Tuesday, February 24, 2009

"शिववडा'च्या निमित्तानं...


चला वडापावच्या गाड्यांवर...

महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी बटाटा वडा खाल्लाय. पण मुंबईतल्या एक-दोन ठिकाणचा (सोकॉल्ड कॉर्पोरेट वडापाव) अपवाद वगळला तर दुसरीकडे कुठेही बटाटा वड्याची चव खराब लागली नाही. त्यामुळं "शिववडा' तरी काय वेगळा असणार,'' असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विचारलाय. हे वाचल्यानंतर मी खरोखरच विचार करु लागलो. रस्त्यावर ठिकठिकाणी लागणाऱ्या वडापावच्या गाड्यांवर अनेकवेळा वडा खाल्लाय. पण कुठेच मला वडा आवडला नाही, असं झालं नाही. आवडण्याचं प्रमाण कमी-अधिक असेल पण गाडीवरचा वडा आवडतोच. (मुळात वडापाव ही डिश माझी "वन ऑफ फेव्हरेट' आहे, हे सांगायला नकोच) त्यामुळं राज ठाकरेंच्या म्हणण्यात नक्कीच तथ्य आहे, हे मला पटलं आणि शिवसेना "शिववडा'च्या रुपानं नेमकं नवं काय देणार आहे, हा विचार उगाच मनात डोकावून गेला.
मुंबईतला वडापाव उर्वरित महाराष्ट्रात गेला आणि बटाटा वडा ही महाराष्ट्राची ओळख बनली. शिववडा मुंबईपुरताच मर्यादित असला तरी मला उगाचच पुण्यातल्या चवदार वड्यांचे स्पॉट्‌स डोळ्यासमोर उभे ठाकले. पुण्यात खरा वडा मिळतो तो हातगाड्यांवर. जोशी वडेवाले किंवा रोहित वडेवाले यांनी वडापावला गाडीवरुन दुकानात नेलं. पण गाडीवर मिळणारा वडापाव अजूनही लोकांच्या चवीस उतरतो. पूर्वी "प्रभा'च्या वड्याची चर्चा सगळीकडे होती. अजूनही जुन्या पिढीतले लोक "प्रभा'चं गुणगान गात असतात. पण हा झाला इतिहास. "प्रभा'च्या तोंडात मारतील असे "हॉटस्पॉट्‌स' आज पुण्यात आहेत. उलट प्रत्येकानं वड्याची स्वतःची वेगळी चव तयार केलीय. तसंच चव टिकवलीही आहे. त्यामुळं "प्रभा'ची प्रभावळ आता हळूहळू ओसरु लागलीय, यात शंका नाही.
टिळक स्मारक किंवा बालगंधर्वमध्ये कार्यक्रमाच्या मध्यंतराला मिळणारा बटाटा वडा हे देखील त्यात आहेतच. शनिपार चौकात भोज्या देवडी यांची गाडी, सहकारनगरमधला कृष्णा वडापाव, कॅम्पात लोकसत्ता कार्यालयाजवळ मिळणारा वडा, पत्र्या मारुतीच्या पाराजवळ लागणारी मामांची गाडी, दांडेकर पुलाजवळचे खराडे वडेवाले, नवी पेठेतल्या विठ्ठल मंदिराजवळची गाडी, पुणे विद्यार्थी गृहाजवळचा वडापाव, शास्त्री रस्त्यावरच्या अजंठामधला वडा, वसंत चित्रपटगृहाजवळचा अन्नपूर्णाचा वडा, झेड ब्रिजच्या जंगली महाराज रस्त्याच्या बाजूची गाडी, रतन चित्रपटगृहाजवळची मधली गाडी, तुळशीबागेत सकाळी रौनकच्या दाराशी मिळणारा खर्डा-वडा किंवा अगदी खडकवासल्याच्या बॅकवॉटरजवळ असणाऱ्या वडापावच्या गाड्या... ही यादी अशीच वाढत जाईल. वडा किंवा भज्यांचा घाणा निघत असेल आणि आपण या परिसरातनं जात असू तर आपण वड्यांच्या गाडीकडे खेचलो जातोच. अगदी इच्छा नसतानाही. हीच तर त्यांच्या चवीची खासियत आहे. दगडूशेठ गणपती मंदिराच्या समोर नव्यानंच उघडण्यात आलेल्या "गोली वडापाव'चा अपवाद सोडला तर बहुतांश ठिकाणी वडापाव खाल्ल्याचा पश्‍चात्ताप कधीच झालेला नाही.
वडा गरमागरम असेल तर मग विचारुच नका. खोबरं-कोथिंबिरीची हिरवी तिखट चटणी, चिंचगुळाची किंवा खजुराची गोड-आंबट चटणी, कांदा लसूण मसाला, बारीक चिरलेला कांदा आणि तळून खारावलेल्या मिरच्या या गोष्टी वड्याची चव वृद्धिंगत करतात. पण मूळच्या वड्याची चव खतरा असेल तर या पूरक गोष्टींची गरजच पडत नाही. प्रत्येक ठिकाणच्या वड्याची चव निराळी आणि पूरक पदार्थांचा मामलाही निराळा. त्यामुळं प्रत्येक वेळी नाविन्याचा अनुभव येतो. "प्रभा'च्या वड्यामध्ये लिंबाचा रस जाणीवपूर्वक वापरल्यासारखा वाटतो. दांडेकर पुलावरचा खराडेंचा वडा काहीच्या काही झणझणीत असतो की विचारता सोय नाही. पत्र्या मारुतीजवळ मामांच्या गाडीवर तिखट चटणी घेतल्याशिवाय वड्याची चव लागतच नाही. लोकसत्ताच्या जवळ मिळणाऱ्या वड्याचा आकार पाहूनच थक्क व्हायला होतं. तिथल्या मिरच्यांना मिठाप्रमाणेच हळदही लागलेली असते. म्हणजे भन्नाटच!
कृष्णा, खराडे आणि पत्र्या मारुती...
पूर्वी कृष्णाचा वडापाव एकदम मस्त होता. पण आता तिथल्या वड्याचा आकार कमी आणि पावाचा आकार भलता मोठा अशी परिस्थिती आहे. त्यामुळे गोंधळून जायला होतं. पण कृष्णाच्या वड्याची चव अजूनही तशीच आहे. शिवाय इथं घाणा काढल्या काढल्या वडे संपतात. त्यामुळं प्रत्येक वेळी गरमागरम वडा. त्यामुळं इथं फक्त वडा घेणं हेच सोईस्कर आहे. पत्र्या मारुतीजवळ मिळणारा वडा चवीला परिपूर्ण नसतोच. वड्याच्या आतल्या सारणामध्ये मीठ आणि तिखंट थोडंसं कमीच असतं. त्यामुळं पावाला झणझणीत चटणी लावल्यानंतर ही कसर भरुन निघते. म्हणूनच इथं वड्यासोबत चटणी घेतली तरच मजा आहे. नही तो बात जमेगी नही... खराडेंच्या वड्याचा पहिला घास घेतल्यानंतर पाणी मागितलं नाही तरच नवल. पण एक वडा खाल्ल्यानंतर दुसरा वडा खाण्यासाठी जीभ खवळली नाही असं कधीच होत नाही.
रामनाथचाही वडाच...
आणखीन एक राहिलं. पुण्यातल्या मिसळचा विषय निघाल्यानंतर टिळक रस्त्यावरच्या रामनाथचं नाव निघाल्यावाचून रहात नाही. पण रामनाथच्या मिसळइतकाच तिथला बटाटा वडा प्रसिद्ध आहे. कदाचित तिथल्या मिसळपेक्षा वडाच अधिच चवदार आहे. कारण रामनाथची मिसळ म्हणजे फक्त जाळ. अक्षरशः घाम निघतो आणि दुसऱ्या दिवशी त्रास होतोच होतो. पण बटाटा वड्याचं तसं नाही. इतर वड्यांपेक्षा आकाराला दुप्पट आणि चवीला काहीपट चांगला असणारा रामनाथचा वडा म्हणजे सुख. रामनाथ वड्यांसाठी प्रसिद्ध न होता मिसळसाठी कसा प्रसिद्ध झाला, हे मला न उलगडलेलं कोडं आहे.
कर्जतच्या स्टेशनवर मिळणारा दिवाडकरचा वडा आता पुण्यातही मिळू लागलाय. तांबडी जोगेश्‍वरीच्या मंदिरासमोरच्या बोळात "दिवाडकर्स' हे नवं दुकान सुरु झालंय. पण तिथं खरोखरच कर्जतचा वडा मिळतो का हे मी तरी अजून "टेस्ट' केलेलं नाही. लवकरच तिथं जावं लागणार आहे, हे नक्की. तुमच्या मनातही वडापावच्या हॉटस्पॉट्‌सनी घर केलं असेल तर प्रतिक्रियांमध्ये त्याबद्दल लिहा. म्हणजे माझ्याप्रमाणेच इतरानांही त्याचा आस्वाद घेता येईल. सो लेट्‌स एन्जॉय. बटाटा वडा.

"मांदेली फ्राय' जरुर ट्राय करा...


गिरगावातला "सत्कार'!!!

बऱ्याच दिवसांपास्नं लिहायचं होतं. पण आज मुहूर्त मिळाला असंच म्हटलं पाहिजे. शेवटी हा सत्कार समारंभ पार पाडलाच पाहिजे, असं ठरवून आज ब्लॉग लिहितोय. एकदा का एखाद्या ठिकाणची चव जिभेवर रुळली की पुन्हा पुन्हा तिथं जायचं आणि वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घ्यायचा ही जुनी खोड. त्यामुळंच मुंबईत आलं आणि गिरगावातल्या सत्कार हॉटेलात गेलो नाही, असं कधीच झालं नाही. अगदी अप्रतिम चवीचे मासे याठिकाणी तुम्हाला मिळतील. पापलेटपासून ते बांगड्यापर्यंत बरीच "व्हरायटी' इथे मिळते. सत्कार हे थोडंसं खानावळीच्या अंगानं जाणारं असलं तरी अगदी घरगुती पद्धतीनं बनवलेलं (बहुधा मालवणी पद्धतीनं) जेवण ही इथली खासियत. त्यामुळे दुपारी दोनपूर्वी आणि संध्याकाळी आठनंतर अगदी बिनदिक्कतपणे तुम्हाला इथं आडवा हात मारु शकाल.

अगदी सुरवातीला म्हणजे "ई टीव्ही'मध्ये काम करत असताना (जवळपास तीन वर्षांपूर्वी) विश्‍वनाथ गरुड, अजय खापे आणि स्वप्नसौरभ कुलश्रेष्ठ या "रानडे'तल्या मित्रांबरोबर पहिल्यांदा सत्कारमध्ये गेलो होतो. तेव्हापास्नं अजूनही गिरगावाकडे पावलं वळतात. मग जेव्हा जेव्हा मुंबईला आलो तेव्हा तेव्हा इथं जाणं व्हायचं. सध्या मुंबईतच आहे. पण फक्त एकदाच सत्कारची पायरी चढलीय. आता कधी एकदा तिथं जाऊन "फिश करी' ओरपतोय, असं झालंय.
वेस्टर्न लाईनच्या मरीन लाईन्स स्टेशनला उतरायचं. चर्चगेटच्या दिशेनं जाऊ लागलो की, अखेरच्या ब्रिजवरनं उतरायचं आणि डावीकडे वळून थेट चालायला लागायचं. पहिला चौक ओलांडला डाव्या हातालाच सत्कार आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनसवरनंही इथं यायला बसेस आहे. अगदी टॅक्सीनं यायचं म्हटलं तरी वीस-पंचवीस रुपयांपेक्षा जास्त मीटर पडणार नाही.

पापलेट किंवा सुरमई थाळी हा इथला "द बेस्ट' ऑप्शन. अगदी "मेन्यू कार्ड' देखील पहायची काहीही आवश्‍यकता नाही. "सत्कार'मध्ये शिरल्यानंतर तुम्ही थेट एखाद्या थाळीची "ऑर्डर' देऊन टाका. "फिश करी'चा स्वाद हे इथलं वैशिष्ट्य. थाळीमध्ये एक सुका फिश, एक करी फिश आणि चपात्या येतात. "फिश करी' खूपच चविष्ट असल्यानं ती ओरपलीच जाते. त्यामुळे दोन-तीन वेळा तरी इथं करी मागवावी लागते. त्याचे स्वतंत्र पैसे पडत नाही. पण जादा पैसे पडत असले तरी हरकत नाही. पुन्हा पुन्हा "करी' हवीच. मासा कोणताही असला तरी तो इतका ताजा असतो (त्यामुळेच सॉफ्टही असतो) की जणू काही तो नुकताच समुद्रातनं पकडून आपल्याला "सर्व्ह' केलाय की काय, अशी शंका येते. अगदी लुसलुशीत मासा आणि अप्रतिम चवीची "फिश करी' यामुळे पाहता पाहता किती चपात्या संपतात ते कळतही नाही.

कोणतीही फिश थाळी मागविली तरी त्याच्या जोडीला "मांदेली फ्राय' ही डिश हवीच. "बोंबिल फ्राय' असेल तर तो "ऑप्शन'ही "ट्राय' करायला हरकत नाही. पण मला विचाराल तर "मांदेली फ्राय' हाच उत्तम पर्याय आहे. एका "प्लेट'मध्ये किमान बारा ते पंधरा मांदेली नक्की असतात. दोन जणांमध्ये एक "प्लेट' अगदी सहज संपते. इथली मांदेली इतकी मस्त आहे की, रत्नागिरीतल्या "शुभम' शिवाय इतकी सुंदर मांदेली दुसरीकडे कुठेच मिळालेली नाही. किमान मला तरी! (कोणाला माहिती असेल तर नक्की सांगा) जास्त लोक असतील तर त्या प्रमाणात तुम्ही "ऑर्डर' द्या. चपात्या आणि "फिश'वर भरपेट ताव मारल्यानंतर एक प्लेट भात तुमची वाट पाहत असेल. तो खाण्याची क्षमता तुमच्यात असेल तर भात खा; अन्यथा त्याबदल्यात एक-दोन चपात्या आणखी घ्या. माशांची चव जिभेवर रेंगाळत ठेवायची असेल तर मग तुम्ही थेट बिल मागवा. नाहीतर इथली "सोलकढी' पण चांगली असते. किमान मी तरी "सोलकढी' घेतल्याशिवाय इथनं बाहेर पडत नाही. तुम्हीपण शक्‍यतो "सोलकढी' घ्याच.
दोन फिश थाळी, भरपूर चपात्या, "मांदेली फ्राय' किंवा "बोंबिल फ्राय'ची प्लेट आणि नंतर एक-दोन ग्लास "सोलकढी' हे झालं दोन जणांचं भरपेट जेवण आणि बिलाची रक्कम अवघी पावणेदोनशे दोनशे रुपये. बिल देऊन बाहेर पडल्यानंतर फक्त एक रस्ता क्रॉस केला की, समोरच पानाचा एक ठेला आहे. मसाला (मिठा) पानापासून ते फुलचंदपर्यंत सर्वप्रकारची पानं तिकडं मिळतात. फुलचंदही चांगलं कडक असतं. त्यामुळं तुम्ही पानाचे "शोकिन' असाल तर "सत्कार'समोरच्या पानवाल्यालाही "व्हिझिट' कराच.