मेकिंग ऑफ संत तुकाराम
चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘तुकाराम’ नावाचा चित्रपट पहायला जाणार असाल, तर पहिली आणि एकमेव अट म्हणजे, 1936 मध्ये निर्मिती होऊनही मराठी माणसाच्या मनात अगदी ताजा असलेला आणि विष्णुपंत पागनीस यांची भूमिका असलेल्या ‘संत तुकाराम’ या चित्रपटाशी त्याची अजिबात तुलना करू नका. अन्यथा सध्याचा तुकाराम तुम्हाला कधीच आवडणार नाही. कारण या चित्रपटाची निर्मिती करण्यामागचा दृष्टीकोनच फार वेगळा आहे, असे माझे मत आहे.
अगदी चित्रपटाचे नाव ‘संत तुकाराम’ असे न ठेवता फक्त ‘तुकाराम’ ठेवण्यापासून या वेगळेपणाची सुरूवात होते. पूर्वी मेकिंग ऑफ महात्मा गांधी नावाचा चित्रपट आला होता. त्याच धर्तीवर हा मेकिंग ऑफ संत तुकाराम अशा स्वरुपाचा चित्रपट आहे. वडिलांची मस्त चाललेली सावकारी आणि बक्कळ पैसा-अडका असूनही तुकारामांना विरक्ती आली, हे सर्व पाश तोडून त्यांनी देवाचा धावा का केला, या सर्व प्रश्नांची उत्तरे ‘तुकाराम’मधून मिळतात. तसेच संत म्हणून असलेली तुकारामांची बरीच माहिती आपल्याला आहे. पण माणूस म्हणून ते कसे घडले, त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी कशी होती, याची खूपच अल्प माहिती सर्वसामान्यांना आहे. वारकरी मंडळींना त्याबद्दल अधिक ज्ञान असू शकेल. पण सामान्य माणूस त्यापासून कोसो दूर आहे.
म्हणजे तुकाराम महाजारांचे वाण्याचे दुकान होते, त्यांची शेती होती, ही माहिती आहे. पण त्यांचे वडील मोठे सावकार होते, त्यांची सावकारी उत्तम चालली होती, तुकारामांनीही सुरूवातीला सावकारीत अगदी उत्तम जम बसविला होता, त्यांना दोन बायका होत्या, अशी बरीच माहिती चित्रपटातून मिळते. तुकारामांची आई-वडील, एक मोठा आणि एक छोटा भाऊ, वहिनी, पुतणे, आजूबाजूचे लोक यांच्याबद्दलच्या माहितीचे बरेच पदर चित्रपटातून हळूहळू उलगडत जातात. तोच चित्रपटाचा यूएसपी (युनिक सेलिंग प्रेपोझिशन) आहे.
संत तुकाराम चित्रपटात चमत्कार आणि तुकारामांचे संतपण मोठ्या विस्ताराने चर्चिले गेले आहे. त्यामुळे त्या चित्रपटात तुकारामांच्या वाटेला आलेली दुःख, यातना, कष्ट यांचे म्हणावे तितके दर्शन घडत नाही. उलट बुडालेली गाथा वर येते, छत्रपती शिवरायांची शत्रूपासून सुटका करताना शिवरायांची अनेक रुपे निर्माण होऊन झालेला चमत्कार, वैकुंठगमन असे चमत्कारच जास्त लक्षात राहतात. त्यांच्यातील माणसाचे दर्शन घडत नाही. कारण संत झाल्यानंतरच्याच गोष्टीत त्यात आहेत. तुकाराममध्ये मात्र, माणूस म्हणून तुकाराम कसे होते, हे पहायला मिळते. त्यामुळे प्रत्येक माणसाच्या वाटेला येणारी दुःख, यातना, वेदना, कष्ट, हालअपेष्टा हे सारे तुकारामांनाही सोसावे लागले होते आणि त्याचे यथार्थ चित्रण चित्रपटात करण्यात आले आहे.
अत्यंत ऐश्वर्यसंपन्न घरातील असून आणि कुटुंब वत्सल असूनही त्यांनी प्रपंचाच्या मार्गावरून परमार्थाची वाट का धरली, हे पाहणे खूप रंजक आहे. महाजनाचं पोर, हरामखोर या लहानपणी एका मित्राने सुनाविलेल्या शब्दांचा सल त्यांच्या मनावर खूप खोलवर परिणाम करतो. त्यामुळंच चांदीचं कडं नदीत फेकून देण्याची कृती त्यांच्याकडून घडली. शिवाय मोठ्या भावाच्या विरक्त वृत्तीचा परिणामही त्यांच्यावर कदाचित झाला असावा.
तराजू जरी आपल्या हातात असला, तरी तोलणारा तो आहे...
त्यांच्या वस्तू आपल्याकडे गहाण असल्यामुळे आपण श्रीमंत वाटत असलो, तरी खरं म्हणजे आपली पोटंच त्यांच्याकडे गहाण पडली आहेत...
हे तुकारामांचे थोरले बंधू सावजी यांच्या तोंडचे संवाद मनाचा ठाव घेतात. आपल्या आणि तुकारामांच्याही. त्यामुळेच सावकारी करतानाही त्यांच्या मनातील माणुसकी तसूभरही कमी झालेली नसते, हे सतत जाणवते. एकदा वसुलीसाठी गेलेले असताना, परतल्यावर वडिल गेल्याची बातमी त्यांना समजते. त्यानंतर मग ते आईला आणि मोठ्या वहिनीला गमावतात. असे संसाराचे एकेक पाश कमी होत असतानाच प्रचंड भीषण दुष्काळ पडतो.
दुष्काळ पडल्यानंतर त्यात पहिला बळी माणुसकीचा पडतो, या एका म्हाता-या गावक-याच्या तोंडातील वाक्याचा अर्थ तुकारामांना हळूहळू समजू लागतो. तेराव्याच्या जेवणालाही अत्यंत ताव मारून जेवणारे गावकरी, चोरून तेराव्याचे लाडू नव-यासाठी घरी नेणारी जवळचीच व्यक्ती, धान्याच्या राशी लोकांना खुल्या केल्यानंतर त्यावर जनावरांसारखी तुटून पडणारी माणसं, पोटात आग पडली असताना चटणी-भाकरीसाठी सोन्याच्या दागिन्यांची करावी लागलेली मोड, अशा सर्व गोष्टी तुकारामांना विरक्तीच्या वाटेवर नेतात. आपत्तीत कामास न येणारी संपत्ती काय कामाची... असे सांगून तुकाराम त्यांच्या मनातील व्यथा व्यक्त करतात. तेव्हापासून तुकाराम बोल्होबा आंबिले यांचा संत तुकाराम होण्यास प्रारंभ होतो. त्या भीषण दुष्काळाचा तुकारामांच्या संतपणापर्यंत पोहोचण्यात सिंहाचा वाटा आहे, असा निष्कर्ष आपण चित्रपट पाहिल्यानंतर नक्कीच काढू शकतो.
चित्रपटात आणखी एका महत्त्वाच्या विषयावर प्रकाश टाकण्यात आला आहे. संसारात मन रमत नसताना किंवा फक्त देवाधर्माचीच आवड असताना लग्न केले, तर त्या कुटुंबाची कशी वाताहत होते, हा मुद्दाही चित्रपटात प्रकर्षाने अधोरेखित करण्यात आला आहे. तुकारामांचे ज्येष्ठ बंधू सावजी यांची प्रथमपासूनच विठ्ठलावर भक्ती. सोन्या-चांदीत राहूनही त्यांचे मन त्यात रमेना. आई-वडिलांनी अनेकदा प्रयत्न करूनही त्यांना कधीच सावकारी जमली नाही. अशात त्यांचे लग्न होते. लग्नाच्या पहिल्या रात्री बायको शेजारी असूनही ईश्वराचे नामस्मरण करणे न सोडणारा माणूस संसारात अजिबात रमत नाही. फक्त नावापुरती लग्नाची बायको असलेल्या त्याच्या सहचरणीची व्यथा हेलावून टाकणारी आहे. प्रपंच करावा नेटका, असे संतांनी सांगून ठेवले आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरूषार्थ आहेत. त्यातील काम ही एक सहज भावना आहे आणि ती गरजही आहे. पण देवाधर्माच्या मार्गावर जाणाऱ्या अनेकांना त्याचा विसर पडतो आणि त्याची झळ त्यांच्या संसाराला कशी बसते, हे अगदी समर्पकपणे चित्रपटातून दाखविण्यात आले आहे.
शिवाय पहिल्या पत्नीपासून अपत्यप्राप्ती होत नाही, म्हणून तुकाराम दुसरे लग्न करतात. तेव्हा तुकारामांची आई पहिल्या बायकोच्या त्यागाचे गोडवे गाते. तेव्हा तुकारामांच्या मोठ्या भावजयीने व्यक्त केलेली खंत हेलावून टाकते. नवऱ्याच्या संसारात न रमण्याच्या वृत्तीमुळे किती मोठा त्याग मी अनेक वर्षे करीत आली आहे, याचे तुम्हाला कधीच कौतुक वाटले नाही... ही तिची खंत अत्यंत योग्य आणि क्लेशदायक वाटते. म्हणजे तुकारामांना पहिल्या पत्नीपासून अपत्यप्राप्ती होत नाही, म्हणून ते दुसरी बायको आणतात. पण नवऱ्यापासून कसलेच सुख मिळत नसतानाही त्यांच्या मोठ्या भावजयीला बोलायचीही सोय नाही. दुसरे लग्न वगैरे तर विचारही नाही. तुकारामांच्या मोठ्या भावाचा आणि भावजयीचा त्यांची आई गेल्यानंतरचा एक प्रसंग फारच बोलका आहे. त्यामुळे परमार्थाचा मार्ग धरताना प्रपंचातील जबाबदाऱ्या टाळल्या जाणार नाहीत, याची जबाबदारी संबंधिताने घ्यायला हवी. कदाचित या सर्व वेदना तुकारामांपर्यंत पोहोचल्या असल्यामुळेच त्यांनी परमार्थाचा मार्ग धरताना प्रपंचाकडे दुर्लक्ष केले नाही.
पत्नीचे निधन झाल्यामुळे तुकारामांचा मोठा भाऊ घर सोडून निघून जातो. प्रपंचातून बाहेर पडल्यावर तरी आपल्याला देव भेटेल, अशी भाबडी आशा त्याला असते. पुढे एका वारीत तुकारामांना त्यांचा मोठा भाऊ भेटतो. तेव्हा तुकाराम हे संतपदापर्यंत पोहोचलेले असतात. त्यांची कीर्ती सर्वदूर पोहोचलेली असते. घर सोडून मी वणवण हिंडलो, पण मला काही देव भेटला नाही. तू मात्र प्रपंचात राहूनही तुला देव भेटला... हा मोठ्या भावाच्या तोंडचा संवाद खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण आणि वास्तववादी वाटतो. तेव्हा उगाच परमार्थाच्या मागे लागून फायदा नाही. सुखी संसार करूनही परमार्थ प्राप्ती होऊ शकते. एका पौराणिक कथेतील, घरच्या मंडळींना दूध देऊन तृप्त केल्यानंतर उरलेले वाटीभर दूध शिव मंदिरात ओतणाऱ्या माऊलीचे उदाहरण या बाबतीत चपखल वाटते. थोडक्यात म्हणजे, आपल्यावर अवलंबून असलेल्या सर्वांच्या इच्छांची पूर्तता झाल्यावरच देव प्रसन्न होतो. अतृप्तीतून नाही. एखाद्या गोष्टीचा हव्यास करू नये, हे जितके खरे तितकेच आहे, त्या गोष्टीचा परमार्थासाठी उगाच त्यागही करू नये. कदाचित तुकारामांनाही हेच वाटत असावे. त्यामुळेच त्यांनी प्रपंच सोडला नाही.
बाकी चित्रपट उत्तम. संवाद, गाणी आणि संगीत फारच छान. गन्या, मन्या, तुका... संतू, दामा, पका... हे गाणे अत्यंत उत्तम आणि प्रभावी. वृक्षवल्ली आम्हा सोयरे... या गण्याची चाल बदलण्याचा प्रयोग बऱ्यापैकी जमला असला तरीही ती चाल लक्षात रहात नाही. जितेंद्र जोशी याने वठविलेली तुकारामाची भूमिका अत्यंत प्रभावी वाटते. जितेंद्र तुकाराममय झाल्याचे त्यात वेळोवेळी जाणवते. चित्रपटात कोणताही चमत्कार नाही. तुकारामांची गाथा बुडविल्यानंतर ती वर येत नाही, तर पंचक्रोशीतील मंडळींची गाथा पाठच असते. मुखोद्गत असते. त्यातूनच तुकारामांची गाथा कायम राहते, ही पुलंनी मांडलेली थिअरी या चित्रपटात दाखविलेली आहे. (कदाचित पुलंच्या आधीही कोणीतरी ती मांडली असावी. मला माहिती नाही.)
जसे ग्रंथांची पाने फाडल्यामुळे शब्द नष्ट होत नाहीत, धडे गाळल्यामुळे इतिहास बदलता येत नाही, पत्र फाडल्यामुळे भावना संपत नाहीत किंवा पुतळे हलविल्यामुळे त्या व्यक्तीचे इतिहासातील योगदान संपुष्टात येत नाही. तसेच गाथा बुडविल्याने तिचा प्रभाव किंवा कार्य संपत नाही. कदाचित हेच तुकारामांना दाखवून द्यायचे होते.
चित्रपटातील तुकाराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीचा प्रसंग अत्यंत प्रभावहीन वाटतो. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणाऱ्या नटाला तर महाराजांचे व्यक्तिमत्त्व अजिबात साकारता आलेले नाही. शिवाय कुठल्या तरी किल्ल्याच्या बुरूजावर बसून छत्रपती शिवराय आणि तुकाराम यांच्यातील चर्चा तर अत्यंत पुस्तकी आणि छापील स्वरुपाची आहे. हा एक प्रसंग आणि इतर एक-दोन किरकोळ गोष्टी वगळल्या तर तुकाराम खूप छान जमला आहे.
पहिल्या आजारी पत्नीवर जीवापाड प्रेम करणारे प्रेमळ तुकाराम, अवार्च्च भाषेत आरडाओरडा करणाऱ्या आवलीच्या चिडचिडीला सामोरे जाणारा टिपिकल नवरा असलेले तुकाराम, भले देऊ गांडीची लंगोटी... असे रोखठोक बजाविणारे तुकाराम, धर्मपीठाला वेद, शास्त्र आणि उपनिषदांचे दाखले देणारे अभ्यासू तुकाराम, आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचा अभंगांमध्ये किंवा ओव्यांमध्ये समावेश कर म्हणजे लोकांना त्या सहजपणे समजतील आणि अपिल होतील, असा उपदेश देणारे साधे आणि संतपणाचा कुठेही बडेजाव न मिरवणारे तुकाराम, अशी त्यांची अनेक रुपं आपल्याला चित्रपटातून पहायला मिळतात.
तुकारामांच्या काळातील ब्राह्मण मंडळींवर चित्रपटात आसूड ओढण्यात आले असले तरीही तुकाराम हे सर्वसमावेशक संत होते. त्यांच्या मनात कोणाच्याबद्दल राग किंवा द्वेष नव्हता. त्यामुळेच तुकारामांना एखाद्या जातीपुरते, समाजापुरते किंवा संप्रदायापुरते मर्यादित न ठेवता तुका आकाशाएवढा एवढी तरी किमान गोष्ट त्यांच्या पाठिराख्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. कारण संत हे कोणत्याच विशिष्ट जाती, समुदाय, पंथ किंवा संप्रदायापुरते मर्यादित नसतात. माळी, कोळी, शिंपी, ब्राह्मण, तेली, महार, चांभार, एससी, एसटी, ओबीसी, मराठा अशा जातींमध्ये संत महात्मे आणि महापुरुषांना अडकवून ठेवणे म्हणजे हा त्यांच्या कार्याचाच अपमान आहे. हाच तुकारामांचा संदेश आहे. आणि तो सगळ्यांनीच ध्यानात ठेवला पाहिजे...
बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम... पंढरीनाथ महाराज की जय...
फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा संत तुकारामशी तुलना करू नका. अन्यथा पस्तावाल.
अधिक माहितीसाठी संपर्क - http://www.tukaramthefilm.com/
आमचे मित्र सचिन परब यांनीही याच विषयावर ब्लॉग लिहिला आहे... त्याची लिंक पुढीलप्रमाणे...
http://parabsachin.blogspot.in/