Tuesday, April 29, 2014

क्यो पडते हो चक्कर मे...

प्रियांकाजी है टक्कर में

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांच्या प्रचार फेरीत सहभागी झाल्यानंतर दुस-या दिवशी रायबरेलीला जाण्याचं प्लॅनिंग होतं. सातव्या टप्प्याचा प्रचार सोमवारी संपणार होता. तिथं बुधवारी म्हणजेत ३० एप्रिल रोजी मतदान आहे. त्यामुळं रायबरेलीला जाण्याचं निश्चित केलं. रायबरेलीतून सोनिया गांधी येणार ही काळ्या दगडावरची रेघ. पण तरीही तिथं जाऊन नेमकं रायबरेली कसं आहे. भारतावर ज्या महिलेनं दहा वर्षे निर्विवाद सत्ता गाजविली, हुकुमत केली, त्या सोनियांचा मतदारसंघ नेमका कसा आहे, हे पाहण्याची आणि परिस्थिती जाणून घेण्याची उत्सुकता होती. केवळ आणि केवळ त्यामुळंच तिथं जायचं होतं. बाकी निकाल तर ठरलेलाच आहे. लखनऊतल्या आलमबाग बस डेपोतून रायबरेलील जाणा-या बसेस सुटतात. लखनऊपासून सुमारे नव्वद किलोमीटरवर असलेलं गाव. लखनऊमध्ये सध्या ३९ ते ४० अंश सेल्सियस तापमान आहे. पण उन्हाचा तीव्रता इतकी आहे की विचारता सोेय नाही. अकोला, वाशिम, नांदेड, जळगांव किंवा हैदराबादची आठवण यावी, इतकं कडक ऊन आहे. दुपारी साधारण पावणेबाराच्या सुमारास लखनऊ सोडलं. दुपारी दोन वाजता रायबरेलीत प्रियांका गांधी यांचा रोड शो होता. त्यामुळं अगदी वेळेवर तिथं पोहोचेन अशा बेतानं निघालो. लखनऊ-अलाहाबाद हायवेवर आत उजवीकडे वळल्यानंतर रायबरेली गाव लागतं. दोन पदरी महामार्ग आत्ता कुठं चौपदरी करण्याचं काम सुरू झालंय. वाटेत एक-दोन ठिकाणी नदीवर मोठे पूल बांधणं आणि गावात ट्रॅफिक जाम होऊ नये, म्हणून फ्लाय ओव्हर उभारण्याचं कामही सुरू आहे. रायबरेली आणि परिसरातील गावात प्रचंड पाऊस होतो. त्यामुळं इथं धानाची म्हणजेच तांदळाची शेती मोठ्या प्रमाणावर होते. काही गावांमध्ये गहू देखील घेतला जातो. इथले जवळपास ८० टक्के लोक हे शेती आणि शेतीपूरक व्यवसायांवर अवलंबून आहेत, असं बसमध्ये भेटलेले सहप्रवासी आणि माजी शिक्षक जयद्रथ चौधरी यांनी सांगितलं. सोनिया यांच्या कृपेमुळ इथं रेल्वे कोचची फॅक्टरी, सिमेंटची फॅक्टरी, सिमेंटचे पत्रे बनविणारी फॅक्टरी वगैरे आली, असंही त्यांनी आवर्जून सांगितलं. मात्र, शेती हाच इथला मुख्य व्यवसाय. सोनियाजींनी खूप निधी केंद्रातून आणला. मात्र, राज्य सरकारने पैसाच सोडला नाही. आमच्याकडे दुर्लक्श केलं, त्यामुळं रायबरेली अजूनही विकसित झालेलं नाही, असं चाचा चौधरी यांचं म्हणणं होतं. मोदीजी की लहर होगी, लेकिन यहा तो सोनियाजी को ही जीतना है, असं चाचा चौधरी यांच्यासह एसटीमध्ये भेटलेले आणखी दोन-तीन सहप्रवासी देखील म्हणत होते.बछरावा, हरचंदपूर आणि गंगागंज वगैरे गावं मागं टाकून आम्ही रायबरेलीमध्ये प्रवेश केला. गावाचा लुक खेड्यासारखा. महाराष्ट्रातील एखाद-दुसरा तालुका सोडला तर इतर कोणत्याही विकसित तालुक्याच्या तुलनेत अत्यंत मागास, अस्वच्छ आणि विस्कळित असं गाव. म्हणजे गेल्या साठ वर्षांमध्ये गांधी घराण्यानं इथं राज्य केलं, असं सांगूनही कोणाचा विश्वास बसणार नाही, इतकी वाईट अवस्था रायबरेलीमध्ये दिसते. उघडी गटारं, मुंबईत खाडीच्या आसपास असताना नाकात घुसणारी नको असलेली दुर्गंधी इथं त्या उघड्या गटारांजवळ आपल्याला हैराण करणारी. प्रचंड तापलेले वातावरण, सगळीकडे प्रचंड तापमान आणि मधूनच येणारी ती दुर्गंधी अस्वस्थ करून टाकणारी. अरुंद रस्ते, एकावेळी दोन गाड्या कशाबशा जाऊ शकतील इतक्यात रुंदीचे हे रस्ते कम बोळ. 

एकमेकांना खेटून उभारलेली घरं. त्याला ना आकार ना उकार.फक्त चार भिंती रचून वर छप्पर आणि समोर दरवाजा काढला की झालं घर, अशा पद्धतीचं बांधकाम. एसटी स्टँड तर अत्यंत घाणेरडा, छोटा आणि बेशिस्त स्वरुपाचा. चौकाचौकात फेरीवाले, हातगाड्यांवर सरबत, खाण्यापिण्याचे पदार्थ आणि इतर वस्तू विकणारे हातगाडीवाले. थोडक्यात म्हणणे सोनियांचा मतदारसंघ म्हणून मिरविणा-या रायबरेली जिल्ह्यातील मुख्य गावाची ही परिस्थिती तर इतर खेडोपाड्यांत आणि गावांमध्ये काय परिस्थिती असेल विचारायला नको. नेत्रचिकित्सालया शेजारच्या कार्यालयातून प्रियांका वड्रा यांची रॅली निघणार असते. प्रियांकांच्या स्वागतासाठी काँग्रेस कार्यकर्ते आणि नेते मोठ्या संख्येनं जमलेले असतात. काँग्रेसचे रायबरेली जिल्हाध्यक्ष सईदुल हसन हे प्रियांकांचं स्वागत चौकाचौकात आणि व्यवस्थितपणे होईल, याचं नियोजन पाहत असतात. फुलं, हार, काँग्रेसच्या टोप्या, उपरणाी वगैरे सर्वांपर्यंत पोहोचली की नाही, याचा अंदाज घेऊन ते देखील प्रियांकांच्या स्वागतासाठी सज्ज होतात. 

एवढ्यात जोरजोरात घोषणाबाजी सुरू होते आणि बरोब्बर अडीचच्या सुमारास प्रियांका वड्रा त्यांच्या टोयोटातून येतात. येतात ते थेट कार्यालयाच्या समोरच्या मैदानात त्यांची टोयोटा थांबते. आतमध्ये जाऊन प्रमुख कार्यकर्त्यांशी दोन-तीन मिनिटांत संवाद साधून पुन्हा बाहेर येतात. कारमध्ये बसून प्रियांका यांनी रोड शो करावा, असा सिक्युरिटीचा आग्रह असतो. तशी विनंती देखील त्यांना केली जाते. प्रियांका गाडीत बसतात देखील. मात्र, मिनिटाभराच्या आतच गाडीतून बाहेर उतरतात आणि वेगानं चालतच तिथून मार्गस्थ होतात. चार साडेचार किलोमीटरचा हा टप्पा चालतच पार करण्याचा निश्चय प्रियांका यांनी मनोमन केलेला असतो. त्या थेट रस्त्यावर उतरून स्वागतासाठी थांबलेल्या नागरिकांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये शिरतात. हा रोड शो आता ना सिक्युरिटीच्या आवाक्यात राहिलेला असतो ना काँग्रेस कार्यकर्त्यांचा. सिक्युरिटी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचं कडं मोडून नागरिक आणि इतर लोक थेट आत घुसून प्रियांका यांच्याशी हस्तांदोलन करतात. त्यांना हार घालतात. त्याच्यावर फुलांची आख्खी टोकरी पालथी करतात. प्रियांका गांधी देखील चालताना थेट दुकानांमध्ये जाऊन उभ्या असलेल्या पुरुष मंडळींना  नमस्कार कर, महिलांची गळाभेट घे, उभ्या असलेल्या लहान मुलाला कडेवर उचलून घे, कार्यकर्त्यांशी एक-दोन शब्द बोल... असं करून फुल्ल हवा निर्माण करतात. लोकांचा जत्थाच्या जत्था प्रियांका यांच्या सोबत पुढे चाललेला असतो. गांधी घराण्याची क्रेझ म्हणजे काय हे रायबरेलीतल्या रोड शो मध्ये अगदी व्यवस्थित पहायला मिळालं. तीस तारीख दुसरा खाना, पंजेपर ठोक देना... किंवा क्यो पडते हो चक्कर में, प्रियांकाजी है टक्कर में... अशा घोषणा देत कार्यकर्ते फुल्ल टू वातावरण निर्मिती करीत असतात. रायबरेली की जनता का हाथ, सोनियाजी के साथ अशा घोषणाही अधून मधून कानावर पडत असतात. प्रियांकाजी आयी है, नयी रोशनी लायी है वगैरेही ऐकू येत असतं. 

 

मुस्लिम मोहल्ला आल्यानंतर तर रोड शो तील जल्लोष, उत्साह आणि आनंद टिपेला पोहोचतो. प्रियांका यांचं सर्वाधिक जोरदार स्वागत सफा मंजिल की तत्सम कुठल्याशा बिल्डिंगपाशी होतं. मुस्लिम महिला त्यांना हात दाखवून हसत हसत अभिवादन करतात. प्रियांका देखील त्यांच्याकडे वर पाहतच पुढं जात राहतात. अत्यंत वेगानं चालणा-या प्रियांका थोड्या दमल्या तर कारच्या फूटरेस्टवर उभ्या राहून लोकांना हात हलवून अभिवादन करीत असतात. पण त्यांची ही छोटेखानी विश्रांती अवघी पाच मिनिटंच टिकते. नंतर त्या पुन्हा रस्त्यावर उतरून वेगानं मार्गस्थ होतात. काश्मिरी सौंदर्याचं जन्मजात वरदान लाभलेल्या प्रियांका यांचा चेहरा कडक उन्हामध्ये फिरताना सफरचंदासारखा लालबुंद होतो. मात्र, त्यांच्या उत्साहावर त्याचा अजिबात परिणाम होत नाही. त्या चालतच असतात.संपूर्ण रायबरेली गावामध्ये फिरून झाल्यानंतर त्यांचं काँग्रेसचं रायबरेली मुख्यालय असलेल्या टिळक भवन इथं आगमन होतं. तिथंही त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केलेली असते. अभय त्रिवेदी, रमाकांत पाण्डेय वगैरे कार्यकर्त्यांनी मोठाच्या मोठा गुलाबाचा हार प्रियांका यांच्यासठी आणलेला असतो. रोड शो संपवून प्रियांका यांचं काँग्रेस भवनात जोरदार स्वागत होतं. त्यांना हार वगैरे घातल्यानंतर प्रियांका फक्त पाच मिनिटांसाठी कार्यालयात जातात. ज्येष्ठ आणि प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर मग त्या राज्य सरकारच्या गेस्ट हाउसवर निघून जातात. प्रियांका वड्रा आणि गांधी घराण्याची जादू काय असते हे रायबरेलीमध्ये अनुभवायला मिळालं. अर्थात, रायबरेलीमध्ये हे चित्र असणार हे माहिती होतंच. मात्र, तरीही प्रियांका या नावाची जादू काय आहे, त्याची चुणूक जाणविली. राहुल यांच्या तुलनेत कितीतरी पटीनं अधिक लोकप्रिय आणि गर्दी खेचणारा चेहरा म्हणून प्रियांका यांच्याकडे काँग्रेसनं गांभीर्यानं पहायला हरकत नाही. अर्थात, यंदाची निवडणूक राहुल यांच्या नेतृत्वाखाली लढल्यानंतर प्रियांका यांचा हुकुमाचा एक्का काँग्रेसकडे अजूनही शाबूत आहे, याची जाणीव भाजपाच्या नेत्यांनी ठेवायला हरकत नाही. सोनिय गांधी परदेशाी आहेत, गांधी घराण्याने घराणेशाही लादली वगैरे कितीही आरोप झाले, तरी भारतात गांधी घराण्याची जादू आहे आणि ती यापुढेही शाबूत का राहू शकते, याचा अंदाज बांधण्यासाठी कोणा राजकीय विश्लेषकाची गरज नाही. 

प्रियांका यांचे पती रॉबर्ट यांच्यावर भाजपने जोरदार हल्ला सुरू केल्यानंतर प्रियांका यांनीही अत्यंत संयतपणे मात्र, रोखठोकपणे नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. भारतात राज्य करायचं असेल तर ५६ इंचाची छाती असून उपयोग नाही, तर मन मोठं पाहिजे किंवा कसे घाबरलेल्या उंदरासारखे इकडे तिकडे पळत आहेत भाजपवाले... वगैरे वगैरे वक्तव्यांनी इथं माहोल निर्माण केला आहे. प्रियांका गांधी यांना काँग्रेसनं थोडं आधी आणि रायबरेली-अमेठी सोडून इतर मतदारसंघांमध्ये प्रचारासाठी उतरविलं असतं तर भाजपच्या मिशन ५० प्लसला नक्कीच लगाम घातला गेला असता. पण कदाचित रिस्क नको आणि पुढील निवडणुकीपर्यंत पत्ते बंदच ठेवलेले बरे, अशा विचारात काँग्रेस नेते असावेत. म्हणूनच त्यांनी प्रियांकांवर दोनच मतदारसंघाची जबाबदारी दिली. उत्तर प्रदेशात मोदींची हवा आहेच. जागा किती मिळतीत, हे आता ठोकपणे मी सांगू शकणार नाही. मात्र, रोज फिरताना ऑटोवाले, पाणीपुरीवाले, सरबतवाले, बसमधील सहप्रवासी अशा कोणालाही विचारलं तरी यंदा मोदीच आहे, असं उत्तर येतं. त्यामुळं कोणी काहीही म्हणो इथं फिरताना मोदीचा बोलबालाच ऐकायला मिळतो आहे. मात्र, भविष्यात प्रियांका गांधी यांच्या रुपानं भाजपसमोर तुलनेनं कठीण आव्हान उभं ठाकणार आहे, याची कल्पना रायबरेलीमध्ये आली. १९८९ ते २००४ या काळात गांधी घराणे सत्तेपासून दुूर होते. काँग्रेस संपली. गांधी घराणे इतिहासजमा झाले वगैरे गप्पा मारल्या जात होत्या. मात्र, त्याच काँग्रेसने आणि गांधी घराण्याने पुढची दहा वर्षे सत्ता उपभोगली. काँग्रेसने बाउन्स बॅक केले. त्यामुळे काँग्रेसला संपविणे वाटते तितके सोपे नाही. किमान प्रियांका गांधी हे चलनी नाणं उपयुक्त नाही, असे सिद्ध होईपर्यंत तर अजिबातच नाही. 

भारतीय जनता पार्टीचे अजय अगरवाल रायबरेलीतून उभे आहेत. सुप्रीम कोर्टातील वकील आहेत. मात्र, सोनिया यांना टक्कर देणारा उमेदवार म्हणून प्रतिमा निर्माण करण्यात ते अपयशी ठरले आहेत. रायबरेली गावात तर भाजपचे झेंडे देखील कुठं दिसत नाहीत. संपूर्ण गावात हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच झेंडे दिसले. रायबरेलीमध्ये भाजपचं ऑफिस कुठं आहे, हे दुकानदार, फेरीवाले, हातगाडीवाले, ऑटोवाले आणि बाजारात आलेले नागरिक यापेैकी कोणालाही माहिती नाही. सुपर मार्केट नावाच्या भागात एका इमारतीमध्ये भाजपचे कार्यालय आहे, याचा शोध साधारण तासभर शोध घेतल्यानंतर लागतो. गमतीची गोष्ट म्हणजे निवडणूक ऐन मोसमात आलेली असताना आणि मतदानाला फक्त दोन दिवस बाकी असताना भाजपच्या कार्यालयाला चक्के कुलूप लावलेले दिसते. असाच अनुभव गुजरातच्या निवडणुकीत सुरत आणि वडोदरा येथील काँग्रेस कार्यालयांमध्ये आला होता. एक बंद होतं तर दुसरीकडं शुकशुकाट. 


भाजपच्या उमेदवारानं दुसरीकडे कुठेतरी कार्यालय थाटल्याचं समजतं. मात्र, तरीही रायबरेली जिल्हा कार्यालय बंद असल्याचं समर्थन कोणीच करू शकणार नाही, अशी परिस्थिती. हिरालाल बैन्सवाल नावाचे एक साठीकडे झुकलेले भाजपाचे कार्यकर्ते भेटतात. ते दोन वर्षांपूर्वी भाजपामध्ये आले होते. त्यांनाही नव्या कार्यालयाची माहिती नसते. ते त्यांच्या परीने शोधाशोध करून मुख्यालय उघडता येईल का, याचा प्रयत्न करतात. मात्र, मुख्यालय बंदच असते. अजय अगरवाल यांच्याशी फोनवरून बोलणं होतं. ते दुस-या गावांमध्ये प्रचार संपवून रायबरेलीच्या दिशेनं यायला निघालेले असतात. मात्र, मला लखनऊ गाठायचं असल्यानं मी फोनवरच त्यांचा निरोप घेतो आणि शुभेच्छा देऊन निघतो...

Monday, April 28, 2014

चप्पा चप्पा... भाजप्पा...


जन जन का संकल्प अटल... 

लखनऊ... संपूर्ण भारतामध्ये नवाबांचं लखनऊ हीच लखनऊची ओळख असली तरीही माझ्यासाठी लखनऊ म्हणजे भारताचे लाडके पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं लखनऊ... वाजपेयी  आणि लखनऊ यांचं अतूट नातं आहे. त्यामुळंच उत्तर प्रदेशच्या निवडणूक दौ-याची सुरुवात लखनऊपासूनच करण्याचं निश्चित केलं होतं. त्यानुसार सुरुवात झाली.

यंदा लखनऊमधून भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह हे निवडणूक लढवित आहेत. अमित शहा यांच्यावर उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपविण्यात आल्यानंतर त्यांनी अनेक सुभेदारांची हलवाहलव करून पार्टीच्या समोर कोणीही मोठा नाही, हा संदेश देण्याचा प्रयत्न केला. त्या हलवाहलवीमध्ये लखनऊमधून हलविण्यात आलेले एक नेते लालजी टंडन. त्यांच्याऐवजी राजनाथ यांना लखनऊमधून उतरविण्याचा निर्णय पार्टीने घेतला. लखनऊ हा भाजपाचा उत्तर प्रदेशातील सर्वाधिक मजबूत बालेकिल्ला आहे. १९९१ पासून वाजपेयी इथले खासदार होते. त्यानंतर एक टर्म टंडन हे लखनऊचे किल्लेदार होते. आता राजनाथ हे लखनऊतून उभे आहेत.काँग्रेसच्या रिटा बहुगुणा-जोशी, समाजवादी पार्टीचे आलोक मिश्रा, बहुजन समाज पार्टीचे नकुल दुबे आणि आम आदमी पार्टीचे जावेद जाफरी हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. लखनऊमध्ये जवळपास साडेतीन लाख मते ही मुस्लिमांची आहेत. त्यापैकी जवळपास दोन लाख मते ही शिया मुस्लिमांची आहेत. त्यामुळे भाजपाचा बालेकिल्ला हस्तगत करायचा असेल तर एकगठ्ठा मुस्लिम मते आपल्या पारड्यात पाडायची हा सर्वाधिक सोप्पा उपाय. मात्र, यावेळी परिस्थिती रंजक आहे. जावेद जाफरी हे शिया पंथाचे असल्यामुळे शिया समाजाची बरीच मते त्यांच्या पारड्यात पडतील, असा जाणकारांचा कयास आहे. शिवाय मुस्लिमांचे मसिहा म्हणून ओळखले जाणारे मुलायमसिंह यादव आणि जामा मशिदींच्या इमामांकडे मतांचा जोगवा मागणा-या सोनिया गांधी यांची काँग्रेस देखील मुस्लिम मतांवर डोळा ठेवून आहेत. त्यामुळे मुस्लिम मतांची विभागणी होईल आणि भाजपचा विजय आणखी सुकर होेईल, अशी चर्चा लखनऊमध्ये आहे. रविवारचा मुहूर्त असल्यामुळे प्रचाराचा जोरदार धुरळा उडणार होता. भारतभर प्रचार करणा-या राजनाथ यांनी शेवटचे चार दिवस फक्त लखनऊसाठी राखून ठेवले होते. त्यापैकी रविवार हा अगदीच खास. रिटा बहुगुणा जोशी आणि जावेद जाफरी यांचेही रोड शो होते. मात्र, मुलायमसिंह यांच्या मोठ्या भावाचे निधन झाल्यामुळे समाजवादी पार्टीचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. बसपाचाही रविवारनिमित्ताने विशेष कार्यक्रम नव्हता. 

त्यामुळे सक्काळी सक्काळी आम्ही पोहोचलो भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात. तिथं राजनाथ सिंह यांच्या रोड शो ची जोरदार तयारी सुरू होती. लखनऊ आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातून सकाळपासूनच कार्यकर्ते येत होते. गेल्या दहा-बारा वर्षांपासून मरगळलेल्या भाजपाला पुन्हा एकदा संजीवनी मिळाल्याचं भाजपा कार्यालयात पोहोचल्यानंतर लगेचच जाणवलं. आपलं सरकार येणार म्हटल्यानंतर जी एक बॉडी लँग्वेज असते, ती भाजपच्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये दिसत होती. सर्वत्र जोश आणि उत्साह संचारला होता. मळक्या  शर्टवर किंवा टी-शर्टवर मोदी यांचे चित्र असलेले पांढरे शुभ्र टी-शर्ट चढविणा-या गोरगरीब कार्यकर्त्यांपासून हातामध्ये दोन दोन आयफोन असलेल्या आणि कडक इस्त्रीच्या कपड्यांमध्ये वावरणा-या हायफंडू कार्यकर्त्यांपर्यंत सर्व स्तरातील कार्यकर्ते इथं पहायला मिळत होते. मुस्लिम समाजाचं प्रतिनिधीत्त्वही पहायला मिळत होतं. भाजपाच्या प्रथेप्रमाणे कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांसाठी चहा-नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. पुरी-भाजी आणि शिरा खाऊन मग एक ग्लास चहा प्यायल्यानंतर कार्यकर्ते अब की बार मोदी सरकार घोषणा देण्यासाठी तयार होत होते.  कुणी भाजपच्या भगव्या टोप्या कुठं मिळतात, याची शोधाशोध करीत होतं. तर कुणी भाजपचे झेंडे खांद्यावर घेऊन मिरवत होतं. मुख्यालयासमोरच थाटलेल्या प्रचार साहित्याच्या स्टॉलवरही खरेदीसाठी कार्यकर्त्यांची झुंबड उडाली होती. एवढ्यात लालजी टंडन यांचं आगमन होतं. मग त्यांच्या पाया पडण्यासााठी कार्यकर्त्यांचा गराडा पडतो. त्यातूनच वाट काढत, कोणाला जवळ घेत, कोणाकडे किरकोळ कटाक्श टाकून लालजी टंडन कार्यालयात मार्गस्थ होतात. राजनाथसिंह दहा मिनिटांत येत आहेत, अशी घोषणा होते आणि मग कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण येतं. हर हर मोदी, घर घर मोदी.., चप्पा चप्पा, भाजप्पा..., लाल किलेपर कमल निशान, माँग रहा है हिंदुस्थान..., नरेंद्र मोदी कमल निशान, माँग रहा है हिंदुस्थान... अशा घोेषणा जोरजोरात दिल्या जात असतात. मधूनच एक उत्साही कार्यकर्ता देश का नेता कैसा हो राजनाथसिंह जैसा हो... अशी घोषणा देतो. त्याला तातडीनं बाजूला घेतलं जातं.
भाजपच्या कार्यालयात मोठ्या संख्येनं आलेल्या मुस्लिम कार्यकर्त्यांचे फोटो टिपण्यासाठी मग माध्यमांचे प्रतिनिधी आणि इतर कार्यकर्त्यांची झुंबड उडते. मोदींचा जयजयकार त्यांच्याकडूनही सुरू असतो. मुस्लिम कार्यकर्ते इतक्या संख्येनं आलेले पाहून मग माध्यमांचे प्रतिनिधीही त्यांच्या मुलाखती वगैरे घ्यायला सुरूवात करतात. एवढ्यात राजनाथसिंह आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचं आगमन होतं. भाजपा का एक नाथ, राजनाथ राजनाथ... अशा घोषणा जोरजोरात दिल्या जातात. कार्यकर्त्यांच्या गराड्यातून मार्ग काढत राजनाथ मुख्यालयात प्रवेश करतात. भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये तेव्हापासून संचारलेला उत्साह सायंकाळी साडेसातपर्यंत तसाच असतो. 

बरोब्बर अकरा वाजता राजनाथ यांच्या रोड शो ला सुरुवात होते. लखनऊच्या एकूण सहा मतदारसंघांपैकी तीन मतदारसंघांमधून हा रोड शो जाणार असतो. मध्य, पूर्व आणि उत्तर लखनऊ मतदारसंघांमधून. साधारण चाळीस किलोमीटरचा रोड शो. मनोहर पर्रीकर, छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह, विजय गोयल, नितीन गडकरी वगैरे मंडळी या रोड शो मध्ये विविध टप्प्यांमध्ये सहभागी होत असतात. प्रचाराच्या तापलेल्या वातावरणाशी उन्हाशी स्पर्धा होत असते. अर्थात, उन्हाची सरशी होते आणि साधारण अर्धा-एक तास उघड्या टेम्पोमधून रोड शो करणारे राजनाथ तासाभरानंतर इनोव्हामध्ये बसून रोड शो सुरू करतात. मुख्य चौकांमध्ये सभा आणि इतर ठिकाणी कार्यकर्त्यांशी हस्तांदोलन, अभिवादन असे रोड शो चे स्वरूप असते. शंभर-सव्वाशेच्या संख्येने थांबलेले भाजपाचे कार्यकर्ते, राजनाथ यांच्यावर उधळण्यासाठी पोतं भरून फुलांची असलेली व्यवस्था, जोरदार होत असलेली घोषणाबाजी हे चित्र चौकाचौकांत पहायला मिळत असतं. चारशे-पाचशे कार्यकर्ते बाईक्स वरून, मग साऊथच्या चित्रपटांमध्ये शोभून दिसेल असा चारचाकी गाड्यांचा ताफा, त्यामध्ये एकात राजनाथ बसलेले असतात. मध्येच कुठं टेम्पोमध्ये महिला, स्थानिक नेते, काही उत्साही मुस्लिम कार्यकर्ते असतात. जागोजागी त्यांच्या उधळण्यात आलेल्या फुलांमुळं राजनाथ यांच्या गाडीवर फुलांचा आणि हारांचा ढीगच्या ढीग जमा झालेला असतो. कार्यकर्त्यांच्या स्वागतामुळं रोड शो ला साधारण दीड-दोन तासांचा उशीर होत असतो. तरीही उत्साही कार्यकर्त्यांच्या संख्येत अजिबात घट होत नाही. कुठं छोटे ढोल वाजवून राजनाथ यांचं स्वागत होत असतं. सुरुवातीच्या टप्प्यात सगळा भाग हा मध्यमवर्गीय आणि उच्चमध्यमवर्गीय स्वरुपाचा. बहुतांश मतदार हा भाजपचा पारंपरिक मतदार असलेला. 
नंतरच्या टप्प्यात रोड शो अमीनबाग, चौक, इमामबाडा, सीतापूर रोड, त्रिवेणीनगर वगैरे भागातून जातो. हा भाग मुस्लिम बहुल. झोपड्यांची संख्या प्रचंड. तुलनेनं इथं भाजपाचं स्वागत कमी होतं. तरीही काही झोपड्यांवर भाजपाचे झेंडे लागलेले असतात. पण समाजवादी पार्टीचे झेंडे आणि बसपाचे छोटे छोटे रथ इथं मोठ्या प्रमाणात दिसतात. खदरा भागात राजनाथ यांच्या रोड शो ची समाप्ती असते. तिथं त्यांची जाहीर कोपरा सभा असते. रमणसिंह आणि राजनाथ दोघेही काँग्रेसच्या भ्रष्टाचारावर जोेरदार आसूड ओढतात. उत्तर प्रदेशमध्ये गुंडागर्दी आणि बेरोजागारी असल्याबद्दल अखिलेश सरकारला जाब विचारतात. 

राजनाथ यांचा जोर असतो हिंदू-मुस्लिम ऐक्यावर. रमणसिह, शिवराजसिंह यांना विचारा त्यांनी हिंदूृ-मुस्लिमांमध्ये कधी भेद केला का. जातीय तेढ निर्माण केली का. आम्हाला घाबरू नका, आम्हाला एकदा संधी द्या... अशा राजनाथ यांच्या भाषणाचा आशय असतो. काँग्रेस आणि समाजवादी पार्टीने मुस्लिमांचा वापर केला. आम्ही मुस्लिमांचा विकास करू, असे आश्वासन देतात. शिवाय शेवटच्या टप्प्यात प्रचाराला आल्याबद्दल मतदारांची माफी मागतात. भाजपच्या कार्यकर्त्यांना घराघरापर्यंत पोहोचण्याचा आदेश देतात. आपले मत नसले तरी त्यांच्याशी संपर्क साधा आणि मतदानासाठी बाहेर काढा, असे सांगतात. राजनाथ यांच्या खदरा येथील सभेला स्थानिक मुस्लिम मंडळी शंभर सव्वाशेच्या संख्येनं उपस्थित असतात. वीस-पंचवीस मिनिटं बोलल्यानंतर राजनाथ निघून जातात आणि मग आम्ही पुन्हा भाजपच्या कार्यालयाच्या दिशेनं निघतो.भाजपा कार्यालयात गाडी सोडून दिल्यानंतर मग रूमवर जाण्यासाठी ऑटो पकडतो. ऑटोवाल्याच्या काचेवर काँग्रेसच्या रिटा बहुगुणा-जोशी यांचा स्टीकर असतो. इथं काय काँग्रेसची हवा का, म्हटल्यानंतर तो ऑटोवाला म्हणतो. नही भैय्या यहा भी मोदी की हवा ही है. हम काँग्रेसवाले है इसलिए ये स्टीकर लगाया है. कोण जिंकणार, असं विचारल्यानंतर त्याचं स्पष्ट उत्तर असतं. भैय्या हम तो काँग्रेस जितेगी ऐसाही बोलेंगे. आखिर हम उम्मीदवार नही देखते. सिर्फ पंजा देखके ठोक देते है. हवा मोदी की है, लेकिन हम पंजे को ही व्होट देंगे, असं त्याचं ठाम मत असतं. 

दिवसभरात ऑटोवाले, ड्रायव्हर, चहावाले, एटीएम सिक्युरिटी गार्ड, रस्त्यावरचे पादचारी, भाजी-फळविक्रेते अशा अनेकांशी बोलल्यानंतर सर्वांच्या मुखी एकच नाव होतं मोदी मोदी आणि मोदी. इस बार तो मोदी की ही हवा है... असं त्यांचं म्हणणं होतं. काँग्रेस जितेगा असं म्हणणारा पहिलीच व्यक्ती मला दिवसभरात भेटली आणि ती म्हणजे तो ऑटोवाला. अर्थाात, तो एकटा. बाकी सर्व मोदींचे समर्थक. 

Sunday, April 13, 2014

अब की बार, शिरोळे खासदार…

देशभरात परिवर्तनाची लाट असताना पुण्यात काय होणार, याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. मुख्य कारण म्हणजे राष्ट्रकुल घोटाळ्यामध्ये पुण्याचे काँग्रेसचे खासदार सुरेश कलमाडी अडकले. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि ‘ऑक्सफर्ड ऑफ इस्ट’ असलेल्या पुण्याच्या खासदाराला तिहार तुरुंगात धाडण्यात आले. त्यामुळे कलमाडींचा पत्ता कापण्यात आला. काँग्रेसने पुण्यातून तरूण उमेदवाराला निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. टू जी, राष्ट्रकुल, कोळसा खाणवाटपासह अनेक घोटाळ्यांमध्ये काँग्रेस अडकली आहे. तेव्हा पुणेकर मतदार भ्रष्टाचाराला खतपाणी घालणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवारावर विश्वास टाकतात, की नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या पाठिशी ठामपणे उभे राहतात का, याचे औत्सुक्य सर्वांना लागून राहिलेले आहे. यंदाही चौरंगी लढत

पुण्याची निवडणूक गेल्यावेळेस प्रमाणेच चौरंगी होणार आहे. भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष अनिल शिरोळे, काँग्रेसचे विश्वजीत कदम, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दीपक पायगुडे आणि ‘आप’चे प्रा. सुभाष वारे यांच्यातच लोकसभेची निवडणूक रंगणार आहे. भाजपचे अनिल शिरोळे हे गेल्यावेळीच निवडून आले असते. मात्र, मनसेचे रणजित शिरोळे (७५ हजार ९३०) आणि बहुजन समाज पक्षाचे डी. एस. कुलकर्णी (६२ हजार ९८१) यांनी खेचलेल्या मतांमुळे अनिल शिरोळे यांना फटका बसला आणि ते अगदी निसटत्या फरकाने म्हणजे अवघ्या पंचवीस हजार ७०१ मतांनी पराभूत झाले. यंदा मात्र, परिस्थिती पूर्णपणे निराळी आहे. गेल्यावेळी भाजपची मते फुटली आणि शिरोळे यांना फटका बसला. यंदा मात्र, काँग्रेसला सर्वाधिक फटका बसणार असून फायदा भाजपच्या पथ्यावर पडणार, अशी चिन्हे आहेत.

पुण्यात जशी लढत चौरंगी आहे. तशाच शिरोळे यांच्यासाठी चार गोष्टी दिलासादायकही आहेत. पहिली गोष्ट म्हणजे राज ठाकरे यांच्या ‘मनसे’ची गेल्या निवडणुकीइतकी यंदा हवा नाही. दुसरे म्हणजे डी. एस. कुलकर्णी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. उलट ते भाजपमध्येच दाखल झाले आहेत. दिल्लीमध्ये सरकार चालविण्यात साफ अपयशी ठरल्यामुळे ‘आप’चा ताप उतरलेला आहे, हा तिसरा मुद्दा. चौथी आणि सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेसचे विश्वजीत कदम हे पुण्याबाहेरील उमेदवार आहेत. नवखे आणि अननुभवी आहेत. पुण्याची संस्कृती, परंपरा, समाजकारण आणि राजकारण यांच्याशी त्यांचा दुरान्वयेही संबंध नाही. या सर्वच्या सर्व गोष्टी अनिल शिरोळे यांच्याच पथ्यावर पडणाऱ्या आहेत.


राज आणि मनसेबद्दल नाराजी

राज ठाकरे यांच्या मनसेने मतदारांचा भ्रमनिरास केला आहे. पुण्यामध्ये मतदारांनी भाषणांना भुलून राज यांच्या पारड्यात भरभरून मते टाकली आणि पुण्यातून मनसेचे २९ नगरसेवक निवडून आले. मात्र, गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत त्यांनी कोणतीही भरीव नि चमकदार कामगिरी केलेली नाही. वेळोवेळी राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीशी संगनमत करून स्वतःच्या पदरात काहीतरी पाडून घेण्याशिवाय मनसेच्या नगरसेवकांनी काहीही केले नाही. नवनिर्माणाची पहिली वीटही न रचल्यामुळे त्यामुळे मतदार मनसेला विटले आहे.

मध्यंतरी पुण्यात घेतलेल्या सभेमध्येही राज यांनी पुण्याच्या समस्या आणि अडचणींना हात न घालता भलतेच मुद्दे आळवले आणि मतदारांचा भ्रमनिरास केला. ‘टोल’च्या मुद्द्याचा त्यांना पुण्यातील सभेत साफ विसर पडला. पुण्यासाठी काय करणार, याबाबत त्यांनी चकार शब्दही काढला नाही. उद्धव यांच्यावर टीका, गोपीनाथ मुंडे यांची नक्कल आणि नितीन गडकरी यांची भलामण इतक्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या. त्यांचे पुण्यातील उमेदवार दीपक पायगुडे हे इतरांपेक्षा कसे उजवे आहेत, याबाबत न बोलणेच त्यांनी टाळले. पुणेकर मतदार सूज्ञ आहेत. राजकीय बोलबच्चनला ते महापालिका निवडणुकीत भुलले. मात्र, यावेळी ते भुलतील अशी आशा करणे व्यर्थ आहे.
  
दहा वर्षे गायब

शिवाय त्यांचे उमेदवार दीपक पायगुडे हे दहा वर्षांनंतर अचानक उगवले आहेत. २००४ मध्ये भवानी पेठेतून पराभूत झाल्यानंतर ते अंतर्धान पावले. ‘मनसे’च्या अंतर्गत राजकारणाला वैतागून पक्षापासून चार हात दूरच थांबू लागले. खुद्द राज ठाकरे यांनीही त्यांनी अनेकदा अव्हेरले. मनसेतील अनेक नेते आणि गट त्यांच्याविरोधात होते. तरीही राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांच्या मनातून उतरलेल्या पायगुडे यांना उमेदवारी दिली. ‘राजसाहेबां’च्या आदेशामुळे बहुसंख्य कार्यकर्ते काम करीत असले तरीही मनापासून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या किती हा चर्चेचा विषय आहे. त्यामुळे गेल्या वेळी राज ठाकरे यांच्या भाषणबाजीला भुलून ‘मनसे’च्या वळचणीला गेलेला भाजपचा बहुतांश परंपरागत मतदार यंदा पुन्हा भाजपकडे वळेल, यात शंका नाही. तसेही मोदी यांना पाठिंबा देणाऱ्या सख्ख्या उमेदवाराला डावलून सावत्र मोदीभक्ताला पाठिंबा देण्याइतपत पुणेकर मतदार मूर्ख नाही. शिवाय मोदी यांनी पुण्यातील जाहीर सभेत सांगितल्याप्रमाणे, कमळाला मत म्हणजेच मोदींना मत. महायुतीला मत म्हणजेच भाजपला किंवा कमळाला मत. त्यामुळे मोदींना पंतप्रधान करण्यासाठी इंजिनाचे बटण दाबण्याची चूक मोदीप्रेमी मतदार कशाला करेल.

डीएसके यांनी गेल्या निवडणुकीत मोठी भूमिका बजाविली होती. यंदाही ते आपकडून किंवा अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास उत्सुक होते. पण ते रिंगणात नाहीत. ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले असते, तर भाजपची मतेच त्यांनी फोडली असती. त्यापैकी बहुतांश मते ही ब्राह्मण आणि मध्यमवर्गीय असती, हे ओघाने आलेच. पर्यायाने शिरोळे यांचे मताधिक्य कमी होण्यास डीएसके कारणीभूत ठरले असते. मात्र, डीएसके यांच्या सूज्ञपणामुळे हा धोका टळलेला आहे. त्यामुळे गेल्यावेळी शिरोळे यांचे जसे नुकसान झाले, तसा फटका यंदा त्यांना बसण्याची शक्यता कमी आहे.

‘आप‘ने पुण्यातून सुभाष वारे यांना उमेदवारी दिली आहे. वारे हे समाजवादी विचारांचे जुने कार्यकर्ते आहेत. मात्र, त्यांना राजकारणाचा काहीही अनुभव नाही. समाजवादी आंदोलनात ते अनेक वर्षांपासून असले तरीही पुणेकरांच्या अडीअडचणी तसेच समस्या सोडविण्यासाठी त्यांनी यापूर्वी विशेष आंदोलन केल्याचे स्मरणात नाही. दिल्लीत सरकार स्थापन केल्यानंतर ‘आप’चा फियास्को झाला आणि त्यांच्याबद्दल असलेल्या सहानुभूतीचा ताप उतरला. त्यामुळे वारे यांची उमेदवारी म्हणावी तितकी तुल्यबळ राहिलेली नाही. तरीही ते लढत आहेत. त्यांचा फटकाही काही प्रमाणात भाजपला आणि मोठ्या प्रमाणावर काँग्रेसला बसणार आहे.


विश्वजीत कदम बाहेरचे उमेदवार

राहता राहिले काँग्रेसचे विश्वजीत कदम. सांगली जिल्ह्यातील कडेगांव-पलूस मतदारसंघाच्या यादीत कदम यांचे मतदार म्हणून नाव आहे. त्यामुळे मी पुण्यातीलच आहे, पुण्यातच शिकलो आणि वाढलो, असा प्रचार करीत असले तरीही ते सांगलीचे आहेत, हे सत्य नाकारता येत नाही. अनेक वर्षांपासून पुण्यात आहे, असा दावा ते करीत आहेत. मात्र, ते पुणे काँग्रेसमध्ये सक्रिय नव्हते. एलबीटी, बीडीपी, डीपी, बीआरटी किंवा मेट्रो या प्रश्नांवर त्यांनी आंदोलन केल्याचे किंवा भूमिका घेतल्याचे स्मरणात नाही. पुण्याची वाहतूक समस्या, पीएमटी वाचवा, नदीसुधार, प्रदूषण, वाढती लोकसंख्या आणि इतर अनेक मुद्द्यांवर त्यांनी कधीच समोर येऊन भूमिका मांडली नाही. ना पक्षाच्या व्यासपीठावर ना वैयक्तिक स्वरूपात.

उलट कदम कुटुंबीयांनी भारती विद्यापीठाच्या आवारातील पुणेकरांच्या सोयीचा आणि वर्दळीचा असलेला रस्ता वाहतुकीसाठी कायमचा बंद करून टाकला. कात्रज, धनकवडी नि बालाजीनगर परिसरातील अनेक रहिवाशांची त्यामुळे कोंडीच झाली. पुणेकरांच्या सुखदुःखांशी देणेघेणे नसलेल्या विश्वजीत कदम यांच्या पाठिशी पुणेकर कशासाठी उभे राहतील, हा संशोधनाचा विषय आहे. शिवाय कदम कुटुंबीयांचा ‘स्वभाव’ आणि पुणेकरांचा स्वभाव जुळून येणे कठीण वाटते.

केवळ ‘राहुल ब्रिगेड’चे सदस्य म्हणून त्यांना तिकिट मिळाले आहे. अत्यंत तरुण वयात उमेदवारी मिळाल्यामुळे काँग्रेसमधील अनेक ज्येष्ठ आमदार त्यांच्यावर खार खाऊन आहेत. तूर्तास नाराजी मिटलेली आहे, असे चित्र रंगविले असले तरीही कलमाडी समर्थक आणि पुण्यातील स्थानिक काँग्रेस नेत्यांकडून त्यांना दगाफटका होण्याची अजिबात शक्यता नाही, असे मानण्याचे अजिबात कारण नाही. सुरूवातीला कदमांचे काम घरचे काम असल्याच्या आनंदात करणाऱ्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि नेतेही विश्वजीत यांच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामुळे आघाडीत बिघाडी होणारच नाही, असे समजून कसे चालेल.


विचारांचे पक्के, कार्यकर्त्यांचे लाडके

सरते शेवटी राहिले अनिल शिरोळे. ते अस्सल पुणेकर आहेत. पुण्यातच लहानाचे मोठे झाले. पुण्याची शान असलेल्या गणेशोत्सवाशी ते पहिल्यापासून कार्यकर्ता म्हणून जोडलेले आहेत. तरुणांची संघटना पतित पावन संघटनेच्या संस्थापकांपैकी एक आहेत. महापालिकेतून मा. डॉ. हेडगेवार यांचे तैलचित्र काढण्याचा मुद्दा किंवा आदमबाग मशिदीविरोधातील मोर्चा असो, यांत्रिक कत्तलखान्याला विरोधाचे प्रकरण किंवा दादोदी कोंडेदव यांचा पुतळा हटविण्याचा विषय असो किंवा बीआरटीविरोधातील जनआंदोलन असो… प्रत्येकवेळी रस्त्यावर उतरून आंदोलन करणारा नेता ही ओळख त्यांनी सार्थ ठरविलेली आहे. कार्यकर्त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारा नेता, अशी त्यांची ओळख आहे. फक्त निवडणुकीपुरता आला आणि नंतर गायब झाला, असा हा नेता नाही.

शिरोळे हे भाजप आणि संघ परिवारातील जुने कार्यकर्ते आहेत. विचारांशी पक्के आहेत. चाळीस-पंचेचाळीस वर्षांपासून संघविचार आणि हिंदुत्वाच्या विचाराशी बांधले गेलेले आहेत. स्वभावाने शांत आणि मृदूभाषी आहेत. शक्यतो कोणत्याही वादात न अडकता साधेपणाने काम करीत राहणे, ही त्यांची शैली आहे. १९९२ साली ते प्रथम नगरसेवक म्हणून निवडून आले. पहिल्यापासूनच त्यांची प्रतिमा स्वच्छ प्रतिमेचा नेता अशीच राहिलेली आहे. महापालिकेकडून मिळणाऱ्या मानधनासह कोणतेही फायदे न घेणारा, पालिकेच्या खर्चाने नगरसेवकांनी परदेश दौरे करू नये, असे ठामपणे सांगणारा, वैयक्तिक स्वार्थासाठी ‘अॅडजस्टमेंट’ न करणारा आणि कोणत्याही परिस्थिती पक्षाच्या भूमिकेशी एकनिष्ठ राहणारा नेता, ही त्यांची प्रतिमा आहे. या प्रतिमेचा त्यांना निवडणुकीत नक्की फायदा होईल.

संघाची यंत्रणा कार्यरत

आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संघ परिवाराने ही निवडणूक नेहमीपेक्षा अधिक गांभीर्याने घेतलेली आहे. काँग्रेसला हटवायचे असेल तर ‘अभी नही तो कभी नही’ अशी परिस्थिती आहे. त्यामुळे काँग्रेसला हटविण्यासाठी परिवारातील अनेक संघटना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे कामाला लागलेल्या आहेत. संघविचारांच्या मतदाराला घरातून बाहेर काढून मतदान केंद्रापर्यंत पोहोचविण्याची रचना लागण्यास सुरुवात झाली आहे. ही यंत्रणा भारतीय जनता पक्षाच्या यंत्रणेपेक्षा पूर्ण वेगळी आहे. संघाची ही यंत्रणा कोणाला दिसत नाही. मात्र, त्यांचे काम सुरू असते. यंदाच्या निवडणुकीत संघाची ही यंत्रणाही मोलाची भूमिका निभावणार आहे.

समीकरण शिरोळेंच्या बाजूने

मतांची आकडेवारीही यंदा शिरोळे यांच्याच बाजूने कौल देते. गेल्या निवडणुकीत मनसे आणि डीएसके यांनी घेतलेल्या एक लाख अडतीस हजार मतांपैकी बरीचशी मते ही भाजपची होती. तो आकडा एक लाख ३८ हजार मतांचा आहे. त्यापैकी डीएसके यांनी खेचलेली भाजपची मते पुन्हा अनिल शिरोळे यांच्याकडे वळतील. गेल्यावेळी रणजित शिरोळे यांनी भाजपची जी मते खाल्ली, त्यामध्ये बरीच घट होईल. मनसेकडून झालेल्या भ्रमनिसारामुळे मनसेने खेचलेला भाजपचा मतदार मोठ्या प्रमाणावर मूळ पक्षाकडे परतेल. मनसेचा उमेदवार काँग्रेसच्या आणि विशेषतः कलमाडींच्या जवळचा आहे. सर्वत्र संचार असणाऱ्या दीपक पायगुडे यांचा फटका भाजपला कमी आणि काँग्रेसला अधिक बसण्याची शक्यता आहे. शिवाय काँग्रेसवर नाराज असलेले कलमाडी कदाचित पायगुडे यांना मदत करण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

भाजपवर नेहंमी जातीयवादाचा आरोप करून काँग्रेसकडे जाणारी समाजवादी आणि डाव्या विचारांची मते कदाचित ‘आप’चे वारे खेचू शकतील. त्यामुळे तिथेही फटका काँग्रेसलाच बसणार हे नक्की.. झोपडपट्टीतील काही मतदार, कष्टकरी वर्ग, हमाल, मोलमजुरी करून जीवन जगणारे कामगार, रिक्षाचालक या वर्गामध्ये ‘आप’ची सर्वाधिक क्रेझ आहे. दिल्लीतही याच वर्गाने त्यांना साथ दिली. पुण्यामध्ये या वर्गाची सर्वच्या सर्व नसली तरी काही प्रमाणात मते ‘आप’कडे नक्की वळणार. हा मतदार पारंपरिक काँग्रेसचा मतदार. त्यामुळे ‘आप’ने खेचलेली बहुतांश मते ही काँग्रेसचीच असतील. भाजपची नव्हे. 


रिपब्लिकन मतांचा फायदा

भाजपने १९९९ आणि २००४ च्या निवडणुकीत तीन लाख मतदारांची व्होटबँक राखलेली आहे. गेल्या निवडणुकीत त्यांना फटका बसला आणि ते दोन लाख ५४ हजारांवर स्थिरावले. डीएसके आणि मनसेकडे गेलेले मतदार पुन्हा भाजपकडे वळल्यामुळे पक्ष पुन्हा तीन लाखांचा आकडा गाठणार हे नक्की. सोबतीला रिपब्लिकन पक्षाची हमखास मते आहेत. रिपब्लिकन पक्षाची बहुतांश मते ही एकगठ्ठा आणि निश्चित असतात. काँग्रेसने मुबलक पैसे वाटले, तरीही ६० ते ७० टक्के रिपब्लिकन मते युतीच्या उमेदवाराला मतदान करतील. मोदी यांच्या सभेतील रिपब्लिकन कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षात घेतली तर वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत, ते समजून येईल. पुण्यातील रिपब्लिकन मतांपैकी किमान वीस हजार मते तरी शिरोळेंच्या पारड्यात नव्याने पडणार आहेत. जी नेहमी काँग्रेसकडे वळतात.

मोदी यांच्या सभेनंतर प्रत्येक मतदारसंघात कुंपणावरील किमान पाऊण ते एक टक्का मते भाजपच्या बाजूने वळतात, असे विश्लेषक सांगतात. पुण्यामध्ये हा निकष लावायचा झाला तर वीस ते पंचवीस हजार मते भाजपच्या बाजूने वळतील, असे म्हणायला हरकत नाही. त्यामुळेच या मोदीमय वातावरणाचा अनिल शिरोळे यांना नक्की फायदा होईल. शिवाय मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी संघ परिवाराने उभारलेल्या यंत्रणेचा फायदाही शिरोळे यांनाच आहे.

तेव्हा भाजपच्या परंपरागत तीन लाख दहा हजारांच्या आकड्यामध्ये किमान पन्नास ते साठ हजार मतांची वाढच होणार आहे. दुसरीकडे काँग्रेसला गेल्या निवडणुकीत दोन लाख ८० हजार मते मिळाली होती. तर २००४ मध्ये तीन लाख ७४ हजार मते. अगदी तीन लाख ७४ हजार मते काँग्रेसची हक्काची आहेत, असे मानले तरीही मनसे आणि आप यांच्यामुळे काँग्रेसलाच फटका बसणार आहे. शिवाय कलमाडी आणि त्यांच्या समर्थकांची नाराजी आहेच. त्यामुळे हा फटका किमान पन्नास हजार मतांचा असेल, असे गृहित धरायला हरकत नाही.

मतांचे समीकरण जुळवून पाहिले, तर अनिल शिरोळे तीस ते चाळीस हजार मतांच्या फरकाने अगदी सहजपणे निवडून येतील. तेव्हा गेल्यावेळी निसटत्या फरकाने पराभूत झालेल्या अनिल शिरोळे यांना विजयाची सुवर्णसंधी असून नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्याची अमूल्य संधी पुणेकरांना आहे, असे म्हणायला हरकत नाही.

 

लास्ट अॅण्ड बेस्ट…

लेखाच्या शेवटी एक गोष्ट आवर्जून सांगाविशी वाटते. माझ्या स्मरणशक्तीनुसार जनसंघाचे दिवंगत नेते दीनदयाळ उपाध्याय यांनी व्यक्त केलेले हे मत आहे. (इतर कोणा ऩेत्याचे असल्यास कृपया खुलासा करावा.) राष्ट्रीय पातळीवरील म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीत मतदान करताना काय विचार करून मतदान केले पाहिजे, हे त्यांनी सांगितले होते. अनेक पक्ष आणि अनेक उमेदवार निवडणुकीत असतात.

मतदारांनी मतदान करताना प्रथम ‘पार्टी’ पहावी. ‘पार्टी’चा इतिहास, त्यांनी आतापर्यंत केलेले काम, त्यांचे नेते, नेत्यांचे चारित्र्य आणि ‘पार्टी’शी संबंधित सर्व गोष्टींचा अभ्यास करून मग चांगल्या ‘पार्टी’ला मतदान करावे.

दोन्ही ‘पार्टी’ चांगल्या असतील, तर मग दोन्ही पक्षांच्या ‘पॉलिसी’चा अभ्यास करावा. पक्षांचे परराष्ट्र धोरण, संरक्षणविषयक धोरण, शिक्षण, शेती, आरोग्य, महिला आणि इतर धोरणांचा आढावा घेऊन योग्य पक्षाला मतदान करावे.

दोन्ही पक्षांची ‘पॉलिसी’ एकसारख्या उत्तम असतील, तर मग ‘पर्सन’ म्हणजे उमेदवार कोण आहे, त्याचे योगदान काय, त्याचा अनुभव काय, त्याची ‘कमिटमेंट’ काय हे पाहून मतदान करावे.
मला वाटतं, तिन्ही गोष्टींमध्ये अनिल शिरोळे हे इतर तीनही उमेदवारांपेक्षा सरस आहेत. त्यामुळे अनिल शिरोळे यांच्या गळ्यात विजयाची माळ पडणार हे निश्चित आहे.

(शंभर दिवसांत महागाई कमी करण्याचे आश्वासन देणारी आणि भ्रष्टाचारात आकंठ बुडालेली काँग्रेस, पाकिस्तान आणि चीनकडून भारताच्या अब्रूचे धिंडवडे निघत असताना हताशपणे मौन बाळगणारे सरदार मनमोहनसिंग नि सोनिया गांधी आणि राजकारण कशाशी खातात, ही साधी गोष्ट माहिती नसलेले राहुलबाबा… अशा स्वाभिमानशून्य लोकांच्या हातात देश सोपवायचा नसेल, तर अनिल शिरोळे यांनाच मत देऊन नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायला हवे.)

संबंधित पोस्ट...

१) कशी साधली मोदींनी हॅटट्रिक


२) कसे आहेत हे मोदी...