Saturday, July 14, 2007

स्पर्धा न जिंकताही "ऑस्कर'!

रोम ः अपंगांच्या ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविणाऱ्या ऑस्कर पिस्टोरियस याने "गोल्डन गाला' स्पर्धेतही चमकदार कामगिरी नोंदवून उपस्थितांच्या टाळ्या मिळविल्या. मुख्य नव्हे तर पात्रता शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर राहूनही तोच चर्चेच्या केंद्रस्थानी होता, हे विशेष!

पुरुषांच्या 400 मीटरच्या पात्रता शर्यतीत त्याला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. चारशे मीटरच्या शर्यतीत स्टेफानो याने त्याला पराभूत केले; पण फक्त 0.18 सेकंदांनी. ऑस्करने ही शर्यत 46.90 सेकंदांमध्ये पूण केली. वास्तविक पाहता दुसऱ्या एखाद्या खेळाडूने ही कामगिरी नोंदविली असती तर त्याची दखलही कोणी घेतली नसती; पण ऑस्करच्या कामगिरीची दखल घेण्याचे एकमेव कारण म्हणजे दोन्ही पाय नसूनही त्याने नोंदविलेली लक्षवेधक कामगिरी.

गुडघ्याखाली धातूच्या पट्ट्या लावून जिद्द व चिकाटीच्या जोरावर धडधाकट धावपटूंना मागे टाकण्याच्या ऑस्करच्या कामगिरीला त्रिवार सलाम!! अपंगांच्या ऑलिंपिक स्पर्धेत 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत तो अजिंक्‍य ठरला आहे. मात्र, त्याला धडधाकट खेळाडूंच्या स्पर्धेत भाग घेण्याची त्याची मनापासून इच्छा होती. गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्‍स महासंघाने अपंग खेळाडूंच्या "कार्बन फायबर ब्लेड्‌स' वापरण्यावरील बंदी उठविली व "कार्बन फायबर ब्लेड्‌स' वापरून अपंग खेळाडू इतर खेळाडूंशी स्पर्धा करू शकतात, असे जाहीर केले. त्यामुळे रोम येथे पार पडलेल्या "गोल्डन गाला' स्पर्धेत ऑस्कर पिस्टोरियस सहभागी होऊ शकला.

आता त्याची इच्छा आहे ऑलिंपिकविजेता जेरेमी वॉर्नियर याने त्याला पराभूत करण्याची. रविवारी शेफिल्ड येथे ब्रिटिश ग्रांप्रि स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, तेथे ऑस्कर व जेरेमी परस्परांचे प्रतिस्पर्धी आहेत. याशिवाय त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे पुढील वर्षी बीजिंग येथे होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी पात्र ठरण्याचे.

मात्र, यासंदर्भात ऍथलेटिक्‍स महासंघाने प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. ऑस्करला धावताना "कार्बन फायबर ब्लेड्‌स'मुळे काही फायदा तर होत नाही, याची तपासणी महासंघ शेफिल्ड येथील शर्यतीदरम्यान करणार आहे.


ऑस्कर द ग्रेट!

दक्षिण आफ्रिकेत जन्मलेला ऑस्कर अपंगांच्या ऑलिंपिक स्पर्धेमुळे चर्चेत आला. "द फास्टेट थिंग ऑन नो लेग्ज' असा त्याचा गौरव केला जातो. जन्मतःच दोन्ही पायांना नडगीचे हाडच नसल्यामुळे पाचव्या महिन्यातच ऑस्करचे दोन्ही पाय कापावे लागले होते. शालेय स्तरावर असताना तो रग्बी आणि वॉटर पोलोच्या स्पर्धांमध्येही सहभागी होत असे.

दरम्यानच्या काळात दुखापतीमुळे त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याच काळात तो ऍथलेटिक्‍सच्या प्रेमात पडला व त्यानंतर त्याच्या गुडघ्याखाली "कार्बन फायबर ब्लेड्‌स' बसविण्यात आले आहेत. सध्या तो "युनिव्हर्सिटी ऑफ प्रिटोरिया' व्यवसाय व्यवस्थापन या विषयाचा अभ्यास करीत आहे.
-----------
कमाल ऑस्करच्या जिद्दीची
- अपंगांच्या शंभर, दोनशे आणि चारशे मीटरच्या शर्यतींचा जागतिक विक्रम.
- गेल्या तीन पॅरालिंपिक स्पर्धांमध्ये सुवर्णपदकांची लयलूट.
- 100 मी. - 10.91 सेकंदांत, 200 मी. -21.98 सेकंदांत, तर 400 मी. - 46.56 सेकंदांमध्ये पूर्ण करण्याचा विक्रम.
------------
फायबर ब्लेड्‌सचा वाद
- फायबर ब्लेड्‌स गरजेपेक्षा लांब त्यामुळे फायदा मिळत असल्याचा आक्षेप.
- ब्लेड्‌समुळे शर्यत सुरू करताना प्रचंड ताकद लागते, असे ऑस्करचे मत.
- ऑस्करच्या या मताचे मियालामीमधील प्राध्यापकांकडून समर्थन.
- ब्लेड्‌समुळे घसरून पडण्याची किंवा ब्लेड्‌स निखळण्याची शक्‍यता अधिक.

3 comments:

ऋयाम said...

namaskar.
Kolhapurcha ahe.
computer cha madhe kam karato ahe Japan madhe.

Anonymous said...

good one

Anonymous said...

IT JUST INSPIRES ME TO CONQUER THE WORLD...LIKE OSCAR