Saturday, August 25, 2007

"कागदी वाघ' उतरले मैदानावर

इतके दिवस आम्ही "कागदी वाघ' होतो. नुसतेच शब्दांचे चेंडू! पण न कर्त्याच्या वारी मात्र, कॉम्प्युटर आणि कागदावरुन थेट मैदानावर पोचलो. तेव्हा आलेला अनुभव केवळ अवर्णनीय. मुख्य म्हणजे कार्यालयात बसून आणि दूरचित्रवाणीवर सामने पाहून याची खेच, त्याला सल्ले दे, त्याची अक्कल काढ, उगाचच कोणालाही उपदेशाचे डोस पाज, असं करीत पत्रकारिता करणारे पुण्यातले बहुतांश क्रीडा पत्रकार खडकीच्या रेंजहिल्स मैदानावर जमले होते. कारण होतं "आयटी'तले अधिकारी आणि क्रीडा पत्रकार (नुसतेच खेळ आवडणारे नव्हे तर मैदानावर उतरण्याची आवड असणारेही) यांच्याल्या फुटबॉल सामन्याचं. महाराष्ट्र क्रीडा मंडळाने रोहन बिल्डर्सच्या सहाय्याने आयोजित केलेल्या "इंटर आयटी' फुटबॉल स्पर्धेमध्ये पत्रकार आणि "आयटी'तले अधिकारी यांच्यात फुटबॉलचा सामना होता. 45 अधिक 45 असा एकूण 90 मिनिटांचा सामना नव्हता. तर फक्त 15 अधिक 15 असा फक्त अर्धा तास आम्ही मैदानावर होतो. पण अक्षरशः घाम निघाला. "अमुक संघाने सोप्या संधी दवडल्या...' किंवा "तमुक गोलरक्षक चेंडू अडवू शकला नाही...' याचा प्रत्यक्ष अनुभव आम्ही मैदानावर घेतला.

आमच्या संघात आशिष पेंडसे (जागो) आणि सिद्धार्थ केळकर हे दोघेच क्‍लब स्तरावर फुटबॉल खेळलेले. पण तरीही त्यांचा गेल्या अनेक महिन्यांपासून (कदाचित वर्षांपासून) सराव नव्हता. उर्वरित सर्व खेळाडू हौशे, नवशे आणि गवशे होते. पास मिळाल्यानंतर चेंडू अडविणे, किक मारणे, व्यवस्थित पास देणे हे या बेसिक गोष्टींमध्येच वांदा होता. अगदी माझ्यापासून सगळ्यांचा. माझी एकूणच प्रकृती पाहून सर्वांनीच मला "गोलपोस्ट' सांभाळण्यास भाग पाडले. पण मी देखील मनापासून गोलरक्षक बनण्यास उत्सुक होतो. कारण आपल्या आवडत्या खेळाडूंपैकी एक म्हणजे जर्मनीचा ऑलिव्हर कान. त्याचे काम किती अवघड आणि जिकिरीचे आहे, त्याचा अनुभव मला घ्यायचा होता.

पहिल्याच मिनिटाला माशी शिंकली. विजय जगताप हा "डी'मध्ये असताना त्याच्या हाताला चेंडू लागला आणि प्रतिस्पर्धी संघाला "पेनल्टी किक' बहाल करण्यात आली. गोल झाला हे योगायोगाने आलेच. 1984 ते 92 या कालावधीत भारताकडून खेळणाऱ्या संतोष कश्‍यप यांनी हा पहिला गोल केला. सद्यस्थितीत कौशिक हे महिंद्राचे "लेव्हल टू' प्रशिक्षक आहेत. कौशिक यांनीच पुढे आम्हाला वारंवार सताविले. खेळताना सराव किती महत्त्वाचा हे आम्हाला पटत होते. खेळात सुसूत्रता नव्हती, बचाव फळी भेदली जात होती, आक्रमकांना यश येत नव्हते ही बातम्यांमध्ये लिहिलेली वाक्‍ये आमच्या समोर घडत होती. (दुर्दैवाने फक्त आमच्या बाबतीच)

आम्हाला त्याचे काही दुःख नव्हते. कारण आम्ही फक्त खेळण्यासाठी मैदानात उतरलो होते. विजयासाठी प्रयत्न केले नाहीत, असे नाही. पण विजय मिळणे अवघड आहे, हे आम्हाला माहिती होतेच. त्यामुळे कमीत कमी गोलने पराभव हे उद्दिष्ट डोळ्यासमोर होते. आणखी एक म्हणजे आपल्या अंगात जी रग असते ती जिरविण्याचा खेळणे हा खूप चांगला पर्याय आहे. बऱ्याच वर्षांनंतर ती रग आज जिरली. पूर्वार्धात केळकर, सलील कुलकर्णी आणि पेंडसे यांनी काही सुरेख चाली रचल्या. दोन ते तीन वेळा चेंडू अगदी "गोलपोस्ट'जवळ नेण्यात आमच्या खेळाडूंना यश आले. पण "गोल' साध्य होत नव्हता. पूर्वार्धात आणखी दोन गोल झाले. (अर्थातच, आमच्यावर) त्यापैकी एक कौशिक यांनीच केला. तो मैदानी गोल होता. तर तिसरा गोल माझ्याच चुकीमुळे झाला. "डी'मधून चेंडू टाकताना किंवा "किक' मारताना थोडी गडबड होत होती आणि चेंडू प्रतिस्पर्धी खेळाडूंकडेच जात होता किंवा चुकीच्या दिशेला जात होता. त्यातच एकदा मी मारलेला चेंडू फार लांब न जाता जवळच उभ्या असलेल्या प्रतिस्पर्धी खेळाडूकडे गेला. कपाळाला हात लावण्यापलिकडे काहीच पर्याय नव्हता.

उत्तरार्ध आमच्यासाठी थोडा चांगला ठरला. बहुतांश वेळ "आयटी'च्या हाफमध्येच चेंडू होता. चार ते पाच वेळा गोल करण्याचे प्रयत्न आमच्याकडून झाले. त्यापैकी एक-दोनदा तर अगदी थोडक्‍यात गोल होता होता वाचले. त्यामुळे थोडा हुरुप आला. उत्तरार्धातील पहिला आणि सामन्यातील चौथा गोल थोडा गंमतशीर पद्धतीने झाला. प्रतिस्पर्धी खेळाडू चेंडू घेऊन आमच्या "डी'मध्ये आला. त्याला अडविण्यासाठी मी पुढे सरसावलो. तेवढ्यात त्याने मला चकवून चेंडू गोलपोस्टसमोर ढकलला. सुदैवाने तेव्हा तेथे त्यांचा कोणीच खेळाडू नव्हता. त्यामुळे आमच्या एका खेळाडूला चेंडू अडव, असे सांगितले. तेव्हा कदाचित आपण क्रिकेट नव्हे तर फुटबॉल खेळत आहोत, याचा त्याला विसर पडला आणि त्याने "डी'मध्ये चक्क हाताने चेंडू अडविला. आपण हे काय केलं, हे दोन क्षण त्यालाही कळलं नाही. पण दोन सेकंदांनंतर सारेच हास्यकल्लोळात बुडाले. इथेच आमच्यावर चौथा आणि शेवटचा गोल झाला.

गोलरक्षण करताना गडबडीत दोन-तीन सूर मारले. एकदा चेंडू अडविला आणि दुसऱ्यांदा प्रतिस्पर्धी संघातील एका खेळाडूला आडवा केला. "आयबीएम' कंपनीत काम करणारा तो खेळाडू पुन्हा आमच्या "गोलपोस्ट'कडे फिरकला नाही. 4-0 याच निकालावर सामना संपला. सामना हरलो पण हरल्याचे दुःख नव्हते. खेळल्याचे समाधान होते.

आमचा संघ ः आशिष पेंडसे (कर्णधार), सिद्धार्थ केळकर, मिकी आग्नेर, मायकेल जोसेफ, सलील कुलकर्णी, आनंद चयनी, हेमंत जाधव, विजय जगताप, आशिष फडणीस, निखिलेश पाठक, मुकुंद पोतदार (पोतोस्की), श्रीराम ओक, चंदन हायगुंडे आणि आशिष चांदोरकर (गोलरक्षक). "नॉन प्लेईंग कॅप्टन' ः राजेंद्र कानिटकर, व्यवस्थापक ः अमित डोंगरे, "नॉन प्लेईंग मॅनेजर' ः भास्कर जोशी, समर्थक ः मनिष कांबळे.

Thursday, August 23, 2007

चक दे इंडिया...

जोशपूर्ण खेळाचे वेगवान सादरीकरण

"एकदा पाहिल्यानंतर वारंवार पाहण्याची इच्छा होणारा चित्रपट.' "चक दे इंडिया' या चित्रपटाचं परीक्षण करण्यास सांगितलं तर ते एका वाक्‍यात अशाप्रकारे करता येईल. हॉकी या अत्यंत वेगवान व जोशपूर्ण खेळावर आधारित हा चित्रपटही तितकाच वेगवान आणि जोशाने भरलेला आहे. एकदम वरच्या दर्जाचे संवाद आहेत. इतकेच नव्हे तर संघबांधणीपासून ते विजेतेपदापर्यंतच्या प्रवासापर्यंतचे अनेक प्रसंग खूपच उद्‌बोधक आहेत.
प्रसिद्धीमाध्यमे, सरकार, प्रायोजक व प्रेक्षक या चौकडीकडून भारतात हॉकीला किंवा अधिक स्पष्टपणे बोलायचं झालं तर महिला हॉकीला जी वागणूक मिळते, त्याचं यथार्थ चित्रण चित्रपटात करण्यता आलं आहे. सुदैवानं महिला हॉकीवरील चित्रपटाला मिळणारा विलक्षण प्रतिसाद पाहून भारावून जायला होतं. गल्लाभरु चित्रपटांची निर्मिती करण्यापेक्षाही काही जण वेगळा प्रयत्न करताना दिसतात आणि त्याला प्रेक्षकही उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त करतात, हे खूपच आनंददायी आहे.
मीररंजन नेगी यांच्या आयुष्यात घडलेल्या घटनांचे सादरीकरण चित्रपटात करण्यात आले आहे. 1982 च्या आशियाई स्पर्धेच्या वेळी नेगी हे भारताचे गोलरक्षक होते. "पेनल्टी शूटआऊट'मध्ये भारत पाकिस्तानकडून पराभूत होतो व त्याचं खापर नेगी यांच्यावर फुटतं. त्यांनी पाकिस्तानकडून पैसे खाल्ले आणि गोल अडविले नाही, असंही म्हटलं जातं. त्यांची कारकिर्द संपते. पुढे हेच नेगी 1998 साली भारताने जिंकलेल्या आशियाई सुवर्णपदकाचे खरे मानकरी ठरतात. 98 साली धनराज पिल्लेच्या नेतृत्त्वाखाली भारत बॅंकॉकला गेला होता. त्यावेळी नेगी हे भारताचे गोलरक्षण प्रशिक्षक होते. तेव्हा सुबय्या नामक गोलरक्षक संघात हवा, हा धनराजचा आग्रह होता. पण नेगी यांनी आशिष बल्लाळच कसा योग्य आहे, हे धनराजला पटवून दिले. अखेरीस सुबय्याऐवजी बल्लाळ मैदानात उतरला आणि दक्षिण कोरियाविरुद्धच्या सामन्यात "पेनल्टी शूटआऊट'मध्ये बल्लाळनेच भारताला तारले व नेगी यांचा निर्णय सार्थ ठरविला. हेच नेगी 2002 मधील राष्ट्रकुल स्पर्धेसाठी महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक बनले. त्या संघाने सुवर्णपदक जिंकण्याची कामगिरी करुन नेगी यांच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला.
"चक दे इंडिया'मध्ये त्याच मीररंजन नेगींची चित्तरकथा काहीशी नाट्यमय स्वरुपात दाखविण्यात आली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात "पेनल्टी स्ट्रोक'वर गोल न करता आल्याने कबीर खानची कारकिर्द संपुष्टात येते. एकतर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पराभव आणि त्यातूनही कबीर खान मुसलमान. त्यामुळे भारताच्या सर्वोत्तम "सेंटर फॉरवर्ड' कबीरला "गद्दार' ही पदवी बहाल करण्यात येते आणि तेथेच त्याची कारकिर्द संपते.
तब्बल सात वर्षे अपमान आणि अवहेलना सहन केल्यानंतर विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी महिलांच्या हॉकी संघाचा प्रशिक्षक बनण्यासाठी तो हॉकी महासंघाच्या कार्यालयात अवतरतो. नाराजीनेच त्याला हॉकी संघाचे प्रशिक्षक करण्यात येते. तेव्हापासून सुरु होते एका खडतर पण आश्‍वासक प्रवासाची सुरवात. भारतात अजूनही खेळ म्हणजे फक्त "टाईमपास' हे गणित पक्के आहे. त्यातूनही एखाद्या मुलीला त्यात करियर करायचे असेल तर किती अडचणी येतात, त्याची आपण कल्पना करु शकतो. मुलगी अजूनही "चूल आणि मूल' हे अजूनही भारतीयांच्या मनात पक्के आहे. त्याला छेद देण्याचा प्रयत्न चित्रपटात करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर नामांकित क्रिकेटपटू त्याच्या हॉकीपटू प्रेयसीला किती तुच्छतेने वागवितो, ते देखील अत्यंत चपखलपणे चित्रित करण्यात आले आहे.
भारताचा संघ तयार करताना आंध्रप्रदेश, दिल्ली, महाराष्ट्र, काश्‍मीर, पंजाब, झारखंड या प्रांतांप्रमाणेच मिझोरम आणि मणिपूर या ईशान्येच्या राज्यांमधील खेळाडूचांही भारतीय संघात आवर्जून समावेश करण्यात आला आहे. झारखंड या प्रांताबद्दलचे अज्ञान, मिझोरम व मणिपूरमधील खेळाडूंना परदेशी नागरिकांप्रमाणे मिळणारी वागणूक व खेळाडूंनी ओळख करुन देताना स्वतःला फक्त राज्यापुरते सिमीत ठेवणे आदी छोट्या छोट्या प्रसांगांमधून चित्रपट प्रेक्षकांवर चांगली पकड निर्माण करतो.
संघबांधणी करताना खेळाडूंचे हेवेदावे, वरिष्ठ-कनिष्ठ वाद, खेळाडूंची "पोझिशन' अशा अनेक गोष्टींमुळे निर्माण झालेले तंटे सोडविण्याचे कबीर खानचे कसब वाखाणण्याजोगे आहे. प्रत्येक "फॉरवर्ड'ला आपल्या नावावर गोल होण्याची असलेली इच्छा आणि त्यामुळे हातच्या निसटणाऱ्या संधी हे काही नवीन नाही. पण "तुम्ही पुढे गेला नाहीत तरी चालेल पण चेंडू पुढे गेला पाहिजे,' अशा एकेका वाक्‍यातून कबीरने दिलेले धडे प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवितात. कर्णधारपदावरून वरिष्ठ खेळाडूंचे प्रशिक्षकासमवेत उडणारे खटके आणि बहिष्काराचे अस्त्र, प्रायोजकांअभावी महिलांच्या संघाऐवजी पुरुषांच्या संघाला विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी पाठविण्याचा हॉकी महासंघाचा हट्ट, कर्णधार होण्यासाठी प्रशिक्षकाशी शरीरसंबंध ठेवण्यास तयार होणारी वरिष्ठ खेळाडू हे प्रसंग सत्यपरिस्थितीची दाहकता दाखवून देतात. अखेरीस पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, वंग अशा भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या महिला खेळाडूंची मोट बांधण्यात कबीर खान यशस्वी होतो.
प्रत्यक्ष सामन्यांवेळी भारतीय खेळाडूंना येणारी इंग्रजी भाषेची व त्यामुळे संवादाची अडचण, ऑस्ट्रेलियाचे "लॅपटॉप' प्रशिक्षक आणि डोक्‍यात रणनिती तयार करणार कबीर खान यांच्यातील फरक, निर्णायक सामन्यातही संघापेक्षा वैयक्तिक गोलसंख्येला अधिक महत्त्व देणारे खेळाडू आणि कोऱ्या करकरीत हॉकी स्टिक्‍स, बूट व टी-शर्ट पाहिल्यानंतर भारतीय खेळाडूंना होणारा आनंद या गोष्टी खूपच सूचक आणि सत्य परिस्थितीदर्शक आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्धचा अंतिम सामना "पेनल्टी शूटआऊट'मध्ये जातो. तेव्हा पाय आणि हॉकी स्टीक हलविण्याच्या ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या कृतीवरुन ती चेंडू कुठे मारणार हे आधीच ओळखून गोलरक्षकाला इशारा करणारा कबीर खान (म्हणजेच मीररंजन नेगी) हॉकीचा किती सखोल अभ्यासक आहे, हे दाखविण्यात आले आहे.
तुम्ही क्रीडाप्रेमी असा किंवा नसा, हॉकी तुम्हाला आवडत असो किंवा नसो पण हा चित्रपट जरुर पहा. एकदा नव्हे तर दोनदा-तीनदा पहा. तुम्हीच पाहू नका तर इतरांनाही चित्रपट पाहण्याची विनंती करा. त्यानिमित्ताने का होईना पण क्रिकेटवेड्यांच्या देशात हॉकी या राष्ट्रीय खेळाची तोंडओळख होईल. हॉकीला आयुष्य वाहणाऱ्या धनराजसारख्या हॉकीपटूंची उपेक्षा करणे किती मोठे पाप आहे, याची पुसटशी जाणीव होईल.

ता.क. ः तुम्हाला शाहरुख खान आवडत नसला तरी हा चित्रपट जरुर पहा!
Mukund Potadar has also written about this movie on his blog. Please read his article also if you want more and inner details. His blog id is :

Saturday, August 18, 2007

भारताचा राष्ट्रीय खाद्यपदार्थ कोणता?

पुरीभाजी, सामोसा की पाणीपुरी

भारताचा राष्ट्रध्वज ः तिरंगा, राष्ट्रगीत ः जन गण मन, राष्ट्रीय पक्षी ः मोर, राष्ट्रीय प्राणी ः वाघ, राष्ट्रीय खेळ ः हॉकी, राष्ट्रीय फूल ः कमळ आणि राष्ट्रीय खाद्यपदार्थ ः ? नाही ना माहिती. खरं सांगायाचं झालं तर मलाही माहिती नाही आणि असा कुठलाच खाद्यपदार्थ राष्ट्रीय खाद्यपदार्थ म्हणून निश्‍चित झालेला नाही. पण माझं मत विचाराल तर पुरीभाजी, पाणीपुरी किंवा सामोसा हे तीन पदार्थ राष्ट्रीय खाद्यपदार्थ म्हणून मान्यताप्राप्त होण्यास अडचण नाही.
महाराष्ट्रातील बाभळेश्‍वर (जि. नगर) येथील एका टपरीपासून ते भारताच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या गुवाहाटीतील (आसाम) एका हातगाडीपर्यंत सर्वच ठिकाणी चहा आणि कॉफीप्रमाणे मिळणारा खाद्यपदार्थ म्हणजे पुरीभाजी आणि सामोसा!वेगवेगळ्या कारणांनी भारताच्या विविध भागांमध्ये गेल्यानंतर अगदी सहजपणे आणि स्वस्तात उपलब्ध होणारे दोन पदार्थ अशी पुरीभाजी आणि सामोसा यांची ओळख करुन द्यावी लागेल.

भारताच्या कोणत्याही भागात गेल्यानंतर पंजाबी खाद्यपदार्थ, दाक्षिणात्य पदार्थ, चाट, भेळ आणि पाणीपुरी तसेच चायनीज खाद्यपदार्थ मिळतात. पण तरीही त्यांची ओळख विशिष्ट राज्यापुरती किंवा विशिष्ट राज्यांपुरतीच आहे. भेळ हा आणखी एक पदार्थ या स्पर्धेत उतरु शकला असता. पण भारतातील सर्वच ठिकाणी भेळ मिळते की नाही, याबाबत साशंकता आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर हैद्राबादमध्ये सहजासहजी भेळ मिळत नाही. अगदी एखाद-दोन ठिकाणी मिळते. त्यामुळे भेळ हा पदार्थ यादीत घेऊ नये, असं मला वाटतं.

पुरीभाजी, पाणीपुरी व सामोसा या पदार्थांची ओळख एखाद्याच राज्यापुरती मर्यादित नाही. ते काही महाराष्ट्रीयन नाहीत, दाक्षिणात्य नाहीत वा पंजाबीही नाहीत. पण तरीही भारतभर हे पदार्थ अगदी सहजपणे मिळतात, म्हणूनच त्या पदार्थांना "राष्ट्रीय' म्हणावेसे वाटते. अभिजीत कांबळे नावाच्या माझ्या मित्राचं लग्न नगर जिल्ह्यातील बाभळेश्‍वर जवळच्या एका गावात होतं. त्या निमित्तानं बाभळेश्‍वरला मुक्कामाची संधी मिळाली. त्यावेळी सकाळी टपरीवर चहा पिण्याच्या हेतूनं गेलो. पाहतो तर काय चहावाला मस्त पुरीचा घाणा काढत होता. त्याला म्हटलं भाजी कोणती आहे. तेव्हा नवाच प्रकार पहायला मिळाला. कांदा-बटाट्याची परतून केलेली भाजी (डोसा) त्यानं डिशमध्ये घेतली आणि त्यावर झणझणीत तर्री असलेली मटकीची उसळ अक्षरशः ओतली. वेगळ्या डिशमध्ये पुरी देऊन माझ्यासमोर ठेवत म्हटलं "घ्या साहेब'.

नाही म्हटलं तरी पुण्या-मुंबईतल्या हॉटेलांमध्येही पुरीभाजी मिळतेच की. "पुरीभाजी'ची "ऑर्डर' दिली की पुरीसोबत येते बटाट्याची परतून केलेली भाजी आणि पातळ भाजी हवी असेल तर "ऑर्डर' द्या "कुर्मापुरी'ची. नाशिकपासून ते नागपूरपर्यंत आणि औरंगाबादपासून ते सोलापूरपर्यंत पुरीभाजी किंवा कुर्मापुरी मिळत नसलेलं हॉटेल शोधून सापडणं अवघड!

हैद्राबादमध्ये असताना तशी सगळीकडेच पुरीभाजी मिळायची. पण आमचा एक ठरलेला चाचा होता. त्याच्याकडे कांदा, बटाटा, टॉमेटो व इतर काही अगम्य भाज्या घालून "कुर्मा'सारखी भाजी केलेली असायची. थोडीशी आंबट चव (चिंचेमुळे) असलेली भाजी चवीला काही निराळीच! अगदी उडुपी दुकांनांमधून वा रस्त्यांवरील गाड्यांवरही पुरीभाजीची विक्री व्हायची. पाच रुपयांमध्ये चार पुऱ्या आणि "अनलिमिटेड' भाजी. तिकडं बटाट्याच्या परतून भाजीची बात नश्‍शे. एक-दोन दुकांनांमध्ये "डोसाभाजी'ची रस्साभाजी मिळायची. पण खरं सांगांयचं तर एकदा खाल्ल्यानंतर पुन्हा ती रस्सा "डोसाभाजी' खायची इच्छाच झाली नाही.

मध्य आणि उत्तर भारतात भोपाळ, ग्वाल्हेर, झॉंशी, मथुरा, आग्रा आणि खुद्द दिल्लीतही अगदी सक्काळी सक्काळी भरपेट नाश्‍ता करण्याची पद्धत आहे. गरमा-गरम दूध, जिलेबी आणि पकोडे या नाश्‍त्याच्या सोबतीला स्टॉलवर किंवा हॉटेलांमध्ये मिळते ते पुरीभाजी! तिथली भाजीही रस्सा भाजीकडे झुकलेली आणि पुऱ्या आकाराला अंमळ मोठ्या व भटुऱ्याच्या जवळ जाणाऱ्या. चना-भटुरा हा देखील पुरीभाजीच्याच जवळ जाणारा आणखी एक खाद्यपदार्थ. गुजरातेतही सुरत, भरुच, बडोदा, अहमदाबाद आणि राजकोटवासियांनाही हा पदार्थ नवीन नाही. सुरतची पुरीभाजी तर अगदी सुप्रसिद्ध होती. आता इतरही पदार्थ आल्यानं तिची लोकप्रियता घटली असावी.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी गुवाहाटीला जाणं झालं व पश्‍चिम बंगाल तसंच आसाममध्येही हा पदार्थ अगदी सहजपणे मिळत असल्याचं स्पष्ट झालं. हावडा स्टेशनसमोर असलेल्या छोट्या टपरीवजा हॉटेलवर सकाळी पुऱ्यांचा घाणा निघत असतो. गुवाहाटीमध्ये सकाळी चहाबरोबर नाश्‍त्याला पुरीभाजी तसंच सामोसा हे दोन पदार्थ हमखासपणे मिळतात. इतकंच काय तर एका अण्णाच्या हॉटेलवरही पुरीभाजीचा "मेन्यू'मध्ये समावेश असल्याचं दिसतं. चव मात्र, अगदी आपल्या महाराष्ट्रात मिळते तशीच!
तमिळनाडू आणि केरळमध्ये जाणं झालं नाही, पण आमचा दाक्षिणात्य मित्र देविदास देशपांडे यानं सांगतिलेल्या माहितीनुसार केरळ आणि तमिळनाडूतही पुरीभाजी अगदी सर्रास उपलब्ध असते. फक्त तिकडं पुऱ्या मैद्याच्या असतात. पण त्यात काही विशेष नाही आसाम, बंगाल आणि अगदी हैद्राबादेतही पुऱ्या मैद्याच्याच असतात. तसंच केरळ आणि तमिळनाडूत भाजीमध्ये धने पावडर मोठ्या प्रमाणावर वापरलेली असते. त्यामुळं तिथल्या भाजील जराशी निराळी चव असते. मेघालयाची राजधानी शिलॉंगमध्येही पुरीभाजी मिळते. (अधिका माहिती म्हणजे तिकडं तिथं वडापाव देखील मिळतो.)

पाणीपुरी पण स्पर्धेत...
पाणीपुरी न आवडणारी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. सापडलीच तर ती व्यक्ती संशोधानाचा विषय होऊ शकते. पाणीपुरीला काही ठिकाणी (विशेषतः उत्तर भारतात) गोलगप्पे म्हणून संबोधलं जातं. पण नाव बदललं म्हणून चव बदलत नाही. शिजवलेल्या वाटाण्याचा किंवा हरभऱ्याचा रगडा, पुदीना आणि मिरचीच्या ठेच्यापासून बनविलेलं तिखट पाणी तसंच चिंच आणि गूळ यांच्यापासून बनविलेलं आंबटगोड पाणी यांचं अफलातून मिश्रण म्हणजे पाणीपुरी. आता भारतातल्या काही भागात फक्त तिखट पाणीच पाणीपुरीमध्ये टाकलं जातं. तर काही ठिकाणी पाणीपुरी खाताना बरोबर बारीक चिरलेला कांदा दिला जातो. पाणीपुरी मिळाल्यानंतर काही शौकिन कांदा टाकून आस्वाद घेतात.
पाणीपुरी देण्याची पद्धतही औरच असते. बहुतांश ठिकाणी प्लेटनुसार पाणीपुरी दिली जाते व प्लेटमधील पाच, सहा किंवा आठ पुऱ्या संपल्यानंतर विक्रेता आपल्याला एक प्लेट झाल्याची सूचना देतो. त्यानंतर हवी असेल तर दुसरी प्लेट सुरु करतो. गुजरातमध्ये अनेक भागात आपण पुरे म्हणेपर्यंत विक्रेता आपल्या प्लेटमध्ये पुऱ्या ठेवत असतो. तिकडे प्लेटची बात नसतेच. आपण जितक्‍या पुऱ्या खाऊ त्याचे तो आठ आण्याप्रमाणे पैसे आकारतो. आहे की नाही गंमत.

... आणि सामोसाही!
सामोश्‍याबद्दल तर काहीच बोलायला नको. हा पदार्थ भारताच्या कानाकोपऱ्यात मिळतो. त्यातही इराण्यांच्या दुकानात मिळणारा सामोसा थोडासा निराळा. त्याच्या सारणात कोबीचा भरणा अधिक. इतर ठिकाणच्या सामोश्‍यात बटाटा आणि मटार (किंवा वाटाणा) यांची मक्तेदारी. आता काही ठिकाणी पट्टीचे सामोसेही मिळू लागले आहेत. पण त्यात फारसा दम नाही. सारण कमी आणि चावण्याचेच श्रम जास्त.
तुम्हाला काय वाटतं कोणता पदार्थ भाराताच राष्ट्रीय खाद्यपदार्थ बनण्यास अधिक पात्र आहे. या तीनपैकी एखादा पदार्थ असावा की आपल्या मतानुसार आणखी एखादा पदार्थ राष्ट्रीय खाद्यपदार्थ बनण्यास लायक आहे. तुमची प्रतिक्रिया "कॉमेंट्‌स'मध्ये नक्की लिहा.

Monday, August 13, 2007

लक्षात राहणारी गटारी...

पळा पळा... लवकर पळा... पटकन गाडी काढ रे... उगाच लटकायचो... चल पळ लवकर... अशी वाक्‍य एखाद्या पत्रकाराच्या तोंडून कधी ऐकली आहेत का? थोडंसं मजेशीर वाटतं ना? हो पण असं घडलंय. ऐन गटारीच्या मुहूर्तावर रात्री एक वाजता...

स्थळ बाबा भिडे पुलाजवळील खाद्यपदार्थांचे स्टॉल. दृश्‍य नेहमीचेच म्हणजे सुमारे शंभर ते सव्वाशे टेबलांवर खाण्यासाठी किंवा कॉफी पिण्यासाठी जमलेले नागरिक. अचानक पोलिसांची गाडी येते. कोणालाही कल्पना नसताना टेबलवर जेवत बसलेल्या ग्राहकांवर पोलिसांचा लाठीमार सुरू होतो. या अनपेक्षित धक्‍क्‍यामुळं सारे ग्राहक जेवण सोडून पळत सुटतात. त्याचवेळी ऑफिसची काम आटोपून कॉफी पिण्यासाठी खडकेच्या स्टॉलवर जमलेल्या पत्रकारांनाही पळण्यावाचून पर्याय नसतो. फुकटच एखादी काठी आपल्यावर पडली तर काय घ्या!

खाया-पिया कुछ नही ग्लास तोडा बारा आना' अशी अवस्था होण्याच्या आत पळ काढलेला बरा नाही का?यानिमित्ताने पोलिसांचा माज अनुभवण्याची पुन्हा एकदा संधी मिळाली. केवळ ग्राहकांवर लाठीमार करुन ही मंडळी थांबली नाहीत. तर त्यांनी जेवणाची टेबलंही लाथाडली. होत्याचं नव्हतं करुन टाकलं. पुन्हा इथं दिसला तर याद राखा, अशा थाटात धमकाविण्यास त्यांनी सुरवात केली. दहशतीच्या दहा ते बारा मिनिटांमध्ये सारा परिसर मोकळा झाला. एव्हाना स्टॉलधारकांचे काही हजार "गटारात' गेलेले असतात अन्‌ पोलिसांची "गटारी' साजरी झालेली असते.

गेल्या अनेक वर्षांपासून भिडे पुलाशेजारी (झेड पुलाखाली) खाद्यपदार्थांचे स्टॉल सुरू आहेत. रात्री उशिरा अगदी दीड वाजेपर्यंत हे स्टॉल सुरू असतात. त्यानंतर पोलिसांची गाडी येते आणि हळूहळू स्टॉल बंद होण्याची प्रक्रिया सुरू होते. हा इथला गेल्या कित्येक वर्षांपासूनचा अनुभव. पोलिस आल्यानंतर प्रथम स्टॉलधारकांना समजावून सांगतात आणि तरीही त्यांनी ऐकले नाही, तर त्यांच्यावर कारवाई करतात. ग्राहकांवर कारवाई करण्याची घटना आतापर्यंत घडलेली नव्हती. मात्र, गटारी अमावास्येच्या निमित्ताने काल ही कसरही भरून निघाली. रात्री "कर्तव्या'वर असलेले पोलिस अधिकारी आणि दोन-तीन हवालदार असा ताफा जीपमधून उतरला आणि त्यांनी पुढे मागे न पाहता टेबलांवर बसलेल्या ग्राहकांवर थेट लाठ्या उगारल्या. इतके करून ते थांबले नाहीत, तर शेवटपर्यंतची टेबल पायाने लाथाडली आणि लाठीमारही सुरूच ठेवला.

""तुम्ही माझ्यावर कारवाई करा पण ग्राहकांवर लाठीमार करू नका. आमच्या पाठीवर मारा पण पोटावर मारु नका,'' अशी विनंती स्टॉलधारकांनी केली; पण संबंधित अधिकाऱ्याने कोणालाच जुमानले नाही. ""गस्तीला येणाऱ्या बाकीच्या अधिकाऱ्यांचे मला माहिती नाही; पण मी राऊंडला आलो, की असेच होणार,'' असे प्रत्युत्तर "त्या' अधिकाऱ्याने दिले.आतापर्यंत अशी घटना कधीच घडलेली नसल्यामुळे भांबावलेले ग्राहक आपापल्या गाड्या घेऊन निघून जातात. त्यानंतर आपली काहीही चूक नसल्याची जाणीव झालेल्या स्टॉलधारकाचा आवाज चढतो. त्यासरशी त्याच्याशी संवाद मध्येच तोडून पोलिसांचा ताफाही निघून जातो.

मात्र त्याचवेळेस नदीकाठच्या रस्त्यांवर मोटारींमध्ये बसून मद्यप्राशनाचा आस्वाद लुटणाऱ्या शौकिनांकडे कर्तव्यावरील पोलिसांचे साधे लक्षही गेलेले नसते. आहे की नाही कमाल? एरवी चिकन किंवा मटण हाणून साजरी होणाऱ्या गटारीपेक्षा ही गटारी चांगलीच लक्षात राहणारी ठरली...

Thursday, August 09, 2007

खाकरा, ढोकला, फाफडा आणि मठिये


कडकडून भूक लागली आहे आणि आपल्यासमोर कोणीतरी विविध पदार्थांनी भरलेली गुजराती थाळी आपल्यासमोर आली की काय खावं आणि काय नको, अशी आपली अवस्था होऊन जाते. अनेकदा सुरवात कशानं करावी, हे देखील समजत नाही. फक्त गुजराती जेवताना अशी परिस्थिती होत असेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकताय. कारण तुम्ही गुजराती खाद्यपदार्थांच्या एखाद्या दुकानात गेला तर विविध खाद्यपदार्थांच रेलचेल व एकाच पदार्थाचे विविध प्रकार पाहिल्यानंतर गुज्जू भाईंच्या आस्वादक वृत्तीचा प्रत्यय येईल.

काही कारणानिमित्तानं बडोदा (वडोदरा) इथं जाणं झालं. तशी धावतीच भेट झाली. पण तरीही आवर्जून वेळ काढून टिपिकल गुजराती पदार्थ मिळणाऱ्या बडोद्यातील एखाद्या दुकानात भेट देणं ओघानं आलंच. प्रतिष्ठित अलकापुरी भागातील "पायल' नावाचं दुकान विशेष लोकप्रिय असल्याचं समजलं आणि थेट दुकान गाठलं. एका दुकानाचे तीन भाग करुन एका भागात गरमागरम ताजे पदार्थ, दुसऱ्या भागात खारा माल आणि तिसऱ्या बाजूला गोड पदार्थ असं विभागणी करुन येणाऱ्या प्रत्येक गिऱ्हाईकाच्या आवडी-निवडीची काळजी घेण्यात आली होती.

लज्जतदार खाकरे...
पाच पंचवीस प्रकारचे खाकरे, पन्नास प्रकारच्या आणि जाडीच्या शेव, स्पेशल गुजराती मठिये, विविध प्रकारचे वेफर्स आणि चिवडे अशी जवळपास शे-सव्वाशे रकाने नुसत्या खाद्यपदार्थांच्या "व्हरायटी'ने भरलेले होते. खाकरा म्हणजे पापडाच्या जाडीची कडक पुरी. लसण शेव, पालक शेव, मेथी शेव, लसण-पालक, पालक-मेथी आणि मेथी-लसण अशा विविध चवींमध्ये शेव उपलब्ध होते. हेच प्रकार जाड शेव, बारीस शेव, गाठी शेव अशा स्वरुपातही उपलब्ध होते. खाकऱ्याचीही गोष्ट काही वेगळी नव्हती. लसूण घातलेला, न घातलेला, पालक, मेथी व इतर अनेक चवींमधील खाकरे ग्राहकांची आशेनं वाटत पाहत होते. यांच्या जोडीला बटाट्याचा आणि मक्‍याचा चिवडा, केळ्याचे नि बटाट्याचे तिखट-बिनतिखट वेफर्स अगदी तय्यारीत होते.

चविष्ट मठिये...
मठिये हा खास गुजराती पदार्थ गुजराती तसंच बिगर गुजराती ग्राहकांचंही आकर्षण होता. गुजरातीत मटकीला मठ असं म्हणतात. त्यामुळं मटकीच्या पिठापासून केलेल्या पाणीपुरीच्या आकाराइतक्‍या तिखट-मिठाच्या पुऱ्या म्हणजे मठिये. तिखट-मीठ असूनही थोडे गोडाकडं झुकणारे मठिये तोंडाला वेगळीच चव देणारे आहेत.

सुरळीची वडीही...
ताज्या पदार्थांमध्येही सुरळीची वडी, साधा आणि तिखट ढोकळा, सॅंडविच ढोकळा, तिखट कचोरी, उपवासाची कचोरी, बटाट्याचे पॅटिस, पंजाबी सामोसा, इटुकला-पिटुकला सामोसा, आलू वडा (म्हणजे आपल्या बटाटा वड्याच्या जवळपासही न फिरकणारा पदार्थ) आणि पालक, मेथी, कांदा तसंच बटाटा भजी... इतकं वैविध्य पाहिल्यानंतर पटकन सांगता येईल काय खायचं आणि काय नाही ते! या सर्व पदार्थांबरोबर मिळणारी ढोकळ्याच्या चुऱ्यापासून बनविलेली हिरवी चटणी खासच. नुसती चटणीही तितकीच चांगली. आणि हो एक राहिलंच की, गुजरातची खासियत म्हणजे गरमागरम फाफडा. डाळीच्या पिठापासून तयार केलेला आकाराने लांबडा पदार्थ. गरमागरम चटणीसह खायला एकदम उत्तम.

फुल्ल खादाडी...
अर्थात गुजराती माणसाला किंमतीकडं पाहून खरेदी करण्याची सवय नसल्यानं पदार्थांच्या किंमतीही थोड्याशा चढ्याच. पण पदार्थ खाल्ल्यानंतर पैसा वसूल. त्यामुळं जादा पैसा गेल्याचं दुःख नाही. शेवची भाजी, गाठीची भाजी, शेव टॉमेटो भाजी हे पदार्थ अस्सल गुजराती. आपल्याकडं जशा वडापावच्या गाड्या असतात, तशा तिथं शेवऊसळच्या गाड्या सकाळपासून रात्रीपर्यंत असतात. वाटाण्याची उसळ, वरुन शेव आणि सोबतीला पुरी किंवा पाव ही गुजराती लोकांची आवडती डिश!

मसाला डोसा आणि इतर दाक्षिणात्य पदार्थ, भेळ, रगडा पॅटिस आणि पाणीपुरीसह चाटचे विविध प्रकार, पंजाबी डिशेस, चायनीज खाद्यपदार्थ यांच्या गाड्यांचीही रेलचेलही आपल्याला रस्त्यारस्त्यांवर दिसते. त्या गाड्यांभोवती असलेली तुडुंब गर्दी पाहिली की गुज्जू लोकांच्या "तबियत का राज' समजतं. पण हे सारं आपल्याकडंही अगदी मुबलक प्रमाणात मिळत असल्यानं तिकडं फिरकण्याचा प्रश्‍नच नव्हता.

भरुचनी सेंग...
रेल्वेनं येताना भरुच नावाचं स्टेशन लागतं. हे ठिकाण खारे शेंगदाणे आणि फुटाणे यांच्यासाठी प्रसिद्ध! मुंबईहून जाताना नर्मदा नदीवरील जवळपास दीड किलोमीटर लांबीचा पूल ओलांडला की गाडी थेट भरुच स्थानकात घुसते. तिथं स्टेशनवर किंवा आपण मोटारीनं जात असलो की "हायवे'वर असंख्य विक्रेते आपल्यापुढं खारे शेंगादाण्याचे पुडे घेऊन उभे असतात. त्यातही दोन-तीन प्रकार आहेत. लहान, मध्यम आणि मोठ्या आकारावरुन शेंगादाण्याच्या किंमती ठरतात. मध्यम आकाराचा शेंगादाणाही भलताच मोठा असतो. किलोला साधारण 80 ते 100 रुपये पडतात.

भरुचमध्ये शेंगादाणे पिकत नाहीत. ते येतात सौराष्ट्राहून. पण भरुचचे कारागिर उत्तम असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळं इथले खारे शेंगादाणे अधिक प्रसिद्ध आहेत. मोठाल्या कढईतील रेतीमध्ये भाजण्याच्या आदल्या रात्री हे शेंगदाणे रात्रभर खाऱ्या पाण्यात भिजवून ठेवले जातात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते चांगले भाजले जातात आणि त्यावेळी पुन्हा त्यावर खाऱ्या पाण्याचा शिडकावा केला जातो. त्यामुळं भरुचच्या शेंगादाण्यांची चव अगदीच न्यारी वाटते. रोज भरुचमध्ये जवळपास 20 टन शेंगादाणे सौराष्ट्र आणि दक्षिण भारतातून भरुचमध्ये येतात. थोडा माल "एक्‍सपोर्ट' होतो आणि काही माल भारताच्या इतर भागांमध्ये पाठविला जातो. पण बाकी सारा माल भरुच आणि गुजरातमध्येच खपतो.

Wednesday, August 01, 2007

दम बिर्याणी, मूँग डोसा आणि चाट


काही कारणानं हैद्राबादला जाणं झालं आणि पुन्हा एकदा आठवणींना उजाळा मिळाला. अडीच वर्षांपूर्वी अत्यंत जड अंतःकरणानं हैद्राबादला निरोप दिला होता. त्यामुळं हैद्राबादला गेल्यानंतर शक्‍य तितक्‍या ठिकाणांना पुन्हा भेट देण्याचं निश्‍चित केलं होते. खाण्याची ठिकाणं त्यात अग्रस्थानी होती हे सांगायला नकोच...

हैद्राबादचं खास आकर्षण म्हणजे बिर्याणी. त्यातही जुन्या हैद्राबादमध्ये मदिना, पिस्ता किंवा शादाब तसंच सिकंदराबादमध्ये "डायमंड' ही बिर्याणीची अगदी मोजकीच पण तितकीच चविष्ट ठिकाणं. त्यातही मला अधिक आवडते ती चारमिनारपासून चालत पाच मिनिटांच्या अंतरावर असलेल्या शादाबची बिर्याणी. जुन्या जमान्यातील इराणी कॅफे असतात तसं दुमजली हॉटेल. इतर चकमकीत हॉटेलपेक्षा थोडसं कळकटलेलंच! खालच्या मजल्यावर एकटी-दुकटी मंडळी चहा-बिस्कुट खात किंवा तंगड्या तोडत बसलेली असतात. तर तुलनेने प्रतिष्ठित आणि कुटुंब कबिला बरोबर असलेली मंडळी दुसऱ्या मजल्याच्या पायऱ्या चढतात.

इतर ठिकाणी मिळणाऱ्या बिर्याणीच्या तुलनेत इथं मिळणारी बिर्याणी काही औरच. चिकन, मटण किंवा अंडा कुठलीही बिर्याणी असो त्याचा स्वाद भातामध्ये इतक्‍या नैसर्गिकरित्या मिसळलेला असतो की काही विचारु नका. शिवाय ज्या मसाल्यामध्ये हे "पिसेस' घोळवलेले असतात तो मसालाच बिर्याणीची जान आहे. (अर्थात, मी हे सांगण्याची गरज नाही) त्यातच सारे पैसे वसूल. सोबत मिळालेली "करी' किंवा दह्यातून आलेले सॅलेड देखील भातात मिसळू नये, असं वाटण्याइतपत बिर्याणी "द ग्रेट' असते. (करी आणि सॅलेड फुकट मिळत असूनही खावंसं वाटत नाही)

बिर्याणी घ्यावी आणि त्यावर थोडंसं लिंबू पिळून हात चालविण्यास सुरवात करावी, हा आमचा नेहमीचा रिवाज. यंदाही अगदी तसंच. सकाळपासून विशेष खाणं झालं नसल्यामुळं एक चिकन बिर्याणी आणि एक मटण बिर्याणी आम्ही दोघांनी अगदी सहजपणे चापली. त्यानंतर हाफ-हाफ लस्सीचाही कार्यक्रम झाला. त्यानंतर "कुर्बानी का मिठा' नामक पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा होती. पण शक्‍यच नव्हतं. "कुर्बानी का मिठा' हा पदार्थ खास "बकरी ईद'च्या दिवशी बनविला जातो, असं सांगण्यात येतं. माझ्या माहितीनुसार खजूर (कौमुदी काशीकरच्या मते ओले अक्रोड) दोन-तीन दिवस गुलाबाच्या पाण्यात भिजवून ठेवले जातात. त्यानंतर त्यात साखरेचा पाक, सुकामेवा, क्रिम आणि इतर अनेक पदार्थ मिसळून "चेरी'सह हा "कुर्बानी का मिठा' एका कुंडा सदृश भांड्यातून तो "सर्व्ह' केला जातो. पण आम्हाला बिर्याणीसाठई "कुर्बानी का मिठा'ची कुर्बानी द्यावी लागली. मग नेहमीप्रमाणे "मिनाक्षी पान' खाण्याचा कार्यक्रम पार पडला.

मूग डोसा द बेस्ट!
हैद्राबादचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे डोसा, इडली, उत्तप्पा, उप्पीट, उप्पीट-डोसा आणि मूग डोसा... पुण्या-मुंबईत वडापावच्या गाड्या जितक्‍या बक्कळ तितक्‍याच इडली-डोसाच्या गाड्या हैद्राबादेत भरपूर. हॉटेलांमध्येही हे पदार्थ इथल्या तुलनेत स्वस्त असतात. आठ रुपयांमध्ये इडली-चटणी-सांबार अगदी नको नको म्हणेपर्यंत. शिवाय "एक्‍स्ट्रा'चे पैसे नाहीत. इडलीचा आकार "वाडेश्‍वर'च्याही तोंडात मारेल असा.

या सगळ्या दाक्षिणात्य पदार्थांच्या भाऊ गर्दीत आपल्या येथे न मिळणारा वेगळा पदार्थ म्हणजे "मूँग डोसा'. उडीद डाळ आणि मूग डाळ भिजत घालून त्याचे पिठ करायचे आणि त्या पिठापासून डोसा करायचा. त्याला खोबऱ्याची पांढरी आणि लाल तिखट चटणी फासायची. त्यानंतर आता नेहमीप्रमाणे बटाट्याची भाजी टाकायची किंवा मग गरमागरम उप्पीट घालायचे. काही अण्णा मंडळी उप्पीट किंवा बटाट्याची भाजी त्यावर फासतात आणि कट डोसाप्रमाणे खातात. पण इतका काला करण्याचे आपले धाडस होत नाही.


गंमत चाटची
पाणीपुरी आणि चाट हे पदार्थही इथं हातगाडीपासून ते दुकानांपर्यंत सर्वत्र मिळतात. भेळ हा पदार्थ मात्र, मोजक्‍याच काही ठिकाणी मिळतो. त्यातही इथल्या भेळची आणि पाणीपुरीची चव अगदीच वेगळी आणि तितकीशी चांगली देखील नाही. मुंबईत जसे भय्या लोक भेळमध्ये उकडलेला बटाटा घालतात. त्याचप्रमाणे हैद्राबादेत भेळमध्ये काकडी घालण्याची पद्धत आहे. भेळही फार कमी ठिकाणी मिळते. आम्ही रहायचो तेथे (दिलसुखनगर) मराठवाडा येथून आलेले एक मामा आहेत. त्यांच्या दुकानात महाराष्ट्रात मिळते तशी भेळ आणि पाणीपुरी मिळते. इतरत्र सारेच अवघड. पाणीपुरी करताना चिंच-गुळाचे पाणी वापरले जात नाही. उकडलेल्या वाटाण्याचे सारण आणि सोबतीला फक्त पुदीन्याचे तिखट पाणी यावरच तुमची हौस भागवावी लागते. हैद्राबादमध्ये चिंच-गुळाच्या पाण्याची बात नस्से. त्यामुळे पाणीपुरी म्हणावी तितकी चविष्ट होत नाही.

हैद्राबादेत कोटी येथे गोकुळ नावाचे चाट सेंटर आहे. एका उत्तर भारतीय व्यक्तीकडून गोकुळ नावाचे तब्बल चार मजली दुकान आहे. सदैव भरगच्च असलेले हे दुकान चवीच्या बाबतीत अगदीच अप्रतिम आहे. मग छोले-भटुरे असो, भेळ पुरी असो किंवा रगडा पॅटिस असो... कचोरी असो किंवा दही वडा सारं कसं झक्कास. त्यामुळे कधी हैद्राबादला गेलात तर "गोकुळ'ला भेट द्यायला विसरु नका.

तिथं काही मोजक्‍या ठिकाणी चहा करण्याची पद्धतही न्यारीच आहे. कोरा चहा आणि कोरी कॉफी दोन निरनिराळ्या भांड्यांमध्ये उकळत असते. तर तिसऱ्या पातेल्यात गरम दूध ठेवलेले असते. तुम्हाला फिका चहा-कॉफी हवी किंवा कडक कॉफी-चहा पाहिजे, हे लक्षात घेऊन तो हॉटेलवाला तुम्हाला हवा तसा चहा तुमच्यासमोर पेश करतो. काहीसा कडवट आणि कडक असा हा चहा चांगलाच लक्षात राहतो. वडापाव आणि कच्छी दाबेली हे पुण्या-मुंबईत जागोजागी मिळणारे पदार्थ इथं मात्र, नजरेसही पडत नाहीत. अगदी सिकंदराबाद किंवा अमीरपेट सारख्या हैद्राबादी संस्कृतीपासून थोडंसं वेगळ्या असलेल्या ठिकाणी गेलं की तिथं हे पदार्थ चाखायला मिळतात. पण तेथेही शोधल्यानंतरच या पदार्थांचा शोध लागतो.

मग कधी जाताय हैद्राबादला?????