Monday, October 25, 2010

चम्मतगं

काही अप्रकाशित म्हणी आणि वाक्प्रचार

पाठ्यपुस्तकातल्या म्हणी आणि वाक्प्रचार आपण नेहमी ऐकले आहेत. वाचले आहेत. लहानपणी पुस्तकांमध्ये शिकल्यापासून लक्षात ठेवले आहेत. पण काही म्हणी आणि वाक्प्रचार त्यापेक्षा वेगळेही आहेत. अनेकदा अचानकपणे ते कानावर पडले की, हडबडून जायला होतं. चौकांमध्ये, नाक्यावर किंवा कट्ट्यावर असताना त्यांचा वापर जास्त केला जातो. विविध ठिकाणी हे कोडवर्ड वेगवेगळे असतात. त्यापैकी फक्त संसदीय शब्द, वाक्प्रचार आणि म्हणी येथे देत आहे. Hope you will enjoy it.

१) खाण तशी माती, आई तशी स्वाती

(जशी आई तश्शीच मुलगी)

२) दुस-याच्या घोड्यावर बसून शनिवारवाडा पाहणे

(फुकटचा रुबाब करणे)

३) मी नाही त्यातली अन् कडी लाव आतली

(वरुन किर्तन आतून तमाशा, याच आशयाची ही म्हण आहे. आहोत त्यापेक्षा वेगळाच दिखावा करणे.)

४) सरशी तिथं पारशी

५) जहा मिले चांदी वहा चलें महात्मा गांधी

६) भेळ तिथं खेळ

(फायदा होणार तिथं नक्की पोचणार)

७) आरतीला भरती

(झळकण्याच्या वेळी सर्व येणार)

८) खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा

(जवळपास काही नसताना उगाच बढाया मारणे)

९) ओळख ना पाळख आणि म्हणे मी लोकमान्य टिळक

(विशेष कर्तृत्व नसताना स्वतःची तुलना मोठमोठ्या नेत्यांशी करणे)

१०) बिच में मेरा चाँदभाई

(इतरांचा कोणताही विषय सुरु असला तरी त्यात आपला मुद्दा उगाच रेटून नेणे)

११) फुकट जेवा पण ओळख ठेवा

(काहीही करा पण वेळप्रसंगी मदतीला धावून या)

१२) काम ना धाम डोक्याला घाम

(काहीच न करता उगाचच लटकणे)

१३) पोट आहे की अक्कलकोट

१४) पोट आहे की पेटारा

(सारखी खा खा करणा-यासाठी उपरोधिक)

१५) खाओ खुजाओ बत्ती बुझाओ

(नाना पाटेकरचा कुठल्याशा पिक्चरमधील डायलॉग. फक्त खायचं, प्यायचं आणि झोपायचं)

१६) डोक्यात जाणे

(एखाद्यावर प्रचंड वैतागणे)

१७) कुच्चा मोडणे

(हा खानदेशी वाक्प्रचार आहे. त्याचा अर्थ वाट लागणे असा आहे.)

१८) गोट्या फिट्ट करणे

(हा विदर्भात वापरला जाणारा वाक्प्रचार असून त्याचा वापर सकाळसारख्या दैनिकात केल्याचे मी माझ्या डोळ्याने पाहिले आहे. पोझिशन आपल्या बाजूने लॉक करुन टाकणे, असा त्याच अर्थ असल्याचे आमचे मित्रवर्य संजय पाखोडे यांनी सांगितले होते.)

१९) झगामगा अन् मला बघा

(चमकोगिरी करुन लोकांना आपल्याकडे आकर्षित करणे)

२०) फुकट चंबू बाबूराव

(फुकटेगिरी करणा-या लोकांसाठी वापरली जाणारे विशेषण)

२१) एखादी व्यक्ती भागवत असणे

(दुस-याच्या खर्चात आपला कार्यभाग उरकणे म्हणजेच भागविणे)

२२) पुतळा होणे

(एखाद्याची खूप वेळ वाट पाहणे)

२३) फुकट ते पौष्टिक

(जे जे फुकट ते सर्वकाही आन दो.)

२४) लग्नात मुंज उरकणे

(मोठ्या गोष्टींमध्ये छोट्या छोट्या गोष्टी उरकून घेणे आणि खर्च वाचविणे)

२५) टाईट मारणे

(रुबाब करणे. हा वाक्प्रचार सोलापूर किंवा कोल्हापूरमध्ये वापरला जातो. नक्की कुठे ते तपासले पाहिजे.)


२६) ठेवल्या ठेवल्या गुल करणे

(पाहता पाहता खाऊन टाकणे. पंतगबाजीवरुन हा वाक्प्रचार आला आहे. जेव्हा दोन पतंगांची पेज होते. तेव्हा एखाद्याने आपला मांजा दुस-याच्या मांजाला घासल्यानंतर ताबडतोब दुस-याचा पतंग गुल होणे, यावरुन ठेवल्या ठेवल्या गुल... हा वाक्प्रचार पडला आहे.)


२७) एखाद्याच्या नावाने बिल फाडणे

(परस्पर संबंध नसलेल्या व्यक्तीवर एखाद्या घटनेची किंवा घडामोडीची जबाबदारी ढकलणे)


तुम्हालाही काही म्हणी, वाक्प्रचार आणि इतर संसदीय शब्द माहिती असतील तर कॉमेंट्स स्वरुपात टाकावेत. म्हणजे ही यादी अशीच वाढत जाईल.

Saturday, October 23, 2010

दादर-परळमधील खादाडी...

बेलापूरला साम मराठीमध्ये असताना मुंबईत येणं फारसं व्हायचं नाही. पण सामना जॉईन केल्यानंतर रोजच्या रोज मुंबईत येण आलंच. दादर-परळमधील ब-याच नामांकित हॉटेल्स आणि रेस्तराँमध्ये पूर्वी अनेकदा गेलेलो आहे. पण गेल्या वर्षभरात खादाडीचे अनेक नवे अड्डे सापडले. त्यातील बरेच अड्डे हे रस्त्यावरचे आहेत. पण अशा अड्ड्यांवरच चांगलं आणि चविष्ट खायला मिळतं, असा माझा अनुभव आहे. त्यामुळे मी ते खात गेलो आणि एन्जॉय करत गेलो.



शिरा-पोहे...
परळ स्टेशनकडून सामना कार्यालयाकडे जात असताना परळ एसटी डेपोच्या चौकात कोप-यावर (मुंबईच्या भाषेत नाक्यावर) एक शिरा-पोह्याचा स्टॉल असतो. अर्थात, पहाटे पावणे चार ते सकाळी आठ-नऊ या कालावधीत. सक्काळी सक्काळी स्वादिष्ट पोहे आणि मस्त शिरा इथं मिळतो. अवघ्या सात रुपयांत. शिरा-पोहे असं कॉम्बिनेशनही मिळतं. तेवढ्याच किंमतीत. पोहे जास्त तेलकट नसतात आणि शिरा चवीला जरा जास्त गोड असतो, त्यामुळं मला ते आवडतात. (शिवाय सामनातून सकाळी पुण्याला निघताना पोटाला आधार मिळतो, हा भाग दुसरा.)
सोबतीला शेजारीच गरमागरम कडक चहाही आहे. तो पण स्पेशल चहाच्या तोडीस तोड.


उपवासाची पुरी-भाजी...
जिथे सकाळी शिरा-पोहे मिळतात त्याच्याच डायगोनली ऑपोझिट प्रकाश नावाचं एक छोटेखानी दुकान आहे. दादरमध्ये प्रकाश नावाचं एक खूप प्रसिद्ध हॉटेल आहे. ते निराळं. हे वेगळं. हे हॉटेल मुंबईत आहे, असं आत गेल्यावर जराही वाटत नाही. आत शिरतानाच ठेवलेली दुधाची कढई. आत विविध प्रकारच्या पाट्या. इथे सर्व प्रकारच्या नागरिकांना मुक्त प्रवेश आहे वगैरे वगैरे. या पाट्या आता फारशा दिसत नाहीत. कारण सर्व ठिकाणी सर्वांना प्रवेश हे सर्वमान्य आहे. शिवाय बुंदीचा लाडू, दाण्याचा लाडू, शेव-चिवडा, पापडी, अगदी बाबा आदमच्या काळातलं सोसयो हे शीतपेयं असा अगदी गावाकडच्या टपरीवरचा फिल इथं येतो. पदार्थांचे भावही हातानं लिहून चिटकविलेले. एक जुन्या जमान्यातलं हॉटेल वाटावं, असं वातावरण. मस्तच...
मला इथला सर्वाधिक आवडणारा पदार्थ म्हणजे राजगि-याच्या पु-या आणि उपवासाची बटाट्याची भाजी. पाच की सहा पु-या आणि गरमागरम झणझणीत भाजी. उपवासाला दिलखुश. मिसळ, वडा-उसळ पण मिळते, पण मला तशी मिसळ विशेष आवडत नाही. वेळेला केळं... म्हणून ठीक आहे. पण आवडीनं नाही. इथला साधा चहाही स्पेशल चहा इतकाच मस्त आणि कडक.


मांसाहारी गिरीश...
टिपिकल मालवणी (किंवा कोकणी) चवीचं आणि अगदी सामान्यांच्या खिशालाही परवडेल, असं हॉटेल म्हणजे गिरीश. परळमधल्या जयहिंद हॉटेलच्या समोरच हे गिरीश आहे. जयहिंदमध्ये प्रचंड गर्दी असल्यामुळे मी एकदा गिरीशमध्ये गेलो आणि नंतर प्रेमातच पडलो. पापलेट, सुरमई, हलवा, बोंबील, मांदेली अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मच्छीपासून ते खिमा, मटण-चिकन हंडी, मसाला अशा सर्व प्रकारच्या वैविध्यानं गिरीश भरलेलं आहे. अस्सल मालवणी म्हटल्यावर सोलकढीही आलीच. काही ठिकाणी सोलकढी ही आपली अशीच असते. पण इथली सोलकढी कायम लक्षात राहिल, अशीच म्हटली पाहिजे.
महत्त्वाचं म्हणजे इथले दरही अगदी माफक आहेत. दोन जण अगदी पोट फाटेपर्यंत जेवलो तर बिल १६० रुपयांच्या वर जात नाही.


प्रभादेवीचा वडापाव...
वरळीकडून प्रभादेवीकडे जाऊ लागलो की रवींद्र नाट्य मंदिराकडे वळण्याआधीचा जो चौक आहे (नाव काही लक्षात नाही बुवा...) त्या चौकात एक गाडी लागते. आई-वडील आणि दोन मुलं अशी त्या गाडीवर असतात. त्या गाडीवर वडापाव खाल्ला की, बाकीचं सारं विसरुन जायला होतं. इथल्या वडापावची चव खरोखरच वेगळी आहे. तसंच दोन-तीन प्रकारच्या चटण्यांमुळं त्याची लज्जत आणखीनच वाढते. वडापाव प्रमाणेच पॅटिस आणि सामोसे ही तितकेच चटकदार असतात. पॅटिस आणि वड्यासाठी वापरलं जाणारं सारण वेगवेगळं असतं. नाहीतर काही ठिकाणी एकच सारण दोन्हीत वापरुन फसवणूक केली जाते. शिवाय इथला खप आणि ग्राहकांचा राबता इतका आहे की, विचारु नका. कधीही जा तुम्हाला अगदी गरमागरम वडा मिळणारच. आणखी काय हवंय.
सामनामध्ये आम्ही कधी-कधी (आठवड्यातून जवळपास पाचवेळा) वडापाव, भजी, दालवडा किंवा इतर खाद्यपदार्थ मागवायचो, त्यातून मला या माणसाचा शोध लागला. संधी मिळेल तसं त्याला भेट देणं व्हायचं.

मधुराची मिसळ...
संकष्टी चतुर्थीला एकदा प्रकाशमध्ये जाण्याऐवजी मधुरामध्ये गेलो. (थँक्स टू माय बॉस मि. विद्याधर चिंदरकर) मधुरात उपवासाची मिसळ खूप छान मिळते, असं त्यांनी सांगितलं. मग मी काय थांबणार होतो. मिशन मधुरा. त्यांनीच मला मधुरात सोडलं. एक प्लेट उपवासाची मिसळ मागितली आणि तृप्त झालो. उपवासाचा बटाट्याचा गोड चिवडा, उपवासाची बटाट्याची भाजी, साबुदाण्याची खिचडी, किसलेली (किंवा चोचलेली) काकडी, दाण्याचं कूट आणि वरुन मस्त दाण्याची आमची. व्वा क्या बात है... हे सारं कालवून राडा करायचा आणि मग ओरपायचं. स्वर्गीय सुख. तोड नाही हो. इतकं चांगलं खायला मिळणार असेल तर कोणी रोजही उपवास करेल. उपवासाची मिसळ खाऊन झाली की, मग पियूष, ताक, लस्सी किंवा कडक चहा काही पण घ्या.
इतर मराठी रेस्तराँमध्ये मिळतात तसे आळूची वडी, थालिपीठ, भाजणीचे वडे, खर्वस इइ अस्सल मराठमोळे पदार्थही इथं मिळतात. दादरमध्ये प्लाझाच्या लाईनमध्ये शिवाजी मंदिर समोर असल्यामुळं दर थोडे अधिक वाटतात. पण तृप्त होऊन बाहेर पडल्यानंतर सगळं वर्थ वाटतं.

इडली-डोसा...
परळ स्टेशनवरुन उतरलं बाहेर आलं की, समोर एक बोगद्यासारखं आहे. त्या बोगद्याखाली एक इडली-डोशाची गाडी लागते. मला वाटतं सकाळी पावणे सात ते दुपारी दोन-अडीच. दहा रुपयांत तीन इडल्या किंवा तीन मेदू वडे (काहींच्या भाषेत मेंदू वडा) किंवा दोन साधे डोसे (घावन). दोन (क्वचित प्रसंगी एक) प्लेट मारल्या की, पोट भरलं. इथं सांबार फारसं चांगलं मिळत नाही. म्हणजे जी टिपिकल दक्षिण भारतीय चव असते ना, ती इथं नाही. त्यामुळं सांबार नाही घेतलं तरी चालेल. पण इथली खोब-याची चटणी तसंच टॉमेटो आणि लाल मिरचीपासून तयार केलेली लाल चटणी एकदम टॉप्प. इडली किंवा घावन काहीही घ्या पण चटणीबरोबर खाल्लं तर अधिक चांगलं लागतं. माझा अनुभव. तुम्हाला सांबार आवडलं तर खाऊ शकताच की...


फालुदा...
मुंबई सेंट्रल आणि वांद्रे स्टेशन इथं आमचे परममित्र मंगेश वरवडेकर उर्फ राजा यांच्या सहकार्याने मी खास फालुदा खाण्यासाठी गेलो होतो. सब्जा, शेवया, घट्ट गुलाबपाणी, मावा, घट्ट दूध आणि वरुन आईस्क्रीम घालून तयार केलेला फालुदा लय भारी. मुंबई सेंट्रल स्टेशनच्या बाहेर अंडा-भुर्जीच्या गाड्यांच्या बाजूला ही गाडी उभी असते. अस्लम की रशीद की सुलेमान असं काहीसं नाव आहे त्याचं. हाफ फालुदा १५ आणि फुल्ल २०. आम्ही आईस्क्रीम खाऊन गेलो होतो म्हणून हाफ घेतला. पण इतक्या लांब गेल्याचं सार्थक झालं.
वांद्रयाच्या स्टेशनबाहेरील फालुदाही चांगला आहे. तो पण मुबारक की तत्समच. इथलाही फालुदा चांगला. पण इथं मावा वरुन घालण्याची पद्धती बहुधा नसावी. त्यामुळे दूधाला किंवा त्या फालुद्याला घट्टपणा येत नाही. हा ड्रॉबॅक सोडला तर चव तशीच. दर मात्र, दहा रुपयांनी जास्त. फुल्ल फालुदा ३० रुपये. तीस रुपयांमध्ये फालुदा आणखी गोष्ट मोफत मिळते. फार खूष होऊ नका हात पुसायला टिश्शू पेपर मिळतो.. हा हा हा...


एलफिन्स्टनचा सामोसा...
प्रत्यक्ष स्टेशनवर जाऊन किंवा तिथं बाहेर कुठं मिळतो तिथं जाऊन मी हा सामोसा खाल्लेला नाही. पण वरवडेकर राजे यांनी दोन-तीन वेळा हा सामोसा सामनामध्ये आणला होता. तेव्हापासून मला त्याची चटकच लागलीय, असं म्हणा ना. सुकी किंवा ओली चटणी नसली तरी चालेल असा हा वेगळाच सामोसा आहे. सामोशाचीच चव इतकी खल्लास आहे की, त्याला इतर गोष्टींची जोड लागतच नाही. फक्त पाच रुपयांत मिळणारा हा गरमागरम सामोसा इतका भारी आहे की, तुम्ही त्याच्या प्रेमात नक्की पडाल.


पूजा चणे भांडार...
सयानी रोडवर भूपेश गुप्ता भवनच्या अलिकडे थोडंसं हे पूजा चणे भांडार लागेल. असंच फिरत असताना मला त्याचा शोध लागला. सामना समोरही एक भैय्या भेल आणि तत्सम पदार्थ विकतो. पण हा भैय्या त्यापेक्षा शेकडो पटीनं भारी आहे. इथं मिळणारी गिली (म्हणजेच ओली) भेळ पुण्यातल्या भेळच्या गाडीवरच्या भेळेची आठवण करुन देणारी. हा भैय्या पण भेळमध्ये बटाटा टाकतोच. असो. पण गूळ आणि चिंचेचं पाणी मी मुंबईतच त्याच्याकडेच पाहिलं. बाकीचे भैय्ये खजूर आणि चिंचेचं पाणी वापरतात. त्यामुळं ही भेळ इतरांपेक्षा वेगळी लागते. जे भेळचं तेच पाणीपुरीचं. पाणी एकदम झकास. चाट मसाला आणि पुदीना यांचं अत्यंत योग्य मिश्रण इथं असतं. त्यामुळं पाणी उग्र किंवा जास्त जळजळीत नसतं.
भेळ आणि पाणीपुरी हेच पदार्थ चाखले आहेत. अजून शेवपुरी, रगडापुरी, रगडापॅटिस आणि जे काही मिळतं ते खायचं आहे. कोरडी भेळही चांगली असावी, असा माझा अंदाज आहे. ती करण्याची पद्धत पाहून उगीच तसं वाटलं.

किर्तीमहलचा चहा...
मुंबई सकाळला असताना परळ टीटीच्या किर्तीमहल इथं चहा प्यायला जाणं व्हायचं. महापालिकेच्या कुठल्याशा ऑफिसच्या खालीच हे रेस्तराँ आहे. इथला चहा एकदम फक्कड. चव थोडीशी इराण्याच्या अंगानं जाणारी. पण हा इराणी नाही. हा बहुतेक उडुपी आहे. पण इथं इतर काही खाण्यापेक्षा चहा पिण्यासाठीच लोक मोठ्या संख्येने आलेले असतात. आम्ही त्यात असायचो. इथला चहा प्याच.

सामनात असताना केलेली खादाडी आत्ता सांगितली. बेलापूरला साम मराठीमध्ये असताना त्या परिसरात केलेली खादाडी लवकरच...

Sunday, October 17, 2010

शब्द हेच शस्त्र

याच मंत्राने मृतांचे, राष्ट्र सारे जागले ।

शस्त्रधारी निष्ठुरांशी, शांतीवादी झुंजले ।

शस्त्रहीना एक लाभे, मंत्र वंदे मातरम्‌


ब्लॉग हे विजयासाठी नवे माध्यम

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लंडनमध्ये असताना एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी गेले होते. त्यावेळी पोलिस येणा-या प्रत्येक नागरिकाची कसून तपासणी करत होते. कोणी आपल्याबरोबर एखादे शस्त्र आणले नाही ना. लपवून बॉम्ब बिम्ब तर आतमध्ये नेत नाही ना, हे तपासून पाहत होते. त्यावेळी स्वातंत्र्यवीरांना पोलिसांनी अडविले. त्यांची तपासणी केली. त्यांच्याकडे काहीच सापडले नाही. सापडले नाही म्हणजे त्यांच्याजवळ काही नव्हतेच. त्यामुळे पोलिसांनी त्यांना आत जाण्यास परवानगी दिली.

आपल्याला परवानगी मिळालेली पाहून सावरकर हसले आणि त्या पोलिसाला विचारले. बाबा, तुला माझ्याजवळ काहीच सापडले नाही ना, मग मी आत जाऊ का. सावरकरांचा असा प्रश्न ऐकून पोलिस बुचकळ्यात पडला. त्यानं सावरकरांना विचारलं की, तुमच्याकडे स्फोटक असं काही आहे का. त्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांच्याकडील पेन दाखवत त्याला म्हणाले, माझ्याकडे ही जी लेखणी आहे, ती सर्वाधिक धोकादायक अस्त्र आहे. इंग्रजांविरुद्ध सर्वात मोठे शस्त्र आहे. तुला जर वाटत असेल तर मी ते काढून ठेवतो. त्यावर तो पोलिस हसला आणि म्हटला, या पेनाचा उपयोग करुन तुम्ही इंग्रजांचे काय वाकडे करणार. ही लेखणी तुमच्यापाशीच ठेवा.

पुढे याच लेखणीच्या जोरावर स्वातंत्र्यावीरांनी १८५७ चे स्वातंत्र्यसमर हे पुस्तक लिहून इंग्रजांना पळता भुई थोडी केली. आपल्याविरुद्ध निर्माण होत असलेला असंतोष पाहून इंग्रजांनी त्या पुस्तकावर बंदी घातली, पुस्तके जप्त केली. पण त्या प्रभावी आणि धारदार शब्दांचा व्हायचा तो उपयोग झालाच आणि हजारो बॉम्बगोळ्यांनी जे काम शक्य नव्हते ते काम शब्दांनी साध्य करुन दाखविले.

लोकमान्य टिळकांनी सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, हे आमचे गुरुच नव्हेत इइ. अग्रलेखांमधून जे जाज्ज्वल्य विचार मांडले ते इतके जहाल आणि प्रेरक होते की, इंग्रजांना काय करावे ते सुचेना. लोकमान्यांचे अग्रलेख इतके स्फूर्तीदायक होते की, लोकमान्यांना असेच मोकळे ठेवले तर आपल्याला राज्यकारभार करणे अवघड होऊन बसेल. ही शब्दांची धार कमी करण्यासाठी इंग्रजांनी लोकमान्यांवर राजद्रोहाचा खटला चालविला आणि त्यांची रवानगी मंडालेच्या तुरुंगात केली. ही होती शब्दांची ताकद.

पुढे आचार्य प्रल्हाद केशव अत्रेंनी मराठामधून आणि हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी कुंचल्याच्या फटका-यांच्या माध्यमातून विरोधकांची दाणादाण उडवून दिली. महाराष्ट्रद्वेष्ट्यांना नामोहरम करुन टाकले. त्यांना कोणत्याच शस्त्रांची गरज वाटली नाही. आपल्याकडे असलेल्या शब्दांच्या आणि कलेच्या सामर्थ्यावर त्यांनी इतकं प्रचंड काम केलं ज्याचा कोणी स्वप्नातही विचार केला नसेल.

आणीबाणीच्या काळातही आपल्याविरोधातील वातावरण अधिक भडकू नये, म्हणून स्व. पंतप्रधान इंदिरा गांधींना वृत्तपत्र स्वातंत्र्यावर गदा आणावी लागली. लोकशाहीच्या काळ्या पर्वातील या घटनेचा निषेध इंडियन एक्सप्रेस सारख्या वृत्तपत्रांनी अग्रलेख न लिहिता ती जागा कोरी सोडून केला. कुलदीप नय्यर यांच्यासारख्या संपादकांनी रुपक कथेच्या माध्यमातून आणीबाणीवर आसूड ओढले. त्यातून पोहोचायचा तो संदेश लोकांपर्यंत पोहोचायचा.

ही शब्दांची ताकद आहे. त्यामुळेच शब्द हेच शस्त्र आहे. हे शस्त्र जपून वापरा. एकदा बंदुकीतून सुटलेली गोळी आणि तोंडातून निघालेला शब्द पुन्हा परत घेता येत नाही, हे म्हणतात. अशा या शब्दांना आता ब्लॉग हे नवे माध्यम मिळाले आहे. व्यक्त होण्याचे, आपली भूमिका मांडण्याचे, आपल्यावर होणा-या अन्यायाला वाचा फोडण्याचे.

ब्लॉग हे माध्यम इतके प्रभावी आहे की, पार एनडीटीव्हीच्या बरखा दत्तपासून ते सकाळ वृत्तपत्र समूहाचे अभिजीत पवार यांनाही या ब्लॉग्जची दखल घ्यावी लागते. इतकेच नाही तर लेट्स भंकस नावाच ब्लॉग तर महाराष्ट्रातील एका अतिवरिष्ठ राजकारण्याने स्वतः हस्तक्षेप करुन बंद करायला लावला होता, अशी चर्चा आहे. अमेरिकेतील काही पत्रकार इराक आणि अफागाणिस्तान युद्ध कव्हर करण्यासाठी गेले होते. तेथे त्यांनी काही ठिकाणी अमेरिकेच्या सैन्याची होत असलेली पिछेहाट हे पत्रकार स्वतःच्या ब्लॉग्जवर देत होते. अशा पद्धतीने आपल्याच देशाची पिछेहाट आणि रणनिती कशी फसते आहे, याचे वार्तांकन ब्लॉ़गवर करणे योग्य की अयोग्य यावर चर्चा होऊ शकते. पण अमेरिकी पत्रकारांते ते ब्लॉग्ज सैन्याला इतके झोंबले की, अमेरिकेने पत्रकारांचे ते ब्लॉग्ज काही काळासाठी ब्लॉक केले. ही ब्लॉग्जची ताकद आहे. कारण ते सर्वसामान्यांना ऍव्हेलेबल आहेत. सोपे आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे फुकट आहे.

आजही विविध वृत्तपत्रे तसेच वृत्तवाहिन्यांमधील कर्मचारी त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाच्या बातम्या कळते-समजते किंवा सहयोगी बातमीदार या ब्लॉग्जकडे व्यक्त करतात. त्यावर अनेक पत्रकार आपली घुसमट प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होतात. त्यातून ज्यांच्यापर्यंत जो संदेश पोहोचला पाहिजे तो पोहोचतोच. अन् मुख्य म्हणजे कोणीही त्याकडे दुर्लक्ष करु शकत नाही.

त्यामुळे ब्लॉग या नव्या माध्यमामुळे शब्दांना नवी धार प्राप्त झाली असून असत्यावर, अन्यायावर आणि अधर्मावर मात करण्यासाठी या माध्यमाचा पुरेपूर उपयोग होउ लागला आहे. भविष्यात हा वापर अधिक वाढणार असून त्याची दखल संबंधितांना अधिक गांभीर्यानं घ्यावी लागेल, यात शंकाच नाही.

(विजयादशमीच्या दिवशी किंवा काही ठिकाणी खंडेनवमीलाही शस्त्रांची पूजा होते. शब्द हेच शस्त्र मानणा-या माझ्यासारख्या हजारो-लाखो जण माझ्याशी सहमत नसतील तरच नवल.)

Tuesday, October 05, 2010

रजनी द ग्रेट...


द रोबो... डॉट...

गझनी, थ्री इडियट आणि दबंग सुपर ड्युपर हिट झाले. अमुक रेकॉर्ड, तमुक रेकॉर्ड झाले. हा विक्रम मोडला, तो विक्रम मोडला असल्या बातम्या कायमच वाचनात येतात. हिंदीमध्ये सध्या शाहरुख, आमीर आणि सलमान या तिघांच्या खानावळींना बॉलिवूडमध्सये ध्या विशेष चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे या मंडळींचे नवे चित्रपट आले की, अशा बातम्या काय झळकतात. त्यापैकी काही चित्रपटांचा आशय चांगला असतो, यात वाद नाही. पण विक्रम, गर्दी, उच्चांक, रेकॉर्डब्रेक हे शब्द या मंडळींसाठी नाहीतच. हे सर्व शब्द फक्त एका आणि एकाच माणसासाठी आहेत, तो म्हणजे द ग्रेट रजनीकांत, रजनी द बॉस... (अमिताभ आणि चिरंजीवी हे अपवाद ठरु शकतात, हा भाग अलहिदा)

रजनीचा १७० की २०० कोटी माहित नाही पण आतापर्यंतचा सर्वाधिक महागडा चित्रपट म्हणून प्रसिद्धी पावलेला बिग बजेट रोबो (इंदिरन) शनिवारी मुंबईत प्लाझाला जाऊन पाहिला. तुफान गर्दी आणि बरेचसे पिटातले प्रेक्षक असल्यामुळे टाळ्या, शिट्ट्या आणि आरडाओरडा ऐकत चित्रपट मनसोक्त एन्जॉय केला. रजनीकांतचा शिवाजी द बॉस हा चित्रपट पुण्यात लक्ष्मीनारायणमध्ये पाहिला होता. त्यावेळी देविदास देशपांडे (उर्फ सेल्वी रंजन, डी. अय्यर, पी. राम, ई. करुणाकरन किंवा तत्सम कोणत्याही तमिळ नावाने ओळखला जाऊ शकेल असा आमचा मराठी मित्र) बरोबर असल्यामुळे आम्ही तमिळमधला शिवाजी द बॉस पाहिला होता. पण यंदा तो नसल्यामुळं इंदिरन न पाहता हिंदीतला रोबोच पाहिला.

वेड लावणारे स्टंटस, हॉलिवूडच्या तोडीचे इफेक्टस, भन्नाट कथा, लक्षणीय वेग आणि २५ मिनिटांचा क्लयमॅक्स असं सगळं एकमेकाच्या हातात हात घालून आलेलं आहे. त्यावर आयसिंग म्हणजे रजनीकांतचा खतरनाक परफॉर्मन्स... तीन तास डोकं बाजूला ठेवायचं आणि फक्त पहायचं...



चिट्टी लय भारी...

डॉ. वशीकरण (रजनीकांत) हा दहा वर्षांपासून स्वतः सारखाच दिसणारा एक रोबो तयार करण्यात व्यस्त असतो. चित्रपट सुरु होताच त्याला वशीकरण आपल्या प्रोजेक्टमध्ये यशस्वी होतो आणि सुरुवातीच्या काही क्षणातच एकाच वेळी दोन रजनीकांत पडद्यावर दिसू लागतात. प्रचंड बुद्धीमत्ता असलेला हा रोबो घर काम करण्यापासून ते कराटेपर्यंत आणि नॅचरल डिलिव्हरी करण्यापासून ते नाच करण्यापर्यंत सर्व काही येत असतं. आपण जसं गावाला जाताना विविध प्रकारचे कपडे बॅगेत भरतो त्याप्रमाणे वेगवेगळ्या विद्या वशीकरणनं या रोबोमध्ये भरलेल्या असतात. चिट्टी... रोबोचं नाव. हा चिट्टी वॉटरप्रूफ आणि फायरप्रूफ असतं. चिट्टीला जगातल्या तीसएक भाषा येत असतात आणि बरंच काही काही त्याला येत असतं. (प्रत्यक्ष पहाच)

अनेक करामती करणा-या या चिट्टीला हिंदुस्थानी संरक्षण दलांमध्ये समाविष्ट करण्यासाठी वशीकरणचे प्रयत्न सुरु असतात. पण चिट्टी हा भावनाशून्य असून तो चांगल्या वाईटाची निवड करु शकत नाही, त्याचा गैरवापरही होऊ शकतं, असा दावा करत डॅनी (वशीकरणचा गुरु) चिट्टीशी कट्टी करतो. त्याला नाकारतो. दुसरीकडे डॅनी हा डॉ. वशीकरणवर मनातून जळत असतो. आपण तसा रोबो बनवू शकत नाही, ही सल कायम त्याच्या मनात असते. ते डोक्यात ठेवूनच तो कायम वशीकरणला टोचून बोलत असतो. डॅनीने झिडकारल्यानंतर वशीकरण चिट्टीमध्ये भावना ओतण्याचं काम करतो. त्याला पुस्तकं वाचायला देतो, त्यामध्ये कसल्या कसल्या सीडी, डिव्हीडी फिड करतो. (सगळंच भन्नाट)



चुकीची लाईन...

वशीकरणच्या या प्रयत्नांना चांगलंच यश येतं आणि चिट्टीमध्ये भावना निर्माण होतात. तो चिडतो, रागावतो, खूष होतो आणि प्रेमही करु लागतो. पण चिट्टीचा नेम चुकतो आणि तो वशीकरणच्या प्रेयसीवरच (ऐश्वर्या राय) लाईन मारायला लागतो. तेव्हापासून वशीकरण आणि चिट्टीचं फाटायला लागतं. ऐश्वर्या चिट्टीला अनेकदा समजावून सांगते पण तो ऐकत नाही. शिवाय वशीकरण आणि ऐश्वर्या यांची प्रायव्हसी चिट्टीमुळे धोक्यात येते. म्हणजे तसं वशीकरणला तरी वाटतं. वशीकरण, चिट्टी व ऐश्वर्या हा भासमान प्रेमाचा त्रिकोण मस्त धम्माल निर्माण करतो. एकदा तर चिट्टी ऐश्वर्याला थेट मागणीच घालतो. तेव्हा या लफडेबाजीला वैतागून वशीकरण चिट्टीला मोडून तोडून कचरा डेपोत नेऊन टाकतो. तिथून तो चेन्नईच्या फुरसुंगीत किंवा देवनारमध्ये जातो.

डॅनीला ही गोष्ट कळते. तो तिथं जाऊन चिट्टीला स्वतःच्या लॅबमध्ये नेतो. त्यामध्ये वाईट-साईट प्रवृत्ती भरतो. सीडी, डिव्हीडी, प्रोग्रॅम, चिप्स (खायचे नाही) अपलोड करतो. त्यामुळं चिट्टी आता विध्वंसक बनतो. काम डॅनीचं आणि बिल फाटतं डॉ. वशीकरणवर. चिट्टी बॉम्बस्फोट घडवितो, आगी लावतो, पेट्रोल-डिझेलचे टॅंकर पेटवून टाकतो आणि बरंच काही काही करतो. शेवटी तो स्वतः सारखे शेकडो नव्हे हजारो चिट्टी तयार करतो आणि मग चित्रपटातील स्पेशल इफेक्टसचं अस्तित्त्व जाणवायला लागतं. एकाचवेळी इतके रजनीकांत पाहून खरं तर चक्करच येते. या सा-या चिट्टींविरोधात वशीकरण एकटा लढतो. त्यांचा नायनाट करतो.

२५ मिनिटांचा क्लायमॅक्स

चित्रपटाचा हा क्लायमॅक्सचा संघर्ष तब्बल २५ मिनिटे रंगला आहे. सर्व चिट्टी एकत्र येऊन केलेली फॉर्मेशन्स आणि लष्कर, पोलिस, इतर सुरक्षा दलांचा उडविलेला फज्जा डोळे फिरविणारा. अखेर त्यांच्यापैकी एक चिट्टी मरतो आणि त्याचा रचनेचा काही मिनिटांमध्ये अभ्यास करुन वशीकरण सर्वांनाच वश करतो आणि मग ख-या चिट्टीतील दोष-वाईटपणा नष्ट करतो. पण हे सारं कसं घडतं, काय काय घडतं ते तुम्ही प्रत्यक्ष पडद्यावरच पहा.

चित्रपटामध्ये रजनीकांतची एकही फेमस स्टाईल नाही. उलट गॉगल घालण्याची नेहमीची स्टाईल त्याला जमत नाही आणि तो सर्वांप्रमाणेच साधेपणाने गॉगल घालतो, असं दृष्य दाखविण्यात आलं आहे. शिवाय डान्समध्येही रजनीचं फार कौशल्य नाही. तरीही चित्रपट भाव खाऊन जातो. हॉलिवूडच्या तोडीचा वाटतो. कारण चित्रपटामध्ये वापरण्यात आलेले स्पशेल इफेक्टस आणि तंत्रज्ञान. शिवाय प्रेक्षकांच्या मनावर जबरदस्त कब्जा मिळविणारी कथा, पटकथा आणि संवाद यामुळे तुम्ही रजनीकांतचे डाय हार्ट फॅन नसाल तरी तुम्हाला चित्रपट जरुर जरुर आवडणारंच. चिट्टी या रोबोचा थरार पाहून दोन अडीच तासात तुम्ही त्याचे फॅन बनला नाहीत तर नवल. म्हणून तर चित्रपटाच्या शेवटी जेव्हा चिट्टीला डिसमेंटल करतात (तोडतात) तेव्हा मनाला खूप वाईट वाटतं. म्हणजे मला तरी वाटलं.

मैं सोचने लगा था...

डिसमेंटल केला त्यानंतर एका संग्रहालयात ठेवण्यात येतं. २०३० मध्ये एका शाळेची स्टडी टूर तिथं येते. त्यावेळी एक विद्यार्थिनी मोडलेल्या तोडलेल्या चिट्टीकडे पाहून विचारते, हा इतका अपडेटेड आणि हुशार होता मग त्याला तोडण्यात का आलं. त्यावर चिट्टीनं दिलेलं उत्तर थेट मनाला भिडतं. चिट्टी म्हणतो मी विचार करायला लागलो होतो. अलिकडच्या हिंदी चित्रपटांत मी तरी इतका भारी आणि भिडणारा संवाद ऐकला नव्हता. मी काही खूप चित्रपट पाहत नाही. पण तरीही माझ्या मनाला हे एक वाक्य इतकं भिडलं की कोणती मुलगीही भिडली नसेल.



देव आहे...

एका कॉन्फरन्समध्ये चिट्टीला विचारतात. देव आहे का. त्यावर चिट्टी विचारतो, देव म्हणजे काय. प्रश्नकर्ता उत्तर देतो, निर्माण करणारा, तयार करणारा म्हणजे देव. मग चिट्टी वशीकरणकडे पाहून म्हणतो, तसं असेल तर देव आहे. वशीकरण यांनी मला निर्माण केलंय आणि ते माझे देव आहेत. रजनीकांतवर कॅमेरा आणि हा माझा देव असा डायलॉग हे कॉम्बिनेशन पुढचे दोन-पाच मिनिटं काहीच ऐकून देत नाही. नुसत्या टाळ्या, शिट्ट्या आणि कल्ला...

एकाच वेळी विनोदी, अतिरंजीत, हृदयस्पर्शी, भविष्यातील तंत्रज्ञानाचा विचार करुन तयार केलेला हा चित्रपट मी तरी अजून एकदा पाहणार आहे. तमिळमध्ये. तुम्ही एकदा तरी पहा. किमान हिंदीत तरी.

Friday, October 01, 2010

तुम्हीच ठरवा, खरं काय...

हा सकाळ की तो सकाळ...



सहयोगी बातमीदार ब्लॉगवर सध्या मस्त शाब्दिक युद्ध रंगलंय. पवार कुटुंबीयांनी सकाळ वृत्तपत्र टेक ओव्हर करण्याच्या घटनेला नुकतीच २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने सकाळमध्ये हृद्य सोहळा रंगला होता. सकाळने त्यादिवशी २५ लाख अंक छापून वितरीत करण्याचे आव्हानही लिलया पेलले होते. या पार्श्वभूमीवर सहयोगी बातमीदार या ब्लॉगवर अरुंधती पुणेकर यांनी लेख लिहून पवार कुटुंबीयांच्या कौशल्याचे तोंड भरुन कौतुक केले आहे.

ही तो पवारांची किमया...



त्यानंतर सकाळमधील एका माजी ज्येष्ठ पत्रकाराने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर लेख लिहिला आहे. यामध्ये अनेक मुद्यांना हात घातला असून काही ठिकाणी वाभाडेही काढण्यात आले आहेत. या लेखावरुन सकाळमध्ये पुरती खळबळ उडाल्याची सूत्रांची माहिती आहे. कोण असेल या ब्लॉगचा लेखक यावरुन सकाळमध्ये चर्चा व अंदाजांना उधाण आले आहे. एकीकडे मटाचे वादळ घोंघावत असताना ढासळत चाललेली तटबंदी वाचविण्यासाठी वरिष्ठांची धावपळ सुरु असल्याचे समजते. मटामध्ये मुलाखती देऊन आलेल्या कर्मचा-यांना तातडीने राजीनामा देण्यासाठी दबाव आणला जात आहे. तसेच सकाळनेच तुम्हाला मोठे केले, आता सोडून कसे जाऊ शकता, असे इमोशनल डायलॉग्ज मारले जात आहेत. त्यातच हा लेख प्रकाशित झाल्यामुळे बुधवार पेठेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळची पवार पंचविशी...



दोन्ही लेखांची जोरदार चर्चा पत्रसृष्टीत आहे. विशेषतः सकाळच्या आजी-माजी कर्मचा-यांमध्ये जास्तच. या दोन्ही ब्लॉग्जच्या लिंक्स खास माझ्या ब्लॉगच्या वाचकांसाठी.

धन्यवाद...

Thursday, September 30, 2010

जय श्रीराम....

न्यायालयाच्या आदेशाने

प्रभू श्रीरामचंद्रांचा वनवास संपला...




भव्य श्रीराम मंदिर बनणार...

Monday, September 27, 2010

प्रत्यक्षातलं ऑर्कुट-फेसबुक...



पुण्यातील लक्ष्मी-रस्त्यावर

गेल्या काही वर्षांपासून ऑर्कुट आणि फेसबुकसह विविध सोशल नेटवर्किंगचं प्रस्थ मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. शाळा, कॉलेज, क्लासेस किंवा इतर ठिकाणचे जुने मित्र-मैत्रिणी भेटतात. एखाद्या सुटीच्या दिवशी मस्त जमण्याचं प्लॅनिंग होतं आणि मग जुन्या आठवणींनी गप्पांचा फड हमखास रंगतो. चॅटिंग, व्हर्च्युअल फार्मिंग, डाटा शेअरिंग आणि इतर अनेक गोष्टींसाठी या सोशल नेटवर्किंगचा उपयोग होतो. पण या साईटस आणि इथलं सगळं विश्व व्हर्च्युअल आहे. प्रत्यक्षात असं काही नाही.

पुण्यामध्ये मात्र, खरंखुरं प्रत्यक्षातलं ऑर्कुट-फेसबुक अस्तित्वात आहे. इथं तुम्हाला नवे मित्र मिळतात, जुन्या मित्र-मैत्रिणींची पुनर्भेट होते. वेगवेगळ्या मुद्द्यांवर पुणेकरांचं काय मत आहे, वेगवेगळ्या विषयांना ते कसे रिएक्ट करतात, ते इथं समजतं. पण इथं दररोज लॉगईन होता येत. वर्षभरातून फक्त एकदाच लॉगईन होता येतं. अनंत चतुर्दशीला. गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीला. हेच पुण्यातलं प्रत्यक्षातलं ऑर्कुट-फेसबुक.

अनेक जण अनेक वर्षांपासून यामध्ये लॉगईन होताहोत. अनेक मंडळाचे कार्यकर्ते, पुणेकर, गणेशभक्त, पत्रकार, रंगावलीकार, कलाकार, आर्टिस्ट, गावोगावचे ढोलताशावाले, नव्याने उदयास आलेली पुणेरी ढोलताशा पथके आणि राज्यभरातले इतर नागरिक या ऑर्कुट-फेसबुकचे सदस्य आहेत. दरवर्षी तितक्याच उत्साहाने यामध्ये लॉगईन होताहेत. पोलिस आणि प्रशासनाला मात्र, इच्छा नसतानाही याचं सभासद व्हावं लागतं. पुण्याप्रमाणेच, आसपासच्या जिल्ह्यातलेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील, देशाच्या विविध भागातील मंडळी इथं लॉगईन होत आहेत. आता तर परदेशी पाहुण्यांनाही या ऑर्कुट-फेसबुकची भुरळ पडली आहे. गेल्या जवळपास पंधरा ते वीस वर्षांपासून मी या ऑर्कुट-फेसबुकमध्ये लॉगईन होतोय. यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत तब्बल २३ तास रस्त्यांवर फिरल्यानंतर मला विसर्जन मिरवणूक ही देखील एकप्रकारचं ऑर्कुट-फेसबुक असल्याचं जाणवलं.



अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी कसबा गणपती लक्ष्मी रस्त्यावर आल्यानंतर रात्री दगडूशेठ गणपती विसर्जित होईपर्यंत तुम्ही याठिकाणी लॉगईन होऊ शकता. गणरायाला निरोप देण्यासाठी लक्ष्मी रस्त्यावर रांगोळ्यांच्या पायघड्या घातल्या जातात. दरवर्षी वेगवेगळे संदेश देणा-या रांगोळ्या आणि अधिकाधिक रंगावलीकारांची यामध्ये भरच पडत जातेय. रंगावलीप्रमाणेच मानाच्या पाच गणपतींसमोर असणारे देखावे, प्रबोधनकार संदेशांचे फलक, नव्या तालांसह, नव्या वादकांसह आणि नव्या नावांसह मिरवणुकीत सामील होणारी ढोल-ताशा पथके, प्रत्येकाची पेहरावाची आणि वादनाचीही विशिष्ट पद्धत या गोष्टी फक्त इथंच लॉगईन केल्यानंतर पहावयास मिळतात. मग कोणी हौसेनं नथ-नऊवारी नेसून घोड्यावर बसलेली असते, तर एखादा रांगडा गडी खास मराठमोळ्या वेशात जीव तोडून ढोल वाजवत असतो. कोणीतरी भगव्याची शान राखत तो नाचवत असतो, कुणी तलवारबाजीतील मर्दानीपणा दाखवत असतो, कुठे वेत्रचर्माचे आणि लाठ्याकाठ्यांची लढाई सुरु असते, तर काही हौशी बच्चे कंपनी महापुरुषांच्या वेशभूषा करुन इथं वावरत असतात. प्रत्येकासाठी हा एक सणच असतो. नटण्याचा, नाचण्याचा आणि डोळ्यात साठवून ठेवण्याचा.




विसर्जन मिरवणुकीत जर टिळक चौक ते बेलबाग चौक असा फेरफटका मारला तर आपले जुने मित्र आपल्याला नक्कीच भेटतात. कुणी कधीतरी आपल्या शेजारी राहणारा असतो, कोणी शाळेतला किंवा कॉलेजमधला असतो, एखादा आपल्या कामाच्या क्षेत्रातला असतो. कधी कधी तर वर्षभर आपण ज्याला भेटत नाही, असा एखादा नातेवाईकही आपल्याला इथं भेटू शकतो. नुसते जुने मित्र भेटत नाहीत तर हा त्याचा मित्र, ती त्याची मैत्रिण, हा त्यांच्याबरोबर असतो, असं करत करत नव्यानव्या मित्र-मैत्रिणींची यादीच आपल्या फ्रेंड लिस्टमध्ये ऍड होत जाते. त्यापैकी कोणाची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारायची आणि कोणाची धुडकावून लावायची, हे तुमच्या आणि त्याच्या हातात आहेच की. मला तर माझे अनेक जुने मित्र-मैत्रिणी, ओळखीचे-पाळखीचे या साईटवर भेटतात. अगदी परवाच्या मिरवणुकीतही जवळपास दहा ते पंधरा जुने मित्र-ओळखीचे याठिकाणी भेटले. तुम्हीही इथं नियमितपणे लॉगईन होत असाल तर तुमचाही हाच अनुभव असेल.



या ऑर्कुट-फेसबुकचे दोनच रंग. एक भगवा (सर्वधर्मसमभाववाले याला केशरी म्हणू शकतात) आणि दुसरा गुलाबी. पर्यावरणप्रेमींच्या ध्वनीप्रदूषणामुळे यातला गुलाबी रंग कमी होऊ लागला असला तरी भगव्याचे तेज दिवसेंदिवस वाढत जात आहे. नेटवरच्या ऑर्कुट-फेसबुकवर जशी टीका होते, तो फालतूपणा आहे, टाईमपास आहे, कुचाळक्या करणा-यांचा अड्डा आहे, असे ताशेरे ओढले जातात. तसेच ताशेरे या साईटवरही ओढले जातात. सगळ्याची वाट लावलीय, धंदा झालाय, परंपरेच्या नावाखाली धुडगूस घालतात, ध्वनीप्रदूषण तसेच वायूप्रदूषण आणि गर्दीमुळे जीव नकोसा होतो, अशी कितीही टीका झाली तरी दिवसेंदिवस या साईटची लोकप्रियता वाढतच जाते आहे. शिवाय जे मनापासून इथं एन्जॉय करतात, त्यांच्यावर असल्या टीकेचा फारसा परिणाम होत नाही. तिथं जसे काही आंबटशौकिन मज्जा करायला येतात, तसे इथंही काही असतात. काही मंडळी व्हायरससारखी असतात. पण काय पहायचं आणि व्हायरसला कसं रोखायचं हे आपल्याला माहिती असतं, ते इथल्या बाबतीतही अगदी तंतोतंत लागू पडतं.

काही जण मात्र, हे काय आहे, इथं काय काय चालतं हे प्रत्यक्ष न पाहता उगाचच घरात सोफ्यावर बसून मिरवणूक पाहतात आणि शिव्यांची लाखोली वाहतात. गर्दी दिवसेंदिवस वाढत जातेय, पुणेकरांपेक्षा बाहेरची मंडळी जास्त येतायेत. असं असलं तरी सकाळी किंवा रात्र यापैकी एकदा तरी पुणेकर इथं लॉगईन होतातच. मग त्याला वयाचं बंधन नसतं. अगदी चार वर्षांच्या चिमुरडीपासून सत्तर वर्षांच्या आजोबांपर्यंत सर्वजण इथं रंगतात. मला तर इथं लॉगईन झाल्याशिवाय चैनच पडत नाही. तुम्हीही इथं लॉगईन होऊन पहा, आवडलं तर पुन्हा पुन्हा लॉगईन व्हा्. अन्यथा पुन्हा लॉगईन होऊ नका... पहा हे प्रत्यक्षातलं ऑर्कुट-फेसबुक आवडतंय का ते...

Saturday, September 18, 2010

लालबाग-परळ...



पुण्यातील गणेशोत्सवाचा टिप्पिकल फिल...

वास्तविक पाहता गणपतीच्या काळात दहा दिवस राहणं, हे माझ्यासारख्याला खूप अवघड आहे. अगदी लहानपणीच्या उत्साहापासून ते अगदी अलिकडे रिपोर्टिंगच्या निमित्ताने प्रत्येक वर्षी पुण्यातील जवळपास सर्व प्रमुख मंडळ पायी हिंडून पाहणं, हा माझ्यासह आमच्या काही मंडळींचा आवडता छंद. मग रोज एखाद्या भागामधील गणपती पहायचे. रोज नव्या मित्रांबरोबर गणपती बघायला जायचं (मैत्रिणींबरोबर गणपती पहायला जाण्याचं भाग्य माझ्या नशीबात नव्हतं) हे अगदी ठरलेलं. कधी कॉलेजमधील मित्र, कधी घराजवळ राहणारे, कधी जुने शाळेतले मित्र, कधी घरच्यांबरोबर अथवा बाहेरगावाहून आलेल्या नातेवाईकांबरोबर. पण नित्यनियमानं आणि नव्या उत्साहानं रात्री लवकर बाहेर पडणं हे ठरलेलं.

ई टीव्ही साठी हैदराबादला बदली झाल्यानंतर मग त्यामध्ये खंड पडत गेला. तरीही एक वर्षाआड सुटी घेऊन पुण्याचा गणपती एन्जॉय केलाय. अगदी दहा दिवस नाही मिळाले तर किमान विसर्जन मिरवणुकीला तरी रात्र जागवायची हे ठरलेलं. गणेशोत्सवात पदोपदी जाणवणारी उर्जा, उत्साह आणि उदंड भक्ती यांच्या जोरावर पुढचं वर्ष आपोआप निघून जातं. साम मराठी आणि आता सामनासाठी मुंबईत आल्यानंतर गणेशोत्सवाचा हा जल्लोष मी खूप मिस करत होतो. रोजच्या दबडघ्यातून श्वास घ्यायला उसंत मिळत नाही, तिथं इतका प्रवास करुन मुंबईचा गणेशोत्सव एन्जॉय करायला जायचं कसं आणि कधी हा प्रश्न अनुत्तरीत होता. सामनामुळं आज ही संधी मिळाली. धन्यवाद सामना आणि माझा सहकारी मंगेश वरवडेकर. तसं पहायला गेलं तर लाईनीत वीस-वीस पंचवीस-पंचवीस तास उभा राहून एखाद्या देवाचं दर्शन घेण्याइतका मी देवभक्त नाही. त्याचप्रमाणे वीस-पंचवीस तास रांगेमध्ये उभं राहणा-या लोकांच्या भक्तीचा अपमान करुन मध्येच घुसत नेहमी नेहमी दर्शन घेणंही मला पटत नाही. त्यामुळं लोकप्रिय आणि गर्दी खेचणा-या देवांना जाणं टाळतो. पुण्यात सुद्धा मी विसर्जनाच्या दिवशी पहाटे जाऊन मानाचे पाच गणपती, भाऊ रंगारी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई, मंडई आणि जिलब्या मारुती या मंडळांच्या गणपतीचं दर्शन घेतो. रांगेमध्ये न थांबता. (कारण तेव्हा रांग नसतेच)




ह्याच कारणामुळे मी इतकी वर्षे लालबागचा राजा आणि प्रभादेवीचा सिद्धीविनायकाच्या दर्शनाला गेलेलो नाही. यंदा मात्र, राजाचा योग जुळून आला. अमर पटवर्धन नावाच्या पनवेलमधल्या एका मित्राच्या आग्रहाखातर आणि मंगेश वरवडेकर या कामगार नगरच्या राजाच्या कृपेमुळे मी लालबागच्या राजाच्या चरणी माथा टेकू शकलो. लोक नवस बोलतात, ते फेडण्यासाठी वीस वीस तास रांगेत थांबतात, हे सारंच माझ्या बुद्धीच्या पलिकडचं होतं. इतके दिवस वाटायचं मूर्ख आहेत साले फुकटचा वेळ वाया घालवतात. पण लालबागच्या राजाच्या चरणी माथा टेकल्यानंतर ही मंडळी इतका वेळ रांगेमध्ये का थांबतात आणि कशामुळे थांबू शकतात हे कोडं उलगडलं. कोणत्याही गणपतीच्या पुढ्यात उभं राहिलं की जी प्रसन्नता मिळते ती इथंही मिळते. राजा जणू काही आपल्यालाकडेच पाहतो आहे आणि आशीर्वाद देतो आहे, असं वाटतं. एखाद-दोन मिनिटांचा खेळ असतो. (रांगेतून गेलात तर काही सेकंदांचाच) पण हा एखाद दोन मिनिटांचा कालावधी वर्षभराचा क्षीण क्षणार्धात घालवून टाकतो. ऐसे तुम मोह को अती भावे... असं का म्हणतात ते तेव्हाच आपल्याला कळतं. अगदी सहजपणे राजाचं दर्शन झालं आणि कृतकृत्य झालो. दरवर्षी जाणं होईल की नाही माहिती नाही. दरवर्षी असं ओळखीतून दर्शन घेणं आवडेल असंही नाही. पण एका वर्षाची प्रत्यक्ष भेट आणखी काही वर्षांसाठी तरी पुरेशी असावी, हे मात्र नक्की.

लालबागच्या राजानंतर आम्ही दर्शन घेतलं गणेश गल्ली मित्र मंडळाचं. गणेश गल्ली म्हणजे उंच मूर्ती तयार करणारं मुंबईतील सर्वात पहिलं मंडळ. आजही या मंडळाची मूर्ती २५ की २७ फुटी असते. दरवर्षी कशावर तरी विराजमान झालेली गणरायांची मूर्ती हे मंडळ साकारतं. यंदाचं मंडळाचं ८३ वं वर्ष असून त्यांनी मूषकराज गणेश साकारला आहे. खरं तर पूर्वी गणेश गल्लीचा गणपती हाच सर्वांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू होता. त्यालाच जास्त गर्दी व्हायची. पण नंतर हळूहळू राजाचं प्रस्थ वाढत गेलं आणि सगळी गर्दी राजानं खेचली. गणेश गल्लीच्या गणपतीचं नाव खरं तर लालबाग सार्वजनिक मित्र मंडळ आणि लालबागच्या राजाचं पूर्वीचं नाव सार्वजनिक गणेशोत्सव, लालबाग. पण कालांतरानं मंडळानं नावाचं रजिस्ट्रेशनचं लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असं करुन घेतलं आहे. (आता पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मंडळाचं खरं नाव सुवर्णयुग तरुण मंडळ. पण हे फारसं कोणाला माहिती नाही. त्यातलाच हा प्रकार) त्यामुळं आवर्जून गणेश गल्लीच्या गणपतीचंही दर्शन घेतलं. सॉल्लिड मूर्ती एकदम. वादच नाही.



परळ आणि लालबाग हा मुंबईच्या गणेशोत्सवाचा केंद्रबिंदू. पूर्वी लोकप्रियतेच्या शिखरावर असलेला गणेश गल्लीचा गणपती आणि आता लालबागचा राजा हे दोन्ही एकाच परिसरात असल्यामुळे इथल्या उत्सवाचं वातावरण पुण्यातील दगडूशेठ गणपती आणि सभोवतालच्या परिसराची आठवण करुन देणारं. आपण पुण्याचे गणपतीच पाहतो आहोत की काय, असं वाटावं इतकं वातावरण सारखं. पहावं तिकडं गणपती, बाहेर लांबच्या लांब रांगा, प्रचंड गर्दी आणि गणपतीपेक्षा खाण्याच्या गाड्यांवर तुफान गर्दी... टिप्पिकल पुण्यासारखंच. लालबागच्या राजाच्या निमित्तानं हे सारं अनुभवता आलं ही राजाच्या दर्शनाबरोबर मिळालेली फ्री गिफ्ट. खरं तर राजाचं दर्शन मिळालं ही गिफ्टच मोठी आहे. त्यामुळं त्यावर काही फ्री मिळतंय की नाही, याचा विचार करण्याची इतरांना गरज वाटणार नाही. पण मला मात्र, राजाच्या दर्शनाबरोबरच परिसरात अनुभवलेला गणेशोत्सवाचा तो टिप्पिकल फिलही तितकाच नसला तरी खूप महत्त्वाचा आहे.

Friday, September 10, 2010

गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया..

दर्शनमात्रे मन कामनापूर्ती...



१४ विद्या आणि ६४ कलांचा स्वामी, तमाम महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि तुमच्या आमच्या सर्वांच्या लाडक्या गणरायाचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपला मुलगा परदेशातून किंवा परगावातून परत घरी येणार असेल किंवा एखादी माहेरवाशीण आपल्या घरी येणार असेल तर तिची वाट आपण जितक्या आतुरतेने पाहत असतो तितक्याच आतुरतेने आपण गणरायाची वाट पाहत असतो. दहा दिवस किंवा तो घरी असेपर्यंत आपल्याकडे कोणतरी घरचं खूप दिवसांनी आल्यासारखं वाटतं. त्यामुळंच गणरायाचं विसर्जन झाल्यानंतर चुकल्या चुकल्यासारखं वाटतं. तर आता पुढचे दहा दिवस बाप्पाचे आहेत. फक्त बाप्पाचे. तेव्हा मोठ्या दणक्यात, उत्साहात, जल्लोषात आणि सारी दुःख विसरुन बाप्पाचा उत्सव साजरा करुया...

गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया...

Thursday, August 26, 2010

जरा सांभाळून बोला...



अमितची बदनामी करणा-यांचा तीव्र निषेध...

गेल्या दोन आठवड्यात दोन बातम्या ऐकून मन खूप व्यथित झालं. (व्यथित हा शब्द खूप जड वाटत असेल तर खूप वाईट वाटलं, असे वाचावे) एक म्हणजे विश्ननाथन आनंद हा हिंदुस्थानी नाही, असा जावईशोध केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने लावला. आणि दुसरे म्हणजे झी २४ तासचा प्रतिनिधी आणि आमचा जिवलग मित्र (GD) अमित जोशी याने मुलींची छेड काढली म्हणून त्याला लोकांनी मारला - इति आरं आरं आबा.

द ग्रेट आणि ट्रू जिनिअस असणारा विश्वनाथन आनंद हिंदुस्थानी नाही. मग हिंदुस्थानी कोण... अहो ज्या माणसामुळं आज हिंदुस्थान बुद्धिबळामध्ये सुपर पॉवर बनू पाहतोय, ज्याच्यामुळे पुण्यापासून ते चेन्नईपर्यंत शेकडो नव्हे हजारो जण बुद्धिबळामध्ये करियर करण्याचा विचार करु लागले, ज्याने असंख्य वेळा हिंदुस्थानचा तिरंगा जगभरात फडकावला, तो आनंद हिंदुस्थानी नाही. अहो मग हिंदुस्थानी कोण. एसी ऑफिसमध्ये बसून निर्णय घेणारे आयएएस अधिकारी, मनुष्य बळाच्या नावाखाली मनुष्य छळ करणारे एचआर वाले की आनंदच्या नागरिकत्वाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतरही त्याबद्दल अनभिज्ञ असणारे केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल. असो त्यावर बरंच चर्वित चर्वण झालंय आणि त्यावर उमटलेली रिऍक्शन इतकी स्ट्राँग होती की, तत्काळ केंद्रीय मंत्र्यांना स्वतः फोन करुन माफी मागावी लागली. त्यामुळे त्यावर अधिक बोलण्यात-लिहिण्यात काय उपयोग नाही.

दुसरा मुद्द अमित जोशीचा. गृहमंत्र्यांनी अमितबद्दल जे बिनबुडाचं वक्तव्य केलंय त्याचा करावा तितका निषेध थोडा आहे. (मी असं म्हटलोच नाही, अशी टिप्पिकल पॉलिटिकल भूमिका घेत दुस-याच दिवशी आरं आरं आबांनी कोलांटउडी मारली) म्हणजे अमित जोशीनं पोरीची छेडछाड काढली. अहो एकवेळ एखादी पोरगी अमित जोशीची छेडछाड काढेल. पण अमित जोशी त्याच्या स्वप्नातही तसं करु शकणार नाही. त्याची इतकी ठाम खात्री मी देऊ शकतो कारण हैदराबादमध्ये ई टीव्हीत असताना मी आणि अमित जवळपास एक ते दीड वर्षे रुममेट (घरभाऊ) होतो. त्याच्याइतका सज्जन आणि सालस मुलगा आख्ख्या ई टीव्हीत नव्हता. किमान आम्ही तरी पाहिली नव्हता.

पत्रकारितेची परीक्षा उत्तीर्ण होऊन ताज्या दमाचा अमित ई टीव्हीत दाखल झाला होता. त्याची ती पहिलीच नोकरी. मी १२ जुलैला (२००३) ई टीव्हीमध्ये जॉईन झालो आणि तो १४ जूनला. त्यामुळे मी, अमित, सचिन फुलपगारे, सचिन देशपांडे आम्ही चौघांनी दिलसुखनगरला एकाच घरात रहायचो. (नंतर राजेंद्र हुंजे आणि श्रीरंग खरे यांनी दोघांना रिप्लेस केलं.) गडकिल्ले, ट्रेकिंग, पुस्तक आणि पेपर वाचन, कॉपी सुधारणं, बातमी अधिकाधिक चांगली कशा पद्धतीनं देता येईल आणि जास्तीत जास्त माहिती कशी मिळेल, यामध्येच त्याचा सारा वेळ जायचा. ऑफिसमध्ये आणि घरी एकत्रच असल्यामुळे मला त्याची खडा न् खडा माहिती होती. आम्ही गंमती गंमतीमध्ये जरी कधी एखाद्या मुलीचा विषय काढला किंवा एखाद्या मुलीवरुन त्याला चिडवलं तरी त्याला त्यामध्ये फारसं स्वारस्य नसायचं.



ई टीव्हीमध्ये त्यावेळी असलेल्या एका मुलीवरुन आम्ही त्याला कायम चिडवायचो. (ई टीव्हीमध्ये असलेल्यांना ते नाव माहिती आहे. सो ते इथे उघड करत नाही.) ते दोघं खूप चांगले मित्र होते. आम्ही त्याला नेहमी म्हणायचो की, बघ ती तुझ्यावर फिदा आहे, बघ, प्रपोज मारुन टाक इ.इ. पण अमित त्यामुळं कधीच हुरळून गेला नाही किंवा आमच्या बोलण्याला बळीही पडला नाही. आमची पवित्र मैत्री आहे... या पलिकडे त्यानं कधी उडी मारली नाही. सांगण्याचा उद्देश्य असा की, पोरींची छेडछाड, लफडी, अफेअर्स हा त्याचा प्रांतच नाही. गड किल्ल्यांवर हिंडायचं, कोणते तरी भोकातले कोणालाही माहिती नसलेले किल्ले सर करायचे आणि त्याबद्दल मित्रांना सांगायचे, हा त्याचा आवडता छंद. वेगवेगळ्या पदार्थांवर दाबून ताव मारायचा, मनसोक्त हादडायचं ही त्याची आवड. बसमधून किंवा काही वेळा आठ-आठ किलोमीटर चालत हैदराबाद पालथं घालायचं, ही त्याची सवय. (हा पठ्ठ्या मुंबईहून हैदराबाद सायकलवरुन येणार होता. पण त्याला आम्ही वेळीच रोखलं होतं.)

पत्रकारितेतही त्याला उथळपणा पसंत नव्हता. एखाद्या विशिष्ट बीटवर अधिक खोलवर जाऊन बातम्या कशा करता येतील, असा त्याचा प्रयत्न असायचा, असतो. तसं तो बोलूनही दाखवतो. संरक्षण, विज्ञान-तंत्रज्ञान, रेल्वे आणि ऑफकोर्स गडकिल्ले हे त्याचे आवडीचे विषय होते. अन् या विषयातील बातम्या कव्हर करण्यासाठी, अधिक जाणून घेण्यासाठी तो सदैव तयार असतो, उत्सुक असतो. लफडी करुन पोरी पटवायच्या आणि मजा मारायची, असल्या गोष्टींसाठी त्याच्याकडे कधीच वेळ नव्हता. वेळ असला तरी त्याला इच्छा नव्हती. कधी कधी त्याच्या या आरबट चरबटपणाची आम्ही खिल्ली उडवायचो, त्याची खेचायचो, त्याची चारचौघांत टिंगलटवाळी करायचो, पण अमितच्या साधेपणाबद्दल आमच्या मनात कोणतीही शंका नव्हती आणि नाहीही. अंडी देखील धुवून घेणारा, चार जणांसाठी पातेलंभर चहा करणारा, साजूक तुपामध्ये आमटी करणा-या आमच्या या मित्राची आम्ही भरपूर चेष्टा केली. त्याच्या पुढे केली. त्याच्या पाठीवर कधी नाही केली. त्याच्या या अतरंगीपणाबद्दल आम्ही अक्षरशः लोळायचो. हसून हसून पोट दुखायचं.

पण आबांसारख्या जबाबदार माणसानं कोणतीही खातरजमा न करता अशोभनीय विधान करुन आम्हा सर्वांनाच धक्का दिला. असल्या फालतू गोष्टींचा विचार आमच्या मनातही कधी आला नाही, तो आबांनी जगजाहीरपणे बोलून दाखविला. दु्र्दैव दुसरे ते काय. त्यामुळे आबा तुम्ही स्वतःची प्रतिमा जपण्यासाठी प्रयत्नशील असताना. मग मिळालेल्या माहितीची खातरजमा न करता केलेल्या वक्तव्यामुळे दुस-याची प्रतिमा काळवंडणार नाही, याची खबरदारी बाळगा. (त्या परिसरातल्या एका पोलिस अधिका-यांच्या वसुली एजंटांनीच अमितवर हल्ला केला. त्यामुळे पोलिसही त्यांना अडविण्यासाठी पुढे सरसावले नाहीत, अशी चर्चा कानावर आली. तथ्य ते काय माहिती नाही. पण त्या अधिका-यानेच तर ही माहिती आबांना पुरविली नसेल ना, अशी शंका राहून राहून येते.)कालच केईममध्ये जाऊन त्याला भेटून आलो. अमितनंही आबांच्या वक्तव्याचा मुद्दा फारसा गांभीर्यानं घेतला नव्हता. पण मला रहावलं नाही. अगदी आपल्या जिवलग मित्राबद्दल कोणीतरी काहीतरी फालतू बडबड करतंय, असं समजल्यानंतर मन अस्वस्थ झालं, म्हणून हा लेखप्रपंच.

(एक महिन्याच्या विश्रांतीनंतर अमित पुन्हा ताज्या दमानं फिल्डवर रुजू होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.)

Sunday, August 15, 2010

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...



तांत्रिक अडचणींपासून मिळाले स्वातंत्र्य...

तांत्रिक अडचणी किती त्रासदायक असून शकतात आणि त्यामुळं किती पारतंत्र्य येऊ शकतं, हे मी गेले काही महिने अनुभवत होतो. गेल्या कित्येक दिवसांपासून काही तांत्रिक कारणांमुळे मला ब्लॉग लिहिणं शक्य झालं नव्हतं. पण आता ती तांत्रिक अडचण दूर झाली आहे आणि तांत्रिक अडचणींपासून मला स्वातंत्र्य मिळालं आहे. तेव्हा मी पुन्हा नव्या जोमानं ब्लॉग लिहीन असं म्हणतोय. मध्यंतरी अनेक ठिकाणी जाऊन आलो, अनेक वेगवेगळे पदार्थ खाल्ले, अनेक चित्र-विचित्र अनुभव आले, त्यावर लिहायची खूप इच्छा होती. पण मला ते शक्य झालं नाही. उल्लेखच करायचा झाला तर आमची कोकणची ट्रीप, आमचं कोकणातलं देवरुख जवळचं घर, ऐन पावसात भिजून घरी गेल्यानंतर ओरपलेलं गरमागरम कुळथाचं पिठलं-भात आणि मुंबईहून पुण्याला येताना कर्जतच्या घाटातली निसर्गाची नवलाई हे दोन प्रसंग लिहिण्याची अतीव इच्छा होती. पण ती उत्स्फूर्तता आता नाही. माझ्या लेखनाचा मेगाब्लॉक सुरु असताना अनेकांनी मी ब्लॉग बंद केला आहे का, असा थेट सवालही केला. पण माझा नाईलाज होता. इच्छा असूनही मी काहीच करु शकत नव्हतो. पण आता मार्ग सापडला आहे आणि मी पुन्हा लिहिता झालो आहे.

ठिकठिकाणच्या वडापावपासून ते रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर मिळणा-या रगडा पावापर्यंत आणि सचिवालय जिमखान्यापासून ते पुण्यातील अभिषेकपर्यंत अनेक ठिकाणचा आस्वाद घेतला आहे. परळमधल्या प्रकाश सारख्या गावाची आठवण आणणा-या हॉटेलवर लिहायचं आहे. अनेक विषय आहेत. तेव्हा आता वारंवार भेटतच राहू.

हिंदुस्थानच्या ६४ व्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
हिंदुस्थानचा स्वातंत्र्यदिन चिरायू होवो, अशी प्रार्थना...


जयहिंद आणि जय महाराष्ट्र...

Wednesday, May 26, 2010

... आणि विठ्ठलाने बोलावूनच घेतले

एकादशीला झाली पंढरपूर वारी...

देवाच्या इच्छेपुढे आपले काही चालत नाही, असं म्हणतात. नुकताच याचा प्रत्यय आम्हाला आला. (आम्हाला म्हणजे मी, विश्वनाथ गरुड, देविदास देशपांडे आणि प्रशांत अनासपुरे) सकाळमध्ये काम करत असताना आमची सोनेरी टोळी होती. सकाळमध्ये टोमणे खाल्ल्याशिवाय काम करताच येत नाही. मी, विश्वनाथ, देविदास आणि आमचा आणखी एक मित्र नंदकुमार वाघमारे. ही आमची सोनेरी टोळी. सवॆ जण आमच्यावर जळायचे. असो. चांगला लेख आहे. वेगळा विषय नको. तर नंदकुमार या आमच्या मित्राचं सोलापुरात लग्न होतं. आम्ही सोमवारी लग्नासाठी सोलापूर गाठलं. म्हणजे पहा २४ मे हा तो दिवस होता. हाच दिवस आमच्यासाठी आश्चयॆकारक ठरला.



सकाळी सातच्या सुमारास सोलापूरसाठी निघालो. मजल दरमजल करत (म्हणजे विविध ठिकाणी खाद्यपदाथॆ आणि पेयपानाचा फडशा पाडत) आम्ही दोनच्या सुमारास लग्न समारंभी म्हणजे विजापूर रोडला पोचलो. हाय हॅलो, शुभेच्छा, ओळखी-पाळखी, काय कसं पार पडलं, हनिमूनला कुठे जाणार अशी विचारपूस हे सगळे सोपस्कार पार पडल्यानंतर जेवण उरकलं. मिष्टान्न इतरे जनः असं म्हणतात. ते आमच्या बाबतीत नेहमीच खरं असतं. जेवण झालं. थोडावेळ थांबलो. मग विजापूर रोडवरुन निघालो.

मग सिद्धेश्वराचं दशॆन घेतलं. सोलापुरात येऊन तिथं गेलो नाही, असं बरोबर वाटत नाही. मग आमचे मित्र आणि ई टीव्हीचे पत्रकार बाबा फुंदे यांच्याबरोबर सिद्धेश्वर मंदिरात गेलो. तिथं एक कथा लिहिली होती. विठ्ठलाचे दशॆन घेण्यासाठी पंढरपूरला जाण्याची गरज नाही. मनात देव असेल तर तो कुठेही दशॆन देतो, असं सिद्धेश्वर यांनी कोणाला तरी सांगितल्याची ती कथा होती. म्हटलं बरंच आहे. पंढरपूरला गेलो नाही तरी हरकत नाही. सिद्धेश्वराचं दशॆन हेच विठ्ठलाचं दशॆन, असं मानून आम्ही मनोभावे नमस्कार करुन निघालो.

साधारण संध्याकाळचे सहा वाजले असतील. पुण्याकडे निघालो. सहाला निघालो म्हणजे बारा-एक वाजेपयॆंत पोचू, असा अंदाज होता. वाटेत मोहोळला गाडीमध्ये पेट्रोल भरले आणि पुढे निघालो. (इथपासून माझा डोळा लागला होता. आपल्याला काय कुठेही झोप लागते. मग मस्त गार वारं सुटलं असताना गाडीत झोप नाही लागली तरच नवल. असो) साधारणतः एक तासभर गेला असेल. रस्ता अनोळखी वाटत होता. वाटेत लागलेला टोलनाकाही येताना लागला होता असं वाटतं नव्हतं. ट्रॅफिकही थोडा कमीच वाटत होता. रस्ता वळणावळणाचा होता. सरळसोट नव्हता. आपण रस्ता चुकलो तर नाही ना, यावर बोलणं सुरु होतं. (त्या तिघांचं) हाच विषय सुरु असताना (इतर तिघे कारण मी झोपलोच होतो) गाडी एका नदीवरच्या फरशी पुलापाशी येऊन पोचली.

च्या मारी... येताना हा पूल आणि ही नदी लागलीच नव्हती. पूल ओलांडला आणि पुढे जाऊन पाहतो तर काय समोर वाळवंट. आई शप्पथ. गाडी पंढरपुरात येऊन पोचली होती. विश्वनाथ आणि प्रशांत ओरडलेच. आपण पंढरपुरात येऊन पोचलो आहोत. त्या आरडा ओरड्याने मला जाग आली. झालं पंढरपुरात आलो म्हणजे प्रवासातील साधारणतः एक तास वाया गेला, असा निष्कषॆ काढत पोटोबाची सोय शोधू लागलो. आधी पोटोबा मग विठोबा हे त्यादिवशी खरेखुरे अनुभवले. दोन-चार भज्यांच्या गाड्यांपैकी एक त्यातल्या त्यात चांगली गाडी पाहिली आणि मस्त गरमागरम भजी मागविली. गरमागरम भजी आल्यानंतर मी फक्त चहाच पिणार, असं म्हणणा-यांचे हातही भजीकडे वळले. दुसरी प्लेट मागविली. मग कोणीतरी शेवचिवडा आणि तळलेल्या मिरच्या मागविल्या. शेवटी दोन कडक स्पेशल घेऊन उठलो. तृप्त मनाने केलेली भक्ती अधिक चांगली असते, असं म्हणतात. (खरं तर असं कोणी काही म्हणत नाही. आपणच आपलं कोणाच्या तरी नावावर बिल फाडायचं...)

पंढरपुरात येऊन विठ्ठलाचे दशॆन न घेता गेलो असतो तर... मनाला पटतच नाही. मग विठ्ठलाचे दशॆन घेऊन जाण्याचंच ठरलं. विठ्ठलानेच आपल्याला बोलावून घेतलं. अन्यथा रस्ता चुकण्याचं आणि मुद्दाम या वाटेने येण्याचं काहीच कारण नव्हतं. तसंच चौघांनाही पुणे-सोलापूर रस्ता काही नवीन नव्हता. प्रत्येकानं किमान पंधरा ते वीस वेळा तरी सोलापूरची वारी केली असेल. मग हे सारं घडलं कसं. पंढरपूरला जायचं ठरलं नसतानाही आणि चौघांनाही सगळे रस्ते व्यवस्थित माहिती असतानाही हे झालंच कसं.
नरेंद्र दाभोळकरांसारखी मंडळी याला निव्वळ योगायोग म्हणतील. पण त्यावर आमचा विश्वास नाही. रस्ताच चुकायचा होता तर तो चुकून आम्ही पंढरपुरातच का आलो. अक्कलकोट किंवा हैदराबादच्या दिशेने का नाही गेलो? किंवा एखाद्या म्हस्के वस्ती, दांगटवाडी किंवा परबाची वाडी इथं का नाही पोचलो... याचं उत्तर कोणीच देऊ शकणार नाही. दाभोळकर सुद्धा नाही. शिवाय दीड सालाच्या नियोजनातही हा विषय नव्हता. शेवटी आम्हालाही पटलं नियोजन न करताही काही गोष्टी चांगल्या होऊ शकतात आणि फसलेल्या बेतांचाही असा चांगला शेवट असू शकतो.

थोडक्यात म्हणजे तुम्ही कितीही प्लॅनिंग करा, काहीही करा, त्याच्या इच्छेपुढे कोणाचेच काहीही चालत नाही....

बोला पुंडलिक वरदे हरि विठ्ठल,
श्री द्यानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय...

Saturday, May 15, 2010

मनःपूवॆक आदरांजली...

निष्ठावंत आणि राजकारण्यांचे गुरु...



साधारणपणे 1950 चे दशक! राजस्थानमध्ये त्यावेळी जनसंघाची फारशी ताकद नसली तरी 1958 साली विधानसभेत जनसंघाचे आठ आमदार होते. त्यावेळी राजस्थानमधील कॉंग्रेस सरकारने जहागिरदारी (वतनदारी) संपुष्टात आणण्यासाठी विधेयक आणले. जनसंघही जहागिरदारी संपुष्टात आणण्याच्या बाजूने होता. त्यामुळे सरकारने आणलेल्या विधेयकाला विरोध करण्याचा प्रश्‍नच नव्हता. तेव्हा जनसंघाने त्यांच्या आमदारांना सरकारने आणलेल्या विधेयकाला पाठिंबा देण्याची सूचना केली.

अर्थात, जनसंघाचे आठही आमदार वतनदार होते. त्यांची प्रत्येकाची मोठ्या प्रमाणावर जमीन होती. त्यामुळे जनसंघाच्या आठपैकी सात आमदारांनी पक्षादेश डावलून विधेयकाच्या विरोधात मतदान केले. एका आमदाराने मात्र, स्वतः जहागिरदार असून केवळ पक्षादेश शिरोधार्य मानून जहागिरदारी संपुष्टात आणण्यासाठी मतदान केले. तो आमदार म्हणजे माजी उपराष्टपती भैरौसिंह शेखावत!

जनसंघाच्या सात आमदारांनी विरोधात मतदान करुनही ते विधेयक संमत झाले. विधेयकाच्या विरोधात मतदान करणारे सात आमदार पुन्हा जिंकले, हरले किंवा त्यांचे पुढे काय झाले, कोणाच्याही स्मरणात नाही. पण भैरोसिंह शेखावत हे नाव मात्र, त्यानंतर प्रादेशिक आणि राष्ट्रीय राजकारणात संस्मरणीय ठरले. तीनवेळा राजस्थानचे मुख्यमंत्रीपद भूषविणारे शेखावत पाच वर्षे भारताचे उपराष्ट्रपती होते.



बाबरी मशीद उद्ध्वस्त झाल्यानंतर भारतीय जनता पक्शाची उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थान अशी तीनही सरकारं बरखास्त केली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत फक्त राजस्थानमध्ये पुन्हा भाजपची सत्ता आली. भैरोसिंह शेखावत यांच्या अप्रतिम मॅनेजमेंटच्या जोरावरच तिथे भाजप पुन्हा सत्तेवर आला. शेखावत तिस-यांदा राजस्थानचे मुख्यमंत्री झाले.

काही महिन्यानंतर शेखावत यांच्यावर अमेरिकेत बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली. कदाचित दुसरी असावी. ते अमेरिकेत असताना त्यांच्या मंत्रीमंडळातील एका कनिष्ठ सहका-याने शेखावत यांच्याविरुद्ध बंड केले. शेखावत यांचे नेतृत्व आम्हाला अमान्य असून आता मीच मुख्यमंत्री अशा थाटात त्याने जुळवाजुळव सुरु केली होती. आमदारांचा एक गटही त्याच्या गळाला लागला होता. शस्त्रक्रिया झाल्यानंतर महिनाभराच्या कालावधीने शेखावत पुन्हा भारतात परतणार होते. शस्त्रक्रियेनंतर विश्रांती घेता-घेता शेखावत यांनी अशी काही जादूची कांडी फिरविली की विचारता सोय नाही. ज्या दिवशी शेखावत पुन्हा राजस्थानात परतले त्याच दिवशी तो बंडखोर आमदारानं शेखावत यांच्या पायावर लोटांगणच घातलं. जो हो गया सो हो गया. अब आप ही तो हमारे नेता है भेरोसिंहजी... असं म्हणत त्या आमदारानं आपली तलवार म्यान केली.

सत्ता टिकविण्यासाठी जे राजकीय चातुयॆ, धूतॆपणा आणि इतरांना मॅनेज करण्याचं कौशल्य लागतं ते शेखावत यांच्याकडे होतं आणि त्या जोरावरच त्यांनी राजस्थानात सत्ता गाजविली. अनेक चढ-उतार आले तरी त्यांनी निष्ठा बदलल्या नाहीत. त्यामुळंच त्यांना तीनवेळा मुख्यमंत्री आणि एकदा उपराष्टपती होता आलं.

अशा या महान नेत्यांना मनोभावे आदरांजली...