Friday, July 01, 2022

राजकारणातील नीचपणाचा कळस...

 

आधी मी, मग माझे दत्तू, शेवटी पक्ष...

आधी राष्ट्र, मग पक्ष आणि शेवटी मी... हे झालं सांगायला. अहवालांमधून छापायला, लेखांमधून लिहायला आणि भाषणांमधून मोठेमोठे बच्चन द्यायला... पण वास्तविक पाहता, आधी मी, नंतर माझे दत्तू (म्हणजे समर्थक) आणि शेवटी काही उरलं तर मग पक्ष (म्हणजे आपल्या विरोधातील इतर नेते नि कार्यकर्ते) वगैरे... हीच खरी नीती आहे. त्याला हल्ली भाजपामध्ये चाणक्यनीती म्हटलं जातं. आणि अशा नितीचा अवलंब करणाऱ्या शहाजोगांना चाणक्य. अगदी काही अपवाद सोडले तर आज पार्टी विथ डिफरन्समध्ये हीच परिस्थिती आहे.

केंद्रामध्ये असाल तर पंडित दीनदयाळ उपाध्याय, महाराष्ट्रात असाल तर वसंतराव भागवत आणि पुण्यात असाल, तर रामभाऊ म्हाळगी यांचं नाव घ्यायचं आणि भाषणं ठोकून टाळ्या मिळवायच्या. बाकी मग पक्ष चालविताना आणि वैयक्तिक आयुष्यात तुम्ही काहीही लफडी करा, कितीही खादाडी करा किंवा एकमेकांवर राजकीय कुरघोड्या करून पक्षातील विरोधकांना संपवून टाका, काही फरक पडत नाही. सगळं चालतंय... मुखी ही नावं असली म्हणजे मग सगळं माफ...

महाराष्ट्रातील सत्तांतराचे सूत्रधार असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी घडविलेल्या चमत्कारानंतर त्यांना मुख्यमंत्री न करता उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला लावून केंद्रीय नेतृत्वाने, विशेषतः अमित शहा यांनी दाखविलेल्या नीचपणानंतर हीच भावना अधिक प्रबळ होते. आपलं भविष्य महत्त्वाचं. पक्ष खड्ड्यात गेला, एखाद्या नेत्याचे खच्चीकरण झालं तर काय फरक पडत नाही. मी आणखी मोठा व्हायला पाहिजे, हीच वृत्ती यातून प्रकर्षाने दिसून येते.

मुळात अजित पवार यांच्यासोबत सत्तास्थापनेचा प्रयोग फसल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत नियोजनबद्धपणे व्यूहरचना रचून महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणले, हे सकृतदर्शनी दिसते. देवेंद्र यांना बाजूला ठेवून अमित शहा आणि जगतप्रकाश नड्डा यांनी सर्व खेळ्या खेळल्या आणि सत्तांतर घडले, यावर विश्वास ठेवायला मी भक्तांइतका भाबडा नाही. (वास्तविक पाहता, जगतप्रकाश नड्डा हा माणूस मोदी आणि शहा यांच्या किल्लीवर चालणारा बोलका बाहुला आहे, ओघानं आलंच. महाराष्ट्रात सत्तांतर घडविणे हा त्यांना झेपणारा घासही नाही.) राज्यातील एकाही नेत्याची तेवढी क्षमता नाही त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना बाजूला ठेवून हे सत्तांतर घडले असू शकते, यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. देवेंद्रच या सत्तांतराचे शिल्पकार आणि सर्वेसर्वा आहेत.


मग इतके सारे व्यवस्थितपणे प्लॅन केल्यानंतरही देवेंद्र फडणवीस यांचा इतका अपमान आणि इतका उपमर्द कशासाठी करण्यात आला असावा? त्याचे फक्त आणि फक्त एकच उत्तर दिसते आणि ते म्हणजे माझ्या स्पर्धेत कोणीही असू नये, हेच आहे. कारण २०२५ नंतर नरेंद्रशेठ मोदी हे निवृत्त होणार, असे त्यांनी आधीच जाहीर करून टाकले आहे. मोदींनंतर कोण, हा प्रश्न सध्या सर्वाधिक चर्चिला जातो आहे. त्यात नितीन गडकरी, शिवराजसिंह चौहान, अमित शहा, योगी आदित्यनाथ आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा समावेश आहे. परवा इकॉनॉमिक टाइम्समध्ये हेमंत बिस्वा शर्मा यांचेही नाव आले आहे. पण ते नाव काही देशभर चालेल असे वाटत नाही. अगदी २०२५ ला देवेंद्र पंतप्रधान नाही झाले, तरी त्यांना अमितभाई शहा हे त्यांना प्रतिस्पर्धी म्हणूनच पहात असावे. देवेंद्र यांच्यासारखा सज्जन, सभ्य, सुसंस्कृत, तळपता, चमकदार, प्रभावी, अभ्यासू आणि संघप्रिय नेता आपल्याला वरचढ होऊ नये, याच हेतूने देवेंद्र यांचा उपमर्द करण्याचे नीच कृत्य केले असावे.

मुळात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर रात्री पेढे भरवाभरवीचा कार्यक्रम सुरु होता तेव्हा देवेंद्र यांना या षडयंत्राची कल्पनाही नसावी. मात्र, दुसऱ्या दिवशी साऱ्या घडामोडी घडत असताना या कपटी षडयंत्राचा हळूहळू उलगडा त्यांना होत गेला असावा.

पहिली शक्यता अशी की देवेंद्र यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते. मात्र, घासून घासून गुळगुळीच झालेला राजकीय मास्टरस्ट्रोक मारण्यासाठी अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनविण्याचे आदेश दिले असावेत. देवेंद्र ब्राह्मण आणि शिंदे मराठा असणे, शिवसेनेचाच मुख्यमंत्री केला, हे श्रेय घेण्याची संधी, अडीच वर्षांतील कारभार सुधारण्याचे मोठे आव्हान, शिवसेनेच्या नि त्यातही बंडखोर आमदारांना सांभाळण्याची जबाबदारी असे चर्चिले गेलेले सर्व मुद्दे ध्यानात ठेवून फडणवीस यांना मुख्यमंत्री न करता शिंदे यांच्याच गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घातली गेली असावी. ठीक आहे हे मान्य.

पण मग देवेंद्र यांना शिंदे यांच्या हाताखाली काम करायला लावून त्यांचा उपमर्द कशाला करायचा. त्यांना प्रदेशाध्यक्ष करून टाकायचं (नाहीतरी चंद्रकांत पाटील यांची टर्म संपतेच आहे) किंवा सरकारचे कामकाज नीट चालविण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवायची. आपल्या ज्युनिअरच्या हाताखाली काम करण्याची सक्ती किंवा बळजबरी त्यांच्यावर कशाला करायची? मुळात देवेंद्र यांनी उपमुख्यमंत्री होण्याचे मान्य केलेच नसेल. त्यामुळेच त्यांनी पत्रकार परिषदेत मी बाहेर थांबून सरकारला सहकार्य करेन, असे सांगितले. पण हे सहन न झाल्यामुळे किल्लीवर चालणाऱ्या अध्यक्षांनी थेट व्हिडिओ ट्विट करून देवेंद्र यांना नेतृत्वाने (म्हणजेच अमितभाई शहा यांनी) उपमुख्यमंत्री होण्याचे निर्देश दिले आहेत, असे सांगून देवेंद्र यांची गोची केली.

दुसरे म्हणजे अध्यक्षांनी सांगितल्यानंतरही देवेंद्र यांनी उपमुख्यमंत्री होण्याचे मान्य केले नसावे म्हणून आणि म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोनवेळा देवेंद्र यांना फोन केला असावा. काय देवेंद्र जेवलात का? काय जेवलात? आज घातलेल्या जॅकेटमध्ये एकदम छान दिसताय, स्वारी खूष का एकदम वगैरे वगैरे गावगप्पा मारायला मोदी यांनी फडणवीस यांना फोन केला नसावा ना... देवेद्र ऐकण्याच्या मूडमध्ये नाहीत म्हणून आणि म्हणूनच मोदी यांनी एकदा नव्हे तर दोनदा फोन करून उपमुख्यमंत्री होण्यासाठी गळ घातली असावी...

अखेरीस सध्या तरी हा निर्णय मान्य करण्याशिवाय काहीही पर्याय नाही, हे ओळखून देवेंद्र यांनी उपमुख्यमंत्रीपदाची अत्यंत सुतकी चेहऱ्याने आणि खोल गेलेल्या आवाजात शपथ घेतली. देवेंद्र यांनी शिस्त, पक्षनिष्ठा आणि स्वयंसेवक वृत्तीचे दर्शन घडविल्याच्या पोष्टी जे भाजपावाले टाकत आहेत, तो निर्णय त्यांनी स्वखुषीने घेतलेला नाही, हे शपथविधीवरूनच समजते.

शपथविधी प्रकरणावरून गळलेली एक गोष्ट म्हणजे देशात, केंद्र सरकारमध्ये, आणि भाजपामध्ये अमित शहा यांचाच शब्द अंतिम आहे. नरेंद्र मोदी हे आता रिटायर्डमेंट मोडमध्ये गेले असून, अमित शहा यांच्या विरोधात जाऊन देवेंद्र यांचे समर्थन करण्यामध्ये त्यांना फारसा रस राहिलेला नाही. वास्तविक पाहता, देवेंद्र हे मोदींचे ब्लू आईड बॉय होते. मात्र, आता परिस्थिती बदलल्याचे जाणवत असून, देवेंद्र यांची नाचक्की आणि अपमान होण्यापासून वाचविण्याठी मोदींनी फार लक्ष घातले नाही, हे स्पष्ट होते आहे.

मुळात तुम्हाला उपमुख्यमंत्री करायचे होते, तर चंद्रकांतदादा पाटील, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार किंवा पंकजा मुंडे यांना करायचे. महाराष्ट्र भाजपात  देवेंद्र यांच्या तोडीचा नि लायकीचा एकही नेता नाही हे मान्य. पण उपमुख्यमंत्री म्हणून चांगले काम करण्याची धमक असलेला एकही नेता नाही, हेच तुम्ही या कृतीतून दाखवून दिले. देवेंद्र यांच्यानंतरचे सर्व दादा, भाई, भाऊ आणि नेते हे आकडे फुगविण्यासाठी जमविलेली फक्त डोकी आहेत, हेच यातून सिद्ध होते.

वास्तविक देवेंद्र यांचा झालेला हा अपमान पाहता महाराष्ट्रातील नगरसेवक, आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधींनी देवेंद्र यांच्या बाजूने आवाज उठविला पाहिजे. महाराष्ट्र देवेंद्र यांच्या पाठिशी आहे, हे दाखवून द्यायला हवे. पण हे राजकारण आहे आणि भविष्यात सर्वांनाच आपल्या दुकानदाऱ्या चालू ठेवायच्या आहेत. त्यामुळे अशी रिस्क कोणी घेणार नाही. खरं तर दम असेल तर असे करता येऊ शकते. २०१४ मध्ये सुधीर मुनगंटीवार यांनी नितीन गडकरी यांच्या नावासाठी आग्रह धरत वातावरण तापवायला सुरूवात केली होती. त्यांच्यावर काही कारवाई झाली नाही. उलट पाच वर्षे त्यांनी महाराष्ट्राच्या अर्थमंत्रिपदाची धुरा सांभाळली...

देवेंद्र यांनी पक्षादेश, नेत्यांचा आदेश शिरोधार्य मानून स्वतःमधील शिस्तबद्ध स्वयंसेवक आणि कार्यकर्त्याचे दर्शन घडविले. त्याचप्रमाणे आपल्या पुढे जाईल, या भीतीने एखाद्याचा उपमर्द, अपमान आणि खच्चीकरण करणाऱ्या नेतृत्वाच्या नीचपणाचे दर्शनही फडणवीस यांच्या उपमुख्यमंत्रीपदावरील निवडीच्या निमित्ताने झाले.

असो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पाहतो आहे. उत्तर प्रदेशात आपल्या मर्जीप्रमाणे वागू शकतील, अशा मनोज सिन्हा यांना मुख्यमंत्री करण्याचा इरादा मोदी-शहा यांचा होता. पण संघाने ऐनवेळी लक्ष घालून तिथे योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री करायला लावले आणि मनमानी चालणार नाही, हा संदेश मोदी-शहा यांच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचविला. भविष्यात अशाच पद्धतीने वाटचाल सुरू राहिली तर पुन्हा एकदा भूमिका घेऊन योग्य तो संदेश द्यायला संबंधित मागेपुढे पाहणार नाहीत, असे वाटते.

Tuesday, June 28, 2022

बंड टाळता आले नसते का?

परिस्थितीला एकटे शिंदेच जबाबदार नाहीत...


२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने शिवसेनेला दूर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदृष्य हाताच्या साथीने बहुमत सिद्ध केले. तेव्हा महाराष्ट्र टाइम्समध्ये असताना एक लेख लिहिला होता. त्यात विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकारणाबद्दल एक मुद्दा मी प्रकर्षाने मांडला होता. तो म्हणजे...

तुम्ही एकतर माझ्या बाजूने असाल किंवा नसाल,’ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकारणाचा मंत्र आहे. त्यांच्या विरोधात उभे राहण्याची सोय नाही. मोदी यांनी त्यांच्या राजकीय विरोधकांची, गुजरातमध्ये आणि देशात काँग्रेसची जी अवस्था झाली आहे, त्यातून त्याचा अंदाज येतो...

पक्षांतर्गत विरोधक किंवा विरोधी पक्षांना क्षीण करण्यात आणि संपवून टाकण्यात नरेंद्र मोदी आणि शहा यांची हातोटी आहे. गुजरातमध्ये केशुभाई पटेल, सुरेश मेहता, शंकरसिंह वाघेला, कांशीराम राणा आणि प्रवीण तोगडिया यांची तसेच अल्पेश ठाकूर नि हार्दिक पटेल यांची झालेली दयनीय अवस्था पुरेशी बोलकी आहे. देशात काँग्रेसची आणि बिहारमध्ये नितीशकुमार तसेच चिराग पासवान यांची यांची अवस्था फार वेगळी नाही. मोदी-शहा यांना पुरुन उरली ती म्हणजे ममता. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी मोदी-शहा यांना चांगलीच धोबीपछाड दिली आणि स्वतःला सिद्ध केले. उद्धव यांनी देखील मोदी-शहा यांना अंगावर घेण्याचा प्रयत्न केला. पण सध्याची परिस्थिती पाहता ते त्यांच्या भलतेच अंगाशी आले आहे. सत्तेवर असताना एखाद्या पक्षावर अशी नामुष्की ओढविते, हीच त्या पक्षासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे. गांभीर्याने विचार करायला लावणारी गोष्ट आहे.

महाराष्ट्रात जनतेने २०१९ मध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे सरकार सत्तेवर यावे, असा स्पष्ट कौल दिलेला असतनाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीचा हात सोडून राष्ट्रवादी काँग्रेस नि काँग्रेसशी जुळवून घेतले. भाजप-शिवसेनेत काय चर्चा झाली होती, काय आश्वासन दिले गेले होते. त्यावर आणि गेल्या अडीच वर्षांतील राज्य सरकारच्या कारभाराबद्दल चर्चा करण्यात फारसे हशील नाही. या मुद्द्यांवर खूप चर्चा झालीय.

मुळात महाराष्ट्रासारखे राज्य हातातून गेले आणि भाजपा सर्वाधिक मोठा पक्ष असूनही अडीच वर्षे सत्तेपासून दूर राहिला, याचे शल्य, खंत, राग आणि चीड भाजपा कार्यकर्ते, देवेंद्र फडणवीस आणि मोदी-शहा यांच्या मनात असणे साहजिक होते. ते गप्प बसणे शक्यच नव्हते. उद्धव यांच्यासह किंवा उद्धव यांच्याविना पुन्हा एकदा सत्तेवर येण्याचे भाजपाचे प्रयत्न सुरू होतेच. खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मध्यंतरीच्या काळात पंतप्रधान मोदी यांनीही उद्धव यांना पुन्हा एकदा एकत्र येण्याचे आवाहन केले होते. अर्थात, अमित शहा यांचा त्याला तीव्र विरोध होता, असे म्हणतात. शिवाय पाच वर्षांतील (२०१४-१९) कारभाराचा अनुभव पाहता उद्धव यांनाही पुन्हा एकत्र येण्यात रस नव्हता, असे समजते.

अर्थात, तुम्हाला भाजपाबरोबर जायचे नाही, तर जाऊ नका. पण बलाढ्य अशा भाजपाशी दोन हात करण्याइतकी आपल्या पक्षाची तयारी आहे का, याचा अंदाज घेण्यात उद्धव कमी पडले. मुख्यमंत्री ही तेच आणि पक्षप्रमुखही तेच. दोन्ही ठिकाणी लक्ष देताना त्यांच्या मर्यादा स्पष्ट होत गेल्या. त्यातून अनेक प्रश्न निर्माण झाले.

उद्धव ठाकरे यांनी शिवसेना कार्यकारीप्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारली तेव्हा मी महाबळेश्वरला पत्रकार म्हणून उपस्थित होतो. तेव्हापासून त्यांची कारकिर्द पाहतो आहे. अभ्यासतो आहे. नारायण राणे आणि राज ठाकरे यांचे बंड त्यांनी ज्या पद्धतीने हाताळले तेव्हापासूनच मी त्यांच्या प्रेमात आहे. राणे यांच्या बंडानंतर तर मालवण आणि संगमेश्वरच्या पोटनिवडणुकीत मी आवर्जून गेलो होतो. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली आहे, याचा अंदाज उद्धव यांना आला नाही, हे सकृतदर्शनी तरी मला पटत नाही. पण परिस्थिती तर तेच सांगते आहे. आणि त्याचेच आश्चर्य नि दुःख अधिक आहे. 

गेल्या अडीच वर्षांपासून राज्यातील शिवसेनेचे वेगवेगळे पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक, नेतेमंडळी यांच्याशी संवाद साधत होतो आणि अजूनही आहे. मुख्य म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेल्या नव्हे, तर उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या लोकांचेच प्रमाण त्यात अधिक आहे. त्यातून अनेक गोष्टी उलगडत गेल्या. मला वाटतं, की राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांच्याकडून निधी न मिळणं, स्थानिक स्तरावर विरोधक बलशाली होणं आणि ईडी नि इन्कम टॅक्सचे छापे यांच्यापलिकडे जाऊन शिवसेनेच्या एकूण कारभाराबद्दल नाराजी आहे. ती नाराजी ही मंडळी अगदी मनापासून बोलून दाखवितात. कारण त्यांना शिवसेनेबद्दल प्रेम आहे. मलाही शिवसेना आणि ठाकरे यांच्याबद्दल प्रेम होते आणि आजही आहे. पण गोष्टी ज्या पद्धतीने गोष्टी कानावर येत आहेत, त्या तशाच सुरू राहिल्या तर परिस्थिती बिकट आहे.

 

शिवसेना प्रत्येक बंडातून सावरली, उभी राहिली आणि विस्तारत गेली वगैरे गोष्टी ठीक आहेत. भविष्यात काय होईल, माहिती नाही. पण जे चुकतंय ते दाखवायला आणि मान्य करायला काय हरकत आहे. अनेकांशी बोलत असताना समजलेले काही अनुभव खालीलप्रमाणे...

...


 


मुळात शिवसेनेमध्ये प्रत्येक नेत्याला एकेक सुभा दिला जातो. जसं पूर्वी आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे ठाणे, पूर्वी नारायण राणे सिंधुदुर्ग किंवा गणेश नाईक नवी मुंबई वगैरे... तिथे दुसऱ्या फळीतील नेतृत्व विकसित करण्यासाठी संघटना आणि पक्षप्रमुख कधीच प्रयत्न करीत नाही. त्यामुळे तिथे संघटना एखाद्या नेत्यावरच अवलंबून असते. आणि मग त्या नेत्याने प्रतारणा केली की संघटना क्षीण होते. पुन्हा बांधणी करण्यात अनेक वर्षे, अनेक पिढ्या जातात. आणि पूर्वीसारखी संघटना तयार होत नाही ती नाहीच. हा शिवसेनेच्या स्थापनेपासून आतापर्यंतच्या व्यवस्थेतील सार्वकालिक दोष आहे.

शिवसेना गेल्या पाच वर्षांपासून सत्तेत असली नि अडीच वर्षांपासून मुख्यमंत्री शिवसेनेचा असला, तरी सत्तेत असण्याचे कोणतेही फायदे स्थानिक पातळीवरील पदाधिकारी, शिवसैनिक आणि संघटनेला मिळालेले नाही. आर्थिक बळ तर सोडा पण विविध पदे, जबाबदाऱ्या किंवा संघटनात्मक ताकद म्हणूनही फार प्रगती झाली नाही. पक्ष सत्तेवर पण शिवसैनिक आणि पदाधिकारी उपेक्षितच राहिले. मुऴात पक्षप्रमुख आणि शिवसैनिक तसेच पदाधिकारी यांच्यातील संवाद तुटला किंवा कमी झाला.

शिवसेना सत्तेवर असतानाही शिवसैनिकांना कामे मिळण्यात अनंत अडचणी यायच्या. मुळात मंत्री आणि आमदारांचे नातेवाईक नि मित्रमंडळ अनेक ठिकाणी कंत्राटदार. त्यामुळे नेते नि पदाधिकाऱ्यांसमोर हुजरेगिरी करण्याची सवय नसलेले शिवसैनिक कायम उपेक्षितच राहिले. दुर्दैवाने स्थानिक नेते म्हणजेच शिवसेना असे सूत्र राहिल्यामुळे आणि पक्षप्रमुख किंवा त्यांचे दूत (शूटर्स) यांनी लक्ष न घातल्याने सामान्य शिवसैनिकापर्यंत सत्तेचे लाभ पोहोचलेच नाहीत.

.

शिवसेना पक्षप्रमुख आणि युवासेना प्रमुखांच्या कार्यपद्धतीबद्दल अनेक आक्षेप आहेत. एखाद्या ज्येष्ठ नेत्याबद्दल काही विचित्र कानावर आले (जसे की पक्ष सोडण्याची शक्यता आहे किंवा तत्सम...), की पक्षप्रमुख त्या व्यक्तीपासून अंतर राखून असतात, अशी अनेकांची तक्रार आहे. नेमकी परिस्थिती काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न ते करीत नाहीत. मुळात असे अंतर राखण्यापेक्षा बोलून तो विषय मिटविला तर कदाचित भविष्यातील धोके कमी होऊ शकतात. पण तो त्यांचा स्वभाव नाही, असे समजते.

अशा पद्धतीने एखाद्या नेत्यांबद्दल किंवा आपल्याला जड होऊ शकणाऱ्या पक्षांतर्गत विरोधकाविषयी पक्षप्रमुखांचे कान भरणारे काही जण आहेत. ते पक्षप्रमुखांच्या विश्वासातील आहेत, असे म्हणतात. अशा पद्धतीने सातत्याने काही गोष्टी कानावर येत राहिल्या की मग त्या व्यक्तीला disown केले जाते. भलेही नगरविकास खाते एकनाथ शिंदे यांना दिले गेले असले, तरीही त्यांचे प्रकरण तशाच पद्धतीने हाताळले गेले. त्यामुळेच शिंदे हळूहळू दूर होत गेले, अशी खात्रीलायक माहिती आहे.


 


शिंदे यांचा उल्लेख निघालाच आहे म्हणून आणखी एक आठवण. युवराजांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असणाऱ्या एका युवा नेत्याचे नगरविकास खात्याच्या कारभारात विशेष लक्ष होते. आपल्या मर्जीतील लोकांनाच कामे मिळावी, यासाठी तो शिंदे यांच्यावर दबाव टाकीत असे. काहीवेळा मंत्रीमहोदयांनी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला काम दिले असेल, तर होणाऱ्या संभाव्य नुकसानीच्या बदल्यात मंत्र्यांकडून दक्षिणा घ्यायलाही संबंधित युवानेता मागेपुढे पहात नसे, ही खात्रीलायक माहिती आहे. मला सांगा ठाण्यावर पकड असणारा आणि चारवेळा आमदार असलेला एखादा माणूस का अशा युवानेत्यांचा हस्तक्षेप का सहन करील. भलेही मुख्यमंत्र्यांनी नगरविकास खाते एकनाथ शिंदे यांच्याकडे दिले, तरी त्यांना कारभार करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले का? हा प्रश्न आहे.  

.

तुम्ही लोकांमध्ये मिसळणार नाही, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणार नाही. फक्त मुंबईत आणि मातोश्रीवर राहून संघटना हाकणार हे कसे चालेल. कोकणात आलेला पूर, वादळ, मराठवाड्यातील अतिवृष्टी अशा कोणत्याच प्रसंगी मुख्यमंत्री असताना किंवा नसतानाही पक्षप्रमुख म्हणून तुम्ही जनतेच्या दुःखात सहभागी होणार नाही, मग संघटना वाढेल कशी. पक्षप्रमुखांच्या प्रकृतीचे समजू शकतो. पण आदित्य तर महाराष्ट्रभर दौरे करूच शकतात. पण तेही तसे करताना दिसत नाहीत.

एकीकडे देवेंद्र महाराष्ट्रभर फिरतात, लोकांमध्ये जातात. देशात नरेंद्र मोदी आणि अमित शहा पायाला भिंगरी लावून दौरे करतात. स्वतःही करतात आणि मंत्री नि संघटनेतील पदाधिकाऱ्यांनाही करायला लावतात. २०१४ नंतर पक्ष चालविण्याचे आणि राजकारणाचे आयाम बदलले आहेत. तुम्ही त्याच्याशी जुळवून घेतले नाही, तर या वेगवान आणि बदलत्या राजकारणात तुम्ही टिकू शकणार नाही, हे उघड आहे. कोणी मान्य करो किंवा न करो... 


 


मुळात आदित्य यांचे विषय, आवडीनिवडी या शिवसेनेचा हक्काचा मतदार आणि शिवसैनिक यांच्या एकूण राहणीमानापासून वेगळ्या आहेत. आदित्य हे पार्ट्यामध्ये अधिक रमतात. त्यामुळेच मुंबईच्या नाईटलाईफचा विषय सातत्याने चर्चेत असतो. हा सामान्य मतदारांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, हे पटत नाही. त्यांना कार्यकर्त्यांमध्ये रमायला आवडते पण ते कार्यकर्ते व्हाइट कॉलर आणि फॉर्मल्समधील हवेत. शिवसेनेचा हक्काचा मतदार नि शिवसैनिक बरोबर उलटा आहे. तो तळागाळातील आहे. कळकट मळकट आहे. घामट आहे. कष्टकरी आहे. अशा लोकांबरोबर मिसळायला जर त्यांना अवघड होत असेल तर संघटना वाढणार कशी, बळकट होणार कशी?

.

महाराष्ट्रभर दौरे करतानाही संबंधित शहरात किंवा गावामध्ये थ्री स्टार किंवा फाईव्ह स्टार हॉटेल आहे का, याची खात्री पटल्यानंतरच आदित्य यांचा दौरा ठरतो. प्रत्येक व्यवस्थेची शंभरदा खात्री केल्यानंतरच आदित्य संबंधित ठिकाणी जातात. राकट आणि कणखऱ महाराष्ट्राला आपलंसं करायचं असेल तर नेताही तसाच परिस्थितीही जमवून घेणारा असायला हवी, ही जनतेची अपेक्षा असेल तर त्यात चूक काय...  

.

युवासेना ही संघटना मुंबई आणि ठाण्यापलिकडील महाराष्ट्रामध्ये किती सक्रिय आहे, याचा विचार व्हायला पाहिजे. किती ठिकाणी सर्वच्या सर्व नियुक्त्या पूर्ण आहेत, किती ठिकाणी संघटना सूत्रबद्धपणे काम करते आहे, किती शहरांत पदाधिकारी फक्त फ्लेक्सवर झळकण्याचेच काम करतात, याचा विचार युवासेना प्रमुख कधी करणार की नाही? नेता शिवसेनेत आणि त्याचा मुलगा युवासेनेत असा पायंडा पडणार असेल, तर नवे नेतृत्व तयार होणार कसे? लोक कशाला युवासेनेचा पर्याय निवडतील, याचा गांभीर्याने विचार होणार की नाही?

.

शिवसेनेने कधीच भाकरी फिरविली नाही. तेच चेहरे आणि तीच माणसे. पारनेरमध्ये विजय औटी, संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे, नगरमध्ये दिवंगत अनिलभैय्या राठोड, रायगडमध्ये अनंत गीते, अमरावतीत आनंदराव अडसूळ वगैरे नेते हरेपर्यंत लढत राहिले. त्यांना बदलण्याची हिंमत शिवसेना नेतृत्वाने दाखविली नाही. शिवसेना पक्षासाठी यांनी योगदान दिले आहेच. पण शिवसेनेने देखील त्यांना पुरेसे दिले आहे. कधी थांबविले पाहिजे हे नेतृत्वाला समजले पाहिजे.

मुंबईतही सगळीकडे सुनील प्रभू, रवींद्र वायकर, राहुल शेवाळे आणि यशवंत जाधव. हीच नावे सातत्याने दिसण्यामागील कारण काय? बरं इतकं सगळं देऊनही परत जाधव यांच्या पत्नी शिंदे यांच्या गटातच. मागे आपली एकदा भेट झाली होती तेव्हा तुम्ही सांगितलं होतं, की प्रचंड नाराजी असून तुम्ही संदीपान भुमरे यांच्यावर कायम विश्वास दाखविला. कारण राणे यांच्या बंडाच्यावेळी ते तुमच्यासोबत होते. पण त्याची जाणीव भुमरे यांनी ठेवली नाही. त्यामुळेच ते आता तुमची साथ सोडून गेले. योग्यवेळीच भाकरी फिरविली असती तर ही वेळ आली नसती...

.

संभाजीनगरमध्ये एकच व्यक्ती जिल्हाप्रमुख. तीच व्यक्ती आमदार आणि तोच प्रवक्ता... अंबादास दानवे काम करणारा माणूस आहे, हे मान्य. पण त्यांच्याकडे तीन-तीन पदे. अशा पद्धतीने कामकाज चालत असेल आणि जबाबदाऱ्यांचे विकेंद्रीकरण होणार नसेल, तर पदाधिकारी खूष राहणार कसे? पक्षामध्ये सर्वांचे समाधान होणार कसे? मुळात चंद्रकांत खैरे यांच्याऐवजी दानवे यांनाच लोकसभेचे तिकिट दिले असते तर ती सीट निघाली असती. पण पुन्हा तेच भाकरी न फिरविणे.

.

पक्षप्रमुख आणि युवासेना प्रमुखांच्या जवळच्या मंडळींबद्दल अनेकांची तक्रार आहे. अनेकदा ऍडजस्टमेंट करून किंवा चुकीचे रिपोर्टिंग करून ठरलेल्या प्रचारसभा, निवडणुकीदरम्यानचे दौरे आणि इतर गाठीभेटी रद्द करतात. असे प्रकार अनेकदा घडतात. कार्यक्रम आयोजित करण्यासाठी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्याने किती कष्ट घेतले असतील, काय काय केले असेल याचा फारसा विचार यामध्ये होत नाही.

.

मुळात मुंबई, ठाणे आणि कोकण या पलिकडे शिवसेना आहे आणि त्याकडे लक्ष दिले पाहिजे. आर्थिक बळ दिले पाहिजे, हा विचार पक्षप्रमुखांना मान्य आहे  की नाही, हे समजत नाही. पुण्यासारख्या शहरात महापालिका निवडणुकीत फक्त एक सभा पक्षप्रमुख घेतात. अशा पद्धतीने पक्ष काय वाढणार, कोणाला बळ मिळणार... बरं सत्ता असलेल्या संभाजीनगरात फारशी वेगळी परिस्थिती आहे, असं वाटत नाही. उद्धव किंवा आदित्य हे मुंबईत जसे लक्ष घालतात तसे लक्ष ते संभाजीनगर महापालिकेत घालीत नाहीत, हीच स्थानिक नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची तर तक्रार आहे. फक्त वर्षातून एक सभा नि निवडणुकीत दौरा यामुळे पक्ष कसा विस्तारेल. संभाजीनगरची शिवसेना ठाकरेंची आहे की खैरेंची अशी परिस्थिती निर्माण होण्याइतकी परिस्थिती बिकट असेल, तर मग काय उपयोग.

.

सर्वात शेवटचे पण तितकेच महत्त्वाचे. पत्रकार म्हणून संजय राऊतसाहेब ग्रेट आहेतच. पण राजकारणी म्हणून आणि शिवसेनेसाठी सध्याच्या बिकट परिस्थितीत ते जी वक्तव्ये करीत आहेत, ती कोणालाही पटण्यासारखी नाहीत... सामान्य नागरिकांप्रमाणेच अनेक शिवसैनिकांमध्येही त्याबद्दल तीव्र नाराजी आहे.

...



भारतीय जनता पार्टीने आयटी, ईडी आणि केंद्रीय यंत्रणांचा धाक दाखवून शिवसेना आमदारांना जेरीस आणले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांनी कमी निधी देऊन शिवसेना आमदारांची अडवणूक केली. शिवसेना आमदारांना स्थानिक पातळीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशीच संघर्ष करावयाचा आहे. त्यामुळे ही अनैसर्गिक युती त्यांना मान्य नाही. या तीन प्रमुख कारणांप्रमाणेच शिवसेनेची एकूण कार्यपद्धती, शिवसेना पक्षप्रमुख तसेच युवासेना प्रमुखांची पक्ष चालविण्याची पद्धती, संवादातील अभाव या आणि अशा अनेक गोष्टी देखील सध्याच्या परस्थितीला काही प्रमाणात कारणीभूत आहेत, असाच निष्कर्ष काढता येऊ शकतो... 


भविष्यात काहीही घडले, तरीही आता जे घडले आहे, त्या निमित्ताने जे काही समोर येते आहे, ते असे आहे. 


पटलं तर घ्या... नाहीतर सोडून द्या...

Wednesday, July 22, 2020

दवा, दुवा आणि देवा...


माझ्या करोना विजयाची त्रिसूत्री...

रविवार दिनांक १९ जुलै रोजी करोनाची टेस्ट पॉझिटिव्ह येऊन बरोबर एक महिना एक दिवस झाला. एका महिन्यानंतर आता मी पूर्णपणे ठणठणीत असून, महिनाभरानंतर प्रथमच बाहेरही पडलो. १९ जून ते १९ जुलै हा महिना बरंच काही शिकवून गेला. त्या विषयी थोडंसं... (खरं तर ब्लॉग खूपच मोठा झालाय. तुम्ही तुमच्या सवडीनं वाचा...)
.....

मला करोना झाला आणि ठणठणीत बराही झालो. पण आयुष्यातील हा एक महिना कसोटी पाहणारा ठरला. करोनाची बाधा झाल्यानंतर अनेकांना असं वाटलं, की साला हा चांदोरकर खूपच बाहेर भटकत होता, खायला फिरत होता म्हणूनच त्याला करोना झाला असावा... वास्तविक पाहता, परिस्थिती तशी नाही. कारण लॉकडाउन उठल्यानंतर मी जरूर काही ठिकाणी गेलो. पण फिरताना योग्य काळजी घेतच होतो. त्यामुळे त्या भटकण्यामुळे मला करोनाची लागण झाली नव्हती. मला करोनाची बाधा होण्याचं कारण हे पूर्णपणे वेगळं आहे.

झालं असं, की मी दीनानाथ हॉस्पिटलमध्ये ज्या दिवशी एडमिट झालो, त्याच्या बरोबर आठवडाभर आधी गुरुवारी ११ जून रोजी मी, सुधीर म्हस्के, विजय गायकवाड आणि प्रणव शेवडे विजयच्या साने गुरुजी नगरमधील घरी भेटलो होतो. आम्ही चौघंही दोन-अडीच तास एकत्र होतो. एकत्रित खाद्यपदार्थांचाही आस्वाद घेतला होता. त्यावेळी सुधीर पॉझिटिव्ह होता, पण असिम्प्टमॅटिक होता. त्यामुळं त्याला काहीच लक्षणं नव्हती. त्यामुळंच आम्ही भेटलो होतो. आणि तिथंच आमची करोनावारी निश्चित झाली.

शनिवारी सुधीर आणि नंतरच्या दोन-तीन दिवसांमध्ये आम्हाला तिघांनाही बारीक ताप, कणकण आणि थोडी अंगदुखी अशी लक्षणं दिसून आली. मला रविवारी ताप आला. सोमवारी सकाळी ताप उतरला होता. मात्र, अंगदुखी होती आण अशक्तपणाही जाणवत होता. वैद्य प्रसाद फाटक यांच्याकडून औषधंही घेऊन आलो होतो. त्यांनीही मला तेव्हा स्प्टपणे सांगितलं, की चार दिवसांचं औषध आहे. चार दिवसांनीही ताप उतरला नाही, तर करोनाची टेस्ट करून घे. डॉक्टरांच्या औषधाचा साधारण दीड दिवसांत मला गुण येतो. मात्र, तेव्हा औषधाचा गुण काही येईना. अंगदुखी नि कणकण कायम होती. तेव्हाच मला साधारण अंदाज यायला सुरुवात झाली होती. सोमवारी सुधीर प़ॉझिटिव्ह निघाल्याचा फोन विजयनं केला. तेव्हा मात्र, पक्कं झालंय, हे समजत होतं. 

तीन-साडेतीन महिन्यांच्या कालावधीनंतर बहीण आणि दोन छोट्या भाच्या घरी रहायला आल्या होत्या. ताप असल्यामुळे त्यांच्यापासून शक्य तेवढं अंतर ठेवून होतोच. पण तरीही भीती ही होतीच. आपण गुरुवारपासून कोणाकोणाला भेटलो होतो, त्यांची नावं आठवायला लागलो. सुदैवाने मी अधिक लोकांना भेटलो नव्हतो. बाबा, बहीण, भाच्या, चुलत बहीण अर्चना, वहिनी शलाका, मेव्हणा मंदार, प्रशांत मोहोळकर, कमलेश पाठक भाग्यश्री, त्यांची कन्या श्रावणी नि आमच्या कामवाल्या मावशी यांच्याशी माझा संपर्क झाला होता. मला काय होणार याच्यापेक्षा त्यांची काळजी अधिक होती.

सोमवारी सुधीर पॉझिटिव्ह आल्यानंतर मंगळवारी विजय आणि बुधवारी मी नि प्रणव सिंहगड रोडवरच्या रावसाहेब पटवर्धन प्रशालेत स्वॅब देऊन आलो. बुधवारी विजय आणि त्याचे तीन भाऊ पॉझिटिव्ह निघाले, तर गुरुवारी प्रणवचा आणि माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. म्हस्के आणि गायकवाड बंधू यांच्याप्रमाणेच मी आणि प्रणवही महापालिकेच्या सणस स्पोर्ट्स ग्राउंड येथील कोव्हिड सेंटरमध्ये दाखल होणार होतो. त्यानुसार माझा मित्र आणि महापालिकेचा सभागृह नेता असलेल्या धीरज घाटेशी बोलणंही झालं होतं. खासगी लॅबमधून बाबांची स्वॅब टेस्ट करून घेऊ म्हणजे त्यांची व्यवस्था कशी करायचीहे ठरवू, असं धीरज म्हणाला. प्रायव्हेट लॅबवाला घरी येईपर्यंत तुम्ही दोघं घरीच थांबा नि स्वॅब देऊनच मग तुम्ही सणसला जा, असं धीरजनं सांगितल्यानं मी आणि प्रणव घरीच थांबलो. चहापाणी झालं. टीव्ही पाहून देखील कंटाळा आला होता.


ते चार तास...
सणसमध्ये रात्री आठ वाजता जेवण येत असल्यानं आम्हाला घरूनच जेवून जावं लागणार होतं. प्रणवनं पावभाजी, एक जोडी एक्स्ट्रॉ आणि एका आलू पराठा, अशी ऑर्डर दिली. ऑर्डर येईपर्यंत मी जरा पडलो. स्वॅब घ्यायला आला, की मला उठव, असं सांगून मी झोपलो. खाली जाऊन प्रणवनं फूड पार्सल आणलं, हे देखील मला अर्धवट झोपेत पाहिल्याचं आठवतंय. पण त्यानंतरच मला काहीही आठवत नाही. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या इमर्जन्सी रुममध्ये गेल्यानंतरच माझे डोळे उघडले. हा कालावधी होता साधारण चार तासांचा. रात्री पावणेनऊला मी झोपलो आणि मध्यरात्री पाऊणच्या सुमारास हॉस्पिटलमध्ये होतो. चित्रपटांत दाखवतात तशीच माझीही प्रतिक्रिया होती, मैं कहा हूँ...

चार तासांमध्ये खूप काही घडलं होतं आणि मला त्याचा थांगपत्ताही नव्हता. नंतर नंतर मला एकेक गोष्टी समजत गेल्या. हॉस्पिटमध्ये असताना एकच ओळ धीरजला उद्देशून टाकली होती. तेव्हा तू होतास, म्हणून आज मी आहे.ती एक ओळ त्या चार तासांमध्ये घडलेल्या घडामोडींमुळे होती.

गुरुवारी रात्री मी झोपलो तो उठतच नव्हतो. मला गदागदा हलवून आणि पाणी मारूनही मी उठत नाही म्हटल्यानंतर प्रणव घाबरला. मला शुगर आहे, हे नेमकं त्याला माहिती नव्हतं आणि बाबांना विचारावं हे त्याला उमगलं नसावं. माझ्या माहितीनुसार, त्यानुसार तोपर्यंत बाबा झोपायला गेले होते. त्यांना उठवून त्रास देण्याऐवजी प्रणवनं धीरजला फोन लावला आणि परिस्थिती सांगितली. धीरजनं तातडीनं एम्ब्युलन्स पाठवून दिली. एव्हाना कमलेश पाठक आणि सुजयेंद्र तथा हिरो पंचमुखी यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचली होती.

अडचण अशी होती, की आशिष चांदोरकर यांना उचलण्यासाठी किमान तीन ते चार लोक तरी लागणार ते इतक्या रात्री कुठून आणायचे. टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळं मदतीला येणार कोण, हा देखील प्रश्न होता. आमच्या क़ॉलनीतील निकेत देसाई, आतिश नेटके किंवा हिरो पंचमुखी हे मदतीला यायला तयार होते. मात्र, धीरजनं मुद्दामून कोणीही वर जाऊ नका, हे निक्षून सांगितलं होतं. आलेली एम्ब्युलन्स खासगी होती. ड्रायव्हर आणि सहाय्यकानं प्रणवच्या मदतीनं खाली नेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना शक्य झाले नाही. मग ते खाली गेले आणि पाच दहा मिनिटं वाट पाहून निघून गेले.

दरम्यानच्या काळात कमलेश पाठक आणि धीरज यांचं फोनवरून बोलणं सुरूच होतं. पहिली एम्ब्युलन्स निघून गेल्यानंतर धीरजनं दुसरी एम्ब्युलन्स 108ची पाठविली. त्यातील ड्रायव्हर आणि डॉक्टर यांनीही मला खाली नेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनाही जमेना. हे समजल्यावर धीरजनं काही मिनिटांतच तिसरी एम्ब्युलन्स पाठविली. दोन्हीचे ड्रायव्हर, डॉक्टर्स नि प्रणव अशा पाच जणांनी मला उचलून खाली नेलं.

घरामधून निघताना बाबांनी हातात घेतलेला माझा हात एम्ब्युलन्समध्ये ठेवेपर्यंत सोडला नाही, असं कमलेश सांगत होता. एका बापाच्या मनात तेव्हा काय विचार आले असतील, हे कोणीही समजू शकतं. दुर्दैवाने दुसऱ्या दिवशी त्यांचा अहवालही पॉझिटिव्ह आला आणि काहीच कारण नसताना ते केवळ माझ्यामुळे करोनाच्या दुर्दैवी फेऱ्यात अडकले. त्याचं सल कायम मनात राहील. पण वाईटात चांगलं असं, की ते असिम्प्टमॅटिक होते. त्यामुळे त्यांना सणस कोव्हिड सेंटर आणि घरी परतल्यावरही काहीच त्रास झाला नाही. आता ते एकदम व्यवस्थित आहेत. तरुणपणी केलेला प्रचंड व्यायाम आणि जबरदस्त जिगर या जोरावर त्यांनी आता पर्यंत अनेक संकटं परतवून लावली आहेत. तशाच पद्धतीनं आताही त्यांनी 
करोनाशीही दोन हात केले आणि यशस्वीपणे घरी परतले.

एम्ब्युलन्स रवाना होईपर्यंत धीरजनं दीनानाथ मंगेशकरमध्ये सचिन व्यवहारे आणि डॉ. माधव भट यांच्याशी उपचारांसदर्भात बोलून ठेवलं होतं. कमलेशनं दिलेल्या माहितीनुसार, हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर मी डॉक्टर, सिस्टर यांच्यापैकी कोणालाही जवळ येऊ देत नव्हतो. हातवारे करून दूर ठेवत होतो. अर्थातच, मला यापेकी काहीही आठवत नाही. पण आपल्याला करोना झाला आहे आणि त्यामुळं कोणीही आपल्याला स्पर्श करू नये, असा विचार कदाचित बॅक ऑफ द माइंड सुरू असावा. त्यामुळेच मी कोणाला जवळ येऊ देत नव्हतो, असं म्हणण्यास पूर्ण वाव आहे. त्यामुळं तुम्ही तातडीनं पोहोचा, असा निरोप देणारा फोन धीरजनं माझ्या भावाला केला. भाऊ शिरीष आणि वहिनी शलाका अवघ्या काही मिनिटांत तिथं पोहोचले. त्यानंतर माझी वहिनी शलाका (जी पूर्वी दीनानाथमध्येच होती.) इमर्जन्सी रुममध्ये आली, मी तिला पाहिलं आणि पूर्णपणे भानावर आलो. भानावर आल्यानंतर तिलाच तो ऐतिहासिक प्रश्न विचारला, की मैं यहा कैसे पहुँचा...

दीनानाथमध्ये माझी शुगर घेण्यात आली, तर ती तीस की पस्तीसच्या आसपास होती. आता दुपारी नेहमीच्याच गोळ्या आणि व्यवस्थित जेवण झाल्यानंतरही शुगर इतकी कमी कशी होऊ शकते, हे मला न उलगडलेलं कोडं आहे. प्रा. रवी पत्की यांनं दिलेल्या माहितीनुसार, कोविडच्या विषाणूनं शरीरात प्रवेश केल्यानंतर शुगरची पातळी अचानकपणे कमी झाल्याच्या अनेक घटना आढळून येत आहेत. चीनमध्ये हे प्रमाण शंभरमागे दहा ते पंधरा रुग्ण असे आहे. हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना कोविडमुळे अनेकांची शुगर प्रचंड वाढल्याचीही उदाहरणं समजत होती. त्यामुळेच पॉझिटिव्ह आलात आणि शुगर असेल तर नेमकं काय होऊ शकतं, हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. विशेषतः होम क्वारंटाइन पेशंटपर्यंत. जेणेकरून पेशंट अधिक खबरदारी घेऊ शकतील. हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यास थोडा जरी उशीर झाला असता, तर माझं काय झालं असतं हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. त्यामुळंच मी लिहिलं होतं,‘तेव्हा तू होतास, म्हणून आज मी आहे.
.....


आयसीयू ते सेमी प्रायव्हेट
दीनानाथ हॉस्पिटलचा माझा अनुभव चांगला आहे. त्यामुळं भानावर आल्यानंतर मी दीनानाथमध्ये असल्याचं समजल्यावर माझ्या जिवात जीव आला. इमर्जन्सी रुममध्ये काही प्राथमिक चाचण्या निप्राथमिक उपचार केल्यानंतर आयसीयूत पोहोचलो. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर मी आयसीयूमध्ये दाखल झालो आणि कधी झोप लागली कळलं नाही. एव्हाना मी इंजेक्शन्स, सलाइन, वेगवेगळ्या गोळ्या, ऑक्सिमीटर, कन्टिन्युअस बीपी मॉनिटरिंग, ऑक्सिजन मास्क वगैरे गोष्टींनी मला पुरतं वेढलं होतं. सकाळपासून डॉक्टरांच्या व्हिजिट्स व्हायला लागल्या. नेमकं काय झालं, गोळी वगैरे जास्त घेतली होती का, मेडिकल हिस्ट्री काय, अशा प्रश्नांची सरबत्ती होऊ लागली. आयसीयूमध्ये असेपर्यंत हे मेडिकल चक्रव्यूह कायम असल्यामुळे मी फारसा कम्फर्टेबलही नव्हतो. आपल्याला झालेला करोना गंभीर स्वरुपाचा आहे, की फक्त शुगर कमी झाल्याने आपण आयसीयूत पोहोचलो आहे, हे कळायला मार्ग नव्हता. अर्थात, मी पण फार लोड घेतला नाही. काय औषधं देतायेत वगैरे समजून घेण्याचाही मी जास्त प्रयत्न केला नाही.

साधारण अडीच दिवस मी आयसीयूमध्ये होतो. तिथं असेपर्यंत चहा, नाश्ता आणि जेवण या पैकी कशात मला विशेष रस वाटत नव्हता. जेवणावरची वासना उडणं, हे देखील करोनाचं प्रमुख लक्षण आहे. चव न कळणं आणि वास न येणं ही देखील लक्षणं आहे, असं म्हणतात. करोना झाल्यानंतरही देवकृपेने मला चव कळत होती. पण अन्न जात नव्हतं. रविवारी दुपारी म्हणजे अडीच दिवसांनंतर मला सेमीप्रायव्हेट रुममध्ये शिफ्ट करण्यात आलं. त्यानंतर मी थोडा रिलॅक्स झालो. त्यामुळंच नाश्ता संपायला लागला. जेवणही जाऊ लागलं... जेवणाचं हे तंत्र जमलं म्हणजे आपण हळूहळू नॉर्मलकडे जातोय, याचा अंदाज येऊ लागला होता.

आर्थर एशची आठवण...
सेमीप्रायव्हेट रुममध्ये शिफ्ट झाल्यानंतर आम्ही चौघे भेटलो तेव्हापासूनच्या सर्व गोष्टी माझ्या डोळ्यासमोरून जात होत्या. करोना का झाला, हे मला माहिती होतं. पण मलाच करोना का झाला, असा प्रश्न अजिबात पडला नाही. जे घडेल, त्याला स्वीकारणं ही माझी वृत्ती. अशी काही संकटं येतात, तेव्हा विंबल्डन विजेता आर्थर ऍशचे शब्द मला कायम आठवतात. आर्थर ऍश म्हणजे विंबल्डन जिकंणारा पहिला (कदाचित एकमेव) कृष्णवर्णीय टेनिसपटू. १९८३ मध्ये शस्त्रक्रियेदरम्यान त्याला अशुद्ध रक्त दिलं आणि त्याला एड्सची बाधा झाली. आर्थर ऍशला एड्स झाला, हे समजल्यावर त्याला चाहत्यांची हजारो पत्रं येऊ लागली. चाहत्यांचा एकच सवाल असायचा. तूच का... तुलाच का... देवानं अशा जिवघेण्या आजारासाठी तुझीच का निवड केली?

आर्थरनं त्या सर्व चाहत्यांना उद्देशून फार छान उत्तर दिलं. जगभरात जवळपास पाच कोटी मुलं टेनिस खेळण्यासाठी कोर्टवर येतात. त्यापैकी पन्नास लाख मुलं टेनिस खेळायला शिकतात. पाच लाख जण व्यावसायिक टेनिसपटू होतात. अवघे पन्नास हजार जण सर्किट टेनिसपर्यंत पोहोचतात आणि फक्त पाच हजार जण ग्रँडस्लॅमसाठी पात्र ठरतात. त्यातील निवडक पन्नास खेळाडूंना विंबल्डनमध्ये सर्व्हिस करण्याची संधी मिळते. त्यापैकी चार जण उपांत्य फेरीत आणि दोनच जण अंतिम फेरीत पोहोचतात नि फक्त एकालाच चषक उंचाविण्याची संधी मिळते... जेव्हा मी विंबल्डनचा चषक उंचाविला तेव्हा देवाला विचारले नाही, की मीच का? माझ्याच नशिबी हा सुवर्णक्षण का दिलास? त्यावेळी जर मीच का, असे विचारले नाही तर अशा संकटाच्या प्रसंगामध्ये देवाला प्रश्न का करू...

मला आर्थर ऍशची ही गोष्ट खूप आठवते. संकटसमयी तर कायमच. सोशल मीडियावर लेखन करणाऱ्या पत्रकारांसाठी देण्यात येणारा राज्य सरकारचा पहिलावहिला पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते २०१५मध्ये मला मिळाला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राजकीय वाटचाल आणि सरकारच्या योजनांचा आढावा घेणारं पुस्तक लिहिण्याची संधी मला मिळाली. पत्रकार म्हणून आणि वैयक्तिक आयुष्य समृद्ध करणाऱ्या अशा अनेक संधी मला मिळाल्या. तेव्हा मी देवाला कधीही मीच का, मलाच का, असे विचारले नाही. त्यामुळे मलाच करोना का, असा विचार करणं, मला अजिबात योग्य वाटला नाही. आपल्या नशिबी जे आलं आहे ते स्वीकारणं आणि कोणालाही दोष न देता पुढे जाणं, हीच माझी कायम भूमिका राहिली आहे.

घाबरू नका, सामना करा...
कोणाला करोना होऊ नयेच. पण दुर्दैवाने जर तुम्ही करोनाच्या फेऱ्यात अडकलात तर सत्य परिस्थिती पटकन स्वीकारा. मीच का, मलाच का, यात न अडकता तातडीने उपचारांना सामोरे जा. अनेक जण ही सत्य परिस्थिती स्वीकारण्यापासून दूर पळतात, लोकांना घाबरतात. आपल्याबद्दल काय चर्चा करतील सगळे, या विवंचनेत असतात. पण एक लक्षात ठेवा तुम्हाला करोना झालाय. असा आजार झालेला नाही, की लोकांना संशयानं तुमच्याकडे पहावं. तुम्ही खून, बलात्कार किंवा दरोडा असा मोठा गुन्हा केलेला नाही. जेणेकरून तुम्हाला मान खाली घालावी लागेल.

अजून एक म्हणजे दुखणं अंगावर काढू नका. अनेक जण दहा-बारा दिवस ताप अंगावर काढतात. मला काही होत नाही म्हणून... मला वाटतं जर लक्षणं दिसत असतील तर डॉक्टरांचं औषध जरूर आणा. पण गुण येत नसेल तर लगेच टेस्ट करून घ्या. कारण सुरुवातीला करोनामुळं काही त्रास जाणवत नसला तरी करोना जेव्हा फुफ्फुसांपर्यंत पोहोचतो तेव्हा तो गंभीर स्वरुप प्राप्त करतो. पहिले काही दिवस काही जाणवत नाही. पण अचानक नंतर आजार बळावू शकतो. जनरल वॉर्डमध्ये पंचवीस-तीस वयोगटातील तरूणही श्वास घेता यायचा नाही, म्हणून प्रचंड अस्वस्थ व्हायचे. ऑक्सिजन काढल्यानंतर चार पावलंही चालता यायचं नाही... नंतर प्रकृतीत सुधारणा व्हायची पण श्वास न घेता येणं, दम लागणं, छाती भरून घेणं हा त्रास अस्वस्थ करून टाकणारा असतो. त्यामुळं तुम्हाला काही झालं नसेल तर चांगलंच आहे. पण लक्षणं असतील तर टेस्ट करून घ्या.

सर्वात शेवटचं आणि महत्त्वाचं म्हणजे करोनाचे पेशंट्स बरे होऊ शकतात. करोना झाला म्हणजे माणूस मेलाच असे अजिबात नाही. त्यामुळे करोना अजितबात घाबरू नका. काळजी जरूर घ्या. पण करोना होईल किंवा करोना झाला, या भीतीने घाबरून जाऊ नका. टेन्शन तर अजिबात घेऊ नका.
.....


औषधे कमी, केअर अधिक...
सेमीप्रायव्हेर रुममध्ये शिफ्ट झाल्यानंतर आपल्याला काय काय औषधं दिली जातायेत, नेमके काय उपचार सुरू आहेत, याची माहिती घ्यायला सुरुवात केली. सेमीप्रायव्हेट रुममध्ये शिफ्ट केल्यानंतर सलाइन बंद झालं होतं. अँटिबायोटिक इंजेक्शन्स, शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी इन्श्युलिनची इंजेक्शन्स, ताप कमी करण्यासाठी क्रोसिन ६५० मिलीग्रॅम, व्हिटामिन सी आणि डीची गोळी, खोकला कमी करण्यासाठी कफ सिरप, इटॉरिकॉक्सिब ही रिएक्शन येऊ नये, यासाठीची गोळी आणि बी-क़ॉम्प्लेक्सची कॅप्सुल इतकीच औषधं होती.  फुफ्फुसाला झालेला संसर्ग रोखण्यासाठी लेंटेक्लीन ही गोळी सुरु होती. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आयव्हरमेक्टीन होती.  सुरुवातीच्या काही दिवसांत आणखी काही इतर औषधं असतीलही. पण शेवटपर्यंत फक्त हीच औषधं होती. नंतर खोकला गेल्यानंतर आणि ताप उतरल्यानंतर क्रोसिन आणि कफ सिरपही बंद झालं.

अजून एक म्हणजे हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर तातडीनं माझा चुलतभाऊ डॉ. योगेश चांदोरकर यानं 'स्वयंपूर्ण उपचारपद्धती'द्वारे उपचार सुरू केले. त्याचे अप्पा बळवंत चौक येथे 'निरामय क्लिनिक' आहे. हे उपचार मोबाईलच्या माध्यमातून 'विनास्पर्श विनाऔषध' पद्धतीने होतात. त्याने आणि वहिनी अमृता यांनी पहिल्या दिवसापासून उपचार सुरू केले. सुरुवातीला शलाका त्यांना फोन करायची. नंतर माझ्याकडे फोन आल्यानंतर मी दिवसातून दोनदा फोन करायचो... नंतर नंतर फक्त एकदाच फोन करावा लागे. माझ्या तब्येतीचा दोघांनाही अंदाज येत होता आणि मी कसा.आहे, हे त्यांना न सांगताही समजत होते. त्या उपचारांचाही माझ्या रिकव्हरीत मोठा वाटा आहे, असं मला लाटतं.

पेशंट तपासण्यासाठी येणारे डॉक्टर, नर्स, मामा, मावशी आणि सफाई कर्मचारी सर्वच मास्क, गॉगल, डोक्यावर टोपी, हातात ग्लोव्हज आणि वेगवेगळ्या रंगांचे एप्रन घालून येत. सुरुवातीला कोण डॉक्टर आहे आणि कोण नर्स यांचा काय पत्ता लागायचा नाही. शिवाय नेहमी डॉक्टरच्या गळ्यात, हातात स्टेथोस्कोप तरी असतो. त्यामुळं तरी ही व्यक्ती डॉक्टर आहे, हे समजतं. पण इथं हृदयाचे ठोके तपासण्याचा विषयच येत नसल्यानं स्टेथोस्कोही नसायचा. मग अनेकदा गोंधळ उडायचा.पण काही दिवसांनंतर पीपीई किट किंवा एप्रनमधून आपल्याला तपासायला येणारे ड़ॉक्टर ओळखता येऊ लागले.

इतर वेळी सेमी प्रायव्हेट रुममध्ये पेशंटसाठी एक आणि नातेवाईकासाठी एक अशा दोन खाटा असतात. आताच्या परिस्थितीत मात्र, दोन खाटांवर दोन वेगळे पेशंट ठेवले जातात. सोबत नातेवाईक राहू शकत नाही. त्यामुळं करोना पेशंटचीच सोबत सुखावह ठरते. सेमी प्रायव्हेट रुममध्ये शिफ्ट झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी मला मोबाईल मिळाले. तोपर्यंत ते फोन हिरोकडेच होते. पाचव्या की सहाव्या दिवशी माझ्याकडे मोबाईल आले. फोन मिळाले त्याच दिवशी माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुण्यात आले होते. धीरजनं मला फोन करून त्यांच्याशी माझं बोलणं करून दिलं. दोन-तीन मिनिटंच बोलले. पण एकदम मस्त वाटलं. प्रेरक वाटलं.  

आश्चर्य... देवेंद्रजींचा फोन
आशिषजी, तुम्हाला कसा काय करोना झाला... काय केलंत. काळजी घ्या. तुम्ही लवकर बरे व्हा. तुम्हाला अजून खूप मोठी कामं करायची आहेत. कसलीही चिंता अजिबात करू नका. आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत, असं ते बोलत होते. देवेंद्रजी, धीरज होता म्हणूनच आज मी तुमच्याशी बोलू शकतोय. त्यानं खूप धावपळ केली त्यादिवशी, असं मी त्यांना आवर्जून सांगितलं. त्यावरही ते एकदम छान बोलले. म्हणाले, आशिषजी, एक लक्षात ठेवा. जो चांगलं काम करतो. त्याचं नेहमी चांगलंच होतं. चांगली लोक त्यांच्या पाठिशी कायम उभी राहतात. तुम्ही लवकर बरे होणार. चिंता करू नका.

देवेंद्रजींचा फोन झाला आणि त्याच संध्याकाळी मला सेमीप्रायव्हेट रुममधून जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्याचं ठऱलं. जनरल वॉर्ड कसा असेल, ही भीती होती. त्यामुळं माझी तिथं शिफ्ट व्हायची इच्छा नव्हती. पण तुम्हाला आता ऑक्सिजनची गरज नाहीये, म्हणून तुम्हाला तिकडे शिफ्ट करीत आहोत, असं मला नर्सनं सांगितलं. हॉस्पिटलमधून बाहेर पडण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे असा विचार करून मी तयार झालो. चालतच जाऊ, व्हीलचेअर नको, असं मी नर्सला सांगितलं. सेमीप्रायव्हेट रूम ते जनरल वॉर्ड हे अंतर साधारण शंभर दीडशे पावलांचंच असेल. जाऊ आपण सहज असं मला वाटलं. पण ती पावलं चालल्यानंतर बऱ्यापैकी दम लागला होता. करोनाचे इफेक्ट्स जाणवू लागले होते. जनरल वॉर्ड म्हणजे एक मोठा ह़ॉल आणि त्यात साधारण बावीस ते पंचवीस पेशंट. त्या वातावरणामध्ये दमल्याचा त्रास थोडा अधिकच बळावला. पुढचे काही दिवस आपण कसे ढकलणार, अशी चिंताच वाटत होती.


तुम्हाला ऑक्सिजन लागणार नाही, म्हणून मला तिथं शिफ्ट केलं होतं. पण दुसऱ्या दिवसापासूनच मला ऑक्सिजनचा त्रास जाणवू लागला. श्वास घ्यायला त्रास होत होता. थोडं चालल्यानंतरही दम लागायचा. रक्तातील ऑक्सिजनची पातळी अर्थात, एसपीओ२ ९०च्या पुढे पाहिजे, तो७५ ते ८०पर्यंत खाली आला होता. त्यामुळं दुसऱ्याच दिवशी मला जनरल वॉर्डात दुसऱ्या छोट्या हॉलमध्ये ऑक्सिजनची व्यवस्था असलेल्या बेडवर शिफ्ट करण्यात आलं. तिथं तुलनेनं पेशंट कमी होते. त्यामुळं जरा बरं वाटत होतं. आणि ऑक्सिजन लावल्यामुळं त्रासही कमी जाणवत होता.

डॉ. भारत पुरंदरे, आमच्या शास्त्री रोडवरच्या पेट्रोल पंपाच्या अलिकडे क्लिनिक असलेल्या डॉ. बहुलीकरांचे चिरंजीव डॉ. यश, नंतरच्या टप्प्यात माझी तपासणी करण्यासाठी येणाऱ्या डॉ. प्रीती जोशी-घोलप आणि संध्याकाळच्या टप्प्यात येणारे डॉ. यश भलानी अशा सर्व डॉक्टरांनी माझ्या लवकर बरे होण्यात खूप मोलाची भूमिका बजावली. वरील आणि इतर सर्व डॉक्टर लोकांचं वैशिष्ट्य असं, की हे फक्त बोलण्यानं रुग्णाला निम्म बरं करायचे. आत्मविश्वास वाढवायचे. तुम्हाला एकदम कम्फर्टेबल करायचे. माझ्या डिस्चार्जच्या दिवशी एक ज्येष्ठ नागरिक एडमिट झाले. डॉक्टर आल्यावर ते रडायलाच लागले. डॉक्टर मला कसा काय करोना झाला... आता मी मरणार वगैरे म्हणू लागले. तेव्हा तिथं आलेले डॉक्टर त्यांना म्हणाले, अहो सकाळी आला तेव्हा बोलू शकत नव्हता. आता किती बोलताय बघा. म्हणजे किती सुधारणा आहे तुमच्यात. अजिबात चिंता करू नका. लवकरच तुम्ही तुमच्या पायावर घरी जाणार... करोनाचे इतके पेशंट, त्यांच्या वेगळ्या तऱ्हा, निराळी मानसिकता अशा परिस्थितीतही स्वतःला सकारात्मक ठेवून दुसऱ्यामध्ये प़ॉझिटिव्हिटी निर्माण करण्याचं काम डॉक्टर मंडळी करत होती.

जनरल वॉर्डमध्ये दुसऱ्या हॉलमध्ये शिफ्ट केल्यानंतर डॉ. यश बहुलीकर यांनी माझा एक एक्स-रे काढून घेतला नि रक्ताची एक चाचणी करायला सांगितली. दुसऱ्या दिवशी त्याचे रिझल्ट्स आले. रक्ताची चाचणी निगेटिव्ह आली होती. म्हणजे माझा करोना गंभीर स्वरुपाचा नव्हता. त्यामुळे तुम्ही लवकर बरे व्हाल, असं त्यांनी मला सांगितलं. मात्र, फुफ्फुसांचा एक्स-रे नॉर्मल नव्हता. कदाचित काही प्रमाणात संसर्ग (इन्फेक्शन) झाला होता. त्यामुळंच मला दम लागत होता आणि रक्तातील ऑक्सिजन थोडा कमी झाला होता.

रक्तातील ऑक्सिजन वाढविण्यासाठी ड़ॉ. यश बहुलीकर यांनी सांगितलेला सर्वात सोपा उपाय म्हणजे पालथं झोपायचं. पोटावर झोपायचं. पाठीवर झोपल्यामुळं फुफ्फुसांना सर्वात कमी प्रमाणात ऑक्सिजन मिळतो. कुशीवर थोडा अधिक किंवा पालथं झोपल्यानं सर्वाधिक प्रमाणात ऑक्सिजन मिळतो. त्यामुळे अर्धा तास पालथं झोपा आणि प्रत्येकी पंधरा मिनिटं डाव्या-उजव्या झोपा. पहा तुमचा एसपीओ२ वाढतो की नाही, असं डॉक्टर म्हणाले होते. जेव्हापासून मी पालथं झोपायला सुरुवात केली तेव्हापासून माझा एसपीओ२ वाढायला सुरुवात झाली. जेव्हा डिस्जार्च मिळाला त्या दिवशी चालून आल्यानंतर एसपीओ२ चं प्रमाण हे 99 होतं. म्हणजे चालण्यापूर्वी ९२ आणि चालल्यानंतर ९९... वास्तविक पाहता, चालल्यानंत एसपीओ२ प्रमाण कमी होतं. पण माझ्या बाबतीत ते वाढलं होतं. त्यामुळं डॉक्टरनाही त्याचं आश्चर्य वाटलं होतं.

मंगेशकर हॉस्पिटलमध्ये सकाळी टीव्हीवर डॉ. धनंजय केळकर हे करोना रुग्णाने कशा पद्धतीने योगासने करावीत, श्वसनाचे व्यायाम करावेत, या बाबत सकाळी अर्धा तास मार्गदर्शन करत. त्याचाही मला खूप फायदा झाला. प्रत्येक रुग्णाला वैयक्तिक मार्गदर्शन करण्यासाठी प्रशिक्षकाची व्यवस्था होती. रोज संध्याकाळी येऊन ती व्यक्ती पंधरा मिनिटे प्रत्येकाकडून छोटे-छोटे व्यायाम प्रकार करून घेत असे. मला वाटतं माझ्या रिकव्हरीमध्ये डॉ. केळकर यांचे व्यायामप्रकार आणि त्या श्वसनाचे व्यायाम करून घेणारे प्रशिक्षक यांचा मोठा वाटा आहे.

मला दीनानाथमधील नर्सिंग स्टाफचंही जाम कौतुक आहे. अगदी मी आधी एडमिट होतो तेव्हा किंवा बाबा कॅन्सर आणि हार्ट एटॅकच्या वेळी दीनानाथमध्ये होते, तेव्हा याचा अनुभव घेतलेला आहे. यावेळीही मला आलेला अनुभव अगदी तसाच होता. दादा, बाबा, काका करून या नर्सेस पेशंटची काळजी घ्यायच्या. एखाद्या पेशंटला जेवण जात नसेल, तर चार शब्द प्रेमाचे आणि समजुतीचे बोलून जेवायला बसवायच्या. प्रत्येक रुग्णाशी प्रेमानं संवाद साधायच्या. बाबा कसं वाटतंय आता. बरं वाटतंय ना वगैरे विचारपूस करायच्या. अनेक नर्सेसचा हात तर इतका हलका होता, की कधी इंजेक्शन दिलं कळायचंही नाही. माणूस औषधानं बरा होतोच. पण डॉक्टर, नर्स आणि इतर स्टाफकडून त्याला कशी वागणूक मिळते, यावरही त्याच्या प्रकृतीतील सुधारणा अवलंबून असते, असं मला कायम वाटतं. दीनानाथचा सर्वच स्टाफ त्याबाबतीत मला कायमच एक नंबर वाटत आलेला आहे.
.....


व्यक्ती तितक्या प्रकृती...
जनरल वॉर्डमधील पुढचे दहा-अकरा दिवस करोनाचं टेन्शन आणि सर्व शीण घालविणारे ठरले. नाना तऱ्हेचे लोक, त्यांची चित्रविचित्र वर्तणूक, सवयी अशा सर्व गोष्टींनी त्या रुक्ष वातावरणातही मनोरंजन केलं. आपण करोनाचे रुग्ण आहोत, याचं भानंही या रुग्णांना नसायचं.

माझ्या शेजारच्या बेडवर एक माजी पोलिस हवालदार होते. वय वर्षे ७५.मी पत्रकार आहे समजल्यावर त्यांनी कृष्णा कुलकर्णी यांचं नाव मला सांगितलं. मी त्यांना चांगला ओळखायचो, असं सांगायचे. त्या माजी पोलिसाला चालताना दम लागायचा. एसपीओ२ पुरेसा नव्हता. तरीही त्यांना घरी जायचं होतं. हॉस्पिटलचा कंटाळा आला होता. मी निवृत्त पोलिस आहे. मला काय होणार आहे, असं ते कायम डॉक्टरांना म्हणायचे. एकदा ते जाम वैतागले असताना एका महिला डॉक्टरला म्हणाले, की मला सोडा नाहीतर मी आज आत्महत्याच करणार आहे. मला काहीही झालेलं नाही तरीही मला थांबवून ठेवलंय वगैरे... कधी नर्सशी वाद घालायचे. आता या मंडळींशी वाद घालून काय फायदा. पण संध्याकाळ झाली की त्यांचे एकपात्री नाट्य ठरलेले असायचे. रोज संध्याकाळी बॅग घेऊन मी चाललो म्हणून निघायचे आणि दारापाशी जाऊन परत यायचे. त्यांचं नाट्य आम्हाला पाठ झालं होतं.

एक पस्तीशीतील तरुण माझ्या समोरच्या बेडवर होता. त्याच्या शेजारच्या बेडवरील ज्येष्ठ व्यक्तीला खोकला यायचा. कुशीवर झोपला असताना खोकला जास्त यायचा. त्या तरुणाकडे तोंड करून झोपल्यानंतर ते कायम खोकायचे. आता त्या तरुणानं गैरसमज असा करून घेतला, की बाबाजी माझ्याकडे तोंड केल्यावर मुद्दाम जोरजोरात खोकतात. त्यावरून जोरदार खटके उडायचे. एकदा काय झालं कोण जाणे पण तो तरुण जाम भडकला. तुम्ही मुद्दाम माझ्याकडे तोंड करून मुद्दाम खोकता. मी मेलो तर माझ्यामागे माझी बायको मुलं आहेत. ती उघड्यावर येतील. तुमचा सगळा संसार झाला आहे. परत तुम्ही माझ्याकडे खोकलात, तर मी तुमचा खूनच करीन... अरे डायरेक्ट खून... काय चाललंय काय. आपण करोना वॉर्डात आहोत, परिस्थिती काय आहे. याचं भानं उरत नसावं. कदाचित करोनामुळे येऊ शकणाऱ्या मृत्यूची भीती त्या भानाचा खून करीत असावी.

एका बापलेक आमच्या वॉर्डात दाखल झाले होते. पोरगा लवकर रिकव्हर झाला आणि बापाला आणखी चार दिवस हॉस्पिटलमध्ये रहावं लागणार होतं. आता बाप हट्ट करून बसला, की मी आणि मुलगा एकत्र आलो. एकत्रच बरोबर जाणार. मग मुलगाही म्हणाला, की बाबांना डिस्चार्ज मिळेपर्यंत मी रहायला तयार आहे. अरे, हे काय लग्नाचं रिसेप्शन आहे का? एकाच गाडीवरून आलोय एकत्रच परत जाणार... नर्स आणि डॉक्टरबरोबर त्यांनी वादही घातला. पण समजून काही घेतलं नाही. अशा अनेक अतरंगी पेशंट्सनी हॉस्पिटलमधील माझा स्टे अधिक मनोरंजक केला. तिथं राहण्याचा कंटाळा येऊ दिला नाही.

आमच्या वॉर्डात दत्तवाडीतील एक पेशंट होते. व्यवस्थित होते. काही दिवसांतच त्यांना डिस्चार्ज मिळणार होता. एक दिवस संध्याकाळी अचानक ते आवराआवरी करताना दिसले. म्हटलं यांना अचानक आज कसा काय डिस्चार्ज मिळाला. तेव्हा शेजारच्या पेशंटनं सांगितलं, की त्यांची आई गेली, असा फोन आता आला होता. एरव्ही हसतमुखानं खुशीत घरी जाणारे पेशंट आम्ही पाहिले. लोक तो चालला म्हणून टाळ्याही वाजवायचे. त्या दिवशी मात्र, दुःखद अंतःकरणानं रडतरडत घरी जाणारा पेशंट पाहून आम्हालाही कसंतरीच वाटलं.
.....

 

वैविध्यपूर्ण, चौरस आणि संतुलित...
दीनानाथमधील नाश्ता आणि जेवण हा स्वतंत्र लेखनाचा विषय आहे. आतापर्यंत मी किंवा बाबा एडमिट असताना पेशंटसाठी तिथलं जेवण कधी घेतलं नव्हतं. कारण रोज कोण ना कोण डबा घेऊन तिथं यायचं. मात्र, यंदा डब्याचा विषयच नव्हता. कारण त्या वॉर्डात येण्याची कोणालाच परवानगी नसायची. आणि असती तरी कशाला दुसऱ्याचं आयुष्य धोक्यात घालायचं. त्यामुळं दीनानाथमधलंच जेवण, नाश्ता वगैरे होता.

दीनानाथमधलं जेवण हे वैविध्यपूर्ण, चौरस आणि अतिशय संतुलित अशा प्रकारचं होतं. तुमचे आजार पाहून त्यानुसार डाएट ठरवून जेवणाचं ताट समोर यायचं. कधी कोशिंबीर, सलाड तर कधी गाजर नि काकडीचे काप, मूग, हरभरा, छोले, चवळी आणि मिक्स कडधान्यांच्या उसळी, क्वचित कधीतरी एखादी घट्ट पालेभाजी... भेंडी, दुधीभोपाळा, पडवळ, तोंडली आणि इतर भाज्या... श्रावण घेवडा, गवार, पापडी अशा शेंगाच्या भाज्या, कधी सोयाबिन, डाळीचा भरपूर वापर असलेली आमटी यांनी ताट सजलेलं असायचं. क्वचित कधीतरी नाचणीचं सत्व, अगदी कमी साखर घातलेला गाजर हलवा आणि साखर नसलेली शेवयांची खीर हे पदार्थही आश्चर्यचकित करून जायचे. कधी पोळ्या तर कधी पालक पराठे असायचे.

  

सकाळी नाश्त्याला पोहे, उपमा, सांजा, शेवयांचा उपमा, दलियाचा उपमा, इडली, नाचणीच्या रव्याची इडली वगैरे पदार्थ असायचे. सोबत कलिंगड किंवा पपईच्या फोडी. शुगर नसलेल्यांना केळं. सोबत ग्लासभर दूध. रात्रीच्या जेवणानंतरही दुधाचा ग्लास यायचा. मला दूध हे विशेष आवडत नाही. विनासाखर आणि काहीही न घालता तर अजिबात नाही. सुरुवातीचे काही दिवस मी दूध पिलं नाही. भूकही नसायची आणि आवडतही नव्हतं. घेतलं तरी आजूबाजूच्या कोणाला तरी देऊन टाकायचो. पण नंतर नंतर माझी भूक वाढली आणि दूध प्यायला सुरुवात केली.

संध्याकाळच्या सुमारास सूप नावाचं एक पेय यायचं. एक दिवस पालक आणि एक दिवस टोमॅटो हा अपवाद वगळला तर उर्वरित दिवस ते सूप कशाचं आहे,  कोणालाच ओळखता यायचं नाही. फक्त गरम आहे, म्हणून ते झटपट संपायचं.
.....

सोळाव्या दिवशी डिस्चार्ज...
एडमिट झाल्यानंतर बरोबर सोळाव्या दिवशी मला डिस्चार्ज मिळाला. थोडा लवकरही मिळाला असता. पण शुगर आणि एसपीओ2 ऑव्झर्व्हेशनसाठी त्यांनी ठेवलं असावं. घरी सोडताना स्वॅब टेस्ट करीत नाहीत. कारण बाराव्या किंवा चौदाव्या दिवसांनंतर शरीरीतील करोनाचा विषाणू ९९ टक्क्यांपर्यंत नष्ट होतो. त्याच्यामुळे दुसऱ्याला संसर्ग होण्याचा धोका अजिबात नसतो. करोनाग्रस्त व्यक्तीही पूर्णपणे बरी झालेली असते. मात्र, रुग्णाच्या घशात वा नाकामध्ये अत्यल्प प्रमाणात विषाणू आढळतात. त्यांच्यामुळे संसर्ग होत नाही. मात्र, स्वॅब टेस्ट पॉझिटिव्ह येते. आणि एकदा टेस्ट पॉझिटिव्ह आली, की पेशंट घरी जाण्यासाठी टाळाटाळ करतात. त्या कारणामुळे हल्ली स्वॅब टेस्ट न करता पेशंटना घरी सोडले जाते. त्यात काहीही धोकादायक नाही. मात्र, हे करताना संबंधित पेशंट्सची एसपीओ2 लेव्हल, चालून आल्यानंतरची लेव्हल, तापमान, शुगर, बीपी आणि इतर पॅरामीटर्स चेक केले जातात. दम लागतोय का, हे तपासलं जातं. जेणे करून घरी गेल्यावर त्याला अडचण येऊ नये.

अशाच पद्धतीने मी देखील सोळाव्या दिवशी म्हणजे शनिवारी घरी परतलो. पाचव्या मजल्यावर असलेला माझा सी वॉर्ड ते लिफ्ट, दुसऱ्या मजल्यावर लिफ्टमधून बिलिंग डिपार्टमेंट, तिथून परत, तळ मजल्यावर पोहोचल्यावर  लिफ्ट ते दीनानाथचा पोर्च ही जवळपास दीडशे ते दोनशे पावले आणि घरी आल्यानंतर २२ पायऱ्या या अगदी छोट्या अंतराने देखील माझा जीव काढला. बिलिंग डिपार्टमेंट मध्ये तर पंधरा-वीस मिनिटं थांबणंही जीवावर आलं होतं. आता विकेट पडतीय, अशीच माझी परिस्थिती घरी पोहोचेपर्यंत झाली होती. इतके दिवस चाल अगदी थोडी होती. त्यामुळं हे अंतरही खूप थकवणारं होतं.


मात्र, घरी आल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस एका खोलीतून दुसऱ्या खोलीत गेल्यानंतर, टॉयलेटमध्ये जाऊन आल्यानंतरही दमून जायला व्हायचं. क्वचित प्रसंगी थोडा दमही लागायचा. मात्र, श्वसनाचे व्यायाम मदतीला धावून आले. पोटावर झोपण्यानं खूप हातभार लावला. हळूहळू थकण्याचं आणि दम लागण्याचं प्रमाण कमी झालं. मग मी हळूहळू नाश्ता बनवू लागलो. कुकर लावू लागलो. वेगवेगळी काम करू लागलो. बरोबर अठऱा दिवसांनंतर मी पूर्णपणे ठणठणीत झालो आणि पहिल्यांदा घराबाहेर पडलो. म्हणजे सिम्प्टमॅटिक पेशंटसाठी पंधरा दिवसांचा जो क्वारंटाइन पिरियड तयार केला आहे तो आवश्यक असाच आहे.
.....


दवा चाहिये और दुवा भी...
डॉक्टरांचे प्रयत्न, औषधांचा गुण, सिस्टर मंडळींकडून घेतली जाणारी काळजी आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून करोना रुग्ण बरे व्हावेत, यासाठी प्रयत्न करणारा प्रत्येक जण यांच्यामुळे पेशंट बरे होऊन घरी जातात. मीही तसाच घरी आलो. मला वाटतं या सर्वांच्या बरोबरीनंच तुमच्या पाठिशी असलेल्या शुभेच्छांचं पाठबळही तुम्हाला बरं करण्यात मोलाची भूमिका बजावतं.

टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीचा सिक्युरिटी गार्ड तुषार धुमाळ याचा एक दिवस फोन आला. साहेब, तुम्हाला करोना झाला समजल्यावर मला खूप वाईट वाटलं. मी गावालाच होतो. तुम्ही लवकर बरे होण्यासाठी मी गावच्या देवाला नवस बोललोय, साहेबांना लवकर बरं कर मी तुला नारळ नि साखर वाहीन. असेच आमचे शेखचाचा. हृद्यविकारातून बरे झाल्यानंतर बाबांसाठी घरी येणारे केअर टेकर. मला फोन करून ते रडायलाच लागले. थोडा वेळानंतर म्हणाले, की दादा तुम्हाला करोना झाल्यापासून आमच्या बायकोनं कुराण वाचायला घेतलंय. तुम्हाला काय होणार नाही. अल्ला तुम्हाला लवकर बरं करणार. नंतर घरी भेटायला आल्यावर बायकोनं दोनदा कुराण वाचून पूर्ण केल्याचं सांगितलं. माझा जिवलग दोस्त कमलेश पाठकनं मी एडमिट झाल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून गुरुचरित्राचं पारायण करायला सुरुवात केली. क्वारंटाइन पिरियड संपल्यानंतर पारायण पूर्ण झालं. तुम्हाला बरं करण्यात या निरपेक्ष प्रेमाचा थोडातरी वाटा असणारच ना...

माझ्याकडे जेव्हापासून फोन आला तेव्हापासून प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी अनेकांनी फोन केले. धीरजनं फेसबुकवर टाकल्यानंतर तर इतके फोन यायला सुरुवात झाली, की मला वाटलं आता सिस्टर सांगतायेत तुम्ही इतकं बोलू नका. व्हॉट्सअप, मेसेजेस, मेसेंजर, फेसबुक कॉमेंट्स नि ट्विटर यांच्यावर अनेकांनी माझी चौकशी केली. लवकर बरं होण्यासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या. सदिच्छा व्यक्त केल्या. अनेक जण तर रोज मेसेज किंवा व्ह़ॉट्सअप करून आज कसा आहेस, सुधारणा होते आहे ना विचारायचे. लवकर बरा हो आपल्याला मिसळ खायला जायचंय, असंही गमतीनं म्हणायचे. अनेकांना वेगळे अनुभव असतील, पण माझ्या इमारतीमधील सर्व जण अगदी मनापासून माझ्या आणि बाबांच्या प्रकृतीची कायम विचारपूस करायचे. बरं होण्यासाठी शुभेच्छा द्यायचे.

हॉस्पिटलमध्ये आणि डिस्चार्जनंतर घरी पोहोचल्यानंतरही डबा आणून देऊ का, आज डब्याची काय व्यवस्था आहे की देऊ, अशी विचारणा करणाऱ्या फोनची गिनतीच नाही. लोकमान्य शाखेतील सर्व दोस्त, आमच्या भावे हायस्कूलमधील मित्र, एसपी कॉलेजमधील आणि रानडे इन्स्टिट्यूटमधील मित्र-मैत्रिणी तसंच व्हॉट्सअपच्या माध्यमातून नव्याने भेटलेले भावे प्राथमिक शाळेतील दोस्त नि इतर अनेक दोस्त मंडळी...

तुझ्या बिलाचा काय विषय आहे... काही मदत लागली तर अगदी न लाजता सांग. मी माझ्या परीने खारीचा वाटा उचलीन. निवृत्त झालेले बाबांचे एक मित्र केशव जोशी यांनी दोन-तीन वेळा मला फोन करून हे सांगितलं. आणखीही काही जणांनी तशीच विचारणा केली आणि मदतीची तयारी दर्शविली. गुरुवारच्या रात्री तुझी तशी अवस्था होती आणि आम्ही काहीच करू शकलो नाही, याचं खूप वाईट वाटतंय, असं म्हणून अनेक दोस्त फोनवर बोलताना ढसाढसा रडायला लागले... इतकं भरभरून व्यक्त होणारं हे प्रेम तुमच्या फास्ट रिकव्हरीमध्ये हातभर लावत असणार, याची मला खात्री आहे.


लोकांच्या सदिच्छा आणि शुभेच्छा असतील तर तुम्ही नक्कीच लवकर बरे होता, असं मला तरी कायम वाटतं. आणि या बाबतीत मी भलताच नशीबवान आहे. दवाच्या बरोबरीनं देवाची कृपा आणि लोकांच्या दुवा देखील तुमच्या पाठिशी असायलाच हव्यात. कोणी मानो न मानो हर एक दुवा जरूरी होती है...यावर आपला ठाम विश्वास आहे. अवघडप्रसंगी मित्रांनी केलेली धावपळ, डॉक्टरांनी केलेले उपचार, दीनानाथमधील स्टाफनं अत्त्यंत प्रेमानं घेतलेली काळजी, माझे सर्व दोस्त, स्नेही आणि आप्तेष्टांच्या शुभेच्छा-सदिच्छा आणि लास्ट बट नॉट लिस्ट गणपती बाप्पाची कृपा या मुळेच मी आज ठणठणीत होऊन ब्लॉग लिहू शकतो आहे.

आयुष्यातील अत्यंत कठीण प्रसंगामध्ये माझ्या पाठिशी ठामपणे उभे राहणाऱ्या आणि माझ्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचे मनःपूर्वक धन्यवाद...

गणपती बाप्पा मोरया...