Friday, November 30, 2007

"कावेरी'चा मटण रस्सा-भाकरी कचकून खा!


उन्हाळ्यात मस्तानी किंवा आइस्क्रीम, पावसाळ्यात गरमागरम भजी आणि वाफाळलेला चहा; तर हिवाळ्यामध्ये घाम काढणारा झणझणीत तांबडा रस्सा ! थंडीचा कडाका जसजसा वाढेल, तसतशी झणझणीत रस्सा ही खासियत असणाऱ्या हॉटेलांमधील गर्दी दुणावत जाईल. त्याच त्याच ठिकाणी जाऊन कंटाळला असाल आणि यंदाच्या थंडीमध्ये गावाबाहेर जाऊन एखाद्या नव्या "स्पॉट'ला जाऊन आडवा हात मारण्याची तुमची इच्छा असेल, तर वाघोली गावातील "हॉटेल कावेरी' या अस्सल गावरान "रेस्तरॉं'ला भेट द्याच!

नरसिंग भाऊसाहेब सातव-पाटील यांनी 1996 मध्ये "कावेरी हॉटेल' सुरू केले. प्रारंभी फक्त मित्रांसाठी ते मटण बनवायचे; पण हॉटेल सुरू करावे, हा त्यांच्या मित्रांचाच आग्रह. सुरवातीच्या काळात ते स्वतः पदार्थ तयार करायचे. आताही त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पदार्थ तयार होत असल्यामुळे जुनी चव कायम आहे, असे अनेक वर्षांपासून "कावेरी'त जाणारी मंडळी सांगतात. सकाळी 11 ते रात्री 11 या कालावधीत "कावेरी' सुरू असते, अशी माहिती व्यवस्थापक शरद द. पवार यांनी दिली.

वाघोलीसह आता "कावेरी'च्या एकूण पाच शाखा आहेत. मार्केट यार्ड (कृषी उद्योग भवन), पुणे-सोलापूर रस्ता (शेवाळेवाडी), कोथरूड (चांदणी चौक), देहूरोड- कात्रज बाह्यवळण मार्ग (बालेवाडी जकात नाक्‍याजवळ) येथेही "कावेरी'चे बस्तान बसले आहे. राज्यातील इच्छुक तरुणांना एक वर्ष स्वतः मार्गदर्शन करून त्यांना त्यांच्या गावी "कावेरी'च्या शाखा उघडण्यासाठी साह्य करण्याची योजना आहे, असे सातव-पाटील सांगतात.

महामार्गांवर असणाऱ्या ढाब्यांपेक्षा "कावेरी'चा चेहरा काही फार वेगळा नाही. तेथे तुम्हाला पार्किंगची समस्या जाणवणार नाही. शिवाय "फॅमिली'साठी स्वतंत्र व्यवस्था असल्याने सहकुटुंब जाण्यासही हरकत नाही. आणखी एक जाणवणारी गोष्ट म्हणजे स्वच्छता. एकाच वेळी शंभर जण बसू शकतील इतकी टेबले असल्यामुळे जास्त थांबावेही लागत नाही. दरही सर्वसामान्यांच्या आवाक्‍यातील आणि "प्लेट' पद्धत नसल्यामुळे भरपेट जेवणाचा आनंदही लुटता येतो. मांसाहारी जेवणासाठी प्रसिद्ध असलेल्या कावेरीत झणझणीत झुणका, भरलं वांगं आणि तर्रीबाज मटकीची उसळ हा अस्सल मराठमोळा "मेनू' असलेली शाकाहारी थाळीही मिळते.

"कावेरी'ची खासियत म्हणजे बोल्हाईचे मटण! मटण थाळीमध्ये मिळणारे रस्सा मटण हे त्यातही विशेष. रस्सा ओरपल्यानंतर भर थंडीतही घाम फुटला नाही तर बोला ! पण झणझणीत म्हणजे नुसताच "जाळ' नाही. तिखटापेक्षा मसाल्याचा वापर अधिक असल्यामुळे रस्सा खाल्ल्यानंतरही जळजळ किंवा इतर त्रास होणार नाही, याची काळजी सातव-पाटलांनी घेतली आहे. रस्सा मटण आणि ज्वारी किंवा बाजरीची भाकरी इतकेच जरी खाल्ले तरी तुम्ही खूष व्हाल. त्याच्या जोडीला सुकं किंवा अळणी मटण, मसालेदार मटण फ्राय व मसालेदार कलेजी फ्राय असे मटणाचे विविध प्रकार "कावेरी'मध्ये उपलब्ध आहेत. जोडीला आहे मटण सूप!

मटण शिजवतानाच त्यात मीठ आणि हळद घातली जाते. मटणाचे तुकडे शिजल्यानंतर ते पाणी "मटण सूप' म्हणून "सर्व्ह' केले जाते; तर हळद आणि मिठाची चव मुरलेले मटण अळणी मटण (सुकं) म्हणून दिले जाते. मसाल्यांचा वापर नसल्याने अळणी मटणात खरा स्वाद समजतो. हेच मटण मसाले घालून "फ्राय' केले, की झाले "मटण फ्राय.' "मटण फ्राय'ही तर्रीबाज आणि रसरशीत. इथला आणखी एक चविष्ट पदार्थ म्हणजे "कलेजी फ्राय.' मटण शिजवून घेतल्यानंतर त्यात असलेले कलेजीचे काही तुकडे वेगळे काढले जातात. ते मीठ, मसाला, तिखट घालून "फ्राय' केले जातात. ही "डिश'ही खाऊन बघण्यासारखी आहे. मटण रस्सा आणि भाकरी यावर कचकून ताव मारा; पण पोटात थोडी जागा ठेवा भातासाठी. बासमती तांदळापासून बनविलेला पांढरा भात, झणझणीत रस्सा आणि झणझणीतपणा वाढविणारा "कावेरी खर्डा' हे "कॉंबिनेशन' खाऊन बघितले नाही तर तुमची "कावेरी'ला भेट व्यर्थ!

नेहमी त्याच त्याच ठिकाणी जाऊन वैतागला असाल तर किमान एकदा तरी "कावेरी'त जायला करायला काय हरकत आहे ? एकदा का तेथे गेलात तर तुम्ही पुन्हा गेल्याशिवाय राहणार नाही, हे निश्‍चित!


चहाची टपरी ते "कावेरी'

नरसिंग सातव यांचे वडील वाघोलीच्या जुन्या एसटी स्टॅंडवर चहाची टपरी चालवायचे. टपरीवर गिऱ्हाईक आल्यानंतर त्यांच्याकडूनच आगाऊ पैसे घेऊन मग चहा, साखर आणि दुधाची खरेदी व्हायची. वडिलांची इतकी हलाखीची परिस्थिती होती. आपल्या पोराने मोठे हॉटेल टाकावे, अशी वडिलांची इच्छा होती. ती आता पूर्ण झाली आहे, असे सातव-पाटील सांगतात.

Friday, November 23, 2007

इच्छाभोजनी "वूडलॅंड्‌स'


"रेस्तरॉं'मध्ये जायचे म्हटले की पहिला प्रश्‍न निर्माण होतो, कोठे जायचे? कोणाला पंजाबी खायचे असते तर कोणाला चायनीज. कोणाला "साउथ इंडियन' आवडते; तर कोणाला साधे घरच्यासारखे जेवण. एखाद्याला "मॉकटेल्स' प्रिय; तर दुसरा म्हणतो फालुदा पाहिजे. प्रत्येकाच्या नाना तऱ्हा! पण आता सर्वांच्या आवडीनिवडी एकाच ठिकाणी पूर्ण होऊ शकतात. हे ठिकाण म्हणजे एरंडवण्यातील "वूडलॅंड्‌स!' एखादा पदार्थ तुम्हाला तुमच्या पद्धतीने तयार हवा असेल, तर तसे "इच्छाभोजन'देखील येथे उपलब्ध आहे.

"वूडलॅंड्‌स'ची सुरवात सुमारे दीड वर्षांपूर्वीची ! नावाप्रमाणेच "रेस्तरॉं'मध्ये "वूड'चा पुरेपूर व योग्य वापर केलेला आढळतो. "फ्लोअरिंग'प्रमाणेच सजावटीसाठीही लाकडाचाच उपयोग केल्याने आत शिरताच "वूडलॅंड्‌स'चा "फील' येतो. रेस्तरॉं प्रशस्त आहे. त्यामुळे परिसरात "आयटी' कंपन्या असल्या तरी जागेसाठी ताटकळावे लागत नाही. "वूडलॅंड्‌स'च्या मालक आहेत सायली मुंदडा.
"वूडलॅंड्‌स'मध्ये वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थ उपलब्ध असले, तरी येथील वैशिष्ट्य म्हणजे दाक्षिणात्य पदार्थ! साध्या इडलीप्रमाणेच कांचीपुरम इडली व रस्सम इडली, मसाला किंवा म्हैसूर डोशाप्रमाणेच स्प्रिंग, चॉप्सी डोसा, पालक डोसा; तसेच मंगळूर डोसा असे इतर प्रकारही उपलब्ध आहेत. दाक्षिणात्य थाळी हे "वूडलॅंड्‌स'चे वेगळेपण. दोन भाज्या, सांबार, रस्सम व मुबलक प्रमाणात भात. शिजवून अगदी बारीक करून घेतलेली तूरडाळ, शिजविलेल्या भाज्या व मसाला यांच्यापासून तयार केलेले रस्सम पिऊन तर बघा! फोडणीला टाकलेल्या कढीलिंबाच्या पानांचा स्वाद रस्समची लज्जत वाढवितो.
वास्तविक "दाक्षिणात्य थाळी'मध्ये पोळ्या किंवा पुऱ्यांची बात नस्से. पण पुण्यातील मंडळींना जेवण पूर्ण झाल्याचे समाधान पोळीशिवाय मिळत नसल्याने "दाक्षिणात्य थाळी'तही पोळी किंवा पुरी दिली जाते. थोडक्‍यात काय, भरपूर भात ओरपायचा असेल, तर "वूडलॅंड्‌स'मध्ये जाच! जिरा राइस, कर्ड राइस, बिर्याणी, पुलाव, कढी खिचडी, पुदिना पुलाव याशिवाय बिसी ब्याळी हुळी अन्न, लेमन राइस, टोमॅटो राइस, पुलिवदा राइस असे खास दाक्षिणात्य भातांचे अनेक चविष्ट प्रकार येथे उपलब्ध आहेत.
तुम्ही जाल तेव्हा बिसी ब्याळी राइस आवर्जून मागवा. फ्लॉवर, गाजर, मटार व फरसबी या भाज्या, तूरडाळ, तांदूळ व मसाला हे एकत्रितपणे शिजवून "बिसी ब्याळी' तयार करतात. हा भात थोडा सरसरीत, चवीला आंबट व तिखटही असतो. "टोमॅटो राइस'ही अगदी वेगळ्या पद्धतीचा. भात शिजवतानाच तो "टोमॅटो प्युरी' शिजवला की खराखुरा "टोमॅटो राइस' तयार! "पुलिवदा राइस' हा मसालेभाताच्या जवळ जाणारा. याची चवही आंबट व तिखट. भात व मसाला एकत्र परतून घेतला जातो. त्यानंतर चिंचेचा कोळ टाकून तांदूळ शिजवला जातो. अशा पद्धतीने तयार होणारा "पुलिवदा राइस'ही अनेकांच्या पसंतीस उतरतो.
रेस्तरॉंचे व्यवस्थापक सुनील मराठे यांनी "महाराष्ट्रीय पिझ्झा' हा वेगळा प्रयोग केला आहे. ब्रेडचा बेस घेऊन त्यावर उकडलेल्या बटाट्यांपासून तयार केलेले सारण थापले जाते. हा ब्रेड कमी तेलात थोडा वेळ "फ्राय' केला जातो. हिरवी-लाल चटणी किंवा टोमॅटो सॉस; तसेच शेव टाकून ते "गार्निश' केले जाते. हा "पिझ्झा'देखील "वूडलॅंड्‌स'चे वैशिष्ट्यच म्हटले पाहिजे. "वूडलॅंड्‌स'मधील पनीर गिलोटी आणि पनीर गिलोटी मसाला या दोन पंजाबी डिश विशेष प्रसिद्ध आहेत. सर्व प्रकारच्या भाज्या एकत्रितपणे शिजवून त्यात मसाले व "चीज' टाकून "स्टफ' तयार केले जाते. पनीरचे चौकोनी तुकडे करून त्यामध्ये हे "स्टफ' भरले जाते. मग हे "पनीर सॅंडविच' तेलावर हलकेच "फ्राय' केले जातात. असे "फ्राय' पनीर सॅंडविच म्हणजेच पनीर गिलोटी! असे "फ्राय' पनीर सॅंडविच टोमॅटो आणि मसालेदार "ग्रेव्ही'ने "गार्निश' केले की तयार होतो "पनीर गिलोटी मसाला.'
"वूडलॅंड्‌स'चे जाणवणारे वेगळेपण म्हणजे "इच्छाभोजन'! मसालेदार व त्याच त्याच भाज्या खाऊन तुम्हाला कंटाळा आला आहे; त्यामुळे तुम्हाला लसणाची फोडणी दिलेली मेथीची परतून केलेली भाजी खायची इच्छा झाली आहे किंवा कारल्याची पंचामृतासारखी भाजी खायची असेल, तर "वूडलॅंड्‌स'चे बल्लव तुमची इच्छा पूर्ण करण्यास तयार आहेत! थोडक्‍यात काय, तर "रेस्तरॉं'च्या "मेनूकार्ड'वर अवलंबून राहण्याची गरज नाही. तुम्ही फर्माईश करा आणि ती पूर्ण करू, अशीच ही योजना आहे.

"वूडलॅंड्‌स'
(श्रीनिवास फूड्‌स)
13-2 वेंकटेश्‍वर हाऊस,
शारदा सेंटरजवळ,
एरंडवणा,पुणे- 411 004.
020- 25422422

Friday, November 16, 2007

129 वर्षांची विश्‍वसनीय चव!

चार पिढ्यांची विश्‍वसनीय वाटचाल, वर्षानुवर्षे कायम राहिलेला पदार्थांचा स्वाद, यजमानांचे प्रेमळ आदरातिथ्य व जुन्या वास्तूमध्ये होणारा परंपरेचा साक्षात्कार, अशा अफलातून मसाल्यांच्या मिश्रणातून तयार झालेले अस्सल पारशी पदार्थ मिळतील कॅंपातील सरबतवाला चौकाजवळ असलेल्या "दोराबजी अँड सन्स' या 129 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या रेस्तरॉंमध्ये!
दोराबजी सोराबजी यांनी 1878 मध्ये हे रेस्तरॉं थाटले. प्रारंभी चहा-बिस्कूट आणि बनमस्का असे पदार्थ तेथे मिळत. पण रेस्तरॉंला मिळणारा प्रतिसाद पाहून नंतर त्यांनी इतर पदार्थ बनविण्यासही प्रारंभ केला. सोराबजी यांचे नातू नवल, तसेच मर्झबान व केटरिंगचे यथायोग्य शिक्षण घेतलेला पणतू दरायस हे "दोराबजी'ची परंपरा पुढे नेण्याच्या प्रयत्नांत आहेत. गेल्याच्या गेल्या शतकात सुरू होऊनही पूर्वीपेक्षा अधिक जोमाने सुरू असलेले "दोराबजी' हे कदाचित पुण्यातील एकमेव रेस्तरॉं असावे.

मुस्लिम व पारशी हे दोन्ही समाज शेकडो वर्षांपूर्वी इराणमधून भारतात आले आणि त्यातील काहींनी रेस्तरॉंचा व्यवसाय सुरू केला. पुण्यात इराण्यांची अनेक रेस्तरॉं मिळतील, पण पारश्‍यांचे एखाद-दुसरेच! दोन्ही ठिकाणी मिळणारे पदार्थ बहुतांश सारखेच. फरक इतकाच, की इराणी मुस्लिमांचे मसाले सौम्य, तर पारशी मंडळींचे काहीसे उग्र! "रेस्तरॉं'साठी आवश्‍यक मसाले स्वतःच तयार करण्यापासून ते सर्व पदार्थ कोळशाच्या शेगडीवरच तयार करण्याची परंपरा चौथ्या पिढीनेही आग्रहपूर्वक जपली आहे. इतकेच काय, "रेस्तरॉं'ची जुनी इमारत जशीच्या तशी आहे. लाकडी खुर्च्यांऐवजी प्लॅस्टिकच्या खुर्च्या व लाकडी टेबलांवरील "मार्बल टॉप' गायब झाला, हाच काय तो फरक!

"दोराबजी'ची खासीयत म्हणजे दालगोश, चिकन किंवा मटण सालीगोश, मटण किंवा चिकन धनसाक, पात्रा फिश, शामी कबाब आणि "कस्टर्ड' हे पारशी पदार्थ! "दालगोश' हा दालचाचा भाऊ. फक्त मसाले पारशी पद्धतीचे व पुदिन्याचा स्वाद. तूर, मूग व मसूर अशा डाळी आणि भोपळा, वांग्यासह इतर भाज्या एकत्रितपणे शिजविल्या जातात. ही झाली दाल. मग त्यात चिकन अथवा मटण घालून ते सहा ते सात तास शिजविले जाते. अशा पद्धतीने तयार होतो दालगोश. चिकन किंवा मटण "दालगोश' आणि विशिष्ट मसाले वापरून तयार केलेला "ब्राऊन राईस' अशी एकत्रित डिश म्हणजे "धनसाक'.

"पात्रा फिश'ची तर बातच काही और. पॉम्फ्रेट मासा घेऊन त्याला उभे-आडवे छेद दिले जातात. आले, लसूण व मसाल्याचे पदार्थ वापरून तयार केलेली चटणी थापून मासा केळीच्या पानात ठेवून वाफेवर शिजविला जातो. अशा पद्धतीने शिजविला गेलेला गरमागरम "पात्रा फिश' उदरभरणासाठी "सर्व्ह' करतात. शामी कबाब म्हणजे पारशी मसाले वापरून तयार केलेला मटण कबाब. हा कबाब "धनसाक'बरोबर खाण्याची पद्धत आहे. जेवणाचा शेवट गोडानेच करायचा, अशी तुमची इच्छा असेल तर तुमच्यासाठी "स्पेशल कस्टर्ड' आहे. साखरयुक्त दूध गुलाबी व थोडेसे घट्ट होईपर्यंत आटवून नंतर त्यात फेटलेली अंडी टाकायची. हे मिश्रण थोडेसे गरम करून नंतर "बेक' करायचे. ही झाली "कस्टर्ड'ची "रेसिपी'!

अर्थात, यापैकी काही पदार्थ फक्त रविवारीच तयार केले जातात. पण मटण पाया, मटण ब्रेन मसाला, लिव्हर मसाला यांच्यासह बिर्याणी, खिमा आदी पदार्थ दररोज असतात. बिर्याणीमध्ये जाणविणारा मिरी व लवंग यांचा स्वाद, "खिमा'मध्ये होणारा टॉमेटोचा वापर, "साली गोश'मध्ये वापरले जाणारे "पोटॅटो चिप्स', टोमॅटो करी व फेटलेल्या अंड्यात "फ्राय' होणारे चिकन-मटण, चिकन-मटण कटलेट फेटलेल्या अंड्यामध्ये बुडवून तळल्यामुळे येणारी अफलातून चव, ही "दोरबजी'ची वैशिष्ट्ये!

अगदी कर्वे रस्ता, प्रभात रस्ता व औंध भागातून नियमितपणे येथे येणारे ग्राहक आहेत. काय, तुम्हालाही त्यामध्ये सामील व्हायचे आहे? मग वाट कसली पाहत आहात? सदाबहार "नवल अंकल' तुमचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत.


दोराबजी अँड सन्स
845, दस्तूर मेहेर मार्ग,
सरबतवाला चौकाजवळ,
पुणे 411001.
020-26145955
020-26834595

Friday, November 09, 2007

सिगरी रेस्तरॉ

फराळानंतर अनुभवा "कबाब'चा रुबाब!

सध्या तुम्ही दिवाळीच्या फराळाचा फडशा पाडत असणार...! होऊ द्या व्यवस्थित फराळ...पण फराळाचे खाऊन खाऊन कंटाळा आल्यानंतर चवीत थोडासा "चेंज' तुम्हाला नक्कीच हवासा वाटेल. फराळाच्या गोडधोड पदार्थांनंतर चटकदार असे काही तरी पाहिजेच ना? मग अगदी बिनधास्तपणे "सिगरी'मध्ये जा!

ढोले-पाटील रस्त्यावर हे "रेस्तरॉ' आहे. "स्पेशालिटी रेस्तरॉ ग्रुप'ने 2006 मध्ये सुरू केलेल्या "सिगरी'चे ठळक वैशिष्ट्य म्हणजे आकर्षक इंटिरियर, शेगडीतील प्रज्वलित अग्नी भासावा अशा पद्धतीने केलेली वैशिष्ट्यपूर्ण प्रकाशरचना, मंद प्रकाशाच्या जोडीला हळुवार आवाजातील मधुर संगीत, अत्यंत सुटसुटीत आसनव्यवस्था व तत्पर सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून होणारे आदरातिथ्य!

शिवाय संध्याकाळी "एसी'ऐवजी मोकळ्या हवेत बसून खाण्याचा आस्वाद घेण्याची सुविधाही "सिगरी'मध्ये आहे. संध्याकाळी "बार्बेक्‍यू'चा पर्यायही तुमच्यासाठी उपलब्ध आहे. "बार्बेक्‍यू' म्हणजे काय, हा प्रश्‍न तुम्हाला नक्कीच पडला असेल. एका टेबलच्या खालच्या बाजूने मध्यभागी कोळशाची शेगडी ठेवण्याची व्यवस्था केलेली असते. त्या शेगडीवर तुम्ही तुम्हाला हवे तशा पद्धतीने कबाब भाजून खाऊ शकता. हेच बार्बेक्‍यू.

"सिगरी'ची खासियत असलेल्या "कबाब'वरच तुम्ही अधिक ताव मारावा, अशा स्वरूपाची योजना आखण्यात आली आहे. ही योजना म्हणजे, "बार्बेक्‍यू'मध्ये तुमच्या आवडीचे कबाब हवे तितके भाजून मनसोक्त खा. "अनलिमिटेड' कबाब खाल्ल्यानंतर जर तुम्हाला, एखादी रोटी, "ग्रेव्ही'युक्त व्हेज अथवा नॉनव्हेज पदार्थ व बिर्याणी खायची असेल तर तुम्हाला नव्याने "ऑर्डर' देण्याची गरज नाही. तुमच्यासाठी "बुफे' तय्यार! "सिटिंग' व "स्टॅंडिंग' अशा दोन्ही प्रकारात "बुफे' उपलब्ध आहे. "अनलिमिटेड' कबाब खाल्ल्यानंतर "बुफे'मध्ये तुमच्यासाठी दोन व्हेज सब्जी, एक नॉनव्हेज पदार्थ, रोटी, लच्छा पराठा, दाल, व्हेज किंवा नॉनव्हेज बिर्याणी आणि एक "डेझर्ट' किंवा "फ्रुट प्लेट' असा भरगच्च मेनू ठेवण्यात आला आहे.

उत्तर भारतीय पदार्थ ही "सिगरी'ची खासियत. पण त्यातही पसंती द्या कबाबलाच! मखमली मकई सिक, मुलतानी चाट, पनीर रावळपिंडी, शबनम कस्तुरी यांच्यासह दहा ते बारा "व्हेज' व अमृतसरी मछली, दक्षिणी मुर्ग, बुऱ्हा कबाब, रान-ए-सिगरी यांच्यासह जवळपास पंधरा "नॉनव्हेज' कबाब तयार आहेत. शाकाहारी पदार्थांच्या यादीत तवा सब्जी, काश्‍मिरी दम आलू, जाफरानी मलई कोफ्ता, पिंड दा चना व कुरकुरी भिंडी यांच्यासह अनेक पदार्थांची रेलचेल आहे. पण "दाल सिगरी' नक्की "ट्राय' करा. मसुरीची डाळ, टोमॅटो प्युरी व लोणी यांच्यापासून तयार केलेली "दाल सिगरी' खाण्यासाठीच काही जण येथे येतात.

दही मेथी मछली, कोलकत्याहून खास येणाऱ्या माशापासून बनविलेला तंदुरी बेटकी मसाला, गोश्‍त लजीज, मुर्ग खुर्चन यांच्याप्रमाणेच "धनिया मुर्ग' ही "सिगरी'ची "स्पेशालिटी'. धने व कोथिंबीर यांच्या "गेव्ही'पासून बनविलेल्या "धनिया मुर्ग'चा स्वाद काही औरच! "डेझर्ट'च्या यादीत काश्‍मिरी "फिरनी', कमळाच्या बिया वापरून बनविलेले "मखनावाली आइस्क्रीम' आणि "मालपुवा विथ रबडी' या थोडाशा "हट के' पदार्थांचा समावेश आहे.

सकाळी 11.30 ते दुपारी 3.30 आणि सायंकाळी 7.30 ते रात्री अकरा या वेळेत "सिगरी' सुरू असते. ढोले-पाटील रस्त्यासारख्या "पॉश' वस्तीमधील हे "चकाचक' रेस्तरॉ इतरांपेक्षा अंमळ महागच आहे; पण "बोनस'युक्त दिवाळीनिमित्त हा वेगळा अनुभव घ्यायला काय हरकत आहे?

सिगरी रेस्तरॉ,
"सिटी टॉवर्स' इमारत,
ढोले-पाटील रस्ता,पुणे - 411001.