नमस्कार, मी विकास मधुकर मठकरी...
सरांची दुसरी टर्म त्याच भागातून होती. पण तेव्हा वॉर्डाचा प्रभाग झाला होता. त्या प्रभागात सर्वाधिक मताधिक्य त्यांचंच होतं. तेव्हा मी ‘केसरी’त बातमीदारी करीत होतो. काही महिने महापालिका बीटही होतं. तेव्हा त्यांची महापालिकेत भेट व्हायची. मात्र, नंतर मी ई टीव्हीत गेलो आणि संपर्क तुटला. तिसरी टर्म वेगळ्या मतदारसंघातून होती.
नोव्हेंबर १९९५… भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची
बैठक पुण्यात आयोजित करण्यात आली होती. त्याच दोन-तीन दिवसांमध्ये एका संध्याकाळी एस.
पी. कॉलेजवर भाजपच्या नेत्यांची एकत्रित जाहीर सभा होती. अटलबिहारी वाजपेयी नि लालकृष्ण
अडवाणी यांना एकत्र ऐकण्याची संधी तशी दुर्मिळच. तीही पुण्यात. तेव्हा आवर्जून त्या
सभेला उपस्थित होतो. शिवाय सुषमा स्वराज, प्रमोद महाजन आणि भाजपची अनेक ज्येष्ठ नेते
मंडळी पुण्यात आली होती. त्यांची भाषणं काही लक्षात नाहीत. पण वाजपेयी नेहमीप्रमाणेच
सुंदर बोलले होते. तेव्हा फारसे थकलेही नव्हते. त्यांना भेट दिलेली तलवार उपसून बाहेर
काढणारे वाजपेयी, असं फारच कॉन्ट्रास्ट चित्र त्यावेळी पहायला मिळालं होतं. (मी जर चुकत
नसेन तर मित्रवर्य रवी पत्की यांनी त्याची फ्रेम घरी करून लावली होती.)
‘दिवा विझण्यापूर्वी मोठा होतो. तसंच काँग्रेस सरकारचं
आहे. हा दिवा आज ना उद्या विझणारच आहे,’ असं मार्मिक भाष्य अटलजींनी त्यावेळी केलं
होतं. त्यानुसार काँग्रेसचा दिवा विझला नि भाजपची ‘पणती’ १३ दिवसांसाठी प्रज्वलित झाली.
अर्थात, तेरा दिवसांतच ती पण विझली. मात्र, त्या तेरा दिवसांमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांना
झालेला आनंद काकणभर अधिकच संस्मरणीय होता. कारण सर्वांचे लाडके अटलजी पंतप्रधान झाले
होते. असो… तो विषय वेगळा. तर अटलजींचे भाषण संपले आणि मंडळी ‘एसपी’तून बाहेर पडू लागली.
त्यावेळी पहिल्यांदा विकास मधुकर मठकरी या व्यक्तीचे दर्शन झाले. अर्थात, तेव्हा ते
फक्त दिसले. ओळख मात्र, झाली नाही.
आमचे मित्रवर्य आणि तेव्हाचे वॉर्डातील भाजपच्या
युवा कार्यकर्त्यांचे मोहोळ जमविणारे सन्माननीय रवी व्यंकटेश पत्की यांनी दाखविले…
‘तो बघ विकास मठकरी. आपल्या वॉर्डाचा भाजपचा अध्यक्ष आहे. ‘अभाविप’चा पूर्णवेळ होता.
आसाम आणि ईशान्य भारत, कुठल्या कुठल्या यात्रा वगैरेमध्ये सहभागी झाला होता. इइ…’ माहिती
सन्माननीय रवी पत्की यांनी पुरविली. मठकरी या माणसाचं नाव माझ्या कानावर पहिल्यांदा
पडलं. जीनची पँट, खादीचा
शर्ट आणि पायात स्पोर्ट्स शूज. अजूनही मला तो पेहराव आठवतोय. पुढंही अनेकदा त्यांचा
हाच पेहराव असायचा. तेव्हा सरांची राजदूत होती आय थिंक. कोणत्याही इतर मोटरसायकलपेक्षा
जरा अधिकच फटफट आवाज करीत राजदूत निघायची. पुढे आणखी काही वर्षे तीच राजदूत ते वापरत
होते. नमस्कार, मी विकास
मधुकर मठकरी… ही त्यांची ओळख करून द्यायची ष्टाइल. हे शब्द अजूनही कानात आहेत.
नंतर मग परिसरातील संघशाखा भरणाऱ्या मैदानावर (संघाच्या
भाषेत संघस्थानावर) स्थानिक नगरसेविकेनं गंडांतर आणण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्या
नगरसेविकेला हैराण करून सोडण्याचे काम विकास मठकरी आणि दुसरे परममित्र धीरज घाटे या
दोघांनी केलं होतं. ‘अटक्यात लोटकं, लोटक्यात दही… मैदानं लाटत चालली बाई’ किंवा ‘मुलांच्या
जीवाशी खेळू नका, खेळाचं मैदान गिळू नका’ अशा घोषणा असो, घराघरांत पत्रक वाटणं असो,
रस्त्यावर उभं राहून स्वाक्षरी मोहीम राबविणं असो किंवा इतर पर्याय असो. काँग्रेसच्या
पक्षश्रेष्ठींकडून संबंधित नगरसेविकेला कानपिचक्या मिळतील, अशीही व्यवस्था करण्यात
आली होती. अखेरीस ते मैदान वाचलं आणि ‘संघाच्या नादाला लागू नका,’ असा इशारा संबंधित
नगरसेविकेला वरिष्ठांनी दिल्याचंही समजलं.
मला वाटतं विकास मठकरी आणि धीरज घाटे या दोघांनी
आक्रमकपणे रस्त्यावर उतरून यशस्वी केलेलं ते पहिलं आंदोलन असावं. त्यानंतर मग विकास
मठकरी यांची सातत्यानं भेट होऊ लागली. चहा पिता पिता गप्पा होऊ लागल्या. त्यांच्या
घरी या ना त्या निमित्तानं जाणं-येणं होऊ लागलं. तेव्हा ते अंकुश काकडे यांच्या शेजारच्या
इमारतीत रहायचे. आमच्या वॉर्डाचे भाजपचे अध्यक्ष हीच त्यांची ओळख होती. नगरसेवकपदासाठी
उभे राहणार, एवढीच चर्चा होती. पण नगरसेवक नव्हते. विकास मठकरी या नावानं त्यांना आम्ही
कधीच बोलावलं नाही. आमच्यासाठी ते कायमच मास्तर किंवा सर राहिले. सरांबद्दलची आणखी
एक आठवण म्हणजे त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात पहिल्यांदा मटण खाल्लं होतं. नवी
पेठेतल्याच कुठल्याशा गच्चीवर कार्यक्रम झाला होता. नीटसं आठवत नाही, पण कदाचित सरांच्याच
गच्चीवर झाला होता.
सरांनी पहिली निवडणूक लढविली १९९७ साली. गोपाळ तिवारी
यांच्याविरोधात. जोरदार प्रचार करून त्यांनी गोपाळदादांना घाम फोडला होता. इतके प्रयत्न
करूनही मठकरी मास्तर पडणार, असाच होरा होता. मात्र, सर ठाम होते. ‘आशिष, मी जिंकणार.
एक मतानं का होईना पण मी जिंकणार,’ हा सरांचा ठाम विश्वास होता. ‘उमेदवार झक्कास, मठकरी
विकास’ असं सांगत कार्यकर्ते आख्ख्या वॉर्डभर हिंडत होते. पण गोपाळ तिवारी यांनी मतदारसंघ
उत्तम बांधला होता. अखेरीस झालंही तसंच तेरा की चौदा मतांनी सर जिंकले आणि नगरसेवक
झाले. नंतर सलग तीनवेळा निवडणूक जिंकले. मात्र, प्रत्येक वेळी त्यांना अडचणींचा सामना
करावा लागला. अगदी सहजपणे काहीच हातात पडलं नाही.
सरांची दुसरी टर्म त्याच भागातून होती. पण तेव्हा वॉर्डाचा प्रभाग झाला होता. त्या प्रभागात सर्वाधिक मताधिक्य त्यांचंच होतं. तेव्हा मी ‘केसरी’त बातमीदारी करीत होतो. काही महिने महापालिका बीटही होतं. तेव्हा त्यांची महापालिकेत भेट व्हायची. मात्र, नंतर मी ई टीव्हीत गेलो आणि संपर्क तुटला. तिसरी टर्म वेगळ्या मतदारसंघातून होती.
२००७ मध्ये बीएमसीसीच्या वॉर्डातून निवडणूक लढविण्याची संधी
त्यांना मिळाली. तेव्हाही दोन दिग्गजांचे तिकिट कापून त्यांना उमेदवारी बहाल करण्यात
आली होती. तेव्हा निवडणूक काळात कर्वे रोडच्या गिरीजात सरांची एकदा भेट झाली होती.
तेव्हाही प्रचंड आत्मविश्वास त्यांच्या चेहऱ्यावर आणि देहबोलीत होता. ‘आशिष, मी जिंकणार
रे.’ कुठे काय यंत्रणा लावलीय, कसे प्रयत्न चालू आहेत आणि कसे प्रयत्न चाललेत सगळं
सविस्तर सांगून टाकलं. सर तिथूनही जिंकले आणि नगरसेवकपदाची हॅट्ट्रिक झाली.
सर त्याच सुमारास ते बीएमसीसी कॉलेजच्या परिसरात
रहायला गेले आणि आमच्या गाठीभेटी कमी झाल्या. क्वचित कधीतरी त्यांचा फोन यायचा. बातमी
किंवा लेख वाचला, असं सांगायला येणारे फोनच अधिक. मी कधीतरीच त्यांना फोन करायचो. धीरजच्या
कुठल्याशा कार्यक्रमात, कुठल्याशा सभा किंवा जाहीर कार्यक्रमात त्यांची भेट व्हायची.
काय चाललंय, सध्या कुठे वगैरे विचारपूस व्हायची इतकंच. पुढे २००९ मध्ये त्यांचे लोकसभेसाठी
प्रयत्न सुरू होते. नंतर विधानसभेला शिवाजीनगरमधून लढले. त्यावेळी मी साम मराठीत होतो.
तेव्हा फोनवरून गप्पा व्हायच्या.
हे आता आठवण्याचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वीच
विकास मठकरी उर्फ मास्तर उर्फ सरांची कोथरूडमधल्या त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. एका
दिवशी सकाळी त्यांचा मला फोन आला आणि म्हणाले, की आशिष, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा…
मी चाट पडलो. कारण त्या दिवशी वाढदिवस नव्हताच. सरांना धन्यवाद दिले आणि सांगितलं,
की अहो आज माझा वाढदिवस नाहीये. त्यांच्याकडे चुकून त्या दिवशी माझा वाढदिवस अशी नोंद
झाली होती. बाकी गप्पाटप्पा झाल्या. मला म्हटले, ‘अरे, आशिष किती दिवस झाले आपण भेटलो
नाही. आता माझा उपयोग नाही, म्हणून भेटणं किंवा फोन करणं बंद करायचं का?’
बापरे, त्यांचं हे वाक्य मला खूप लागलं. अर्थात,
जेव्हा ते चांगले होते. राजकारणात सक्रिय होते, तेव्हाही त्यांचं माझं भेटणं अगदी नैमित्तिक
होतं. कामासाठी वगैरे तर नाहीच नाही. पण तरीही मला ते वाक्य ऐकून मनाला खूप वाईट वाटलं.
सगळे लोक ‘उगवत्या सूर्याला नमस्कार’ करणारेच असतात. आज मठकरींकडे काही नाही, म्हणून
आपण त्यांना फोन करत नाही किंवा भेटत नाही, असं वाटायला नको म्हणून त्यांना म्हटलं,
‘सर, अहो असं काही नाही. तुम्ही सांगा कधी भेटायचं. मी त्यादिवशी येतो भेटायला. वाटलं
तर रवीला पण घेऊन येतो.’ ‘आज संध्याकाळी ये पाचनंतर मी मोकळा आहे.’ सरांनी फर्मान काढले.
तुम्ही म्हणाल तेव्हा येतो, म्हटल्यामुळं मला पर्यायच नव्हता. त्यामुळं संध्याकाळी
सव्वा पाच वाजता सरांच्या कोथरूडमधल्या निवासस्थानी पोहोचलो.
दीडएक वर्षांपूर्वी सरांना अर्धांगवायूचा त्रास झाला
आणि खाटकन एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. उज्ज्वल राजकीय कारकिर्दीला ब्रेक लागला
होता. अॅडमिट झाल्यानंतर वेगवेगळ्या बातम्या वाचनात यायच्या. त्यांनी हॉस्पिटलमध्ये
भाजपच्या शहर कार्यकारिणीची बैठक घेतल्याचंही कळलं होतं. प्रकृतीत हळूहळू सुधारणा होते
आहे, असं कानावर यायचं. नंतर दोन-तीनदा फोनवर बोलणंही झालं. विशेषतः निवडणुकीच्या काळात.
तेव्हा ते रामदेव बाबांच्या आश्रमात उपचार घेत होते. मास्तर, वैशालीत येऊन गेले, भाजपच्या
कार्यालयात त्यांनी उपस्थिती लावली, असंही अधनंमधनं कळायचं. धीरज मध्यंतरी सरांना टिळक
टँकवर जाऊन भेटला होता. तिथले फोटोही त्यानं फेसबुकावर टाकले होते. एक-दोनदा सार्वजनिक
कार्यक्रमात त्यांची भेटही झाली. पण निवांत गप्पा झाल्या नव्हत्या. त्या मारण्यासाठीच
कोथरूडमधलं घर गाठलं.
सर एकदम मस्त मूडमध्ये होते. पुतण्याकडून ‘शिवांबू’चे
फायदे आणि शरीरावर होणारे शास्त्रीय परिणाम समजावून घेत होते. सध्या ‘शिवांबू’ची ट्रीटमेंट
सुरू केलीय. ‘शिबांवू’ प्राशन, शिवांबूपासून मसाज वगैरे गोष्टी अगदी उत्साहानं सांगत
होतं. शिवांबू प्राशन करण्याच्या कालावधीत काय खायचं आणि काय नाही खायचं, याचे स्पष्ट
उल्लेख आयुर्वेदात आहेत, असं सांगत होते. शिवांबू घ्यायला लागल्यापासून खूप फरक जाणवतोय,
असंही म्हणत होते. इतर पथ्य नि उपचार पद्धतींबद्दल सांगत होते. दिवसभर काय करतो, किती
चालतो, याची माहिती देत होते. पूर्वी रोज दहा-बारा किलोमीटर सहज चालणं व्हायचं. सायकलिंग
व्हायचं. पक्षाच्या बैठकीला एखाद्या मतदारसंघात गेलो तर तिथून चालतच घरी यायचो. अगदी
वडगांव शेरीतूनही घरी चालत आलोय, असं हसत हसत सांगत होते. मी इतका फिट होतो… पण त्यादिवशी
ढोलाचं टिपरू लागलं आणि मग पुढचं सगळं रामायण घडलं, हे सांगताना त्यांचा चेहरा पाहवत
नव्हता.
पण इतकं सगळं असूनही पुन्हा एकदा नव्यानं मैदानात
उतरण्याची जिद्द त्यांच्या बोलण्यात होती. नजरेत होती. सरांच्या या गोष्टीचं मला कायम
अप्रूप वाटतं. त्यांच्यामध्ये असलेली लढण्याची प्रचंड जिद्द, दुर्दम्य आत्मविश्वास
आणि पुन्हा एकदा पूर्वीसारखं राजकारणात उतरण्यासाठी चाललेली धडपड. एखादा असता तर खचलाच
असता. गपचूप शिकविण्याचे काम करून सर्वसामान्य प्राध्यापकाचे जीवन जगण्यात धन्यता मानली
असती. पण सहजपणे हार मानतील किंवा परिस्थितीला शरण जातील, ते सर कसले. या अतिअत्यंत
प्रतिकूल परिस्थितीही त्यांना ‘फिनिक्स’ पक्षाप्रमाणे भरारी घ्यायची आहे. पुन्हा एकदा
राजकारणात जायचं आहे. काही जणांना हे अवास्तव किंवा निरर्थक वाटू शकतं. पण मला मात्र,
त्यांची लढाऊ वृत्ती यातून दिसते.
मास्तरांची लढाऊ वृत्ती अनेक निवडणुकांमधून दिसलीय.
गोपाळ तिवारींविरोधात दिसलीय. अनिल शिरोळे यांच्याशी असलेल्या सुप्त संघर्षाच्या प्रसंगी
दिसलीय. गोपीनाथ मुंडे यांनी कोत्या मनाने त्यांच्यावर टाकलेल्या बहिष्काराच्या प्रसंगी
दिसलीय. खडकवासला भाजपकडे खेचून आणताना दिसलीय. गणेश बिडकर यांना स्थायी समिती अध्यक्ष
करताना दिसलीय. पक्षांतर्गत विरोधकांना पुरून उरतानाही दिसलीय. सरांचा तो संघर्ष आजही
सुरूय. आधी तो पक्षांतर्गत विरोधकांशी होता. विरोधी पक्षातल्या लोकांशी होता. आज तो
परिस्थितीशी नि नियतीशी सुरू आहे.
पुण्या-मुंबईत झालेल्या उपाचारांनंतर त्यांनी उत्तराखंडमध्ये
रामदेव बाबांचा आश्रम गाठला. भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने रामदेव बाबांकडे शब्द टाकला.
‘हा माझा माणूस आहे. हा खणखणीत व्हायलाच पाहिजे. तुम्ही स्वतः लक्ष घाला.’ रामेदवबाबांचे
उपचार आणि प्रचंड पथ्य यामुळे माझ्या प्रकृतीत खूप सुधारणा झाली, असं सर स्वतः सांगतात.
अनेक पद्धतीचे उपचार, अनेक प्रकारचे व्यायाम, मालिश आणि इतर पूरक औषधांमुळे सध्या मी
७० टक्के बरा झालो आहे. लवकरच उर्वरित तीस टक्के बरा होईन, हे त्यांच्या बोलण्यातून
अनेकदा ऐकायला मिळत होतं.
कोणाचीही मदत न घेता सर स्वतः स्वतःचे चालत होते.
स्वतःची काम स्वतः करत होते. मध्यंतरी पदवीधर मतदारसंघातील चंद्रकांतदादा पाटलांच्या
विजयानिमित्त श्रमपरिहाराचे आयोजन करण्यात आले होते. तिथं सरांची भेट झाली होती. कुठल्याशा
मिळालेल्या पत्रकाची त्यांनी स्वतः घडी घातली. एक हात आणि दात यांचा वापर करून घडी
घातली नि पत्रक खिशात ठेवलं. खाली पडलेलं पत्रक स्वतः उचललं, कोणाच्याही आधाराविना
स्वतः उठून उभे राहिले. उभं राहण्यासाठी दिलेला मदतीचा हात त्यांनी अत्यंत विनम्रपणे
नाकारला. अशी स्वाभिमानी आणि स्वावलंबी वृत्ती तेव्हाही जाणवत होती. त्या तुलनेत परवा
भेट झाली तेव्हा सरांची प्रकृती खूपच उत्तम वाटली. तब्येत खूप सुधारली आहे, हा त्यांचा
दावा योग्य वाटत होता.
पक्षाचं काय चाललंय, आठ आमदार आणि एक खासदार काय
म्हणतायेत, कोण कशा पद्धतीनं काम करतंय, लोकांमध्ये आणि पत्रकारांमध्ये पक्षाबद्दल,
सरकारबद्दल काय भावना आहे, केंद्र आणि राज्य सरकारबद्दल काय वाटतं? अशा असंख्य प्रश्नांचा
भडिमार करत होते. त्यांच्या नसानसांमध्ये फक्त भाजपच ठासून भरलाय, असं पदोपदी जाणवतं
होतं. ‘आशिष, माझी संधी हुकली रे…’ हीच त्यांची भावना होती. मागे दोन ते तीनवेळा त्यांनी
फोनवर तसं बोलूनही दाखवलं होतं. परवा मात्र, ते थेट तसं बोलले नाहीत. पण भावना व्यक्त
होत होती.
पुण्यातील भाजपचा आक्रमक, अभ्यासू आणि धडाकेबाज नगरसेवक
आज अशा अवस्थेत आहे, हे पाहून खूपच वाईट वाटतं. एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास करण्याची
वृत्ती, अभाविपच्या कामाचा अनुभव (सध्या भाजपमध्ये हा अनुभव सर्वाधिक महत्त्वाचा समजला
जातो, अशी माझी ठाम भावना आहे.), मराठीसह हिंदी आणि इंग्रजी या भाषांवर प्रभुत्त्व,
तुलनेनं तरूण नि धडाकेबाज असे अनेक नेतृत्व गुण त्यांच्याकडे होते-आहेत. पुण्याचे
भावी खासदार किंवा भावी आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. नरेंद्र मोदींच्या
लाटेत गावगन्ना मंडळी आमदार-खासदार झाली. विकास मठकरी तर दोन हजार टक्के निवडून आले
असते. पण आता ते त्यांच्या नशिबात नव्हते. आपल्याला याबद्दल इतकं वाईट वाटतं, तर स्वतः
मठकरींना त्याबद्दल किती वाईट वाटत असेल.
सरांना म्हटलं, सर तुम्ही बाकी काही विचार करू नका.
आधी ठणठणीत व्हा. मस्त पहिल्यासारखे बरे व्हा. नशिबात जे लिहिलं असेल ते कधीच तुमच्यापासून
कोणी हिरावून घेणार नाही. मिळणार असेल ते नक्की मिळणार. आज नाही तर उद्या. पण त्याचा
विचार तुम्ही आता करू नका. नंतर ते नक्की मिळेल, यावर विश्वास ठेवा. त्यांनाही ते पटलं.
पण आता मिळालं नाही, याचं दुःख त्यांना होतं.
शिवाजीनगर मतदारसंघात पुन्हा एकदा फिरायचंय. जनसंपर्क
अभियान राबवायचंय, असं म्हणत होते. अधूनमधून कार्यकर्त्यांचे एक-दोन फोनही येऊन गेले.
आमच्या गप्पा सुरू असतानाच नारायण पेठेतील सरांचा (म्हणजेच पक्षाचाही जुनाच) कार्यकर्ता
बिपीनही (आडनाव आठवत नाही आत्ता!) आला होता. कोथरुड मतदारसंघातील भाजपचे उपाध्यक्ष
की चिटणीस होते, ते देखील सरांना भेटायला आले. ही मंडळी सरांना कायम भेटायला येत असावी.
म्हणजे तसं त्यांच्या बोलण्यावरून जाणवत होतं.
आधीही म्हटल्याप्रमाणे हल्लीचा जमाना हा ‘उगवत्या सूर्याला’ नमस्कार करणाऱ्यांचा
आहे. राजकारणात तर दररोज नवे सूर्य उगवतात नि मावळतात. पण मला वाटतं, सर तुम्ही आता
याचा अजिबात विचार करू नका. तुम्ही तुमच्या प्रकृतीची काळजी घ्या. तुम्हाला तुमच्या
नशिबात आहे, ते नक्की मिळणार. आज नाही तर उद्या हमखास मिळणार. सुदैवाने तुम्ही ज्या
पक्षात आहात, तो पक्ष कार्यकर्त्यांना न्याय देणारा आहे. तेव्हा तुम्हाला न्याय नक्की
मिळेल. आणि जेव्हा मिळेल तेव्हा आतापर्यंतचा बॅकलॉग भरून निघेल इतकं मिळेल. आमच्या
शुभेच्छा आहेत तुम्हाला…
तेव्हा लवकर बरे व्हा. तंदुरुस्त रहा…
तुमचे आरोग्य उत्तम राहो, हीच प्रार्थना.