Thursday, October 28, 2010

माता न तू वैरिणी...

आणखी किती दिवस हे असं चालणार...

मुंबईमध्ये एका आईनं जुळ्या मुला-मुलींपैकी मुलीला पहिल्या मजल्यावरुन खाली फेकून दिल्याची घटना नुकतीच घडली. प्रत्यक्ष जन्मदातीच आपल्या मुलीला असं मृत्यूच्या तोंडात कसं ढकलून देऊ शकते. हा विचार फक्त सुन्न करणारा नाही तर हा विचारही करता येण्यापलिकडचा आहे. मुलगी अशक्त आहे किंवा तिचा सांभाळ करण्याची आपली आर्थिक कुवत नाही, अशी स्पष्टीकरणं देऊन कदाचित या कृत्याचा समर्थन केलंही जाईल. पण मला मात्र, हे अजिबात पटत नाही.

प्राणी जसे आपल्या पिल्लांना जन्म दिल्यानंतर वा-यावर सोडून देतात किंवा त्यांची फार फिकीर करत नाहीत, तसं माणूस कधीपासून वागायला लागला, हा प्रश्न मनात आल्यावाचून राहत नाही. आईचं हृदय इतकं राक्षसी कसं होऊ शकतं, मुलीला फेकून देण्यासाठी तिचे हात धजावतातच कसे, आपण मातृत्त्वाच्या नात्यालाच डाग लावतो आहोत किंवा महापाप करतो आहोत, असं तिला कसं वाटत नाही, याचंच आश्चर्य वाटतं.

दुसरी गोष्ट म्हणजे समजा ही सगळी कारणं मान्य केलीत तरी मग आईनं मुलीलाच का फेकलं, मुलाला का नाही. हा प्रश्न तर गेल्या अनेक पिढ्यांपासून आपल्याला सतावतो आहे. आजही स्त्री भ्रूण हत्येचं पाप करणारे हात या देशात आहेत, ही शरमेचीच गोष्ट म्हटली पाहिजे. खुद्द सायना नेहवालची आजीही लहानपणी तिचा राग राग करायची, असं नुकतंच पुढं आलंय. सायनाच्या आई-वडिलांनीही जर तशीच वागणूक सायनाला दिली असती तर आज अशी वर्ल्ड क्लास प्लेयर हिंदुस्थानला मिळाली असती का...

पाठोपाठ घडलेल्या या दोन गोष्टींमुळे स्त्री भ्रूण हत्या हा गंभीर विषय पुन्हा एकदा चर्चेत आला असून हे सारं कधी थांबणार... याचं उत्तर सध्या तरी कोणाकडेच नाही. जोपर्यंत आपण मानसिकता बदलत नाही तोपर्यंत तरी हे शक्य नाही. गेल्या काही वर्षांपासून ह्याच विषयावर फॉर्वर्डेड मेल फिरत आहेत. त्यापैकी तीन उत्तम जाहिराती खाली देत आहे. त्या वापरण्याची परवानगी आहे किंवा नाही, हे मला माहिती नाही. पण एका चांगल्या हेतूनं त्या वापरत आहे, त्यामुळं त्याला कोणाचीही हरकत नसावी, ही अपेक्षा...






No comments: