Thursday, February 02, 2012

आदर्श यांचा घ्या...

सच्चे मुसलमान मुझफ्फर हुसेन



 

२६ जानेवारीच्या दुपारी दोन-अडीच वाजता एक फोन आला. वास्तविक पाहता, सुटीच्या दिवशी दुपारी झोपण्याच्या वेळी म्हणजे दोन-अडीचला फोन आला, की टाळकंच सटकतं. इन्श्य़ुरन्स हवाय का, पॉलिसी घेणार का, क्रेडिट कार्ड हवंय का किंवा काय मित्रा, बऱ्याच दिवसांनी फोन नाही केलास, काय करतोयस वगैरे वगैरे मंडळींच्या फोनमुळं डोकंच उठतं. जे खूप जवळचे आहेत, त्यांचे फोन आले तर बिघडत नाही. पण या मंडळींना दुपारच्या वेळी फोन करू नये, हा सेन्स असतो.

थोडक्यात काय तर दुपारी फोन आले तर डोकं फिरतं. पण २६ जानेवारीला दुपारी अडीच वाजता फोन आल्यानंतर डोकं फिरण्याऐवजी खूष व्हायला झालं. त्याचं कारणही तसंच होतं. ज्येष्ठ पत्रकार आणि पाकिस्तान तसेच मुस्लिम जगताचे अभ्यासक श्री. मुझफ्फर हुसेन यांच्या भेटीचं निमंत्रण आलं होतं. ते सुद्धा ध्यानीमनी नसताना... इतकी चांगली संधी स्वतःहून चालून आल्यावर आनंद होणार नाही तर काय... सामनाचे स्तंभलेखक म्हणून त्यांची मला ओळख होती. त्यांचे लेख खरंच अभ्यासूपणे लिहिलेलेल आणि वेगळ्या विषयांवरचे असतात. ‘मुस्लिम मनाचा शोध’ हे त्यांचे पुस्तकही मी खरेदी करून वाचलेले आहे. इतकीच माझी त्यांच्याशी ओळख. त्यामुळे अशा अभ्यासू लेखकाला भेटण्यासाठी मी खूपच आतूर होतो.


मुझफ्फर हुसेन हे गरवारे कॉलेजमध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते. तो कार्यक्रम संध्याकाळी साडेसहा वाजता वगैरे होता. त्यामुळे दुपारच्या वेळी पुण्यातील काही पत्रकारांसमवेत गप्पांचा फड रंगवावा, अशी इच्छा त्यांनी बोलून दाखविली आणि माझ्यासह आणखी चार-पाच जणांना फोन करून विचारण्यात आलं, येऊ शकाल का. २६ जानेवारी असल्यानं बरेच जण पुण्यात नव्हते, काही जण गाढ झोपले होते. त्यामुळे मी आणि मटातीलच सहकारी मंगेश कुलकर्णी, असे आम्ही दोघे मुझफ्फर हुसेन उतरले होते तिथं त्यांना भेटायला गेलो आणि चालत्या बोलत्या विकिपिडियाची भेट घडल्याचा अनुभव आला.

काश्मीर, पाकिस्तान, हिंदू-मुस्लिम संबंध, देशातील राजकीय परिस्थिती, चीनचे वाढत चाललेले दडपण, भारतातील राजकीय अराजकता, कणाहीन नेतृत्त्वाचा सर्वच पक्षांमध्ये असलेला अभाव, नरेंद्र मोदी आणि मुस्लिम समाज यांच्याबद्दल अनेक किस्से, बापजन्मात न ऐकलेली माहिती आणि भविष्यात काय होऊ शकते, यावर व्यक्त केलेली मार्मिक प्रतिक्रिया हे सर्व ऐकण्यात दीड-दोन तास कसे निघून गेले ते कळलंही नाही.

पाकिस्तानमधील सर्वसामान्य नागरिक (कट्टरपंथी नव्हे) हा तिथल्या राजकीय आणि लष्करी हुकुमशाहीला वैतागला असून लवकरच म्हणजे येत्या दहा ते पंधरा वर्षांमध्ये पाकिस्तानची फाळणी निश्चितपणे होणारच आहे, असा दावा हुसेन यांनी केला. वास्तविक पाहता, सरहद्द गांधी खान अब्दुल गफार खान यांना पाकिस्तानमध्ये जाण्याची अजिबात इच्छा नव्हती. तसे दुःख त्यांनी भारतीय नेत्यांकडे व्यक्त केले देखील होते. पण भारताचे राष्ट्रपिता काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आजही बलुचिस्तान आणि फ्रंटियरमधील लोकांना पाकिस्तानात राहण्यात काडीचाही रस नाही. म्हणूनच ते लवकरात लवकर पाकिस्तानमधून फुटून बाहेर पडतील. मग त्यांच्यावर नियंत्रण कोणाचे यासाठी इराण, अफगाणिस्तान आणि रशिया यांच्यात संघर्ष निर्माण होईल. त्याचवेळी पाकिस्तानमधील सिंध आणि पंजाब प्रांतांनी स्वतंत्रपणे अस्तित्त्व ठेवण्याऐवजी भारतात सामील होण्याची इच्छा व्यक्त केली आणि ती फलद्रूप झाली तर आश्चर्याचा धक्का बसायला नको, असेही हुसेन यांनी स्पष्ट केले.

भारताचे पहिले गृहमंत्री आणि ज्यांच्या खमकेपणामुळेच भारताचा आजचा नकाशा तयार झाला आहे, ते लोहपुरूष (लोहपुरूष एकच दुसरे लोहपुरुष कोणीही नाहीत.) वल्लभभाई पटेल यांनी संसदेत केलेल्या एका भाषणाचा संदर्भ हुसेन यांनी दिला. त्यावेळी पाकिस्तानला ५५ कोटी रुपये देण्याचा वाद पेटला होता. त्या पार्श्वभूमीवर बोलताना पटेल म्हणाले, की बाप आपल्या मुलाला एखादा व्यवसाय काढून देण्यासाठी भांडवल म्हणून काही पैसे देतो. जर मुलाचा व्यवसाय चालला नाही, तर तो पुन्हा घरी परततो आणि आपल्या बापाच्या व्यवसायात सहभागी होऊन जातो. आज माझ्या मनात काहीशी तशीच भावना आहे. वेगळा व्यवसाय करण्याचा हट्ट आहे म्हणून आम्ही भांडवल देतो आहोत. व्यवसाय नीट चालला तर बघा. नाहीतर बापाचे दरवाजे तुम्हाला सदैव उघडेच आहेत... वल्लभभाई यांच्याबद्दल ही माहिती आतापर्यंत कधीच पुढे आली नव्हती. दहा-पंधरा वर्षांनंतर जर हुसेन म्हणतात, तसे घडले तर वल्लभभाईंच्या दूरदृष्टीची कमालच म्हणावी लागेल.

पाकिस्तानप्रमाणेच चीनबद्दलही एक किस्सा त्यांनी सांगितला. अर्थात, या गोष्टीचा उल्लेख त्यांनी त्यांच्या पूर्वीच प्रसिद्ध झालेल्या एका लेखात केला होता, हा भाग अलहिदा. (आम्ही तो वाचलेला नव्हता, हे ओघाने आलेच.) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळविलेल्यांपैकी २५ ते २८ क्रीडापटू हे हरियाणाचे होते आणि त्यापैकी बहुतांश खेळाडू हे शाकाहारी होते. हरियाणातील दुग्धपुरवठ्यापैकी सर्वाधिक दूध हे मुर्रा नामक एक अव्व्ल जातीच्या म्हशीपासून मिळते. यामध्ये फॅट आणि इतर घटक हे अगदी वरच्या दर्जाचे असतात. या मुर्रा म्हशी दिवसाला १८ ते ३५ लिटर्सपर्यंत दूध देतात. त्यामुळे हरियाणाचे खेळाडू (अगदी पहिलवान आणि मुष्टीयोद्धे सुद्धा) फक्त दुधावर आणि पौष्टिक आहारावर मजबूत तब्येत कमावू शकतात. ही गोष्ट चीनने हेरली नसती तरच नवल. मुर्रा म्हशीचे वैशिष्ट आणि उपयुक्तता लक्षात आल्यानंतर चीनने जवळपास पाच हजार मुर्रा म्हशींची अवैध मार्गांनी तस्करी केली. आणि मुर्रा म्हशींचे ब्रीड करून आणखी दर्जेदार स्वरूपाचे दुधाचे उत्पादन कसे करता येईल यावर चीनमध्ये जोरदार संशोधन सुरू आहे. भविष्यात पाच हजारांच्या पन्नास हजार म्हशी करून त्यापासून मिळणाऱ्या दुधाचा स्वस्त दरात पुरवठा भारताला करण्याचे डावपेच चीनकडून आखले जात आहेत. हे ऐकून तर वेडंच लागायची वेळ आली होती. चीन काय करू शकेल, बरंच काही ऐकलं होतं. पण ते असंही असू शकेल, हा विचारही कधी मनात आला नव्हता. त्यामुळंच आणखी एक धक्का बसला.


मुझफ्फर हुसेन हे फक्त नावाचे मुसलमान म्हणायचे. त्यांचे विचार आणि लेखन हे इतकं स्वतंत्र आणि व्यापक आहे, की भारतातील सर्व मुसलमानांनी त्यांचा आदर्श ठेवला तर दंगली घडणारच नाहीत आणि राजकीय पक्षांना लांगुलचालन करण्याची संधी मिळणारच नाही. आपण हिंदू लोक असं करत नाही, आपण हिंदू लोक तसं करत नाही... असं म्हणूनच त्यांच्या अनेक वाक्यांची सुरूवात होत होती. गेल्या पंधरा वर्षांपासून हुसेन हे स्वतः शाकाहारी बनले आहेत आणि ‘इस्लाम आणि शाकाहार’ या विषयावर पुस्तक लिहित आहेत किंवा लिहिले आहे. ते जितक्या अभिमानानं कुराण पठण करतात तितक्याच अभिमानानं वंदे मातरम म्हणतात. ते जितके सच्चे मुसलमान आहेत तितकेच सच्चे सावरकरभक्त आहेत. सावरकरांचा हिंदुत्त्ववाद भारताच्या राष्ट्रीयत्वाशी जोडला गेलेला आहे, हे त्यांनी अगदी मनापासून मान्य केलेले आहे. त्यामुळेच ते स्वतःला आपण हिंदू लोक, असं म्हणतात.

तुम्हाला मुस्लिम कट्टरवाद्यांकडून किंवा जहाल मतवाद्यांकडून धमक्या येत नाहीत का, तुमच्या बहिष्कार टाकला जात नाही का, धर्मातून निलंबित वगैरे करण्याची भीती वाटत नाही का... अशा बऱ्याच प्रश्नांना त्यांचं उत्तर एकच होतं. ‘मी जे लिहितो ते नेहमी अभ्यास आणि पुराव्यांच्या आधारेच लिहितो. लोकांशी चर्चा केल्याशिवाय किंवा पुस्तकांमधील उतारे दिल्याशिवाय लिहित नाही. त्यामुळेच माझे मुस्लिम मित्र आणि विरोधकही लेखनाचा आदर करतात. जरी त्यांच्याविरूद्ध असलं तरीही.’ शिवाय धर्मातून निलंबित होण्याची किंवा बहिष्कार टाकला जाण्याची भीती मला कधीच वाटत नाही. त्यामुळे माझा अभ्यास आणि लेखन अव्याहतपणे सुरू आहे.

हुसेन यांचं वाचन आणि भ्रमंती प्रचंड आहे, सर्वज्ञातच आहे. त्यांच्याशी बोलताना त्याचा अगदी मिनिटामिनिटाला प्रत्यय येतो. आपने ये किताब तो पढी होंगी... आपने ये तो पढाही होगा... असं म्हणत त्यांनी दीड तासांत तब्बल वीस ते पंचवीस पुस्तकांचे दाखले दिले. कुठलं पुस्तक भारतातलं होतं, कुठलं स्पेनचं, कुठलं इराणचं आणि काही पाकिस्तानमधली. आता आमचं वाचन कुठं आलंय इतकं. शाळा पिक्चर आल्यानंतर मिलिंद बोकील यांचं शाळा पुस्तक वाचायला घेणारे आम्ही इतकी पुस्तकं कशाला वाचतोय. पण आपली झाकली मूठ म्हणून मी फक्त माना डोलावत होतो.

मोहम्मद अली जीना यांच्यापासून ते नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत आणि शेख अब्दुल्ला यांच्यापासून ते राहुल गांधी यांच्यापर्यंत अनेक व्यक्ती, प्रसंग आणि घटनांबद्दल त्यांच्याशी गप्पा झाल्या. काही ऑन तर काही ऑफ द रेकॉर्ड. त्यामुळे एका मोठ्या आणि अभ्यासू माणसाला भेटल्याचा आनंद घरी परतताना मनात होता.