Friday, July 01, 2022

राजकारणातील नीचपणाचा कळस...

 

आधी मी, मग माझे दत्तू, शेवटी पक्ष...

आधी राष्ट्र, मग पक्ष आणि शेवटी मी... हे झालं सांगायला. अहवालांमधून छापायला, लेखांमधून लिहायला आणि भाषणांमधून मोठेमोठे बच्चन द्यायला... पण वास्तविक पाहता, आधी मी, नंतर माझे दत्तू (म्हणजे समर्थक) आणि शेवटी काही उरलं तर मग पक्ष (म्हणजे आपल्या विरोधातील इतर नेते नि कार्यकर्ते) वगैरे... हीच खरी नीती आहे. त्याला हल्ली भाजपामध्ये चाणक्यनीती म्हटलं जातं. आणि अशा नितीचा अवलंब करणाऱ्या शहाजोगांना चाणक्य. अगदी काही अपवाद सोडले तर आज पार्टी विथ डिफरन्समध्ये हीच परिस्थिती आहे.

केंद्रामध्ये असाल तर पंडित दीनदयाळ उपाध्याय, महाराष्ट्रात असाल तर वसंतराव भागवत आणि पुण्यात असाल, तर रामभाऊ म्हाळगी यांचं नाव घ्यायचं आणि भाषणं ठोकून टाळ्या मिळवायच्या. बाकी मग पक्ष चालविताना आणि वैयक्तिक आयुष्यात तुम्ही काहीही लफडी करा, कितीही खादाडी करा किंवा एकमेकांवर राजकीय कुरघोड्या करून पक्षातील विरोधकांना संपवून टाका, काही फरक पडत नाही. सगळं चालतंय... मुखी ही नावं असली म्हणजे मग सगळं माफ...

महाराष्ट्रातील सत्तांतराचे सूत्रधार असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी घडविलेल्या चमत्कारानंतर त्यांना मुख्यमंत्री न करता उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला लावून केंद्रीय नेतृत्वाने, विशेषतः अमित शहा यांनी दाखविलेल्या नीचपणानंतर हीच भावना अधिक प्रबळ होते. आपलं भविष्य महत्त्वाचं. पक्ष खड्ड्यात गेला, एखाद्या नेत्याचे खच्चीकरण झालं तर काय फरक पडत नाही. मी आणखी मोठा व्हायला पाहिजे, हीच वृत्ती यातून प्रकर्षाने दिसून येते.

मुळात अजित पवार यांच्यासोबत सत्तास्थापनेचा प्रयोग फसल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत नियोजनबद्धपणे व्यूहरचना रचून महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणले, हे सकृतदर्शनी दिसते. देवेंद्र यांना बाजूला ठेवून अमित शहा आणि जगतप्रकाश नड्डा यांनी सर्व खेळ्या खेळल्या आणि सत्तांतर घडले, यावर विश्वास ठेवायला मी भक्तांइतका भाबडा नाही. (वास्तविक पाहता, जगतप्रकाश नड्डा हा माणूस मोदी आणि शहा यांच्या किल्लीवर चालणारा बोलका बाहुला आहे, ओघानं आलंच. महाराष्ट्रात सत्तांतर घडविणे हा त्यांना झेपणारा घासही नाही.) राज्यातील एकाही नेत्याची तेवढी क्षमता नाही त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना बाजूला ठेवून हे सत्तांतर घडले असू शकते, यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. देवेंद्रच या सत्तांतराचे शिल्पकार आणि सर्वेसर्वा आहेत.


मग इतके सारे व्यवस्थितपणे प्लॅन केल्यानंतरही देवेंद्र फडणवीस यांचा इतका अपमान आणि इतका उपमर्द कशासाठी करण्यात आला असावा? त्याचे फक्त आणि फक्त एकच उत्तर दिसते आणि ते म्हणजे माझ्या स्पर्धेत कोणीही असू नये, हेच आहे. कारण २०२५ नंतर नरेंद्रशेठ मोदी हे निवृत्त होणार, असे त्यांनी आधीच जाहीर करून टाकले आहे. मोदींनंतर कोण, हा प्रश्न सध्या सर्वाधिक चर्चिला जातो आहे. त्यात नितीन गडकरी, शिवराजसिंह चौहान, अमित शहा, योगी आदित्यनाथ आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा समावेश आहे. परवा इकॉनॉमिक टाइम्समध्ये हेमंत बिस्वा शर्मा यांचेही नाव आले आहे. पण ते नाव काही देशभर चालेल असे वाटत नाही. अगदी २०२५ ला देवेंद्र पंतप्रधान नाही झाले, तरी त्यांना अमितभाई शहा हे त्यांना प्रतिस्पर्धी म्हणूनच पहात असावे. देवेंद्र यांच्यासारखा सज्जन, सभ्य, सुसंस्कृत, तळपता, चमकदार, प्रभावी, अभ्यासू आणि संघप्रिय नेता आपल्याला वरचढ होऊ नये, याच हेतूने देवेंद्र यांचा उपमर्द करण्याचे नीच कृत्य केले असावे.

मुळात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर रात्री पेढे भरवाभरवीचा कार्यक्रम सुरु होता तेव्हा देवेंद्र यांना या षडयंत्राची कल्पनाही नसावी. मात्र, दुसऱ्या दिवशी साऱ्या घडामोडी घडत असताना या कपटी षडयंत्राचा हळूहळू उलगडा त्यांना होत गेला असावा.

पहिली शक्यता अशी की देवेंद्र यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते. मात्र, घासून घासून गुळगुळीच झालेला राजकीय मास्टरस्ट्रोक मारण्यासाठी अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनविण्याचे आदेश दिले असावेत. देवेंद्र ब्राह्मण आणि शिंदे मराठा असणे, शिवसेनेचाच मुख्यमंत्री केला, हे श्रेय घेण्याची संधी, अडीच वर्षांतील कारभार सुधारण्याचे मोठे आव्हान, शिवसेनेच्या नि त्यातही बंडखोर आमदारांना सांभाळण्याची जबाबदारी असे चर्चिले गेलेले सर्व मुद्दे ध्यानात ठेवून फडणवीस यांना मुख्यमंत्री न करता शिंदे यांच्याच गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घातली गेली असावी. ठीक आहे हे मान्य.

पण मग देवेंद्र यांना शिंदे यांच्या हाताखाली काम करायला लावून त्यांचा उपमर्द कशाला करायचा. त्यांना प्रदेशाध्यक्ष करून टाकायचं (नाहीतरी चंद्रकांत पाटील यांची टर्म संपतेच आहे) किंवा सरकारचे कामकाज नीट चालविण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवायची. आपल्या ज्युनिअरच्या हाताखाली काम करण्याची सक्ती किंवा बळजबरी त्यांच्यावर कशाला करायची? मुळात देवेंद्र यांनी उपमुख्यमंत्री होण्याचे मान्य केलेच नसेल. त्यामुळेच त्यांनी पत्रकार परिषदेत मी बाहेर थांबून सरकारला सहकार्य करेन, असे सांगितले. पण हे सहन न झाल्यामुळे किल्लीवर चालणाऱ्या अध्यक्षांनी थेट व्हिडिओ ट्विट करून देवेंद्र यांना नेतृत्वाने (म्हणजेच अमितभाई शहा यांनी) उपमुख्यमंत्री होण्याचे निर्देश दिले आहेत, असे सांगून देवेंद्र यांची गोची केली.

दुसरे म्हणजे अध्यक्षांनी सांगितल्यानंतरही देवेंद्र यांनी उपमुख्यमंत्री होण्याचे मान्य केले नसावे म्हणून आणि म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोनवेळा देवेंद्र यांना फोन केला असावा. काय देवेंद्र जेवलात का? काय जेवलात? आज घातलेल्या जॅकेटमध्ये एकदम छान दिसताय, स्वारी खूष का एकदम वगैरे वगैरे गावगप्पा मारायला मोदी यांनी फडणवीस यांना फोन केला नसावा ना... देवेद्र ऐकण्याच्या मूडमध्ये नाहीत म्हणून आणि म्हणूनच मोदी यांनी एकदा नव्हे तर दोनदा फोन करून उपमुख्यमंत्री होण्यासाठी गळ घातली असावी...

अखेरीस सध्या तरी हा निर्णय मान्य करण्याशिवाय काहीही पर्याय नाही, हे ओळखून देवेंद्र यांनी उपमुख्यमंत्रीपदाची अत्यंत सुतकी चेहऱ्याने आणि खोल गेलेल्या आवाजात शपथ घेतली. देवेंद्र यांनी शिस्त, पक्षनिष्ठा आणि स्वयंसेवक वृत्तीचे दर्शन घडविल्याच्या पोष्टी जे भाजपावाले टाकत आहेत, तो निर्णय त्यांनी स्वखुषीने घेतलेला नाही, हे शपथविधीवरूनच समजते.

शपथविधी प्रकरणावरून गळलेली एक गोष्ट म्हणजे देशात, केंद्र सरकारमध्ये, आणि भाजपामध्ये अमित शहा यांचाच शब्द अंतिम आहे. नरेंद्र मोदी हे आता रिटायर्डमेंट मोडमध्ये गेले असून, अमित शहा यांच्या विरोधात जाऊन देवेंद्र यांचे समर्थन करण्यामध्ये त्यांना फारसा रस राहिलेला नाही. वास्तविक पाहता, देवेंद्र हे मोदींचे ब्लू आईड बॉय होते. मात्र, आता परिस्थिती बदलल्याचे जाणवत असून, देवेंद्र यांची नाचक्की आणि अपमान होण्यापासून वाचविण्याठी मोदींनी फार लक्ष घातले नाही, हे स्पष्ट होते आहे.

मुळात तुम्हाला उपमुख्यमंत्री करायचे होते, तर चंद्रकांतदादा पाटील, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार किंवा पंकजा मुंडे यांना करायचे. महाराष्ट्र भाजपात  देवेंद्र यांच्या तोडीचा नि लायकीचा एकही नेता नाही हे मान्य. पण उपमुख्यमंत्री म्हणून चांगले काम करण्याची धमक असलेला एकही नेता नाही, हेच तुम्ही या कृतीतून दाखवून दिले. देवेंद्र यांच्यानंतरचे सर्व दादा, भाई, भाऊ आणि नेते हे आकडे फुगविण्यासाठी जमविलेली फक्त डोकी आहेत, हेच यातून सिद्ध होते.

वास्तविक देवेंद्र यांचा झालेला हा अपमान पाहता महाराष्ट्रातील नगरसेवक, आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधींनी देवेंद्र यांच्या बाजूने आवाज उठविला पाहिजे. महाराष्ट्र देवेंद्र यांच्या पाठिशी आहे, हे दाखवून द्यायला हवे. पण हे राजकारण आहे आणि भविष्यात सर्वांनाच आपल्या दुकानदाऱ्या चालू ठेवायच्या आहेत. त्यामुळे अशी रिस्क कोणी घेणार नाही. खरं तर दम असेल तर असे करता येऊ शकते. २०१४ मध्ये सुधीर मुनगंटीवार यांनी नितीन गडकरी यांच्या नावासाठी आग्रह धरत वातावरण तापवायला सुरूवात केली होती. त्यांच्यावर काही कारवाई झाली नाही. उलट पाच वर्षे त्यांनी महाराष्ट्राच्या अर्थमंत्रिपदाची धुरा सांभाळली...

देवेंद्र यांनी पक्षादेश, नेत्यांचा आदेश शिरोधार्य मानून स्वतःमधील शिस्तबद्ध स्वयंसेवक आणि कार्यकर्त्याचे दर्शन घडविले. त्याचप्रमाणे आपल्या पुढे जाईल, या भीतीने एखाद्याचा उपमर्द, अपमान आणि खच्चीकरण करणाऱ्या नेतृत्वाच्या नीचपणाचे दर्शनही फडणवीस यांच्या उपमुख्यमंत्रीपदावरील निवडीच्या निमित्ताने झाले.

असो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पाहतो आहे. उत्तर प्रदेशात आपल्या मर्जीप्रमाणे वागू शकतील, अशा मनोज सिन्हा यांना मुख्यमंत्री करण्याचा इरादा मोदी-शहा यांचा होता. पण संघाने ऐनवेळी लक्ष घालून तिथे योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री करायला लावले आणि मनमानी चालणार नाही, हा संदेश मोदी-शहा यांच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचविला. भविष्यात अशाच पद्धतीने वाटचाल सुरू राहिली तर पुन्हा एकदा भूमिका घेऊन योग्य तो संदेश द्यायला संबंधित मागेपुढे पाहणार नाहीत, असे वाटते.