Friday, February 14, 2014

‘नौटंकी साला’ चित्रपटाचा हिरो

पळपुटा राजकारणी अरविंद केजरीवाल



‘रडतराव घोड्यावर बसले, ते काय तलवार चालविणार’ अशी मराठीमध्ये एक म्हण आहे. थोडक्यात म्हणजे एखाद्याची इच्छा नसताना बळजबरीने एखादी गोष्ट करण्यास सांगितली, तर त्याचा फज्जाज उडतो. दिल्लीचे औट घटकेचे मुख्यमंत्री, पळपुट्यांचे सरदार, राजकारणातील ‘नौटंकी साला’ चित्रपटाचे हिरो अरविंद केजरीवाल यांच्याबाबतीत ही म्हण अगदी तंतोतंत लागू आहे. ४८ दिवसांचा ड्रामा अखेरीस संपुष्टात आला आहे.

दिल्लीमध्ये ‘आप’चा झाडू सत्तेवर आल्यानंतर अनेक जणांनी विचारणा केली, की तुझा केजरीवालवर ब्लॉग नाही आला. तुला काय वाटतं, काय होईल वगैरे वगैरे. मी ह्याच दिवसाची वाट पाहत होतो. म्हणूनच लिहिलं नव्हतं. अखेरीस तो दिवस उगविला. आंदोलन, उपोषण आणि धरणे यापेक्षा इतर कोणतीही गोष्ट ‘आप’ल्याला जमत नाही, हे कळल्यानंतर केजरीवाल यांनी अखेरीस जनलोकपालाचा मुद्दा पुढे काढून राजीनाम्याचे अस्त्र उपसले. अर्थात, ही ‘आप’मतलबी मंडळी फार काळ सत्तेत राहूच शकत नाही, याचा अंदाज निवडणुकीनंतरच्या थोड्याच दिवसांमध्ये आला होता. 

स्टंटबाज, ढोंगी, हडेलहप्पी, हटवादी आणि अडेलतट्टू अशा अनेक शब्दांना केजरीवाल हा समानार्थी शब्द मिळाला आहे. ‘मी म्हणेन तसेच व्हायला पाहिजे. जे लोक आणि राजकीय पक्ष माझे ऐकणार नाहीत. मला आणि माझ्या ठरावांना पाठिंबा देणार नाहीत, ते सर्व भ्रष्ट, चुकीचे, नालायक आणि देशद्रोही,’ अशीच धारणा या केजरीवाल यांनी केली आहे. दिल्लीत निवडणुकांचे निकाल लक्षात घेतले तर त्यांनी काँग्रेसविरोधात कौल दिला होता. खरं तर  भाजप आणि केजरीवाल या दोघांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन करावी, असा कौल खरं तर मतदारांचा होता. पण ‘आम्ही कोणाला पाठिंबा देणार नाही आणि कोणाचा पाठिंबा घेणार नाही,’ अशी हटवादी भूमिका घेऊन केजरीवाल यांनी सुरुवातीला भाजपला दुखावले.
सत्तेच्या जवळ पोहोचून आणि सत्ता स्थापन करण्याची संधी असूनही आपण सरकार बनविले नाही, तर जनतेत चुकीचा संदेश जाईल, याची जाणीव केजरीवाल आणि सरदारांना झाली. पण भ्रष्टाचारात बरबटलेल्या काँग्रेसचा पाठिंबा घेतला, तर लोक तोंडात शेण घालतील, याची जाणीव झाली. मग त्यांनी काँग्रेस आणि भाजपला पत्र पाठवून अटी घातल्या. त्या अटी मान्य केल्या तर पाठिंबा घेऊ असले नाटक केले. भाजपला या नौटंकीच्या फंदात पडायचेच नव्हते, त्यामुळे त्यांनी पत्राला उत्तरही दिले नाही आणि ‘आप’मध्ये स्वारस्यही दाखविले नाही. काँग्रेसने मात्र, अचूक राजकीय खेळी खेळून केजरीवाल यांना कात्रीत पकडले.

काँग्रेस पाठिंबा देतेय, म्हटल्यानंतर ‘आप’चे नवे नाटक सुरू झाले. मतदारांपर्यंत जाऊन त्यांचा कौल आजमाविण्याचे. ई-मेल, एसएमएस, दूरध्वनी आणि जनसभांमधून केजरीवालांनी जनमत आजमावले. त्यांनी सरकार बनविण्यास संमती दर्शविली, म्हणून आम्ही सरकार बनवित आहोत, असा पवित्रा घेतला. अन्यथा आम्हाला सरकार बनविण्यात आणि सत्तेत येण्यात काहीही रस नाही, वगैरे पुरवण्याही जोडल्या. मुळाच काँग्रेसने तुमचा मामा बनविण्यासाठीच तुम्हाला पाठिंबा दिला होता, हे न समजण्याइतपत तुम्ही मूर्ख असाल, तर मग तुमचा असाच पोपट होणार. त्याला आणखी कोण काय करणार. शिवाय तुमच्याकडे योगेंद्र यादव यांच्यासारखा राजकीय विश्लेषक असूनही तुम्ही स्वतःचा पोपट करून घेण्याची स्वतःच तयारी करता, या बावळटपणाला काय म्हणावे. मग सुशीलकुमार शिंदे यांनी तुम्हाला ‘वेडा मुख्यमंत्री’ म्हटले तर त्यांची चुकले कुठे. तुम्ही आहातच मूर्ख. नुसते मूर्ख नाही तर अट्टल मूर्ख.

दुसरीकडे केजरीवाल यांचीही नाटके सुरूच होती. सरकारची गाडी घेणार नाही. वॅगन आर मधूनच जाणार. मेट्रोने शपथविधीला जाणार. सरकारी बंगला घेणार नाही. सुरक्षारक्षकांचा ताफा मला नको वगैरे वगैरे केजरी यांनी स्वतःचीच वॅगन आर वापरली. शेवटच्या दिवसापर्यंत. मेट्रोने शपथविधीला गेले. पण एकच दिवस. ही स्टंटबाजी संपते ना संपते तोच सरकारी घराचे नाटक जनतेसमोर आले. मी सरकारी घर घेणार नाही, अशी बोलबच्चन देणाऱ्या ‘नौटंकी’ने मस्त सहा सहा बेडरुमच्या ड्युप्लेक्स घरामध्ये रहायला जाण्याचा विचार चालविला होता. मात्र, माध्यमांमध्ये ही गोष्ट उघड झाल्यानंतर त्याने विचार बदलला. मात्र, स्वतःच्याच घरात न राहता शेवटी सरकारी घर घेतलेच. कारण पुढे केले, ते सुरक्षेच्या अडचणीचे. सुरक्षारक्षकांचेही तेच. मला सुरक्षा नको. मी ‘आम आदमी’ आहे, वगैरे भाषणबाजी केली. पण शेवटी सुरक्षारक्षकांचा ताफा केजरीवालांच्या घराबाहेर दिसायला लागला. बरं, केजरीवाल यांच्या तोंडी एकच टेप लावलेली असायची. ‘हमे सत्ता का मोह नही है.. मैं आम आदमी हूँ. जनलोकपाल लाना है,’ वगैरे वगैरे. त्या पलिकडे त्यांना काही दिसतच नव्हते. सरकार चालविण्यात त्यांचा अजिबात रस नसल्याचे पदोपदी जाणवत होते.

दुसरीकडे एकदा केजरीवाल सत्तेवर आल्यानंतर मग माध्यमांना तर ऊतच आला. मुळात माध्यमे ही एखाद्याला इतके झाडावर चढवितात, की आता त्या मंडळींशिवाय देशच चालणारच नाही, अशी परिस्थिती निर्माण करून टाकतात. केजरीवाल यांचेही असेच झाले. बास्स, आता एकच केजरीवाल. काँग्रेस, भाजप आणि इतर सगळे डब्ब्यात जाणार. देशभर केजरीवाल यांची हवा वगैरे वातावरण निर्मिती केली गेली. माध्यमांना असे च्युईंगम अधूनमधून लागतच असते. कधीकधी ते लवकर संपते. कधीकधी महिनोंमहिने चालू असते. केजरीवालांचे च्युईंगम पहिल्या पंधरा दिवसातच संपुष्टात आले. लवकरच माध्यमांचाही भ्रमनिरास झाला आणि त्यांनीही केजरीवाल यांची खेचण्यास प्रारंभ केला. केजरीवाल कसे उघडे पडत आहे, हे दाखविण्यास प्रारंभ केला. क्वचित प्रसंगी त्यांना स्वतःहून उघडे पाडले देखील. मग केजरीवाल यांनी माध्यमांवर भाजप-काँग्रेसचे हस्तक असल्याचा ठेवणीतला आरोप बाहेर काढला.

केजरीवाल सत्तेवर आल्यानंतर मग ते आणि त्यांचे सहकारी उघडे पडायला लागले. सोमनाथ भारती यांनी ‘नायक’मधील अनिल कपूर स्टाईलमध्ये मध्यरात्री रस्त्यावर उतरून पोलिसांना बरोबर घेऊन छापे टाकले. महिलांशी गैरवर्तन केले. त्यांच्याविषयी वंशभेदी टिपण्णी केली. त्यावरून रान उठले. महिला आणि महिला संघटना पेटल्या. कायदामंत्र्यांनी न्यायाधीशांची बैठक बोलविण्याचा प्रयत्न केला. तिथेही ते तोंडावर आपटले. महिलेला रात्री अटक करता येत नाही, इतकीही साधी माहिती कायदामंत्र्यांना नाही का, अशी विचारणा करीत सामान्य माणसाने सोमनाथ भारतींच्या अकलेचे वाभाडे काढले. शेवटी भारती यांचे छापे प्रकरण प्रचंड तापले आणि सोमनाथ भारतींचे हे भूत केजरीवालांच्या मानगुटीवर बसले ते उतरलेच नाही. मग सोमनाथ भारती प्रकरणावरून लक्ष हटविण्यासाठी केजरीवाल त्यांचे आवडते काम पुन्हा सुरू केले. दिल्ली पोलिसांना अधिकार मिळावे, म्हणून हा ढोंगीबाबा जंतरमंतरवर उपोषणाला बसला. आंदोलन आणि धरणे वगैरे हा त्यांचा छंदच आहे. महात्मा गांधी यांनी त्यांच्या आयुष्यात केली नसतील एवढे सत्याग्रह, उपोषणे आणि धरणे आंदोलने केजरीवाल त्यांच्या कारकिर्दीत करणार, याबाबत तिळमात्र शंका नाही. 


‘नौटंकी’ असलेल्या केजरीवालांनी आपण सरकारमध्ये आहोत, सत्तेवर आहोत, याचे गांभीर्य कधी बाळगलेच नाही. उठसूठ पोरकटपणा सुरूच असायचा. मध्यंतरी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मुलाखतीमध्ये सांगितले होते, की मुख्यमंत्र्यांनी साधेपणानेच रहावे. पण मुख्यमंत्री आहोत, हे लक्षात ठेवून वागावे. पर्रीकर हे सर्वाधिक साधे आणि खूप वर्षांपासून तसेच आहेत. त्यांनी साधेपणाची जाहिरातबाजी कधी केली नाही. पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री एन. रंगास्वामीही खूप साधे आहेत. कुठेही स्कूटरवर वगैरे फिरतात. त्यामुळे केजरीवाल यांच्या साधेपणाचे काही फार कौतुक करण्याची गरज नाही. पण माध्यमांनी एखाद्याला डोक्यावर चढवायचे ठरविले, की ते चढवितातच. तसेच केजरीवालांचे झाले. मात्र, अपेक्षांचे ओझे सहन न झाल्यामुळे त्यांनी जबाबदारीपासून पळून जाण्याचा निर्णय घेतला.

केजरीवालांची नाटके सुरू असतानाच आप आणि आपचे कार्यकर्ते यांनाही उधाण आले होते. लोक उगाच कारण नसताना डोक्यावर गांधी टोपी घालून हिंडू लागले. ‘आम आदमी पार्टी’ कशी सगळीकडे पसरतेय, अशा बातम्या येऊ लागल्या. कोण कोण आपमध्ये जॉइन झाले याचे वृत्त थडकू लागले. इन्फोसिसचा कुठल्या तरी खात्याचा प्रमुख, महात्मा गांधींचे वारसदार, कुठल्याशा मल्टिनॅशनल बँकेच्या प्रमुख बाई, मोदींविरोधात दणकून आपटलेल्या मल्लिका साराभाई आणि डी. एस. कुलकर्णी यांच्यासारखे सगळीकडचे पडेल उमेदवार ‘आप’मध्ये येणार अशा बातम्या ठळकपणे झळकू लागल्या. लोकांना ‘आप’ म्हणजे उद्याची आशा वाटू लागली. मुळात दिल्लीची पुनरावृत्ती देशभर होण्याची सूतराम शक्यता नाही. समाजमनात स्थान नसलेल्या आणि नवी आशा म्हणून ‘आप’मध्ये सहभागी झालेल्या असल्या हायप्रोफाईल मंडळींमुळे तर अजिबात नाही. राजकारणात येण्याचे निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे स्वागतच करायला हवे. मात्र, त्यांच्यामुळे ‘आप’ला यश मिळणे हे मृगजळ आहे. मात्र, माध्यमांनी तशी हवा तर निर्माण केली. तो बारही फुसका असल्याचे लवकरच स्पष्ट होईल.

नाटकी केजरीवालांनी केले, काय तर दिल्लीवासियांना फक्त काही महिन्यांसाठी सातशे लिटर पाणी मोफत दिले. नंतर पुन्हा एकदा परिस्थितीचा आढावा घेऊन फुकट पाणी देण्याबाबत विचार केला जाईल, असे जाहीर करून टाकले. विजेचे बिल भरणाऱ्या फुकट्यांचे बिल पन्नास टक्के माफ केले. मात्र, ज्यांनी बिल भरले त्यांना राज ठाकरे यांच्या भाषेत बोलायचे झाले तर ‘घंटा’ दिली. म्हणजे फुकट्या नि बिलबुडव्यांना केजरीवालांनी हात दिला. जे प्रामाणिकपणे बिल भरत होते, त्यांना काहीच दिले नाही. झोपडपट्टीत राहणाऱ्यांना मोफत घर देण्याचे आश्वासन पूर्ण करेपर्यंत ते सत्तेवरच राहिले नाहीत. जनलोकपाल या विधेयकाचा मुद्दा प्रतिष्ठेचा करून त्यांनी स्वतःची सुटका करून घेतली. 

आता पुन्हा एकदा जंतरमंतर आणि रामलीलावर पोरकटपणे आंदोलन करण्यास आणि उपोषणे-धरणे हा शिवाशिवीचा खेळ खेळण्यास ते सज्ज झाले आहेत. मतदारांनी भरघोस मतांनी निवडून दिल्यानंतरही केजरीवाल ‘भरवशाच्या म्हशीला टोणगा’ ठरले आहेत. साधेपणाचे ढोंग, जनलोकपाल आणि चमकोगिरी त्यांची त्यांनाच लखलाभ. ‘आप’ला मतदान करून काहीही फायदा नाही. त्यांची सरकार चालविण्याची लायकीच नाही (औकात हा शब्द अधिक योग्य वाटतो का?) यावर केजरीवाल आणि त्यांच्या नौंटकी सरदारांनी शिक्कामोर्तब केले आहे. तेव्हा असल्या आपमतलबी लोकांच्या नादी न लागता मतदारांनी सूज्ञपणे निर्णय घेऊन मतदान करावे, हीच अपेक्षा. पुन्हा दिल्लीत हे आपमतलबी आणि पळपुटे लोक सत्तेवर येऊ नये, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

केजरीवाल यांना भविष्यातील आंदोलने, उपोषण, धरणे, सत्याग्रह, मोर्चे, ठिय्या आंदोलन आणि इतर गांधीवादी मार्गांनी आंदोलनांसाठी शुभेच्छा... कारण तुम्ही फक्त तेवढेच करू शकता. तेवढेच करा.

2 comments:

Unknown said...

Tumhi Bolala Te 1000 % Brobar ahe.

Unknown said...
This comment has been removed by the author.