आसाममध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या वार्तांकनासाठी जाताना मनात अनेक प्रश्न होते. तेथे वातावरण कसे असेल, किती सुरक्षा असेल, स्पर्धेत काही गोंधळ तर होणार नाही ना, नागरिकांचा किती प्रतिसाद मिळेल, खेळाडू आणि संघांचा (विशेषतः हिंदीभाषक) बहिष्कार तर असणार नाही ना, तेथील लोक आपल्याशी कसे "रिऍक्ट' होतील... अशा असंख्य प्रश्नांनी मनात हलकल्लोळ माजविला होता; पण गुवाहाटीमध्ये इतके चांगले अनुभव आले, की विचारता सोय नाही. त्यांपैकी काही अनुभव येथे देत आहे...
बालासाहाब कैसे है...
मी महाराष्ट्रातून आला असल्याचे समजल्यावर "ट्रान्स्पोर्ट कमिटी'चे अध्यक्ष पोलॉक महंत यांनी विचारले, की "अरे, तुमचे ते बाळासाहेब आता कसे आहेत?' मला कळेचना याला एकदम बाळासाहेब ठाकरेंची आठवण कशी झाली. तेव्हा त्याने सांगितले, ""मी तिसरी-चौथीत असताना आई-वडिलांबरोबर मुंबईला गेलो होतो. तेव्हा दादरच्या गर्दीमध्ये मी हरवलो. मला काहीच कळत नव्हते. तेव्हा शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी माझी चौकशी केली आणि एका कार्यकर्त्याच्या घरी नेले. तेथे त्यांनी माझी विचारपूस केली. परिसरात हिंडून माझ्या आई-वडिलांना शोधून आणले आणि मला त्यांच्या स्वाधीन केले. त्यामुळे माझे आणि शिवसेनेचे जुने ऋणानुंबंध आहेत.''
स्टेडियम तरी पाहू दे...
जलतरणाचे सर्व सामने संपलेले, तरीही गर्दी हटत नव्हती. हळूहळू लोक बॉक्सिंग रिंगकडे वळू लागले, तरीही 80 वर्षांच्या एक आजीबाई जलतरण तलावाकडे जात होत्या. तेव्हा जलतरणाच्या सर्व स्पर्धा संपल्या आहेत. तिथे काहीही पाहायला मिळणार नाही, असे सुरक्षा रक्षकाने सांगितले. तेव्हा आजीबाईंनी दिलेले उत्तर स्पर्धेला मिळणाऱ्या प्रतिसादाविषयी सर्व काही सांगून जाते. आजी म्हणाल्या, ""अरे बाबा, आजची स्पर्धा संपली असली तरी हे स्टेडियम आतून कसे आहे, ते पाहण्यासाठी तरी मला जाऊ देशील की नाही? इतके दिवस टीव्हीवर मी हे पाहायचे. आज प्रत्यक्ष पाहण्यासाठी आले आहे, तर तू मला नाही म्हणतोस...''
आप तो मीडिया से है...
आसाममध्ये अनेक वर्षांपासून अस्तित्वात असलेला उल्फाचा प्रश्न; तसेच स्पर्धा उधळून लावण्याची उल्फाने दिलेली धमकी या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडक असणार यात शंकाच नव्हती; पण ती किती कडक असेल याची कल्पना येत नव्हती; पण मीडियासाठी आवश्यक ओळखपत्र तयार झाल्यानंतर कोणत्याही स्टेडियममध्ये जाण्यापूर्वी एकाही सुरक्षा रक्षकाने अंगाला हातही लावलेला नाही. लॅपटॉपची बॅग किंवा सॅकमध्ये काय आहे ते दाखवा, असा सवालही केलेला नाही. ""आप तो मीडिया से है। आप से क्या खतरा होगा,'' असे उद्गार सुरक्षा रक्षकाने काढले. प्रत्येक सुरक्षा रक्षकाला तोंड देता देता नाकी नऊ येतील, असे वाटत असतानाच हा अनुभव सुखद धक्काच देऊन गेला.
प्रथमच प्रत्यक्ष दर्शन
ऍथलेटिक्स, फुटबॉल, हॉकी, कुस्ती आणि फार फार तर व्हॉलिबॉल किंवा कबड्डी या खेळांना नागरिक गर्दी करतील, असे वाटत होते; पण बॉक्सिंग, लॉन बॉल, सेपाकताकरॉ, सायकलिंग, टेबल टेनस यांच्यासह जवळपास सर्वच खेळांना नागरिकांनी तुडुंब गर्दी केली होती. नागरिकांना खेळांविषयी अधिकाधिक जाणून घ्यायचे होते. सरकारने बांधलेली स्टेडियम्स पाहायची होती. खेळाडू कसे खेळतात, हे बघायचे होते. याबाबत टिंकू कुंभकर या स्थानिक तरुणाने व्यक्त केलेली प्रतिक्रिया फारच बोलकी वाटते. टिंकू म्हणतो, ""इतके वर्षे आम्ही हे खेळ टीव्हीवर पाहतच होतो; पण हे सारे खेळ मुंबई आणि दिल्लीसारख्या ठिकाणी व्हायचे. आज प्रत्यक्ष आमच्या शहरात, आमच्या राज्यात स्पर्धा होत आहेत. इतकी चांगली संधी आम्ही कशी घालवू. त्यामुळेच नागरिकांची गर्दी होत आहे. तुम्हाला ते आश्चर्यकारक वाटत असले, तरी आम्हाला ते अपेक्षितच होते.''
ये तो घर का काम है...
आसाममध्ये प्रथमच स्पर्धा होत असल्याने; तसेच ईशान्य भारत थोडासा बाजूला असल्याने अनेक जण आसाममध्ये प्रथमच आले आहेत. इतक्या मोठ्या संख्येने नागरिक गुवाहाटीमध्ये आल्याचेच त्यांना अधिक अप्रूप होते. पाहुण्यांची कशी काळजी घ्यावी आणि कशी सरबराई करावी, यासाठी प्रत्येक जण धडपडत होता. पत्रकार उतरलेल्या हॉटेलमध्ये माहिती देण्यासाठी "मीडिया हेल्प डेस्क' तयार करण्यात आला होता. तेथील राजेंद्र नावाच्या "व्हॉलेंटियर'ला विचारले, की तू रात्रीपर्यंत इतके काम करतोस. तुला किती पैसे मिळतात? तेव्हा राजेंद्र म्हणाला, ""सर, मैं व्हॉलेंटियर हूँ! मै पैसे क्यू लूँगा! अगर वो देंगे तो ठीक है, अगर नही देंगे तो बुरा क्या है? ये हमारे घर के "खेला' है! घर के काम के लिए कोई पैसा लेता है?''
चितळेंच्या बाकरवडीची आठवण
"ब्रह्मपुत्रा वॉटर वर्क्स'मध्ये अभियंता पदावर काम करणाऱ्या पंजाब शर्मांची भेट झाली. शर्मा हे पुण्यातील "सीडब्ल्यूपीआरएस'मध्ये दीड वर्ष कामाला होते. पुण्यात असताना सहकाऱ्यांकडून मिळालेली वागणूक आणि पुणेकरांचे प्रेम यामुळे पुणे अजूनही माझ्या हृदयात आहे, असे श्री. शर्मा यांनी सांगितले. ""पुण्यात मिळणारी चितळेंची बाकरवडी, डेक्कनवर मिळणारी पूना कॉफी हाऊसची कॉफी, कॅम्पातील इराण्याच्या हॉटेलमधील सामोसा या गोष्टी मी अजूनही विसरलेलो नाही.'' मराठी माणसे खूप चांगली आहेत, हे वाक्य मराठीमध्ये बोलून त्यांनी आम्हाला भलतेच खूष केले. शर्मा यांच्याप्रमाणेच पुणे-मुंबई आणि महाराष्ट्रात शिक्षणासाठी आलेले किंवा एखादा नातेवाईक महाराष्ट्रात शिकला असलेले अनेक जण तेथे भेटले.
वो हमारा शिवाजी है...
गुवाहाटीमध्ये एक अश्वारूढ पुतळा आहे. हा पुतळा कुणाचा असे बोटीपोन मालाकार या "व्हॉलेंटियर'ला विचारल्यावर त्याने लाचित बडफुकन, असे सांगून प्रतिप्रश्न केला. तुम्हाला लाचित बडफुकन माहिती आहे का? मुघलांना आसाम आणि पर्यायाने ईशान्य भारतात प्रवेश करण्यापासून रोखणारा योद्धा म्हणजे लाचित बडफुकन, असे सांगितल्यावर मालाकार इतका भारावून गेला, की त्याने माझा हात हातात घेतला आणि म्हणाला, ""व्वा! आपने तो दिल खूष कर दिया.'' बडफुकन यांच्याबद्दल आसामबाहेरच्या फार कमी लोकांना माहिती असते. तुम्हाला आमच्या हिरोबद्दल माहिती आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. बडफुकन हा आमचा "शिवाजी' आहे, असे सांगून मालाकारने धक्काच दिला; कारण त्याला महाराष्ट्रात मुघलांविरुद्ध लढणारे शिवाजी महाराज हे नाव माहिती होते.
घुसखोरांच्या गावात...
आसाममध्ये अनेक बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी सुरू असते. तेथे अनेक जणांना शिधापत्रिका मिळाल्या आहेत, त्यांची नावे मतदार यादीमध्ये देखील आहेत, असे वाचले व ऐकले होते. आसाममध्ये बांगलादेशी घुसखोरांचे गाव पाहण्याची आणि तेथील नागरिकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. ब्रह्मपुत्रा नदी ओलांडून ते कुटुंब पाच वर्षांपूर्वी गुवाहाटीपासून शंभर किलोमीटरवर असलेल्या एका लहानशा खेड्यात आले होते. अशी जवळपास 110 कुटुंबे त्या गावामध्ये होती. प्रत्येक कुटुंबामध्ये किमान सात ते आठ जण! अशी अनेक गावे ब्रह्मपुत्रेच्या किनारी वसली असल्याचे समजले आणि भयानक वास्तवाचा अनुभव आला. स्थानिक आमदारानेच त्या नागरिकांना शिधापत्रिका दिल्या, घरे बांधून दिली, भाजी मंडई व सडका निर्माण केल्या, काही नागरिकांना जमिनीही मिळाल्या, हे ऐकून धक्का बसलाच; पण त्यापेक्षाही अधिक चीड आली.
आशिष चांदोरकर