Sunday, December 26, 2010

टिळक, सावरकर, मंगेशकर, तेंडुलकर

ब्राह्मण समाजाचे नामोनिशाण मिटवा

पुण्याच्या लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविण्यास दिल्याबद्दल पुणे महानगरपालिकेचे अभिनंदन. आता ठाणे महानगरपालिकेनेही दादोजी कोंडदेव स्टेडियमचे नाव बदलून संभाजी ब्रिगेड आणि तत्सम संघटनांपुढे मान तुकवावी, अशी आशा आहे. वास्तविकतः दादोजी कोंडदेव हे ब्राह्मण होते आणि त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून ब्राह्मण इतिहासकारांनीच रंगविले, असा आक्शेप घेत संभाजी ब्रिगेड आणि त्यांच्या सहकारी संघटना थयथयाट करीत आहेत. पण हा विषय फक्त दादोजी कोंडदेव यांच्यापुरताच मर्यादित आहे का, तर नाही. हा विषय त्याही पुढे जाऊन ब्राह्मणविरोधाला जाऊन भिडतो.

ब्राह्मणवैरामुळेच समर्थ रामदासांना विरोध, वासुदेव बळवंत फडके पहिले क्रांतिकारक नव्हते तर उमाजी नाईक होते, लोकमान्य टिळकांनी नव्हे तर महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिवजयंतीला सुरवात केली, अफझलखानाकडे कुलकर्णी आडनावाचा कोणी माणूस चाकरीस होता, या गोष्टी वारंवार पुढे आणून ब्राह्मण समाजावर आसूड ओढण्याचा प्रयत्न होतो आहे. पुस्तके लिहून नवा इतिहास बिंबविण्याचा प्रयत्न केला जातो आहे. सेतुमाधव पगडी, बाबासाहेब पुरंदरे आणि निनाद बेडेकर हे ब्राह्मण असल्यामुळेच त्यांच्यावर टीकेची झोड उठविली जात आहे, हे आता ओपन सिक्रेट आहे. अर्थात, १९४८ पासून (गांधी हत्येनंतर) ब्राह्मण समाज अशा प्रकारची टीका, निंदा सहन करत आला आहे. त्यामुळे हे नवीन आहे, असे वाटण्याचे काहीच कारण नाही. सत्तेतही त्यांचेच राजे (जाणते असूनही अजाणतेपणाचा बुरखा घेऊन वावरणारे) असल्यामुळे संभाजी ब्रिगेडला आयती संधी आहे. असो.

पण या निमित्ताने मला गेल्या काही दिवसांपासून मांडायचं होतं ते मांडण्याची संधी मिळाली आहे. सर्वप्रथम ब्रिगेडने जी मोहिम उघडली आहे ती स्तुत्य, कौतुकास्पद आणि अभिनंदनीय आहे. पण ब्रिगेडने त्यांचे हे ब्राह्मणवैर इथेच थांबवू नये, अशी माझी मागणी आहे. त्यामध्ये ब्रिगेड आणि त्यांच्या सहकारी संघटना यशस्वी झाल्या तरच त्या कौतुकास पात्र आहेत.

पहिले म्हणजे ज्याप्रमाणे ब्रिगेडने दादोजी कोंडदेव यांचे नामोनिषाण इतिहासातून मिटविण्याचा प्रयत्न चालविला आहे, त्याचप्रमाणे त्यांनी संत ज्ञानेश्वर आणि समर्थ रामदास यांचेही नाव पुसण्यासाठी लढा उभारावा. संतमहंतांची जात काढण्याचे काहीच कारण नाही. तसे करणे चूकही आहे. पण फक्त ब्राह्मणवैरच ज्यांच्या नसानसांत भरले आहे, त्यांच्यासाठी हे काही चुकीचे ठरु नये. त्यामुळे ज्ञानेश्वर आणि रामदास यांचे नाव इतिहासातून, शालेय अभ्यासातून वगळावे, यासाठी पुढील आंदोनल असावे. कारण हे दोघेही ब्राह्मणच होते. तेव्हा आषाढी एकादशीला संत तुकोबारायांच्या पालखीबरोबर ज्ञानेश्वर महाजारांच्या पालखीऐवजी नामदेव, चोखामेळा किंवा तत्सम अब्राह्मण संतांची पालखी काढण्याची मागणी ब्रिगेडने करावी. श्री ज्ञानेश्वर तुकाराम ऐवजी श्री नामदेव तुकाराम असाही बदला त्यांना करता येईल.

छत्रपती शिवरायांचे कार्य आणि स्वराज्याचा भगवा ज्यांनी अटकेपार (पाकिस्तानमध्ये अटक नावाचे शहर आहे.) फडकाविला त्या राघोबादादांचे आणि समस्त पेशव्यांचे नामोनिषाण ब्रिगेडने मिटवून टाकावे. शनिवारवाडा पाडण्याचा कट काही बहुजन संस्थानी रचलेला आहेच. तशी आंदोलनेही होत असतात. त्यामुळे ब्राह्मण समाजालाच नव्हे तर समस्त हिंदुस्थानला अभिमानास्पद वाटणारा शनिवारवाडा जमीनदोस्त करुन तथाकथिक ब्राह्मणी वर्चस्वाला तडा देऊन टाकावा.

आणखी थोडे पुढे जाऊन झाशीच्या राणीच्या संघर्षाचा लढा इतिहासाच्या पुस्तकातून वगळण्यास सांगावे. झाशीच्या राणीचे माहेरचे आडनाव तांबे होते. तांबे म्हणजे ब्राह्मण. (कऱ्हाडे ब्राह्मण) महिला असूनही जिने पुरुषांना लाजवेल, असा संघर्ष केला त्या लढवय्या रणरागिणीचे नाव इतिहासात आहे कारण ब्राह्मण इतिहासकारांनीच तसे चित्र रंगविले आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई खरोखरच रणरागिणी होती की नाही, हे ब्रिगेडच्या इतिहासकारांनी शोधून काढले पाहिजे. झाशीच्या राणीचे नाव इतिहासाच्या पुस्तकातून काढून टाकले पाहिजे. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर चौकातील तिचा पुतळा आणि झाशी या गावी जर पुतळा असेल तर तिथूनही पुतळे काढून टाकले पाहिजेत.

संभाजी ब्रिगेडने थोडे त्याच्याही पुढे जायला हवे. पहिले क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धातील लढवय्ये मंगल पांडे आणि तात्या टोपे, तेल्यातांबोळ्यांचे नेते म्हणून ओळखले जाणारे लोकमान्य टिळक, सुधारणावादी विचारांचे गोपाळ गणेश आगरकर, तत्वशील विचारवंत महादेव गोविंद रानडे, क्रांतिकारकांचे मेरुमणी स्वातंत्र्यवीर विनायम दामोदर सावरकर, चापेकर बंधू, भगतसिंग आणि सुखदेव यांच्या जोडीने फासावर जाणारे राजगुरु, इंग्रजांशी मुकाबला करताना धारातीर्थी पडलेले रामप्रसाद बिस्मील आणि चंद्रशेखर आझाद, अनंत कान्हेरे, महात्मा गांधीजींचे गुरु गोपाळकृष्ण गोखले, विधवा पुनर्विवाह आणि स्त्री शिक्शणात दैदीप्यमान कामगिरी करणारे महर्षि धोंडो केशव कर्वे, हिंदुस्थानचे राष्ट्रगीत लिहिणारे रवींद्रनाथ टागोर आणि वंदे मातरम् चे जनक बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचे इतिहासातील योगदान पुसून टाकले पाहिजे.

स्वातंत्र्योत्तर काळातील हिंदुस्थानचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु, केरळचे मार्क्सवादी नेते ईएमएस नंबुद्रीपाद, श्रीपाद अमृत डांगे, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील अग्रणी प्रल्हाद केशव अत्रे आणि एस एम जोशी, भूदान चळवळ उभारणारे विनोबा भावे, सुप्रसिद्ध समाजसेवक बाबा आमटे, इन्फोसिस या जगप्रसिद्ध कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती, पहिला हिंदुस्थानी अंतराळवीर राकेश शर्मा, क्रिकेटपटू सुनील गावस्कर, सौरभ गांगुली, राहुल द्रविड, दिलीप वेंगसरकर, अजित वाडेकर, वेंकटराघवन, चंद्रशेखऱ, प्रसन्ना, व्हीव्हीएस लक्श्मण, अनिल कुंबळे, जवागल श्रीनाथ आणि डॉन ब्रॅडमनलाही ज्याने वेड लावले तो सर्वांचा लाडका हिरो सचिन तेंडुलकर, जागतिक विजेतेपदाला वारंवार गवसणी घालणारा हिंदुस्थानचा अव्वल बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद, हिंदुस्थानची गानकोकिळा लता मंगेशकर, पंडित भीमसेन जोशी, माधुरी दीक्शित... ही यादी हजारो लाखोंपर्यंत वाढत जाईल. या सर्वांचे नामोनिषाण इतिहासाच्या पानापानातून मिटविण्याचे मोठे आव्हान संभाजी ब्रिगेडपुढे असणार आहे. कारण ही मंडळीही दुर्दैवाने ब्राह्मणच आहेत.

ही मंडळी आज त्यांच्या त्यांच्या क्शेत्रात अव्वलस्थानी आहेत. ती ब्राह्मण असल्यामुळेच त्या स्थानी आहेत किंवा ब्राह्मण म्हणून जन्माला आल्यामुळे त्यांना ते स्थान सहजासहजी मिळाले आहे, असे जो म्हणेल त्याला बावळटच म्हटले पाहिजे. ही मंडळी कष्ट, परिश्रम आणि अथक मेहनत घेऊन त्या-त्या स्थानी पोहोचली आहेत किंवा प्रसिद्धीच्या झोतात आली आहेत. फक्त ब्राह्मण आहेत म्हणून त्यांना प्रत्येक ठिकाणी केकवॉक मिळालेला नाही किंवा कोणी मुद्दामून मदतही केलेली नाही. सध्याच्या जागतिकीकरणाच्या युगात स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर वा परिश्रमांच्या जोरावर जर कोणी पुढे गेला असेल किंवा जात असेल, तर त्याची जात आडवी येत नाही. तसेच फक्त जातीच्या जोरावर कोणीही पुढे जाऊ शकत नाही, हे मान्य केलेच पाहिजे. किंवा तेच सत्य आहे. जे ही बाब मान्य करणार नाहीत, त्यांना भविष्य नाही हे मुद्दामून सांगण्याची गरज नाही.

सांगण्याचा मुद्दा असा की, काम केल्याशिवाय किंवा चमक दाखविल्याशिवाय फक्त ब्राह्मण आहे म्हणून कोणीही पुढे येत नाही, कोणालाही नाव मिळत नाही. जे शिकेल तो टिकेल, असे सध्याचे युग आहे. इतरांच्या दुर्दैवाने ब्राह्मण समाजाने शिक्शणाची कास सोडलेली नाही. त्यामुळे दादोजी कोंडदेवांपासून ते लतादीदींपर्यंत कोणत्याही ब्राह्मण व्यक्तीची कारकिर्द इतिहासातून पुसून टाकण्याचा प्रयत्न झाला तरी त्यामुळे कोणालाही फरक पडणार नाही. ब्राह्मण समाजाला तर मुळीच नाही. आणखी पुढे जाऊन म्हणायचे झाले तर, इतिहासातून जरी नावे पुसली गेली ती समाजमनावरुन नक्कीच पुसता येणार नाही. म्हणूनच म्हणतो की, हिंदुस्थानच्या इतिहासात खारीचा वाटा उचललेल्या प्रत्येक ब्राह्मण व्यक्तीचे नाव पुसून टाकले पाहिजे. दादोजींपासून सुरुवात झाली आहे ती सचिन तेंडुलकरपर्यंत येऊन थांबावी, हीच अपेक्शा आहे.

हार्दिक शुभेच्छा...

Wednesday, December 22, 2010

चवीची परंपरा जपताना...

पेशवाई थाट आणि बादशाही ताट

चांदीच्या ताटात आणि पेशवाई थाटात... अशी जाहिरात करणारं श्रेयस आणि पुण्यातील हजारो-लाखो जणांना (विशेषतः विद्यार्थ्यांना) जगविणारं बादशाही. पुण्यातील या दोन खूप लोकप्रिय आणि तितक्याच जुन्या ठिकाणी जेवण्याचा योग आला. यापूर्वीही दोन्ही ठिकाणी अनेकदा जेवलेलो असल्यामुळे तिथल्या जेवणाची खासियत, चव आणि स्टाईल माहित होती. पण गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये दोन्हीकडे जेवणं झालं नव्हतं. त्यामुळं जेवण कसं असेल, याची प्रचंड उत्सुकता लागून राहिली होती. एका ठिकाणी ती पूर्ण झाली तर दुसरीकडे मात्र, भलतीच निराशा उदरी (पदरी नव्हे) पडली.


सर्वप्रथम श्रेयस. आपटे रस्त्यावर असलेलं हे हॉटेल अगदी सुरुवातीपासून मराठी पद्धतीचा डायनिंग हॉल म्हणून प्रसिद्ध आहे. अस्सल मराठमोळं (ब्राह्मणी म्हटल्यास अधिक योग्य) जेवण ही इथली खासियत. अगदी वीक डेला सुद्धा इथं वेटिंग लिस्ट असते. रविवारची तर गोष्टच विचारु नका. (आम्ही रविवारीच गेलो होतो. शिवाय दहा-बारा जण होतो. त्यामुळं भलतंच थांबावं लागलं.) तर असं हे प्रचंड लोकप्रिय श्रेयस. प्रचंड लोकप्रियता, आपटे रोडवर असलेलं लोकेशन आणि वर्षानुवर्षांची चव यामुळे साहजिकच इथला रेट प्रचंड प्रचंड प्रचंड आहे. एका थाळीसाठी (स्वीटसह) तब्बल दोनशे रुपये मोजावे लागतात इथे. तरीपण लोक दोनशे रुपये मोजतात आणि आत्मा तृप्त करतात. जेवणाची चवच इतकी अफलातून आहे की, हातावर पाणी घेताना साहजिकच शब्द बाहेर पडतात दोनशे रुपये वसूल.

आम्ही गेलो होतो तेव्हा सणासुदीला असतो तसा मेन्यू होता. किंवा पूर्वीच्या लग्नांमध्ये असायचा तसा मेन्यू. आळूची भाजी, बटाट्याची सुकी भाजी, बिरड्याची उसळ (सोललेल्या वालाची), पुऱ्या, गोल भजी, पापड, चटणी, कोशिंबीर, थालिपीठ आणि सरते शेवटी सोलकढी किंवा ताक. आणखी दोन-चार पदार्थ असतीलही. पण मला आत्ता आठवत नाही. पण हे जे काही होतं ते इतकं टेस्टी होतं की बस्स.


आळूची भाजी जशी हवी अगजी तशी. चवीला आंबट-गोड. जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही. शिवाय त्यात शेंगदाणे, खोबरं इइ. ऐवज अगदी मुबलक प्रमाणात घातलेला. बटाट्याची भाजीही थोडी झणझणीत. मिरचीच्या ठेच्याचा अगदी योग्य प्रमाणात वापर. सजावटीला खोबरं आणि कोथिंबीरही. बिरड्याची उसळही तोडीस तोड. खोबऱ्याच्या वाटणाचा उपयोग चव वाढविणारा. त्यांच्या सोबतीला गोल भजी, थालिपीठ आणि बटाटा वडा होताच. अधून मधून ताकाची फेरीही होत होती. जेवणाची सुरुवात वरण भाताने, नंतर मसाले भात, नंतर पुऱ्या आणि अगदी शेवटी हवा असेल तर दहीभात किंवा पुन्हा साधा भात. अशा पद्धतीनं जेवणावर लोक तुटून पडत होते. जेवण सुरु असतानाच मध्ये स्वीट काय हवं, अशी विचारणा झाली. मग कोणी गुलाबजाम, कोणी श्रीखंड, कोणी पुरणपोळी मागविली. अशा स्वर्गसुख देणाऱ्या जेवणामुळे सर्वांचे आत्मे तृप्त झाले.

खरं तर सोलकढी या जेवणामध्ये मिसफिट. पण मासे खाल्ल्यानंतरच सोलकढी प्यायली पाहिजे, असा काही नियम नाही. त्यामुळे श्रेयसमधील त्या जेवणानंतरही मी सोलकढी प्यायली. सोलकढीही एखाद्या मालवणी हॉटेलवाल्याच्या तोंडात मारेल अशी. त्यामुळे सोलकढीने कळस चढविला, असं म्हणायला हरकत नाही. तुडुंब जेवण झाल्यानंतर श्रेयसवाल्यांनी पानाची सोय पण ठेवली होती. पण पानपट्टीच्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी मिळणारं पान कसं असतं, याचा पुरेपूर अनुभव असल्याने मी पान मात्र खाल्लं नाही. थोडक्यात काय तर चांदीच्या ताटात अन् पेशवाई थाटात... अशी जाहिरात करणाऱ्या श्रेयसने त्यांची चव आणि परंपरा शब्दशः जपली आहे. चांदीचं ताट नसलं तरी थाट मात्र, पेशवाई होता, हे सांगायला नकोच. त्यामुळं अन्नदात्याचं भलं हो... असं म्हणत आम्ही श्रेयसमधून बाहेर पडलो.

थो़ड्याच दिवसांनी टिळक रोडवरील बादशाहीत जाण्याची वेळ आली. बादशाही म्हणजे परगावातून पुण्यात नोकरी किंवा शिकण्यासाठी पुण्यात आलेल्या लोकांचे अन्नदाता, जुन्या काळातील प्रचंड लोकप्रिय खाणावळ आणि अजूनही जुन्या पुणेकर मंडळींच्या ‍जिव्हाळ्याचा विषय. चर्चेचा विषय. दोन-अडीच वर्षांपूर्वी एकदा मित्रांबरोबर बादशाहीत गेलो होतो. त्यानंतर मुंबईला असल्यामुळं तिथं जाणं व्हायचं नाही. पण एका रविवारी बाहेर जायची वेळ आली, म्हणून मोठ्या उत्साहानं बादशाहीत गेलो.


पण उदरी प्रचंड निराशा पडली. बादशाही हे नुसतं नावात बादशाही नव्हतं. तर चवीतही बादशाही होतं. तिथल्या वाट्या आणि वाढण्याची पद्धत कधीच बादशाही नसली तरी त्याचं दुःख कधीच नसायचं. कारण तिथं अगदी घरच्यासारखं चविष्ट जेवण मिळत होतं. त्यामुळं बाकी सगळं माफ होतं. पण आता परिस्थिती बदलल्यासारखी वाटली. बादशाहीपण फक्त नावातच उरलं असल्याचं जाणवलं. वाट्यांचा आकार व वाढण्याची पद्धत पूर्वीसारखीच होती. त्यात शाहीपणा असण्याचा प्रश्नच नव्हता. पण चवीत मात्र, कमालीची घसरण झाल्याचं अगदी पहिल्या घासाला जाणवलं आणि प्रत्येक घासागणिक ही घसरण वाढतच गेली.


मुळात पांढरा भात आणि वरणाला सुट्टी. फक्त मसाले भात. तिथंच डोकं सटकलं. पोळ्या होत्या पण त्या गव्हाच्या होत्या की, मैद्याच्या ते कळत नव्हतं. गरम होत्या मऊही होत्या. पण मैदा जाणवत होता. आज पांढरा भात नाही. रविवार असल्यामुळे फक्त मसाले भात असं उत्तर मिळाल्यावर गिळा, असं मनातल्या मनात म्हणण्याखेरीज काहीच नव्हतं. बटाट्याच्या भाजीत ना तिखट ना मीठ. स्वीट म्हणून असलेले गुलाबजाम हे खेळण्यातील गोट्यांच्या आकाराचे. (तेही पाकात न मुरलेले). चटणीचा पत्ताच नाही. चटणीच्या ऐवजी फरसाण पानात आलं होतं. आता बादशाहीच्या ताटात फरसाण हे क्रांतिकारक असलं तरी ते संपूर्ण जेवणात मिसफिट होतं आणि काहीतरी पाहिजे म्हणून असल्यासारखं होतं. संपूर्ण जेवणात आळूची भाजीच चांगली होती. म्हणजे चवीला उत्कृष्ट होती. त्यानंतर नंबर होता तो काकडीच्या कोशिंबीरीचा. अर्थात, कोशिंबीर करण्याला फार अक्कल लागत नाही. तसंच कोशिंबीर खायला कोणी हॉटेलात जात नाही. त्यामुळे कोशिंबीर चांगली होती, याचं कौतुक असण्याचं कारण नाही.

असो. अन्न हे पूर्णब्रह्म असं मानून कोणतीच तक्रार न करता जेवलो. पोट भरलं पण तृप्त मात्र, झालो नाही. जेवल्यानंतर माझी प्रतिक्रिया मालकांना सांगण्याचा प्रश्नच नव्हता. कारण त्यांच्याकडे जेवणासाठी लोक वेटिंगवर होते. त्यामुळे माझ्या मताला त्यांच्या लेखी फारशी किंमत नसावी, असा विचार करुन मी बाहेर पडलो. आणखी एक-दोन जणांशी बोलताना सहज बादशाहीचा विषय निघाला आणि त्यांनीही माझ्यासारखीच प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यामुळेच हा ब्लॉग लिहावासा वाटला आणि लिहिला. चवीतला बादशाहीपणा असा सहजासहजी सोडू नये, अशीच माझी अपेक्शा आहे आणि पुढच्या वेळी जेव्हा जाईन तेव्हा पुन्हा एकदा नव्याने ब्लॉग लिहावासा वाटेल, अशी जेवणाची चव असावी, अशीच इच्छाही आहे.

पुण्यातील खवय्यांनी या दोन्ही ठिकाणचा आस्वाद घेतलेलाच असेल. त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया ब्लॉगवर जरुर नोंदवाव्यात. ही विनंती.

Sunday, December 19, 2010

नशीब सामनात कॉस्ट कटिंग नव्हतं...

कॉस्ट कटिंग हा शब्द अनेक संस्थांमध्ये (फक्त वृत्तपत्र नव्हे...) सगळ्यांत जास्त लोकप्रिय शब्द आहे. जागतिक मंदीच्या काळात तर या शब्दाला खूप महत्व प्राप्त झालं होतं. अनेकांचे अनेक अनुभव असतात. तसेच माझेही काही अनुभव आहेत. त्यामुळेच मला म्हणावसं वाटतं की, नशीब सामनामध्ये कॉस्ट कटिंग नव्हतं.

१) कॉस्ट कटिंगच्या नावाखाली (किंवा परफॉर्मन्स नाही, असे कारण देऊन) सामनातून एकाही व्यक्तीला काढून टाकण्यात आलेले नाही. हा मुद्दा मला सर्वाधिक लक्षवेधी वाटतो. अर्थातच, हे संजय राऊत साहेबांचे वैशिष्ट्य म्हटले पाहिजे. काही वर्षांपूर्वी यांत्रिक पद्धतीने कामाची सुरवात झाल्यानंतरही कामगारांना काढून न टाकता, त्यांना नवे काम शिकण्याची संधी देण्यात आली. ती मंडळी अजूनही सामनामध्ये आहेत आणि यथायोग्य पद्धतीने काम करीत आहेत. जागतिक आर्थिक मंदी असतानाही सामनात माणुसकीचे कॉस्ट कटिंग कधीच झाले नाही.

२) जागतिक मंदी आली म्हणून कॉस्ट कटिंगच्या नावाखाली ऑफिसातले एसी बंद करण्यात आले नाहीत. एसीच्या ऐवजी मंगल कार्यालयात लावतात तसे घों घों करणारे मोठ्ठाले पंखे ऑफिसात लावण्यात आले नाहीत. शिवाय बंद ऑफिसमध्ये एसीची काहीच गरज नाही, हे सांगण्यासाठी लेक्चर्सही देण्यात आली नाहीत. कर्मचा-यांच्या सोयीसुविधांचे कॉस्ट कटिंग तर अजिबात नाही.

३) कॉस्ट कटिंगच्या नावाखाली ऑफिसातील निम्मे ट्यूब लाईट आणि निम्मे दिवे काढून टाकण्याचे (न लावण्याचे नव्हे) फर्मान साहेबांनी काढले नाही. विजेची बचत म्हणून दिवे न लावणे समजण्यासारखे आहे. पण बचत म्हणून दहापैकी फक्त चारच दिवे लावायचे आणि उरलेले सहा दिवे काढून टाकायचे, असले दळभद्री प्रकार सामनात अनुभवयास मिळाले नाहीत.

४) सामनात दररोज तीन-चार वेळा महाराज चहा घेऊन येतो. (राजेश शहा, विद्याधर चिंदरकरसाहेब आणि अनेक जण त्याला जहर म्हणून हिणवतात.) या चहाचे बिल कंपनी अदा करते. पण जागतिक मंदीचे कारण पुढे करत सामनाने चहा बंद केला नाही. दोन रुपयाचा चहा दिला म्हणून कोणी मोठा होत नाही आणि तेथे काम करणा-यांनाही दोन रुपयाच्या चहाने स्वर्गसुख मिळत नाही. पण द्यायची दानत लागते, हेच महत्वाचे. थोडक्यात काय तर प्रभादेवीत द्यायच्या वृत्तीचेही कॉस्ट कटिंग झाले नाही.

५) एखादी घटना एन्जॉय करण्याचा आनंद वेगळाच असतो. पण अशा एन्जॉयमेंटलाही कॉस्ट कटिंगचे कारण देऊन फाटा दिला जातो. मग एखाद्या गोष्टीच्या लॉन्चिंगची पार्टीही सामोसा आणि वेफर्सवर भागविली जाते. एखाद्या हॉटेलात जेवण देणंही कंपनीला परवडत नाही आणि कारण दिलं जातं, आपण असं करत नाही. पण सामनात असली फालतुचं कॉस्ट कटिंग नव्हतं. राऊत साहेबांना खासदारकीचं तिकिट मिळणं असो किंवा उद्धव साहेबांची मिटिंग असो, सगळं कसं एकदम जोरात. आनंद आणि मौजमजेचे कॉस्ट कटिंग मला प्रभादेवीत कधीच आढळले नाही. इतकंच काय तर क्वचित प्रसंगी रात्री मुक्काम करण्याची वेळ आली तर घरी जाण्यासाठी किंवा जेवणासाठी लागणारे पैसे देतानाही, कंपनीचा कधीच हात आखडता झाला नाही. शिवाय मांसाहारी जेवणाचं बिल मिळणार नाही, अशी भंपक कारणंही अकांऊट्स डिपार्टमेंट पुढं करायची नाहीत.

६) कंपनीत घेताना एक पगार सांगायचा, पत्र देताना वेगळीच फिगर दाखवायची आणि प्रत्यक्ष हातात येणारा पगार भलताच, अशी फसवाफसवी करुन बचत करण्याची वृत्ती मला सामनात अनुभवायला मिळाली नाही. राऊत साहेबांनी शब्द दिला म्हणजे दिला. त्याच्या अलिकडे नाही आणि पलिकडेही नाही. इथे वचननामा पाळला जातो, असंच म्हटलं पाहिजे. कामगारांच्या पगारातून कॉस्ट कटिंग करुन जागतिक मंदीला पळवून लावण्याचा बनाव करण्याचं धोरण सामनात नाही. त्यामुळंच इथं येणारा माणूस पगार मिळाल्यानंतरही खूष होऊन काम करतो. हातात पगार पडल्यानंतर डोळे फिरण्याची वेळ कामगारांवर येत नाही. समाधानाच्या बाबतीत तर कॉस्ट कटिंगमधला क पण इथं सापडत नाही.

७) सामना म्हणजे हास्यविनोदांची पंढरी. स्वतः राऊत साहेब विनोद करुन स्वतः हास्यकल्लोळात बुडून जायचे. समोरच्याची विकेट कधी काढायचे कळायचं देखील नाही. उगाचच चेह-यावर गांभीर्याचा मुखवटा चढवून जड मुद्रेनं वावरायचं, हे सामनाच्या स्वभावातच बसत नाही. शिवाय पाच डेसिबलपेक्षा कमी आवाजातच हसायचं वगैरे बंधनही नाही. त्यामुळे विनोदी वृत्ती आणि हसण्याखिदळण्याचं कॉस्ट कटिंग कधीच अनुभवलं नाही.

८) असं असतानाही सामनात मात्र, काही गोष्टींचं कॉस्ट कटिंग नक्कीच होतं. उगाचच आपण जागतिक स्तरावरचे अग्रगण्य आहोत, अशा थाटात वावरायचं आणि पगार तसेच सेवासुविधा गल्लीतल्या पेपरसारख्या पुरवायच्या, अशा कद्रू वृत्तीचं मात्र कॉस्ट कटिंग सामनात नक्कीच होतं. मिटिंगांचं कॉस्ट कटिंग होतं. रिपोर्टांचं कॉस्ट कटिंग होतं. इंटरनेटवरच्या वापरावर असलेल्या बंधनांचं कॉस्ट कटिंग होतं. पत्रकारांच्या कल्पना आणि स्वातंत्र्यावर असलेल्या परंपरेच्या बोज्याचं कॉस्ट कटिंग होतं.

गेल्या अनेक दिवसांपासून सामनातील कॉस्ट कटिंगवर लिहायचं होतं. पण आज वेळ मिळाला आणि ब्लॉग उतरला. आता या विषयाचं थोडंसं कॉस्ट कटिंग करुन पुन्हा एकदा खाद्यजत्रेला सुरुवात करावीशी वाटते आहे. गोव्याची ट्रीप, कोल्हापूरचा दावणगिरी लोणी डोसा, पेशवाई थाटाचं श्रेयस आणि `बाद`शाही इइ अनेक विषयांवर लिहायचं आहे. जसा वेळ मिळत जाईल तसं तसं लिहीत जाईन.

(शेवटी तुम्ही सगळीकडे नोकरीच करणार. कामगार तो कामगार तो कितीही बदलला तरी त्याची झेप वर्तुळाबाहेर जात नाही.आणि वर्तुळाला काही केंद्रबिंदू सापडत नाही, अशा निनावी कॉमेंट्सना मी फार महत्व देत नाही. त्यामुळे अशा लोकांनी नावाने कॉमेंट्स टाकण्याची हिंमत दाखवावी. अन्यथा वेळेचा आणि शब्दांचा अपव्यय टाळणेच इष्ट. धन्यवाद. )

Saturday, November 20, 2010

सामनातले दिवस...

अविस्मरणीय आणि अतुलनीय...

सचिन आणि सेहवाग सातच्या आत घरात, खल्लास, राजीनामा, लालूच, बारवाल्यांचे मापात पाप, शिक्षणाच्या आयचा घो..., ना-या बोल मुंबई कोणाची, येड्याच्या ढुंगणावर उगवलंय बाभूळ... अशी एक से बढकर एक दिलखेच आणि धक्कादायक हेडिंगं वाचून कोणीही पत्रकार सामनाच्या प्रेमात नाही पडला तरच नवल. रोखठोक भूमिका आणि आक्रमक भाषा यांच्यामुळे हा पेपर सदैव केंद्रस्थानी असतो. ज्या पेपरची पानं वाहिन्यांसाठी नियमितपणे बातम्या घेऊन येतात, असा हा एकमेव मराठी पेपर. त्यामुळं पहिल्यापासून मला सामनाविषयी प्रेम, जिव्हाळा आणि ऍट्रॅक्शन होतं. ये लोग कौनसी चक्की का आटा खाकर पेपर निकालते है, असं गंमतीनं आम्ही बोलायचो. इतकं वेगळेपण त्या पेपरमध्ये होतं. (ये आटा भांडुप, परळ और डोंबिवली में मिलता है, ही गोष्ट मला तिकडे गेल्यावर कळली.)थँक्स टू राऊत साहेब...

मी सामनामध्ये काम करेन, अशी कल्पना स्वप्नातही केली नव्हती. पण योगायोग जुळून आला आणि संजय राऊत साहेबांनी स्वतः लक्ष घालून मला काम करण्याची संधी दिली. फक्त नऊच महिने मी सामनात काम केलं आणि नंतर पुन्हा पुण्यात जायचं असल्यामुळं मला मुंबई सामनाचा राजीनामा द्यावा लागला. पण ते नऊ महिने कधीही विसरु शकणार नाही, असे ठरले. सामनात जाताना अनेकांनी सांगितलं होतं की, बाबा सांभाळून रहा, तो सामना आहे. इतर वृत्तपत्रांपेक्षा तिथलं वातावरण वेगळं आहे. तिथल्या राजकारणाचा तूही बळी जाशील, असंही काहींनी सांगितलं होतं. अनेकांनी तर न जाण्याचा सल्लाही दिला होता. काहींनी तर पगार वेळेवर मिळत नाही, अशी भीतीही घातली होती. पण मी सामनात जाणार होतो, ते सामनानं मला दिलेल्या संधीमुळं, माझ्यावर दाखविलेल्या विश्वासामुळे आणि माझ्या सामनावरील प्रेमामुळे. अनेकांनी दाखविलेली भीती खोटी ठरली आणि सामनातले दिवस हे माझ्या आयुष्यातील सोनेरी दिवस ठरले.साम सोडताना जितकं वाईट वाटलं होतं तितकंच किंवा त्यापेक्षाही जास्त वाईट मला सामना सोडताना वाटलं होतं. सामनामध्ये मी फक्त नऊ महिनेच काम केलं. पण हे नऊ महिने कायम लक्षात राहतील असेच होते. सामनामधलं वातावरण, तिथली काम करण्याची पद्धत आणि वृत्तपत्राचा स्वभाव लक्षात घेतला तर मला राहून राहून केसरीशी तुलना करण्याचा मोह आवरता येत नाही. अगदी घरगुती वातावरण, हिंदुत्त्ववादी विचार, आक्रमक भूमिका, रोखठोक भाषा आणि बरंच काही...

सामना, सामना आणि सामना...
पहिल्या दिवसापासून पान एकवर काम करण्याची संधी भल्या भल्या दैनिकांमध्ये दिली जात नाही. पण राऊत साहेबांनी तो विश्वास दाखविला. मी संस्थेत नवीन आणि अननुभवी आहे, संस्थेमध्ये ज्युनिअर आहे, अशा पद्धतीने ते कधीच वागले नाही. प्रसंगी रोखठोक शब्दात कानउघाडणी केली. पण ती देखील अत्यंत योग्य आणि मनाला डाग देणारी नव्हती. जेव्हा चूक व्हायची तेव्हाच ते बोलायचे, हे माहिती असल्यामुळेच त्याचं वाईट वाटायचं नाही. शिवाय ते स्वतः सकाळी अकरा वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपयंत शिवसेना आणि सामनाचाच विचार करत असायचे. त्यांची तळमळ लक्षात घेतली तर त्यांनी काहीही म्हटलं तरी वाईट वाटायचं नाही. मुख्य म्हणजे राऊत साहेब अंक छपाईला जाण्याआधी बोलायचे. अंक छापून आल्यानंतर दुस-या दिवशी संध्याकाळी सात वाजता बैठकीमध्ये बोलायचे नाहीत.

एखादी बातमी चुकली असेल तर ते वैतागून बोलायचे. एखादी बातमी किंवा फोटो चुकला की, माझा जीव अक्षरशः तळमळतो. तुम्हाला मात्र, काहीच कसे वाटत नाही. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. जरा गंभीरपणे अंकाचा विचार करा. (हा आशय आहे, अगदी शब्दशः देता येणार नाही) राऊत साहेबांच्या फेसबुक अकाऊंटवर एकदा त्यांनी लिहिलं होतं की, सामना आणि शिवसेना हा माझ्या प्राण आहे. हे अगदी तंतोतंत खरं आहे.

स्वतः सदैव काही ना काही लिहित असायचे. एक टाकी लिहायचे आणि दुसरीकडे संस्थेतल्या लोकांनाही लिहिण्यासाठी प्रोत्साहन द्यायचे. कागदाला पेन लागू द्या, हा त्यांचा अगदी सुप्रसिद्ध डायलॉग. काही ठिकाणी जसे संपादक स्वतःही लिहित नाही आणि लिहिणा-या उपसंपादकांचाही हिरमोड करतात. अशाच मंडळींना मोठमोठी पदंही मिळतात. पण राऊत साहेबांचं तसं नाही. सामनामध्ये माझी जेव्हा पहिली बायलाईन आली होती, तेव्हा स्वतःहून त्यांनी कौतुक केलं होतं आणि असंच लिहित रहा, अशा शुभेच्छाही दिल्या होत्या. वरिष्ठ पदांवरील व्यक्तींनीही चांगल्या बातम्या स्वतः केल्या पाहिजे, असा त्यांचा आग्रह असायचा आणि ते स्वतःही बातम्या लिहिण्यास मागेपुढे पहायचे नाही.

थांबा, घाई करु नका...
ओघवत्या शैलीत एकटाकी लिहिणारा, सातत्याने तसेच रोखठोकपणे आपली मते मांडणारा, सहका-यांनाही लिहिण्यास प्रोत्साहन देणारा, सहका-यांबरोबर हास्यविनोदात सहभागी होणारा, ट्रीट मागितली तर सहजपणे हजार दोन हजार रुपये खिशातून काढून देणारा, दिवाळीच्या निमित्ताने सगळ्या ऑफिस स्टाफला स्वतःच्या पैशातून गिफ्ट देणारा, बदलत्या जमान्यातही मॅनेजमेंटला तोडीस तोड उत्तर देणारा, शब्द दिलेल्या पगाराचा आकडा नंतर न फिरविणारा व पगाराच्या आकड्यांमध्ये कोणतीही गोलमाल न करणारा, असा संपादक विरळाच. मराठीतील शेवटचा संपादक कोण, असं ठरविण्याची अहमहमिका सध्या सुरु असली तरी संजय राऊत आणि इतर काही जण आहेत, तोवर कोणीही शेवटचा संपादक ठरविण्याची घाई करु नये.संजय राऊत हे जसे हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शब्द जसेच्या तसे मांडतात. तसेच राऊत साहेबांना काय हवे, त्यांना काय म्हणायचंय हे तंतोतंत माहिती असणारी दोन मंडळी म्हणजे विद्याधर चिंदरकर साहेब आणि अतुल जोशी साहेब. चिंदरकर साहेब हे सामन्यातील बातम्यांचे प्राण आहेत तर जोशी साहेब हे सामनाच्या संपादकीय पानाचे आधारस्तंभ आहेत. या तीन मंडळींशिवाय सामनाचा विचार होऊच शकत नाही. ते तिघे आहेत म्हणूनच सामनाचे सध्याचे स्वरुप आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रातील या तीन असामान्य क्षमतेच्या लोकांबरोबर काम करण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्यच.

नो मिटिंग्ज, नो व्हीसी...
सामनातील वातावरणही लय भारी होतं. अत्यंत कमी साधनसामुग्रीमध्येही सामना ज्या पद्धतीने काढतात, ते चकित करुन टाकणारं आहे. फक्त खंडित अखंडित पद्धतीने पीटीआयची सेवा असूनही सामनामध्ये एकही बातमी चुकलेली नसते, हे विशेष. दीड सालाचं नियोजन नाही, दिवसाला चार-चार बैठका नाही, व्हिसी नाही ऑडिओ कॉन्फरन्सिंग नाही, एटीसी-बीटीसी-सीटीसी नाही. काही काही नाही. पण पेपरमध्ये दिवसभरातील सगळ्या बातम्या मात्र आहेत. सामनातले सगळे पत्रकाराच इटंरनेट, वेबसाईट्स, टीव्ही चॅनल्स, एसएमएस सेवा आणि बातम्यांच्या सगळ्या स्रोतांवर गरुड दृष्टी ठेवून असतात. दिसली बातमी की उचल. दिसली बातमी की उचल. त्यामुळेच अगदी अपवादात्मक परिस्थितीत सामनामध्ये बातमी चुकते.

शिवाय सामनामध्ये डिझाईन आणि ले-आऊट यांचे स्वातंत्र्य आहे. पाच-सात कोटी रुपये उधळून कोणतीही परकीय यंत्रणा न राबवूनही सामनाचा लेआऊट सगळ्यांच्या तोडीस तोड असतो. तो कलाकार आणि उपसंपादक यांना मिळणा-या स्वातंत्र्यामुळेच. कमीत कमी शब्दात हेडिंग हे सुद्धा सामनाचं वैशिष्ट्य. वेगवेगळ्या ऑप्शन्सचा विचार करुन मग कमीत कमी शब्दांचे हेडिंग दिले जातात. स्वतः राऊत साहेब, चिंदरकर साहेब, क्रीडा विभागातील मंगेश वरवडेकर, गजानन सावंत किंवा राजेश पोवळे ही मंडळी अशी काही सामनामय झाली आहेत, की ते अत्यंत अचूक आणि आक्रमक हेडिंग शोधूनच काढतात. त्यामुळे चांगले वृत्तपत्र काढण्यासाठी परदेशी प्रशिक्षकांचे सल्ले, महागडे डिझाईन्स, पाने लावण्यांची नियमावली आणि तत्सम कोणत्याही गोष्टींची गरज नसते. बातमीसाठी तळमळ असली की झालं. हे सगळ्यांना माहिती असलेली गोष्ट सामनात अधिक प्रकरषानं जाणवली.

सामनातील खाद्यसंस्कृती
सामनात मला आवडलेली आणखी एक गोष्ट म्हणजे सामनातील खाद्यसंस्कृती. काँट्रिब्युशन काढून वडापाव, दालवडा, सामोसे, भजीपाव आणायचे आणि सगळ्यांनी त्यावर तुटून पडायचे हा नित्यक्रमच होता. मग कधी नवनाथ दांडेकर आणि राजन शेलार शेवबुंदी आणायचे, कधी डाएट चिवडा आणायचे. नितीन सावंत आले की, सँडविचची मेजवानी ठरलेली. चिंदरकर साहेब कधी सारंगचा वडापाव, मूँगभजी मागवायचे , कधी सब वे मधून बेकरी आयटम्स आणायला सांगायचे. अनेकदा (म्हणजे बरेचदा) प्रभाकर पवार साहेबही उदार व्हायचे आणि सब वे किंवा होम डेलीमधून मेजवानी यायची.

न करत्याच्या वारी म्हणजे शनिवारी हरषदा परब तिच्या पोतडीतून काही ना काही भरुन घेऊन यायचीच. गुरुवारी अरविंदभाई शहा आस्वाद किंवा प्रकाशमधून काहीतरी (म्हणजे बटाटे वडा, कोथिंबीर वडी, साबुदाणा वडा किंवा थालिपीठ) घेऊन यायचे. कधी देवेंद्र भोगले पापडी किंवा शेव-जिलेबी घेऊन यायचा. उन्मेष गुजराती किंवा भीमराव गवळी भेळ-उपरवाला किंवा खारे दाणे-फुटाणे घेऊन यायचे. वाढदिवसाचं कारण पुढे करुन कधी गणेश कदमला मुंडक्यावर टाकलं जायचं तर कधी बायलाईन आली की गवळीला कापलं जायचं. मग मी किंवा गजा सावंतही कधीकधी सगळ्यासांसाठी काहीतरी मागवायचो. अशी ही खाद्ययात्रा कायमच सुरु रहायची.

सामनातील ज्येष्ठ सहकारी नवनाथ दांडेकर आणि राजन शेलार यांचे डबे हे सामनातील खास वैशिष्ट्य. मी तर नऊ महिने त्यांच्याच डब्यावर होतो. माझ्यामुळे ते किती दिवस उपाशी राहिले हे माहिती नाही. पण त्यांच्या डब्याची चवच इतकी भन्नाट असायची की मी कंट्रोलच नाही करु शकायचो. आणखी एक संस्मरणीय गोष्ट म्हणजे मंग्या आणि मेघा गवंडेची मेजवानी. स्पेनच विश्वकरंडक जिंकणार, ही पैज जिंकल्यानंतर मंग्या वरवडेकरनं सगळ्या सामनाला चिकन बियाणीची मेजवानी दिली होती. तर सामना सोडणार असल्यामुळे मेघा गवंडेनं सगळ्यांना कोंबडी-वडे आणि सोलकढीची मेजवानी दिली. इतकं इतकं प्रेम मिळाल्यानंतर संस्था कायमची सोडताना वाईट वाटणारच ना.

जिथं मला भरभरुन मिळालं. अपेक्षेपेक्षा जास्त मिळालं. ती संस्था सोडताना वाईट वाटणार नाही तर काय. त्यामुळेच सामनाचे हे सोनेरी दिवस कधीही न विसरण्यासारखेच आहेत. कारण तिथला प्रत्येक दिवस मी मनापासून एन्जॉय केलाय.

(पुढच्या लेखात वाचाः नशीब सामनामध्ये कॉस्ट कटिंग नव्हतं...)

Thursday, October 28, 2010

माता न तू वैरिणी...

आणखी किती दिवस हे असं चालणार...

मुंबईमध्ये एका आईनं जुळ्या मुला-मुलींपैकी मुलीला पहिल्या मजल्यावरुन खाली फेकून दिल्याची घटना नुकतीच घडली. प्रत्यक्ष जन्मदातीच आपल्या मुलीला असं मृत्यूच्या तोंडात कसं ढकलून देऊ शकते. हा विचार फक्त सुन्न करणारा नाही तर हा विचारही करता येण्यापलिकडचा आहे. मुलगी अशक्त आहे किंवा तिचा सांभाळ करण्याची आपली आर्थिक कुवत नाही, अशी स्पष्टीकरणं देऊन कदाचित या कृत्याचा समर्थन केलंही जाईल. पण मला मात्र, हे अजिबात पटत नाही.

प्राणी जसे आपल्या पिल्लांना जन्म दिल्यानंतर वा-यावर सोडून देतात किंवा त्यांची फार फिकीर करत नाहीत, तसं माणूस कधीपासून वागायला लागला, हा प्रश्न मनात आल्यावाचून राहत नाही. आईचं हृदय इतकं राक्षसी कसं होऊ शकतं, मुलीला फेकून देण्यासाठी तिचे हात धजावतातच कसे, आपण मातृत्त्वाच्या नात्यालाच डाग लावतो आहोत किंवा महापाप करतो आहोत, असं तिला कसं वाटत नाही, याचंच आश्चर्य वाटतं.

दुसरी गोष्ट म्हणजे समजा ही सगळी कारणं मान्य केलीत तरी मग आईनं मुलीलाच का फेकलं, मुलाला का नाही. हा प्रश्न तर गेल्या अनेक पिढ्यांपासून आपल्याला सतावतो आहे. आजही स्त्री भ्रूण हत्येचं पाप करणारे हात या देशात आहेत, ही शरमेचीच गोष्ट म्हटली पाहिजे. खुद्द सायना नेहवालची आजीही लहानपणी तिचा राग राग करायची, असं नुकतंच पुढं आलंय. सायनाच्या आई-वडिलांनीही जर तशीच वागणूक सायनाला दिली असती तर आज अशी वर्ल्ड क्लास प्लेयर हिंदुस्थानला मिळाली असती का...

पाठोपाठ घडलेल्या या दोन गोष्टींमुळे स्त्री भ्रूण हत्या हा गंभीर विषय पुन्हा एकदा चर्चेत आला असून हे सारं कधी थांबणार... याचं उत्तर सध्या तरी कोणाकडेच नाही. जोपर्यंत आपण मानसिकता बदलत नाही तोपर्यंत तरी हे शक्य नाही. गेल्या काही वर्षांपासून ह्याच विषयावर फॉर्वर्डेड मेल फिरत आहेत. त्यापैकी तीन उत्तम जाहिराती खाली देत आहे. त्या वापरण्याची परवानगी आहे किंवा नाही, हे मला माहिती नाही. पण एका चांगल्या हेतूनं त्या वापरत आहे, त्यामुळं त्याला कोणाचीही हरकत नसावी, ही अपेक्षा...


Wednesday, October 27, 2010

खा खा खादाडी भाग २

दादर-परळमदली काही राहिलेली ठिकाणं आणि पूर्वी साम मराठीमध्ये काम करत असताना बेलापूरमध्ये काही ठिकाणी चाखलेली वेगवेगळ्या पदार्थांची तोंडओळख इथं करुन देत आहे. प्रत्येक ठिकाणची प्रत्येक गोष्ट चांगली चविष्ट असतेच असं नाही आणि प्रत्येक पदार्थ आपण खातोच असंही नाही. पण जेजे उत्तम चविष्ट सुंदर तेते देण्याचा हा प्रयत्न...मराठमोळी मिसळ...

मराठमोळ्या वरळीमध्ये अस्सल मराठमोळी मिसळ खाण्याचा योग साम मराठीचा जुना सहकारी पराग खरात याच्यामुळे आला. बोलता बोलता विषय निघाला तेव्हा तो म्हणाला तुम्ही वैशालीची मिसळ खाल्ली की नाही. एक नंबर मिसळ आणि झणझणीत रस्सा. मग निवांत वेळ काढून वैशालीत पोचलो. नुसती मिसळच नाही तर दही मिसळ, वडा, भजी या मराठी पदार्थांप्रमाणेच विविध गुजराती आयटम्स (खाण्याचे), फरसाण आणि सरते शेवटी फक्कड चहा असं सर्व काही मिळणारं हे मस्त रेस्तराँ म्हणजे वैशाली.

मिसळ खाण्यासाठीच आलो होतो, त्यामुळे आम्ही मिसळच घेतली. फक्त फरसाण आणि त्यावर वाटाण्याची उसळ ही मुंबईतली मिसळची व्याख्या असल्यामुळे इथं फारसं वेगळं दृष्य नव्हतं. तरीही फरसाणच्या जाड-बारीक शेव, नायलॉनच्या पोह्यांचा चिवडा असं वैविध्य होतं. पण रस्सा मात्र, इतरांच्या तुलनेत जरा हटके होता. थोडासा मालवणी स्टाईलचा किंवा नाशिकच्या काळ्या तिखटाच्या मिसळीच्या जवळ जाईल असा. जाळ निघेल असा झणझणीत नसला तरी घाम आला. त्यामुळं येणं फुकट गेलं, असं वाटलं नाही. शिवाय जांबोरी मैदानावरुन जाताना मंचेकर वडापाव आणि त्याच्या डायगोनली ऑपोझिट असलेल्या (साई की तत्सम काहीतरी) वडापावच्या आठवणी ताज्या झाल्या.म्हैसूर मसाला...

दादरला परळ एसटी डेपोकडून पोर्तुगीज चौकाकडे जायला लागलं की दुस-या चौकात संध्याकाळी डोशाची एक गाडी लागते. सैतान चौकीच्या इथला चौक हे मला माहिती असलेलं नाव. इथं डोसा-उत्तप्पाचे काही प्रकार मिळतात. त्यापैकी म्हैसूर मसाला डोसा अप्रतिम. साध्या डोशावर बटाट्याची भाजी, कापलेला कांदा-टोमॅटो, किसलेले बिट, थोडी खोब-याची चटणी असा स्मॅश केलेला रगडा. एकदम स्वादिष्ट म्हैसूर डोसा तयार. सोबत सांबार आणि चटणी. त्यातही सांबार नसले तरी चालू शकेल, असा पद्धतीचे. पण ती उणिव चटणी भरुन काढते. त्यामुळे दिलखुश्श. इतर ठिकाणी साधा किंवा मसाला डोसा बारा रुपयांना असला तरी इथं मात्र, म्हैसूर मसाला डोसा अवघ्या बारा रुपयांना मिळतो.

शिवाय फुकटचा टाईमपास म्हणजे शिवसेना की मनसे की नारायण राणे यावर चौकातल्या तज्ज्ञांची चर्चा कानावर पडतेच. सातनंतर गेलात तर नक्कीच.टीटीचा शिववडा...
दादर टीटीच्या (पूर्व) जवळ अशोक नावाचं हॉटेल आहे. तिथून पुढे स्वामीनारायण मंदिराकडे जायला लागलं की, कॉर्नरलाच शिववड्याची एक गाडी दिसेल. थोडी आतल्या बाजूला आहे. आतापर्यंत मी जे काही पाच-सहा ठिकाणचे शिववडा पाव आवर्जून खाल्ले त्यापैकी द बेस्ट शिववडा इथलाच. बाकीच्या ठिकाणांबद्दल न लिहिलेलंच बरं. पण इथला वडा मस्त गरमागरम असतो. पावही मऊ आणि चटणीही झणझणीत. त्यामुळे वडापावची दुसरा घेतल्याशिवाय स्वस्थ बसविणारच नाही.बेलापूर गावातली मिसळ...

बेलापूर गावात मी जिथं राहतो (किंवा रहायचो) तिथं तळ्याशेजारी (राम मंदिराजवळ) मिळणारी मिसळ नवी मुंबई आणि मुंबईतील मला सर्वाधिक आवडलेली मिसळ आहे. एकदम छोटं झोपडीवजा टपरी. तीन बाकडी. त्यावर जेमतेम सात-आठ लोकं बसतील इतकीच जागा. पण चवीला बाप. रस्सा आणि तर्री पाहूनच पोट भरतं. फक्त फरसाण असलं तरी रस्सा बाकीची जबाबदारी पार पाडतो. कधीकधी गरमागरम रस्सा-वडाही भाव खाऊन जातो. दुपारी शाकाहारी मांसाहारी जेवणही तिथं मिळतं. पण मी काही जेवलेलो नाही. पण मिसळ मात्र, एक नंबर.स्टेशनजवळची पाणीपुरी...

साम मराठीमध्ये असताना या पाणीपुरीवाल्याची दोस्ती झाली होती. स्टेशनकडून आल्यानंतर बाहेर पडताना उजवीकडे हा पाणीपुरीवाला असतो. संध्याकाळी साधारण सहानंतर. पाणीपुरीचं पाणी म्हणाल तर पित रहावं असं वाटतं. (दुस-या दिवशीचा विचार करुन जास्त पिणं होत नाही, हा भाग अलहिदा) गरमागरम रगडा आणि फक्त तिखट पाणी असं कॉम्बिनेशन खूप मस्त. खजूराचं गोड पाणी नाही घेतलं तरी चालेलसं. साममध्ये असताना आठवड्यातून सहावेळा तरी जाणं व्हायचं. त्या परिसरता किमान पाच ते सहा ठिकाणी पाणीपुरी मिळते. महागड्या हॉटेलांमधूनही मिळते. पण इथली चव त्याला नाही.स्टेशनवरचा सामोसा...

बेलापूर स्टेशनवर जर तुम्ही बेलापूरहून सुटणारी गाडी पकडली तर ए गरम सामोसे... असं ओरडत एक मनुष्य चढतो. क्वचित कधीतरी हा योग जुळून आला तर त्याच्या कडचे सामोसे नक्की खा. दहा रुपयांत दोन सामोसे मिळतात. चवीला एकदम उत्तम असतात. शिवाय एकदम गरम. चटणी नसली तरी ते कोरडे वाटत नाहीत, हे विशेष. पाहता पाहता सामोसे कधी संपतात ते कळतही नाही.

बसस्टँडचा वडा...
बेलापूर बस डेपोच्या आवारातच एक छोटं दुकान आहे. तिथं स्नॅक्स आणि ज्यूस वगैरे मिळतात. तिथं सक्काळी सक्काळी गरमागरम बटाटे वडा मिळतो. पुण्यात जसा रौनक जवळ वडे, सामोसे, पॅटिससाठी गर्दी असते. तशीच गर्दी सक्काळी सक्काळी इथं वडा खाण्यासाठी असते. मुख्य म्हणजे फक्त वडा (पाव नाही) खाणा-यांचं प्रमाण अधिक. चटणी आणि वडा हे समीकरण इतकं फिट्ट आहे की बस्स. पण वड्यानंतर चहा मात्र, पिऊ नका. नाहीतर सगळी गंमत निघून जाईल.सरतेशेवटी पान...
बेलापूरला पाम बीच रोडला अश्विथ नावाचं एक मध्यमवर्गीयांना परवडेल, असं चांगलं हॉटेल आहे. त्याच्या बाहेर एक पानाची टपरी आहे. लकलकीत पितळी भांड्यांच्या साक्षीनं तो पानं लावत असतो. त्याच्याकडे मसाला पानापासून ते १२०-३०० पर्यंत कोणतेही पान खा दिलखूष झालंच म्हणून समजा. तुम्ही त्याच्याकडे वारंवार येताय म्हटल्यावर साधा फुलचंद, रिमझिमवाला फुलचंद, डबल किवाम, हरीपत्ती सल्ली सुपारी, कात-चुना-किवाम लवंग जला के... असं काहीही भन्नाट कॉम्बिनेशन असलं तरी ते त्याच्या लक्षात असायचं. आपण गेल्यानंतर आपण काहीही न सांगता आपल्याला हवं असलेलं पान आपल्यासमोर ठेवेल तो खरा पानवाला, या पुलंच्या व्याख्येत हा पानवाला १०० टक्के बसणारा. कधी जर गेलात तर नक्की रसास्वाद घ्या.

Monday, October 25, 2010

चम्मतगं

काही अप्रकाशित म्हणी आणि वाक्प्रचार

पाठ्यपुस्तकातल्या म्हणी आणि वाक्प्रचार आपण नेहमी ऐकले आहेत. वाचले आहेत. लहानपणी पुस्तकांमध्ये शिकल्यापासून लक्षात ठेवले आहेत. पण काही म्हणी आणि वाक्प्रचार त्यापेक्षा वेगळेही आहेत. अनेकदा अचानकपणे ते कानावर पडले की, हडबडून जायला होतं. चौकांमध्ये, नाक्यावर किंवा कट्ट्यावर असताना त्यांचा वापर जास्त केला जातो. विविध ठिकाणी हे कोडवर्ड वेगवेगळे असतात. त्यापैकी फक्त संसदीय शब्द, वाक्प्रचार आणि म्हणी येथे देत आहे. Hope you will enjoy it.

१) खाण तशी माती, आई तशी स्वाती

(जशी आई तश्शीच मुलगी)

२) दुस-याच्या घोड्यावर बसून शनिवारवाडा पाहणे

(फुकटचा रुबाब करणे)

३) मी नाही त्यातली अन् कडी लाव आतली

(वरुन किर्तन आतून तमाशा, याच आशयाची ही म्हण आहे. आहोत त्यापेक्षा वेगळाच दिखावा करणे.)

४) सरशी तिथं पारशी

५) जहा मिले चांदी वहा चलें महात्मा गांधी

६) भेळ तिथं खेळ

(फायदा होणार तिथं नक्की पोचणार)

७) आरतीला भरती

(झळकण्याच्या वेळी सर्व येणार)

८) खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा

(जवळपास काही नसताना उगाच बढाया मारणे)

९) ओळख ना पाळख आणि म्हणे मी लोकमान्य टिळक

(विशेष कर्तृत्व नसताना स्वतःची तुलना मोठमोठ्या नेत्यांशी करणे)

१०) बिच में मेरा चाँदभाई

(इतरांचा कोणताही विषय सुरु असला तरी त्यात आपला मुद्दा उगाच रेटून नेणे)

११) फुकट जेवा पण ओळख ठेवा

(काहीही करा पण वेळप्रसंगी मदतीला धावून या)

१२) काम ना धाम डोक्याला घाम

(काहीच न करता उगाचच लटकणे)

१३) पोट आहे की अक्कलकोट

१४) पोट आहे की पेटारा

(सारखी खा खा करणा-यासाठी उपरोधिक)

१५) खाओ खुजाओ बत्ती बुझाओ

(नाना पाटेकरचा कुठल्याशा पिक्चरमधील डायलॉग. फक्त खायचं, प्यायचं आणि झोपायचं)

१६) डोक्यात जाणे

(एखाद्यावर प्रचंड वैतागणे)

१७) कुच्चा मोडणे

(हा खानदेशी वाक्प्रचार आहे. त्याचा अर्थ वाट लागणे असा आहे.)

१८) गोट्या फिट्ट करणे

(हा विदर्भात वापरला जाणारा वाक्प्रचार असून त्याचा वापर सकाळसारख्या दैनिकात केल्याचे मी माझ्या डोळ्याने पाहिले आहे. पोझिशन आपल्या बाजूने लॉक करुन टाकणे, असा त्याच अर्थ असल्याचे आमचे मित्रवर्य संजय पाखोडे यांनी सांगितले होते.)

१९) झगामगा अन् मला बघा

(चमकोगिरी करुन लोकांना आपल्याकडे आकर्षित करणे)

२०) फुकट चंबू बाबूराव

(फुकटेगिरी करणा-या लोकांसाठी वापरली जाणारे विशेषण)

२१) एखादी व्यक्ती भागवत असणे

(दुस-याच्या खर्चात आपला कार्यभाग उरकणे म्हणजेच भागविणे)

२२) पुतळा होणे

(एखाद्याची खूप वेळ वाट पाहणे)

२३) फुकट ते पौष्टिक

(जे जे फुकट ते सर्वकाही आन दो.)

२४) लग्नात मुंज उरकणे

(मोठ्या गोष्टींमध्ये छोट्या छोट्या गोष्टी उरकून घेणे आणि खर्च वाचविणे)

२५) टाईट मारणे

(रुबाब करणे. हा वाक्प्रचार सोलापूर किंवा कोल्हापूरमध्ये वापरला जातो. नक्की कुठे ते तपासले पाहिजे.)


२६) ठेवल्या ठेवल्या गुल करणे

(पाहता पाहता खाऊन टाकणे. पंतगबाजीवरुन हा वाक्प्रचार आला आहे. जेव्हा दोन पतंगांची पेज होते. तेव्हा एखाद्याने आपला मांजा दुस-याच्या मांजाला घासल्यानंतर ताबडतोब दुस-याचा पतंग गुल होणे, यावरुन ठेवल्या ठेवल्या गुल... हा वाक्प्रचार पडला आहे.)


२७) एखाद्याच्या नावाने बिल फाडणे

(परस्पर संबंध नसलेल्या व्यक्तीवर एखाद्या घटनेची किंवा घडामोडीची जबाबदारी ढकलणे)


तुम्हालाही काही म्हणी, वाक्प्रचार आणि इतर संसदीय शब्द माहिती असतील तर कॉमेंट्स स्वरुपात टाकावेत. म्हणजे ही यादी अशीच वाढत जाईल.

Saturday, October 23, 2010

दादर-परळमधील खादाडी...

बेलापूरला साम मराठीमध्ये असताना मुंबईत येणं फारसं व्हायचं नाही. पण सामना जॉईन केल्यानंतर रोजच्या रोज मुंबईत येण आलंच. दादर-परळमधील ब-याच नामांकित हॉटेल्स आणि रेस्तराँमध्ये पूर्वी अनेकदा गेलेलो आहे. पण गेल्या वर्षभरात खादाडीचे अनेक नवे अड्डे सापडले. त्यातील बरेच अड्डे हे रस्त्यावरचे आहेत. पण अशा अड्ड्यांवरच चांगलं आणि चविष्ट खायला मिळतं, असा माझा अनुभव आहे. त्यामुळे मी ते खात गेलो आणि एन्जॉय करत गेलो.शिरा-पोहे...
परळ स्टेशनकडून सामना कार्यालयाकडे जात असताना परळ एसटी डेपोच्या चौकात कोप-यावर (मुंबईच्या भाषेत नाक्यावर) एक शिरा-पोह्याचा स्टॉल असतो. अर्थात, पहाटे पावणे चार ते सकाळी आठ-नऊ या कालावधीत. सक्काळी सक्काळी स्वादिष्ट पोहे आणि मस्त शिरा इथं मिळतो. अवघ्या सात रुपयांत. शिरा-पोहे असं कॉम्बिनेशनही मिळतं. तेवढ्याच किंमतीत. पोहे जास्त तेलकट नसतात आणि शिरा चवीला जरा जास्त गोड असतो, त्यामुळं मला ते आवडतात. (शिवाय सामनातून सकाळी पुण्याला निघताना पोटाला आधार मिळतो, हा भाग दुसरा.)
सोबतीला शेजारीच गरमागरम कडक चहाही आहे. तो पण स्पेशल चहाच्या तोडीस तोड.


उपवासाची पुरी-भाजी...
जिथे सकाळी शिरा-पोहे मिळतात त्याच्याच डायगोनली ऑपोझिट प्रकाश नावाचं एक छोटेखानी दुकान आहे. दादरमध्ये प्रकाश नावाचं एक खूप प्रसिद्ध हॉटेल आहे. ते निराळं. हे वेगळं. हे हॉटेल मुंबईत आहे, असं आत गेल्यावर जराही वाटत नाही. आत शिरतानाच ठेवलेली दुधाची कढई. आत विविध प्रकारच्या पाट्या. इथे सर्व प्रकारच्या नागरिकांना मुक्त प्रवेश आहे वगैरे वगैरे. या पाट्या आता फारशा दिसत नाहीत. कारण सर्व ठिकाणी सर्वांना प्रवेश हे सर्वमान्य आहे. शिवाय बुंदीचा लाडू, दाण्याचा लाडू, शेव-चिवडा, पापडी, अगदी बाबा आदमच्या काळातलं सोसयो हे शीतपेयं असा अगदी गावाकडच्या टपरीवरचा फिल इथं येतो. पदार्थांचे भावही हातानं लिहून चिटकविलेले. एक जुन्या जमान्यातलं हॉटेल वाटावं, असं वातावरण. मस्तच...
मला इथला सर्वाधिक आवडणारा पदार्थ म्हणजे राजगि-याच्या पु-या आणि उपवासाची बटाट्याची भाजी. पाच की सहा पु-या आणि गरमागरम झणझणीत भाजी. उपवासाला दिलखुश. मिसळ, वडा-उसळ पण मिळते, पण मला तशी मिसळ विशेष आवडत नाही. वेळेला केळं... म्हणून ठीक आहे. पण आवडीनं नाही. इथला साधा चहाही स्पेशल चहा इतकाच मस्त आणि कडक.


मांसाहारी गिरीश...
टिपिकल मालवणी (किंवा कोकणी) चवीचं आणि अगदी सामान्यांच्या खिशालाही परवडेल, असं हॉटेल म्हणजे गिरीश. परळमधल्या जयहिंद हॉटेलच्या समोरच हे गिरीश आहे. जयहिंदमध्ये प्रचंड गर्दी असल्यामुळे मी एकदा गिरीशमध्ये गेलो आणि नंतर प्रेमातच पडलो. पापलेट, सुरमई, हलवा, बोंबील, मांदेली अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मच्छीपासून ते खिमा, मटण-चिकन हंडी, मसाला अशा सर्व प्रकारच्या वैविध्यानं गिरीश भरलेलं आहे. अस्सल मालवणी म्हटल्यावर सोलकढीही आलीच. काही ठिकाणी सोलकढी ही आपली अशीच असते. पण इथली सोलकढी कायम लक्षात राहिल, अशीच म्हटली पाहिजे.
महत्त्वाचं म्हणजे इथले दरही अगदी माफक आहेत. दोन जण अगदी पोट फाटेपर्यंत जेवलो तर बिल १६० रुपयांच्या वर जात नाही.


प्रभादेवीचा वडापाव...
वरळीकडून प्रभादेवीकडे जाऊ लागलो की रवींद्र नाट्य मंदिराकडे वळण्याआधीचा जो चौक आहे (नाव काही लक्षात नाही बुवा...) त्या चौकात एक गाडी लागते. आई-वडील आणि दोन मुलं अशी त्या गाडीवर असतात. त्या गाडीवर वडापाव खाल्ला की, बाकीचं सारं विसरुन जायला होतं. इथल्या वडापावची चव खरोखरच वेगळी आहे. तसंच दोन-तीन प्रकारच्या चटण्यांमुळं त्याची लज्जत आणखीनच वाढते. वडापाव प्रमाणेच पॅटिस आणि सामोसे ही तितकेच चटकदार असतात. पॅटिस आणि वड्यासाठी वापरलं जाणारं सारण वेगवेगळं असतं. नाहीतर काही ठिकाणी एकच सारण दोन्हीत वापरुन फसवणूक केली जाते. शिवाय इथला खप आणि ग्राहकांचा राबता इतका आहे की, विचारु नका. कधीही जा तुम्हाला अगदी गरमागरम वडा मिळणारच. आणखी काय हवंय.
सामनामध्ये आम्ही कधी-कधी (आठवड्यातून जवळपास पाचवेळा) वडापाव, भजी, दालवडा किंवा इतर खाद्यपदार्थ मागवायचो, त्यातून मला या माणसाचा शोध लागला. संधी मिळेल तसं त्याला भेट देणं व्हायचं.

मधुराची मिसळ...
संकष्टी चतुर्थीला एकदा प्रकाशमध्ये जाण्याऐवजी मधुरामध्ये गेलो. (थँक्स टू माय बॉस मि. विद्याधर चिंदरकर) मधुरात उपवासाची मिसळ खूप छान मिळते, असं त्यांनी सांगितलं. मग मी काय थांबणार होतो. मिशन मधुरा. त्यांनीच मला मधुरात सोडलं. एक प्लेट उपवासाची मिसळ मागितली आणि तृप्त झालो. उपवासाचा बटाट्याचा गोड चिवडा, उपवासाची बटाट्याची भाजी, साबुदाण्याची खिचडी, किसलेली (किंवा चोचलेली) काकडी, दाण्याचं कूट आणि वरुन मस्त दाण्याची आमची. व्वा क्या बात है... हे सारं कालवून राडा करायचा आणि मग ओरपायचं. स्वर्गीय सुख. तोड नाही हो. इतकं चांगलं खायला मिळणार असेल तर कोणी रोजही उपवास करेल. उपवासाची मिसळ खाऊन झाली की, मग पियूष, ताक, लस्सी किंवा कडक चहा काही पण घ्या.
इतर मराठी रेस्तराँमध्ये मिळतात तसे आळूची वडी, थालिपीठ, भाजणीचे वडे, खर्वस इइ अस्सल मराठमोळे पदार्थही इथं मिळतात. दादरमध्ये प्लाझाच्या लाईनमध्ये शिवाजी मंदिर समोर असल्यामुळं दर थोडे अधिक वाटतात. पण तृप्त होऊन बाहेर पडल्यानंतर सगळं वर्थ वाटतं.

इडली-डोसा...
परळ स्टेशनवरुन उतरलं बाहेर आलं की, समोर एक बोगद्यासारखं आहे. त्या बोगद्याखाली एक इडली-डोशाची गाडी लागते. मला वाटतं सकाळी पावणे सात ते दुपारी दोन-अडीच. दहा रुपयांत तीन इडल्या किंवा तीन मेदू वडे (काहींच्या भाषेत मेंदू वडा) किंवा दोन साधे डोसे (घावन). दोन (क्वचित प्रसंगी एक) प्लेट मारल्या की, पोट भरलं. इथं सांबार फारसं चांगलं मिळत नाही. म्हणजे जी टिपिकल दक्षिण भारतीय चव असते ना, ती इथं नाही. त्यामुळं सांबार नाही घेतलं तरी चालेल. पण इथली खोब-याची चटणी तसंच टॉमेटो आणि लाल मिरचीपासून तयार केलेली लाल चटणी एकदम टॉप्प. इडली किंवा घावन काहीही घ्या पण चटणीबरोबर खाल्लं तर अधिक चांगलं लागतं. माझा अनुभव. तुम्हाला सांबार आवडलं तर खाऊ शकताच की...


फालुदा...
मुंबई सेंट्रल आणि वांद्रे स्टेशन इथं आमचे परममित्र मंगेश वरवडेकर उर्फ राजा यांच्या सहकार्याने मी खास फालुदा खाण्यासाठी गेलो होतो. सब्जा, शेवया, घट्ट गुलाबपाणी, मावा, घट्ट दूध आणि वरुन आईस्क्रीम घालून तयार केलेला फालुदा लय भारी. मुंबई सेंट्रल स्टेशनच्या बाहेर अंडा-भुर्जीच्या गाड्यांच्या बाजूला ही गाडी उभी असते. अस्लम की रशीद की सुलेमान असं काहीसं नाव आहे त्याचं. हाफ फालुदा १५ आणि फुल्ल २०. आम्ही आईस्क्रीम खाऊन गेलो होतो म्हणून हाफ घेतला. पण इतक्या लांब गेल्याचं सार्थक झालं.
वांद्रयाच्या स्टेशनबाहेरील फालुदाही चांगला आहे. तो पण मुबारक की तत्समच. इथलाही फालुदा चांगला. पण इथं मावा वरुन घालण्याची पद्धती बहुधा नसावी. त्यामुळे दूधाला किंवा त्या फालुद्याला घट्टपणा येत नाही. हा ड्रॉबॅक सोडला तर चव तशीच. दर मात्र, दहा रुपयांनी जास्त. फुल्ल फालुदा ३० रुपये. तीस रुपयांमध्ये फालुदा आणखी गोष्ट मोफत मिळते. फार खूष होऊ नका हात पुसायला टिश्शू पेपर मिळतो.. हा हा हा...


एलफिन्स्टनचा सामोसा...
प्रत्यक्ष स्टेशनवर जाऊन किंवा तिथं बाहेर कुठं मिळतो तिथं जाऊन मी हा सामोसा खाल्लेला नाही. पण वरवडेकर राजे यांनी दोन-तीन वेळा हा सामोसा सामनामध्ये आणला होता. तेव्हापासून मला त्याची चटकच लागलीय, असं म्हणा ना. सुकी किंवा ओली चटणी नसली तरी चालेल असा हा वेगळाच सामोसा आहे. सामोशाचीच चव इतकी खल्लास आहे की, त्याला इतर गोष्टींची जोड लागतच नाही. फक्त पाच रुपयांत मिळणारा हा गरमागरम सामोसा इतका भारी आहे की, तुम्ही त्याच्या प्रेमात नक्की पडाल.


पूजा चणे भांडार...
सयानी रोडवर भूपेश गुप्ता भवनच्या अलिकडे थोडंसं हे पूजा चणे भांडार लागेल. असंच फिरत असताना मला त्याचा शोध लागला. सामना समोरही एक भैय्या भेल आणि तत्सम पदार्थ विकतो. पण हा भैय्या त्यापेक्षा शेकडो पटीनं भारी आहे. इथं मिळणारी गिली (म्हणजेच ओली) भेळ पुण्यातल्या भेळच्या गाडीवरच्या भेळेची आठवण करुन देणारी. हा भैय्या पण भेळमध्ये बटाटा टाकतोच. असो. पण गूळ आणि चिंचेचं पाणी मी मुंबईतच त्याच्याकडेच पाहिलं. बाकीचे भैय्ये खजूर आणि चिंचेचं पाणी वापरतात. त्यामुळं ही भेळ इतरांपेक्षा वेगळी लागते. जे भेळचं तेच पाणीपुरीचं. पाणी एकदम झकास. चाट मसाला आणि पुदीना यांचं अत्यंत योग्य मिश्रण इथं असतं. त्यामुळं पाणी उग्र किंवा जास्त जळजळीत नसतं.
भेळ आणि पाणीपुरी हेच पदार्थ चाखले आहेत. अजून शेवपुरी, रगडापुरी, रगडापॅटिस आणि जे काही मिळतं ते खायचं आहे. कोरडी भेळही चांगली असावी, असा माझा अंदाज आहे. ती करण्याची पद्धत पाहून उगीच तसं वाटलं.

किर्तीमहलचा चहा...
मुंबई सकाळला असताना परळ टीटीच्या किर्तीमहल इथं चहा प्यायला जाणं व्हायचं. महापालिकेच्या कुठल्याशा ऑफिसच्या खालीच हे रेस्तराँ आहे. इथला चहा एकदम फक्कड. चव थोडीशी इराण्याच्या अंगानं जाणारी. पण हा इराणी नाही. हा बहुतेक उडुपी आहे. पण इथं इतर काही खाण्यापेक्षा चहा पिण्यासाठीच लोक मोठ्या संख्येने आलेले असतात. आम्ही त्यात असायचो. इथला चहा प्याच.

सामनात असताना केलेली खादाडी आत्ता सांगितली. बेलापूरला साम मराठीमध्ये असताना त्या परिसरात केलेली खादाडी लवकरच...

Sunday, October 17, 2010

शब्द हेच शस्त्र

याच मंत्राने मृतांचे, राष्ट्र सारे जागले ।

शस्त्रधारी निष्ठुरांशी, शांतीवादी झुंजले ।

शस्त्रहीना एक लाभे, मंत्र वंदे मातरम्‌


ब्लॉग हे विजयासाठी नवे माध्यम

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लंडनमध्ये असताना एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी गेले होते. त्यावेळी पोलिस येणा-या प्रत्येक नागरिकाची कसून तपासणी करत होते. कोणी आपल्याबरोबर एखादे शस्त्र आणले नाही ना. लपवून बॉम्ब बिम्ब तर आतमध्ये नेत नाही ना, हे तपासून पाहत होते. त्यावेळी स्वातंत्र्यवीरांना पोलिसांनी अडविले. त्यांची तपासणी केली. त्यांच्याकडे काहीच सापडले नाही. सापडले नाही म्हणजे त्यांच्याजवळ काही नव्हतेच. त्यामुळे पोलिसांनी त्यांना आत जाण्यास परवानगी दिली.

आपल्याला परवानगी मिळालेली पाहून सावरकर हसले आणि त्या पोलिसाला विचारले. बाबा, तुला माझ्याजवळ काहीच सापडले नाही ना, मग मी आत जाऊ का. सावरकरांचा असा प्रश्न ऐकून पोलिस बुचकळ्यात पडला. त्यानं सावरकरांना विचारलं की, तुमच्याकडे स्फोटक असं काही आहे का. त्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांच्याकडील पेन दाखवत त्याला म्हणाले, माझ्याकडे ही जी लेखणी आहे, ती सर्वाधिक धोकादायक अस्त्र आहे. इंग्रजांविरुद्ध सर्वात मोठे शस्त्र आहे. तुला जर वाटत असेल तर मी ते काढून ठेवतो. त्यावर तो पोलिस हसला आणि म्हटला, या पेनाचा उपयोग करुन तुम्ही इंग्रजांचे काय वाकडे करणार. ही लेखणी तुमच्यापाशीच ठेवा.

पुढे याच लेखणीच्या जोरावर स्वातंत्र्यावीरांनी १८५७ चे स्वातंत्र्यसमर हे पुस्तक लिहून इंग्रजांना पळता भुई थोडी केली. आपल्याविरुद्ध निर्माण होत असलेला असंतोष पाहून इंग्रजांनी त्या पुस्तकावर बंदी घातली, पुस्तके जप्त केली. पण त्या प्रभावी आणि धारदार शब्दांचा व्हायचा तो उपयोग झालाच आणि हजारो बॉम्बगोळ्यांनी जे काम शक्य नव्हते ते काम शब्दांनी साध्य करुन दाखविले.

लोकमान्य टिळकांनी सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, हे आमचे गुरुच नव्हेत इइ. अग्रलेखांमधून जे जाज्ज्वल्य विचार मांडले ते इतके जहाल आणि प्रेरक होते की, इंग्रजांना काय करावे ते सुचेना. लोकमान्यांचे अग्रलेख इतके स्फूर्तीदायक होते की, लोकमान्यांना असेच मोकळे ठेवले तर आपल्याला राज्यकारभार करणे अवघड होऊन बसेल. ही शब्दांची धार कमी करण्यासाठी इंग्रजांनी लोकमान्यांवर राजद्रोहाचा खटला चालविला आणि त्यांची रवानगी मंडालेच्या तुरुंगात केली. ही होती शब्दांची ताकद.

पुढे आचार्य प्रल्हाद केशव अत्रेंनी मराठामधून आणि हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी कुंचल्याच्या फटका-यांच्या माध्यमातून विरोधकांची दाणादाण उडवून दिली. महाराष्ट्रद्वेष्ट्यांना नामोहरम करुन टाकले. त्यांना कोणत्याच शस्त्रांची गरज वाटली नाही. आपल्याकडे असलेल्या शब्दांच्या आणि कलेच्या सामर्थ्यावर त्यांनी इतकं प्रचंड काम केलं ज्याचा कोणी स्वप्नातही विचार केला नसेल.

आणीबाणीच्या काळातही आपल्याविरोधातील वातावरण अधिक भडकू नये, म्हणून स्व. पंतप्रधान इंदिरा गांधींना वृत्तपत्र स्वातंत्र्यावर गदा आणावी लागली. लोकशाहीच्या काळ्या पर्वातील या घटनेचा निषेध इंडियन एक्सप्रेस सारख्या वृत्तपत्रांनी अग्रलेख न लिहिता ती जागा कोरी सोडून केला. कुलदीप नय्यर यांच्यासारख्या संपादकांनी रुपक कथेच्या माध्यमातून आणीबाणीवर आसूड ओढले. त्यातून पोहोचायचा तो संदेश लोकांपर्यंत पोहोचायचा.

ही शब्दांची ताकद आहे. त्यामुळेच शब्द हेच शस्त्र आहे. हे शस्त्र जपून वापरा. एकदा बंदुकीतून सुटलेली गोळी आणि तोंडातून निघालेला शब्द पुन्हा परत घेता येत नाही, हे म्हणतात. अशा या शब्दांना आता ब्लॉग हे नवे माध्यम मिळाले आहे. व्यक्त होण्याचे, आपली भूमिका मांडण्याचे, आपल्यावर होणा-या अन्यायाला वाचा फोडण्याचे.

ब्लॉग हे माध्यम इतके प्रभावी आहे की, पार एनडीटीव्हीच्या बरखा दत्तपासून ते सकाळ वृत्तपत्र समूहाचे अभिजीत पवार यांनाही या ब्लॉग्जची दखल घ्यावी लागते. इतकेच नाही तर लेट्स भंकस नावाच ब्लॉग तर महाराष्ट्रातील एका अतिवरिष्ठ राजकारण्याने स्वतः हस्तक्षेप करुन बंद करायला लावला होता, अशी चर्चा आहे. अमेरिकेतील काही पत्रकार इराक आणि अफागाणिस्तान युद्ध कव्हर करण्यासाठी गेले होते. तेथे त्यांनी काही ठिकाणी अमेरिकेच्या सैन्याची होत असलेली पिछेहाट हे पत्रकार स्वतःच्या ब्लॉग्जवर देत होते. अशा पद्धतीने आपल्याच देशाची पिछेहाट आणि रणनिती कशी फसते आहे, याचे वार्तांकन ब्लॉ़गवर करणे योग्य की अयोग्य यावर चर्चा होऊ शकते. पण अमेरिकी पत्रकारांते ते ब्लॉग्ज सैन्याला इतके झोंबले की, अमेरिकेने पत्रकारांचे ते ब्लॉग्ज काही काळासाठी ब्लॉक केले. ही ब्लॉग्जची ताकद आहे. कारण ते सर्वसामान्यांना ऍव्हेलेबल आहेत. सोपे आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे फुकट आहे.

आजही विविध वृत्तपत्रे तसेच वृत्तवाहिन्यांमधील कर्मचारी त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाच्या बातम्या कळते-समजते किंवा सहयोगी बातमीदार या ब्लॉग्जकडे व्यक्त करतात. त्यावर अनेक पत्रकार आपली घुसमट प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होतात. त्यातून ज्यांच्यापर्यंत जो संदेश पोहोचला पाहिजे तो पोहोचतोच. अन् मुख्य म्हणजे कोणीही त्याकडे दुर्लक्ष करु शकत नाही.

त्यामुळे ब्लॉग या नव्या माध्यमामुळे शब्दांना नवी धार प्राप्त झाली असून असत्यावर, अन्यायावर आणि अधर्मावर मात करण्यासाठी या माध्यमाचा पुरेपूर उपयोग होउ लागला आहे. भविष्यात हा वापर अधिक वाढणार असून त्याची दखल संबंधितांना अधिक गांभीर्यानं घ्यावी लागेल, यात शंकाच नाही.

(विजयादशमीच्या दिवशी किंवा काही ठिकाणी खंडेनवमीलाही शस्त्रांची पूजा होते. शब्द हेच शस्त्र मानणा-या माझ्यासारख्या हजारो-लाखो जण माझ्याशी सहमत नसतील तरच नवल.)

Tuesday, October 05, 2010

रजनी द ग्रेट...


द रोबो... डॉट...

गझनी, थ्री इडियट आणि दबंग सुपर ड्युपर हिट झाले. अमुक रेकॉर्ड, तमुक रेकॉर्ड झाले. हा विक्रम मोडला, तो विक्रम मोडला असल्या बातम्या कायमच वाचनात येतात. हिंदीमध्ये सध्या शाहरुख, आमीर आणि सलमान या तिघांच्या खानावळींना बॉलिवूडमध्सये ध्या विशेष चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे या मंडळींचे नवे चित्रपट आले की, अशा बातम्या काय झळकतात. त्यापैकी काही चित्रपटांचा आशय चांगला असतो, यात वाद नाही. पण विक्रम, गर्दी, उच्चांक, रेकॉर्डब्रेक हे शब्द या मंडळींसाठी नाहीतच. हे सर्व शब्द फक्त एका आणि एकाच माणसासाठी आहेत, तो म्हणजे द ग्रेट रजनीकांत, रजनी द बॉस... (अमिताभ आणि चिरंजीवी हे अपवाद ठरु शकतात, हा भाग अलहिदा)

रजनीचा १७० की २०० कोटी माहित नाही पण आतापर्यंतचा सर्वाधिक महागडा चित्रपट म्हणून प्रसिद्धी पावलेला बिग बजेट रोबो (इंदिरन) शनिवारी मुंबईत प्लाझाला जाऊन पाहिला. तुफान गर्दी आणि बरेचसे पिटातले प्रेक्षक असल्यामुळे टाळ्या, शिट्ट्या आणि आरडाओरडा ऐकत चित्रपट मनसोक्त एन्जॉय केला. रजनीकांतचा शिवाजी द बॉस हा चित्रपट पुण्यात लक्ष्मीनारायणमध्ये पाहिला होता. त्यावेळी देविदास देशपांडे (उर्फ सेल्वी रंजन, डी. अय्यर, पी. राम, ई. करुणाकरन किंवा तत्सम कोणत्याही तमिळ नावाने ओळखला जाऊ शकेल असा आमचा मराठी मित्र) बरोबर असल्यामुळे आम्ही तमिळमधला शिवाजी द बॉस पाहिला होता. पण यंदा तो नसल्यामुळं इंदिरन न पाहता हिंदीतला रोबोच पाहिला.

वेड लावणारे स्टंटस, हॉलिवूडच्या तोडीचे इफेक्टस, भन्नाट कथा, लक्षणीय वेग आणि २५ मिनिटांचा क्लयमॅक्स असं सगळं एकमेकाच्या हातात हात घालून आलेलं आहे. त्यावर आयसिंग म्हणजे रजनीकांतचा खतरनाक परफॉर्मन्स... तीन तास डोकं बाजूला ठेवायचं आणि फक्त पहायचं...चिट्टी लय भारी...

डॉ. वशीकरण (रजनीकांत) हा दहा वर्षांपासून स्वतः सारखाच दिसणारा एक रोबो तयार करण्यात व्यस्त असतो. चित्रपट सुरु होताच त्याला वशीकरण आपल्या प्रोजेक्टमध्ये यशस्वी होतो आणि सुरुवातीच्या काही क्षणातच एकाच वेळी दोन रजनीकांत पडद्यावर दिसू लागतात. प्रचंड बुद्धीमत्ता असलेला हा रोबो घर काम करण्यापासून ते कराटेपर्यंत आणि नॅचरल डिलिव्हरी करण्यापासून ते नाच करण्यापर्यंत सर्व काही येत असतं. आपण जसं गावाला जाताना विविध प्रकारचे कपडे बॅगेत भरतो त्याप्रमाणे वेगवेगळ्या विद्या वशीकरणनं या रोबोमध्ये भरलेल्या असतात. चिट्टी... रोबोचं नाव. हा चिट्टी वॉटरप्रूफ आणि फायरप्रूफ असतं. चिट्टीला जगातल्या तीसएक भाषा येत असतात आणि बरंच काही काही त्याला येत असतं. (प्रत्यक्ष पहाच)

अनेक करामती करणा-या या चिट्टीला हिंदुस्थानी संरक्षण दलांमध्ये समाविष्ट करण्यासाठी वशीकरणचे प्रयत्न सुरु असतात. पण चिट्टी हा भावनाशून्य असून तो चांगल्या वाईटाची निवड करु शकत नाही, त्याचा गैरवापरही होऊ शकतं, असा दावा करत डॅनी (वशीकरणचा गुरु) चिट्टीशी कट्टी करतो. त्याला नाकारतो. दुसरीकडे डॅनी हा डॉ. वशीकरणवर मनातून जळत असतो. आपण तसा रोबो बनवू शकत नाही, ही सल कायम त्याच्या मनात असते. ते डोक्यात ठेवूनच तो कायम वशीकरणला टोचून बोलत असतो. डॅनीने झिडकारल्यानंतर वशीकरण चिट्टीमध्ये भावना ओतण्याचं काम करतो. त्याला पुस्तकं वाचायला देतो, त्यामध्ये कसल्या कसल्या सीडी, डिव्हीडी फिड करतो. (सगळंच भन्नाट)चुकीची लाईन...

वशीकरणच्या या प्रयत्नांना चांगलंच यश येतं आणि चिट्टीमध्ये भावना निर्माण होतात. तो चिडतो, रागावतो, खूष होतो आणि प्रेमही करु लागतो. पण चिट्टीचा नेम चुकतो आणि तो वशीकरणच्या प्रेयसीवरच (ऐश्वर्या राय) लाईन मारायला लागतो. तेव्हापासून वशीकरण आणि चिट्टीचं फाटायला लागतं. ऐश्वर्या चिट्टीला अनेकदा समजावून सांगते पण तो ऐकत नाही. शिवाय वशीकरण आणि ऐश्वर्या यांची प्रायव्हसी चिट्टीमुळे धोक्यात येते. म्हणजे तसं वशीकरणला तरी वाटतं. वशीकरण, चिट्टी व ऐश्वर्या हा भासमान प्रेमाचा त्रिकोण मस्त धम्माल निर्माण करतो. एकदा तर चिट्टी ऐश्वर्याला थेट मागणीच घालतो. तेव्हा या लफडेबाजीला वैतागून वशीकरण चिट्टीला मोडून तोडून कचरा डेपोत नेऊन टाकतो. तिथून तो चेन्नईच्या फुरसुंगीत किंवा देवनारमध्ये जातो.

डॅनीला ही गोष्ट कळते. तो तिथं जाऊन चिट्टीला स्वतःच्या लॅबमध्ये नेतो. त्यामध्ये वाईट-साईट प्रवृत्ती भरतो. सीडी, डिव्हीडी, प्रोग्रॅम, चिप्स (खायचे नाही) अपलोड करतो. त्यामुळं चिट्टी आता विध्वंसक बनतो. काम डॅनीचं आणि बिल फाटतं डॉ. वशीकरणवर. चिट्टी बॉम्बस्फोट घडवितो, आगी लावतो, पेट्रोल-डिझेलचे टॅंकर पेटवून टाकतो आणि बरंच काही काही करतो. शेवटी तो स्वतः सारखे शेकडो नव्हे हजारो चिट्टी तयार करतो आणि मग चित्रपटातील स्पेशल इफेक्टसचं अस्तित्त्व जाणवायला लागतं. एकाचवेळी इतके रजनीकांत पाहून खरं तर चक्करच येते. या सा-या चिट्टींविरोधात वशीकरण एकटा लढतो. त्यांचा नायनाट करतो.

२५ मिनिटांचा क्लायमॅक्स

चित्रपटाचा हा क्लायमॅक्सचा संघर्ष तब्बल २५ मिनिटे रंगला आहे. सर्व चिट्टी एकत्र येऊन केलेली फॉर्मेशन्स आणि लष्कर, पोलिस, इतर सुरक्षा दलांचा उडविलेला फज्जा डोळे फिरविणारा. अखेर त्यांच्यापैकी एक चिट्टी मरतो आणि त्याचा रचनेचा काही मिनिटांमध्ये अभ्यास करुन वशीकरण सर्वांनाच वश करतो आणि मग ख-या चिट्टीतील दोष-वाईटपणा नष्ट करतो. पण हे सारं कसं घडतं, काय काय घडतं ते तुम्ही प्रत्यक्ष पडद्यावरच पहा.

चित्रपटामध्ये रजनीकांतची एकही फेमस स्टाईल नाही. उलट गॉगल घालण्याची नेहमीची स्टाईल त्याला जमत नाही आणि तो सर्वांप्रमाणेच साधेपणाने गॉगल घालतो, असं दृष्य दाखविण्यात आलं आहे. शिवाय डान्समध्येही रजनीचं फार कौशल्य नाही. तरीही चित्रपट भाव खाऊन जातो. हॉलिवूडच्या तोडीचा वाटतो. कारण चित्रपटामध्ये वापरण्यात आलेले स्पशेल इफेक्टस आणि तंत्रज्ञान. शिवाय प्रेक्षकांच्या मनावर जबरदस्त कब्जा मिळविणारी कथा, पटकथा आणि संवाद यामुळे तुम्ही रजनीकांतचे डाय हार्ट फॅन नसाल तरी तुम्हाला चित्रपट जरुर जरुर आवडणारंच. चिट्टी या रोबोचा थरार पाहून दोन अडीच तासात तुम्ही त्याचे फॅन बनला नाहीत तर नवल. म्हणून तर चित्रपटाच्या शेवटी जेव्हा चिट्टीला डिसमेंटल करतात (तोडतात) तेव्हा मनाला खूप वाईट वाटतं. म्हणजे मला तरी वाटलं.

मैं सोचने लगा था...

डिसमेंटल केला त्यानंतर एका संग्रहालयात ठेवण्यात येतं. २०३० मध्ये एका शाळेची स्टडी टूर तिथं येते. त्यावेळी एक विद्यार्थिनी मोडलेल्या तोडलेल्या चिट्टीकडे पाहून विचारते, हा इतका अपडेटेड आणि हुशार होता मग त्याला तोडण्यात का आलं. त्यावर चिट्टीनं दिलेलं उत्तर थेट मनाला भिडतं. चिट्टी म्हणतो मी विचार करायला लागलो होतो. अलिकडच्या हिंदी चित्रपटांत मी तरी इतका भारी आणि भिडणारा संवाद ऐकला नव्हता. मी काही खूप चित्रपट पाहत नाही. पण तरीही माझ्या मनाला हे एक वाक्य इतकं भिडलं की कोणती मुलगीही भिडली नसेल.देव आहे...

एका कॉन्फरन्समध्ये चिट्टीला विचारतात. देव आहे का. त्यावर चिट्टी विचारतो, देव म्हणजे काय. प्रश्नकर्ता उत्तर देतो, निर्माण करणारा, तयार करणारा म्हणजे देव. मग चिट्टी वशीकरणकडे पाहून म्हणतो, तसं असेल तर देव आहे. वशीकरण यांनी मला निर्माण केलंय आणि ते माझे देव आहेत. रजनीकांतवर कॅमेरा आणि हा माझा देव असा डायलॉग हे कॉम्बिनेशन पुढचे दोन-पाच मिनिटं काहीच ऐकून देत नाही. नुसत्या टाळ्या, शिट्ट्या आणि कल्ला...

एकाच वेळी विनोदी, अतिरंजीत, हृदयस्पर्शी, भविष्यातील तंत्रज्ञानाचा विचार करुन तयार केलेला हा चित्रपट मी तरी अजून एकदा पाहणार आहे. तमिळमध्ये. तुम्ही एकदा तरी पहा. किमान हिंदीत तरी.