Saturday, December 24, 2011

एकच अटलजी...

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...


भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा आज वाढदिवस. २५ डिसेंबर. राजकारणी असूनही ते सर्वांपेक्षा वेगळे आहेत. कवी, रसिक आहेत. त्यामुळेच राजकारणी असूनही ते गेंड्याच्या कातडीचे नेते नाही. विरोधी पक्षातील लोकही त्यांच्याबद्दल अपशब्द बोलण्याची हिंमत करीत नाही. अटलजी आप अच्छे हैं लेकिन आपकी पार्टी गलत है... एक अटलजी बाकी सब शटलजी, फक्त इतकीच माफक टीका विरोधक करायचे. त्यामुळेच अटलजी हे अटलजी आहेत. त्यांची सर कोणत्याही नेत्याला येणार नाही. म्हणूनच आज ते सक्रिय राजकारणात नसले आणि चर्चेत नसले तरी वाजपेयी यांचे कोट्यवधी चाहते आहेत. त्यांच्यावर प्रेम करणारे लाखो लोक आहेत. लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात. मावळत्या सूर्याला कोणीही नमन करीत नाही. पण वाजपेयींचा करिष्मा इतका आहे, की आजही त्यांचा प्रभाव चाहत्यांवर टिकून आहे. मीही त्यापैकीच एक.

काल के कपाल पर लिखता मिटाता हूँ
गीत नया गाता हूँ, गीत नया गाता हूँ...

या कवितेप्रमाणेच अटलबिहारी वाजपेयी यांचे आयुष्य होते. अटलजींचा जन्म एका सर्वसामान्य शिक्षकाच्या घरी झाला. २५ डिसेंबर १९२४. अटलजींचे वडील कृष्णबिहारी हे शिक्षक होते. आपल्या पोरानं तेव्हा प्रतिष्ठेची असलेली सरकारी नोकरी करावी, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. मुलाला एक वर्षे जास्त नोकरी करता यावी, यासाठी त्यांच्या वडिलांनी अटलजींची जन्मतारीख १९२४ ऐवजी १९२५ अशी लिहिली. पण काळाच्या पोटात काय दडले आहे, ते कोणालाच ठाऊक नसते. मग ते कृष्णबिहारी यांना तरी कसे ठाऊक असणार. आपला पोरगा सरकारी नोकरी करणार नाही तर चक्क सरकार चालविणार आहे, हे कोणाला ठाऊक असणार. पण अटलजींनी स्वतःच्या नेतृत्व, कर्तृत्व आणि वक्तृत्त्वाच्या जोरावर जे काही साध्य केले, ते सर्वांनाच अचंबित करणारे आहे.

अटलजी म्हणजे वक्तृत्तवाचा अमोघ झरा आणि निर्मळ मनाचा मनुष्य. विषय कोणताही असो त्यावर अभ्यासपूर्ण आणि लोकांची मने जिंकेल, असे भाषण हे अटलजींचे वैशिष्ट्य. मग विषय गीतरामायणाचा असो, भारत-चीन संबंध असो, पंडित जवाहरलाल नेहरू असो किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक श्री गुरुजी असो... अटलजींच्या मुखातून अक्षरशः सरस्वती बोलते आहे, असाच प्रत्यय यायचा. त्यामुळेच अटलजींचे जिथे कुठे भाषण असेल तिथे जाऊन ते ऐकायचे किंवा टीव्हीवर असेल तेव्हा कान तृप्त होईपर्यंत ऐकायचे, हे अगदी लहानपणापासून सुरु होतं. भाषणाला अगदी थोडा जरी उशीर झाला तरी ‘मैं देर से आया हूँ लेकिन बहोत दूर से आया हूँ’ हा अटलजींचा डायलॉग अगदी ठरलेला. तो त्यांनी प्रत्येकवेळी जरी म्हटला तरी त्यांच्या हिंदीमध्ये जी मिठास होती, ती कानावर पडली की टाळ्याच वाजायच्या. वक्तृत्त्वाच्या जोरावरच अटलजींनी हजारो सभा जिंकल्या.

माझ्यासारखे कोट्यवधी नागरिक त्यांच्या भाषणाचे चाहते आहेतच. पण भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे देखील वाजपेयींच्या भाषणांचे चाहते होते. वाजपेयी त्यावेळी अगदी युवा खासदार होते. त्यामुळे त्यांना भाषणाची संधी शेवटी शेवटी मिळे. पण परराष्ट्र धोरण आणि इतर कोणत्याही महत्त्वाच्या मुद्द्यांवर अटलजींचे भाषण ऐकण्यासाठी पंडितजी आवर्जून उपस्थित रहायचे. इंग्रजीत हिरेन मुखर्जी आणि हिंदीत अटलबिहारी वाजपेयी हे माझे आवडते वक्ते आहेत, असे खुद्द नेहरू यांनी म्हटल्याचे उल्लेख सापडतात. अशी वाजपेयींच्या वाणीची मोहिनी होती.


सुषमा स्वराज यांच्या पुढाकारातून जेव्हा लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज थेट दूरदर्शनवर पाहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली तेव्हापासून तर वाजपेयींच्या भाषणाची पर्वणी अधूनमधून मिळतच गेली. १९९६ साली भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्त्वाखाली पहिल्यांदा केंद्रात सरकार आले. पण ते अवघे १३ दिवसच टिकले होते. त्यावेळी अटलजींनी राष्ट्रपतींकडे राजीनामा देण्यापूर्वी लोकसभेत केलेले भाषण अजूनही कानात आहे.

‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड करण्याचा प्रश्नच येत नाही. १९७७ मध्येही जनता पक्षाचे सरकार असताना हाच मुद्दा उपस्थित झाला होता. तेव्हाही आमची भूमिका तीच होती आणि आजही तीच आहे. संघाशी आमचे असलेले संबंध जगजाहीर आहेत आणि ते नाकारण्याचा संबंधच नाही. आमच्याकडे बहुमत नाही आणि बहुमतासाठी घोडेबाजार करण्याचा किंवा आपल्या विचारांशी प्रतारणा करण्याची आमची तयारी नाही. त्यामुळेच मी राष्ट्रपतींकडे राजीनामा देण्यासाठी निघालो आहे... ’ असे अगदी ठामपणे सांगणारे वाजपेयी आजही अगदी जशेच्या तसे डोळ्यासमोर आहेत. त्यानंतर त्यांना दोनदा भारताचे पंतप्रधान होण्याची संधी भारतीयांनी दिली. कदाचित १९५२ पासून एकाच विचारांशी निष्ठा बाळगल्याबद्दल तमाम भारतीयांनी त्यांना दिलेले हे बक्षिसच होते.

सी. के. जाफर शरीफ हे नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात रेल्वेमंत्री होते. त्यावेळी कोणत्या तरी विषयावरून संघाचा मुद्दा उपस्थित झाला. त्यावेळी जाफर शरीफ त्यांच्या भाषणात म्हणाले होते, की लहानपणी मी संघात जायचो. पण आता माझा संघाशी काहीही संबंध नाही. तेव्हा माझ्यावरही संघाचे संस्कार झालेले आहेत, असे तुम्ही म्हणाल का? त्यावर वाजपेयी यांनी क्षणाचाही विलंब न करत उत्तर दिले होते, वन्स अ स्वयंसेवक इज ऑलवेज अ स्वयंसेवक... त्यामुळे तुम्ही आजही संघाचे स्वयंसेवक आहात, असेच संघ मानत असेल. वाजपेयींच्या या उत्तरानंतर जाफर शरीफ यांची अवस्था काय झाली असेल, त्याचा अंदाज आला असेलच.

कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या गीता मुखर्जी यांचे निधन झाल्यानंतर त्यांना श्रद्धांजलनी वाहणारी भाषणे लोकसभेत सुरु होती. त्यावेळी वाजपेयी यांनी कम्युनिस्ट नेत्याचे भरभरून केलेले कौतुक अविस्मरणीय असेच आहे. वाजपेयी म्हणाले होते, की गीता मुखर्जी यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर कम्युनिस्ट पक्षाचाच कोणतरी उमेदवार निवडून येईल. तो त्यांची जागा घेईल. पण एक चांगल्या संसदपटू आणि अभ्यासू वक्त्या म्हणून आमच्या हृदयामध्ये त्यांची जी जागा आहे, ती कोण घेणार. असे एक ना दोन असंख्य प्रसंग आणि त्यांच्या वक्तृत्वाचे शेकडो किस्से इथे सांगता येतील. अशी त्यांची शैली होती.

अटलजी त्यांच्या भाषणांमधून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर कडाडून टीका करीत असत. प्रसंगी त्यांच्यावरही जोरदार आसूड ओढत. पण बांग्लादेशच्या युद्धात पाकिस्तानला नामोहरम केल्यानंतर अटलजींनी इंदिरा गांधींचा उल्लेख दुर्गा असा केला होता. आपल्या विरोधकांचेही प्रसंगी कौतुक करण्याचा दिलदारपणा त्यांच्यात होता. त्यामुळेच विरोधी पक्षांमध्येही त्यांचे मित्र होते. चंद्रशेखर तर त्यांना माझे राजकीय गुरु असेच म्हणायचे. अशी अटलजींची महती होती, आहे आणि राहणार.



अटलजी कविमनाचे असले तरी देशाचे नेतृत्व करताना त्यांचे हे कविमन आड आले नाही. पोखरणमध्ये ११ आणि १३ मे रोजी केलेले अणुस्फोट असोत किंवा कारगिलमध्ये पाकिस्तानला चारलेली धूळ असो, अटलजींचा कणखरपणाच वेळोवेळी दिसून आला. त्यांनी कधीच कोणाचीही भीडभाड बाळगली नाही. मग ते नरेंद्र मोदी का असेना. हिंदू तन मन हिंदू जीवन रग रग हिंदू मेरा परिचय... ही संघ परिवारातील कट्टर हिंदुत्ववाद्यांची आवडती कविता करणारे अटलजी हळव्या मनाचे असले तरी ते प्रसंगी कठोरही होत. भिवंडीत उसळलेल्या दंगलीनंतर त्यांनी संसदेत भाषण करताना ‘अब हिंदू मार नही खाएगा,’ असे ठणकावून सांगितले होते. पण वाजपेयी हे आंधळे किंवा झापडबंद हिंदुत्वावादी नाहीत. मुळात ते अडवाणी किंवा उमा भारती यांच्यासारखे कडवे तर नाहीतच. एकदम खुल्या दिलाचे आणि विचारांचे आहेत. त्यामुळेच गोध्रा दंगलीनंतर ‘राजधर्माचे पालन करा’ असे मोदींना निक्षून सांगण्याची हिंमत त्यांनी दाखविली. ती कदाचित आजही भाजपच्या कोणत्याही नेत्याकडे किंवा संघाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याकडे नाही.

दुसरीकडे प्रमोद महाजन यांनाही त्यांनी एका फटक्यात जमिनीवर आणले होते. त्यावेळी महाजन हे अटलजींचे डावे-उजवे दोन्ही हात होते. त्यामुळेच त्यांच्याकडे विज्ञान-तंत्रज्ञान आणि दूरसंचार अशी अगदी महत्त्वाची खाती होती. प्रमोद महाजन म्हणजे पीएम. भाजपचे पुढील प्राईम मिनिस्टर असे त्यांचे वर्णन केले जायचे. त्यावेळी महाजनांनी एका जाहीर सभेत सोनिया गांधी यांची तुलना बिल क्लिंटन यांचे संबंध असलेल्या मोनिका ल्युवेन्स्की हिच्याशी केली होती. त्यावेळी वाजपेयी यांना ही हीन दर्जाची टीका अजिबात रुचली नव्हती. योग्य ती वेळ साधून वाजपेयी यांनी महाजनांची दोन्ही खाती काढून घेतली होती, तसेच त्यांना पक्षाचे सरचिटणीस म्हणून काम करण्याची सूचना केली होती. मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या निवडणुकीची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. आपल्या जवळचा वगैरे असा विचार करून त्यांनी दोषी व्यक्तीला पाठिशी घातले नाही.

तीनवेळा भारताचे पंतप्रधान होणारे वाजपेयी हे एकमेव गैरकाँग्रेसी नेते. पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी या काँग्रेसच्या नेत्यांना ही संधी मिळाली होती. पण गैरकाँग्रेसी नेत्यांच्या स्वप्नातही येणार नाही, अशी कामगिरी वाजपेयी यांनी करून दाखविली. अर्थात, वैचारिकदृष्ट्या भाजपशी किंवा संघ परिवाराशी आयुष्यात कधी जमले नाही, अशा चंद्राबाबू नायडू, जॉर्ज फर्नांडिस, जयललिता, ममता बॅनर्जी, मायावती आणि फारूख अब्दुल्ला यांच्यासारख्यांची मोट वाजपेयी यांनी बांधली आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्त्वाखालील सरकार केंद्रात आणले. वाजपेयी राजकारणातून निवृत्त झाले आणि भाजपच्या नेतृत्त्वाची काय वाताहत झाली आहे आणि कोणकोणत्या राजकीय पक्षांनी त्यांची साथ सोडली आहे, हे सर्वज्ञातच आहे. त्यामुळे भाजपची सत्ता येण्यात वाजपेयी यांचे किती महत्त्वाचे योगदान होते, हेच यावरून स्पष्ट होते.

पुण्यातही १९९८ च्या लोकसभा निवडणुकीत पुणे विकास आघाडीच्या सुरेश कलमाडी यांना भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने पाठिंबा दिला होता। त्यावेळी त्यांच्या विरोधात अविनाश धर्माधिकारी यांनी निवडणूक लढविली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन कार्यवाह आणि धर्माधिकारी यांचे सासरे अनंतराव गोगटे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लेटरहेडवर एक पत्र प्रसिद्ध करण्याचा मुद्दा त्यावेळी खूप चर्चेत आला होता.

संघाच्या स्वयंसेवकांवर कोणत्याही विशिष्ट उमेदवाराचे काम करण्याचे बंधन नसते, असा त्या पत्राचा आशय होता। म्हणजे संघाच्या लोकांनी धर्माधिकारी यांचे काम करावे, हा त्यातील छुपा अर्थ. पण फक्त अटलजींच्या एका शब्दावर भाजपच्या निष्ठांवत मतदारांनी धर्माधिकारी नव्हे तर कलमाडींना मत टाकले होते आणि धर्माधिकारी यांना अवघ्या ३५ हजार मतांवर समाधान मानावे लागले होते.

असे वाजपेयी २५ डिसेंबर २०११ मध्ये ८८ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. प्रकृती अस्वाथ्यामुळे आज अटलजी जरी समोरच्या व्यक्तीला ओळखण्याच्या किंवा त्याच्याशी बोलण्याच्या परिस्थितीत नसले ते आहेत, हाच त्यांच्या चाहत्यांना दिलासा आहे. वाजपेयींवर ईश्वराची कृपादृष्टी कायम रहावी, अशीच त्याच्याकडे प्रार्थना.

Tuesday, November 29, 2011

श्री गुरुदेव दत्त संतप्त...


दत्त दत्त दत्ताची गाय, गायीचं दूध... या गाण्यामुळे आधीच चर्चेत आलेला देऊळ नावाचा चित्रपट काही दिवसांपूर्वी पाहिला। एका चांगल्या आणि जळजळीत विषयाला तोंड फोडल्याबद्दल कुलकर्णी बंधूंचे सर्वप्रथम अभिनंदन.

मध्यंतरी शिर्डीला गेलो होतो. शिर्डीचा जो बाजार झालाय तो पाहून भाव, भक्ती किंवा श्रद्धा या गोष्टी शे-पाचशे रुपयांना अगदी सहज मिळू शकतात, हे जाणवलं. शिर्डीचे साईबाबा काय, तिरुपतीचा बालाजी काय, प्रभादेवीचा सिद्धीविनायक काय, आणि कुठले कुठले देव काय. सगळेच भक्तीचे भुकेले. पण त्या मंदिरांच्या ट्रस्टचे काम पाहणारी मंडळी मात्र, वेगळ्याच भावाचे भुकेले असतात. त्यामुळेच काही हजार रुपये मोजले, की तातडीचे दर्शन. थोडे कमी पैसे दिले, की आणखी जास्त वेळ. अशा गुणोत्तराने दर्शनाची वेळ वाढत जाते. अगदी सर्वसामान्य म्हणून जो भक्त असतो, तो तासन्तास दर्शनाच्या रांगेत उभा आणि पैसेवाली मंडळी दोन मिनिटांच दर्शन घेऊन मोकळे. चहापासून ते राहण्यापर्यंत सर्वच गोष्टी दामदुपटीने विकून भक्तगणांना चक्क लुटणारी मंडळी आणि भक्तीचा मांडलेला बाजार. डोकं उठतं. त्यावर कोणी ना कोणी तरी आसूड ओढणे गरजेचेच होते. ते काम कुलकर्णी द्वयांनी केले. त्याबद्दल मनापासून अभिनंदन.

चित्रपटाचे संवाद एक नंबर आहेत. त्याबद्दल गिरीश कुलकर्णी यांना शंभरपैकी दोनशे मार्क दिले पाहिजेत. चित्रपटातील संवादामुळेच तो पाहणेबल झाला आहे. अन्यथा प्रेक्षकांवर किती अत्याचार झाले असते त्याचा विचारच करता येत नाही. काही ठिकाणी पातळी सोडल्याचे जाणवते. उदा. ठासली जाणे, गोट्या कपाळात जाणे इइ. पण इतके चालणारच.

पण चित्रपटाबद्दल सर्वाधिक महत्त्वाचा आक्षेप म्हणजे निवडण्यात आलेला देव। देवाची निवड चुकलीच म्हणायची. कारण गुरुदेव दत्त हा देव अजूनही बाजारापासून दूर आहे. नरसोबाची वाडी, गाणगापूर, गोंदवलेकर महाराज, स्वामी समर्थ, नवनाथ किंवा शेगांवचे गजानन महाराज या सर्वांचा बाजार मांडलेला नाही. खरीखुरी भक्ती तिथं अजूनही टिकून आहे. शिर्डीला जा आणि एकदा शेगांवला जा. दोन्हीमधला फरक वर्णन न करता येण्याजोगा आहे. शिवाय दत्त या देवाची ख्याती वेगळी असल्यानं त्याच्या वाटेला शक्य तो कोणी जात नाही. गुरुचरित्र वाचायलाही काही नियमावली असते. ती पूर्ण केली नाही तर गुरुचरित्राचे फायदे मिळत नाहीत. असा हा कडक देव. त्यामुळं दत्ताचा बाजार मांडण्याचे धाडस अजूनही कोणी केलेले नाही. खरा बाजार झालाय तो फकीर म्हणून आयुष्य काढलेल्या साईबाबांचा. महागड्या बालाजीचा आणि सिद्धीविनायकाचा.

वरीलपैकी कोणत्या तरी एकाही देवाविरुद्ध चित्रपट काढला असता तर तो थिएटर आणि मल्टिप्लेक्समध्ये चढण्यापूर्वीच त्याचा बाजार उठला असता. म्हणूनच, की काय कुलकर्णी द्वयांनी दत्त या साध्या भोळ्या आणि शांत देवाचा बाजार मांडून चूकच केली. किंवा त्यांच्यात खराखुरा बाजार झालेल्या देवांची कथा खरं तर व्यथा मांडण्याची हिंमत नसावी, इतकाच निष्कर्ष आपण काढू शकतो. शेवटी संस्कृतमध्ये म्हटलेच आहे,
वाघाचा सिंहाचा बळी दिला जात नाही। बोकडाचाच बळी दिला जातो. कारण तो शांत असतो, प्रतिकार करू शकत नाही. तसाच दत्ताचा बळी या चित्रपटात देण्यात आला आहे.

दुसरी खटकणारी गोष्ट म्हणजे, चित्रपटात झालेली कलाकारांची बजबजपुरी। दिलीप प्रभावळकर, नाना पाटेकर, सोनाली कुलकर्णी यांच्यापासून ते विभावरी देशपांडे, उषा नाडकर्णी, मोहन आगाशे, किशोर कदम आणि स्वतः गिरीश कुलकर्णी यांच्यापर्यंत बऱ्याच नटनच्यांचा गोतावळा चित्रपटांत जमविण्यात आला आहे. पण त्यामुळेच कोणत्याच नटाची छाप त्यामध्ये पडत नाही. दिलीप प्रभावळकर सुद्धा तीन-चार प्रसंगांमधूनच दिसतात. त्यांचे अगदी थोडेच संवाद प्रभावी आहेत. प्रभावळकर आणि नाना यांचा म्हणावा तसा उपयोग चित्रपटात झालेलाच दिसत नाही. कदाचित गिरीश कुलकर्णी यांची भूमिका त्यांच्या भूमिकेपुढे दुबळी वाटू नये, म्हणूनच दोघांनाही तोंडी लावण्यासाठी घेतले, की काय असे वाटते. तसे जर असेल तर तो त्यांचा अपमानच म्हटला पाहिजे.



हे दोन झाले प्रमुख आक्षेप। बाकी दिग्दर्शनाचे म्हणाल, तर अनेक पुरावे देता येतील. मुख्य म्हणजे गावांतल्या झेंडावंदनाच्या कार्यक्रमानंतर लागलेले जयोस्तुते हे गाणे. भारतातील तमाम शाळांमध्ये तिरंगा फडकल्यानंतर राष्ट्रगीत म्हणजे जन गण मनच लागते. वंदेमातरम लाही अजून तो मान मिळालेला नाही. त्यामुळे जयोस्तुते लावणे चूकच आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे माझे लाडके राष्ट्रपुरुष आहेत. जयोस्तुते हे उत्तम गीतही आहे. पण राष्ट्रगीताची जागा ते घेऊ शकत नाही. त्यामुळे इतकी गंभीर चूक होऊनही एकाही चित्रपट परीक्षकाने त्यावर बोट ठेवलेले नाही, याचे आश्चर्यच वाटते. आता गाणे घाईगडबडीत चुकून लागले आहे, असे दिग्दर्शकाला दाखवायचे असेल तर तो संदेश अजिबात पोहोचत नाही.

नंतर खटकणारी गोष्ट म्हणजे सकाळी गिरीश कुलकर्णीला मंदिरात प्रवेश मिळत नाही। सुरक्षारक्षक त्याला हाकलवून लावतात. मग रात्रीच्या वेळी गिरीश कुलकर्णीला मंदिरात प्रवेश कसा मिळतो आणि तो मंदिरातील दत्ताची मूर्ती चोरून पळून कसा जातो, या चमत्काराची कथा प्रेक्षकांना अजिबात कळत नाही. गिरीश कुलकर्णी हे दत्ताची मूर्ती कसा चोरतो, हे जर अधिक स्पष्टपणे दाखविले असते, तर मायबाप प्रेक्षकांवर उपकार झाले असते, असे ऍज अ प्रेक्षक म्हणून वाटते हं.

नंतर गिरीष कुलकर्णी जेव्हा दत्ताची मूर्ती पाण्यात बुडवितो तेव्हा ती पाण्यावर तरंगताना दाखविली आहे. मंदिरात मूर्तीची प्रतिष्ठापना करतात, तेव्हा एक तर ती मूर्ती दगडाची असते, संमगरवरी असते, प्लॅस्टर ऑफ पॅरिसची असते किंवा शाडूची असते. चित्रपटात दाखविलेली दत्ताची मूर्ती पाण्यावर तरंगताना दाखविली आहे. म्हणजे ती फायबरची असावी असे दिसते. दत्ताचे देवस्थान जर जागृत असेल तर तिथे फायबरची मूर्ती असूच शकत नाही. शिवाय मूर्तीचे विसर्जन करताना पाणी खळखळत असते पण नंतर ते अचानक शांत होते, असे दृष्यातून दिसते. खूप मोठ्या चुका आहेत, असे नाही. पण उघड्या डोळ्यांनी पाहिले तर जाणवते. तेव्हा कुलकर्णी मंडळींनी पुढील वेळी या बारीकसारीक गोष्टींचा जरूर विचार करावा.

ज्या गावामध्ये पोस्टमनही येत नाही, त्या गावात दिलीप प्रभावळकरच्या घरी इंटरनेट पोहोचलेले असते, दत्ताची प्रतिष्ठापना झाल्यानंतर पत्रकार किशोर कदम महासंग्राममधून आयबीएन लोकमतमध्ये पोहोचतो, हा विरोधाभास न पटण्यासारखा आहे. शिवाय काही दृष्यांमध्ये फिल्टर वापरून रात्र करण्याची चोरी जाणकार मंडळींच्या लगेच लक्षात येते.

चित्रपटात काही गोष्टी उगाच घुसडल्यासारख्या वाटतात। पहिली म्हणजे वेलकम राया ही लावणी कम आयटम साँग. आता त्यात निवडलेली आयटम इतकी बकवास आहे, की झक मारली आणि लावणी पाहिली, असे वाटते. गायिकेचा आवाज आणि लावणीचे शब्द सोडले तर लावणीत मादकता अजिबात नाही. प्लॅस्टिकचा बॉल आणि प्लॅस्टिकची बॅट काय, नाईट क्रिकेट काय, उचलून मारा, हळूवार मारा, अलगद मारा... ही म्हणजे अकलेची दिवाळखोरी वाटते. प्रेक्षक खिळवूनच ठेवायचे असेल तर एखादे सेक्स साँग किंवा कॅब्रे डान्सच टाकायचा ना. साईड साईडने कशाला खेळता. थेटच भिडा.

तीच गोष्ट नाना पाटेकर आणि सोनाली कुलकर्णी यांच्या सागरगोट्यांच्या दृष्याची. अजिबात आवश्यकता नसलेले आणि सोनाली कुलकर्णीला गुरुदेव गच्च दाखविणारे ते उठवळ दृष्य असेच प्रेक्षकांना चळवायला चित्रपटात घेतले आहे, की काय अशी शंका येते.

जाता जाता आणखी एक। नसिरुद्दीन शाह यांचा विनाकारण घुसडलेला प्रसंग। मुळात त्या प्रसंगाची आवश्यकता काय, की मोठा कलावंत मराठीत आणण्याचा अट्टहास, याचे उत्तर मिळत नाही. करडीच्या पायाला झालेली दुखापत तसेच नसिरुद्दीनच्या पायाला झालेली दुखापत, यातून दिग्दर्शकाला काय दाखवायचे आहे, हे समजत नाही. करडीच नसिरुद्दीन शहाच्या रुपाने तिथे आलेली असते, असे तर सुचवायचे नाही ना. तसे जर असेल तर हा अंधश्रद्धा पसरविण्याचाच प्रकार आहे. म्हणजे एका वाईट बाजूवर कोरडे ओढायचे आणि आपणच दुसरी वाईट बाजू उचलून धरायची, असे झाले. दिग्दर्शकाला त्या प्रसंगातून काय दाखवायचे हे समजत नाही. पण मी म्हणतो, तसे दाखवायचे असेल तर एक हजार वेळा निषेध.

तेव्हा अशा काही सुधारणा झाल्या असत्या तर देवळात अधिक प्रसन्न वाटले असते. बाकी देवा तुला शोधू कुठे आणि दत्त दत्त दत्ताची गाय ही गाणी एकदम झक्कास. एका चांगल्या विषयाला भिडल्याबद्दल अभिनंदन.

Tuesday, November 15, 2011

चार हजार कोटींची भीक मागणारा

उधळ्या उद्योगपती

भारतातील क्रमांक दोनची एअरलाईन्स सेवा असलेल्या किंगफिशरचे विमान जमिनीवर आदळले आहे. चार हजार कोटी रुपयांचा संचित तोटा किंगफिशर एअरलाईन्सला झाला असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे कंपनीची गेल्या काही दिवसांपासून उड्डाणे रद्द करण्यात येत आहेत. किंगफिशरचा शेअरही धपकन उतरला आहे. कर्जाची परतफेड करता येत नाही, म्हणून ज्या बँकांनी त्यांचे शेअर्स ताब्यात घेतले, त्या बँकाची चांगल्या धास्तावल्या आहेत. कारण शेअरचे भाव गडगडल्यामुळे त्यांची किंमत खूप कमी झाली आहे. प्राप्त परिस्थितीत कंपनीला आणि कर्मचाऱ्यांना वाचविण्यासाठी सरकारने आम्हाला बेल आऊट पॅकेज देण्यात यावे, अशी मागणी मद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी केली आहे।

मुळात, असे पॅकेज देण्यात यावे किंवा कसे, याबाबत भारताचे मुखदुर्बळ पंतप्रधान आणि स्वतः अर्थतज्ज्ञ असूनही सामान्यांना महागाईच्या खाईत लोटणारे डॉ. मनमोहनसिंग काय निर्णय घेतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. टूजी तसेच राष्ट्रकुल घोटाळ्याप्रकरणी हाताची घडी तोंडावर बोट ठेवणारे पंतप्रधान याबाबत तोंड उघडतात की नेहमीप्रमाणे मौनीबाबा होतात, यावर अब्जावधी रुपयांचा सट्टा लागला आहे, असे नुकतेच ऐकिवात आले आहे.

असो. आजचा विषय तो नाही. मुख्य प्रश्न आहे, मद्यमहर्षि विजय मल्ल्या यांना अशी आर्थिक मदत करावी, की नाही. मुळात मल्ल्या यांची एकूण लाईफस्टाईल पाहता त्यांची कंपनी तोट्यात येणार हे सांगायला मनमोहनसिंग यांच्यासारख्या अर्थतज्ज्ञाची आवश्यकता नाही. अगदी फुटकळ माणूसही ते छातीठोकपणे सांगू शकला असता. मुळात आपली औकात नाही, तर शंभर गाढवं अंगावर घ्यायची कशाला. झेपतंय तेवढंच करावं. पण मल्ल्या यांना हे कोण सांगणार।

पूर्वी फक्त बिअर व दारुपुरताच किंगफिशर हा ब्रँड मर्यादित होता. पण नंतर हवाई उद्योगात प्रवेश करतानाच मल्ल्या यांनी स्वतःचा बडेजाव मिरवित फॉर्म्युला वनची भारतीय टीम विकत घेतली. आयपीएलमध्ये बेंगळुरुची टीम खरेदी केली. त्यापूर्वीर्ही काही वर्षे त्यांनी परदेशातून टिपू सुलतानची तलवार अब्जावधी रुपये मोजून ताब्यात घेतली. त्यानंतर ते राजकारणात शिरले आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या तिकिटावर राज्यसभेतही पोहोचले।

टिपू सुलतानची तलवार हे एकवेळ समजू शकतो. मुळात तो लोकांच्या भावनेचा विषय होता आणि त्यासाठी मल्ल्या यांनी साडेतीन ते चार अब्ज रुपये मोजले होते. तेही स्वतःच्या खिशांतून. उद्या छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार भारतात आणण्यात येणार असेल तर त्यासाठी मराठी माणूस कितीही पैसे मोजू शकतो. त्यामुळे टिपू सुलतानची तलवार भारतात आणण्यासाठी खर्च केलेले पैसे हा विषय वेगळा आहे. त्याचा इतर दोन गोष्टींची संबंध जोडण्याची आवश्यकता नाही।

राहता राहिला मुद्दा फोर्स वनची टीमचा आणि बेंगळुरुच्या संघाचा. मल्ल्या यांनी साडेपाचशे कोटी रुपयांच्या आसपास रक्कम मोजून बेंगळुरुची टीम खरेदी केली. तर मल्ल्या यांनी मायकेल मोल यांच्याशी भागीदारीमध्ये साधारण साडेसहाशे कोटी रुपये खर्च करुन फोर्स वन ही एफ वन रेसमधील भारतीय टीम खरेदी केली. दरवर्षी त्यावर होणारा खर्च किंवा इतर गोष्टींच्या तपशीलामध्ये जाण्याची आवश्यकता नाही. अगदी स्पष्टच बोलायचे झाले, तर भारतामध्ये फॉर्म्युला वन रेस लोकप्रिय असली तरी फारशी रुजलेली नाही. नरेन कार्तिकेयन आणि करुण चंडोक ही दोन नावे सोडली तर भारतात त्या रेसमध्ये सहभागी होऊ शकेल असा एकही एफ वन ड्रायव्हर नाही. फोर्स वनचे दोन्ही ड्रायव्हर्स परदेशी आहेत. त्यामुळे मल्ल्या यांनी फोर्स वन टीम खरेदी करुन भारताची शान वाढविली असे काही क्षण जरी वाटत असले तरी त्यांनी हरणाऱ्या घोड्यावर पैसे लावले आहेत. त्यामुळे त्यांनी स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारुन घेतली असून ज्यात तोटात तोटा दिसतो आहे, तिथे पैसा लावला आहे।

प्रत्येक वेळी मल्ल्या यांची प्रतिमा राष्ट्रीय पातळीवर अधिकाधिक मोठी झाली असली तरी मल्ल्या यांची झोळी रिकामी होत गेली आहे. मल्ल्या यांनी हाच पैसा पद्धतशीरपणे किंगफिशरमध्ये लावला असता तर त्यांच्यावर ही वेळ ओढविलीच नसती, हे सांगायला मॉन्टेकसिंग अहलुवालिया यांची आवश्यकता नाही. दोन्ही कंपन्या वेगळ्या आहेत, इकडचा पैसा तिकडे कसा फिरविणार वगैरे आक्षेप असू शकतात, पण टूजीचे हजार कोटी इकडे तिकडे फिरविणाऱ्या मंडळींना हे पैसे फिरविण्याइतके अर्थज्ञान नक्कीच असू शकेल. तेव्हा मल्ल्या यांनी आधीपासूनच जर योग्य व्यवसाय केला असला तर हवाई वाहतुकीच्या धंद्यासाठी केंद्र सरकारपुढे भिकाऱ्यासारखे हात पसरण्याची वेळ आली नसती.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सुरेश कलमाडी यांना मर्सिडिजमधील भिकारी म्हणाले होते. त्या धर्तीवर मल्ल्या यांना विमानवाला भिकारी म्हटले पाहिजे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, समजा तुम्हाला धंदा चालविता येत नसेल तर धंदा बंद करुन टाका. विमानसेवा कंपनीला टाळा लावा आणि दारुचा महापूर वाढवून कसा पैसा ओढता येईल, याच्या नव्यानव्या कल्पना शोधून काढा. पण धंदा तुमचा आणि पैसा सरकारचा (पर्यायाने लोकांचा) हा आतबट्ट्याचा व्यवहार सांगितला कोणी. त्यामुळेच भारतीय जनता पक्ष आणि डाव्या पक्षांनी बेल आऊट पॅकेज देण्यास विरोध केला आहे.

आता चार हजार कोटी रुपयांचे बेल आऊट पॅकेज मिळाले तर मल्ल्या यांची चांदीच आहे. दोन-पाच वर्षांत ते पैसेही फुकून पुन्हा एकदा भिकाऱ्यासारखे सरकारपुढे हात पसरायला मोकळे. काही वर्षांपूर्वी सहारा एअरवेज ही कंपनी तोट्यात आली होती. ती नरेश गोयल यांच्या जेट कंपनीने विकत घेतली. त्याच धर्तीवर मल्ल्या यांनी त्यांची किंगफिशर कंपनी फुकून टाकावी आणि मोकळे व्हावे, म्हणजे सरकारपुढे वारंवार हात पसरण्याची वेळच ओढविणार नाही. तेव्हा मुळातच सरकारने किंगफिशरला बेल आऊट पॅकेज वगैरे देण्याच्या फंदात पडूच नये. आणि जरी अशाप्रकारे पॅकेज देण्याचा निर्णय घ्यायचा विचार सरकारने केला तरी त्याबदल्यात संपूर्ण किंगफिशर कंपनी ताब्यात घ्यावी.

मात्र, जर कंपनी आणि कामगार वाचविण्यासाठी बेलआऊट पॅकेज वगैरे जाहीर केले, तर सरकारपुढे महासंकटच उभे राहिल. भारतीयांची मानसिकता लक्षात घेता, भविष्यात आणखी काही कंपन्या स्वतःला दिवाळखोर जाहीर करुन पैसे लाटण्यासाठी नक्की पुढे येतील, यात वाद नाही. शिवाय, आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी किंवा शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी पैशांची मदत करायला वर्षानुवर्षे लावणारे सरकार मद्यमहर्षी विजय मल्ल्या यांच्या कंपनीला तातडीने मदत देऊ लागले तर सरकारच्या दळभद्रीपणाचा कळसच होईल, असे म्हणावे लागेल.

समिती बसवा, चर्चा करा, आढावा घ्या, तज्ज्ञांना आढावा घेण्यास सांगा, असे न करु नका. तेव्हा मनमोहना, आता तरी तोंड उघडा आणि मल्ल्यांना स्पष्ट शब्दात नाही म्हणा. नाही तर तुम्ही तुमच्या अगम्य इंग्रजीत तोंडातल्या तोंडात नाही म्हणाल आणि मल्ल्या मात्र, सरकारच्या मदतीच्या अपेक्षेत राहतील. तेव्हा खणखणीत नकार द्या आणि विषयाचा तुकडा पाडा.

Sunday, October 02, 2011

जळू बाई जळू, कोपऱ्यात पळू...


जळू बाई जळू, फोटोंचा प्रतिसाद पाहून जळू...
सुचली नाही आयडिया म्हणून दूर दूर पळू...
.
बँकेत, शाळेत, ऑफिसात, देवळी एकच रंग दिसावा
मटाच्या रंगामध्ये अवघा परिसर न्हाऊन निघावा
.
नवरंगच्या प्रतिसादामुळे पोटात लागले दुखू
एकच रंग पाहून लोकांचे डोळे लागले फिरु
.
मग सकाळी सकाळी कोणा आयडिया सुचे छान
म्हणे, जा बाबा जा दुसरे फोटो काढून तरी आण
.
'भगवान से भी नही लगता' अशा ठिकाणी लागला कॉल
वेगवेगळ्या रंगाच्या साड्यांनी भरुन गेला होता सारा हॉल
.
मग काय साहेब झाले भलतेच खूष
'सप्तरंगी' साड्यांचे फोटो काढले खूप खूप
.
नवरंगातल्या पैठणीपुढे 'सप्तरंगी' दिसे जनता साडी
कोत्या वृत्तीच्या मनांची दूरच होत नाही अढी
.
खुन्नस देण्यासाठीची आयडिया कशी आली अंगाशी
पुणेकरांच्या लक्षात आली असली फालतू मखलाशी
.
दास म्हणजे लोका, करु नका दुसऱ्यांची नक्कल
कल्पनांचा असेल दुष्काळ तर बदाम खा बक्कळ
.
मटाच्या नवरंगांना पुणेकरांनी आपलेसे केले
जळूबाई जळू फक्त हात चोळत बसले
.
जळू बाई जळू, फोटोंचा प्रतिसाद पाहून जळू...
सुचली नाही आयडिया म्हणून दूर दूर पळू...

Saturday, October 01, 2011

‘डबल सिक्स’ची सिक्सर

आता फक्त आयफोन...

अरे, आता तरी मोबाईल बदल. राजा केळकर संग्रहालयात ठेवण्याच्या लायकीचा अँटिक पीस झालाय तुझा डबल सिक्स डबल झिरो... हा कुठला बाबा आदमच्या काळातला मोबाईल वापरतोयस... गेल्या दोन-तीन वर्षांपासून अशा किंवा समानार्थी स्वरुपाचे संवाद अनेकदा झडतात. कशाला तो जुना पिस जपून ठेवलाय. जग कुठं चाललंय आणि तू अजूनही जुनाट मोबाईल वापरतोय. इइ.





आता हे संवाद आठवण्याचं कारण म्हणजे माझ्या ६६०० ला यंदाच्या ऑगस्टमध्ये तब्बल सहा वर्षे पूर्ण झाली. डबल सिक्स डबल झिरोनं सिक्सर मारल्यामुळं हा ब्लॉगप्रपंच. आयुष्यामध्ये ३३१५, ई टीव्हीनं दिलेला सॅमसंगचा मोबाईल आणि नोकियाचा ३११५ हे मोबाईल येऊन गेले. पण टिकला आणि मनात बसला तो ६६००च. त्यामुळं सहा वर्षे उलटली तरी माझ्या त्याच्यावर जडलेला जीव कमी व्हायला तयार नाही. कारण अनेक आठवणी आणि किस्से त्याच्याशी जोडलेले आहेत. त्यामुळं कंजूस आणि चिंगूस अशी विशेषणं मला आणि लक्सचा साबण, वीट आणि ठोकळा अशी विशेषणं मोबाईलला चिकटल्यानंतरही मी ६६००ची साथ सोडलेली नाही. अर्थात, मोबाईल सहा वर्षानंतरही एकदम टकाटक आहे. आता थोडंसं नाजूकपणे हाताळावं लागतं. पण बाकी सगळं उत्तम.


ई टीव्ही (मुंबई) सोडून पुण्यात सकाळ जॉईन केलं आणि तेव्हा नवा मोबाईल आणि नवं कार्ड घ्यावं लागलं. त्यावेळी नोकियाचा डबल सिक्स डबल झिरो हा लेटेस्ट मोबाईल बाजारात आला होता. त्यात फोटो काढणं, व्हिडिओ शूट करणं, ब्लू टूथ, इन्फ्रारेड, जीपीआरएस वगैरे अद्ययावत ऍप्लिकेशन्स असल्यामुळं घ्यायचा तर हाच हे निश्चित केलं होतं. म्हणजे आता ब्लॅकबेरीची वगैरे जी क्रेझ आहे तेव्हा ती डबल सिक्स डबल झिरोची होती. त्यामुळं घ्यायचा तर तोच हे ठरलं होतं. मार्केटमध्ये लाँच झाला तेव्हा त्याची किंमत सोळा-अठरा हजार रुपयांच्या आसपास होती. मग काही महिन्यांनी ती अकरा-बारा हजारांवर आली. ६६०० डोक्यातच बसला होता. अखेरीस मोठ्या हिंमतीनं ६६०० ची खरेदी झाली.





मी महाराष्ट्र बोलतोय... च्या दौऱ्यावर असतानाचा फोटो


साडेअकरा हजार रुपयांच्या आसपास किंमत पडली. बरं, तेव्हा ६६०० वर उड्या पडत असल्यामुळं वशिला लावून टेलिफोन शॉपीमधून मोबाईल घ्यावा लागला होता. परममित्र योगेश ब्रह्मे आणि मी दोघांनी एका महिन्याच्या अंतरानं मोबाईल घेतला. साडेअकरा हजारांचा मोबाईल ही त्यावेळी उधळपट्टी होती. (खरं तर साडेअकरा हजार ही किंमत आजही उधळपट्टी या कॅटेगरीमध्ये मोडणारीच आहे.) त्यामुळं तीर्थरुपांनी आमची अक्कलही काढली. इतका मोबाईल घ्यायची काय गरज आहे, त्याला काय सोनं लागलं आहे वगैरे वगैरे. पण हा संवाद झडेपर्यंत मोबाईल खरेदी झाली होती. त्यामुळं तीर्थरुपांचं बोलणं ऐकून घेण्यापलिकडं हातात काही नव्हतं. असो.

गेल्या सहा वर्षांमध्ये फक्त दोनच वेळा मोबाईल दुरुस्तीसाठी द्यावा लागला. व्हायरस शिरल्यामुळं चार वर्षांपूर्वी आणि दुसऱ्यांदा म्हणजे अगदी चार महिन्यांपूर्वी. बाकी मोबाईल एकदम जबरदस्त. पूर्वी ६६०० एकदम रफ अँड टफ होता. आता वयोपरत्वे (मोबाईलच्या) त्याला अधिक नाजूकपणे हाताळावं लागतं. एसएमएस टाईप करताना किंवा बटण दाबताना अगदी हलक्या हातानं करावं लागतं. इतकी वर्षे साथ दिलेल्या मोबाईलवर लिहायला हवं, असं मनात आलं म्हणून ब्लॉग लिहायला घेतला. फक्त ६६००च नाही तर नोकियाच्या इतर मोबाईलचा माझा अनुभव असाच आहे. ६६०० चं वैशिष्ट्य असं, की सहा वर्षे तो राहिला. बाकीचे मोबाईल दोन-तीन वर्षांनंतर दुसऱ्याला वापरायला दिले. अजूनही ते व्यवस्थित सुरु आहेतच. (फक्त सध्या माझ्याकडं नाहीत.) त्यामुळंच मी एकदम नोकिया लॉयल आहे.

आता ब्लॅकबेरी आणि ऍपलचे दिवस आहेत. मोबाईलवरच ई-मेल, फेसबुक, ट्विटर वगैरे पाहता येऊ शकतं. त्यामुळं गल्लीतल्या मायक्रोमॅक्सपासून ते अमेरिकेतल्या आयफोनपर्यंत सर्वांनीच या सुविधा द्यायला सुरुवात केली आहे. या सुविधाच मोबाईलचा यूएसपी ठरला आहे. अनेकदा मनात येतं, की आपणही ६६०० ऐवजी दुसरा एखादा चांगला आणि अपडेटेड व्हर्जनचा मोबाईल घ्यावा. पण अजून मन होत नाही. मध्यंतरी एका गॅलरीत आयफोन पाहिला आणि आता तो माझ्या डोक्यात गेला आहे. घ्यायचा तर आयफोनच घ्यायचा. पण त्याची किंमत डोळे फिरविणारी आहे. अशा परिस्थितीत आयफोन नाही तर कोणताच मोबाईल नाही, या निर्णयाप्रत मी आलो आहे. नोकियानं आयफोनची कॉपी करुन जर एखादा कमी किंमतीचा फोन काढला तर तो घेण्याचा पर्यायही पुढे येऊ शकतो. पण मार्केट डाऊन झालेली नोकिया कंपनी असं काही करेल, असं वाटत नाही. तेव्हा आयफोन परवडेपर्यंत मायफोन एकदम उत्तम.

Sunday, August 14, 2011

बस कहर चले, जब आवे सिंघम...

आईच्च्या गावात पिक्चर...


दक्षिणेतले चित्रपट खूप लाऊड असतात, अगदी अंगावर येतात, काहीही दाखवतात इइ टीकास्त्र सोडून साऊथ इंडियन सिनेमा इंडस्ट्रीला शिव्यांची लाखोली वाहणाऱ्या प्रेक्षकांनीच सिंघमला भरभरून दिलेला प्रतिसाद हा काव्यगत न्यायच म्हटला पाहिजे. वास्तविक पाहता, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी ही हिंदीच्या पाचशे वर्षे पुढे आहे. चित्रपटांचे विषय असो, टेक्नॉलॉजी असो, चित्रीकरणाचे स्पॉट्स असोत, चित्रपटावर होणारा खर्च असो किंवा रजनीकांत तसेच चिरंजिवी यांचे कोटीच्या कोटी मानधन असो. हिंदी चित्रपटसृष्टी दक्षिणेच्या पासंगालाही नाही. रजनीकांतचे सिनेमे पाहण्यासाठी पहाटे चार-चार वाजल्यापासून लोकं लायनी लावून तिकिटं खरेदी करतात, पहाटे चारचा शोदेखील हाउसफुल्ल होतो. चिरंजीवीच्या चित्रपटाची तिकिटं काढण्यासाठी प्रचंड गर्दी होऊन चेंगराचेंगरीत तीन-चार लोक मरतात. ही प्रचंड लोकप्रियता हिंदीतील एकाही अभिनेता किंवा अभिनेत्रीला मिळालेली नाही. त्यामुळेच साऊथ इंडियन (विशेषतः तमिळ आणि तेलुगू) इंडस्ट्री खतरनाक आहे.

अगदी सत्या, रोजा, बॉम्बेपासून ते अलिकडच्या काळातील चंद्रमुखी, शिवाजी द बॉस, गजनी आणि रोबोपर्यंत सर्वच चित्रपट साऊथमधून हिंदीत आलेले. हिंदी चित्रपट करणारी मंडळी चोऱ्यामाऱ्या करुन तर चित्रपट काढतात. कधी साऊथची स्टोरी चोर कधी हॉलिवूडचा चित्रपट स्वतःच्या नावावर खपव, असं करत तर त्यांचं आयुष्य सुरु आहे. अगदी संगीतकारापासून ते कथालेखकापर्यंत सर्वच मंडळी (मधुर भांडारकर, विशाल भारद्वाज, आशुतोष गोवारीकर असे अपवादवगळता) उचल्या कॅटॅगरीतील आहेत. असो.
सिंघम हा साऊथचा सिनेमा मराठी कलाकारांसह हिंदीमध्ये हिट्ट झाल्यामुळं अगदी मनापासून आनंद झाला. खूप दिवसांनंतर चांगला डोक्याला ताप न देणारा पिक्चर पाहिल्याचं समाधान मिळालं. तुमच्या आमच्या सर्वांच्या मनातील चिड चित्रपटातून पहायला मिळाली. वास्तविक पाहता, अशा घटना भारतीय लोकशाहीमध्ये कधीच घडू शकणार नाही. सिस्टीम आणि नियम फाट्यावर मारुन अपप्रवृत्तींचा खात्मा करणारे पोलीस भारतात कधीच आढळणार नाहीत. भारतात शेतकऱ्यांवर, आंदोलकांवर गोळीबार करणारे पोलीस सापडतील. जैतापूरला मिळतील, मावळात दिसतील, अमरावतीत दिसतील, पुणे जिल्ह्यातील माणमध्ये दिसतील. पण गुंड प्रवृत्ती मोडून काढणारे पोलीस धुतल्या तांदळात खड्यासारखे. त्यामुळे भारतात असा पोलीस अधिकारी वास्तवात असणे, अगदी अशक्य.


हीच गोष्ट साऊथच्या चित्रपटांमध्ये हेरली जाते. गावातला सावकार, जमीनदार, गुंडा, शहरातील डॉन किंवा महानगरातील माफिया, भ्रष्ट राजकारणी सर्वसामान्यांना नाडत असतात. पैसे चारल्याशिवाय काहीच कामं होत नाहीत. पोलीस आणि प्रशानसही हलत नाही. मग सर्वसामान्यांच्या मदतीला हिरो धावून येतो आणि सगळ्या सिस्टीमच्या विरोधात जाऊन सामान्य लोकांचा तारणहार बनतो. ही बहुतांश चित्रपटांची कथा. अभिनेते, ठिकाण, पात्र, विषय, भाषा बदल जाते. पण मूळ गाभा कायम. सिस्टीमविरोधात पेटून उठण्याचा. असे चित्रपट पाहून सामान्यांनाही थोडा धीर येतो. च्यामारी आपल्या आयुष्यातही असा सुपरहिरो येईल आणि सारं चित्र बदलेल, या आशेवर त्याचे तीन तास मजेत जातात. सिंघमही त्याच पठडीतला.

अजय देवगणसारखा सुपरहिरो. त्याला त्याच्याच गावात पोस्टिंग मिळतं, हा मोठा जोक. शिवाय नंतर महाराष्ट्रातला पोलीस अधिकारी गोव्यामध्ये ट्रान्सफर होऊन जातो, ही आणखी एक न कळलेली गोष्ट. अजय देवगणचा पोलीस चौकीत केस रजिस्टर न करता परस्पर सोडविण्यावर भर असतो. अर्थात, परस्पर सांमजस्यानं. पोलीस केस रजिस्टर न करता क्राईम रेट कमी दाखविण्याचा प्रयत्न करतात, हे पटू शकतं. पण अजय देवगण करतो, ते पटू शकत नाही. पोलीस इन्स्पेक्टर डीसीपीच्या अंगावर धावून जातो, पोलीस महासंचालकाला सुनावतो, मंत्र्याच्या ढुंगणावर लाथा मारतो, सर्व पोलिसांना बोल बच्चन देऊन त्यांचे ब्रेन वॉशिंग करतो, या गोष्टी कशा पटतील. बाबांनो, ही लोकशाही आहे. ठोकशाही नाही. पण साऊथच्या चित्रपटांमध्ये असे प्रश्न पडू द्यायचे नसतात. डोकं बाजूला ठेवायचं आणि निवांत एन्जॉय करायचं.

सिंघममधील फाईट्स, डायलॉग आणि प्रकाशराजचा (जयकांत शिक्रे) अभिनय या सर्व गोष्टी लाजबाव. एखाद्या चित्रपटात व्हिलन, त्याचा ज्युनिअर मेन हिरोला खाऊन टाकतो, असं कधी पाहिलंय का. पण सिंघममध्ये प्रकाशराज प्रत्येक शॉटला अजय देवगणला खाऊन टाकतो. अगदी आईच्या गावात, आता माझी सटकली रे, आली रे आली आता माझी बारी आली, कुछ भी करने का लेकीन जयकांत शिक्रे का इगो हर्ट नही करने का, वेलकम टू गोवा अशा एक से बढकर एक डायलॉगमधून प्रकाशराज प्रेक्षकांना खूष करुन टाकतो. त्याची काम करण्याची स्टाईल, बोलण्याची पद्धती यावर तमाम पब्लिक एकदम फिदा. तो सगळ्यांना खाऊन टाकतो. चित्रपटाच्या शेवटी शेवटी पोलीस जेव्हा त्याला पकडण्यासाठी येतात तेव्हा प्रकाशराज जिवाच्या आकांतानं पळत असतो. त्यावेळी पळता पळता प्रकाशराज पुतळ्यापाशी जे काही झोपतो तो शॉट तर जगात एक नंबर आहे. हसूनहसून आपण अक्षरशः लोळतो. पहिल्यापासून शेवटपर्यंत तोच खाऊन टाकतो.

चित्रपटाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गाड्यांची उडवाउडवी आणि तुफान मारामारी. अशा पद्धतीची मारामारी फक्त साऊथच्याच चित्रपटांमध्ये दिसते. एक हिरो आणि पन्नास गुंड. गुंडांकडे हॉकी स्टीक्स, लाठ्याकाठ्या, चेन्स, चाकू, गावठी कट्टे यांच्यापासून ते एके-56 पर्यंत सगळं काही. हिरो मात्र, निशस्त्र. पण तरीही तो सगळ्यांना पुरुन उरतो. हे फक्त चित्रपटांमध्येच शक्य आणि तेही साऊथच्याच. एकापाठोपाठ सात-आठ गाड्या उगाचच व्हिलनच्या गाडीमागून जात असतात, हे शॉटही साऊथच्या चित्रपटांमध्ये कायम दिसणारे. गाड्या उडवाउडवीची स्टाईल रोहित शेट्टीची. हे सगळं गुळपीट एकदम जुळून आलंय ते सिंघममध्ये. त्यामुळंच सिंघमला तुडुंब प्रतिसाद मिळतोय.

खरं तर असे चित्रपट मंगला, अलका, निलायम, विजय अशा चित्रपटगृहातून पाहण्यासारखेच. टाळ्या, शिट्या, शिव्या आणि फुल्ल कल्ला अशा वातावरणात चित्रपटा पाहण्याची मजा काही औरच. आम्ही सिटीप्राईड कोथरुडला पाहिला. आईशप्पथ तिथंही फुल्ल कल्ला. आजूबाजूच्या प्रेक्षकांचा काहीही विचार न करता आम्हीही त्यात सहभागी. फुल टू धम्माल. मला जेजे भेटले त्यांनी सिंघम पाहिलाच आहे. पण ज्यांनी नाही पाहिला त्यांनी नक्की पहावा. सिडीवर घरी पाहू नका. फुल्ल कल्ला होणाऱ्या थिएटरमध्ये जाऊन पहा. नाही तर माझी सटकेल...

Thursday, July 14, 2011

दळभद्री नालायकांनो



भारतात काय स्पिरीटचा कारखाना आहे...

नेमेचि येतो मग पावसाळा या धर्तीवर आता भारतामध्ये नेमेचि होतात मग बॉम्बस्फोट अशी पद्धत सुरु झाली आहे. भारतात कुठे ना कुठे तरी बॉम्बस्फोट होतात. मग कधी जयपूर, कधी वाराणसी, कधी पुणे, कधी दिल्ली, कधी सुरत, कधी बेंगळुरू, कधी अहमदाबाद, कधी गुवाहाटी आणि नेहमी मुंबई.

बॉम्बस्फोट होतात, मग नेहमीप्रमाणे एनआयएचे पथक स्फोटाला भेट देते. सर्व पुरावे गोळा करते, मग गृहमंत्री येतात. कधी पॅण्ट सांभाळतात कधी लुंगी सांभाळणारे असतात. तो येऊन लोकांना उगाच अक्कल शिकवतात. उगाचच बाहेर पडू नका, अफवांवर विश्वास ठेवू नका, एकी बाळगा, सदैव जागरुक रहा इइ. फक्त गृहमंत्री येत नाहीत, विरोधी पक्षनेत्यांची भेट होते, मूड असेल तर पंतप्रधानही येऊन जातात. यूपीए अध्यक्ष सोनिया गांधीही येण्याची शक्यता असते. राज्याचे मुख्यमंत्री, राज्यांचे नेते यांच्याही भेटी होतात. मिडीयाला बाईट देऊन तेही टीव्हीवर झळकतात. विरोधी पक्ष सरकारवर टीका करतात. सरकार म्हणतं विरोधी पक्षांनी स्फोटांचं राजकारण करु नये. हे नेहमीचंच झालं आहे.

लोकांना उगाचच अक्कल शिकवून मग काथ्याकूट होतो ते हा स्फोट कोणी घडवून आणला त्यावर. कोणी म्हणतं लष्करै तैय्यबा, कोण म्हणतं अल कायदा. सध्या इंडियन मुजाहिदीनचा जोर आहे. मग त्यासाठी आरडीएक्स वापरलं की अमोनियम नायट्रेट वापरलं याच्यावर चर्चा झडतात. मग बसस्टॉपला टार्गेट का केलं, रेल्वेला टार्गेट का केलं, यावर टीव्ही चॅनेल्सवर वादसंवाद रंगतो. जुन्या स्फोटांच्या तारखा आणि घडलेल्या घटना यांच्या आठवणी या निमित्ताने निघतात. सरकार आणि पोलीस काय करतात, यावर चर्चा रंगते. सरकारने काय करायला पाहिजे, याबद्दल तज्ज्ञ त्यांची त्यांची मतं मांडतात. कोणी पोलिसांच्या नावानं बोटं मोडतात, कोणी इंटेलिजन्सच्या नावानं खडे फोडतं. इंटरनेट, ट्वीटर, फेसबुक यांच्यावर देशप्रेमाचा उमाळा येतो.

अफझल गुरुच्या फाशीचा मुद्दा पुन्हा चर्चेत येतो, कसाब कसा बिर्याणी झोडतोय, यावर टीका होते. मग बाहेरुन येणाऱ्या लोंढ्यांचे काय हा मुद्दा चर्चेत येतो. सारीच वांझोटी चर्चा. आपण फक्त वांझोट्या चर्चाच करतो. सरकारला सामान्य माणसाचं काहीच देणंघेणं नाही. राजकीय पक्षांनाही काही पडलेली नाही. ऐसे हादसे होतेही रहते हे, असं राज्याचा गृहमंत्री म्हणतो. तर काँग्रेसचा युवराज म्हणतो हल्ले होतच राहणार. बोला आता तुम्ही आम्ही करणार काय. म्हणूनच सामान्य माणूस फेसबुर ट्वीटर रिअॅक्ट होत राहतो, टीव्हीवर चर्चा करत राहतो. त्यातून काहीही साध्य होत नाही. पण हे सोपस्कार पडत राहतात.

स्फोट झाल्याच्या दुसऱ्या दिवशी लोक कसे कामावर आले, शाळा कशा नेहमीप्रमाणे भरल्या, कॉलेज कट्टे कसे फुलून गेले, लोकल कशा भरभरून वाहताहेत, अशी दृष्य आणि बातम्या दाखवून न्यूज चॅनेल्स मुंबईच्या स्पिरीटची चर्चा करतात. अहो, कसलं स्पिरीट प्रत्येकाला उद्याची चिंता आहे. उद्या कामावर नाही गेलो तर एक दिवसाचा पगार कापला जाणार, शाळेत-कॉलेजात नाही गेलो आणि मार्क कमी पडले तर उद्या अॅडमिशन कोण देणार, या विवंचनेत तो घराबाहेर करतो. त्यामुळं हे काही स्पिरीट फिरीट नाही. ही हतबलता आहे. अहो, मुंबईच नाही तर इतर सर्व शहरे दुसऱ्या दिवशी नेहमीच्या व्यवहारांमध्ये गुंतून जातात. कारण त्यांना जगायचं आहे. मुंबईत आणि शहरांमध्ये काय स्पिरीटचा कारखाना आहे, सारखं स्पिरीट स्पिरीट करायला. ही हतबलता आहे, दुसरा पर्यायच नाही. त्याला काय करणार. खरं, तर हे स्पिरीट स्पिरीट करणाऱ्यांवरच या स्पिरीटचा उपयोग केला पाहिजे.

वाढलेल्या महागाईत रुपया रुपया कमाविण्यासाठी रोज मरावं लागतं. सामान्य माणूस रोजच मरतोय. या एसीमध्ये बसलेल्या राजकारण्यांना त्याचा काय पत्ता. त्यांचा काय समजणार हे. रोज मरणं आणि एकदाचं कायमचं मरणं, यातला फरकही आता मिटून चालला आहे. नालायक राजकारणी आणि निर्लज्ज यंत्रणा असलेल्या भारतात जन्माला आलो ते मरण्यासाठीच. त्यामुळे सामान्य माणसाला मरणाची भीती नाहीये. तो घरातून बाहेर पडतो तेच मरण्यासाठी.

असो. आता ११-७ झाले. २६-११ झाले. १३-२ झाले. काल १३-७ झाले. आता पुन्हा कोठे आणि कधी स्फोट होणार याची वाट पाहत बसण्यापेक्षा आणि त्यात आपण आणि आपले जवळचे नसावेत, यासाठी देवाचा धावा करत बसण्यापलिकडे सामान्यांच्या हातात काहीही नाही. कारण आपण सर्वसामान्य आहोत. अतिरेक्यांसाठी सॉफ्ट टार्गेट आहोत. निलाजऱ्या राजकारण्यांसाठी मतांची पेटी आहोत. महागाईच्या भस्मासुराचे भक्ष्य आहोत. नक्षलवद्यांचे लक्ष्य आहोत. कारण आपण सर्वसामान्य आहोत.


भारतासारख्या लोकशाहीप्रधान देशात सर्वसामान्य माणसाचे हे हाल, हे मजबूत लोकशाहीचेच 'लक्षण' आहे. एकीकडे आपण लोकशाहीचे गोडवे गायचे आणि दुसरीकडे हीच लोकशाही सर्वसामान्य माणसाचा गळा घोटणार.


जय हिंद, जय लोकशाही...

Sunday, July 10, 2011

उतू नका, मातू नका...

हवा डोक्यात जाऊ देऊ नका...

टीपटॉप नगर होतं. तिथं एक क्लब होता. टॉपफन क्लब असं त्याचं नाव. लोक संध्याकाळी यायचे, कुणी टेनिस खेळायचे, कुणी जिममध्ये जायचे, कुणी स्विमिंगचा आनंद लुटायचे, तर काही जण रिफ्रेशमेंटमध्ये जाऊन पोटपूजा करायचे. महिलांच्या किटी पार्टीजना तर मर्यादाच नव्हती. रोज दे धम्माल सुरु असायची. मस्त चाललंय आमचं, असं म्हणत क्लबची जोरात घोडदौड सुरु होती. आपण पण या क्लबचे मेंबर व्हावं, अशी इच्छा त्या नगरीतल्या प्रत्येक माणसाला असायची. कधी एकदा मी त्या क्लबचा मेंबर होतोय आणि एन्जॉय करतोय, असं त्याला व्हायचं. त्यासाठीच त्यांची सारी धडपड सुरु असायची. इतकी प्रतिष्ठा त्या क्लबला प्राप्त झाली होती.

नगरीतील बडीबडी मंडळी त्या क्लबचे मेंबर होते. कोणाला क्लबचं मेंबर करुन घ्यायचं आणि कोणाला मेंबरशिप द्यायची नाही, हे सगळं त्या क्लबच्या पदाधिकाऱ्यांवर अवलंबून होतं. अनेकदा पदाधिकारी लोकांना इतक्या वाईट पद्धतीनं झिडकारायचे की विचारता सोय नाही. इतकी त्या क्लबची चलती होती. चलती कसली दबदबा किंवा दराराच होता, असं म्हणा ना. अर्थात, फक्त पैसा पाहूनच त्या क्लबची मेंबरशिप मिळायची नाही. मेंबरशिप फी लाखो रुपये असायची पण फक्त पैसा असला की मेंबरशिप मिळाली असं नव्हतं. अभ्यासू, हुशार आणि विविध क्षेत्रात चमकलेल्या मंडळींना या क्लबचं मानद सदस्य करुन घेतलं जायचं. पण ती संख्या खूपच लिमिटेड होती. क्लबचे काही नियम तर भन्नाट होते. तुम्हाला क्लबची मेंबरशिप सोडायची असेल तर कारण सांगावं लागायचं. ते कारण संचालक मंडळाला पटलं तरच तुम्हाला क्लब सोडता यायचा. जर कारण पटलं नाही तर पन्नास हजार रुपयांचा दंड भरावा लागायचा. अन्यथा क्लबची मेंबरशिप सोडता यायची नाही.

क्लबची वाढती लोकप्रियता आणि लक्ष्मीची प्रसन्नता असल्यामुळे पदाधिकाऱ्यांना क्लबचा इतर शहरांमध्ये ब्रांचेस काढायच्या होत्या. इतकंच नाही तर हिल स्टेशन आणि टुरिस्ट स्पॉट्सवर रिसॉर्ट्स काढण्याचाही बेत होता. त्यादृष्टीनं त्यांची तयारी सुरु होती. तज्ज्ञ मंडळींचं मार्गदर्शन घेणं सुरु होतं. कशा पद्धतीनं वाटचाल करायची याबाबत मिटिंग्ज सुरु होत्या. अशा पद्धतीनं रिसॉर्ट्स आणि हॉलिडे होम चालविणाऱ्या मंडळींनी हे कसं सुरु केलं, त्याचं अवलोकन करणंही जोरात सुरु होतं. असंच काहीसं वेगळं करण्याची क्लबची इच्छा होती. सगळं जग पाहतच राहिल, असं जगातलं एक नंबरचं काहीतरी करण्याचा त्यांचा इरादा होता. शिवाय सगळी परिस्थिती त्यांच्या बाजून होती.

सगळं काही छान सुरु असताना नेमकं क्लबच्या मागं वेगळंच बालंट आलं. क्लबच्या स्विमिंग पुलामध्ये बुडून एकाचा मृत्यू झाला. वास्तविक पाहता जीवरक्षक वगैरे मंडळी होतीच. पण घडायचं ते घडून गेलं. काही दिवस क्लबमध्ये वातावरण सुन्न होतं. लोक पूर्वीसारखे यायचे नाही आणि आले तरी ते पूर्वीसारखे एन्जॉय करायचे नाहीत. स्विमिंग पुलावर तर कोणी फिरकेनासंच झालं. त्याची तर रयाच निघून गेली. क्लबच्या पदाधिकाऱ्यांना वाटलं, की थोड्या दिवसांनी लोक ही घटना विसरुन जातील आणि सगळं स्थिरस्थावर होईल. पण कसलं काय आणि कसलं काय. ज्यांना क्लबची मेंबरशिप मिळाली नव्हती, त्या चिडलेल्या लोकांनी अफवा पसरविण्यास सुरुवात केली, की स्विमिंग पुलामध्ये मरण पावलेल्या तरुणाचा आत्मा क्लबमध्ये अधूनमधून हिंडत असतो. त्याला बऱ्याच लोकांनी पाहिलंय, तो कधीकधी समोर असतो आणि पटकन गायब होतो इइ.

आता नगरी टिपटॉप असली तरीही काही लोक अंधश्रद्ध असतातंच ना. मग इतर लोकांनी त्याला तेल तिखट मीठ लावून अफवा पसरवायला सुरुवात केली. क्लबची मेंबरशिप घेतली तर घरात आक्रीत घडतं. काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीनं मेंबरशिप घेतली आणि दहा दिवसांमध्ये त्याची आई गेली. एकाने मेंबरशिप घेतली आणि त्याची नोकरी गेली. अशा अफवांना ऊत आला. त्याचा परिणाम असा, की लोकांनी त्या क्लबची मेंबरशिप सोडायला सुरुवात केली. लोकं वार्षिक मेंबरशिप रिन्यू करेनासे झाले. जे लाईफ मेंबर होते ते क्लबकडे फिरकेनासे झाले. त्यांनी आपल्या एन्जॉयमेंटसाठी नगरीतील इतर क्लबचा आसरा घेतला. अर्थात, सुरुवातीला नगरीतील इतर क्लब फारसे चांगले नव्हते. पण मेंबरशिप वाढल्यानंतर त्या क्लबचं स्टेटसही वाढलं.

एकीकडे नगरीतल्या इतर क्लबचं स्टेटस वाढत असताना टॉपफन क्लबचं मात्र दिवाळं निघण्याची वेळ आली होती. आर्थिक क्षेत्रात तर दाणादाणच उडाली होती. दुसरीकडे ग्राहक आणि मेंबर्सची संख्या कमालीनं कमी होत होती. तिसरीकडे दोन-दोन महिने पगार मिळत नसल्यामुळं कर्मचारीही राजीनामा देऊन दुसरा जॉब जॉईन करु लागले होते. त्यामुळे टॉपफन क्लबची अवस्था केविलवाणी झाली होती. संचालक मंडळाला तर काय करावं, हेच सुचेनासं झालं होतं. अशा परिस्थितीत एका संचालकाच्या डोक्यातून एक अफलातून कल्पना आली. त्यानं दुसऱ्याच दिवशी पेपरमध्ये अॅड दिली. पाच जणांना मेंबर करा आणि मेंबरशिप फुकट मिळवा. पूर्वी नाही का, पत्रक वाटली जायची. ही शंभर पत्रक छापून वाटा म्हणजे तुम्हाला चांगली नोकरी मिळेल, लग्न ठरेल, पगार वाढेल, घर घ्याल. नाही वाटली तर कोण तरी जाईल, नोकरीवर गदा येईल आणि दुःखद घटनांचा भडिमार होईल. पूर्वी अशी पत्रकं वाटली जायची. आता असे ईमेल आणि एसएमएस येतात. काही मल्टिनॅशनल कंपन्याही अशाच पद्धतीनं मार्केटिंग करुन बकरे मिळवतात.

आता टॉपफन क्लबवरही मेंबर, कर्मचारी आणि व्यवसाय मिळविण्यासाठी ही वेळ आली होती. पाच मेंबर करा आणि मेंबरशिप मोफत मिळवा, वीस मेंबर करा आणि लाईफटाईम मेंबरशिप फ्री घ्या अशा योजना सुरु करण्याची वेळ क्लबवर आली होती. कुठे मेंबरशिप सोडताना पन्नास हजार रुपयांचा दंड द्यायचा आणि चेनमार्केटिंगसारखी योजना जाहीर करायची. क्लबची सगळीच वाट लागली होती. अशी योजना सुरु केल्यामुळे क्लबमध्ये क्लास येण्याऐवजी सगळी तळागाळातील मंडळी येऊ लागली. क्लबचा दर्जा हरवला. हुशार, श्रीमंत, प्रतिष्ठीत, अभ्यासू, नामवंत मंडळी इतर क्लबकडे जाऊ लागली आणि ज्यांना दुसरीकडे कुठेच मेंबरशिप मिळत नाही, ती मंडळी टॉपफन क्लबचे मेंबर होऊ लागली. कारण पाच बकरे मिळविणं हे लाखो रुपये भरण्यापेक्षा खूप सोप्प होतं.

क्लबच्या कामगारांनाही अशाच पद्धतीनं जुंपलं गेलं होतं. वर्षभरात पाच मेंबर करणं त्यांना कम्पल्सरी केलं होतं. पाच मेंबर केले नाहीत तर त्यांना पगारवाढ मिळायची नाही. पगारवाढच नाही तर त्यांचं प्रमोशनही त्यावरच अवलंबून असायचं. मेंबर करा आणि प्रमोशन घ्या, पगारवाढ घ्या. कामगाराची कुवत काय आहे, त्याचं शिक्षण काय आहे, त्याचा अनुभव काय आहे, याचा काहीही संबंध उरला नव्हता. त्यामुळं हुशार आणि सचोटीनं काम करणारी मंडळी मागं पडली आणि बाजारबुणगे कर्मचारी पुढं जाऊ लागले. वर्षानुवर्षे काम करणाऱ्या सज्जन आणि प्रामाणिकपणे काम करणारे कामगार असल्या कमअस्सल मंडळींच्या हाताखाली झटू लागले.

क्लबचे मेंबर आणि कामगार हे सुसंस्कृत नसल्यामुळे महिला आणि कुटुंबांचं क्लबमध्ये येणं थांबलंच होतं. देशी दारुचे अड्डे असतात तसं स्वरुप क्लबला आलं होतं. जिम, स्विमिंगपूल, टेनिस कोर्ट ओस पडलं होतं आणि क्लबमध्य़े नव्यानंच सुरु करण्यात आलेला बार जोरात सुरु होता. सकाळी आठ वाजल्यापासून रात्री दोन वाजेपर्यंत हाऊसफुल्ल. बरं, परदेशी मद्यापासून ते वाईनपर्यंत उंची मद्य घेणारी मंडळी कमी आणि संत्रीमोसंबी घेणारी मंडळी जास्त असा प्रकार सुरु झाला होता. क्लबची सगळीच वाट लागली होती आणि टॉपफन क्लब दारुड्या बेवड्यांचा अड्डा बनला होता. क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी ही परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला. पण काहीच होत नाही म्हटल्यानंतर त्यांनीही क्लबचे राजीनामे देऊन दुसरीकडे जाणे पसंत केले. काही जण दुसऱ्या क्लबमध्ये जॉईन झाले तर काहींनी स्वतःचा बिझनेस सुरु केला. ज्यांना दुसरीकडे काहीच मिळालं नाही ती मंडळी नाईलाजानं टॉपफन क्लबमध्येच राहिले. अर्थात, टॉपफनमधील फन कधीच संपली होती आणि सगळा बाजारबुणग्यांचा खेळ उरला होता.

टिपटॉप नगरीतील मंडळींनीही टॉपफन क्लबकडे पाठ फिरविली होती आणि हा क्लब नगरीतल्या भणंग, दारुबाज आणि भुरट्या मंडळींचा अड्डा बनला होता. उतू नये, मातू नये, कोणावरही अशी वेळ ओढवू नये, असं म्हणत गावकरी नाराजी व्यक्त करत होते.

साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

Saturday, July 02, 2011

ती आणि मी...

झालं संपलं सगळं. गेल्या पाच-सहा महिन्यांपासूनचा ऋणानुबंध संपुष्टात आला. तसं पहायला गेलं तर गेल्या आठ-दहा महिन्यांपूर्वीच आमचा स्नेह जुळला होता. दोघांनाही एकमेकांची इतकी सवय झाली होती, की विचारता सोय नाही. दोघांनाही एकमेकांवाचून करमायचं नाही. दोघांनी कधीच एकमेकांना एकटं सोडलं नव्हतं. मित्र, मैत्रिणी, नातेवाईकांपासून ते ऑफिसातील सहकाऱ्यांपर्यंत सगळेच तिची आपुलकीनं विचारपूस करायचे. काय, कधीपासून, कशामुळे अशी बित्तंबात काढून घ्यायचे. अगदी सामनात असल्यापासून ती माझ्या बरोबर होती. पण महाराष्ट्र टाइम्समध्ये आल्यानंतर मला तिला कायमचं दूर करावंच लागलं.

अहो, भलतासलता विचार मनात आणू नका. मी बोलतोय ते माझ्या हनवटीखाली आलेल्या एका गाठीबद्दल. सामना वृत्तपत्रात असताना शेवटच्या काही दिवसांमध्ये मला त्या गाठीचं अस्तित्त्व जाणवत होतं. सुरुवातीला वाटलं, की वजन वाढल्यामुळं हनवटीखाली हनवटी (डबल चीन) आली की काय. त्यामुळं सुरुवातीला त्याकडं दुर्लक्ष झालं. पण नंतर हळूहळू ती गाठ असल्याचं स्पष्ट होत गेलं. मग ऑपरेशन करुन ती गाठ काढेपर्यंत जवळपास रोज मला त्या गाठीबद्दलचं एक्सप्लेनेशन कोणाला ना कोणाला तरी द्यावं लागायचं. पण दोन आठवड्यापूर्वी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन केल्यामुळं सगळेच प्रश्न निकाली निघाले. शिवाय, तुमच्या गाठीचा प्रश्न कायमचा सुटला आहे आणि आता पुन्हा तसं काही होणार नाही, असं आश्वासन डॉक्टर धनंजय केळकर यांनी दिल्यामुळे खरोखरच हा प्रश्न कायमचाच निकाली निघाला आहे.

वास्तविक पाहता त्या गाठीचा मला तसा काही त्रास नव्हता. सर्व तपासण्या आणि चाचण्या झाल्या होत्या. त्यामध्ये काहीही गंभीर नसल्याचे रिपोर्ट होते. पाण्यामुळं किंवा कुठल्या तरी लिक्विडमुळं (फ्लुईड) गाठ झाली असावी, असं डॉक्टरांचं म्हणणं होतं. शिवाय ती गाठ बाहेरून आलेली होती. तेव्हा खाता-पिताना किंवा बोलतानाही काहीही त्रास व्हायचा नाही. तिला हात लावला तरीही दुखायचं नाही. गाठीचा मला काहीच त्रास नव्हता. फक्त दिसायला खराब दिसायचं आणि दाढी करताना थोडा त्रास व्हायचा. कारण रेझर मारताना अधिक काळजी घ्यावी लागत होती. इतकंच. दाढी करताना त्रास व्हायचा म्हणून कित्येक आठवडे दाढीही करायचो नाही. मग दाढी का केली नाही, याचं स्पष्टीकरण ओघानं आलंच. पण हे समजण्यासारखं आहे. (तसाही नियमित दाढी करण्याचा मला कंटाळाच आहे. दाढी ही काय रोज करण्याची गोष्ट आहे, असं मला अजिबात वाटत नाही.)

पण त्या गाठीमुळं मला लोकांनी जो त्रास दिलाय ना, तो जास्त तापदायक होता. अर्थात, बरीच जवळची मंडळी आपुलकीनं चौकशी करायची, हे समजू शकतो. पण ज्यांच्याशी साधी तोंड ओळखही नाही ते उगाच फालतू चौकशा करुन डोक्यात जायचे.
गाठ कशी आली, कधी आली, आयुर्वेदीक उपचार करा, हे औषध घ्या, ते औषध घ्या, ह्या डॉक्टरला भेटा, त्या बाबाला भेटा, ऑपरेशन हा काही उपाय नाही किंवा तोच एकमेव उपाय आहे, असं समजू नका इइ एक ना दोन शंभर फुकटचे सल्ले मंडळी द्यायची. त्यातील काही खवट पुणेकर तर काय कॅन्सर बिन्सर नाही ना, असं विचारून खात्री करून घ्यायचे. पहा, नीट चेक करुन घ्या. हल्ली कोणाला काय होईल, सांगता येत नाही, असं सांगून उगाच भीती निर्माण करायचे. त्यामुळं गाठ चालेल पण प्रश्न आवर, अशी परिस्थिती झाली होती.

सामनामधील मित्र राजेश शेलार यानं अगदी सुरुवातीलाच सांगितलं होतं, की ती गाठ आहे. ऑपरेशन केल्याशिवाय ती जाणार नाही. वेळीच डॉक्टरकडून तपासण्या करून घ्या आणि ऑपरेशन करून टाका. पण मुंबईत वेळही नव्हता आणि मुंबईत ऑपरेशन करणं शक्यही नव्हतं. त्यामुळं तेव्हापासून ते पुढं ढकललं गेलं. पण पुण्यात शिफ्ट झाल्यानंतर दीनानाथला जाऊन तपासण्या केल्या आणि ऑपरेशनचा निर्णय पक्का झाला. पण काही ना काही अडचणी येतच होत्या. त्यामुळं ते पुढं ढकलावं लागत होतं. अर्थात, काही सिरीयस नाही, असं सांगितल्यामुळं मी पण थोडा रिलॅक्स होतो. पण मैत्री किंवा नातं नसलेली मंडळी उगाचच घाबरवून सोडायची. (आता मी गाठीला घाबरलो नाही, तर त्यांना काय घाबरणार, हा भाग अलहिदा.)

दोन आठवड्यांपूर्वी ऑपरेशन झालं आणि गाठ काढून टाकली. जवळपास सहा सेंटीमीटर बाय चार सेंटीमीटर बाय चार सेंटीमीटर अशा आकाराची ती गाठ होती. जी इतके दिवस माझ्या शरीरात होती तिला पहायचं भाग्य मला मिळालं नाही. मला शुद्ध येण्यापूर्वीच डॉक्टरांनी अधिक तपासण्यांसाठी तिला धाडलं होतं. पण रिपोर्ट पाहिल्यानंतर आणि डॉक्टरांनी सांगितल्यानंतर साधारण अंदाज आला. एक आठवडा जखमेवर स्टेप्लरच्या पिना मारल्या होत्या. हल्ली टाके असेच असतात असं म्हणतात. ते काढल्यानंतरही हनवटीखाली थोडा जडपणा जाणवत होता. पण आता जवळपास पूर्ण रिकव्हर झाल्यासारखं वाटत आहे. कारण ती आयुष्यातून निघून गेल्यामुळं निर्माण झालेली ‘पोकळी’ आता पूर्णपणे ‘भरुन’ आली आहे.

Friday, May 20, 2011

‘बाप’गंधर्व

आजि म्या बालगंधर्व पाहिला...



बालगंधर्व कसे होते, ते पहायची आम्हाला संधीच मिळाली नाही, असं कोणालाही यापुढे म्हणता येणार नाही. नितीन चंद्रकांत देसाई यांनी निर्मिलेल्या चित्रपटात सुबोध भावेनं साकरलेली बालगंधर्वांची भूमिका पाहिल्यानंतर सर्वांच्याच मनातील खंत दूर होते. जसं राम म्हटलं की आपल्यासमोर अरुण गोविल येतो, कृष्ण म्हटलं की नितीश भारद्वाज येतो, संत तुकाराम म्हटलं की विष्णुपंत पागनीस येतात, छत्रपती शिवाजी महाराज म्हटले की सूर्यकांत-चंद्रकांत येतात, अगदी अलिकडच्या काळातील डॉ. अमोल कोल्हे येतो (महेश मांजरेकर मात्र चुकूनही येत नाही) तसं बालगंधर्व म्हटल्यानंतर यापुढे आपल्या डोळ्यासमोर नक्की सुबोध भावेच येणार. कारण बालगंधर्वांना माझ्या पिढीनं (अगदी माझ्या वडिलांनीही) पाहिलेलं नाही. त्यामुळं सुबोध भावे हाच आपल्यासाठी नारायणराव आहे, बालगंधर्व आहे. कारण त्यानं बालगंधर्वांची भूमिका त्याच ताकदीनं वठवली आहे.
बालगंधर्व येणार येणार तेव्हापासून पिक्चर कसं असेल, याची उत्सुकता होती. मुळातच लहानपणापासून बालगंधर्व रंगमंदिरातील नारायणराव राजहंस आणि बालगंधर्व यांचे छायाचित्र पाहतच मोठे झालो. एखादा पुरुष नट बेमालूमपणे स्त्री पार्टांची भूमिका निभावू शकतो, यावर विश्वासच बसायचा नाही. बालगंधर्व स्त्री वेशामध्ये हळदी-कुंकवाचे समारंभांनाही उपस्थिती लावायचे, असे अनेक किस्से ऐकले होते. त्यांच्याबद्दल खूप खूप जाणून घ्यायची इच्छा चित्रपटाच्या निमित्ताने पूर्ण होणार होती. त्यामुळंच चित्रपटाविषयी प्रचंड औत्सुक्य होतं. पण अनेकदा खूप आशा बाळगली, पदरी निराशा येते, असं म्हणतात. पण बालगंधर्व अजिबात भ्रमनिरास करत नाही.


मुळातच चित्रपटाचा वेग, पात्रांची निवड, संवाद, कॅमेरा अँगल्स, चित्रपटातील पदं आणि गाणी, वेशभूषा, प्रसंगांची निवड हे सर्व काही दर्जेदारच आहे. मुख्य म्हणजे जुन्या पिढीला त्या काळात ओढून नेणारे आहेत. चित्रपटामध्ये बालगंधर्वांच्या अनेक नाटकातील प्रसंग आहेत. कोणत्याही नाटकाचा रंगमंचावरील सेट जेव्हा डोळ्यासमोर येतो तो पाहून आजूबाजूच्या प्रेक्षकांमधून हमखाम नावं पुटपुटली जातात. शारदा, स्वयंवर, मानापमान. नाव समोर येण्यापूर्वीच लोकांपर्यंत ते नाटक पोहोचतं. हे देसाई यांचं अफलातून यश आहे. बालगंधर्व पाहताना लोक चित्रपटात खूप गुंतून जातात. बालगंधर्व जेव्हा अखेरचे माहिमला जायला निघतात, तेव्हा त्यांची पत्नी त्यांच्या हातावर दही देण्यासाठी पुढे येते आणि लवकर परत या, असे म्हणते. बालगंधर्वांच्या पुढचा डायलॉग येण्यापूर्वी मागच्या खुर्चीवर बसलेली एक महिला पुटपुटते, इट्स टू मच हं. म्हणजे लोक चित्रपटाशी किती एकरुप होतात ते पहा.
बालगंधर्वांच्या अगदी लहानपणापासून ते त्यांच्या कारकिर्दीला उतरती कळा लागेपर्यंतचा चित्रपटाचा प्रवास आणि प्रसंग थक्क करणारे आहेत. मुलगी मेलेली असताना रंगमंचावर प्रयोग करणारे कलावंत, मायबाप प्रेक्षकांसाठी किर्लोस्कर नाटक कंपनीतून तडकाफडकी बाहेर पडणारे नट, पंचवीस पंचवीस हजारांची अत्तरं खरेदी करणारे कंपनीचे मालक, यशाच्या उंच शिखरावर असूनही नाटकातील एका प्रसंगात ज्येष्ठ अभिनेते केशवराव भोसलेंच्या पायात वहाणा चढविण्यास मागेपुढे न पाहणारे दिलदार अभिनेते, स्वतःची कंपनी कर्जात बुडलेली असतानाही स्वराज्य फंडासाठी नाटकाचा प्रयोग करणारे देशप्रेमी, केवळ एक प्रेक्षक असतानाही त्याच्यासाठी प्रयोग करणारे रसिकप्रेमी, केवळ पैशासाठी स्वतःच्या सहा लाखांची ऑफर धुडकावणारे मनस्वी आणि पडत्या काळात कोणत्या तरी आलतूफालतू गायकांना मागे बसून तंबोऱ्याची साथ करणारे वादक अशी बालगंधर्वांची विवध रुपं चित्रपटामध्ये अगदी यथार्थ पद्धतीनं सादर करण्यात आली आहेत.

- दुःख नारायणाला झालंय, त्याचे चटके भामिनीला बसला कामा नये.
- भले भले कर्तृत्त्ववान पुरुष आम्ही काय हातात बांगड्या भरल्या आहेत काय, असं म्हणतात. पण मी हातात बांगड्या भरूनच पुरुषार्थ गाजवून दाखवेन.
असे संवाद चित्रपटांत जान आणतात. कधीकधी डोळ्यात पाणी आणतात आणि चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या टाळ्या घेतात.

किर्लोस्कर नाटक मंडळी, गडकरी मास्तर, गणपतराव बोडस, गोविंदराव टेंबे, भास्करबुवा बखले आणि इतर अनेक जणांनी बालगंधर्वांची साथ सोडल्यानंतरही लढण्याची जिद्द आणि पुन्हा भरारी घेण्याची उमेद बालगंधर्वांच्या प्रत्येक संवाद आणि दृष्यातून ठळकपणे जाणवते. बालगंधर्वांची किती क्रेझ होती, ते बायकांच्या छोट्या छोट्या संवादांमधून, दृष्यांमधून मांडण्यात आले आहे. सोबतील दैनिक केसरीचे जुने अंकही रेफरन्स म्हणून वापरले आहेत. बालगंधर्व ही काय चीज होती, हे त्यावरून अगदी मनोमन पटते. पडत्या काळातही गोहरबाईच्या तुलनेत प्रेक्षकांना म्हातारे बालगंधर्वच रुक्मिणी म्हणून अधिक रुचतात. मग श्रीकृष्णाच्या भूमिकेतील बालगंधर्वांनी रुक्मिणीचं पद म्हटलेलं प्रेक्षकांना चालतं. लोकप्रियतेच्या शिखरावर म्हणजे काय, यापेक्षा वेगळं ते काय...


बालगंधर्वचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्या महान नटाचा उतरता काळ किंवा वाईट दिवसही तितक्याच चांगल्या पद्धतीनं रंगविलेले आहेत. वास्तविक पाहता, बरेचदा मोठ्या लोकांची चांगली बाजू दाखविण्याचंच फॅड सध्या आहे. वाईट बाजू लोकांना आवडेल किंवा कसे, हे माहिती नसल्याने लोक रिस्क घेत नाहीत. त्यामुळं बालगंधर्वांच्या आयुष्यात घडलेल्या वाईट गोष्टीही उत्कृष्ट पद्धतीने दाखविलेल्या आहेत. त्याबद्दलही निमार्ते आणि दिग्दर्शकांचे अभिनंदन करायला हवे.


सरतेशेवटी बालगंधर्वांची भूमिका साकारणारे सुबोध भावे. एक नंबर अभिनय. बालगंधर्व जेव्हा एन्ट्री घेतात किंवा पदं सादर करताना चित्रपटातील प्रेक्षकांनी वाजविलेल्या टाळ्या कोणत्या आणि चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांनी वाजविलेल्या टाळ्या कोणत्या, हे अजिबात कळत नाही इतक्या टाळ्या वाजतात. चित्रपटातील प्रेक्षक आणि चित्रपट पाहणारे प्रेक्षक दोघेही आळीपाळीनं वन्स मोअर ओरडत असतात. बालगंधर्व पहिल्या रात्री पत्नीच्या शेजारी स्त्रीवेषात आल्यानंतर चित्रपटगृहात टाळ्यांचा एकच कडकडाट होतो. भूमिकेशी समरस झालेल्या कलाकाराला यापेक्षा वेगळी दाद कोणती असू शकते.



संपूर्ण चित्रपट एकदम फक्कड झाला आहे. तरीही दोन-तीन खटकलेल्या गोष्टी नमूद करणे उचित वाटते. पहिली गोष्ट म्हणजे चित्रपटांत एकही पद सविस्तर दाखविलेलं नाही. त्याकाळातील पदं खूप मोठी असायची, हे जरी मान्य केली तरी केशवराव भोसले आणि बालगंधर्व यांची जुलगबंदी थोडी आणखी लांबविता आली असती. अर्थात, चित्रपट दोन-सव्वादोन तासांत संपविण्याचा अट्टहास ठेवला नसता आणि थोडा वाढविला असता तरी चालले असते.
दुसरी गोष्ट म्हणजे गोहरजान बालंगधर्वांच्या आयुष्यात येते, तो प्रसंग खूप सविस्तर रंगविला आहे. मात्र, बालगंधर्वांच्या पडत्या काळात शेवटी तिचे काय झाले आणि ती कोठे गेली, हे प्रसंग दाखविले असते तर चित्रपट अधिक परिपूर्ण वाटला असता. त्याचप्रमाणे बालगंधर्वांच्या अखेरच्या काळात पत्नी, कन्या आणि माता कुठे होत्या, यावर थोडा प्रकाश टाकला असता तर शेवट व्यवस्थित वाटला असता. आता शेवट अचानकपणे (म्हणजेच अबरप्टली) केल्यासारखा वाटतो. य दोन-तीन गोष्टी टाळल्या असत्या तर बालगंधर्व म्हणजे खरोखरच ‘बाप’गंधर्व आहे.


ता.क. – चित्रपट संपल्यानंतरही प्रेक्षक चित्रपटगृह सोडून जात नाहीत. लोकांची नाव वाचण्यासाठी नाही तर बालगंधर्वांचे दुर्मिळ असे फोटो पाहण्यासाठी. एखादा कलाकार इतक्या वर्षांनंतरही लोकांना इतकी भुरळ घालू शकतो, यावर विश्वास बसत नाही. पण विश्वास ठेवावाच लागतो कारण तेच सत्य आहे.

Thursday, April 21, 2011

तमिळनाडूचे चार प्रतिनिधी

दीपक, अशोक आणि च्यो रामास्वामी...

आपण प्रवासाला गेलो किंवा नव्या शहरात गेलो, की तिथे आपल्याला चांगले-वाईट अनुभव येतात. अनुभव चांगले-वाईट असतात कारण परिस्थिती किंवा आपल्याला भेटलेली माणसं चांगली किंवा वाईट असतात. तमिळनाडूमध्ये गेलो होतो तेव्हा मलाही असेच काही चांगले-वाईट (वाईट फक्त एखाद दुसराच) अनुभव आले. त्यावर गेल्या बऱ्याच दिवसांपासून लिहीन म्हणत होतो. पण अखेर आज मुहूर्त मिळाला.

मदुराईचा दीपक


तमिळनाडू दौऱ्यात मला भेटलेला मस्त मित्र म्हणजे एन. बी. दीपक. हा स्वतः एका जाहिरात कंपनीमध्ये काम करतो. तंजावूर ते मदुराई एसटीमध्ये तो मला प्रथम भेटला. नंतर तो माझा मदुराईतील गाईडच बनला. एसटी स्टँडपासून ते मदुराई शहरात कोणत्या बसने जायचं, हे त्यानं मला सांगितलं. त्यालाही त्याच बसनं जायचं होतं, म्हणून तोही माझ्या बरोबरच निघाला. इतकंच नाही तर त्यानं माझं तिकिटही काढून टाकलं. (हा त्याला चांगलं म्हणण्याचा निकष नक्कीच नाही.) रात्री बारा वाजता मदुराईत चांगलं हॉटेल शोधण्यात त्यानं मला मदत केली. रात्री साडेबारा वाजता खायला कुठं मिळेल, काय मिळेल, यासाठी तो माझ्याबरोबर हिंडला. एका हॉटेलमध्ये घुसून त्यानं आमच्या दोघांच्या जेवणाची व्यवस्था केली.

दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्याबरोबर मदुराई मंदिरात आला. एम. के. अळगिरी यांच्या भेटीसाठी डीएमकेचे ऑफिस आणि त्यांच्या घरापर्यंत माझ्याबरोबर फिरला. संध्याकाळीही मदुराई मंदिरातील देवांची यात्रा निघते, तिथं मला घेऊन गेला. रात्री मला एस. टी. स्टँडवर सोडायला आला आणि कन्याकुमारीला पोहोचला का? असा फोनही दुसऱ्या दिवशी केला. ओळख फक्त एस.टी. मधली. तो तमिळ, मी मराठी. आमच्या दोघांचा दुरान्वयेही संबंध नाही. पण तरीही त्यानं माझ्यासाठी खूपखूप केलं. आपण महाराष्ट्रातच बसून म्हणतो, की ते तमिळ लोकांना मदत करत नाहीत. हिडीसफिडीस करतात. पण असेही काही तमिळ आहेत, की जे कायमचे तुमचे मित्र होतात. जसा दीपक माझा कायमचा मित्र झाला.

मदुराईबद्दल बोलताना दीपक म्हणला होता. मदुराई पीपल आर पासक्कारे पीपल. म्हणजे मदुराईचे लोक हे प्रेमळ लोक असतात. मला त्याचं बोलणं अगदी पटलं. कारण दीपक हाच माझ्यासाठी मदुराई पीपल होता. खरंच मदुराई पीपल आर पासक्कारे पीपल.

रेल्वे अधिकारी व्ही. अशोक

पु. ल. देशपांडे यांच्या चौकोनी कुटुंबात शोभून दिसेल असा रेल्वे अधिकारी चेन्नई-पुणे प्रवासादरम्यान माझा सहप्रवासी होता. एकदम पापभीरू म्हणजे तो कुर्डुवाडीपर्यंतच होता. पण तो माझ्या कायम लक्शात राहील असाच होता. व्ही. अशोक असं त्याचं नाव. अकदम टापटीप, वक्तशीर आणि नीटनेटका. पंढरपूर आणि तुळजापूरला देवदर्शनासाठी निघाला होता. एकटाच. पण दोन भल्या मोठ्या बॅगा, एक हँडबॅग आणि एक पाऊच बरोबर घेऊन आला होता. दोन्ही बॅगा साखळीबंद करून त्याची चावी एका छोट्या पाकिटात ठेवली. ते पाकिट पाऊचमध्ये ठेवलं आणि ते पाऊच कुठेतरी लपवून ठेवलं. बरं, डबा सेकंड एसीचा आणि हा एकटाच. इतकं मौल्यवान काय घेऊन जात असणार हा ते पांडुरंगालाच माहिती.

बरं, त्याच्याकडे कोरे कागद होते. पट्टी होती. रेल्वेचे दक्शिण, मध्य आणि पूर्व विभागाचे सविस्तर वेळापत्रक होते. त्यामुळे कुर्डुवाडी कधी येणार, पुणे कधी येणार, गुंटकल आणि वाडी कधी येणार, कशानंतर काय याची त्याला सविस्तर माहिती होती. रेल्वेचा माहितीकोष म्हणूनच तो वावरत होता आणि प्रत्येक सहप्रवाश्याला मदत करत होता. सक्काळी उठल्या उठल्या चहा घेतला आणि अर्ध्या तासानं दही खायला घेतलं. सकाळी साडेआठ वाजता दही खाल्लं, तेव्हा मला चक्करच यायची बाकी होती. बरं, दही खाल्लं ते खाल्लं आणि म्हटला नो क्वालिटी. रेल्वेच्या पॅण्ट्री कारचे खासगीकरण झाल्यानंतर कशी मजा गेली, यावर मला दर तासाभरानं सांगत होता. म्हटलं, कुठून यानं दही खाल्लं आणि हे सर्व ऐकण्याची वेळ माझ्यावर आली.

वाडीला एका चहावाल्यानं जेवण आणून देऊ का विचारल्यानंतर त्यानं दर विचारले. तेव्हा चहावाला म्हणाला, बाजरीका एक रोटी बीस रुपया. त्यावर हा पठ्ठा म्हणाला, बाबा क्या एक किलो का रोटी लाओगे क्या? नंतर दही मिलेगा क्या, असं त्यानं विचारलं. तेव्हा म्हणाला मिलेगा. आधा किलो लाऊ क्या? त्यावर तो म्हणाला, मेरे को अकेले को चाहिए. पुरे डिब्बे को खिलाओगे क्या? त्यानंतर पुढचा अर्धा तास मी एकटाच वेड्यासारखा हसत होतो. माझ्या हसण्याची मलाचा लाज वाटत होती. पण काय करणार. असा हा व्ही. अशोक कुर्डुवाडी येण्यापूर्वीच दारात जाऊन उभा होता आणि पाहता पाहता नजरेआड झाला.

च्यो रामास्वामी

तुघलक या साप्ताहिकाचे संपादक आणि जयललिता यांचे कट्टर समर्थक च्यो रामास्वामी यांना भेटण्याचा योग आला. तमिळमधील लेखक, कवी, कथाकार, पटकथाकार, पत्रकार आणि बरेच काही. सध्या तुघलकचे संपादक. टाइम्सचे गेस्ट हाऊस असलेल्या अल्वर पेठ भागाच्या जवळच ग्रीनवेस रेल्वे स्टेशनजवळ त्यांचं ऑफिस. दुपारी तीननंतर फोन करा, असं म्हणून त्यांनी मला भेटण्यास होकार दिला. तीन वाजता फोन केला तर फोन बंद. म्हटलं वामकुक्शी सुरु असणार. मग साडेचारला फोन केला. फोन उचलला आणि पाचची अपॉईण्टमेंट दिली.

ऑफिसात गेलो. सुरुवातीला समोरच महात्मा गांधीजींचा फोटो. स्वतः रामास्वामी दे दुसऱ्या मजल्यावर बसतात. मग त्यांच्या पीएनं फोन करुन बोलणं करून घेतलं आणि मला वर जाण्यास सांगितलं. वर गेलो तर मंगल पांडेंचा फोटो. खाली गांधी वर पांडे. एक अहिंसक दुसरा १८५७ च्या स्वातंत्र्यसमराची ठिणगी पडण्यास कारणीभूत ठरलेला. केबिनमध्ये गेलो. म्हणाले, टेक युअर सीट आणि माझ्यावरच प्रश्नांचा भडिमार सुरु केला. कुठून आला, कुठे कुठे गेला, काय काय पाहिलं, तुमचा अंदाज काय, काय होईल इइ. जयललिता येणार पण घासून येणार हा माझा अंदाज चुकीचा आहे, असं सांगून त्या निर्विवाद बहुमत मिळविणार हे त्यांनी निक्शून सांगितलं. वर, करुणानिधी सरकारच्या चार वाईट गोष्टीही सांगितल्या.

सिंहासन वाटावं, अशा खुर्चीवर मस्त मांडी घालून बसलेली वामनमूर्ती. डोक्याला केस नाही. भुवयाही नाहीत. त्यामुळे भुवया काजळानं किंवा काळ्या रंगानं कोरलेल्या. कमरेला लुंगी. वरती सिल्कचा सदरा आणि संपूर्ण केबिनमध्ये विविध स्वामींचे आणि शंकराचार्यांचे फोटो. काही फोटो च्यो रामास्वामी यांच्याबरोबर तर काही आशीर्वाद देताना. मला तर एखाद्या शंकराचार्यांच्या पीठात वगैरे तर आलो नाही ना, असंच वाटत होतं. बोलायला मस्त रोखठोक आणि फोटोसाठी पोझ द्यायला एक नंबर. अवघ्या पंधरा मिनिटांमध्ये आमची भेट आटोपली आणि चेन्नई दौरा सार्थक झाल्याचं वाटलं. लहानपणापासून तमिळनाडूतील एक्सपर्ट म्हणून ज्यांना एनडीटीव्ही आणि स्टार न्यूजवर पाहत आलो त्यांना प्रत्यक्श भेटलो.

गेस्ट हाऊसचा वॉचमन

टाइम्सच्या गेस्ट हाऊसचा वॉचमन हा माझा लोकल गाईड होता. वॉचमनचं नाव विचारलं होतं. पण आता लक्शात नाही. गेस्ट हाऊसपासून कुठे कोणती बस जाते. बसस्टॉप कुठे आहे. तिथून पुढे जाण्यासाठी कोणती बस उपयुक्त ठरेल, तिकिट किती असेल. किती मिनिटांनी बस येईल, याचा तो विकिपिडीयाच होता. त्याच्यामुळेच मला चेन्नईच्या बससेवेची जवळून ओळख झाली. कोणत्या पेपरमध्ये काय आलंय, कोणता पेपर कोणाचा आहे, चॅनलवर नेमक्या काय बातम्या सांगितल्या, हे त्याला अगदी इत्थंभूत माहिती असायचं. असा हा वॉचमन माझा चेन्नईतील गाईडच होता.

तंजावूरचा खडूस म्हातारा

तंजावूरला होतो तेव्हा आर्यभुवन नावाच्या एका हॉटेलमध्ये संध्याकाळी नाश्ता करण्यासाठी गेलो होतो. तिथं माझ्यासमोरच एक म्हातारा येऊन बसला. बरं, इतर अनेक टेबलं मोकळी होती तरी समोर येऊन बसला. बरं, विषय काढायचा म्हणून त्याला विचारलं तमिळनाडूत यंदा काय होणार? तेव्हा मला म्हटला, ओन्ली तमिळ. नो इंग्लिश. दिसायला तर एकदम टापटीप आणि सोज्वळ होता. पुण्यातील काही खवट म्हातारे असतात तसा तो होता. त्याला इंग्लिश येत असणार पण भडवा बोलला नाही. इडलीबरोबर झालेला अपमान गिळून आणि मनातल्या मनात त्याच्या आई-बहिणीचा उद्धार करून बाहेर पडलो.

आणखी बरेच जण भेटले पण लक्शात राहणारे हे इतकेच.

Tuesday, April 12, 2011

मराठी माणसाकडे

तंजावूरमध्ये द्रमुकची धुरा

पांढरा शर्ट, कमरेला पांढरी स्वच्छ लुंगी, कपाळाला कुंकवाचा टिळा आणि वणक्कम सर म्हणून समोरच्याचे स्वागत करण्याची सवय... कोणत्याही तमिळ नागरिकाला लागू पडेल, असे हे वर्णन आहे तंजावूरच्या बी. मोहन या मराठी माणसाचे. बी. मोहन आणि मराठी? अशा विचारात पडू नका. बी मोहन हे त्यांचे तमिळ नाव. खरं नाव मोहन जाधव.

तंजावूरचे द्रमुकचे उमेदवार आणि विद्यमान मंत्री ओबेयदुल्ला यांच्या प्रचाराची धुरा मोहन जाधव हा मराठमोळा गडी अत्यंत यशस्वीपणे सांभाळतो आहे.
जवळपास तीनशे-साडेतीनशे वर्षांपासून जाधव यांचे कुटुंब तंजावूरमध्ये आहे. मोहन जाधव यांची ही तंजावूरमधली साधारण आठवी-दहावी पिढी. सध्या मोहन आणि त्यांचे बंधू आपल्या कुटुंबासह तंजावूरमध्ये रहात आहेत. लहानपणापासून तंजावूरमध्येच राहिल्यामुळे मराठीची ओळख जवळपास नाहीच.

अगदी तोडकं मोडकं मराठी मोहन जाधव बोलू शकतात. त्यांचे बंधू मात्र, अधिक चांगल्या पद्धतीने मराठी बोलतात. अर्थात, आपल्याला लक्श देऊन ऐकल्याशिवाय ते काय बोलत आहेत, ते समजत नाही. शिवाय आपण खूप वेगाने बोललो तरी त्यांना आपले मराठी समजत नाही.
आपण हिंदी किंवा इंग्लिशमधून बोलण्यास सुरुवात केली तर मोहन यांची पत्नी म्हणते, की तुम्ही मराठीत बोला मला थोडं थोडं समजतं. घरात जास्त प्रभाव तमिळचाच. पण ही मंडळी मराठी एकदम विसरलेली नाहीत.

पॅलेस भागात मराठी माणसांची घरे जास्त आहेत. त्याठिकाणी मराठी माणसांची घरे कुठे आहेत, तर कोणतीही व्यक्ती मोहन जाधव यांच्या घराचा पत्ता पहिल्यांदा देतो. मोहन हे मराठी चांगल्या पद्धतीने बोलू शकत नसतीलही. पण तंजावूरमधील त्यांची एक ओळख ते मराठी आहेत, अशीही आहे.
मोहन जाधव हे गेल्या तीस वर्षांपासून द्रमुक पक्शाही एकनिष्ठ आहेत. सुरुवातीपासूनच कलैंग्नार यांचे आकर्षण असल्यामुळे तरुण वयातच द्रमुकच्या युथ विंगमध्ये दाखल झालो, असं मोहन अभिमानानं सांगतात.

सुरुवातीच्या काळात मोहन हे द्रमुकच्या युथ विंगचे तंजावूर शहर सरचिटणीस होते. सध्या द्रमुक पक्शाचे तंजावूर शहर उपसरचिटणीस म्हणून ते काम पाहत आहेत. तंजावूर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणूनही ते काम करीत आहेत. सध्या तंजावूरचे द्रमुकचे उमेदवार ओबेयदुल्ला यांच्या प्रचाराची सर्व जबाबदारी मोहन यांच्यावर आहे.
शहरातील विविध वॉर्डांमध्ये जाऊन प्रचार करणे, ओबेयदुल्ला यांच्या बरोबर संपूर्ण मतदारसंघात फिरून नागरिकांना मतदानाचे आवाहन करणे, तंजावूर परिसरातील गावांमध्ये जाऊन तिथल्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन निवडणुकीसाठी योग्य फिल्डिंग लावणे, अशा कामांमध्ये मोहन सध्या व्यग्र आहेत.

वेळात वेळा काढून त्यांनी महाराष्ट्र टाइम्सच्या प्रस्तुत प्रतिनिधीशी संवाद साधला. टू जी घोटाळ्याचा मुद्दा ग्रामीण भागामध्ये अजिबात महत्वाचा नसून कलैंग्नार यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने केलेल्या कामांची माहिती आम्ही घरोघरी जाऊन देतो आहोत आणि आम्हाला खूप चांगला रिसपॉन्स मिळत आहे, अशी प्रतिक्रिया मोहन यांनी व्यक्त केली.


जिसमे मिलाओ उसके जैसा...

पानी रे पानी तेरा रंग कैसा, जिसमे मिलाओ उसके जैसा... एखाद्या गोष्टीमध्ये अगदी सहजपणे मिसळलं जाणारं आणि स्वतःचं स्वतंत्र अस्तित्त्व न ठेवता त्याच्याशी खूप चांगल्या पद्धतीनं एकरुप होण्याचा पाण्याचा गुण मराठी माणसानं अगदी चांगल्या पद्धतीनं अवगत केला आहे. जिथं मराठी माणसानं आपला डेरा टाकला तो तिथलाच होऊन गेला. तिथली संस्कृती, भाषा आणि परिसरातील सगळ्या गोष्टी त्यानं इतक्या उत्तम पद्धतीनं आत्मसात केल्या की आतला कोण आणि बाहेरचा कोण, हे ओळखणं मुश्किल व्हावं. पानिपत, बडोदा, इंदूर, जिंजी, ग्वाल्हेर किंवा हैदराबाद... जिथं मराठी माणूस गेला तो तिथलाच होऊन गेला. त्यानं स्वतःचं मराठीपण जपलं पण स्वतंत्र चूल कधीच मांडली नाही. अशा परिस्थितीत तंजावूरचा मराठी माणूस कसा वेगळा असणार. तो देखील तमिळच होऊन गेलाय.


छत्रपती शिवाजी महाराजांचे बंधू व्यंकोजीराजे हे १६७५ मध्ये तंजावूरचे महाराज बनले. तत्पूर्वी शहाजीराजांनीही तंजावूर जिंकले होते. पण नंतर त्यांनी विजयराघवन नायक याला राज्य बहाल केले. पण नंतरच्या काळात व्यंकोजीराजे हे तंजावूरचे महाराज झाले. व्यंकोजीराजांनंतर तंजावूरच्या इतिहासात संस्मरणीय ठरलेले नाव म्हणजे सरफोजी महाराज यांचे. सरफोजी महाराज हे १८३२ ते १८५५ या काळात तंजावूरचे राजे होते. त्यांनी अनेक लोकोपयोगी गोष्टींची अंमलबजावणी केल्यामुळे ते लोकप्रिय ठरले होते. सरफोजी महाराजांची सहावी पिढी सध्या राजे पदावर आहे. बाबाजी भोसले हे सध्या तंजावूरचे राजे आहेत.

व्यंकोजी राजांच्या काळात जी कुटुंब तंजावूरला आली ती तंजावूरचीच होऊन गेली.
तंजावूर शहर आणि परिसरात जवळपास पाच हजार मराठी कुटुंबे आहेत. मराठी मंडळींची एकूण लोकसंख्या पंधरा ते अठरा हजारांच्या आसपास असावी. अर्थात, गेल्या काही वर्षांत तंजावूरची मराठी मंडळी इथला जमीन जुमला विकून सातारा, कोल्हापूर आणि सांगली भागात रहावायास गेली आहे. त्यामुळे मराठी टक्का काही प्रमाणात घटलाही आहे, अशी माहिती तंजावूरचे प्रिन्स शिवाजीराजे टी. भोसले यांनी महाराष्ट्र टाइम्सला दिली.

सध्या पन्नाशी किंवा साठीत असलेली पिढी अगदी तोडकं मोडकं मराठी बोलते. त्यांची पुढची पिढी मराठीचा वापर त्यापेक्शा कमी करते आणि तिसरी पिढीला मराठीची फक्त तोंडओळख आहे. आपण मराठी आहोत, इतकंच कदाचित त्यांना माहिती असेल. म्हणूनच मराठीत बोलायला लागल्यानंतर ही मंडळी थोडी बिचकतात. कदाचित आपलं मराठी ह्यांच्याइतकं स्वच्छ आणि शुद्ध नाही म्हणूनही त्यांना असं वाटत असावं. पण तुम्ही बोला, मला समजेल, अशा विश्वास आपण व्यक्त केला तर ही मंडळी अगदी मोकळेपणानं मराठीत बोलतात. तमिळ भाषेतील अनेक शब्द आणि लहेजा असलेलं मराठी समजून घेणं अवघड जातं. पण आपल्याला त्यांचं मराठी समजतं इतकंच.


इतर मंडळींच्या मानानं तंजावूरचे प्रिन्स शिवाजीराजे टी. भोसले यांचे मराठी उत्तम आहे. कोल्हापूर, सातारा आणि महाराष्ट्राच्या इतर भागात त्यांच्या वारंवार भेटी असतात. म्हणूनही असेल कदाचित. पण ते अत्यंत सहजपणे मराठीतून संवाद साधतात.

मराठी माणसाची संख्या अठरा-वीस हजार असली तरी मराठी माणूस मराठी म्हणून ही मंडळी फारशी एकत्र येत नाहीत. गटातटाच्या राजकारणाचा मराठी माणसाला लागलेला शाप तंजावूरमध्येही कायम आहे. तंजावूरमध्ये राहणा-या बहुतांश मराठी नागरिकांचे महाराष्ट्रात फारसे नातेवाईक नाहीत. ही मंडळी कर्नाटक आणि हैदराबाद इथल्या मराठी लोकांशी किंवा तंजावूरमध्येच सोयरिक करतात. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठी लोकांशी त्यांचा फारसा संबंध येत नाही. ही मंडळी साऊथ इंडियन महाराष्ट्र मंडळ ही संस्था चालवितात. ही संस्था बृहन्महाराष्ट्र मंडळाशी संलग्न आहे.
बाबाजी भोसले सध्या राहतात तो पॅलेस, सरस्वती महाल संग्रहालय आणि सरफोजी महाराज तसेच मराठ्यांचा इतिहास दर्शविणारे संग्रहालय पॅलेस परिसरातच आहे. तिथं फिरून थोड़ी माहिती घेतली आणि मग पुरातत्व खात्याचे अधिकारी एस. सेल्वराज यांच्याशी गप्पा झाल्या. सेल्वराज यांनी मराठी माणसाबद्दल व्यक्त केलेली प्रतिक्रिया खूप मस्त होती. मराठी माणसाचा उल्लेख ते मराठा असाच करतात. मराठे हे कधीच भांडखोर आणि विध्वसंक नव्हते. ते इथे राजे म्हणून आले तेव्हा त्यांनी चौल राजांच्या स्मृतींचे निष्ठेने जतन केले. वास्तविक पाहता, त्यांना ते उद्ध्वस्त करणे सहज शक्य होते. पण त्यांचा तो मूळ स्वभाव नाही. आजही मराठे इतक्या शांततेने आणि मिळून मिसळून रहात आहेत, की त्यांना मराठी का म्हणावे ते तर तमिळच आहेत, असे वाटते. आपल्या समाजाबद्दल एका त्रयस्थ माणसाने अशी प्रतिक्रिया व्यक्त केली तर कोणाला आवडणार नाही.

तमिळनाडूत कमळ फुलण्याची शक्यता

नागरकोईलमध्ये भाजपला संधी



प्रदेशाध्यक्श राधाकृष्णन यांचे पारडे जड
तमिळनाडूच्या रणसंग्रामात द्रमुक आणि अण्णा द्रमुक यांच्यात घमासान युद्ध सुरु असताना राष्ट्रीय पक्श असलेल्या काँग्रेस आणि भारतीय जनता पक्शाला मात्र या निवडणुकीतून फारशा आशा नाहीत. काँग्रेसने तरी द्रमुकबरोबर युती करून पंधरा-वीस जागांची बेगमी करुन ठेवली असली तरी भाजपला मात्र, या निवडणुकीत नेहमीप्रमाणेच अपयशाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कन्याकुमारी जिल्ह्यातील नागरकोईल मतदारसंघ भाजपसाठी लक्की ठरण्याची शक्यता असून इथून विजय निश्चित आहे, अशी आशा भाजपचे कार्यकर्ते बाळगून आहेत.

भारतीय जनता पक्शाने नागरकोईल मतदारसंघातून पक्शाचे प्रदेशाध्यक्श पाँडी राधाकृष्णन यांना रिंगणात उतरविले आहे. राधाकृष्णन हे अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात केंद्रीय वाहतूक राज्यमंत्री होते. गेल्या अनेक दशकांपासून राजकारणात असूनही अत्यंत साध्या पद्धतीने जीवन जगणारे राधाकृष्णन हे अविवाहित आहेत. साध्या राहणीमुळे ते कन्याकुमारीचे कामराज म्हणूनही ओळखले जातात. राधाकृष्णन हे व्यवसायाने वकील आहेत. राधाकृष्णन हे हिंदू मुनान्नी या लढवय्या संघटनेचे ‍१९८० मध्ये पूर्णवेळ कार्यकर्ते होते. तेव्हापासून ते सार्वजनिक जीवनात आहेत.
राधाकृष्णन यांनी यापूर्वी दोनवेळा लोकसभेची निवडणूक लढविली होती. मात्र, दोन्हीवेळा त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. दुस-या वेळी त्यांना कम्युनिस्ट पक्शाच्या उमेदवाराकडून ६५ हजारांनी पराभव पत्करावा लागला होता. त्यावेळी त्यांना अडीच लाख मते मिळाली होती. वाहतूक राज्यमंत्री असताना कोलाचेल-तिरुवत्तर आणि थ्युकालय-थडीक्कारमकोलम या गावांदरम्यान केलेल्या पक्क्या डांबरी सडकांमुळे नागरिकांची खूप मोठ्या प्रमाणावर सोय झाली, अशी आठवण इथले मतदार अजूनही काढतात.

गेल्या अनेक वर्षांपासून मी लोकांची कामे करतो आहे. त्याचा विचार करून लोक मला यंदा नक्की संधी देतील. सामान्य कार्यकर्ता ही माझी ओळख आहे आणि मी अगदी सहजपणे उपलब्ध होऊ शकतो, हे लोकांना माहिती आहे. त्यामुळे यंदा भाजपला नक्की संधी आहे. शिवाय आमच्या मतदारसंघात ख्रिश्चन मतदारांची संख्या लक्शणीय आहे. आतापर्यंत ख्रिश्चन समाज आम्हाला कधीच मतदान करीत नव्हता. पण आता आमची ख्रिश्चन संघटनांबरोबर बैठक झाली असून चर्च लवकरच तसा आदेशही जारी करण्याची शक्यता आहे. तेव्हा भाजप यंदा नक्की खाते उघडणार, असा विश्वास राधाकृष्णन यांनी महारष्ट्र टाइम्सशी बोलताना व्यक्त केला.


अर्थात, दक्शिण तमिळनाडूचे राजकीय विश्लेषक अण्णामलाई यांनी मात्र, भाजपच्या विजयाची शक्यता खूपच कमी असल्याचे सांगितले. राधाकृष्णन हे खूप चांगले उमेदवार आहेत. मात्र, तमिळनाडूमध्ये द्रमुक किंवा अण्णा द्रमुकची मदत घेतल्याशिवाय दुस-या कोणत्याही पक्शाचा उमेदवार निवडून येत नाही, हा इतिहास आहे. भाजपला हा इतिहास पुसायचा असेल तर खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. पण तशी शक्यता कमीच दिसते आहे.

Thursday, April 07, 2011

प्रचाराच्या जुन्या आठवणींना उजाळा

पुद्दुचेरीत बाळासाहेबांचे फॅन्स

तमिळनाडू डायरी

तमिळनाडूमध्ये गेल्या 44 वर्षांपासून काँग्रेस स्वबळावर सत्तेवर आलेली नसली तरी तमिळनाडूच्या पोटातच असलेल्या पुदुच्चेरीमधली परिस्थिती मात्र, खूपच वेगळी आहे. काँग्रेसशिवाय सरकार स्थापन करणे हे द्रमुक किंवा अण्णा द्रमुक यापैकी कोणत्याही पक्षाला पुदुच्चेरीमध्ये शक्य होत नाही. काँग्रेसकडून दोनदा मुख्यमंत्रीपद भूषविलेले एन. रंगास्वामी यांनी दिल्लीतील दरबारींच्या राजकारणाला कंटाळून एन आर काँग्रेस नावाचा स्वतंत्र पक्ष स्थापन केला असून ते जयललिता यांच्याशी युती करुन निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. पुद्दुचेरीमध्ये विधानसभेच्या अवघ्या तीस जागा असून प्रत्येक मतदारसंघात अवघे पाच ते दहा हजार मतदान आहे.




पुद्दुचेरीमध्ये प्रवेश करताच निवडणुकीच्या लहानपणीच्या आठवणी जागा झाल्या. म्हणजे लहानपणीचं वातावरण डोळ्यासमोर उभं राहिलं. ताई माई आक्का विचार करा पक्का आणि अमुक तमुकवर मारा शिक्का... अशा घोषणा देत फिरणाऱ्या रिक्षा, भडक रंगांनी रंगविलेल्या भिंती आणि जागोजागी लागलेली पोस्टर्स तसेच स्टिकर्स. कालांतराने निवडणूक आयोगाच्या कडक निर्बंधांमुळे हे चित्र नष्ट झाले आणि निवडणुकीतील गंमतच हरविली. पण पुद्दुचेरीमध्ये मात्र, कर्कश्श तमिळ गाण्यांच्या सहाय्याने प्रचार करणाऱ्या रिक्षा जागोजागी दिसतात. पुद्दुचेरीमध्ये येताना आणि पुद्दुचेरीहून तंजावूरकडे जाताना छोट्या छोट्या गावांमध्ये रंगवलेल्या भिंतीही नजरेस पडतात. कुठे करुणानिधींचा उगवता सूर्य दिसतो. तर कुठे अम्मांच्या पक्षाची दोन पाने दिसतात. मध्ये कधीतरी विजयकांत यांच्या चित्रपटांतील पोस्टर्सही लागलेली दिसतात. त्यामुळे म्हटलं चेन्नईमध्ये न दिसलेली गोष्ट पुद्दुचेरीमध्ये दिसल्यामुळे पूर्वीच्या आठवणी जाग्या झाल्या.

पुद्दुचेरीचं महत्वाचं आकर्षण म्हणजे इथला अरविंदाश्रम. योगी अरविंद यांची समाधी. तिथं जाऊन त्यांच्या समाधीचं दर्शन तर घेतलंच पण मला ओढ लागली होती ती पुद्दुचेरीचे माजी मुख्यमंत्री एन. रंगास्वामी यांना भेटण्याची. भलताच लोकप्रिय माणूस. चौकापासून ते चौकीपर्यंत आणि बारशापासून ते मयतापर्यंत प्रत्येक ठिकाणी हजर राहणारे तसेच लोकांच्या अडल्या नडल्याला धावून जाणारे पुद्दुचेरीचे माजी मुख्यमंत्री. मुख्यमंत्री असूनही मोटरसायकल किंवा स्कूटरवरून फिरणारे, सहजपणे चौकात गप्पा झोडणारे किंवा टपरीवर कोणतीही लाज न बाळगता चहा पिणारे एन. रंगास्वामी. वेटरपासून ते रिक्षा ड्रायव्हरपर्यंत कोणालाही विचारा त्याच्याकडे रंगास्वामी यांचा मोबाईल नंबर असणारच. अशा रंगास्वामींना भेटण्याची खूप इच्छा होती. फोनवरुन त्यांच्याशी बराच वेळ बोलणंही झालं. पण ते प्रचारात व्यस्त असल्यामुळे प्रत्यक्ष भेट मात्र झाली नाही. पण निवडणुका झाल्यानंतर पुद्दुचेरीला पुन्हा एकदा निवांत या, असं निमंत्रण द्यायला मात्र, ते विसरले नाहीत.

बाळासाहेबांचे फॅन्स



मी महाराष्ट्रातून आलोय, म्हटल्यानंतर अनेकांनी म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या राज्यातून का, अशीच विचारणा केली. चेन्नईमध्ये वकिली करणारे एल. गणपती हे त्यापैकीच एक. गणपती हे बाळासाहेबांचे भलतेच फॅन. काँग्रेसच्या नेत्यांनी एन. रंगास्वामी यांना कसा त्रास दिला आणि त्यामुळे त्यांना काँग्रेस कशी सोडावी लागली याबद्दल गणपती हे भरभरून बोलत होते. थोड्या वेळाने गाडी पुन्हा बाळासाहेबांकडे वळली. मला त्या माणसाचे सडेतोड विचार पटतात. ते आणि त्यांचा पक्ष आमच्या पुद्दुचेरीमध्ये हवा होता, अशी गणपती यांची इच्छा. पण ते शक्य नाही, हे गणपती यांनाही माहिती. बाळासाहेबांसारखा एखादा खमक्या माणूसच आमच्याकडे हवा, या नोटवर त्यांनी माझा निरोप घेतला.

Tuesday, April 05, 2011

तमिळनाडू खाद्ययात्रा

भातोबा, इडलोबा आणि डोसोबा...
तमिळनाडूमध्ये विधानसभेच्या कव्हरेजसाठी येण्याचं निश्चित झालं तेव्हा अनेकांनी अभिनंदन करताना म्हटलं, की आता काय मजा आहे. इडली, डोसा आणि भात खाऊन दिवस काढायचे आहेत तुला. तसं पहायला गेलं तर मला हे सगळ्ळं खूप आवडतं. त्यातून इडली तर माझी एकदम लाडकी. त्यामुळं मी पण मनातल्या मनात खूप खूष होतो. चेन्नईत पोहोचलो तेव्हा सुरुवातीचे तीन दिवस टाइम्सच्या गेस्ट हाऊसमध्ये व्यवस्था होती. तिथला आचारी हा उत्तर प्रदेशचा होता. रमेश यादव. दोन दिवसांनंतर त्याच्याजागी उत्तर प्रदेशचाच दुसरा कोणतरी आला. त्यामुळं सुरुवातीचे तीन दिवस मला दाक्षिणात्य पदार्थांचा पुरेपूर आस्वाद घेता आला नव्हता. जेवणात रोज पोळ्या असायच्याच. सकाळी नाश्त्याला मसाला डोसा (घावन स्टाईलचा) किंवा इडल्या ठरलेल्या. एका दिवशी छोटे उत्तप्पेही होते. पदार्थ मस्त असायचे पण ती चव रेग्युलर चव नव्हती. म्हणजे खास दाक्षिणात्य हॉटेलात असते तशी नव्हती.

नाही म्हणायला पहिल्या दिवशी टेन्यामपेट भागातील एका छोट्या हॉटेलात पुरी भाजी आणि कर्ड राईस खाल्ला होता. दुसऱ्या दिवशी अड्यार गेट परिसरातच एका ठिकाणी मसाला डोसा आणि पुन्हा एका कर्ड राईस खाल्ला. मसाला डोसा पुण्यात मिळतो तसाच होता. फारसा फरक नव्हता. पण दोन्हीकडील कर्ड राईस अमुलाग्र वेगळा. रसरशीत आणि मी आंबट. सोबत किसलेले गाजर किंवा गाजराचे तुकडे त्यामध्ये टाकलेले. लेमन राईस, कर्ड राईस, सांबार राईस, पोंगल, स्वीट राईस असे राईसचे किमान पाच-सात प्रकार प्रत्येक टिफीनमध्ये मिळतात.

चेन्नईसोडून पुद्दुचेरीला पोहोचलो आणि तिथं खऱ्या अर्थानं स्पेशल तमिळ राईस प्लेट मिळाली. पुद्दुचेरी बसस्टँडसमोरच स्री सब्थगिरी (मराठीत श्री सप्तगिरी) नावाचे हॉटेल आहे. एक नंबर प्रकार. पन्नास रुपयांमध्ये भरपूर जेवण. म्हणजे एक पोळी आणि हवा तेवढा राईस. सुरुवातीला ताटात आठ-दहा वाट्या, एक पोळी आणि एक पापड असा मेन्यू येतो. एक वाटी भेंडीच्या भाजीची, एक वांग्याच्या भाजीची, एकामध्ये सांबार, एकात सारम्, एकात दही, एकात मिरचीचा खर्डा लावलेलं ताक, आणखी एकात खीर (ती देखील भाताचीच), आणखी एका वाटीत आणखी कसलीशी भाजी. (किती लक्षात ठेवायचं)


एक पोळी संपल्यावर त्याला म्हटलं आणखी एक पोळी दे बाबा. तो म्हटला, वन्ली वन सर. तुम्हाला हवा तेवढा भात घ्या, पण पोळी एकच. बाबा पैसे देईन एक्स्ट्रॉ, असं म्हटल्यावर तो तयार झाला. दोन पोळ्या घेतल्यानंतर त्यानं जो भात वाढला तो पाहून चक्करच यायची बाकी होती. परत इतकं वाढून आणखी वाढू का, असं विचारत होता. म्हटलं, बाबा काय मारतोस की काय भात खायला घालून. हैदराबादची आठवण झाली. तिथंही राईस प्लेटही खरोखरच राईस प्लेट होती. फक्त राईस राईस आणि राईस. पहिला भात, मधला भात आणि शेवटचा भात. आंबट आणि आपल्यापेक्षा थोडं जास्त तिखट असं जेवून तृप्त मनानं उठलो.

तिथंच दुसऱ्या दिवशी सकाळी मसाला डोसा खाल्ला. मसाला डोसा हा कुठेही खा तो कुरकुरीत अजिबात नसतो. घावनसारखाच जाडसर असतो. (मला तर वाटतं, पुण्यातल्या तमाम उडुपी हॉटेल्स कुरकुरीत डोसाच्या नावाखाली लोकांना जास्त पैसे घेऊन फसवितात. अन्यथा हैदराबाद, चेन्नई, पुद्दुचेरी कुठेही जा, कुरकुरीत डोसा कुठेही मिळत नाही. मग ही मंडळीच कुठून ही शक्कल लढवितात. बरं, आपण पण कुरकुरीत डोसा, कुरकुरीत डोसा करून त्यांच्या घशात बक्कळ पैसे ओतत असतो.) सोबतीला दोन-तीन चटण्या आणि घट्ट सांबार. पुद्दुचेरीहून कुडलूर, चिदंबरम, कुंभकोणममार्गे तंजावूरला पोहोचलो. (आपल्याला फक्त पुलंच्या असामी असामी मधला प्रोफेसर कुंभकोणम माहिती होता. कुंभकोणम नावाचं गाव आहे, ते आजच कळलं. अर्थात, चिदंबरम नावाचं गाव आहे, हे माहिती होतं.)

तंजावूर इथं बसस्टँडच्या जवळच आर्य भुवन नावाचं एक सॉल्लिड टिफीन सेंटर आहे. तिथं इडली खाल्ली. खाल्ली नाही खाल्ल्या नाही. मस्त केळीचं पान. त्यावर दोन गरमागर इडल्या. समोर दोन वाट्या सांबार. नंतर तीन प्रकारच्या चटण्या. एक नारळाची पांढरी चटणी. एक हिरवी तिखट चटणी. आपण तयार करतो तशी. आणि एक लाल चटणी. टोमॅटो आणि लाल मिरची घालून तयार केलेली आंबट चटणी. गरमागरम मऊ लुसलुशीत चटणी कशाबरोबर खायची ते तुम्ही ठरवा आणि तुटून पडा. दोनवर थोडंच भागणार आहे. मग आणखी दोन मागविल्या. तेव्हा कुठं समाधान झालं. नंतर मस्त कडक कॉफी घेतली आणि बाहेर पडलो.


आर्य भुवनच्या जवळच एक छोटंस स्नॅक्स सेंटर आहे. तिथं गरीब लोकांची गर्दी जास्त. दोन रुपयांना ओनियन वडा, उडीद वडा, तीन रुपयांना पॅटिस किंवा सामोसा, चार रुपयांना चहा किंवा सहा रुपयांना ऑरेंज सरबत, असा अगदी सामान्य गरीबांना परवडेल असा मेन्यू. सोबतील चिवडा आणि चकण्याचे अनेक आयटम्स. लाडू, जिलेबी आणि इतर पदार्थही. तिथं खाणारी आणि घरी नेणारी मंडळी मोठ्य़ा संख्येनं इथं दिसतात. इडली, डोसा आणि भाताचे अजूनही काही दिवस बाकी आहेत. तेव्हा पुन्हा एकदा लवकरच भेटू नव्या शहरांसह, नव्या पदार्थांसह आणि नव्या चवीसह.

नन्ड्री.

तमिळ शिका तरच पैसे मिळतील

चेन्नईहून पाँडिचेरीसाठी निघालो आणि तमिळनाडूमध्ये तमिळ भाषेचे महत्त्व का टिकून आहे, याचा साक्शात्कार मला प्रवासादरम्यान झाला. तमिळनाडूमध्ये कोठेही काम करा, तमिळ आल्याशिवाय तुम्हाला नोकरी मिळत नाही किंवा जादा पैसेही मिळत नाही. तेव्हा जास्त पैसे मिळवायचे असतील तर तमिळ शिकण्यावाचून तुम्हाला गत्यंतरच नाही, ही गोष्ट उत्तर प्रदेशहून आलेल्या एका भैय्या मुलाकडून मला समजली. तेव्हा मला धक्का वगैरे काही बसला नाही. पण जे काही ऐकले होते ते प्रत्यक्श अनुभवल्याचा साक्शात्कार झाला.
सोनू असं त्या मुलाचं नाव. वय साधारण पंचवीस सव्वीस असेल. सोनू हा मूळचा उत्तरप्रदेशचा. रामपूर किंवा तत्सम कुठल्या तरी खेड्यातला. दोन वर्षांपूर्वी तो मुंबईमध्ये फर्निचर बनविण्याच्या धंद्यात कारागिर म्हणून लागला होता. तिथं त्याला सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या कालावधीचे दोनशे रुपये मिळायचे. पण चेन्नईमध्ये तितक्याच कामाचे त्याला साडेतीनशे रुपये रोज मिळतात. त्यामुळे त्यानं मुंबई सोडून चेन्नईत येण्याचा निर्णय घेतला. मुंबईमध्ये भैय्या लोकांची खूप गर्दी असल्यामुळे तिथं जास्त पैसे मिळत नाही. पण चेन्नईमध्ये कारागिर लोकांची कमतरता असल्याने इथं आम्हाला जास्त भाव मिळतो, असं सोनू सांगतो.
चेन्नईतही कारागिरांचे दोन प्रकार आहेत. ज्यांना तमिळ येते, अशा कारागिरांनाच तमिळ ठेकेदार कामावर ठेवतात. तमिळ ठेकेदारांकडे काम केले तर आम्हाला दिवसाला साडेतीनशे रुपये मिळतात. जर गैरतमिळ (म्हणजे हिंदीभाषक) ठेकेदाराकडे काम केले तर मुंबईप्रमाणेच दोनशे रुपये रोजाने काम मिळते. त्यामुळे आम्हाला जास्त पैसे मिळवायचे असतील तर तमिळ भाषा शिकावीच लागते. तमिळनाडूत येऊन जर मुंबईचाच भाव मिळणार असेल तर इथे येण्याचा काय उपयोग, असा सवाल सोनू उपस्थित करतो.
तमिळनाडूमध्ये आल्यावर तमिळ शिकला. मग मुंबईमध्ये असताना मराठी शिकला होता का? हा माझा प्रश्न ऐकून तो चक्रावूनच गेला. मी मूर्ख म्हणून असा प्रश्न विचारतो आहे, की काय असाच त्याचा चेहरा झाला होता. सोनू म्हणाला, साहेब, मुंबईमध्ये मराठी लोकच हिंदीमध्ये बोलतात. त्यामुळे आम्हाला तिथे भाषेचा प्रॉब्लेम कधीच आला नाही. आम्ही आमच्याच प्रांतामध्ये आहोत, असे आम्हाला वाटायचे. त्यामुळे महाराष्ट्रात असताना किंवा मुंबईमध्ये असताना मराठी शिकण्याचा प्रश्नच आला नाही. तिथे मराठी न शिकताही आम्हाला नोकरी आणि पैसे मिळत होते. मात्र, इथे तसे नाही. त्यामुळे तमिळ आम्हाला शिकावीच लागली.
काही महिन्यांपूर्वी तमिळनाडूमध्ये राजस्थानी लोकांचे एक संमेलन झाले होते. त्यावेळी त्यांनी राजस्थानी भाषेतील गाणी आणि संगीत जोरजोरात लावले होते. त्यावेळी काही जणांनी त्यांच्याबद्दल तक्रार केली आणि हा मुद्दा करुणानिधी यांच्यापर्यंत गेला. त्यावेळी करुणानिधी यांनी त्यांना सज्जड भाषेत इशारा दिला होता, तुम्हाला गाणी ऐकायची ऐका, काम करायचे आहे करा. तुम्हाला कोणी अडविणार नाही. पण जेव्हा भाषेचा मुद्दा येईल, तेव्हा तुम्हाला तमिळ आलीच पाहिजे. बोलायचे मात्र, तमिळमध्येच. ब-याच दिवसांपूर्वी वाचलेला हा किस्सा नुसता डोक्यात होता. सोनूच्या निमित्ताने त्याचा थेट अनुभव आला.
तमिळनाडू डायरी
जयललिता आणि विजयकांत यांच्यासह इतर विरोधकांनी ए. राजा यांच्यावरील आरोपांचा मुद्दा लावून धरला नसला तरी सर्वसामान्य रिक्शावाल्यांपर्यंत हा मुद्दा नीट पोहोचलेला आहे, याचा प्रत्यय चेन्नईमध्ये आला. चेन्नईहून पुद्दुचेरी येथे येण्यासाठी बस स्टँडला जायला निघालो. तेव्हा मी रिक्शामध्ये बसलो त्याचा ड्रायव्हर रघू नावाचा माणूस होता. तो मूळचा कर्नाटकचा. तो मोठा झाला आंध्र प्रदेशात आणि रिक्शा चालवितो चेन्नईमध्ये, म्हणजे तमिळनाडूत.
कुंचूम कुंचूम हिंदी, कुंचूम कुंचूम इंग्लिश, असं तो म्हणला. म्हणजे मला थोडं थोडं हिंदी आणि इंग्लिश समजतं असं. त्याला मी विचारलं, काय यंदा कोणाला संधी आहे? त्यावर त्यानं क्शणाचाही विलंब न करता सांगितलं, की यंदा अम्माच. मी म्हटलं, का? तेव्हा तो म्हणाला, की त्या राजानं संपूर्ण देशाला लुटलं. पावणे दोन करोडचा गफला केला. सगळ्या तमिळनाडूचं नाव खराब केलं, असं म्हणत रिक्शावाल्यानं एक पंचाक्शरी शिवी हासडली. पुन्हा तमिळमध्ये दोन-चार अपशब्द वापरून नवी पंचाक्शरी हिंदी शिवी हासडून यंदा अम्माच, असं ठासून सांगितलं. त्यामुळं विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला नसला तरी काही चलाख लोकांना त्याची पुरेपूर माहिती आहे, असंच म्हणावं लागेल.
आजचा तमिळ शब्द वेईप्पाळः शब्दाचा अर्थ उमेदवार

Monday, April 04, 2011

करुणानिधी यांच्या घराणेशाहीवरच हल्ला

तमिळनाडूच्या प्रचारातून टू जी गायब


संपूर्ण देशाला हादरवून टाकणा-या टू जी घोटाळ्यामुळे मंत्रिपद गमवावे लागलेल्या ए. राजा यांच्या तमिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात या महाघोटाळ्याचा साधा उल्लेखही होताना दिसत नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अण्णा द्रमुकच्या नेत्या जे. जयललिता यांनीही या मुद्द्दायाला हात न घालता थेट करुणानिधी यांच्या घराणेशाहीवरच हल्ला चढविला आहे. पावणे दोन लाख कोटींच्या टू जी घोटाळ्यामुळे आम्हाला कुठे काय फरक पडतो, असा उलट सवाल विचारून तमिळ मतदारही हा मु्द्दा निकालात काढत आहेत.

केंद्र सरकारला अडचणीत आणणा-या टू जी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी ए. राजा हे सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघम पक्शाचे. त्यामुळे द्रमुकला अडचणीत आणण्यासाठी विरोधी पक्शनेत्या जे. जयललिता हा मुद्दा हिरीरीने मांडतील, असा विचार पुण्याहून चेन्नईला येताना मनात आला होता. मात्र, जयललिता नव्हे तर डीएमडीके पक्शाचे नेते विजयकांत यांनी देखील टू जी घोटाळ्याबद्दल ब्र देखील काढला नसून वाढती महागाई, राज्यातील विजेचे संकट आणि करुणानिधी यांच्या कुटुंबीयांची दादागिरी आणि राज्यभरात वाढलेल्या गुन्हेगारीच्या घटना या नेहमीच्याच मुद्द्यांभोवती विरोधकांचा प्रचार फिरत आहे.

करुणानिधी आता थकले असून वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांना विश्रांतीची गरज आहे. दुसरीकडे करुणानिधी यांचे पुत्र स्टॅलिन आणि अळगिरी तसेच कन्या कनिमोळी यांच्यामध्ये नेतृत्त्वावरून प्रचंड मतभेद आहेत. हाच मुद्दा जयललिता त्यांच्या भाषणांमधून हायलाईट करीत आहेत. शिवाय जगातील श्रीमंतांच्या यादीमध्ये समावेश होईल, इतकी संपत्ती करुणानिधी कुटुंबाने ओरबाडली आहे, असा आरोप जयललिता करीत आहेत. दुसरीकडे कोईमतूर, सेलम आणि इरोड यासारख्या पश्चिमी जिल्ह्यांमध्ये रंगाचे कारखाने आणि यंत्रमाग यांची संख्या प्रचंड आहे. त्यांना भारनियमनाचा फटका बसत असून हाच मुद्दा जयललिता यांनी लावून धरला आहे. तमिळनाडूच्या दक्शिण भागात द्रमुकच्या अळगिरी यांचे वर्चस्व असून त्यांची दादागिरी आणि तेथील वाढती गुन्हेगारी हे मुद्दे जयललिता यांच्या भाषणांमध्ये प्रामुख्याने येतात.

टू जी स्पेक्ट्रमसारखा महाप्रचंड घोटाळ्याचा मुद्दा हातात असतानाही जयललिता त्याला महत्त्व का देत नाहीत, यावर तमिळनाडूतील वरिष्ठ राजकीय विश्लेषक श्री. मणी म्हणाले, की मुळात टू जी हा घोटाळा तमिळनाडूतील लोकांपर्यंत पोहोचलेला नाही. तो घोटाळा म्हणजे नक्की काय झाले आणि त्याचा आपल्याला थेट काय फटका बसणार हे त्यांना समजलेले नाही. अशा परिस्थितीत महागाई, भारनियमन आणि करुणानिधी यांच्या कुटुंबियांचे पटकन नजरेत भरणारे वैभव हे मुद्दे सामान्य नागरिकांच्ा अत्यंत जिव्हाळ्याचे आहेत. ते मुद्दे पटले तरच लोक मते देतील. टू जीमुळे फारशी मते मिळणार नाहीत, हे जयललिता यांना ठाऊक आहे. त्यामुळेच त्यांनी आणि विजयकांत यांनी हा मुद्दा भाषणांमध्ये काढला नाही.

बॉक्स

द्रमुकचे अध्यक्श एम. करुणानिधी हे त्यांच्या समर्थकांप्रमाणेच तमिळ लोकांमध्ये कलैंग्नार या नावाने ओळखले जातात. कलैंग्नार म्हणजे कलेचे मर्म जाणणारा निष्णात कलावंत. करुणानिधी हे कलैंग्नार नावाने ओळखले जातात तर जयललिता यांचे सुप्रसिद्ध नाव म्हणजे अम्मा. पण अण्णा द्रमुकच्या कार्यकर्त्यांमध्ये त्या पुरच्ची तलैवी या नावाने लोकप्रिय आहेत. पुरच्ची तलैवी म्हणजे क्रांतिकारी महिला नेत्या. जयललिता यांचे राजकीय गुरु एम. जी. रामचंद्रन हे पुरुच्ची तलैवर म्हणून ओळखले जायचे. पुरुच्ची तलैवरचे स्त्रीलिंगी रुप म्हणजे पुरुच्ची तलैवी. त्यामुळे हा सामना कलैंग्नार आणि पुरुच्ची तलैवी यांच्यातच आहे.

आजचा शब्दः अदिरेडी. त्याचा अर्थ खूप मोठा आणि महत्वाचा. विजय या शब्दाशी सुसंगत असलेला आणि वापरला जाणारा तमिळ शब्द. भारताच्या विश्वविजयाचे वर्णन करण्यासाठी दिनकरन आणि दिनमणि वृत्तपत्रांमध्ये हा शब्द वापरलेला आहे.