Sunday, August 21, 2016

उसेन गोल्ड

अचाट, अफाट, सुसाट आणि जबराट...

काही वर्षांपूर्वी टीव्हीवर एक जाहिरात लागायची. बॉलिवूडमधील एक अभिनेता इतर स्पर्धकांना वाकुल्या दाखवत धावण्याची शर्यत अगदी सहजपणे जिंकतो. अगदी सहजपणे चालत, नाचत स्पर्धा जिंकताना तो दाखविला आहे. जाहिरातीत काय काहीही दाखवितात, असं म्हणून आपण ती जाहिरात हसण्यावारी नेतो. मात्र, खऱ्या दुनियेतील शर्यतीमध्येही गेली दहा-बारा वर्षे अगदी अशीच परिस्थिती आहे. धावण्याच्या शर्यतीत स्वतःशीच स्पर्धा करीत, स्वतःचेच जुने रेकॉर्ड मोडीत, सर्व स्पर्धकांना पाच-दहा फूट मागे टाकत एक अवलिया धावपटू प्रत्येक स्पर्धेगणिक नवनवीन शिखरे पादाक्रांत करीत आहे. असा हा एकमेव अद्वितीय खेळाडू म्हणजे जमैकाचा उसेन सेंट लिओ बोल्ट.


असं म्हणतात, की काही जणांची निर्मिती करताना देव थोडा अवधी जास्तच घेतो. फुरसतीनं त्यांना बनवितो. त्यांची निर्मिती करताना विशेष प्रयत्न करतो. त्यांच्या अंगी चार गुण, चार कला जास्तच टाकतो. हे जर खरं असेल, तर उसेन बोल्टची निर्मिती करताना देवानं किमान काही दिवस तरी नक्की घेतले असतील. त्याशिवाय या धरतीवर अशा अजिंक्य नि अतुलनीय खेळाडूची निर्मिती होणं अवघड आहे. आतापर्यंत असा स्प्रिंटर झाला नाही आणि भविष्यातही कदाचित होणार नाही. बोल्टच्या कामगिरीवर फक्त एक नजर जरी मारली ना तरी कळेल, हे वाक्य किती बरोबर आहे.

बीजिंग (२००८), लंडन (२०१२) आणि रिओ (२०१६) अशा सलग तीन ऑलिंपिक स्पर्धांमध्ये १०० मीटर, २०० मीटर आणि ४ बाय १०० मीटर रिले अशा तीन प्रकारांमध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो एकमेव खेळाडू आहे. एकाच स्पर्धेत तीन प्रकारांच्या शर्यतींमध्ये सुवर्णपदक पटकाविताना खेळाडूंचे तीनतेरा वाजतात. ते सुवर्णपदक सलग तीन स्पर्धांमध्ये राखणं तर ‘दूर की बात’. बरं सर्व ठिकाणचं यश निर्विवाद. नऊ सुवर्णपदकांपैकी एखाद्या वेळी ‘फोटोफिनीश’चा आधार घ्यावा लागलाय किंवा अगदी घासून सुवर्णपदक जिंकलंय वगैर वगैरे काहीही नाही. प्रत्येक वेळी किमान काही फूट अंतर राखून पठ्ठ्यानं ही नऊ सुवर्णपदकं मिळवली आहेत. हे कमी म्हणून की काय वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धांमध्ये मिळविलेली ११ सुवर्णपदकं वेगळी. बरं तीनही प्रकारच्या शर्यतींमधील जागतिक विक्रम याच पठ्ठ्याच्या नावावर आहेत. अगदी आता रिओ ऑलिंपिकमध्येही ४ बाय १०० रिले शर्यतीत जमैकाच्या संघानं नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. बोल्टच्या हातात बॅटन येईपर्यंत जमैका आणि प्रतिस्पर्धी धावपटूंमधील अंतर आणि बोल्ट सुसाट सुटल्यानंतरचे अंतर सारं काही सांगून जाते. म्हणूनच बोल्ट हा देवानं विशेष प्रयत्न करून बनविलेला खेळाडू आहे, असं मला वाटतं.

काही वर्षांपूर्वी एका संस्थेनं एक प्रयोग केला. पृथ्वीवरील सर्वाधिक वेगवान प्राणी आणि पृथ्वीवरील सर्वाधिक वेगवान मनुष्य यांना १०० मीटरचे अंतर कापण्यास किती वेळ लागतो याचा त्यांनी अभ्यास करण्याचे ठरविले. यू-ट्यूबवर या संदर्भातील व्हिडिओ पहायला मिळतो. समोर असलेल्या भक्ष्याला पकडण्यासाठी जीव तोडून पळणारा चित्ता या व्हिडिओत दिसतो. चित्त्याने वेगाने कापलेले १०० मीटरचे अंतर त्यांनी वारंवार नोंदविले. चित्त्याला १०० मीटरचे अंतर कापण्यासाठी लागलेली सर्वोत्तम वेळ नोंदली गेली आहे ६.१३ सेकंद. दुसरीकडे जगातील सर्वाधिक वेगवान मनुष्य असलेल्या उसेन बोल्टची १०० मीटरचे अंतर कापण्यासाठीची विक्रमी वेळ आहे ९.५८ सेकंद. म्हणजे दोघांमधील अंतर आहे अवघे ३.४५ सेकंद. या प्रयोगाची किंवा टायमिंगची जागतिक पातळीवर दखल किती प्रमाणात घेतली जाते वगैरे गोष्टी गौण आहेत. बोल्टच्या वेगाचा अंदाज येण्यासाठी हा प्रयोग पुरेसा बोलका आहे.


पण विरोधाभास असा, की बोल्ट हा शंभर किंवा दोनशे मीटर स्पर्धेसाठी योग्य शरीरयष्टी असलेला खेळाडू नाही, असे तज्ज्ञ सांगतात. अगदी सुरुवातीच्या काळात त्याचा काहीसा फटकाही बोल्टला बसला. ‘तू शंभर किंवा दोनशे मीटरच्या शर्यतीसाठी प्रयत्न करू नकोस,’ असं त्याचे प्रशिक्षक त्याला सांगायचे. म्हणजे, स्प्रिंटर्स खूप उंच नसावा, असे त्यांचे मत. स्प्रिंटरची खूप उंचही नसावा किंवा बुटकाही नसावा. त्याची उंची मध्यम स्वरुपाची असावी. कारण शर्यतीला सुरुवात केल्यानंतर पूर्णपणे फॉर्ममध्ये येऊन पूर्ण जोशाने धावण्यास प्रारंभ करण्यासाठी खूप उंच अॅथलिट्सना थोडा अधिक वेळ लागतो आणि शंभर-दोनशे मीटरच्या शर्यतीसाठी हा मुद्दा खूपच महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे सहा फूट पाच इंच असलेल्या उसेन बोल्टची उंची शंभर किंवा दोनशे मीटरसाठी अनुकूल ठरत नाही, असं प्रशिक्षक आणि तज्ज्ञांना वाटतं.

तसं आहेही. कारण बोल्टही ती गोष्ट मान्य करतो. म्हणजे शर्यतीची सुरुवात करताना त्याला त्रास होतो. ‘अॅम अ पूअर स्टार्टर,’ असं तो सांगतो. म्हणजे माझी पहिली काही पावलं ही वेगवान नसतात. शिवाय संपूर्ण शरीर ताणून वेगानं धावण्यासाठी मला पहिले तीस मीटर खर्ची घालावे लागतात. इतर धावपटू आधीच ‘टॉप स्पीड’मध्ये पोहोचलेले असतात, असं तो सांगतो. पण एकदा त्यानं बॉडी पूर्ण स्ट्रेच केली आणि देवानं फक्त त्यालाच दिलेला ‘टॉप गिअर’ टाकला, की मग तो मागे वळून पाहतच नाही. पहिल्या तीस मीटरनंतरची पुढची सर्व शर्यत त्याचीच असते. पन्नास ते साठ मीटरपर्यंत येऊन ठेपल्यानंतर तो आपल्या डावी-उजवीकडे पाहतो. बाकीचे धावपटू किती मागे आहेत. आपल्या आणि त्यांच्यातील अंतर किती आहे वगैरे वगैरे. १०० मीटरच्या शर्यतीत चित्त एकाग्र करून पळताना अशा पद्धतीनं आजूबाजूला पाहणं म्हणजे मूर्खपणाच, असं आपल्याला वाटतं. ‘असं बघण्याच्या नादात एखादी स्पर्धा गमावून बसेल बोल्ट,’ अशी भीतीही आपल्याला वाटते. मात्र, तसं करणं त्याच्या ट्रेनिंगचा आणि सवयीचा भाग आहे. त्यामुळं त्याला इकडेतिकडे पाहण्याची काहीच भीती वाटत नाही.

‘निम्मे अंतर कापल्यानंतर मी चाहत्यांचा आवाज कानात साठवून घेतो. मला प्रोत्साहन देत असतात ते ऐकत असतो. त्याचा फायदा घेऊन वेग आणखी वाढवत असतो. ६०व्या किंवा ७०व्या मीटरला मला कळतं, की आता मी शर्यत जिंकणार आहे. (काय आत्मविश्वास आहे राव!) पुढील ३०-४० मीटर माझे असतात. तिथं मला कोणी मागे टाकू शकत नाही. आणखी वेग वाढवितो आणि प्रतिस्पर्धांना आणखी मागे टाकतो. अखेरच्या १०-१५ मीटरमध्ये पुन्हा एकदा डावी-उजवी बाजू पाहतो आणि आता किती वेगाने पळायचे हे ठरवितो की थांबले तरी चालेल याचा विचार करतो,’ असं बोल्ट गमतीनं म्हणतो.

‘शेवटच्या दहा मीटरमध्ये कोणीही मला गाठू शकत नाही. मग स्पर्धा कोणतीही असो आणि प्रतिस्पर्धी कोणीही असो…’ काय म्हणायचं बोल्टच्या या आत्मविश्वासाला… सहा फूट पाच इंच ही उंची त्याला इथं कामी येते. म्हणजे शेवटच्या टप्प्यात बोल्ट आणि प्रतिस्पर्धी यांच्यातील अंतर वाढविण्यासाठी बोल्टला उंचीचा खूप फायदा होतो. पाहता पाहता तो इतर धावपटूंना कुठल्या कुठं मागं टाकून देतो आणि अगदी सहजपणे सुवर्णपदक पटकावितो. बोल्ट जमैकाचा असल्यामुळे स्पर्धा जिंकल्यानंतर खास कॅरेबियन स्टाइलमध्ये सेलिब्रेशन तर व्हायलाच हवे आणि तसे होतेही. चाहते आणि प्रेक्षकांना प्रतिसाद देत बोल्टही त्यांच्या जल्लोषामध्ये सहभागी होऊन जातो. खास बोल्ट स्टाइल करून फोटोग्राफरला पोझही देतो.

तीन ऑलिंपिक आणि ११ वर्ल्ड चॅम्पियनशिप्स. नेहमी वेगळा देश, वेगळा खंड, वेगळे वातावरण आणि नवे प्रतिस्पर्धी. समानता आणि सातत्य एकच. जमैकाचा उसेन सेंट लिओ बोल्ट. अॅथलेटिक्सच्या बाबतीत बोलायचं झालं, तर ‘बोल्ट इज द ओन्ली कॉन्स्टन्ट.’ एखाद्या अॅथलिटचे सार्वकालीन सर्वश्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी आणखी काय हवे...

 

पूर्वप्रसिद्धीः महाराष्ट्र टाइम्स (२१ ऑगस्ट २०१६)