Friday, January 25, 2008

नावाप्रमाणेच "सवाई'!


सवाई व्हेज...

सवाई हे नाव उच्चारताच सर्वप्रथम पुणेकरांच्या डोळ्यासमोर येतो तो सवाई गंधर्व महोत्सव. इतिहासात माधवराव पेशवे यांच्या नावामागे सवाई पदवी असल्याचे आपल्याला माहीत असते; पण तानाजी मालुसरे रस्त्यावर (सिंहगड रस्ता) नित्यनियमाने ये-जा करणाऱ्या पुणेकरांसाठी मात्र "सवाई' हे नाव आणखी एका गोष्टीशी जोडले गेले आहे. ते म्हणजे "सवाई व्हेज'. सात महिन्यांपूर्वी सुरू झालेले सवाई आता नावारूपाला येत असून, खऱ्या अर्थाने "सवाई' होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.

तानाजी मालुसरे रस्त्याला (सिंहगड रस्ता) लागल्यानंतर पु.ल. देशपांडे उद्यानाच्या थोडेसे अलीकडे सवाई व्हेज रेस्तरॉं आहे. "हॉटेल मॅनेजमेंट'चे धडे घेतलेल्या अमित शिंदे या युवकाने "सवाई'ची सुरवात केली. शाकाहारी पदार्थांच्या "रेस्तरॉं'ला साजेसे व एकदम वेगळे नाव ठेवण्याची इच्छा अमितची होती. शिवाय "रेस्तरॉं' ज्या परिसरात आहे तेथील नागरिकांची आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक पार्श्‍वभूमी विचारात घेऊन नाव निश्‍चित करावयाचे होते. त्यामुळे बऱ्याच विचारांती सवाई नाव निश्‍चित झाले. अर्थात, एकदमच "हटके' असलेले हे नाव "क्‍लिक' झाले हे सांगणे नकोच.

सिंहगड रस्त्यासारख्या विस्तारणाऱ्या पट्ट्यात "सवाई'चा प्रशस्तपणा नजरेत भरणारा आहे. अगदी दोनशे-सव्वादोनशे मंडळी एका वेळी बसू शकतील इतकी मोठी जागा. त्यातही गार्डनमध्ये निवांतपणे बसण्याचा पर्याय उपलब्ध आहे. शिवाय 40-50 जणांच्या ग्रुपसाठी स्वतंत्र व्यवस्थाही येथे करण्यात आली आहे. "रेस्तरॉं'मध्ये प्रवेश करताच नजरेस पडते ते फेटा बांधून अगदी थाटात बसलेल्या मराठी सरदाराचे तैलचित्र.

"सवाई'मध्ये पंजाबी, चायनीज, पिझ्झा, सिझलर्स, पावभाजी, ज्यूस आणि डेझर्ट अशी खाद्य पदार्थांची मोठी रेंज उपलब्ध आहे. पण त्यातही पंजाबी व पावभाजी यांनाच नागरिकांची सर्वाधिक पसंती. इतर ठिकाणी मिळणारे पदार्थ व "सवाई'ची खासीयत यांची माहिती घेतानाच कोणत्या "डिश' मागवायच्या हे निश्‍चित केले होते.

"सवाई'चे दर सर्वसामान्यांना परवडणारे आहेतच, पण सिंहगड रस्त्यावरील पूर्वीपासून राहणारी मंडळी आणि शनिवार, नारायण, सदाशिव या पेठांमधून स्थलांतरित झालेली मंडळी, अशा दोघांनाही सवयीची वाटणारी चव जपण्याचा प्रयत्न "सवाई'मधील विविध "डिश'मधून करण्यात आला आहे.

"स्टार्टर्स'मध्ये "स्पीनच मलेशिया' व "व्हेज सीक कबाब'ची ऑर्डर दिली. बारीक चिरून घेतलेल्या पालकामध्ये तिखट-मीठ व मसाले टाकून त्याचे मध्यम आकाराचे गोळे तयार करून घेतात. हे गोळे तळून घेतल्यानंतर ते टोमॅटो व चायनीज सॉसमध्ये परतून घेतले जातात. सजावटीसाठी काजू-बदाम यांचा वापर होतो. पालकाचे हे "स्टार्टर्स' आवर्जून घ्या. "व्हेज सीक कबाब' हे ऐकायला थोडेसे विचित्र वाटते; पण त्याची चव अगदी उत्तम आहे. सर्व भाज्यांचा खिमा करून मग त्यात विशिष्ट मसाले टाकून थोडीशी तिखटाच्या बाजूला झुकणाऱ्या या कबाबचा आकार अगदी "सीक कबाब'सारखाच!

"मेन कोर्स'मध्ये पारंपरिक भाज्या आहेतच, पण व्हेज मराठा, व्हेज लाजवाब व पनीर जंगी ही "सवाई'ची खासीयत. पण आम्ही मात्र व्हेज मालवणीची "ऑर्डर' दिली. मालवणी चवीत पनीर मालवणी हा "ऑप्शन'ही आहे. भाज्या व पनीरचा वापर इतर "डिश'मध्ये होतो तसाच असला तरी मालवणी मसाले वापरून "ग्रेव्ही' तयार होते. त्यामुळे चव आणि रंग या गोष्टी अगदी "मालवणी करी'च्या जवळ जाणाऱ्या.

वेगळी "डिश' चाखायची असेल तर "व्हेज बगदादी'चा जरूर विचार करा. सर्व भाज्या एकत्रित करून थोडीशी घट्ट "ग्रेव्ही' असलेली ही डिश सर्व्ह करण्याची पद्धत अगदी निराळी आहे. "सिझलर्स' जसे बिडाच्या पात्रात कोबीच्या पानात "सर्व्ह' करतात, त्याप्रमाणे भांड्यामध्ये "टोमॅटो ऑम्लेट'मध्ये बगदादी "सर्व्ह' करण्याची पद्धत आहे. पण असे करताना भाजीची "क्वांटिटी' घटते. त्यामुळे भाजीवर "टोमॅटो ऑम्लेट'चे टॉपिंग करून दिले जाते.

"व्हेज हिंडोल' ही अशीच हटके डिश! सर्व भाज्यांना साथ मिळते ती पनीर व मशरूम यांची. कोथिंबीर व पुदिना यांचा वापर "ग्रेव्ही'मध्ये जास्त असतो. त्यामुळे भाजीला हिरवा रंग तर येतोच, पण त्याचबरोबर पुदिन्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे भाजीला हलकी "मिंट'ची चवही येते. त्यामुळे ही भाजीही काही जण आवर्जून मागतात, अशी माहिती व्यवस्थापक विजय पुजारी यांनी दिली.

पावभाजीतही कोल्हापुरी पावभाजी ही वेगळी चव "सवाई'ने जपली आहे. मुळातच भाजी तयार करताना त्यात मसाल्यांचे प्रमाण अधिक टाकून ही भाजी तिखट केली जाते. तिखट टाकून जाळ करणे वेगळे व मसाले वापरून झणझणीत करणे निराळे. दुसरा प्रकार "सवाई'ने स्वीकारला आहे. झणझणीतपणाला या ठिकाणी मागणी मिळणे साहजिकच आहे. त्यामुळे "कोल्हापुरी पावभाजी' येथे चांगलीच लोकप्रिय ठरली आहे.

"सवाई'पासून तीन-चार किलोमीटरच्या आत राहणाऱ्या मंडळींना घरपोच सेवाही पुरविली जाते तीही अगदी "फ्री ऑफ चार्ज'! "सवाई'चे आणखी एक वेगळेपण म्हणजे अमितने "ऑर्कुट'वर "सवाई व्हेज' नावाची "कम्युनिटी'च तयार केली आहे. या "कम्युनिटी'च्या माध्यमातून नव्या "डिश' सुरू करणे अथवा सुरू असलेल्या पदार्थांमध्ये ग्राहकांनी सुचविलेले बदल करून पाहणे, अशा गोष्टी होतात. "सवाई'चे निस्सीम चाहते "कम्युनिटी' आवर्जून "जॉईन' करतात व इतरांना "सवाई'बद्दल सांगतात. चार जानेवारीलाच सुरू झालेल्या "कम्युनिटी'चे 24 जण सदस्य झाले आहेत. तेव्हा तुम्हालाही "सवाई' पसंत पडले तर तुम्हीही "कम्युनिटी' "जॉईन' करायला विसरू नका!

"सवाई व्हेज'
देवगिरी अपार्टमेंट,
ए विंग, तानाजी मालुसरे रस्ता,
पुणे 411030.
सकाळी 11 ते रात्री 11.30

Saturday, January 19, 2008

सौंदर्य व्हेज नॉनव्हेज


डेक्कनच्या "सौंदर्य'ला चवीची जोड!

जंगली महाराज रस्ता आणि नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्त्यावर (फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता) "रेस्तरॉं'ची काही कमी नाही. अगदी चायनीजपासून पंजाबीपर्यंत आणि पिझ्झा-पास्तापासून सिझलर्सपर्यंत सर्व पदार्थ आपल्याला या दोन रस्त्यांवरील "रेस्तरॉं'मध्ये मिळतात. पण अस्सल मराठी पद्धतीने बनविलेले घरगुती चवीचे मांसाहारी पदार्थ देणारे एकही "रेस्तरॉं' या ठिकाणी नाही. ही कसर भरून काढली आहे मुरकुटे बंधूंच्या "सौंदर्य'ने.

लालबहाद्दूर शास्त्री रस्त्यावरील "सौंदर्य'ची नवी शाखा नुकतीच रानडे इन्स्टिट्यूटसमोर सुरू झाली आहे. अगदी नावापासून वेगळेपण जोपासणाऱ्या "सौंदर्य रेस्तरॉं'ने दहा वर्षांपूर्वी शास्त्री रस्त्यावर शाकाहारी व मांसाहारी "रेस्तरॉं'ची सुरवात केली. खवय्यांच्या जिभेवर "सौंदर्य'ची चव रुळल्यानंतर त्यांनी डेक्कन परिसरात आणखी एक शाखा सुरू करण्याचा विचार केला व कल्पना प्रत्यक्षात उतरविली.

साधारण 90 ते 100 जण बसू शकतील इतकी प्रशस्त जागा व डेक्कनच्या परिसराला शोभेल अशी अंतर्गत सजावट या गोष्टी "सौंदर्य'च्या सौंदर्यात भर घालतात. शिवाय वातानुकूलित दालनाचा पर्यायही उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे डेक्कनवर आल्यानंतर ग्राहकांना भेडसावणारा पार्किंगचा प्रश्‍न बाळासाहेब मुरकुटे यांनी सोडविला असून "सौंदर्य'मध्ये पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था आहे. "सौंदर्य'चे व्यवस्थापन सागर व सूरज मुरकुटे यांच्याकडे आहे.

चिकन, मटण आणि माशांचे विविध प्रकार येथे उपलब्ध आहेत. असे असले तरी तितकेच चविष्ट शाकाहारी पदार्थ "सौंदर्य'मध्ये मिळतात. शाकाहारी-मांसाहारी पदार्थ तयार करण्यासाठी वेगवेगळी भांडी वापरतात, हे सर्वज्ञात आहे. पण येथे दोन्ही प्रकारच्या पदार्थांसाठी आचारीही स्वतंत्र आहे. त्यामुळे शाकाहारी मंडळी अगदी निर्धास्तपणे येथील जेवणाचा आस्वाद लुटू शकतात. शास्त्री रस्त्यावरील "सौंदर्य' डेक्कनवर आले तरी चवीमध्ये फरक पडलेला नाही, हे आणखी एक वैशिष्ट्य!

मटण ही "सौंदर्य'ची खासीयत! त्यातही मटण केशरी बिर्याणी आणि पुणेरी मटण हे दोन पदार्थ "मेन्यू कार्ड'मध्ये अगदी वेगळे वाटतात. मटण केशरी बिर्याणी तयार करण्याची पद्धत अगदी नेहमीसारखीच. ही बिर्याणी करताना साजूक तुपाचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो, हे "सौंदर्य'चे वेगळेपण. शिवाय या बिर्याणीमध्ये शेवटचा थर हा काजू, मनुका, बेदाणे आणि केशर यांचा असतो. त्यामुळे याला आपण "मटण ड्रायफ्रूट बिर्याणी' असेही म्हणू शकतो.

पुणेरी मटण म्हणजे गावरान हिरवे मटण. लाल तिखटाऐवजी मिरची आणि इतर हिरव्या पदार्थांचा वापर करून हे मटण तयार केले जाते. हिरवी मिरची, ओला नारळ, खसखस, धने व तीळ यापासून तयार केलेल्या मसाल्याच्या जोडीला कोथिंबीर व पुदिना यांचे वाटण वापरले जाते. लाल तिखट कमी आणि सांगितले तर तेलाचा वापरही कमी, या गोष्टी ध्यानात ठेवून हे मटण घरगुती पद्धतीने तयार करतात.

"चायना राईस' हादेखील कमी ठिकाणी मिळणारा पदार्थ येथे मिळतो. मटण खिमा आणि अंडा भुर्जी तयार करून एकत्रितपणे परतली जाते. त्यानंतर त्यात बासमती राईस टाकून "चायना राईस' तयार होतो. काही ठिकाणी याला "छिना राईस'ही म्हणतात.

अस्सल शाकाहारी असाल तरी तुमच्यासाठी काही खास डिशेस येथे आहेत. पनीर बटर मसाला, बैंगन मसाला, बैंगन भरता, पनीर मटर मसाला आणि पालक पनीर अशा नेहमीच्या पदार्थांच्या जोडीला तंदुरी आलू, नसीली भेंडी आणि पनीर राजवाडी हे पदार्थ काहीसे वेगळे आहेत. नसीली भेंडी ही लालभडक "ग्रेव्ही'मधील भाजी अगदीच "टेम्प्टिंग' दिसते. तेलामध्ये भेंडी "फ्राय' करून घेतात. मग "फ्राय पॅन'मध्ये कांदा, टोमॅटो, ओले खोबरे, मसाला व ब्याडगी मिरचीपासून तयार केलेली "पेस्ट' हे पदार्थ एकत्र करतात. त्यामध्ये "फ्राय' केलेली भेंडी टाकून हे एकजीव होईपर्यंत परततात.

"पनीर राजवाडी'मध्ये पनीरचे मोठे तुकडे केले जातात. पनीरचे हे तुकडे कॉर्नफ्लोअरमध्ये घोळून तळले जातात. तपकिरी रंगाचे झाल्यानंतर हे तुकडे बाहेर काढतात. मग "फ्राय पॅन'मध्ये कांदा-टोमॅटो, मसाल्याचे वाटण टाकून "ग्रेव्ही'चा बेस तयार केला जातो. मग पुन्हा एकदा पनीरचे तुकडे "शॅलो फ्राय' करून त्या "ग्रेव्ही'मध्ये टाकले जातात. वरून पुदिना पेस्ट आणि सिमला मिरचीचे बारीक तुकडे टाकून ते मिश्रण उकळले जाते. अशी ही "पनीर राजवाडी'देखील विशेष लोकप्रिय आहे.


सौंदर्य रेस्तरॉं,
लॅंड स्क्वेअर इमारत,
नामदार गोखले रस्ता,
डेक्कन जिमखाना,
पुणे.
वेळ स. 11.30 ते दु. 4 आणि सायं. 7 ते रा. 11.30.
No :- 9823034452

Sunday, January 06, 2008

पुण्यातील "दक्षिण भारत"

पुण्यातील "दक्षिण भारत"

सकाळीच काही कामानिमित्तानं कॅम्पमध्ये जायचं होतं. त्यामुळं येताना के.ई.एम. रुग्णालयासमोर (साऊथ इंडियन मेसजवळ) मिळणाऱ्या दाक्षिणात्य नाश्‍त्याचा आस्वाद घ्यावा, असा विचार आला. मग काय येतायेता एक चक्कर झालीच. तिथे गेल्यानंतर मला हैदराबाद, चेन्नई किंवा बंगळूरमध्ये गेल्यासारखंच वाटलं.

जवळपास सहा ते सात गाड्यांवर सांबार-चटणीच्या बरोबर इडली, मेदूवडा, डोसा आणि उत्तप्पा असे दक्षिणी पदार्थ खाण्यात पुणेकर मंडळी गुंग असल्याचे दिसेल. गाड्या जरी सहा-सात असल्या तरी प्रत्येक गाडीवर गर्दी जवळपास सारखीच! शिवाय प्रत्येक गाडीवरील ग्राहक रोजचे किंवा ठरलेले!! रास्ता पेठ, सोमवार पेठ आणि परिसरात दक्षिणी मंडळींचे प्रमाण तुलनेने अधिक. ज्यांना सर्वसाधारणपणे मद्रासी म्हणतात अशा मंडळींचे प्रमाण जाणवण्याइतपत असल्यामुळे या ठिकाणी अशा नाश्‍त्याच्या गाड्या लागणे नवीन नाही.

सांबार भात आणि रस्सम भात यांच्यासाठी प्रसिद्ध असलेली "मद्रासी मेस' याच ठिकाणी आहे. त्यामुळे दाक्षिणात्य पदार्थांच्या प्रेमींनी इथे जायलाच हवे. असो. सांगण्याचा उद्देश्‍य असा की, मी तेथे गेलो आणि पुन्हा एकदा हैदराबादची चव अनुभवता आली. पुण्यातील अनेक उडुपी किंवा इतर "रेस्तरॉं"मधून इडली-डोसा मिळतो पण या ठिकाणी गाड्यांवर मिळणाऱ्या पदार्थांची चव काही औरच.

नायर नावाच्या एका व्यक्तीच्या नावे असलेल्या गाडीवर इडली-वडा सांबार मागितला. इडली-मेदूवड्याच्या वरती सांबार आणि सांबारच्याच वरती चटणी अशी डिश समोर आली. मेदूवडा एक नंबर. पण इडली मात्र म्हणावी तितकी मऊ किंवा हलकी नाही. शिवाय सांबारची चवही मद्रासी नव्हती. पण मेदूवड्याची कमाल होती. मेदूवडा इतका हलका होता की विचारु नका. सांबारमध्ये तर त्याची काही वेगळीच चव लागत होती. या गाड्यांवर सांबार आणि चटणी पुन्हा मागितली तरी मिळते. शिवाय जादा चटणी-सांबार देताना मालकाचा चेहराही उपकार केल्यासारखा नव्हता हे विशेष!

हे पदार्थ खाणाऱ्या मंडळींमध्ये अर्थातच दक्षिणी मंडळी कमी होती. जादा संख्या होती ती मराठी आणि गुजराती मंडळींची! ठेपले, खाकरा, फाफडा आणि पापडी यांच्यासारख्या पदार्थांना रविवारची सुटी देऊन गुजराती मंडळींनी गाड्यांभोवती गर्दी केली होती.

या गाड्यांवर आढळणारे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या गाड्यांवर चटणी आणि सांबारच्या बादल्या किंवा पातेली नसतात. तर हे पदार्थ स्टीलच्या बरण्यांमध्ये ठेवलेले असतात. त्यामुळे तुम्हाला इडली किंवा मेदूवडा सांबार हवा असेल तर काही मिनिटे इडली किंवा मेदूवडा सांबारच्या बरण्यांमध्ये बुडवून ठेवला जातो. दोन-एक मिनिटे सांबारमध्ये राहिल्यानंतर मग तो वडा तुमच्या प्लेटमध्ये टाकून त्यावर सांबार आणि चटणी टाकली जाते. आहे की नाही गंमत!

नायर शेजारच्या गाडीवर डोसा, उत्तप्पा आणि हे पदार्थ मिळत होते. डोसा इतका पातळ की दोन मिनिटांमध्ये डोसा तव्यापासून अलग होऊन वर नाही आला तर शप्पथ. येथेही सांबारपेक्षा चटणीच अधिक चांगली. त्यामुळे चटणीला मागणी अधिक! या दोन गाड्यापासून थोडी दूर एका कडेला एक महिला गाडी लावते. तिच्याकडे आज गर्दी कमी होती. पण तिचे वैशिष्ट्य असे की, तिची गाडी संध्याकाळीही असते. इतर गाड्या फक्त सकाळी असतात. शिवाय त्या बाईकडील डोसाही अप्रतिम असतो. वैशाली-रुपालीच्या तोंडात मारेल असा कुरकुरीत डोसा तिच्याकडे मिळतो. कधी जर चुकून त्या भागात गेलात तर जरुर खा!

आणखी एक गाडी येथे आहे तिथे जायला विसरु नका. या गाडीचा परवाना चेट्टीयार नावाच्या माणसाकडे आहे. गाडीवर कदाचित तोच असावा. कपाळाला गंध लावून दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये हिरो नाही पण "व्हिलन' म्हणून शोभेल अशी एक व्यक्ती ही गाडी चालविते. चेट्टीयारच्या गाडीचे वैशिष्ट्य असे की, त्याच्याकडे मेदूवडा, इडली, सांबार आणि चटणी हे सर्वच पदार्थ एक नंबर! त्यामुळे तुम्ही जर कधी गेलात तर त्याच्याकडेच जा असा माझा सल्ला असेल. मी पण तेच करणार आहे.

मेदूवडा आणि इडली तितकेच मऊ आणि हलके. चटणी पण घट्ट, थोडी तिखट आणि अगदी थोडी आंबट. सांबारही मद्रासी चवीकडे झुकणारे. चेट्टीयारची आणखी एक खासियत म्हणजे त्याच्याकडे तांदूळ आणि उडदाच्या डाळीच्या पिठापासून तयार केलेले घावन मिळतात. डोश्‍यापेक्षा थोडे जाड आणि उत्तप्पापेक्षा थोडे पातळ, अशा मधल्याच आकारातील. त्याला घरी आपण घावन म्हणतो त्याला गाडीवर डोसा म्हणतात. तो डोसा एका डिशमध्ये चतकोर आकारात घडी घालून ठेवला जातो. त्यावर नेहमीप्रमाणे चटणी आणि सांबार टाकून "सर्व्ह' केला जातो. तुम्हाला एक डोसा सांबार-चटणी टाकून दे, अशी ऑर्डर ऐकू आली तर घाबरुन जाऊ नका. तुम्हीही असा रगडा एकदा खाऊन बघा. खूष व्हाल.

शिवाय या पदार्थांचे दर फार अधिक नाहीत. इडली-चटणी-सांबार दहा रुपये, इडली-मेदूवडा आणि सांबार-चटणी अकरा रुपये तर मेदूवडा-सांबार-चटणी बारा रुपये. डोसा बारा रुपये आणि उत्तप्पा तेरा रुपये. हॉटेलात जाऊन खाण्यापेक्षा हे अधिक स्वस्त आणि चविष्टही! तिथे गर्दी जमते ती काय उगाचच?

Saturday, January 05, 2008

सर्जा रेस्तरॉं


मंगेशकरांचे "फॅमिली रेस्तरॉं'

आपण आज आलो आहोत पुण्यातील पहिल्या "सेलिब्रिटी रेस्तरॉं'मध्ये! पण औंध भागात बरोबर 11 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या "सर्जा'ची ओळख "सेलिब्रिटी रेस्तरॉं' पुरतीच मर्यादित राहिलेली नाही. चविष्ट पदार्थ आणि कुटुंबातील सर्वांनी एकत्रितपणे भोजनाचा मनमुराद आस्वाद घेण्यासाठी पूरक वातावरण यामुळे "सर्जा' आता "फॅमिली रेस्तरॉं' बनले आहे.

लतादीदी येथील दाल-खिचडी आवडीने खातात. बाळासाहेबांना मांसाहारी पदार्थ एकदम वर्ज्य. उषाताईंचे जेवण मात्र "चिकन तंदुरी' किंवा "फिश फ्राय'शिवाय पूर्णच होत नाही. आशाताईंची "स्टाईल'च हटके. आशाताई तर भटारखान्यात जाऊन मालवणी पद्धतीने मासे कसे बनवायचे याचे धडे स्वयंपाकी मंडळीना देतात. हे "रेस्तरॉं' मंगेशकर कुटुंबीयांच्या मालकीचे आहे. त्यामुळेच त्यांची "सर्जा'वर इतकी मर्जी आहे.

सुरवातीला "सर्जा'चा नावलौकिक सर्वदूर पोचविण्यासाठी मंगेशकरांच्या पुण्याईचा उपयोग झाला. नंतर पदार्थांची चव व वातावरण यामुळे खवय्या ग्राहकांचा "फ्लो' टिकवून ठेवणे व्यवस्थापक रणजित शेट्टी यांना शक्‍य झाले. "सर्जा' म्हणजे सिंह. हे नाव स्वतः लतादीदींच्या आग्रहावरून देण्यात आले होते. अर्थात, हे "रेस्तरॉं' मंगेशकर कुटुंबीयांच्या मालकीचे आहे, हे सांगितल्याशिवाय कळत नाही. लतादीदी किंवा इतर भावंडांची पेंटिंग्ज किंवा छायाचित्रे भिंतीवर न लावता आवर्जून मिलिंद मुळीक यांच्या निसर्गचित्रांना भिंतीवर स्थान देण्यात आले आहे. अर्थात, हा निर्णयही खुद्द दीदींचाच! "रेस्तरॉं'मध्ये कायम "वर्ल्डस्पेस' रेडिओवरील संगीत कायम सुरू असते.

"सर्जा' हे पूर्णपणे "नॉर्थ इंडियन' आहे. त्यामुळे व्यवस्थापन शेट्टी यांच्याकडे असले तरी येथे इडली-डोसा आणि तत्सम दक्षिण भारतीय पदार्थांना "मेन्यू कार्ड'मध्ये स्थान नाही. उत्तर भारतीय पद्धतीने तयार केलेले शाकाहारी व मांसाहारी पदार्थ हीच येथील खासीयत. चिकन, मटण व माशांचे विविध प्रकार येथे उपलब्ध असले, तरी "सर्जा' विशेष प्रसिद्ध आहे "पंजाबी डिशेस'साठीच!

"पालक सूप' हा सध्या अनेक ठिकाणी मिळणारा पदार्थ देण्यास आम्ही सुरवात केली, हे शेट्टी आवर्जून सांगतात. त्यामुळे "पालक सूप' घ्याच, असा त्यांचा आग्रह! पंजाबी पदार्थांमध्ये पनीरचे पदार्थ हे "सर्जा'चे वैशिष्ट्य. आपण पनीर खातो की बटर असा अनुभव पनीरची सब्जी खाताना आला नाही, तरच नवल. पनीरच्या जोडीला "सरसू का साग' आणि "मक्के की रोटी' हा अस्सल पंजाबी पदार्थही "झकास'.

आम्ही मात्र, "लसूनी तवा डिंगरी' ही मशरूमची डिश मागविली. लसूण म्हणजे उग्र. पण येथे मशरूमच्या भाजीला लसणाची अगदी हलकी फोडणी दिलेली असते. त्यामुळे लसणाची चव लागते; पण त्याच्या उग्रपणाचा त्रास होत नाही. "मकई मिर्च मसाला' ही डिशही विशेष लोकप्रिय आहे. स्वीट अमेरिकन कॉर्न व सिमला मिरची यांच्यापासून तयार केलेल्या व "रेड ग्रेव्ही'मधून "सर्व्ह' केल्या जाणाऱ्या या "डिश'चे "रेटिंग' प्रथमपासूनच "हाय' आहे.

दाल किंवा पालक खिचडी ही खुद्द लतादीदींची आवडीची "डिश'. अर्थात, इतर खवय्या मंडळींची मनेही या "डिश'ने जिंकली आहेत. पण "मेन्यू कार्ड'मधील "दहीभात तडकावाला' हा पदार्थ लक्ष वेधून घेतो व त्याचीच "ऑर्डर' करायला भाग पाडतो. साधा पातळ दहीभातच, पण त्याला लाल मिरचीचा तडका दिल्यामुळे भाताला एकदम वेगळीच चव प्राप्त होते. "दहीभात तडकावाला' ही सर्व मंगेशकरांची समान आवडती "डिश'. मंगेशकर मंडळींच्या जेवणाचा शेवट दहीभातानेच होतो, असे शेट्टी सांगतात.

बाकी मग "नॉनव्हेज'मध्ये चिकन थाई, चिकन मंगोलियन, चिकन कॅश्‍यू, चिकन व्होल्कॅनो, "प्रॉन्स विथ मिक्‍स व्हेजिटेबल्स हॉंगकॉंग स्टाईल', गोल्डन फ्राईड फिश, पुदीन मच्छी, फिश अमृतसरी, बोल्हाईच्या मटणाचे चायनीज पद्धतीने केलेले पदार्थ व कबाबच्या पंचवीसहून अधिक "व्हरायटी' येथे आहेत. "स्टार्टर्स'मध्ये "फिश तवा' अनेकांना आवडतो. तव्यावर करीमध्ये मासा टाकून ती करी माशामध्ये पूर्णपणे मिसळून तवा कोरडा होईपर्यंत मासा शिजवितात. त्यामुळे मासा खायचा तर "फिश तवा'च!

सॅलड व रायताचे नऊ-दहा प्रकार, "आईस टी' व "लिची विथ क्रीम' तसेच "लिची विथ आईस्क्रीम' यांनाही विशेष मागणी असते. साधारणपणे शंभर जण एका वेळी बसू शकतात, अशी व्यवस्था येथे आहे. त्यामुळे "वेटिंग'चा प्रश्‍न उद्‌भवत नाही. औंधसारख्या उच्चभ्रू वस्तीमध्ये असल्यामुळे येथील पदार्थांचे दर साहजिकपणे इतर ठिकाणपेक्षा थोडे अधिक आहेत; पण तरीही एकदा का होईना, मंगेशकरांच्या या आवडत्या "रेस्तरॉं'मध्ये जायलाच हवे.


"सर्जा रेस्तरॉं',
127-2 सानेवाडी,
आयटीआय रस्ता,
औंध,पुणे - 411007.
वेळ ः दुपारी 12 ते 3.30
व सायंकाळी 7 ते 11.30