Tuesday, August 20, 2013

निष्ठेची, तपश्चर्येची हत्या

ध्येयवादी सुधारक हरपला...



नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यातल्या ओंकारेश्वरजवळील पुलावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची बातमी ऐकली आणि धक्काच बसला. नुकताच अमेरिकेत गेलेल्या योगेश ब्रह्मेचा फोन आल्यामुळं सकाळी खडबडून उठलो आणि त्याच्याकडून ही बातमी ऐकताच माझा माझ्या कानांवर विश्वासच बसला नाही. अरे काही तरीच काय बोलतोय. तीन-चार दिवसांपूर्वी तर आमच्या ऑफिसमध्ये आले होते. लेखासंदर्भात संपादकांना भेटण्यासाठी आले होते, त्यावेळीच ते दिसले होते. आज अचानक असं कसं शक्य आहे. उगाच कशाला असं कोण त्यांच्यावर हल्ला करेल. असं म्हणत म्हणत मराठी न्यूज चॅनल लावला आणि पाहतो तर तोंडातून पुढचा शब्द बाहेरच पडेना… योगेशलाही तिथं मराठी न्यूज चॅनल सापडला, मग लगेचच आमचा फोन बंद झाला.

दाभोलकर गेल्याचं ऐकलं, पाहिलं आणि धक्काच बसला. मनापासून हलल्यासारखं झालं. वास्तविक पाहता, नरेंद्र दाभोलकर यांचा आणि माझा तसा थेट काहीही संबंध नाही. ओळख सोडा तोंडओळखही नव्हती साधी. उलट ते मांडायचे त्यापैकी अनेक गोष्टी पटायच्या नाहीत. गणेश मूर्तींचे नदीपात्रात विसर्जन करण्याऐवजी त्या दान करा किंवा तलावांमध्ये विसर्जन करा, हे मुद्दे मात्र, मनापासून पटले होते. मात्र, त्यांचे इतर विचार अजिबात पटण्यासारखे नव्हते. इतकं सगळं असूनही दाभोलकरांच्या हत्येमुळं खूप गलबलल्यासारखं झालं. का झालं असावं असं…

कदाचित त्यांची त्यांच्या समाजवादी विचारांवर असलेल्या निष्ठेमुळं असेल. ध्येयानं पछाडलेला माणूस पंधरा-वीस वर्षांपासून एकाच विचारासाठी किंवा विधेयकासाठी लढा देतो, ही गोष्ट महत्त्वाची वाटत असावी म्हणून कदाचित दाभोलकर यांच्याबद्दल मनात सॉफ्ट कॉर्नर असावा. भले त्यांचे विचार कितीही न पटणारे किंवा माझ्या विचारांच्या विरोधातील असले तरीही ते त्यांचा विचार प्रामाणिकपणे मांडत आले होते. त्यासाठी काय वाट्टेल ते करण्याची त्यांची तयारी होती. आंदोलन, उपोषण, निषेध, लेखन, भाषण, विविध राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी, सरकारच्या प्रतिनिधींशी चर्चा, वारकरी आणि विरोधी विचारांच्या मंडळींशी चर्चा अशा अनेक स्तरांवर दाभोलकर काम करीत होते. त्यामुळे त्यांच्याबद्दल असलेल्या सॉफ्ट कॉर्नरचं रुपांतर होऊन कामाबद्दल आदर वाटू लागला होता.

हल्ली समाजात बुवाबाजी, महाराज, गंडेदोरे, अंगठ्या-खडे वगैरेंच प्रस्थ भलतेच वाढले आहे. म्हणजे जणू काही ही मंडळीच सर्व दुनियेचे व्यवहार हँडल करीत असतात, अशा थाटात यांची दुकानदारी सुरू असते. त्यांच्याविरोधात कठोर पावले उचलणे आवश्यकच आहे. कुणीतही पेपरमध्ये जाहिरात देऊन सांगतो, की मी बोलते ते कायम सत्य होते वगैरे. तुला जर सगळ्या दुनियेची खबर असेल आणि कोणाचे लग्न कधी जमणार, पोरं कधी होणार हे तुलाच माहिती असेल तर तूच भविष्यात येणाऱ्या भूकंप, अपघात, प्रलय, त्सुनामी वगैरेची माहिती देत जा ना… पण असली आव्हाने स्वीकारायला ही मंडळी तयार नसतात. अशा भोंदू बाबा-महाराजांविरोधात दाभोलकरांनी म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने उघडलेली आघाडी अगदी योग्य आणि स्वागतार्हच होती. लाथा घालून रोग मिटविणारे, हात लावताच पाणी गोड करणारे, अंगारे-धुपारे, पुड्या, उदी वगैरे देऊन रोग बरे होतील, अशी बतावणी करणाऱ्या सर्व भोंदू बाबांना लाथा घालून ताळ्यावर आणले पाहिजे. तेच काम दाभोलकर कायदेशीर मार्गांनी करत होते. त्यामुळे त्यांच्याबद्दल आदर होता.

सध्या कपडे बदलतात, तशा पद्धतीनं मंडळी विचार बदलू लागली आहेत. त्यामुळे अशा वैचारिक अधिष्ठान असलेल्या लोकांबद्दल आदर वाटत होता. अन्यथा डॉक्टर असलेले दाभोलकर साताऱ्यात किंवा अगदी पुण्यातही मस्त प्रॅक्टिस करून रग्गड पैसा कमावू शकले असते. पण त्यांनी तसे केले नाही. ही त्यागी वृत्ती आजच्या घडीला दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. अनेक हिंदुत्त्ववादी संघटना त्यांच्यावर परदेशातून मदत स्वीकारल्याचा किंवा परदेशी ‘एनजीओं’कडून खोऱ्याने पैसा ओढत असल्याचे आरोप करीत होत्या. त्यात तथ्य आहे किंवा नाही, याच्या तपशीलात आता जाण्याची गरज नाही. मात्र, त्यांना जर परदेशातून तसा पैसा येत असला, तरीही ते तो पैसा अंधश्रद्धा निर्मूलनासाठीच वापरत असावेत, हा विश्वास अगदी मनात ठाम होता. त्यामुळंच अशा आरोपांचा त्यांच्या प्रतिमाभंजनासाठी कधीच उपयोग झाला नाही.


शिवाय एखाद्याचा विचार पटत नसला तरीही तो विचार मांडणाऱ्या व्यक्तीची हत्या करण्याची भाषा करणारे किंवा थेट हत्या करणारे लोक कधीच पटले नाहीत. मागे साम मराठीमध्ये असताना संघाच्या एका प्रचारकाचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत सोलापुरातील रेल्वेट्रॅकवर सापडला होता. इतर वृत्तपत्रे किंवा चॅनेलनी त्याची विशेष दखल घेतली नव्हती. कदाचित तो संघवाला होता, म्हणून असेल. पण साम मराठी म्हणून आम्ही त्या घटनेची गंभीर दखल घेतली होती. कारण एखाद्या विचारासाठी जी व्यक्ती स्वतःच्या आयुष्यातील दोन-तीन वर्षे खर्ची घालते, त्या व्यक्तीचा खून होऊन त्याचा मृतदेह अशा पद्धतीने रेल्वेट्रॅकवर आढळावा, ही गोष्टी शाहू, फुले, आंबेडकर, रानडे, कर्वे, टिळक, आगरकर, सावकरकर यांच्या महाराष्ट्राला लांच्छनास्पद होती. आज ही वेळ संघाच्या कार्यकर्त्यावर आलेली वेळ कदाचित नंतर समाजवादी किंवा कम्युनिस्ट कार्यकर्त्यावरही येऊ शकते. त्यामुळेच आम्ही ती घटनेचा फॉलोअप घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला होता. तशी वेळ डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावरच यावी, यापेक्षा महाराष्ट्राचे आणखी दुर्दैव कोणते?

‘मला जर कोणी पिस्तूल आणून दिली, तर मी सर्वप्रथम नरेंद्र मोदींना गोळ्या घालून ठार मारेन,’ असे म्हणणारे विजय तेंडुलकरही असेच असहिष्णुतेने पछाडले होते की काय, असे वाटले होते. पु्ण्यातील भांडारकर संस्थेवर केलेला हल्लाही तशाच असहिष्णू आणि अविवेकी लोकांनी केलेला होता हे ठाम मत होते आणि आहे. हे सर्व सांगण्याचा उद्देश इतकाच, की कोणत्याही (अर्थातच, देशविघातक किंवा दहशतवादी नसलेल्या) विचारासाठी मनापासून काम करण्याऱ्या व्यक्तीचे विचार तुम्हाला कितीही न पटो, ते विचार मांडण्याचे स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा तुम्हाला काहीही अधिकार नाही, ही भूमिका ठाम आहे. मग ते लेखन स्वातंत्र्य असो, भाषण स्वातंत्र्य असो किंवा विचार स्वातंत्र्य असो… अर्थात, प्रत्येक वेळी हे शक्य असतेच असे नाही. तरीही अनेक जण आपला प्रामाणिक विचार तितक्याच प्रामाणिकपणाने मांडत असतात.

दाभोलकर हे असेच विचारांशी, तत्त्वांशी आणि ध्येयाशी प्रामाणिक असल्यामुळे कदाचित त्यांचा तो ध्येयवेडेपणा मला भावला होता. त्यामुळंच कोणत्या तरी दळभद्री माथेफिरूनं त्यांची गोळ्या घालून हत्या केली, हे ऐकल्यानंतर संतापाची तिडीक आली. दुर्दैवाने विचारांचा मुकाबला विचारांनी करण्याची कुवत नसलेल्या मंडळींनी दाभोलकर यांना पाठीमागून गोळ्या घातल्या. दाभोलकर यांच्यासारख्या ध्येयवेडाने पछाडलेल्या व्यक्तीला सामोरे जाण्याचे धारिष्ट्य वेड्या आणि विकृत मनोवृत्तीच्या हल्लेखोरांमध्ये झाले नसावे. म्हणूनच त्यांनी कदाचित पाठिमागून हल्ला केला असावा.