
"रेस्तरॉं'मध्ये जायचे म्हटले की पहिला प्रश्न निर्माण होतो, कोठे जायचे? कोणाला पंजाबी खायचे असते तर कोणाला चायनीज. कोणाला "साउथ इंडियन' आवडते; तर कोणाला साधे घरच्यासारखे जेवण. एखाद्याला "मॉकटेल्स' प्रिय; तर दुसरा म्हणतो फालुदा पाहिजे. प्रत्येकाच्या नाना तऱ्हा! पण आता सर्वांच्या आवडीनिवडी एकाच ठिकाणी पूर्ण होऊ शकतात. हे ठिकाण म्हणजे एरंडवण्यातील "वूडलॅंड्स!' एखादा पदार्थ तुम्हाला तुमच्या पद्धतीने तयार हवा असेल, तर तसे "इच्छाभोजन'देखील येथे उपलब्ध आहे.
"वूडलॅंड्स'ची सुरवात सुमारे दीड वर्षांपूर्वीची ! नावाप्रमाणेच "रेस्तरॉं'मध्ये "वूड'चा पुरेपूर व योग्य वापर केलेला आढळतो. "फ्लोअरिंग'प्रमाणेच सजावटीसाठीही लाकडाचाच उपयोग केल्याने आत शिरताच "वूडलॅंड्स'चा "फील' येतो. रेस्तरॉं प्रशस्त आहे. त्यामुळे परिसरात "आयटी' कंपन्या असल्या तरी जागेसाठी ताटकळावे लागत नाही. "वूडलॅंड्स'च्या मालक आहेत सायली मुंदडा.
"वूडलॅंड्स'मध्ये वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थ उपलब्ध असले, तरी येथील वैशिष्ट्य म्हणजे दाक्षिणात्य पदार्थ! साध्या इडलीप्रमाणेच कांचीपुरम इडली व रस्सम इडली, मसाला किंवा म्हैसूर डोशाप्रमाणेच स्प्रिंग, चॉप्सी डोसा, पालक डोसा; तसेच मंगळूर डोसा असे इतर प्रकारही उपलब्ध आहेत. दाक्षिणात्य थाळी हे "वूडलॅंड्स'चे वेगळेपण. दोन भाज्या, सांबार, रस्सम व मुबलक प्रमाणात भात. शिजवून अगदी बारीक करून घेतलेली तूरडाळ, शिजविलेल्या भाज्या व मसाला यांच्यापासून तयार केलेले रस्सम पिऊन तर बघा! फोडणीला टाकलेल्या कढीलिंबाच्या पानांचा स्वाद रस्समची लज्जत वाढवितो.
वास्तविक "दाक्षिणात्य थाळी'मध्ये पोळ्या किंवा पुऱ्यांची बात नस्से. पण पुण्यातील मंडळींना जेवण पूर्ण झाल्याचे समाधान पोळीशिवाय मिळत नसल्याने "दाक्षिणात्य थाळी'तही पोळी किंवा पुरी दिली जाते. थोडक्यात काय, भरपूर भात ओरपायचा असेल, तर "वूडलॅंड्स'मध्ये जाच! जिरा राइस, कर्ड राइस, बिर्याणी, पुलाव, कढी खिचडी, पुदिना पुलाव याशिवाय बिसी ब्याळी हुळी अन्न, लेमन राइस, टोमॅटो राइस, पुलिवदा राइस असे खास दाक्षिणात्य भातांचे अनेक चविष्ट प्रकार येथे उपलब्ध आहेत.
तुम्ही जाल तेव्हा बिसी ब्याळी राइस आवर्जून मागवा. फ्लॉवर, गाजर, मटार व फरसबी या भाज्या, तूरडाळ, तांदूळ व मसाला हे एकत्रितपणे शिजवून "बिसी ब्याळी' तयार करतात. हा भात थोडा सरसरीत, चवीला आंबट व तिखटही असतो. "टोमॅटो राइस'ही अगदी वेगळ्या पद्धतीचा. भात शिजवतानाच तो "टोमॅटो प्युरी' शिजवला की खराखुरा "टोमॅटो राइस' तयार! "पुलिवदा राइस' हा मसालेभाताच्या जवळ जाणारा. याची चवही आंबट व तिखट. भात व मसाला एकत्र परतून घेतला जातो. त्यानंतर चिंचेचा कोळ टाकून तांदूळ शिजवला जातो. अशा पद्धतीने तयार होणारा "पुलिवदा राइस'ही अनेकांच्या पसंतीस उतरतो.
रेस्तरॉंचे व्यवस्थापक सुनील मराठे यांनी "महाराष्ट्रीय पिझ्झा' हा वेगळा प्रयोग केला आहे. ब्रेडचा बेस घेऊन त्यावर उकडलेल्या बटाट्यांपासून तयार केलेले सारण थापले जाते. हा ब्रेड कमी तेलात थोडा वेळ "फ्राय' केला जातो. हिरवी-लाल चटणी किंवा टोमॅटो सॉस; तसेच शेव टाकून ते "गार्निश' केले जाते. हा "पिझ्झा'देखील "वूडलॅंड्स'चे वैशिष्ट्यच म्हटले पाहिजे. "वूडलॅंड्स'मधील पनीर गिलोटी आणि पनीर गिलोटी मसाला या दोन पंजाबी डिश विशेष प्रसिद्ध आहेत. सर्व प्रकारच्या भाज्या एकत्रितपणे शिजवून त्यात मसाले व "चीज' टाकून "स्टफ' तयार केले जाते. पनीरचे चौकोनी तुकडे करून त्यामध्ये हे "स्टफ' भरले जाते. मग हे "पनीर सॅंडविच' तेलावर हलकेच "फ्राय' केले जातात. असे "फ्राय' पनीर सॅंडविच म्हणजेच पनीर गिलोटी! असे "फ्राय' पनीर सॅंडविच टोमॅटो आणि मसालेदार "ग्रेव्ही'ने "गार्निश' केले की तयार होतो "पनीर गिलोटी मसाला.'
"वूडलॅंड्स'चे जाणवणारे वेगळेपण म्हणजे "इच्छाभोजन'! मसालेदार व त्याच त्याच भाज्या खाऊन तुम्हाला कंटाळा आला आहे; त्यामुळे तुम्हाला लसणाची फोडणी दिलेली मेथीची परतून केलेली भाजी खायची इच्छा झाली आहे किंवा कारल्याची पंचामृतासारखी भाजी खायची असेल, तर "वूडलॅंड्स'चे बल्लव तुमची इच्छा पूर्ण करण्यास तयार आहेत! थोडक्यात काय, तर "रेस्तरॉं'च्या "मेनूकार्ड'वर अवलंबून राहण्याची गरज नाही. तुम्ही फर्माईश करा आणि ती पूर्ण करू, अशीच ही योजना आहे.
"वूडलॅंड्स'
(श्रीनिवास फूड्स)
13-2 वेंकटेश्वर हाऊस,
शारदा सेंटरजवळ,
एरंडवणा,पुणे- 411 004.
020- 25422422