Saturday, March 28, 2015

अॅथलिट्स ओन कंट्री… केरळ

अॅथलेटिक्स हा जीव की प्राण...

गुवाहाटी येथे पार पडलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी गेलो होतो तेव्हा केरळच्या अॅथलेटिक्स प्रेमाबद्दल बरीच माहिती मिळाली होती. केरळमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा नक्की कव्हर करायच्या, हे तेव्हाच ठरविलं होतं. त्यानुसार फेब्रुवारी महिन्यात केरळमध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी तिथं गेलो होतो. कव्हर करायला नाही, पण आनंद लुटायला…


राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला महिन्याभराचा कालावधी उलटल्यानंतर हा ब्लॉग का, असा प्रश्न सर्वांच्याच मनात येऊ शकतो. मात्र, हा ब्लॉग राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेबद्दल नाही. शिवाय क्रिकेटच्या फिव्हरमध्ये ब्लॉग लिहिण्यात मलाही रस नव्हता. म्हणूनच सर्वकाही संपल्यानंतर मुद्दाम ब्लॉग लिहित आहे.
‘गॉड्स ओन कंट्री’ ही केरळची खरी ओळख. तेच केरळ अॅथलिट्सची खाण आहे. भारतातील बहुतांश नावाजलेले अॅथलिट्स ही केरळची देण आहे. अगदी जुन्या काळातील टी. सी. योहोन्नन आणि सुरेश बाबू, माझ्या पिढीला माहिती असलेले पी. टी. उषा आणि शायनी विल्सन, अलिकडच्या काळातील के. एम. बीनामोल, टिंटू लुका, अंजू बॉबी जॉर्ज, प्रीजा श्रीधरन, रेंजित माहेश्वरी आणि ओ. पी. जैशा ही केरळची देण. नावं अजूनही निघतील. मात्र, ही अगदी पटकन सुचलेली आणि मिळालेली.
केरळमध्ये उद्योगधंद्यांची वानवा. इथला मुख्य उद्योग म्हणजे पर्यटन आणि पर्यटनाच्या अनुषंगानं चालत येणारे काही पूरक उद्योग. बाकी मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करणारे उद्योग केरळमध्ये नाही. त्यामुळंच कदाचित देशभरात आणि परदेशात (विशेषतः मध्यपूर्वेला) मल्याळी मंडळी कामासाठी स्थलांतर करत असतात. 

तिथं राहणाऱ्या लोकांनाही रोजगाराची विशेष उपलब्धता नाही. त्यामुळंच खेड्यापाड्यातील मुलं आणि मुली क्रीडापटू होण्याची मनिषा बाळगतात. केरळच्या छोट्या छोट्या गावांमध्ये राहणाऱ्या या मंडळींना प्रचंड चालण्याची, वेगाने पळण्याची नि डोंगरदऱ्यांमध्ये सहजपणे वावरण्याची सवय असते. ही मंडळी काटक असतात. शारिरीक मजबुती ही त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरते. खेडोपाड्यातील मुला-मुलींना लहानपणापासूनच खूप चालण्याची किंवा धावण्याची सवय असते. शाळेत जाण्यासाठी त्यांना अनेकदा पाच-सात किलोमीटरची पायपीट करावी लागते. कमीत कमी. अधिकाधिक दिवसाकाठी पंधरा-सोळा किलोमीटरही. त्यामुळं शारिरीक कष्टांची त्यांना सवय झालेली असते. शिवाय अॅथलिट म्हणून जर उत्तम करियर झालं, तर केरळ सरकार किंवा केंद्र सरकारमध्ये नोकरी मिळेल आणि आयुष्याचा रोजगाराचा प्रश्न सुटेल, असा दुसरा हेतूही त्यांच्या मनात असतो. केरळमधून सर्वाधिक अॅथलिट निर्माण होण्याचं ही दोन मुख्य कारणं आहेत.


आणि ही लोकं अॅथलेटिक्ससाठी किती करतात. ऐकाल-वाचाल तर थक्क व्हाल. केरळमध्ये शाळांनी घेतलेल्या मेहनतीमुळे, लोकांच्या प्रेमामुळे, माध्यमांनी केलेल्या वार्तांकनामुळे नि सरकारी मदतीमुळे अॅथलिट घडतात. त्यांच्या घडण्यामध्ये या सर्वांचा महत्त्वाचा वाटा असतो. त्यामुळंच अॅथलिट घडविणं आणि त्यांना सांभाळणं ही आख्ख्या केरळची जबाबदारी असते, असं तिथं गमतीनं म्हटलं जातं. 

शालेय स्तरावरील स्पर्धांमध्ये भविष्यात चकमू शकणारे अॅथलिट्स वेचले जातात. राज्यस्तरीय आंतरशालेय क्रीडा स्पर्धा ही केरळवासियांसाठी आणि अॅथलेटिक्स प्रेमींसाठी पर्वणी असते. इतर ठिकाणी स्थानिक पातळीवरील क्रिकेट सामन्यांना नसेल त्यापेक्षा कितीतरी पटीनं अधिक गर्दी आंतरशालेय क्रीडा स्पर्धांना असते. शाळांमधील क्रीडा शिक्षक तसेच इतर प्रमुख शिक्षकही स्पर्धांना आवर्जून उपस्थित असतात. स्थानिक वृत्तपत्रांमध्ये स्पर्धेच्या कालावधीत दोन विशेष पाने प्रसिद्ध होतात. त्यामध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची माहिती, त्यांच्या घरगुती पार्श्वभूमी, सर्व स्पर्धांचे निकाल असे विस्तृत वार्तांकन करण्यात येते. अनेक न्यूज चॅनल्सवरून आंतरशालेय क्रीडा स्पर्धांच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले असते. गुवाहाटीमध्ये मल्याळी माध्यमांचे जवळपास वीस ते पंचवीस प्रतिनिधी उपस्थित होते. गुवाहाटी आणि केरळात मराठी माध्यमांचे प्रतिनिधी किती? पाचच्या आत.

  (ओ. पी. जैशा आणि प्रिजा श्रीधरन.)
ही माहिती वाचून काही संस्था, कंपन्या किंवा सामाजिक संघटना छोट्या अॅथलिट्सना दत्तक घेतात. काही जण त्यांच्या खर्चाचा काही हिस्सा उचलतात. सर्वोत्तम खेळाडूंना आपल्या शाळेत ओढण्यासाठी शाळांमध्येही स्पर्धा असते. उदाहरणच द्यायचे तर एर्णाकुलम जिल्ह्यातील कोथमंगलम या ठिकाणी असलेल्या सेंट जॉर्ज आणि मार बॅसिल या दोन शाळांमध्ये खेळाडू आपल्याकडे आकर्षिक करण्यासाठी विशेष चुरस असते. या शाळांचे मुख्याध्यापक आणि ट्रस्टी वगैरे मंडळी चांगल्या कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या पालकांशी संपर्क करतात, त्यांच्याशी संवाद साधतात, त्यांना काय सुविधा देणार याची जंत्रीच सादर करतात. त्यांच्या राहण्याचा, खाण्या-पिण्याचा, शिक्षणाचा, ट्रेनिंगचा आणि सर्व खर्च ही शाळांची जबाबदारी असते. अशा पद्धतीने ही मंडळी चांगल्या अथॅलिट्सना आपल्या शाळेमध्ये खेचून आणतात आणि त्यांना ट्रेन करतात.

हा झाला एक भाग. शालेय किंवा महाविद्यालयीन स्तरावर पास झाल्यानंतर किंवा ते शिक्षण घेत असतानाच हे अॅथलिट्स राज्य सरकारच्या किंवा खासगी अकादमींमध्ये दाखल होतात. केरळमध्ये जवळपास प्रत्येक जिल्ह्यात क्रीडा अकादमी आहे. मुख्य म्हणजे ती सुस्थितीत आहे. अनेक खासगी अकादमीही आहेत. स्प्रिंट (धावपटूंसाठी), थ्रो (गोळा, हातोडा आणि भालाफेक) आणि जम्प (लांब, उंच आणि बांबूउडी) अशा वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांसाठी स्वतंत्र अकादमी आहेत. पी. टी. उषाची स्वतंत्र अकादमी आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत १० हजार मीटरची स्पर्धा विजेती ओ. पी. जैशा ही तिच्याच अकादमीची अॅथलिट आहे.


इतकं करून हे लोक स्वस्थ बसत नाहीत. जिथं जिथं अॅथलेटिक्सच्या स्पर्धा होतात तिथं तिथं ही चाहते मंडळी आवर्जून उपस्थिती लावतात. खेळाडूंना प्रोत्साहन देतात. अॅथलेटिक्स फॉलो करतात. त्यामुळं खेळाडू आणि अॅथलेटिक्स चाहते यांच्यात एक वेगळंच नातं निर्माण झालेलं असतं. अनेक चाहत्यांना खेळाडू अगदी पहिल्या नावानं ओळखत असतात. चाहते आणि अॅथलिट यांच्यातील हेच आगळवेगळं नातं केरळमधील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत अगदी जवळून पहायला मिळालं. अनुभवायला मिळालं.

स्पर्धेतील केरळच्या अॅथलिटला इतकं प्रोत्साहन देतील की विचारू नका. प्रत्येक सुवर्णपदक आणि प्रत्येक पदक केरळच्या खेळाडूनेच जिंकले पाहिजे, अशी त्यांची अपेक्षा असावी. धावण्याच्या स्पर्धेत केरळच्या अॅथलिटने आघाडी घेतली की मग विचारूच नका. आरडाओरडा, त्याच्या नावानं प्रोत्साहन, शिट्ट्या, घोषणा आणि मेक्सिकन व्हेव्ज तयार करण्याचा प्रयत्न… काय करतील भरवसा नाही. माध्यम प्रतिनिधींचीही सुवर्णपदक आणि चांगली कामगिरी बजाविणाऱ्या अॅथलिट्सच्या विशेष मुलाखती नि बाइट्ससाठी धावपळ. एक्सक्लुझिव्हसाठी पळापळ. प्रत्येक दिवसानंतर तासाभराचा स्पेशल प्रोग्रॅम. त्यामध्ये थेट स्टेडियमवरून खेळाडू, माजी खेळाडू लाइव्ह आणि बरंच काही. अॅथलेटिक्स हे केरळमधील लोकांच्या नसानसात भिनलंय, असं म्हणायला हरकत नाही.

स्पर्धा संपल्यानंतर काही वेळ ट्रॅकवर होतो तेव्हा खेळाडू आणि पत्रकार तसेच खेळाडू आणि चाहते यांच्यातील निकटचं नातं पहायला मिळालं. पी. टी. उषा, शायनी विल्सन-अब्राहम, अंजू बॉबी जॉर्ज आणि तेव्हा नुकतीच निवृ्त्त झालेली प्रिजा श्रीधरन यांच्यासोबत छबी टिपण्यासाठी आणि त्यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी अक्षरशः रांग लागली होती. सर्वाधिक लोकप्रिय अर्थातच, पायोली एक्स्प्रेस अर्थात, पीटी उषा. जवळपास दीड तास तिच्यासोबत फोटोसेशन सुरू होतं. 


 
दर दोन मिनिटांनी पाच-सात जणांचा नवा ग्रुप यायचा, कुटुंब यायचं आणि फोटो काढून घ्यायचं. मोठी माणसं सोबतच्या लहानग्यांना पीटी उषा म्हणजे नेमकी कोण, हे मल्याळममध्ये समजावून सांगत. काय सांगायचे ते कळत नव्हतं. पण लहानग्यांच्या चेहऱ्यावरचे भाव भारावून गेल्यासारखे असायचे. अनेकांना तर आपण देवासोबत फोटो काढून घेतला किंवा देवाशी हस्तांदोलन केलं, असंच वाटत होतं. अर्थातच, माझी भावना फार काही वेगळी नव्हती. शायनी विल्सन, अंजू बॉबी जॉर्ज आणि प्रिजा श्रीधरन यांच्यासोबत फोटो काढून घेण्यासाठीही लोकांची प्रचंड तारांबळ सुरू होती. 


 
पी. टी. उषाच्या अॅकॅडमीला भेट देण्याची आणि तिच्याशी निवांत गप्पा मारण्याची माझी खूप दिवसांपासूनची इच्छा आहे. भारतीय अॅथलेटिक्समध्ये पी. टी. उषानं केलेली कामगिरी कदाचितच भविष्यात कोणी करू शकेल. आणि केली तरी पीटीचं स्थान कोणीही घेऊ शकणार नाही. त्यामुळंच तिला भेटल्यानंतर मी तशी इच्छा व्यक्त केली. ‘अरे, आपण जरूर या. फक्त फोन करून मी आहे किंवा नाही, ते पाहून या. म्हणजे चुकामूक होणार नाही,’ असं निमंत्रण तिनं दिलं. जायचं निश्चित आहे. फक्त कधी आणि कसं ते पाहू. पण पीटी उषाशी संवाद साधून झाल्यानंतर मग थोडी टंगळ मंगळ करून मी स्टेडियममधून बाहेर पडलो.

तिरुवनंतपुरममध्ये ‘मी मराठी’
फोटोसेशन आणि गप्पा सुरू असतानाच एक फोन आला. फोनवर मराठी बोलणं ऐकून दोन तरुण माझ्याकडे ‘अरे, हा कोण इथं मराठीतून बोलतोय,’ असे भाव करून पहायला लागले. मला आधी वाटलं की खेळाडू किंवा प्रशिक्षक असतील. स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून  आलेले कोणीतरी. पण ते दोघे भलतेच निघाले आणि त्यांची भेट वेगळी माहिती देऊन गेली.

ते दोघे होते सांगलीच्या विटा तालुक्यातील खानापूरचे मालोजी चव्हाण आणि श्रीरंग चव्हाण. हे दोघे चुलत भाऊ गेल्या बारा वर्षांपासून तिरुवनंतपुरममध्ये आहेत. यांचा व्यवसाय सोनं शुद्ध करण्याचा. सोन्याची प्युरिटी तपासण्याचा आणि ते अधिक प्युअर करण्याचा. ‘नायट्रिक अॅसिड’चा वापर करून सोनं शुद्ध केलं जातं. संपूर्ण देशात या पद्धतीनं सोनं प्युअर करणारी मंडळी फक्त मराठीच आहेत आणि ते सर्व विट्यातील खानापूरचेच आहेत, ही नवी माहिती चव्हाण बंधूंकडून मिळाली. 



मालोजी आणि श्रीरंग यांचे चुलते मनोज चव्हाण हे १९८२ पासून तिरुवनंतपुरममध्ये आहेत. तिथं जवळपास १०० ते १२५ मराठी कुटुंब या व्यवसायात आहेत. तिथं त्यांनी दुकान थाटली आहेत आणि व्यवसायात चांगला जम बसविला आहे. श्रीरंग आणि मालोजी चव्हाण हे उत्तम मल्याळम बोलतात. वाचतात आणि लिहितातही. कारण सगळा व्यवसाय त्याच भाषेतून होतो. मल्याळम शिकायला त्यांना तीन वर्षे लागली. ‘मराठी माणूस जिथं जाईल, तिथला होऊन जातो. स्वतःचं वेगळेपण मुद्दामून दाखवून देत नाही,’ या म्हणण्याला पुन्हा एकदा पुष्टी मिळाली. 

सिद्धिनाथ गोल्ड रिफायनरी (एस एस ज्वेलरी वर्क्स) या नावानं त्यांनी तिथं दुकान थाटलं. छान व्यवसाय सुरूय. मला दुसऱ्या दिवशी पहाटेच निघायचं असल्यानं मला त्यांच्या दुकानाला भेट देता आली नाही. पुढच्या वेळी याल तेव्हा जरूर भेट द्या, असं आग्रहाचं निमंत्रण त्यांनीही दिलं. पुढच्या वेळी नक्की येतो, असं आश्वासन देऊन स्टेडियमला रामराम केला.

अॅथलिट बनल्या पत्रकार…
तिरुवनंतपुरमच्या प्रेसक्लबनं माध्यमकर्मींची उत्तम व्यवस्था केली होती. त्यांना वेळेत सर्व माहिती मिळेल, त्यांचं आदरातिथ्य उत्तम असेल अशी सर्व व्यवस्था प्रेसक्लबचे सदस्य आणि शिकाऊ पत्रकार यांनी चांगल्या पद्धतीनं पार पाडली होती. तिथं दोन-तीन युवा पत्रकार भेटल्या. इंटरनॅशनल अॅथलिट ज्युबी पिल्ले आणि स्वाती प्रभा. स्वाती प्रभा ही पी. टी. उषाच्या अकादमीमधून तयार झालेली. ज्युबी ही वायनाडची. कन्नूर स्पोर्ट्स अकादमीतून बाहेर पडलेली. तिघींमधील समानता आणि वैशिष्ट्य म्हणजे या तिघीही राष्ट्रीय स्तरावरच्या अॅथलिट्स. पण रोजगार नसल्यानं त्यांनी स्पोर्ट्स रिपोर्टर म्हणून करियर करण्याचा विचार केलाय. दोघी टीव्ही चॅनल्समध्ये रिपोर्टर आहेत. तर तिसरी (ज्युबी) पत्रकारितेचं शिक्षण पूर्ण करतानाच ट्रेनी म्हणून जॉब करतेय. आहे ना गंमत…


ज्युबीशी गप्पा मारताना तिनं एक गमतीशीर गोष्ट सांगितली. तिला विचारलं, ‘कसं वाटतं तुम्हाला केरळकडून खेळताना. अॅथलिट म्हणून वावरताना. इतक लोक सपोर्ट करतात. प्रेम करतात तुमच्यावर. काय भावना असते तुमची…’ तिनं दिलेलं उत्तर मस्त होतं. ती म्हणाली, ‘एकदा का तुम्ही केरळ असं लिहिलेली जर्सी अंगावर घातली ना की मग तुम्ही देखील सर्वोत्तम कामगिरीच कराल. केरळची जर्सी घातली की तुम्ही कुठलेही असा, आख्खा केरळ तुमच्या पाठिशी उभा राहील. त्या बळावर तुम्ही नक्कीच नेहमीपेक्षा अधिक चांगली कामगिरी कराल.’