Tuesday, March 11, 2008

अन्नपूर्णा आणि महालक्ष्मी...


गरमागरम बटाटे वडा आणि फक्कड चहा

वडेवाले जोशी, रोहित वडेवाले, गोली वडापाव, जम्बो वडापाव आणि चौकाचौकांमध्ये गाड्यांवर मिळणाऱ्या वड्याची चव चाखून कंटाळा आला असेल तर शिवाजी रस्त्यावर असलेल्या "प्रकाश स्टोअर्स'च्या गल्लीत असलेल्या अन्नपूर्णाला एकवार जरुर भेट द्या.

आपण त्या गल्लीत शिरल्यानंतर जसजसे "अन्नपूर्णा'च्या जवळ जायला लागू तसतसा आपल्याला वडे तळण्याचा घमघमाट जाणवू लागतो. तेथेच आपली विकेट पडते. मग "एक प्लेट' वडा किंवा दोन वडापाव खाल्ल्याशिवाय आपला आत्मा थंड होत नाही. वास्तविक पाहता अन्नपूर्णा हे खरोखरच नावाप्रमाणे आहे. बटाटा वड्यापासून ते भाजणीच्या वड्यापर्यंत बऱ्याच "व्हरायटी' येथे मिळतात. मग त्यात उडीद वडा व साबुदाणा वडा हे प्रकारही आलेच. दक्षिणेकडील इडली-चटणी देखील आहे. मराठमोळी ओल्या नारळाची करंजीही आहे. पण बटाटा वड्याची चव म्हणाल तर काही औरच!

साधारणपणे संध्याकाळी पाच वाजल्यानंतर शिवाजी रस्त्यावरील गर्दी वाढू लागते आणि अन्नपूर्णासमोर उभे राहून खाद्यपदार्थ खाणाऱ्या खवय्यांचीही. पूर्वी कुमठेकर रस्त्यावरील प्रभा विश्रांती गृहातील वडा हा इतरांपेक्षा वेगळा होता. तो अजूनही आहे. पण अनेक अटी आणि नियमांच्या चौकटीत अडकलेला तो वडा न खाल्लेलाच बरा अशी अवस्था होऊन जाते. अन्नपूर्णाचा वडा अगदी तसाच आहे. म्हणजे अटी व नियमांच्या चौकटीत अडकलेला नव्हे. तर चवीला अगदी हटके!

इथे गर्दीच इतकी असते की प्रत्येक घाण्यातील वडे अगदी हातोहात संपतात. त्यामुळे प्रत्येक वेळी गरमगरम वडे हमखास मिळतात. वड्यातील सारणामध्ये बटाटा व कांदा यांच्या जोडीला लसूणाचाही हलका स्वाद असतो. शिवाय या सारणामध्ये लिंबाचीही थोडी चव जाणवते. त्यामुळेच हा वडा इतरांपेक्षा वेगळा ठरतो. चणा डाळीच्या पिठातही मीठ व तिखट असते त्यामुळे तेही बेचव लागत नाही. शिवाय वड्याला चण्याच्या पिठाचे आवरण अगदी पातळ असते. त्यामुळे वडा आणखी लज्जतदार लागतो.

"अन्नपूर्णा'तील चटणीही अगदी चविष्ट. बटाटा वड्यासोबत मिळणारी हिरवी किंवा साबुदाणा वड्यासोबत मिळणारी दाण्याची चटणी दोन्ही चटण्या तितक्‍याच चवदार. "चटणी वड्यातच टाकली आहे' असे कुमठेकर रस्त्यावरील उपहारगृहात हमखास मिळणारे उत्तर येथे मिळत नाही. वड्याला पुरेशी चटणी येथे दिली जाते. आणखी हवी असेल तर परतही चटणी मिळते. साबुदाणा वडा तितकाच खमंग अन्‌ भाजणीचा वडाही चांगलाच खुसखुशीत. पण माझे ऐकाल तर अनेकदा भेट दिल्यानंतर बटाटा वड्याची चव तुमच्या जिभेवर रुळली की मगच इतर खाद्यपदार्थांकडे वळा.

वडा खाल्ल्यानंतर चहा आलाच. अर्थात, वडा खाल्ला नाही तरी चहा आहेच पण खाल्ल्यानंतर आवर्जून आहेच. चहाची तल्लफ भागविण्यासाठी तुम्हाला खूप दूर जाण्याची गरज नाही. "प्रकाश स्टोअर्स'कडून "रॉंग साईड'ने (अर्थातच, चालत) तुम्ही नाना वाड्याकडे जाऊ लागा. नाना वाड्यासमोर कॉर्नरला महालक्ष्मी नावाचे अमृततुल्य आहे. दूध जास्त आणि पाणी कमी अशा द्रवापासून वेलचीयुक्त चहा प्यायल्यानंतर खाद्य यात्रेचे एक वर्तुळ पूर्ण होईल.

पेरुगेट जवळील "नर्मदेश्‍वर'सारखा चहा पुण्यातील असंख्य अमृततुल्यांमध्ये मिळतो. "महालक्ष्मी' येथील चहा त्याजवळ जाणारा पण अगदी तसा नाही. येथे दूधाचे प्रमाण पाण्यापेक्षा अधिक असल्यामुळे साधा चहाच अगदी "स्पेशल'सारखा वाटतो. "अन्नपूर्णा'चा वडा आणि "महालक्ष्मी'चा चहा यांच्यासाठी शिवाजी रस्त्यावर जाच!