Sunday, March 31, 2013

‘धान्य दान’ मोहीम सुफळ संपूर्ण


धान्य पोहोचले, समाधान लाभले...

साने गुरूजी तरुण मंडळ आणि हिंदू गर्जना प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने धान्यदान मोहीम आयोजित करण्यात आली होती. परममित्र धीरज घाटे यांच्या वाढदिवसानिमित्त ही मोहीम राबविली गेली. त्या मोहिमेच्या निमित्ताने नोंदविलेली काही निरीक्षणे आणि आलेले काही अनुभव… 

धान्य दान मोहिमेची अगदी प्राथमिक चर्चा सुरू असते. अजून काहीच नक्की असे झालेले नसते घरात काम करणाऱ्या मोलकरणीच्या कानावर ती चर्चा पडते. ती दुसऱ्या दिवशी तिच्या घरातून एक किलो धान्य दुष्काळग्रस्तांसाठी घेऊन येते आणि ‘बाईसाहेब, तुम्ही काल बोलत होता ना, त्यासाठी माझं हे एक किलो धान्य...’

दुष्काळग्रस्तांसाठी काही तरी केलं पाहिजे, या विचारातून साकारलेल्या धान्यदान मोहिमेमध्ये पहिलं माप टाकणारी व्यक्ती असते एक मोलकरीण.  त्यानंतर मग धान्याच्या राशीच्या राशी जमा होतात आणि हजारो दुष्काळग्रस्तांपर्यंत त्या पोहोचविल्याही जातात. दुष्काळग्रस्त नागरिकांसाठी नुसतेच उसासे टाकत बसण्यापेक्षा काहीतरी केलं पाहिजे, या विचारातून या मोहिमेला सुरूवात झाली. मग कुठं कशाची मदत लागेल वगैरे याची चाचपणी सुरू झाली. 
 
बालपणीपासूनचा मित्र धीरज घाटे हा पाच वर्ष संघाचा पूर्णवेळ प्रचारक असताना काही काळ बीड जिल्ह्याला प्रचारक म्हणून कार्यरत होता. त्यामुळे सर्वप्रथम बीड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये काय मदत करता येऊ शकेल, याचीच चाचपणी केली. पाणी आणि चारा या गोष्टींची प्रामुख्याने गरज आहे, हे स्पष्ट होतेच. पण अनेक तालुक्यांमध्ये पुढील काही महिने धान्याचीही अडचण भासणार आहे, हे तिथं जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर आम्हाला समजलं आणि मग त्यातून धान्यदान मोहिमेचा आराखडा तयार करण्यात आला. 

शहरातील बड्या व्यक्ती, संस्था आणि संघटना यांना अॅप्रोच न होता घराघरातून मदत गोळा करायची आणि अधिकाधिक नागरिकांना यात सहभागी करून घ्यायचं हे सुरूवातीपासूनच ठरलं होतं. त्यानुसार प्रत्येक इमारती, वाडे, सोसायट्या, चाळी, शाळा आणि महाविद्यालयांमधून या मोहिमेची सविस्तर माहिती देण्यात आली. काही आय टी कंपन्यांमध्येही मोहिमेचा प्रसार करण्यात आला. फेसबुक आणि ई-मेलच्या माध्यमातूनही धान्यदान मोहीम सर्वदूर पोहोचविण्यात आली. 

आशिष शर्मा यांनी त्यांच्या परदेशातील मित्रांपर्यंत ही योजना पोहोचविली आणि त्यांच्याकडूनही मोठ्या प्रमाणावर मदत मिळाली. काही दानशूर नागरिकांनी विशिष्ट दुकानांमधून पाच किंवा दहा हजार रुपयांपर्यंत धान्य खरेदी करण्यास सांगितले. अनेक शाळांमधून एक मूठ धान्यदान संकल्पना राबविली गेली. त्यातून प्रत्येकी सातशे ते आठशे किलो धान्य गोळा झाले. हास्यसंघासारख्या संघटनांनीही मदतीचा हात पुढे केला. कर्वेनगर-कोथरुड सारख्या भागात संकल्प सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रत्येक सोसायटीमध्ये धान्य गोळा करण्याची यंत्रणा राबविण्यात आली. त्यामुळे या भागातूनही जवळपास वीस ते पंचवीस हजार किलो धान्य जमा झाले. नियोजनबद्धरित्या केलेल्या प्रयत्नांमुळे तब्बल ६० ते ६५ हजार किलो धान्य जमा झाले. गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी आणि डाळी असे धान्य लोकांकडून दान म्हणून स्वीकारण्यात आले. आमचे प्रयत्न २१ हजार किलोंसाठी सुरू होते. पण ‘देणाऱ्याचे हात हजारो…’ हा अनुभव आला आणि पाहता पाहता ६० हजार किलोचा आकडा कधीच ओलांडला गेला.


अर्थात, चांगल्या योजनेला अपशकुन करण्याची मराठी माणसाची परंपरा या वेळी पाळली गेली नाही असं नाही. विघ्नांशिवाय उत्तम कामे पार पडल्याचं ऐकिवात नाही, अन अनुभवानतही.  मुळात दुष्काळग्रस्त भागांमध्ये फक्त पाणी आणि चाऱ्याची आवश्यकता आहे. तेथे धान्य मुबलक आहे, धान्याची अजिबात जरूरी नाही, असे ई-मेल फिरविण्यात आले. ‘व्हिस्परिंग कॅम्पेन’ करण्यात आले. धान्य जमा करणारे कसे मूर्ख आहेत, अशी चर्चा घडविण्यात आली. पण तेथे धान्याची आवश्यकता आहे, याची आधीच खात्री करून घेतल्यामुळे आंम्हाला असल्या क्षुल्लक गोष्टींमुळे फरक पडत नव्हता. आम्ही आमचे उद्दिष्ट साध्य करण्यात मग्न होतो. (उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत २५ हजार नागरिकांनी रक्तदान केले होते. त्यावेळीही राज ठाकरे यांनी अपशकुन करीत या उपक्रमावर अत्यंत वाईट शब्दात टीका केली होती.)

बीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, गेवराई आणि शिरूर-कासार या तालुक्यांमध्ये दुष्काळाची तीव्रता सर्वाधिक आहे. तुलनेने अंबाजोगाई, परळी, खुद्द बीड शहर आणि केज वगैरे भागांत दुष्काळाच्या झळा कमी आहेत. आष्टी तालुक्यातील कडा, दादेगाव, बीड सांगवी, नांदूर आणि इतर दोन-पाच गावांमध्ये आम्ही मदत करण्याचे निश्चित केले होते. मात्र, २१ हजार किलो धान्य गोळा करण्याचे निश्चित केले होते, तेव्हा या गावांची निवड करण्यात आली होती. पण आमच्याकडील धान्य ६० हजार किलोंच्या पुढे गेलो होते. त्यामुळे आणखी अनेक गावांना देता येईल एवढे धान्य आमच्याकडे होते. अर्थात, अशा गावांची यादी बीडमधील कार्यकर्त्यांकडे तर तयारच होती. त्यामुळे त्याचाही प्रश्न उरला नव्हता.

गुरूवारी सकाळी आम्ही आष्टीच्या दिशेने निघालो. चार ट्रक भरतील इतके धान्य गोळा झाले होते. जवळपास ७०-८० कार्यकर्ते आणि धान्याचे चार ट्रक असे मार्गस्थ झालो. ‘मोबाईल किंग’ आणि ‘टेलिफोन शॉपी’चे मालक आशिष शर्माही आमच्या सोबत आले होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास आम्ही कडा येथे पोहोचलो. अॅडव्होकेट बाबूराव अनारसे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या टीमसह आमची वाट पाहत होते. बीडमधील संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्रीधरपंत सहस्रबुद्धे देखील आवर्जून उपस्थित होते. वय वर्षे ७७. झुपकेदार मिशा, ठणठणीत तब्येत आणि खणखणीत आवाज, ही वैशिष्ट्ये. गोपीनाथ मुंडे हे अजूनही ज्या मोजक्या लोकांच्या पाया पडतात आणि मान देतात, त्यापैकी एक व्यक्तिमत्व म्हणजे श्रीधरपंत. कडक शिस्तीचे पण तितकेच सहजपणे लोकांमध्ये मिसळून जाणारे.


पोहोचल्यानंतर कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी आणि ओळखी झाल्या. मग धान्याचे कोणते ट्रक कुठे न्यायचे, कुठं किती धान्य उतरवून घ्यायचं याचं नियोजन करण्यात आलं. एक ट्रक आष्टी गावात पाठविण्यात आला. काही धान्य कडा येथील सुयोग मंगल कार्यालयात उतवरून घेण्यात आलं. काही धान्य दादेगाव आणि नांदूरमध्ये पाठविण्यात आलं. नियोजनानुसार सर्व काही पार पडल्यानंतर आम्ही दादेगावच्या दिशेनं निघालो. तिथं धान्य वाटपाचा पहिला कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

मला सर्वाधिक उत्सुकता होती, ती हे धान्य वाटप करण्याची काय यंत्रणा लावण्यात आली आहे, हे जाणून घेण्याची. मुळात पाऊसच झाला नसल्यामुळे आसपासच्या तीन-चार तालुक्यांमध्ये शेतीची कामे नव्हतीच. शेतकाम नसल्यामुळे मजुरांच्या हाताला काहीच काम नाही. दुष्काळामुळे बांधकामे करण्यास बंदी घातलेली. त्यामुळे बांधकामावरील मजुरांच्या (विशेषतः वडार समाज) रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालेला. अनेक गावांतील तरुण मंडळी कामं शोधण्यासाठी इतर गावांच्या दिशेने गेलेली. त्यामुळे शेकापूरसारख्या अनेक गावांमध्ये फक्त म्हातारे-कोतारे आणि लहान मुलं एवढेच शिल्लक राहिलेले. बाकी गाव ओसाड. आता तर रेशनवर मिळणाऱ्या गव्हाचे प्रमाणही कमी करण्यात आले आहे. शिवाय रेशनवर धान्य मिळण्यात येणाऱ्या अनेक अडचणी आणि अनियमितता यामुळे ‘भीक नको पण कुत्रे आवर’ अशी गत झाली आहे. अशा सर्व लोकांपर्यंत जमा केलेले धान्य पोहोचणार होते. त्यामुळे रोजच्या दोन वेळच्या जेवणासाठी त्यांना वणवण करीत दुसऱ्यासमोर हात पसरायला लागणार नव्हते. 


वडार, वैदू, शेतमजूर, मागासवर्गीय, दलित आणि रोजचे रोज कमावून खाणाऱ्या मजुरांची संख्या अधिक असलेली जवळपास तीस गावे निश्चित करण्यात आली आहेत. त्या प्रत्येक गावामध्ये खरोखरच धान्य वाटप करण्याची आवश्यकता कोणाला आहे, याची यादी गावातील प्रमुख मंडळींनीच तयार केली होती. जेणेकरून हे धान्य गरज नसलेल्या व्यक्तींच्या घरी जाऊ नये. इतकी यंत्रणा लागल्यानंतर आमचे काम होते, ते फक्त गावांमध्ये जाऊन गरजू व्यक्तींना धान्य वाटप करण्याचे.
त्यानुसार आम्ही दादेगाव आणि नांदूर या गावांमध्ये गेलो. दोन्ही ठिकाणी दीडशे ते दोनशे लोक उपस्थित होते. दोन्ही गावांमध्ये ७० ते ८० जणांची यादी सर्वानुमते तयार करण्यात आलेली. त्यापैकी प्रत्येकी दोन जणांना जाहीर कार्यक्रमांमध्ये पन्नास-पन्नास किलो धान्य देण्यात आले आणि उर्वरित सर्वांना घरोघरी जाऊन धान्य वाटप करण्यात येणार होते. एव्हाना ते झाले असेलही. इतर गावांमध्येही संपर्क सुरू झाला आहे. गरजूंपर्यंत धान्य पोहोचते आहे. 

ज्या लोकांना दादेगावमध्ये धान्य दिले त्यापैकी एक म्हणजे तुळसाबाई. जख्खड म्हातारी. वय वर्षे साधारण ७५ पेक्षा अधिक असेल. मुलगी नगरमध्ये स्थायिक झालेली आणि आतापर्यंत तिच्याजवळ राहणारा तिचा नातू लग्नानंतर आष्टीमध्ये रहायला गेलेला. त्यामुळे म्हातारी दादेगावमध्ये एकटीच. इतके दिवस तिला नातवाचा आधार होता. पण आता तोही नाही. त्यामुळे लोक त्यांच्याकडे उरलेलं शिळंपाकं अन्न तिला आणून द्यायचे आणि त्यावर तिचा उदरनिर्वाह चालायचा. पूर्वी ती लोकांकडे जाऊन पडेल ते काम करायची. आता वयोमानाप्रमाणे तेही जमत नाही. पण आता तिला धान्य मिळाल्यामुळं ती स्वतःचं स्वतः करून खाऊ शकते. ‘तुमचे खूप उपकार झाले भाऊ. तुमच्यामुळं मला लोकांपुढं भीक मागायची वेळ येणार नाही…’ हे तिचे उद्गार.


कड्यामध्ये पोहोचल्यानंतर रखरखीत दुष्काळात मदतीचा सुखद झरा सापडला. आष्टी, पाटोदा, गेवराई आणि शिरूर-कासार या तालुक्यांमध्ये दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात जवळपास ३८ चारा छावण्या आहेत. त्यांमध्ये ५६ ते ५७ हजार जनावरे आश्रयासाठी आलेली आहेत. जनावरांसाठी एका व्यक्तीला या छावणीत २४ तास थांबावेच लागते. ही मंडळी सकाळी गावातून निघतात. त्यांचे दुपारचे जेवण सोबत आणलेले असते. पण सकाळी घरातून निघताना बरोबर घेतलेली रात्रीची शिदोरी उन्हा‍ळ्यामुळे खराब होते. त्यामुळं धानोरा येथील परमेश्वर शेळके या चारा छावणी मालकानं निवास करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी रात्रीच्या जेवणाची मोफत सोय केली आहे. २० जानेवारीपासून त्याने अन्नदानाचे पुण्यकर्म सुरू केले आहे. नावातच परमेश्वर असलेले शेळके हे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी खऱ्याखुऱ्या परमेश्वरासारखे धावून आले आहेत.


रोज जवळपास ७०० शेतकरी रात्रीच्या वेळी जेवायला असतात. एकावेळी ७०० लोकांना भात देण्यासाठी त्यांना ७० किलोच्या आसपास तांदूळ लागतो. शेतकऱ्यांना आमटी-भात, कधीमधी लापशी, भात-पातळ भाजी, क्वचित कधीतरी भाकरी असे जेवण दिले जाते. परमेश्वर शेळके यांच्यापासून प्रेरणा घेऊन आता इतर दोन-चार चारा छावणी मालकांनीही रात्रीच्या जेवणाची सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आहे. दुष्काळग्रस्तांसाठी काम करणारी ही देवमाणसंच म्हटली पाहिजेत.
शेतकऱ्यांना रात्रीचे जेवण देण्याचे पुण्यकर्म करणाऱ्या चारा छावणी मालकांनाही धान्य वाटप करण्यात येणार आहे. पुढील दोन-तीन महिने लागेल तितके धान्य देण्याची आमची तयारी आहे. भविष्यात जर त्यांना धान्याची कमतरता भासत असेल तर अजूनही धान्य गोळा करून देण्याचे आश्वासन आम्ही त्यांना दिले आहे. शेवटी काय शेतकऱ्यांकडून आपल्याला जे मिळते आहे, तेच आपण त्यांना परत करतो आहोत, हीच भावना मनात होती...

दुष्काळग्रस्तांसाठी काही तरी करायचं हे मनात ठरवून आम्ही उपक्रमाला सुरूवात केली होती. यशस्वी होणार याची खात्री होतीच. पण प्रतिसाद कसा मिळेल, काय होईल, याबाबत काहीच सांगता येत नव्हतं. मात्र, ईश्वर कृपेने सर्व काही उत्तम झाले. गावांमध्ये धान्य वाटप केल्यानंतर उपस्थितांच्या चेहऱ्यावर असलेल्या समाधानापेक्षा अधिक समाधान आमच्या चेहऱ्यावर झळकत होतं. तेच समाधान मनात ठेवून आम्ही पुन्हा पुण्याच्या वाटेने मार्गस्थ झालो...

अधिक माहितीसाठी संपर्कः 
धीरज घाटेः ९८२२८७१५३० 
अॅडव्होकेट बाबूराव अनारसेः ९४२३१७२६८२
परमेश्वर शेळकेः ९४२१३३९५२२

Wednesday, March 20, 2013

भोपाळ पार्ट टू...



लक्षात राहिलेली माणसं...
कुठल्याही ठिकाणी गेल्यानंतर मला तिथल्या लोकांना भेटायला मला खूप आवडतं. म्हणजे ऐतिहासिक वास्तू, संग्रहालयं, देवळं किंवा मशिदी-चर्च हे पहायला आवडतं नाही, असं नाही. पण तिथल्या लोकांशी बोलायला, त्यांच्याकडून त्या भागाची अधिक माहिती घ्यायला, परंपरा जाणून घ्यायला, गमतीशीर किस्से ऐकायला अधिक आवडतं. शिवाय भारताच्या कोणत्याही भागातला सर्वसामान्य माणूस हा खूप बोलका असतो. तो अगदी सहजपणे आपल्याशी बोलायला सुरूवात करतो. त्यामुळं संवादाला कधीच अडचण येत नाही.

हैदराबाद असो, गुवाहाटी असो, तमिळनाडू असो, गुजरात असो किंवा ‘मी महाराष्ट्र बोलतोय’च्या वेळी संपूर्ण महाराष्ट्र असो… कुठंही गेलो की अधिकाधिक लोकांशी बोलणं ही माझी सवय बनून गेली आहे. इंडियन मिडीया सेंटरच्या निमित्तानं भोपाळला गेलो तेव्हा देखील अनेक जणांच्या भेटी झाल्या. हिमाचलपासून ते आंध्र प्रदेशापर्यंत आणि भोपाळपासून ते पश्चिम बंगालपर्यंत अनेक राज्यांमधील मंडळी भेटली. खुद्द भोपाळमधील काही जणांचीही भेट झाली. अनिल सौमित्र त्यापैकीच एक...

हजरजबाबी, हरहुन्नरी आणि हुश्शार…
भोपाळ ट्रीपदरम्यान सर्वाधिक लक्षात राहिलेली व्यक्ती, ही अनिल सौमित्र यांची माझ्यासाठीची खरी ओळख. मध्य प्रदेश भाजपचे मुखपत्र असलेल्या ‘चरैवेति’ या मासिकाचा संपादक. कधी काळी संघ परिवारातील ‘विश्व संवाद’ या संघ परिवारातील संस्थेचा पूर्णवेळ प्रचारक राहिलेला कार्यकर्ता. चेहरा, पेहराव आणि सौमित्र या नावामुळे प्रथम बंगालीच वाटला. पण मी बंगाली नाही, बिहारी आहे, असे त्याने नम्रपणे सांगितलं. अनिल मूळचा बिहारच्या मुझफ्फरपूरचा. पुण्यातून निघण्यापासून ते झेलम एक्स्प्रेसचे रिझर्व्हेशन होईपर्यंत प्रत्येक वेळी अनिल सौमित्र या व्यक्तीच्याच संपर्कात होतो. त्यामुळे सुरूवातीपासूनच या नावाबद्दल खूप उत्सुकता होती.


भोपाळला गेल्यानंतर जेव्हा विज्ञान भवनमध्ये पोहोचलो, तेव्हा तिथं त्याचं सर्वप्रथम दर्शन झालं. नरेंद्र मोदी घालतात तसा हाफ स्लिव्हचा कुर्ता, वर खादीचं जॅकेट, जीन पँट आणि हातात डायरी, कागदपत्र, पुस्तकं आणि बरंच काही. स्वभावाने विनोदी, एकदम हजरजबाबी आणि अगदी सहज बोलता बोलता समोरच्या व्यक्तीला जिंकून घेणारा. स्पंदन नावाची माध्यमांशी संबंधित संस्था चालविणारा आणि ‘चरैवेति’चा संपादक असलेला हा पत्रकार. जवळपास अठरा एक वर्षांपासून माध्यमांमध्ये असलेला आणि रमलेला. कधीकाळी पांचजन्यचा भोपाळ प्रतिनिधी म्हणूनही त्यानं काम केलंय. शिवाय विश्व संवाद केंद्रामध्ये पाच वर्ष पूर्ण वेळ काम करून त्यानं प्रचारकाची भूमिकाही पार पाडलीय.

भोपाळमधील सेमिनारचं एकहाती मॅनेजमेंट सौमित्र यानेच केलं होतं, हे एव्हाना आमच्या लक्षात आलं होतं. म्हणजे सेमिनारचं ठिकाण निवडण्यापासून, मंडळींच्या राहण्याची व्यवस्था, उत्तम आचारी शोधणे, वाहतुकीची व्यवस्था करण्यापर्यंत सबकुछ सौमित्र, असाच प्रत्यय ठायीठायी येत होता. एरव्ही रुबाबात नेता म्हणून वावरणारा अनिल अनेक प्रसंगी कार्यकर्त्याची भूमिका अगदी समर्थपणे वठवित होता. म्हणजे ‘वीर मारूती’चे क्वचित प्रसंगी ‘दास मारूती’ हे रुपही समोर येते... अगदी तस्सेच.

हिंदी एकदम मधुर. बोलतानाही आणि लिहितानाही. ‘पूर्वाग्रह’ हे प्रकाशित झालेल्या लेखांचे पुस्तक त्यानं मला दिलं. ते वाचतानाही तो बोलतो तशीच हिंदी वाचायला मिळते. जागरण, आज, प्रभात खबर, दिव्य भास्कर, हिंदुस्थान, जनसत्ता अशा अनेक वर्तमानपत्रांमध्ये आणि स्वदेशीपासून ते छत्तीसगडच्या आदिवासी संस्कृतीपर्यंत अनेक विषयांना त्यानं हात घातलाय. बोलतानाचा ओघ लेखनातही कायम दिसतो. विचारांना वाहिलेला आणि त्यावर निष्ठा असलेला. बरं, विचारांवर निष्ठा असून तारतम्याने विचार करणारा आणि ‘आपल्या’ लोकांमधील दोषांवर अगदी यथायोग्य पद्धतीने बोट ठेवणारा... म्हणजे वाहवत जाणारा वाटत नाही. 

  (श्री. विद्याधर चिंदरकर हे अमिताभ बच्चन यांची मुलाखत घेताना...)

अनिलला पाहून मला ‘सामना’तील विद्याधर चिंदरकर यांची आठवण आली. दिसण्यामध्येही बरेच साम्य. वयही सारखेच. दोघेही हजरजबाबी, हुश्शार आणि हरहुन्नरी. राज्याच्या राजधानीत राजकीय पक्षाच्या मुखपत्रात वरिष्ठ पदांवर काम करणारे. बातमीवर योग्य ते संस्कार करून ती अधिक आकर्षक करण्यापासून ते  गरीब गरजूंना उपचारांसाठी आर्थिक मदत मिळवून देण्यापर्यंत अनेक गोष्टींमध्ये हातखंडा असलेले. सर्वदूर आणि सर्वक्षेत्रात उत्तम नेटवर्किंग असलेले. अशा अनेक गोष्टी दोघांमध्ये सारख्याच वाटल्या. 

सेमिनार संपल्यानंतर ‘चरैवेति’च्या ऑफिसमध्ये बराच वेळ त्यांच्यासमवेत घालविला. जर्नालिझम युनिव्हर्सिटीमध्ये दुपारी त्यांची भेट झाली. ‘यहा कुछ मजा नही है… आप हमारे साथ ‘चरैवेति’ चलो. हमारा काम देखो,’ असं म्हटल्यानंतर मग मीही जास्त आढेवेढे न घेता त्यांच्याबरोबर गेलो. मग तिथं चार-पाच तास कसे गेले कळलंच नाही. ‘चरैवेति’चे काही जुने अंक, ‘स्पंदन’ने काढलेले विशेषांक, अनिलच्या लेखांचे संकलन असलेले ‘पूर्वाग्रह’ हे पुस्तक असं बरंच काही तिथं मिळालं. छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या राजकारणापासून ते ‘दोपहर का सामना’चे प्रेम शुक्ला यांच्यापर्यंत अनेक गोष्टींवर मस्त गप्पा रंगल्या. संध्याकाळी ‘काय पो छे’चा सहाचा शो पहायला ते निघाले आणि मग त्यांना अलविदा केला.

पत्रकार असूनही विनम्र
‘साम मराठी’मध्ये असताना अनेक चांगल्या पत्रकारांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यापैकी एक म्हणजे शरद व्दिवेदी. एखाद्या चित्रपटातील हिरोला शोभेल, अशी चेहरेपट्टी. मृदूभाषी आणि  स्वभावाने गोड. ‘साम’साठी ते मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या बातम्या पाठवायचे. फक्त राजकीय, सामाजिक आणि क्राइम नव्हे, तर मराठी मंडळींचे उपक्रम, सण-समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांच्याही बातम्यांचा त्यात अंतर्भाव असायचा. त्यामुळे त्यांच्याशी मस्त गट्टी जमली होती. कधीही फोन आल्यानंतर ‘आशिषजी, आप फ्री तो है ना… बात कर सकते है...’ याच वाक्याने त्यांच्या बोलण्याची सुरूवात होते. तेव्हाही आणि आताही. मी त्यांच्यापेक्षा वयाने आणि अनुभवानेही लहान आहे. हे त्यांना सांगतिल्यानंतरही अजूनही ते आशिषजी म्हणूनच हाक मारतात. अत्यंत शांत, सभ्य, आणि विनम्र. माध्यमांमध्ये असूनही अशी तीन विशेषणे लावता येतील, अशी व्यक्ती. संतोष कुलकर्णी हा त्याच पंथातील. दुसऱ्याला मान देण्याची ही प्रथा भोपाळमध्ये खूप पहायला मिळते.

‘साम’ने कॉस्ट कटिंग सुरू केल्यानंतर त्यांचे आणि आमचे सहचर्य संपले. पण दोस्ती अजूनही कायम आहे. यू्एनआय आणि डीडी स्पोर्ट्सवर ‘क्विझ शो’चे अँकरिंग असं बरंच काही केल्यानंतर शरदजी सध्या भोपाळमध्येच स्थिरावले आहेत. ‘बन्सल न्यूज’ या मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये दिसणाऱ्या चॅनेलचे हेड म्हणून कार्यरत आहेत. सुरूवातीला अनेक जणांनी आम्हाला किरकोळीत काढलं. पण आम्ही महत्प्रयत्नांनंतर हे चॅनेल आपण ‘टीआरपी’मध्ये दोन नंबरला आणलंय, असं आवर्जून सांगतात. रविवारी संध्याकाळी त्यांची भेट झाली. मग त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो. तिथं त्यांचे काही रेकॉर्डेड कार्यक्रम आणि इतर टेक्निकल गोष्टींची माहिती घेतली. कसं चाललंय वगैरे माहितीची देवाण घेवाण झाली. 

भोपाळमधले लोक शक्यतो बाहेर जायला पसंती देत नाही. एकदम सुशेगात शहर आहे. फार महागाई नाही. शिवाय राजधानी असली तरी निवांतपणा हरविलेला नाही. त्यामुळे अनेकदा चार पैसे कमी मिळाले तरी लोक भोपाळ सोडत नाहीत… शरदजी सांगत होते. हलका आहार म्हणून आम्ही रात्री कढी-चावलला पसंती दिली आणि मग भोपाळच्या सफरीवर निघालो. शरदजींच्या नव्या कोऱ्या वॅगन आरमधून. मध्य प्रदेश विधानसभा, मंत्रालय, सचिवालय, भारत भवन, बडा तालाब, उमा भारती आणि दिग्विजय सिंह यांचे बंगले वगैरेचं दर्शन आणि सोबत शरदजींची लाईव्ह कॉमेंट्री… व्वा. भोपाळ शहराबद्दल बरीच माहिती मला त्यांच्याकडूनच समजली.

शरदजी हे उत्तम नकलाकार आहेत, हे देखील लक्षात आले. मध्य प्रदेश म्हटल्यावर गोविंदाचार्य यांचा विषय निघालाच. त्यांचे आणि उमा भारती यांचे संबंध, भाजपशी त्यांचे असलेले संबंध, संघ परिवाराशी असलेले नाते वगैरे गोष्टींवर चर्चा झाली. तेव्हा गोविंदाचार्य जसे शुद्ध, सात्विक आणि गोड हिंदी बोलतात अगदी तशाच स्टाईलमध्ये शरदजींनी नक्कल केली. हुबेहुब नक्कल ऐकल्यानंतर मला तर धक्काच बसला. म्हटलं, तुम्ही नक्कल खूप चांगली करता. तेव्हा त्यांचे उत्तर असे, कभी कभी कर लेता हूँ… जेवणानंतर थोडावेळ भोपाळ भ्रमण झालं आणि मग त्यांनी मला सेमिनारच्या ठिकाणी परत सोडलं. त्यानंतर मग पुन्हा एकदा फोनवरून संपर्क सुरू झाला.

मध्य प्रदेशातील ‘आम आदमी’
अनिल सौमित्र यांच्या सौजन्याने मध्य प्रदेश भाजपच्या प्रदेश मुख्यालयात रात्री जेवणाची व्यवस्था झाली. म्हणजे इतरत्र कुठेही चार घास पोटात ढकलता आले असते. ‘यहा का खाना आपको पसंद आएगा…’ असं म्हणून त्यांनी तिथं माझी व्यवस्था करूनही टाकली. मग रात्री आठच्या सुमारास तिथं गेलो. मप्र भाजपने कार्यकर्त्यांसाठी ही उत्तम सोय केली आहे. राज्यभरातून अनेक कार्यकर्ते काही ना काही कामासाठी भोपाळला येत असतात. प्रत्येकालाच बाहेरचे महागडे जेवण परवडतेच असे नाही. हे लक्षात घेऊन पक्षाने कार्यकर्त्यांसाठी वीस रुपयांमध्ये भरपेट जेवणाची व्यवस्था केली आहे. मुख्य कार्यालयात जाऊन कार्यकर्त्याने कुपन खरेदी करायचे आणि भोजनगृहामध्ये द्यायचे. ओळखीशिवाय किंवा काही कामासाठी आल्याशिवाय हे कुपन मिळत नाही, हे ओघाने आलेच.

सौमित्र सौजन्यामुळे तिथं माझ्या जेवणाचा योग जुळून आला. फुलके, फ्लॉवर-बटाटा मिक्स भाजी, दाल-चावल, पापड, लोणचे आणि मिरच्या. मनसोक्त जेवण अगदी घरच्यासारखे. भाजपचे अनेक कार्यकर्ते आणि स्वतःला नेते समजणारे बरेच जण तिथं जेवायला आले होते. मध्य प्रदेशात सत्तेवर असूनही भाजपचे लोक प्रदेशाच्या भोजनगृहात जेवतात, हे पाहूनच मला धक्का बसला. महाराष्ट्रासह इतर प्रांतातही भाजपने ही सुविधा सुरू करावी, अशी मागणी मला आवर्जून करावीशी वाटते. अर्थात, राजकीय पक्षांच्या नेत्या-कार्यकर्त्यांची परिस्थिती वीस रुपयांमध्ये उत्तम जेवण घेण्याइतकी वाईट नाही. त्यामुळे असा उपक्रम सुरू होईल, याची सुतराम शक्यता नाही. असो.


तिथं मला इंद्रेशसिंह विश्वकर्मा हे शेतकरी भेटले. वय साधारण ५५ ते ६० असावे. कदाचित त्यापेक्षा थोडे अधिक असेलही. गुणा जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील. गहू हे मध्य प्रदेशातील मुख्य पिक. विश्वकर्मा यांचे शेतही गव्हानेच डवरलेले आहे. ते तिथं मुख्यमंत्र्यांना भेटायला आले होते. म्हणजे मंगळवारी सकाळी ते दरबारात मुख्यमंत्र्यांना भेटणार होते. प्रत्येक आठवड्याच्या सोमवार, मंगळवार, बुधवार मुख्यमंत्री हे हमखास भाजपच्या प्रदेश कार्यालयात आम जनतेला भेटतात, हा ठाम विश्वास लोकांमध्ये आहे. त्यामुळेच ते ३००-३५० किलोमीटरवरून सीएमना भेटायला आले होते. (महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबद्दल काही न बोललेलेच बरे.) त्यामुळेच त्यांचे रात्रीचे जेवण तिथे होते.

भारतातील खेड्यातला सर्वसामान्य शेतकरी दिसतो तसेच इंद्रेशसिंह. उन्हात काम करून रापलेली काया, सुरकुत्या पडलेला चेहरा आणि पांढरे केस. त्यांच्या जावयासोबत ते तिथं आले होते. त्यांचा पुतण्या वीज पडल्यामुळे गंभीर जखमी झाला होता. डॉक्टरांनी उपचारासाठी एक-दीड लाख रुपये सांगितले होते. सरकारकडून काही मदत मिळते का, पहायला ते आले होते. (दुसऱ्या दिवशी त्यांची आणि सीएमची भेट झाली. सरकारने २५ ते ३० हजार रुपये देण्याची तयारी दर्शविली आहे, हे त्यांनी मला आवर्जून फोन करून सांगितले.)

आम्ही तिघांनीही एकत्रच जेवण घेतले. आम्ही आमचे ताट भरून घेतले. पण मी पाण्याचा ग्लास घ्यायला विसरलो. ते मात्र, न विसरता माझ्यासाठी पाण्याचा ग्लास घेऊन आले. तेव्हा मलाच लाजल्यासारखं झालं. तिघंही मस्त रेमटून जेवलो. ‘आप अगर बाहर खाना खाते, तो आपका ज्यादा पैसा जाता. ७०-८० रुपये तो जरूर लगते…’ प्रदेश भाजपने सुरू केलेला हा उपक्रम किती उपयुक्त आहे, याचा प्रत्यय लगेचच आला. जेवण झाल्यानंतर थोड्या गप्पा मारल्या आणि मग माझी निघायची वेळ झाली. जाता जाता आठवण म्हणून त्यांचा एक फोटो काढला. निघताना म्हणाले, ‘आशिषजी, अगली बार गुना जरूर आईएगा…’ मी म्हटलं, ‘जरूर आऊंगा. पर आप मुझे आशिषजी मत कहिए. आशिष ही ठीक है.’ त्यावर त्यांचं उत्तर खूप विचार करायला लावणारं होतं. ते म्हणाले, ‘आशिषजी, दुसरे को बडा कहनेसे कोई आदमी छोटा नही होता. हम उमर में आप से बडे है. मग आप हमसे ज्यादा पढे लिखे है. इसलिए आपका सम्मान करना उचितही है…’

व्वा… काय वाक्य बोलला तो माणूस. शेकडो पुस्तकं आणि हजारो ग्रंथांमध्ये सापडणार नाही, असं एकदम साधं वाक्य तो ‘आम आदमी’ बोलून गेला. ‘दुसरे को बडा कहनेसे कोई आदमी छोटा नही होता.’ इंद्रेशसिंह विश्वकर्मा यांनी माझी भोपाळ ट्रीप वस्स्सूल करून टाकली.

Friday, March 15, 2013

हिंदुस्थान का दिलदार दिल…




चलो भोपाळ...
 मध्य प्रदेशात दुसऱ्यांदा आणि भोपाळमध्ये पहिल्यांदाच चाललो असल्यामुळं शहराबद्दल प्रचंड उत्सुकता होती. आधी एकदा भावाच्या लग्नासाठी इंदूरला गेलो होतो. पण तेव्हा पाचवी-सहावीत होतो. शिवाय ती ट्रीप अगदी धावपळीची झाली होती. त्यामुळं इंदूरला फक्त जाऊन आलो होतो. यंदा मात्र, मला भोपाळ एन्जॉय करायचं होतं. भारतातील इतर अनेक शहरांप्रमाणेच हे शहरही जुने भोपाळ आणि नवे भोपाळ असे विभागलेले आहे. जुन्या शहराचा तोंडावळा मागास किंवा अविकसीत आणि नवे भोपाळ चकाचक आणि सोयीसुविधांनी उपयुक्त असे. मुस्लिम नागरिकांची टक्केवारी साधारण १२ ते १५ टक्के. पण तरीही सध्या हे शहर दंगलींमुळे फारसे चर्चेत नसते. बाबरी मशीद कोसळल्यानंतर उसळलेल्या दंगलीत शंभर सव्वाशे जणांचा बळी गेला होता. त्यानंतर किरकोळ दगडफेक वगळता दंगल झालेली नाही, अशी माहिती आमचे ‘साम’ मित्र शरद व्दिवेदी यांनी दिली. त्यांच्याबरोबरच शहराची सफर घडली आणि शहराची माहितीही समजली. भोपाळमध्ये फिरताना अनेक चढउतार जाणवतात. एखाद्या डोंगराळ भागात शहर बसल्यासारखं वाटतं.

मुळात भोपाळ हे तसे राजधानीचे शहर वाटत नाही. म्हणजे इथं उड्डाणपूल नाहीत. मॉल किंवा मल्टिप्लेक्सही अगदी आता आता येऊ लागलेत. मार्केट पण तुलनेने खूप मोठे नाही. मेट्रो नाही, वाहतूकही फार वेगवान नाही. धावपळ नाही आणि लगबगही नाही. शिवाय भोपाळ इंदूरपेक्षाही छोटे. इथे फारसे उद्योग धंदेही नाहीत. स्वतःचा व्यवसाय, सरकारी नोकरी, बँका, शाळा-कॉलेजे आणि इतर सरकारी आस्थापनांमध्ये नोकरी हे रोजगाराचे स्रोत. कंपन्या, कारखाने किंवा सध्या भरात असलेली आयटी यापासून भोपाळ दूरच आहे. पण इथली माणसं दिलदार आहेत. खुल्या आणि मोठ्या मनाची आहेत. आदरातिथ्य करायला हात आखडता घेणारी नाहीत. 

इथल्या मंडळींचं हिंदी एकदम शुद्ध, अस्खलित आणि गोड. मिठ्ठी हिंदी. साजूक तुपातील जिलबी जशी असते, अगदी तश्शी गोड. मराठी भाषेत जशी पुण्याची मराठी शुद्ध आणि मस्त आहे, तशीच भोपाळ किंवा माळवा प्रांतातील हिंदी एकदम शुद्ध आणि गोड. त्यांनी हिंदीत बोलत रहावं आणि आपण तल्लीन होऊन ऐकत रहावं, असंच वाटतं. अनेक शब्दही एकदम खास हिंदीतील. आमचा कार्यक्रम होता त्या हॉलला नाव होतं, विज्ञान विमर्श विथीका... विज्ञान विमर्श कळलं हो.. पण विथीका म्हणजे काय. विथीका म्हणजे गंभीर चर्चा करण्याची किंवा विचार विमर्श करण्याची जागा. आता आपल्या इथल्या एखाद्या व्यक्तीचं हिंदी कितीही चांगलं असलं तरी असले शुद्ध शब्द ऐकल्यानंतर विकेट जायचीच. तशी आमचीही विकेट गेली. मग अनेक जणांशी बोलल्यानंतर या शुद्ध हिंदी शब्दाचे अर्थार्जन झाले. गमतीचा भाग सोडला तरी भोपाळमध्ये हिंदी ऐकण्यास एकदम मधुर वाटते.

बडा तालाब…
प्रकाश झा यांच्या बऱ्याच चित्रपटांचे शूटिंग भोपाळमध्ये झालेले आहे. त्यापैकी राजनिती चित्रपटाचा क्लायमॅक्स जिथं होतो, ते तलावाशेजारचं विस्तीर्ण मैदान हे आमचा सेमिनार होता, त्यापासून पाच मिनिटांच्या अंतरावर. मैदानाच्या बाजूलाच मोठ्ठा तलाव आहे. याच तलावातून भोपाळला पाणी पुरविलं जातं आणि आजूबाजूच्या गावांना शेतीसाठी पाणी दिलं जातं. पाण्याची योग्य ती पातळी राखण्यासाठी एक छोटं धरणही तिथं आहे. हाच तलाव शहरातील मुख्य अशा बडा तालाबला जोडला गेलेला आहे. हा बडा तालाब जवळपास पंधरा अठरा किलोमीटर पसरलेला आहे. तेच शहरातील प्रमुख आकर्षण केंद्र आहे. हा तलाव रात्री मुंबईतील क्वीन्स नेकलेस सारखा भासतो. संध्याकाळी हवा खायला किंवा फिरायला, रात्री आइस्क्रिम-ज्यूससाठी इथं येतात. सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी उभारलेलं भारत भवन, नवी विधानसभा, सचिवालय, मंत्रालय, मुख्यमंत्र्यांचे निवास्थान अशा महत्त्वाच्या अनेक इमारती याच परिसरात आहेत. व्दिवेदी यांच्या गाडीतून या सर्व ठिकाणांची सफरही झाली.

पोहे नि जिलेबी…
सकाळी सातच्या सुमारास भोपाळ स्टेनशवर उतरलो आणि मुख्य गेटमधून बाहेर पडलो. समोर पाहतो तर नाश्त्याचे ठेले आमच्या स्वागतासाठी सज्ज होते. मदनमहाराज का हॉटेल हे त्यातल्या त्यात मोठं. शेजारीच असलेल्या एका ठेल्यामध्ये आम्ही शिरलो. कडकडून भूक लागली होतीच आणि ठेल्यावर सजविलेले पोहे वगैरे पाहून तर भूक आणखीनच चाळवली गेली. कचोरी उसळ, सामोसा उसळ, पोहे उसळ, पोहे-जिलेबी असा भरभक्कम नाश्ता तिथं उपलब्ध होता. पोहे-जिलेबी हा नाश्ता भोपाळमधील (कदाचित मध्य प्रदेशमधीलही) सर्वाधिक लोकप्रिय आणि सहज उपलब्ध होणारा नाश्ता आहे, असं मला तिथल्या तीन-चार दिवसांच्या मुक्कामादरम्यान समजून गेलं. भोपाळवासिय पोह्यांवर मनापासून प्रेम करतात. कारण पुढले तीनही दिवस सकाळी नाश्त्यासाठी पोहे-जिलेबी होतेच.


पोहे हा माझाही विक पॉइंट असल्यामुळं माझी ऑर्डर तीच होती. लिंबू-मिरची आणि टोमॅटो लावून मस्त सजवलेले पोहे पाहिल्यानंतर कोणीही तीच ऑर्डर केली असती. अगदी आपल्या घरी करतात तसेच पोहे, त्यावर इंदौरी शेव, त्यावर जीरामण म्हणजे खास इंदौरी मसाला आणि त्यावर छोले. व्वा… व्वा… जीरामण म्हणजे सगळीकडे चाट मसाला म्हणून जी पावडर विकली जाते, त्याच्या जवळपास जाणारा पण त्यापेक्षा खूपच चांगला असा मसाला. जीरे, हिंग, सैंधव (काळे मीठ), मोठी दालचिनी, लवंग आणि गरम मसाल्याचे आणखी काही पदार्थ असे एकत्र कुटून हे जीरामण तयार होते. चवीला आंबट गोड आणि काहीसे तिखट असलेले जीरामण एकदम पाचक. त्यामुळे कितीही खाल्ले तरी काही फिकीर नाही. (अर्थात, जीरामण आहे म्हणून उगाच जास्त खा... खा... खायची आवश्यकता नाही...)

जेवण आणि नाश्त्यामध्ये कांद्याचे प्रमाण वाढण्याची सुरूवात कदाचित मध्य भारतापासून होत असावी. कारण इथं पोह्यांवर कांदा टाकणं मस्ट आहे. सक्काळी सक्काळी कांदा खायचा नसल्यामुळं त्यानं घातलेला कांदा बाजूला काढून पोहे खाल्ले. भल्या सकाळी अशा जबरदस्त नाश्त्याने आमच्या दिवसाची सुरूवात झाली. एक प्लेट पोहे झाल्यानंतर आम्ही (मी आणि मि. प्रणव पवार) जिलेबीची प्लेट मागविली. जिलेबीही एकदम जबरी. बेतास बेत गोड आणि गरर्मागरम. जिलेबीच्या पिठात केशरी किंवा पिवळा असा कोणताच रंग मिसळत नसल्यामुळं खरपूस तळल्यानंतर येणारा रंग हाच जिलेबीचा रंग असतो, हे वेगळेपण.

भोपाळमध्ये नाश्ता भलताच स्वस्त आहे. म्हणजे पोहे, जिलेबी, सामोसा, पॅटिस किंवा कचोरी काहीही घ्या अवघ्या पाच रुपयांमध्ये. अर्थात, टपरी किंवा गाडीवर मिळणाऱ्या गोष्टींचे हे भाव आहेत. म्हणजे आपल्याकडे गल्लोगल्ली पोहे-उप्पीटच्या गाड्या असतात तसं. आता तिथंही दहा-बारा रुपये अगदी सहज घेतात. त्या तुलनेत पाच रुपये अगदीच स्वस्त म्हटलं पाहिजे.

मानव स्वास्थ्य हर्बल उद्यान
 इंडियन मीडिया सेंटरची वार्षिक बैठक भोपाळमधील विज्ञान आणि प्रौद्योगिकी भवनमध्ये आयोजित करण्यात आली होती. विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयातील चर्चासत्र, कार्यक्रम, प्रदर्शनी वगैरे आयोजित करण्यासाठी एक हक्काची जागा. त्याठिकाणी राहण्याची तसेच सेमिनार हॉल वगैरेची एकत्रित व्यवस्था असल्याने आमची व्यवस्था तिथेच करण्यात आली होती. या विज्ञान भवनच्या परिसरात जाणवलेली थोडीशी निराळी गोष्ट म्हणजे मानव स्वास्थ्य हर्बल उद्यान… असं उद्यान किंवा छोटीशी बाग कुठं आहे की नाही, हे मला माहिती नाही. पण ती कल्पना नक्कीच दाद देण्यासारखी होती.




मानव स्वास्थ्य हर्बल उद्यान म्हणजे, एका छोट्याशा बागेत मनुष्याच्या शरीराच्या रचनेसारखी आकृती तयार केली आहे. त्यामध्ये शरीराचे वेगवेगळे भाग कप्प्यासारखे दाखविण्यात आले आहेत. म्हणजे डोके, गळा, छाती, हृदय, पोट वगैरे वगैरे. प्रत्येक कप्प्यात संबंधित अवयवाला होणाऱ्या रोगांवर आयुर्वेदात कोणती वनस्पती उपचारांसाठी वापरतात, त्या वनस्पती आहेत. अर्थात, केसांसाठी महाभृंगराज किंवा मेहंदी, हृदयासाठी सिंदूर, गळ्याला तुळशी, डोळ्यांसाठी गुलबकावली, नाकासाठी लसूण आणि इतर अवयवांसाठी इतर अनेक वनस्पती. मेहंदी, सिंदूर, गुलबकावली, लाजाळू आणि असंख्य वनस्पतींची माहिती इथं उपलब्ध आहे. शिवाय कोणती वनस्पती कोणत्या अवयवासाठी लाभदायक आहे, याचाही उलगडा होतो.

हीच खरी राष्ट्रीय एकात्मता
दोन दिवसांच्या सेमिनारमध्ये रात्रीच्या भोजनात दालबाटी चूर्मा, कढी चावल असा मस्त मेन्यू ठेवण्यात आला होता. त्यामुळं ताव मारणं आलंच. पण हा मेन्यू रात्री असल्यामुळं थोडं हातचं राखूनच ताव मारला. दालबाटी आणि चूर्मा हा राजस्थानी पदार्थ असला तरी मध्य प्रदेशातही हे पदार्थ लोकप्रिय आहेत. बरं हे तयार करणारा मुख्य आचारी मिश्रा आणि त्याच्या हाताखाली काम करणारी मंडळी उत्तर प्रदेशातील. (राज ठाकरे यांच्या भाषेत भैय्या.) पदार्थ राजस्थानी, ठिकाण मध्य प्रदेश, तयार करणारे उत्तर प्रदेशी आणि खाणारे नवी दिल्ली, महाराष्ट्र, चंडीगड, ओरिसा, आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हरियाणामधील. भारतातील पदार्थ माणसांना जोडतात, ही थिअरी सिद्ध करण्यासाठी आणखी काय पाहिजे आणि राष्ट्रीय एकात्मता म्हणतात, ती हीच नाही का.


हलकी तिखट आणि घट्ट अशी डाळ, साजूक तुपात तळलेले कणकेच्या पिठाची बाटी. सोबतीला वांग्याची झणझणीत भाजी. रव्याचा लाडू आणि कढी भात. आहाहाहाहाहाहा… अर्थात गुजराती किंवा महाराष्ट्रीयन थाळीत मिळते त्यापेक्षा ही कढी वेगळी. आपल्याकडे ताक असेल तशी कढी असते. आंबट-गोड. गुजराती थाळीमध्ये मिळणारी कढी ही गोड असते. मात्र, राजस्थानी कढीचावलमध्ये आम्हाला तिखट कढी मिळाली. त्यामध्ये गोळे मिसळलेले होते. म्हणजे जशी गोळ्यांची आमटी असते तशीच गोळ्यांची कढी. गुजराती कढीपेक्षा हा स्वाद तसा फिकाच वाटला.

फिक्यावरून आठवलं, इथला साधा चहा एकदम फिका असतो. म्हणजे कमी गोड. शिवाय चहामध्ये दुधाचे प्रमाणही अधिक. मात्र, उकळी कमी. त्यामुळे चहा तसाही फिक्काच वाटतो.

स्टेशनवर तब्बल पाच तास
जाताना पुणे-लखनऊ गाडीचे रिझर्व्हेशन मिळाले होते. मात्र, येतानाचे ह. निजामुद्दीन-म्हैसूर सुवर्णजयंती एक्स्प्रेसचे रिझर्व्हेशन प्रचंड सेटिंग लावल्यानंतरही कन्फर्म झाले नाही. कारण त्या गाडीला भोपाळमधून फक्त दोनच कोटा होता. त्यामुळं त्या गाडीचं तिकिट रद्द करून रात्रीच्या झेलम एक्स्प्रेसचं (खरं तर पॅसेंजर) तिकिट काढलं आणि रिझर्व्हेशन कन्फर्मही झालं. पण झेलम एक्स्प्रेम तब्बल पावणेसहा तास उशिरा होती. म्हणजे हळूहळू हा उशीर वाढत जात होता. सुरूवातीला एक तास मग दोन, अडीच असं करत झेलमनं पाचचा आकडा गाठला. मग काय येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचे बोर्ड वाचणे आणि सेमिनारमध्ये मिळालेल्या साहित्याचा फडशा पाडणे असे दोनच कार्यक्रम उरले होते. पण तेही फार काळ टिकले नाही. 

पूर्वी शाळेमध्ये रेल्वे स्टेशनवर एक तास किंवा दोन तास वगैरे विषय निबंध लिहिण्यासाठी असायचे. तेव्हा आपण मारे पानेच्या पाने भरभरून लिहायचो. रेल्वे स्टेशनचं वर्णन करायचो. किती मज्जा येते वगैरे लिहायचो. पण रेल्वे स्टेशनवर गाडीची वाट पाहत थांबल्यामुळं मनस्ताप होतो, हे मला त्या दिवशी कळलं. परीक्षेमध्ये असले निंबध लिहायला लावणाऱ्या शिक्षकांना रेल्वे स्टेशनवर रात्री अपरात्री पाच तास थांबण्याची शिक्षा द्यायला हवी, खरं तर. उगाच काहीतरी निबंध लिहायला सांगतात. असो.

शिवाय वेळही रात्रीची असल्यानं आणि स्टेशनही हबीबगंज असल्यानं (पुण्याच्या शिवाजीनगरसारखं) माहोलही फारसा नव्हता. त्यामुळं वेळ कसा घालवावा, असा प्रश्नच पडला होता. अखेरीस १० वाजून १० मिनिटांनी येणारी झेलम सकाळी ३ वाजून ५५ मिनिटांनी आली. दिवसभरही ती गाडी डकाव डकाव करतच चालली होती. म्हणजे दुपारी अडीचला पोहोचणारी गाडी रात्री आठ वाजता पुणे स्टेशनात दाखल झाली. खरं तर रेल्वे प्रवास जिव्हाळ्याचा पण प्रथम या झेलम एक्स्प्रेसच्या प्रवासाचा तिटकारा आला… अर्थात, भोपाळ दौऱ्याचा शेवट रटाळ असला तरी आठवणी मधुर आहेत.

भोपाळमध्ये भेटलेल्या माणसांविषयी पुढील ब्लॉगमध्ये...