Wednesday, March 21, 2012

कुछ मिठा हो जाए...

जंगली महाराज रस्त्यावर आलेला एक खूप छोटा पण काळजाला भिडणारा अनुभव... वास्तविक पाहता, असे अनेक छोटे छोटे अनुभव आपल्याला रोजच्या जीवनात येत असतात. पण अनेकदा ते आपल्या नजरेतून निसटतात आणि नजरेतून निसटले नाहीत, तरी आठवणींच्या कप्प्यातून हळूहळू नाहीसे होतात. हा अनुभवही काहीसा तशाच पद्धतीचा...


दोन-चार दिवसांपूर्वीची घटना. योगेश ब्रह्मे आणि वनबंधू बिंदूमाधव वैशंपायन या दोन मित्रांबरोबर जंगली महाराज रस्त्यावर एका हॉटेलमध्ये गेलो होतो. चायनीज खायचं असल्यानं ते दोघे चायना गेट या हॉटेलमध्ये गेले होते. माझं जेवण झालं होतं त्यामुळं नंतर मी दोघांना जॉईन झालो. वेगवेगळ्या विषयांवर गप्पा टप्पा करीत जेवण वगैरे आटोपलं. कदाचित आम्हीच त्यांच्याकडचे अखेरचे ग्राहक होतो. साधारण इतका उशीर झाला होता.

झालेल्या बिलाचे पैसे दिल्यानंतर वेटरनं उरलेले पेसे आणि एक पाच रुपयांची डेरी मिल्क कॅडबरी आणून दिली. कदाचित त्याच्याकडे पाच रुपये सुटे नसावेत किंवा टोल नाक्यावर ज्या पद्धतीने तुमच्या गळ्यात चॉकलेट वगैरे मारतात, तसा ट्रेंड आता हॉटेलवाल्यांनीही आत्मसात केला असावा. कारण काहीही असो पण त्यानं उगाचच आमच्या गळ्यात ती कॅडबरी मारली होती. काय टोल नाक्यावर जाऊन आला का, असा अकारण हिणकस शेरा मराठीतून मारत आम्ही टेबलावरून उठलो. (वास्तविक पाहता, तिथली बरीच मंडळी दार्जिलिंगची आहेत. त्यामुळं आम्ही काय म्हणालो, हे त्यांना घंटा कळलं नसणार. पण तरीही मताची पिंक टाकण्याची प्रवृत्ती थोडीच थांबणार आहे.)

ब्रह्मे महाशयांनी ती कॅडबरी वरच्या खिशात ठेवली होती. आम्ही चायना गेट समोरच्या फूटपाथवर दोन-पाच मिनिटं गप्पा मारत थांबलो होतो. तेवढ्यात तिथं एक छोटा मुलगा आला. छोटा म्हणजे आठ-दहा वर्षांचा असावा. त्याच्या एका हातात फुगे होते आणि कडेवर त्याच्यापेक्षा छोटीशी बहिणी होती. तीन ते चार वर्षांची असावी. फुगे विकणारी अशी अनेक मुलं फर्ग्युसन आणि जंगली महाराज रस्त्यावर दिसत असतात. फुगे विकायचे (विकले गेले नाहीतर गळ्यात मारायचे) हा त्यांचा उद्योग. गेल्या अनेक वर्षांपासून ही मुलं आणि त्यांचे आई-वडील रस्त्यांवरून फिरताना दिसतात. त्यामुळं त्यांच्याबद्दल कधीच फारसं काही वाटत नाही.


‘साहब कुछ दे दो ना... कुछ दे दो ना...’ अशी विनवणी तो करीत होता. वास्तविक पाहता, अशा लोकांची मला विलक्षण चीड येते. त्या दोघांचीही अवस्था फार वेगळी नसावी. पण नुकतंच पोटभर जेवण झालेलं असल्यामुळं म्हणा किंवा त्याच्या कडेवर बसलेल्या बहिणीकडे पाहून असेल म्हणा, आम्ही त्याला काहीच बोललो नाही. आम्ही काहीही देत किंवा बोलत नाही, हे पाहूनही त्या मुलानं पैसे मागणं सोडलं नाही. अखेरीस योगेशनं त्याच्या खिशातली कॅडबरी त्या मुलाच्या हातात दिली. कॅडबरी मिळताच, तो मुलगा खूपच सुखावला. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी त्या अंधारातही दिसत होता. तो मुलगा दोन पावलं देखील पुढं गेला नसेल, त्यानं ती कॅडबरी अगदी सहजपणे त्याच्या त्या लहानगया बहिणीच्या हातात देऊन टाकली आणि त्या बहिणीनंही आपल्या भावानं दिलेली ती भेट हसत हसत स्वीकारली.

क्षणभर मनात विचार आला, मानवी भावना या किती सारख्या असतात ना. लहान भावा किंवा बहिणीबरोबर आपल्याकडे असलेल्या छोट्यातल्या छोट्या गोष्टीचं किंवा खाऊचं शेअरिंग करणं, ही गोष्ट किती समान आहे, असाच विचार काहीवेळ मनात घोळत होता. तो मुलगा कोणत्या प्रांतातून आला असेल, त्याचं शिक्षण किती झालं असेल, आई-वडिलांनी त्याच्यावर लहानपणी काही संस्कार केले असतील किंवा नसतीलही, त्याची जात-धर्म-पथ कोणता असेल, यापैकी कोणतीही माहिती आम्हाला नव्हती. असण्याचं कारणही नव्हतं. पण मानवी भावना या सर्वांच्या पलिकडे असतात आणि बऱ्याचदा त्या सारख्याच असतात, असं अगदी प्रकर्षानं जाणवलं.


ते भाऊ-बहिण कोणत्याही धर्माचे, जातीचे किंवा प्रांतातील असते तरी कदाचित त्या घटनेचीच पुनरावृत्ती पहायला मिळाली असती. त्यामुळंच कॅडबरी न खाताही आम्हाला ‘कुछ मिठा हो जाए’चा अनुभव आला.