीय खेळाडूंना येणारी इंग्रजी भाषेची व त्यामुळे संवादाची अडचण, ऑस्ट्रेलियाचे "लॅपटॉप' प्रशिक्षक आणि डोक्यात रणनिती तयार करणार कबीर खान यांच्यातील फरक, निर्णायक सामन्यातही संघापेक्षा वैयक्तिक गोलसंख्येला अधिक महत्त्व देणारे खेळाडू आणि कोऱ्या करकरीत हॉकी स्टिक्स, बूट व टी-शर्ट पाहिल्यानंतर भारतीय खेळाडूंना होणारा आनंद या गोष्टी खूपच सूचक आणि सत्य परिस्थितीदर्शक आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्धचा अंतिम सामना "पेनल्टी शूटआऊट'मध्ये जातो. तेव्हा पाय आणि हॉकी स्टीक हलविण्याच्या ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या कृतीवरुन ती चेंडू कुठे मारणार हे आधीच ओळखून गोलरक्षकाला इशारा करणारा कबीर खान (म्हणजेच मीररंजन नेगी) हॉकीचा किती सखोल अभ्यासक आहे, हे दाखविण्यात आले आहे.
तुम्ही क्रीडाप्रेमी असा किंवा नसा, हॉकी तुम्हाला आवडत असो किंवा नसो पण हा चित्रपट जरुर पहा. एकदा नव्हे तर दोनदा-तीनदा पहा. तुम्हीच पाहू नका तर इतरांनाही चित्रपट पाहण्याची विनंती करा. त्यानिमित्ताने का होईना पण क्रिकेटवेड्यांच्या देशात हॉकी या राष्ट्रीय खेळाची तोंडओळख होईल. हॉकीला आयुष्य वाहणाऱ्या धनराजसारख्या हॉकीपटूंची उपेक्षा करणे किती मोठे पाप आहे, याची पुसटशी जाणीव होईल.
ता.क. ः तुम्हाला शाहरुख खान आवडत नसला तरी हा चित्रपट जरुर पहा!
Mukund Potadar has also written about this movie on his blog. Please read his article also if you want more and inner details. His blog id is :
Saturday, August 18, 2007
भारताचा राष्ट्रीय खाद्यपदार्थ कोणता?
पुरीभाजी, सामोसा की पाणीपुरी
महाराष्ट्रातील बाभळेश्वर (जि. नगर) येथील एका टपरीपासून ते भारताच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या गुवाहाटीतील (आसाम) एका हातगाडीपर्यंत सर्वच ठिकाणी चहा आणि कॉफीप्रमाणे मिळणारा खाद्यपदार्थ म्हणजे पुरीभाजी आणि सामोसा!वेगवेगळ्या कारणांनी भारताच्या विविध भागांमध्ये गेल्यानंतर अगदी सहजपणे आणि स्वस्तात उपलब्ध होणारे दोन पदार्थ अशी पुरीभाजी आणि सामोसा यांची ओळख करुन द्यावी लागेल.
पाणीपुरी देण्याची पद्धतही औरच असते. बहुतांश ठिकाणी प्लेटनुसार पाणीपुरी दिली जाते व प्लेटमधील पाच, सहा किंवा आठ पुऱ्या संपल्यानंतर विक्रेता आपल्याला एक प्लेट झाल्याची सूचना देतो. त्यानंतर हवी असेल तर दुसरी प्लेट सुरु करतो. गुजरातमध्ये अनेक भागात आपण पुरे म्हणेपर्यंत विक्रेता आपल्या प्लेटमध्ये पुऱ्या ठेवत असतो. तिकडे प्लेटची बात नसतेच. आपण जितक्या पुऱ्या खाऊ त्याचे तो आठ आण्याप्रमाणे पैसे आकारतो. आहे की नाही गंमत.
भारताचा राष्ट्रध्वज ः तिरंगा, राष्ट्रगीत ः जन गण मन, राष्ट्रीय पक्षी ः मोर, राष्ट्रीय प्राणी ः वाघ, राष्ट्रीय खेळ ः हॉकी, राष्ट्रीय फूल ः कमळ आणि राष्ट्रीय खाद्यपदार्थ ः ? नाही ना माहिती. खरं सांगायाचं झालं तर मलाही माहिती नाही आणि असा कुठलाच खाद्यपदार्थ राष्ट्रीय खाद्यपदार्थ म्हणून निश्चित झालेला नाही. पण माझं मत विचाराल तर पुरीभाजी, पाणीपुरी किंवा सामोसा हे तीन पदार्थ राष्ट्रीय खाद्यपदार्थ म्हणून मान्यताप्राप्त होण्यास अडचण नाही.

भारताच्या कोणत्याही भागात गेल्यानंतर पंजाबी खाद्यपदार्थ, दाक्षिणात्य पदार्थ, चाट, भेळ आणि पाणीपुरी तसेच चायनीज खाद्यपदार्थ मिळतात. पण तरीही त्यांची ओळख विशिष्ट राज्यापुरती किंवा विशिष्ट राज्यांपुरतीच आहे. भेळ हा आणखी एक पदार्थ या स्पर्धेत उतरु शकला असता. पण भारतातील सर्वच ठिकाणी भेळ मिळते की नाही, याबाबत साशंकता आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर हैद्राबादमध्ये सहजासहजी भेळ मिळत नाही. अगदी एखाद-दोन ठिकाणी मिळते. त्यामुळे भेळ हा पदार्थ यादीत घेऊ नये, असं मला वाटतं.
पुरीभाजी, पाणीपुरी व सामोसा या पदार्थांची ओळख एखाद्याच राज्यापुरती मर्यादित नाही. ते काही महाराष्ट्रीयन नाहीत, दाक्षिणात्य नाहीत वा पंजाबीही नाहीत. पण तरीही भारतभर हे पदार्थ अगदी सहजपणे मिळतात, म्हणूनच त्या पदार्थांना "राष्ट्रीय' म्हणावेसे वाटते. अभिजीत कांबळे नावाच्या माझ्या मित्राचं लग्न नगर जिल्ह्यातील बाभळेश्वर जवळच्या एका गावात होतं. त्या निमित्तानं बाभळेश्वरला मुक्कामाची संधी मिळाली. त्यावेळी सकाळी टपरीवर चहा पिण्याच्या हेतूनं गेलो. पाहतो तर काय चहावाला मस्त पुरीचा घाणा काढत होता. त्याला म्हटलं भाजी कोणती आहे. तेव्हा नवाच प्रकार पहायला मिळाला. कांदा-बटाट्याची परतून केलेली भाजी (डोसा) त्यानं डिशमध्ये घेतली आणि त्यावर झणझणीत तर्री असलेली मटकीची उसळ अक्षरशः ओतली. वेगळ्या डिशमध्ये पुरी देऊन माझ्यासमोर ठेवत म्हटलं "घ्या साहेब'.
नाही म्हटलं तरी पुण्या-मुंबईतल्या हॉटेलांमध्येही पुरीभाजी मिळतेच की. "पुरीभाजी'ची "ऑर्डर' दिली की पुरीसोबत येते बटाट्याची परतून केलेली भाजी आणि पातळ भाजी हवी असेल तर "ऑर्डर' द्या "कुर्मापुरी'ची. नाशिकपासून ते नागपूरपर्यंत आणि औरंगाबादपासून ते सोलापूरपर्यंत पुरीभाजी किंवा कुर्मापुरी मिळत नसलेलं हॉटेल शोधून सापडणं अवघड!
हैद्राबादमध्ये असताना तशी सगळीकडेच पुरीभाजी मिळायची. पण आमचा एक ठरलेला चाचा होता. त्याच्याकडे कांदा, बटाटा, टॉमेटो व इतर काही अगम्य भाज्या घालून "कुर्मा'सारखी भाजी केलेली असायची. थोडीशी आंबट चव (चिंचेमुळे) असलेली भाजी चवीला काही निराळीच! अगदी उडुपी दुकांनांमधून वा रस्त्यांवरील गाड्यांवरही पुरीभाजीची विक्री व्हायची. पाच रुपयांमध्ये चार पुऱ्या आणि "अनलिमिटेड' भाजी. तिकडं बटाट्याच्या परतून भाजीची बात नश्शे. एक-दोन दुकांनांमध्ये "डोसाभाजी'ची रस्साभाजी मिळायची. पण खरं सांगांयचं तर एकदा खाल्ल्यानंतर पुन्हा ती रस्सा "डोसाभाजी' खायची इच्छाच झाली नाही.
मध्य आणि उत्तर भारतात भोपाळ, ग्वाल्हेर, झॉंशी, मथुरा, आग्रा आणि खुद्द दिल्लीतही अगदी सक्काळी सक्काळी भरपेट नाश्ता करण्याची पद्धत आहे. गरमा-गरम दूध, जिलेबी आणि पकोडे या नाश्त्याच्या सोबतीला स्टॉलवर किंवा हॉटेलांमध्ये मिळते ते पुरीभाजी! तिथली भाजीही रस्सा भाजीकडे झुकलेली आणि पुऱ्या आकाराला अंमळ मोठ्या व भटुऱ्याच्या जवळ जाणाऱ्या. चना-भटुरा हा देखील पुरीभाजीच्याच जवळ जाणारा आणखी एक खाद्यपदार्थ. गुजरातेतही सुरत, भरुच, बडोदा, अहमदाबाद आणि राजकोटवासियांनाही हा पदार्थ नवीन नाही. सुरतची पुरीभाजी तर अगदी सुप्रसिद्ध होती. आता इतरही पदार्थ आल्यानं तिची लोकप्रियता घटली असावी.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी गुवाहाटीला जाणं झालं व पश्चिम बंगाल तसंच आसाममध्येही हा पदार्थ अगदी सहजपणे मिळत असल्याचं स्पष्ट झालं. हावडा स्टेशनसमोर असलेल्या छोट्या टपरीवजा हॉटेलवर सकाळी पुऱ्यांचा घाणा निघत असतो. गुवाहाटीमध्ये सकाळी चहाबरोबर नाश्त्याला पुरीभाजी तसंच सामोसा हे दोन पदार्थ हमखासपणे मिळतात. इतकंच काय तर एका अण्णाच्या हॉटेलवरही पुरीभाजीचा "मेन्यू'मध्ये समावेश असल्याचं दिसतं. चव मात्र, अगदी आपल्या महाराष्ट्रात मिळते तशीच!
तमिळनाडू आणि केरळमध्ये जाणं झालं नाही, पण आमचा दाक्षिणात्य मित्र देविदास देशपांडे यानं सांगतिलेल्या माहितीनुसार केरळ आणि तमिळनाडूतही पुरीभाजी अगदी सर्रास उपलब्ध असते. फक्त तिकडं पुऱ्या मैद्याच्या असतात. पण त्यात काही विशेष नाही आसाम, बंगाल आणि अगदी हैद्राबादेतही पुऱ्या मैद्याच्याच असतात. तसंच केरळ आणि तमिळनाडूत भाजीमध्ये धने पावडर मोठ्या प्रमाणावर वापरलेली असते. त्यामुळं तिथल्या भाजील जराशी निराळी चव असते. मेघालयाची राजधानी शिलॉंगमध्येही पुरीभाजी मिळते. (अधिका माहिती म्हणजे तिकडं तिथं वडापाव देखील मिळतो.)
पाणीपुरी पण स्पर्धेत...
पाणीपुरी न आवडणारी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. सापडलीच तर ती व्यक्ती संशोधानाचा विषय होऊ शकते. पाणीपुरीला काही ठिकाणी (विशेषतः उत्तर भारतात) गोलगप्पे म्हणून संबोधलं जातं. पण नाव बदललं म्हणून चव बदलत नाही. शिजवलेल्या वाटाण्याचा किंवा हरभऱ्याचा रगडा, पुदीना आणि मिरचीच्या ठेच्यापासून बनविलेलं तिखट पाणी तसंच चिंच आणि गूळ यांच्यापासून बनविलेलं आंबटगोड पाणी यांचं अफलातून मिश्रण म्हणजे पाणीपुरी. आता भारतातल्या काही भागात फक्त तिखट पाणीच पाणीपुरीमध्ये टाकलं जातं. तर काही ठिकाणी पाणीपुरी खाताना बरोबर बारीक चिरलेला कांदा दिला जातो. पाणीपुरी मिळाल्यानंतर काही शौकिन कांदा टाकून आस्वाद घेतात.

... आणि सामोसाही!
सामोश्याबद्दल तर काहीच बोलायला नको. हा पदार्थ भारताच्या कानाकोपऱ्यात मिळतो. त्यातही इराण्यांच्या दुकानात मिळणारा सामोसा थोडासा निराळा. त्याच्या सारणात कोबीचा भरणा अधिक. इतर ठिकाणच्या सामोश्यात बटाटा आणि मटार (किंवा वाटाणा) यांची मक्तेदारी. आता काही ठिकाणी पट्टीचे सामोसेही मिळू लागले आहेत. पण त्यात फारसा दम नाही. सारण कमी आणि चावण्याचेच श्रम जास्त.
तुम्हाला काय वाटतं कोणता पदार्थ भाराताच राष्ट्रीय खाद्यपदार्थ बनण्यास अधिक पात्र आहे. या तीनपैकी एखादा पदार्थ असावा की आपल्या मतानुसार आणखी एखादा पदार्थ राष्ट्रीय खाद्यपदार्थ बनण्यास लायक आहे. तुमची प्रतिक्रिया "कॉमेंट्स'मध्ये नक्की लिहा.
Monday, August 13, 2007
लक्षात राहणारी गटारी...
पळा पळा... लवकर पळा... पटकन गाडी काढ रे... उगाच लटकायचो... चल पळ लवकर... अशी वाक्य एखाद्या पत्रकाराच्या तोंडून कधी ऐकली आहेत का? थोडंसं मजेशीर वाटतं ना? हो पण असं घडलंय. ऐन गटारीच्या मुहूर्तावर रात्री एक वाजता...
स्थळ बाबा भिडे पुलाजवळील खाद्यपदार्थांचे स्टॉल. दृश्य नेहमीचेच म्हणजे सुमारे शंभर ते सव्वाशे टेबलांवर खाण्यासाठी किंवा कॉफी पिण्यासाठी जमलेले नागरिक. अचानक पोलिसांची गाडी येते. कोणालाही कल्पना नसताना टेबलवर जेवत बसलेल्या ग्राहकांवर पोलिसांचा लाठीमार सुरू होतो. या अनपेक्षित धक्क्यामुळं सारे ग्राहक जेवण सोडून पळत सुटतात. त्याचवेळी ऑफिसची काम आटोपून कॉफी पिण्यासाठी खडकेच्या स्टॉलवर जमलेल्या पत्रकारांनाही पळण्यावाचून पर्याय नसतो. फुकटच एखादी काठी आपल्यावर पडली तर काय घ्या!
खाया-पिया कुछ नही ग्लास तोडा बारा आना' अशी अवस्था होण्याच्या आत पळ काढलेला बरा नाही का?यानिमित्ताने पोलिसांचा माज अनुभवण्याची पुन्हा एकदा संधी मिळाली. केवळ ग्राहकांवर लाठीमार करुन ही मंडळी थांबली नाहीत. तर त्यांनी जेवणाची टेबलंही लाथाडली. होत्याचं नव्हतं करुन टाकलं. पुन्हा इथं दिसला तर याद राखा, अशा थाटात धमकाविण्यास त्यांनी सुरवात केली. दहशतीच्या दहा ते बारा मिनिटांमध्ये सारा परिसर मोकळा झाला. एव्हाना स्टॉलधारकांचे काही हजार "गटारात' गेलेले असतात अन् पोलिसांची "गटारी' साजरी झालेली असते.
गेल्या अनेक वर्षांपासून भिडे पुलाशेजारी (झेड पुलाखाली) खाद्यपदार्थांचे स्टॉल सुरू आहेत. रात्री उशिरा अगदी दीड वाजेपर्यंत हे स्टॉल सुरू असतात. त्यानंतर पोलिसांची गाडी येते आणि हळूहळू स्टॉल बंद होण्याची प्रक्रिया सुरू होते. हा इथला गेल्या कित्येक वर्षांपासूनचा अनुभव. पोलिस आल्यानंतर प्रथम स्टॉलधारकांना समजावून सांगतात आणि तरीही त्यांनी ऐकले नाही, तर त्यांच्यावर कारवाई करतात. ग्राहकांवर कारवाई करण्याची घटना आतापर्यंत घडलेली नव्हती. मात्र, गटारी अमावास्येच्या निमित्ताने काल ही कसरही भरून निघाली. रात्री "कर्तव्या'वर असलेले पोलिस अधिकारी आणि दोन-तीन हवालदार असा ताफा जीपमधून उतरला आणि त्यांनी पुढे मागे न पाहता टेबलांवर बसलेल्या ग्राहकांवर थेट लाठ्या उगारल्या. इतके करून ते थांबले नाहीत, तर शेवटपर्यंतची टेबल पायाने लाथाडली आणि लाठीमारही सुरूच ठेवला.
""तुम्ही माझ्यावर कारवाई करा पण ग्राहकांवर लाठीमार करू नका. आमच्या पाठीवर मारा पण पोटावर मारु नका,'' अशी विनंती स्टॉलधारकांनी केली; पण संबंधित अधिकाऱ्याने कोणालाच जुमानले नाही. ""गस्तीला येणाऱ्या बाकीच्या अधिकाऱ्यांचे मला माहिती नाही; पण मी राऊंडला आलो, की असेच होणार,'' असे प्रत्युत्तर "त्या' अधिकाऱ्याने दिले.आतापर्यंत अशी घटना कधीच घडलेली नसल्यामुळे भांबावलेले ग्राहक आपापल्या गाड्या घेऊन निघून जातात. त्यानंतर आपली काहीही चूक नसल्याची जाणीव झालेल्या स्टॉलधारकाचा आवाज चढतो. त्यासरशी त्याच्याशी संवाद मध्येच तोडून पोलिसांचा ताफाही निघून जातो.
मात्र त्याचवेळेस नदीकाठच्या रस्त्यांवर मोटारींमध्ये बसून मद्यप्राशनाचा आस्वाद लुटणाऱ्या शौकिनांकडे कर्तव्यावरील पोलिसांचे साधे लक्षही गेलेले नसते. आहे की नाही कमाल? एरवी चिकन किंवा मटण हाणून साजरी होणाऱ्या गटारीपेक्षा ही गटारी चांगलीच लक्षात राहणारी ठरली...
स्थळ बाबा भिडे पुलाजवळील खाद्यपदार्थांचे स्टॉल. दृश्य नेहमीचेच म्हणजे सुमारे शंभर ते सव्वाशे टेबलांवर खाण्यासाठी किंवा कॉफी पिण्यासाठी जमलेले नागरिक. अचानक पोलिसांची गाडी येते. कोणालाही कल्पना नसताना टेबलवर जेवत बसलेल्या ग्राहकांवर पोलिसांचा लाठीमार सुरू होतो. या अनपेक्षित धक्क्यामुळं सारे ग्राहक जेवण सोडून पळत सुटतात. त्याचवेळी ऑफिसची काम आटोपून कॉफी पिण्यासाठी खडकेच्या स्टॉलवर जमलेल्या पत्रकारांनाही पळण्यावाचून पर्याय नसतो. फुकटच एखादी काठी आपल्यावर पडली तर काय घ्या!
खाया-पिया कुछ नही ग्लास तोडा बारा आना' अशी अवस्था होण्याच्या आत पळ काढलेला बरा नाही का?यानिमित्ताने पोलिसांचा माज अनुभवण्याची पुन्हा एकदा संधी मिळाली. केवळ ग्राहकांवर लाठीमार करुन ही मंडळी थांबली नाहीत. तर त्यांनी जेवणाची टेबलंही लाथाडली. होत्याचं नव्हतं करुन टाकलं. पुन्हा इथं दिसला तर याद राखा, अशा थाटात धमकाविण्यास त्यांनी सुरवात केली. दहशतीच्या दहा ते बारा मिनिटांमध्ये सारा परिसर मोकळा झाला. एव्हाना स्टॉलधारकांचे काही हजार "गटारात' गेलेले असतात अन् पोलिसांची "गटारी' साजरी झालेली असते.
गेल्या अनेक वर्षांपासून भिडे पुलाशेजारी (झेड पुलाखाली) खाद्यपदार्थांचे स्टॉल सुरू आहेत. रात्री उशिरा अगदी दीड वाजेपर्यंत हे स्टॉल सुरू असतात. त्यानंतर पोलिसांची गाडी येते आणि हळूहळू स्टॉल बंद होण्याची प्रक्रिया सुरू होते. हा इथला गेल्या कित्येक वर्षांपासूनचा अनुभव. पोलिस आल्यानंतर प्रथम स्टॉलधारकांना समजावून सांगतात आणि तरीही त्यांनी ऐकले नाही, तर त्यांच्यावर कारवाई करतात. ग्राहकांवर कारवाई करण्याची घटना आतापर्यंत घडलेली नव्हती. मात्र, गटारी अमावास्येच्या निमित्ताने काल ही कसरही भरून निघाली. रात्री "कर्तव्या'वर असलेले पोलिस अधिकारी आणि दोन-तीन हवालदार असा ताफा जीपमधून उतरला आणि त्यांनी पुढे मागे न पाहता टेबलांवर बसलेल्या ग्राहकांवर थेट लाठ्या उगारल्या. इतके करून ते थांबले नाहीत, तर शेवटपर्यंतची टेबल पायाने लाथाडली आणि लाठीमारही सुरूच ठेवला.
""तुम्ही माझ्यावर कारवाई करा पण ग्राहकांवर लाठीमार करू नका. आमच्या पाठीवर मारा पण पोटावर मारु नका,'' अशी विनंती स्टॉलधारकांनी केली; पण संबंधित अधिकाऱ्याने कोणालाच जुमानले नाही. ""गस्तीला येणाऱ्या बाकीच्या अधिकाऱ्यांचे मला माहिती नाही; पण मी राऊंडला आलो, की असेच होणार,'' असे प्रत्युत्तर "त्या' अधिकाऱ्याने दिले.आतापर्यंत अशी घटना कधीच घडलेली नसल्यामुळे भांबावलेले ग्राहक आपापल्या गाड्या घेऊन निघून जातात. त्यानंतर आपली काहीही चूक नसल्याची जाणीव झालेल्या स्टॉलधारकाचा आवाज चढतो. त्यासरशी त्याच्याशी संवाद मध्येच तोडून पोलिसांचा ताफाही निघून जातो.
मात्र त्याचवेळेस नदीकाठच्या रस्त्यांवर मोटारींमध्ये बसून मद्यप्राशनाचा आस्वाद लुटणाऱ्या शौकिनांकडे कर्तव्यावरील पोलिसांचे साधे लक्षही गेलेले नसते. आहे की नाही कमाल? एरवी चिकन किंवा मटण हाणून साजरी होणाऱ्या गटारीपेक्षा ही गटारी चांगलीच लक्षात राहणारी ठरली...
लेबल:
Baba Bhide Pool,
Gatari,
Police.
Thursday, August 09, 2007
खाकरा, ढोकला, फाफडा आणि मठिये

कडकडून भूक लागली आहे आणि आपल्यासमोर कोणीतरी विविध पदार्थांनी भरलेली गुजराती थाळी आपल्यासमोर आली की काय खावं आणि काय नको, अशी आपली अवस्था होऊन जाते. अनेकदा सुरवात कशानं करावी, हे देखील समजत नाही. फक्त गुजराती जेवताना अशी परिस्थिती होत असेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकताय. कारण तुम्ही गुजराती खाद्यपदार्थांच्या एखाद्या दुकानात गेला तर विविध खाद्यपदार्थांच रेलचेल व एकाच पदार्थाचे विविध प्रकार पाहिल्यानंतर गुज्जू भाईंच्या आस्वादक वृत्तीचा प्रत्यय येईल.
काही कारणानिमित्तानं बडोदा (वडोदरा) इथं जाणं झालं. तशी धावतीच भेट झाली. पण तरीही आवर्जून वेळ काढून टिपिकल गुजराती पदार्थ मिळणाऱ्या बडोद्यातील एखाद्या दुकानात भेट देणं ओघानं आलंच. प्रतिष्ठित अलकापुरी भागातील "पायल' नावाचं दुकान विशेष लोकप्रिय असल्याचं समजलं आणि थेट दुकान गाठलं. एका दुकानाचे तीन भाग करुन एका भागात गरमागरम ताजे पदार्थ, दुसऱ्या भागात खारा माल आणि तिसऱ्या बाजूला गोड पदार्थ असं विभागणी करुन येणाऱ्या प्रत्येक गिऱ्हाईकाच्या आवडी-निवडीची काळजी घेण्यात आली होती.
लज्जतदार खाकरे...
पाच पंचवीस प्रकारचे खाकरे, पन्नास प्रकारच्या आणि जाडीच्या शेव, स्पेशल गुजराती मठिये, विविध प्रकारचे वेफर्स आणि चिवडे अशी जवळपास शे-सव्वाशे रकाने नुसत्या खाद्यपदार्थांच्या "व्हरायटी'ने भरलेले होते. खाकरा म्हणजे पापडाच्या जाडीची कडक पुरी. लसण शेव, पालक शेव, मेथी शेव, लसण-पालक, पालक-मेथी आणि मेथी-लसण अशा विविध चवींमध्ये शेव उपलब्ध होते. हेच प्रकार जाड शेव, बारीस शेव, गाठी शेव अशा स्वरुपातही उपलब्ध होते. खाकऱ्याचीही गोष्ट काही वेगळी नव्हती. लसूण घातलेला, न घातलेला, पालक, मेथी व इतर अनेक चवींमधील खाकरे ग्राहकांची आशेनं वाटत पाहत होते. यांच्या जोडीला बटाट्याचा आणि मक्याचा चिवडा, केळ्याचे नि बटाट्याचे तिखट-बिनतिखट वेफर्स अगदी तय्यारीत होते.
चविष्ट मठिये...
मठिये हा खास गुजराती पदार्थ गुजराती तसंच बिगर गुजराती ग्राहकांचंही आकर्षण होता. गुजरातीत मटकीला मठ असं म्हणतात. त्यामुळं मटकीच्या पिठापासून केलेल्या पाणीपुरीच्या आकाराइतक्या तिखट-मिठाच्या पुऱ्या म्हणजे मठिये. तिखट-मीठ असूनही थोडे गोडाकडं झुकणारे मठिये तोंडाला वेगळीच चव देणारे आहेत.
सुरळीची वडीही...
ताज्या पदार्थांमध्येही सुरळीची वडी, साधा आणि तिखट ढोकळा, सॅंडविच ढोकळा, तिखट कचोरी, उपवासाची कचोरी, बटाट्याचे पॅटिस, पंजाबी सामोसा, इटुकला-पिटुकला सामोसा, आलू वडा (म्हणजे आपल्या बटाटा वड्याच्या जवळपासही न फिरकणारा पदार्थ) आणि पालक, मेथी, कांदा तसंच बटाटा भजी... इतकं वैविध्य पाहिल्यानंतर पटकन सांगता येईल काय खायचं आणि काय नाही ते! या सर्व पदार्थांबरोबर मिळणारी ढोकळ्याच्या चुऱ्यापासून बनविलेली हिरवी चटणी खासच. नुसती चटणीही तितकीच चांगली. आणि हो एक राहिलंच की, गुजरातची खासियत म्हणजे गरमागरम फाफडा. डाळीच्या पिठापासून तयार केलेला आकाराने लांबडा पदार्थ. गरमागरम चटणीसह खायला एकदम उत्तम.
फुल्ल खादाडी...
अर्थात गुजराती माणसाला किंमतीकडं पाहून खरेदी करण्याची सवय नसल्यानं पदार्थांच्या किंमतीही थोड्याशा चढ्याच. पण पदार्थ खाल्ल्यानंतर पैसा वसूल. त्यामुळं जादा पैसा गेल्याचं दुःख नाही. शेवची भाजी, गाठीची भाजी, शेव टॉमेटो भाजी हे पदार्थ अस्सल गुजराती. आपल्याकडं जशा वडापावच्या गाड्या असतात, तशा तिथं शेवऊसळच्या गाड्या सकाळपासून रात्रीपर्यंत असतात. वाटाण्याची उसळ, वरुन शेव आणि सोबतीला पुरी किंवा पाव ही गुजराती लोकांची आवडती डिश!
मसाला डोसा आणि इतर दाक्षिणात्य पदार्थ, भेळ, रगडा पॅटिस आणि पाणीपुरीसह चाटचे विविध प्रकार, पंजाबी डिशेस, चायनीज खाद्यपदार्थ यांच्या गाड्यांचीही रेलचेलही आपल्याला रस्त्यारस्त्यांवर दिसते. त्या गाड्यांभोवती असलेली तुडुंब गर्दी पाहिली की गुज्जू लोकांच्या "तबियत का राज' समजतं. पण हे सारं आपल्याकडंही अगदी मुबलक प्रमाणात मिळत असल्यानं तिकडं फिरकण्याचा प्रश्नच नव्हता.
भरुचनी सेंग...
रेल्वेनं येताना भरुच नावाचं स्टेशन लागतं. हे ठिकाण खारे शेंगदाणे आणि फुटाणे यांच्यासाठी प्रसिद्ध! मुंबईहून जाताना नर्मदा नदीवरील जवळपास दीड किलोमीटर लांबीचा पूल ओलांडला की गाडी थेट भरुच स्थानकात घुसते. तिथं स्टेशनवर किंवा आपण मोटारीनं जात असलो की "हायवे'वर असंख्य विक्रेते आपल्यापुढं खारे शेंगादाण्याचे पुडे घेऊन उभे असतात. त्यातही दोन-तीन प्रकार आहेत. लहान, मध्यम आणि मोठ्या आकारावरुन शेंगादाण्याच्या किंमती ठरतात. मध्यम आकाराचा शेंगादाणाही भलताच मोठा असतो. किलोला साधारण 80 ते 100 रुपये पडतात.
भरुचमध्ये शेंगादाणे पिकत नाहीत. ते येतात सौराष्ट्राहून. पण भरुचचे कारागिर उत्तम असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळं इथले खारे शेंगादाणे अधिक प्रसिद्ध आहेत. मोठाल्या कढईतील रेतीमध्ये भाजण्याच्या आदल्या रात्री हे शेंगदाणे रात्रभर खाऱ्या पाण्यात भिजवून ठेवले जातात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते चांगले भाजले जातात आणि त्यावेळी पुन्हा त्यावर खाऱ्या पाण्याचा शिडकावा केला जातो. त्यामुळं भरुचच्या शेंगादाण्यांची चव अगदीच न्यारी वाटते. रोज भरुचमध्ये जवळपास 20 टन शेंगादाणे सौराष्ट्र आणि दक्षिण भारतातून भरुचमध्ये येतात. थोडा माल "एक्सपोर्ट' होतो आणि काही माल भारताच्या इतर भागांमध्ये पाठविला जातो. पण बाकी सारा माल भरुच आणि गुजरातमध्येच खपतो.
Wednesday, August 01, 2007
दम बिर्याणी, मूँग डोसा आणि चाट

काही कारणानं हैद्राबादला जाणं झालं आणि पुन्हा एकदा आठवणींना उजाळा मिळाला. अडीच वर्षांपूर्वी अत्यंत जड अंतःकरणानं हैद्राबादला निरोप दिला होता. त्यामुळं हैद्राबादला गेल्यानंतर शक्य तितक्या ठिकाणांना पुन्हा भेट देण्याचं निश्चित केलं होते. खाण्याची ठिकाणं त्यात अग्रस्थानी होती हे सांगायला नकोच...
हैद्राबादचं खास आकर्षण म्हणजे बिर्याणी. त्यातही जुन्या हैद्राबादमध्ये मदिना, पिस्ता किंवा शादाब तसंच सिकंदराबादमध्ये "डायमंड' ही बिर्याणीची अगदी मोजकीच पण तितकीच चविष्ट ठिकाणं. त्यातही मला अधिक आवडते ती चारमिनारपासून चालत पाच मिनिटांच्या अंतरावर असलेल्या शादाबची बिर्याणी. जुन्या जमान्यातील इराणी कॅफे असतात तसं दुमजली हॉटेल. इतर चकमकीत हॉटेलपेक्षा थोडसं कळकटलेलंच! खालच्या मजल्यावर एकटी-दुकटी मंडळी चहा-बिस्कुट खात किंवा तंगड्या तोडत बसलेली असतात. तर तुलनेने प्रतिष्ठित आणि कुटुंब कबिला बरोबर असलेली मंडळी दुसऱ्या मजल्याच्या पायऱ्या चढतात.
इतर ठिकाणी मिळणाऱ्या बिर्याणीच्या तुलनेत इथं मिळणारी बिर्याणी काही औरच. चिकन, मटण किंवा अंडा कुठलीही बिर्याणी असो त्याचा स्वाद भातामध्ये इतक्या नैसर्गिकरित्या मिसळलेला असतो की काही विचारु नका. शिवाय ज्या मसाल्यामध्ये हे "पिसेस' घोळवलेले असतात तो मसालाच बिर्याणीची जान आहे. (अर्थात, मी हे सांगण्याची गरज नाही) त्यातच सारे पैसे वसूल. सोबत मिळालेली "करी' किंवा दह्यातून आलेले सॅलेड देखील भातात मिसळू नये, असं वाटण्याइतपत बिर्याणी "द ग्रेट' असते. (करी आणि सॅलेड फुकट मिळत असूनही खावंसं वाटत नाही)
बिर्याणी घ्यावी आणि त्यावर थोडंसं लिंबू पिळून हात चालविण्यास सुरवात करावी, हा आमचा नेहमीचा रिवाज. यंदाही अगदी तसंच. सकाळपासून विशेष खाणं झालं नसल्यामुळं एक चिकन बिर्याणी आणि एक मटण बिर्याणी आम्ही दोघांनी अगदी सहजपणे चापली. त्यानंतर हाफ-हाफ लस्सीचाही कार्यक्रम झाला. त्यानंतर "कुर्बानी का मिठा' नामक पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा होती. पण शक्यच नव्हतं. "कुर्बानी का मिठा' हा पदार्थ खास "बकरी ईद'च्या दिवशी बनविला जातो, असं सांगण्यात येतं. माझ्या माहितीनुसार खजूर (कौमुदी काशीकरच्या मते ओले अक्रोड) दोन-तीन दिवस गुलाबाच्या पाण्यात भिजवून ठेवले जातात. त्यानंतर त्यात साखरेचा पाक, सुकामेवा, क्रिम आणि इतर अनेक पदार्थ मिसळून "चेरी'सह हा "कुर्बानी का मिठा' एका कुंडा सदृश भांड्यातून तो "सर्व्ह' केला जातो. पण आम्हाला बिर्याणीसाठई "कुर्बानी का मिठा'ची कुर्बानी द्यावी लागली. मग नेहमीप्रमाणे "मिनाक्षी पान' खाण्याचा कार्यक्रम पार पडला.
मूग डोसा द बेस्ट!
हैद्राबादचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे डोसा, इडली, उत्तप्पा, उप्पीट, उप्पीट-डोसा आणि मूग डोसा... पुण्या-मुंबईत वडापावच्या गाड्या जितक्या बक्कळ तितक्याच इडली-डोसाच्या गाड्या हैद्राबादेत भरपूर. हॉटेलांमध्येही हे पदार्थ इथल्या तुलनेत स्वस्त असतात. आठ रुपयांमध्ये इडली-चटणी-सांबार अगदी नको नको म्हणेपर्यंत. शिवाय "एक्स्ट्रा'चे पैसे नाहीत. इडलीचा आकार "वाडेश्वर'च्याही तोंडात मारेल असा.
या सगळ्या दाक्षिणात्य पदार्थांच्या भाऊ गर्दीत आपल्या येथे न मिळणारा वेगळा पदार्थ म्हणजे "मूँग डोसा'. उडीद डाळ आणि मूग डाळ भिजत घालून त्याचे पिठ करायचे आणि त्या पिठापासून डोसा करायचा. त्याला खोबऱ्याची पांढरी आणि लाल तिखट चटणी फासायची. त्यानंतर आता नेहमीप्रमाणे बटाट्याची भाजी टाकायची किंवा मग गरमागरम उप्पीट घालायचे. काही अण्णा मंडळी उप्पीट किंवा बटाट्याची भाजी त्यावर फासतात आणि कट डोसाप्रमाणे खातात. पण इतका काला करण्याचे आपले धाडस होत नाही.
गंमत चाटची
पाणीपुरी आणि चाट हे पदार्थही इथं हातगाडीपासून ते दुकानांपर्यंत सर्वत्र मिळतात. भेळ हा पदार्थ मात्र, मोजक्याच काही ठिकाणी मिळतो. त्यातही इथल्या भेळची आणि पाणीपुरीची चव अगदीच वेगळी आणि तितकीशी चांगली देखील नाही. मुंबईत जसे भय्या लोक भेळमध्ये उकडलेला बटाटा घालतात. त्याचप्रमाणे हैद्राबादेत भेळमध्ये काकडी घालण्याची पद्धत आहे. भेळही फार कमी ठिकाणी मिळते. आम्ही रहायचो तेथे (दिलसुखनगर) मराठवाडा येथून आलेले एक मामा आहेत. त्यांच्या दुकानात महाराष्ट्रात मिळते तशी भेळ आणि पाणीपुरी मिळते. इतरत्र सारेच अवघड. पाणीपुरी करताना चिंच-गुळाचे पाणी वापरले जात नाही. उकडलेल्या वाटाण्याचे सारण आणि सोबतीला फक्त पुदीन्याचे तिखट पाणी यावरच तुमची हौस भागवावी लागते. हैद्राबादमध्ये चिंच-गुळाच्या पाण्याची बात नस्से. त्यामुळे पाणीपुरी म्हणावी तितकी चविष्ट होत नाही.
हैद्राबादेत कोटी येथे गोकुळ नावाचे चाट सेंटर आहे. एका उत्तर भारतीय व्यक्तीकडून गोकुळ नावाचे तब्बल चार मजली दुकान आहे. सदैव भरगच्च असलेले हे दुकान चवीच्या बाबतीत अगदीच अप्रतिम आहे. मग छोले-भटुरे असो, भेळ पुरी असो किंवा रगडा पॅटिस असो... कचोरी असो किंवा दही वडा सारं कसं झक्कास. त्यामुळे कधी हैद्राबादला गेलात तर "गोकुळ'ला भेट द्यायला विसरु नका.
तिथं काही मोजक्या ठिकाणी चहा करण्याची पद्धतही न्यारीच आहे. कोरा चहा आणि कोरी कॉफी दोन निरनिराळ्या भांड्यांमध्ये उकळत असते. तर तिसऱ्या पातेल्यात गरम दूध ठेवलेले असते. तुम्हाला फिका चहा-कॉफी हवी किंवा कडक कॉफी-चहा पाहिजे, हे लक्षात घेऊन तो हॉटेलवाला तुम्हाला हवा तसा चहा तुमच्यासमोर पेश करतो. काहीसा कडवट आणि कडक असा हा चहा चांगलाच लक्षात राहतो. वडापाव आणि कच्छी दाबेली हे पुण्या-मुंबईत जागोजागी मिळणारे पदार्थ इथं मात्र, नजरेसही पडत नाहीत. अगदी सिकंदराबाद किंवा अमीरपेट सारख्या हैद्राबादी संस्कृतीपासून थोडंसं वेगळ्या असलेल्या ठिकाणी गेलं की तिथं हे पदार्थ चाखायला मिळतात. पण तेथेही शोधल्यानंतरच या पदार्थांचा शोध लागतो.
मग कधी जाताय हैद्राबादला?????
Wednesday, July 25, 2007
चला खाऊया "अंडा राईस'...

खाणारे काय श्रावणातही खातात. पण आम्ही मात्र श्रावण पाळतो, असं म्हणत लोकं आषाढात मांसाहाराचा फडशा पाडतात. अंडी, कोंबडी, बकरी, मेंढी, "पोर्क' आणि बरंच काही! आम्ही तर आसाममध्ये असताना बदकही हाणलं होतं. त्याची गोडी काही औरच. पण तूर्तास आषाढाचं स्वागत करताना अंड्यापासून सुरवात करावी, असं ठरवून नेहमीच्या अड्ड्यांकडे धाव घेतली.
अंडा ऑम्लेट, भुर्जी आणि "हाफ फ्राय' या पदार्थांप्रमाणंच गेल्या काही वर्षांपासून "अंडा राईस' हा पदार्थही अधिक लोकप्रिय झाला आहे. म्हणजे मला अधिक आवडू लागला आहे. तरी त्याला आता सहा-सात वर्ष झाली असतील. कुमठेकर रस्त्यावर शिक्षण संशोधन परिषदेबाहेर अशोक नावाचा माणूस अंडा भुर्जीची गाडी लावायचा. त्या गाडीवर भुर्जीप्रमाणेच राईसही चांगला मिळतो, असं समजल्यानंतर थेट धडकलोच.
प्रचंड गर्दी हे अशोकच्या गाडीची ओळख. कांदा मस्त बारीक चिरुन तेलात टाकायचा. अर्थातच, भुर्जीला लागते त्यापेक्षा थोडं जास्त तेल कढईत टाकायचं. कांदा मस्त "फ्राय' झाला की त्यात गरजेनुसार तिखट-मीठ टाकायचं व गिऱ्हाईकाच्या ऑर्डरप्रमाणं एक किंवा दोन अंडी फोडायची. मग अंडी, कांदा आणि मसाला हे मिश्रण तेलात मस्त खमंग होईपर्यंत "फ्राय' करुन घ्यायचं. खमंग भाजल्यानंतर त्यात आधीच शिजवून ठेवलेला भात टाकायचा आणि पुन्हा एकदा हे मिश्रण चांगलं परतून घ्यायचं. त्यावर पुन्हा थोडंसं मीठ टाकायचं. झालं चांगलं परतून झाल्यानंतर भात डिशमध्ये काढून "सर्व्ह' करण्यासाठी तयार. भातावर वरुन बारीक कोथिंबीर पेरायची. सोबतीला कांदा आणि लिंबू. आपण आडवा हात (चमचा!) मारण्यास तयार. अंडा आणि कांदा जितका "फ्राय' केलेला तितकी चव उत्कृष्ट हे समजून चालायचं.
अशोकचा राईस हे अजब मिश्रण आहे. एकदा का अशोककडील अंडा राईसची चटक लागली की त्यापासून दूर जाणं अवघड. सारं काही अचूक. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे की अशोकच्या गाडीवर काही खाल्लं आणि दुसऱ्या दिवशी घसा खवखवला आहे किंवा त्रास झालाय, असं कधीच आठवत नाही. अंडा भुर्जीच्या इतर गाड्यांवर खाल्लं की दुसऱ्या दिवशी घसा धरलाच म्हणून समजा. कारण अशोक रिफाईंड तेलात पदार्थ करतो. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण ते सत्य आहे.
अजून एका ठिकाणी तुम्हाला चांगला अंडा राईस मिळेल. सणस क्रीडांगणाच्या बाहेरील रस्त्यावर (कल्पना-विश्व हॉटेलच्या समोरील) तुम्हाला तीन-चार गाड्या आढळतील. त्यापैकी जास्त गर्दी असलेली लोखंडी गाडी म्हणजे गणेशची गाडी. अंड्याच्या पदार्थांप्रमाणेच बांगड्याचा "फिश राईस' देखील तुम्हाला या गाडीवर मिळेल. राईस करण्याची अशोकची पद्धत आणि गणेशची पद्धत यामध्ये प्रचंड फरक आहे. त्यामुळेच चवीत फरक आलाच.
गणेश प्रथम तेलात मीठ-मसाला-तिखट टाकून कांदा परतून घेतो. मग त्यात अंडी टाकण्याऐवजी प्रथम भात टाकतो. भात परतून घेतल्यानंतर त्यावर अंडी फोडतो. त्यामुळं अंडी वेगळी आणि भात वेगळा अशा पद्धतीनं "अंडा राईस' तयार होत नाही. तर भाताच्या अनेक शिंताभोवती अंड्यांचा अंश लागतो आणि मग तो खमंग परतला जातो. त्यामुळे त्याची चव काही औरच होते. हा भात खमंग परतल्यानंतर त्याला आणखी चव येण्यासाठी त्यावर चटण्यांची हलकी फवारणी करण्यात येते. मग हा भात काढून त्यावर कोथिंबीर आणि कोबी यांची सजावट केली जाते. अर्थातच, तुम्हाला कोबी आवडत असेल तर! मग त्यावर लिंबू पिळलं आणि सोबतीला कांदा घेतला की, आस्वाद घेण्यासाठी अंडा राईस तयार.
तिसऱ्या प्रकारचा अंडा राईस मी नुकताच "एमएमसीसी'समोर (मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज) एक मुस्लिम चाचा गाडी लावतो. त्याकडं अंड्याच्या पदार्थांची बरीच विविधता आहे. अंडा सॅंडविचपासून अंडा करीपर्यंत सारे काही त्याच्याकडं मिळतं. अंडा पराठा या तुलनेने वेगळ्या पदार्थाची चवही तुम्हा इथं चाखू शकता. या चाचाकडं एका पातेल्यात करी तयार असते. अंडा राईस करताना तो प्रथम सर्वांप्रमाणे कांदा, तिखट-मीठ आणि तेल परतून घेतो. त्यानंतर त्यात अंड फोडतो. पण हे मिश्रण तो खूप परतत नाही. थोडंस परतल्यानंतर तो त्यात करी टाकतो. ही "अंडाकरी' थोडीशी गरम झाल्यानंतर चाचा त्यामध्ये शिजविलेला भात घालतो आणि मग तो खमंग होईपर्यंत परततो. पहिल्या दोन "अंडा राईस'पेक्षा ही चव काही औरच आहे.
अशोककडे "सिंगल अंडा' राईसची किंमत आहे 15 रुपये आणि "डबल अंडा' राईसची 25 रुपये. तर गणेशकडे एका प्लेटमध्ये दोन अंडी घातलेला राईस मिळतो आणि त्याची किंमत आहे फक्त 20 रुपये. चाचाचा राईसचा दर आणखीनच वेगळा आहे. "हाफ' राईससाठी 16 रुपये आणि नीट आठवत नाही पण "फुल' राईससाठी 30 की 32 रुपये.
एक मात्र खरं की तिघांचेही राईसचे दर वेगळे आणि चवही निराळी. मात्र, तिघांची चवही तोडीस तोड आहे. मला तर अजूनही कळत नाही, कोणाचा "अंडा राईस' अधिक चांगला आहे. तुम्ही मला यामध्ये मदत कराल का? शक्य झालं तर तुम्हीही याठिकाणी जाऊन एकदा चव घेऊन पहा आणि ठरवा कोण अधिक चांगला आहे ते! अन् मला पण सांगा तुम्हाला कोणाचा "राईस' अधिक चांगला वाटला. तुमच्याही आवडीचा एखादा "अंडा राईस'वाला असेल तर मला सांगा. तिकडंही भेट देता येईल.
(सूचनाः एमएमसीसी समोरील अतिक्रमणे हटविण्याच्या नादात रेश्मा म्हणजेच चाचाची गाडी हटविण्यात आली होती. तीच गाडी आता आबासाहेब गरवारे कॉलेजसमोर सुरू आहे. आता गाडीचा विस्तार झाला असून छोटेखानी फूड जॉइंटचे स्वरुप त्याला आला आहे.)
Saturday, July 14, 2007
स्पर्धा न जिंकताही "ऑस्कर'!

पुरुषांच्या 400 मीटरच्या पात्रता शर्यतीत त्याला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. चारशे मीटरच्या शर्यतीत स्टेफानो याने त्याला पराभूत केले; पण फक्त 0.18 सेकंदांनी. ऑस्करने ही शर्यत 46.90 सेकंदांमध्ये पूण केली. वास्तविक पाहता दुसऱ्या एखाद्या खेळाडूने ही कामगिरी नोंदविली असती तर त्याची दखलही कोणी घेतली नसती; पण ऑस्करच्या कामगिरीची दखल घेण्याचे एकमेव कारण म्हणजे दोन्ही पाय नसूनही त्याने नोंदविलेली लक्षवेधक कामगिरी.
गुडघ्याखाली धातूच्या पट्ट्या लावून जिद्द व चिकाटीच्या जोरावर धडधाकट धावपटूंना मागे टाकण्याच्या ऑस्करच्या कामगिरीला त्रिवार सलाम!! अपंगांच्या ऑलिंपिक स्पर्धेत 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत तो अजिंक्य ठरला आहे. मात्र, त्याला धडधाकट खेळाडूंच्या स्पर्धेत भाग घेण्याची त्याची मनापासून इच्छा होती. गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्स महासंघाने अपंग खेळाडूंच्या "कार्बन फायबर ब्लेड्स' वापरण्यावरील बंदी उठविली व "कार्बन फायबर ब्लेड्स' वापरून अपंग खेळाडू इतर खेळाडूंशी स्पर्धा करू शकतात, असे जाहीर केले. त्यामुळे रोम येथे पार पडलेल्या "गोल्डन गाला' स्पर्धेत ऑस्कर पिस्टोरियस सहभागी होऊ शकला.
आता त्याची इच्छा आहे ऑलिंपिकविजेता जेरेमी वॉर्नियर याने त्याला पराभूत करण्याची. रविवारी शेफिल्ड येथे ब्रिटिश ग्रांप्रि स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, तेथे ऑस्कर व जेरेमी परस्परांचे प्रतिस्पर्धी आहेत. याशिवाय त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे पुढील वर्षी बीजिंग येथे होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी पात्र ठरण्याचे.
मात्र, यासंदर्भात ऍथलेटिक्स महासंघाने प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. ऑस्करला धावताना "कार्बन फायबर ब्लेड्स'मुळे काही फायदा तर होत नाही, याची तपासणी महासंघ शेफिल्ड येथील शर्यतीदरम्यान करणार आहे.

ऑस्कर द ग्रेट!
दक्षिण आफ्रिकेत जन्मलेला ऑस्कर अपंगांच्या ऑलिंपिक स्पर्धेमुळे चर्चेत आला. "द फास्टेट थिंग ऑन नो लेग्ज' असा त्याचा गौरव केला जातो. जन्मतःच दोन्ही पायांना नडगीचे हाडच नसल्यामुळे पाचव्या महिन्यातच ऑस्करचे दोन्ही पाय कापावे लागले होते. शालेय स्तरावर असताना तो रग्बी आणि वॉटर पोलोच्या स्पर्धांमध्येही सहभागी होत असे.
दरम्यानच्या काळात दुखापतीमुळे त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याच काळात तो ऍथलेटिक्सच्या प्रेमात पडला व त्यानंतर त्याच्या गुडघ्याखाली "कार्बन फायबर ब्लेड्स' बसविण्यात आले आहेत. सध्या तो "युनिव्हर्सिटी ऑफ प्रिटोरिया' व्यवसाय व्यवस्थापन या विषयाचा अभ्यास करीत आहे.
-----------
कमाल ऑस्करच्या जिद्दीची
- अपंगांच्या शंभर, दोनशे आणि चारशे मीटरच्या शर्यतींचा जागतिक विक्रम.
- गेल्या तीन पॅरालिंपिक स्पर्धांमध्ये सुवर्णपदकांची लयलूट.
- 100 मी. - 10.91 सेकंदांत, 200 मी. -21.98 सेकंदांत, तर 400 मी. - 46.56 सेकंदांमध्ये पूर्ण करण्याचा विक्रम.
------------
फायबर ब्लेड्सचा वाद
- फायबर ब्लेड्स गरजेपेक्षा लांब त्यामुळे फायदा मिळत असल्याचा आक्षेप.
- ब्लेड्समुळे शर्यत सुरू करताना प्रचंड ताकद लागते, असे ऑस्करचे मत.
- ऑस्करच्या या मताचे मियालामीमधील प्राध्यापकांकडून समर्थन.
- ब्लेड्समुळे घसरून पडण्याची किंवा ब्लेड्स निखळण्याची शक्यता अधिक.
लेबल:
Athletics,
IAAF,
Oscar Pistorious,
Paralympics,
Rome
Thursday, July 12, 2007
Lal Krishna Advani: Pleasant Personality
Thanks to Pune Union of Working Journalist, Who gave opportunity to meet and interact with opposition leader in Lok Sabha Mr. L. K. Advani. Of course Presidential election issue was the crux of his speech and that issue was highlighted the question answer session.
In his speech he touched all the issues including presidential candidates, why NDA is opposing Pratibha Patil, why Bhairosingh is contesting election as independent candidate, what was the quality of election campaign between Neelam Sanjeev Reddy and V. V. Giri. Many statements of Advani were already published in media so there is no point to give all that discussion here. I just want to give some of my observations here.
The person who comes on time is not a politician is the common definition of leader. Many leaders including Bhartiya Janata Party are `Late Latifs`. But Mr. Advani seems to be exception to that. Program of Meet the Press was at 4 pm. But Mr. Advani was present at Patrakar Sangh at 3.45 pm and he came to the dais at 3.55 before the time to start.
In the beginning of `Meet the Press` program, secretary of PUWJ Mr. D. R. Kulkarni gave instruction to all journalists to switch off their mobile phones or to keep them on silent mode. Interesting thing to observe is that taking cognizance of this instruction Advani immediately brought his mobile out of his jacket. Switched it on silent mode and again put in pocket. In many other programs you can see that those who are on dais are reluctant to instructions including all the politicians. But this is the uniqueness of leaders like Advani.
Advani is in active politics from 1952 and he also told that thing in his speech. One journalist asked him about Shekhawat that Mr. Vice President is using his office for campaign. That senior journalist told Advani that Shekhawat is using telephone in his office to call MP’s and MLA’s for the campaign. Within the fraction of second Advani replied that could you please tell me the single person to whom Mr. Shekhawat has called from his office. Advani informed the house that Mr. Shekhawat has installed separate phone line in his office only for the election campaign purpose. He is using that line for his campaign.
He also registered his view on the issue that Shekhawat contesting Presidential Election without giving resignation as Vice President. Advani told that there is provision in constitution for this thing. You can contest Presidential election without giving resignation of VP.
लेबल:
Bhairosingh Shekhawat,
Journalist,
L.K.Advani,
President.,
pune
Monday, July 09, 2007
लक्षात राहणारे चंद्रशेखर...

अर्थसंकल्पावरील चर्चा असो, विश्वासदर्शक किंवा अविश्वासाचा ठराव असो अथवा भारतीय स्वातंत्र्याला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने आयोजित विशेष अधिवेशनातील मंथन असो... दूरदर्शनवर थेट प्रक्षेपणाची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे देशातील अनेक नेत्यांची भाषणे घरबसल्या ऐकायची संधी प्रत्येकाला प्राप्त झाली. त्यात लहानपणापासून राजकारणात रस असल्यामुळे ही भाषणे ऐकणे हा माझा आवडता उद्योग झाला होता. पण याचा निश्चितच खूप फायदा झाला.
इंद्रजित गुप्त आणि सोमनाथ चॅटर्जी यांचे ओघवत्या इंग्रजीतील काहीसे बोजड पण प्रचंड माहितीपूर्ण भाषणे ऐकता आली. अटलबिहारी वाजपेयी यांचे सुमधूर हिंदीमधील आवेशपूर्ण भाषण टीव्हीवरुन ऐकण्या-पाहण्याची संधी मिळाली. जॉर्ज फर्नांडिस पुराव्याच्या आधारे कसे आसूड ओढतात आणि लालू प्रसाद त्यांच्या बिहारी ढंगामध्ये विरोधकांची कशी दांडी गुल करतात, याचे प्रत्यक्ष दर्शन दूरदर्शनवर घडले. या साऱ्या गदारोळात दूरदर्शनमुळे आणखी एक फायदा झाला आणि तो म्हणजे चंद्रशेखर यांच्यासारख्या महान नेत्याची उंची अनुभवता आली.
सुरवातीला अनेक कंटाळवाणी भाषणे झाल्यानंतर अखेरच्या टप्प्यात मोठ्या नेत्यांची भाषणे हा संसदेचा पायंडा ठरलेला. त्यामुळे अखेरची काही भाषणे हटकून ऐकायची हे ठरलेले. बहुतेक वेळा राजेश पायलट किंवा रघुवंश प्रसाद यांची भाषणे झाल्यानंतर चंद्रशेखर भाषणाला उभे रहायचे. एकदा का चंद्रशेखर भाषणाला उभे राहिले की, सभागृहात निरव शांतता पसरायची. प्रत्येक जण चंद्रशेखर काय म्हणतात ते ऐकण्यासाठी उत्सुक असायचा.
अशा परिस्थितीत एकेका मुद्द्याला हळूहळू हात घालत चंद्रशेखर यांची गाडी पुढे सरकायची. चंद्रशेखर यांचे वैशिष्ट्य असे की, ते कधीही हातात कागद घेऊन बोलले नाहीत. कधीही कागदावर मुद्दे काढून ठरवून मुद्देसूद भाषण केले नाही. पण चंद्रशेखर यांची वक्तृत्वावरील पकड इतकी जबरदस्त होती की कोणतीही परिस्थिती असली तरी त्यांचे भाषण मुद्देसूद व्हायचेच. चंद्रशेखर मुद्द्याला सोडून भरकटले आहेत, असे कधी झाले नाही. किमान माझ्या "ऐकिवात' नाही. त्यांचे भाषण केवळ सर्वसामन्यांना ऐकण्यासाठी उपयुक्त होते असे नव्हे. तर खासदारांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे विचार चंद्रशेखर भाषणातून मांडत. पण, फक्त माल आणि मलिदा यांच्याशीच इमान ठेवणाऱ्या खासदारांनी त्यांची भाषणे कधीच गांभीर्याने घेतली नाहीत, हा भाग अलहिदा. पण पुन्हा पुढच्या वेळी भाषणाला उभे राहिल्यानंतर चंद्रशेखर तितक्याच पोटतिडकीने बोलायचे.
चंद्रशेखर यांचे भाषण कितीही गंभीर विषयावर असले तरी त्यांची गाडी अटलबिहारी वाजपेयी यांच्या दिशेने हमखास वळणारच. मग वाजपेयी विरोधी बाकांवर असो किंवा सत्ताधारी बाकांवर. वाजपेयीदेखील चंद्रशेखर यांच्या भाषणांना आवर्जून उपस्थिती असायचे. ""वाजपेयीजी तुम्ही माझे गुरु आहात. आपणासारख्या नेत्यांच्या मार्गावर व मार्गदर्शनाखाली आम्ही वाटचाल करीत आहोत,'' हे चंद्रशेखर यांचे वाक्य तर भाषणात ठरलेले असे. मग आपल्या शिष्याला उद्देश्यून वाजपेयी म्हणत,""मी तुमचा गुरु आहे तर गुरु एका पक्षात आणि शिष्य दुसऱ्या पक्षात हे कसे चालायचे. तुम्ही माझ्या पक्षात या. म्हणजे तुम्ही माझे शिष्य शोभून दिसाल.'' त्यावर चंद्रशेखर प्रत्युत्तर देत की, अटलजी तुम्हाला तर माहिती आहे. तुमच्या पक्षाचे आणि माझे जमणे शक्य नाही. पण तरीही तुम्ही माझे गुरु होता, आहात आणि रहाल. त्याला तुम्ही बाधा पोचवू शकत नाही. चंद्रशेखर यांच्या वक्तव्यावर मग सभागृहात हास्याची कारंजी उडायची.
चंद्रशेखर यांची आणखी एक आठवण म्हणजे परंदवाडी येथे एका कार्यक्रमानिमित्त ते आले असता आलेला प्रत्यक्ष भेटीचा योग. समाजवादी कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणासाठी परंदवाडी (ता. मावळ) येथे एका शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या शिबिराच्या उद्घाटनासाठी चंद्रशेखर येणार होते आणि त्या कार्यक्रमाच्या वार्तांकनासाठी मला जाण्याची संधी मिळाली होती. माजी पंतप्रधान असलेला हा माणून खादीचा पांढरा सदरा, खादीचे धोतर आणि पायात साधी चप्पल अशा पोशाखात आला होता. बरं खादीचे कपडे असले तरी स्टार्च व कडक इस्त्री हे बहुधा चंद्रशेखर यांना मान्य नसावे. कदाचित त्यामुळेच त्यांचे कपडे काहीसे चुरगळलेले होते.
चंद्रशेखर तेथे आल्यानंतर इतका साधा माणूस अपघाताने का होईना पण देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होऊ शकतो, याचे प्रथमतः आश्चर्यच वाटले. इतकी वर्षे दूरदर्शनवर चंद्रशेखर यांचे भाषण ऐकलेले. पण त्यादिवशी त्यांचे भाषण प्रत्यक्ष ऐकण्याचे योग आला आणि तेव्हाही त्यांचे भाषण तितकेच प्रभावी ठरले. कार्यकर्त्यांनी शिकल्यानंतर किमान काही वर्षे आपल्या देशासाठी सामाजिक काम करावे, हा त्यांच्या भाषणाचा सूर होता.
चंद्रशेखर यांच्याशी संबंधित आणखी एक आठवण वृत्तपत्रातून वाचण्यात आली होती. त्यावेळी हवाला घोटाळ जोरात होता आणि अनेक राजकीय नेत्यांची नावे हवालातील एका डायरीत आढळली होती. त्या डायरीमध्ये एल. के. अशी दोन अक्षरे लिहिलेली होती. त्यामुळे एल. के. म्हणजेच लालकृष्ण (एल. के.) अडवानी यांनी हवालात पैसे घेतले असे आरोप त्यांच्यावर झाले. फक्त इतकेच कारण झाले आणि लालकृष्ण अडवानी यांनी विरोधी पक्ष नेतेपदाचा आणि खासदारकीचा राजीनामा दिला.
त्यावेळी चंद्रशेखर यांनी अडवानी यांच्याबद्दल म्हटले होते की, ""संसदेतील असे अनेक खासदार तुम्हाला मिळतील की ज्यांनी संसदेच्या कॅंटिनचे बिल थकविलेले आहे. पण अडवानी असे खासदार आहेत की ज्यांनी एकदाही कॅंटिनचे बिल थकविलेले नाही. जो माणूस कॅंटिनचे बिल भरण्यात इतकी तत्परता दाखवितो. दुसऱ्याकडून पैसे खाईल याच्यावर माझा तरी विश्वास नाही.''
पुढे अडवानी हवाला खटल्यातून निर्दोष मुक्त झाले देखील. पण माझ्यावरील ओरापांचे मळभ दूर होण्यापूर्वी चंद्रशेखर यांच्यासारख्या स्वच्छ चारित्र्याच्या नेत्याने दिलेल्या प्रशस्तिपत्रामुळे मला खूप धीर आला, अशी प्रतिक्रिया खुद्द अडवानी यांनी त्यावेळी व्यक्त केली होती. प्रभावी वक्ते, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हा विचार प्रत्यक्षात आणणारे आणि कधीही एखादे मत व्यक्त करण्यास न डगमगणारे चंद्रशेखर आता आपल्यात नाहीत. जेव्हा केव्हा संसदेचे अधिवेशन सुरु होईल तेव्हा त्यात चंद्रशेखर दिसणार नाहीत, ही खंत कायम मनामध्ये राहते.
Friday, July 06, 2007
भाषा व संस्कृती वेगळी असूनही पुणं भावलं!

आशिष चांदोरकर
पुणे, ता. 28 ः "शहर पुणे... मुंबईपासून फक्त तीन तासांच्या अंतरावर... इथं बऱ्याच महिला तुम्हाला साडी नेसलेल्या दिसतील. वाहनचालक मोटारगाड्यांना सहजपणे "ओव्हरटेक' करून "रॉंग साइड'नं जाताना तुम्ही पाहू शकाल. पण माझ्या कायम लक्षात राहील ते नागरिकांचं बास्केटबॉल प्रेम व पाहुण्यांचं आदरातिथ्य! महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत झालेला माझा सत्कार व विरोधी पक्षनेत्यांच्या शेजारील खुर्चीवर बसण्याची मिळालेली संधी, हा मी सर्वोच्च सन्मान समजतो. इथली संस्कृती वेगळी आहे. भाषाही निराळी आहे. तरीही मला शहर भावलं. पुणेकरांनो, माझ्यावर भरभरून प्रेम केल्याबद्दल विशेष धन्यवाद!'
ही आहे जॉन डेव्हिड वॉल्श यांची डायरी. महाराष्ट्रातील बास्केटबॉल खेळाडू व प्रशिक्षकांना पुण्यात मोफत प्रशिक्षण देणारे जे. डी. वॉल्श कदाचित विस्मरणात गेले असतील. पण वॉल्श यांनी पुण्यातील अनुभव त्यांच्या वेबसाइटवर लिहिला असून, त्याची एक "ई-मेल' प्रस्तुत प्रतिनिधीलाही पाठविली आहे. त्यातीलच हा काही भाग...
बास्केटबॉलविषयी भारतामध्ये इतकं प्रेम आणि उत्सुकता असेल, याची मी कधी कल्पनाच केली नव्हती. फर्ग्युसन महाविद्यालयात गेलो तेव्हा तिथं कोर्टची रंगरंगोटी व किरकोळ दुरुस्ती सुरू होती. उन्हाचा त्रास आणि पावसाची शक्यता लक्षात घेता मी सकाळी सात वाजताच सराव सुरू करण्यास सांगितलं. पहिल्या दिवशी कोर्टवर नारळ फोडण्यात आला. हे काय सुरू आहे, असा विचार माझ्या मनात आला. पण प्रशिक्षण शिबिरात विघ्न येऊ नये, म्हणून नारळ फोडण्यात आल्याचं मला सांगण्यात आलं.
मग सुरू झाले प्रशिक्षणाचे धडे. पहिल्या दिवशी 80 खेळाडू आणि प्रशिक्षक होते. पण म्हणता म्हणता संख्या वाढली आणि अखेरच्या दिवशी हा आकडा 150 पर्यंत पोचला. पुण्यात बास्केटबॉल "स्पिरीट' जिवंत असल्याचं मला जाणवत होतं. काही काही जण तर वीस-वीस तास अंतर कापून माझ्या शिबिरासाठी आले होते. तेही "एसी' नसलेल्या गाड्यांमधून! तेव्हाच माझ्यापाशी देण्यासारखे जेवढे काही आहे ते देण्याचा मी निश्चय पहिल्याच दिवशी केला. सोळा वर्षांचा सिद्धार्थ कोलकता येथून दोन दिवस प्रवास करून आल्याचं ऐकलं आणि माझ्या प्रशिक्षण शिबिराचं सार्थक झाल्याची भावना निर्माण झाली.
खेळाडू व प्रशिक्षकांचा खेळाविषयीचा उत्साह व माहिती जाणून घ्यायची जिज्ञासा पाहून मला हुरूप आला. "बॉल शूटिंग' आणि "ड्रिबलिंग'चे धडे दिले. सुरवातीला कोर्टवरचे प्रशिक्षण व वर्गातील धडे खेळाडूंपर्यंत पोचण्यात अपयश येत होते. पण माझा संदेश सर्वांपर्यंत पोचविण्यात अपूर्व सोनटक्के, ओंकार कदम, अमित आंबेडकर, अजिंक्य मेहता व गणेश बगाडे या डेक्कन क्लबच्या खेळाडूंची मला मदत झाली.
पुण्यातील बहुतांश वृत्तपत्रांमध्ये माझ्याविषयी छापून आलं होतं. भारतीय पत्रकाराची बास्केटबॉलविषयीची उत्कंठा किती आहे, हे मला पहिल्या पत्रकार परिषदेतचं जाणवलं. मला विचारलेला पहिलाच प्रश्न होता, "अमेरिकेशी सामना करण्यासाठी भारतीय बास्केटबॉलपटूंना आणखी किती वेळ लागेल?' भारतात बास्केटबॉलची सात-आठच "इनडोअर कोर्ट' आहेत आणि खेळाडूंची सरासरी उंची पाच फूट पाच इंच. तरीही बास्केटबॉलमध्ये अमेरिकेशी स्पर्धा करण्याची इच्छा ऐकून मी चक्रावलोच.
पुण्यामध्ये मला "व्हीआयपी' वागणूक दिल्याने मी खूपच भारावून गेलो. महापौर राजलक्ष्मी भोसले, उपमहापौर चंद्रकांत मोकाटे, विरोधी पक्षनेते प्रा. विकास मठकरी, बास्केटबॉल संघटनेचे विवेक मेहता आणि महापालिकेतील नगरसेवक यांनी माझा सत्कार केला. यापूर्वी मी असे कधीच अनुभवले नव्हते. शेवटी विरोधी पक्षनेत्याशेजारी बसण्याची विनंती मला केली गेली. मी तर उडालोच! असो. मला इतकं प्रेम दिल्याबद्दल पुणेकरांनो धन्यवाद.
लेबल:
Basketball,
Deccan Gymkhana,
J. D. Walsh,
PMC
Wednesday, June 27, 2007
अंजूच्या उपस्थितीवरच प्रेक्षक खूष...

जागतिक ऍथलेटिक्स स्पर्धेला पात्र ठरण्याची आणखी एक संधी अंजू बॉबी जॉर्जच्या हातून निसटली असली, तरी लोकांना तिच्या उपस्थितीचेच अप्रूप होते. गेल्या वेळेस आजारी असल्यामुळे पुण्यातील ग्रांप्री स्पर्धेत सहभागी होऊ न शकलेली अंजू सणस क्रीडांगणावर आली आणि स्पर्धेचा नूरच पालटला. हरवलेले चैतन्य परत आले. टाळ्यांचा गजर सुरू झाला आणि प्रत्येक जण तिच्या यशासाठी प्रार्थना करू लागला.
लांब उडीच्या स्पर्धेत फक्त चारच स्पर्धक होते. त्यात अंजू जॉर्ज, मनीषा डे आणि सुश्मिता सिंग रॉय या भारताच्या खेळाडू, तर सायरा फझल ही पाकिस्तानची ऍथलिट होती. त्यामुळे अंजूचे पुण्यातील विजेतेपद निश्चित होते. पण सर्वांनाच उत्सुकता होती ती अंजू 6.60 मीटर लांब उडी मारून जागतिक ऍथलेटिक्स स्पर्धेला पात्र ठरते का याचीच!
प्रत्येक खेळाडूला सहा वेळा उडी मारण्याची संधी होती. पात्र ठरण्यासाठी आवश्यक 6.6 चा आकडा पार करणे आपल्या आवाक्यात नाही, याचा अंदाज अंजूला पहिल्या दोन प्रयत्नांनंतरच आला असावा. कारण पुढच्या प्रत्येक उडीच्या वेळी ती प्रेक्षकांकडे पाहून मला "चिअर अप' करा, असे आवाहन करीत होती. चौथ्या उडीपर्यंत अंजूने सर्वप्रथम संधी घेतली आणि इतर तीन खेळाडूंनी नंतर उड्या मारल्या. पण अखेरच्या दोन उड्या मारण्यापूर्वी अंजूने थोडी अधिक विश्रांती घेतली व सर्वांत शेवटी उड्या मारल्या. तरीही अंजूची मजल 6.21 मीटरपर्यंतच गेली. अखेरच्या प्रयत्नातही अपयश आल्यानंतर मातीवर जोरात हात आपटणाऱ्या अंजूच्या चेहऱ्यावरचे नैराश्य अगदी सहजपणे दिसत होते.
अंजूने पात्रता निकष पूर्ण केला नसला, तरी तिने अपेक्षेप्रमाणे सुवर्णपदक मात्र पटकाविले. उपस्थितांच्या चेहऱ्यावर मात्र, अंजूला प्रत्यक्ष पाहिल्याचेच समाधान होते. स्पर्धा संपल्यानंतर अंजूचे फोटो काढण्यासाठी फटाफट कॅमेरा "क्लिक' होऊ लागले. स्वाक्षरी घेण्यासाठी चाहत्यांचा गराडा पडला. प्रत्येकाची इच्छा होती अंजूबरोबर हस्तांदोलन करण्याची, शुभेच्छा देण्याची आणि आयुष्यभरासाठी अंजूबरोबरच्या सुखद आठवणी जपून ठेवण्याची!
जागतिक ऍथलेटिक्स स्पर्धेत भारताला ब्रॉंझपदक मिळवून देणाऱ्या अंजू जॉर्जची लोकप्रियता अबाधित असून, ती कामगिरीवर अवलंबून नाही, याचाच प्रत्यय सणस क्रीडांगणावर येत होता.
लेबल:
Anju George,
Asian Grampri,
Athletics,
pune
Tuesday, June 26, 2007
अद्ययावत तंत्रज्ञानाचा "शिवाजी'

सदैव लॅपटॉप जवळ बाळगून असणारा, गरीब व गरजूंना स्वस्तात शिक्षण मिळण्यासाठी परदेशातील भारतीयांकडून "मनी ट्रान्सफर'द्वारे पैसे गोळा करणारा आणि एमएमएस तसेच "स्पायकॅम' हे अद्ययावत तंत्रज्ञान हाताळण्यात पुरता सरावलेला नायक हे रजनीकांतच्या "शिवाजी द बॉस'चे वेगळेपण किंवा वैशिष्ट्य म्हटले पाहिजे.
परदेशात उच्च शिक्षण घेतल्यानंतर मिळालेली नोकरी सोडून पुन्हा भारतात परतलेला शिवाजी (रजनीकांत) हा चित्रपटाचा नायक आहे. तो अनेक वर्षे परदेशात राहिलेला असल्याने अद्ययावत तंत्रज्ञान त्याने आत्मसात केले असणे साहजिकच आहे. पण या गोष्टींचा चित्रपटामध्ये योग्य ठिकाणी उपयोग करुन कथानक अधिक रंजक केले आहे.
लॅपटॉपचा पासवर्ड हा एखादा शब्द नव्हे तर विशिष्ट पद्धतीने आवाज काढल्याशिवाय संगणकात "एन्टर'च करता येत नाही, हा तंत्रज्ञानातील पुढारलेपणाचे पहिले उदाहरण. त्याच्या या क्लृप्तीमुळेच पोलिस, सीबीआय व संगणक तज्ज्ञांनाही त्याचा पासवर्ड "हॅक' करता येत नाही. अवैध मार्गांनी पैसा जमविणाऱ्या अधिकाऱ्यांकडून काळा पैसा जमा करण्याची त्याची कल्पनाही वेगळी आहे. तुमच्याकडे किती काळा पैसा आहे, याची माहिती माझ्याकडे असून त्यापैकी निम्मा पैसा माझ्याकडे जमा करा. अन्यथा आयकर अधिकाऱ्यांकडे जाऊन मी माहित देतो, मग ते तुमचे सगळे पैसे काढून घेतील, ही शिवाजीची कल्पना चांगलीच लागू पडते.
शिवाय मोठ्या प्रमाणावर जमा झालेला काळा पैसा "व्हाईट' करण्याची त्याची शक्कलही अफाट आहे. परदेशातील भारतीय नागरिकांकडूनही शिवाजी पैसे जमा करतो, पण "मनी ट्रान्सफर'द्वारेच! जमा झालेला सगळा काळा पैसा तो अंडरवर्ल्डमधील मुस्लिम म्होरक्याकडे जमा करतो. त्यानंतर तो म्होरक्या अमेरिकेतील त्याच्या एजंटला कॉल करुन माझ्याकडे इतके रुपये जमा आहेत. तितक्या रकमेचे डॉलर्स तू अमूक अमूक माणसाच्या नावावर जमा कर, असे सांगतो. काळा पैसा अशा पद्धतीने चलनात येतो की नाही, माहिती नाही. पण असे घडत असल्यास ते अफाटच आहे.
अखेरच्या प्रसंगांमध्येही तंत्रज्ञान कसे कथानकाला उपयुक्त ठरु शकते ते आपण अनुभवतो. शिवाजी तुरुंगामध्ये असताना त्याचे तुरुंगातील काही हस्तक त्याला "एमएमएस' आणि "जीपीआरएस' सुविधा असलेला एक मोबाईल पुरवितात. त्याद्वारे तो साऱ्यांशी संपर्क साधतो. "एमएमएस' पाठवितो. पोलिस चौकीमध्ये शिवाजीच्या हस्तकाने छुपा कॅमेरा बसविलेला असतो. त्यातून पोलिस चौकीत घडणाऱ्या साऱ्या घटना शिवाजीच्या मोबाईलवर येत असतात. कल्पना म्हणून तरी ही नवीनच वाटते. शक्याशक्यतेच्या कसोटीवर हे असंभव वाटत असले तरी भविष्यात असे होणारच नाही, असा दावा कोणीच करणार नाही.
इतके अद्ययावत तंत्रज्ञान चित्रपटामध्ये असल्याने तो चित्रपट सध्याच्या जमान्यातील आहे, असे फक्त वाटतच नाही. तर नकळतपणे आपली त्याच्याशी नाळ जोडली जाते. वायफळ विनोद आणि फुटकळ कथानकाच्या आधारे झळकणारे मराठी, हिंदी चित्रपट पाहिल्यानंतर दाक्षिणात्य चित्रपटांमधील वैविध्य आणि पुढारलेपण सहज जाणवते. त्यासाठी का होईना शिवाजी एकदा पहाच.
परदेशात उच्च शिक्षण घेतल्यानंतर मिळालेली नोकरी सोडून पुन्हा भारतात परतलेला शिवाजी (रजनीकांत) हा चित्रपटाचा नायक आहे. तो अनेक वर्षे परदेशात राहिलेला असल्याने अद्ययावत तंत्रज्ञान त्याने आत्मसात केले असणे साहजिकच आहे. पण या गोष्टींचा चित्रपटामध्ये योग्य ठिकाणी उपयोग करुन कथानक अधिक रंजक केले आहे.
लॅपटॉपचा पासवर्ड हा एखादा शब्द नव्हे तर विशिष्ट पद्धतीने आवाज काढल्याशिवाय संगणकात "एन्टर'च करता येत नाही, हा तंत्रज्ञानातील पुढारलेपणाचे पहिले उदाहरण. त्याच्या या क्लृप्तीमुळेच पोलिस, सीबीआय व संगणक तज्ज्ञांनाही त्याचा पासवर्ड "हॅक' करता येत नाही. अवैध मार्गांनी पैसा जमविणाऱ्या अधिकाऱ्यांकडून काळा पैसा जमा करण्याची त्याची कल्पनाही वेगळी आहे. तुमच्याकडे किती काळा पैसा आहे, याची माहिती माझ्याकडे असून त्यापैकी निम्मा पैसा माझ्याकडे जमा करा. अन्यथा आयकर अधिकाऱ्यांकडे जाऊन मी माहित देतो, मग ते तुमचे सगळे पैसे काढून घेतील, ही शिवाजीची कल्पना चांगलीच लागू पडते.
शिवाय मोठ्या प्रमाणावर जमा झालेला काळा पैसा "व्हाईट' करण्याची त्याची शक्कलही अफाट आहे. परदेशातील भारतीय नागरिकांकडूनही शिवाजी पैसे जमा करतो, पण "मनी ट्रान्सफर'द्वारेच! जमा झालेला सगळा काळा पैसा तो अंडरवर्ल्डमधील मुस्लिम म्होरक्याकडे जमा करतो. त्यानंतर तो म्होरक्या अमेरिकेतील त्याच्या एजंटला कॉल करुन माझ्याकडे इतके रुपये जमा आहेत. तितक्या रकमेचे डॉलर्स तू अमूक अमूक माणसाच्या नावावर जमा कर, असे सांगतो. काळा पैसा अशा पद्धतीने चलनात येतो की नाही, माहिती नाही. पण असे घडत असल्यास ते अफाटच आहे.
अखेरच्या प्रसंगांमध्येही तंत्रज्ञान कसे कथानकाला उपयुक्त ठरु शकते ते आपण अनुभवतो. शिवाजी तुरुंगामध्ये असताना त्याचे तुरुंगातील काही हस्तक त्याला "एमएमएस' आणि "जीपीआरएस' सुविधा असलेला एक मोबाईल पुरवितात. त्याद्वारे तो साऱ्यांशी संपर्क साधतो. "एमएमएस' पाठवितो. पोलिस चौकीमध्ये शिवाजीच्या हस्तकाने छुपा कॅमेरा बसविलेला असतो. त्यातून पोलिस चौकीत घडणाऱ्या साऱ्या घटना शिवाजीच्या मोबाईलवर येत असतात. कल्पना म्हणून तरी ही नवीनच वाटते. शक्याशक्यतेच्या कसोटीवर हे असंभव वाटत असले तरी भविष्यात असे होणारच नाही, असा दावा कोणीच करणार नाही.
इतके अद्ययावत तंत्रज्ञान चित्रपटामध्ये असल्याने तो चित्रपट सध्याच्या जमान्यातील आहे, असे फक्त वाटतच नाही. तर नकळतपणे आपली त्याच्याशी नाळ जोडली जाते. वायफळ विनोद आणि फुटकळ कथानकाच्या आधारे झळकणारे मराठी, हिंदी चित्रपट पाहिल्यानंतर दाक्षिणात्य चित्रपटांमधील वैविध्य आणि पुढारलेपण सहज जाणवते. त्यासाठी का होईना शिवाजी एकदा पहाच.
लेबल:
GPRS,
MMS,
Mobile,
Rajanikant,
Shivji the boss,
Technology
Monday, June 25, 2007
शिवाजीची भेट एकदा तरी घ्या...

हैदराबादहून मुंबईला बदली झाल्यानंतर आणि त्यानंतर पुण्यात आल्यावर तेलुगू चित्रपट पाहणे जवळजवळ बंदच झाले होते. आमचा तमिळ मित्र देविदास देशपांडे याच्या रुमवर गेल्यानंतर कधी तरी एखादा दाक्षिणात्य चित्रपट पाहिला जायचा. पण "शिवाजी - द बॉस' या तमिळ चित्रपटाने पुन्हा एकदा खेचून चित्रपटगृहाकडे नेले.
भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा, सावकारी किंवा वतनदारी समूळ नष्ट करण्यासाठीचा संघर्ष, प्रेमकथा या घासून गुळगुळीत झालेल्या विषयांप्रमाणेच कंपनीचा "सीईओ' निवडण्यासाठी "लेडी बॉस'कडून घेतली जाणारी परीक्षा हा "मिसाम्मा' या चित्रपटाच्या कथानकाचा गाभा असतो. एका विस्कटलेल्या प्रेमकथेचा पत्रकाराने लावलेला छडा आणि त्यातून उत्पन्न झालेला संघर्ष या कथेवर शिवमणी चित्रपट बेतलेला असतो. डाव्या विचारसरणीच्या प्रचारार्थ निघालेले "लाल सलाम' आणि "विळा कोयता' असे चित्रपटही चांगले "हाऊसफुल्ल' चालतात.
थोडक्यात म्हणजे फक्त परदेशात चित्रीकरण आणि भडक कपडे हेच तेलुगू किंवा एकूणच दाक्षिणात्य चित्रपटांचे वैशिष्ट्य नाही. तर कथानक, संवाद, संगीत व चित्रीकरण असेही मुद्देही तितकेच प्रभावशाली असल्यामुळेच चित्रपट भावतात. "टागोर' या चिरंजीवीच्या चित्रपट प्रदर्शनाच्या काळात हैदराबादमध्ये असल्याने त्याच्या लोकप्रियतेचा चुणूक जाणवली होती. आता "शिवाजी-द बॉस' या रजनीकांतच्या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या निमित्ताने कलाकाराची लोकप्रियता किती असू शकते, याचा प्रत्यय आला. मी काही रजनीकांतचा "फॅन' नाही. त्यामुळे रजनीकांतच्या प्रेमापायी मी तो चित्रपट पाहिला नाही. पण दाक्षिणात्य चित्रपटांची भव्यदिव्यता, त्याचे कथानक हे निश्चितपणे निराळे असते याची जाणीव असल्यामुळेच चित्रपट पाहण्याची हिंमत केली.
गॉगल घालण्याची आणि तो डोळ्यावरुन बाजूला करण्याची लकब, च्युईंगम खाण्याची अजब तऱ्हा, नाणे उडवून खिशात टाकण्याची पद्धत या गोष्टी पाहिल्यानंतर रजनीकांतचा चित्रपट पाहिल्याचे समाधान नक्कीच मिळते. ती रजनीकांतची स्टाईल आहे. रजनीकांत स्टाईलसाठीच अधिक प्रसिद्ध आहे. चाहते त्याची स्टाईल पाहण्यासाठी चित्रपटाला गर्दी करतात. पण रजनीची स्टाईल आणि संवाद यापेक्षाही चित्रपटाचे कथानक मला अधिक भावले. चित्रपट तमिळ असल्यामुळे तो अतिरंजित असणे हे ओघाने आलेच. पण त्यामुळे चित्रपटाच्या विषयाचे गांभीर्य जराही कमी होत नाही.
सध्या शिक्षण आणि आरोग्य सुविधा इतक्या महाग झाल्या असून त्या सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. ज्यांच्याकडे पैसा आहे, त्यांना फक्त चांगले शिक्षण आणि आरोग्य या परिस्थितीमुळे अस्वस्थ झालेल्या रजनीकांतचा लढा चित्रपटात दाखविण्यात आला आहे. हे सारे बदलून टाकण्यासाठी त्याने उभारलेला संघर्ष आणि प्रस्थापितांकडून त्यामध्ये आणण्यात येणाऱ्या अडचणी हे चित्रपटात दाखविलेले आहे. रजनीकांत नायक असल्याने तो या लढ्यामध्ये यशस्वी होणार आणि प्रस्थापितांची सद्दी संपणार, हे सांगायला नकोच.
मुद्दा असो की, वेगळा विषय प्रेक्षकांसमोर आणण्यासाठीची धडपड नक्कीच स्तुत्य आहे. रजनीच्या अभिनयापुढे शंकरचे दिग्दर्शन आणि चित्रपटाची कथा मार खाते असा अनुभव आहे. पण हे मत आहे रजनीकांतच्या निस्सीम चाहत्यांचे! माझ्यासारख्या तटस्थपणे चित्रपट पाहणाऱ्या माणसाला रजनीच्या स्टाईलप्रमाणेच चित्रपटाची कथाही तितकीच आकर्षक वाटते. तर चित्रपटातील कथानकाप्रमाणेच रजनी आपला तारणहार आहे, ही सामान्यांची भावना झाल्यामुळेच कदाचित रजनीकांतचे चाहते त्याचे चित्रपट पाहण्यासाठी रांगा लावतात. सर्वसामान्यांना भेडसावणारे प्रश्न चित्रपटामध्ये प्रतिबिंबीत झाल्यामुळेच चित्रपट अतिरंजीत असूनही आवडतो.
अर्थातच, "शिवाजी - द बॉस' पाहण्यासाठी जाताना रजनीकांतचा "लेटेस्ट' चित्रपट हीच गोष्ट ध्यानात ठेवून गेलो होते. डोक्याला ताप नाही, याच भूमिकेतून चित्रपट आपण चित्रपट पाहतो. पण संपूर्ण चित्रपट पाहिल्यानंतर रजनीकांत इतकाच चित्रपटाचा विषय आणि मांडणी देखील भावते.
लेबल:
Chiranjivi,
Rajanikant,
Shivji the boss,
Tamil,
Telugu
Thursday, June 21, 2007
राष्ट्रपतीपदी कलाम हवे का...?

कौन बनेगा राष्ट्रपती? या प्रश्नाने सध्या सर्वाधिक धुमाकूळ घातला आहे. सुरुवातीला संयुक्त पुरोगामी आघडीच्या उमेदवार आणि कॉंग्रेसच्या निष्ठावंत नेत्या प्रतिभा पाटील आणि राष्ट्रीय लोकशाहीच्या आघाडीच्या पाठिंब्यावर निवडणूक लढविणारे बुजुर्ग नेते भैरोसिंह शेखावत यांच्यातच लढत होईल, असे वाटत होते. मात्र, विविध राज्यातील पराभूत नेत्यांनी उभारलेल्या तिसऱ्या आघाडीने या लढतीमध्ये गंमत निर्माण केली आहे. चुरस निर्माण झाली असे म्हणणे सध्या तरी धाडसाचे ठरेल. पण किमान या आघाडीमुळे नवी समीकरणे समोर येऊ लागली आहेत.
तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांच्या चेन्नईमध्ये झालेल्या बैठकीत विद्यमान राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे, अब्दुल कलाम यांनाच पुन्हा राष्ट्रपतीपदासाठी उभे राहण्याची गळ घालण्याचे निश्चित करण्यात आले. कॉंग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांपासून समान अंतर राखण्याचा इरादा व्यक्त करीत शेखावत आणि पाटील यांच्याऐवजी नवे कलाम यांचे नाव तिसऱ्या आघाडीने समोर आणले. या आघाडीतील समाजवादी पक्ष वगळता इतर सर्व पक्षांनी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्त्वाखालील वाजपेयी सरकारमध्ये मंत्रीपदे उपभोगली आहेत. शिवाय समाजवादी पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांची उत्तर प्रदेशातील मैत्री हे तर "ओपन सिक्रेट'च आहे. त्यामुळेच तिसरी आघाडी जरी भाजपपासून अंतर राखण्याची भाषा करीत असेल, तरी ते कितपत शक्य आहे, यात शंकाच आहे.
कलाम यांचे नाव पुढे आल्यानंतर खुद्द शेखावत यांनीच ""अब्दुल कलाम हे जर उमेदवार असल्यास माझी बिनशर्त माघार आहे,'' असे सांगून आणखी एक बॉंबगोळा टाकला. त्यामुळे कलाम यांच्या नावाला बळकटी मिळण्यास मदत झाली. शिवाय भाजपनेच एक वर्षापूर्वी कलाम यांची इच्छा असेल तर त्यांनाच पुन्हा पाठिंबा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर सारी हयात जनसंघ आणि भाजपमध्ये घालविलेल्या शेखावत यांच्याकडून या व्यतिरिक्त कोणत्याही दुसऱ्या भूमिकेची अपेक्षाच करता येत नाही. त्यामुळे पाटील, शेखावत की कलाम असा प्रश्न उभा राहिला आहे.
राष्ट्रपतीपदाची निवडणूक थेट होणार असती तर कलाम हे निर्विवादपणे निवडून आले असते, यात शंकाच नाही. त्यांच्याइतकी लोकप्रियता इतर दोन्ही नेत्यांना नाही. मात्र, ही निवडणूक आमदार व खासदारांकडून होणार आहे. त्यामुळेच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.या सर्व पार्श्वभूमीवर कलाम यांना पुन्हा संधी देणे योग्य आहे किंवा नाही, या संदर्भात चर्चा करणे इष्ट ठरेल. भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक आणि कर्ते करविते डॉक्टर ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी भारतासाठी दिलेल्या योगदानाची मांडणी करण्यासाठी शब्दच अपुरे पडतील. त्यांची योग्यता, अभ्यास आणि वैज्ञानिक म्हणून कार्य लक्षात घेतले तर अधिक सांगण्याची गरजच नाही. गेल्या वेळी याच गोष्टी लक्षात राष्ट्रीय लोकशाही आघाडीने त्यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनविले होते.
अर्थात, राष्ट्रपती हा राजकीय पार्श्वभूमी असलेलाच असावा, अशी भूमिका डाव्यांनी घेतली. त्यामुळे कलाम आणि आझाद हिंद सेनेतील सेनानी कॅप्टन लक्ष्मी सेहगल या दोन महान व्यक्तींमध्ये विनाकारण लढत झाली. त्यात कलाम विजयी झाले. डावे वगळता इतर कोणी कलाम यांच्या नावाला आक्षेप घेतला नव्हता. आता परिस्थिती बदलली आहे. डावे तर कलाम यांच्या बाजूने नाहीच पण कॉंग्रेसही प्रतिभा पाटील यांच्या नावावर ठाम आहे. कॉंग्रेसचे सहकारी पक्षही कलाम यांच्या नावाला पाठिंबा देण्यास उत्सुक नाहीत. शिवाय राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील शिवसेनाही कलाम यांच्यावर नाराज आहे. त्यामुळेच उत्सुकता ताणली गेली आहे.
कलाम हे कोणताही राजशिष्टाचार न बाळगता थेट सामान्य नागरिकांमध्ये मिसळतात, लहान मुलांच्या प्रश्नांना तितक्याच आत्मीयतेने उत्तरे देतात, राष्ट्रपती झाल्यानंतरही स्वतःमधील माणूस जागरुक ठेवतात, त्यामुळेच कलाम यांच्याबद्दल सर्वसामान्य नागरिकांना आपुलकी आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात जखमी झाले तेव्हा सर्व शिष्टाचार बाजूला ठेवून कलाम स्वतःहून नायडू यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. अशा छोट्या छोट्या घटनांमधून कलाम यांनी त्यांचे वेगळेपण सिद्ध केले होते.
मात्र, मोहम्मद अफझल प्रकरणापासून कलाम हे अनेक जणांच्या मनातून उतरले आहेत. संसदेवर हल्ला करणाऱ्या मोहम्मद अफझलला सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतरही राष्ट्रपती म्हणून कलाम त्याच्यावर सही करत नाहीत, तेव्हा कलाम यांच्या भूमिकेची चीड येते. तुमचे वैयक्तिक मत काहीही असले तरी राष्ट्राच्या प्रतिष्ठेचा प्रश्नी तुम्ही तटस्थपणे भूमिका पार पाडणे अपेक्षित असते. कारणे काहीही असोत, कलाम यांनी अफझलच्या फाशीवर सही न केल्यानेच ते वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. कलाम यांनी वेळीच अफझलच्या फाशीवर शिक्कामोर्तब केले असते आणि अफझल फासावर लटकला असता तर आज ही परिस्थिती उद्भवलीच नसती.
राष्ट्रपती पदावर बिगर राजकीय व्यक्ती नको, या भूमिकेचे डावे पक्ष, कॉंग्रेस आणि कॉंग्रेस आघाडीतील पक्ष आहेत. राष्ट्रपती आपल्या विचाराचा असावा. त्यामुळे आपल्याला हवा तेव्हा आणि हवा तसा त्याचा उपयोग करुन घेता येतो, हे राजकीय पक्षांच्या डोक्यात पक्के बसल्याने त्यांना बिगरराजकीय व्यक्ती या पदावर नको. गेल्यावेळी झालेल्या निवडणुकीला गोध्रा दंगलींची पार्श्वभूमी होती. भारतात मुस्लिमांना धोका नाही. ते सुरक्षित असून त्यांना सन्मान आहे, हा आणखी एक संदेश कलाम यांच्या निवडीतून देण्याचा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा हेतू होता. तो गेल्या वेळी साध्य झाला.
आता भाजप आणि आघाडी अल्पमतात असून कॉंग्रेस आघाडीचे बहुमत आहे. शिवाय कॉंग्रेसला डाव्यांची हॉंजी-हॉंजी करण्यावाचून गत्यंतरच नाही. त्यामुळेच परिस्थिती अधिक बिकट बनली आहे. गेल्या वेळी कलाम यांचा विजय निश्चित होता. यंदा तशी परिस्थिती नाही. त्यामुळे कलाम यांनी निवडणूक लढवून पराभूत व्हायची "रिस्क' घ्यायची का? हा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा की, अफझलच्या फाशीच्या अर्जावर कलाम यांनी स्वाक्षरी का केली नाही. हा मुद्दाही पुन्हा निवडणूक लढविताना महत्त्वाचा आहे?
अशा घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतीपदी पुन्हा कलाम यांचीच निवड व्हावी, असे आपल्याला वाटते का? कृपया आपले मत येथे नोंदवा...
What is your opinion about Dr. APJ Abdul Kalam's candidature for Presidential post? Should he come into the fray or stay away from it? Issue of Mohammad Afzal's capital punishment is how much important as per your opinion? Please give your opinion on President's Election here...
लेबल:
APJ Abdul Kalam,
BJp,
Congress,
President.
Saturday, June 16, 2007
रेस झाली तर उत्तमच... पण होणे अवघड!

भारतात दिल्ली येथे "फॉर्म्युला वन' शर्यत होण्यासाठी भारतीय ऑलिंपिक संघटनेने पुढाकार घेतला असून त्या दृष्टीने आवश्यक करारांची पूर्तता लवकरच करणार आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी गुरुवारी दिली होती. त्या पार्श्वभूमीवर कार्तिकेयन याची प्रतिक्रिया विचारली असता त्याने, तसे झाले तर उत्तमच; पण ते अवघड आहे, अशी साधी सरळ प्रतिक्रिया व्यक्त केली.
"सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स' आणि "ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया' यांच्या संयुक्त विद्यमाने "बाहा एसएई इंडिया 2007' स्पर्धेनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेचे उद्घाटन कार्तिकेयन याच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर तो पत्रकारांशी बोलत होता.
"भारतात स्पर्धेसाठी आवश्यक पायाभूत सुविधांची निर्मिती करणे हे मोठे आव्हान असणार आहे. फक्त "रेसिंग ट्रॅक'ची निर्मिती करणे हेदेखील खूप खर्चिक काम आहे. ट्रॅकसाठी मोठ्या प्रमाणावर जमीनही आवश्यक आहे. बहारिनसारख्या देशात निधीची उपलब्धता ही समस्या नव्हती. मात्र, भारतातही तशीच परिस्थिती असेल, याबद्दल कोणीच खात्री देऊ शकणार नाही. मध्यंतरी चंद्राबाबू नायडू यांनी "एफ वन'साठी सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, निवडणुकीनंतर तेच सत्तेवरून दूर झाले व "एफ वन'चा बाडबिस्तरा गुंडाळावा लागला. भारतात अजूनही क्रीडा क्षेत्रासाठी इतकी गुंतवणूक हवीच का, असे विचारणारे आहेत. तेव्हा "एफ वन' शर्यत भारतात होण्यात प्रचंड गुंतागुंत आहे,'' असे कार्तिकेयनने सांगितले.
भारत आता खऱ्या अर्थाने बदलतो आहे. नवे तंत्रज्ञान येत आहे. केवळ जगभरातच नव्हे तर भारतातही "एफ वन' शर्यतींची लोकप्रियता वाढते आहे. शिवाय बहारिनप्रमाणेच मलेशिया आणि भारताचा शेजारी चीन येथेही "फॉर्म्युला वन'चा ट्रॅक उपलब्ध आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतात ट्रॅक का नको, असा सवाल त्याने उपस्थित केला.
कार्तिकेयन सध्या "विल्यम्स'चा टेस्ट ड्रायव्हर असून 2009 मध्ये भारतात शर्यत झालीच तर भारतातील ट्रॅकवर "ड्राईव्ह' करण्यास मला निश्चित आवडेल, असे सांगून तो म्हणाला, ""तोपर्यंत माझे वय 32 वर्षे झालेले असेल. त्या वेळीही वय माझ्या बाजूने असेल आणि मी शर्यतीत सहभागी होण्यास निश्चितच पात्र असेन. त्यामुळे मी आता योग्य संधीची वाट पाहत आहे.
भारतात प्रथमच "बाहा एसएई' स्पर्धा
अमेरिकेच्या धर्तीवर भारतात प्रथमच "बाहा एसएई इंडिया 2007' या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून, ही स्पर्धा 21 ते 23 डिसेंबरदरम्यान इंदूरजवळील पीथमपूर येथे पार पडणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन भारताचा "फॉर्म्युला वन' रेसर कार्तिकेयन याच्या हस्ते आज झाले.
"सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स'ने (एसएई) स्पर्धेचे आयोजन केले असून, या स्पर्धेत अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचा व बुद्धिकौशल्याचा कस लागणार आहे. कमी किमतीमध्ये व कोणत्याही भूप्रदेशात, कितीही खडतर भूपृष्ठावर टिकाव धरू शकेल, असे वाहन सहा महिन्यांच्या कालावधीत विद्यार्थ्यांना विकसित करावयाचे आहे. त्यासाठी सहभागी संघांना दोन लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य देण्यात येणार असून, कमीत कमी पैसे खर्च करणाऱ्या संघाला अधिक गुण दिले जाणार आहेत.
कार्तिकेयनचे अभियंत्यांना आवाहन
कार्यशाळेचे उद्घाटन केल्यानंतर नरेन कार्तिकेयन याने "एफ वन'च्या कारकिर्दीतील चढ-उतार आणि काही किस्से ऐकविले. ""पूर्वी "एफ वन' शर्यतींमध्ये युरोप आणि अमेरिका खंडातील व्यक्तींचा अधिक भरणा होता. आशियाई नावे शोधूनही सापडायची नाहीत. मात्र, आता परिस्थिती बदलत आहे. केवळ ड्रायव्हर्स नव्हे, तर अभियंते आणि इतर तंत्रज्ञही मोठ्या प्रमाणात आशियाई आहेत. काही भारतीयही "एफ वन'मध्ये अभियंते म्हणून कार्यरत आहेत. ही गोष्ट बदलती परिस्थिती दर्शविणारी आहे,'' असे तो म्हणाला.
कार्तिकेयनने काही अभियंत्यांना बरोबर घेऊन एक गट स्थापन केला आहे. हा गट "एफ वन' शर्यतींवर कार्यरत आहे. "ज्या "ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स'ना माझ्याबरोबर काम करण्याची इच्छा असेल त्यांनी माझ्याबरोबर यावे,' असे आवाहन त्याने केल्यानंतर कार्यक्रमात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.
देशभरातील 52 अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या संघांनी संगणकावर नोंदणी केली होती. त्यातून एकूण 27 संघांची निवड या स्पर्धेसाठी करण्यात आली आहे. "एसएई इंडिया'चे अध्यक्ष डॉ. पवन गोएंका, "एसएई इंडिया'चे उपाध्यक्ष श्रीकांत मराठे, "जे. के. टायर्स'चे मोटर स्पोर्टस विभागप्रमुख संजय शर्मा, "फोर्ड इंडिया'चे व्यवस्थापकीय संचालक अरविंद मॅथ्यू आदींचीही या वेळी भाषणे झाली.
बास्केटबॉलची ओढ पाहून वॉल्श भारावले
महाराष्ट्राच्या खेळाडूंना मोफत प्रशिक्षण
अमेरिकेच्या तुलनेत भारतातील नवोदित बास्केटबॉलपटूंचे कौशल्य आणि वेग कमी असेल; परंतु खेळाच्या ओढीमुळे ते तब्बल वीस-वीस तास प्रवास करून येथे आले आहेत, ही गोष्टच भारावून टाकणारी आहे, अशा शब्दांत अमेरिकेचे माजी आंतरराष्ट्रीय बास्केटबॉलपटू आणि प्रशिक्षक जे. डी. वॉल्श यांनी महाराष्ट्राच्या बास्केटबॉलपटूंचे कौतुक केले.
महाराष्ट्र बास्केटबॉल संघटनेने या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले असून, त्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून 80 हून अधिक खेळाडू आणि 35 प्रशिक्षक उपस्थित आहेत. अमेरिका, इटली, चीन, इस्राईल येथे वॉल्श यांनी बास्केटबॉल प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. मात्र, महाराष्ट्राच्या खेळाडूंना पाच दिवस प्रशिक्षण देण्यास पुण्यात आलेले वॉल्श एकही रुपया मानधन म्हणून घेणार नाहीत. अपूर्व सोनटक्के याच्या प्रेमापोटीच आपण येथे आलो, असल्याचे वॉल्श यांनी आवर्जून सांगितले.
बॉस्केटबॉलपटूंची उंची किती व वजन किती आहे, यापेक्षाही खेळाडूंचे "बॉल हॅंडलिंग' कसे आहे, चेंडू "बास्केट' करण्याची पद्धत कशी आहे, या गोष्टी अधिक महत्त्वाच्या आहेत. थोडेसे वेगळ्या पद्धतीने नियोजन केले तर कमी उंचीचे खेळाडू घेऊनही सामने जिंकता येतात. त्यामुळेच येथे उंचीपेक्षा विविध कौशल्ये अधिक उपयुक्त आहेत. त्यामुळेच भारतीय खेळाडूंनी बास्केटबॉलची मूलभूत कौशल्ये अंगी बाणवली पाहिजेत. त्यासाठीचे पहिले पाऊल म्हणून या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, असे वॉल्श यांनी स्पष्ट केले.
खेळाडूंना चेंडूवर नियंत्रण ठेवणे, पास देणे, चेंडू जाळीत टाकणे आदी मूलभूत गोष्टींचे प्रशिक्षण देण्यात येणार असून, प्रशिक्षकांना संघनिवड कशी करावी, खेळाडू कसे बदली करावेत, खेळापूर्वी व सामना सुरू झाल्यानंतर रणनीती कशी आखावी, आदी गोष्टींबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. पुण्यातील प्रशिक्षण शिबिर संपल्यानंतर काश्मीरमधील अनाथ मुलांना बास्केटबॉलची तोंडओळख करून देण्यासाठी वॉल्श हे जम्मू-काश्मीर येथे जाणार आहेत. त्याचप्रमाणे मुंबईच्या झोपडपट्टीमधील मुलांनादेखील बास्केटबॉलचे प्रशिक्षण देण्याची इच्छा वॉल्श यांनी व्यक्त केली.
दहाव्या मिनिटाला पाणी...

जेम्स डेव्हिड वॉल्श यांनी शिबिरासाठी आलेल्या खेळाडूंचा सराव घेण्यास प्रारंभ केला. सुरवातीच्या टप्प्यात खेळाडूंचे "वॉर्मअप' सुरू होते. त्या वेळी वॉल्श पाचव्याच मिनिटाला खेळाडूंचा घाम काढला. त्यानंतर आठव्या मिनिटानंतरच खेळाडूंचा "स्टॅमिना' संपला आणि त्यांनी पाण्याच्या बाटल्या मागण्यास सुरवात केली. दहाव्या मिनिटाला पाणी मागितल्यामुळे वॉल्श यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. चाळीस मिनिटांच्या खेळासाठी किमान 80 मिनिटे सलग खेळण्याची तयारी ठेवावी लागते, असे सांगत वॉल्श यांनी महाराष्ट्राच्या खेळाडूंना "स्टॅमिना' वाढविण्याचा सल्ला दिला.
Friday, June 15, 2007
निष्ठावंत विरुद्ध निष्ठावंत

साधारणपणे 1950 चे दशक! राजस्थानमध्ये त्यावेळी जनसंघाची फारशी ताकद नसली तरी 1958 साली विधानसभेत जनसंघाचे आठ आमदार होते. त्यावेळी राजस्थानमधील कॉंग्रेस सरकारने जहागिरदारी (वतनदारी) संपुष्टात आणण्यासाठी विधेयक आणले. जनसंघही जहागिरदारी संपुष्टात आणण्याच्या बाजूने होता. त्यामुळे सरकारने आणलेल्या विधेयकाला विरोध करण्याचा प्रश्नच नव्हता. तेव्हा जनसंघाने त्यांच्या आमदारांना सरकारने आणलेल्या विधेयकाला पाठिंबा देण्याची सूचना केली.
अर्थात, जनसंघाचे आठही आमदार वतनदार होते. त्यांची प्रत्येकाची मोठ्या प्रमाणावर जमीन होती. त्यामुळे जनसंघाच्या आठपैकी सात आमदारांनी पक्षादेश डावलून विधेयकाच्या विरोधात मतदान केले. एका आमदाराने मात्र, स्वतः जहागिरदार असून केवळ पक्षादेश शिरोधार्य मानून जहागिरदारी संपुष्टात आणण्यासाठी मतदान केले. तो आमदार म्हणजे सध्याचे उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपतीपदासाठीचे संभाव्य उमेदवार भैरौसिंह शेखावत!
जनसंघाच्या सात आमदारांनी विरोधात मतदान करुनही ते विधेयक संमत झाले. विधेयकाच्या विरोधात मतदान करणारे सात आमदार पुन्हा जिंकले, हरले किंवा त्यांचे पुढे काय झाले, कोणाच्याही स्मरणात नाही. पण भैरोसिंह शेखावत हे नाव मात्र, त्यानंतर प्रादेशिक आणि राष्ट्रीय राजकारणात संस्मरणीय ठरले. तीनवेळा राजस्थानचे मुख्यमंत्रीपद भूषविणारे शेखावत गेले पाच वर्षे भारताचे उपराष्ट्रपती होते. तेच निष्ठावंत शेखावत आता राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत उतरत आहेत.
भैरौसिंहांना निवडणूक लढवावी लागणार आहे, ती त्यांच्याच राजस्थानच्या राज्यपाल असलेल्या प्रतिभा पाटील-शेखावत यांच्याशी! शेखावत यांच्याप्रमाणेच प्रतिभा पाटील यांचा गौरवही निष्ठावंत म्हणूनच करावा लागेल. त्या देखील साधारणपणे 1962 पासून विधीमंडळात आहेत आणि अनेकदा डावलल्यानंतरही त्यांनी कॉंग्रेसवरची निष्ठा कदापिही ढळू दिलेली नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने ही लढत दोन निष्ठावंतांमधील ठरले.
वयाच्या पंचविसाव्या वर्षी प्रतिभा पाटील या 1962 मध्ये जळगाव मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेल्या. त्यानंतर सलग सहावेळा त्यांनी आमदारकी भूषविली. आमदार असतानाच त्या एल. एल. बी. बनल्या आणि विवाहित झाल्या. देवीसिंह शेखावत यांच्याशी त्यांचा विवाह झाला. जळगावनंतर त्यांनी मतदारसंघ बदलला आणि त्या एदलाबाद (सध्याचा मुक्ताईनगर हा एकनाथ खडसे यांचा मतदारसंघ) मधून सलग पाचवेळा निवडणूक जिंकल्या.
प्रतिभा पाटील यांनी 1967 ते 77 या कालावधीत उपमंत्री, राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्रीपद सांभाळले. त्यानंतर 1978 ते 1980 या कालावधीत शरद पवार "पुलोद'चे मुख्यमंत्री असताना त्यांनी विरोधी पक्षनेतेपद समर्थपणे सांभाळले. कॉंग्रेसवरील निष्ठा आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व लक्षात घेऊन 1980 मध्ये प्रतिभा पाटील यांना मुख्यमंत्री बनविण्याचे कॉंग्रेसचे डावपेच होते. मात्र, ऐनवेळी अब्दुल रेहमान अंतुले यांनी बाजी मारली आणि पाटील यांचे मुख्यमंत्रीपद हुकले. मात्र, पक्षावर किंवा एखाद्या व्यक्तीवर नाराज होऊन कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा विचारही त्यांच्या मनाला शिवला नाही.
अखेर त्यांना राज्यसभेवर घेण्यात आले. तेथे त्यांची उपसभापती म्हणून निवड झाली. 1986 ते 88 या कालावधीत त्यांनी उपसभापतीपद भूषविले. पुढे त्यांच्यावर कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या निवडणुकीत 1991 साली त्या अमरावतीतून सहजपणे लोकसभेवर निवडून आल्या. त्यानंतर त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतल्यासारखी परिस्थिती होती. तीन वर्षांपूर्वी त्यांच्यावर राजस्थानच्या राज्यपालपदाची जबाबदारी सोपविली गेली. इतकी वर्षे कॉंग्रेस पक्षाच्या विचारांशी प्रतिभा पाटील यांनी ठेवलेली बांधिलकीच त्यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनविण्यात निर्णायक ठरली.
हल्ली राजकारणाचा धंदा झाला असून पैसा व गुंड प्रवृत्तींच्या जोरावर निवडणुका जिंकता येतात, हा सर्वांचाच अनुभव बनला आहे. त्यामुळे "पैसा फेको आणि तमाशा देखो'च्या धर्तीवर राजकारणही खालच्या पातळीवर पोचले आहे. निष्ठावंतांनी आणि कार्यकर्त्यांनी काय कायम सतरंज्याच घालायच्या का? असा प्रश्न विचारायलाही निष्ठावंत व कार्यकर्ते शिल्लक नाहीत. त्यामुळे एकाच पक्षावर निष्ठा ठेवण्याचे दिवस संपले, असे सांगत फुशारकी मिरविणाऱ्यांना सध्या सगळ्याच पक्षात चांगले दिवस आहेत.
अगदी सुरवातीच्या काळात जनसंघाने दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत सर्व जागांवर उमेदवार उभे केले होते. ते सारे उमेदवार जोरदार आपटले. त्या दिवशी संध्याकाळी एका पत्रकाराने अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांना गाठून प्रश्न विचारला, ""आता पुढे काय?'' त्यावर अडवाणी उत्तरले, ""पराभवाचा शीण घालविण्यासाठी आम्ही दोघांनी आज एक चित्रपट पाहिला. त्याचे नाव "फिर सुबह होगी'. चित्रपटाच्या नावाप्रमाणेच आमच्या पक्षासाठीही "फिर सुबह होगी' आणि लवकरच पक्ष पुन्हा उभा राहिल. आम्ही पराभूत झालो असलो तरी आमच्या निष्ठा अजूनही कायम आहेत. आम्ही निवडणूक हरलो आहोत. आमची लढाई सुरुच राहिल.''
याच निष्ठावंत अडवाणी आणि वाजपेयी यांनी जनता पक्षाच्या कारकिर्दीत संघ विचारांची कास धरताना राजसत्तेला रामराम ठोकला होता, हे सर्वज्ञात आहेच. पण सोळा वर्षांनी का होईना ही मंडळी पुन्हा एकदा राजसिंहासनावर विराजमान झाली होती. त्यामुळे विचारांवर आणि पक्षावर निष्ठा ठेवणाऱ्यांना भाग्योदय निश्चित असतो. मग तो आज होईल किंवा उद्या!
अर्थात, "इझी मनी' आणि "फास्ट फूड'च्या आजच्या जमान्यात प्रत्येकाला सारे काही इस्टंट हवे आहे. तपश्चर्या करण्याची किंवा परीक्षा देण्याची फारशी कोणाची तयारी नसते. इतर क्षेत्रांच्या तुलनेत राजकारणात ही बाब अधिक प्रकर्षाने जाणवते. त्यामुळेच राजकारणात "चमकोगिरी' करुन नगरसेवक वा आमदार होणाऱ्या मंडळींचा परीघ फारसा विस्तारत नाही. त्या तुलनेत अभ्यासू आणि निष्ठावंतांना अधिक संधी मिळते. हल्लीच्या बाजारू राजकारणात निष्ठावंतांना पाय पुसण्याची जागा दाखविणाऱ्या पक्षांनी गरज म्हणून का होईना पण निष्ठावंतांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनविले आहे. ही बाब मृगजळासारखी वाटत असली तरी नक्कीच दिलासादायक आहे.
Thursday, June 14, 2007
प्रतिसाद, पाहुणचार आणि प्रेमाचा वर्षाव...

आसाममध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या वार्तांकनासाठी जाताना मनात अनेक प्रश्न होते. तेथे वातावरण कसे असेल, किती सुरक्षा असेल, स्पर्धेत काही गोंधळ तर होणार नाही ना, नागरिकांचा किती प्रतिसाद मिळेल, खेळाडू आणि संघांचा (विशेषतः हिंदीभाषक) बहिष्कार तर असणार नाही ना, तेथील लोक आपल्याशी कसे "रिऍक्ट' होतील... अशा असंख्य प्रश्नांनी मनात हलकल्लोळ माजविला होता; पण गुवाहाटीमध्ये इतके चांगले अनुभव आले, की विचारता सोय नाही. त्यांपैकी काही अनुभव येथे देत आहे...
बालासाहाब कैसे है...
मी महाराष्ट्रातून आला असल्याचे समजल्यावर "ट्रान्स्पोर्ट कमिटी'चे अध्यक्ष पोलॉक महंत यांनी विचारले, की "अरे, तुमचे ते बाळासाहेब आता कसे आहेत?' मला कळेचना याला एकदम बाळासाहेब ठाकरेंची आठवण कशी झाली. तेव्हा त्याने सांगितले, ""मी तिसरी-चौथीत असताना आई-वडिलांबरोबर मुंबईला गेलो होतो. तेव्हा दादरच्या गर्दीमध्ये मी हरवलो. मला काहीच कळत नव्हते. तेव्हा शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी माझी चौकशी केली आणि एका कार्यकर्त्याच्या घरी नेले. तेथे त्यांनी माझी विचारपूस केली. परिसरात हिंडून माझ्या आई-वडिलांना शोधून आणले आणि मला त्यांच्या स्वाधीन केले. त्यामुळे माझे आणि शिवसेनेचे जुने ऋणानुंबंध आहेत.''
स्टेडियम तरी पाहू दे...
जलतरणाचे सर्व सामने संपलेले, तरीही गर्दी हटत नव्हती. हळूहळू लोक बॉक्सिंग रिंगकडे वळू लागले, तरीही 80 वर्षांच्या एक आजीबाई जलतरण तलावाकडे जात होत्या. तेव्हा जलतरणाच्या सर्व स्पर्धा संपल्या आहेत. तिथे काहीही पाहायला मिळणार नाही, असे सुरक्षा रक्षकाने सांगितले. तेव्हा आजीबाईंनी दिलेले उत्तर स्पर्धेला मिळणाऱ्या प्रतिसादाविषयी सर्व काही सांगून जाते. आजी म्हणाल्या, ""अरे बाबा, आजची स्पर्धा संपली असली तरी हे स्टेडियम आतून कसे आहे, ते पाहण्यासाठी तरी मला जाऊ देशील की नाही? इतके दिवस टीव्हीवर मी हे पाहायचे. आज प्रत्यक्ष पाहण्यासाठी आले आहे, तर तू मला नाही म्हणतोस...''
आप तो मीडिया से है...
आसाममध्ये अनेक वर्षांपासून अस्तित्वात असलेला उल्फाचा प्रश्न; तसेच स्पर्धा उधळून लावण्याची उल्फाने दिलेली धमकी या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडक असणार यात शंकाच नव्हती; पण ती किती कडक असेल याची कल्पना येत नव्हती; पण मीडियासाठी आवश्यक ओळखपत्र तयार झाल्यानंतर कोणत्याही स्टेडियममध्ये जाण्यापूर्वी एकाही सुरक्षा रक्षकाने अंगाला हातही लावलेला नाही. लॅपटॉपची बॅग किंवा सॅकमध्ये काय आहे ते दाखवा, असा सवालही केलेला नाही. ""आप तो मीडिया से है। आप से क्या खतरा होगा,'' असे उद्गार सुरक्षा रक्षकाने काढले. प्रत्येक सुरक्षा रक्षकाला तोंड देता देता नाकी नऊ येतील, असे वाटत असतानाच हा अनुभव सुखद धक्काच देऊन गेला.
प्रथमच प्रत्यक्ष दर्शन
ऍथलेटिक्स, फुटबॉल, हॉकी, कुस्ती आणि फार फार तर व्हॉलिबॉल किंवा कबड्डी या खेळांना नागरिक गर्दी करतील, असे वाटत होते; पण बॉक्सिंग, लॉन बॉल, सेपाकताकरॉ, सायकलिंग, टेबल टेनस यांच्यासह जवळपास सर्वच खेळांना नागरिकांनी तुडुंब गर्दी केली होती. नागरिकांना खेळांविषयी अधिकाधिक जाणून घ्यायचे होते. सरकारने बांधलेली स्टेडियम्स पाहायची होती. खेळाडू कसे खेळतात, हे बघायचे होते. याबाबत टिंकू कुंभकर या स्थानिक तरुणाने व्यक्त केलेली प्रतिक्रिया फारच बोलकी वाटते. टिंकू म्हणतो, ""इतके वर्षे आम्ही हे खेळ टीव्हीवर पाहतच होतो; पण हे सारे खेळ मुंबई आणि दिल्लीसारख्या ठिकाणी व्हायचे. आज प्रत्यक्ष आमच्या शहरात, आमच्या राज्यात स्पर्धा होत आहेत. इतकी चांगली संधी आम्ही कशी घालवू. त्यामुळेच नागरिकांची गर्दी होत आहे. तुम्हाला ते आश्चर्यकारक वाटत असले, तरी आम्हाला ते अपेक्षितच होते.''
ये तो घर का काम है...
आसाममध्ये प्रथमच स्पर्धा होत असल्याने; तसेच ईशान्य भारत थोडासा बाजूला असल्याने अनेक जण आसाममध्ये प्रथमच आले आहेत. इतक्या मोठ्या संख्येने नागरिक गुवाहाटीमध्ये आल्याचेच त्यांना अधिक अप्रूप होते. पाहुण्यांची कशी काळजी घ्यावी आणि कशी सरबराई करावी, यासाठी प्रत्येक जण धडपडत होता. पत्रकार उतरलेल्या हॉटेलमध्ये माहिती देण्यासाठी "मीडिया हेल्प डेस्क' तयार करण्यात आला होता. तेथील राजेंद्र नावाच्या "व्हॉलेंटियर'ला विचारले, की तू रात्रीपर्यंत इतके काम करतोस. तुला किती पैसे मिळतात? तेव्हा राजेंद्र म्हणाला, ""सर, मैं व्हॉलेंटियर हूँ! मै पैसे क्यू लूँगा! अगर वो देंगे तो ठीक है, अगर नही देंगे तो बुरा क्या है? ये हमारे घर के "खेला' है! घर के काम के लिए कोई पैसा लेता है?''
चितळेंच्या बाकरवडीची आठवण
"ब्रह्मपुत्रा वॉटर वर्क्स'मध्ये अभियंता पदावर काम करणाऱ्या पंजाब शर्मांची भेट झाली. शर्मा हे पुण्यातील "सीडब्ल्यूपीआरएस'मध्ये दीड वर्ष कामाला होते. पुण्यात असताना सहकाऱ्यांकडून मिळालेली वागणूक आणि पुणेकरांचे प्रेम यामुळे पुणे अजूनही माझ्या हृदयात आहे, असे श्री. शर्मा यांनी सांगितले. ""पुण्यात मिळणारी चितळेंची बाकरवडी, डेक्कनवर मिळणारी पूना कॉफी हाऊसची कॉफी, कॅम्पातील इराण्याच्या हॉटेलमधील सामोसा या गोष्टी मी अजूनही विसरलेलो नाही.'' मराठी माणसे खूप चांगली आहेत, हे वाक्य मराठीमध्ये बोलून त्यांनी आम्हाला भलतेच खूष केले. शर्मा यांच्याप्रमाणेच पुणे-मुंबई आणि महाराष्ट्रात शिक्षणासाठी आलेले किंवा एखादा नातेवाईक महाराष्ट्रात शिकला असलेले अनेक जण तेथे भेटले.
वो हमारा शिवाजी है...
गुवाहाटीमध्ये एक अश्वारूढ पुतळा आहे. हा पुतळा कुणाचा असे बोटीपोन मालाकार या "व्हॉलेंटियर'ला विचारल्यावर त्याने लाचित बडफुकन, असे सांगून प्रतिप्रश्न केला. तुम्हाला लाचित बडफुकन माहिती आहे का? मुघलांना आसाम आणि पर्यायाने ईशान्य भारतात प्रवेश करण्यापासून रोखणारा योद्धा म्हणजे लाचित बडफुकन, असे सांगितल्यावर मालाकार इतका भारावून गेला, की त्याने माझा हात हातात घेतला आणि म्हणाला, ""व्वा! आपने तो दिल खूष कर दिया.'' बडफुकन यांच्याबद्दल आसामबाहेरच्या फार कमी लोकांना माहिती असते. तुम्हाला आमच्या हिरोबद्दल माहिती आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. बडफुकन हा आमचा "शिवाजी' आहे, असे सांगून मालाकारने धक्काच दिला; कारण त्याला महाराष्ट्रात मुघलांविरुद्ध लढणारे शिवाजी महाराज हे नाव माहिती होते.
घुसखोरांच्या गावात...
आसाममध्ये अनेक बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी सुरू असते. तेथे अनेक जणांना शिधापत्रिका मिळाल्या आहेत, त्यांची नावे मतदार यादीमध्ये देखील आहेत, असे वाचले व ऐकले होते. आसाममध्ये बांगलादेशी घुसखोरांचे गाव पाहण्याची आणि तेथील नागरिकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. ब्रह्मपुत्रा नदी ओलांडून ते कुटुंब पाच वर्षांपूर्वी गुवाहाटीपासून शंभर किलोमीटरवर असलेल्या एका लहानशा खेड्यात आले होते. अशी जवळपास 110 कुटुंबे त्या गावामध्ये होती. प्रत्येक कुटुंबामध्ये किमान सात ते आठ जण! अशी अनेक गावे ब्रह्मपुत्रेच्या किनारी वसली असल्याचे समजले आणि भयानक वास्तवाचा अनुभव आला. स्थानिक आमदारानेच त्या नागरिकांना शिधापत्रिका दिल्या, घरे बांधून दिली, भाजी मंडई व सडका निर्माण केल्या, काही नागरिकांना जमिनीही मिळाल्या, हे ऐकून धक्का बसलाच; पण त्यापेक्षाही अधिक चीड आली.
आशिष चांदोरकर
Subscribe to:
Posts (Atom)