Saturday, December 19, 2009

भाजीवाल्याचा झाला 'वडा...'

गेल्या काही दिवसांपास्नं थोडंसं 'आयडल' झाल्यासारखं वाटत होतं. पण पुन्हा एकदा नव्या जोमाने ब्लॉग लिहिण्यास सुरवात करणार आहे. गेल्या काही दिवसांपास्नं ब्लॉग लिहिण्यास वेळच मिळत नव्हता. खरं सांगायचं तर मनच होत नव्हतं. पण 'शो मस्ट गो ऑन'ही गोष्ट ध्यानात ठेवून आता हा ब्लॉग पुन्हा पहिल्यासारखा लिहिता राहिल.

थोड्याच दिवसांत एक आगळ्यावेगळ्या भाजीवाल्याची कथा घेऊन येतोय. ही गोष्ट आहे एका भाजी विक्रेत्याची. ज्या भाजी विक्रेत्याला आपल्या भाजीच्या स्टॉलबरोबरच वडे विक्रीचा स्टॉल सुरु करायचा होता. त्याचं एक्स्पान्शन करायचं होतं. लोकांपर्यत आपला ब्रँड पोचवायचा होता आणि जगातला सर्वाधिक मोठा वडा विक्रेता व्हायचं होतं...

भाजी विक्रेत्याचे वडे लोकप्रिय ठरतात का, त्याचे वडे खरोखरंच चमचमीत आणि खमंग असतात का, भाजीप्रमाणेच वड्यांसाठीही तो वाखाणला जातो का... या आणि इतर अनेक प्रश्नांची उत्तर घेऊन येतोय माझा नवा ब्लॉग 'भाजीवाल्याचा झाला वडा...' लवकरच...

Friday, October 30, 2009

रविवार सकाळ @ मातोश्री..."जब वुई मेट' चित्रपटातलं "ते" दृष्य आठवतंय...? शाहिद कपूर करिनाला सोडून आल्यानंतर प्रथमच "शेअर होल्डर्स'ना सामोरा जातो. तेव्हा त्याच्या तोंडचे संवाद आठवतात...? ""आदित्य कश्‍यप अपने फादर की जगह नही ले सकता. कंपनी स्पिल्ट होनेवाली है. हमारे शेअर प्रायझेस ऑल टाईम लो है. सारे नये ब्रॅंड्‌स फ्लॉप हो चुके है. उपर से 572 क्‍लेम्स. इन आदर वर्डस अपनी हालत बहुत खराब हो गई है बॉस. अपनी तो बॅंण्ड बज गई है बॉस...'' इइ.

परिस्थिती अगदी तशीच्या तशी नसली तरी शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव यांची अवस्था काहीशी अशीच आहे. उद्धव हे अगदी चोहोबाजूंनी समस्या आणि अडीअडचणींनी घेरले गेले आहेत. राज-राणे यांच्या बंडखोरीतून शिवसेनेला बाहेर काढून सैनिकांमध्ये मनोधैर्य निर्माण करण्यात ते यशस्वी ठरले. पण लोकसभा निवडणुकीत मुंबईत बसायचा तो फटका बसलाच. त्यावेळी किमान मराठवाड्यानं तरी साथ दिली होती. पण विधानसभा निवडणुकीत मुंबईप्रमाणेच मराठवाड्यानंही पाठ फिरविली. त्यामुळं उद्धव यांच्या नेतृत्वाच्या क्षमतेबाबतच प्रश्‍नचिन्ह निर्माण केलं जातंय. मराठी मतदार आणि शिवसैनिकांमध्येही काही प्रमाणात कुजबूज सुरु झालीय.

च्या दिवशी उद्धव ठाकरे पत्रकारांना सामोरेही गेले नाहीत. त्यामुळं उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया काय, ते पराभवाचं विश्‍लेषण कसं करतात हे जाणून घेण्याची उत्सुकता होती. त्यामुळंच भेटण्याची इच्छा व्यक्त करणारा डचड उद्धव यांना टाकला. अनपेक्षितपणे उद्धव यांचा तातडीनं "रिप्लाय' आला, "उद्या दुपारी साडेबारा वाजता मातोश्री..." निमंत्रण स्वीकारलं आणि रविवारी मध्यान्हीला (पत्रकार परिषदेच्या आदल्या दिवशीच...) मी आणि माझा सहकारी हृषिकेश देशपांडे मातोश्रीवर पोचलो. उद्धव यांच्याशी सविस्तर चर्चा तर झालीच पण ठाकरे कुटुंबियांचा जिव्हाळा अनुभवण्याची संधीही मिळाली.

एखाद्या घरात गेल्यानंतर यजमानाकडनं होणारं स्वागत, नुकतीच दिवाळी झाल्यामुळं फराळासाठी होणारा आग्रह अथवा खास "सीकेपी' पद्धतीनं तयार केलेल्या "कानुल्या' किंवा पोहे खाण्यासाठी रश्‍मी वहिनींकडून होणारा आग्रह... हे सगळं अनपेक्षित तर होतंच पण त्यापेक्षाही आश्‍चर्यकारक होतं. मातोश्रीवर पोचलो तेव्हा उद्धव हे मनोहर जोशी यांच्याशी बोलत होते. त्यामुळं रश्‍मी वहिनींनी सुरवातीला आमचं आदरातिथ्य केलं. अगदी कोण कुठनं उभं होतं किंवा माध्यमं कशी एकांगी बातम्या देतात इथपासून ते "सीकेपी' खाद्यपदार्थ किंवा मराठीचा मुद्दा किती महत्वाचा आहे, इथपर्यंत सर्वच विषयांवर त्या मोकळेपणानं बोलत होत्या. माध्यमांवर त्यांची किती "नजर' आहे, हे त्या देत असलेल्या संदर्भांवरनं अगदी क्षणोक्षणी जाणवत होतं.

सरांशी "गुफ्तगू' झाल्यानंतर उद्धव आमच्याशी "शिवसंवाद' साधायला आले. तत्पूर्वी त्यांनी निखील वागळे यांच्या "आजचा सवाल'चं उत्तर दिलेलं होतं. गेल्या पाच वर्षांत उद्धव यांनी जितकी आंदोलनं केली तितकी राज्यातल्या एकाही नेत्यानं केली नाहीत. कापूस दिंडी, कर्जमुक्ती देता का जाता, ऊस दरासाठी आंदोलन किंवा "शिवसंवाद' दौरा... इतक्‍यांदा जनतेमध्ये गेलेला हा नेता निकालानंतर पुरता हताश झाला असेल किंवा खचून गेला असेल, असं आम्हाला वाटलं होतं. राजचा दबदबा वाढत जातोय. दुसरीकडे मुंबई आणि मराठवाड्यासारखे बालेकिल्ले पडताहेत. याची चिंता त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत होतीच. पण मी इतक्‍यानं खचून जाणाऱ्यातला नाही, हे देखील त्यांच्या बोलण्यातनं जाणवत होतं.

"मी महाराष्ट्र बोलतोय...'च्या निमित्तानं आम्ही राज्यात काय काय पाहिलं, याची माहिती ते आवर्जून घेत होते. शिवसेनेचे लोकप्रतिनिधी असलेला भागही कसा अविकसित आहे, हे आम्ही त्यांना सांगितलं. तसंच एकाच उमेदवाराला अनेकदा संधी दिल्यामुळंही काही ठिकाणी फटका बसला असावा, असं सांगितलं. त्यावर बरीच चर्चा झाली. त्यांनी मांडलेली बाजू कार्यप्रमुखातली माणुसकी दाखवणारी होती.

""नारायण राणे सेनेतून बाहेर पडले तेव्हा त्यांनी मराठवाड्यातल्या प्रत्येक आमदाराला चुचकारलं होतं. पण त्यांनी सेनेवरची निष्ठा ढळू दिली नाही. त्यात अनेक ज्येष्ठांचाही समावेश होता. सांदिपान भुमरें अथवा अण्णासाहेब माने यांना पुन्हा तिकिट मिळालं ते त्यांच्या निष्ठेमुळंच. त्यांचा पराभव झाला. पण सेनेत निष्ठावंतांनाच तिकिटं मिळतात, हे दाखवून देण्यासाठी त्यांना पुन्हा उमेदवारी दिली होती. सेनेत तिकिटं विकली जात नाहीत, हे दाखवून द्यायचं होतं,'' असं उद्धव यांचं स्पष्टीकरण वेगळा आयाम मांडणारं होतं.

दुसरीकडे अनुसूया खेडकर (कै. आमदार प्रकाश खेडकर यांच्या पत्नी) यांनी इच्छा नसताना पण सेनेला गरज असताना नांदेडमधून निवडणूक लढविली. मग आता दुसरा उमेदवार मिळाला म्हणून त्यांना उमेदवारी डावलणं मला माणूस म्हणून पटलं नाही, हे स्पष्टीकरणही शांत आणि संयमी नेत्याची आणखी एक बाजू दाखवणारं होतं. माध्यमांकडून दोन्ही बाजूनी होणाऱ्या टीकेला सामोरं जाताना उद्धव भूमिकेवर ठाम होते. ज्येष्ठांना तिकिटं द्या किंवा त्यांची तिकिटं कापा, टीका होतेच. शिवसेना राडेबाज, शिवराळ भाषा वापरणारी किंवा गुंडप्रवृत्तीची म्हणूनही टीका होत होती आणि आता संस्कृती बदलतोय तरीही टीका होतेच. त्यामुळं माध्यमं दोन्ही बाजूनं बोलतात आणि शिवसेनेवरच टीका करतात, हे त्यांनी सोदाहरण दाखवून दिलं. तसंच आम्ही आमचा मार्ग सोडणार नाही, हेही निक्षून सांगितलं.

""मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या जनतेमध्ये गेलो. इतर कोणीही गेलं नाही इतके वेळा गेलो. तरीही मला आणि शिवसेनेला अपयश का आलं,'' याचं उत्तर त्यांना जास्त सतावत होतं. कदाचित उद्धव जितके कार्यरत आहेत तितके त्यांचे आमदार-खासदार नाहीत, हेच त्याचं उत्तर आहे. आपल्या भागाचा विकास करण्यात शिवसेनेचे लोकप्रतिनिधी पुढे नाहीत आणि हे आम्ही प्रत्यक्ष पाहिल्यामुळं आम्हाला माहिती होतं. ते त्यांनाही सांगितलं. शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करत असताना सभागृहात मात्र, पक्ष तितका सक्षम वाटत नव्हता. अशा काही विधानांच्या वेळी त्यांचा चेहरा पुरेसा बोलका होता.

आता मुंबईतली पक्ष संघटना वॉर्ड स्तरापासून पुन्हा बांधून काढायची, मराठवाडा-विदर्भात फक्त आंदोलन न करता विधायक तसंच विकासकामंही सुरु करायची, पुन्हा एकदा त्याच तडफेनं स्वकीय तसंच परकीयांशी दोन हात करायचे आणि मुख्य म्हणजे या सर्वांच्या जोडीला पुन्हा एकदा ज्वलंत हिंदुत्व हातात घ्यायचं, अशा अनेक गोष्टींचे संकेत कळत नकळत मिळत होते. जवळपास तास दीडतासांच्या भेटीमध्ये उद्धव यांच्याशी अगदी मोकळेपणानं चर्चा झाली.

राज आणि राणे यांच्या तडाख्यामुळं शिवसेनेची पडझड होणार, हे माहिती होतंच. पण उद्धव पराभूत झाले असले तरी "फिनिक्‍स' पक्षाप्रमाणे उभं राहण्याची जिद्द त्यांच्यात आहे. शांत, संयमी आणि सुसंस्कृत आहेत. ते चिवट आहेत. लोकांमध्ये मिसळण्यात आणि आंदोलनांचं नेतृत्व करण्यात त्यांना शरम वाटत नाही. तरीही शिवसेनेचे 44 आमदार आहेत. त्यातला 26 तरुण आहेत. लोकांसाठी जनतेमध्ये जाऊन आंदोलनं करणारा आणि त्यांच्या व्यथा समजून घेणारा उद्धव यांच्या व्यतिरिक्त एकही नेता नाही. अशा त्यामुळंच त्यांच्या या प्रयत्नांना लोकांची आज ना उद्या साथ लाभणार का, याचीच उत्सुकता आहे.

लेखाच्या सुरवातीला "जब वुई मेट' या चित्रपटात वापरलेल्या संवादाचा उत्तरार्ध खालील बाजूस आहे. फक्त चित्रपटात शोभेल असाच तो आहे.

""... इससे बुरा और कुछ हो नही सकता. अब सिर्फ अच्छा हो सकता है और होगा. इन्सान जो कुछ रियली चाहता है ना, ऍक्‍च्युली... उसे हमेशा वोही मिलता है. और इस बार मे रियल मे चाहता हूँ. ऍक्‍च्युअल मे. हर प्रॉब्लेम को में सामने से फेस करु. हर इनकमप्लिट प्लॅन को कम्प्लिट करु. इस कंपनी को वहा तक ले जाऊ जहा खुद डॅड भी नही सोच सकते...''

चित्रपटाच्या उत्तरार्धात शाहिद कपूर त्याच्या वडिलांची कंपनी खूप मोठी करतो. त्याला खूप फायदा होतो वगैरे वगैरे... तुलना करण्याची इच्छा नाही. पण तरीही उद्धव यांच्या आयुष्यातही हा संवाद खरा ठरेल का... असा विचार करतच "मातोश्री'तून बाहेर पडलो... समाधानी मनानं!

Thursday, October 29, 2009

युवराज आदित्याय नमःरंग उडालेली स्काय ब्लू जीन्स, केल्विन क्‍लेनचा टी-शर्ट, चेहऱ्यावर "डिट्टो' वडिलांसारखं हास्य, वारश्‍यानंच चालत आलेला बोलण्या-चालण्यातला आत्मविश्‍वास आणि मिश्‍किल वृत्ती... ठाकरे घराण्यातल्या चौथ्या पिढीचा प्रतिनिधी असलेल्या आदित्य उद्धव ठाकरेची ही पहिली ओळख. "साम मराठी'साठी आदित्यची मुलाखत घेण्यासाठी "मातोश्री'वर गेलो होतो. तेव्हा आदित्यची ही ओळख मनावर ठसा उमटवून गेली. मुलाखत जसजशी रंगत गेली तसतसा त्याच्यातला "कॉन्फिडन्स' दुणावत गेला.

पुरोगामी विचारांचे प्रबोधनकार ठाकरे, ज्वलंत हिंदुत्ववादी आणि मराठी माणसाचा मानबिंदू असलेले बाळासाहेब तर सभ्य आणि सुंस्कृत राजकारणी अशी ओळख असलेले उद्धव ठाकरे... या तीनपैकी कोणती प्रतिमा तुला अधिक जवळची वाटते किंवा कोणत्या प्रतिमेत तू "फिट्ट' बसतो, असं विचारल्यानंतर आदित्यनं दिलेलं उत्तर त्याची वाटचाल परिपक्वतेच्या दिशेनं सुरु असल्याचं द्योतक वाटलं. ""तिघांच्याही भूमिका त्या-त्या काळाशी सुसंगत होत्या. किंवा संबंधित भूमिका ही त्या काळाची गरज होती. त्यामुळं कालानुरुप विचार केला तर तिघांच्याही भूमिका जवळच्या वाटतात. भविष्यात कालानुरुप आवश्‍यक असेल तशीच माझी भूमिका असेल. कदाचित ती या तिघांपेक्षा वेगळीही असेल,'' असे सांगून आदित्यनं त्याच्यातला "स्पार्क' दाखवून दिला.

घरातल्या प्रत्येक नात्यापासून ते राज ठाकरे यांच्याशी असलेल्या संबंधांबद्दल आणि विधानसभेच्या प्रचारापासून ते स्वयंसेवी कामाबद्दल प्रत्येक विषयावर तो अगदी स्पष्टपणे बोलतो. खास ठाकरे शैलीप्रमाणे कोणताही आडपडदा न बाळगता! सध्या तो "झेवियर्स'मधून बीए करतोय. राज्यशास्त्र आणि इतिहास ते त्याच्या आवडीचे विषय आहेत. बीए झाल्यानंतर पुढचं शिक्षण आणि करियर कशात करायचं याबद्दल विचार करायचा, असं तो सांगतो. बाबांप्रमाणे स्वतःला पूर्णपणे राजकारणात झोकून देणार का, या प्रश्‍नावर सध्या तरी त्याच्याकडे उत्तर नाही. सुरवातीला शिक्षण या विषयात काहीतरी ठोस करण्याची त्याची इच्छा आहे. त्याची सुरवात प्राध्यापकांच्या संपाच्या निमित्ताने झाली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आदित्यला "प्रोजेक्‍ट' करण्यात आलं, असं माध्यमांना वाटत असलं तरी हे विधान तो खोडून काढतो. मी प्रचारात उतरण्याचा विचार करतोय, पण राजकारणात सक्रिय होईन किंवा नाही हे अजूनही ठरलेले नाही. मग "प्रोजेक्‍ट' करण्याचा प्रश्‍न येतोच कुठं, असा प्रतिप्रश्‍न तो विचारतो.

तूर्तास तरी अभ्यास, कविता लेखन, फोटोग्राफी, कॉलेजियन्सशी निगडित आंदोलनं आणि स्वयंसेवी संस्था यांच्यापुरतंच मर्यादित राहण्याचं आदित्यनं ठरवलंय. कार्यप्रमुखांनी आदेश दिला तरच तो प्रचारात उतरणार आहे. पण फक्त निवडणुकीपुरतं. नंतर पुन्हा कॉलेज, अभ्यास आणि सामाजिक काम. नाही म्हटलं तरी आदित्यच्या "शिवसेना भवन'च्या फेऱ्या वाढल्या आहेत. शिवसेनेच्या कार्य पद्धतीची जवळून ओळख व्हावी, यासाठी तो सेना भवनावर असतो. पण तिथं गेलं की त्याला वेगवेगळ्या जिल्ह्यांची निमंत्रण येऊ लागतात. आमच्याकडे दौऱ्यावर या, प्रचारासाठी या वगैरे वगैरे. नुकतंच त्याला अकोल्यामध्ये प्रचाराला येण्याचं निमंत्रण आलंय. काही ठिकाणी तो बाबांबरोबर प्रचाराला जाईलही. पण अजून काही निश्‍चित झालेलं नाही. जगभरातल्या शिक्षणतज्ज्ञांचे शिक्षणविषयक प्रबंध आणि पेपर्सचा अभ्यास करणं,

बाहेरच्यांसाठी जहाल किंवा कठोर वाटणारे बाळासाहेब खूप हळवे आणि "इमोशनल' आहेत, असं आदित्यला वाटतं. घरी आई आणि बाबा यापैकी कोणाचा मार जास्त खाल्ला आहे, याला मिळालेलं उत्तर धक्कादायक पण गमतीशीर आहे. आदित्य म्हणतो, ""कोणाचाच मार खाल्लेला नाही. मुळात आमच्याकडे असा नियमच आहे. कोणीही कोणावरही हात उगारायचा नाही. त्यामुळं ओरडा खाल्ला पण मार खाल्लेला नाही. आईकडून नाही आणि बाबांकडूनही नाही.'' ""माझा जन्म जरी ठाकरे घराण्यात झालेला असला तरी आईनं आम्हाला कायम जमिनीवर ठेवलं. आम्ही वेगळे किंवा असामान्य आहोत, असं जाणवूच दिलं नाही. जिथं रांग असेल तिथं रांगेत उभं रहायचं, शाळेत झालेली शिक्षा इतरांप्रमाणेच भोगायची आणि ठाकरे नावाचा गैरवापर करायचा नाही, हे आईनं आमच्या मनावर चांगलंच ठसवलं आहे,'' असं आदित्य आवर्जून सांगतो.

""कॉलेजमध्ये ओळख करुन देताना मी फक्त आदित्य इतकीच ओळख सांगतो. कोणी अगदीच विचारलं तर "आदित्य टी' असं सांगतो. अगदीच जर कोणी खोदून खोदून विचारलं तर आदित्य ठाकरे अशी ओळख करुन देतो. ठाकरे नावाचा मला अभिमान आहे. पण त्यामुळं आपसूक मिळणारे फायदे मला नको आहेत,'' असं आदित्य सांगतो. "व्हॅलेन्टाईन डे'च्या दिवशी आदित्य शक्‍यतो कॉलेजला जाण्याचं टाळतो. गेल्या दोन-तीन वर्षांपासून हा मुद्दा तितकाचा वादग्रस्त राहिलेला नाही. त्यामुळं "व्हॅलेन्टाईन डे'ला "गोची' होत नाही, असं आदित्यचं म्हणणं आहे.

शिवसेना या राजकीय पक्षाचं वलय आणि कार्यप्रमुखांचा मुलगा असल्याचा अहंकार त्याच्यामध्ये जाणवत नाही. कदाचित हीच गोष्ट भविष्यात त्याच्यासाठी "प्लस पॉईंट' ठरु शकेल. आदित्यचं वागणं बोलणं हे जवळपास उद्धव ठाकरे यांच्यासरखंच आहे. त्यामुळंच तो शांत आणि संयमी वाटत असावा. आदित्य राजकारणात प्रवेश करेल किंवा त्याला लोक स्वीकारतील की नाही, याबद्दल आताच बोलायची गरज नाही. पण बंदे मे दम है... यात वाद नाही.

Friday, October 16, 2009

दिन दिन दिवाळी...!दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा...!!!

काही वर्षांपूर्वी दिवाळीच्या कालावधीत "लोकसत्ता'मध्ये एक अग्रलेख आला होता. विषय अर्थातच, दिवाळीचा होता. प्रकाशाचा उत्सव, जल्लोषाचा आणि उत्साहाचा सण, फटाके, फराळ, दिवाळी अंक आणि दिवाळीच्या अनुषंगानं येणारे नेहमीचेच इतर मुद्दे त्यामध्ये होते. पण त्यातला एक मुद्दा नवीन होता आणि त्यामुळंच कायम लक्षात राहण्याजोगा होता. त्याचा काही अंश असा...

"आपलं रोजचं आयुष्य हातावरच्या किंवा भिंतीवरच्या घड्याळाभोवती फिरत असतं. पण आपल्या कुटुंबाचं आयुष्य हे एका वेगळ्याच घड्याळाभोवती फिरत असतं. त्या घड्याळाचं नाव आहे "दिवाळी! हो दिवाळी!! घराला रंग द्यायचा असो, गाडी घ्यायची असो, इंटिरियर चेंज करायचं असो किंवा टीव्ही, फ्रीज किंवा सोन्या-चांदीचे दागिने घ्यायचे असोत. या खरेदीसाठी दिवाळीपेक्षा सर्वोत्तम मुहूर्त नसतो. त्यामुळेच एखादी महत्वाची खरेदी असेल तर ""... दिवाळीला घेऊयात की...'' असे संवाद आपल्याला घरातून ऐकू येतात. अशा या दिवाळीच्या घड्याळाभोवती आपलं आयुष्य फिरत असतं. आपलं कुटुंब फिरत असतं....''

अश्‍शी ही दिवाळी. दिवाळी येण्यापूर्वी जवळपास महिनी दीड महिना तिची चाहूल लागते. घरातल्या भांड्याकुंड्यांची स्वच्छता होते. घराची पण साफसफाई होते. मग कोणाला कोणते कपडे घ्यायचे किंवा यंदा दिवाळीला काय घ्यायचं याच्यावर चर्चा सुरु होते. पगार आणि बोनस (अर्थातच, मंदीच्या जमान्यात मिळाला तर...) झाल्यावर कपड्यांच्या खरेदीची लगबग सुरु होते. आकाशकंदिल, पणत्या विकत घेतल्या जातात. दिवाळीला आठवडा राहिला असताना घराघरातून फराळाच्या पदार्थांचे सुगंध दरवळू लागतात. हल्ली धावपळीच्या जगातही किमान एखादा तरी पदार्थ घरी केला जातोच. मग ती चकली असेल, लाडू असेल, ओल्या नारळाची करंजी असेल किंवा शेव-चिवडा असेल. फराळाचं आटोपलं आणि दिवाळीला एक-दोन दिवस बाकी असताना. मोती साबण आणि प्रवीणच्या उटण्याची खरेदी होते. (मोती साबण ही दिवाळीची खरी ओळख. मोती साबणाच्या आंघोळीशिवाय दिवाळी असल्याचं वाटतंच नाही.) फटाक्‍यांची खरेदी पार पडते. अशा पद्धतीनं सर्व प्रकारची खरेदी करुन आपण जय्यत तयारीनिशी दिवाळीचं स्वागत करण्यासाठी सज्ज होतो.

पूर्वी दिवाळीच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या "दिवाळी बंपर'चं तिकिट बहुतांश घरांमध्ये खरेदी केलं जायचं. बाबाही ते कायम खरेदी करायचे. आम्हाला ते कधीच लागलं नाही, ही गोष्ट सोडून द्या. पण दिवाळीच्या वेळी लॉटरीचं तिकिट हे मोती साबणाइतकंच घट्ट रुजलेलं समीकरण होतं. आता कदाचित ते तितकसं राहिलेलं नाही. पण दिवाळीचा आनंद आणि उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. दिवाळीत घरासमोर पहिला फटाका कोण वाजवणार यासाठी लागणारी स्पर्धा. त्यासाठी सक्काळी सक्काळी लवकर उठून अभ्यंगस्नान करुन तयार होणं, फटाके वाजवून झाल्यावर सारसबागेत किंवा एखाद्या देवळात दर्शनाला जाणं, त्यानंतर घरी येऊन दाबून फराळ करणं आणि सरतेशेवटी गादीवर लोळत दिवाळी अंकातला एखादा लेख वाचून काढणं... हे सारं आहे तसं सुरु आहे.

दिवाळी निमित्तानं मित्र-मैत्रिणी किंवा नातेवाईक एकत्र येऊन कल्ला करणं किंवा जुन्या आठवणी काढून हास्यकल्लोळात बुडून जाणं, यामध्ये जराही खंड नाही. जगणं बदलतंय असं आपण म्हणतो. पण अजूनही लहानग्यांना दिवाळीच्या किल्ल्यांचं आकर्षण आहेच. ते किल्ले करतात. कदाचित तुमच्या-माझ्याकडून यामध्ये क्वचित प्रसंगी खंड पडला असेलही. तरी पण आपल्यासारख्या इतर अनेकांकडून ही परंपरा पार पाडली जात आहे, पुढे नेली जात आहे. हेच तर दिवाळीचं वैशिष्ट्य आहे.

दिवाळी आणि "पोस्त' हे तर कधीच एकमेकांपासून वेगळे केले जाऊ शकत नाही. मग तो इमारतीचा वॉचमन असो, परिसरात गस्त घालणारा गुरखा असो, घरात काम करणाऱ्या मावशी असोत, महापालिकेचे कर्मचारी असो किंवा संदेशवाहक पोस्टमन असो. प्रत्येकालाच "दिवाळी' हवी असते. मग आपणही त्यांना फारसा विरोध करत नाही. आपल्याला शक्‍य असेल तितकी "दिवाळी' त्यांना देऊनच टाकतो. घरातली कामवाली आणि पत्र घेऊन येणारा पोस्टमन यांना दिली जाणारी "पोस्त' ही काहीशी अधिक खुषीनं दिली जाते. इतरांना दिल्या जाणाऱ्या "दिवाळी'त आपुलकीचा ओलावा कदाचित नसेलही. पण "पोस्टमन'च्या कामातला प्रामाणिकपणा आणि त्याची चिकाटी लक्षात घेतली तर तो मागेल तितकी "पोस्ट' आपण त्याला देतोच. तिथं आपण कमीजास्तचा विचार करत नाही.

पूर्वी दिवाळीसारखा उत्सव वर्षातून एकदा यायचा. त्यावेळी भरभरुन खरेदी व्हायची. अनेकांकडे तर दिवाळी आणि वाढदिवस अशी दोनच वेळा खरेदी व्हायची. काही ठिकाणी अजूनही होत असेल. पण कितीही मंदी असली किंवा पगार कितीही कमी असले तरी प्रत्येक घरात दिवाळीचा तोच आनंद असतो, दिवाळी साजरी करण्यात तोच उत्साह असतो. स्वरुपातला फरक इथं गौण ठरतो. जागतिकीकरणामुळं आता अनेक कुटुंबांची आर्थिक घडी पूर्णपणे बदललीय. पूर्वीइतकी गरीबी त्यांच्याकडे नाही. अनेकांना गलेलठ्ठ पगार आहेत. त्यामुळं वर्षभरात कधीही काहीही खरेदी करण्याची क्षमता ते बाळगून असतात. पण अशाही परिस्थितीत दिवाळीचं महत्व पूर्वीइतकंच आहे. कारण फक्त पैसा आणि खरेदी म्हणजेच दिवाळी नाही. श्रीमंती आणि ऐश्‍वर्य म्हणजे दिवाळी नाही. घराबाहेर एखादा आकाशकंदील आणि दोन-चार पणत्या लावल्या तरी घराचं आणि दिवाळीचं वेगळेपण त्यातनं स्पष्टपणे जाणवतं.

सो बी हॅप्पी आणि हॅप्पी दिवाली... शुभ दीपावली...!!!

Thursday, October 08, 2009

या टोपीखाली दडलंय काय?आघाडीप्रमाणेच विजयाची संधी युतीलाही!

महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक ऐन रंगात आलीय. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला हॅटट्रिक करण्याची संधी मिळणार का, नाकर्ते हटून शिवसेना-भाजपचे सरकार सत्तेवर येणार, याची उत्सुकता शिगेला पोचलीय. राजकीय अभ्यासकांचीही, नागरिकांचीही आणि अर्थातच माझीही.

पण काही जणांना या निवडणुकीत काय होणार, हे माझ्याकडून जाणून घेण्याची उत्सुकता लागून राहिली आहे. लोकसभेच्या वेळी मी व्यक्त केलेले अंदाज काही प्रमाणात चुकले होते. त्यामुळे यंदा मी व्यक्त केलेले अंदाज खरे ठरतात की मी पुन्हा तोंडावर आपटतो, याचीच उत्सुकता काही जणांना लागून राहिलीय. माझ्या गेल्या दोन-तीन पोस्टच्या कॉमेंटसवरुन हे स्पष्ट होतंय. कोणीतरी नाव न लिहिता मला अंदाज व्यक्त करा, अंदाज व्यक्त करा, असा आग्रह करतंय. वास्तविक पाहता जे नाव न लिहिता आव्हान देतात, प्रतिक्रिया व्यक्त करतात, त्यांच्या मताला फारसं महत्व देऊ नये, असं माझं मत आहे. जे आहे ते रोखठोक असावं, तोंडावर असावं, अशी माझी इच्छा असते. पण माझ्या अंदाजांची कोण तरी वाट पाहतं आहे (मी चुकेन की नाही हे पाहण्यासाठी का होईना!) हे वाचूनच मला खूप भरुन आलंय. पण खरं सांगायचं झालं तर काहीच मत व्यक्त करणं अवघड आहे.

गेल्या वेळेसप्रमाणेच यंदाही आम्ही `मी महाराष्ट्र बोलतोय...` या कार्यक्रमासाठी उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दौ-यावर गेलो होतो. मुंबईतही थोडंसं फिरलो. कोकण, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही सामान्य लोकांशी, पत्रकारांशी, मित्रांशी बोलतोय. तिथली परिस्थिती जाणून घेतोय. पण काहीच अंदाज अजून लागत नाहीये. निवडणुकीपूर्वी म्हणजे दौ-यावर बाहेर पडेपर्यंत मला असं वाटत होतं की लोकांमध्ये सरकारविरोधी आणि शिवसेना-भाजप युतीच्या बाजूने लाट आहे. पण तसं काहीही नाहीये. लोकांमध्ये शिवसेना-भाजपबद्दल सहानुभूती आहे. पण त्यांच्या बाजूने लाट नाही. अनेक ठिकाणी स्थानिक मुद्द्यांमुळे लोक युतीच्या बाजूने आहेत. काही ठिकाणी युतीच्या उमेदवारांचाही प्रभाव आहे. पण लाट नाही.

मराठवाड्यात काही प्रमाणात युतीच्या (जास्त करुन शिवसेनेच्या) जागा वाढतील, असं वाटतंय. पण काही जागा त्यांना गमवाव्याही लागतील. (कदाचित बीड). पण अमुक एक जागा अमुक एका पक्षाला मिळेल, असं ठामपणे अवघड आहे. विदर्भातही काही प्रमाणात अशीच परिस्थिती आहे, असं म्हणावं लागेल. पण उत्तर महाराष्ट्रात युतीला मिळणा-या जागांची संख्या घटेल, असा अंदाज आहे. त्यामुळं युतीची लाट आहे, असं म्हणता येणार नाही. पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी-काँग्रेसचा बालेकिल्ला. पण त्यांचे बंडखोर आणि काही ठिकाणी अपक्ष उमेदवारांमुळे ठामपणे कोणाला किती जागा मिळणार, याचं भाकित करणं, खूप अवघड आहे.

अनेक ठिकाणी हिंडल्यानंतर युती आणि आघाडी या दोघांचंही जागावाटप काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं झाल्याचं जाणवलं. त्यामुळंच तिथं उमेदवारांबद्दल नाराजी आहे. कुठं बंडखोरीही झालीय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये हे प्रमाण अधिक असलं तरी शिवसेना आणि भाजपमध्ये मात्र, हे नाहीच असं नाही. चारही प्रमुख पक्षांना या गोष्टींचा फटका बसणार आहे. अपक्ष आणि बंडखोर यांच्यामुळं काहीच अंदाज व्यक्त करता येत नाही. तसंच रिपब्लिकन डावी लोकशाही आघाडीचे उमेदवार काँग्रेस-राष्ट्रवादीचे किती उमेदवार पाडणार, यावरही काही ठिकाणचे निकाल अवलंबून आहेत.

दुसरीकडे मुंबईतली मनसेची जादू गेल्यावेळेस इतकी चालेल की नाही, याचाही अंदाज अजून येत नाहीये. लोकांशी बोलल्यानंतर मनसेची जादू काही प्रमाणात कमी झाल्याचं जाणवतं आहे. पण नेमकं हे प्रमाण किती कमी झालं त्याबद्दलचं भाकित व्यक्त करता येत नाही. मनसेचा आकडा दहापर्यंत जाणार की पाचच्या आतच आटोपतं घ्यावं लागणार, याचा अंदाज लागत नाहीये. मुख्य म्हणजे मनसेचे किती उमेदवार येणार यापेक्षा ते युतीचे किती उमेदवार पाडणार याची उत्सुकता आहे. पण गेल्या निवडणुकीत युतीला फक्त १५ जागा होत्या आणि आघाडीला १९. यंदा मनसेनं कितीही प्रयत्न केले तरी युतीच्या १५-१६ जागा नक्की येतील असं चित्र आहे. त्यामुळं मनसेनं कितीही मतं खाल्ली किंवा सुपारीबाज पद्धत अवलंबली तरी युतीच्या जागा १५ च्या खाली जाणार नाही, हे नक्की.

तिकडे कोकणात युतीला गेल्यावेळी जितका फटका बसला होता तितका यंदा बसणार नाही. चिपळूण, रत्नागिरी, राजापूर किंवा अगदी महाडची जागाही यंदा युतीला मिळू शकते. म्हणजे कोकणातून युतीला फायदा होणार, असं दिसतंय. ठाण्यातही राजन राजे यांची यंदा हवा नाही. ठाण्यातल्या तीनही जागा युतीलाच मिळण्याची शक्यता अधिक आहे. कळवा-मुंब्राची जागा जितेंद्र आव्हाड यांच्याकडे जाईलही कदाचित. पण त्यातही कदाचित आहेच. ठाण्यातल्या एकूण चित्र गेल्यावेळेसपेक्षा वेगळं असण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी-काँग्रेसनं इथून स्वीप केला होता. पण यंदा इथंही युतीच्या जागा वाढताहेत. तिकडे वसई-विरार पट्ट्यात बहुजन विकास आघाडीचा बोलबाला आहे. तिथंही आघाडीची डाळ शिजणा नाहीये. त्यामुळं या पट्ट्यात युतीच्या जागा वाढतील पण आघाडीच्या कमी होतील. (बहुजन विकास आघाडी काँग्रेसचीच बटिक आहे. पण चिन्ह पंजा नाही. त्यामुळं संख्याबळात ते इतर म्हणूनच गणले जातील)

एकूणच सगळं चित्र अस्पष्ट आणि धूसर आहे. काही ठिकाणी जागांची अदलाबदली होईल. कुठं युतीच्या जागा वाढतील तर कुठं आघाडी युतीकडून काही जागा हिसकावून घेईल. पण नेमकं काय होईल, हे आताच सांगणं अवघड आहे. कदाचित १९९५ प्रमाणे ४५ अपक्ष (बंडखोर आणि इतर किरकोळ उमेदवार) निवडून आले तर कदाचित परिस्थिती वेगळी असू शकते. अपक्ष, बंडखोर आणि तिस-या आघाडीचे किंवा तिस-या पक्षाचे उमेदवार यांचा फटका काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीलाच सर्वाधिक बसणार आहे. शिवसेना-भाजप युतीला कमी फटका बसेल. त्यामुळं यंदा युतीला गेल्या दोन वेळेसपेक्षा सर्वाधिक संधी आहे. यंदा नाही तर पुढच्या दोन टर्म तर नक्की नाही, अशी परिस्थिती आहे.

पण युतीचं जागावाटप, राज-उद्धव यांचे वाद, गडकरी-मुंडे यांच्या वादामुळं झालेलं जागावाटप, परस्परांचं काम करताना सेना-भाजप युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी आणि मुख्य म्हणजे विनय नातू यांच्या तिकिटावरुन झालेलं रामायण अशा सर्व गोष्टी पाहता युतीला फटका बसला तर तो त्यांच्याच कृत्याचं फळ असेल. पुढं ताट वाढून ठेवलंय. पण ते खाण्याची शिवसेना-भाजप युतीची इच्छाच नसेल तर कोण काय करणार... युतीला संधी नक्की आहे. गेल्या दोनवेळेस पेक्षा नक्कीच अधिक आहे. पण युतीची लाट नाही. त्यामुळं त्यांना झगडून यश मिळवावं लागणारेय. उद्धव ठाकरेंनी एकट्यानं जिवाचं रान करुन उपयोग नाही. शिवसेनेला ७०-७५ पेक्षा अधिक जागा नक्की मिळतील. गडकरी-मुंडे-खडसे यांनीही भाजपच्या किमान ५० जागा तरी निवडून आणल्या पाहिजेत. तरच युतीची सत्ता येण्याची शक्यता आहे. पाहूयात खरंच हा बदल होतो का...

Tuesday, October 06, 2009

कोण आहेत मिलिंद नार्वेकर?शिवसेनेचे 'डेप्युटी' कार्यप्रमुख!!!

प्रत्येक निवडणूक जवळ आली की मिलिंद नार्वेकर या नावाची चर्चा होते. यावेळीही शिवसेनेचे औरंगाबादेतले बंडखोर माजी खासदार प्रदीप जैस्वाल यांच्या आरोपांमुळे नार्वेकर गाजले. पण हे नार्वेकर कोण आहेत? ते मातोश्रीपर्यंत पोहोचले कसे? असे प्रश्न आपल्याला पडत असतात. पण प्रत्येक वेळी त्याचं उत्तर मिळतंच असं नाही. मिळालं तरी ते सविस्तर असतं असंही नाही. पण माझा मित्र सचिन परब यानं मिलिंद नार्वेकरबद्दल खूप सविस्तर लिहिलंय आणि अगदी बारीकसारीक माहितीही त्यानं दिलीय. सचिन परब आणि मटा ऑनलाईनच्या परवानगीनं हा लेख माझ्या ब्लॉगच्या वाचकांसाठी खास!!!


रणजीत देसाईंनी श्रीमान योगी लिहायचं ठरवलं तेव्हा प्रख्यात विचारवंत नरहर कुरुंदकर यांनी त्यांना एक पत्र लिहिले. ते पत्रच श्रीमान योगीची प्रस्तावना म्हणूनही छापले आहे. त्यात कुरुंदकरांनी देसाईंना औरंगजेब प्रभावीपणे रंगवायला सांगितलाय. कारण जेवढा औरंगजेब मोठा दाखवाल, तेवढेच शिवाजी मोठे ठरणार आहेत. नारायण राणेंनी हे वाचलेलं नसणार हे निश्चित. पण त्यांच्यातल्या अंगभूत शहाणपणाने त्यांनी याचं मर्म ओळखलं असणार बहुतेक. म्हणून तर त्यांनी शिवसेना सोडताना आपली मोठी प्रतिमा उभी करण्यासाठी आपल्या कहाणीत एक नवा औरंगजेब रंगवला. त्याचं नाव मिलिंद नार्वेकर.

मिलिंदशी राणेंचं काही वैयक्तिक वैर नव्हतंच. तेव्हा उद्धवचा फोन आला तरी राणे घरी उठून उभे राहायचे. त्याकाळात अनेकदा आपल्या कल्पना उद्धवच्या गळी उतरवताना त्यांनी मिलिंदची मदतही घेतलीय. पण तरीही पक्ष सोडताना त्यांनी बाळासाहेब, उद्धव, सुभाष देसाई, मनोहर जोशी यांना थेट टार्गेट करण्याऐवजी केलं ते मिलिंदला. सर्वसामान्य शिवसैनिक आणि पदाधिकारीही मिलिंदला मातोश्री आणि आपल्यामधली धोंडच समजत होता. मिलिंदचा रूबाब, श्रीमंती आणि वेगाने झालेले प्रगती त्यांच्याही डोळ्यात भरत होती. त्यामुळे राणे यांनी आपलं सॉफ्ट टार्गेट ठरवलं. तो मीडियाच्याही ब्लॅक लिस्टमध्येच होता. त्यांनीही त्याला मस्त काळ्या रंगात रंगवला. या सगळ्यामुळे आज कुणाची इच्छा असो अगर नसो, महाराष्ट्राच्या ओळखीचा बनलाय.

मुळात मिलिंद साधा शिवसैनिक होता. मालाडच्या लिबर्टी गार्डन भागातला गटप्रमुख. ९२च्या महापालिका निवडणुकांआधी त्याच्या एरियातला वॉर्ड विभागला. म्हणून नव्या वॉर्डचं शाखाप्रमुखपद मिळेल या आशेने मातोश्रीवर पोहोचला. चुणचुणीत, हुशार, स्मार्ट, बोलण्यात पटाईत असा हा पंचविशीतला मुलगा उद्धव ठाकरेंच्या नजरेत भरला. ते स्वत:च तेव्हा सुभाष देसाईंचं बोट पकडून सेनेत सक्रिय होत होते. उद्धवनी त्याला विचारलं, फक्त शाखाप्रमुख बनायचंय की आणखी काही जबाबदारी उचलायची तयारी आहे. मिलिंद पटकन उत्तरला, तुम्ही सांगाल ते.

आधी मातोश्रीवर पडेल ते काम केलं आणि साधारण ९४ सालच्या उत्तरार्धात मिलिंद रितसर उद्धव ठाकरे यांचा पीए बनला. अपॉइण्टमेण्ट घेणं, डायरी ठेवणं, फोन घेणं, दौरे आखणं, व्यवस्था करणं अशी कामं तो करू लागला. पुढे स्मिता आणि राज ठाकरे मातोश्रीतील सत्ताकेंद्राच्या वर्तुळाबाहेर सरकली आणि उद्धवकडे सेनेची अनभिषिक्त सत्ता आली. उद्धव मोठे होत होते आणि मिलिंदही. कधीच कोणत्याही गोष्टीला नाही न म्हणणारा, सांगितलेली गोष्ट काहीही करून पूर्ण करून देणारा, गोड बोलणारा, प्रसंगी स्वत:कडे वाईटपणा घेणारा, लोकांना कटवण्यात चतुर असणारा हा पीए उद्धव यांच्या गळ्यातला ताईत बनला. उद्धव बाळासाहेबांसारखे चोवीस तास लोकांत रमणारे नेते नव्हते. घरात, कुटुंबात आणि आपल्या छंदांत रमणारा हा साधा मध्यमवर्गीय डोक्याचा माणूस. त्यामुळे त्यांच्या अपॉइण्टमेण्ट कार्यकर्त्यांनाच काय पण पदाधिकारी आणि पत्रकारांनाही महाग होत्या. त्यामुळ मिलिंदचं महत्त्व वाढत चाललं.

कार्यकारी अध्यक्षांशी अपॉइण्टमेण्ट नक्की कोण टाळतं, स्वत: धाकटेसाहेब की मिलिंद हे भल्याभल्यांना कळत नव्हतं. पण मिलिंदच्या मातोश्रीवरच्या वर्चस्वाची चर्चा सगळ्यांमध्येच होती. पण २००४ च्या निवडणुकांत सत्ता दोन बोटं उरल्यामुळे त्याची जाहीर वाच्यता कुठे होत नव्हती. त्याला तोंड फोडलं आमदार भास्कर जाधवांनी. त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. आणि बंडखोरी केली. याच कारण त्यांनी आपल्याला मातोश्रीवर मिलिंदने अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप केला. तेव्हा पहिल्यांदा मिलिंदचं नाव गाजलं. पण त्यादिवसांत राणे मिलिंदची बाजू घेऊन जाधवांच्या विरोधात प्रचार करत होते. पुढे सत्ता आली नाहीच उलट राणेंच्या बंडाने सगळंच बदललं.

राणेंनी मिलिंदकडून आर्थिक व्यवहार होत असल्याचे आरोप केले. राणेंनी मिलिंदविरोधात केलेली हवा इतकी जबरदस्त होती, की त्याच्यावरच्या आरोपांची शहानिशा करण्याची तसदीही कोणी घेतली नाही. पण यातून मिलिंदच मोठा होत होता. भल्याभल्यांना जेरीस आणणा - या राणेंचेही मिलिंदसमोर काही चालले नाही, असे चित्र राणेंच्याच प्रचारातून उभे राहिले. राणेंच्या पोटनिवडणुकीत कणकवलीला तिथल्या लोकांनी मिलिंदला पाहण्यासाठी गर्दी केली होती, यातच सगळं आलं. पुढे राज यांनीही मिलिंदला सोडलं नाही. त्यांनी सांगितलेल्या मातोश्रीवरच्या चांडाळचौकटीत दुसरे तीन कोण हे स्पष्ट नव्हतं, पण त्यातला एक मिलिंद असल्याचं सगळ्यांना माहीत होतं. वर एवढा गहजब झाल्यानंतरही उद्धवच्या दरबारी त्याचं स्थान बळकट होतं आणि आहे.

राज यांच्या बंडानंतर उद्धव बरेच अॅक्सेसेबल झाले. छोटे मेळावे घेत होते. राज्यभर फिरत होते. शिवसेना भवनावर नियमित बसू लागले. मातोश्रीवर पोहोचणं तुलनेनं सोपं झालं. उद्धवपर्यंत पोहोचण्यासाठी अनिल देसाई, विनायक राऊत असे पर्यायही उभे राहिले. पालिकेतल्या विजयानंतर सेनेविषयी वातारवणही बदललं. त्यात अपक्ष आणि गवळीच्या नगरसेवकांना सेनेपर्यंत आणण्यात मिलिंदने महत्त्वाची भूमिका पार पाडली. त्यामुळे मिलिंदला विधानपरिषदेवर पाठवायला हवं, अशी चर्चा त्याच्या हितशत्रूंनी केली. पण या सगळ्यात मिलिंदचं आधीचं प्रस्थ कमी झालं, पण मातोश्रीवरचं महत्त्व नाही. अजूनही त्याचा मातोश्रीवरचा वावर तसाच आहे. त्याचं उद्धवसोबत दौ-यावर जाणं तसंच आहे. उगाच काहीतरी कारणं सांगून स्टेजवर उद्धवच्या कानाशी लागणं थांबलेलं नाही.

Thursday, August 27, 2009

गणपती बाप्पा मोरया...

मराठी माणसाचा मानबिंदू...
`मी मराठी...` असा एक मेल नुकताच आलाय. त्यामध्ये पु. ल. देशपांडे यांनी केलेली मराठी माणसाची व्याख्या पाहिली. `छत्रपती शिवाजी महाराज की...` असं म्हटल्यानंतर `जय` असा प्रतिसाद ज्या माणसाकडून येत नाही, तो माणूस मराठी असूच शकत नाही, असं पुलं म्हणतात. त्यालाच जोडून मला आणखी म्हणावंसं वाटतं की, `गणपती बाप्पा...` अशी आरोळी ठोकल्यानंतर `मोरया...` असा प्रतिसाद जो माणूस देत नाही. त्याला मराठी म्हणणं अजिबात पटत नाही. अर्थात, हीच गोष्ट लोकमान्य टिळकांसारख्या द्रष्ट्या माणसानं केव्हाच हेरली आणि शिवजयंती तसंच गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. हे दोनच उत्सव निवडण्यामागचं त्यांचं द्रष्टेपण आणि मराठी माणसाच्या माणसाच्या मनाची पारख नक्कीच वाखाणण्यासारखी आहे.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं गुवाहाटीला गेलो होतो. तिकडं अनेक खेळांचे सामने कव्हर करत होतो. तिथं महाराष्ट्राचे खेळाडू गणरायाचा जल्लोष करुनच मैदानात उतरायची. कबड्डी, खो-खो आणि रग्बी या सांघिक खेळांच्या सामन्यांना तर गणपती बाप्पाच्या जयघोषाची सवयच होऊन गेली होती. सामन्याच्या सुरवातीला आणि सामना जिंकल्यानंतर गणपती बाप्पा मोरया... हा आवाज चौफेर दुमदुमायचाच. (कबड्डी आणि रग्बीचं सुवर्णपदक महाराष्ट्रानं पटकावलं होतं. त्यामुळं हा आवाज महाराष्ट्राच्या प्रत्येक सामन्यावेळी घुमायचा.)

आणखी एक आठवणीत राहणारं उदाहरण म्हणजे सारेगम लिटल चॅम्प्सचं. महाराष्ट्रात लोकप्रियतेची परिसीमा गाठलेल्या लिटल चॅम्प्सचा तो भाग आठवा. महाअंतिम फेरीत कोणते तीन स्पर्धक जाणार ते निश्चित करणारा. त्यावेळी तीनऐवजी पाचही स्पर्धकांना सहभागी करुन घेण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला होता. त्यावेळीही या निर्णयानंतर लिटल चॅम्प्सच्या स्टेजवर एकच नारा घुमला होता गणपती बाप्पा मोरया... सांगायचा उद्देश्य म्हणजे गणपती बाप्पा हा आपल्या नसानसांत भिनला आहे. अहो साधं ट्रीपसाठी निघतानाही नारळ फोडल्यानंतर आपण गणपती बाप्पा मोरया म्हणायला विसरत नाही. आणखी काय हवं.

पुण्यातच लहानाच मोठा झालो. अगदी लहानपणी छोटंसं मंडळ चालवणं असो, दर दिवशी गणपती पहायला जाणं असो किंवा मानाच्या पहिल्या गणपतीपासून ते दगडूशेठ लक्ष्मी रस्त्यावर येईपर्यंत मिरवणुकीत सहभागी होणं असो गणपती हा कायमच माझा मोस्ट फेव्हरिट राहिलाय. बाकी इतर कोणत्या देवाबद्दल मला इतकी आपुलकी नाही. पण गणपती इज समथिंग डिफरंट. आणि असा हा अगदी जवळचा वाटावा, असा देव जर आपल्या घरी येणार असेल (पाहुणा हा शब्द मुद्दाम वापरत नाही.) मग विचारण्याची सोय नाही.

गणपती घरात येणार ही कल्पनाच अवर्णनीय असते. मग त्याच्या स्वागतासाठी घराची साफसफाई होते. सजावट करण्यात येते. गणरायाच्या स्वागतासाठी उकडीच्या मोदकासारखा भन्नाट पदार्थ करण्यात येतो. घरामधलं वातावरण मंगलमय असतं. गणपती हा जरी निर्जीव असला तरी त्याच्या अस्तित्त्वामुळं घरात खरंच कोणीतरी रहायला आलंय, असं वाटतं. त्यामुळंच `गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला...` हे वाक्य समाजमनामध्ये घट्ट रुजलंय. गणपती विसर्जन झाल्यानंतर खरंच काही दिवस आपल्याला चैन पडत नाही. आपल्याच घरातही चुकल्या चुकल्यासारखं वाटतं.

शिवाय गणपती म्हटलं की, लालबागचा राजा, मुंबईतला सिद्धीविनायक किंवा श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्यापुढं रांगा लावून उभं राहण्याची गरज आहेच असं नाही. घरातला पूजेमधला गणपतीही तितकाच लोभसवाणा किंवा श्रद्धेला पावणारा असतो, यावर माझा विश्वास आहे. त्याला दागदागिन्यांची आणि जडजवाहिरांची गरज आहेच, असंही नाही. परवाच गणेश चतुर्थीला दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती पाहिली. अंगावर एकही दागिना नव्हता. पण मूर्तीचे डोळे आणि तिचा लुक पाहिल्यानंतर नेहमीपेक्षा अधिक समाधान मिळालं. असंच समाधान पेणच्या कोणत्याही सर्वांग सुंदर मूर्तीकडे पाहिल्यानंतर मिळतं. भाऊ रंगारी, मंडई, जिलब्या मारुती, राजाराम मित्र मंडळ, हत्ती गणपती, गुरुजी तालिम मंडळ, ओंकारेश्वर मित्र मंडळ, लोखंडे तालीम मंडळ आणि इतर अनेक मंडळाच्या नुसत्या मूर्ती एकाग्र चित्तानं पाहिल्या तर मन वेडं होतं.

असा हा गणेशोत्सव मग तो घरातला असो किंवा सार्वजनिक असो सगळीकडे कसं चैतन्यमय वातावरण असतं. माझ्याप्रमाणेच आपणही कधी ना कधी त्या वातावरणाचा भाग असतो गणपती पहायला जायच्या निमित्तानं असो, घरामध्ये गणेशोत्सव साजरा करण्याच्या निमित्तानं असो किंवा सार्वजनिक मंडळाचा कार्यकर्ता म्हणून राबण्यात असो. थोडक्यात काय तर गणपती किंवा गणेशोत्सव हे नेहमीच आपल्या म्हणजेच मराठी माणसाच्या जीवनाचे अविभाज्य भाग आहेत, हे मात्र नक्की...!

Wednesday, August 19, 2009

"साम मराठी'ची वर्षपूर्ती...

कार्यकर्त्यांमुळे साकारतेय "साम राज्य'...

ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि भारत... क्रिकेटमध्ये सध्याच्या युगातली ही दादा मंडळी. पण न्यूझीलंडचा संघ या दादा मंडळींमध्ये कधीच मोडला जात नाही. तरीही कायम तो संघ विजेतेपदाच्या स्पर्धेत असतो. चॅंपियन्स करंडक स्पर्धा जिंकण्याची कामगिरीही त्यांनी एकदा करुन दाखवलीय. त्यांच्याकडे सचिन तेंडुलकरसारखा "स्टार प्लेअर' नाही, वॉर्न-मुरलीप्रमाणे फिरकी गोलंदाज नाही, पॉटिंग-कॅलिस सारखे फलंदाज नाही. पण न्यूझीलंडच्या संघाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे अष्टपैलू खेळाडू, त्यांचं क्षेत्ररक्षण, खेळातलं सातत्य आणि संघासाठी प्रत्येकाचं काही ना काही योगदान. हा संघ ऑस्ट्रेलियासारखा जगज्जेता नसेल पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करुनही चालत नाही. असंच काहीसं "साम मराठी' वाहिनीचं आहे. विशेषतः बातम्यांचं!

पण गेल्या वर्षी जेव्हा वाहिनीची सुरवात झाली तेव्हा परिस्थिती अशी नव्हती. "साम जन्मला गं सखी साम जन्मला...' अशा प्रतिक्रियांनी गेल्या वर्षी 15 ऑगस्टच्या आसपास "साम मराठी' या वाहिनीचं स्वागत झालं होतं. अर्थातच, माध्यमातल्या बऱ्याच जणांनी स्वागत करताना नाकं मुरडली होती किंवा त्यांची या बाळाबद्दल फारशी चांगली प्रतिक्रिया नव्हती. "सकाळ'सारख्या ग्रुपकडनं त्यांच्या ज्या अपेक्षा होत्या, त्या पूर्ण झाल्या नव्हत्या. ही गोष्ट बरेच जणांनी बोलून दाखविली होती. कारणही तसंच होतं. काहीच महिन्यांपूर्वी म्हणजेच गुढीपाडव्याला "आयबीएन लोकमत' या वृत्तवाहिनीचं आगमन झालं होतं. त्यामुळं सकाळची "साम' आणि "आयबीएन लोकमत' यांच्यात तुलना होणं साहजिकच होतं. अशा परिस्थितीत "साम'वरचे कार्यक्रम आणि इतर घडामोडी यामुळं ""...उचललेस तू मीठ मूठभर, "साम्राज्या'चा खचला पाया...'' असं म्हणण्यापर्यंत लोकांची मजल गेली होती. अर्थातच, सुरवातीच्या काही महिन्यातच!

आमच्याकडे राजदीप सरदेसाई किंवा निखील वागळे यांच्यासारखा चेहरा सेल, "आयबीएन', "स्टार' किंवा "झी'सारखं नेटवर्क नसेल, "टाइम्स नाऊ' किंवा "नेटवर्क 18' इतक्‍या "ओबी व्हॅन' नसतील. पण तरीही आमची बातमी चुकत नाही. बातमीचा क्रम चुकलाय असं कधी झालं नाही. सोयी-सुविधांची फारशी रेलचेल नसतानाही आम्हाला कशाचीच उणीव भासली नाही. ना राज ठाकरे यांच्या मराठीच्या आंदोलनावेळी, ना 26 डिसेंबरच्या हल्ल्यावेळी, ना लोकसभा निवडणुकीच्या संपूर्ण टप्प्यात. काठोड्याचं बलात्कार प्रकरण असो किंवा हासेगावच्या एड्‌सग्रस्त विद्यार्थ्यांची ससेहोलपट साम मराठीनं प्रथम प्रकरणाला वाचा फोडली आणि नंतरही वेगवेगळ्या स्तरावर हे मुद्दे लावून धरले. निरनिराळ्या वृत्तमालिका झाल्या. "सकाळ'च्या संस्कृतीपेक्षा थोडीशी हटके भूमिका घेत "साम'नं कायम आक्रमकपणे बातम्या दिल्या. मग पद्मसिंह पाटील यांच्या अटकेची बातमीही "राष्ट्रवादी'वर आसूड ओढणारी होती. "राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दहाव्या वर्धापनदिनी पद्मसिंह पाटलांच्या हकालपट्टीची पक्षावर नामुष्की...' अशा मथळ्याची बातमी "सकाळ'मध्ये आली असती का? पण हीच हेडलाईन आणि बातमीचा हाच टोन "साम'वर होता. त्यामुळं आम्हीही आता आमचा टक्का निश्‍चित केला असून तो वाढवत नेण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत.

कोणी काहीही म्हणत असलं तरी आता "साम मराठी' बऱ्यापैकी स्थिरावलीय. राज ठाकरे यांचं मराठीच्या मुद्‌द्‌यावरचं आंदोलन असो, "एन्ट्री पोल', "मी महाराष्ट्र बोलतोय...' किंवा "लोकसभा ट्‌वेंटी-20' सारखे निवडणूक विषयक कार्यक्रम असो, "साम'च्या वृत्तविभागानं बऱ्यापैकी मायलेज मिळवलं आहे. अगदी सुरवातीच्या काळात तर राजू परुळेकर यांनी घेतलेल्या "महाराष्ट्र कोणाचा' या कार्यक्रमामुळं "साम'ची बऱ्यापैकी प्रसिद्धी झाली होती. तसंच टोकदार, आक्रमक पण इतर वृत्तवाहिन्यांप्रमाणे उथळपणा न करता बातम्या देण्याचं काम "साम मराठी'चा वृत्तविभाग करतोय. त्यालाही हळूहळू प्रतिसाद मिळतोय. ""तुमच्या बातम्या वेगळ्या असतात. इतरांकडे त्याच त्याच बातम्या दाखवितात. तुमच्याकडे मात्र, तोच तोच पणा येत नाही,'' अशा प्रतिक्रिया प्रेरणादायीच म्हटल्या पाहिजेत. बाकी "टाटा स्काय' किंवा "डिश'वर साम दिसत नाही. ही खंत आहेच. पण हे जेव्हा घडेल तेव्हा "साम'ची घोडदौड खऱ्या अर्थानं सुरु होईल.

"झी 24 तास', "स्टार माझा' आणि "आयबीएन लोकमत' यांच्याकडचं मनुष्यबळ, वार्ताहरांची संख्या, उपलब्ध तंत्रज्ञान, सुविधा आणि हिंदी किंवा इंग्रजी वाहिन्यांकडून मिळणारा "सपोर्ट' या सर्वच गोष्टी लक्षणीय आहेत. म्हणजेच या गोष्टींमध्ये "साम'ची तुलना इतर मराठी वाहिन्यांशी करता येत नाही. पण तरीही "साम'च्या बातम्यांचा स्वतंत्र प्रेक्षक वर्ग तयार झाला आहे. ही गोष्ट वारंवार स्पष्ट झालीय. "आयबीएन' वाहिनी दोन्ही "डीटीएच'वर जाण्यापूर्वी "आयबीएन' वाहिनीपेक्षा "साम'चा "जीआरपी' (ग्रॅंड रेटिंग पॉईंट) प्रत्येक आठवड्याला अधिक असायचा. इतकंच काय तर लोकसभा निवडणुकीच्या दिवशी "एनडीटीव्ही' आणि "साम' वाहिनीच्या प्रेक्षकांची टक्केवारी जवळपास सारखीच होती. "एन्ट्री पोल'च्या प्रश्‍नमंजुषेच्या उत्तरासाठी रोज जवळपास हजारहून अधिक "एसएमएस' यायचे. थोडक्‍यातच सांगायचं झालं तर "साम'ची लढाई अस्तित्वासाठी सुरु नसून अधिकाधिक वरच्या क्रमांकावर जाण्यासाठी सुरु आहे. "मी मराठी'च्या बातम्यांशी तुलना करण्याची माझी इच्छा नाही. पण अनेकदा आमच्या बातम्या, आमचा लुक "झी 24 तास'पेक्षाही चांगला असतो. असो.
वैयक्तिकदृष्ट्या विचार करायचा झाला तर "इनपुट हेड' किंवा "प्रोड्युसर' म्हणून काम करताना खूप मजा आली. कामातला आनंद इतका होता की त्याचा कधी कंटाळा आलाच नाही. स्वतंत्र विचार करण्याची आणि त्याची अंमलबजावणी करण्याचं स्वातंत्र्य इथं आहे. त्यामुळं काम करताना मिळणारा आनंद खरोखरच अवर्णनीय आहे. इतरांना हेवा वाटावा, असा मराठी वृत्तवाहिन्यांमधला क्रमांक एकचा "डेस्क' आज "साम मराठी'कडे आहे. अनुभवी आणि धडपड्या रिपोटर्सची "टीम' आमच्याकडे आहे. "बॉसिंग' न करणारे "साहेब' आमच्याकडे आहेत. नवं काहीतरी शिकण्याची जिद्द असणारे "कार्यकर्ते' आमच्याकडे आहेत. त्यामुळंच "डेस्क'चं काम सांभाळून रिपोर्टिंग करणारे, गरज पडली तर पॅनेल प्रोड्युसिंग करणारे "कॉपी एडिटर' किंवा "बीपी' साममध्ये आहेत. एखाद्या "एपिसोड'साठी दोन-दोन दिवस ऑफिसमध्ये तळ ठोकून बसणारी मंडळी आहेत. या सर्वांच्या जोरावर हा "साम'चा गाडा ओढला जातोय. रिपोर्टिंग, कॉपी एडिटिंग, स्पेशल प्रोग्रॅमचं प्लॅनिंग, व्हिडिओ एडिटिंग किंवा "व्हीओ' असं काहीही असलं तरी "कार्यकर्ते' सदैव तयार असतात.

शिवरायांचं स्वराज्य जसं मावळ्यांच्या जोरावर घडलं तसंच हे "साम राज्य' कार्यकर्त्यांच्या जोरावर घडतं आहे. अडचणी आहेत. संकटं येणार आहेत, हे देखील माहिती आहे. पण त्याचबरोबर एक सुंदर "एसएमएस'ही आम्हाला माहिती आहे. तो "एसएमएस' असा...
As we sail through life, don't avoid storms and rough waters. Just let it pass. Sail On and Sail On. Just because calm seas never make skillful sailors...

Monday, August 10, 2009

मेरिकोम, सुशीलकुमार आणि विजेंदर


भारताची खरी खेलरत्न...

खेळाडूंसाठी प्रतिष्ठेचा असलेला राजीव गांधी खेलरत्न पुररस्कार आणि अर्जुन पुरस्कारांची घोषणा नुकतीच झाली. सर्वात महत्वाची आणि नेहमीपेक्षा वेगळी गोष्ट म्हणजे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार तीन जणांना विभागून (त्रिभागून) दिला गेला. ऑलिंपिकमध्ये भारतासाठी कांस्यपदक मिळवून देणारा मल्ल सुशीलकुमार व मुष्टीयोद्धा विजेंदर सिंग तसंच सलग चारवेळा महिलांच्या मुष्टीयुद्ध स्पर्धेचं विश्वविजेतेपद पटकाविणारी मेरिकोम अशा तिघांना हा पुरस्कार विभागून देण्यात आला. मुख्य म्हणजे क्रिकेटपटूंची मक्तेदारी यावेळी देशी तसंच इतर खेळांनी मोडून काढली. ट्वेंटी-२० विश्वकरंडक स्पर्धेत नामुष्की पत्करावी लागलेल्या भारतीय संघातल्या फक्त गौतम गंभीरचीच अर्जुन पुरस्कारासाठी निवड झाली.

क्रिकेटचा दुस्वास करण्याचे काहीच कारण नाही. पण नेहमी इतर खेळांवर आणि खेळाडूंवर होणारा अन्याय यावेळी दूर झाला. भारतात क्रिकेट हा खेळ म्हणजे धर्म मानणारे लोक आहेत. क्रिकेटवेड्यांची संख्या काही कमी नाही. पण त्यामुळे इतर खेळांवर आणि खेळाडूंवर होणारा अन्याय प्रचंड आहे. प्रायोजक, जाहिराती मिळण्यापासून ते प्रसिद्धीमाध्यमांमध्ये बातम्या येण्यापर्यंत. सर्वच स्तरावर अन्याय, अन्याय आणि अन्याय. पण यावेळी परिस्थिती बदलली. मुख्य म्हणजे तीनही खेळाडूंची कामगिरी नजरेत भरणारीच होती. त्यामुळं त्यांना डावलून इतर खेळाडूंना (किंवा क्रिकेटपटूंना) पुरस्कार देण्याची हिंमत क्रीडा खात्याची झाली नसणार.

इराण किंवा रशियाचे मल्ल तसंच क्युबाच्या मुष्टीयोद्ध्यांचं आव्हान परतवून लावत कांस्यपदकापर्यंत मजल मारणं ही काही खाण्याची गोष्ट नाही. ऑलिंपिक स्पर्धेत तर नाहीच नाही. त्यातून भारतात या खेळांसाठी मिळणाऱ्या सुविधा, प्रशिक्षण, प्रायोजक आणि प्रसिद्धी या सर्वांपासून ही मंडळी दूर असतात. दिवसाचा रोजचा खुराक मिळाला तरी पुरे, असं म्हणण्याची परिस्थिती असते. त्यामुळे या सर्व गोष्टींवर मात करुन ऑलिंपिकच्या कांस्यपदकापर्यंत मजल मारणं हे आव्हान महाकठीण. त्यामुळेच आपले खेळाडू चमकले ही आनंदाची गोष्ट आहे. मुख्य म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना या खेळाडूंची नावेही माहिती नव्हती. किंवा आता कोणी कांस्यपदक जिंकले असं विचारलं तर त्यांची नावे आठवणारही नाहीत. पण क्रीडाप्रेमींसाठी हे खेळाडू दैवतांच्या रांगेत विराजमान झाले आहेत.


प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा, अशी आणखी एक मुष्टीयोद्धा म्हणजे मेरिकोम. एम. सी. मेरिकोम. महिलांच्या मुष्टीयुद्ध प्रकारात गेल्या अनेक वर्षांपास्नं ही वर्चस्व गाजवते आहे. सलग चारवेळा तिनं विश्वविजेतेपद पटकाविलं आहे. विश्वविजेतेपद म्हणजे क्रिकेटपटूंनी सलग चार वेळा विश्वकरंडक जिंकण्यासारखेच आहे. पण तिच्या कामगिरीचं कौतुक कोणाला आहे. मेरिकोमचं वैशिष्ट्य असं की, तिनं मिळविलेलं चौथं विजेतेपद हे तिच्या डिलिव्हरीनंतर मिळविलेलं आहे. तिला जुळ्या मुली झाल्या आणि त्यानंतर दोन आठवड्यांमध्येच तिनं पुन्हा सरावाला सुरवात केली. बॉक्सिंगला वाहून घेणं म्हणजे काय हे मेरिकोमकडून शिकलं पाहिजे. त्यामुळं तिचा सन्मान व्हायलाच हवा होता. थोडा उशीरच झाला, असं म्हटलं तरी चालेल. पण 'देर आये दुरुस्त आये...' हे 'आये ही नही...' या गोष्टीपेक्षा कधीही चांगलं.

भारतीय क्रीडा जगतामध्ये आणखी एक नाव चांगलंच गाजतंय. ते नाव म्हणजे साईना नेहवाल. गेल्या वर्षी मलेशियन ओपन आणि या वर्षी इंडोनेशियन ओपन बॅडमिंटन स्पर्धा जिंकून साईनानं सगळ्यांनाच वेड लावलंय. गेल्या वर्षी झालेल्या राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेचं सुवर्णपदक जिंकून तिनं सगळ्यांच्याच आशा उंचावल्या आहेत. पुढील वर्षी होणारी राष्ट्रकुल स्पर्धा, यंदाची विश्वकरंडक बॅडमिंटन स्पर्धा आणि आशियाई तसंच ऑलिंपिक स्पर्धा या सर्वांमध्येच तिच्याकडून दर्जेदार कामगिरीची अपेक्षा आहे. जागतिक क्रमवारीत तिनं सहाव्या स्थानावर झेप घेतलीय. साईनाच्या वडिलांनी भविष्य निर्वाह निधीवर (प्रॉव्हिडंट फंड) कर्ज काढून साईनाचं प्रशिक्षण केलंय. तिला प्रोत्साहन दिलंय. त्यामुळंच यंदाच्या वर्षी मिळालेला अर्जुन पुरस्कार तिच्यासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. साईनाची एकूण वाटचाल पाहता भविष्यात ती बॅडमिंटनच्या क्षितीजावर चमकणार, अशी सध्या तरी आशा आहे.

महाराष्ट्रासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे पंकज शिरसाट या मराठमोळ्या कबड्डीपटूला यंदा अर्जुन पुरस्कारानं गौरविण्यात आलंय. जवळपास पंधरा-वीस वर्षांनंतर मराठमोळ्या खेळाडूला हा पुरस्कार मिळालाय, कबड्डी या खेळासाठी. यापूर्वी सांगलीच्या राजू भावसार या कबड्डीपटूला पुरस्कारानं गौरविण्यात आलं होतं. त्यानंतर कोणत्याही मराठी कबड्डीपटूला हा पुरस्कार मिळाला नाही. आता पंकजनं तो पटकावलाय.
क्रिकेटच्या झंझावातामध्ये इतर खेळ पार कोलमडून जातात. खो-खो आणि कबड्डीसारखे देशी खेळ तर पार मरणासन्न अवस्थेत आहेत. आट्यापाट्या सारखा खेळ तर कधीच इतिहासजमा झालाय. भविष्यात कबड्डी आणि खो-खो यांचीही तीच परिस्थिती झाली तर नवल वाटू नये, अशीच परिस्थिती आहे. टेनिसमध्ये पेस-भूपती आणि सानिया मिर्झा, बिलियर्डस-स्नूकरमध्ये गीत सेठी आणि पंकज अडवाणी, बुद्धिबळात 'द ग्रेट' विश्वनाथन आनंद, दोन वेळा कॅरमचा विश्वविजेता आणि नऊ वेळा राष्ट्रीय विजेतेपद पटकाविणारा ए. मारिया ईरुदयम, टेबल टेनिसमध्ये भारताचं नाव रोशन करणारा आणि आठ वेळा राष्ट्रीय विजेतेपद मिळविणारा कमलेश मेहता, ऑल इंग्लड बॅडमिंटन जिंकून देणारा गोपीचंद आणि आधुनिक युगातला ध्यानचंद अशी पदवी मिळविणारा धनराज पिल्ले... अशी एक ना अनेक नावं इथं घेता येतील. ज्यांची कामगिरी खरं तर दखलपात्र होती पण माध्यमांनी त्यांच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. किंवा माध्यमांनी जरी लक्ष दिलं तरी भारतीयांनी त्यांना तितकसं प्रेम दिलं नाही.

पण उशिरा का होईना या साऱ्यांना सरकार दरबारी स्थान मिळतंय. कदाचित उशिरा का होईना पण भविष्यात सामान्य नागरिकही या खेळाडूंना आपलंसं करतील. फक्त स्पर्धा जिंकल्यानंतरच नाही तर नेहमीच. खेळाडूंच्या पडत्या काळातही आणि उभरत्या काळातही. तरच भारतात खऱ्या अर्थानं क्रीडा संस्कृती रुजली, असं म्हणता येईल.

Tuesday, July 21, 2009

विधानसभेलाही "मनसे' मतं खाणार?

"मनसे'ला भवितव्य आहे का?"

दो ही मारा लेकिन कैसा मारा...' महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीनंतर जाहीरपणे केलेलं एक वक्तव्य! लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या उमेदवारांना मिळालेलं यश पाहिल्यानंतर "मनसे'चे समर्थक आणि कार्यकर्ते अक्षरशः हुरळून गेले होते. वास्तविक पाहता "मनसे'चा जन्मच शिवसेनेला संपविण्यासाठी किंवा त्यांची ताकद कमी करण्यासाठी झालाय. त्यामुळे "मनसे'चा एकही खासदार नवी दिल्लीत पोचला नसला तरीही त्यांच्यामुळं भारतीय जनता पक्ष-शिवसेनेच्या सहा ते आठ जागा पडल्या, हे वास्तव कोणीही नाकारणार नाही. राज यांचा सुप्त हेतू लोकसभा निवडणुकीत साध्य झाला आणि त्यामुळंच त्यांनी कुत्सितपणे हे वक्तव्य केलं. काही जणांना वाटलं की, आता सारं संपलं. शिवसेनेच्या पडझडीला पुन्हा सुरवात होणार. उद्धव यांना राजकीय संन्यास घ्यायला लागून फक्त फोटोग्राफीच करावी लागेल, इथपर्यंत मत व्यक्त केली जात होती.

पण पण आणि पण "मनसे' स्थापन झाली तेव्हापासून ते आतापर्यंत (लोकसभा निवडणुकीनंतरही) माझं ठाम मत आहे की, शिवसेना संपणार नाही. राज ठाकरे यांची तसंच त्यांच्या पक्षाची कार्यपद्धती पाहता "मनसे'ला लोकसभेत यश मिळालं. कदाचित पुढच्या दोन-तीन निवडणुकांमध्येही असंच घडेल. पण हीच अंतिम स्थिती नक्कीच असणार नाही. शिवसेनेला मरण नाही आणि "मनसे'ला भवितव्य नाही. "मनसे' हा झंझावात नाही. ती वावटळ आहे. त्यामुळं ती फार काळ टिकणार नाही. त्यामुळं फारशी पडझड होणार नाही आणि शिवसेनेवर फारसा परिणामही होणार नाही. लोकसभा निवडणुकीनंतर माझं हेच मत होतं. काहींनी मला वेड्यात काढलं. पण मी ठाम होतो आणि आहे.

उद्धव व राज यांच्या कार्यपद्धतीवर नजर टाकली तर आपल्याला काही गोष्टी स्पष्टपणे जाणवतील. शिवसेनेच्या पडत्या काळातही उद्धव हे खचून गेले नाहीत. उलट त्यावेळी त्यांची खंबीर वृत्ती दिसून आली. मग ते नारायण राणे किंवा राज ठाकरे यांचा पक्षाला "जय महाराष्ट्र' करणं असो किंवा लोकसभा निवडणुकीत आलेलं अपयश असो. लोकसभेनंतर उद्धव यांची चिडचिड झाली होती. वादच नाही. पण त्यानंतर खचून न जाता रिलायन्स एनर्जी विरोधातील आंदोलन असो किंवा "म्हाडा'ची घरं मराठी माणसांना मिळणं असो शिवसेना सतत आंदोलनं करीतच राहिली. उलट पक्षी रमेश किणी याचा नामोल्लेख झाल्यानंतर राज ठाकरे यांची बोलतीच बंद झाली. लोकसभा निवडणुकीमध्ये "मनसे'ला मिळालेलं यश हे उद्धव यांच्या "त्या' उत्तरानंतर फिकं पडलं. मराठीच्या तापल्या तव्यावर पोळी भाजून तर झाली. पण प्रत्येक निवडणुकीपूर्वी हा तवा तापवायचा आणि पोळी भाजून घ्यायची ही काही खायची गोष्ट नाही. लोकोपयोगाची कामं केल्याशिवाय मतांचे सातत्य रहात नाही, हे मी सांगण्याची गरज नाही. हाच मुद्दा "मनसे'च्या भवितव्याचा विचार करताना महत्वाचा ठरतो.

शिवसेनेनेही सुरवातीच्या काळात राडाबाजी केली. दक्षिण भारतीय, उत्तर भारतीय किंवा परप्रांतियांविरुद्ध आंदोलन उभारले. मराठी माणसांचा मुद्दा लावून धरला. मुस्लिम, बांग्लादेशी आणि पाकिस्तीनी घुसखोरांच्या निमित्तानं भगवा विचार मांडला. हिंदुत्व आणि मराठी हे दोन्ही मुद्दे त्यांनी अगदी प्रखरपणे मांडले. कशाचीच हयगय केली नाही. तोडफोड, राडा, पेटवापेटवी आणि बरंच काही. पण हे करताना शिवसेनेनं रचनात्मक कार्यही केलं. स्थानिक लोकाधिकार समितीच्या माध्यमातनं मुंबईतल्या बॅंका, हॉटेल्स, विमानतळ आणि केंद्र सरकारच्या आस्थापनांमध्ये स्थानिक मराठी माणसाला स्थान मिळवून दिलं. नोकऱ्या लावल्या. शिवसैनिकांच्या आधारावर लोकहिताची कामं केली. जिथं जिथं मराठी माणसावर अन्याय झाला तिथं तिथं सेनेनं आवाज उठविला. मुंबईनंतर ग्रामीण भागातही हळूहळू पाय पसरले. तिथं शिवसेनेनं अगदी चलाखपणे हिंदुत्वाच्या मुद्‌द्‌याचा वापर केला. मराठवाड्यात जिथं निजामाचं राज्य होतं तिंथं "खान हवा की बाण हवा' अशा वृत्तीतून प्रचार करुन सेनेनं घट्ट पाय रोवले. त्यामुळंच आज इतके हादरे बसूनही सेनेचा गड शाबूत आहे आणि उद्याही राहिल.

राहता राहिला मुद्दा "मनसे'चा तर "मनसे' हा कोणताही विचार किंवा कोणतेही ध्येय-धोरण नसलेला पक्ष आहे. मुळात पक्ष स्थापन झाला तोच उद्धव यांच्या विरोधाची भूमिका घेऊन. त्यामुळेच शिवसेनेला (आणि उद्धव यांनाही) संपविण्याचा विडा उचलून "मनसे'ची वाटचाल सुरु आहे. पण महापालिका निवडणुकांमध्ये "मनसे' सपशेल आपटला. पण त्यानंतर राज्य सरकारच्या मदतीमुळं राज ठाकरे यांचा चांगलाच बोलबाला झाला. स्पष्टच बोलायचं झालं तर "मनसे' वाढविण्यासाठीच राज ठाकरे यांची प्रतिमा आहे त्यापेक्षा मोठी करण्याचा प्रयत्न राज्य सरकारनं केला. त्याचा फायदा राज यांना लोकसभा निवडणुकीत झाला. पण विधानसभेला असं होईलच असं नाही. कारण कोणताही मुद्दा न देता, कोणताही कार्यक्रम हाती न घेता आणि कोणत्याही प्रकारची वैचारिक बांधिलकी नसलेला पक्ष टिकूच शकत नाही. भैय्या टॅक्‍सीवाल्यांना फोडून काढणं, पाणीपुरीवाल्यांना पळवून लावणं, भैय्या मंडळींना मारहाण करणं आणि अमराठी पाट्या फोडणं म्हणजेच मराठीचा कळवळा हा गैरसमज आहे आणि ते येत्या काही निवडणुकांमध्ये (कदाचित विधानसभेलाच) स्पष्ट होईलच.

आणखी एक आणि महत्वाची गोष्ट म्हणजे राज ठाकरे यांच्या कार्यपद्धतीबद्दल असलेले आक्षेप. ""राजकीय पक्षाचं आणि सामाजिक काम करण्यासाठी रोज सकाळी लवकर उठावं लागतं,'' हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आक्षेप पुरेसा बोलका आहे. तसंच प्रत्यक्ष मैदानात न उतरता फक्त सभेच्या व्यासपीठावरुन राणा भीमेदवी घोषणा करण्यातच राज ठाकरे यांना रस आहे. उद्धव ठाकरे, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी आणि इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांप्रमाणे एखाद्या मोर्च्यात किंवा आंदोलनात राज प्रत्यक्ष सहभागी झालेले आठवत नाही. गेल्या काही दिवसांमध्ये तर नक्कीच नाही. आणखी एक गोष्ट म्हणजे "मनसे' हा पक्ष राज ठाकरे आणि त्यांच्याभोवतीची चौकडी यांच्यापुरताच मर्यादित राहिला आहे, असा आरोप श्‍वेता परुळकर आणि प्रकाश महाजन यांनी केलाय. त्याच मुद्‌द्‌यावरुन हे दोन्ही नेते (नेते या शब्दाला आक्षेप असेल तर राजकारणी हा शब्द योग्य आहे) पक्षातून बाहेर पडले आहेत. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अशाच स्वरुपाचे आरोप करुन राज यांनी शिवसेनेला "जय महाराष्ट्र' केला होता. दुर्दैवाने तेच आरोप राज यांच्यावर होताहेत आणि तेही फक्त तीन वर्षांच्या कालावधीतच!

महत्वाची गोष्ट म्हणजे राज ठाकरे हे एकहाती पक्ष चालवित आहेत. प्रवीण दरेकर, शिरीष पारकर, शिशिर शिंदे, अतुल सरपोतदार, बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई. एखाद-दुसरा इकडे तिकडे. ही मंडळी सोडली तर राज यांच्याकडे नेत्यांची फौज नाही. कार्यकर्त्यांची फौज आहे, असं वाटतं. पण कोणताही ठोस कार्यक्रम नसताना फक्त बोलीबच्चन देऊन तरुणांना बांधून ठेवणं अवघड आहे. पोलिस आणि न्यायालयांचा फेरा मागे लागला की, हे तरुण पक्ष कामाकडे हळूहळू दुर्लक्ष करु लागतात. शिवाय "मनसे'तली धुसफूसही वाढू लागलीय. पुण्यातलं लोकसभेचं तिकिट रणजित शिरोळे यांना देण्यावरुन दीपक पायगुडे हे राज यांचे समर्थक खूप दुखावले गेले होते. ते राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चाही रंगली होती. पण पायगुडे यांनी "मनसे'तच राहणं पसंत केलंय. पण आता ते फारसे सक्रिय नाही. आपलं मतही विचारात न घेता शिरोळे यांनी तिकिट दिल्यामुळं पायगुडे दुखावले आहेत. दुसरीकडे राज यांची पुण्यात पहिली सभा लावणारे गणेश सातपुते यांनीही "मनसे'ला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केला. हिंदुत्वाच्या मुद्‌द्‌याला राज यांनी हरताळ फासल्यामुळं सातपुते शिवसेनेत गेले. पण पायगुडे आणि सातपुते यांचं जमत नसल्यामुळंच हे पक्षांतर झाल्याचं खरं वृत्त आहे. थोडक्‍यात म्हणजे "मनसे'तही सारं आलबेल आहे, असं नाही.

एकीकडे मराठीचा मुद्दा सारखा तापवता ठेवता येत नाती. दुसरीकडे मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे वगळता इतर शहरांमध्ये "मनसे'चा फारसा प्रभाव नाही. ग्रामीण भागात तर "मनसे'ला कोणी ओळखतही नाही. मतं मिळणं तर दूरच. "मनसे'चे कार्यकर्ते सध्या जी आंदोलनं करत आहेत ती स्वतःच्या ताकदीवर किंवा स्वतःच्या निर्णयाने करीत आहेत. त्यात कोणतीही सुसूत्रता आणि भूमिका नाही. शिवाय महाराष्ट्राच्या विकासाची "ब्ल्यू प्रिंट' तयार असतानाही राज महाराष्ट्राच्या विकासावर काहीच का बोलत नाही, हा महत्वाचा मुद्दा आहे.

दुसरं म्हणजे शिवउद्योग सेनेच्या मार्फत राज ठाकरे यांनी किती तरुणांना रोजगार उपलब्ध करुन दिला आणि किती जणांना वाटाण्याच्या अक्षता मिळाल्या कोण जाणे... (ज्येष्ठ पत्रकार महेश विजापूरकर यांनी लिहिलेल्या एका लेखाच्या संदर्भानुसार राज यांच्यासाठीच उघडण्यात आलेल्या शिवउद्योग सेनेकडे जवळपास लाखभर तरुणांचे अर्ज आले होते. पण त्यापैकी फक्त अडीच हजार तरुणांनाच नोक-या दिल्या गेल्या.) सो राज ठाकरे यांनी आधी शिवउद्योग सेनेचा हिशेब द्यावा आणि मग महाराष्ट्राच्या ब्ल्यू प्रिंटकडे वळावं...

शिवाय राज हे त्यांच्या "छानछौकी'साठीच अधिक प्रसिद्ध आहेत. त्यांनी शेतकऱ्यांसाठी एखादा मोर्चा काढलाय, वीजेच्या मुद्‌द्‌यावर रस्त्यावर उतरले आहेत, रिलायन्सच्या वीज दरवाढीविरोधात आंदोलन उगारलंय, कापूस दिंडी काढलीय किंवा गोपीनाथ मुंडे यांच्यासारखी संघर्ष यात्रा काढलीय? काही आठवतंय. नाही शक्‍यच नाही. राज ठाकरे हे "पोस्टरबॉय' आहेत आणि उन्हातान्हात फिरण्याची त्यांची वृत्ती नाही, हे उघड सत्य आहे. कोणीही कितीही अमान्य केलं तरी. अशा परिस्थितीत फक्त सभांच्या आणि तोडफोडीच्या जोरावर तरुणांना आणि मध्यमवर्गीयांनी किती दिवस खिळवून ठेवता येईल, हाच खरा प्रश्न आहे.

"मनसे'च्या मतं खाण्यामुळं युतीच्या "सिटा' पडल्या हे मरी माणसावर बिंबवणयात शिवसेना काही प्रमाणात नाही तरी यशस्वी झाली आहे. शिवसेनेचे कार्यकर्तेही "मनसे'ला धडा शिकवण्याच्या तयारीत आहेत. तसंच राज ठाकरे हे सध्या शांत आहेत. ही मराठीच्या नावावर काही महिन्यांपूर्वी घडलेल्या "तोडफोडी'सारख्या वादळापूर्वीची शांतता म्हणायची की, राज यांचे काही वेगळेच मनसुबे आहेत, हे कळायला मार्ग नाही. पण काहीही आणि कितीही झालं तरी "मनसे'ला भवितव्य आहे, यावर विश्‍वास बसत नाही. राज ठाकरे यांच्या लोकप्रियतेबद्दल शंका घेण्याची इच्छा नाही. खरं तर तो मुद्दाच नाही. राज यांचा करिष्मा बाळासाहेबांइतकाच आहे. ते बाळासाहेबांसारखेच फर्डे वक्ते आहे. त्यांची शैलीही बाळासाहेबांसारखीच आहे. शेवटी ते ठाकरेच. त्यामुळे ते लोकप्रिय असणारच.

पण त्या जोरावर "मनसे' वाढेल आणि शिवसेना संपेल किंवा "मनसे'च्या मतं खाण्याचा शिवसेनेला कायमच फटका बसेल असं नाही. आणखी एक म्हणजे विधानसभेला "मनसे' लोकसभेइतकी मतं खाईल का, हा देखील कळीचा मुद्दा आहे. (घेईल का शब्द मुद्दामून वापरलेला नाही.) घोडा मैदान जवळच आहे. पाहू या काय होतं ते!!!!!

Thursday, July 02, 2009

लोभ असावा ही विनंती...


ओलांडला पंधरा हजारांचा टप्पा...

गेल्या तीन-चार वर्षांपासून मी हा ब्लॉग चालवितो आहे ब्लॉग जरी मी चालवित असलो तरी मला यामध्ये ओढण्याचं किंवा मला ब्लॉगचं व्यसन लावण्याचं काम केलंय ते देविदास देशपांडे यानं. दैनिक सकाळच्या पुणे आवृत्तीमध्ये उपसंपादक म्हणून काम करत असताना त्यानं सर्वप्रथम ब्लॉग सुरु केला. त्यावेळी तो इंग्रजी, मराठी, फ्रेंच आणि न जाणो किती भाषेत ब्लॉग लिहायचा. तीन ते चार ब्लॉग तर त्यानं नक्कीच सुरु केले होते. त्याच्यापासून प्रेरणा घेऊनच किंवा त्यानं मदत केल्यामुळेच मी देखील ब्लॉग सुरु केला. मीच काय पण नंदकुमार वाघमारे, विश्वनाथ गरुड, नितीन ब्रह्मे, मुकुंद पोतदार, अभिजीत पेंढारकर आणि अशाच अनेक उपसंपादकांनी ब्लॉग सुरु केले. काहींचे ब्लॉग अजून सुरु आहेत. मी देखील त्यापैकीच एक.

गेल्या तीन वर्षांपासून कधी अधिक सातत्याने तर कधी कमी सातत्याने मी ब्लॉग लिहितो आहे. कधी खाद्यपदार्थांवर, कधी हॉटेल्सवर, कधी राजकारणावर, कधी क्रीडा घडामोडींवर किंवा कधी प्रवासावर. अगदी अलिकडे माझी आई गेल्यानंतरही मला ब्लॉगवर लिहिल्यामुळं खूप बरं वाटलं होत. एखादी घटना घडल्यानंतर प्रत्येकवेळी आपल्याला त्याबद्दल पेपरमध्ये लिहिता येतंच असं नाही. शिवाय आपण प्रत्येक गोष्टीतले एक्स्पर्ट नसतो. त्यामुळं आपल्या मताला पेपरमध्ये काय स्थान मिळणार. पण तरीही आपण आपलं मत रेटून मांडतो. कधी चहा पिताना, कधी मित्रांच्या घोळक्यात, तर कधी ऑफिसमध्ये बातम्यांवर चर्चा करताना. आता या पर्यायांमध्ये आणखी एकाची भर पडली आणि ती म्हणजे ब्लॉगची. मला जे हवं आणि जसं हवं तसं लिहिण्याची मोकळीक इथं मिळते. शिवाय उपसंपादकाची कात्री लागण्याची भीतीही नसते.

ब्लॉग लिहिताना आपला ब्लॉग किती दिवस चालेल, याबद्दल खरं सांगायचं तर शंकाच होती. शिवाय नव्याचे नऊ दिवस... या म्हणीप्रमाणे आपला ब्लॉग दोन-चार महिन्यांनी बंद तर पडणार नाही ना, हा विचारही मनात होता. पण येत्या सप्टेंबर महिन्यात ब्लॉगला तीन वर्षे पूर्ण होणार आहेत. पंधरा हजार व्हिजिटर्सचा टप्पाही पार झालाय. तसंच स्टार माझा या वृत्तवाहिनीनं घेतलेल्या स्पर्धेत माझ्या ब्लॉगला उत्तेजनार्थ पारितोषिकही मिळालं होतं. माझ्याप्रमाणेच अभिजीत पेंढारकरही त्याचा मानकरी ठरला होता. पारितोषिक हा काही ब्लॉगच्या लोकप्रियतेचा मापदंड नाही. पण ते मिळाल्यामुळं कदाचित मी अधिक हुरुपानं लिहू लागलो असेलही.

यापुढंही अधिक उत्साहानं, हिरीरीनं आणि अभ्यासपूर्ण पद्धतीनं ब्लॉग लिहिण्याचा माझा प्रयत्न सुरुच राहिल. तुम्हाला जर माझे लेख आवडत असतील तर शेजारच्या फॉलोअर्स या लिंकवर क्लिक करुन माझ्या ब्लॉगचे फॉलोअर्स बना. तसंच लेख आवडला असेल किंवा नसेल अथवा काही सूचना असतील तर कॉमेंटस हा ऑप्शन आहेच. कारण मला जसं माझं मत आहे. तसंच इतरांनाही मत आहे. त्यानं ते आपल्या ब्लॉगवर मांडलं तर ते हटविण्याचा अधिकार मला आहे. पण मी तो आतापर्यंत वापरलेला नाही. यापुढेही येऊ नये, हीच अपेक्षा आहे. (कॉमेंटवरुन आठवलं माझ्या ब्लॉगवर आलेल्या लेखाविरोधातल्या किंवा लेख न आवडल्याच्या कॉमेंटस देखील मी आहे तशाच ठेवल्या आहेत. हटविलेल्या नाहीत. राज ठाकरे यांच्या लेखावरची एका बिहारी माणसाची जळजळीत प्रतिक्रियाही अगदी आहे तशीच छापली आहे.)

तेव्हा फ्रेंडस माझा ब्लॉग वाचाच पण तुम्हीही लवकर ब्लॉगर व्हा...
अगदी मनापासून धन्यवाद.

Wednesday, June 17, 2009

आई...

"ती' माझ्या रक्तातच आहे...

आठ मे 2009. "मदर्स डे'च्या बरोब्बर दोन दिवस आधी. माझ्या आईचं निधन झालं. गेल्या अनेक वर्षांपासून ती आजारी होती. पण तरीही तिची जगण्यासाठीची झुंज सुरु होती. पण आठ वर्षानंतर तिनं दम तोडला. गेल्या अनेक दिवसांपास्नं आईवर लिहायचं होतं. वास्तविक पाहता आईवर लिहायचं तर पुस्तकही लिहिता येईल. पण मी माझ्या आईवर लिहिलेलं वाचणार कोण? त्यामुळं माझ्या ब्लॉगवर लिहायला काय हरकत आहे. प्रयत्न करुनही कमी शब्दात लेख आटोपणं शक्‍य झालेलं नाही. काहीसा "स्वान्त सुखाय" लिहिलेला हा लेख इथं देत आहे...

मध्यंतरी कोटेशन्सचं एक पुस्तक वाचत होतो. त्यात आईबद्दल एक सुंदर विचार लिहिला होता. "गॉड कॅनॉट बी एव्हरीवेअर. सो ही क्रिएटेड मदर्स...' हे झालं इंग्रजीचं. आईचं वर्णन करण्यासाठी यापेक्षा अधिक सुंदर वाक्‍य कोणते असू शकेल? मराठीतही अशाच पद्धतीनं आईची महती गायली गेलीय. मराठीतही एक गाणं आहे, "आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही, म्हणून "श्री"च्या राजानंतर शिक रे अ आ ई...' कोणी म्हणतं आई म्हणजे जिच्या आत्म्यात ईश्‍वराचा वास असतो, ती व्यक्ती म्हणजे आई.

अर्थात, जोपर्यंत आई होती तोपर्यंत मला या गोष्टींचं फारसं अप्रूप वाटलं नव्हतं. पण आठ मे ला आई गेली आणि राहून राहून हे विचार माझ्यासमोर तरळत होते. माझी आई नेहमी म्हणायची की, "जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुला माझी किंमत कधीच कळणार नाही. पण मी गेल्यावर माझं महत्व तुला नक्की समजेल.' आज माझी आई माझ्याबरोबर नाही. आठवणींनी आणि तिच्या विचारांनी ती जरी कायम माझ्याबरोबर असली तरी आई आता पुन्हा मला कधीच भेटणार नाही. पण मला आईची किंमत पुरती कळून चुकलीय. ती अमूल्य आहे. आई असतानाही हे माहिती होतंच. पण आज ती जवळ नाही. त्यामुळं तिचीं उणीव अधिकच जाणवतेय.

आई नावाचं विद्यापीठ...

आई म्हणजे एक चालतं बोलतं विद्यापीठ होतं. तिनं आमच्यावर मारुन मुटकून कधीच संस्कार केले नाहीत. शिस्त लावली नाही. पण तिचं वागणं बोलणंच असं होतं की हळूहळू आम्हीही तिचं अनुकरण करु लागलो. तिचा माझ्यावर इतका प्रभाव होता की, आज माझ्यामध्ये असलेल्या बऱ्याच चांगल्या सवयी या फक्त तिच्यामुळेच आहेत, असं मी म्हणेनं. (अर्थात, मला नीट ओळखणाऱ्यांना माझ्यातले वाईट गुण चांगले माहिती आहेत. त्याचा आणि माझ्या आईचा काहीही संबंध नाही, हे सांगायला नकोच.) अगदी माझ्या लहानपणापासून ते तिच्या अखेरच्या दिवसांपर्यंत. देवावर अगाध श्रद्धा, शिक्षणाचं महत्त्व, साधी राहणी, अत्यंत कष्टाळू आणि जिद्दी, तीक्ष्ण स्मरणशक्ती आणि माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यातली सर्वोत्तम "कुक', अशा अनेक गोष्टी तिचं वर्णन करताना लिहिता येतील.

शिक्षणाची गोडी...

लहानपणापासनं तिनं मला अभ्यासाची गोडी लावली. ती फार शिकलेली होती असं नाही. इंटरनंतर एखाद दुसरं वर्ष तिनं केलं असेल. पण तरीही तिला शिक्षणाचं महत्व पटलेलं होतं. "आपल्याकडे खूप पैसे नाहीत. बापजाद्यांची इस्टेट नाही. त्यामुळं चांगलं शिकलं तरच आपलं आयुष्य सुखात जाईल. तुला शिकायचं असेल तर वेळप्रसंगी मी माझे दागिने मोडेन पण तू खूप शिक,' हा संवाद तिच्या तोंडी कायम असायचा. सुरवातीला मला शिकण्याचा खूप कंटाळा होता. त्यामुळं माझं कसं होणार याची चिंता तिला कायम सतावत असायची. पण नंतर मात्र मला हळूहळू शिक्षणाचं महत्व पटू लागलं. आजच्या घडीला माझ्याकडे ज्या तीन-चार पदव्या आहेत, त्याचं श्रेयं आई-बाबांनाच जातं. आईचं हस्ताक्षर खूप सुंदर होतं. माझं अक्षर चांगलं असावं, यासाठी तिचा खूप आग्रह होता. या गोष्टीसाठी मी तिचा अनेकदा मार खाल्ल्याचं मला अजूनही आठवतंय.

हरामाचा पैसा नको...

पैसा आयुष्यात महत्वाचा आहे. पण पैसा म्हणजेच सर्वस्व नाही, हे मला तिच्याकडूनंच समजलं. वडील "महिंद्र ऍण्ड महिंद्र'मध्ये होते. पण पगार बेताचाच होता. पण अत्यंत परिस्थितीतही आईनं संसार अगदी नेटानं सुरु ठेवला. वडिलांच्या कंपनीमध्ये दोनवेळा "लॉक आऊट' जाहीर करण्यात आला होता. त्यामुळं तीन-चार महिने कंपनीतनं पगार येणार नव्हता. पण अशा परिस्थिततही पहिल्या वेळी शिवणकाम करुन आणि दुसऱ्या वेळी पाळणाघर सुरु करुन तिनं बाबांना आर्थिक हातभार लावला.
कुरियरसाठी लागणाऱ्या कापडी पिशव्या किंवा कव्हर्स ती शिवायची. एका कव्हरचे आकारानुसार चार आणे ते बारा आणे मिळायचे. दिवसभरात असे वीस-पंचवीस रुपये ती मिळवायची. पाळणाघर चालवायची तेव्हा तीन-चार मुलांचे पंधराशे ते दोन हजार रुपये दरमहिना ती कमवत असे. पण पैशाच्या चणचणीची धग आमच्यापर्यंत कधीच पोचली नाही. वास्तविक पाहता आईचे वडिल म्हणजे माझे दादा आजोबा सयाजीराव गायकवाड यांच्याकडे वरिष्ठ पदावर कार्यरत होते. त्यामुळं तिच्या घरात लक्ष्मी पाणी भरत होती, असं म्हटलं तरी चालेल. पण सासरी तशी परिस्थिती नव्हती. हल्ली ज्याला "ऍडजस्टमेंट' म्हणतात, ती आईंनं खूप केली. अर्थातच, कोणतीही कुरबूर न करता.

तिचं आणखी एक म्हणणं असायचं. "हरामाचा पैसा अजिबात पचत नाही. त्यामुळं फुकटचा एक रुपयाही आपल्याला नको.' एखाद्या दुकानदारानं गडबडीत जर सुटे परत देताना पैसे जास्त दिले तर प्रामाणिकपणे ती पैसे परत करायची. पाचवी-सहावीत असताना आम्ही एकदा आमच्या इथल्या काका हलवाईकडे गेलो होतो. आम्ही पाचशे रुपये दिले आहेत असं समजून त्यानं सुटे पैसे परत केले. आईनं मात्र, शंभर रुपयेच दिले होते. त्यामुळं तिनं उरलेले पैसे परत केले. दुकानदारालाही आईचं आश्‍चर्य वाटलं. पण आईचं उत्तर ठरलेलं होतं. हरामाचा पैसा पचत नाही. अशा छोट्या मोठ्या प्रसंगांमधून माझ्यावर झालेले संस्कार आयुष्यभरासाठी पुरणारे आहेत. कोणाचा एक रुपया तिनं घेतला नाही की बुडवला नाही.

"आपल्याला राजाचा राजवाडा नको. आपण खाऊन पिऊन सुखी आहोत आणि तेच बरं आहे.' सगळ्यांना येतात तशा अनेक अडचणी आल्या, अनेक संकटं आली. त्यातली काही आर्थिकही होती. पण दोनवेळच्या जेवणाची ददात आम्हाला कधीच जाणवली नाही. तसंच आईचं आदरातिथ्य इतकं होतं की, आमच्याकडे आलेला कोणीच न खाता-पिता गेला नाही. इतकंच काय तर अनेक छोटे प्राणी-पक्षीही आमच्याकडे रोज मेजवानी झोडायचे. रोज भाताच्या कुकरचं प्रेशर पडल्यानंतर सर्वात पहिल्यांदा ती कावळे आणि चिमण्यांना तो भात वाढायची. कावळे-चिमण्या देखील स्वयंपाकघराच्या खिडकीवर बसून त्याची वाट पाहायचे. हल्ली हल्ली तर कबुतरं, साळुंकी आणि छोटीशी खारुताई देखील नित्यनियमाने येतात. आई धार्मिक होती. प्रथा, परंपरा आणि रुढी पाळण्याची तिला जबर हौस. पण स्वयंपाक झाल्यानंतर नेवैद्य दाखवण्यापूर्वी ती पक्ष्यांसाठी भात वाढायची. तिची एकूणच धार्मिक वृत्ती पाहता हे मात्र, थोडंसं अजब होतं.

धार्मिक आणि देवभोळी

आई खूप धार्मिक आणि परंपरावादी होती. पण त्याचा जाच आम्हाला कधीच झाला नाही. उलट तिच्यामुळं अनेक स्तोत्र, मंत्र आणि आरत्या यांचं आमचं पाठांतर झालं. जोपर्यंत आई धडधाकट होती तोपर्यंत ती श्रावणी आणि कार्तिकी सोमवारचा उपास धरायची. सक्काळी सक्काळी नवी पेठेतल्या विठ्ठल मंदिरातल्या शंकराच्या पूजेला जायची. अनवाणी जायची. हरितालिकेचं आणि वटपौर्णिमेचं व्रत करायची, चैत्रगौर बसवायची, संक्रांत आणि चैत्राचं हळदी-कुंकू साजरी करायची. हल्ली क्वचितच ऐकू येणारं अविधवा नवमी तसंच धुरित्री पाडवा हे व्रतही तिनं शेवटच्या वर्षापर्यंत केलं.

गणपतीत मानाचे गणपती आणि नवरात्रीमध्ये महत्वाच्या देवींचं दर्शन अगदी रांगेत उभं राहून घेणं नित्याचंच! नवरात्रीत अष्टमीच्या दिवशी एखाद्या देवीची साडी-चोळीनं ओटी भरणं आलंच. गणपती विसर्जन मिरवणुकीत मानाच्या पहिल्या पाच आणि रात्री दगडूशेठ-मंडईच्या गणपतींचं दर्शन कधीच चुकलं नाही. चालती फिरती असताना प्रत्यक्ष आणि अर्धांगवायू झाल्यानंतर तिनं अगदी गेल्या वर्षीपर्यंत टीव्हीवर बाप्पांचं दर्शन घेतलं. अष्टविनायक, बारा ज्योतिर्लिंग, महाराष्ट्रातली देवीची साडेतीन पिठं, पंढरपूर, वाडी, अक्कलकोट, गाणगापूर आणि इतर बऱ्याच ठिकाणी तिनं धार्मिक पर्यटन केलं. इतकं करुनही काही वेळा अपयश आलंच तरी त्याचं खापर तिनं कधीच देवावर फोडलं नाही. कितीही बिकट परिस्थिती आली तरी तिचा देवावरचा विश्‍वास तसूभरही ढळला नाही. तितक्‍याच मनोभावे ती देवाची पूजा करतच राहिली.

द बेस्ट "कुक'

आईचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिचं सुगरण असणं. गोडाचा शिरा, आळूची भाजी, पोहे, छोट्या आणि बरोब्बर गोल पोळ्या, पुरणाची दिंडं, सांबार, पावभाजी, रव्या बेसनाचे लाडू, ओल्या नारळ्याच्या वड्या आणि करंज्या, ताक घालून पालकाची भाजी, थालिपीठ आणि असे असंख्य पदार्थ खावे तर फक्त तिच्या हातचे. आईच्या हाताला अशी काही चव होती की, विचारता सोय नाही. लहानपणापासून मी तिच्या हातचं खात असल्यामुळं मला असं वाटत असेलही कदाचित. पण काही पदार्थ करावे तर तिनंच.

नागपंचमीला पुरणाची दिंडं, दिव्याच्या अमावास्येला गोड दिवे, कोजागिरीला मसाला दूध, दिवाळीत ओल्या नारळाच्या करंज्या, पहिला पाऊस पडला की कांदा भजी याची इतकी सवय झाली होती की बस्स! दणगेलं, गवार ढोकळी, डाळ ढोकळी, सुरळीच्या वड्या, ढोकळा आणि पराठे हे खास गुजराती पदार्थही ती उत्तम करायची. तिचा जन्म आणि जवळपास निम्मं आयुष्य बडोद्यात गेलं होतं. त्यामुळं ओघानं हे आलंच. अर्थात, अर्धांगवायू झालापास्नं हे सारंच संपलं. ती एक नंबरची सुगरण होती. त्यामुळंच कदाचित मला चविष्ट आणि निरनिराळे पदार्थ खाण्याचं व्यसन लागलं असावं. माझी आई पण माझ्यासारखीच चवीनं खाणारी होती. पण साधं अंडही तिनं कधी खाल्लं नाही. आम्ही जर घरी ऑम्लेट केलं तरी ती भांडी आम्हालाच घासावी लागायची. तिनं त्यालाही हात लावला नाही.

जीव भांड्यात...

आईला स्वतःला आवड होती ती वेगवेगळ्या प्रकारची भांडी जमवायची. एकवेळ ती नवी साडी घ्यायची नाही. एखादा दागिना कमी घेईल. पण बाजारातलं नवं भांडं ती जरुर घ्यायची. तांबं, पितळ, स्टील, ग्लास आणि अगदी ऍल्युमिनियमपासून बनवलेली भांडी तिनं जमवली. वेगवेगळ्या प्रकारची ताटं, डिशेस, वाट्या-भांडी, पराती, पातेली, ग्लासेस, डब्बे इथपासून ते अगदी छोटे-मोठे चमचे व लहान डब्यादेखील. आज जर आमच्या घरातली सगळी भांडी एकत्र केली तर कदाचित एखाद-दुसरी खोली सहज भरुन जाईल. आतापर्यंत आमच्या घरी जी काही कार्य झाली त्यावेळी आम्हाला कधीही बाहेरुन एक भांड भाड्यानं आणावं लागलं नाही.

तिचा जीव भांड्यांमध्ये रमत होता, असं म्हटलं तरी चालेल. पण नुसती भांडी जमवून ती थांबली नाही. दोन-तीन महिन्यांनी किंवा दिवाळीसारखं निमित्त साधून त्यातली बहुतांश भांडी ती स्वतः घासायची आणि पुसायची. हा नियम अगदी अपवादानंच मोडला गेला. एखादं भांडं पडलं किंवा नीट घासलं गेलं नाही तरी तिचा जीव वरखाली व्हायचा. भांडी ठेवायची तिची स्वतःची एक पद्धत होती. त्यामुळं लहानपणी चोरून काही खाल्लं तर ते तिला अगदी सहजपणे कळायचं. राहून राहून एक आश्‍चर्य वाटतं की, त्यावेळी बाबांचा पगार फारसा नसतानाही आईनं इतकी भांडी जमविलीच कशी?

आईनं काही वर्षे पाळणाघरही चालवलं. अर्थात, तेव्हा गरज म्हणून तिनं हा व्यवसाय सुरु केला. पण आवाक्‍यपेक्षा अधिक मुलं तिनं कधीच सांभाळली नाही. एकावेळी दोन किंवा तीन. त्यापैकी सौरभ कट्टी आणि मीरा देशपांडे हे दोघे तर आमच्याकडे तीन महिन्यांचे असल्यापासून होते. आईनं त्यांचा सांभाळ स्वतःच्या मुलांपेक्षा म्हणजेच आमच्यापेक्षा अधिक काळजीपूर्वक केला असावा. सकाळी आठ-नऊ वाजल्यापास्नं ते संध्याकाळी सात- आठ वाजेपर्यंत ते आमच्या घरीच असायचे. आईचा त्यांना इतका लळा लागला की, आमची आई हीच त्यांची खरी आई आहे, असं त्यांना वाटायचं. त्यामुळंच ते तिला मिनाक्षी आई म्हणायचे. मिनाक्षी आईनं त्या दोघा-तिघांचे केलेले लाड पाहिल्यानंतर खरं तर आम्हाला त्यांचा खूप हेवा वाटायचा. जस्ट जोकिंग. पण आईचा त्यांच्यावर खूप जीव होता. आम्हाला त्यांचा तीन-चार वर्षांपर्यंत हे दोघेही आमच्याकडे असायचे. नंतर दोघेही आमच्या घरापासून दूर गेले. पण आजपर्यंत त्यांचे आणि आमच्या घराचे बंध जुळलेले आहेत.

तल्लख बुद्धी...

तिची बुद्धी आणि स्मरणशक्ती अगदी तल्लख होती. आईचे भाऊ-बहिण, भाचे-पुतणे आणि इतर अनेकांचे वाढदिवस तिचे तोंडपाठ होते. प्रत्येकाच्या वाढदिवशी ती आवर्जून त्यांना फोन करायची. आणखी एक म्हणजे पेपरमध्ये वाचलेली प्रत्येक गोष्ट आणि बातमी तिच्या लक्षात असायची. पूर्वी कधीतरी महाराष्ट्र केसरी जिंकणारा सईद चाऊस असो किंवा आजचा सोन्याचा भाव काय आहे, या गोष्टी तिच्या अगदी तोंडपाठ असायच्या. अखेरच्या दिवसांमध्ये तिला टीव्ही पाहण्यासाठी बाहेरच्या खोलीत येणं जमत नसे. त्यावेळी टीव्हीवर ती तिच्या आवडीच्या मालिका फक्त ऐकायची. पण आवाजावरुन कोण कलाकार आता बोलतो आहे, हे तिला समजायचं. अखेरच्या दिवसांमध्ये शरीरानं तिला साथ दिली नसली तरी तिची बुद्धी मात्र कायमच तिच्या बाजूनं होती (शेवटचे सहा-सात दिवस सोडले तर) ही खूपच दिलासादायक गोष्ट होती.

आयुष्यभरात माझ्या आई-बाबांनी एकवेळ इस्टेट कमी कमाविली असेल. पण त्यांनी माणसं खूप जोडली. नातेवाईक असो, मित्र-मैत्रिणी असो किंवा शेजारीपाजारी. मदतीच्या प्रसंगी धावून जाणं हे दोघांच्याही रक्तात भिनलेलं. अर्धांगवायूचा झटका आल्यानंतरचं सात-आठ वर्षांचं आयुष्य तिनं अगदी हसत हसत काढलं. पथ्य पाळली. पण पथ्य पाळतानाच ती अगदी मनसोक्त जगली. ती आयुष्याला कंटाळलीय, असं कधीही वाटलं नाही. "तू देवाचं इतकं करतेस. तरी मग तुला इतका त्रास का होतोय. देव बिव काही नाही...' असं तिला चिडवण्यासाठी मी म्हणायचो. त्यावेळी ती सांगायची की, "देवाचं करते म्हणूनच इतका कमी त्रास होतोय. देवधर्म केला नसता तर आणखी झाला असता.' हे पॉझिटिव्ह थिंकिंग थक्क करणारं होतं, ते देखील सगळं शरीर थकलं असताना.

ग्रेट फादर!
दुसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अखेरच्या काही वर्षांत बाबांनी आईची केलेली सेवा. एखाद्या पुरुषानं आपल्या पत्नीची इतकी सेवा केल्याचं मी तरी पाहिलेलं नाही. असणार यात शंका नाही. मी तर असं म्हणेन की शेवटची काही वर्ष आई जगली ती बाबांमुळेच. सकाळी उठल्यावर तिचं तोंड धुणं, संडास आणि बाथरुमला नेणं, आंघोळ घालणं, औषधं-गोळ्या यांचे डोस सांभाळणं आणि बरच काही. ते देखील कोणतीही चिडचिड न करता. अखेरच्या दिवसांमध्ये तर एखाद्या नर्सला लाजवेल इतकी काळजी ते आईची घ्यायचे. "हॅट्‌स ऑफ टू माय फादर टू!'
"आई-वडिलांची सेवा कर. आयुष्यात तुला कोणतीच गोष्ट कमी पडणार नाही,' हे वाक्‍य देखील तिच्या तोंडी कायम असायचं. अर्थात, तिनं तिच्या आईची खूप सेवा केली होती, हे आम्हाला माहिती होतं. माझ्या आईची तिच्या आईवर खूप श्रद्धा होती. खूप जीव होता. त्यामुळंच कदाचित आमची आजी ज्या दिवशी गेली बरोब्बर त्याच दिवशी माझ्या आईचं देखील निधन झालं. आठ मे रोजी. इतरांसाठी हा निव्वळ योगायोग असेलही किमान मला तरी त्याकडे योगायोग म्हणून पाहता येणार नाही. कारण आठ मे पूर्वी चार-पाच दिवस आई बऱ्यापैकी सिरीयस होती. तिला शुद्ध नव्हती, असं म्हटलं तरी चालेल. सात मे रोजी पण ती जाते की राहते अशी परिस्थिती होती. पण अखेर तिनं सात तारीख मागे टाकली आणि आठ मे हाच तिच्या आयुष्यातला शेवटचा दिवस ठरला. "मदर्स डे'च्या बरोब्बर दोन दिवस आधी.

आज आईला जाऊन महिन्यापेक्षा अधिक कालावधी उलटून गेला. पण आई गेली यावर अजूनही विश्‍वास नाही. मला अजूनही असं वाटतं की, शुक्रवारी रात्री बेलापूरहून घरी गेल्यानंतर आई माझी वाटत पाहत असेल. आत गेल्यावर आई विचारेल, ""जेवलास का?, काय जेवलास?'' किंवा घरातून निघताना सांगेल, ""नीट जा आणि पोचल्यावर फोन कर. रोज वेळेवर जेवत जा आणि नीट काम कर.'' टीव्हीवर जर एखाद्या बातमीला माझा व्हॉईस ओव्हर असेल किंवा माझं नाव असेल तर फोन करुन मला सांगेल, ""आशिष, आम्ही ऐकली आज तुझी बातमी.'' किंवा विचारेल, ""अरे, आज तू ऑफिसला नाही गेलास का? तुझा आवाज नव्हता?'' पेपरमध्ये काम करत असेन तर विचारेल की, आज तुझी काही बातमी किंवा लेख आहे का?

आपल्या सर्वात जवळचं माणूस गेल्यानंतर त्याची उणीव आपल्याला किता भासू शकते, हे माझ्या कल्पनेच्याही पलिकडचे होते. पण गदिमांनी गीत रामायणामध्ये लिहिलेलं अगदी खरं आहे.

"दोन ओंडक्‍यांची होते सागरात भेट,
एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ'

आई गेली तेव्हा सध्या "एनडीटीव्ही'त काम करणाऱ्या प्रसाद काथे या एका जुन्या सहकाऱ्याचा एसएमएस आला, ""आई आपल्या रक्तातच असते.'' थोडक्‍यात म्हणजे आई कायम आपल्या बरोबर असते. कधीही परत न येण्यासाठी गेली असली तरी! ही गोष्टही तितकीच खरी आहे.

Sunday, June 14, 2009

माटुंग्याचे अयप्पन इडली सेंटर...

दक्षिणेतल्या पदार्थांची चविष्ट रेलचेल


माटुंगा... मुंबईच्या मध्यवर्ती भागात दादरला खेटून असलेला भाग. इथं दाक्षिण भारतीय नागरिकांचं प्राबल्य. गुजराती नागरिकही मोठ्या संख्येनं आहेत पण दाक्षिणात्य नागरिकांचं वर्चस्व अंमळ जास्तच. साहजिकंच दाक्षिणात्य नागरिकांच्या पसंतीचे पदार्थ इथं अधिक चांगले मिळतात. माटुंगा रेल्वे स्थानकातून दिसणारं रामा नायक यांचं उडुपी रेस्तरॉं प्रसिद्ध आहेच. अनेक इंग्रजी-मराठी वृत्तपत्रांमधून "रामा नायक'वर बक्कळ छापून आलंय. त्यामुळं त्यावर आणखी शब्द खर्च करण्याची माझी इच्छा नाही. मला लिहायचं आहे खवय्यांच्या एका वेगळ्याच अड्ड्यावर.

माटुंगा स्टेनशनच्या कल्याणच्या बाजूच्या सर्वाधिक शेवटच्या जिन्यावरुन बाहेर उतरायचं. आपण केरळ किंवा तमिळनाडूमध्ये आलो आहोत की काय, अशी शंका आपल्याला स्टेनशमधून बाहेर पडल्यानंतर लगेच येते. स्टेशन मागे टाकून आपण हायवेकडे जाऊ लागलो की आपल्याला दाक्षिणात्य वस्तूंच्या विक्रीचे स्टॉल्स लागतात. थोडं पुढे गेलं की, फुलांचे स्टॉल्स लागतात. ही मक्तेदारी आहे तमिळ आणि केरळी भाषकांकडे! पहिल्या गल्लीत डावीकडे वळलो की थोडसं पुढं जायचं. तिथं शंकराचार्यांचं किंवा तमिळ नागरिकांचं एक मंदिर आहे. देवळाच्या समोर जितकी गर्दी नसते तितकी गर्दी आपल्याला समोरच्या खाण्याच्या स्टॉलवर दिसेल. हेच ते अयप्पन इडली सेंटर, ज्याच्यावर मला भरभरुन लिहायचंय.

साधा डोश्‍यापासून सुरु होणारी डोश्‍यांची यादी साठ ते सत्तर वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्सनंतर संपते. मग त्यात मसाला डोसा, कट डोसा, म्हैसूर मसाला, म्हैसूर कट अशी नेहमीची कॉम्बिनेशन्स आलीच. कांदा उत्तप्पाच्या जोडीला मसाला उत्तप्पा आहे. उडीद वडा, डाल वडा आणि इडलीच्या जोडीला कच्च्या केळ्यांपासून बनवलेली भजी आहेत. कांचीपुरम इडलीही आहे बहुतेक. पण तुम्ही म्हणाल मुंबईत अशी उपहारगृह पायलीला पन्नास मिळतील. रेल्वे स्टेशन्सच्या बाहेरही अनेक छोटे-मोठे विक्रेते झाडाच्या पानांवर इडली, साधा डोसा आणि मेदू वडा विकत असतात. त्यांची चवही चांगली असतेच. वाद नाही. ते स्वस्तही असतात. पण अयप्पनच्या पदार्थांची चवच न्यारी.

विशेषतः सांबार, खोबऱ्याची चटणी आणि टोमॅटो-लाल मिरची यांच्यापासून बनविलेली चटणी या गोष्टी पदार्थांच्या स्वादात शेकडो पट भर घालते. केळी भजी ही इथली खासियत म्हणावी लागेल. तंसच थोडासा सरसरीत म्हणजेच मऊसर उप्पीट दक्षिणेची आठवण नक्की करुन देते. तुम्ही अस्सल खवय्ये आणि थोडेसे निर्लज्ज असाल तर अगदी पुन्हा पुन्हा मागून या पदार्थांवर ताव माराल. फक्त एखादी प्लेट खाऊन तुमचं भागणार नाही. दुसऱ्या प्लेटची ऑर्डर तुम्हाला द्यावी लागेलच.

अयप्पन इडली सेंटरला भेट देणाऱ्यांमध्ये तमिळ किंवा केरळी मंडळी कमी आणि उर्वरित भारतातले खवय्येच जास्त, अशी परिस्थिती असते. गुजराती, मराठी आणि अगदी पंजाबी मंडळी सुद्धा इथं येऊन भरपेट ताव मारुन जातात. दक्षिण भारतातल्या काही तरुण मंडळींनी किंवा होतकरु लोकांनी एकत्र येऊन हे सेंटर चालविल्यासारखे वाटते. मराठी गृहिणी जसं एकत्र येऊन मराठी खाद्यपदार्थांचे स्टॉल्स चालवतात तसं. पण मराठी स्टॉल्सवर न आढळणाऱ्या दोन गोष्टी इथं अगदी सहजपणे जाणवतात. एक म्हणजे आपलेपणा आणि दुसरी गोष्ट म्हणजे ग्राहकावरचा विश्‍वास. "आधी पैसे द्या, मग पदार्थ घ्या' या अस्सल मराठमोळ्या धोरणाला बळी पडून मी ऑर्डर दिल्यानंतर लगेच शंभरची नोट काढली. तेव्हा कॅशियरनं नम्रपणे सांगितलं की, ""तुम्हाला पार्सल न्यायचं नाही ना? मग आधी खा आणि नंतर पैसे द्या...' तसंच तुमची ऑर्डर तुम्हाला मिळाली का किंवा आणखी काही पाहिजे का, या गोष्टींची विचारणा तिथली मंडळी अगदी आपुलकीनं करतात. (आपुलकी म्हटली की कपाळावरच्या आठ्या येत नाहीत, हे सांगायला नकोच) त्यामुळंच गर्भश्रीमंतापासून ते ओझी वाहणाऱ्या हमालापर्यंत आणि सत्तर वर्षांच्या आजीपासून ते बारा-चौदा वर्षांच्या शाळकरी मुलापर्यंत सर्व जण तुम्हाला इथं दिसतील.

बरं गर्दी वाढतेय म्हणून पदार्थांचे भाव मात्र फारसे वाढलेले दिसत नाहीत. दहा-बारा रुपयांना उप्पीट, केळी भजी तर अठरा-वीस रुपयांना मसाला आणि म्हैसूर डोसा. इतर पदार्थांचे दरही थोडेफार इकडे तिकडे. थोडक्‍यात म्हणजे काय तर स्वस्तात मस्त आणि चविष्ट पदार्थ खायचे असतील तर किमान एकदा का होईना माटुंगा (मध्य रेल्वेवरचं) परिसरातलं अयप्पन इडली सेंटर गाठलं पाहिजेच.

Wednesday, June 03, 2009

राजकारणातील तरुणाई वाढतेय...


घराणेशाहीच होतेय प्रबळ...

पंडित जवाहरलाल नेहरु यांचे पणतू, इंदिरा गांधी यांचे नातू, राजीव गांधी यांनी पुत्र श्री राहुल गांधी यांनी सक्रिय राजकारणात उडी घेतलीय आणि कॉंग्रेसला केंद्रात पुन्हा सत्ता मिळाल्यानंतर राहुल यांचं पक्षातलं वजन चांगलंच वाढलंय. त्यामुळं पुन्हा एकदा राजकारणात तरुणाई येतेय, शिकलेले लोक राजकारणात येताहेत अशी आवई उठविली जातेय. राजकारणातील तरुणाई कोण आहे ते पहा आणि तुम्हीच ठरवा हे खरं आहे का ते...

लोकसभेतील तरुणाई...
राहुल गांधी (सोनिया गांधी यांचे पुत्र), सुप्रिया सुळे (शरद पवार यांच्या कन्या), जितीन प्रसाद (कॉंग्रेस नेते जितेंद्र प्रसाद यांचे पुत्र), सचिन पायलट (दिवंगत कॉंग्रेस नेते राजेश पायलट यांचे पुत्र), ज्योतिरादित्य शिंदे (दिवंगत माधवराव शिंदे यांचे पुत्र), अगाथा संगमा (पूर्णो संगमा यांच्या कन्या), एम के अळगिरी (करुणानिधी यांचे पुत्र), दयानिधी मारन (करुणानिधी यांचे भाचे), डी. पुरंदरेश्‍वरी (तेलुगू देसमचे संस्थापक एन टी रामाराव यांच्या कन्या), डी. नेपोलियन (करुणानिधी यांचे नातेवाईक), भारतसिंह सोळंकी (गुजरात कॉंग्रेस नेते माधवसिंह सोळंकी यांचे पुत्र), तुषार चौधरी (गुजरात कॉंग्रेस नेते अमरसिंह चौधरी यांचे पुत्र), प्रतीक पाटील (वसंतदादा पाटील यांचे नातू), मिलींद देवरा (मुरली देवरा यांचे पुत्र), नितेश राणे (नारायण राणे यांचे पुत्र), समीर भुजबळ (छगन भुजबळ यांचे पुतणे), प्रिया दत्त (सुनील दत्त यांच्या कन्या), एच डी कुमारस्वामी (एच डी देवेगौडा यांचे पुत्र), प्रेणित कौर (पंजाब कॉंग्रेसचे नेते कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या पत्नी), अखिलेश यादव (मुलायमसिंह यांचे पुत्र), यशोधराराजे शिंदे (भाजप नेत्या विजयाराजे शिंदे यांच्या कन्या तर वसुंधराराजे यांच्या बहिण).

लोकसभेतल्या तरुण खासदारांची नावं पाहिली की ते कोणत्या ना कोणत्या राजकीय पुढाऱ्याचे नातेवाईक आहेत हे आपल्याला पटकन समजू शकेल. राजू शेट्टी यांच्यासारखे एक-एक रुपया वर्गणी काढून लोकांच्या पाठिंब्यावर निवडून आलेले आणि कोणत्याही घराण्याशी संबंध नसलेले खासदार अगदी थोडे असतील.

राज्याराज्यतील तरुणाई...
एम के स्टॅलिन (तमिळनाडूचे उपमुख्यमंत्री आणि करुणानिधी यांचे पुत्र), सुखबिरसिंह बादल (प्रकाशसिंह बादल यांचे पुत्र), ओमर अब्दुल्ला (फारुख अब्दुल्ला यांचे पुत्र), नवीन पटनाईक (बिजू पटनाईक यांचे पुत्र), उद्धव ठाकरे (बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र), अजित पवार (शरद पवार यांचे पुतणे), मंत्री राणा जगजितसिंह (पद्मसिंह पाटील यांचे पुत्र), मंत्री राजेश टोपे (अंकुशराव टोपे यांचे पुत्र), भाजपचे माजी आमदार समीर मेघे (दत्ता मेघे यांचे पुत्र), देवेंद्र फडणवीस (भाजपच्या शोभाताई फडणवीस यांचे पुतणे), कॉंग्रेसचे युवराज मालोजीराजे (माजी मंत्री दिग्विजय खानविलकर यांचे जावई), जयंत पाटील (राजारामबापू पाटील यांचे पुत्र), आमदार मदन भोसले (कॉंग्रेस नेते प्रतापसिंह भोसले यांचे पुत्र), आमदार संभाजी निलंगेकर (भाजपच्या माजी खासदार रुपा निलंगेकर यांचे पुत्र आणि माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर यांचे नातू), आमदार अजित गोगटे (भाजपचे माजी आमदार गोगटे यांचे पुतणे), आमदार विनय नातू (भाजपचे माजी आमदार श्रीधर नातू यांचे पुत्र), आमदार वर्षा गायकवाड (खासदार एकनाथ गायकवाड यांच्या कन्या), आमदार रणजित कांबळे (प्रभा राव यांचे भाचे किंवा पुतणे), राधाकृष्ण विखे-पाटील (बाळासाहेब विखे-पाटील यांचे पुत्र), पूनम महाजन (प्रमोद महाजन यांच्या कन्या), धनंजय मुंडे (गोपीनाथ मुंडे यांचे  पुतणे).

पटकन डोळ्यासमोर येतील अशी ही काही नावे. पण राजकारणात घराणेशाही काही नवी नाही. स्वतः निवृत्ती घेताना आपला मुलगा, आपली मुलगी, भाचा-पुतण्या, बायको, सून, मेव्हणा किंवा आणखी जवळच्या नातेवाईकाचीच त्या जागी वर्णी लावण्याची पद्धत कॉंग्रेसच्या दरबारी राजकारणात फारशी नवी नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस हे कॉंग्रेसचेच अपत्य असल्याने ही कीड राष्ट्रवादी कॉंग्रेसला पण लागलेली आहे. भारतीय जनता पक्षही त्याच मार्गाने जाऊ लागला आहे. शिवसेनेतही बाळासाहेबांनी कार्याध्यक्षपद देताना राज ठाकरे यांना बाजूला सारुन आपले पुत्र उद्धव यांचीच निवड केली आहे.

एकूण परिस्थिती पाहिली की कोणताच पक्ष याला अपवाद ठरलेला नाही आणि यापुढे तर ठरण्याची शक्‍यताही नाही.अशा परिस्थितीत सर्वसामान्य माणूस, मध्यमवर्गीय माणूस, कोणत्याही राजकारण्याशी सूतरामही संबंध नसलेला युवक-युवती राजकारणत कधी येणार आणि त्यांना कशी संधी मिळणार हाच खरा प्रश्‍न आहे.

Friday, May 29, 2009

व्वा! व्वा!! अगाथा...


अप्रूप राष्ट्रभाषेतून शपथ घेतल्याचे...

पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या मंत्रीमंडळाचा पहिला विस्तार काही दिवसांपूर्वी पार पडला. तमिळनाडू, महाराष्ट्र आणि पश्‍चिम बंगाल या राज्यांना मिळालेलं महत्व आणि उत्तर प्रदेशातनं 21 खासदार निवडून येऊनही तिथला एकही कॅबिनेट मंत्री न करणं या गोष्टी चटकन डोळ्यात भरणाऱ्या होत्या. राहुल गांधी यांच्या जवळचे समजले जाणारे जितीन प्रसाद, सचिन पायलट, ज्योतिरादित्य शिंदे आणि प्रतीक पाटील यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालं याचंही काही जणांना अप्रूप वाटतंय. या सर्व गदारोळात मला मात्र, अधिक भावल्या त्या पूर्णो संगमा यांच्या कन्या अगाथा संगमा. वय वर्षे फक्त 28. मेघालयातल्या तुरा मतदारसंघातून त्या सलग दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. आपले वडील आणि दोन भाऊ यांच्याप्रमाणेच अगाथाही आता राजकारणात रमल्या आहेत, असं म्हणायला हरकत नाही.

मनमोहनसिंग मंत्रिमंडळातल्या किंवा आतापर्यंतच्या सर्वाधिक तरुण मंत्री ही अगाथा संगमा यांची आणखी एक ओळख. यापूर्वी कुमारी सैलजा या आतापर्यंतच्या सर्वाधिक तरुण मंत्री होत्या. नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात 1991-92 मध्ये त्यांचा पहिल्यांदा समावेश झाला होता. पण आता त्यांनी वयाची चाळिशी ओलांडली आहेत. आता हा विक्रम अगाथा संगमा यांच्या नावावर नोंदला गेलाय. पण पी. ए. संगमा यांची कन्या किंवा सर्वाधिक तरुण मंत्री यापेक्षा मला भावलेली गोष्ट म्हणजे हिंदी ही त्यांची मातृभाषा नसतानाही त्यांनी हिंदीतून घेतलेली शपथ. महाराष्ट्रातले प्रतिक पाटलांसारखे मंत्री कदाचित "इम्प्रेशन' मारण्यासाठी घाबरत घाबरत का होईना पण इंग्रजीतून शपथ घेतात. आणि दुसरीकडे मेघालयासारख्या ईशान्य भारतातल्या राज्यातून आलेली अगाथा संगमा हिंदीतून शपथ घेते, ही गोष्ट नक्कीच कौतुकास्पद आहे.

ईशान्येकडील राज्यांमध्ये (आसामवगळता) हिंदी भाषेला फारसे महत्व मिळत नाही. उलट हिंदी ही राष्ट्रभाषा असली तरी तिथल्या स्थानिक भाषांमधूनच सर्व व्यवहार चालतात. मेघालयमध्ये गारो, खासी आणि जयंतिया तीन जमाती प्रामुख्यानं अस्तित्वात आहेत. त्याशिवाय कोच, हाजॉंग, दिमासा, ह्मार, कुकी, लाखर, मिकीर, राभा आणि नेपाळी या छोट्या छोट्या जमातीही अस्तित्वात आहेत. त्यांची संस्कृती, राहणीमान आणि भाषा या विभिन्न आहेत. खासी आणि गारो याच इथल्या प्रमुख भाषा. इथं ख्रिश्‍चन धर्मियांची संख्या जवळपास 70 टक्के आहे. त्यामुळंच हिंदी ही भाषा मेघालयातल्या कोणालाही जवळची नाही. अशा परिस्थितीत अगाथा यांनी हिंदीतून शपथ घेणं हे नक्कीच अनुकरणीय आहे.

दोन वर्षांपूर्वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं गुवाहाटी इथं गेलो होतो. स्पर्धा संपल्यानंतर आम्ही मेघालयाची राजधानी शिलॉंग इथं गेलो होतो. त्यावेळी मेघालयाच्या संस्कृतीची पुसटशी का होईना पण जवळून ओळख झाली होती. आपण मुंबईतल्या फोर्ट भागात, किंवा पुण्यातल्या कॅम्प भागात किंवा पणजीतल्या एखाद्या भागात आलो आहोत की काय असं वाटावं, अशी परिस्थिती. जीन्स, टी-शर्ट, स्कर्ट-टॉप्स घातलेल्या तरुणी, शॉपिंगसाठी मोठी बाजारपेठ आणि थंडगार हवामान... कोणालाही आवडेल, असं हिल स्टेशन.

अशा या मेघालयाला त्यांची कोणतीही एक अशी राज्यभाषा नव्हती. खासी ही तिथली प्रमुख भाषा असली तरी ती बोली भाषा होती. तिची लिपी नव्हती. पण मेघालयची स्थापना झाल्यानंतर राज्यभाषा कोणती हा प्रश्‍न पडला आणि मग खासी भाषेची लिपी निश्‍चित करण्यात आली. हिंदी ही राष्ट्रभाषा असली तरी देवनागरी लिपी खासी भाषेसाठी निवडण्यात आली नाही. तर रोमन लिपीचा वापर खासी भाषा लिहिण्यासाठी करण्याचे निश्‍चित झाले. म्हणजेच सोनिया गांधी हिंदीतून भाषण करताना जसे इंग्रजीत भाषण लिहून हिंदीत वाचतात तसे. हिंदीची अशी शोचनीय परिस्थिती असताना संगमा यांनी अडखळत का होईना हिंदीतूनच शपथ घेतली, ही गोष्ट मनाला खूपच स्पर्शून गेलीय.

तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश किंवा कर्नाटकातले मंत्री इंग्रजीतूनच शपथ घेतात. दाक्षिणात्य मंत्र्यांचे (आणि नागरिकांचेही) हिंदी प्रेम आपल्या सर्वांना माहिती आहेच. त्यांना हिंदीची ऍलर्जीच नाही तर हिंदीची लाज वाटते की काय अशी शंका येण्यासारखी परिस्थिती आहे. बी. के. हॅंडिक किंवा पाला यांच्यासारखे ईशान्य भारतातले मंत्रीही त्यांचाच कित्ता गिरवतात. त्यामुळंच आपले वडिल पूर्णो संगमा यांच्याप्रमाणेच हिंदीलाच प्राधान्य देणाऱ्या अगाथा यांना सोनिया गांधी यांनीही जोरात टाळ्या वाजवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अंतःकरण किंवा विषय असे आपल्याला सोपे वाटणारे शब्द उच्चारताना त्या बराच वेळ अडखळल्या. पण तरीही न डगमगता त्यांनी हिंदी सुरुच ठेवले. त्यामुळेच सदनामध्ये उपस्थित असलेल्या प्रत्येकामध्ये अगाथा यांच्या हिंदीतून शपथ घेण्याचीच चर्चा होती.

काश्‍मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या भारतात भाषा वैविध्य आहे. प्रत्येक राज्याची संस्कृती, पेहराव, खाद्यसंस्कृती, हवामान, उत्सव आणि भाषा या गोष्टी निरनिराळ्या आहेत. पण तरीही भारताला जोडणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्यामध्ये हिंदी या भाषेचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. राज ठाकरे यांच्या पुराव्यानुसार हिंदी ही फक्त एका मताने राष्ट्रभाषा झाली असली तरी "जो जिता वोही सिकंदर' या न्यायाने तिला राष्ट्रभाषा मानावीच लागेल. हिंदी ही खऱ्या अर्थाने राष्ट्रभाषा होईल की नाही, हे कोणीच सांगू शकत नाही. पण अगाथा संगमा यांच्यासारख्या अनुभवांमुळे ही थोडासा दिलासा मिळतो इतकंच!

Sunday, May 24, 2009

मनसेने मुंबईतला अंदाज चुकविला...

महाराष्ट्रातही वातावरण फिरले...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मुंबईत प्रभाव पडेल पण तो शिवसेना-भाजपच्या उमेदवारांना पाडण्याइतका असेल याचा अंदाज नव्हता. त्यामुळेच मुंबईतला आणि पर्यायाने महाराष्ट्राचा अंदाज चुकला. मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक इथं मनसेनं युतीला दणका दिला नसता तर कदाचित मी वर्तवलेलं भाकित खरं ठरु शकलं असतं. पण राजकारणात जर-तर याला स्थान नाही. जे झालं ते मान्य केलंच पाहिजे. त्यामुळंच आपले अंदाज चुकले हे मान्य करायला मला अजिबात संकोच वाटत नाही.
धन्यवाद...

Thursday, April 30, 2009

राज्यात युतीचेच पारडे जड...


महाराष्ट्रात तरी नाकर्ते हटणार...

"मी महाराष्ट्र बोलतोय...'च्या निमित्तानं राज्याच्या विविध भागांत फिरण्याची संधी मिळाली. राज्यातल्या जवळपास 80 टक्के मतदारसंघांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये "मी महाराष्ट्र बोलतोय...'ची टीम फिरली. नागरिकांची मतं, त्यांच्या अपेक्षा आणि त्यांचा कौल जाणून घेतला. अनेक ठिकाणी मतदारांनी राजकीय नेत्यांवर कडक शब्दांमध्ये टीका केली. तर काही ठिकाणी नागरिकांनी राजकारण्यांवर बोलणं देखील टाळलं. नागरिकांशी बोलल्यानंतर आणि मतदारसंघांमध्ये फिरल्यानंतर साधारणपणे तिथला निकाल काय असेल किंवा राज्यातलं एकूण चित्र कसं असेल, याचा अंदाज येतो. तेच चित्र इथं रेखाटण्याचा प्रयत्न मी करत आहे...

अटलबिहारी वाजपेयी सरकारला घरी बसायला लावणाऱ्या 2004 च्या निवडणुकीत महाराष्ट्रानं शिवसेना-भाजप युतीला निसटती आघाडी दिली होती. त्यावेळी अनेक ठिकाणी अनपेक्षित निकाल लागले होते. बहुजन समाज पक्षाच्या उमेदवारांमुळे विदर्भात काही ठिकाणी युतीला फायदा झाला होता. वर्धा, चिमूर आणि भंडारासारख्या जागा युतीच्या पारड्यात पडल्या होत्या. तर लातूर आणि नांदेडमध्येही भगवा फडकला होता. मुंबईतल्या मतदारांनी अनपेक्षितपणे युतीला झिडकारलं होतं. मनोहर जोशी सरांसारखा नेता दादरचा समावेश असलेल्या मतदारसंघात पराभव झाला होता. त्यावेळी राज्यात कॉंग्रेस आणि भारतीय जनता पक्षाला प्रत्येकी 13 जागा मिळाल्या होत्या. तर शिवसेनेला 12 आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला नऊ जागांवर समाधान मानावं लागलं होतं. तर पंढरपूरमधल्या जागेवर रामदास आठवले हे रिपब्लिकन पक्षाच्या तिकिटावर निवडून आले होते. म्हणजेच शिवसेना-भाजप युतीला 25 तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला 23 जागा मिळाल्या होत्या.

यंदाची परिस्थिती मात्र वेगळी होती. कारण मतदारसंघांचं चित्र बदललं आहे. त्यामुळं नव्यानं अस्तित्वात आलेल्या मतदारसंघांमध्ये कोणाचं भाग्य फळफळणार आणि कोणाला गाशा गुंडाळावा लागणार, याचा काहीच अंदाज येत नव्हता. काही मतदारसंघ गायब झाले होते. काहींचा भूगोल बदलला होता. त्यामुळं नागरिकांमध्ये, राजकारणात रुची बाळगणाऱ्यांमध्ये उत्सुकता होती. अजूनही आहे. त्याचप्रमाणे गेल्या चार साडेचार वर्षांमध्ये राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचं सरकार आहे. तर केंद्रात संयुक्त पुरोगामी आघाडीचं सरकार आहे. दोन्ही ठिकाणी एकाच आघाडीचं सरकार असल्यामुळं राज्य आणि केंद्रातल्या सरकारांनी राबविलेल्या योजना, त्यांची कार्य या गोष्टींचा विचार मतदानावर निश्‍चितपणे होणार आहे. दोन्ही सरकारांची कामगिरी मतदारांवर निश्‍चित प्रभाव टाकणारी आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतकऱ्यांना मिळालेली कर्जमाफी, शेतकऱ्यांचे सातबारे कोरे करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेनं उभारलेलं आंदोलन, मनसेचा मराठीसाठीचा लढा, मुंबईवर झालेला अतिरेकी हल्ला, वाढती महागाई आणि राज्यात सर्वत्र असलेली वीज-पाणी-सिंचन तसंच बेरोजगारीची समस्या अशा अनेक गोष्टी मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या ठरतील, असं प्रथम दर्शनी दिसतंय. तसंच अनेक ठिकाणी स्थानिक मुद्देही प्रभावी ठरत आहेत.

विदर्भात युतीचा बोलबाला...
विदर्भाचा विचार करता गेल्या निवडणुकीच्या आकड्यांमध्ये फारसा फरक पडेल, असं वाटत नाही. काही जागांची अदलाबदल होईल पण आकडा मात्र, कायम राहण्याची चिन्हे आहेत. नागपूरमध्ये विलास मुत्तेमवार यांना पराभूत करुन बनवारीलाल पुरोहित निवडून येतील, असं स्पष्टपणे जाणवतंय. तिथं अनिस अहमद, सतीश चतुर्वेदी आणि नितीन राऊत यांनी मुत्तेमवार यांना पूर्णपणे असहकार्य केलंय. त्याचा फटका कॉंग्रेसला बसण्याची शक्‍यता आहे. रामटेक हा शिवसेनेचा बालेकिल्ला. गेल्या तीन निवडणुकांपासून इथून शिवसेनेचा उमेदवार विजयी होतोय. त्यामुळं यंदा कृपाल तुमाने यांच्यासारखा कार्यकर्ता विजयी झाल्यास आश्चर्य वाटू नये. काँग्रेसनं इथून मुकुल वासनिक यांना उमेदवारी दिलीय. पण सुलेखा कुंभारे यांच्या उमेदवारीमुळं वासनिक यांची मतं फुटतील. त्याचा फायदा तुमाने यांना होईल.
वर्ध्यातनं दत्ता मेघे यांना चांगली संधी आहे. सुरेश वाघमारे यांना भाजपच्या मतविभागणीचा फटका बसण्याची शक्‍यता आहे. अर्थात, वर्ध्यात प्रभा राव यांच्या समर्थकांनी दत्ता मेघेंना सहकार्य केलं तरच हा बदल घडू शकतो. भंडाऱ्यात नाना पटोले यांच्या बंडखोरीचा फायदा भाजपच्या शिशुपाल पटले यांना होणार असं दिसतंय. तर गडचिरोली-चिमूरमध्ये बसपच्या महाराजांची उमेदवारी भाजपच्या अशोक नेते यांच्यासाठी फायदेशीर ठरु शकते.

शिवसेनेचे आनंदराव अडसूळ अमरावतीची जागा राखतील, हे नक्की आहे. तर अडसूळ यांच्या पूर्वीच्या बुलडाणा मतदारसंघात राष्ट्रवादीचे डॉ. राजेंद्र शिंगणे आणि शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांच्यातली टक्कर काट्याची असेल. पण शिंगणे यांचं पारडं इथं जड वाटतंय. बाकी चंद्रपूरमध्ये हंसराज अहिर, यवतमाळ-वाशिममध्ये शिवसेनेच्या धडाडीच्या खासदार भावना गवळी, अकोल्यात विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे विजय जवळपास निश्‍चित आहेत. नरेश पुगलिया यांच्याविरुद्धची नाराजी आणि जोरदार लोकसंपर्क अहिर यांच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. तर हरिभाऊ राठोड यांची बंडखोरी आणि कॉंग्रेसच्या उत्तमराव राठोड यांची नाराजी गवळी यांच्यासाठी पूरक आहे. तिकडे बाळासाहेब आंबेडकर आणि बाबासाहेब धाबेकर यांच्यातल्या मतविभागणीचा फायदा धोत्रे यांनी होईल. एकूणातच विदर्भातल्या तेरापैकी 11 ते 12 जागा युतीच्या नावावर निश्‍चितपणे नोंदल्या जातील.

मराठवाड्यातही युतीच!
मराठवाड्यातल्या आठ मतदारसंघांमध्येही युतीचेच पारडे जड दिसते आहे. हिंगोलीमध्ये धक्कादायक निकाल लागू शकतो. तिथं शिवसेनेच्या सुभाष वानखेडे यांच्या उमेदवारीमुळं राष्ट्रवादीच्या केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांना पराभवाची चव चाखावी लागण्याची शक्‍यता आहे. वानखेडे यांची स्वच्छ प्रतिमा, अफाट जनसंपर्क आणि त्यांनी आमदार म्हणून केलेली कामं वानखेडे यांच्या जमेच्या बाजू आहेत. तर राज्य आणि केंद्र सरकारच्या अपयशी कामगिरीचा फटका सूर्यकांता पाटील यांना बसण्याची शक्‍यता आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभेला सव्वा ते दीड लाख नागरिकांनी लावलेली हजेरी हिंगोली मतदारसंघाच्या निकालाबाबत पुरेशी बोलकी आहे.

हिंगोलीला खेटून असलेल्या परभणीत पुन्हा एकदा भगवा फडकणार हे निश्‍चित आहे. इथं शिवसेनेनं गणेश दुधगांवकर यांना उमेदवारी दिलीय. खासदार तुकाराम रेंगे-पाटील यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिल्यामुळं हा मतदारसंघ चर्चेत आला. निवडून आलेल्या खासदारानं शिवसेनेला "जय महाराष्ट्र' करणं इथल्या मतरादांना नवीन नाही. अशोक देशमुख, सुरेश जाधव आणि आता रेंगे-पाटील. पण या सर्वांना पक्ष सोडल्यानंतरही पुन्हा शिवसेनेचाच उमेदवार इथं निवडून आला. हा मतदारसंघ शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला आहे. त्यामुळं शिवसेनेनं इथं दगड जरी उभा केला तरी तो निवडून येईल, असं म्हणतात. यंदाची निवडणूकही त्याला अपवाद असणार नाही.

मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात नांदेड जिल्हा बॅंकेचे बुडीत प्रकरण, गुरु-ता-गद्दीसाठी पैसा येऊनही त्याचे नियोजन न झाल्यामुळं लोकांचा रोष व भास्करराव खतगांवकर यांच्याबद्दलची नाराजी कॉंग्रेसचे उमेदवार खतगांवकर यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मेव्हण्याच्या विजयासाठी विशेष मेहनत घेतलीय. पण तरीही खतगांवकर यांच्या वाट्याला पुन्हा पराभव येतो की काय, अशी शंका उपस्थिती केली जातेय. तिकडे भाजपनं संभाजी पवार यांना उमेदवारी दिलीय. त्यांचा विजय झाला तर तो कॉंग्रेस आणि कॉंग्रेस उमेदवाराबद्दलच्या नाराजीमुळं असेल हे निश्‍चित.
लातूरमध्ये भाजपच्या गायकवाड यांचा विजय निश्‍चित आहे. तिथं जयवंतराव आवळे हे बाहेरचे उमेदवार आहे. त्यात ते धर्मानं ख्रिश्‍चन आहेत. दुसरीकडे भाजपचे गायकवाड हे स्थानिक उमेदवार आहेत. या मतदारसंघात लिंगायत नागरिक बहुसंख्येनं आहेत. हा समाज कट्टर हिंदू म्हणून ओळखला जातो. या गोष्टी निकालासाठी निर्णायक ठरण्याची शक्‍यता आहे. तिकडे उस्मानाबादमध्ये शिवसेनेचे प्रा. रवी गायकवाड आणि राष्ट्रवादीचे पद्मसिंह पाटील यांच्यात सरळ लढत आहे. इथली लढत काट्याची असून दोघांनाही विजयाची समान संधी आहे, असं बोललं जातंय. त्यामुळं "प्रेडिक्‍शन' करणं चुकीचं ठरेल.

युतीचा बोलबाला...
बीड, औरंगाबाद आणि जालना इथंही युतीचेच पारडे वरचढ आहे. बीडमध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे उभे आहेत. त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीनं नवोदित रमेश आडस्कर यांना रिंगणात उतरवलंय. मराठा-वंजारी अशी लढत करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीनं केला असला तरी मुंडे यांची आजवरची कारकिर्द आणि जयसिंग गायकवाड यांनी केलेला शिवसेनाप्रमुख या गोष्टी मुंडे यांच्यासाठी पूरक आहेत. मुंडे यांच्यासाठी हा खूप मोठा विजय असेल.

तिकडे औरंगाबादमध्ये शांतीगिरी महाराज उभे असले तरी औरंगाबाद हा सेनेचा आणखी एक गड आहे. तिथं खैरे यांचं बऱ्यापैकी काम आणि जनसंपर्क आहे. तसंच शांतीगिरी महाराज हे फक्त खैरे यांची मतं खातील, असं मानणं चूक आहे. शिवाय महाराज आणि बाबांना लोकप्रतिनिधीत्व करण्याची संधी देण्याची महाराष्ट्राची परंपरा नाही. त्यामुळं शांतीगिरी महाराज फारसे यशस्वी होतील, असं मला वाटत नाही. तेव्हा उत्तमसिंह पवार यांना विजयासाठी खूप झगडावं लागेल. जालन्यात विद्यमान खासदार भाजपचे रावसाहेब दानवे यांच्यापुढं औरंगाबादच्या कल्याण काळे यांचं आव्हान आहे. हा मतदारसंघ युतीचा अनेक वर्षांपासून बालेकिल्ला आहे. इथं बदल होण्याची शक्‍यता आहे आणि काळे यांचं कल्याण होणं अवघड दिसतंय.

उत्तर महाराष्ट्रात समसमान...
उत्तर महाराष्ट्रातलं प्रमुख शहर असलेल्या नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना घाम फुटलाय. त्यांनी नाशिकबाहेर पडून प्रचार केल्याचंही ऐकिवात नाही. इथं समीर भुजबळ यांच्याविरोधात मराठा समाज एकवटला असल्याचं दिसतंय. तसंच मराठा आरक्षणाला भुजबळ यांचा विरोध असल्यामुळं हा मुद्दा शिवसेनेच्या दत्ता गायकवाड यांच्यासाठी दिलासादायक ठरतोय. भुजबळ यांना मोठं होऊ न देण्यासाठी राष्ट्रवादीतलेच काही नेते कार्यरत असल्याची चर्चा ऐकायला मिळते आहे. पण तरीही भुजबळ यांनी त्यांच्या भुजातलं बळ एकवटल्यामुळं गायकवाड यांच्यासाठी ही लढत सोपी नाही.

तिकडे दिंडोरीत भाजपचे हरिश्‍चंद्र चव्हाण आणि राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळू यांच्यात "कॉंटे की टक्कर' आहे. पण राष्ट्रवादीचेच अर्जुन तुकाराम पवार हे पक्षनेतृत्वावर नाराज आहेत. त्यामुळं ते आतून चव्हाण यांना मदत करत असल्याची चर्चा कानावर येतेय. तसंच इथून माकपनं जिवा पांडू गावित यांना उभं केल्यानं धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी होणारेय. त्याचा फायदा चव्हाण यांना होईल. त्यामुळंच चव्हाण यांचं पारडं काकणभर का होईना पण सरस आहे.

जळगावात भाजपची बाजी...
जळगावातल्या दोन्ही जागा भाजपकडे जाणार हे निश्‍चित आहे. जळगाव शहरातून भाजपचे ए. टी. पाटील आणि राष्ट्रवादीचे वसंतराव मोरे यांच्यात लढत आहे. ए.टी. पाटील हे काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आले होते. त्यामुळं त्यांच्याविरुद्ध कार्यकर्त्यांमध्ये काहीशी नाराजी आहे. त्यांच्याऐवजी बी. एस. पाटील यांनी तिकिट मिळालं असतं तर ते सहज निवडून आले असते. पण नाथाभाऊ खडसे आणि सुरेशदादा जैन यांच्या ताकदीच्या जोरावर जळगावची जागा भाजप जिंकेल, असं दिसतंय. जळगाव जिल्ह्यातली रावेरची जागा भाजपसाठी सर्वाधिक सुरक्षित आहे. हा मतदारसंघ भाजपसाठी "बारामती' आहे. त्यामुळं इथून हरिभाऊ जावळे अगदी दोनशे टक्के निवडून येणार यात शंका नाही.

नंदूरबार आणि धुळे हे एकेकाळचे कॉंग्रेसचे बालेकिल्ले. पण या बालेकिल्ल्याचे बुरुज आता हळूहळू ढासळू लागले आहेत. धुळ्यात तर प्रतापदादा सोनावणे यांच्या विजयाची शक्‍यताही आहे. मालेगावचे दोन मतदारसंघ आणि सटाणा यांचा धुळे मतदारसंघात समावेश आहे. धुळ्यातले तीन आणि नाशिकमधले तीन मतदारसंघ यामध्ये येतात. निहाल अहमद यांच्या उमेदवारीमुळं कॉंग्रेसच्या अमरिश पटेल यांना फटका बसेल. या मतदारसंघात पटेल हे विकासाचा मुद्दा घेऊन उतरलेत. त्याचा त्यांना फायदा होईल. पण पटेल अमराठी आहेत, हा मुद्दाही इथं प्रभावी ठरतोय. त्यामुळं त्याचा फायदा अप्रत्यक्षपणे सोनावणे यांना होणरेय. त्यामुळं धुळ्यात यंदा परिवर्तन होण्याची शक्‍यता आहे.

नंदूरबारमध्येही माणिकराव गावित यांच्याविरोधात वातावरण आहे. तसंच राष्ट्रवादीचे नेते विजयकुमार गावित यांचे भाऊ शरद गावित यांनी उमेदवारी दाखल केल्यामुळं मतविभागणी होणारेय. त्याचा फायदा भाजपच्या डॉ. सुहास नटावदकर यांना होईल. पण आदिवासी मतांच्या जोरावर माणिकराव गावित बाजी मारतील, असं वाटतं. इथं परिवर्तन होण्याची शक्‍यता कमी आहे. पण झालंच तर आश्‍चर्य वाटायला नको.

पश्चिम मराहाष्ट्रात पवारांना धक्का?
शिर्डीमध्ये कॉंग्रेसच्या कोट्यातून जागा मिळवलेल्या रामदास आठवले यांना विजयासाठी झुंजावं लागतं की काय, अशी परिस्थिती आहे. बाळासाहेब विखे-पाटील यांनी वरुन आठवले यांचे काम करण्याचे आदेश दिले असले तरी आतून ते नक्की काय करणार हे कोणीच सांगू शकत नाही. दुसरीकडे प्रेमानंद रुपवते हे काही प्रमाणात कॉंग्रेसची मते खाणार हे देखील पक्कं आहे. दुसरीकडे भाऊसाहेब वाकचौरे हे स्थानिक आहेत आणि अनेक महिन्यांपासून त्यांनी तयारी सुरु केली आहे. त्यामुळं इथली लढत रंगतदार होईल. "ऍट्रॉसिटी'चा मुद्दा आणि दलित-सवर्ण अशा संघर्षाची पार्श्‍वभूमी लक्षात घेता आठवले यांना लढत अवघड आहे. पण आठवले यांची सीट पडली दलित समाजात वेगळा संदेश जाईल, म्हणून कॉंग्रेस-राष्ट्रवादीला जिवाचं रान करुन ही जागा जिंकून दाखवावीच लागेल. तिकडे नगरमध्ये दिलीप गांधी हे निवडून आल्यातच जमा आहेत. राजीव राजळे, तुकाराम गडाख आणि राष्ट्रवादीचे शिवाजी कर्डिले यांच्यात धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी होणार आणि गांधी सहज विजयी होणार, असं इथलं गणित आहे.

सुशीलकुमारांचे अवघड...
सोलापुरात भाजपचे शरद बनसोडे आणि कॉंग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांच्यात घमासान आहे. बनसोडे यांची खूप पूर्वीच जाहीर झालेली उमेदवारी, सुभाष देशमुख यांच्या कामाचा होणारा फायदा, मंगळवेढा मतदारसंघातल्या 22 गावांनी मतदानावर टाकलेला बहिष्कार आणि माकपच्या आडम मास्तरांनी "बसप'च्या उमेदवाराला जाहीर केलेला पाठिंबा या सर्व गोष्टी सुशीलकुमारांच्या छातीत धडकी भरवणाऱ्या आहेत. त्यामुळंच शरद बनसोडे यांनाही विजयाची संधी नक्की आहे. तिकडे माढ्यातनं शरद पवार येणार यात शंका नाही. पण त्यांचं मताधिक्‍य किती असेल हे औत्सुक्‍याचं असेल. प्रत्येक मतदारसंघातून एक लाख असे मिळून सहा लाखांनी पवारांना निवडून आणण्याचा चंग राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बांधला आहे. पण सुभाषबापूंच्या शिस्तबद्ध प्रचारामुळं तसंच सरकारविरोधातल्या नाराजीमुळं हे मताधिक्‍य दोन लाखांपर्यंत खाली आलं तर आश्‍चर्य वाटायला नको.

पुण्यातही बदल शक्य...
पुण्यात कॉंग्रेसच्या सुरेश कलमाडी यांना यंदा धक्का बसू शकतो. कॉंग्रेसचे पक्षांतर्गत विरोधक, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली असहकाराची भूमिका, भारतीय जनता पक्षाचे अनिल शिरोळे हे 96 कुळी मराठा उमेदवारी आणि कसबा पेठ, कोथरुड आणि शिवाजीनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर झालेलं मतदान या गोष्टी कलमाडी यांच्यासाठी धोकादायक आहेत. अनेक ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपला मतदान केलेलं आहे. ज्यांना कमळावर मत टाकणं जमणार नाही, त्यांनी हत्ती चालवावा, अशी पक्षांतर्गत सूचना असल्याचं ऐकू येतंय. त्यामुळं कलमाडी यांना दिल्ली दूरच दिसतेय. इथं डीएसके, रणजित शिरोळे आणि अरुण भाटिया हे सर्व मिळून पन्नास-साठ हजारांच्या वर जात नाहीत, हे ही नक्की.

बारामतीत सुप्रियाताई सुळे येणार हे सांगायला राजकीय विश्‍लेषकाची गरज नाही. तर शिरुरमधून शिवाजीराव आढळराव-पाटील यांची सीट बसणार यातही दुमत असण्याचं कारण नाही. आढळराव यांचा जिवंत संपर्क त्यांच्यासाठी फायद्याचा आहे. तिकडे मावळमधून गजानन बाबर यांची खासदारकी निश्‍चित मानली जातेय. घाटाखाली शिवसेना आणि शेकाप यांची छुपी युती बाबर यांच्या विजयात महत्वाचा वाटा उचलेल. शिवाय राष्ट्रवादीच्या आझमभाई पानसरे यांच्या उमेदवारीमुळं मतदारसंघात हिंदू-मुस्लीम या आधारे मतविभागणी होण्याची शक्‍यताही नाकारता येत नाही. त्यामुळं बाबर यांच्या नावामागं खासदार हे पद लागणार अशी चिन्ह आहेत.

राजू शेट्टी यांना संधी...
सातारा आणि दक्षिण महाराष्ट्रातल्या तीन मतदारसंघातही गमतीदार लढती आहेत. साताऱ्यात उदयनराजे निवडून येणार असले तरी सातारा आणि कऱ्हाडमधल्या राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते आणि नागरिक यांनी महाराजांच्या विरोधात कौल दिलाय. त्यामुळं शिवसेनेच्या पुरुषोत्तम जाधव यांच्या मतांची संख्या वाढून महाराजांच्या मताधिक्‍या कदाचित कमी होईल. तिकडे सांगलीत कॉंग्रेसचे प्रतीक पाटील आणि कॉंग्रेस बंडखोर अजित घोरपडे यांच्यात सरळ लढत आहे. युतीनं इथं घोरपडेंना पाठिंबा जाहीर केलाय. राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही आतून घोरपडेंचं काम करत असल्याची चर्चा आहे. त्यामुळं कॉंग्रेसचा आणि वसंतदादा घराण्याचा हा बालेकिल्ला यंदा ढासळण्याची शक्‍यता निर्माण झालीय.

कोल्हापुरात संभाजीराजे निवडून येतील, असं वातावरण जरी असलं तरी सदाशिव मंडलिक यांनी शरद पवारांना घाम फोडला यात वाद नाही. शिवाय धनंजय महाडिक आतून मंडलिक यांचं काम करत असल्याचं बोललं जातंय. त्यामुळं संभाजीराजे आणि मंडलिक यांच्यात फार अंतर असणार नाही. हातकणंगलेमधून मात्र, राजू शेट्टी यांच्या विजयाची शक्‍यता आहे. नागरिकांनी एक-एक रुपया गोळा करुन शेट्टी यांना चाळीस लाख रुपये जमा करुन दिले आहेत. तसंच शेट्टी यांची शेतकऱ्यांसाठी लढण्याची भूमिका पाहता शेट्टी यांना भरघोस मतं मिळतील आणि कदाचित ते निवेदिता माने यांना मागे टाकून दिल्लीत पोचतीलही.

कोकणात भगवाच फडकणार...
सिंधुदुर्ग-रत्नागिरी आणि रत्नागिरी-रायगड या विचित्र मतदारसंघांमध्ये दोन्ही ठिकाणी शिवसेनेचा भगवा फडकेल, असं दिसतंय. खाणी आणि प्रकल्पांच्या मुद्‌द्‌यावर नागरिक, कॉंग्रेस नेते-कार्यकर्ते नारायण राणे यांच्यावर नाराज आहेत. अनेकांनी उघड तर काहींनी छुपी भूमिका घेतलीय. सावंतवाडी, देवगड, रत्नागिरी, संगमेश्‍वर, राजापूर आणि चिपळूण भागात युतीचं पारडं जड आहे. त्यामुळं फक्त मालवण, कणकवली आणि वेंगुर्ला यांच्या जोरावर निलेश राणे खासदार होणं अवघड आहे. शिवाय डॉ. सुरेश प्रभू यांची शांत-संयमी-अभ्यासू प्रतिमा आणि त्या तुलनेत निलेश राणे यांचं उथळ नेतृत्व हे मुद्दे निवडणुकीत निर्णायक ठरतील.

वरती अनंत गीते हे बॅरिस्टर अब्दुल रेहमान अंतुले यांना धूळ चारल्यावाचून राहणार नाहीत. दापोली, मंडणगड, गुहागर आणि श्रीवर्धन हे युतीचे बालेकिल्ले . तिकडे अलिबाग आणि पेणमध्ये शिवसेनेला शेकापची साथ आहे. शिवाय 26-11 नंतर अंतुले यांनी केलेली बडबड त्यांच्या अंगाशी आली नाही तरच नवल. इथं कॉंग्रेसच्या प्रवीण ठाकूर यांनी केलेली बंडखोरीही गीते यांच्याच पथ्यावर पडेल. एकूण काय तर अनंत गीते पुन्हा दिल्लीत पोचतील, असं दिसतंय.

शिवसेनेचे ठाणे राहणार का?
ठाणे मतदारसंघ आता पूर्णपणे बदलला आहे. नवी मुंबईत गणेश नाईक यांचं असलेलं वर्चस्व, कल्याण-डोंबिवली यांचं ठाण्यातून वगळणं आणि विजय चौगुले यांची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी या सर्व गोष्टी शिवसेनेसाठी धोकादायक आहेत. पण ठाणे हा हिंदुत्ववाद्यांचा बालेकिल्ला आहे. तिथं उमेदवार कोणीही असला तरी कमळ किंवा धनुष्यबाण यांच्यापलिकडे मतदार जात नाहीत. शिवाय ऐरोली हा विजय चौगुले यांचे "होमपिच'. शिवाय मंदा म्हात्रे, मीरा-भाईंदरचे गिल्बर्ट मेंडोसा, मुझफ्फर हुसेन, नवी मुंबईचे कॉंग्रेसचे नामदेव भगत ही मंडळी गणेश नाईक यांचे पारंपरिक विरोधक. या गोष्टी शिवसेनेला दिलासादायक आहेत. पण मनसेचे राजन राजे यांच्या उमेदवारीमुळं शिवसेनेला धोका निर्माण झालाय. ते जर अधिक चालले तर चौगुले यांचा विजय दुरापास्त वाटतो. पण आजवरचा इतिहास पाहिला आणि एकनाथ शिंदे यांचे राजकीय कसब पाहिले तर चौगुले निवडून येतील, असं आता तरी वाटतंय.

कल्याणमध्ये आनंद परांजपे निवडून येतील. कल्याण, डोंबिवली आणि अंबरनाथच्या जोरावर ते बाजी मारणार हे नक्की. पालघरमध्ये भाजपच्या चिंतामण वनगा यांचा मार्ग सोपा आहे. भाई ठाकूर यांनी उभा केलेल्या उमेदवारामुळं कॉंग्रेसच्या दामू शिंगडा यांची मते फुटणार आणि त्याचा फायदा वनगा यांना होईल, असं दिसतंय. त्यामुळं पालघरमध्ये बदल निश्‍चित दिसतोय.

तिकडे नव्यानं अस्तित्वात आलेल्या भिवंडीमध्ये सध्या तरी काहीच सांगता येत नाही. गेल्यावेळी कल्याणमधून (विधानसभेला) उमेदवारी नाकारण्यात आलेल्या जगन्नाथ पाटील यांना भाजपनं उमेदवारी दिलीय. तर कुणबी सेनेच्या विश्‍वनाथ पाटील यांनीही इथं उमेदवारी दाखल केलीय. शिवसेनेचे आमदार योगेश पाटील यांनी भाजपला मतदारसंघ सोडण्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. या सर्व गोष्टींचा फटका भाजपलाच बसणार आहे. पण भाजपसाठी दिलासादायक म्हणजे कॉंग्रेसच्या सुरेश टावरे यांच्याविरोधात त्यांच्याच पक्षाच्या आर आर पाटील यांनी केलेली बंडखोरी. पाटील हे समाजवादी पक्षाच्या तिकिटावर रिंगणात उतरले आहेत. त्यामुळं इथली लढत रंगतदार होईल. अगदी शेवटपर्यंत काय होईल, काहीच सांगता येणार नाही.

मुंबईत यंदा परिवर्तन...
गेल्या वेळी युतीला फक्त एक खासदार देणाऱ्या मुंबईतून यंदा युतीचे किमान चार खासदार निवडून येतील असं दिसतंय. राम नाईक, किरीट सोमय्या, गजानन किर्तीकर आणि मोहन रावले हे युतीचे उमेदवार निवडून येण्याची दाट शक्‍यता आहे. अर्थात, ईशान्य मुंबईत संजय पाटील तसेच मनसेचे शिशिर शिंदे आणि दक्षिण मुंबईत मनसेच्या बाळा नांदगांवकर यांनी जोरदार आव्हान उभं केलंय. बाकी ठिकाणी मनसेचे उमेदवार नावाला आहेत.

शिरीष पारकर हे उत्तर मुंबईत राम नाईक यांची मतं घेणार हे नक्की असलं तरी त्यांचा फारसा फटका नाईकांना बसणार नाही. शिवाय संजय निरुपम यांच्या रुपानं कॉंग्रेसचा दुबळा उमेदवार नाईक यांच्यासमोर आहे. त्यामुळं नाईक यंदा दिल्ली गाठणार असं दिसतंय. तिकडे आबू आझमी यांच्या उमेदवारीमुळं गजाभाऊंचा मार्ग सुकर झालाय. तसंच स्थानिक लोकाधिकार समितीच्या माध्यमातून केलेली काम गजाभाऊंना उपयोगी पडणारेत. गुरुदास कामत यांच्यासाठी हा मतदारसंघ नवीन आहे. ते बाहेरचे आहेत, असाही प्रचार होतोय. त्यामळं कामत यांच्यावर घरी बसण्याची वेळ येणारेय.

प्रिया दत्त ही कॉंग्रेसची एकमेव सीट निश्‍चित आहे. दलित, मुस्लिम आणि उत्तर भारतीय मतदारांच्या प्राबल्यामुळं महेश जेठमलानी यांची डाळ इथं शिजणार नाही आणि ते "केस' हरतील, असं दिसतंय. दक्षिण मध्य मुंबईतून माहिमचे आमदार सुरेश गंभीर आणि खासदार एकनाथ गायकवाड यांच्यात "टसल' आहे. दादर, माहिम, वडाळा, सायन हे शिवसेनेचे बालेकिल्ले, शिवाय धारावीतही त्यांना काही प्रमाणात मते मिळतील. या जोरावर त्यांनी गायकवाड यांच्यासमोर जोरदार आव्हान उभं केलंय. पण उर्वरित ठिकाणी चेंबूर, धारावी आणि अणुशक्तीनगर इथं एकनाथ गायकवाड यांना मिळणारं मताधिक्‍य गंभीर यांना मोठ्या प्रमाणावर तोडावं लागेल. तरच ते जिंकतील.
दुसरीकडे ईशान्य मुंबईतही कॉंटे की टक्कर आहे. मुलुंड, घाटकोपर आणि विक्रोळी इथं युतीला भरभरुन मतदान होणार. तर भांडुपमध्ये संजय पाटील जरा जास्त चालतील. मराठी मतांच्या जोरावर आणि होमपिच मुलुंडमुळं शिशिर शिंदे यांनाही थोडाफार फायदा होईल. त्यामुळं तेही इथं आव्हान निर्माण करतील. पण गुजराती मतांच्या जोरावर सोमय्या यांचेच पारडे इथं जड वाटतंय.

मनसेनं जोरदार हवा निर्माण केली असली तरी मराठी मतदार सूज्ञ आहे, हे ठाणे, पुणे, मुंबई आणि नाशिकमधल्या महापालिका निवडणुकीत सिद्ध झालंय. याठिकाणी मराठी मतांची विभागणी फार मोठ्या प्रमाणावर झाली नव्हती. त्यामुळं मनसेची जितकी हवा होती तितके त्यांचे उमेदवार निवडून आले नाहीत. अर्थात, त्यानंतर मनसेनं अनेक आंदोलनं करुन त्यांचा "बेस' वाढविला. पण ठोस कार्यक्रम नसल्यानं मतदार त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर वळतील, असं वाटत नाही. किमान लोकसभेसाठी तरी. विधानसभेला गणित वेगळी असू शकतात.

एकूण काय तर राज्यात शिवसेना-भाजप युतीची हवा असून जवळपास ३० ते ३२ जागा युतीला मिळू शकतात. तर उर्वरित १६ ते १८ ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी विजयी ठरेल. शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यंदाच्या निवडणुकीत बराच मोठा पल्ला मारेल, असं वाटत होतं. पण पवार यांच्या खात्याबद्दल असलेली नाराजी आणि सरकारविरोधी वातावरण यामुळं गेल्या निवडणुकीतला नऊचा आकडा गाठण्यासाठीही त्यांना झगडावं लागेल असं दिसतंय.
राज्यातील संभाव्य विजेते
1) दक्षिण मुंबई - मोहन रावले (सेना)
2) दक्षिण मध्य मुंबई - एकनाथ गायकवाड (कॉं) किंवा सुरेश गंभीर (सेना)
3) उत्तर मध्य मुंबई - प्रिया दत्त (कॉं)
4) वायव्य मुंबई - गजानन किर्तीकर (सेना)
5) ईशान्य मुंबई - किरीट सोमय्या (भाजप)
6) उत्तर मुंबई - राम नाईक (भाजप)
7) ठाणे - विजय चौगुले (सेना)
8) कल्याण - आनंद परांजपे (सेना)
9) भिवंडी - सुरेश टावरे (कॉं) किंवा जगन्नाथ पाटील (भाजप)
10) पालघर - चिंतामण वनगा (भाजप)
11) रायगड-रत्नागिरी - अनंत गीते (सेना)
12) रत्नागिरी-सिंधुदुर्ग - सुरेश प्रभू (सेना) किंवा निलेश राणे (कॉं)
13) कोल्हापूर - छत्रपती संभाजीराजे (राष्ट्रवादी)
14) हातकणंगले - राजू शेट्टी (अपक्ष) किंवा निवेदिता माने (राष्ट्रवादी)
15) सांगली - अजित घोरपडे (अपक्ष)
16) सातारा - उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी)
17) पुणे - अनिल शिरोळे (भाजप)
18) बारामती - सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी)
19) मावळ - गजानन बाबर (सेना)
20) शिरुर - शिवाजीराव आढळराव-पाटील (सेना)
21) माढा - शरद पवार (राष्ट्रवादी)
22) सोलापूर - शरद बनसोडे (भाजप) किंवा सुशीलकुमार शिंदे (कॉं)
23) अहमदनगर - दिलीप गांधी (भाजप)
24) शिर्डी - रामदास आठवले (रिपब्लिकन) किंवा भाऊसाहेब वाकचौरे (सेना)
25) नाशिक - रत्नाकर गायकवाड (सेना) किंवा समीर भुजबळ (राष्ट्रवादी)
26) दिंडोरी - हरिश्‍चंद्र चव्हाण (भाजप)
27) धुळे - प्रतापदादा सोनावणे (भाजप)
28) नंदूरबार - माणिकराव गावित (कॉं)
29) जळगाव - ए. टी. पाटील (भाजप)
30) रावेर - हरिभाऊ जावळे (भाजप)
31) बुलडाणा - राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी) किंवा प्रताप जाधव (सेना)
32) अकोला - संजय धोत्रे (भाजप)
33) यवतमाळ-वाशिम - भावना गवळी (सेना)
34) अमरावती - आनंदराव अडसूळ (सेना)
35) वर्धा - दत्ता मेघे (कॉं) किंवा सुरेश वाघमारे (भाजप)
36) नागपूर - बनवारीलाल पुरोहित (भाजप)
37) रामटेक - कृपाल तुमाने (सेना)
38) भंडारा-गोंदिया - शिशुपाल पटले (भाजप)
39) गडचिरोली-चिमूर - अशोक नेते (भाजप) किंवा मारोतराव कोवासे (कॉं)
40) चंद्रपूर - हंसराज अहिर (भाजप)
41) नांदेड - संभाजी पवार (भाजप) किंवा भास्करराव पाटील (कॉं)
42) हिंगोली - सुभाष वानखेडे (सेना) किंवा सूर्यकांता पाटील (राष्ट्रवादी)
43) परभणी - गणेश दुधगांवकर (सेना)
44) बीड - गोपीनाथ मुंडे (भाजप)
45) लातूर - सुनील गायकवाड (भाजप)
46) उस्मानाबाद - पद्मसिंह पाटील (राष्ट्रवादी) किंवा प्रा. रवी गायकवाड (सेना)
47) औरंगाबाद - चंद्रकांत खैरे (सेना)
48) जालना - रावसाहेब दानवे (भाजप)
भाजप (निश्‍चित) - 16
शिवसेना (निश्‍चित) - 12
कॉंग्रेस (निश्‍चित) - 2
राष्ट्रवादी (निश्‍चित) - 4
अपक्ष - 1
संदिग्ध - 13