पळा पळा... लवकर पळा... पटकन गाडी काढ रे... उगाच लटकायचो... चल पळ लवकर... अशी वाक्य एखाद्या पत्रकाराच्या तोंडून कधी ऐकली आहेत का? थोडंसं मजेशीर वाटतं ना? हो पण असं घडलंय. ऐन गटारीच्या मुहूर्तावर रात्री एक वाजता...
स्थळ बाबा भिडे पुलाजवळील खाद्यपदार्थांचे स्टॉल. दृश्य नेहमीचेच म्हणजे सुमारे शंभर ते सव्वाशे टेबलांवर खाण्यासाठी किंवा कॉफी पिण्यासाठी जमलेले नागरिक. अचानक पोलिसांची गाडी येते. कोणालाही कल्पना नसताना टेबलवर जेवत बसलेल्या ग्राहकांवर पोलिसांचा लाठीमार सुरू होतो. या अनपेक्षित धक्क्यामुळं सारे ग्राहक जेवण सोडून पळत सुटतात. त्याचवेळी ऑफिसची काम आटोपून कॉफी पिण्यासाठी खडकेच्या स्टॉलवर जमलेल्या पत्रकारांनाही पळण्यावाचून पर्याय नसतो. फुकटच एखादी काठी आपल्यावर पडली तर काय घ्या!
खाया-पिया कुछ नही ग्लास तोडा बारा आना' अशी अवस्था होण्याच्या आत पळ काढलेला बरा नाही का?यानिमित्ताने पोलिसांचा माज अनुभवण्याची पुन्हा एकदा संधी मिळाली. केवळ ग्राहकांवर लाठीमार करुन ही मंडळी थांबली नाहीत. तर त्यांनी जेवणाची टेबलंही लाथाडली. होत्याचं नव्हतं करुन टाकलं. पुन्हा इथं दिसला तर याद राखा, अशा थाटात धमकाविण्यास त्यांनी सुरवात केली. दहशतीच्या दहा ते बारा मिनिटांमध्ये सारा परिसर मोकळा झाला. एव्हाना स्टॉलधारकांचे काही हजार "गटारात' गेलेले असतात अन् पोलिसांची "गटारी' साजरी झालेली असते.
गेल्या अनेक वर्षांपासून भिडे पुलाशेजारी (झेड पुलाखाली) खाद्यपदार्थांचे स्टॉल सुरू आहेत. रात्री उशिरा अगदी दीड वाजेपर्यंत हे स्टॉल सुरू असतात. त्यानंतर पोलिसांची गाडी येते आणि हळूहळू स्टॉल बंद होण्याची प्रक्रिया सुरू होते. हा इथला गेल्या कित्येक वर्षांपासूनचा अनुभव. पोलिस आल्यानंतर प्रथम स्टॉलधारकांना समजावून सांगतात आणि तरीही त्यांनी ऐकले नाही, तर त्यांच्यावर कारवाई करतात. ग्राहकांवर कारवाई करण्याची घटना आतापर्यंत घडलेली नव्हती. मात्र, गटारी अमावास्येच्या निमित्ताने काल ही कसरही भरून निघाली. रात्री "कर्तव्या'वर असलेले पोलिस अधिकारी आणि दोन-तीन हवालदार असा ताफा जीपमधून उतरला आणि त्यांनी पुढे मागे न पाहता टेबलांवर बसलेल्या ग्राहकांवर थेट लाठ्या उगारल्या. इतके करून ते थांबले नाहीत, तर शेवटपर्यंतची टेबल पायाने लाथाडली आणि लाठीमारही सुरूच ठेवला.
""तुम्ही माझ्यावर कारवाई करा पण ग्राहकांवर लाठीमार करू नका. आमच्या पाठीवर मारा पण पोटावर मारु नका,'' अशी विनंती स्टॉलधारकांनी केली; पण संबंधित अधिकाऱ्याने कोणालाच जुमानले नाही. ""गस्तीला येणाऱ्या बाकीच्या अधिकाऱ्यांचे मला माहिती नाही; पण मी राऊंडला आलो, की असेच होणार,'' असे प्रत्युत्तर "त्या' अधिकाऱ्याने दिले.आतापर्यंत अशी घटना कधीच घडलेली नसल्यामुळे भांबावलेले ग्राहक आपापल्या गाड्या घेऊन निघून जातात. त्यानंतर आपली काहीही चूक नसल्याची जाणीव झालेल्या स्टॉलधारकाचा आवाज चढतो. त्यासरशी त्याच्याशी संवाद मध्येच तोडून पोलिसांचा ताफाही निघून जातो.
मात्र त्याचवेळेस नदीकाठच्या रस्त्यांवर मोटारींमध्ये बसून मद्यप्राशनाचा आस्वाद लुटणाऱ्या शौकिनांकडे कर्तव्यावरील पोलिसांचे साधे लक्षही गेलेले नसते. आहे की नाही कमाल? एरवी चिकन किंवा मटण हाणून साजरी होणाऱ्या गटारीपेक्षा ही गटारी चांगलीच लक्षात राहणारी ठरली...