Wednesday, April 17, 2013

'त्या' गीताचं काय करायचं?

जवळपास सात वर्षांनंतर दुसरा ब्लॉग सुरू केला आहे. परममित्र निलेश बने यांचा प्रचंड आग्रह मोडणे मला शक्य झाले नाही. सर‘मिसळ’ असे ब्लॉगचे नाव असून तो महाराष्ट्र टाइम्सच्या वेबसाईटवर उपलब्ध असणार आहे. जे सुचेल, जे दिसेल ते लिहिण्याचा प्रयत्न असणार आहे. तेव्हा वाचा आणि व्यक्त व्हा... धन्यवाद.
 
एखाद्या ओळखीच्या माणसाला खूप दिवसांनी पाहिलं तर कसं मस्त वाटतं. खूप वर्षांपासून ओळख असेल आणि अनेक दिवस भेट झाली नसेल तर भेटल्यावर बरं वाटतं. पण मी तिला खूप दिवसांनी काल पाहिलं आणि मला खूप वाईट वाटलं. तिचं तसं दिसणं मनाला अगदी चटका लावून गेलं

तीम्हणजे गीता देशपांडेमला रस्त्यावर भटकताना दिसली. विस्कटलेले केस, खूप दिवस आंघोळ केल्यामुळं काळवंडलेली त्वचा, मळलेल्या पंजाबी ड्रेसचा फक्त टॉप आणि तोही कुठं कुठं फाटलेला, एका हातात प्लॅस्टिकची पिशवी आणि दुसऱ्या हातात छोटीशी काठी अशा अगदी विपन्नावस्थेत गीता मला दोन-चार दिवसांखाली दिसली. एकटीच स्वतःशी काहीतरी बडबड करत डेक्कनच्या सिग्नलजवळून चालत होती. मी गाडीवर होतो, त्यामुळं अर्धा-एक मिनिट तिचं दर्शन झालं आणि काळीज हेलावलं.

गीता ही अगदी सात-आठ वर्षांपर्यंत आमच्या कॉलनीत राहणारी. माझ्या मागच्याच इमारतीमध्ये. माझ्यापेक्षा साधारण दहा-बारा वर्ष मोठी असेल. तिची आई आणि माझी आई मैत्रिणी किंवा चांगल्या ओळखीच्या होत्या, असं म्हटलं तरी चालेल. त्यामुळं माझं तिच्या घरी आणि तिचं माझ्या घरी जाण येणं अगदी नेहमीचंच. कधी तरी मला एखादं चॉकलेट दे किंवा काय रे अभ्यास करतोस ना, असं विचारणं. किंवा कधी आमच्याकडे काही विशेष केलं तर तो पदार्थ त्यांच्याकडे नेऊन देणं आणि त्यांच्याकडील पदार्थ आमच्याकडे येणं असं चालायचं. इतकीच आमची ओळख.

भारतात सॉफ्टवेअर इंजीनिअरिंगची नुकतीच सुरुवात व्हायला लागल्यानंतर म्हणजे १९९० च्या आसपास ती सॉफ्टवेअर इंजीनिअर झाली आणि मुंबईमध्ये जॉबला लागली. त्यानंतर आमच्यातील संपर्क खूप कमी झाला आणि नंतर मग तो तुटलाच. मुंबईत नोकरीला असताना तिचं कोणाशी तरी सूत जुळलं होतं. पण त्यानं तिचा ‘फायदा’ घेतला आणि नंतर झिडकारलं, असं कानावर आलं होतं. त्यानं अव्हेरल्यानंतर ती बिथरल्यासारखी वागायची. हे सगळं घडत असतानाच आधी तिची आई गेली आणि नंतर लगेचच एक-दोन वर्षांत वडीलही गेले. मानसिक परिस्थिती ढासळल्यामुळं तिचा जॉबही गेला असावा आणि मग ती पुन्हा पुण्यामध्ये तिच्या घरात येऊन राहू लागली.

आता मात्र गीता पूर्णपणे बदलली होती. बदलली म्हणजे काय तर ठार वेडीच झाल्यासारखं तिचं वागणं होतं. घरामध्ये आदळआपट, भाड्यांची फेकाफेक, जोरजोरात किंचाळणं, शिव्यांची लाखोली वाहणं (ज्यानं फसविलं त्याला आणि तो ज्या जातीचा होता त्या जातीला), विक्षिप्तपणे वागणं, शेजाऱ्या पाजाऱ्यांना त्रास देणं (जिन्यामध्ये तेल ओतणे वगैरे…) असले प्रकार वाढले होते. तिचं वागणं असं झाल्यामुळं नातेवाईकांनीही तिला कधीच झिडकारलं होतं. शेजारी पाजारीही तिला टरकून असायचे आणि फारसं काही बोलायचे नाहीत. अनेक जण तिला त्रास मात्र द्यायचे. म्हणजे उगाचच तिच्या घराला कडी लाव, रस्त्यामध्ये दिसली तर तिला दगड मार किंवा तिला विनाकारण चिडव वगैरे प्रकार वाढले होते.

काही जण तिच्या त्रासाला कंटाळून पोलिसांना बोलवायचे. मात्र, पोलिसांशी ती व्यवस्थित इंग्रजीतून संवाद साधायची आणि त्यांना परतवून लावायची. विक्षिप्त आणि वेडसर वागण्यामुळं तिच्याशी बोलणं किंवा नुसती ओळख दाखविण्याचीही भीती वाटायची. तरीही कधी कधी ती मला भर रस्त्यात ओळख द्यायची. काय करतोस किंवा सध्या कुठे वगैरे विचारायची. आई कशी आहे विचारायची. बरं, अगदी भणंगावस्थेत आहे, म्हणून माझ्याकडे कधी पैसे मागितले आहेत, असं झालं नाही.

तिच्या घराला कोणी बाहेरून कडी लावली असेल तर मला ती काढण्यासाठीही खिडकीतून आवाज द्यायची. त्यावेळी पोटात गोळाच यायचा. कडी काढायला गेलो आणि हिनं काही केलं तर या कल्पनेनंच घाम फुटायचा. पण तरीही जीव मुठीत धरून मी तिच्या घराची कडी काढायला जायचो. पण तिनं कधीच मला काही केलं नाही. तिच्यासाठी काहीतरी करावं, असं खूप वाटायचं. पण काय करावं हे सुचायचं नाही आणि कसा मार्ग शोधावा, हे कळत नव्हतं. तसा मी खूप मोठाही नव्हतो.

नंतर मात्र, तिनं आमच्या इमारतीमध्ये राहणं सोडलंच. का सोडलं, कशामुळं सोडलं हे कोणालाच माहिती नाही. पण नंतर ती घरामध्ये दिसायचीच नाही. फक्त कधी तरी रस्त्यावर दिसायची. मळलेला टी-शर्ट आणि जीन्सच्या पॅण्टमध्ये. अर्थात, तिचं दर्शन नियमितपणे व्हायचं. म्हणजे रोज नसलं तरी आठवड्यातून दोन-तीनदा तरी. म्हणजे ती कॉलनीमध्ये यायची. इकडं तिकडं भटकायची आणि परत गायब व्हायची. मात्र, नंतर काही वर्षं मी ई टीव्ही आणि साम मराठीच्या निमित्तानं हैदराबाद आणि मुंबईमध्ये असल्यामुळं तिची ‘भेट’ व्हायची नाही. सुटीसाठी कधी पुण्यात आल्यानंतर क्वचित तिचं दर्शन व्हायचं.

गेल्या तीन वर्षांपासून मात्र, ती कॉलनीमध्ये कधीच दिसली नाही. सहा-आठ महिन्यांनी कोणीतरी सांगायचं अरे आज मला अमुक तमुक ठिकाणी गीता दिसली. मला पण दोन-एक वर्षांत ती दिसली नव्हती. चार-पाच दिवसांपूर्वी मला ती दिसली आणि हा सगळा प्रवास डोळ्यांसमोरून पुढे सरकला. दोन-तीन दिवस तिचाच विचार करीत होतो. आमच्याच कॉलनीतील कमलेशला त्याच परिसरात गीता दिसली. दोघांनी काही करता येईल का, अशी चर्चा केली. फक्त पैसे किंवा कपडे देऊन काहीच उपयोग नाही. तिला सुधारणं किंवा तिचं आयुष्य पूर्वपदावर आणणं आता शक्य आहे का, याबाबत आमचं बोलणं झालं.

खरंच हे शक्य आहे का आणि असेल तर कशा मार्गानं हे शक्य आहे. मुळात तिचा ठावठिकाणा नाही. क्वचित कधीतरी दिसते. त्यामुळं शोधणं कठीण. शिवाय तिची जबाबदारी घेईल, असं सध्या तरी कोणी नाही. तिला सुधारण्याची जबाबदारी समजा कोणी घेतल्यानंतर जितकं लक्ष द्यायला लागेल तितकं लक्ष द्यायलाही कोणी नाही. आर्थिक भार उचलायचा असेल, तर त्याचंही फारसं नियोजन नाही. अशा परिस्थितीत तिला आयुष्यात परत आणणं शक्य आहे का, याची चाचपणी तर आम्ही सुरू केलीय. पाहू त्यात यश येतं का ते. कारण तिचं आयुष्य पूर्वपदावर यावं, असं कुठंतरी आतून वाटतंय.

Sunday, March 31, 2013

‘धान्य दान’ मोहीम सुफळ संपूर्ण


धान्य पोहोचले, समाधान लाभले...

साने गुरूजी तरुण मंडळ आणि हिंदू गर्जना प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने धान्यदान मोहीम आयोजित करण्यात आली होती. परममित्र धीरज घाटे यांच्या वाढदिवसानिमित्त ही मोहीम राबविली गेली. त्या मोहिमेच्या निमित्ताने नोंदविलेली काही निरीक्षणे आणि आलेले काही अनुभव… 

धान्य दान मोहिमेची अगदी प्राथमिक चर्चा सुरू असते. अजून काहीच नक्की असे झालेले नसते घरात काम करणाऱ्या मोलकरणीच्या कानावर ती चर्चा पडते. ती दुसऱ्या दिवशी तिच्या घरातून एक किलो धान्य दुष्काळग्रस्तांसाठी घेऊन येते आणि ‘बाईसाहेब, तुम्ही काल बोलत होता ना, त्यासाठी माझं हे एक किलो धान्य...’

दुष्काळग्रस्तांसाठी काही तरी केलं पाहिजे, या विचारातून साकारलेल्या धान्यदान मोहिमेमध्ये पहिलं माप टाकणारी व्यक्ती असते एक मोलकरीण.  त्यानंतर मग धान्याच्या राशीच्या राशी जमा होतात आणि हजारो दुष्काळग्रस्तांपर्यंत त्या पोहोचविल्याही जातात. दुष्काळग्रस्त नागरिकांसाठी नुसतेच उसासे टाकत बसण्यापेक्षा काहीतरी केलं पाहिजे, या विचारातून या मोहिमेला सुरूवात झाली. मग कुठं कशाची मदत लागेल वगैरे याची चाचपणी सुरू झाली. 
 
बालपणीपासूनचा मित्र धीरज घाटे हा पाच वर्ष संघाचा पूर्णवेळ प्रचारक असताना काही काळ बीड जिल्ह्याला प्रचारक म्हणून कार्यरत होता. त्यामुळे सर्वप्रथम बीड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये काय मदत करता येऊ शकेल, याचीच चाचपणी केली. पाणी आणि चारा या गोष्टींची प्रामुख्याने गरज आहे, हे स्पष्ट होतेच. पण अनेक तालुक्यांमध्ये पुढील काही महिने धान्याचीही अडचण भासणार आहे, हे तिथं जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर आम्हाला समजलं आणि मग त्यातून धान्यदान मोहिमेचा आराखडा तयार करण्यात आला. 

शहरातील बड्या व्यक्ती, संस्था आणि संघटना यांना अॅप्रोच न होता घराघरातून मदत गोळा करायची आणि अधिकाधिक नागरिकांना यात सहभागी करून घ्यायचं हे सुरूवातीपासूनच ठरलं होतं. त्यानुसार प्रत्येक इमारती, वाडे, सोसायट्या, चाळी, शाळा आणि महाविद्यालयांमधून या मोहिमेची सविस्तर माहिती देण्यात आली. काही आय टी कंपन्यांमध्येही मोहिमेचा प्रसार करण्यात आला. फेसबुक आणि ई-मेलच्या माध्यमातूनही धान्यदान मोहीम सर्वदूर पोहोचविण्यात आली. 

आशिष शर्मा यांनी त्यांच्या परदेशातील मित्रांपर्यंत ही योजना पोहोचविली आणि त्यांच्याकडूनही मोठ्या प्रमाणावर मदत मिळाली. काही दानशूर नागरिकांनी विशिष्ट दुकानांमधून पाच किंवा दहा हजार रुपयांपर्यंत धान्य खरेदी करण्यास सांगितले. अनेक शाळांमधून एक मूठ धान्यदान संकल्पना राबविली गेली. त्यातून प्रत्येकी सातशे ते आठशे किलो धान्य गोळा झाले. हास्यसंघासारख्या संघटनांनीही मदतीचा हात पुढे केला. कर्वेनगर-कोथरुड सारख्या भागात संकल्प सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रत्येक सोसायटीमध्ये धान्य गोळा करण्याची यंत्रणा राबविण्यात आली. त्यामुळे या भागातूनही जवळपास वीस ते पंचवीस हजार किलो धान्य जमा झाले. नियोजनबद्धरित्या केलेल्या प्रयत्नांमुळे तब्बल ६० ते ६५ हजार किलो धान्य जमा झाले. गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी आणि डाळी असे धान्य लोकांकडून दान म्हणून स्वीकारण्यात आले. आमचे प्रयत्न २१ हजार किलोंसाठी सुरू होते. पण ‘देणाऱ्याचे हात हजारो…’ हा अनुभव आला आणि पाहता पाहता ६० हजार किलोचा आकडा कधीच ओलांडला गेला.


अर्थात, चांगल्या योजनेला अपशकुन करण्याची मराठी माणसाची परंपरा या वेळी पाळली गेली नाही असं नाही. विघ्नांशिवाय उत्तम कामे पार पडल्याचं ऐकिवात नाही, अन अनुभवानतही.  मुळात दुष्काळग्रस्त भागांमध्ये फक्त पाणी आणि चाऱ्याची आवश्यकता आहे. तेथे धान्य मुबलक आहे, धान्याची अजिबात जरूरी नाही, असे ई-मेल फिरविण्यात आले. ‘व्हिस्परिंग कॅम्पेन’ करण्यात आले. धान्य जमा करणारे कसे मूर्ख आहेत, अशी चर्चा घडविण्यात आली. पण तेथे धान्याची आवश्यकता आहे, याची आधीच खात्री करून घेतल्यामुळे आंम्हाला असल्या क्षुल्लक गोष्टींमुळे फरक पडत नव्हता. आम्ही आमचे उद्दिष्ट साध्य करण्यात मग्न होतो. (उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत २५ हजार नागरिकांनी रक्तदान केले होते. त्यावेळीही राज ठाकरे यांनी अपशकुन करीत या उपक्रमावर अत्यंत वाईट शब्दात टीका केली होती.)

बीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, गेवराई आणि शिरूर-कासार या तालुक्यांमध्ये दुष्काळाची तीव्रता सर्वाधिक आहे. तुलनेने अंबाजोगाई, परळी, खुद्द बीड शहर आणि केज वगैरे भागांत दुष्काळाच्या झळा कमी आहेत. आष्टी तालुक्यातील कडा, दादेगाव, बीड सांगवी, नांदूर आणि इतर दोन-पाच गावांमध्ये आम्ही मदत करण्याचे निश्चित केले होते. मात्र, २१ हजार किलो धान्य गोळा करण्याचे निश्चित केले होते, तेव्हा या गावांची निवड करण्यात आली होती. पण आमच्याकडील धान्य ६० हजार किलोंच्या पुढे गेलो होते. त्यामुळे आणखी अनेक गावांना देता येईल एवढे धान्य आमच्याकडे होते. अर्थात, अशा गावांची यादी बीडमधील कार्यकर्त्यांकडे तर तयारच होती. त्यामुळे त्याचाही प्रश्न उरला नव्हता.

गुरूवारी सकाळी आम्ही आष्टीच्या दिशेने निघालो. चार ट्रक भरतील इतके धान्य गोळा झाले होते. जवळपास ७०-८० कार्यकर्ते आणि धान्याचे चार ट्रक असे मार्गस्थ झालो. ‘मोबाईल किंग’ आणि ‘टेलिफोन शॉपी’चे मालक आशिष शर्माही आमच्या सोबत आले होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास आम्ही कडा येथे पोहोचलो. अॅडव्होकेट बाबूराव अनारसे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या टीमसह आमची वाट पाहत होते. बीडमधील संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्रीधरपंत सहस्रबुद्धे देखील आवर्जून उपस्थित होते. वय वर्षे ७७. झुपकेदार मिशा, ठणठणीत तब्येत आणि खणखणीत आवाज, ही वैशिष्ट्ये. गोपीनाथ मुंडे हे अजूनही ज्या मोजक्या लोकांच्या पाया पडतात आणि मान देतात, त्यापैकी एक व्यक्तिमत्व म्हणजे श्रीधरपंत. कडक शिस्तीचे पण तितकेच सहजपणे लोकांमध्ये मिसळून जाणारे.


पोहोचल्यानंतर कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी आणि ओळखी झाल्या. मग धान्याचे कोणते ट्रक कुठे न्यायचे, कुठं किती धान्य उतरवून घ्यायचं याचं नियोजन करण्यात आलं. एक ट्रक आष्टी गावात पाठविण्यात आला. काही धान्य कडा येथील सुयोग मंगल कार्यालयात उतवरून घेण्यात आलं. काही धान्य दादेगाव आणि नांदूरमध्ये पाठविण्यात आलं. नियोजनानुसार सर्व काही पार पडल्यानंतर आम्ही दादेगावच्या दिशेनं निघालो. तिथं धान्य वाटपाचा पहिला कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

मला सर्वाधिक उत्सुकता होती, ती हे धान्य वाटप करण्याची काय यंत्रणा लावण्यात आली आहे, हे जाणून घेण्याची. मुळात पाऊसच झाला नसल्यामुळे आसपासच्या तीन-चार तालुक्यांमध्ये शेतीची कामे नव्हतीच. शेतकाम नसल्यामुळे मजुरांच्या हाताला काहीच काम नाही. दुष्काळामुळे बांधकामे करण्यास बंदी घातलेली. त्यामुळे बांधकामावरील मजुरांच्या (विशेषतः वडार समाज) रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालेला. अनेक गावांतील तरुण मंडळी कामं शोधण्यासाठी इतर गावांच्या दिशेने गेलेली. त्यामुळे शेकापूरसारख्या अनेक गावांमध्ये फक्त म्हातारे-कोतारे आणि लहान मुलं एवढेच शिल्लक राहिलेले. बाकी गाव ओसाड. आता तर रेशनवर मिळणाऱ्या गव्हाचे प्रमाणही कमी करण्यात आले आहे. शिवाय रेशनवर धान्य मिळण्यात येणाऱ्या अनेक अडचणी आणि अनियमितता यामुळे ‘भीक नको पण कुत्रे आवर’ अशी गत झाली आहे. अशा सर्व लोकांपर्यंत जमा केलेले धान्य पोहोचणार होते. त्यामुळे रोजच्या दोन वेळच्या जेवणासाठी त्यांना वणवण करीत दुसऱ्यासमोर हात पसरायला लागणार नव्हते. 


वडार, वैदू, शेतमजूर, मागासवर्गीय, दलित आणि रोजचे रोज कमावून खाणाऱ्या मजुरांची संख्या अधिक असलेली जवळपास तीस गावे निश्चित करण्यात आली आहेत. त्या प्रत्येक गावामध्ये खरोखरच धान्य वाटप करण्याची आवश्यकता कोणाला आहे, याची यादी गावातील प्रमुख मंडळींनीच तयार केली होती. जेणेकरून हे धान्य गरज नसलेल्या व्यक्तींच्या घरी जाऊ नये. इतकी यंत्रणा लागल्यानंतर आमचे काम होते, ते फक्त गावांमध्ये जाऊन गरजू व्यक्तींना धान्य वाटप करण्याचे.
त्यानुसार आम्ही दादेगाव आणि नांदूर या गावांमध्ये गेलो. दोन्ही ठिकाणी दीडशे ते दोनशे लोक उपस्थित होते. दोन्ही गावांमध्ये ७० ते ८० जणांची यादी सर्वानुमते तयार करण्यात आलेली. त्यापैकी प्रत्येकी दोन जणांना जाहीर कार्यक्रमांमध्ये पन्नास-पन्नास किलो धान्य देण्यात आले आणि उर्वरित सर्वांना घरोघरी जाऊन धान्य वाटप करण्यात येणार होते. एव्हाना ते झाले असेलही. इतर गावांमध्येही संपर्क सुरू झाला आहे. गरजूंपर्यंत धान्य पोहोचते आहे. 

ज्या लोकांना दादेगावमध्ये धान्य दिले त्यापैकी एक म्हणजे तुळसाबाई. जख्खड म्हातारी. वय वर्षे साधारण ७५ पेक्षा अधिक असेल. मुलगी नगरमध्ये स्थायिक झालेली आणि आतापर्यंत तिच्याजवळ राहणारा तिचा नातू लग्नानंतर आष्टीमध्ये रहायला गेलेला. त्यामुळे म्हातारी दादेगावमध्ये एकटीच. इतके दिवस तिला नातवाचा आधार होता. पण आता तोही नाही. त्यामुळे लोक त्यांच्याकडे उरलेलं शिळंपाकं अन्न तिला आणून द्यायचे आणि त्यावर तिचा उदरनिर्वाह चालायचा. पूर्वी ती लोकांकडे जाऊन पडेल ते काम करायची. आता वयोमानाप्रमाणे तेही जमत नाही. पण आता तिला धान्य मिळाल्यामुळं ती स्वतःचं स्वतः करून खाऊ शकते. ‘तुमचे खूप उपकार झाले भाऊ. तुमच्यामुळं मला लोकांपुढं भीक मागायची वेळ येणार नाही…’ हे तिचे उद्गार.


कड्यामध्ये पोहोचल्यानंतर रखरखीत दुष्काळात मदतीचा सुखद झरा सापडला. आष्टी, पाटोदा, गेवराई आणि शिरूर-कासार या तालुक्यांमध्ये दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात जवळपास ३८ चारा छावण्या आहेत. त्यांमध्ये ५६ ते ५७ हजार जनावरे आश्रयासाठी आलेली आहेत. जनावरांसाठी एका व्यक्तीला या छावणीत २४ तास थांबावेच लागते. ही मंडळी सकाळी गावातून निघतात. त्यांचे दुपारचे जेवण सोबत आणलेले असते. पण सकाळी घरातून निघताना बरोबर घेतलेली रात्रीची शिदोरी उन्हा‍ळ्यामुळे खराब होते. त्यामुळं धानोरा येथील परमेश्वर शेळके या चारा छावणी मालकानं निवास करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी रात्रीच्या जेवणाची मोफत सोय केली आहे. २० जानेवारीपासून त्याने अन्नदानाचे पुण्यकर्म सुरू केले आहे. नावातच परमेश्वर असलेले शेळके हे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी खऱ्याखुऱ्या परमेश्वरासारखे धावून आले आहेत.


रोज जवळपास ७०० शेतकरी रात्रीच्या वेळी जेवायला असतात. एकावेळी ७०० लोकांना भात देण्यासाठी त्यांना ७० किलोच्या आसपास तांदूळ लागतो. शेतकऱ्यांना आमटी-भात, कधीमधी लापशी, भात-पातळ भाजी, क्वचित कधीतरी भाकरी असे जेवण दिले जाते. परमेश्वर शेळके यांच्यापासून प्रेरणा घेऊन आता इतर दोन-चार चारा छावणी मालकांनीही रात्रीच्या जेवणाची सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आहे. दुष्काळग्रस्तांसाठी काम करणारी ही देवमाणसंच म्हटली पाहिजेत.
शेतकऱ्यांना रात्रीचे जेवण देण्याचे पुण्यकर्म करणाऱ्या चारा छावणी मालकांनाही धान्य वाटप करण्यात येणार आहे. पुढील दोन-तीन महिने लागेल तितके धान्य देण्याची आमची तयारी आहे. भविष्यात जर त्यांना धान्याची कमतरता भासत असेल तर अजूनही धान्य गोळा करून देण्याचे आश्वासन आम्ही त्यांना दिले आहे. शेवटी काय शेतकऱ्यांकडून आपल्याला जे मिळते आहे, तेच आपण त्यांना परत करतो आहोत, हीच भावना मनात होती...

दुष्काळग्रस्तांसाठी काही तरी करायचं हे मनात ठरवून आम्ही उपक्रमाला सुरूवात केली होती. यशस्वी होणार याची खात्री होतीच. पण प्रतिसाद कसा मिळेल, काय होईल, याबाबत काहीच सांगता येत नव्हतं. मात्र, ईश्वर कृपेने सर्व काही उत्तम झाले. गावांमध्ये धान्य वाटप केल्यानंतर उपस्थितांच्या चेहऱ्यावर असलेल्या समाधानापेक्षा अधिक समाधान आमच्या चेहऱ्यावर झळकत होतं. तेच समाधान मनात ठेवून आम्ही पुन्हा पुण्याच्या वाटेने मार्गस्थ झालो...

अधिक माहितीसाठी संपर्कः 
धीरज घाटेः ९८२२८७१५३० 
अॅडव्होकेट बाबूराव अनारसेः ९४२३१७२६८२
परमेश्वर शेळकेः ९४२१३३९५२२

Wednesday, March 20, 2013

भोपाळ पार्ट टू...



लक्षात राहिलेली माणसं...
कुठल्याही ठिकाणी गेल्यानंतर मला तिथल्या लोकांना भेटायला मला खूप आवडतं. म्हणजे ऐतिहासिक वास्तू, संग्रहालयं, देवळं किंवा मशिदी-चर्च हे पहायला आवडतं नाही, असं नाही. पण तिथल्या लोकांशी बोलायला, त्यांच्याकडून त्या भागाची अधिक माहिती घ्यायला, परंपरा जाणून घ्यायला, गमतीशीर किस्से ऐकायला अधिक आवडतं. शिवाय भारताच्या कोणत्याही भागातला सर्वसामान्य माणूस हा खूप बोलका असतो. तो अगदी सहजपणे आपल्याशी बोलायला सुरूवात करतो. त्यामुळं संवादाला कधीच अडचण येत नाही.

हैदराबाद असो, गुवाहाटी असो, तमिळनाडू असो, गुजरात असो किंवा ‘मी महाराष्ट्र बोलतोय’च्या वेळी संपूर्ण महाराष्ट्र असो… कुठंही गेलो की अधिकाधिक लोकांशी बोलणं ही माझी सवय बनून गेली आहे. इंडियन मिडीया सेंटरच्या निमित्तानं भोपाळला गेलो तेव्हा देखील अनेक जणांच्या भेटी झाल्या. हिमाचलपासून ते आंध्र प्रदेशापर्यंत आणि भोपाळपासून ते पश्चिम बंगालपर्यंत अनेक राज्यांमधील मंडळी भेटली. खुद्द भोपाळमधील काही जणांचीही भेट झाली. अनिल सौमित्र त्यापैकीच एक...

हजरजबाबी, हरहुन्नरी आणि हुश्शार…
भोपाळ ट्रीपदरम्यान सर्वाधिक लक्षात राहिलेली व्यक्ती, ही अनिल सौमित्र यांची माझ्यासाठीची खरी ओळख. मध्य प्रदेश भाजपचे मुखपत्र असलेल्या ‘चरैवेति’ या मासिकाचा संपादक. कधी काळी संघ परिवारातील ‘विश्व संवाद’ या संघ परिवारातील संस्थेचा पूर्णवेळ प्रचारक राहिलेला कार्यकर्ता. चेहरा, पेहराव आणि सौमित्र या नावामुळे प्रथम बंगालीच वाटला. पण मी बंगाली नाही, बिहारी आहे, असे त्याने नम्रपणे सांगितलं. अनिल मूळचा बिहारच्या मुझफ्फरपूरचा. पुण्यातून निघण्यापासून ते झेलम एक्स्प्रेसचे रिझर्व्हेशन होईपर्यंत प्रत्येक वेळी अनिल सौमित्र या व्यक्तीच्याच संपर्कात होतो. त्यामुळे सुरूवातीपासूनच या नावाबद्दल खूप उत्सुकता होती.


भोपाळला गेल्यानंतर जेव्हा विज्ञान भवनमध्ये पोहोचलो, तेव्हा तिथं त्याचं सर्वप्रथम दर्शन झालं. नरेंद्र मोदी घालतात तसा हाफ स्लिव्हचा कुर्ता, वर खादीचं जॅकेट, जीन पँट आणि हातात डायरी, कागदपत्र, पुस्तकं आणि बरंच काही. स्वभावाने विनोदी, एकदम हजरजबाबी आणि अगदी सहज बोलता बोलता समोरच्या व्यक्तीला जिंकून घेणारा. स्पंदन नावाची माध्यमांशी संबंधित संस्था चालविणारा आणि ‘चरैवेति’चा संपादक असलेला हा पत्रकार. जवळपास अठरा एक वर्षांपासून माध्यमांमध्ये असलेला आणि रमलेला. कधीकाळी पांचजन्यचा भोपाळ प्रतिनिधी म्हणूनही त्यानं काम केलंय. शिवाय विश्व संवाद केंद्रामध्ये पाच वर्ष पूर्ण वेळ काम करून त्यानं प्रचारकाची भूमिकाही पार पाडलीय.

भोपाळमधील सेमिनारचं एकहाती मॅनेजमेंट सौमित्र यानेच केलं होतं, हे एव्हाना आमच्या लक्षात आलं होतं. म्हणजे सेमिनारचं ठिकाण निवडण्यापासून, मंडळींच्या राहण्याची व्यवस्था, उत्तम आचारी शोधणे, वाहतुकीची व्यवस्था करण्यापर्यंत सबकुछ सौमित्र, असाच प्रत्यय ठायीठायी येत होता. एरव्ही रुबाबात नेता म्हणून वावरणारा अनिल अनेक प्रसंगी कार्यकर्त्याची भूमिका अगदी समर्थपणे वठवित होता. म्हणजे ‘वीर मारूती’चे क्वचित प्रसंगी ‘दास मारूती’ हे रुपही समोर येते... अगदी तस्सेच.

हिंदी एकदम मधुर. बोलतानाही आणि लिहितानाही. ‘पूर्वाग्रह’ हे प्रकाशित झालेल्या लेखांचे पुस्तक त्यानं मला दिलं. ते वाचतानाही तो बोलतो तशीच हिंदी वाचायला मिळते. जागरण, आज, प्रभात खबर, दिव्य भास्कर, हिंदुस्थान, जनसत्ता अशा अनेक वर्तमानपत्रांमध्ये आणि स्वदेशीपासून ते छत्तीसगडच्या आदिवासी संस्कृतीपर्यंत अनेक विषयांना त्यानं हात घातलाय. बोलतानाचा ओघ लेखनातही कायम दिसतो. विचारांना वाहिलेला आणि त्यावर निष्ठा असलेला. बरं, विचारांवर निष्ठा असून तारतम्याने विचार करणारा आणि ‘आपल्या’ लोकांमधील दोषांवर अगदी यथायोग्य पद्धतीने बोट ठेवणारा... म्हणजे वाहवत जाणारा वाटत नाही. 

  (श्री. विद्याधर चिंदरकर हे अमिताभ बच्चन यांची मुलाखत घेताना...)

अनिलला पाहून मला ‘सामना’तील विद्याधर चिंदरकर यांची आठवण आली. दिसण्यामध्येही बरेच साम्य. वयही सारखेच. दोघेही हजरजबाबी, हुश्शार आणि हरहुन्नरी. राज्याच्या राजधानीत राजकीय पक्षाच्या मुखपत्रात वरिष्ठ पदांवर काम करणारे. बातमीवर योग्य ते संस्कार करून ती अधिक आकर्षक करण्यापासून ते  गरीब गरजूंना उपचारांसाठी आर्थिक मदत मिळवून देण्यापर्यंत अनेक गोष्टींमध्ये हातखंडा असलेले. सर्वदूर आणि सर्वक्षेत्रात उत्तम नेटवर्किंग असलेले. अशा अनेक गोष्टी दोघांमध्ये सारख्याच वाटल्या. 

सेमिनार संपल्यानंतर ‘चरैवेति’च्या ऑफिसमध्ये बराच वेळ त्यांच्यासमवेत घालविला. जर्नालिझम युनिव्हर्सिटीमध्ये दुपारी त्यांची भेट झाली. ‘यहा कुछ मजा नही है… आप हमारे साथ ‘चरैवेति’ चलो. हमारा काम देखो,’ असं म्हटल्यानंतर मग मीही जास्त आढेवेढे न घेता त्यांच्याबरोबर गेलो. मग तिथं चार-पाच तास कसे गेले कळलंच नाही. ‘चरैवेति’चे काही जुने अंक, ‘स्पंदन’ने काढलेले विशेषांक, अनिलच्या लेखांचे संकलन असलेले ‘पूर्वाग्रह’ हे पुस्तक असं बरंच काही तिथं मिळालं. छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या राजकारणापासून ते ‘दोपहर का सामना’चे प्रेम शुक्ला यांच्यापर्यंत अनेक गोष्टींवर मस्त गप्पा रंगल्या. संध्याकाळी ‘काय पो छे’चा सहाचा शो पहायला ते निघाले आणि मग त्यांना अलविदा केला.

पत्रकार असूनही विनम्र
‘साम मराठी’मध्ये असताना अनेक चांगल्या पत्रकारांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यापैकी एक म्हणजे शरद व्दिवेदी. एखाद्या चित्रपटातील हिरोला शोभेल, अशी चेहरेपट्टी. मृदूभाषी आणि  स्वभावाने गोड. ‘साम’साठी ते मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या बातम्या पाठवायचे. फक्त राजकीय, सामाजिक आणि क्राइम नव्हे, तर मराठी मंडळींचे उपक्रम, सण-समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांच्याही बातम्यांचा त्यात अंतर्भाव असायचा. त्यामुळे त्यांच्याशी मस्त गट्टी जमली होती. कधीही फोन आल्यानंतर ‘आशिषजी, आप फ्री तो है ना… बात कर सकते है...’ याच वाक्याने त्यांच्या बोलण्याची सुरूवात होते. तेव्हाही आणि आताही. मी त्यांच्यापेक्षा वयाने आणि अनुभवानेही लहान आहे. हे त्यांना सांगतिल्यानंतरही अजूनही ते आशिषजी म्हणूनच हाक मारतात. अत्यंत शांत, सभ्य, आणि विनम्र. माध्यमांमध्ये असूनही अशी तीन विशेषणे लावता येतील, अशी व्यक्ती. संतोष कुलकर्णी हा त्याच पंथातील. दुसऱ्याला मान देण्याची ही प्रथा भोपाळमध्ये खूप पहायला मिळते.

‘साम’ने कॉस्ट कटिंग सुरू केल्यानंतर त्यांचे आणि आमचे सहचर्य संपले. पण दोस्ती अजूनही कायम आहे. यू्एनआय आणि डीडी स्पोर्ट्सवर ‘क्विझ शो’चे अँकरिंग असं बरंच काही केल्यानंतर शरदजी सध्या भोपाळमध्येच स्थिरावले आहेत. ‘बन्सल न्यूज’ या मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये दिसणाऱ्या चॅनेलचे हेड म्हणून कार्यरत आहेत. सुरूवातीला अनेक जणांनी आम्हाला किरकोळीत काढलं. पण आम्ही महत्प्रयत्नांनंतर हे चॅनेल आपण ‘टीआरपी’मध्ये दोन नंबरला आणलंय, असं आवर्जून सांगतात. रविवारी संध्याकाळी त्यांची भेट झाली. मग त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो. तिथं त्यांचे काही रेकॉर्डेड कार्यक्रम आणि इतर टेक्निकल गोष्टींची माहिती घेतली. कसं चाललंय वगैरे माहितीची देवाण घेवाण झाली. 

भोपाळमधले लोक शक्यतो बाहेर जायला पसंती देत नाही. एकदम सुशेगात शहर आहे. फार महागाई नाही. शिवाय राजधानी असली तरी निवांतपणा हरविलेला नाही. त्यामुळे अनेकदा चार पैसे कमी मिळाले तरी लोक भोपाळ सोडत नाहीत… शरदजी सांगत होते. हलका आहार म्हणून आम्ही रात्री कढी-चावलला पसंती दिली आणि मग भोपाळच्या सफरीवर निघालो. शरदजींच्या नव्या कोऱ्या वॅगन आरमधून. मध्य प्रदेश विधानसभा, मंत्रालय, सचिवालय, भारत भवन, बडा तालाब, उमा भारती आणि दिग्विजय सिंह यांचे बंगले वगैरेचं दर्शन आणि सोबत शरदजींची लाईव्ह कॉमेंट्री… व्वा. भोपाळ शहराबद्दल बरीच माहिती मला त्यांच्याकडूनच समजली.

शरदजी हे उत्तम नकलाकार आहेत, हे देखील लक्षात आले. मध्य प्रदेश म्हटल्यावर गोविंदाचार्य यांचा विषय निघालाच. त्यांचे आणि उमा भारती यांचे संबंध, भाजपशी त्यांचे असलेले संबंध, संघ परिवाराशी असलेले नाते वगैरे गोष्टींवर चर्चा झाली. तेव्हा गोविंदाचार्य जसे शुद्ध, सात्विक आणि गोड हिंदी बोलतात अगदी तशाच स्टाईलमध्ये शरदजींनी नक्कल केली. हुबेहुब नक्कल ऐकल्यानंतर मला तर धक्काच बसला. म्हटलं, तुम्ही नक्कल खूप चांगली करता. तेव्हा त्यांचे उत्तर असे, कभी कभी कर लेता हूँ… जेवणानंतर थोडावेळ भोपाळ भ्रमण झालं आणि मग त्यांनी मला सेमिनारच्या ठिकाणी परत सोडलं. त्यानंतर मग पुन्हा एकदा फोनवरून संपर्क सुरू झाला.

मध्य प्रदेशातील ‘आम आदमी’
अनिल सौमित्र यांच्या सौजन्याने मध्य प्रदेश भाजपच्या प्रदेश मुख्यालयात रात्री जेवणाची व्यवस्था झाली. म्हणजे इतरत्र कुठेही चार घास पोटात ढकलता आले असते. ‘यहा का खाना आपको पसंद आएगा…’ असं म्हणून त्यांनी तिथं माझी व्यवस्था करूनही टाकली. मग रात्री आठच्या सुमारास तिथं गेलो. मप्र भाजपने कार्यकर्त्यांसाठी ही उत्तम सोय केली आहे. राज्यभरातून अनेक कार्यकर्ते काही ना काही कामासाठी भोपाळला येत असतात. प्रत्येकालाच बाहेरचे महागडे जेवण परवडतेच असे नाही. हे लक्षात घेऊन पक्षाने कार्यकर्त्यांसाठी वीस रुपयांमध्ये भरपेट जेवणाची व्यवस्था केली आहे. मुख्य कार्यालयात जाऊन कार्यकर्त्याने कुपन खरेदी करायचे आणि भोजनगृहामध्ये द्यायचे. ओळखीशिवाय किंवा काही कामासाठी आल्याशिवाय हे कुपन मिळत नाही, हे ओघाने आलेच.

सौमित्र सौजन्यामुळे तिथं माझ्या जेवणाचा योग जुळून आला. फुलके, फ्लॉवर-बटाटा मिक्स भाजी, दाल-चावल, पापड, लोणचे आणि मिरच्या. मनसोक्त जेवण अगदी घरच्यासारखे. भाजपचे अनेक कार्यकर्ते आणि स्वतःला नेते समजणारे बरेच जण तिथं जेवायला आले होते. मध्य प्रदेशात सत्तेवर असूनही भाजपचे लोक प्रदेशाच्या भोजनगृहात जेवतात, हे पाहूनच मला धक्का बसला. महाराष्ट्रासह इतर प्रांतातही भाजपने ही सुविधा सुरू करावी, अशी मागणी मला आवर्जून करावीशी वाटते. अर्थात, राजकीय पक्षांच्या नेत्या-कार्यकर्त्यांची परिस्थिती वीस रुपयांमध्ये उत्तम जेवण घेण्याइतकी वाईट नाही. त्यामुळे असा उपक्रम सुरू होईल, याची सुतराम शक्यता नाही. असो.


तिथं मला इंद्रेशसिंह विश्वकर्मा हे शेतकरी भेटले. वय साधारण ५५ ते ६० असावे. कदाचित त्यापेक्षा थोडे अधिक असेलही. गुणा जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील. गहू हे मध्य प्रदेशातील मुख्य पिक. विश्वकर्मा यांचे शेतही गव्हानेच डवरलेले आहे. ते तिथं मुख्यमंत्र्यांना भेटायला आले होते. म्हणजे मंगळवारी सकाळी ते दरबारात मुख्यमंत्र्यांना भेटणार होते. प्रत्येक आठवड्याच्या सोमवार, मंगळवार, बुधवार मुख्यमंत्री हे हमखास भाजपच्या प्रदेश कार्यालयात आम जनतेला भेटतात, हा ठाम विश्वास लोकांमध्ये आहे. त्यामुळेच ते ३००-३५० किलोमीटरवरून सीएमना भेटायला आले होते. (महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबद्दल काही न बोललेलेच बरे.) त्यामुळेच त्यांचे रात्रीचे जेवण तिथे होते.

भारतातील खेड्यातला सर्वसामान्य शेतकरी दिसतो तसेच इंद्रेशसिंह. उन्हात काम करून रापलेली काया, सुरकुत्या पडलेला चेहरा आणि पांढरे केस. त्यांच्या जावयासोबत ते तिथं आले होते. त्यांचा पुतण्या वीज पडल्यामुळे गंभीर जखमी झाला होता. डॉक्टरांनी उपचारासाठी एक-दीड लाख रुपये सांगितले होते. सरकारकडून काही मदत मिळते का, पहायला ते आले होते. (दुसऱ्या दिवशी त्यांची आणि सीएमची भेट झाली. सरकारने २५ ते ३० हजार रुपये देण्याची तयारी दर्शविली आहे, हे त्यांनी मला आवर्जून फोन करून सांगितले.)

आम्ही तिघांनीही एकत्रच जेवण घेतले. आम्ही आमचे ताट भरून घेतले. पण मी पाण्याचा ग्लास घ्यायला विसरलो. ते मात्र, न विसरता माझ्यासाठी पाण्याचा ग्लास घेऊन आले. तेव्हा मलाच लाजल्यासारखं झालं. तिघंही मस्त रेमटून जेवलो. ‘आप अगर बाहर खाना खाते, तो आपका ज्यादा पैसा जाता. ७०-८० रुपये तो जरूर लगते…’ प्रदेश भाजपने सुरू केलेला हा उपक्रम किती उपयुक्त आहे, याचा प्रत्यय लगेचच आला. जेवण झाल्यानंतर थोड्या गप्पा मारल्या आणि मग माझी निघायची वेळ झाली. जाता जाता आठवण म्हणून त्यांचा एक फोटो काढला. निघताना म्हणाले, ‘आशिषजी, अगली बार गुना जरूर आईएगा…’ मी म्हटलं, ‘जरूर आऊंगा. पर आप मुझे आशिषजी मत कहिए. आशिष ही ठीक है.’ त्यावर त्यांचं उत्तर खूप विचार करायला लावणारं होतं. ते म्हणाले, ‘आशिषजी, दुसरे को बडा कहनेसे कोई आदमी छोटा नही होता. हम उमर में आप से बडे है. मग आप हमसे ज्यादा पढे लिखे है. इसलिए आपका सम्मान करना उचितही है…’

व्वा… काय वाक्य बोलला तो माणूस. शेकडो पुस्तकं आणि हजारो ग्रंथांमध्ये सापडणार नाही, असं एकदम साधं वाक्य तो ‘आम आदमी’ बोलून गेला. ‘दुसरे को बडा कहनेसे कोई आदमी छोटा नही होता.’ इंद्रेशसिंह विश्वकर्मा यांनी माझी भोपाळ ट्रीप वस्स्सूल करून टाकली.