Tuesday, November 24, 2015

‘सोशल मीडिया’ पुरस्काराबद्दल

आपणा सर्वांचे शतशः धन्यवाद

राज्यात सत्ताबदल झाला. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारचं पानिपत झालं आणि भारतीय जनता पार्टी नि शिवसेना युतीचं सरकार सत्तेवर आलं. सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, सरकारी कर्मचारी, उद्योजक आणि इतर सर्वांसाठी नवे सरकार आल्यामुळं काय फरक पडला, बदल झाला माहिती नाही. पण एक महत्त्वपूर्ण बदल फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर जाणवला. मुख्यमंत्र्यापासून अनेक मंत्री ऑनलाईन आले. त्यांची फेसबुक पेज निर्माण झाली. ट्विटर अकाउंट सुरू झाली. छोट्या-मोठ्या गोष्टींची दखल सोशल नेटवर्किंग साइटवरून घेतली जाऊ लागली. कार्यक्रमांची नि उपक्रमांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी फेसबुक, ट्विटर नि व्हॉट्सअपचा उपयोग होऊ लागला. मुख्यमंत्र्यांनीही नुकतीच एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात ‘ब्लॉगलेखन’ करण्याची घोषणा केली आहे. 


अशा सगळ्या सोशल पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पत्रकारांना दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांमध्ये ‘सोशल मीडिया’साठी राज्यस्तरावर स्वतंत्र पुरस्कार जाहीर केला जाणार असल्याची घोषणा केली. म्हणजेच ऑनलाइन स्वरुपाच्या लेखनासाठी हा पुरस्कार होता. वृत्तपत्र आणि दूरचित्रवाणी या माध्यमांप्रमाणेच ऑनलाईन माध्यमांनाही राज्य सरकारने मानाचे स्थान देण्याचा निर्णय घेतला होता. सर्वप्रथम राज्य सरकारचे यासाठी अभिनंदन केले पाहिजे. जमाना बदलतोय आणि त्याचबरोबर पत्रकारिताही बदलते आहे, याची जाणीव राज्य सरकारला झाली आणि त्यांनी तसे दाखवून दिले, हे महत्त्वाचे.
सोशल मीडियावर लेखन करणाऱ्या पत्रकारांसाठी हा पुरस्कार होता. म्हणजे फेसबुकवरील लेखन, ब्लॉग लेखन किंवा कोणत्याही वृत्तपत्राच्या वेबसाईटवर लिहिल्या जाणाऱ्या ब्लॉगलेखनासाठी. ‘सोशल मीडिया’ या नव्या माध्यमासाठी दिला जाणारा पहिला पुरस्कार मला मिळाला, तो माझ्या http://ashishchandorkar.blogspot.in/ या ब्लॉगसाठी. ‘ऑनलाईन’ अशा उल्लेखामुळे अनेकांचा उगाचच असा गैरसमज झाला, की मी ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ऑनलाइन एडिशला शिफ्ट झालो की काय? अनेकांनी तशी विचारणाही केली. पण तसे नाही. मी पेपरमध्येच आहे आणि हा पुरस्कार आहे माझ्या ब्लॉगसाठी. मटा ऑनलाइनवरही माझा एक ब्लॉग आहे. पण हा पुरस्कार त्यासाठी नाही. 

http://ashishchandorkar.blogspot.in/ हा का सुरू केला, याची कहाणी खूपच मजेशीर आणि रंगतदार आहे. बुधवार, आठ नोव्हेंबर २००६ साली मी हा ब्लॉग सुरू केला. त्यावेळी मी ज्या संस्थेत होतो, तिथं कामाच्या असमान तासांमुळे खरं तर हा ब्लॉग सुरू झाला. म्हणजे काही उपसंपादकांना आठ तास ड्युटी आणि काही उपसंपादकांना सहा तास ड्युटी असा भेदाभेद होता. कंत्राटी उपसंपादक आणि परमनंट उपसंपादक असा भेद त्यावेळी होता. त्यामुळे ड्युटीमध्ये दोन तासांचा फरक होता. ‘तुम्ही ऑफिसला आठ तासच काम केले पाहिजे, पण ‘त्या’ दोन तासांमध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे वेगळे काम करू शकता,’ अशी सवलत तेव्हाच्या संपादकांनी दिली होती. त्यामुळे खरे आभार तेव्हाचे संपादक यमाजी बाळाजी मालकर यांचे मानायला हवेत. त्यांनी मोठ्या मनाने दिलेल्या सवलतीमुळेच  ब्लॉगलेखनाकडे वळण्याची संधी आम्हाला मिळाली. देविदास देशपांडे, विश्वनाथ गरुड, नंदकुमार वाघमारे आणि मी. आम्ही चौघांनीही ब्लॉगलेखन तेव्हाच सुरू केलं.


पण सर्वाधिक महत्त्वाचे आभार मानले पाहिजेत, आमचा दिलदार दोस्त देविदास प्रकाशराव देशपांडे याचे. तंत्रज्ञान, सोशल मीडिया, भाषेवरील प्रभुत्व, अवगत असलेल्या भाषा आणि अशा अनेक क्षेत्रांचे ज्ञान आणि माहिती त्याच्याकडे भरपूर असते. पण ते ज्ञान तो स्वतःपुरते मर्यादित ठेवत नाही. तर जवळपासच्या मित्रांना त्याबद्दल माहिती देत असतो. माहिती वाटत असतो, असंच म्हणा ना. त्यानंच मला खऱ्या अर्थानं ब्लॉगच्या विश्वात आणलं. ब्लॉग म्हणजे काय, तो कसा सुरू करायचा, त्यावर कसं लिहायचं, तो सजवायचा कसा, टेम्पेलट वगैरे वगैरे सर्व काही त्यानं सांगितलं. आजही त्याच्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे आणि आजही तो काहीही हातचं राखून ठेवत नाही. त्यामुळं खरं तर या पुरस्कारावर माझ्याइतकाच त्याचाही अधिकार आहे. त्यामुळे त्याला खूप खूप धन्यवाद.
ब्लॉगलेखन सुरू झाल्यानंतर सुरुवातीला ‘नव्याचे नऊ’ दिवस म्हणून सगळ्यांनी त्याकडे पाहिलं. मी इतकी वर्षे ब्लॉग लिहित राहीन, असं मला सुरुवातीला अजिबात वाटलं नव्हतं. पण अनेकदा पेपरात किंवा काम करीत असलेल्या माध्यमात तुम्हाला जे मांडायचं आहे, ते मांडणं शक्य नसतं. ते तुम्ही ब्लॉगवर मांडू शकता. काही गोष्टी संबंधित कंपनीच्या धोरणाविरुद्ध असतात, विचारांविरुद्ध असतात, समूहाच्या दृष्टीने अगदीच क्षुल्लक असतात किंवा ते वाचकांना आवडतीलच अशी खात्री नसते. असं सर्व लिखाण तुम्ही तुमच्या ब्लॉगवर करू शकता. वैयक्तिक आलेले अनुभव, वेगवेगळ्या घटनांवरची तुमची मतं असं काहीही तुम्ही ब्लॉगवर शेअर करू शकता. शिवाय या अमक्या विषयावर लिहायचं नाही, तमक्या विषयावर लिहिता येणार नाही, असला भानगड नाही. शिवाय कोणीही तुमचा ब्लॉग हटवू शकत नाही. यामुळे आज जवळपास नऊ वर्षे मी ब्लॉग लिहितो आहे आणि अजून तरी मला ब्लॉगवर लेखनाचा कंटाळा आलेला नाही. 

जवळपास सव्वा दोनशे ब्लॉग आतापर्यंत लिहिले असून दीड लाखांहून अधिक जणांनी हा ब्लॉग वाचलेला आहे. पण मला वाटतं की ब्लॉग संख्या किंवा वाचक संख्या यापेक्षाही ब्लॉगवर लिहिल्यानंतर तुम्हाला मिळणारा आनंद आणि वाचकांकडून मिळणारा प्रतिसाद या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. सुदैवाने दोन्ही गोष्टींबाबत मला प्रचंड समाधान आहे.


राजकारण, क्रीडा आणि अर्थातच, हिंडणं नि खाणंपिणं या गोष्टी आपल्या सर्वाधिक आवडीच्या. त्या संदर्भातील लिखाण ब्लॉगवर सर्वाधिक आहे. सुरुवातीच्या काळात वृत्तपत्रात छापून येणारे लेख अधिक सविस्तरपणे ब्लॉगवर येत होते. मात्र, तो ट्रेंड लवकरच बदलला. ‘साम मराठी’त गेल्यानंतर पेपरातलं लेखन थांबलंच. मग ब्लॉग लिहिण्याची फ्रिक्वेन्सी वाढली. त्यातून दोनवेळा निवडणुकीच्यानिमित्तानं महाराष्ट्रभर फिरता आलं. त्यातील अनुभव ब्लॉगवर टाकले. गुवाहाटी आणि केरळमधीलराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसंदर्भातील अनुभव ब्लॉगवर आहेत. तीनवेळा गुजरातमध्ये जाणं झालं. पहिल्यांदा ‘केसरी’साठी अभयजी कुलकर्णी यांच्यासोबत गेलो होतो. मात्र, नंतर दोनदागेलो, ते फक्त आणि फक्त ब्लॉगवर लिहिण्यासाठी. महाराष्ट्र टाइम्सकडून तमिळनाडूमधीलविधानसभा निवडणूक कव्हर करण्याची संधी मिळाली. त्या ठिकाणचे अनुभव व्यक्त करणारे ब्लॉगलिहिले. काही स्वतंत्रपणे आणि काही पेपरातील बातम्यांचे एक्स्टेंशन.


गेल्या वर्षी उत्तरप्रदेशात लोकसभेची निवडणूक कव्हर करण्यासाठी गेलो होतो. तिथे आलेले अनुभव ब्लॉगवर मांडले. त्याला तर भन्नाट प्रतिसाद मिळाला. उत्तर प्रदेशबद्दल असलेले माझ्या मनातले समज गैरसमज या दौऱ्यामुळे बऱ्याच प्रमाणात दूर झाले. प्रत्यक्षात नेमके काय घडले, याचा ‘फर्स्ट हँड’ अनुभव घेता आला. लखनऊ, रायबरेली, अमेठी, बाराबंकी, अयोध्या, सुलतानपूर, वाराणसीआणि आझमगड अशा विविध शहरांमध्ये जाऊन मनसोक्तफिरलो. अयोध्येला जाऊन ‘रामलल्ला’चं दर्शन घेतलं. सगळीकडे सामान्यातल्या सामान्याशी बोललो. तिथली अवस्था प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिली. नुसतं फिरून उपयोग काय? ते लोकांपर्यंत पोहोचलं तर पाहिजे. म्हणून मग आलेले अनुभव आणि तिथली परिस्थिती लोकांपर्यंत पोहोचविली. उत्तर प्रदेशातील ब्लॉगला तर प्रचंड म्हणजे प्रचंड प्रतिसाद मिळाला. तिथं जाण्याचं सार्थक झालं, असंच मला वाटलं. 


‘सोशल मीडिया’साठीचा पुरस्कार २०१४ मध्ये केलेल्या लेखनासाठी होता. योगायोगानं मी गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उत्तर प्रदेशात गेलोच होतो. तिथं आलेल्या भन्नाट अनुभवांचे ब्लॉग्ज मी स्पर्धेसाठी पाठविले होते. त्यापैकी ऐकूलाल या हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी आदर्श उदाहरण असलेल्या चहाविक्रेत्याचीघेतलेली भेट, मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे इंद्रेशकुमारजी यांच्यासमवेत ‘एक दिवस’ आणि उत्तर प्रदेशातील एकूण अनुभव, सामाजिक-राजकीय परिस्थिती, तिथले लोक, त्यांची दुःख मांडणारा‘उत्तर प्रदेश, उत्तम प्रदेश’ असे तीन ब्लॉग स्पर्धेसाठी पाठविले होते. उर्वरित सर्व ब्लॉगची यादी आणि ते प्रसिद्ध केले तेव्हाची तारीख, ठिकाण वगैरे माहिती सोबत जोडली होती. अशा पद्धतीने तयार केलेल्या माझ्या प्रवेशिकेला (किंवा अर्जाला) सोशल मीडियाचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला. हा ‘सोशल मीडिया’साठीचा पहिलाच पुरस्कार आहे. याचा आनंद अधिकच आहे. तेव्हा सर्व परीक्षकांचेही जाहीर हार्दिक आभार. 


‘आई’ गेली तेव्हा खूप काही लिहावसं वाटत होतं. पण इतक्या सविस्तरपणे कुठंही छापून येणं अवघड होतं. कारण मी कोणी मोठा नाही आणि माझी आईपण खूप प्रसिद्ध नव्हती. पण माझ्यासाठी ती सर्व काही होती. अशा वेळी मला ब्लॉगचा आधार होता. म्हणून आईवर ब्लॉग लिहिला. ‘आई्’ एक व्यक्ती नाही तर संस्था आहे. ती कुणाचीही असो, त्यानं फारसा फरक पडत नाही. आई या व्यक्तिमत्त्वात असलेले गुण हे बहुतांश प्रमाणात समानच असतात. त्यामुळे कोणीही आपल्या आईवर लेख लिहिला असता, तरी तो थोड्याबहुत प्रमाणात सारखाच होण्याची शक्यता अधिक. कदाचित यामुळेच आई गेल्यानंतर लिहिलेला ब्लॉग बऱ्याच लोकांना आवडला. अनेकांनी तसं सांगितलं. ‘तुमचा आईवरचा ब्लॉग उत्तम आहे,’ असं यमाजी मालकरसाहेब आणि संजय राऊतसाहेब यांनीही आवर्जून सांगितलं होतं. कोणता संपादक इतक्या खुल्या मनानं ज्युनिअर लोकांचं कौतुक करतो. अपवाद असतील. आहेतही. पण खूपच कमी. ‘शौकिन’ या पुण्यातील पानविक्रेत्याच्या दुकानाबाहेर एक जण भेटला. ‘तुम्ही आशिष चांदोरकर का?’ असं त्यानं विचारलं. मी त्याला ओळखत नव्हतो आणि नावही ओळखीचं नव्हतं. पण त्यानं मला ओळखलं होतं. ‘तुमचा आईवरचा ब्लॉग वाचला. खूप आवडला. डोळ्यातून पाणी आलं…’ कोणालाही आश्चर्याचा धक्का बसेल, अशी ही घटना. असे असंख्य वाचक ब्लॉगला मिळत गेले. काही जण कायमचे वाचक झाले. काही जण आवडीनुसार अधूनमधून भेटणारे वाचक ठरले. त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानायचे की ऋणातच राहणे पसंत करायचे, हा गोंधळ अजूनही मिटलेला नाही. पण अशा वाचकांमुळेच पुन्हा पुन्हा लिहिण्याची उमेद निर्माण झाली. त्यामुळे त्यांना धन्यवाद आहेतच.

सुरुवातीच्या काळात अनेकदा हा काय ब्लॉग तर लिहितो, कोण वाचतो हे ब्लॉग वगैरे सूरही उमटले. ‘तुम्ही मंडळी खूप लिहिता बुवा…’ असा नापसंतीचा सूरही उमटला. खरंतर अशा प्रतिक्रियाच ब्लॉग लेखन अधिक जोमाने करण्यासाठी उर्मी निर्माण करीत होत्या. त्यामुळे अशा एकदम पुणेरी प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्यांचेही आभार. पुढे पुढे तर ब्लॉग लेखनाचं व्यसन लागलं, असंच म्हणा ना. अगदी छोटे अनुभवही लिहिले. रस्त्यावरच्या एका फुगेविक्रेत्याला कॅडबरी दिल्याचा अनुभवअनेकांना आवडला. दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविला तेव्हा संभाजी ब्रिगेडला आणि बाबासाहेबपुरंदरे यांच्या ‘महाराष्ट्र भूषण’ला विरोध करणाऱ्यांना धू धू धुणारा ब्लॉग लिहिला. 

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपविरोधी भूमिका घेणाऱ्या नेत्यावर टीका करणारे ब्लॉग लिहिले. ब्राह्मण महासंघाला फटकाविणारा लेख लिहिला. राज ठाकरे यांच्यावर टीका करणारे ब्लॉग लिहिले. उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलही खूप काही लिहिलं. शिवसेना-भाजप युती टिकावी, अशी मांडणी करणारा ब्लॉग लिहिला. युती तुटल्यानंतर भाजपचं सरकार आल्यानंतर ‘नाही, नाही, नाही म्हणजे हो’ असा ब्लॉग हाणला. पुण्यातले आमचे सर विकास मठकरी यांच्याबद्दल लिहिलं. अमित जोशीला झालेल्या मारहाणीनंतर लिहिलं. चित्रपटांबद्दल, विशेषतः दाक्षिणात्या चित्रपटांबद्दल लिहिलं. 


‘चार्ली हेब्दो’वरझालेल्या हल्ल्यानंतर लिहिलेल्या ब्लॉगमध्ये माझी भूमिका जगाच्या विपरित होती. त्यावरलोकांनी विरोधी प्रतिक्रिया व्यक्त करून मला धुवून काढलंय. पण पोप फ्रान्सिस यांनी व्यक्त केलेली भूमिका आणि मी लिहिलेला ब्लॉग यामध्ये साम्य होतं. पोप यांची प्रतिक्रिया वाचल्यानंतर लोकांनी मला धुतलं त्याचं विशेष काही वाटलं नाही. ‘भाजीवाल्याचा झाला वडा’ अशा शीर्षकाखाली सहा-सात ब्लॉग लिहिले. कोणाशीही दुरान्वये संबंध नसूनही काही जणांना तो आपल्याबद्दलच लिहिला आहे की काय, असे वाटू लागले. त्यांचा त्या ब्लॉग्जचा प्रचंड राग आला, याचाच अर्थ ते सत्य होतं. सत्य कटू असतं हेच खरं. मात्र, त्यांच्या विनंतीचा मान राखला जावा आणि उगाच कटकटी वाढू नये, यासाठी ते ब्लॉग्ज ड्राफ्ट केले. लोकमान्यटिळक यांच्या नावाने पत्रकारितेसाठीचा जीवनगौरव पुरस्कार ज्यांना मिळालाय, त्या मुजफ्फरहुसेन यांना भेटल्यानंतर त्यांच्यावरही ब्लॉग लिहिलाय.  
थोडक्यात काय तर जे जे वाटलं ते ते लिहिलं. जसं वाटलं तसं लिहिलं. खाण्यापिण्यासबाबत आणि फिरण्यासंदर्भात लेखनासाठी वर्डप्रेसवर स्वादिष्ट या नावाने स्वतंत्र ब्लॉग सुरू केलाय. त्यावरही चार-पाच ब्लॉग लिहून झालेत. अजून पुष्कळ लिहायचेत. लवकरच तेही लिहून होतील. 

‘ब्लॉग’ला मिळालेला हा चौथा पुरस्कार आहे. पहिला पुरस्कार डॉ. अनिल फळे यांच्या संस्थेतर्फे दिला जाणारा चौथा स्तंभ पुरस्कार होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते मिळाला होता. नंतरचे दोन उ्त्तेजनार्थ पुरस्कार ‘स्टार माझा’ आणि ‘एबीपी माझा’ चॅनेलतर्फे मिळाले होते. आणि हा चौथा म्हणजे राज्य सरकारचा ‘सोशल मीडिया’साठीचा पहिला राज्यस्तरीय पुरस्कार.


पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अनेकांनी स्वतःहून फेसबुकवर माझ्याबद्दल बरंच काही लिहिलं. बऱ्याच जणांनी व्हॉट्सअप, फेसबुक, एसएमएस आणि फोन करून अभिनंदन केलं. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्या सर्वांचे हार्दिक आभार. मनःपूर्वक धन्यवाद. महाराष्ट्र टाइम्सच्या पुणे आवृत्तीचे संपादक पराग करंदीकर आणि मटातील माझा सहकारी मित्र धनंजय जाधव यांचेही या निमित्ताने मला आभार मानायचे आहेत. माझा बालपणीपासूनचा मित्र आणि भाजपचा पुणे शहर सरचिटणीस धीरज घाटे यानं प्रदीप कोल्हटकरच्या हस्ते केलेला सत्कार तर जबरदस्तच. खरं तर सत्काराआधीचा सत्कारलहानपणापासून ज्यांच्यासोबत वाढलो आणि शिकलो, त्यांच्याकडून होणारं कौतुक, मिळणाऱ्या शुभेच्छा माझ्यासाठी खूपच महत्त्वाच्या आहेत. आमचे बंधू शिरीष चांदोरकर यांनी पुरस्कार मिळाल्याचे जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी एकदम बढिया बासुंदी करून शुभेच्छा दिल्या. त्याच्यासारखी बासुंदी आलम दुनियेत क्वचितच कुणाला जमत असेल, हा आपला दावाय. इतकं सारं कौतुक होतंय, त्यामुळं खूपच भन्नाट वाटतंय.

जे मला चांगलं ओळखतात, त्यांनी माझ्या मनातली सल बरोबर ओळखली. ‘आज आई हवी होती…’ ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये खूप वर्षांपूर्वी आईवर एक अग्रलेख लिहिला होता. त्यात एक वाक्य खूप छान होतं. ‘एखादी वाईट गोष्ट करताना आपल्या मनात पहिल्यांदा विचार येतो, की आईला काय वाटेल आणि एखादी चांगली गोष्ट घडली, तर असं वाटतं, की कधी एकदा आईला सांगतोय.’ खूपच मस्त वाक्यय हे. आज आई नाही, पण ती असती तर तिला खूपच आनंद झाला असता. अर्थात, बाबांना आनंद आहेच. त्यांनाही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘गुणवंत कामगार’ पुरस्कार मिळाला होता. मलाही मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते पुरस्कार मिळणार असल्यानं त्यांना अधिक बरं वाटतंय.

माझ्यावर, माझ्या लेखनावर, ब्लॉगवर प्रेम करणाऱ्या आपणा सर्वांचे पुन्हा एकदा शतशः धन्यवाद…