बालगंधर्व कसे होते, ते पहायची आम्हाला संधीच मिळाली नाही, असं कोणालाही यापुढे म्हणता येणार नाही. नितीन चंद्रकांत देसाई यांनी निर्मिलेल्या चित्रपटात सुबोध भावेनं साकरलेली बालगंधर्वांची भूमिका पाहिल्यानंतर सर्वांच्याच मनातील खंत दूर होते. जसं राम म्हटलं की आपल्यासमोर अरुण गोविल येतो, कृष्ण म्हटलं की नितीश भारद्वाज येतो, संत तुकाराम म्हटलं की विष्णुपंत पागनीस येतात, छत्रपती शिवाजी महाराज म्हटले की सूर्यकांत-चंद्रकांत येतात, अगदी अलिकडच्या काळातील डॉ. अमोल कोल्हे येतो (महेश मांजरेकर मात्र चुकूनही येत नाही) तसं बालगंधर्व म्हटल्यानंतर यापुढे आपल्या डोळ्यासमोर नक्की सुबोध भावेच येणार. कारण बालगंधर्वांना माझ्या पिढीनं (अगदी माझ्या वडिलांनीही) पाहिलेलं नाही. त्यामुळं सुबोध भावे हाच आपल्यासाठी नारायणराव आहे, बालगंधर्व आहे. कारण त्यानं बालगंधर्वांची भूमिका त्याच ताकदीनं वठवली आहे.
बालगंधर्व येणार येणार तेव्हापासून पिक्चर कसं असेल, याची उत्सुकता होती. मुळातच लहानपणापासून बालगंधर्व रंगमंदिरातील नारायणराव राजहंस आणि बालगंधर्व यांचे छायाचित्र पाहतच मोठे झालो. एखादा पुरुष नट बेमालूमपणे स्त्री पार्टांची भूमिका निभावू शकतो, यावर विश्वासच बसायचा नाही. बालगंधर्व स्त्री वेशामध्ये हळदी-कुंकवाचे समारंभांनाही उपस्थिती लावायचे, असे अनेक किस्से ऐकले होते. त्यांच्याबद्दल खूप खूप जाणून घ्यायची इच्छा चित्रपटाच्या निमित्ताने पूर्ण होणार होती. त्यामुळंच चित्रपटाविषयी प्रचंड औत्सुक्य होतं. पण अनेकदा खूप आशा बाळगली, पदरी निराशा येते, असं म्हणतात. पण बालगंधर्व अजिबात भ्रमनिरास करत नाही.
मुळातच चित्रपटाचा वेग, पात्रांची निवड, संवाद, कॅमेरा अँगल्स, चित्रपटातील पदं आणि गाणी, वेशभूषा, प्रसंगांची निवड हे सर्व काही दर्जेदारच आहे. मुख्य म्हणजे जुन्या पिढीला त्या काळात ओढून नेणारे आहेत. चित्रपटामध्ये बालगंधर्वांच्या अनेक नाटकातील प्रसंग आहेत. कोणत्याही नाटकाचा रंगमंचावरील सेट जेव्हा डोळ्यासमोर येतो तो पाहून आजूबाजूच्या प्रेक्षकांमधून हमखाम नावं पुटपुटली जातात. शारदा, स्वयंवर, मानापमान. नाव समोर येण्यापूर्वीच लोकांपर्यंत ते नाटक पोहोचतं. हे देसाई यांचं अफलातून यश आहे. बालगंधर्व पाहताना लोक चित्रपटात खूप गुंतून जातात. बालगंधर्व जेव्हा अखेरचे माहिमला जायला निघतात, तेव्हा त्यांची पत्नी त्यांच्या हातावर दही देण्यासाठी पुढे येते आणि लवकर परत या, असे म्हणते. बालगंधर्वांच्या पुढचा डायलॉग येण्यापूर्वी मागच्या खुर्चीवर बसलेली एक महिला पुटपुटते, इट्स टू मच हं. म्हणजे लोक चित्रपटाशी किती एकरुप होतात ते पहा.
बालगंधर्वांच्या अगदी लहानपणापासून ते त्यांच्या कारकिर्दीला उतरती कळा लागेपर्यंतचा चित्रपटाचा प्रवास आणि प्रसंग थक्क करणारे आहेत. मुलगी मेलेली असताना रंगमंचावर प्रयोग करणारे कलावंत, मायबाप प्रेक्षकांसाठी किर्लोस्कर नाटक कंपनीतून तडकाफडकी बाहेर पडणारे नट, पंचवीस पंचवीस हजारांची अत्तरं खरेदी करणारे कंपनीचे मालक, यशाच्या उंच शिखरावर असूनही नाटकातील एका प्रसंगात ज्येष्ठ अभिनेते केशवराव भोसलेंच्या पायात वहाणा चढविण्यास मागेपुढे न पाहणारे दिलदार अभिनेते, स्वतःची कंपनी कर्जात बुडलेली असतानाही स्वराज्य फंडासाठी नाटकाचा प्रयोग करणारे देशप्रेमी, केवळ एक प्रेक्षक असतानाही त्याच्यासाठी प्रयोग करणारे रसिकप्रेमी, केवळ पैशासाठी स्वतःच्या सहा लाखांची ऑफर धुडकावणारे मनस्वी आणि पडत्या काळात कोणत्या तरी आलतूफालतू गायकांना मागे बसून तंबोऱ्याची साथ करणारे वादक अशी बालगंधर्वांची विवध रुपं चित्रपटामध्ये अगदी यथार्थ पद्धतीनं सादर करण्यात आली आहेत.
- भले भले कर्तृत्त्ववान पुरुष आम्ही काय हातात बांगड्या भरल्या आहेत काय, असं म्हणतात. पण मी हातात बांगड्या भरूनच पुरुषार्थ गाजवून दाखवेन.
असे संवाद चित्रपटांत जान आणतात. कधीकधी डोळ्यात पाणी आणतात आणि चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या टाळ्या घेतात.
किर्लोस्कर नाटक मंडळी, गडकरी मास्तर, गणपतराव बोडस, गोविंदराव टेंबे, भास्करबुवा बखले आणि इतर अनेक जणांनी बालगंधर्वांची साथ सोडल्यानंतरही लढण्याची जिद्द आणि पुन्हा भरारी घेण्याची उमेद बालगंधर्वांच्या प्रत्येक संवाद आणि दृष्यातून ठळकपणे जाणवते. बालगंधर्वांची किती क्रेझ होती, ते बायकांच्या छोट्या छोट्या संवादांमधून, दृष्यांमधून मांडण्यात आले आहे. सोबतील दैनिक केसरीचे जुने अंकही रेफरन्स म्हणून वापरले आहेत. बालगंधर्व ही काय चीज होती, हे त्यावरून अगदी मनोमन पटते. पडत्या काळातही गोहरबाईच्या तुलनेत प्रेक्षकांना म्हातारे बालगंधर्वच रुक्मिणी म्हणून अधिक रुचतात. मग श्रीकृष्णाच्या भूमिकेतील बालगंधर्वांनी रुक्मिणीचं पद म्हटलेलं प्रेक्षकांना चालतं. लोकप्रियतेच्या शिखरावर म्हणजे काय, यापेक्षा वेगळं ते काय...
बालगंधर्वचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्या महान नटाचा उतरता काळ किंवा वाईट दिवसही तितक्याच चांगल्या पद्धतीनं रंगविलेले आहेत. वास्तविक पाहता, बरेचदा मोठ्या लोकांची चांगली बाजू दाखविण्याचंच फॅड सध्या आहे. वाईट बाजू लोकांना आवडेल किंवा कसे, हे माहिती नसल्याने लोक रिस्क घेत नाहीत. त्यामुळं बालगंधर्वांच्या आयुष्यात घडलेल्या वाईट गोष्टीही उत्कृष्ट पद्धतीने दाखविलेल्या आहेत. त्याबद्दलही निमार्ते आणि दिग्दर्शकांचे अभिनंदन करायला हवे.
सरतेशेवटी बालगंधर्वांची भूमिका साकारणारे सुबोध भावे. एक नंबर अभिनय. बालगंधर्व जेव्हा एन्ट्री घेतात किंवा पदं सादर करताना चित्रपटातील प्रेक्षकांनी वाजविलेल्या टाळ्या कोणत्या आणि चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांनी वाजविलेल्या टाळ्या कोणत्या, हे अजिबात कळत नाही इतक्या टाळ्या वाजतात. चित्रपटातील प्रेक्षक आणि चित्रपट पाहणारे प्रेक्षक दोघेही आळीपाळीनं वन्स मोअर ओरडत असतात. बालगंधर्व पहिल्या रात्री पत्नीच्या शेजारी स्त्रीवेषात आल्यानंतर चित्रपटगृहात टाळ्यांचा एकच कडकडाट होतो. भूमिकेशी समरस झालेल्या कलाकाराला यापेक्षा वेगळी दाद कोणती असू शकते.
संपूर्ण चित्रपट एकदम फक्कड झाला आहे. तरीही दोन-तीन खटकलेल्या गोष्टी नमूद करणे उचित वाटते. पहिली गोष्ट म्हणजे चित्रपटांत एकही पद सविस्तर दाखविलेलं नाही. त्याकाळातील पदं खूप मोठी असायची, हे जरी मान्य केली तरी केशवराव भोसले आणि बालगंधर्व यांची जुलगबंदी थोडी आणखी लांबविता आली असती. अर्थात, चित्रपट दोन-सव्वादोन तासांत संपविण्याचा अट्टहास ठेवला नसता आणि थोडा वाढविला असता तरी चालले असते.
दुसरी गोष्ट म्हणजे गोहरजान बालंगधर्वांच्या आयुष्यात येते, तो प्रसंग खूप सविस्तर रंगविला आहे. मात्र, बालगंधर्वांच्या पडत्या काळात शेवटी तिचे काय झाले आणि ती कोठे गेली, हे प्रसंग दाखविले असते तर चित्रपट अधिक परिपूर्ण वाटला असता. त्याचप्रमाणे बालगंधर्वांच्या अखेरच्या काळात पत्नी, कन्या आणि माता कुठे होत्या, यावर थोडा प्रकाश टाकला असता तर शेवट व्यवस्थित वाटला असता. आता शेवट अचानकपणे (म्हणजेच अबरप्टली) केल्यासारखा वाटतो. य दोन-तीन गोष्टी टाळल्या असत्या तर बालगंधर्व म्हणजे खरोखरच ‘बाप’गंधर्व आहे.
ता.क. – चित्रपट संपल्यानंतरही प्रेक्षक चित्रपटगृह सोडून जात नाहीत. लोकांची नाव वाचण्यासाठी नाही तर बालगंधर्वांचे दुर्मिळ असे फोटो पाहण्यासाठी. एखादा कलाकार इतक्या वर्षांनंतरही लोकांना इतकी भुरळ घालू शकतो, यावर विश्वास बसत नाही. पण विश्वास ठेवावाच लागतो कारण तेच सत्य आहे.