Wednesday, October 29, 2008

राज यांचे राजकारण...!

निवडणुकीचे राजकारण जमणार?
पुण्यात नुकतीच राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा रंगली. स्पर्धेची वातावरण निर्मिती करण्यासाठी आयोजकांनी प्रत्येक जिल्ह्यात युथ बॅटन रिलेचं आयोजन केलं होतं. आता राज ठाकरे यांची आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्याराज्यात पोहोचावी म्हणून राज्य सरकार आणि पोलिसांनी राज ठाकरे अटक बॅटन रिले आयोजित केलीय.
सुरवातीला विक्रोळी, नंतर वांद्रे, मग मानपाडा आता कल्याण आणि नंतर कदाचित जळगाव, सोलापूर, पंढरपूर ..... आणि महाराष्ट्रातलं प्रत्येक शहर अगदी छोटं छोटं गाव. हो कारणंच तसं आहे. राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची चढाओढ पोलिसांमध्ये लागलीय. जळगावमध्ये दहा ठिकाणी तर नाशिकमध्ये सात ठिकाणी गुन्हे नोंदले गेलेत. पुण्यातही कोथरुड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदला गेलाय. सोलापुरात आणि पंढरपुरात गुन्हा दाखल झालाय. लवकरच प्रत्येक जिल्ह्यात असे गुन्हे नोंदतील. मग प्रत्येक ठिकाणीचे पोलिस त्यांना अटक करण्यासाठी येतील आणि राज ठाकरे आणखी मोठे होतील. राज यांना आणखी मोठं करण्यासाठीच पोलिस प्रयत्नशील आहे. कदाचित त्यांना वरुन तसे आदेशही मिळाले असतील.
हो सरकारला आणि पोलिसांना राज यांना गावागावात पोहोचवायचंय. निवडणुका झाल्या तर राज्य सरकार गोत्यात येईल, अशी परिस्थिती आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसनं राज्य कारभाराचा बट्ट्याबोळ केलाय. त्यामुळंच ते शिवसेनेची मतं फोडण्यासाठी राज यांना मोठं करताहेत. हे आम्ही नाही तर देशातला प्रत्येक राजकीय पक्ष करतोय. अगदी भाजप, संयुक्त जनता दल आणि समाजवादी पक्षही आहे. भाजपचे अध्यक्ष राजनाथसिंह, समाजवादी पक्षाचे सरचिटणीस अमरसिंह आणि मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते प्रकाश करात यांनीही अशाच प्रकारचं विधान केलंय.
मराठीच्या मुद्‌द्‌यावर राज ठाकरे यांनी उभारलेलं आंदोलन योग्यच आहे. त्याला विरोध करण्याचं कारण नाही. मराठी पाट्यांचा मुद्दा असो किंवा जया बच्चन यांनी मराठी भाषकांचा केलेला अपमान असो. राज ठाकरे अगदी शंभर टक्के मान्य. मराठी तरुणांच्या नोकऱ्या हिसकावून घेणाऱ्या उत्तर भारतीयांना फटकावलंच पाहिजे. मग ते राज ठाकरे यांच्या मनसेचे कार्यकर्ते असोत, शिवसेनेचे असोत किंवा अगदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे. राष्ट्रीय पक्षांनीही अशी भूमिका घेतली तरी कोणालाच वाईट वाटणार नाही.
सध्या तरी राज ठाकरेच आक्रमक भूमिका घेत आहेत. ती त्यांची गरज आहे, असं म्हटलं तर अधिक योग्य ठरेल. म्हणजे राज यांचा मुद्याही योग्यच आहे. त्यांचा मार्गही काही प्रमाणात योग्य आहे. शिवाय राज्य सरकारचा त्याला आतून पाठिंबा आहे, अशीही चर्चा आहे. राज यांच्या आंदोलनाला हवा मिळाली तर त्याचा निवडणुकीत मनसेला फायदाच होईल. शिवसेनेची मतं फुटतील. शिवसेनेच्या मतफुटीमुळं सरकार तरुन जाईल, असे मनसुबे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने बांधले आहेत. त्यामुळं राज ठाकरे यांच्या बाबतीत सरकार नरमाईचं धोरण स्वीकारत होतं.
कदाचित हेच कारण असल्यामुळं सरकारनं विक्रोळी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवताना शंभरवेळा विचार केला होता. अन्‌ राज ठाकरे यांना अटक लांबवली होती. पण ठाण्यातल्या घडामोडींनंतर राज यांना पहाटे पहाटेच उचलण्यात आलं. आता राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात राज यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदले जाताहेत. पोलिसही कधी नव्हे इतकी घाई करताहेत. इतकी तत्परता दाखवण्यात राज्य सरकारचा कोणताच छुपा हेतू नाही, यावर विश्‍वास बसणं कठीण जातंय.
राज यांचे आंदोलन त्यांच्या पक्षाची भूमिका लोकांपर्यंत जाण्यासाठी आणि पक्षविस्तार करण्यासाठी अगदी योग्य आहे. त्यांच्या पक्षाचा पायाही विस्तारला जाईल. शिवाय मराठीच्या मुद्‌द्‌यासाठी लढणारा आणखी एक शिलेदार महाराष्ट्राला मिळेल. पण राज यांच्या संघटनेसमोरचा सर्वाधिक महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांच्याकडे नेत्यांची दुसरी फळी नाही.
शिशिर शिंदे, शिरीष पारकर, प्रवीण दरेकर, अतुल सरपोतदार आणि दीपक पायगुडे... या पलिकडे नेत्यांची यादी जाणार नाही. शिवाय राज ठाकरे यांची पुण्यात पहिली सभा लावणाऱ्या गणेश सातपुते यांच्यासारख्या कार्यकर्त्यानं मनसेला राम राम ठोकून पुन्हा शिवसेनेत प्रवेश केलाय. हिंदुत्व सोडून काम करणं जमत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. इतर कार्यकर्त्यांची अवस्थाही आज ना उद्या तशीच होणारेय.
पक्षापुढे कार्यक्रम नाही, कार्यकर्ते आहेत पण नेत्यांची दुसरी फळी नाही आणि मुख्य म्हणजे सभांना गर्दी मतांमध्ये रुपांतरित होत नाही, हा बाळासाहेब यांचा वर्षानुवर्षाचा अनुभव पाहता राज ठाकरे यांच्यासमोरचे आव्हान खूप मोठे आहे. त्यांचं भवितव्य खडतर आहे. नागरिक भावनिक होऊन मतदान करत नाही. हा प्रत्यय राज आणि राणे यांना मुंबईच्या महापालिका निवडणुकीत आलेलाच आहे.
तरुणांमध्ये राज ठाकरेंची लोकप्रियता अफाट आहे. त्यांचे मुद्देही योग्य आहेत. पण तरीही पुढच्या निवडणुकीत राज यांचे भवितव्य खडतरच आहे.

Wednesday, October 15, 2008

शिवसेनेचा चेहरा बदलणारा नेता...


संघटक आणि शिस्तप्रिय कार्याध्यक्ष
ठाकरे हे आडनाव ऐकलं की, कोणत्याही मराठी माणसाचे कान टवकारणच! मग ते बाळासाहेब असोत, राज असो किंवा उद्धव. अगदी स्मिता ठाकरे हे नाव ऐकलं तरी टवकारणारे कान आहेतच. ठाकरे घराण्याबद्दल मराठी माणसाला पहिल्यापासून आकर्षण आहे. आदित्य ठाकरे एक अल्बम बाजारात आणतो आणि माध्यमांमध्ये चर्चेत राहतो. ही आहे ठाकरे या आडनावाची जादू.

उद्धव हे नाव अगदी अलिकडेच पुढे आलेलं. नाही म्हटलं तरी पाच वर्ष झाली. महाबळेश्‍वर इथं झालेल्या शिवसेना मेळाव्यात उद्धव यांच्या गळ्यात कार्याध्यक्षपदाची माळ घालण्यात आली. तेव्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या पहिल्यावहिल्या पत्रकार परिषदेला मी होतो. तेव्हापासून त्यांच्यात होत गेलेला बदल, घडत गेलेला कुशल संघटक आणि परिपक्व राजकारणी मी पाहतो आहे.

उद्धव हा कारकुनांचा नेता आहे, तो बाळासाहेबांइतका प्रभावी वक्ता नाही, उद्धव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना मवाळ होतेय... असे एक ना अनेक आरोप उद्धव यांच्या होत राहिले. ते राजकारणीच नाहीत, असंही काही जण म्हणत होते. पण या सर्वांकडे दुर्लक्ष करत उद्धव यांची वाटचाल सुरुच होती. नारायण राणे गेले, राजही सोडून गेला, अनेक छोटे-मोठे नेते उद्धव यांच्यावर आरोप करुन निघून जात होते. पण उद्धव त्यांच्या कार्यपद्धतीवर ठाम होते.

"फर्स्ट क्‍लास' कारकिर्द!
लागोपाठ दोन वेळा मुंबई महापालिकेवरची सत्ता अबाधित राखून त्यांनी कुशल संघटकाची आणि कार्याध्यक्षपदाची परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण होण्याची कामगिरी केली होती. राणेंचा अश्‍वमेध रायगडमध्येच रोखून तुकाराम सुर्वे यांना विधानसभेत पोहोचविले होते. रामटेकमध्येही सुबोध मोहिते हे प्रकाश जाधव यांच्यापुढे चारी मुंड्या चीत झाले. ठाण्याच्या लोकसभा पोटनिवडणुकीत आख्खी राष्ट्रवादी कॉंग्रेस ठाण्यात एकवटली होती. पण तिथंही उद्धव यांची मुत्सद्देगिरी यशस्वी ठरली. राज आणि राणे बाहेर पडले तरी उद्धव यांनी हळूहळू संघटना इतकी उत्तम रितीने बांधली होती की, त्याला अधिक तडे गेले नाहीत. त्यांनी शिवसेनेला दिशा दिली.

बाळासाहेबांच्या काळातील शिवसेना आणि उद्धव यांच्या काळातील शिवसेना पूर्णपणे वेगळी आहे. एका अर्थानं तिला "कॉर्पोरेट लुक' आला आहे. पण दुसरीकडे तळागाळातल्या नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रसंगी "राडा' करण्याची रगही शिवसैनिकांमध्ये आहे. ऊस, कापूस आणि भारनियमनासारख्या प्रश्‍नांवर संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करत हिंडणारा एकमेव नेता म्हणजे उद्धव ठाकरे, झोपडपट्टीवासियांसाठी मुंबईत रस्त्यावर उतरणारा नेता म्हणजे उद्धव ठाकरे आणि मराठीच्या फेऱ्यात अडकवून न ठेवता सर्व मुंबईकरांमध्ये शिवसेनेला नेण्याचा प्रयत्न करणारा नेता म्हणजे उद्धव ठाकरे. त्यामुळेच उद्धव यांच्या कार्यपद्धतीबद्दल, निर्णयक्षमतेबद्दल आणि एकूणच त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल मला आकर्षण होतं. त्यांना अगदी जवळून न्याहाळण्याची आणि मनसोक्त गप्पा मारण्याची इच्छा होती. काही दिवसांपूर्वीच ही इच्छा पूर्ण झाली.

"डिट्टो' कॉपी
दसरा मेळाव्याच्या निमित्तानं "साम मराठी' वाहिनीसाठी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घ्यायची होती. ज्येष्ठ पत्रकार संजीव लाटकर यांनी ही मुलाखत घेतली. पण मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली आणि उद्धव ठाकरे यांचं अगदी जवळून निरीक्षण करता आलं. शिवसेना भवनात सैनिकांचा राबता कायमच. साहेबांना भेटण्यासाठी आलेले असंख्य कार्यकर्ते. उद्धव यांचे निकटवर्तीय विनायक राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांची सुरु असलेली धावपळ. अशा परिस्थितीत बाळासाहेब आणि राज यांची डिट्टो कॉपी वाटावी, अशा पद्धतीनं उद्धव यांचं आगमन झालं. आज काय, पेपरमध्ये काय वगैरे माहिती घेऊन साहेब आले. मध्येच कार्यकर्त्यांची चौकशी करुन मग मुलाखतीसाठी तयार झाले. बोला, विचारा प्रश्‍न असं म्हणून थेट सुरवात. त्यामुळे कॅमेरामन व लाटकर यांची थोडी धावपळ. माध्यमांना एकदमच किरकोळीत काढण्याची ठाकरे घराण्याची सवय उद्धव यांच्यामध्येही दिसून येते.

उद्धव यांच्या मुलाखतीमध्ये जाणवलेल्या काही गोष्टी म्हणजे आपल्यात काय कमी आहे, याची उद्धव यांना चांगली जाणीव आहे. त्यावर मात करुन किंवा त्याकडे दुर्लक्ष करुन उद्धव यांना पुढे वाटचाल करायची आहे. ""मी चांगला वक्ता नाही. मला बाळासाहेबांसारखं (आणि राजसारखंही) भाषण करता येत नाही. त्यामुळे बाळासाहेब आणि माझी कार्यपद्धती वेगळी आहे. त्यामुळेच शिवसेनेचा तोंडावळा वेगळा आहे,'' हे उद्धव अगदी स्वतःहून मान्य करतात. मी फर्डा वक्ता नाही, मला वक्तृत्व जमत नाही. पण त्यामुळं मी संघटना वाढवू शकत नाही, इतकंच त्यांचं म्हणणं आहे.

नवनिर्माणाचे वाटोळे
अगदी बरोबर राज हे बाळासाहेबांप्रमाणेच फर्डे वक्ते आहेत. त्यांच्यासारखेच उत्तम नकलाकार आहेत. फर्स्ट क्‍लास व्यंगचित्रकारही आहेत. पण "मनसे'चे अध्यक्ष म्हणून राज ठाकरे यांची कारकिर्द अगदीच व्यर्थ आहे. मराठीच्या मुद्‌द्‌यावर दहशत निर्माण करण्याची त्यांची वृत्ती म्हणजे पक्षाला आणि कार्यकर्त्यांना कोणताच कार्यक्रम नसल्याचे द्योतक आहे. गेल्या दोन वर्षांत जो उत्तम संघटन करु शकला नाही आणि कार्यकर्त्यांना चांगला कार्यक्रम देऊ शकला नाही, तो नेता महाराष्ट्राचे नवनिर्माण काय करणार, हा कोणालाच न सुटणारा प्रश्‍न आहे. राज ठाकरे यांच्या भाषणांमध्येही आता तेच तेच मुद्दे येताहेत. नाविन्य संपले आहे. म्हणूनच लवकरच राज यांच्या नवनिर्माणाचे वाटोळे झाले नाही तरच नवल! त्या तुलनेत उद्धव यांचा मार्ग अधिकाधिक प्रशस्त होताना दिसतो आहे.

आहे हे असं आहे...
दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना आपल्या छंदांबद्दल प्रचंड अभिमान आहे. असतात एकेकाला महागडे छंद. आता मला मासे पाळण्याचा छंद आहे आणि माझ्याकडे काही लाखांचा मासा होता, त्याला माझा काय दोष? माझा त्याच्यावर जीव जडला होता आणि तो गेला म्हणून मला दुःख झालं. त्यात माझं काय चुकलं? असा सवाल उद्धव कसलीच भीडभाड न बाळगता उपस्थित करतात. मासा मेला ही माध्यमांसाठी (लोकसत्ताच!) मथळ्याची बातमी होते पण दोन आठवड्यांपूर्वी चार दिवसांत नऊ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्याची बातमी माध्यमांना महत्वाची वाटत नाही. हीच का तुमची बातमीदारी, असा सवाल उपस्थित करुन ते स्वतःची बाजू समर्थपणे मांडतात. लपवाछपवी करण्याची गरज त्यांना वाटत नाही. आहे हे असं आहे, पटत असेल तर या अन्यथा धन्यवाद हा सावरकरी विचारांचा वसा घेऊन ते पुढे निघालेत. (येतील त्यांच्या सह, नाही येणार त्यांच्याविना आणि आड येतील त्यांना पार करुन ः सावरकर)

शेतीतलं कळत नाही...
आपल्याला जे कळत नाही, ते स्पष्टपणे मान्य करण्याचा मोठा गुण त्यांच्याकडे दिसतो. म्हणूनच ते म्हणातात, मला शेतीतलं कळत नाही. कारण मी कधीच शेतात गेलो नाही. पण शेतकरी मरतो आहे, हे मी उघड्या डोळ्यानी पाहू शकतो. वीज मोफत, पाणी मोफत, कर्जही माफ पण तरीही शेतकरी आत्महत्या करतोय. कारण त्याला बी-बियाणं नाही, खतं वेळेवर मिळत नाही, पावसाचा पत्ताच नाही, पाणी मिळालंच तर पिक येतं. पण त्याला सरकार भावच देत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यावाचून पर्याय राहत नाही. म्हणूनच शेतकऱ्यांच्या पिकाला भरपूर भाव दिल्याखेरीज आत्महत्या थांबणार नाही, हे कळण्यासाठी शेतीतलं कळलंच पाहिजे, असं नाही. उद्धव ठाकरे यांचा हा मुद्दा पटतोही. कारण शेतीतलं कळणारे सत्तेत असतानाही शेतकरी आत्महत्या करताहेत. त्यांचाच नेता कृषीमंत्री आहे. मग उपयोग काय
त्यांना शेतीतलं कळून?

उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेवर प्रचंड पकड मिळविली आहे. शिवसेनेला एका दिशेने आणि एका विचाराने नेण्याचा त्यांचा मानस आहे. जुन्या नेत्यांना न दुखावता त्यांनी स्वतःचं स्वतंत्र सल्लागार मंडळ स्थापन केलं आहे. विनायक, संजय आणि भारतकुमार ही राऊत मंडळी, मिलिंद नार्वेकर, दिवाकर रावते आणि सुभाष देसाई या सहा सल्लागारांच्या सहाय्याने त्यांचा कारभार सुरु आहे. त्यांनी संघटना मुळापासून बांधून काढली आहे. भविष्यात त्यांना कितपत यश प्राप्त होतं त्याचं भाकित आताच करणं अवघड आहे. पण शिवसेना संपली, असं म्हणणाऱ्यांना या "कारकुनांच्या नेत्या'नं चोख उत्तर दिलंय...