Monday, January 11, 2016

संघशक्तीचा अपूर्व संगममहाराष्ट्रातही दिसली संघाची ताकद

आयुष्यात काही प्रसंग, घटना किंवा आंदोलने अशी असतात, की जे अनुभवण्याची संधी क्वचितच मिळते. वैयक्तिक आयुष्यातही आणि संघटनेच्या आयुष्यातही. अशा दुर्मिळ प्रसंगांचे जे साक्षीदार होतात, ते स्वतःला भाग्यवान समजतात. त्यासाठी तळजाईचे शिबिर किंवा रामजन्मभूमीचे आंदोलन अशी काही उदाहरणे देता येतील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या अपूर्व अशा शिवशक्ती संगमला अशाच कार्यक्रमांच्या पंक्तीत बसविले पाहिजे. केरळ, मेंगळुरू, कर्नाटकातील इतर शहरे, महाकोशल वगैरे प्रांतांमध्ये झालेल्या संघाच्या भव्य एकत्रीकरणांच्या बातम्या आपण नेहमीच वाचतो. त्यांच्या ध्वनिचित्रफिती पाहून आनंदी होतो. मात्र, महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे अतिभव्य एकत्रीकरण आपण का घेऊ शकत नाही, याची सल प्रत्येक स्वयंसेवकाच्या मनात होती. ती सल शिवशक्ती संगमच्या निमित्ताने दूर झाली आहे.

महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने संघाचे भव्यदिव्य शिबिर गेल्या काही दशकांमध्ये पार पडले नव्हते. प्रत्येक वेळी दाखला दिला जायचा तो १९८३ साली पार पडलेल्या तळजाईच्या शिबिराचा. त्यानंतर संघाचे अशा प्रकारे अतिविराट एकत्रीकरण महाराष्ट्रात झाले नव्हते. माजी सरसंघचालक माननीय राजेंद्रसिंहजी उर्फ रज्जूभय्या यांना मानवंदना देण्यासाठी २००० किंवा २००१ मध्ये मुंबईत शिवाजी पार्कवर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माटुंग्याहून संचलन करून शिवाजी पार्कवर पोहोचल्यानंतर तिथे सरसंघचालक प्रणाम आणि मा. रज्जूभैय्या यांचे बोलणे, असा कार्यक्रम होता. मात्र, संख्यात्मकदृष्ट्या तो कार्यक्रम तळजाईच्या शिबिराला मागे टाकू शकला नव्हता. मुंबई म्हणजे राज्याच्या एका टोकाला असलेले स्थान हा त्यामधील मुख्य अडसर ठरला असावा. त्यामुळेच यावेळी संघाने नव्या रचनेतील प्रांतशः एकत्रीकरण घेण्याचे ऩिश्चित केले असावे. मध्यंतरी मराठवाडा प्रांताचे एकत्रीकरण औरंगाबाद येथे पार पडले आणि आता पुण्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे शिवशक्ती संगम हे ‘न भूतो’ असे एकत्रीकरण मोठ्या दिमाखात संपन्न झाले.


नाशिक, नगर, पुणे महानगर, पुणे जिल्हा, सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमधून स्वयंसेवक संपूर्ण गणवेशात (दंड नाही) जांबे, नेरे आणि मारुंजी या तीन गावांच्या सीमांवर आय़ोजित करण्यात आलेल्या शिवशक्ती संगममध्ये सहभागी झाले. पश्चिम महाराष्ट्रातील जवळपास एक लाख साठ हजार स्वयंसेवकांनी या संगमसाठी नोंदणी केली होती नि त्यापैकी निम्म्याहून अधिक स्वसंयेवक गणवेशात उपस्थित राहिले. पन्नास ते साठ हजारहून अधिक नागरिक हा भव्यदिव्य सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ पाहण्यासाठी मारुंजी येथे आवर्जून आले होते. त्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांचाही समावेश होता.

भोजनासह सर्व व्यवस्था अत्यंत चोखपणे आणि ठरलेल्या नियोजनानुसार पार पडत होत्या. कुठे धक्काबुक्की नाही. चेंगराचेंगरी नाही. सारे काही शिस्तीत. हीच शिस्त कार्यक्रम संपल्यानंतरही अनुभवायला मिळत होती. कार्यक्रम संपल्यानंतरही कुठे महिलांच्या छेडछाडीच्या घटना घडल्या नाहीत. रस्त्यावरील दुकाने लुटल्याच्या बातम्या छापून आल्या नाहीत. अपघाताच्या घटना घडल्या नाहीत. दारू पिऊन धिंगाणा घातल्याचे वृत्त कानावर आले नाही. इतर राजकीय पक्ष (काही सन्मान्य अपवाद वगळता) आणि संघटनांच्या महाएकत्रीकरणानंतर जे जे ऐकायला मिळते, त्यापैकी कशाचाही अनुभव शिवशक्ती संगम संपल्यानंतर आला नाही. हे संघाचे आणखी एक वैशिष्ट्य.


कार्यक्रमाच्या मुख्य प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेला धनुष्यबाण अनेकांचे लक्ष वेधून घेत होता. भुवयाही उंचवायला लावत होता. मात्र, संघाचे संघटन हे हिंदूंचे आहे. हिंदुत्वाला मानणाऱ्यांचे आहे. हिंदुत्वाचा विचार करणारे कोणीही आम्हाला परके नाही. हाच संदेश देण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारावर धनुष्यबाणाची प्रतिकृती साकारण्यात आली होती. प्रभू श्रीरामचंद्रांचा हा धनुष्यबाण सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरला होता.

मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी उभारलेले भव्यदिव्य असे व्यासपीठ आणि अत्यंत शिस्तबद्धपणे करण्यात आलेली आखणी, चर्चेचा विषय ठरली होती. संघस्थानाच्या परिसरात शिवकालीन वातावरण निर्माण करण्यात आले होते. विविध किल्ल्यांमधील दिंडी दरवाजांच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या होत्या. तटबंदीचे स्वरुप देण्यात आले होते. छत्रपती शिवराय आणि त्यांच्या मावळ्यांचे पुतळे, हत्ती, आणि घोड्यांच्या प्रतिकृती शिवकालात घेऊन जात होत्या. महाराष्ट्रातील सामाजिक महापुरुषांची शिल्प साकारण्यात आली होती. कार्यक्रमाला येणारा प्रत्येक जण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले, महर्षि धोंडो केशव कर्वे, अण्णा भाऊ साठे, सयाजीराव गायकवाड, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू संत तुकाराम यांच्या पुतळ्यांपाशी आवर्जून थांबत होता. हात जोडत होता. अभिवादन करत होता.

तीन जानेवारीचा अनुभव ज्यांनी घेतला, त्यांना संघाच्या विराट रुपाचे दर्शन घडले. रविवारी सकाळी नऊ वाजल्यापासूनच स्वयंसेवकांचे जथ्थेच्या जथ्थे संघस्थानाच्या दिशेने येताना दिसत होते. अगदी दुपारी दोन-अडीच वाजेपर्यंत ‘जनांचा प्रवाहो’ मारुंजीमध्ये दाखल होत होता. त्यांच्यात उत्साह होता, आपण एका भव्यदिव्य कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी आलो आहोत, याचा आनंद चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. जगातील सर्वाधिक मोठ्या संघटनेचा आपण एक बिंदू आहोत, याचा स्वाभिमान त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होत होता. नोंदणी न झालेल्या पण शिवशक्ती संगमचा भाग होण्यासाठी उत्सुक असलेल्या स्वयंसेवकांसाठी ऐनवेळी नोंदणी करण्याची सवलत देण्यात आली होती. त्या ठिकाणीही लांबच लांब रांगा लागल्या होत्या. गणवेशाची पूर्तता करण्यासाठीही अनेकांची धावपळ सुरू होती.


आपल्या वडिलांचे बोट धरून आलेल्या छोट्या स्वयंसेवकांपासून ते शंभरी पार ज्येष्ठ स्वयंसेवकांपर्यंत अनेक जण खास शिवशक्ती संगमसाठी उपस्थित होते. एकाच कुटुंबातील आठ-दहा जण, एकाच घरातील चार पिढ्या अशीही दृष्ये बघायला मिळत होती. काही जणांनी खास शिवशक्ती संगमसाठी गणवेश पूर्ण केला होता. अनेकांनी प्रथमच संघाची अर्धी विजार चढविली होती. संघकामापासून काही वर्षे दूर गेलेले स्वयंसेवकही सारे काही विसरून या एकत्रीकरणासाठी उपस्थित होते. संघकामाचे एक वैशिष्ट्य आहे. एखादी व्यक्ती संघाच्या तत्कालीन अधिकाऱ्यांवर, संघाच्या भूमिका किंवा निर्णयांवर जरूर नाराज होते. काही काळ संघकामापासून दूर जाते. पण बहुतांश स्वयंसेवकांच्या मनात संघाबद्दल कटू भाव नसतात. त्यामुळे ते स्वयंसेवक या ना त्या निमित्ताने पुन्हा एकदा रचनेमध्ये फिट्ट बसतात. असेही काही स्वयंसेवक शिवशक्ती संगमच्या निमित्ताने पुन्हा एकदा नव्या उमेदीने कामासाठी सज्ज झालेले दिसले.

स्वयंसेवकांच्या आगमनापासून ते संघस्थानावर जाईपर्यंत सर्वच कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्धपणे आणि नियोजनाप्रमाणे सुरू होते. सिद्धता केंद्रांमध्ये नोंदणी करण्याचे काम असो किंवा भोजनाची रांग असो, सर्वच ठिकाणी संघाची शिस्त ठायीठायी दिसत होती. शिवशक्ती संगमच्या परिसरात लाख-सव्वा लाख स्वयंसेवक आहेत आणि तरीही सर्व कार्यक्रम शांतपणे सुरू आहे, हे त्रयस्थ माणसाला सांगितले असते, तर विश्वासही बसला नसता. इतकी शांतता आणि शिस्त सर्वत्र होती. अर्थात, संघाचा कार्यक्रम आहे, याचा अर्थ तो शिस्तबद्धपणे आणि वक्तशीरच होणार, यात नवीन ते काही नाही. त्याचाच प्रत्यय शिवशक्ती संगमच्या निमित्ताने आला इतकेच.


संघ ब्राह्मणांचा आहे, संघ उच्चवर्णीयांचा आहे, संघ शहरी लोकांचा आहे, संघ उच्चशिक्षितांचा आहे, संघ म्हाताऱ्यांचा आहे, अशी टीका संघावर अनेकदा होते. अशी टीका करणारी मंडळी जर मारुंजीमध्ये उपस्थित असती, तर त्यांची तोंडे कायमची बंद झाली असती. सर्व सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्तरातील स्वयंसेवक या एकत्रीकरणाला उपस्थित होते. संघाने जात-धर्म कधीच पाळला नाही, त्यामुळे कोणत्या जातीचे किती होते वगैरे चर्चा करण्यात काहीच हशील नाही. राहता राहिला प्रश्न वयाचा, तर शिवशक्ती संगमला जवळपास चाळीस टक्के संख्या ही तरुणांची होती. संघदृष्ट्या तरूण नव्हे तर लौकिक अर्थाने ज्यांना तरुण म्हणता येईल, असे तरूण. त्यामुळे संघावर होणाऱ्या सर्व आरोपांना शिवशक्ती संगमच्या माध्यमातून आपसूक उत्तर मिळाले.

संघावर होणार आणखी एक आरोप म्हणजे संघामधील महिलांचा सहभाग. राष्ट्र सेविका समिती आणि संघ परिवारातील विविध संघटनांशी संबंधित अशा हजारो महिला शिवशक्ती संगमच्या व्यवस्थेमध्ये सहभागी झाल्या होत्या. भगवे दुपट्टे परिधान केलेल्या शेकडो महिलांचे लोंढेच्या लोंढे सोपविलेल्या व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडण्यासाठी मारुंजी येथे येऊन धडकत होते. सिद्धता केंद्र वगळता सर्वच व्यवस्थांमध्ये महिलांचा सहभाग पहायला मिळत होता. शिवाय बाहेरगावाहून आलेल्या स्वयंसेवकांना परत जाताना शिदोरी देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. जवळपास अकरा लाख पुऱ्या जमा करण्याचा विश्वविक्रम या निमित्ताने नोंदला गेला. त्याची बहुतांश व्यवस्था ही महिलांनीच पार पाडल्यामुळेत त्यांच्या सहभागाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांचे सारे प्रश्न वासलात निघाले.

अनेकदा संघाच्या शाखांवर टीका होते. हे काय पाच-दहा स्वयंसेवक एकत्र येतात आणि एक तासानंतर आपापल्या घरी जातात. अशातून काय राष्ट्रकार्य साध्य होणार आहे, अशी टीका अनादि काळापासून सर्रास होताना दिसते. मात्र, शिवशक्तीच्या निमित्ताने संघाच्या स्वयंसेवकांचे जे विराट रुप समाजाला दिसले, त्यातून संघ स्वयंसेवकांमध्ये दुर्दम्य असा आत्मविश्वास निर्माण झालेला पहायला मिळाला. शाखेत जरी आम्ही दहा-पंधरा असलो, तरीही आमची संघटना लाखो-करोडो स्वयंसेवकांची आहे, हे स्वयंसेवकांना समजले. समाजातील कोणत्याही समस्येवर किंवा अडचणींवर संघशक्तीच्या जोरावर आपण लीलया मात करू शकतो, असा ठाम विश्वास स्वयंसेवकांमध्ये पहायला मिळाला. ज्या गावांत आतापर्यंत संघ किंवा संघाचे स्वयंसेवक पोहोचू शकले नव्हते, अशा सर्व ठिकाणांपर्यंत शिवशक्तीच्या निमित्ताने संपर्क झाला. काही नवीन कार्यकर्ते संघकामामध्ये आले. नवीन गावे जोडली गेली. त्यामुळे संघाचा हा कार्यक्रम घेण्यामागचा जो मूळ उद्देश होता, तो या निमित्ताने साध्य झाल्याचे दिसून आले. माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावरही शिवशक्तीच्या अपूर्व संगमाचे जोरदार पडघम वाजताना दिसले. अगदी परदेशी माध्यमे आणि वृत्तसंस्थांचे प्रतिनिधीही या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे वार्तांकन करण्यासाठी जातीने उपस्थित होते. भारतातील इंग्रजी, हिंदी आणि मराठी माध्यमांचे (प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक दोन्हीही) प्रतिनिधीही मारुंजी येथे हजर होते. अनेकांनी तर कार्यक्रमाचे आणि परमपूजनीय सरसंघचालकांचे भाषण लाइव्ह प्रसारित केले. दुसऱ्या दिवशीही सर्वच वृत्तपत्रांमध्ये कार्यक्रमाचे उत्तम वार्तांकन पहायला-वाचायला मिळाले. फेसबुक आणि ट्वीटरवर तर शिवशक्ती संगमचा ट्रेंड झालेला पहायला मिळाला. जो तो या अपूर्व संगमाची आठवण आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात किंवा कॅमेऱ्यामध्ये साठवून घेण्यासाठी धडपडत होता. ड्रोनच्या माध्यमातून होणारी फोटोग्राफी आणि शूटिंग, ड्रोनमधून होणारी पुष्पवृष्टी असे काही हटके प्रकारही या निमित्ताने अनुभवायला मिळाले.

शिवशक्ती संगममध्ये आलेला प्रत्येक जण ते वातावरण पाहून भारून गेला होता. असेच दोन अनुभव या निमित्ताने मला अनुभवता आले. पहिला अनुभव संघाच्या ज्येष्ठ प्रचारकांचा. शिवशक्ती संगमचे भव्य व्यासपीठ आणि इतर व्यवस्था पाहून या प्रचारकांची प्रतिक्रिया काय होती… ‘आज जरी मला देवाने बोलवून घेतले, तरी मी आनंदाने जायला तयार आहे. माझ्या आयुष्याचे सार्थक झाले, असे मी मानतो.’

संघाचे खूप जुने आणि निष्ठावंत स्वयंसेवक सु. ह. जोशी शिवशक्ती संगममध्ये भेटले. ‘अभूतपूर्व. डॉक्टरांनी लावलेल्या रोपट्याचे विशाल वृक्षामध्ये रुपांतर झाले आहे. आणि मी या क्षणांचा साक्षीदार आहे, हे मी माझे भाग्य समजतो. डॉक्टरांची पुण्याई, त्यांची दूरदृष्टी आणि संघाच्या स्वयंसेवकांची अपार मेहनत यांच्यामुळेच हे क्षण आज आपल्याला अनुभवायला मिळत आहेत.’ जवळपास प्रत्येक स्वयंसेवकांच्या मनातील भावनाच सुहंनी त्यावेळी व्यक्त केली.

शिवशक्तीच्या अपूर्व संगमाला आणखी एक किनार आहे. केरळ आणि कर्नाटकमध्ये यापूर्वी अशा पद्धतीचे कार्यक्रम अनेकदा झाले असतील आणि इतक्या वर्षांनंतर महाराष्ट्रात असे कार्यक्रम होत आहेत. वास्तविक पाहता, नागपूरनंतर संघाचे काम सर्वप्रथम पुण्यात सुरू झाले नि नंतर पश्चिम महाराष्ट्रात. मात्र, तरीही इतक्या वर्षांमध्ये अतिविराट कार्यक्रम घेणे संघाला जमले नव्हते. त्याची अनेक कारणे असतील. पण मला वाटते, की त्यापैकी महत्त्वाचे कारण म्हणजे गांधीहत्येनंतर संघकामाला बसलेला फटका. 


असे म्हणतात, की गांधीहत्येनंतर संघाचे काम पन्नास वर्षे मागे गेले. संघाचे काम करणाऱ्या अनेकांना त्याचा चटका बसला. संघाच्या स्वयंसेवकांची घरे जाळली, त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यात आला. हे हेतुपुरस्सर करण्यात आले होते. त्या चटक्यामुळे अनेक जण संघापासून आणि संघकामापासून दूर गेले. अनेकांनी संघाशी असलेले संबंध तोडले. त्यामुळेच संघाचे काम अनेक वर्षे मागे गेले. मात्र, अशाही परिस्थितीत संघविचारांवर निष्ठा ठेवून जी मंडळी, जे स्वयंसेवक संघकामात कार्यरत राहिले, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही ज्यांनी संघविचारांची पालखी खाली ठेवली नाही, अशा सर्वांच्या प्रयत्नांचे यश म्हणजे शिवशक्ती संगम आहे.

केंद्रात सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण खूप गाजले होते. त्यात मोदी म्हणाले होते, की हे माझे एकट्याचे यश नाही. भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचे हे यश आहे. इतकेच नाही, तर जनसंघ आणि भाजपला गावागावांत पोहोचविण्यासाठी ज्या चार-पाच पिढ्या खपल्या त्या सर्व पिढ्यांमुळे आपण हा दिवस पाहू शकतो आहोत. शिवशक्ती संमगच्या बाबतीतही तेच लागू आहे. शिवशक्ती संगमसाठी गेली दोन वर्षे झटणाऱ्या प्रत्येक स्वयंवसेकाचे आणि अधिकाऱ्यांचे हे यश आहे. त्याचप्रमाणे संघावर गांधीहत्येचा आरोप झाल्यानंतरही विचलित न होता संघकाम सुरूच ठेवणाऱ्या आणि आणीबाणीत महिन्मोमहिने तुरुंगात काढावे लागल्यानंतरही हसतमुखाने पुन्हा संघाच्या दैनंदिन कामात सहभागी झालेल्या स्वयंसेवकांचे हे यश आहे. राकट, कणखर आणि काळ्या पाषाणापासून बनलेल्या महाराष्ट्रात संघाची पाळेमुळे रुजविण्यासाठी धडपडणाऱ्या संघाच्या चार-पाच पिढ्यांमधील अधिकाऱ्यांचे, प्रचारकांचे आणि स्वयंसेवकांचे हे यश आहे.

१९४८ साली गांधी हत्येमुळे संघाला फटका बसला आणि संघाचे काम ५० वर्षे मागे गेले, असे जर मान्य केले. तर २०१५ साली पार पडलेल्या अपूर्व अशा शिवशक्ती संगममुळे संघाचे काम पुन्हा एकदा पूर्वपदावर आले आहे, असे म्हणायला हरकत नाही. आणि हेच शिवशक्ती संगमच्या आय़ोजनाचे यश आहे.


(विवेकच्या मंथन पेजवर प्रसिद्ध झालेला लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...)

कोण म्हणते संघ कामात महिलांचे योगदान नाही?


(काही छायाचित्रे मिलिंद वेर्लेकर यांच्या फेसबुक वॉलवरून साभाjर...)

Thursday, January 07, 2016

हस्तस्य भूषणं दानं


‘सोशल’ची रक्कम ‘सोशल’साठी

राज्य सरकारतर्फे दिला जाणारा ‘सोशल मीडिया’साठीचा पहिला पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे चहुबाजूंनी माझ्यावर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत होता. अनेकांनी फोन करून, एसएमएस पाठवून नि सोशल मीडियावर बरंच काही चांगलंचुंगलं लिहून माझं कौतुक केलं. असं बरंच काही सुरू असताना एक डिसेंबर रोजी मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर प्रत्यक्ष पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह आणि एक्केचाळीस हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 


बाबा आणि बहीण यांना व्यासपीठावर येण्याची संधी मिळाली, ही गोष्ट मला पुरस्कारा एवढीच महत्त्वाची वाटते. अन्यथा आमचे बाबा आणि बहीण कधी मुख्यमंत्र्यांना इतक्या जवळून पाहणार. जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी यांना कार्यक्रमाला उपस्थित राहता आले, या गोष्टीच माझ्यासाठी खूप काही होत्या. पुरस्काराच्या रकमेपेक्षा या गोष्टीच मला अधिक आनंद देणाऱ्या ठरल्या. 


आता हा जो ब्लॉग लिहितो आहे, तो मी त्याच दिवसासाठी लिहून ठेवला होता. कदाचित तिथं पुरस्कारार्थींचा प्रतिनिधी म्हणून बोलण्याची संधी मिळाली, असती तर हाच ब्लॉग मी काही बदल करून भाषण स्वरुपात वाचणार होतो. पण आधीच एका पत्रकाराला मनोगत व्यक्त करण्यासाठी सांगितल्यामुळं मला तिथं बोलण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे त्यावेळी लिहिलेले भाषण थोड्या प्रमाणात फेरफार करून ब्लॉग स्वरुपात मांडत आहे.

पुरस्कार मिळाल्यानंतर ४१ हजार रुपयांचे काय करणार, असा प्रश्न अनेकांनी विचारला होता. काहींनी सल्लेही दिले होते. अर्थातच, गमतीगमतीत. वास्तविक पाहता, यंदाच्या वर्षी पुरस्कार मिळणे आणि त्याच्या अनुषंगाने काही रक्कम मिळणे ही गोष्ट किती दिलासादायक आणि महत्त्वाची आहे, हे मला ओळखणारे जाणतातच. मात्र, तरीही पहिल्यापासूनच माझा निर्णय हा मिळालेली रक्कम चांगल्या कामासाठी मदत म्हणून देण्याचाच होता.


पुरस्कारासाठी जेव्हा अर्ज केला होता, तेव्हाच मी ही गोष्ट निश्चित केली होती. यदा कदाचित पुरस्कार मिळालाच तर त्यातील काही रक्कम दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या ‘जलयुक्त शिवार’ या योजनेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सन्मानाने सुपूर्त करावयाची. पुरस्कारासाठी जेव्हा अर्ज केला, तेव्हा मराठवाड्यासह महाराष्ट्राच्या अनेक भागात भीषण परिस्थिती निर्माण होणार, अशीच चिन्हे होती. मध्यंतरीच्या मराठवाड्याच्या एक-दोन जिल्ह्यात थोडा पाऊस झाला असला, तरीही परिस्थिती बदललेली नाही. अजूनही दुष्काळाची भीती आहेच. त्यामुळे अजूनही तिथे मदतीचा हात हवाच आहे.

काही गोष्टी आपसूक घडत जातात, असे म्हणतात. दररोज सकाळी व्हॉट्सअपवर ढिगाने मेसेज येत असतात. सूर्य, नवा दिवस, प्रेरणा आणि असं बरंच काही. बहुतांश मेसेज तद्दन फालतू याच कॅटॅगरीतील असतात. अनेकदा ते मेसेज न पाहताच डिलीट होतात. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर दोन-तीन दिवसांनीच व्हॉट्सअपवर अशाच स्वरुपाचा एक मेसेज आला. विशेष म्हणजे तो कशाबद्दल आहे, हे माहिती नसूनही माझ्याकडून तो मेसेज नेमका पाहिला गेला. तो मेसेज अमेरिकेतील एक ख्रिश्चन धर्मगुरु आणि लेखक मार्क बॅटरसन यांचा होता. त्या मेसेजमध्ये म्हटले होते, ‘When God Blesses you Financially, Don’t Raise your Standard of Living. Raise ur Standard of Giving.’ काही घटना परिस्थितीला पूरक अशा स्वरुपाच्या आपोआप घडतात, असं मी म्हटलं ते असं. 

दोन दिवस जात नाहीत, तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक शरदभाऊ खाडिलकर चहापानासाठी घरी आले होते. सध्या त्यांच्याकडे जनकल्याण समितीची जबाबदारी आहे. मराठवाड्यातील परिस्थिती कशी आहे, या अनुषंगाने त्यांच्याशी चर्चा सुरू होती. त्यावेळी त्यांनी काही देणगीदारांचे किस्से ऐकविले आणि चांगले-वाईट अनुभवही सांगितले. बोलण्याच्या ओघात एका संस्कृत सुभाषिताचा उल्लेख त्यांनी केला. 

हस्तस्य भूषणं दानं सत्यं कण्ठस्य भूषणम्
श्रोत्रस्य भूषणं शास्त्रं भूषणैः किं प्रयोजनम्
 
अर्थात, हाताचे भूषण हे दान आहे. सत्य हे कंठाचे आभूषण आहे. शास्त्र किंवा ज्ञान हे कानांचे भूषण आहे… अशी सर्व आभूषणे असताना मग इतर आभूषणांची गरजच काय… 

मिळालेल्या पुरस्काराचा मान ठेवण्यासाठी काही रक्कम ठेवायची आणि बाकी बहुतांश रक्कम मदत म्हणून देऊन टाकायची, हा माझा निर्णय आधीच ठरला होता. मात्र, या दोन घटनांमुळे तो अधिक पक्का झाला. मग काय फक्त निर्णयाची अंमलबजावणीच बाकी होती. 


सामाजिक कर्तव्य म्हणून आपल्याला मिळालेल्या पुरस्काराच्या रकमेपैकी काही रक्कम ही दुष्काळग्रस्त नागरिकांसाठी देण्याचे मी ठरविले होते आणि सात जानेवारी २०१६ रोजी ती रक्कम मी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेल्या जलयुक्त शिवार या योजनेसाठी मदत म्हणून देऊन टाकली. आमचे चुलत बंधू शिरीष चांदोरकर आणि पुण्याचे पालकमंत्री गिरीषजी बापट हे यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक सुमीतजी वानखेडे यांनी केलेल्या मदतीसाठी मी त्यांचा आभारी आहे. देवेंद्र फडणवीस तसेच मुख्यमंत्री  यांचे फेसबुक पेज, ट्विटर हँडल आणि त्यांचा ई-मेल या सर्वांवर संपर्क साधूनही प्रतिसाद मिळेना. अखेर सुमीतजी वानखेडे धावून आले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घालून दिली. त्यामुळेच त्यांचे खूप खूप आभार.

‘जलयुक्त शिवार’ या प्रकल्पाप्रमाणेच काही रक्कम मी पुण्यातील सामाजिक संस्था असलेल्या स्वरुपवर्धिनीला दिली आहे. गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीतील ढोल-ताशा पथक असलेली संस्था ही स्वरुपवर्धिनीची माझ्यासाठीची अगदी पहिली ओळख. अर्थात, ती अपुरी असल्याचे नंतरच्या काळात समजले. आमचे मित्र आणि पत्रकारितेच्या अभ्यासक्रमातील सहअध्यायी संजय तांबट यांच्यामुळे स्वरुपवर्धिनीच्या उपक्रमांची सविस्तर माहिती मिळत गेली आणि तेथील अपडेट्स समजत गेल्या. ज्ञानेश पुरंदरे यांच्याकडूनही नियमितपणे येणारे ई-मेलही वर्धिनीच्या नित्यनूतन उपक्रमांबद्दल माहिती देत असतात. 


स्वरुपवर्धिनी ही संस्था सेवावस्ती किंवा झोपडपट्टीमधील गरीब विद्यार्थ्यांना सुशिक्षित आणि सुसंस्कृत करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून झटते आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये अडचण येऊ नये, पैशांमुळे शिक्षण अडू नये, या हेतूने त्यांना मदत करण्याचा निर्णय मी घेतला आणि सिद्धीस नेला. स्वरुपवर्धिनीच्या सहकार्यवाह श्रीमती पुष्पाताई नडे यांच्याकडे मदतीचा धनादेश सुपूर्त केला. आमचे मित्र संजय विष्णू तांबट हे छायाचित्र टिपण्यात व्यस्त होते, त्यामुळे ते छायाचित्रात आले नाहीत. ‘सोशल मीडिया’ या क्षेत्रात केलेल्या पत्रकारितेसाठी मला हा पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळेच त्या पुरस्काराची रक्कम ‘सोशल’ कामांसाठीच वापरले जाणे, हे अधिक योग्य आहे, असे मला वाटते. त्यामुळेच पुरस्काराची बहुतांश रक्कम या दोन्ही उपक्रमांसाठी दिली आहे.
पुरस्कार मिळाल्यानंतर ज्यांनी ज्यांनी मला आणखी पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिले, कौतुकाचा वर्षाव केला, त्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार.