Sunday, December 26, 2010

टिळक, सावरकर, मंगेशकर, तेंडुलकर

ब्राह्मण समाजाचे नामोनिशाण मिटवा

पुण्याच्या लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविण्यास दिल्याबद्दल पुणे महानगरपालिकेचे अभिनंदन. आता ठाणे महानगरपालिकेनेही दादोजी कोंडदेव स्टेडियमचे नाव बदलून संभाजी ब्रिगेड आणि तत्सम संघटनांपुढे मान तुकवावी, अशी आशा आहे. वास्तविकतः दादोजी कोंडदेव हे ब्राह्मण होते आणि त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून ब्राह्मण इतिहासकारांनीच रंगविले, असा आक्शेप घेत संभाजी ब्रिगेड आणि त्यांच्या सहकारी संघटना थयथयाट करीत आहेत. पण हा विषय फक्त दादोजी कोंडदेव यांच्यापुरताच मर्यादित आहे का, तर नाही. हा विषय त्याही पुढे जाऊन ब्राह्मणविरोधाला जाऊन भिडतो.

ब्राह्मणवैरामुळेच समर्थ रामदासांना विरोध, वासुदेव बळवंत फडके पहिले क्रांतिकारक नव्हते तर उमाजी नाईक होते, लोकमान्य टिळकांनी नव्हे तर महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिवजयंतीला सुरवात केली, अफझलखानाकडे कुलकर्णी आडनावाचा कोणी माणूस चाकरीस होता, या गोष्टी वारंवार पुढे आणून ब्राह्मण समाजावर आसूड ओढण्याचा प्रयत्न होतो आहे. पुस्तके लिहून नवा इतिहास बिंबविण्याचा प्रयत्न केला जातो आहे. सेतुमाधव पगडी, बाबासाहेब पुरंदरे आणि निनाद बेडेकर हे ब्राह्मण असल्यामुळेच त्यांच्यावर टीकेची झोड उठविली जात आहे, हे आता ओपन सिक्रेट आहे. अर्थात, १९४८ पासून (गांधी हत्येनंतर) ब्राह्मण समाज अशा प्रकारची टीका, निंदा सहन करत आला आहे. त्यामुळे हे नवीन आहे, असे वाटण्याचे काहीच कारण नाही. सत्तेतही त्यांचेच राजे (जाणते असूनही अजाणतेपणाचा बुरखा घेऊन वावरणारे) असल्यामुळे संभाजी ब्रिगेडला आयती संधी आहे. असो.

पण या निमित्ताने मला गेल्या काही दिवसांपासून मांडायचं होतं ते मांडण्याची संधी मिळाली आहे. सर्वप्रथम ब्रिगेडने जी मोहिम उघडली आहे ती स्तुत्य, कौतुकास्पद आणि अभिनंदनीय आहे. पण ब्रिगेडने त्यांचे हे ब्राह्मणवैर इथेच थांबवू नये, अशी माझी मागणी आहे. त्यामध्ये ब्रिगेड आणि त्यांच्या सहकारी संघटना यशस्वी झाल्या तरच त्या कौतुकास पात्र आहेत.

पहिले म्हणजे ज्याप्रमाणे ब्रिगेडने दादोजी कोंडदेव यांचे नामोनिषाण इतिहासातून मिटविण्याचा प्रयत्न चालविला आहे, त्याचप्रमाणे त्यांनी संत ज्ञानेश्वर आणि समर्थ रामदास यांचेही नाव पुसण्यासाठी लढा उभारावा. संतमहंतांची जात काढण्याचे काहीच कारण नाही. तसे करणे चूकही आहे. पण फक्त ब्राह्मणवैरच ज्यांच्या नसानसांत भरले आहे, त्यांच्यासाठी हे काही चुकीचे ठरु नये. त्यामुळे ज्ञानेश्वर आणि रामदास यांचे नाव इतिहासातून, शालेय अभ्यासातून वगळावे, यासाठी पुढील आंदोनल असावे. कारण हे दोघेही ब्राह्मणच होते. तेव्हा आषाढी एकादशीला संत तुकोबारायांच्या पालखीबरोबर ज्ञानेश्वर महाजारांच्या पालखीऐवजी नामदेव, चोखामेळा किंवा तत्सम अब्राह्मण संतांची पालखी काढण्याची मागणी ब्रिगेडने करावी. श्री ज्ञानेश्वर तुकाराम ऐवजी श्री नामदेव तुकाराम असाही बदला त्यांना करता येईल.

छत्रपती शिवरायांचे कार्य आणि स्वराज्याचा भगवा ज्यांनी अटकेपार (पाकिस्तानमध्ये अटक नावाचे शहर आहे.) फडकाविला त्या राघोबादादांचे आणि समस्त पेशव्यांचे नामोनिषाण ब्रिगेडने मिटवून टाकावे. शनिवारवाडा पाडण्याचा कट काही बहुजन संस्थानी रचलेला आहेच. तशी आंदोलनेही होत असतात. त्यामुळे ब्राह्मण समाजालाच नव्हे तर समस्त हिंदुस्थानला अभिमानास्पद वाटणारा शनिवारवाडा जमीनदोस्त करुन तथाकथिक ब्राह्मणी वर्चस्वाला तडा देऊन टाकावा.

आणखी थोडे पुढे जाऊन झाशीच्या राणीच्या संघर्षाचा लढा इतिहासाच्या पुस्तकातून वगळण्यास सांगावे. झाशीच्या राणीचे माहेरचे आडनाव तांबे होते. तांबे म्हणजे ब्राह्मण. (कऱ्हाडे ब्राह्मण) महिला असूनही जिने पुरुषांना लाजवेल, असा संघर्ष केला त्या लढवय्या रणरागिणीचे नाव इतिहासात आहे कारण ब्राह्मण इतिहासकारांनीच तसे चित्र रंगविले आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई खरोखरच रणरागिणी होती की नाही, हे ब्रिगेडच्या इतिहासकारांनी शोधून काढले पाहिजे. झाशीच्या राणीचे नाव इतिहासाच्या पुस्तकातून काढून टाकले पाहिजे. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर चौकातील तिचा पुतळा आणि झाशी या गावी जर पुतळा असेल तर तिथूनही पुतळे काढून टाकले पाहिजेत.

संभाजी ब्रिगेडने थोडे त्याच्याही पुढे जायला हवे. पहिले क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धातील लढवय्ये मंगल पांडे आणि तात्या टोपे, तेल्यातांबोळ्यांचे नेते म्हणून ओळखले जाणारे लोकमान्य टिळक, सुधारणावादी विचारांचे गोपाळ गणेश आगरकर, तत्वशील विचारवंत महादेव गोविंद रानडे, क्रांतिकारकांचे मेरुमणी स्वातंत्र्यवीर विनायम दामोदर सावरकर, चापेकर बंधू, भगतसिंग आणि सुखदेव यांच्या जोडीने फासावर जाणारे राजगुरु, इंग्रजांशी मुकाबला करताना धारातीर्थी पडलेले रामप्रसाद बिस्मील आणि चंद्रशेखर आझाद, अनंत कान्हेरे, महात्मा गांधीजींचे गुरु गोपाळकृष्ण गोखले, विधवा पुनर्विवाह आणि स्त्री शिक्शणात दैदीप्यमान कामगिरी करणारे महर्षि धोंडो केशव कर्वे, हिंदुस्थानचे राष्ट्रगीत लिहिणारे रवींद्रनाथ टागोर आणि वंदे मातरम् चे जनक बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचे इतिहासातील योगदान पुसून टाकले पाहिजे.

स्वातंत्र्योत्तर काळातील हिंदुस्थानचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु, केरळचे मार्क्सवादी नेते ईएमएस नंबुद्रीपाद, श्रीपाद अमृत डांगे, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील अग्रणी प्रल्हाद केशव अत्रे आणि एस एम जोशी, भूदान चळवळ उभारणारे विनोबा भावे, सुप्रसिद्ध समाजसेवक बाबा आमटे, इन्फोसिस या जगप्रसिद्ध कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती, पहिला हिंदुस्थानी अंतराळवीर राकेश शर्मा, क्रिकेटपटू सुनील गावस्कर, सौरभ गांगुली, राहुल द्रविड, दिलीप वेंगसरकर, अजित वाडेकर, वेंकटराघवन, चंद्रशेखऱ, प्रसन्ना, व्हीव्हीएस लक्श्मण, अनिल कुंबळे, जवागल श्रीनाथ आणि डॉन ब्रॅडमनलाही ज्याने वेड लावले तो सर्वांचा लाडका हिरो सचिन तेंडुलकर, जागतिक विजेतेपदाला वारंवार गवसणी घालणारा हिंदुस्थानचा अव्वल बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद, हिंदुस्थानची गानकोकिळा लता मंगेशकर, पंडित भीमसेन जोशी, माधुरी दीक्शित... ही यादी हजारो लाखोंपर्यंत वाढत जाईल. या सर्वांचे नामोनिषाण इतिहासाच्या पानापानातून मिटविण्याचे मोठे आव्हान संभाजी ब्रिगेडपुढे असणार आहे. कारण ही मंडळीही दुर्दैवाने ब्राह्मणच आहेत.

ही मंडळी आज त्यांच्या त्यांच्या क्शेत्रात अव्वलस्थानी आहेत. ती ब्राह्मण असल्यामुळेच त्या स्थानी आहेत किंवा ब्राह्मण म्हणून जन्माला आल्यामुळे त्यांना ते स्थान सहजासहजी मिळाले आहे, असे जो म्हणेल त्याला बावळटच म्हटले पाहिजे. ही मंडळी कष्ट, परिश्रम आणि अथक मेहनत घेऊन त्या-त्या स्थानी पोहोचली आहेत किंवा प्रसिद्धीच्या झोतात आली आहेत. फक्त ब्राह्मण आहेत म्हणून त्यांना प्रत्येक ठिकाणी केकवॉक मिळालेला नाही किंवा कोणी मुद्दामून मदतही केलेली नाही. सध्याच्या जागतिकीकरणाच्या युगात स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर वा परिश्रमांच्या जोरावर जर कोणी पुढे गेला असेल किंवा जात असेल, तर त्याची जात आडवी येत नाही. तसेच फक्त जातीच्या जोरावर कोणीही पुढे जाऊ शकत नाही, हे मान्य केलेच पाहिजे. किंवा तेच सत्य आहे. जे ही बाब मान्य करणार नाहीत, त्यांना भविष्य नाही हे मुद्दामून सांगण्याची गरज नाही.

सांगण्याचा मुद्दा असा की, काम केल्याशिवाय किंवा चमक दाखविल्याशिवाय फक्त ब्राह्मण आहे म्हणून कोणीही पुढे येत नाही, कोणालाही नाव मिळत नाही. जे शिकेल तो टिकेल, असे सध्याचे युग आहे. इतरांच्या दुर्दैवाने ब्राह्मण समाजाने शिक्शणाची कास सोडलेली नाही. त्यामुळे दादोजी कोंडदेवांपासून ते लतादीदींपर्यंत कोणत्याही ब्राह्मण व्यक्तीची कारकिर्द इतिहासातून पुसून टाकण्याचा प्रयत्न झाला तरी त्यामुळे कोणालाही फरक पडणार नाही. ब्राह्मण समाजाला तर मुळीच नाही. आणखी पुढे जाऊन म्हणायचे झाले तर, इतिहासातून जरी नावे पुसली गेली ती समाजमनावरुन नक्कीच पुसता येणार नाही. म्हणूनच म्हणतो की, हिंदुस्थानच्या इतिहासात खारीचा वाटा उचललेल्या प्रत्येक ब्राह्मण व्यक्तीचे नाव पुसून टाकले पाहिजे. दादोजींपासून सुरुवात झाली आहे ती सचिन तेंडुलकरपर्यंत येऊन थांबावी, हीच अपेक्शा आहे.

हार्दिक शुभेच्छा...

Wednesday, December 22, 2010

चवीची परंपरा जपताना...

पेशवाई थाट आणि बादशाही ताट

चांदीच्या ताटात आणि पेशवाई थाटात... अशी जाहिरात करणारं श्रेयस आणि पुण्यातील हजारो-लाखो जणांना (विशेषतः विद्यार्थ्यांना) जगविणारं बादशाही. पुण्यातील या दोन खूप लोकप्रिय आणि तितक्याच जुन्या ठिकाणी जेवण्याचा योग आला. यापूर्वीही दोन्ही ठिकाणी अनेकदा जेवलेलो असल्यामुळे तिथल्या जेवणाची खासियत, चव आणि स्टाईल माहित होती. पण गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये दोन्हीकडे जेवणं झालं नव्हतं. त्यामुळं जेवण कसं असेल, याची प्रचंड उत्सुकता लागून राहिली होती. एका ठिकाणी ती पूर्ण झाली तर दुसरीकडे मात्र, भलतीच निराशा उदरी (पदरी नव्हे) पडली.


सर्वप्रथम श्रेयस. आपटे रस्त्यावर असलेलं हे हॉटेल अगदी सुरुवातीपासून मराठी पद्धतीचा डायनिंग हॉल म्हणून प्रसिद्ध आहे. अस्सल मराठमोळं (ब्राह्मणी म्हटल्यास अधिक योग्य) जेवण ही इथली खासियत. अगदी वीक डेला सुद्धा इथं वेटिंग लिस्ट असते. रविवारची तर गोष्टच विचारु नका. (आम्ही रविवारीच गेलो होतो. शिवाय दहा-बारा जण होतो. त्यामुळं भलतंच थांबावं लागलं.) तर असं हे प्रचंड लोकप्रिय श्रेयस. प्रचंड लोकप्रियता, आपटे रोडवर असलेलं लोकेशन आणि वर्षानुवर्षांची चव यामुळे साहजिकच इथला रेट प्रचंड प्रचंड प्रचंड आहे. एका थाळीसाठी (स्वीटसह) तब्बल दोनशे रुपये मोजावे लागतात इथे. तरीपण लोक दोनशे रुपये मोजतात आणि आत्मा तृप्त करतात. जेवणाची चवच इतकी अफलातून आहे की, हातावर पाणी घेताना साहजिकच शब्द बाहेर पडतात दोनशे रुपये वसूल.

आम्ही गेलो होतो तेव्हा सणासुदीला असतो तसा मेन्यू होता. किंवा पूर्वीच्या लग्नांमध्ये असायचा तसा मेन्यू. आळूची भाजी, बटाट्याची सुकी भाजी, बिरड्याची उसळ (सोललेल्या वालाची), पुऱ्या, गोल भजी, पापड, चटणी, कोशिंबीर, थालिपीठ आणि सरते शेवटी सोलकढी किंवा ताक. आणखी दोन-चार पदार्थ असतीलही. पण मला आत्ता आठवत नाही. पण हे जे काही होतं ते इतकं टेस्टी होतं की बस्स.


आळूची भाजी जशी हवी अगजी तशी. चवीला आंबट-गोड. जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही. शिवाय त्यात शेंगदाणे, खोबरं इइ. ऐवज अगदी मुबलक प्रमाणात घातलेला. बटाट्याची भाजीही थोडी झणझणीत. मिरचीच्या ठेच्याचा अगदी योग्य प्रमाणात वापर. सजावटीला खोबरं आणि कोथिंबीरही. बिरड्याची उसळही तोडीस तोड. खोबऱ्याच्या वाटणाचा उपयोग चव वाढविणारा. त्यांच्या सोबतीला गोल भजी, थालिपीठ आणि बटाटा वडा होताच. अधून मधून ताकाची फेरीही होत होती. जेवणाची सुरुवात वरण भाताने, नंतर मसाले भात, नंतर पुऱ्या आणि अगदी शेवटी हवा असेल तर दहीभात किंवा पुन्हा साधा भात. अशा पद्धतीनं जेवणावर लोक तुटून पडत होते. जेवण सुरु असतानाच मध्ये स्वीट काय हवं, अशी विचारणा झाली. मग कोणी गुलाबजाम, कोणी श्रीखंड, कोणी पुरणपोळी मागविली. अशा स्वर्गसुख देणाऱ्या जेवणामुळे सर्वांचे आत्मे तृप्त झाले.

खरं तर सोलकढी या जेवणामध्ये मिसफिट. पण मासे खाल्ल्यानंतरच सोलकढी प्यायली पाहिजे, असा काही नियम नाही. त्यामुळे श्रेयसमधील त्या जेवणानंतरही मी सोलकढी प्यायली. सोलकढीही एखाद्या मालवणी हॉटेलवाल्याच्या तोंडात मारेल अशी. त्यामुळे सोलकढीने कळस चढविला, असं म्हणायला हरकत नाही. तुडुंब जेवण झाल्यानंतर श्रेयसवाल्यांनी पानाची सोय पण ठेवली होती. पण पानपट्टीच्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी मिळणारं पान कसं असतं, याचा पुरेपूर अनुभव असल्याने मी पान मात्र खाल्लं नाही. थोडक्यात काय तर चांदीच्या ताटात अन् पेशवाई थाटात... अशी जाहिरात करणाऱ्या श्रेयसने त्यांची चव आणि परंपरा शब्दशः जपली आहे. चांदीचं ताट नसलं तरी थाट मात्र, पेशवाई होता, हे सांगायला नकोच. त्यामुळं अन्नदात्याचं भलं हो... असं म्हणत आम्ही श्रेयसमधून बाहेर पडलो.

थो़ड्याच दिवसांनी टिळक रोडवरील बादशाहीत जाण्याची वेळ आली. बादशाही म्हणजे परगावातून पुण्यात नोकरी किंवा शिकण्यासाठी पुण्यात आलेल्या लोकांचे अन्नदाता, जुन्या काळातील प्रचंड लोकप्रिय खाणावळ आणि अजूनही जुन्या पुणेकर मंडळींच्या ‍जिव्हाळ्याचा विषय. चर्चेचा विषय. दोन-अडीच वर्षांपूर्वी एकदा मित्रांबरोबर बादशाहीत गेलो होतो. त्यानंतर मुंबईला असल्यामुळं तिथं जाणं व्हायचं नाही. पण एका रविवारी बाहेर जायची वेळ आली, म्हणून मोठ्या उत्साहानं बादशाहीत गेलो.


पण उदरी प्रचंड निराशा पडली. बादशाही हे नुसतं नावात बादशाही नव्हतं. तर चवीतही बादशाही होतं. तिथल्या वाट्या आणि वाढण्याची पद्धत कधीच बादशाही नसली तरी त्याचं दुःख कधीच नसायचं. कारण तिथं अगदी घरच्यासारखं चविष्ट जेवण मिळत होतं. त्यामुळं बाकी सगळं माफ होतं. पण आता परिस्थिती बदलल्यासारखी वाटली. बादशाहीपण फक्त नावातच उरलं असल्याचं जाणवलं. वाट्यांचा आकार व वाढण्याची पद्धत पूर्वीसारखीच होती. त्यात शाहीपणा असण्याचा प्रश्नच नव्हता. पण चवीत मात्र, कमालीची घसरण झाल्याचं अगदी पहिल्या घासाला जाणवलं आणि प्रत्येक घासागणिक ही घसरण वाढतच गेली.


मुळात पांढरा भात आणि वरणाला सुट्टी. फक्त मसाले भात. तिथंच डोकं सटकलं. पोळ्या होत्या पण त्या गव्हाच्या होत्या की, मैद्याच्या ते कळत नव्हतं. गरम होत्या मऊही होत्या. पण मैदा जाणवत होता. आज पांढरा भात नाही. रविवार असल्यामुळे फक्त मसाले भात असं उत्तर मिळाल्यावर गिळा, असं मनातल्या मनात म्हणण्याखेरीज काहीच नव्हतं. बटाट्याच्या भाजीत ना तिखट ना मीठ. स्वीट म्हणून असलेले गुलाबजाम हे खेळण्यातील गोट्यांच्या आकाराचे. (तेही पाकात न मुरलेले). चटणीचा पत्ताच नाही. चटणीच्या ऐवजी फरसाण पानात आलं होतं. आता बादशाहीच्या ताटात फरसाण हे क्रांतिकारक असलं तरी ते संपूर्ण जेवणात मिसफिट होतं आणि काहीतरी पाहिजे म्हणून असल्यासारखं होतं. संपूर्ण जेवणात आळूची भाजीच चांगली होती. म्हणजे चवीला उत्कृष्ट होती. त्यानंतर नंबर होता तो काकडीच्या कोशिंबीरीचा. अर्थात, कोशिंबीर करण्याला फार अक्कल लागत नाही. तसंच कोशिंबीर खायला कोणी हॉटेलात जात नाही. त्यामुळे कोशिंबीर चांगली होती, याचं कौतुक असण्याचं कारण नाही.

असो. अन्न हे पूर्णब्रह्म असं मानून कोणतीच तक्रार न करता जेवलो. पोट भरलं पण तृप्त मात्र, झालो नाही. जेवल्यानंतर माझी प्रतिक्रिया मालकांना सांगण्याचा प्रश्नच नव्हता. कारण त्यांच्याकडे जेवणासाठी लोक वेटिंगवर होते. त्यामुळे माझ्या मताला त्यांच्या लेखी फारशी किंमत नसावी, असा विचार करुन मी बाहेर पडलो. आणखी एक-दोन जणांशी बोलताना सहज बादशाहीचा विषय निघाला आणि त्यांनीही माझ्यासारखीच प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यामुळेच हा ब्लॉग लिहावासा वाटला आणि लिहिला. चवीतला बादशाहीपणा असा सहजासहजी सोडू नये, अशीच माझी अपेक्शा आहे आणि पुढच्या वेळी जेव्हा जाईन तेव्हा पुन्हा एकदा नव्याने ब्लॉग लिहावासा वाटेल, अशी जेवणाची चव असावी, अशीच इच्छाही आहे.

पुण्यातील खवय्यांनी या दोन्ही ठिकाणचा आस्वाद घेतलेलाच असेल. त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया ब्लॉगवर जरुर नोंदवाव्यात. ही विनंती.

Sunday, December 19, 2010

नशीब सामनात कॉस्ट कटिंग नव्हतं...

कॉस्ट कटिंग हा शब्द अनेक संस्थांमध्ये (फक्त वृत्तपत्र नव्हे...) सगळ्यांत जास्त लोकप्रिय शब्द आहे. जागतिक मंदीच्या काळात तर या शब्दाला खूप महत्व प्राप्त झालं होतं. अनेकांचे अनेक अनुभव असतात. तसेच माझेही काही अनुभव आहेत. त्यामुळेच मला म्हणावसं वाटतं की, नशीब सामनामध्ये कॉस्ट कटिंग नव्हतं.

१) कॉस्ट कटिंगच्या नावाखाली (किंवा परफॉर्मन्स नाही, असे कारण देऊन) सामनातून एकाही व्यक्तीला काढून टाकण्यात आलेले नाही. हा मुद्दा मला सर्वाधिक लक्षवेधी वाटतो. अर्थातच, हे संजय राऊत साहेबांचे वैशिष्ट्य म्हटले पाहिजे. काही वर्षांपूर्वी यांत्रिक पद्धतीने कामाची सुरवात झाल्यानंतरही कामगारांना काढून न टाकता, त्यांना नवे काम शिकण्याची संधी देण्यात आली. ती मंडळी अजूनही सामनामध्ये आहेत आणि यथायोग्य पद्धतीने काम करीत आहेत. जागतिक आर्थिक मंदी असतानाही सामनात माणुसकीचे कॉस्ट कटिंग कधीच झाले नाही.

२) जागतिक मंदी आली म्हणून कॉस्ट कटिंगच्या नावाखाली ऑफिसातले एसी बंद करण्यात आले नाहीत. एसीच्या ऐवजी मंगल कार्यालयात लावतात तसे घों घों करणारे मोठ्ठाले पंखे ऑफिसात लावण्यात आले नाहीत. शिवाय बंद ऑफिसमध्ये एसीची काहीच गरज नाही, हे सांगण्यासाठी लेक्चर्सही देण्यात आली नाहीत. कर्मचा-यांच्या सोयीसुविधांचे कॉस्ट कटिंग तर अजिबात नाही.

३) कॉस्ट कटिंगच्या नावाखाली ऑफिसातील निम्मे ट्यूब लाईट आणि निम्मे दिवे काढून टाकण्याचे (न लावण्याचे नव्हे) फर्मान साहेबांनी काढले नाही. विजेची बचत म्हणून दिवे न लावणे समजण्यासारखे आहे. पण बचत म्हणून दहापैकी फक्त चारच दिवे लावायचे आणि उरलेले सहा दिवे काढून टाकायचे, असले दळभद्री प्रकार सामनात अनुभवयास मिळाले नाहीत.

४) सामनात दररोज तीन-चार वेळा महाराज चहा घेऊन येतो. (राजेश शहा, विद्याधर चिंदरकरसाहेब आणि अनेक जण त्याला जहर म्हणून हिणवतात.) या चहाचे बिल कंपनी अदा करते. पण जागतिक मंदीचे कारण पुढे करत सामनाने चहा बंद केला नाही. दोन रुपयाचा चहा दिला म्हणून कोणी मोठा होत नाही आणि तेथे काम करणा-यांनाही दोन रुपयाच्या चहाने स्वर्गसुख मिळत नाही. पण द्यायची दानत लागते, हेच महत्वाचे. थोडक्यात काय तर प्रभादेवीत द्यायच्या वृत्तीचेही कॉस्ट कटिंग झाले नाही.

५) एखादी घटना एन्जॉय करण्याचा आनंद वेगळाच असतो. पण अशा एन्जॉयमेंटलाही कॉस्ट कटिंगचे कारण देऊन फाटा दिला जातो. मग एखाद्या गोष्टीच्या लॉन्चिंगची पार्टीही सामोसा आणि वेफर्सवर भागविली जाते. एखाद्या हॉटेलात जेवण देणंही कंपनीला परवडत नाही आणि कारण दिलं जातं, आपण असं करत नाही. पण सामनात असली फालतुचं कॉस्ट कटिंग नव्हतं. राऊत साहेबांना खासदारकीचं तिकिट मिळणं असो किंवा उद्धव साहेबांची मिटिंग असो, सगळं कसं एकदम जोरात. आनंद आणि मौजमजेचे कॉस्ट कटिंग मला प्रभादेवीत कधीच आढळले नाही. इतकंच काय तर क्वचित प्रसंगी रात्री मुक्काम करण्याची वेळ आली तर घरी जाण्यासाठी किंवा जेवणासाठी लागणारे पैसे देतानाही, कंपनीचा कधीच हात आखडता झाला नाही. शिवाय मांसाहारी जेवणाचं बिल मिळणार नाही, अशी भंपक कारणंही अकांऊट्स डिपार्टमेंट पुढं करायची नाहीत.

६) कंपनीत घेताना एक पगार सांगायचा, पत्र देताना वेगळीच फिगर दाखवायची आणि प्रत्यक्ष हातात येणारा पगार भलताच, अशी फसवाफसवी करुन बचत करण्याची वृत्ती मला सामनात अनुभवायला मिळाली नाही. राऊत साहेबांनी शब्द दिला म्हणजे दिला. त्याच्या अलिकडे नाही आणि पलिकडेही नाही. इथे वचननामा पाळला जातो, असंच म्हटलं पाहिजे. कामगारांच्या पगारातून कॉस्ट कटिंग करुन जागतिक मंदीला पळवून लावण्याचा बनाव करण्याचं धोरण सामनात नाही. त्यामुळंच इथं येणारा माणूस पगार मिळाल्यानंतरही खूष होऊन काम करतो. हातात पगार पडल्यानंतर डोळे फिरण्याची वेळ कामगारांवर येत नाही. समाधानाच्या बाबतीत तर कॉस्ट कटिंगमधला क पण इथं सापडत नाही.

७) सामना म्हणजे हास्यविनोदांची पंढरी. स्वतः राऊत साहेब विनोद करुन स्वतः हास्यकल्लोळात बुडून जायचे. समोरच्याची विकेट कधी काढायचे कळायचं देखील नाही. उगाचच चेह-यावर गांभीर्याचा मुखवटा चढवून जड मुद्रेनं वावरायचं, हे सामनाच्या स्वभावातच बसत नाही. शिवाय पाच डेसिबलपेक्षा कमी आवाजातच हसायचं वगैरे बंधनही नाही. त्यामुळे विनोदी वृत्ती आणि हसण्याखिदळण्याचं कॉस्ट कटिंग कधीच अनुभवलं नाही.

८) असं असतानाही सामनात मात्र, काही गोष्टींचं कॉस्ट कटिंग नक्कीच होतं. उगाचच आपण जागतिक स्तरावरचे अग्रगण्य आहोत, अशा थाटात वावरायचं आणि पगार तसेच सेवासुविधा गल्लीतल्या पेपरसारख्या पुरवायच्या, अशा कद्रू वृत्तीचं मात्र कॉस्ट कटिंग सामनात नक्कीच होतं. मिटिंगांचं कॉस्ट कटिंग होतं. रिपोर्टांचं कॉस्ट कटिंग होतं. इंटरनेटवरच्या वापरावर असलेल्या बंधनांचं कॉस्ट कटिंग होतं. पत्रकारांच्या कल्पना आणि स्वातंत्र्यावर असलेल्या परंपरेच्या बोज्याचं कॉस्ट कटिंग होतं.

गेल्या अनेक दिवसांपासून सामनातील कॉस्ट कटिंगवर लिहायचं होतं. पण आज वेळ मिळाला आणि ब्लॉग उतरला. आता या विषयाचं थोडंसं कॉस्ट कटिंग करुन पुन्हा एकदा खाद्यजत्रेला सुरुवात करावीशी वाटते आहे. गोव्याची ट्रीप, कोल्हापूरचा दावणगिरी लोणी डोसा, पेशवाई थाटाचं श्रेयस आणि `बाद`शाही इइ अनेक विषयांवर लिहायचं आहे. जसा वेळ मिळत जाईल तसं तसं लिहीत जाईन.

(शेवटी तुम्ही सगळीकडे नोकरीच करणार. कामगार तो कामगार तो कितीही बदलला तरी त्याची झेप वर्तुळाबाहेर जात नाही.आणि वर्तुळाला काही केंद्रबिंदू सापडत नाही, अशा निनावी कॉमेंट्सना मी फार महत्व देत नाही. त्यामुळे अशा लोकांनी नावाने कॉमेंट्स टाकण्याची हिंमत दाखवावी. अन्यथा वेळेचा आणि शब्दांचा अपव्यय टाळणेच इष्ट. धन्यवाद. )