Friday, June 15, 2007

निष्ठावंत विरुद्ध निष्ठावंत




साधारणपणे 1950 चे दशक! राजस्थानमध्ये त्यावेळी जनसंघाची फारशी ताकद नसली तरी 1958 साली विधानसभेत जनसंघाचे आठ आमदार होते. त्यावेळी राजस्थानमधील कॉंग्रेस सरकारने जहागिरदारी (वतनदारी) संपुष्टात आणण्यासाठी विधेयक आणले. जनसंघही जहागिरदारी संपुष्टात आणण्याच्या बाजूने होता. त्यामुळे सरकारने आणलेल्या विधेयकाला विरोध करण्याचा प्रश्‍नच नव्हता. तेव्हा जनसंघाने त्यांच्या आमदारांना सरकारने आणलेल्या विधेयकाला पाठिंबा देण्याची सूचना केली.

अर्थात, जनसंघाचे आठही आमदार वतनदार होते. त्यांची प्रत्येकाची मोठ्या प्रमाणावर जमीन होती. त्यामुळे जनसंघाच्या आठपैकी सात आमदारांनी पक्षादेश डावलून विधेयकाच्या विरोधात मतदान केले. एका आमदाराने मात्र, स्वतः जहागिरदार असून केवळ पक्षादेश शिरोधार्य मानून जहागिरदारी संपुष्टात आणण्यासाठी मतदान केले. तो आमदार म्हणजे सध्याचे उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपतीपदासाठीचे संभाव्य उमेदवार भैरौसिंह शेखावत!

जनसंघाच्या सात आमदारांनी विरोधात मतदान करुनही ते विधेयक संमत झाले. विधेयकाच्या विरोधात मतदान करणारे सात आमदार पुन्हा जिंकले, हरले किंवा त्यांचे पुढे काय झाले, कोणाच्याही स्मरणात नाही. पण भैरोसिंह शेखावत हे नाव मात्र, त्यानंतर प्रादेशिक आणि राष्ट्रीय राजकारणात संस्मरणीय ठरले. तीनवेळा राजस्थानचे मुख्यमंत्रीपद भूषविणारे शेखावत गेले पाच वर्षे भारताचे उपराष्ट्रपती होते. तेच निष्ठावंत शेखावत आता राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत उतरत आहेत.

भैरौसिंहांना निवडणूक लढवावी लागणार आहे, ती त्यांच्याच राजस्थानच्या राज्यपाल असलेल्या प्रतिभा पाटील-शेखावत यांच्याशी! शेखावत यांच्याप्रमाणेच प्रतिभा पाटील यांचा गौरवही निष्ठावंत म्हणूनच करावा लागेल. त्या देखील साधारणपणे 1962 पासून विधीमंडळात आहेत आणि अनेकदा डावलल्यानंतरही त्यांनी कॉंग्रेसवरची निष्ठा कदापिही ढळू दिलेली नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने ही लढत दोन निष्ठावंतांमधील ठरले.

वयाच्या पंचविसाव्या वर्षी प्रतिभा पाटील या 1962 मध्ये जळगाव मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेल्या. त्यानंतर सलग सहावेळा त्यांनी आमदारकी भूषविली. आमदार असतानाच त्या एल. एल. बी. बनल्या आणि विवाहित झाल्या. देवीसिंह शेखावत यांच्याशी त्यांचा विवाह झाला. जळगावनंतर त्यांनी मतदारसंघ बदलला आणि त्या एदलाबाद (सध्याचा मुक्ताईनगर हा एकनाथ खडसे यांचा मतदारसंघ) मधून सलग पाचवेळा निवडणूक जिंकल्या.

प्रतिभा पाटील यांनी 1967 ते 77 या कालावधीत उपमंत्री, राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्रीपद सांभाळले. त्यानंतर 1978 ते 1980 या कालावधीत शरद पवार "पुलोद'चे मुख्यमंत्री असताना त्यांनी विरोधी पक्षनेतेपद समर्थपणे सांभाळले. कॉंग्रेसवरील निष्ठा आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व लक्षात घेऊन 1980 मध्ये प्रतिभा पाटील यांना मुख्यमंत्री बनविण्याचे कॉंग्रेसचे डावपेच होते. मात्र, ऐनवेळी अब्दुल रेहमान अंतुले यांनी बाजी मारली आणि पाटील यांचे मुख्यमंत्रीपद हुकले. मात्र, पक्षावर किंवा एखाद्या व्यक्तीवर नाराज होऊन कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा विचारही त्यांच्या मनाला शिवला नाही.

अखेर त्यांना राज्यसभेवर घेण्यात आले. तेथे त्यांची उपसभापती म्हणून निवड झाली. 1986 ते 88 या कालावधीत त्यांनी उपसभापतीपद भूषविले. पुढे त्यांच्यावर कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या निवडणुकीत 1991 साली त्या अमरावतीतून सहजपणे लोकसभेवर निवडून आल्या. त्यानंतर त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतल्यासारखी परिस्थिती होती. तीन वर्षांपूर्वी त्यांच्यावर राजस्थानच्या राज्यपालपदाची जबाबदारी सोपविली गेली. इतकी वर्षे कॉंग्रेस पक्षाच्या विचारांशी प्रतिभा पाटील यांनी ठेवलेली बांधिलकीच त्यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनविण्यात निर्णायक ठरली.

हल्ली राजकारणाचा धंदा झाला असून पैसा व गुंड प्रवृत्तींच्या जोरावर निवडणुका जिंकता येतात, हा सर्वांचाच अनुभव बनला आहे. त्यामुळे "पैसा फेको आणि तमाशा देखो'च्या धर्तीवर राजकारणही खालच्या पातळीवर पोचले आहे. निष्ठावंतांनी आणि कार्यकर्त्यांनी काय कायम सतरंज्याच घालायच्या का? असा प्रश्‍न विचारायलाही निष्ठावंत व कार्यकर्ते शिल्लक नाहीत. त्यामुळे एकाच पक्षावर निष्ठा ठेवण्याचे दिवस संपले, असे सांगत फुशारकी मिरविणाऱ्यांना सध्या सगळ्याच पक्षात चांगले दिवस आहेत.

अगदी सुरवातीच्या काळात जनसंघाने दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत सर्व जागांवर उमेदवार उभे केले होते. ते सारे उमेदवार जोरदार आपटले. त्या दिवशी संध्याकाळी एका पत्रकाराने अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांना गाठून प्रश्‍न विचारला, ""आता पुढे काय?'' त्यावर अडवाणी उत्तरले, ""पराभवाचा शीण घालविण्यासाठी आम्ही दोघांनी आज एक चित्रपट पाहिला. त्याचे नाव "फिर सुबह होगी'. चित्रपटाच्या नावाप्रमाणेच आमच्या पक्षासाठीही "फिर सुबह होगी' आणि लवकरच पक्ष पुन्हा उभा राहिल. आम्ही पराभूत झालो असलो तरी आमच्या निष्ठा अजूनही कायम आहेत. आम्ही निवडणूक हरलो आहोत. आमची लढाई सुरुच राहिल.''

याच निष्ठावंत अडवाणी आणि वाजपेयी यांनी जनता पक्षाच्या कारकिर्दीत संघ विचारांची कास धरताना राजसत्तेला रामराम ठोकला होता, हे सर्वज्ञात आहेच. पण सोळा वर्षांनी का होईना ही मंडळी पुन्हा एकदा राजसिंहासनावर विराजमान झाली होती. त्यामुळे विचारांवर आणि पक्षावर निष्ठा ठेवणाऱ्यांना भाग्योदय निश्‍चित असतो. मग तो आज होईल किंवा उद्या!

अर्थात, "इझी मनी' आणि "फास्ट फूड'च्या आजच्या जमान्यात प्रत्येकाला सारे काही इस्टंट हवे आहे. तपश्‍चर्या करण्याची किंवा परीक्षा देण्याची फारशी कोणाची तयारी नसते. इतर क्षेत्रांच्या तुलनेत राजकारणात ही बाब अधिक प्रकर्षाने जाणवते. त्यामुळेच राजकारणात "चमकोगिरी' करुन नगरसेवक वा आमदार होणाऱ्या मंडळींचा परीघ फारसा विस्तारत नाही. त्या तुलनेत अभ्यासू आणि निष्ठावंतांना अधिक संधी मिळते. हल्लीच्या बाजारू राजकारणात निष्ठावंतांना पाय पुसण्याची जागा दाखविणाऱ्या पक्षांनी गरज म्हणून का होईना पण निष्ठावंतांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनविले आहे. ही बाब मृगजळासारखी वाटत असली तरी नक्कीच दिलासादायक आहे.

2 comments:

wishwanath said...

मित्रा, आशिष तुझ्या मताशी काही प्रमाणात मी सहमत आहे. पण सध्या दिवस चमकोगिरी करणाऱ्याचेच आहेत. प्रतिभाताईंची कामगिरी प्रतिभावंत आहेच पण राष्ट्रपतीपदासाठी त्यांचे नाव केवळ गरज म्हणून पुढे आले आहे, हे विसरून चालणार नाही. यामागील राजकारण सर्वांना माहिती आहेच. प्रतिभाताईंना राष्ट्रपती होण्याची संधी मिळाली आहे, यासाठी खरं तर आपण डाव्या पंक्षांचे आभार मानले आहे. कारण त्यांनी आडमुठी भूमिका घेतली नंसती तर प्रतिभाताईंची कारकिर्द राजस्थानच्या राज्यपाल म्हणूनच संपुष्टात आली असती. बरं तू आजच्या (15 जून) टाइम्स मधील अंबरिश मिश्र यांच्या लेख वाचला का, तो खरंच खूप छान आहे.
- विश्वनाथ गरूड

Anonymous said...

Blog changala aahe. Tumachi marathi bashevar changali pakad disate. Batmynachi mandani sudha far vyavashtith aahe.

Vinayak Kale