Showing posts with label Maharashtra. Show all posts
Showing posts with label Maharashtra. Show all posts

Monday, January 11, 2016

संघशक्तीचा अपूर्व संगम



महाराष्ट्रातही दिसली संघाची ताकद

आयुष्यात काही प्रसंग, घटना किंवा आंदोलने अशी असतात, की जे अनुभवण्याची संधी क्वचितच मिळते. वैयक्तिक आयुष्यातही आणि संघटनेच्या आयुष्यातही. अशा दुर्मिळ प्रसंगांचे जे साक्षीदार होतात, ते स्वतःला भाग्यवान समजतात. त्यासाठी तळजाईचे शिबिर किंवा रामजन्मभूमीचे आंदोलन अशी काही उदाहरणे देता येतील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या अपूर्व अशा शिवशक्ती संगमला अशाच कार्यक्रमांच्या पंक्तीत बसविले पाहिजे. केरळ, मेंगळुरू, कर्नाटकातील इतर शहरे, महाकोशल वगैरे प्रांतांमध्ये झालेल्या संघाच्या भव्य एकत्रीकरणांच्या बातम्या आपण नेहमीच वाचतो. त्यांच्या ध्वनिचित्रफिती पाहून आनंदी होतो. मात्र, महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे अतिभव्य एकत्रीकरण आपण का घेऊ शकत नाही, याची सल प्रत्येक स्वयंसेवकाच्या मनात होती. ती सल शिवशक्ती संगमच्या निमित्ताने दूर झाली आहे.

महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने संघाचे भव्यदिव्य शिबिर गेल्या काही दशकांमध्ये पार पडले नव्हते. प्रत्येक वेळी दाखला दिला जायचा तो १९८३ साली पार पडलेल्या तळजाईच्या शिबिराचा. त्यानंतर संघाचे अशा प्रकारे अतिविराट एकत्रीकरण महाराष्ट्रात झाले नव्हते. माजी सरसंघचालक माननीय राजेंद्रसिंहजी उर्फ रज्जूभय्या यांना मानवंदना देण्यासाठी २००० किंवा २००१ मध्ये मुंबईत शिवाजी पार्कवर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माटुंग्याहून संचलन करून शिवाजी पार्कवर पोहोचल्यानंतर तिथे सरसंघचालक प्रणाम आणि मा. रज्जूभैय्या यांचे बोलणे, असा कार्यक्रम होता. मात्र, संख्यात्मकदृष्ट्या तो कार्यक्रम तळजाईच्या शिबिराला मागे टाकू शकला नव्हता. मुंबई म्हणजे राज्याच्या एका टोकाला असलेले स्थान हा त्यामधील मुख्य अडसर ठरला असावा. त्यामुळेच यावेळी संघाने नव्या रचनेतील प्रांतशः एकत्रीकरण घेण्याचे ऩिश्चित केले असावे. मध्यंतरी मराठवाडा प्रांताचे एकत्रीकरण औरंगाबाद येथे पार पडले आणि आता पुण्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे शिवशक्ती संगम हे ‘न भूतो’ असे एकत्रीकरण मोठ्या दिमाखात संपन्न झाले.


नाशिक, नगर, पुणे महानगर, पुणे जिल्हा, सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमधून स्वयंसेवक संपूर्ण गणवेशात (दंड नाही) जांबे, नेरे आणि मारुंजी या तीन गावांच्या सीमांवर आय़ोजित करण्यात आलेल्या शिवशक्ती संगममध्ये सहभागी झाले. पश्चिम महाराष्ट्रातील जवळपास एक लाख साठ हजार स्वयंसेवकांनी या संगमसाठी नोंदणी केली होती नि त्यापैकी निम्म्याहून अधिक स्वसंयेवक गणवेशात उपस्थित राहिले. पन्नास ते साठ हजारहून अधिक नागरिक हा भव्यदिव्य सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ पाहण्यासाठी मारुंजी येथे आवर्जून आले होते. त्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांचाही समावेश होता.

भोजनासह सर्व व्यवस्था अत्यंत चोखपणे आणि ठरलेल्या नियोजनानुसार पार पडत होत्या. कुठे धक्काबुक्की नाही. चेंगराचेंगरी नाही. सारे काही शिस्तीत. हीच शिस्त कार्यक्रम संपल्यानंतरही अनुभवायला मिळत होती. कार्यक्रम संपल्यानंतरही कुठे महिलांच्या छेडछाडीच्या घटना घडल्या नाहीत. रस्त्यावरील दुकाने लुटल्याच्या बातम्या छापून आल्या नाहीत. अपघाताच्या घटना घडल्या नाहीत. दारू पिऊन धिंगाणा घातल्याचे वृत्त कानावर आले नाही. इतर राजकीय पक्ष (काही सन्मान्य अपवाद वगळता) आणि संघटनांच्या महाएकत्रीकरणानंतर जे जे ऐकायला मिळते, त्यापैकी कशाचाही अनुभव शिवशक्ती संगम संपल्यानंतर आला नाही. हे संघाचे आणखी एक वैशिष्ट्य.


कार्यक्रमाच्या मुख्य प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेला धनुष्यबाण अनेकांचे लक्ष वेधून घेत होता. भुवयाही उंचवायला लावत होता. मात्र, संघाचे संघटन हे हिंदूंचे आहे. हिंदुत्वाला मानणाऱ्यांचे आहे. हिंदुत्वाचा विचार करणारे कोणीही आम्हाला परके नाही. हाच संदेश देण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारावर धनुष्यबाणाची प्रतिकृती साकारण्यात आली होती. प्रभू श्रीरामचंद्रांचा हा धनुष्यबाण सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरला होता.

मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी उभारलेले भव्यदिव्य असे व्यासपीठ आणि अत्यंत शिस्तबद्धपणे करण्यात आलेली आखणी, चर्चेचा विषय ठरली होती. संघस्थानाच्या परिसरात शिवकालीन वातावरण निर्माण करण्यात आले होते. विविध किल्ल्यांमधील दिंडी दरवाजांच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या होत्या. तटबंदीचे स्वरुप देण्यात आले होते. छत्रपती शिवराय आणि त्यांच्या मावळ्यांचे पुतळे, हत्ती, आणि घोड्यांच्या प्रतिकृती शिवकालात घेऊन जात होत्या. महाराष्ट्रातील सामाजिक महापुरुषांची शिल्प साकारण्यात आली होती. कार्यक्रमाला येणारा प्रत्येक जण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले, महर्षि धोंडो केशव कर्वे, अण्णा भाऊ साठे, सयाजीराव गायकवाड, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू संत तुकाराम यांच्या पुतळ्यांपाशी आवर्जून थांबत होता. हात जोडत होता. अभिवादन करत होता.

तीन जानेवारीचा अनुभव ज्यांनी घेतला, त्यांना संघाच्या विराट रुपाचे दर्शन घडले. रविवारी सकाळी नऊ वाजल्यापासूनच स्वयंसेवकांचे जथ्थेच्या जथ्थे संघस्थानाच्या दिशेने येताना दिसत होते. अगदी दुपारी दोन-अडीच वाजेपर्यंत ‘जनांचा प्रवाहो’ मारुंजीमध्ये दाखल होत होता. त्यांच्यात उत्साह होता, आपण एका भव्यदिव्य कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी आलो आहोत, याचा आनंद चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. जगातील सर्वाधिक मोठ्या संघटनेचा आपण एक बिंदू आहोत, याचा स्वाभिमान त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होत होता. नोंदणी न झालेल्या पण शिवशक्ती संगमचा भाग होण्यासाठी उत्सुक असलेल्या स्वयंसेवकांसाठी ऐनवेळी नोंदणी करण्याची सवलत देण्यात आली होती. त्या ठिकाणीही लांबच लांब रांगा लागल्या होत्या. गणवेशाची पूर्तता करण्यासाठीही अनेकांची धावपळ सुरू होती.


आपल्या वडिलांचे बोट धरून आलेल्या छोट्या स्वयंसेवकांपासून ते शंभरी पार ज्येष्ठ स्वयंसेवकांपर्यंत अनेक जण खास शिवशक्ती संगमसाठी उपस्थित होते. एकाच कुटुंबातील आठ-दहा जण, एकाच घरातील चार पिढ्या अशीही दृष्ये बघायला मिळत होती. काही जणांनी खास शिवशक्ती संगमसाठी गणवेश पूर्ण केला होता. अनेकांनी प्रथमच संघाची अर्धी विजार चढविली होती. संघकामापासून काही वर्षे दूर गेलेले स्वयंसेवकही सारे काही विसरून या एकत्रीकरणासाठी उपस्थित होते. संघकामाचे एक वैशिष्ट्य आहे. एखादी व्यक्ती संघाच्या तत्कालीन अधिकाऱ्यांवर, संघाच्या भूमिका किंवा निर्णयांवर जरूर नाराज होते. काही काळ संघकामापासून दूर जाते. पण बहुतांश स्वयंसेवकांच्या मनात संघाबद्दल कटू भाव नसतात. त्यामुळे ते स्वयंसेवक या ना त्या निमित्ताने पुन्हा एकदा रचनेमध्ये फिट्ट बसतात. असेही काही स्वयंसेवक शिवशक्ती संगमच्या निमित्ताने पुन्हा एकदा नव्या उमेदीने कामासाठी सज्ज झालेले दिसले.

स्वयंसेवकांच्या आगमनापासून ते संघस्थानावर जाईपर्यंत सर्वच कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्धपणे आणि नियोजनाप्रमाणे सुरू होते. सिद्धता केंद्रांमध्ये नोंदणी करण्याचे काम असो किंवा भोजनाची रांग असो, सर्वच ठिकाणी संघाची शिस्त ठायीठायी दिसत होती. शिवशक्ती संगमच्या परिसरात लाख-सव्वा लाख स्वयंसेवक आहेत आणि तरीही सर्व कार्यक्रम शांतपणे सुरू आहे, हे त्रयस्थ माणसाला सांगितले असते, तर विश्वासही बसला नसता. इतकी शांतता आणि शिस्त सर्वत्र होती. अर्थात, संघाचा कार्यक्रम आहे, याचा अर्थ तो शिस्तबद्धपणे आणि वक्तशीरच होणार, यात नवीन ते काही नाही. त्याचाच प्रत्यय शिवशक्ती संगमच्या निमित्ताने आला इतकेच.


संघ ब्राह्मणांचा आहे, संघ उच्चवर्णीयांचा आहे, संघ शहरी लोकांचा आहे, संघ उच्चशिक्षितांचा आहे, संघ म्हाताऱ्यांचा आहे, अशी टीका संघावर अनेकदा होते. अशी टीका करणारी मंडळी जर मारुंजीमध्ये उपस्थित असती, तर त्यांची तोंडे कायमची बंद झाली असती. सर्व सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्तरातील स्वयंसेवक या एकत्रीकरणाला उपस्थित होते. संघाने जात-धर्म कधीच पाळला नाही, त्यामुळे कोणत्या जातीचे किती होते वगैरे चर्चा करण्यात काहीच हशील नाही. राहता राहिला प्रश्न वयाचा, तर शिवशक्ती संगमला जवळपास चाळीस टक्के संख्या ही तरुणांची होती. संघदृष्ट्या तरूण नव्हे तर लौकिक अर्थाने ज्यांना तरुण म्हणता येईल, असे तरूण. त्यामुळे संघावर होणाऱ्या सर्व आरोपांना शिवशक्ती संगमच्या माध्यमातून आपसूक उत्तर मिळाले.

संघावर होणार आणखी एक आरोप म्हणजे संघामधील महिलांचा सहभाग. राष्ट्र सेविका समिती आणि संघ परिवारातील विविध संघटनांशी संबंधित अशा हजारो महिला शिवशक्ती संगमच्या व्यवस्थेमध्ये सहभागी झाल्या होत्या. भगवे दुपट्टे परिधान केलेल्या शेकडो महिलांचे लोंढेच्या लोंढे सोपविलेल्या व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडण्यासाठी मारुंजी येथे येऊन धडकत होते. सिद्धता केंद्र वगळता सर्वच व्यवस्थांमध्ये महिलांचा सहभाग पहायला मिळत होता. शिवाय बाहेरगावाहून आलेल्या स्वयंसेवकांना परत जाताना शिदोरी देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. जवळपास अकरा लाख पुऱ्या जमा करण्याचा विश्वविक्रम या निमित्ताने नोंदला गेला. त्याची बहुतांश व्यवस्था ही महिलांनीच पार पाडल्यामुळेत त्यांच्या सहभागाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांचे सारे प्रश्न वासलात निघाले.

अनेकदा संघाच्या शाखांवर टीका होते. हे काय पाच-दहा स्वयंसेवक एकत्र येतात आणि एक तासानंतर आपापल्या घरी जातात. अशातून काय राष्ट्रकार्य साध्य होणार आहे, अशी टीका अनादि काळापासून सर्रास होताना दिसते. मात्र, शिवशक्तीच्या निमित्ताने संघाच्या स्वयंसेवकांचे जे विराट रुप समाजाला दिसले, त्यातून संघ स्वयंसेवकांमध्ये दुर्दम्य असा आत्मविश्वास निर्माण झालेला पहायला मिळाला. शाखेत जरी आम्ही दहा-पंधरा असलो, तरीही आमची संघटना लाखो-करोडो स्वयंसेवकांची आहे, हे स्वयंसेवकांना समजले. समाजातील कोणत्याही समस्येवर किंवा अडचणींवर संघशक्तीच्या जोरावर आपण लीलया मात करू शकतो, असा ठाम विश्वास स्वयंसेवकांमध्ये पहायला मिळाला. ज्या गावांत आतापर्यंत संघ किंवा संघाचे स्वयंसेवक पोहोचू शकले नव्हते, अशा सर्व ठिकाणांपर्यंत शिवशक्तीच्या निमित्ताने संपर्क झाला. काही नवीन कार्यकर्ते संघकामामध्ये आले. नवीन गावे जोडली गेली. त्यामुळे संघाचा हा कार्यक्रम घेण्यामागचा जो मूळ उद्देश होता, तो या निमित्ताने साध्य झाल्याचे दिसून आले. 



माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावरही शिवशक्तीच्या अपूर्व संगमाचे जोरदार पडघम वाजताना दिसले. अगदी परदेशी माध्यमे आणि वृत्तसंस्थांचे प्रतिनिधीही या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे वार्तांकन करण्यासाठी जातीने उपस्थित होते. भारतातील इंग्रजी, हिंदी आणि मराठी माध्यमांचे (प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक दोन्हीही) प्रतिनिधीही मारुंजी येथे हजर होते. अनेकांनी तर कार्यक्रमाचे आणि परमपूजनीय सरसंघचालकांचे भाषण लाइव्ह प्रसारित केले. दुसऱ्या दिवशीही सर्वच वृत्तपत्रांमध्ये कार्यक्रमाचे उत्तम वार्तांकन पहायला-वाचायला मिळाले. फेसबुक आणि ट्वीटरवर तर शिवशक्ती संगमचा ट्रेंड झालेला पहायला मिळाला. जो तो या अपूर्व संगमाची आठवण आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात किंवा कॅमेऱ्यामध्ये साठवून घेण्यासाठी धडपडत होता. ड्रोनच्या माध्यमातून होणारी फोटोग्राफी आणि शूटिंग, ड्रोनमधून होणारी पुष्पवृष्टी असे काही हटके प्रकारही या निमित्ताने अनुभवायला मिळाले.

शिवशक्ती संगममध्ये आलेला प्रत्येक जण ते वातावरण पाहून भारून गेला होता. असेच दोन अनुभव या निमित्ताने मला अनुभवता आले. पहिला अनुभव संघाच्या ज्येष्ठ प्रचारकांचा. शिवशक्ती संगमचे भव्य व्यासपीठ आणि इतर व्यवस्था पाहून या प्रचारकांची प्रतिक्रिया काय होती… ‘आज जरी मला देवाने बोलवून घेतले, तरी मी आनंदाने जायला तयार आहे. माझ्या आयुष्याचे सार्थक झाले, असे मी मानतो.’

संघाचे खूप जुने आणि निष्ठावंत स्वयंसेवक सु. ह. जोशी शिवशक्ती संगममध्ये भेटले. ‘अभूतपूर्व. डॉक्टरांनी लावलेल्या रोपट्याचे विशाल वृक्षामध्ये रुपांतर झाले आहे. आणि मी या क्षणांचा साक्षीदार आहे, हे मी माझे भाग्य समजतो. डॉक्टरांची पुण्याई, त्यांची दूरदृष्टी आणि संघाच्या स्वयंसेवकांची अपार मेहनत यांच्यामुळेच हे क्षण आज आपल्याला अनुभवायला मिळत आहेत.’ जवळपास प्रत्येक स्वयंसेवकांच्या मनातील भावनाच सुहंनी त्यावेळी व्यक्त केली.

शिवशक्तीच्या अपूर्व संगमाला आणखी एक किनार आहे. केरळ आणि कर्नाटकमध्ये यापूर्वी अशा पद्धतीचे कार्यक्रम अनेकदा झाले असतील आणि इतक्या वर्षांनंतर महाराष्ट्रात असे कार्यक्रम होत आहेत. वास्तविक पाहता, नागपूरनंतर संघाचे काम सर्वप्रथम पुण्यात सुरू झाले नि नंतर पश्चिम महाराष्ट्रात. मात्र, तरीही इतक्या वर्षांमध्ये अतिविराट कार्यक्रम घेणे संघाला जमले नव्हते. त्याची अनेक कारणे असतील. पण मला वाटते, की त्यापैकी महत्त्वाचे कारण म्हणजे गांधीहत्येनंतर संघकामाला बसलेला फटका. 


असे म्हणतात, की गांधीहत्येनंतर संघाचे काम पन्नास वर्षे मागे गेले. संघाचे काम करणाऱ्या अनेकांना त्याचा चटका बसला. संघाच्या स्वयंसेवकांची घरे जाळली, त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यात आला. हे हेतुपुरस्सर करण्यात आले होते. त्या चटक्यामुळे अनेक जण संघापासून आणि संघकामापासून दूर गेले. अनेकांनी संघाशी असलेले संबंध तोडले. त्यामुळेच संघाचे काम अनेक वर्षे मागे गेले. मात्र, अशाही परिस्थितीत संघविचारांवर निष्ठा ठेवून जी मंडळी, जे स्वयंसेवक संघकामात कार्यरत राहिले, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही ज्यांनी संघविचारांची पालखी खाली ठेवली नाही, अशा सर्वांच्या प्रयत्नांचे यश म्हणजे शिवशक्ती संगम आहे.

केंद्रात सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण खूप गाजले होते. त्यात मोदी म्हणाले होते, की हे माझे एकट्याचे यश नाही. भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचे हे यश आहे. इतकेच नाही, तर जनसंघ आणि भाजपला गावागावांत पोहोचविण्यासाठी ज्या चार-पाच पिढ्या खपल्या त्या सर्व पिढ्यांमुळे आपण हा दिवस पाहू शकतो आहोत. शिवशक्ती संमगच्या बाबतीतही तेच लागू आहे. शिवशक्ती संगमसाठी गेली दोन वर्षे झटणाऱ्या प्रत्येक स्वयंवसेकाचे आणि अधिकाऱ्यांचे हे यश आहे. त्याचप्रमाणे संघावर गांधीहत्येचा आरोप झाल्यानंतरही विचलित न होता संघकाम सुरूच ठेवणाऱ्या आणि आणीबाणीत महिन्मोमहिने तुरुंगात काढावे लागल्यानंतरही हसतमुखाने पुन्हा संघाच्या दैनंदिन कामात सहभागी झालेल्या स्वयंसेवकांचे हे यश आहे. राकट, कणखर आणि काळ्या पाषाणापासून बनलेल्या महाराष्ट्रात संघाची पाळेमुळे रुजविण्यासाठी धडपडणाऱ्या संघाच्या चार-पाच पिढ्यांमधील अधिकाऱ्यांचे, प्रचारकांचे आणि स्वयंसेवकांचे हे यश आहे.

१९४८ साली गांधी हत्येमुळे संघाला फटका बसला आणि संघाचे काम ५० वर्षे मागे गेले, असे जर मान्य केले. तर २०१५ साली पार पडलेल्या अपूर्व अशा शिवशक्ती संगममुळे संघाचे काम पुन्हा एकदा पूर्वपदावर आले आहे, असे म्हणायला हरकत नाही. आणि हेच शिवशक्ती संगमच्या आय़ोजनाचे यश आहे.


(विवेकच्या मंथन पेजवर प्रसिद्ध झालेला लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...)

कोण म्हणते संघ कामात महिलांचे योगदान नाही?


(काही छायाचित्रे मिलिंद वेर्लेकर यांच्या फेसबुक वॉलवरून साभाjर...)

Sunday, November 16, 2014

नाही, नाही, नाही म्हणजे हो...

भाजप-‘भ्रष्टवादी’ युतीचा विजय असो...

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यामुळे सध्या भारतीय जनता पक्षाला आणि भारतालाही ‘अच्छे दिन’ आल्याची चर्चा आहे. सध्याच्या घडीला देशात आणि भाजपमध्येही ‘मोदी म्हणतील तीच पूर्व दिशा’ आहे. मोदींचा शब्द सगळीकडे अंतिम आहे. ‘विकासपुरुष’ मोदी यांच्याकडे सर्व समस्यांवर ‘अक्सिर इलाज’ असल्याचे चित्र असून, त्यांच्याविरोधात बोलण्याची काही सोय उरलेली नाही. मोदी यांच्या विरोधात बोललात किंवा त्यांच्या विरोधात गेलात, तर परिस्थिती कोणत्या थराला जाऊ शकते, याचा प्रत्यक्ष अनुभव सध्या शिवसेना आणि मुख्यतः उद्धव ठाकरे घेत आहेत.



महाराष्ट्राला आणि शिवसेनेला हा अनुभव नवा असला, तरीही गुजरातला हा प्रकार नवा नाही. ‘तुम्ही एकतर माझ्या बाजूने असाल किंवा नसाल,’ हा नरेंद्र मोदी यांच्या राजकारणाचा मंत्र आहे. त्यांच्या विरोधात राहण्याची सोय नाही. मोदी यांनी त्यांच्या राजकीय विरोधकांची, गुजरातमध्ये आणि देशात काँग्रेसची जी अवस्था झाली आहे, त्यातून याचा नेमका अंदाज येतो. नेमक्या त्या घटना कशा घडतात, कोणाचा त्यामागे हात असतो, याचा थांगपत्ताही लागत नाही. मात्र, सर्व गोष्टी योग्य पद्धतीने आणि योग्यवेळी घडत जातात.

गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल, सुरेश मेहता आणि त्यांच्या समर्थकांची नरेंद्र मोदी यांनी केलेली अवस्था पाहिली, तर मला नेमके काय म्हणायचे आहे, ते आपल्याला कळेल. एकेकाळी गुजरात भाजपावर हुकुमत गाजविणाऱ्या संजय जोशी यांची अचानक एका महिलेबरोबर सीडी कशी सापडते, याचा उलगडा भल्याभल्यांना झालेला नाही. पुढे संजय जोशी यांचे निर्दोषत्व सिद्ध झाले असले, तरी त्यांची राजकीय कारकीर्द तूर्त संपलीच आहे.  

काही वर्षांपूर्वी गुजरातचे माजी गृह राज्यमंत्री हरेन पंड्या यांची संशयास्पदपणे हत्या झाली आणि त्यांच्या मारेकऱ्यांना आजपर्यंत शिक्षा होऊ शकली नाही. यामागे कोण आहेत, याबद्दल काहीही दावा करणे अवघड आहे. अशक्य आहे. पण मग प्रशासनावर घट्ट पकड असलेल्या नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मारेकऱ्यांचा छडा का लावला नाही, हा प्रश्न राहून राहून पडतोच. नितीन गडकरी यांना दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची टर्म मिळण्याची शक्यता असतानाच अचानक त्यांच्यावर माध्यमांमधून आरोपांचा भडिमार सुरू होतो नि अध्यक्षपद हुकते. भाजपमधील काही नेतेच या पाठीमागे असल्याची चर्चा माध्यमांमध्ये रंगते. सर्व घटनांचे ‘टायमिंग’ अचूक असते आणि त्यांचे कर्ते-करविते मात्र अजूनही सापडत नाहीत. त्यामुळे संशयाचे मोहोळ कायम राहते.

एकच विचारधारा असलेल्या शिवसेनेवर मोदींचा राग का असावा बुवा? २००२ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुखांनी मोदींची पाठराखण केली होती. ‘टग्या सगळ्यांना पुरून उरला,’ अशा शब्दांत गोध्राच्या दंगलप्रकरणी नरेंद्र मोदी यांचे बाळासाहेब ठाकरे यांनी समर्थन केले होते. ‘मोदींना हटवू नका,’ अशी विनंती त्यांनी भाजपकडे केली होती. कठीण प्रसंगात शिवसेना बाजूने उभी होती, हे मोदी विसरले आणि नंतर घडलेल्या गोष्टी मात्र त्यांनी चांगल्याच लक्षात ठेवल्या. म्हणजे कोणत्या, तर शिवसेनेने पंतप्रधानपदासाठी सुषमा स्वराज यांचे पुढे केले. त्याचा राग मोदी यांच्या मनात असावा. शिवाय ‘सामना’तून अधूनमधून मोदींनाही चिमटे काढले जाऊ लागले. लालकृष्ण अडवाणींची महती गायली जाऊ लागली. त्याचाही परिणाम मोदींचा राग तीव्र होण्यात झाला असावा.


एकतर भाजपकडे नरेंद्र मोदी यांच्यासारखा हुकुमाचा एक्का होता. त्यामुळे मोदी आणि अमित शहा यांच्या निवडणूक कौशल्यांच्या जोरावर भाजपाला एकहाती सत्ता मिळेल, अशी आशा भाजपचे धुरीण बाळगून होते. त्यामुळेच भाजपने ठरवून युती तोडली. कोणी कितीही काही म्हणो, ‘शत प्रतिशत’ भाजपचे धोरण राबविण्यासाठी पद्धतशीरपणे युती तोडण्यात आली. नंतर ‘आम्ही टीका करणार नाही आणि त्यांनी टीका केली, तरी उत्तर देणार नाही,’ ही खेळीही सेनेला अडचणीत आणण्यासाठीच रचण्यात आली होती. तसे झाले असते तर सेना २५-३० च्या घरातच अडकली असती नि भाजपला कदाचित एकहाती सत्ता मिळाली असती. मात्र, उद्धव यांनी मोदी आणि भाजप यांना अंगावर घेण्याचा निर्णय घेतला. मराठी विरुद्ध गुजराती अस्मितेचा मुद्दा उपस्थित केला. भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले. जोरदार प्रहार केले. एकीकडे मोदी यांच्या २७ सभा, भाजपाचे देशातील विविध मुख्यमंत्री, मंत्री, नेते आणि कार्यकर्ते प्रचारासाठी आलेले. प्रचंड मोठ्या प्रमाणावर पैसा ओतण्यात आला होता. इतके सगळे असूनही शिवसेना ६३ पर्यंत पोहोचली. ती उद्धव यांनी भाजपला अंगावर घेतल्यामुळेच. म्हणजे टीका न करता जितक्या जागा मिळाल्या असत्या, त्याच्या दुप्पट.
तेव्हा ‘उद्धव यांनी उगाच टीका केली, अशी टीका करायला नको होती,’ वगैरे म्हणण्यात काही हशील नाही. ‘मला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आदर आहे. मी त्यांच्याविरुद्ध एकही शब्द बोलणार नाही,’ असे म्हणणाऱ्या मोदींच्या पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेला उंदीर करण्याची भाषा नव्हती का केली? तेव्हा पातळी दोन्हीकडून सोडली गेली होती, हे मान्य केले पाहिजे.

उद्धव ठाकरे यांनी भाजप नेत्यांच्या फौजेला अफझलखानाची पलटण अशी उपमा दिली आणि मोदी भलतेच दुखावले. प्रखर हिंदुत्ववादी म्हणून तयार झालेल्या प्रतिमेला शिवसेनेने नख लावले. हा घाव मोदींच्या वर्मी लागला. शिवसेनेशी पुन्हा समझोता नाही, हे त्याच वेळी निश्चित झाले असावे. ‘दोपहर का सामना’तून मोदींचे वडील दामोदरदास यांचा वाईट पद्धतीने उल्लेख करण्यात आला. (ही सर्वस्वी चूक होती, हे मान्य केलेच पाहिजे.) या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणजे भाजपने शिवसेनेला त्यांची जागा दाखवून देण्याचा चंग बांधला. कोणत्याही परिस्थिती शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घ्यायचे नाही, हे भाजपने पहिल्या दिवसापासूनच ठरविले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने न मागता पाठिंबा जाहीर करून टाकला. ही खेळी देखील भाजपच्या निर्देशावरूनच झाली, असे म्हणण्यास पुरेपूर वाव आहे.

वास्तविक जनतेने कौल भाजप-शिवसेना युतीच्याच बाजूने दिला होता. म्हणजे दोघांनी मिळून सरकार स्थापावे, हा जनादेश होता. त्यात मोठा भाऊ भाजप असेल आणि शिवसेना छोटा भाऊ हेही जनतेने स्पष्टपणे सांगितले होते. मंत्रिमंडळात दोनास एक या प्रमाणात मंत्रिपदे हा तोडगा अत्यंत योग्य होता. मात्र, भाजपला शिवसेना बरोबर नकोच होती. त्यामुळे त्यांनी शिवसेनेला झुलवत ठेवले. कधी मंत्रिपदाच्या संख्येचे, तर कधी शिवसेनेकडून होणाऱ्या मागण्यांचे कारण पुढे करून. दुसरीकडे राष्ट्रवादीचा पाठिंबा घेण्याऐवजी भाजप आपला पाठिंबा घेईल आणि त्यानिमित्ताने आपल्याला काही मंत्रिपदांवर दावा ठोकता येईल, अशा भ्रमात उद्धव ठाकरे राहिले. पंचवीस वर्षांची युती आणि हिंदुत्वाचा विचार वगैरे मुद्दे पुढे करण्यात आले; पण भाजपला शिवसेनेची साथ नकोच होती आणि इथून पुढेही नकोय. मात्र, तरीही चर्चेच्या फेऱ्यांमध्ये शिवसेनेला अडकवायचे, हेलपाटे मारायला लावायचे, शिवसेना मंत्रिपदासाठी कशी लाचार आहे, हे माध्यमांमधून चित्र रंगवायचे या रणनीतीमध्ये भाजपचे नेते यशस्वी झाले.


या रणनीतीचा एक भाग म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसेनेला दोन जागा देण्याचा केलेला दिखावा. राज्याचे चित्र स्पष्ट नसताना ‘आम्ही मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही,’ हे उद्धव यांनी आधीच स्पष्ट करायला हवे होते. मात्र, त्यांनी तसे केले नाही. त्यामुळे अनिल देसाई यांचे हसे झाले. अर्थात, वाईटातही चांगले घडते तसे झाले. देसाई यांनी शपथ घेतली नाही, हे एकप्रकारे बरेच झाले. अन्यथा राज्यात शिवसेनेला भाजपाच्या मागे मुकाटपणे उभे रहावे लागले असते.

सुरेश प्रभू यांचा ऐनवेळी फेकलेला पत्ता हा देखील भाजपाच्या रणनीतीचाच एक भाग होता. नरेंद्र मोदी यांना सुरेश प्रभू यांच्याबद्दल विशेष ममत्व आहे. मग त्यांनी पहिल्याच शपथविधीत प्रभूंना मंत्रिमंडळात घ्यायला हवे होते. तसे करताही आले असते. मात्र, नेमकी संधी साधून त्यांनी शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. ‘तुम्हाला दोन मंत्रिपदे देतो. मात्र, त्यापैकी एक मंत्री मी सांगतो, तोच असेल,’ ही कोणीही स्वीकारणार नाही, अशी अट भाजपाने शिवसेनेसमोर ठेवली. म्हणजे ‘सुरेश प्रभू यांना राज्यसभेवर पाठविण्याची सोय तुम्हीच करा आणि शिवाय तुमचे हक्काचे एक मंत्रिपदही गमावून बसा.’ सुदैवाने शिवसेना त्यात अडकली नाही आणि सुरेश प्रभू यांनी भाजपाची वाट धरली.

एकीकडे भाजपचे नेते म्हणतात, ‘विनाशर्त पाठिंबा द्या. बहुमत सिद्ध झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचे बघू.’ तोच भाजप केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात सहभागी होण्यासाठी शिवसेनेला मात्र, अटी आणि शर्ती घालतो. वास्तविक, शिवसेनेला दोन मंत्रिपदे देऊन प्रभूंना भाजपच्या कोट्यातून मंत्री करता आले असते. तसे त्यांनी आता केलेही. मात्र, दिलदारपणा दाखवित असल्याचे नाटक करायचे आणि शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी राजकीय खेळी खेळायची, हीच भाजपची रणनीती आहे.

चर्चेच्या कितीही फेऱ्या पार पडल्या, तरीही एक निश्चित आहे, की शिवसेनेला सरकारमध्ये सामावून घ्यायचे नाही, हे भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी ठरविले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाहेरून मिळणाऱ्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करायचे. वर्षभरानंतर वातावरण निवळले की राष्ट्रवादीला केंद्रात आणि राज्यात सत्तेत सहभागी करून घ्यायचे आणि पाच वर्षे सत्ता उपभोगायची, हा भाजपचा डाव आहे. त्यांचा हा निर्णय राज्यातील बहुतांश नेत्यांना मान्य नसावा, असे वाटते. मात्र, सत्तेपुढे नि मोदींपुढे शहाणपण नाही. शिवाय त्यांच्याच कृपेमुळे अनेक आमदार निवडून आलेले असल्यामुळे विरोधात शब्दही काढण्याची कुणाची हिंमत नाही.


एवढा अपमान होऊनही उद्धव ठाकरे यांनी स्वाभिमान का दाखविला नाही, अशी टीका उद्धव आणि शिवसेना यांचे समर्थकही आता करू लागले आहेत. मात्र, सत्तेविना पंधरा वर्षे बाहेर राहिल्यानंतर आणि पुढे काही वर्षे रहावे लागणार, असे दिसत असताना संघटना टिकवून ठेवणे आणि वाढविणे अवघड आहे. उद्धव यांना त्याची पुरेपूर जाण आहे. त्यामुळेच त्यांनी सत्तेत सहभागी होण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले. अर्थात, सत्ताच अधिक प्यारी असती, तर भाजप फेकेल त्या मंत्रिपदाच्या तुकड्यावर त्यांनी समाधान मानले असते. मात्र, तसे झाले नाही. तेव्हा उद्धव यांनी सत्तेसाठी स्वाभिमानाशी तडजोड केली, हे विधान पूर्णपणे चूक आहे.

महाराष्ट्राच्या इतिहासात भाजप आणि राष्ट्रवादी अशी नवी युती साकारण्याच्या मार्गावर असून, शिवसेनेला कणखर विरोधी पक्ष म्हणून भूमिका निभावावी लागेल. संघटना मजबूत करावी लागेल. निर्णयावर आणि कृतीवर ठाम रहावे लागेल. तर नि तरच भाजपच्या अजस्त्र सामर्थ्यासमोर त्यांचा निभाव लागू शकेल. दुसरीकडे भाजपचा नव्याने होऊ घातलेला घरोबा पाहिला, तर त्यांनी विचारांना तिलांजलीच दिली आहे. ‘देश किंवा महाराष्ट्र ‘हाफचड्डी’वाल्यांच्या हातात देणार का’ किंवा ‘भाजप म्हणजे शेटजी-भटजींचा पक्ष’ अशी टीका करणारे शरद पवार, संभाजी ब्रिगेडच्या विचारांना खतपाणी घालणारी आणि अनेक घोटाळ्यांचे आरोप असलेली राष्ट्रवादी काँग्रेस, ‘महात्मा गांधींच्या हत्येमध्ये संघाचा सहभाग होता,’ असा आरोप करणारे जितेंद्र आव्हाड… यांच्याबरोबर संसार थाटण्यासाठी भाजप सज्ज झाला आहे. (भगवा आतंकवाद आणि इशरत जहाँ हे मुद्दे उद्धव ठाकरे यांनीच उपस्थित केले आहेत. त्यांचा पुन्हा उल्लेख नको.)


सरकार टिकविण्यासाठी सरकार चालविणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस अभिमानाने सांगत आहेत. मग संघाबद्दल पराकोटीचा द्वेष असलेल्या राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन सरकार चालविणे फडणवीसांना योग्य वाटते का? की ही राजकीय तडजोड योग्य असल्याचा आदेश नरेंद्र मोदी यांनी फडणवसींना दिला आहे. निवडणूक निकालांनंतर ‘नाही, नाही, म्हणजे नाही’ असे त्रिवार नाही, म्हणणाऱ्या फडणवीस यांनी अखेर राष्ट्रवादीच्याच पाठिंब्यावर सरकार तरविले. कदाचित शरद पवार यांच्याप्रमाणेच ‘नाही म्हणजे हो’ ही वृत्ती फडणवीस यांनी आत्मसात केल्याचेच तर हे द्योतक नाही ना? असो.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणजेच ‘न्यॅचरली करप्ट पार्टी’च्या पाठिंब्यावर (तूर्त बाहेरून आणि नंतर आतून) भाजपचे सरकार स्थापन होणार, हे उघड सत्य आहे. उठता-बसता संघावर टीका करणाऱ्यांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापणाऱ्या भाजपला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!