Wednesday, January 14, 2015

हाताने ओढविलेला मृत्यू...

हे तर पत्रकारितेतील ‘व्यंग’

‘शार्ली हेब्दो’ या फ्रान्समधील व्यंग्यसाप्ताहिकाच्या पॅरिसमधील कार्यालयावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात व्यंगसाप्ताहिकाचे संपादक, तीन व्यंग्यचित्रकार आणि दोन पोलिसांसह एकूण बारा जण ठार झाले. या घटनेने साऱ्या जगाला हादरवून टाकले. कदाचित युरोपमधील देशांना अशा पद्धतीने प्रथमच दहशतवादी हल्ल्याला सामोरे जावे लागल्यामुळे सर्वांना जबरदस्त धक्का बसला असवा. किंवा अशा पद्धतीने पत्रकारांवर किंवा नियतकालिकावर हल्ला करून इतक्या मोठ्या प्रमाणावर हत्याकांड घडवून आणल्यामुळे सारे जग हादरून गेले असावे. 


‘शार्ली हेब्दो’वरील हल्ल्यानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मत स्वातंत्र्य, पत्रकारांचे स्वातंत्र्य अशा मुद्द्यांची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. मला याच मुद्द्यावर लिहायचं आहे. मला जो मुद्दा मांडायचा आहे, तो बहुधा कोणीच मांडलेला नाही किंवा मला जसा मांडायचा आहे, तसा कोणाकडूनही मांडला गेलेला नाही. त्यामुळेच मला लिहावंसं वाटतंय. लेखामध्ये विविध मुद्द्यांची चर्चा सुरू करण्यापूर्वीच एक गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते. ती म्हणजे, दहशतवाद्यांनी जे हत्याकांड घडवून आणले आणि प्रतिक्रिया दिली, ती पद्धती पूर्णपणे चूक आहे. त्याला समर्थन अजिबात नाही. अशा पद्धतीने हल्ले करून आणि हत्या करून आपली बाजू मांडण्याची वृत्ती घोर निंदनीय आहे. त्यामुळेच त्याचे समर्थन करण्यासाठी हे लिखाण आहे, असा अर्थ कोणीही काढण्याची आवश्यकता नाही.

हे निमित्त घेऊन मला वेगळा मुद्दा मांडायचा आहे. ‘शार्ली हेब्दो’चे सर्व व्यंग्यचित्रकार आणि संपादक वगैरे मंडळी खूप अत्युच्च दर्जाची व्यंग्यचित्रकार आहेत आणि त्यांच्या तोडीचे व्यंग्यचित्रकार जगात आजपर्यंत कोणीही कधीही झाले नाहीत, ही गोष्ट आपण सर्वप्रथम मान्य करून टाकू. असे असले तरीही आपल्या कलेची वा अभिव्यक्तीची खुमखुमी जिरविताना किंवा खाज भागविताना दुसऱ्या धर्माच्या, पंथाच्या किंवा समुदायाच्या भावनांवर आघात तर होत नाही ना, याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे, असे कोणासच वाटत नाही का? मग तो व्यंग्यचित्रकार असो, लेखक असो, कवी असो किंवा कोणत्याही प्रकारची कला सादर करणारा कलाकार असो...

‘शार्ली हेब्दो’ हे निधर्मी आणि डाव्या विचारसरणीचा कट्टर पुरस्कार करणारे व्यंग्यसाप्ताहिक आहे. कडव्या विचारसरणीवर रेषांचे फटकारे ओढणारे, सामाजिक-धार्मिक धारणेची व्यंग्यातून चिरफाड करणारे  निर्भीड साप्ताहिक ही ‘शार्ली हेब्दो’ची ओळख आहे. ‘आम्हाला कट्टरपंथीयांचे हसू येते. मुस्लिम असो, ज्यू किंवा कॅथलिक...धार्मिक असणे गैर नाही; पण कट्टर विचार आणि तशीच कृती आम्हाला मान्य नाही.’ हे त्या साप्ताहिकाचे ब्रीद होते. २००६मध्ये डेन्मार्कच्या जिलँड्स पोस्टेनचे प्रेषित महंमदावरील कार्टून शार्ली एब्दोने पुन्हा प्रसिद्ध केले होते. नोव्हेंबर, २०११मध्ये चेरिया एब्दो नावाने अंक काढून त्या अंकाचे पाहुणे संपादक म्हणून  प्रेषित महंमद यांचे नाव प्रकाशित केले. त्याच अंकात प्रेषिताचे कार्टूनही प्रसिद्ध केले होते. हत्याकांड घडवून आणल्यानंतर बाजारात आलेल्या नव्या अंकातही त्यांनी प्रेषित महंमद यांचे कार्टून प्रसिद्ध केले आहे.


आक्षेप याच गोष्टीला आहे. तुम्हाला जे काही लिहायचे आहे, व्यक्त व्हायचे ते व्हा. मात्र, दुसऱ्यांच्या भावनांवर आणि श्रद्धांवर आघात करण्याची परवानगी तुम्हाला कोणी दिली. जर इस्लाममध्ये मूर्तीपूजा मान्य नाही. मुस्लिमांना महंमद पैगंबर यांचे चित्र, व्यंग्यचित्र, मूर्ती किंवा कोणत्याही दृष्य स्वरुपातील रुप साकारणे मान्य नाही, तर त्या धर्माचा आणि त्या धर्माची उपासना करणाऱ्यांच्या श्रद्धेवर घाला घालण्याचा अधिकार कोणालाही नाही. अगदी तो कितीही मोठ्या ताकदीचा कलावंत असला तरीही नाही. दुसऱ्यांच्या श्रद्धा आणि देवदेवता हा टिंगलटवाळीचा, चेष्टेचा किंवा कुत्सितपणे थट्टा करण्याचा विषय कसा होऊ शकतो. मुस्लिमच नाही, तर कोणत्याही धर्माच्या, पंथाच्या किंवा मोठ्या समुदायाच्या श्रद्धेचा आदर करून जर अभिव्यक्त होता येत असेल तर अशा घटना घडणारच नाहीत. किंवा कमी प्रमाणात घडतील, असे मानायला हरकत नाही. 

त्यामुळे ‘शार्ली हेब्दो’च्या सर्व व्यंग्यचित्रकारांनी आपले मरण स्वतःहून ओढवून घेतलेले होते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आणि ज्यांनी स्वतःचे मरण किरकोळ आणि फालतू कारणासाठी ओढवून घेतले, त्यांच्यासाठी आख्ख्या जगाने शोक व्यक्त करायची गरज आहे असे वाटत नाही. पेशावरमध्ये दहशतवाद्यांनी कोवळ्या वयातील विद्यार्थ्यांचा जीव घेतला. ते सर्व मुस्लिमच होते. तरीही त्यांना निर्दयीपणे ठार मारले. भारतातल्या प्रत्येकाचा जीव त्या हत्याकांडामुळे हळहळला. बिचाऱ्या विद्यार्थ्यांचा अजिबात अपराध नसताना त्यांचा बळी गेला. इथे मात्र, व्यंग्यचित्रकारांच्या स्वतःच्या चुकीमुळे त्यांना प्राण गमवावे लागले. दहशतवाद्यांनी त्यांचा जीव घेतला, हे अगदी मान्य. त्याचा लाखो वेळा निषेध. मात्र, व्यंग्यचित्रकारांचे कृत्यच इस्लामी दहशतवाद्यांना उद्युक्त करणारे होते. त्यामुळे या संघर्षाकडे इस्लामी दहशतवादी आणि त्यांना आव्हान देणारे पश्चिमेकडील वा युरोपातील ख्रिश्चन धर्मीय अशा पद्धतीने का पाहू नये? हा हल्ला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि पत्रकारितेवरील हल्ल्यापेक्षाही मुस्लिम मूलतत्ववाद्यांना काहीही कारण नसताना डिवचल्यामुळे झालेला हल्ला आहे. मुद्दामून डिवचले नसते, तर कदाचित ही वेळच ओढविली नसती. मग स्वतःहून दुसऱ्याची खोडी काढणाऱ्याबद्दल इतका शोक आणि आक्रोश व्यक्त करण्याचे कारण काय? मला तरी हे पटत नाही.


आपल्याकडेही अशाच धर्तीवरचे एक बोलके उदाहरण आहे. एम. एफ. हुसेन हे भारतात जन्मलेले जागतिक किर्तीचे चित्रकार. अगदी आपल्या पंढरपुरात जन्मलेले कलावंत. आंतरराष्ट्रीय किर्तीचे चित्रकार ही त्यांची खरी ओळख. मात्र, त्यांची भारतीयांना असलेली त्यांची ओळख म्हणजे हिंदू देवदेवतांची आक्षेपार्ह नि नग्न छायाचित्रे काढणारे चित्रकार. अशी ओळख निर्माण होण्याचे कारण ते स्वतःच होते. त्यांनी हिंदू देवदेवतांची म्हणजे सरस्वती, हनुमान, राम-सीता वगैरे देवतांची नग्न आणि आक्षेपार्ह चित्रे काढली. भारतमातेचे नग्न चित्र काढून वाद निर्माण केला. मुद्दामून वाद निर्माण व्हावा, यासाठी तशी चित्रे काढली की त्यांच्यातील कलावंताला जसे स्फुरले तसे चित्र कॅनव्हासवर उतरत गेले, हा मुद्दा गौण वाटतो. 

चित्र म्हणून ही चित्रे कितीही जागतिक दर्जाची आणि अफलातून असली तरीही त्या चित्रांमुळे जर एखाद्या मोठ्या समुदायाच्या भावना दुखावल्या जाणार असतील, तर सर्वसामान्यांसाठी ती चित्रे कवडीमोल किंवा मातीमोल ठरतात. कलावंत म्हणून तो माणूस कितीही महान असला, तरीही त्याची समाजमान्यता आणि समाजातील लोकप्रियता शून्य असते. कुठेही गेले तरी त्यांना रोष आणि आंदोलनांचाच सामना करावा लागतो. जसा हुसेन यांना करावा लागला आणि आयुष्याचा शेवट भारताबाहेर करावा लागला. 


सुदैवाने त्यांनी फक्त हिंदू देवदेवतांचीच नग्न चित्रे चितारली. हिंदू समाज मुस्लिमांच्या तुलनेत बराच सहिष्णू आहे. त्यामुळे हुसेन यांच्या चित्रांचे प्रदर्शन उधळून लावण्याच्या घटना, जाळपोळ, हुसेन यांना धक्काबुक्की किंवा किरकोळ मारहाण एवढ्यावरच निभावले. त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला नाही.   हुसेन यांनी त्यांच्या चित्रांमधून मुस्लिम धर्माच्या श्रद्धास्थानाला धक्का लावला असता, तर कदाचित ‘शार्ली हेब्दो’च्या बाबतीत झालेली घटना हुसेन यांच्याबाबतही घडू शकली असती. मुस्लिम समाज सहिष्णू आहे किंवा असहिष्णू आहे, या वादात पडायचे नाही. मात्र, श्रद्धास्थानांवर हल्ला झाला किंवा इस्लामविरोधात कोणी बोलले किंवा लिहेले, तर ते कोणालाही सोडत नाहीत. सलमान रश्दी आणि तस्लिमा नसरीन यांची उदाहरणे पुरेशी बोलकी आहेत. तेव्हा हुसेन हे देखील ‘शार्ली हेब्दो’च्याच परंपरेतील होते, असे मानायला हरकत नाही. मुद्दाम एखाद्या समुदायाच्या श्रद्धास्थानांवर हल्ला करण्यात कसली आलीय निर्भिडता आणि कसले आलेय अभिव्यक्ती स्वातंत्र्य.

जाता जाता आठवलं म्हणून सांगतो. शीख पंथाचे लोक देखील तसे कर्मठ आणि कट्टर. भारताचे गृहमंत्रिपद भूषविलेल्या बुटासिंग यांना शीख पंथातून बहिष्कृत करण्याचे काम शीख गुरुद्वारा प्रबंधक कमिटीने (एसजीपीसी) केले होते. सुवर्णमंदिर परिसरात कारवाई करून अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आल्यानंतर सुवर्णमंदिराच्या डागडुजीचे काम केंद्र सरकारच्या वतीने करण्यात येत होते. अकाल तख्ताचा त्याला विरोध होता. हे काम करसेवेच्या माध्यमातून शीख समाजाच्या लोकांनी करावे, अशी त्यांची इच्छा होती. मात्र, सरकारने त्याला नकार दिला. त्यामुळे बुटासिंग आणि तत्कालीन राष्ट्रपती झैलसिंग यांच्यावर शीख समाज नाराज होता. त्यांना बहिष्कृत करण्यात आले. अखेर झैलसिंग यांनी माफी मागितली. मात्र, बुटासिंग यांनी माफी मागण्यास नकार दिला. त्यामुळे ते बहिष्कृतच राहिले. अखेर नंतरच्या काळात बुटासिंग यांनी माफी मागून गुरुद्वारात सेवा केल्यानंतर त्यांच्यावरील बहिष्कार मागे घेण्यात आला.

 
दुसरी उदाहरण अलिकडचे. अरुण जेटली यांच्या पराभवाचे… अमृतसर या अत्यंत सुरक्षित जागेवर अरुण जेटली यांना शीख पंथाच्या कट्टरपणामुळे हार पत्करावी लागली. आख्ख्या देशभरात मोदी लाट असताना अरुण जेटली थोड्या थोडक्या नव्हे लाखोंच्या फरकाने आपटले. कारण होते, अकाली दलाच्या मजिठिया नावाच्या मंत्र्याने ‘गुरुवाणी’मध्ये बदल करण्याचे महापाप करण्याचे. ‘निश्चय कर अपनी जीत करू’ ऐवजी ‘निश्चय कर अरुण जेटली की जीत करू’ असा बदल गुरुवाणीमध्ये केला आणि तशी पत्रके अमृतसरमध्ये घराघरात वाटली. त्यामुळे जेटली दणदणीत आपटले. तेव्हा आपल्या श्रद्धांवर आघात करणाऱ्यांना लोक धडा शिकविताच. प्रवृत्तीनुसार त्याचे स्वरुप बदलते. इतकेच.

आणखी एक म्हणजे सर्वश्रेष्ठ धर्म कोणता? याच प्रश्नावरून सध्याचे ‘धर्मयुद्ध’ पेटलेले आहे, असे मला वाटते. पश्चिम आशियात ‘श्रेष्ठ धर्म कोणता’ यावरूनच ‘इस्लाम वि. ज्यू’ आणि युरोपात ‘इस्लाम वि. ख्रिश्चन’ असा संघर्ष पेटलेला आहे. पॅलेस्टाइन विरुद्ध इस्रायल यामुळे इस्लाम आणि ज्यू संघर्षात ठिणगी पडली आहे. तर अमेरिकेने इराकवर दोनवेळा केलेले आक्रमण, सद्दाम हुसेन यांची घडवून आणलेली हत्या आणि अफगाणिस्तानमध्ये केलेली अनावश्यक लुडबूड यामुळे ख्रिश्चन आणि इस्लाम यांच्यात धर्मयुद्धाचा बॉम्ब पडला आहे. या मागील राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक अशी विविध गणितं कदाचित असतीलही. मात्र, सर्वसामान्यपणे दिसणारं एकमेव कारण हे ‘कोणता धर्म सर्वश्रेष्ठ’ या अहमहमिकेतून हा रक्तरंजित संघर्ष सुरू झाला आहे. 


‘शार्ली हेब्दो’ने येशू ख्रिस्त आणि ख्रिश्चन धर्मावरही व्यंग्यचित्राद्वारे आसूड ओढले होते, असे काही जण म्हणतील. मात्र, ख्रिश्चन समाज कोणतेही काम शांततेनेच करतो. म्हणजे सेवा नि शिक्षणाचे कामही शांतपणेच करतो, धर्मांतराचे कामही शांततेने करतो आणि निषेधही शांततामय मार्गांनीच करतो. ‘दा विन्सी कोड’ या पुस्तकाला तसेच चित्रपटालाही त्यांनी हिंसात्मक मार्गाने विरोध केल्याचे ऐकिवात नाही. ख्रिश्चन धर्मियांनी भारतातही ‘द सीन्स’ या ख्रिश्चन धर्मगुरुंवर ताशेरे ओढणाऱ्या चित्रपटालाही हिंसात्मक आंदोलन करून विरोध केला नव्हता. त्यामुळे ही मंडळी ‘शार्ली हेब्दो’च्या विरोधात काही करतील, असे वाटत नाही.

ज्यू धर्मावरही ‘शार्ली हेब्दो’ने आसूड ओढले होते. मात्र, ज्यू धर्मीय हे इस्रायलवर अधिक प्रेम करणारे आहेत. ज्यू धर्माचे गुरू किंवा धर्मप्रमुख वगैरे यांच्यापेक्षाही त्यांचा जीव इस्रायलमध्ये अधिक गुंतलेला आहे. इस्रायलवर हल्ला करणाऱ्यांचा ते मुडदा पाडतात. पॅलेस्टाइनला सर्व अरब देशांचे समर्थन आहे. मात्र, एकटा इस्रायल सर्वांना पुरून उरला आहे. नुसता उरला नाही, पॅलेस्टाइनच्या छाताडावर बसला आहे. तेव्हा प्रत्येक जण स्वभावानुसार विरोध, निषेध आणि प्रतिक्रिया व्यक्त करतो. 

प्रत्येक मुस्लीम हा पूर्णतः असहिष्णू नसला तरी मुस्लिम धर्मातील अनेक गट हे प्रचंड असहिष्णू आहेत. त्यांच्याकडे सहनशीलता अजिबात नाही. जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही मुस्लिमविरोधात काहीही झाले, तरी ही मंडळी आपापल्या देशात ‘इस्लाम खतरे में’ म्हणत एकत्र येतात. आसाममध्ये बांगलादेशी मुस्लिमांना ठार केल्यानंतर मुंबईत मुस्लिमांनी धुडगूस घातला. अमेरिकेने इराकवर आणि अफगाणिस्तानवर हल्ला केला म्हणून मुंबईत मोर्चे निघतात. ही त्याचीच उदाहरणे. त्यामुळे कोणी मान्य करो अथवा ना करो, मुस्लिम धर्मियांना तुम्ही जेवढे अधिक डिवचाल, तितके ते त्वेषाने पेटून उठतात आणि प्रतिक्रिया देतात. हा आजवरचा इतिहास आहे. तो इतिहास बदलणे बाप जन्मात शक्य नाही.


‘शार्ली हेब्दो’ नवा अंक बाजारात आला आहे. त्यावरही प्रेषित महंमद पैगंबर यांचे व्यंगचित्र रेखाटले आहे. त्याबाबत इजिप्तमधील एका सुन्नी संघटनेने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ती खूपच बोलकी आहे. ‘अल अझर’ या संघटनेचा पदाधिकारी म्हणतो,यापुढे आणखी व्यंगचित्रे छापण्यामुळे फक्त आणि फक्त द्वेषच वाढेल. फ्रान्समधील मुस्लिम संघटनांनी समाजबंधवांना शांत राहण्याचा आणि भावनिक प्रतिक्रिया देण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, फ्रान्समधील किंवा युरोपमधील मुस्लिम शांत राहिले, तरी पश्चिम आशियातील आणि आशियातील मुस्लिम शांत राहतील का? प्रतिक्रिया कुठे ना कुठे उमटतच राहील. कदाचित ती यापेक्षाही भयंकर आणि तीव्र असेल…

तेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आणि पत्रकारांच्या स्वातंत्र्याखाली उगाच मुस्लिमांना डिवचणे पहिल्यांदा थांबविले पाहिजे. विशेषतः युरोप आणि पश्चिम आशियात. हे कोणी ‘शार्ली हेब्दो’च्या वारसांना सांगणार आहे का? कारण असे डिवचण्यात कोणताही पुरुषार्थ नाही, ना पत्रकारितेचा कोणता मोठा धर्म तुम्ही निभावत आहात. तेव्हा उगाच मरणाला साद घालण्यात हशील नाही, हे वेळीच ओळखलेले बरे.

Sunday, January 04, 2015

पैशांची भाषा...

कोणत्याही भाषेपेक्षा प्रभावी भाषा...


दक्षिण भारतातील लोकांमध्ये भाषेविषयीचा स्वाभिमान अगदी ठासून भरलाय. म्हणजे प्रत्येक राज्याला आपल्या भाषेबद्दल जाज्वल्य अभिमान आहे. अतिजाज्वल्य अभिमान आहे. प्रत्येक नागरिक आपल्याच मातृभाषेमधून अधिकाधिक बोलण्याचा प्रयत्न करीत असतो. इंग्रजी आणि हिंदीला अजिबात धूप घालत नाही. एकवेळ इंग्रजी चालेल, पण हिंदी अजिबात नको, अशीच त्यांची मनोभूमिका असते. जेव्हा केव्हा  आपण दक्षिण भारतात जातो, तेव्हा तेव्हा अनेकदा आपल्याला याचा अनुभव कधी ना कधी आलेला असतो.

दक्षिण भारतातील भाषाभिमानाचा असाच काहीसा अनुभव मलाही आहे. थोडासा वाईट पण बराचसा चांगला. म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या कव्हरेजसाठी तमिळनाडूमध्ये गेलो होतो. तेव्हा तंजावूरला जाणं झालं होतं. तिथं एका इडली हाऊसमध्ये बसलो असताना समोर एक व्यक्ती येऊन बसली. पांढरी लुंगी, पिवळसर शर्ट आणि कपाळावर भस्म ओढलेली. अस्सल तमिळ. मला थोडी माहिती हवी होती, की एका ठिकाणचा पत्ता वगैरे हवा होता. त्याला मी आधी हिंदीत विचारलं. तो काहीच बोलला नाही. नंतर मग इंग्रजीतून विचारलं. त्यावेळीही तो काही बोलला नाही नि चक्क त्याचं केळीचं पान घेऊन दुसऱ्या टेबलवर जाऊन बसला. ही एकमेव अपवादात्मक घटना सोडली, तर दक्षिण भारतात कोणताही वाईट अनुभव मला नाही. लोक त्यांच्या परीनं हिंदीतून, इंग्रजीतून अथवा हातवारे करून खाणाखुणा करून आपल्याला मदत करण्याचा प्रयत्न करतात, असाच माझा अनुभव आहे. मध्यंतरी पुदुच्चेरीला (पाँडिचेरी) गेलो होतो. त्यावेळीही नेहमीपेक्षा थोडा वेगळा अनुभव आला. 

पहिला अनुभव एका रिक्षावाल्याचा. त्याचं नाव इब्राहिम. नुसतं इब्राहिम आडनाव वगैरे काही नाही. पहिला दिवशी भेटला, तो पुढचे दोन दिवस आमच्याबरोबरच राहिला. सातवी की आठवीच शिकलेला. आधी ट्रक ड्रायव्हर होता. त्यामुळं पश्चिम आशियातील एक-दोन देश आणि केरळ, मुंबई, हैदराबादसह बऱ्याच शहरांमध्ये फिरलेला. अर्थात, हिंदीचा पत्ता नव्हताच. पण इंग्रजी मात्र, तोडकं मोडकं येत होतं. त्यानं स्वतःहूनच आमच्याशी तोडक्या मोडक्या इंग्रजीतून संवाद साधला. कुठं जाणार? काय पाहणार? कसे जाणार? पुढचे दोन-तीन दिवस तुम्हाला रिक्षा लागेल का? इ.इ. आमचा सौदा पक्का झाला आणि मग काय पुढचे दोन दिवस तोच आमचा ड्रायव्हर कम गाइड बनला.


नाश्त्याला, जेवणाला कुठं काय चांगलं मिळतं? फिश कुठे चांगले मिळतात? आणखी काही पहायचं राहिलं आहे का? वगैरे गोष्टींचं मार्गदर्शन तो त्याच्या तोडक्या मोडक्या इंग्रजीतून करीत होता. वेट सर, नो प्रॉब्लेम, ‘यू गो आय स्टे’ यासह अनेक छोट्या छोट्या इंग्रजी शब्दांची जुळवणी त्यानं करून ठेवली होती. ऑटोचं भाडं किती झालं, ते पॅसेंजरला इंग्रजीमधून सांगण्याची कलाही त्यानं आत्मसात केली होती. म्हणजे सेव्हन्टी, एटी किंवा वन हर्ड्रेंड वगैरे आकडे त्याला तोंडपाठ होते. इंग्रजीतून संवाद साधल्यानंतरच त्याला कदाचित अधिक ग्राहक किंवा पॅसेंजर मिळत असावेत. 

दुसरा अनुभव चेन्नईतल्या तिरुवनमियूर एसटी स्टॅंडजवळच्या टी स्टॉलवरचा. इथली चहा करण्याची पद्धत मोठी गमतीशीर. कुठं पाणी तापविण्याच्या बंबामधून चहा दिला जातो. तर काही ठिकाणी चहा पावडर टाकलेली कापडी गाळणी एका भांड्यातल्या उकळत्या पाण्यात बुडवून ठेवलेली असते. त्यातला चहा आणि गरम दूध एकत्र करून चहा दिला जातो. दोन्ही चहाची चव एकदम मस्त. स्ट्राँग आणि तलफ भागविणारा. तर असा मस्त फक्कड चहा घेतल्यानंतर आम्हाला त्यानं पैसे सांगितले. आठ रुपयांना चहा मिळतो, हे आम्हाला माहिती होतं. म्हणजे सोळा रुपये झाले असणार, हे उघड होतं. तरीही आम्ही किती झाले, हे त्याला विचारत होतो. म्हणजे इंग्रजीतून किंवा हिंदीतून सांगतो का, पाहण्यासाठी. गल्ल्यावर बसलेल्या माणसाला हिंदी आणि इंग्रजीचा गंधही नव्हता. त्यामुळं तो तमिळमधूनच आकडा सांगत होता. मात्र, त्याच्या दुकानात वेटरचं काम करणाऱ्या एका तमिळच मुलानं ‘सोला रुपये बोल रहा है वो…’ असं दाक्षिणात्य टोनमध्ये सांगून आम्हाला मोकळं केलं.

तिसरा अनुभव यापेक्षाही भन्नाट. नटराजाचं मंदिर असलेल्या चिदंबरममध्ये गेलो होतो. खूप मोठ्या परिसरात अतिशय भव्य मंदिर. इतर देवदेवतांची छोटी-मोठी मंदिर. बारीक नक्षीकाम केलेले खांब आणि प्राचीन स्थापत्य शैलीचं दर्शन घडविणारं नटराज मंदिर. दुपारी एक ते चार मंदिर बंद असतं. तशी दक्षिणेतली बरीचशी मंदिरं दुपारी बंदच असतात. किमान तमिळनाडू आणि केरळमधली तरी. (लोक उगाच चितळेंना नावं ठेवतात.) तर नटराजाचं दर्शन घेण्यासाठी चिदंबरमला गेलो, तेव्हा एसटी स्टँडवर चहा घेतला. अर्थातच तिथेही चहाचे सोळा रुपयेच झाले. चहावाल्याला फक्त तमिळच येत होतं. ना इंग्रजी आणि हिंदीचा गंधही नाही. आम्हाला त्याच्याकडून आकडा माहिती करून घ्यायचा होता. पण त्याला सांगता येत नव्हता. अखेर त्यानं त्याच्या हातावर बोटानंच इंग्रजी सोळा आकडा काढून दाखविला आणि आम्ही त्याला पैसे देऊन निघालो.  

पुदुच्चेरी सरकारनं राज्यात २५ ते ३० ठिकाणी मिल्क पार्लर्स उघडली आहेत. (आणि मुख्य म्हणजे सुरू आहेत आणि प्रतिसादही उत्तम आहे.) फ्लेवर्ड मिल्क, गरम दूध, कॉफी, दही, ताक, लस्सी, मलई पेढा, आइस्क्रिम आणि बरेचसे दुग्धजन्य पदार्थ या ठिकाणी असतात. तिथं काम करणारा कृष्णमूर्तीही चांगल्या पद्धतीनं इंग्रजीतून संवाद साधणारा. मध्येच एखाद दुसरा हिंदी शब्दही हिंदीतून बोलणारा. दूध कुठनं येतं, सरकार दोन महिन्यांनी एका महिन्याचा पगार देतं, कोणत्या प्रॉडक्टला किती रिस्पॉन्स आहे, वगैरे अगदी उत्तम रितीनं सांगत होता. 

चेन्नई किंवा पुदुच्चेरीतील बसमध्येही तिकिटाचे किती रुपये द्यायचे हे कंडक्टर मंडळी गरज पडल्यास इंग्रजीमध्ये जरूर सांगायचे. पुढची बस कुठं मिळेल, स्टॉप कधी येईल किंवा स्टॉप आल्यानंतर उतरा वगैरे या गोष्टी ते इंग्रजीतून किंवा खुणेनं सांगायचे. चहा आणि मिरची नि केळ्याची भज्जी विकणारे ठेलेवाले, दुकानदार, इडली-वडे मिळणारे फूड जॉइंट्स आणि अनेक व्यावसायिक तुमच्याशी तुम्हाला समजेल अशा पद्धतीनं इंग्रजी आणि क्वचित प्रसंगी हिंदीतून संवाद साधू शकतात. गंमत सांगतो. मागे निवडणुकीच्या निमित्ताने गेलो असताना, एका रिक्षावाल्यानं ए. राजा आणि करुणानिधी हे कसे भ्रष्टाचारी आहेत, हे सांगताना हिंदीतून कचकचीत शिवी हासडून त्यांचा उद्धार केला होता. 

हे सोडा. ही झाली अगदी साध्या साध्या लोकांची आणि हातावर पोट असलेल्या लोकांची उदाहरणं. ‘नल्ली’ किंवा ‘पोथीज’ या हायफाय वस्त्रदालनांमध्ये गेल्यानंतर तिथले सेल्समन आणि सेल्सवूमन तमिळनाडूबाहेरील ग्राहकांशी हिंदीतूनही संवाद साधतात. म्हणजे तुम्ही जर एखादा प्रश्न हिंदीतून विचारला, तर ते त्यांच्या तोडक्या मोडक्या हिंदीतून का होईना पण तुमच्या प्रश्नाला योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करतात. 

मागं केरळमध्ये गेलो होतो, तेव्हाही डी बुक करताना रहीम नावाचा बहुभाषिक ड्रायव्हर आम्हाला मिळाला होता. तिथल्या प्रत्येक टूरिस्ट कंपनीमध्ये किमान तीन ते चार ड्रायव्हर्स हे इंग्रजीप्रमाणेच थोडंबहुत हिंदी बोलू शकणारे असतात. म्हणजे जर तुम्हाला इंग्रजीची अडचण असेल आणि त्याला फक्त मल्याळमच येत असेल, तर गडबड होऊ शकते. हा गोंधळ टाळण्यासाठी अनेक टूरिस्ट एजन्सीज जुजबी हिंदी येणारे ड्रायव्हर्सही आवर्जून नेमतात आणि तुम्हाला हवा असल्यास तसा पर्यायही उपलब्ध असतो. 

सर्व अनुभवांचा निष्कर्ष आपण काय काढू शकतो? दक्षिणेत विशेषतः केरळ किंवा तमिळनाडूमध्ये त्यांच्या मातृभाषेबद्दलचं प्रेम कमी होऊ लागलंय का? किंवा इंग्रजी-हिंदीमध्ये बोलण्याचं प्रमाण वाढलं आहे का? तर अजिबात नाही. असं अजिबात नाही. त्या लोकांचं मातृभाषेवरचं प्रेम तितकंच असून अभिमानही तितकाच जाज्वल्य आहे. निष्कर्ष इतकाच, की कोणत्याही भाषेपेक्षा पैशाची भाषा अधिक प्रभावी असते. पैसा मिळणार असेल, तर लोक चार नव्या् गोष्टी किंवा एखादी भाषा जुजबी प्रमाणात का होईना, पण जरूर आत्मसात करतात. चेन्नई आणि पुदुच्चेरीत फिरल्यानंतर अधिक व्यापक प्रमाणात आम्हाला त्याची अनुभूती आली. 

(पूर्वप्रसिद्धी, महाराष्ट्र टाइम्स ‘संवाद’ पुरवणी ४ जानेवारी २०१५.)