Sunday, August 14, 2011

बस कहर चले, जब आवे सिंघम...

आईच्च्या गावात पिक्चर...


दक्षिणेतले चित्रपट खूप लाऊड असतात, अगदी अंगावर येतात, काहीही दाखवतात इइ टीकास्त्र सोडून साऊथ इंडियन सिनेमा इंडस्ट्रीला शिव्यांची लाखोली वाहणाऱ्या प्रेक्षकांनीच सिंघमला भरभरून दिलेला प्रतिसाद हा काव्यगत न्यायच म्हटला पाहिजे. वास्तविक पाहता, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी ही हिंदीच्या पाचशे वर्षे पुढे आहे. चित्रपटांचे विषय असो, टेक्नॉलॉजी असो, चित्रीकरणाचे स्पॉट्स असोत, चित्रपटावर होणारा खर्च असो किंवा रजनीकांत तसेच चिरंजिवी यांचे कोटीच्या कोटी मानधन असो. हिंदी चित्रपटसृष्टी दक्षिणेच्या पासंगालाही नाही. रजनीकांतचे सिनेमे पाहण्यासाठी पहाटे चार-चार वाजल्यापासून लोकं लायनी लावून तिकिटं खरेदी करतात, पहाटे चारचा शोदेखील हाउसफुल्ल होतो. चिरंजीवीच्या चित्रपटाची तिकिटं काढण्यासाठी प्रचंड गर्दी होऊन चेंगराचेंगरीत तीन-चार लोक मरतात. ही प्रचंड लोकप्रियता हिंदीतील एकाही अभिनेता किंवा अभिनेत्रीला मिळालेली नाही. त्यामुळेच साऊथ इंडियन (विशेषतः तमिळ आणि तेलुगू) इंडस्ट्री खतरनाक आहे.

अगदी सत्या, रोजा, बॉम्बेपासून ते अलिकडच्या काळातील चंद्रमुखी, शिवाजी द बॉस, गजनी आणि रोबोपर्यंत सर्वच चित्रपट साऊथमधून हिंदीत आलेले. हिंदी चित्रपट करणारी मंडळी चोऱ्यामाऱ्या करुन तर चित्रपट काढतात. कधी साऊथची स्टोरी चोर कधी हॉलिवूडचा चित्रपट स्वतःच्या नावावर खपव, असं करत तर त्यांचं आयुष्य सुरु आहे. अगदी संगीतकारापासून ते कथालेखकापर्यंत सर्वच मंडळी (मधुर भांडारकर, विशाल भारद्वाज, आशुतोष गोवारीकर असे अपवादवगळता) उचल्या कॅटॅगरीतील आहेत. असो.
सिंघम हा साऊथचा सिनेमा मराठी कलाकारांसह हिंदीमध्ये हिट्ट झाल्यामुळं अगदी मनापासून आनंद झाला. खूप दिवसांनंतर चांगला डोक्याला ताप न देणारा पिक्चर पाहिल्याचं समाधान मिळालं. तुमच्या आमच्या सर्वांच्या मनातील चिड चित्रपटातून पहायला मिळाली. वास्तविक पाहता, अशा घटना भारतीय लोकशाहीमध्ये कधीच घडू शकणार नाही. सिस्टीम आणि नियम फाट्यावर मारुन अपप्रवृत्तींचा खात्मा करणारे पोलीस भारतात कधीच आढळणार नाहीत. भारतात शेतकऱ्यांवर, आंदोलकांवर गोळीबार करणारे पोलीस सापडतील. जैतापूरला मिळतील, मावळात दिसतील, अमरावतीत दिसतील, पुणे जिल्ह्यातील माणमध्ये दिसतील. पण गुंड प्रवृत्ती मोडून काढणारे पोलीस धुतल्या तांदळात खड्यासारखे. त्यामुळे भारतात असा पोलीस अधिकारी वास्तवात असणे, अगदी अशक्य.


हीच गोष्ट साऊथच्या चित्रपटांमध्ये हेरली जाते. गावातला सावकार, जमीनदार, गुंडा, शहरातील डॉन किंवा महानगरातील माफिया, भ्रष्ट राजकारणी सर्वसामान्यांना नाडत असतात. पैसे चारल्याशिवाय काहीच कामं होत नाहीत. पोलीस आणि प्रशानसही हलत नाही. मग सर्वसामान्यांच्या मदतीला हिरो धावून येतो आणि सगळ्या सिस्टीमच्या विरोधात जाऊन सामान्य लोकांचा तारणहार बनतो. ही बहुतांश चित्रपटांची कथा. अभिनेते, ठिकाण, पात्र, विषय, भाषा बदल जाते. पण मूळ गाभा कायम. सिस्टीमविरोधात पेटून उठण्याचा. असे चित्रपट पाहून सामान्यांनाही थोडा धीर येतो. च्यामारी आपल्या आयुष्यातही असा सुपरहिरो येईल आणि सारं चित्र बदलेल, या आशेवर त्याचे तीन तास मजेत जातात. सिंघमही त्याच पठडीतला.

अजय देवगणसारखा सुपरहिरो. त्याला त्याच्याच गावात पोस्टिंग मिळतं, हा मोठा जोक. शिवाय नंतर महाराष्ट्रातला पोलीस अधिकारी गोव्यामध्ये ट्रान्सफर होऊन जातो, ही आणखी एक न कळलेली गोष्ट. अजय देवगणचा पोलीस चौकीत केस रजिस्टर न करता परस्पर सोडविण्यावर भर असतो. अर्थात, परस्पर सांमजस्यानं. पोलीस केस रजिस्टर न करता क्राईम रेट कमी दाखविण्याचा प्रयत्न करतात, हे पटू शकतं. पण अजय देवगण करतो, ते पटू शकत नाही. पोलीस इन्स्पेक्टर डीसीपीच्या अंगावर धावून जातो, पोलीस महासंचालकाला सुनावतो, मंत्र्याच्या ढुंगणावर लाथा मारतो, सर्व पोलिसांना बोल बच्चन देऊन त्यांचे ब्रेन वॉशिंग करतो, या गोष्टी कशा पटतील. बाबांनो, ही लोकशाही आहे. ठोकशाही नाही. पण साऊथच्या चित्रपटांमध्ये असे प्रश्न पडू द्यायचे नसतात. डोकं बाजूला ठेवायचं आणि निवांत एन्जॉय करायचं.

सिंघममधील फाईट्स, डायलॉग आणि प्रकाशराजचा (जयकांत शिक्रे) अभिनय या सर्व गोष्टी लाजबाव. एखाद्या चित्रपटात व्हिलन, त्याचा ज्युनिअर मेन हिरोला खाऊन टाकतो, असं कधी पाहिलंय का. पण सिंघममध्ये प्रकाशराज प्रत्येक शॉटला अजय देवगणला खाऊन टाकतो. अगदी आईच्या गावात, आता माझी सटकली रे, आली रे आली आता माझी बारी आली, कुछ भी करने का लेकीन जयकांत शिक्रे का इगो हर्ट नही करने का, वेलकम टू गोवा अशा एक से बढकर एक डायलॉगमधून प्रकाशराज प्रेक्षकांना खूष करुन टाकतो. त्याची काम करण्याची स्टाईल, बोलण्याची पद्धती यावर तमाम पब्लिक एकदम फिदा. तो सगळ्यांना खाऊन टाकतो. चित्रपटाच्या शेवटी शेवटी पोलीस जेव्हा त्याला पकडण्यासाठी येतात तेव्हा प्रकाशराज जिवाच्या आकांतानं पळत असतो. त्यावेळी पळता पळता प्रकाशराज पुतळ्यापाशी जे काही झोपतो तो शॉट तर जगात एक नंबर आहे. हसूनहसून आपण अक्षरशः लोळतो. पहिल्यापासून शेवटपर्यंत तोच खाऊन टाकतो.

चित्रपटाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गाड्यांची उडवाउडवी आणि तुफान मारामारी. अशा पद्धतीची मारामारी फक्त साऊथच्याच चित्रपटांमध्ये दिसते. एक हिरो आणि पन्नास गुंड. गुंडांकडे हॉकी स्टीक्स, लाठ्याकाठ्या, चेन्स, चाकू, गावठी कट्टे यांच्यापासून ते एके-56 पर्यंत सगळं काही. हिरो मात्र, निशस्त्र. पण तरीही तो सगळ्यांना पुरुन उरतो. हे फक्त चित्रपटांमध्येच शक्य आणि तेही साऊथच्याच. एकापाठोपाठ सात-आठ गाड्या उगाचच व्हिलनच्या गाडीमागून जात असतात, हे शॉटही साऊथच्या चित्रपटांमध्ये कायम दिसणारे. गाड्या उडवाउडवीची स्टाईल रोहित शेट्टीची. हे सगळं गुळपीट एकदम जुळून आलंय ते सिंघममध्ये. त्यामुळंच सिंघमला तुडुंब प्रतिसाद मिळतोय.

खरं तर असे चित्रपट मंगला, अलका, निलायम, विजय अशा चित्रपटगृहातून पाहण्यासारखेच. टाळ्या, शिट्या, शिव्या आणि फुल्ल कल्ला अशा वातावरणात चित्रपटा पाहण्याची मजा काही औरच. आम्ही सिटीप्राईड कोथरुडला पाहिला. आईशप्पथ तिथंही फुल्ल कल्ला. आजूबाजूच्या प्रेक्षकांचा काहीही विचार न करता आम्हीही त्यात सहभागी. फुल टू धम्माल. मला जेजे भेटले त्यांनी सिंघम पाहिलाच आहे. पण ज्यांनी नाही पाहिला त्यांनी नक्की पहावा. सिडीवर घरी पाहू नका. फुल्ल कल्ला होणाऱ्या थिएटरमध्ये जाऊन पहा. नाही तर माझी सटकेल...