गेल्या अनेक वर्षांपासून जिभेवर रेंगाळणारी चव काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा चाखायला मिळाली. निमित्त होते माझे जुने मित्र आणि लोकसत्ताचे पत्रकार विनायक करमरकर शास्त्री यांच्या भेटीचे. शास्त्री रस्त्यावर एक कार्यक्रम कव्हर करण्यासाठी ते आले होते. त्यावेळी त्यांच्यासमवेत भारतीय जनता युवा मोर्चाचे संदीप खर्डेकर देखील होते. त्यावेळी चला अजंठामध्ये जाऊ असा सूर शास्त्रींनी आळवल्याने मला थोडासा धक्काच बसला आणि अजंठाच्या चवीची ओळख करमरकर बुवांनाही असल्याचे ऐकून थोडेसे बरेही वाटले.
सांगायची गोष्ट अशी की, शास्त्री रस्त्यावर तेव्हा फार कमी हॉटेल्स किंवा रेस्तराँ होती. अर्थात, आजच्या घडीला खूप आहेत अशातील काही गोष्ट नाही. पण तेव्हा चॉईसच नव्हता. पण त्यावेळीही जे काही तीन-चार स्पॉटस होते त्यात अजंठाची अगदीच न्यारी होती. शास्त्री-खर्डेकर यांच्याबरोबर गेल्यानंतर चव अजूनही कायम राखली असल्याचे जाणवले. गरमागरम वडा आणि इडली सांबार ही अजंठाची वैशिष्ट्य. पण इथे मिळणारी दहा पंधरा प्रकारची श्रीखंड, भेळ-मिसळ आणि फक्कड चहा यांचीही तोड नाही. पण वडा द बेस्ट.
अजंठाचा वडा
वड्याचा आकार म्हणाल तर इतर ठिकाणच्या वड्यांच्या तोंडात मारेल असा. आणि चव थोडीशी झणझणीत. सोबतीला त्यापेक्षा झणझणीत हिरवी चटणी. हवी असेल तर चिंचगूळ आणि खजूर यांची चटणीही आहेच एकावेळी कमीत कमी दोन वडे खाल्ल्याशिवाय पठ्ठा उठणारच नाही. बाहेर मिळत असलेल्या वड्यांच्या तुलनेत अजंठाच्या वड्याची किंमत थोडी अधिक असेल पण चव चांगली असेल तर खवय्यांची कोणतीही किंमत मोजायची तयारी असते
काही दिवसांपूर्वी अजंठाच्या बरोबर समोर जोशी वडेवालेची शाखा सुरु झाली होती. तेव्हा अजंठाचा खप कमी होणार, अशी सर्वांचीच अटकळ होती. पण अजंठाची चव आणि त्यामुळे विक्री आहे तशीच आहे. त्यामुळे जरा बरं वाटलं.
इडली सांबारमध्ये बुडली
वड्याप्रमाणेच इथला आणखी एक लोकप्रिय प्रकार म्हणजे इडली सांबार. आता इडली सांबारमध्ये काय आहे खाण्यासारखं आणि ते देखील एका मराठी माणसाच्या हॉटेलमध्ये, असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. पण एकदा खाऊन पहाच. आकाराने मोठी आणि तरीही हलकी अशी वाफाळलेली इडली तुमच्यासमोर असेल तर काय हिंमत तुम्ही इडली गट्टम करणार नाही. कोणत्याही अण्णाच्या तोंडात मारेल अशी इडली हे अजंठाचं वैशिष्ट्य आहेच.
पण सांबार ही इथली दुसरी खासियत. पूर्वी कुमठेकर रस्त्यावर असलेल्या स्वीट होममध्ये (आणि आताही) सांबारची जी चव होती तीच चव अजंठामध्ये आहे. तूरडाळीचं वरण, त्याला सांबारची चव आणि वरुन झणझणीत तर्री असा सांबार खाताना अक्षरशः घाम निघतो. पण चव कायम लक्षात राहते अर्थातच दुसऱ्या दिवशी होणाऱ्या परिणामामुळे नव्हे.
श्रीखंडाची रेलचेल
श्रीखंड म्हटलं की एक-दोन प्रकार आपल्याला आठवतात. वेलची, आम्रखंड आणि फारफार तर केशरबदाम किंवा केशर पिस्ता. पण तुम्ही स्ट्रॉबेरी, पायनापल, चॉकलेट आणि असे काही एकदम हटके प्रकार कधी ऐकले आहेत का. नाही ना मग तुम्ही एकदा तरी अजंठाला भेट द्यायलाच हवी. कारण इथे मिळणारी ही व्हरायटी तुम्हाला दुसरीकडे क्वचितच मिळेल.