Wednesday, August 19, 2015

हे तर महाराष्ट्र दूषण...

बी ग्रेडी पिलावळीचा बंदोबस्त करा...

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याच्या निमित्ताने निष्कारण झालेला वादविवाद आणि घुसळण यांच्यामुळे एक बरं झालं नेमकं कोण कोणत्या बाजूला आहे, हे स्पष्ट झालं. एकीकडे उठता बसता शाहू, फुले आणि आंबेडकरांचं नाव घ्यायचं, पुरोगामी महाराष्ट्र नि पुढारलेला महाराष्ट्र अशी जपमाळ ओढायची आणि दुसरीकडे जातीपातीवरून खुसपटं काढत बसायची. विशेषतः ब्राह्मणांबद्दल त्वेषानं आकस व्यक्त करायचा… अशी दुटप्पी भूमिका घेऊन भोंदूगिरी करणारे कोण आहेत, हे स्पष्ट झाले. पुरोगामीत्वाचे बुरखे टराटरा फाटले. जातीपाती निर्मूलनाची भूमिका घेऊन पुढे जाण्याच्या बाता करणाऱ्यांचे वस्त्रहरण झाले. नागव्यांची जत्रा अवघ्या महाराष्ट्राने पाहिली.


देश कुठे चालला आहे. जग कुठे चाललं आहे आणि ‘जाणता राजा’ म्हणून टेंभा मिरविणारी मंडळी लोकांना जातीपातीच्या राजकारणात गुंतवून स्वतःची पोळी भाजून घेण्यात मश्गूल आहेत. मराठ्यांचा नेता म्हणून ओळख असलेल्या या नेत्यानं ब्राह्मणांना टार्गेट करण्यासाठी ‘संभाजी ब्रिगेड’, ‘जिजाऊ ब्रिगेड’ आणि ‘मराठा सेवा संघ’ अशी जातीयवादी संघटनांची पिलावळ जन्मास घातली. खतपाणी घातलं. तरुणांची माथी भडकाविली. विषवल्ली फोफावत राहील, याची अगदी पुरेपूर काळजी घेतली. पुरोगामी महाराष्ट्रात जातीपातीची विषवल्ली पसरविणारी ही विखारी पिलावळ राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्याच काळात फोफावली. आणि त्याला खतपाणी घातलं ‘जाणत्या राजा’नंच!

महाराष्ट्रात मनसोक्त सत्ता उपभोगणाऱ्या या जाणत्या राजानं आणि त्यांच्या पक्षानं स्वतःच्या जातीसाठी, म्हणजे मराठ्यांसाठी इतक्या वर्षांत काय केलं कोणास ठाऊक? वर्षानुवर्षे सत्ता उपभोगून ही मंडळी अजूनही मागासच आहेत. आरक्षणासाठी छात्या पिटताहेत. मोर्चे काढताहेत. निषेध करताहेत. आंदोलनं करताहेत. अहो, महाराष्ट्रात ४०-४५ टक्के असलेला तुमचा समाज. पाटीलकी, देशमुखी आणि इतर गोष्टींमधून सत्ता राबविण्याची परंपरा, सत्तेत बहुतांश मंत्री, आमदार तुमच्याच जातीचे. तरीही तुमचा समाज पिछाडलेला. का बुवा? आरक्षणाची भीक मागण्यासाठी हात पसरण्याची वेळ तुमच्यावर का आली? याचा विचार आधी करा. मग बाबासाहेब पुरंदरे, समर्थ रामदास, दादोजी कोंडदेव यांच्या बदनामीची मोहीम उघडा. 



आणि तुम्ही ज्यांच्या नावाने खडे फोडताय, त्यांना संपविण्यासाठी आंदोलनं उभारताय, तीन टक्क्यांचं अस्तित्व संपविण्यासाठी जीवाचं रान करताय, तो ब्राह्मण समाज अनेक वर्षांपासून लढतोय, झटतोय आणि स्वतःचे महत्त्व दाखवून देतोय. बुद्धीच्या, ज्ञानाच्या, कष्टाच्या, मेहनतीच्या आणि परिश्रमाच्या जोरावर आजही प्रचंड विरोधाच्या जमान्यातही तग धरून आहे. याचा कधी तरी विचार कराल की नाही? महाराजांच्या नावानं राजकारण करणं आणि जातीयवात पसरविण्याचे धंदे बंद करा. ब्राह्मणच नाही, तर सर्वच जातीमधील कष्टाळू आणि परिश्रम घेण्याची तयारी असलेल्या प्रत्येकाचेच भवितव्य उज्ज्वल आहे. फक्त आरक्षणाने काहीही साध्य होत नाही, हे कधीतरी समजून घ्या. कष्ट करणं हे भांडारकर फोडण्याइतकं सोप्प नाही, हे कधीतरी तुमच्या कार्यकर्त्यांना सांगा. 

तर मुद्दा मराठा सेवा संघ आणि बी ग्रेडी संघटनांचा. मुळात शिवकालातील ब्राह्मण लोकांनाच टार्गेट करण्यासाठी या लोकांनी अभियान राबविलं. समर्थ रामदास हे ब्राह्मण करा त्यांना टार्गेट. दादोजी कोंडदेव ब्राह्मण करा त्यांना टार्गेट. अफझलखानाचा वकील कोणतरी कुलकर्णी म्हणजे ब्राह्मण. करा ब्राह्मणांना टार्गेट. ही मंडळी बाजीप्रभू देशपांडे यांनाही टार्गेट करायला निघाली होती. देशपांडे म्हणजे ब्राह्मणच अशी यांची धारणा. पण या येड्याखुळ्यांना कुठे माहितीये की सीकेपींमध्येही देशपांडे हे आडनाव असतं. बाजीप्रभू देशपांडे हे ब्राह्मण नव्हे तर सीकेपी होते. ही गोष्ट पुढे आल्यानंतर मग बी ग्रेडींचा कार्यक्रम मावळला. दुर्दैवाने बाबासाहेबांचं आडनाव पुरंदरे. म्हणजे ब्राह्मण. मग तेही या बी ग्रेडींच्या ‘टार्गेट लिस्ट’वर आले. 



स्वराज्याची चर्चा करताना कसला जातीपातीचा मुद्दा उपस्थित करता. जातींवर चर्चा करता. स्वराज्य आणि शिवाजी महाराज ही काय एकट्या मराठ्यांची जहागिरी आहे का? तुमच्याकडे शिवाजी महाराज या नावाचा मालकी हक्क कुणी दिलाय का? महाराज सर्वांचे आहेत. सर्व जातीधर्मांचे आहेत. फक्त महाराष्ट्राचे नाहीत, तर अवघ्या हिंदूराष्ट्राचे आहेत. ते होते म्हणून आज आपण आहोत, याची जरा तरी जाणीव ठेवा. स्वराज्य उभारण्यात अठरापगड जातींचा वाटा आहे, हे कसं विसरून चालेल आणि ही गोष्ट मान्य करावीच लागेल. अठरापगड जातींप्रमाणेच ब्राह्मणांनीही स्वराज्य उभारणीत योगदान दिलेलेच आहे. सिंहाचा वाटा नसेलही, पण खारीचा आहेच आहे. इतिहास संशोधक त्याबद्दल अधिक बोलू शकतील. तो माझा प्रांत नाही.

शिवाजी महाराजांकडे जसं जातीच्या चष्म्यातून पाहण्याची गरज नाही तसंच शिवरायांच्या कोणत्याही सरदाराकडे वा शिवकालीन व्यक्तिमत्वाकडे जातीच्या नजरेतून पाहण्याची गरज नाही. अहो, शाळेत असताना दादोजी कोंडदेव यांचं आडनाव कुलकर्णी होतं हे कोणाला तरी माहिती होतं का? ते ब्राह्मण होते, हे देखील माहिती नव्हतं. त्यामुळं त्याचा अभिमान बाळगण्याची आवश्यकताच नव्हती. कोंडदेव हे महार, माळी, कोळी, चांभार किंवा आणखी कोणत्या तरी जातीतील असते, तरीही आम्हाला त्यांच्याबद्दल आदरच असता. आकसाने त्यांचा पुतळा हटविण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो नसतो. बी ग्रेडींच्या जातीपातीच्या राजाकारणामुळं दादोजींचं आडनाव कुलकर्णी होतं हे कळलं. फक्त ब्राह्मण म्हणून द्वेष करायचा. गुरू म्हणून तर नाकारायचंच पण तो माणूसच अस्तित्वात नव्हता, असेही दावे करायचे. कशामुळे तर फक्त ते ब्राह्मण होते म्हणून. ही कुठली दळभद्री वृत्ती. 

बाबासाहेबांच्या लिखाणावर आक्षेप घेणार कोण? बिनबुडाचे दावे करणार कोण श्रीमंत कोकाटे? इतिहास संशोधनात यांचे योगदान काय? महाराज गेले त्या किती ठिकाणी हा माणूस गेला? किती फिरला? किती कागदपत्रे यांनी तपासली आणि अभ्यासली. किती भाषांमधली कागदपत्रे पाहिली? फ्रेंच, इंग्रजी, फारसी, पर्शियन, मोडी आणि इतर किती भाषा इतिहासाची ओळख करून घेण्यासाठी आत्मसात केल्यात. त्यांची साथ कोण देणार पुरुषोत्तम खेडेकर. अहो, या खेडेकरचा आणि इतिहासाचा काय संबंध? ब्राह्मण बायका त्यांचे लैंगिक समाधान मराठ्यांकडून करून घ्यायच्या आणि उत्तान कपडे घालून काय काय करायच्या असलं बीभत्स नि अश्लील लिखाण करणारा हा खेडेकर कोर्टात शेपूट घालतो. बिनशर्त माफी मागतो आणि पुस्तक मागे घेतो. असली कोकाटे नि खेडेकर ही मंडळी बाबासाहेब पुरंदरेंच्या लेखनावर आक्षेप घेणार? बरं अत्यंत वाईट शब्दात लिहिणाऱ्या खेडेकरला शिक्षा काय तर काहीच नाही. फक्त माफीनामा आणि पुस्तक परत घेण्यावर भागलं. 
(खेडेकरच्या लेखणीची लायकी कळावी, म्हणून त्याच्या पुस्तकातील ब्लॉगमध्ये काही पानांचे जेपीजी मुद्दाम टाकले आहेत.)



अहो, बाबासाहेबांच्या पासंगाला तरी ही मंडळी पुरणार आहेत का? बाबासाहेबांनी जेवढं लेखन केलंय आणि जेवढी व्याख्यानं दिलीयेत तेवढं या मंडळींनी ऐकलं आणि वाचलं तरी आहे का? ‘जाणता राजा’ सारखं महानाट्य बाबासाहेबांनी उभं केलं, जगभर पोहोचविलं, त्यासाठी किती कष्ट त्यांनी उपसलेत हे पाहण्याचं भाग्य मला मिळालंय. त्यांच्या नाटकात सहभागी होण्याचं भाग्य आम्हाला मिळालंय. तुम्ही काय केलंय शिवराय जगभर पोहोचविण्यासाठी? अहो, ज्या माणासावर समोरच्या व्यक्तीच्या वयाचा मान ठेवण्याचे संस्कारही नाहीत, ती व्यक्ती काय लायकीची आहे, हे सांगायला कोणाचीही आवश्यकता नाही. आणि जितेंद्र आव्हाड सारखा बोलका पोपट असल्या दळभद्री लेखकांची तुलना बाबासाहेबांच्या लेखनाशी करतो. आव्हाडांनी खेडेकरच्या पुस्तकातील आक्षेपार्ह लेखनाबद्दल आधी बोलावे आणि मग इतिहासाचे ज्ञान पाजळावे. एक लक्षात ठेवा. बाबासाहेब ‘महाराष्ट्र भूषण’ आहेत, तर तुम्ही ‘महाराष्ट्र दूषण’ आहात.

पुरोगामी महाराष्ट्रात इतक्या नीच पातळीवर जाऊन जातीय राजकारण करणारी ही मंडळी महाराष्ट्राला लागलेली कीड आहे. अहो, महाराजांनी काय फक्त मराठ्यांच्या जोरावर स्वराज्य उभारलं नाही. मदारी मेहतर, जिवा महाला, शिवा काशीद, नेताजी पालकर, हिरोजी फर्जंद, दौलतखान आणि अशी असंख्य सरदार मंडळी मराठा होती का हो? प्रत्येक गोष्टीत जातपात पाहण्याचे संस्कार माझ्यावर नाहीत. घरातूनही नाही आणि ज्या संघटनेत वाढलो तिथंही नाही. पण किमान आडनावावरून तरी वाटत नाहीत. खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ, रांझेगावचा बाबाजी पाटील, जावळीचे चंद्रराव मोरे ही मंडळी मराठा होती का? हे देखील बी ग्रेडींनी तपासावं एकदा. म्हणजे महाराजांसाठी लढणारे कोण होते नि त्यांच्या विरोधात कोण होते, हे जगासमोर येऊ दे. होऊ दे चर्चा. जातपात काढण्याची गरज नाही. पण तुम्हाला खुमखुमीच असेल जात काढायचीच असेल तर सर्वांचीच जात काढा.

अगदी जाणतेपणी जातीपातीचे राजकारण करणारी ही नीच आणि दळभद्री वृत्ती तातडीने नष्ट करण्याची आवश्यकता आहे. अशी प्रवृत्ती पसरविणाऱ्या आणि विशिष्ट समाजाला टार्गेट करण्यासाठी संघटनांची पिलावळ प्रसृत करणारे नेते स्वकर्मानेच नष्ट होतील. पण हा विखारी विचार नष्ट करण्याचे आव्हान मोठे आहे. आपल्याला जिथे जमेल, जसे जमेल तशा पद्धतीने हा विचार खोडून काढण्यासाठी, हा विखार नष्ट करण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. ही विषवल्ली ठेचून काढण्यात सर्वाधिक जबाबदारी सरकारची आहे. इतकी वर्षे जाणत्या राजांचेच राज्य होते. आता मात्र, अशा विखारी विचारांच्या लोकांचा देवेंद्र फडणवीस सरकारने चोख बंदोबस्त करावा, ही आमची आग्रहाची विनंती आहे.



जाता जाता एकच गोष्ट सांगतो. परवा एका छोटेखानी कार्यक्रमात बाबासाहेब पुरंदरे यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी अगदी थोडक्यात पण मार्मिकपणे बाबासाहेब बोलले. ते म्हणाले, ‘परिस्थिती सर्वांना माहिती आहे. जे आहे ते सगळं तुमच्यासमोर आहे. जास्त बोलत नाही. एकच सांगतो, दुसऱ्याची रेघ छोटी करण्यासाठी स्वतःची रेघ मोठी करावी लागते. स्वतःची रेघ मोठी करा, म्हणजे दुसऱ्याची रेघ आपोआप छोटी होईल.’ 

वयाची ७० वर्षे इतिहासाची अखंड तपश्चर्या करून आखलेली रेघ छोटी करण्यासाठी दुसरी मोठी रेघ ओढण्याचे सामर्थ्य ना तुमच्यात आहे ना तुमच्या पुढील पिढ्यांमध्ये आहे. कारण फक्त आरक्षण मागून स्वतःची रेघ मोठी होत नाही. जाळपोळ, फोडाफोडी नि आकांडतांडव करून आपली रेघ मोठी होत नाही. टीव्हीवरच्या चर्चांमध्ये शिरा ताणून आणि आवाज चढवून आपली रेघ मोठी होत नाही. त्यासाठी आयुष्य खर्ची घालावं लागतं. हजारो-लाखो ग्रंथ आणि दस्तऐवज हाताखालून घालावे लागतात. देशोदेशीच्या भाषा अवगत करून घ्याव्या लागतात. प्रसंगी स्वतःच्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून संसार करावा लागतो. बाबासाहेबांनी ही कठोर तपश्चर्या यशस्वीपणे पूर्ण केली म्हणून ते आज इथं आहेत. त्या तपश्चर्येतील त लिहायचीही तुमची लायकी नाही, हे ध्यानात असू द्या…

संबंधित ब्लॉग...
ब्राह्मण समाजाचे नामोनिशाण मिटवा