Thursday, January 28, 2010

शंभर टक्के मराठी, दोनशे टक्के मुंबईकर!



खमंग आणि रुचकर वडापाव

मध्यंतरीच्या काळात माझ्या ब्लॉगवर (http://ashishchandorkar.blogspot.com) "वडापाव'वर एक लेख लिहिला होता. त्याला वेगवेगळ्या ठिकाणहून काही प्रतिक्रिया आल्या होत्या. त्यातील सर्वात वेगळी आणि आनंददायक प्रतिक्रिया होती ती अमेरिकेतल्या संदीप नावाच्या एका ब्लॉग वाचकाची. संदीप म्हणतो, ""तुमचा लेख मला खूपच आवडला. तुमचा लेख वाचल्यानंतर मला अमेरिकेतील शिकागो शहरातील एका दुकानाची आठवण झाल्यावाचून राहत नाही. त्या ठिकाणी सुखाडिया नावाच्या माणसाने एक भव्य दुकान थाटलेय. "शॉपिंग मॉल'च म्हणा ना. तिथल्या "रेस्तरॉं'च्या "मेन्यू कार्ड'वर "बॉम्बे वडापाव'चा उल्लेख आहे. हा "बॉम्बे वडापाव' तीन डॉलर्सला मिळतो.''

शंभर टक्के मुंबईचा असलेला वडापाव आता फक्त महाराष्ट्रात किंवा भारतातच नव्हे; तर परदेशातही मिळू लागला आहे आणि तिथेही त्याचे नाव नुसते वडापाव असे न राहता "बॉम्बे वडापाव' असे नोंदले गेले आहे. त्यातच वडापावची लोकप्रियता लक्षात येते. तसेच वडापाव आणि मुंबई यांचे किती अतूट नाते आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. त्यामुळे मुंबईने महाराष्ट्राला काय दिले, असा प्रश्‍न विचारल्यानंतर अनेकांची अनेक उत्तरे असतील. कोणी म्हणेल बाळासाहेब ठाकरे, कोणी म्हणेल सुनील गावस्कर किंवा सचिन तेंडुलकर, कोणी म्हणेल "फायटिंग स्पिरीट', कोणी म्हणेल बॉलीवूडची मायानगरी इ.इ. पण मला विचारले तर माझे उत्तर असेल- मुंबईने महाराष्ट्राला "वडापाव' दिला.

महाराष्ट्राबाहेर मराठी पदार्थ म्हणून मान्यता पावलेला आणि अस्सल खवय्यांच्या पसंतीस उतरलेला सर्वाधिक लोकप्रिय पदार्थ म्हणजे वडापाव. अस्सल मराठमोळा आणि 100 टक्के मुंबईकर. अगदी दिल्लीपासून ते हैदराबादपर्यंत आणि अहमदाबादपासून ते कोलकत्तापर्यंत बॉम्बे वडापाव (शिवसेनेच्या भाषेत बोलायचे झाले तर मुंबई वडापाव) मिळू लागलाय. भारतातील बहुतांश राज्यात वडापाव मिळतो आहे. प्रांतानुरूप आणि तिथल्या चवीनुरूप काही किरकोळ बदल झाले आहेत. म्हणजे गुजरातमध्ये कापलेला कांदा, बीट आणि कोबी यांच्या सलाडबरोबर वडापाव "सर्व्ह' करतात. तर हैदराबादमध्ये "आलू बोंडा' म्हणून ब्रेडच्या स्लाईसबरोबर वडा दिला जातो. प्रत्येक ठिकाणची चव आणि स्वरूप वेगळे; पण वडापाव तोच अस्सल मराठमोळा.

साबुदाणा खिचडी, थालिपीठ, झुणका-भाकरी, मटारच्या करंज्या, खारी पॅटीस, झणझणीत मिसळ आणि इतरही अनेक पदार्थांच्या तुलनेत वडापाव हा अधिक झपाट्याने महाराष्ट्रभर रुजला आणि सामोसा किंवा कचोरीच्या स्पर्धेतही टिकला. बटाट्यापासून केलेले सारण हाच बटाटा वड्याचा खरा आत्मा. त्याची चव जितकी चांगली तितका वडापाव रुचकर. सोबतीला गोड किंवा तिखट अशी ओली चटणी, कांदा लसूण मसाला किंवा सुकी चटणी असा लवाजमा असतो. पण खरी चव असते ती नुसत्या वड्याचीच. मग तो किती झणझणीत आहे, त्यातील मसाला कसा आहे, त्यात लिंबाचा रस मिसळला आहे का, अशा अनेक गोष्टींवर वड्याची चव ठरते. मग तो वडा नुसता खाल्ला काय किंवा पावाबरोबर खाल्ला काय, एकदम जन्नत. बरोबर तळलेली लवंगी मिरची मात्र हवी. मग गोड-तिखट चटण्या असो किंवा नसो.

मुंबईतील छबिलदास जवळच्या "श्रीकृष्ण'चा अतिमहागडा वडा, कीर्ती कॉलेजजवळचा खमंग वडापाव (हा विक्रेता चुरापाव विकूनही पैसे वसूल करतो), हुतात्मा चौकातील (टेलिफोन एक्‍स्चेंजजवळचा) वडापाव, परळच्या भोईवाडा चौकातील वडापाव, सीएसटीसमोरचा आरामचा वडापाव, ठाण्यातील कुंजविहारचा वडापाव, कर्जतचा दिवाडकरचा वडा, पुण्यातील जोशींचा वडा, सहकारनगरचा कृष्णा किंवा कॅम्पातील फेमस वडापाव, औरंगाबादचा भोला वडापाव, कोल्हापूरचा दीपकचा वडा इ.इ. ही यादी आणखी खूप वाढत जाईल आणि अनेक जण त्यामध्ये नवे नवे स्पॉट्‌स नमूद करता येतील. थोडक्‍यात म्हणजे मुंबईत उगम
पावलेल्या वडापावची ओळख आणि चव सगळीकडे पोचलीय.

फार लवाजमा नसल्यामुळे अगदी गल्लोगल्लीच्या गाड्यांवरही वडापाव दिसू लागला. तयार करायला सोपा आणि ग्राहकही पुष्कळ त्यामुळे "वडापाव' लवकरच सर्वदूर पोचला. गरिबातील गरीबापासून ते गर्भश्रीमंतापर्यंत प्रत्येकाला खमंग वडापाव आवडतो. मग तो सचिन तेंडुलकर का असेना. वडाभाव हा त्याचा "वीक पॉईंट' असतो. त्यामुळे गल्लोगल्ली गाड्यांवर मिळणाऱ्या वडापावलाही "हायजिनिक' स्वरूप देण्याच्या नादात "वडापाव' दुकानांमध्ये गेला. मग तो "प्लॅस्टिक'चे ग्लोव्हज घालून तयार करण्यात येणारा जम्बो किंग वडापाव असो, गोली वडा असो किंवा शिवसेनेचा "शिववडा'. पुण्यातील जोशी वडेवाले असो किंवा रोहित वडेवाला. शिवसेनेनेही आता चौकाचौकांत "शिववडा'च्या गाड्या टाकून ब्रॅंडिंगचा प्रयत्न सुरू केला आहे. वडापावची देखील साखळी पद्धतीची दुकाने निघतील, याची कल्पना कोणीच केली नव्हती. पण आता ती वस्तुस्थिती आहे.

"फक्त एका रुपयात वडापाव' अशा जाहिरातीपासून सुरू झालेले मार्केटिंग आता "हायजिनिक वडापाव'पर्यंत येऊन पोचले आहे. पण कोणी कितीही आणि काहीही म्हटले तरी गाडीवर कढईतल्या उकळत्या तेलात तळले जाणारे गरमागरम खमंग वडे खाण्याची मजा काही औरच. मग थोडंसं तोंड भाजलं तरी त्याचं काही वाटत नाही. आणि एकदा तोंड खवळलं की दुसरा वडापाव खाल्ल्याशिवाय आपण तिथून हलत नाही. अशा वडापावची चव नेहमी आपल्या जिभेवर रेंगाळायला लावण्याचे श्रेय दुसऱ्या-तिसऱ्या कोणाचे नसून या मुंबापुरीचे आहे, हे विसरून चालणार नाही. त्यामुळेच मुंबई बाहेरच्या मंडळींना मुंबईत गेलो आणि वडापाव खाल्ला नाही तर चुकल्या चुकल्यासारखं वाटतं. ते त्यामुळेच.


(मुंबई सकाळच्या वर्धापनदिनानिमित्त निघालेल्या विशेष पुरवणीतील लेख...)

Saturday, January 23, 2010

ऋषितुल्य युगपुरुष...

हिंदूहृदयसम्राट आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 83 वा वाढदिवस. साहेबांनी आज 84 व्या वर्षांत पदार्पण केलंय. साहेबांना दीर्घायुष्य
लाभो, याच शुभेच्छा आणि देवाकडे प्रार्थना. साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने साहेबांच्या काही मोजक्‍या छायाचित्रांच्या माध्यमातून साहेबांना माझ्या ब्लॉगकडून शुभेच्छा...

आशिष चांदोरकर




















Tuesday, January 19, 2010

`आपल्या` ब्लॉगला पुरस्कार...



माझ्या नियमित आणि अनियमित वाचकांना नमस्कार

गेल्या चार साडेचार वर्षांपासून ब्लॉग लिहितोय. दोन वर्षांपूर्वी स्टार माझा या वृत्तवाहिनीनं घेतलेल्या स्पर्धेत ब्लॉगला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालं होतं. २०१० या नव्या वर्षाची सुरवातही चांगली झालीय. औरंगाबादच्या ओम एचआरडी इन्स्टिट्यूटनं आशिषचांदोरकर.ब्लॉगस्पॉट.कॉम या ब्लॉगलची पुरस्कारासाठी निवड केली आणि सोमवारी (दिनांक १८ जानेवारी) हा पुरस्कार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते प्रदानही झाला.

माझी दिवंगत आई, बाबा आणि इतर कुटुंबियांना माझ्या ब्लॉगसाठीचा हा दुसरा वुसरा पुरस्कार प्रदान. त्यांच्यामुळेच मी इथवर पोचलो आहे आणि त्यांच्या आशीर्वादानेच मला यापुढेही यश मिळत राहील, असं वाटतो. सो इटस टू देम ओन्ली...

पुरस्कार वितरण समारंभाची बातमी विविध वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली आहे. त्याची लिंक खाली देत आहे. यापुढेही आपला लोभ माझ्यावर (माझ्यापेक्षा माझ्या ब्लॉगवर अधिक) राहील, अशी अपेक्षा आणि विश्वास मला आहे.


आपला,

आशिष अरविंद चांदोरकर


कार्यक्रमाची व्हिडिओ क्लिप...



लोकसत्ता...

Monday, January 11, 2010

वेड लावणा-या कलाकृती...



'आठवणी'चा समृद्ध व सुंदर खजिना...!

कलाकार हा जन्मजात असावा लागतो, असं म्हणतात. ते खरंही आहे. शाळा-कॉलेजातून अभ्यासक्रम पूर्ण करुन कलाकार होता येत नाही. कला ही उपजतच असावी लागते. ही आणि अशी अनेक वाक्य आपण प्रत्येकवेळी ऐकलेली असतात. पण जर अशा गोष्टींचा प्रत्यय आला तर आपला त्यावर चटकन विश्वास बसतो. असंच काहीसं माझं झालंय.

देव कोणाच्या हातात काय कला निर्माण करेल काही सांगता येत नाही, हे पाहण्याची संधी मला नुकतीच मुंबईत मिळाली. शशिकांत धोत्रे या अगदी उदयोन्मुख कलावंतानं साकारलेल्या चित्रांचं प्रदर्शन पाहिलं आणि मला ही गोष्ट मनोमन पटली. सोलापूरातल्या मोहोळ तालुक्यामधल्या एका छोट्याशा खेड्यात वाढलेल्या शशिकांत धोत्रे नामक चित्रकाराची ही गोष्ट. ही गोष्ट एखाद्या हिंदी किंवा मराठी चित्रपटात हुबेहूब शोभेल अशीच वाटते.



वडार समाजात जन्माला आलेल्या शशिकांतचे वडील दगड फोडण्याचं काम करतात. आई गृहिणी आहे. रस्त्याच्या कडेला बसून दगड फोडण्याचं काम करणारे अनेक जण आपण आतापर्यंत पाहिले असतील. मोठे-मोठे दगड फोडून त्याचे बारीक दगड करण्याचं काम किती कष्टाचं असू शकतं याची आपण कल्पनाच केलेली बरी. तर असं वडार काम करणा-या घरात शशिकांतचा जन्म झाला. पण वडिल करतात ते दगड फोडण्याचं पारंपरिक काम करण्याची वेळ शशिकांतवर आली नाही. कारण देवानं त्याच्या हातामध्ये दगड फोडण्यासाठी लागणा-या सामर्थ्यापेक्षा चित्र साकारण्याचं कसब निर्माण केलं होतं.

शाळेत असताना चित्र काढण्यावरुन त्यानं अनेकदा शिक्षकांचा ओरडा खाल्ला होता. प्रसंगी मारही खाल्ला होता. शाळेतल्या अनेक भिंती शशिकांतनं चितारलेल्या कलाकृतींनी भरुन गेल्या होत्या. मग कधी त्या त्यानं स्वतःहून काढलेल्या होत्या. तर कधी शाळेतल्या काही कलासक्त शिक्षकांनी त्याच्याकडून करवून घेतल्या होत्या. पुढे दहावी-बारावीचा टप्पा पार करुन शशिकांत मुंबईच्या सुप्रसिद्ध जेजे महाविद्यालयात शिकण्यासाठी दाखल झाला. पण तिथं महिना-दोन महिने काढल्यानंतर शशिकांतनं तिथनं पळ काढला आणि स्वतःच कलेची आराधना करु लागला.



शशिकांतच्या चित्रांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यानं ही चित्र फक्त पेन्सिलच्या सहाय्यानं काढली आहेत. भारतात अशा पद्धतीनं चित्र काढणारे चित्रकार खूप थोडे आहे. जगामध्ये मायकेल एंजेलो हा चित्रकार अशा पद्धतीनं चित्र काढायचा. शशिकांतनं काळ्या पेपरवर काढलेली ही चित्र पाहिली की डोळे दिपून जातात. एकेक चित्र काढायला साधारण सहा ते आठ दिवसांचा कालावधी लागतो. मुंबईतल्या तुलिका आर्ट गॅलरीमध्ये भरलेल्या प्रदर्शनात शशिकांतची दहा-बारा चित्र लावलेली आहेत. त्यापैकी एकही चित्र ७५ हजार रुपयांपेक्षा कमी नाही. तर प्रदर्शनातलं सर्वाधिक महागडं चित्र दीड लाख रुपयांना आहे. मुख्य म्हणजे प्रदर्शनातील सर्वच्या सर्व चित्र विकली गेलेली आहेत.

व्यक्तीचित्र रेखाटताना शशिकांतनं अगदी बारीक सारीक गोष्टींचा विचार करुन ते चित्र चितारलं आहे. गफ्फार नावाच्या त्याच्या लहानपणीच्या मित्राचं काढलेलं चित्र तर प्रचंड अफलातून आहे. त्याची बसण्याची लकब, पायावर जखमेची खूण, गोट्यांचे रंग, गोट्या खेळताना चेह-यावर असणारे भाव अशा सर्व गोष्टी त्यानं हुबेहूब हेरल्या आहेत. तन्वी साळकर या मैत्रिणीची दोन पोट्रेट काढताना त्यानं थोडंसं वेगळेपण जपलं आहे. एक चित्र लग्नापूर्वीचं तर दुसरं लग्नानंतरचं आहे. ही दोन्ही चित्र पाहिली की शशिकांतच्या कलेला दाद दिल्याशिवाय रहावत नाही. घराच्या खिडकीतून नव-याची वाट पाहणारी नवविवाहिती तर अफलातून आहे. (म्हणजे चित्र अफलातून आहे.) आपल्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा देणारे हे 'रिमेम्बरन्स' नक्की पहायला हवं.

एखाद्या खेड्यातनं आणि प्रचंड गरीबीतून वर आलेला शशिकांत आता चांगलाच लोकप्रिय झालाय. त्याला अनेक प्रतिष्ठित पारितोषिकांनी गौरवण्यात आलंय. येत्या काही महिन्यात तो लंडनलाही जाणार आहे. शशिकांतच्या भविष्यातील वाटचालीस माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा...

शशिकांत धोत्रेबद्दल अधिक माहितीसाठी क्लिक करा...

http://www.tulikaartsgallery.com/index.php?page=2&isArtist=315

Friday, January 08, 2010

अस्सल मराठमोळं जेवण...



तांबे उपहारगृह

गिरगांव म्हणजे मराठी माणसाची जान. मराठी माणसाची शान. गिरगावातल्या सत्कार नावाच्या हॉटेलवर मी यापूर्वीच लिहिलं आहे. सत्कारप्रमाणेच किंवा सत्कारपेक्षाही अधिक लोकप्रिय आणि नावाजलेलं आणखी एक उपहारगृह म्हणजे तांबे उपहारगृह. मरीन लाईन्स रेल्वेस्थानकापासून पाच मिनिटांच्या अंतरावर व सीएसटीपास्नं टॅक्सीनं फक्त तेरा ते पंधरा रुपये अंतरावर. त्यामुळं इच्छित स्थळी पोहोचणं फारसं अवघड नाही. (आणि जरी अवघड असलं तरी खरा खवय्या कसंही करुन इथं आल्याशिवाय राहणार नाही, हे सांगायला नकोच.)

अफलातून चव...
तांबे उपहारगृहाची खरी ओळख म्हणजे इथल्या मराठमोळ्या खाद्यपदार्थांची अफलातून चव. कोथिंबीर वडी, आळू वडी, भाजणीच्या पिठाचं थालिपीठ आणि लोणी, डाळिंब्यांची (सोललेल्या कडव्या वालाची) उसळ, आळूची पातळ भाजी (आळूचं फदफदं), उकडलेल्या बटाट्याची डोसा भाजी (घरगुती पद्धतीनं केलेली उडप्यासारखी नव्हे...) मूग आणि मटकीची उसळ, कढी-भात, कढी- मूगडाळ खिचडी, चवळी-पालक आणि इतर अनेक चविष्ट पदार्थ. ओल्या काजूची (काजूगराची) उसळ हे इथलं आणखी एक वैशिष्ट्य!

औरंगाबाद सकाळचे मुख्य वार्ताहर अभय निकाळजे, मुंबई सकाळमधील सहकारी अभय न. जोशी तसंच मंगेश मधुकर कुलकर्णी आणि मी असे आम्ही चौघे तांबे उपहारगृहामध्ये गेलो होतो. सकाळचे चौघे तांबे उपहारगृहामध्ये जाऊन अक्षरशः खूष झालो. तिथल्या जेवणावर दिलखूष झालं. कुठं जायचं कुठं जायचं असं ठरत असतानाच तांबे उपहारगृहाचं नाव पुढे आलं आणि सर्वांनीच त्याला पसंती दिली. मग सकाळच्या फोर्ट कार्यालयातनं ठाकूरद्वार गाठलं.

ब्राह्मणी जेवण...
ब्राह्मणी पद्धतीचं मराठी जेवण इथं फर्स्ट क्लास मिळतं. ब्राह्मणी कुटुंबामध्ये ज्या पद्धतीनं तिखट बेताचंच आणि गुळाचा वापर सढळ हाताने असतो, त्याच पद्धतीची चव इथं चाखायला मिळते. कमी तिखट असलं तरी हे मराठी पदार्थ कमी तिखट असले तरच किंवा थोडेसे गूळचट असले तरच चांगले लागतात, हे सांगायला नको. आळूची भाजी त्याच पठडीतली. पण आळूच्या भाजीला लाल मिरच्यांची फोडणी दिलेली असते. हे इथलं वेगळेपण. त्यामुळंच चवही थोडीशी वेगळी.



डाळिंब्याची उसळ...
इथं गेल्यानंतर आवर्जून खायची गोष्ट म्हणजे डाळिंब्याची उसळ. एकदम घट्ट (रस्सा एकदम कमी) अशी ही उसळ पुण्यातल्या कोहिनूर मंगल कार्यालय किंवा ज्ञानल मंगल कार्यालयातल्या उसळीची आठवण करुन देते. डाळिंब्याची उसळही थोडीशी गोड असेल तर अधिक चांगली लागते. तांबेंनीही हे जाणलंय. पालक पनीरपेक्षा पालक-चवळी असं वेगळंच कॉम्बिनेशन इथं चाखायला मिळतं. शिवाय झुणका-भाकर आहेच. अर्थात, झुणका हा तिखट नाही, हे वेगळं सांगायला नकोच. पण झुणका झणझणीत असेल तरच चांगला लागतो. त्यामुळं इथं झुणका-भाकरी न खाणंच उत्तम. इतर पदार्थ ट्राय केले तर उत्तम.

अनेक पर्याय...
द बेस्ट गोष्ट म्हणजे इथं लिमिटेड किंवा अनलिमिटेड स्वरुपात थाळी मिळतेच. पण तुम्हाला थाळी नको असेल तर भाज्या आणि उसळी यांच्यासाठी प्लेट सिस्टीमही आहे. त्यामुळं आवडीच्या दोन-चार भाज्या, भाकरी किंवा पोळ्या, सोबतीला आळूवडी किंवा कोथिंबीर वडी, एखादं थालिपीठ अशी ऑर्डर दिली तर मग विचारायलाच नको. शिवाय भाजी किंवा उसळीची क्वांटीटी दोघांना पुरेल इतकी असते. त्या अंदाजानं आपण ऑर्डर देऊ शकतो. शेवटी मूगडाळ खिचडी आणि कढी किंवा पांढरा भात आणि कढी हा मेन्यू बेस्ट. एक प्लेट भात किंवा खिचडी दोघांना पुरते. त्यामुळं इथंही अंदाज घेऊनच ऑर्डर देऊ शकतो. इतकं सगळं खाल्ल्यानंतर तुमच्या पोटात थोडी जागा असेल तर एक ग्लास सोलकढी प्या. (आम्ही प्यायली होती, हे आलंच)

स्वच्छता आणि टापटीप....
इथली आणखी एक ओळख म्हणजे इथली स्वच्छता आणि टापटीप. स्वच्छतेकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं. पण इथले वेटरही एकदम स्वच्छ आहेत. शिवाय टिपिकल मराठी उपहारगृहांमध्ये ग्राहकाकडे ज्या तुच्छतेनं पाहिलं जातं तो अनुभव इथं येत नाही. फक्त काहीवेळा पदार्थ लवकर संपलेले असतात. त्याला पर्याय नाही, असं म्हणायचं आणि दुर्लक्ष करायचं. इथले दरही खूप जास्त आहेत, असं नाही. माफक दर आणि उत्तम चव असं वर्णन करायला हरकत नाही. चार जणांनी यथेच्छ हादडल्यानंतर साधारणपणे तीनशे रुपयांपर्यंत बिल येतं, असा अनुभव आहे. साधारण तीन-चार वेळचा. त्यामुळं जास्त चिंता करु नका आणि ओरपा...


तांबे उपहारगृह
२७७, मापला महल,
जे. एस. मार्ग, ठाकूरद्वार,
गिरगांव, मुंबई – ४००००४
०२२-२३८९९००९
०२२-२३८६४२२३

मायेच्या हाताची मराठी चव...



श्रीयोग डायनिंग हॉल (डोंबिवली)

मुंबईमध्ये आल्यानंतर काही वेळचा अपवाद वगळला तर रोजरोज अण्णाकडे खाऊन ('साम'चा कॅन्टिनवाला) वैताग आला होता. मग महाराष्ट्रीयन पद्धतीचं आणि अगदी घरच्यासारखं जेवण जेवायची खूप इच्छा झाली होती. एकदम साधं, शुद्ध शाकाहारी आणि सात्विक जेवण जेवायला कुठंतरी जायला हवं, असं कित्येक दिवसांपास्नं वाटत होतं. दोनवेळा अचानक हा योग जुळून आला. पहिला योग म्हणजे डोंबिवलीमधल्या श्रीयोग डायनिंग हॉलमधलं (आईच्या हाताची चव...) जेवण आणि दुसरं म्हणजं गिरगावातल्या ठाकूरद्वारजवळच्या तांबे उपहारगृहामधलं जेवण. दोन्ही ठिकाणचं जेवण म्हणजे लय भारी. पहिल्या ठिकाणी मराठी पद्धतीनं तयार केलेली थाळी तर दुसरीकडे टिपिकल मराठी पद्धतीचं बिसमिल्लाह जेवण!

श्रीयोग डायनिंग हॉल...!

मध्यंतरी ई टीव्हीतला माझा जुना सहकारी आणि सध्या आयबीएन-लोकमतचे निखिल वागळे यांच्यानंतरचे आधारस्तंभ श्री.राजेंद्र हुंजे याच्या घरी गेलो होतो. तरी साधारणपणे दोन महिने उलटले. तेव्हा रात्री कुठंतरी 'कार्यक्रम' करायचा आणि थोडंसं जेवायचं, असं ठरलं होतं. पण नेमके एक-दोन जण आलेच नाहीत. मग उरलो फक्त मी आणि राजेंद्रच. मग 'कार्यक्रम' करायचं रद्द झालं आणि महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवायचं ठरलं. राजेंद्रनं आई भोजनालयात जाऊ असं म्हटलं. मी पण होकार दिला. स्टेशनजवळच (पूर्वेला) आई भोजनालय म्हणजेच श्रीयोग डायनिंग हॉल आहे. अगदी पाच मिनिटांवर.

आईच्या हाताची चव...

मायेच्या हाताची मराठी चव... अशीच जाहिरात करण्यात आल्यामुळं जेवण कसं असणार याची उत्सुकता होतीच. शिवाय श्रीकांत मोघे, सुनील बर्वे, प्रशांत दामले आणि इतर अनेक नेते-अभिनेते तिथं जेवून गेले असल्यामुळं उत्सुकता अधिकच ताणली गेली. मेन्यू कार्ड न पाहताच दोन थाळीची (अनलिमिटेड हे आलंच!) ऑर्डर दिली. सुरळीच्या वड्या, बिटाची कोशिंबीर, छोल्यांची उसळ, टॉमेटो-बटाटा रस्सा भाजी, आळूची भाजी, मऊसूद घडीच्या पोळ्या, एक मोठी वाटी श्रीखंड, ताक आणि सरतेशेवटी मस्त सोलकढी... सोबतीला इतर काही पदार्थ असतील तर ते लक्षात नाही. पण ताट एकदम खचाखच भरलेलं आणि वाढपाची सेवाही अगदी शिस्तीत. (आखडता हात न घेता...)

घरचं जेवण...

पोळ्या म्हणजे अगदी घरच्या सारख्या. मऊ आणि तेल लावलेल्या. इतर ठिकाणी मिळणा-या वातड पोळ्या खाऊन इतका कंटाळा आला होता की, मायेच्या हाताच्या मराठी चवीमुळं दोन काय चांगल्या चार पोळ्या जास्त गेल्या. शिवाय सोबतीला आळूची भाजी (काही जण त्याला छद्मीपणे फदफदं असं म्हणतात) असल्यामुळं व्वा! क्या बात है... आळूची भाजी माझी मोस्ट फेव्हरेट असल्यामुळं मला वेड लागलं होतं. पुण्यात श्रुती मंगल कार्यालयात किंवा पूना गेस्ट हाऊसमधल्या चवीला थोडीशी गुळचट असणा-या आळूच्या भाजीची आठवण झाल्याखेरीज रहात नाही. छोले, आमटी आणि टोमॅटो-बटाटा रस्सा भाजीही चवीला घरच्यासारखीच. तिखट बेताचंच. गूळही थोडा सैल हातानंच वापरलेला. भातही मोकळा आणि गरमागरम. भात मोकळा असला तरी त्यामध्ये सोडा मात्र नव्हता. कारण नंतर पोट डब्ब होत नाही.

ताकही घट्ट आणि गोड. इतर अनेक ठिकाणी ताकाच्या नावाखाली पांढरं पाणी देण्याची वाईट खोड असते. पण इथलं ताक म्हणजे एकदम घट्ट आणि गोड. जेवताना अधूनमधून ताक पिऊन संपवलं तरी हरकत नाही. जेवणानंतर अपेटायझर म्हणून सोलकढी आहेच. ती पण एखाद्या मालवणी रेस्तरॉच्या तोंडात मारेल अशी. ताटात स्वीट म्हणून दोन-तीन ऑप्शन्स. गुलाबजाम, अंगूर मलाई, श्रीखंड आणि एखाद दुसरा... तुम्हाला आवडेल ते घ्या. स्वीटपेक्षा या सर्व गोष्टींचीच चव इतकी तोंडावर राहते की विचारता सोय नाही. सर्व पदार्थांवर यथेच्छ ताव मारल्यानंतर आपण अगदी तृप्त भावनेनं बाहेर पडू लागतो. इथं एका थाळीचा भाव १३० रुपये इतका आहे. पण स्वीट नको असेल तर किंवा इतर दिवशी हा दर कमी असतो. साधारण शंभर रुपयांच्या आसपास. पण पैसा वसूल जेवण आहे. सो डोन्ट वरी एन्जॉय इट!!!

श्रीयोग डॉयनिंग हॉल
(मायेच्या हाताची मराठी चव... श्रीयोग)
पी. मालवीय मार्ग, रामनगर,
डोंबिवली (पूर्व) – ४२१२०१.
२८६०८७१, (फॅक्स) – २८६१६०३
sachin_bodas@yahoo.com

Monday, January 04, 2010

इडियटगिरीपेक्षा गांधीगिरीच श्रेष्ठ!



ऑल इट नॉट दॅट वेल...

"मुन्नाभाई एमबीबीएस" आणि "लगे रहो मुन्नाभाई...' या गाजलेल्या चित्रपटांचा दिग्दर्शक राजकुमार हिरानी याचा थ्री इडियटस हा चित्रपट कसा आहे, हे पाहण्याची प्रचंड उत्सुकता होती. पण थ्री इडियटस हा चित्रपट त्या दोन्ही चित्रपटांची उंची गाठू शकलेला नाही, असं मला प्रामाणिकपणे इथं कबूल करावसं वाटतं. माझ्या या मताशी फार कोणी सहमत होणार नाही. पण तरीही मला ते मत मांडल्याशिवाय रहावत नाही.

आपलं शिक्षण हे सर्वोत्तम विद्यार्थी कोण आहे, हे शोधण्यासाठी उपयुक्त आहे. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काय सर्वोत्तम आहे, हे शोधण्यासाठी आपली शिक्षण पद्धती उपयुक्त नाही. त्यामुळंच आपली महाविद्यालयं ही एकाच साच्यातून एकाच पद्धतीचे विद्यार्थी तयार करणारा कारखाना आहे, अशी टीका होते. ती खरीही आहे. त्यावरच थ्री इडिटस बेतलेला आहे. नेहमीप्रमाणेच आमीर खान आणि माधवन यांच्या भूमिका झक्कास आहेत. शर्मन जोशी देखील कमी पडल्याचं जाणवत नाही. करीना कपूरही छोट्या रोलमध्ये लक्षात राहते.

सर्वप्रथम म्हणजे थ्री इडियटसचा विषय एकदम भन्नाट आहे. परंपरागत शिक्षणपद्धती किती बोगस आणि तकलादू आहे, हे त्यात दाखवण्यात आलंय. आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये फक्त पहिला येणाऱ्याला महत्त्व आहे. दुसऱ्या, तिसऱ्या आणि त्यानंतरच्या लोकांना इथं फारसं महत्त्व नाही. त्यामुळं जो तो पहिल्या क्रमांकासाठी धावतोय. आपण किती मनापासून शिकतो, त्याचा आपल्याला आयुष्यात किती उपयोग होतो, दैनंदिन जीवनात आपल्याला शिक्षणाचा किती उपयोग होतो, याचा काहीही विचार न करता आपण पाठांतर करतो आणि परीक्षेमध्ये सगळं बाहेर काढतो. अशा या शिक्षण पद्धतीवर थ्री इडियटसनं प्रकाशझोत टाकलाय.

अभियांत्रिकीचं शिक्षण घेण्यासाठी आलेल्या तीन (किंवा चार) तरुणांची ही कथा आहे. इंजिनिअर किंवा डॉक्टर व्यतिरिक्त माणसानं काही होऊच नये की काय, अशा पद्धतीनं पालक विचार करतात आणि त्या ओझ्याखाली विद्यार्थी-विद्यार्थिनी पार दबून जातात. मग कोणी परीक्षेच्या टेन्शनमुळं आत्महत्या करतं तर कोणी वाईल्ड फोटोग्राफीचा छंद सोडून इंजिनिअर होण्यासाठी रॅट रेसमध्ये उतरतो. थोडक्यात म्हणजे जो तो स्वतःच्या आवडी निवडी सोडून पारंपरिक शिक्षणाच्या मागं धावतोय. अशा या जळजळीत विषयावर राजकुमार हिरानी स्टाईलनं कोरडे ओढण्यात आले आहेत.

कॉलेजमधलं रॅगिंग, विद्यार्थ्यांच्या गमती-जमती, आमीर आणि त्याच्या मित्रांनी केलेल्या करामती अशा अनेक गोष्टींमुळे चित्रपटाला मस्त तडका मिळालाय. कॉलेजच्या गॅदरिंगच्या वेळी उडालेली धम्माल किंवा जावेद जाफरीच्या घरी माधवन आणि शर्मन जोशी यांनी वठवलेला प्रसंग पोट धरुन लोळायला लावणारे आहेत. इतरही काही प्रसंगांमधून पोट धरुन हसायला होतं. पण चित्रपट म्हणून जी सलगता हवी किंवा लिंक रहायला हवी, ती थोडीशी इथं जाणवत नाही. वेगवेगळे प्रसंग फक्त एकत्र केल्यासारखे वाटतात. काही वेळा तर अतर्क्य आणि अशक्यप्राय गोष्टी दाखवून चित्रपटाला थोडंसं वास्तवतेपासून दूर नेल्यासारखं वाटतं.

आमीर खाननं वेगवेगळ्या शहरांमध्ये वेषांतर करुन जाऊन चित्रपटाची पब्लिसिटी केली होती. त्याचा प्रसिद्धी माध्यमांमधून चांगलाच गवगवा झाला होता. चेतन भगत यांच्या फाईव्ह पॉईंट समवन या पुस्तकावर हा चित्रपट आधारित आहे. मात्र, चित्रपटाच्या श्रेय नामावलीत भगत यांचा अनुल्लेख केल्यामुळे भगत चांगलेच भडकले आहेत. त्यांचा आणि आमीर खान यांचा वाद सध्या चांगलाच रंगलाय. बॉक्स ऑफिसवरही चित्रपट तुफान चालतोय. वेगळा विषय, वेगळी मांडणी आणि आमीरच ग्लॅमर यामुळं चित्रपटाला चांगला गल्ला तयार करताय आलाय.

इतकं सगळं असूनही मनापासनं सांगायचं तर मला हा चित्रपट तितकासा आवडलेला नाही. दोन मुन्नाभाईंच्या तुलनेत थ्री इडियटस फिका पडतो आणि तुफान मनोरंजनाची अपेक्षा ठेवली तर अपेक्षाभंग झाल्याशिवाय राहत नाही.इतकं सगळं असलं तरी डोन्ट वरी एकदा बघायला नक्कीच हरकत नाही...

Saturday, December 19, 2009

भाजीवाल्याचा झाला 'वडा...'

गेल्या काही दिवसांपास्नं थोडंसं 'आयडल' झाल्यासारखं वाटत होतं. पण पुन्हा एकदा नव्या जोमाने ब्लॉग लिहिण्यास सुरवात करणार आहे. गेल्या काही दिवसांपास्नं ब्लॉग लिहिण्यास वेळच मिळत नव्हता. खरं सांगायचं तर मनच होत नव्हतं. पण 'शो मस्ट गो ऑन'ही गोष्ट ध्यानात ठेवून आता हा ब्लॉग पुन्हा पहिल्यासारखा लिहिता राहिल.

थोड्याच दिवसांत एक आगळ्यावेगळ्या भाजीवाल्याची कथा घेऊन येतोय. ही गोष्ट आहे एका भाजी विक्रेत्याची. ज्या भाजी विक्रेत्याला आपल्या भाजीच्या स्टॉलबरोबरच वडे विक्रीचा स्टॉल सुरु करायचा होता. त्याचं एक्स्पान्शन करायचं होतं. लोकांपर्यत आपला ब्रँड पोचवायचा होता आणि जगातला सर्वाधिक मोठा वडा विक्रेता व्हायचं होतं...

भाजी विक्रेत्याचे वडे लोकप्रिय ठरतात का, त्याचे वडे खरोखरंच चमचमीत आणि खमंग असतात का, भाजीप्रमाणेच वड्यांसाठीही तो वाखाणला जातो का... या आणि इतर अनेक प्रश्नांची उत्तर घेऊन येतोय माझा नवा ब्लॉग 'भाजीवाल्याचा झाला वडा...' लवकरच...

Friday, October 30, 2009

रविवार सकाळ @ मातोश्री...



"जब वुई मेट' चित्रपटातलं "ते" दृष्य आठवतंय...? शाहिद कपूर करिनाला सोडून आल्यानंतर प्रथमच "शेअर होल्डर्स'ना सामोरा जातो. तेव्हा त्याच्या तोंडचे संवाद आठवतात...? ""आदित्य कश्‍यप अपने फादर की जगह नही ले सकता. कंपनी स्पिल्ट होनेवाली है. हमारे शेअर प्रायझेस ऑल टाईम लो है. सारे नये ब्रॅंड्‌स फ्लॉप हो चुके है. उपर से 572 क्‍लेम्स. इन आदर वर्डस अपनी हालत बहुत खराब हो गई है बॉस. अपनी तो बॅंण्ड बज गई है बॉस...'' इइ.

परिस्थिती अगदी तशीच्या तशी नसली तरी शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव यांची अवस्था काहीशी अशीच आहे. उद्धव हे अगदी चोहोबाजूंनी समस्या आणि अडीअडचणींनी घेरले गेले आहेत. राज-राणे यांच्या बंडखोरीतून शिवसेनेला बाहेर काढून सैनिकांमध्ये मनोधैर्य निर्माण करण्यात ते यशस्वी ठरले. पण लोकसभा निवडणुकीत मुंबईत बसायचा तो फटका बसलाच. त्यावेळी किमान मराठवाड्यानं तरी साथ दिली होती. पण विधानसभा निवडणुकीत मुंबईप्रमाणेच मराठवाड्यानंही पाठ फिरविली. त्यामुळं उद्धव यांच्या नेतृत्वाच्या क्षमतेबाबतच प्रश्‍नचिन्ह निर्माण केलं जातंय. मराठी मतदार आणि शिवसैनिकांमध्येही काही प्रमाणात कुजबूज सुरु झालीय.

च्या दिवशी उद्धव ठाकरे पत्रकारांना सामोरेही गेले नाहीत. त्यामुळं उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया काय, ते पराभवाचं विश्‍लेषण कसं करतात हे जाणून घेण्याची उत्सुकता होती. त्यामुळंच भेटण्याची इच्छा व्यक्त करणारा डचड उद्धव यांना टाकला. अनपेक्षितपणे उद्धव यांचा तातडीनं "रिप्लाय' आला, "उद्या दुपारी साडेबारा वाजता मातोश्री..." निमंत्रण स्वीकारलं आणि रविवारी मध्यान्हीला (पत्रकार परिषदेच्या आदल्या दिवशीच...) मी आणि माझा सहकारी हृषिकेश देशपांडे मातोश्रीवर पोचलो. उद्धव यांच्याशी सविस्तर चर्चा तर झालीच पण ठाकरे कुटुंबियांचा जिव्हाळा अनुभवण्याची संधीही मिळाली.

एखाद्या घरात गेल्यानंतर यजमानाकडनं होणारं स्वागत, नुकतीच दिवाळी झाल्यामुळं फराळासाठी होणारा आग्रह अथवा खास "सीकेपी' पद्धतीनं तयार केलेल्या "कानुल्या' किंवा पोहे खाण्यासाठी रश्‍मी वहिनींकडून होणारा आग्रह... हे सगळं अनपेक्षित तर होतंच पण त्यापेक्षाही आश्‍चर्यकारक होतं. मातोश्रीवर पोचलो तेव्हा उद्धव हे मनोहर जोशी यांच्याशी बोलत होते. त्यामुळं रश्‍मी वहिनींनी सुरवातीला आमचं आदरातिथ्य केलं. अगदी कोण कुठनं उभं होतं किंवा माध्यमं कशी एकांगी बातम्या देतात इथपासून ते "सीकेपी' खाद्यपदार्थ किंवा मराठीचा मुद्दा किती महत्वाचा आहे, इथपर्यंत सर्वच विषयांवर त्या मोकळेपणानं बोलत होत्या. माध्यमांवर त्यांची किती "नजर' आहे, हे त्या देत असलेल्या संदर्भांवरनं अगदी क्षणोक्षणी जाणवत होतं.

सरांशी "गुफ्तगू' झाल्यानंतर उद्धव आमच्याशी "शिवसंवाद' साधायला आले. तत्पूर्वी त्यांनी निखील वागळे यांच्या "आजचा सवाल'चं उत्तर दिलेलं होतं. गेल्या पाच वर्षांत उद्धव यांनी जितकी आंदोलनं केली तितकी राज्यातल्या एकाही नेत्यानं केली नाहीत. कापूस दिंडी, कर्जमुक्ती देता का जाता, ऊस दरासाठी आंदोलन किंवा "शिवसंवाद' दौरा... इतक्‍यांदा जनतेमध्ये गेलेला हा नेता निकालानंतर पुरता हताश झाला असेल किंवा खचून गेला असेल, असं आम्हाला वाटलं होतं. राजचा दबदबा वाढत जातोय. दुसरीकडे मुंबई आणि मराठवाड्यासारखे बालेकिल्ले पडताहेत. याची चिंता त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत होतीच. पण मी इतक्‍यानं खचून जाणाऱ्यातला नाही, हे देखील त्यांच्या बोलण्यातनं जाणवत होतं.

"मी महाराष्ट्र बोलतोय...'च्या निमित्तानं आम्ही राज्यात काय काय पाहिलं, याची माहिती ते आवर्जून घेत होते. शिवसेनेचे लोकप्रतिनिधी असलेला भागही कसा अविकसित आहे, हे आम्ही त्यांना सांगितलं. तसंच एकाच उमेदवाराला अनेकदा संधी दिल्यामुळंही काही ठिकाणी फटका बसला असावा, असं सांगितलं. त्यावर बरीच चर्चा झाली. त्यांनी मांडलेली बाजू कार्यप्रमुखातली माणुसकी दाखवणारी होती.

""नारायण राणे सेनेतून बाहेर पडले तेव्हा त्यांनी मराठवाड्यातल्या प्रत्येक आमदाराला चुचकारलं होतं. पण त्यांनी सेनेवरची निष्ठा ढळू दिली नाही. त्यात अनेक ज्येष्ठांचाही समावेश होता. सांदिपान भुमरें अथवा अण्णासाहेब माने यांना पुन्हा तिकिट मिळालं ते त्यांच्या निष्ठेमुळंच. त्यांचा पराभव झाला. पण सेनेत निष्ठावंतांनाच तिकिटं मिळतात, हे दाखवून देण्यासाठी त्यांना पुन्हा उमेदवारी दिली होती. सेनेत तिकिटं विकली जात नाहीत, हे दाखवून द्यायचं होतं,'' असं उद्धव यांचं स्पष्टीकरण वेगळा आयाम मांडणारं होतं.

दुसरीकडे अनुसूया खेडकर (कै. आमदार प्रकाश खेडकर यांच्या पत्नी) यांनी इच्छा नसताना पण सेनेला गरज असताना नांदेडमधून निवडणूक लढविली. मग आता दुसरा उमेदवार मिळाला म्हणून त्यांना उमेदवारी डावलणं मला माणूस म्हणून पटलं नाही, हे स्पष्टीकरणही शांत आणि संयमी नेत्याची आणखी एक बाजू दाखवणारं होतं. माध्यमांकडून दोन्ही बाजूनी होणाऱ्या टीकेला सामोरं जाताना उद्धव भूमिकेवर ठाम होते. ज्येष्ठांना तिकिटं द्या किंवा त्यांची तिकिटं कापा, टीका होतेच. शिवसेना राडेबाज, शिवराळ भाषा वापरणारी किंवा गुंडप्रवृत्तीची म्हणूनही टीका होत होती आणि आता संस्कृती बदलतोय तरीही टीका होतेच. त्यामुळं माध्यमं दोन्ही बाजूनं बोलतात आणि शिवसेनेवरच टीका करतात, हे त्यांनी सोदाहरण दाखवून दिलं. तसंच आम्ही आमचा मार्ग सोडणार नाही, हेही निक्षून सांगितलं.

""मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या जनतेमध्ये गेलो. इतर कोणीही गेलं नाही इतके वेळा गेलो. तरीही मला आणि शिवसेनेला अपयश का आलं,'' याचं उत्तर त्यांना जास्त सतावत होतं. कदाचित उद्धव जितके कार्यरत आहेत तितके त्यांचे आमदार-खासदार नाहीत, हेच त्याचं उत्तर आहे. आपल्या भागाचा विकास करण्यात शिवसेनेचे लोकप्रतिनिधी पुढे नाहीत आणि हे आम्ही प्रत्यक्ष पाहिल्यामुळं आम्हाला माहिती होतं. ते त्यांनाही सांगितलं. शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करत असताना सभागृहात मात्र, पक्ष तितका सक्षम वाटत नव्हता. अशा काही विधानांच्या वेळी त्यांचा चेहरा पुरेसा बोलका होता.

आता मुंबईतली पक्ष संघटना वॉर्ड स्तरापासून पुन्हा बांधून काढायची, मराठवाडा-विदर्भात फक्त आंदोलन न करता विधायक तसंच विकासकामंही सुरु करायची, पुन्हा एकदा त्याच तडफेनं स्वकीय तसंच परकीयांशी दोन हात करायचे आणि मुख्य म्हणजे या सर्वांच्या जोडीला पुन्हा एकदा ज्वलंत हिंदुत्व हातात घ्यायचं, अशा अनेक गोष्टींचे संकेत कळत नकळत मिळत होते. जवळपास तास दीडतासांच्या भेटीमध्ये उद्धव यांच्याशी अगदी मोकळेपणानं चर्चा झाली.

राज आणि राणे यांच्या तडाख्यामुळं शिवसेनेची पडझड होणार, हे माहिती होतंच. पण उद्धव पराभूत झाले असले तरी "फिनिक्‍स' पक्षाप्रमाणे उभं राहण्याची जिद्द त्यांच्यात आहे. शांत, संयमी आणि सुसंस्कृत आहेत. ते चिवट आहेत. लोकांमध्ये मिसळण्यात आणि आंदोलनांचं नेतृत्व करण्यात त्यांना शरम वाटत नाही. तरीही शिवसेनेचे 44 आमदार आहेत. त्यातला 26 तरुण आहेत. लोकांसाठी जनतेमध्ये जाऊन आंदोलनं करणारा आणि त्यांच्या व्यथा समजून घेणारा उद्धव यांच्या व्यतिरिक्त एकही नेता नाही. अशा त्यामुळंच त्यांच्या या प्रयत्नांना लोकांची आज ना उद्या साथ लाभणार का, याचीच उत्सुकता आहे.

लेखाच्या सुरवातीला "जब वुई मेट' या चित्रपटात वापरलेल्या संवादाचा उत्तरार्ध खालील बाजूस आहे. फक्त चित्रपटात शोभेल असाच तो आहे.

""... इससे बुरा और कुछ हो नही सकता. अब सिर्फ अच्छा हो सकता है और होगा. इन्सान जो कुछ रियली चाहता है ना, ऍक्‍च्युली... उसे हमेशा वोही मिलता है. और इस बार मे रियल मे चाहता हूँ. ऍक्‍च्युअल मे. हर प्रॉब्लेम को में सामने से फेस करु. हर इनकमप्लिट प्लॅन को कम्प्लिट करु. इस कंपनी को वहा तक ले जाऊ जहा खुद डॅड भी नही सोच सकते...''

चित्रपटाच्या उत्तरार्धात शाहिद कपूर त्याच्या वडिलांची कंपनी खूप मोठी करतो. त्याला खूप फायदा होतो वगैरे वगैरे... तुलना करण्याची इच्छा नाही. पण तरीही उद्धव यांच्या आयुष्यातही हा संवाद खरा ठरेल का... असा विचार करतच "मातोश्री'तून बाहेर पडलो... समाधानी मनानं!

Thursday, October 29, 2009

युवराज आदित्याय नमः



रंग उडालेली स्काय ब्लू जीन्स, केल्विन क्‍लेनचा टी-शर्ट, चेहऱ्यावर "डिट्टो' वडिलांसारखं हास्य, वारश्‍यानंच चालत आलेला बोलण्या-चालण्यातला आत्मविश्‍वास आणि मिश्‍किल वृत्ती... ठाकरे घराण्यातल्या चौथ्या पिढीचा प्रतिनिधी असलेल्या आदित्य उद्धव ठाकरेची ही पहिली ओळख. "साम मराठी'साठी आदित्यची मुलाखत घेण्यासाठी "मातोश्री'वर गेलो होतो. तेव्हा आदित्यची ही ओळख मनावर ठसा उमटवून गेली. मुलाखत जसजशी रंगत गेली तसतसा त्याच्यातला "कॉन्फिडन्स' दुणावत गेला.

पुरोगामी विचारांचे प्रबोधनकार ठाकरे, ज्वलंत हिंदुत्ववादी आणि मराठी माणसाचा मानबिंदू असलेले बाळासाहेब तर सभ्य आणि सुंस्कृत राजकारणी अशी ओळख असलेले उद्धव ठाकरे... या तीनपैकी कोणती प्रतिमा तुला अधिक जवळची वाटते किंवा कोणत्या प्रतिमेत तू "फिट्ट' बसतो, असं विचारल्यानंतर आदित्यनं दिलेलं उत्तर त्याची वाटचाल परिपक्वतेच्या दिशेनं सुरु असल्याचं द्योतक वाटलं. ""तिघांच्याही भूमिका त्या-त्या काळाशी सुसंगत होत्या. किंवा संबंधित भूमिका ही त्या काळाची गरज होती. त्यामुळं कालानुरुप विचार केला तर तिघांच्याही भूमिका जवळच्या वाटतात. भविष्यात कालानुरुप आवश्‍यक असेल तशीच माझी भूमिका असेल. कदाचित ती या तिघांपेक्षा वेगळीही असेल,'' असे सांगून आदित्यनं त्याच्यातला "स्पार्क' दाखवून दिला.

घरातल्या प्रत्येक नात्यापासून ते राज ठाकरे यांच्याशी असलेल्या संबंधांबद्दल आणि विधानसभेच्या प्रचारापासून ते स्वयंसेवी कामाबद्दल प्रत्येक विषयावर तो अगदी स्पष्टपणे बोलतो. खास ठाकरे शैलीप्रमाणे कोणताही आडपडदा न बाळगता! सध्या तो "झेवियर्स'मधून बीए करतोय. राज्यशास्त्र आणि इतिहास ते त्याच्या आवडीचे विषय आहेत. बीए झाल्यानंतर पुढचं शिक्षण आणि करियर कशात करायचं याबद्दल विचार करायचा, असं तो सांगतो. बाबांप्रमाणे स्वतःला पूर्णपणे राजकारणात झोकून देणार का, या प्रश्‍नावर सध्या तरी त्याच्याकडे उत्तर नाही. सुरवातीला शिक्षण या विषयात काहीतरी ठोस करण्याची त्याची इच्छा आहे. त्याची सुरवात प्राध्यापकांच्या संपाच्या निमित्ताने झाली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आदित्यला "प्रोजेक्‍ट' करण्यात आलं, असं माध्यमांना वाटत असलं तरी हे विधान तो खोडून काढतो. मी प्रचारात उतरण्याचा विचार करतोय, पण राजकारणात सक्रिय होईन किंवा नाही हे अजूनही ठरलेले नाही. मग "प्रोजेक्‍ट' करण्याचा प्रश्‍न येतोच कुठं, असा प्रतिप्रश्‍न तो विचारतो.

तूर्तास तरी अभ्यास, कविता लेखन, फोटोग्राफी, कॉलेजियन्सशी निगडित आंदोलनं आणि स्वयंसेवी संस्था यांच्यापुरतंच मर्यादित राहण्याचं आदित्यनं ठरवलंय. कार्यप्रमुखांनी आदेश दिला तरच तो प्रचारात उतरणार आहे. पण फक्त निवडणुकीपुरतं. नंतर पुन्हा कॉलेज, अभ्यास आणि सामाजिक काम. नाही म्हटलं तरी आदित्यच्या "शिवसेना भवन'च्या फेऱ्या वाढल्या आहेत. शिवसेनेच्या कार्य पद्धतीची जवळून ओळख व्हावी, यासाठी तो सेना भवनावर असतो. पण तिथं गेलं की त्याला वेगवेगळ्या जिल्ह्यांची निमंत्रण येऊ लागतात. आमच्याकडे दौऱ्यावर या, प्रचारासाठी या वगैरे वगैरे. नुकतंच त्याला अकोल्यामध्ये प्रचाराला येण्याचं निमंत्रण आलंय. काही ठिकाणी तो बाबांबरोबर प्रचाराला जाईलही. पण अजून काही निश्‍चित झालेलं नाही. जगभरातल्या शिक्षणतज्ज्ञांचे शिक्षणविषयक प्रबंध आणि पेपर्सचा अभ्यास करणं,

बाहेरच्यांसाठी जहाल किंवा कठोर वाटणारे बाळासाहेब खूप हळवे आणि "इमोशनल' आहेत, असं आदित्यला वाटतं. घरी आई आणि बाबा यापैकी कोणाचा मार जास्त खाल्ला आहे, याला मिळालेलं उत्तर धक्कादायक पण गमतीशीर आहे. आदित्य म्हणतो, ""कोणाचाच मार खाल्लेला नाही. मुळात आमच्याकडे असा नियमच आहे. कोणीही कोणावरही हात उगारायचा नाही. त्यामुळं ओरडा खाल्ला पण मार खाल्लेला नाही. आईकडून नाही आणि बाबांकडूनही नाही.'' ""माझा जन्म जरी ठाकरे घराण्यात झालेला असला तरी आईनं आम्हाला कायम जमिनीवर ठेवलं. आम्ही वेगळे किंवा असामान्य आहोत, असं जाणवूच दिलं नाही. जिथं रांग असेल तिथं रांगेत उभं रहायचं, शाळेत झालेली शिक्षा इतरांप्रमाणेच भोगायची आणि ठाकरे नावाचा गैरवापर करायचा नाही, हे आईनं आमच्या मनावर चांगलंच ठसवलं आहे,'' असं आदित्य आवर्जून सांगतो.

""कॉलेजमध्ये ओळख करुन देताना मी फक्त आदित्य इतकीच ओळख सांगतो. कोणी अगदीच विचारलं तर "आदित्य टी' असं सांगतो. अगदीच जर कोणी खोदून खोदून विचारलं तर आदित्य ठाकरे अशी ओळख करुन देतो. ठाकरे नावाचा मला अभिमान आहे. पण त्यामुळं आपसूक मिळणारे फायदे मला नको आहेत,'' असं आदित्य सांगतो. "व्हॅलेन्टाईन डे'च्या दिवशी आदित्य शक्‍यतो कॉलेजला जाण्याचं टाळतो. गेल्या दोन-तीन वर्षांपासून हा मुद्दा तितकाचा वादग्रस्त राहिलेला नाही. त्यामुळं "व्हॅलेन्टाईन डे'ला "गोची' होत नाही, असं आदित्यचं म्हणणं आहे.

शिवसेना या राजकीय पक्षाचं वलय आणि कार्यप्रमुखांचा मुलगा असल्याचा अहंकार त्याच्यामध्ये जाणवत नाही. कदाचित हीच गोष्ट भविष्यात त्याच्यासाठी "प्लस पॉईंट' ठरु शकेल. आदित्यचं वागणं बोलणं हे जवळपास उद्धव ठाकरे यांच्यासरखंच आहे. त्यामुळंच तो शांत आणि संयमी वाटत असावा. आदित्य राजकारणात प्रवेश करेल किंवा त्याला लोक स्वीकारतील की नाही, याबद्दल आताच बोलायची गरज नाही. पण बंदे मे दम है... यात वाद नाही.

Friday, October 16, 2009

दिन दिन दिवाळी...!



दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा...!!!

काही वर्षांपूर्वी दिवाळीच्या कालावधीत "लोकसत्ता'मध्ये एक अग्रलेख आला होता. विषय अर्थातच, दिवाळीचा होता. प्रकाशाचा उत्सव, जल्लोषाचा आणि उत्साहाचा सण, फटाके, फराळ, दिवाळी अंक आणि दिवाळीच्या अनुषंगानं येणारे नेहमीचेच इतर मुद्दे त्यामध्ये होते. पण त्यातला एक मुद्दा नवीन होता आणि त्यामुळंच कायम लक्षात राहण्याजोगा होता. त्याचा काही अंश असा...

"आपलं रोजचं आयुष्य हातावरच्या किंवा भिंतीवरच्या घड्याळाभोवती फिरत असतं. पण आपल्या कुटुंबाचं आयुष्य हे एका वेगळ्याच घड्याळाभोवती फिरत असतं. त्या घड्याळाचं नाव आहे "दिवाळी! हो दिवाळी!! घराला रंग द्यायचा असो, गाडी घ्यायची असो, इंटिरियर चेंज करायचं असो किंवा टीव्ही, फ्रीज किंवा सोन्या-चांदीचे दागिने घ्यायचे असोत. या खरेदीसाठी दिवाळीपेक्षा सर्वोत्तम मुहूर्त नसतो. त्यामुळेच एखादी महत्वाची खरेदी असेल तर ""... दिवाळीला घेऊयात की...'' असे संवाद आपल्याला घरातून ऐकू येतात. अशा या दिवाळीच्या घड्याळाभोवती आपलं आयुष्य फिरत असतं. आपलं कुटुंब फिरत असतं....''

अश्‍शी ही दिवाळी. दिवाळी येण्यापूर्वी जवळपास महिनी दीड महिना तिची चाहूल लागते. घरातल्या भांड्याकुंड्यांची स्वच्छता होते. घराची पण साफसफाई होते. मग कोणाला कोणते कपडे घ्यायचे किंवा यंदा दिवाळीला काय घ्यायचं याच्यावर चर्चा सुरु होते. पगार आणि बोनस (अर्थातच, मंदीच्या जमान्यात मिळाला तर...) झाल्यावर कपड्यांच्या खरेदीची लगबग सुरु होते. आकाशकंदिल, पणत्या विकत घेतल्या जातात. दिवाळीला आठवडा राहिला असताना घराघरातून फराळाच्या पदार्थांचे सुगंध दरवळू लागतात. हल्ली धावपळीच्या जगातही किमान एखादा तरी पदार्थ घरी केला जातोच. मग ती चकली असेल, लाडू असेल, ओल्या नारळाची करंजी असेल किंवा शेव-चिवडा असेल. फराळाचं आटोपलं आणि दिवाळीला एक-दोन दिवस बाकी असताना. मोती साबण आणि प्रवीणच्या उटण्याची खरेदी होते. (मोती साबण ही दिवाळीची खरी ओळख. मोती साबणाच्या आंघोळीशिवाय दिवाळी असल्याचं वाटतंच नाही.) फटाक्‍यांची खरेदी पार पडते. अशा पद्धतीनं सर्व प्रकारची खरेदी करुन आपण जय्यत तयारीनिशी दिवाळीचं स्वागत करण्यासाठी सज्ज होतो.

पूर्वी दिवाळीच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या "दिवाळी बंपर'चं तिकिट बहुतांश घरांमध्ये खरेदी केलं जायचं. बाबाही ते कायम खरेदी करायचे. आम्हाला ते कधीच लागलं नाही, ही गोष्ट सोडून द्या. पण दिवाळीच्या वेळी लॉटरीचं तिकिट हे मोती साबणाइतकंच घट्ट रुजलेलं समीकरण होतं. आता कदाचित ते तितकसं राहिलेलं नाही. पण दिवाळीचा आनंद आणि उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. दिवाळीत घरासमोर पहिला फटाका कोण वाजवणार यासाठी लागणारी स्पर्धा. त्यासाठी सक्काळी सक्काळी लवकर उठून अभ्यंगस्नान करुन तयार होणं, फटाके वाजवून झाल्यावर सारसबागेत किंवा एखाद्या देवळात दर्शनाला जाणं, त्यानंतर घरी येऊन दाबून फराळ करणं आणि सरतेशेवटी गादीवर लोळत दिवाळी अंकातला एखादा लेख वाचून काढणं... हे सारं आहे तसं सुरु आहे.

दिवाळी निमित्तानं मित्र-मैत्रिणी किंवा नातेवाईक एकत्र येऊन कल्ला करणं किंवा जुन्या आठवणी काढून हास्यकल्लोळात बुडून जाणं, यामध्ये जराही खंड नाही. जगणं बदलतंय असं आपण म्हणतो. पण अजूनही लहानग्यांना दिवाळीच्या किल्ल्यांचं आकर्षण आहेच. ते किल्ले करतात. कदाचित तुमच्या-माझ्याकडून यामध्ये क्वचित प्रसंगी खंड पडला असेलही. तरी पण आपल्यासारख्या इतर अनेकांकडून ही परंपरा पार पाडली जात आहे, पुढे नेली जात आहे. हेच तर दिवाळीचं वैशिष्ट्य आहे.

दिवाळी आणि "पोस्त' हे तर कधीच एकमेकांपासून वेगळे केले जाऊ शकत नाही. मग तो इमारतीचा वॉचमन असो, परिसरात गस्त घालणारा गुरखा असो, घरात काम करणाऱ्या मावशी असोत, महापालिकेचे कर्मचारी असो किंवा संदेशवाहक पोस्टमन असो. प्रत्येकालाच "दिवाळी' हवी असते. मग आपणही त्यांना फारसा विरोध करत नाही. आपल्याला शक्‍य असेल तितकी "दिवाळी' त्यांना देऊनच टाकतो. घरातली कामवाली आणि पत्र घेऊन येणारा पोस्टमन यांना दिली जाणारी "पोस्त' ही काहीशी अधिक खुषीनं दिली जाते. इतरांना दिल्या जाणाऱ्या "दिवाळी'त आपुलकीचा ओलावा कदाचित नसेलही. पण "पोस्टमन'च्या कामातला प्रामाणिकपणा आणि त्याची चिकाटी लक्षात घेतली तर तो मागेल तितकी "पोस्ट' आपण त्याला देतोच. तिथं आपण कमीजास्तचा विचार करत नाही.

पूर्वी दिवाळीसारखा उत्सव वर्षातून एकदा यायचा. त्यावेळी भरभरुन खरेदी व्हायची. अनेकांकडे तर दिवाळी आणि वाढदिवस अशी दोनच वेळा खरेदी व्हायची. काही ठिकाणी अजूनही होत असेल. पण कितीही मंदी असली किंवा पगार कितीही कमी असले तरी प्रत्येक घरात दिवाळीचा तोच आनंद असतो, दिवाळी साजरी करण्यात तोच उत्साह असतो. स्वरुपातला फरक इथं गौण ठरतो. जागतिकीकरणामुळं आता अनेक कुटुंबांची आर्थिक घडी पूर्णपणे बदललीय. पूर्वीइतकी गरीबी त्यांच्याकडे नाही. अनेकांना गलेलठ्ठ पगार आहेत. त्यामुळं वर्षभरात कधीही काहीही खरेदी करण्याची क्षमता ते बाळगून असतात. पण अशाही परिस्थितीत दिवाळीचं महत्व पूर्वीइतकंच आहे. कारण फक्त पैसा आणि खरेदी म्हणजेच दिवाळी नाही. श्रीमंती आणि ऐश्‍वर्य म्हणजे दिवाळी नाही. घराबाहेर एखादा आकाशकंदील आणि दोन-चार पणत्या लावल्या तरी घराचं आणि दिवाळीचं वेगळेपण त्यातनं स्पष्टपणे जाणवतं.

सो बी हॅप्पी आणि हॅप्पी दिवाली... शुभ दीपावली...!!!

Thursday, October 08, 2009

या टोपीखाली दडलंय काय?



आघाडीप्रमाणेच विजयाची संधी युतीलाही!

महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक ऐन रंगात आलीय. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला हॅटट्रिक करण्याची संधी मिळणार का, नाकर्ते हटून शिवसेना-भाजपचे सरकार सत्तेवर येणार, याची उत्सुकता शिगेला पोचलीय. राजकीय अभ्यासकांचीही, नागरिकांचीही आणि अर्थातच माझीही.

पण काही जणांना या निवडणुकीत काय होणार, हे माझ्याकडून जाणून घेण्याची उत्सुकता लागून राहिली आहे. लोकसभेच्या वेळी मी व्यक्त केलेले अंदाज काही प्रमाणात चुकले होते. त्यामुळे यंदा मी व्यक्त केलेले अंदाज खरे ठरतात की मी पुन्हा तोंडावर आपटतो, याचीच उत्सुकता काही जणांना लागून राहिलीय. माझ्या गेल्या दोन-तीन पोस्टच्या कॉमेंटसवरुन हे स्पष्ट होतंय. कोणीतरी नाव न लिहिता मला अंदाज व्यक्त करा, अंदाज व्यक्त करा, असा आग्रह करतंय. वास्तविक पाहता जे नाव न लिहिता आव्हान देतात, प्रतिक्रिया व्यक्त करतात, त्यांच्या मताला फारसं महत्व देऊ नये, असं माझं मत आहे. जे आहे ते रोखठोक असावं, तोंडावर असावं, अशी माझी इच्छा असते. पण माझ्या अंदाजांची कोण तरी वाट पाहतं आहे (मी चुकेन की नाही हे पाहण्यासाठी का होईना!) हे वाचूनच मला खूप भरुन आलंय. पण खरं सांगायचं झालं तर काहीच मत व्यक्त करणं अवघड आहे.

गेल्या वेळेसप्रमाणेच यंदाही आम्ही `मी महाराष्ट्र बोलतोय...` या कार्यक्रमासाठी उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दौ-यावर गेलो होतो. मुंबईतही थोडंसं फिरलो. कोकण, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही सामान्य लोकांशी, पत्रकारांशी, मित्रांशी बोलतोय. तिथली परिस्थिती जाणून घेतोय. पण काहीच अंदाज अजून लागत नाहीये. निवडणुकीपूर्वी म्हणजे दौ-यावर बाहेर पडेपर्यंत मला असं वाटत होतं की लोकांमध्ये सरकारविरोधी आणि शिवसेना-भाजप युतीच्या बाजूने लाट आहे. पण तसं काहीही नाहीये. लोकांमध्ये शिवसेना-भाजपबद्दल सहानुभूती आहे. पण त्यांच्या बाजूने लाट नाही. अनेक ठिकाणी स्थानिक मुद्द्यांमुळे लोक युतीच्या बाजूने आहेत. काही ठिकाणी युतीच्या उमेदवारांचाही प्रभाव आहे. पण लाट नाही.

मराठवाड्यात काही प्रमाणात युतीच्या (जास्त करुन शिवसेनेच्या) जागा वाढतील, असं वाटतंय. पण काही जागा त्यांना गमवाव्याही लागतील. (कदाचित बीड). पण अमुक एक जागा अमुक एका पक्षाला मिळेल, असं ठामपणे अवघड आहे. विदर्भातही काही प्रमाणात अशीच परिस्थिती आहे, असं म्हणावं लागेल. पण उत्तर महाराष्ट्रात युतीला मिळणा-या जागांची संख्या घटेल, असा अंदाज आहे. त्यामुळं युतीची लाट आहे, असं म्हणता येणार नाही. पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी-काँग्रेसचा बालेकिल्ला. पण त्यांचे बंडखोर आणि काही ठिकाणी अपक्ष उमेदवारांमुळे ठामपणे कोणाला किती जागा मिळणार, याचं भाकित करणं, खूप अवघड आहे.

अनेक ठिकाणी हिंडल्यानंतर युती आणि आघाडी या दोघांचंही जागावाटप काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं झाल्याचं जाणवलं. त्यामुळंच तिथं उमेदवारांबद्दल नाराजी आहे. कुठं बंडखोरीही झालीय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये हे प्रमाण अधिक असलं तरी शिवसेना आणि भाजपमध्ये मात्र, हे नाहीच असं नाही. चारही प्रमुख पक्षांना या गोष्टींचा फटका बसणार आहे. अपक्ष आणि बंडखोर यांच्यामुळं काहीच अंदाज व्यक्त करता येत नाही. तसंच रिपब्लिकन डावी लोकशाही आघाडीचे उमेदवार काँग्रेस-राष्ट्रवादीचे किती उमेदवार पाडणार, यावरही काही ठिकाणचे निकाल अवलंबून आहेत.

दुसरीकडे मुंबईतली मनसेची जादू गेल्यावेळेस इतकी चालेल की नाही, याचाही अंदाज अजून येत नाहीये. लोकांशी बोलल्यानंतर मनसेची जादू काही प्रमाणात कमी झाल्याचं जाणवतं आहे. पण नेमकं हे प्रमाण किती कमी झालं त्याबद्दलचं भाकित व्यक्त करता येत नाही. मनसेचा आकडा दहापर्यंत जाणार की पाचच्या आतच आटोपतं घ्यावं लागणार, याचा अंदाज लागत नाहीये. मुख्य म्हणजे मनसेचे किती उमेदवार येणार यापेक्षा ते युतीचे किती उमेदवार पाडणार याची उत्सुकता आहे. पण गेल्या निवडणुकीत युतीला फक्त १५ जागा होत्या आणि आघाडीला १९. यंदा मनसेनं कितीही प्रयत्न केले तरी युतीच्या १५-१६ जागा नक्की येतील असं चित्र आहे. त्यामुळं मनसेनं कितीही मतं खाल्ली किंवा सुपारीबाज पद्धत अवलंबली तरी युतीच्या जागा १५ च्या खाली जाणार नाही, हे नक्की.

तिकडे कोकणात युतीला गेल्यावेळी जितका फटका बसला होता तितका यंदा बसणार नाही. चिपळूण, रत्नागिरी, राजापूर किंवा अगदी महाडची जागाही यंदा युतीला मिळू शकते. म्हणजे कोकणातून युतीला फायदा होणार, असं दिसतंय. ठाण्यातही राजन राजे यांची यंदा हवा नाही. ठाण्यातल्या तीनही जागा युतीलाच मिळण्याची शक्यता अधिक आहे. कळवा-मुंब्राची जागा जितेंद्र आव्हाड यांच्याकडे जाईलही कदाचित. पण त्यातही कदाचित आहेच. ठाण्यातल्या एकूण चित्र गेल्यावेळेसपेक्षा वेगळं असण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी-काँग्रेसनं इथून स्वीप केला होता. पण यंदा इथंही युतीच्या जागा वाढताहेत. तिकडे वसई-विरार पट्ट्यात बहुजन विकास आघाडीचा बोलबाला आहे. तिथंही आघाडीची डाळ शिजणा नाहीये. त्यामुळं या पट्ट्यात युतीच्या जागा वाढतील पण आघाडीच्या कमी होतील. (बहुजन विकास आघाडी काँग्रेसचीच बटिक आहे. पण चिन्ह पंजा नाही. त्यामुळं संख्याबळात ते इतर म्हणूनच गणले जातील)

एकूणच सगळं चित्र अस्पष्ट आणि धूसर आहे. काही ठिकाणी जागांची अदलाबदली होईल. कुठं युतीच्या जागा वाढतील तर कुठं आघाडी युतीकडून काही जागा हिसकावून घेईल. पण नेमकं काय होईल, हे आताच सांगणं अवघड आहे. कदाचित १९९५ प्रमाणे ४५ अपक्ष (बंडखोर आणि इतर किरकोळ उमेदवार) निवडून आले तर कदाचित परिस्थिती वेगळी असू शकते. अपक्ष, बंडखोर आणि तिस-या आघाडीचे किंवा तिस-या पक्षाचे उमेदवार यांचा फटका काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीलाच सर्वाधिक बसणार आहे. शिवसेना-भाजप युतीला कमी फटका बसेल. त्यामुळं यंदा युतीला गेल्या दोन वेळेसपेक्षा सर्वाधिक संधी आहे. यंदा नाही तर पुढच्या दोन टर्म तर नक्की नाही, अशी परिस्थिती आहे.

पण युतीचं जागावाटप, राज-उद्धव यांचे वाद, गडकरी-मुंडे यांच्या वादामुळं झालेलं जागावाटप, परस्परांचं काम करताना सेना-भाजप युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी आणि मुख्य म्हणजे विनय नातू यांच्या तिकिटावरुन झालेलं रामायण अशा सर्व गोष्टी पाहता युतीला फटका बसला तर तो त्यांच्याच कृत्याचं फळ असेल. पुढं ताट वाढून ठेवलंय. पण ते खाण्याची शिवसेना-भाजप युतीची इच्छाच नसेल तर कोण काय करणार... युतीला संधी नक्की आहे. गेल्या दोनवेळेस पेक्षा नक्कीच अधिक आहे. पण युतीची लाट नाही. त्यामुळं त्यांना झगडून यश मिळवावं लागणारेय. उद्धव ठाकरेंनी एकट्यानं जिवाचं रान करुन उपयोग नाही. शिवसेनेला ७०-७५ पेक्षा अधिक जागा नक्की मिळतील. गडकरी-मुंडे-खडसे यांनीही भाजपच्या किमान ५० जागा तरी निवडून आणल्या पाहिजेत. तरच युतीची सत्ता येण्याची शक्यता आहे. पाहूयात खरंच हा बदल होतो का...

Tuesday, October 06, 2009

कोण आहेत मिलिंद नार्वेकर?



शिवसेनेचे 'डेप्युटी' कार्यप्रमुख!!!

प्रत्येक निवडणूक जवळ आली की मिलिंद नार्वेकर या नावाची चर्चा होते. यावेळीही शिवसेनेचे औरंगाबादेतले बंडखोर माजी खासदार प्रदीप जैस्वाल यांच्या आरोपांमुळे नार्वेकर गाजले. पण हे नार्वेकर कोण आहेत? ते मातोश्रीपर्यंत पोहोचले कसे? असे प्रश्न आपल्याला पडत असतात. पण प्रत्येक वेळी त्याचं उत्तर मिळतंच असं नाही. मिळालं तरी ते सविस्तर असतं असंही नाही. पण माझा मित्र सचिन परब यानं मिलिंद नार्वेकरबद्दल खूप सविस्तर लिहिलंय आणि अगदी बारीकसारीक माहितीही त्यानं दिलीय. सचिन परब आणि मटा ऑनलाईनच्या परवानगीनं हा लेख माझ्या ब्लॉगच्या वाचकांसाठी खास!!!


रणजीत देसाईंनी श्रीमान योगी लिहायचं ठरवलं तेव्हा प्रख्यात विचारवंत नरहर कुरुंदकर यांनी त्यांना एक पत्र लिहिले. ते पत्रच श्रीमान योगीची प्रस्तावना म्हणूनही छापले आहे. त्यात कुरुंदकरांनी देसाईंना औरंगजेब प्रभावीपणे रंगवायला सांगितलाय. कारण जेवढा औरंगजेब मोठा दाखवाल, तेवढेच शिवाजी मोठे ठरणार आहेत. नारायण राणेंनी हे वाचलेलं नसणार हे निश्चित. पण त्यांच्यातल्या अंगभूत शहाणपणाने त्यांनी याचं मर्म ओळखलं असणार बहुतेक. म्हणून तर त्यांनी शिवसेना सोडताना आपली मोठी प्रतिमा उभी करण्यासाठी आपल्या कहाणीत एक नवा औरंगजेब रंगवला. त्याचं नाव मिलिंद नार्वेकर.

मिलिंदशी राणेंचं काही वैयक्तिक वैर नव्हतंच. तेव्हा उद्धवचा फोन आला तरी राणे घरी उठून उभे राहायचे. त्याकाळात अनेकदा आपल्या कल्पना उद्धवच्या गळी उतरवताना त्यांनी मिलिंदची मदतही घेतलीय. पण तरीही पक्ष सोडताना त्यांनी बाळासाहेब, उद्धव, सुभाष देसाई, मनोहर जोशी यांना थेट टार्गेट करण्याऐवजी केलं ते मिलिंदला. सर्वसामान्य शिवसैनिक आणि पदाधिकारीही मिलिंदला मातोश्री आणि आपल्यामधली धोंडच समजत होता. मिलिंदचा रूबाब, श्रीमंती आणि वेगाने झालेले प्रगती त्यांच्याही डोळ्यात भरत होती. त्यामुळे राणे यांनी आपलं सॉफ्ट टार्गेट ठरवलं. तो मीडियाच्याही ब्लॅक लिस्टमध्येच होता. त्यांनीही त्याला मस्त काळ्या रंगात रंगवला. या सगळ्यामुळे आज कुणाची इच्छा असो अगर नसो, महाराष्ट्राच्या ओळखीचा बनलाय.

मुळात मिलिंद साधा शिवसैनिक होता. मालाडच्या लिबर्टी गार्डन भागातला गटप्रमुख. ९२च्या महापालिका निवडणुकांआधी त्याच्या एरियातला वॉर्ड विभागला. म्हणून नव्या वॉर्डचं शाखाप्रमुखपद मिळेल या आशेने मातोश्रीवर पोहोचला. चुणचुणीत, हुशार, स्मार्ट, बोलण्यात पटाईत असा हा पंचविशीतला मुलगा उद्धव ठाकरेंच्या नजरेत भरला. ते स्वत:च तेव्हा सुभाष देसाईंचं बोट पकडून सेनेत सक्रिय होत होते. उद्धवनी त्याला विचारलं, फक्त शाखाप्रमुख बनायचंय की आणखी काही जबाबदारी उचलायची तयारी आहे. मिलिंद पटकन उत्तरला, तुम्ही सांगाल ते.

आधी मातोश्रीवर पडेल ते काम केलं आणि साधारण ९४ सालच्या उत्तरार्धात मिलिंद रितसर उद्धव ठाकरे यांचा पीए बनला. अपॉइण्टमेण्ट घेणं, डायरी ठेवणं, फोन घेणं, दौरे आखणं, व्यवस्था करणं अशी कामं तो करू लागला. पुढे स्मिता आणि राज ठाकरे मातोश्रीतील सत्ताकेंद्राच्या वर्तुळाबाहेर सरकली आणि उद्धवकडे सेनेची अनभिषिक्त सत्ता आली. उद्धव मोठे होत होते आणि मिलिंदही. कधीच कोणत्याही गोष्टीला नाही न म्हणणारा, सांगितलेली गोष्ट काहीही करून पूर्ण करून देणारा, गोड बोलणारा, प्रसंगी स्वत:कडे वाईटपणा घेणारा, लोकांना कटवण्यात चतुर असणारा हा पीए उद्धव यांच्या गळ्यातला ताईत बनला. उद्धव बाळासाहेबांसारखे चोवीस तास लोकांत रमणारे नेते नव्हते. घरात, कुटुंबात आणि आपल्या छंदांत रमणारा हा साधा मध्यमवर्गीय डोक्याचा माणूस. त्यामुळे त्यांच्या अपॉइण्टमेण्ट कार्यकर्त्यांनाच काय पण पदाधिकारी आणि पत्रकारांनाही महाग होत्या. त्यामुळ मिलिंदचं महत्त्व वाढत चाललं.

कार्यकारी अध्यक्षांशी अपॉइण्टमेण्ट नक्की कोण टाळतं, स्वत: धाकटेसाहेब की मिलिंद हे भल्याभल्यांना कळत नव्हतं. पण मिलिंदच्या मातोश्रीवरच्या वर्चस्वाची चर्चा सगळ्यांमध्येच होती. पण २००४ च्या निवडणुकांत सत्ता दोन बोटं उरल्यामुळे त्याची जाहीर वाच्यता कुठे होत नव्हती. त्याला तोंड फोडलं आमदार भास्कर जाधवांनी. त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. आणि बंडखोरी केली. याच कारण त्यांनी आपल्याला मातोश्रीवर मिलिंदने अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप केला. तेव्हा पहिल्यांदा मिलिंदचं नाव गाजलं. पण त्यादिवसांत राणे मिलिंदची बाजू घेऊन जाधवांच्या विरोधात प्रचार करत होते. पुढे सत्ता आली नाहीच उलट राणेंच्या बंडाने सगळंच बदललं.

राणेंनी मिलिंदकडून आर्थिक व्यवहार होत असल्याचे आरोप केले. राणेंनी मिलिंदविरोधात केलेली हवा इतकी जबरदस्त होती, की त्याच्यावरच्या आरोपांची शहानिशा करण्याची तसदीही कोणी घेतली नाही. पण यातून मिलिंदच मोठा होत होता. भल्याभल्यांना जेरीस आणणा - या राणेंचेही मिलिंदसमोर काही चालले नाही, असे चित्र राणेंच्याच प्रचारातून उभे राहिले. राणेंच्या पोटनिवडणुकीत कणकवलीला तिथल्या लोकांनी मिलिंदला पाहण्यासाठी गर्दी केली होती, यातच सगळं आलं. पुढे राज यांनीही मिलिंदला सोडलं नाही. त्यांनी सांगितलेल्या मातोश्रीवरच्या चांडाळचौकटीत दुसरे तीन कोण हे स्पष्ट नव्हतं, पण त्यातला एक मिलिंद असल्याचं सगळ्यांना माहीत होतं. वर एवढा गहजब झाल्यानंतरही उद्धवच्या दरबारी त्याचं स्थान बळकट होतं आणि आहे.

राज यांच्या बंडानंतर उद्धव बरेच अॅक्सेसेबल झाले. छोटे मेळावे घेत होते. राज्यभर फिरत होते. शिवसेना भवनावर नियमित बसू लागले. मातोश्रीवर पोहोचणं तुलनेनं सोपं झालं. उद्धवपर्यंत पोहोचण्यासाठी अनिल देसाई, विनायक राऊत असे पर्यायही उभे राहिले. पालिकेतल्या विजयानंतर सेनेविषयी वातारवणही बदललं. त्यात अपक्ष आणि गवळीच्या नगरसेवकांना सेनेपर्यंत आणण्यात मिलिंदने महत्त्वाची भूमिका पार पाडली. त्यामुळे मिलिंदला विधानपरिषदेवर पाठवायला हवं, अशी चर्चा त्याच्या हितशत्रूंनी केली. पण या सगळ्यात मिलिंदचं आधीचं प्रस्थ कमी झालं, पण मातोश्रीवरचं महत्त्व नाही. अजूनही त्याचा मातोश्रीवरचा वावर तसाच आहे. त्याचं उद्धवसोबत दौ-यावर जाणं तसंच आहे. उगाच काहीतरी कारणं सांगून स्टेजवर उद्धवच्या कानाशी लागणं थांबलेलं नाही.

Thursday, August 27, 2009

गणपती बाप्पा मोरया...

मराठी माणसाचा मानबिंदू...
`मी मराठी...` असा एक मेल नुकताच आलाय. त्यामध्ये पु. ल. देशपांडे यांनी केलेली मराठी माणसाची व्याख्या पाहिली. `छत्रपती शिवाजी महाराज की...` असं म्हटल्यानंतर `जय` असा प्रतिसाद ज्या माणसाकडून येत नाही, तो माणूस मराठी असूच शकत नाही, असं पुलं म्हणतात. त्यालाच जोडून मला आणखी म्हणावंसं वाटतं की, `गणपती बाप्पा...` अशी आरोळी ठोकल्यानंतर `मोरया...` असा प्रतिसाद जो माणूस देत नाही. त्याला मराठी म्हणणं अजिबात पटत नाही. अर्थात, हीच गोष्ट लोकमान्य टिळकांसारख्या द्रष्ट्या माणसानं केव्हाच हेरली आणि शिवजयंती तसंच गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. हे दोनच उत्सव निवडण्यामागचं त्यांचं द्रष्टेपण आणि मराठी माणसाच्या माणसाच्या मनाची पारख नक्कीच वाखाणण्यासारखी आहे.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं गुवाहाटीला गेलो होतो. तिकडं अनेक खेळांचे सामने कव्हर करत होतो. तिथं महाराष्ट्राचे खेळाडू गणरायाचा जल्लोष करुनच मैदानात उतरायची. कबड्डी, खो-खो आणि रग्बी या सांघिक खेळांच्या सामन्यांना तर गणपती बाप्पाच्या जयघोषाची सवयच होऊन गेली होती. सामन्याच्या सुरवातीला आणि सामना जिंकल्यानंतर गणपती बाप्पा मोरया... हा आवाज चौफेर दुमदुमायचाच. (कबड्डी आणि रग्बीचं सुवर्णपदक महाराष्ट्रानं पटकावलं होतं. त्यामुळं हा आवाज महाराष्ट्राच्या प्रत्येक सामन्यावेळी घुमायचा.)

आणखी एक आठवणीत राहणारं उदाहरण म्हणजे सारेगम लिटल चॅम्प्सचं. महाराष्ट्रात लोकप्रियतेची परिसीमा गाठलेल्या लिटल चॅम्प्सचा तो भाग आठवा. महाअंतिम फेरीत कोणते तीन स्पर्धक जाणार ते निश्चित करणारा. त्यावेळी तीनऐवजी पाचही स्पर्धकांना सहभागी करुन घेण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला होता. त्यावेळीही या निर्णयानंतर लिटल चॅम्प्सच्या स्टेजवर एकच नारा घुमला होता गणपती बाप्पा मोरया... सांगायचा उद्देश्य म्हणजे गणपती बाप्पा हा आपल्या नसानसांत भिनला आहे. अहो साधं ट्रीपसाठी निघतानाही नारळ फोडल्यानंतर आपण गणपती बाप्पा मोरया म्हणायला विसरत नाही. आणखी काय हवं.

पुण्यातच लहानाच मोठा झालो. अगदी लहानपणी छोटंसं मंडळ चालवणं असो, दर दिवशी गणपती पहायला जाणं असो किंवा मानाच्या पहिल्या गणपतीपासून ते दगडूशेठ लक्ष्मी रस्त्यावर येईपर्यंत मिरवणुकीत सहभागी होणं असो गणपती हा कायमच माझा मोस्ट फेव्हरिट राहिलाय. बाकी इतर कोणत्या देवाबद्दल मला इतकी आपुलकी नाही. पण गणपती इज समथिंग डिफरंट. आणि असा हा अगदी जवळचा वाटावा, असा देव जर आपल्या घरी येणार असेल (पाहुणा हा शब्द मुद्दाम वापरत नाही.) मग विचारण्याची सोय नाही.

गणपती घरात येणार ही कल्पनाच अवर्णनीय असते. मग त्याच्या स्वागतासाठी घराची साफसफाई होते. सजावट करण्यात येते. गणरायाच्या स्वागतासाठी उकडीच्या मोदकासारखा भन्नाट पदार्थ करण्यात येतो. घरामधलं वातावरण मंगलमय असतं. गणपती हा जरी निर्जीव असला तरी त्याच्या अस्तित्त्वामुळं घरात खरंच कोणीतरी रहायला आलंय, असं वाटतं. त्यामुळंच `गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला...` हे वाक्य समाजमनामध्ये घट्ट रुजलंय. गणपती विसर्जन झाल्यानंतर खरंच काही दिवस आपल्याला चैन पडत नाही. आपल्याच घरातही चुकल्या चुकल्यासारखं वाटतं.

शिवाय गणपती म्हटलं की, लालबागचा राजा, मुंबईतला सिद्धीविनायक किंवा श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्यापुढं रांगा लावून उभं राहण्याची गरज आहेच असं नाही. घरातला पूजेमधला गणपतीही तितकाच लोभसवाणा किंवा श्रद्धेला पावणारा असतो, यावर माझा विश्वास आहे. त्याला दागदागिन्यांची आणि जडजवाहिरांची गरज आहेच, असंही नाही. परवाच गणेश चतुर्थीला दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती पाहिली. अंगावर एकही दागिना नव्हता. पण मूर्तीचे डोळे आणि तिचा लुक पाहिल्यानंतर नेहमीपेक्षा अधिक समाधान मिळालं. असंच समाधान पेणच्या कोणत्याही सर्वांग सुंदर मूर्तीकडे पाहिल्यानंतर मिळतं. भाऊ रंगारी, मंडई, जिलब्या मारुती, राजाराम मित्र मंडळ, हत्ती गणपती, गुरुजी तालिम मंडळ, ओंकारेश्वर मित्र मंडळ, लोखंडे तालीम मंडळ आणि इतर अनेक मंडळाच्या नुसत्या मूर्ती एकाग्र चित्तानं पाहिल्या तर मन वेडं होतं.

असा हा गणेशोत्सव मग तो घरातला असो किंवा सार्वजनिक असो सगळीकडे कसं चैतन्यमय वातावरण असतं. माझ्याप्रमाणेच आपणही कधी ना कधी त्या वातावरणाचा भाग असतो गणपती पहायला जायच्या निमित्तानं असो, घरामध्ये गणेशोत्सव साजरा करण्याच्या निमित्तानं असो किंवा सार्वजनिक मंडळाचा कार्यकर्ता म्हणून राबण्यात असो. थोडक्यात काय तर गणपती किंवा गणेशोत्सव हे नेहमीच आपल्या म्हणजेच मराठी माणसाच्या जीवनाचे अविभाज्य भाग आहेत, हे मात्र नक्की...!

Wednesday, August 19, 2009

"साम मराठी'ची वर्षपूर्ती...

कार्यकर्त्यांमुळे साकारतेय "साम राज्य'...

ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि भारत... क्रिकेटमध्ये सध्याच्या युगातली ही दादा मंडळी. पण न्यूझीलंडचा संघ या दादा मंडळींमध्ये कधीच मोडला जात नाही. तरीही कायम तो संघ विजेतेपदाच्या स्पर्धेत असतो. चॅंपियन्स करंडक स्पर्धा जिंकण्याची कामगिरीही त्यांनी एकदा करुन दाखवलीय. त्यांच्याकडे सचिन तेंडुलकरसारखा "स्टार प्लेअर' नाही, वॉर्न-मुरलीप्रमाणे फिरकी गोलंदाज नाही, पॉटिंग-कॅलिस सारखे फलंदाज नाही. पण न्यूझीलंडच्या संघाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे अष्टपैलू खेळाडू, त्यांचं क्षेत्ररक्षण, खेळातलं सातत्य आणि संघासाठी प्रत्येकाचं काही ना काही योगदान. हा संघ ऑस्ट्रेलियासारखा जगज्जेता नसेल पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करुनही चालत नाही. असंच काहीसं "साम मराठी' वाहिनीचं आहे. विशेषतः बातम्यांचं!

पण गेल्या वर्षी जेव्हा वाहिनीची सुरवात झाली तेव्हा परिस्थिती अशी नव्हती. "साम जन्मला गं सखी साम जन्मला...' अशा प्रतिक्रियांनी गेल्या वर्षी 15 ऑगस्टच्या आसपास "साम मराठी' या वाहिनीचं स्वागत झालं होतं. अर्थातच, माध्यमातल्या बऱ्याच जणांनी स्वागत करताना नाकं मुरडली होती किंवा त्यांची या बाळाबद्दल फारशी चांगली प्रतिक्रिया नव्हती. "सकाळ'सारख्या ग्रुपकडनं त्यांच्या ज्या अपेक्षा होत्या, त्या पूर्ण झाल्या नव्हत्या. ही गोष्ट बरेच जणांनी बोलून दाखविली होती. कारणही तसंच होतं. काहीच महिन्यांपूर्वी म्हणजेच गुढीपाडव्याला "आयबीएन लोकमत' या वृत्तवाहिनीचं आगमन झालं होतं. त्यामुळं सकाळची "साम' आणि "आयबीएन लोकमत' यांच्यात तुलना होणं साहजिकच होतं. अशा परिस्थितीत "साम'वरचे कार्यक्रम आणि इतर घडामोडी यामुळं ""...उचललेस तू मीठ मूठभर, "साम्राज्या'चा खचला पाया...'' असं म्हणण्यापर्यंत लोकांची मजल गेली होती. अर्थातच, सुरवातीच्या काही महिन्यातच!

आमच्याकडे राजदीप सरदेसाई किंवा निखील वागळे यांच्यासारखा चेहरा नसेल, "आयबीएन', "स्टार' किंवा "झी'सारखं नेटवर्क नसेल, "टाइम्स नाऊ' किंवा "नेटवर्क 18' इतक्‍या "ओबी व्हॅन' नसतील. पण तरीही आमची बातमी चुकत नाही. बातमीचा क्रम चुकलाय असं कधी झालं नाही. सोयी-सुविधांची फारशी रेलचेल नसतानाही आम्हाला कशाचीच उणीव भासली नाही. ना राज ठाकरे यांच्या मराठीच्या आंदोलनावेळी, ना 26 डिसेंबरच्या हल्ल्यावेळी, ना लोकसभा निवडणुकीच्या संपूर्ण टप्प्यात. काठोड्याचं बलात्कार प्रकरण असो किंवा हासेगावच्या एड्‌सग्रस्त विद्यार्थ्यांची ससेहोलपट साम मराठीनं प्रथम प्रकरणाला वाचा फोडली आणि नंतरही वेगवेगळ्या स्तरावर हे मुद्दे लावून धरले. निरनिराळ्या वृत्तमालिका झाल्या. "सकाळ'च्या संस्कृतीपेक्षा थोडीशी हटके भूमिका घेत "साम'नं कायम आक्रमकपणे बातम्या दिल्या. मग पद्मसिंह पाटील यांच्या अटकेची बातमीही "राष्ट्रवादी'वर आसूड ओढणारी होती. "राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दहाव्या वर्धापनदिनी पद्मसिंह पाटलांच्या हकालपट्टीची पक्षावर नामुष्की...' अशा मथळ्याची बातमी "सकाळ'मध्ये आली असती का? पण हीच हेडलाईन आणि बातमीचा हाच टोन "साम'वर होता. त्यामुळं आम्हीही आता आमचा टक्का निश्‍चित केला असून तो वाढवत नेण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत.

कोणी काहीही म्हणत असलं तरी आता "साम मराठी' बऱ्यापैकी स्थिरावलीय. राज ठाकरे यांचं मराठीच्या मुद्‌द्‌यावरचं आंदोलन असो, "एन्ट्री पोल', "मी महाराष्ट्र बोलतोय...' किंवा "लोकसभा ट्‌वेंटी-20' सारखे निवडणूक विषयक कार्यक्रम असो, "साम'च्या वृत्तविभागानं बऱ्यापैकी मायलेज मिळवलं आहे. अगदी सुरवातीच्या काळात तर राजू परुळेकर यांनी घेतलेल्या "महाराष्ट्र कोणाचा' या कार्यक्रमामुळं "साम'ची बऱ्यापैकी प्रसिद्धी झाली होती. तसंच टोकदार, आक्रमक पण इतर वृत्तवाहिन्यांप्रमाणे उथळपणा न करता बातम्या देण्याचं काम "साम मराठी'चा वृत्तविभाग करतोय. त्यालाही हळूहळू प्रतिसाद मिळतोय. ""तुमच्या बातम्या वेगळ्या असतात. इतरांकडे त्याच त्याच बातम्या दाखवितात. तुमच्याकडे मात्र, तोच तोच पणा येत नाही,'' अशा प्रतिक्रिया प्रेरणादायीच म्हटल्या पाहिजेत. बाकी "टाटा स्काय' किंवा "डिश'वर साम दिसत नाही. ही खंत आहेच. पण हे जेव्हा घडेल तेव्हा "साम'ची घोडदौड खऱ्या अर्थानं सुरु होईल.

"झी 24 तास', "स्टार माझा' आणि "आयबीएन लोकमत' यांच्याकडचं मनुष्यबळ, वार्ताहरांची संख्या, उपलब्ध तंत्रज्ञान, सुविधा आणि हिंदी किंवा इंग्रजी वाहिन्यांकडून मिळणारा "सपोर्ट' या सर्वच गोष्टी लक्षणीय आहेत. म्हणजेच या गोष्टींमध्ये "साम'ची तुलना इतर मराठी वाहिन्यांशी करता येत नाही. पण तरीही "साम'च्या बातम्यांचा स्वतंत्र प्रेक्षक वर्ग तयार झाला आहे. ही गोष्ट वारंवार स्पष्ट झालीय. "आयबीएन' वाहिनी दोन्ही "डीटीएच'वर जाण्यापूर्वी "आयबीएन' वाहिनीपेक्षा "साम'चा "जीआरपी' (ग्रॅंड रेटिंग पॉईंट) प्रत्येक आठवड्याला अधिक असायचा. इतकंच काय तर लोकसभा निवडणुकीच्या दिवशी "एनडीटीव्ही' आणि "साम' वाहिनीच्या प्रेक्षकांची टक्केवारी जवळपास सारखीच होती. "एन्ट्री पोल'च्या प्रश्‍नमंजुषेच्या उत्तरासाठी रोज जवळपास हजारहून अधिक "एसएमएस' यायचे. थोडक्‍यातच सांगायचं झालं तर "साम'ची लढाई अस्तित्वासाठी सुरु नसून अधिकाधिक वरच्या क्रमांकावर जाण्यासाठी सुरु आहे. "मी मराठी'च्या बातम्यांशी तुलना करण्याची माझी इच्छा नाही. पण अनेकदा आमच्या बातम्या, आमचा लुक "झी 24 तास'पेक्षाही चांगला असतो. असो.
वैयक्तिकदृष्ट्या विचार करायचा झाला तर "इनपुट हेड' किंवा "प्रोड्युसर' म्हणून काम करताना खूप मजा आली. कामातला आनंद इतका होता की त्याचा कधी कंटाळा आलाच नाही. स्वतंत्र विचार करण्याची आणि त्याची अंमलबजावणी करण्याचं स्वातंत्र्य इथं आहे. त्यामुळं काम करताना मिळणारा आनंद खरोखरच अवर्णनीय आहे. इतरांना हेवा वाटावा, असा मराठी वृत्तवाहिन्यांमधला क्रमांक एकचा "डेस्क' आज "साम मराठी'कडे आहे. अनुभवी आणि धडपड्या रिपोटर्सची "टीम' आमच्याकडे आहे. "बॉसिंग' न करणारे "साहेब' आमच्याकडे आहेत. नवं काहीतरी शिकण्याची जिद्द असणारे "कार्यकर्ते' आमच्याकडे आहेत. त्यामुळंच "डेस्क'चं काम सांभाळून रिपोर्टिंग करणारे, गरज पडली तर पॅनेल प्रोड्युसिंग करणारे "कॉपी एडिटर' किंवा "बीपी' साममध्ये आहेत. एखाद्या "एपिसोड'साठी दोन-दोन दिवस ऑफिसमध्ये तळ ठोकून बसणारी मंडळी आहेत. या सर्वांच्या जोरावर हा "साम'चा गाडा ओढला जातोय. रिपोर्टिंग, कॉपी एडिटिंग, स्पेशल प्रोग्रॅमचं प्लॅनिंग, व्हिडिओ एडिटिंग किंवा "व्हीओ' असं काहीही असलं तरी "कार्यकर्ते' सदैव तयार असतात.

शिवरायांचं स्वराज्य जसं मावळ्यांच्या जोरावर घडलं तसंच हे "साम राज्य' कार्यकर्त्यांच्या जोरावर घडतं आहे. अडचणी आहेत. संकटं येणार आहेत, हे देखील माहिती आहे. पण त्याचबरोबर एक सुंदर "एसएमएस'ही आम्हाला माहिती आहे. तो "एसएमएस' असा...
As we sail through life, don't avoid storms and rough waters. Just let it pass. Sail On and Sail On. Just because calm seas never make skillful sailors...

Monday, August 10, 2009

मेरिकोम, सुशीलकुमार आणि विजेंदर


भारताची खरी खेलरत्न...

खेळाडूंसाठी प्रतिष्ठेचा असलेला राजीव गांधी खेलरत्न पुररस्कार आणि अर्जुन पुरस्कारांची घोषणा नुकतीच झाली. सर्वात महत्वाची आणि नेहमीपेक्षा वेगळी गोष्ट म्हणजे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार तीन जणांना विभागून (त्रिभागून) दिला गेला. ऑलिंपिकमध्ये भारतासाठी कांस्यपदक मिळवून देणारा मल्ल सुशीलकुमार व मुष्टीयोद्धा विजेंदर सिंग तसंच सलग चारवेळा महिलांच्या मुष्टीयुद्ध स्पर्धेचं विश्वविजेतेपद पटकाविणारी मेरिकोम अशा तिघांना हा पुरस्कार विभागून देण्यात आला. मुख्य म्हणजे क्रिकेटपटूंची मक्तेदारी यावेळी देशी तसंच इतर खेळांनी मोडून काढली. ट्वेंटी-२० विश्वकरंडक स्पर्धेत नामुष्की पत्करावी लागलेल्या भारतीय संघातल्या फक्त गौतम गंभीरचीच अर्जुन पुरस्कारासाठी निवड झाली.

क्रिकेटचा दुस्वास करण्याचे काहीच कारण नाही. पण नेहमी इतर खेळांवर आणि खेळाडूंवर होणारा अन्याय यावेळी दूर झाला. भारतात क्रिकेट हा खेळ म्हणजे धर्म मानणारे लोक आहेत. क्रिकेटवेड्यांची संख्या काही कमी नाही. पण त्यामुळे इतर खेळांवर आणि खेळाडूंवर होणारा अन्याय प्रचंड आहे. प्रायोजक, जाहिराती मिळण्यापासून ते प्रसिद्धीमाध्यमांमध्ये बातम्या येण्यापर्यंत. सर्वच स्तरावर अन्याय, अन्याय आणि अन्याय. पण यावेळी परिस्थिती बदलली. मुख्य म्हणजे तीनही खेळाडूंची कामगिरी नजरेत भरणारीच होती. त्यामुळं त्यांना डावलून इतर खेळाडूंना (किंवा क्रिकेटपटूंना) पुरस्कार देण्याची हिंमत क्रीडा खात्याची झाली नसणार.

इराण किंवा रशियाचे मल्ल तसंच क्युबाच्या मुष्टीयोद्ध्यांचं आव्हान परतवून लावत कांस्यपदकापर्यंत मजल मारणं ही काही खाण्याची गोष्ट नाही. ऑलिंपिक स्पर्धेत तर नाहीच नाही. त्यातून भारतात या खेळांसाठी मिळणाऱ्या सुविधा, प्रशिक्षण, प्रायोजक आणि प्रसिद्धी या सर्वांपासून ही मंडळी दूर असतात. दिवसाचा रोजचा खुराक मिळाला तरी पुरे, असं म्हणण्याची परिस्थिती असते. त्यामुळे या सर्व गोष्टींवर मात करुन ऑलिंपिकच्या कांस्यपदकापर्यंत मजल मारणं हे आव्हान महाकठीण. त्यामुळेच आपले खेळाडू चमकले ही आनंदाची गोष्ट आहे. मुख्य म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना या खेळाडूंची नावेही माहिती नव्हती. किंवा आता कोणी कांस्यपदक जिंकले असं विचारलं तर त्यांची नावे आठवणारही नाहीत. पण क्रीडाप्रेमींसाठी हे खेळाडू दैवतांच्या रांगेत विराजमान झाले आहेत.


प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा, अशी आणखी एक मुष्टीयोद्धा म्हणजे मेरिकोम. एम. सी. मेरिकोम. महिलांच्या मुष्टीयुद्ध प्रकारात गेल्या अनेक वर्षांपास्नं ही वर्चस्व गाजवते आहे. सलग चारवेळा तिनं विश्वविजेतेपद पटकाविलं आहे. विश्वविजेतेपद म्हणजे क्रिकेटपटूंनी सलग चार वेळा विश्वकरंडक जिंकण्यासारखेच आहे. पण तिच्या कामगिरीचं कौतुक कोणाला आहे. मेरिकोमचं वैशिष्ट्य असं की, तिनं मिळविलेलं चौथं विजेतेपद हे तिच्या डिलिव्हरीनंतर मिळविलेलं आहे. तिला जुळ्या मुली झाल्या आणि त्यानंतर दोन आठवड्यांमध्येच तिनं पुन्हा सरावाला सुरवात केली. बॉक्सिंगला वाहून घेणं म्हणजे काय हे मेरिकोमकडून शिकलं पाहिजे. त्यामुळं तिचा सन्मान व्हायलाच हवा होता. थोडा उशीरच झाला, असं म्हटलं तरी चालेल. पण 'देर आये दुरुस्त आये...' हे 'आये ही नही...' या गोष्टीपेक्षा कधीही चांगलं.

भारतीय क्रीडा जगतामध्ये आणखी एक नाव चांगलंच गाजतंय. ते नाव म्हणजे साईना नेहवाल. गेल्या वर्षी मलेशियन ओपन आणि या वर्षी इंडोनेशियन ओपन बॅडमिंटन स्पर्धा जिंकून साईनानं सगळ्यांनाच वेड लावलंय. गेल्या वर्षी झालेल्या राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेचं सुवर्णपदक जिंकून तिनं सगळ्यांच्याच आशा उंचावल्या आहेत. पुढील वर्षी होणारी राष्ट्रकुल स्पर्धा, यंदाची विश्वकरंडक बॅडमिंटन स्पर्धा आणि आशियाई तसंच ऑलिंपिक स्पर्धा या सर्वांमध्येच तिच्याकडून दर्जेदार कामगिरीची अपेक्षा आहे. जागतिक क्रमवारीत तिनं सहाव्या स्थानावर झेप घेतलीय. साईनाच्या वडिलांनी भविष्य निर्वाह निधीवर (प्रॉव्हिडंट फंड) कर्ज काढून साईनाचं प्रशिक्षण केलंय. तिला प्रोत्साहन दिलंय. त्यामुळंच यंदाच्या वर्षी मिळालेला अर्जुन पुरस्कार तिच्यासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. साईनाची एकूण वाटचाल पाहता भविष्यात ती बॅडमिंटनच्या क्षितीजावर चमकणार, अशी सध्या तरी आशा आहे.

महाराष्ट्रासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे पंकज शिरसाट या मराठमोळ्या कबड्डीपटूला यंदा अर्जुन पुरस्कारानं गौरविण्यात आलंय. जवळपास पंधरा-वीस वर्षांनंतर मराठमोळ्या खेळाडूला हा पुरस्कार मिळालाय, कबड्डी या खेळासाठी. यापूर्वी सांगलीच्या राजू भावसार या कबड्डीपटूला पुरस्कारानं गौरविण्यात आलं होतं. त्यानंतर कोणत्याही मराठी कबड्डीपटूला हा पुरस्कार मिळाला नाही. आता पंकजनं तो पटकावलाय.
क्रिकेटच्या झंझावातामध्ये इतर खेळ पार कोलमडून जातात. खो-खो आणि कबड्डीसारखे देशी खेळ तर पार मरणासन्न अवस्थेत आहेत. आट्यापाट्या सारखा खेळ तर कधीच इतिहासजमा झालाय. भविष्यात कबड्डी आणि खो-खो यांचीही तीच परिस्थिती झाली तर नवल वाटू नये, अशीच परिस्थिती आहे. टेनिसमध्ये पेस-भूपती आणि सानिया मिर्झा, बिलियर्डस-स्नूकरमध्ये गीत सेठी आणि पंकज अडवाणी, बुद्धिबळात 'द ग्रेट' विश्वनाथन आनंद, दोन वेळा कॅरमचा विश्वविजेता आणि नऊ वेळा राष्ट्रीय विजेतेपद पटकाविणारा ए. मारिया ईरुदयम, टेबल टेनिसमध्ये भारताचं नाव रोशन करणारा आणि आठ वेळा राष्ट्रीय विजेतेपद मिळविणारा कमलेश मेहता, ऑल इंग्लड बॅडमिंटन जिंकून देणारा गोपीचंद आणि आधुनिक युगातला ध्यानचंद अशी पदवी मिळविणारा धनराज पिल्ले... अशी एक ना अनेक नावं इथं घेता येतील. ज्यांची कामगिरी खरं तर दखलपात्र होती पण माध्यमांनी त्यांच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. किंवा माध्यमांनी जरी लक्ष दिलं तरी भारतीयांनी त्यांना तितकसं प्रेम दिलं नाही.

पण उशिरा का होईना या साऱ्यांना सरकार दरबारी स्थान मिळतंय. कदाचित उशिरा का होईना पण भविष्यात सामान्य नागरिकही या खेळाडूंना आपलंसं करतील. फक्त स्पर्धा जिंकल्यानंतरच नाही तर नेहमीच. खेळाडूंच्या पडत्या काळातही आणि उभरत्या काळातही. तरच भारतात खऱ्या अर्थानं क्रीडा संस्कृती रुजली, असं म्हणता येईल.

Tuesday, July 21, 2009

विधानसभेलाही "मनसे' मतं खाणार?

"मनसे'ला भवितव्य आहे का?"

दो ही मारा लेकिन कैसा मारा...' महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीनंतर जाहीरपणे केलेलं एक वक्तव्य! लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या उमेदवारांना मिळालेलं यश पाहिल्यानंतर "मनसे'चे समर्थक आणि कार्यकर्ते अक्षरशः हुरळून गेले होते. वास्तविक पाहता "मनसे'चा जन्मच शिवसेनेला संपविण्यासाठी किंवा त्यांची ताकद कमी करण्यासाठी झालाय. त्यामुळे "मनसे'चा एकही खासदार नवी दिल्लीत पोचला नसला तरीही त्यांच्यामुळं भारतीय जनता पक्ष-शिवसेनेच्या सहा ते आठ जागा पडल्या, हे वास्तव कोणीही नाकारणार नाही. राज यांचा सुप्त हेतू लोकसभा निवडणुकीत साध्य झाला आणि त्यामुळंच त्यांनी कुत्सितपणे हे वक्तव्य केलं. काही जणांना वाटलं की, आता सारं संपलं. शिवसेनेच्या पडझडीला पुन्हा सुरवात होणार. उद्धव यांना राजकीय संन्यास घ्यायला लागून फक्त फोटोग्राफीच करावी लागेल, इथपर्यंत मत व्यक्त केली जात होती.

पण पण आणि पण "मनसे' स्थापन झाली तेव्हापासून ते आतापर्यंत (लोकसभा निवडणुकीनंतरही) माझं ठाम मत आहे की, शिवसेना संपणार नाही. राज ठाकरे यांची तसंच त्यांच्या पक्षाची कार्यपद्धती पाहता "मनसे'ला लोकसभेत यश मिळालं. कदाचित पुढच्या दोन-तीन निवडणुकांमध्येही असंच घडेल. पण हीच अंतिम स्थिती नक्कीच असणार नाही. शिवसेनेला मरण नाही आणि "मनसे'ला भवितव्य नाही. "मनसे' हा झंझावात नाही. ती वावटळ आहे. त्यामुळं ती फार काळ टिकणार नाही. त्यामुळं फारशी पडझड होणार नाही आणि शिवसेनेवर फारसा परिणामही होणार नाही. लोकसभा निवडणुकीनंतर माझं हेच मत होतं. काहींनी मला वेड्यात काढलं. पण मी ठाम होतो आणि आहे.

उद्धव व राज यांच्या कार्यपद्धतीवर नजर टाकली तर आपल्याला काही गोष्टी स्पष्टपणे जाणवतील. शिवसेनेच्या पडत्या काळातही उद्धव हे खचून गेले नाहीत. उलट त्यावेळी त्यांची खंबीर वृत्ती दिसून आली. मग ते नारायण राणे किंवा राज ठाकरे यांचा पक्षाला "जय महाराष्ट्र' करणं असो किंवा लोकसभा निवडणुकीत आलेलं अपयश असो. लोकसभेनंतर उद्धव यांची चिडचिड झाली होती. वादच नाही. पण त्यानंतर खचून न जाता रिलायन्स एनर्जी विरोधातील आंदोलन असो किंवा "म्हाडा'ची घरं मराठी माणसांना मिळणं असो शिवसेना सतत आंदोलनं करीतच राहिली. उलट पक्षी रमेश किणी याचा नामोल्लेख झाल्यानंतर राज ठाकरे यांची बोलतीच बंद झाली. लोकसभा निवडणुकीमध्ये "मनसे'ला मिळालेलं यश हे उद्धव यांच्या "त्या' उत्तरानंतर फिकं पडलं. मराठीच्या तापल्या तव्यावर पोळी भाजून तर झाली. पण प्रत्येक निवडणुकीपूर्वी हा तवा तापवायचा आणि पोळी भाजून घ्यायची ही काही खायची गोष्ट नाही. लोकोपयोगाची कामं केल्याशिवाय मतांचे सातत्य रहात नाही, हे मी सांगण्याची गरज नाही. हाच मुद्दा "मनसे'च्या भवितव्याचा विचार करताना महत्वाचा ठरतो.

शिवसेनेनेही सुरवातीच्या काळात राडाबाजी केली. दक्षिण भारतीय, उत्तर भारतीय किंवा परप्रांतियांविरुद्ध आंदोलन उभारले. मराठी माणसांचा मुद्दा लावून धरला. मुस्लिम, बांग्लादेशी आणि पाकिस्तीनी घुसखोरांच्या निमित्तानं भगवा विचार मांडला. हिंदुत्व आणि मराठी हे दोन्ही मुद्दे त्यांनी अगदी प्रखरपणे मांडले. कशाचीच हयगय केली नाही. तोडफोड, राडा, पेटवापेटवी आणि बरंच काही. पण हे करताना शिवसेनेनं रचनात्मक कार्यही केलं. स्थानिक लोकाधिकार समितीच्या माध्यमातनं मुंबईतल्या बॅंका, हॉटेल्स, विमानतळ आणि केंद्र सरकारच्या आस्थापनांमध्ये स्थानिक मराठी माणसाला स्थान मिळवून दिलं. नोकऱ्या लावल्या. शिवसैनिकांच्या आधारावर लोकहिताची कामं केली. जिथं जिथं मराठी माणसावर अन्याय झाला तिथं तिथं सेनेनं आवाज उठविला. मुंबईनंतर ग्रामीण भागातही हळूहळू पाय पसरले. तिथं शिवसेनेनं अगदी चलाखपणे हिंदुत्वाच्या मुद्‌द्‌याचा वापर केला. मराठवाड्यात जिथं निजामाचं राज्य होतं तिंथं "खान हवा की बाण हवा' अशा वृत्तीतून प्रचार करुन सेनेनं घट्ट पाय रोवले. त्यामुळंच आज इतके हादरे बसूनही सेनेचा गड शाबूत आहे आणि उद्याही राहिल.

राहता राहिला मुद्दा "मनसे'चा तर "मनसे' हा कोणताही विचार किंवा कोणतेही ध्येय-धोरण नसलेला पक्ष आहे. मुळात पक्ष स्थापन झाला तोच उद्धव यांच्या विरोधाची भूमिका घेऊन. त्यामुळेच शिवसेनेला (आणि उद्धव यांनाही) संपविण्याचा विडा उचलून "मनसे'ची वाटचाल सुरु आहे. पण महापालिका निवडणुकांमध्ये "मनसे' सपशेल आपटला. पण त्यानंतर राज्य सरकारच्या मदतीमुळं राज ठाकरे यांचा चांगलाच बोलबाला झाला. स्पष्टच बोलायचं झालं तर "मनसे' वाढविण्यासाठीच राज ठाकरे यांची प्रतिमा आहे त्यापेक्षा मोठी करण्याचा प्रयत्न राज्य सरकारनं केला. त्याचा फायदा राज यांना लोकसभा निवडणुकीत झाला. पण विधानसभेला असं होईलच असं नाही. कारण कोणताही मुद्दा न देता, कोणताही कार्यक्रम हाती न घेता आणि कोणत्याही प्रकारची वैचारिक बांधिलकी नसलेला पक्ष टिकूच शकत नाही. भैय्या टॅक्‍सीवाल्यांना फोडून काढणं, पाणीपुरीवाल्यांना पळवून लावणं, भैय्या मंडळींना मारहाण करणं आणि अमराठी पाट्या फोडणं म्हणजेच मराठीचा कळवळा हा गैरसमज आहे आणि ते येत्या काही निवडणुकांमध्ये (कदाचित विधानसभेलाच) स्पष्ट होईलच.

आणखी एक आणि महत्वाची गोष्ट म्हणजे राज ठाकरे यांच्या कार्यपद्धतीबद्दल असलेले आक्षेप. ""राजकीय पक्षाचं आणि सामाजिक काम करण्यासाठी रोज सकाळी लवकर उठावं लागतं,'' हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आक्षेप पुरेसा बोलका आहे. तसंच प्रत्यक्ष मैदानात न उतरता फक्त सभेच्या व्यासपीठावरुन राणा भीमेदवी घोषणा करण्यातच राज ठाकरे यांना रस आहे. उद्धव ठाकरे, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी आणि इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांप्रमाणे एखाद्या मोर्च्यात किंवा आंदोलनात राज प्रत्यक्ष सहभागी झालेले आठवत नाही. गेल्या काही दिवसांमध्ये तर नक्कीच नाही. आणखी एक गोष्ट म्हणजे "मनसे' हा पक्ष राज ठाकरे आणि त्यांच्याभोवतीची चौकडी यांच्यापुरताच मर्यादित राहिला आहे, असा आरोप श्‍वेता परुळकर आणि प्रकाश महाजन यांनी केलाय. त्याच मुद्‌द्‌यावरुन हे दोन्ही नेते (नेते या शब्दाला आक्षेप असेल तर राजकारणी हा शब्द योग्य आहे) पक्षातून बाहेर पडले आहेत. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अशाच स्वरुपाचे आरोप करुन राज यांनी शिवसेनेला "जय महाराष्ट्र' केला होता. दुर्दैवाने तेच आरोप राज यांच्यावर होताहेत आणि तेही फक्त तीन वर्षांच्या कालावधीतच!

महत्वाची गोष्ट म्हणजे राज ठाकरे हे एकहाती पक्ष चालवित आहेत. प्रवीण दरेकर, शिरीष पारकर, शिशिर शिंदे, अतुल सरपोतदार, बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई. एखाद-दुसरा इकडे तिकडे. ही मंडळी सोडली तर राज यांच्याकडे नेत्यांची फौज नाही. कार्यकर्त्यांची फौज आहे, असं वाटतं. पण कोणताही ठोस कार्यक्रम नसताना फक्त बोलीबच्चन देऊन तरुणांना बांधून ठेवणं अवघड आहे. पोलिस आणि न्यायालयांचा फेरा मागे लागला की, हे तरुण पक्ष कामाकडे हळूहळू दुर्लक्ष करु लागतात. शिवाय "मनसे'तली धुसफूसही वाढू लागलीय. पुण्यातलं लोकसभेचं तिकिट रणजित शिरोळे यांना देण्यावरुन दीपक पायगुडे हे राज यांचे समर्थक खूप दुखावले गेले होते. ते राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चाही रंगली होती. पण पायगुडे यांनी "मनसे'तच राहणं पसंत केलंय. पण आता ते फारसे सक्रिय नाही. आपलं मतही विचारात न घेता शिरोळे यांनी तिकिट दिल्यामुळं पायगुडे दुखावले आहेत. दुसरीकडे राज यांची पुण्यात पहिली सभा लावणारे गणेश सातपुते यांनीही "मनसे'ला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केला. हिंदुत्वाच्या मुद्‌द्‌याला राज यांनी हरताळ फासल्यामुळं सातपुते शिवसेनेत गेले. पण पायगुडे आणि सातपुते यांचं जमत नसल्यामुळंच हे पक्षांतर झाल्याचं खरं वृत्त आहे. थोडक्‍यात म्हणजे "मनसे'तही सारं आलबेल आहे, असं नाही.

एकीकडे मराठीचा मुद्दा सारखा तापवता ठेवता येत नाती. दुसरीकडे मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे वगळता इतर शहरांमध्ये "मनसे'चा फारसा प्रभाव नाही. ग्रामीण भागात तर "मनसे'ला कोणी ओळखतही नाही. मतं मिळणं तर दूरच. "मनसे'चे कार्यकर्ते सध्या जी आंदोलनं करत आहेत ती स्वतःच्या ताकदीवर किंवा स्वतःच्या निर्णयाने करीत आहेत. त्यात कोणतीही सुसूत्रता आणि भूमिका नाही. शिवाय महाराष्ट्राच्या विकासाची "ब्ल्यू प्रिंट' तयार असतानाही राज महाराष्ट्राच्या विकासावर काहीच का बोलत नाही, हा महत्वाचा मुद्दा आहे.

दुसरं म्हणजे शिवउद्योग सेनेच्या मार्फत राज ठाकरे यांनी किती तरुणांना रोजगार उपलब्ध करुन दिला आणि किती जणांना वाटाण्याच्या अक्षता मिळाल्या कोण जाणे... (ज्येष्ठ पत्रकार महेश विजापूरकर यांनी लिहिलेल्या एका लेखाच्या संदर्भानुसार राज यांच्यासाठीच उघडण्यात आलेल्या शिवउद्योग सेनेकडे जवळपास लाखभर तरुणांचे अर्ज आले होते. पण त्यापैकी फक्त अडीच हजार तरुणांनाच नोक-या दिल्या गेल्या.) सो राज ठाकरे यांनी आधी शिवउद्योग सेनेचा हिशेब द्यावा आणि मग महाराष्ट्राच्या ब्ल्यू प्रिंटकडे वळावं...

शिवाय राज हे त्यांच्या "छानछौकी'साठीच अधिक प्रसिद्ध आहेत. त्यांनी शेतकऱ्यांसाठी एखादा मोर्चा काढलाय, वीजेच्या मुद्‌द्‌यावर रस्त्यावर उतरले आहेत, रिलायन्सच्या वीज दरवाढीविरोधात आंदोलन उगारलंय, कापूस दिंडी काढलीय किंवा गोपीनाथ मुंडे यांच्यासारखी संघर्ष यात्रा काढलीय? काही आठवतंय. नाही शक्‍यच नाही. राज ठाकरे हे "पोस्टरबॉय' आहेत आणि उन्हातान्हात फिरण्याची त्यांची वृत्ती नाही, हे उघड सत्य आहे. कोणीही कितीही अमान्य केलं तरी. अशा परिस्थितीत फक्त सभांच्या आणि तोडफोडीच्या जोरावर तरुणांना आणि मध्यमवर्गीयांनी किती दिवस खिळवून ठेवता येईल, हाच खरा प्रश्न आहे.

"मनसे'च्या मतं खाण्यामुळं युतीच्या "सिटा' पडल्या हे मरी माणसावर बिंबवणयात शिवसेना काही प्रमाणात नाही तरी यशस्वी झाली आहे. शिवसेनेचे कार्यकर्तेही "मनसे'ला धडा शिकवण्याच्या तयारीत आहेत. तसंच राज ठाकरे हे सध्या शांत आहेत. ही मराठीच्या नावावर काही महिन्यांपूर्वी घडलेल्या "तोडफोडी'सारख्या वादळापूर्वीची शांतता म्हणायची की, राज यांचे काही वेगळेच मनसुबे आहेत, हे कळायला मार्ग नाही. पण काहीही आणि कितीही झालं तरी "मनसे'ला भवितव्य आहे, यावर विश्‍वास बसत नाही. राज ठाकरे यांच्या लोकप्रियतेबद्दल शंका घेण्याची इच्छा नाही. खरं तर तो मुद्दाच नाही. राज यांचा करिष्मा बाळासाहेबांइतकाच आहे. ते बाळासाहेबांसारखेच फर्डे वक्ते आहे. त्यांची शैलीही बाळासाहेबांसारखीच आहे. शेवटी ते ठाकरेच. त्यामुळे ते लोकप्रिय असणारच.

पण त्या जोरावर "मनसे' वाढेल आणि शिवसेना संपेल किंवा "मनसे'च्या मतं खाण्याचा शिवसेनेला कायमच फटका बसेल असं नाही. आणखी एक म्हणजे विधानसभेला "मनसे' लोकसभेइतकी मतं खाईल का, हा देखील कळीचा मुद्दा आहे. (घेईल का शब्द मुद्दामून वापरलेला नाही.) घोडा मैदान जवळच आहे. पाहू या काय होतं ते!!!!!

Thursday, July 02, 2009

लोभ असावा ही विनंती...


ओलांडला पंधरा हजारांचा टप्पा...

गेल्या तीन-चार वर्षांपासून मी हा ब्लॉग चालवितो आहे ब्लॉग जरी मी चालवित असलो तरी मला यामध्ये ओढण्याचं किंवा मला ब्लॉगचं व्यसन लावण्याचं काम केलंय ते देविदास देशपांडे यानं. दैनिक सकाळच्या पुणे आवृत्तीमध्ये उपसंपादक म्हणून काम करत असताना त्यानं सर्वप्रथम ब्लॉग सुरु केला. त्यावेळी तो इंग्रजी, मराठी, फ्रेंच आणि न जाणो किती भाषेत ब्लॉग लिहायचा. तीन ते चार ब्लॉग तर त्यानं नक्कीच सुरु केले होते. त्याच्यापासून प्रेरणा घेऊनच किंवा त्यानं मदत केल्यामुळेच मी देखील ब्लॉग सुरु केला. मीच काय पण नंदकुमार वाघमारे, विश्वनाथ गरुड, नितीन ब्रह्मे, मुकुंद पोतदार, अभिजीत पेंढारकर आणि अशाच अनेक उपसंपादकांनी ब्लॉग सुरु केले. काहींचे ब्लॉग अजून सुरु आहेत. मी देखील त्यापैकीच एक.

गेल्या तीन वर्षांपासून कधी अधिक सातत्याने तर कधी कमी सातत्याने मी ब्लॉग लिहितो आहे. कधी खाद्यपदार्थांवर, कधी हॉटेल्सवर, कधी राजकारणावर, कधी क्रीडा घडामोडींवर किंवा कधी प्रवासावर. अगदी अलिकडे माझी आई गेल्यानंतरही मला ब्लॉगवर लिहिल्यामुळं खूप बरं वाटलं होत. एखादी घटना घडल्यानंतर प्रत्येकवेळी आपल्याला त्याबद्दल पेपरमध्ये लिहिता येतंच असं नाही. शिवाय आपण प्रत्येक गोष्टीतले एक्स्पर्ट नसतो. त्यामुळं आपल्या मताला पेपरमध्ये काय स्थान मिळणार. पण तरीही आपण आपलं मत रेटून मांडतो. कधी चहा पिताना, कधी मित्रांच्या घोळक्यात, तर कधी ऑफिसमध्ये बातम्यांवर चर्चा करताना. आता या पर्यायांमध्ये आणखी एकाची भर पडली आणि ती म्हणजे ब्लॉगची. मला जे हवं आणि जसं हवं तसं लिहिण्याची मोकळीक इथं मिळते. शिवाय उपसंपादकाची कात्री लागण्याची भीतीही नसते.

ब्लॉग लिहिताना आपला ब्लॉग किती दिवस चालेल, याबद्दल खरं सांगायचं तर शंकाच होती. शिवाय नव्याचे नऊ दिवस... या म्हणीप्रमाणे आपला ब्लॉग दोन-चार महिन्यांनी बंद तर पडणार नाही ना, हा विचारही मनात होता. पण येत्या सप्टेंबर महिन्यात ब्लॉगला तीन वर्षे पूर्ण होणार आहेत. पंधरा हजार व्हिजिटर्सचा टप्पाही पार झालाय. तसंच स्टार माझा या वृत्तवाहिनीनं घेतलेल्या स्पर्धेत माझ्या ब्लॉगला उत्तेजनार्थ पारितोषिकही मिळालं होतं. माझ्याप्रमाणेच अभिजीत पेंढारकरही त्याचा मानकरी ठरला होता. पारितोषिक हा काही ब्लॉगच्या लोकप्रियतेचा मापदंड नाही. पण ते मिळाल्यामुळं कदाचित मी अधिक हुरुपानं लिहू लागलो असेलही.

यापुढंही अधिक उत्साहानं, हिरीरीनं आणि अभ्यासपूर्ण पद्धतीनं ब्लॉग लिहिण्याचा माझा प्रयत्न सुरुच राहिल. तुम्हाला जर माझे लेख आवडत असतील तर शेजारच्या फॉलोअर्स या लिंकवर क्लिक करुन माझ्या ब्लॉगचे फॉलोअर्स बना. तसंच लेख आवडला असेल किंवा नसेल अथवा काही सूचना असतील तर कॉमेंटस हा ऑप्शन आहेच. कारण मला जसं माझं मत आहे. तसंच इतरांनाही मत आहे. त्यानं ते आपल्या ब्लॉगवर मांडलं तर ते हटविण्याचा अधिकार मला आहे. पण मी तो आतापर्यंत वापरलेला नाही. यापुढेही येऊ नये, हीच अपेक्षा आहे. (कॉमेंटवरुन आठवलं माझ्या ब्लॉगवर आलेल्या लेखाविरोधातल्या किंवा लेख न आवडल्याच्या कॉमेंटस देखील मी आहे तशाच ठेवल्या आहेत. हटविलेल्या नाहीत. राज ठाकरे यांच्या लेखावरची एका बिहारी माणसाची जळजळीत प्रतिक्रियाही अगदी आहे तशीच छापली आहे.)

तेव्हा फ्रेंडस माझा ब्लॉग वाचाच पण तुम्हीही लवकर ब्लॉगर व्हा...
अगदी मनापासून धन्यवाद.

Wednesday, June 17, 2009

आई...

"ती' माझ्या रक्तातच आहे...

आठ मे 2009. "मदर्स डे'च्या बरोब्बर दोन दिवस आधी. माझ्या आईचं निधन झालं. गेल्या अनेक वर्षांपासून ती आजारी होती. पण तरीही तिची जगण्यासाठीची झुंज सुरु होती. पण आठ वर्षानंतर तिनं दम तोडला. गेल्या अनेक दिवसांपास्नं आईवर लिहायचं होतं. वास्तविक पाहता आईवर लिहायचं तर पुस्तकही लिहिता येईल. पण मी माझ्या आईवर लिहिलेलं वाचणार कोण? त्यामुळं माझ्या ब्लॉगवर लिहायला काय हरकत आहे. प्रयत्न करुनही कमी शब्दात लेख आटोपणं शक्‍य झालेलं नाही. काहीसा "स्वान्त सुखाय" लिहिलेला हा लेख इथं देत आहे...

मध्यंतरी कोटेशन्सचं एक पुस्तक वाचत होतो. त्यात आईबद्दल एक सुंदर विचार लिहिला होता. "गॉड कॅनॉट बी एव्हरीवेअर. सो ही क्रिएटेड मदर्स...' हे झालं इंग्रजीचं. आईचं वर्णन करण्यासाठी यापेक्षा अधिक सुंदर वाक्‍य कोणते असू शकेल? मराठीतही अशाच पद्धतीनं आईची महती गायली गेलीय. मराठीतही एक गाणं आहे, "आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही, म्हणून "श्री"च्या राजानंतर शिक रे अ आ ई...' कोणी म्हणतं आई म्हणजे जिच्या आत्म्यात ईश्‍वराचा वास असतो, ती व्यक्ती म्हणजे आई.

अर्थात, जोपर्यंत आई होती तोपर्यंत मला या गोष्टींचं फारसं अप्रूप वाटलं नव्हतं. पण आठ मे ला आई गेली आणि राहून राहून हे विचार माझ्यासमोर तरळत होते. माझी आई नेहमी म्हणायची की, "जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुला माझी किंमत कधीच कळणार नाही. पण मी गेल्यावर माझं महत्व तुला नक्की समजेल.' आज माझी आई माझ्याबरोबर नाही. आठवणींनी आणि तिच्या विचारांनी ती जरी कायम माझ्याबरोबर असली तरी आई आता पुन्हा मला कधीच भेटणार नाही. पण मला आईची किंमत पुरती कळून चुकलीय. ती अमूल्य आहे. आई असतानाही हे माहिती होतंच. पण आज ती जवळ नाही. त्यामुळं तिचीं उणीव अधिकच जाणवतेय.

आई नावाचं विद्यापीठ...

आई म्हणजे एक चालतं बोलतं विद्यापीठ होतं. तिनं आमच्यावर मारुन मुटकून कधीच संस्कार केले नाहीत. शिस्त लावली नाही. पण तिचं वागणं बोलणंच असं होतं की हळूहळू आम्हीही तिचं अनुकरण करु लागलो. तिचा माझ्यावर इतका प्रभाव होता की, आज माझ्यामध्ये असलेल्या बऱ्याच चांगल्या सवयी या फक्त तिच्यामुळेच आहेत, असं मी म्हणेनं. (अर्थात, मला नीट ओळखणाऱ्यांना माझ्यातले वाईट गुण चांगले माहिती आहेत. त्याचा आणि माझ्या आईचा काहीही संबंध नाही, हे सांगायला नकोच.) अगदी माझ्या लहानपणापासून ते तिच्या अखेरच्या दिवसांपर्यंत. देवावर अगाध श्रद्धा, शिक्षणाचं महत्त्व, साधी राहणी, अत्यंत कष्टाळू आणि जिद्दी, तीक्ष्ण स्मरणशक्ती आणि माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यातली सर्वोत्तम "कुक', अशा अनेक गोष्टी तिचं वर्णन करताना लिहिता येतील.

शिक्षणाची गोडी...

लहानपणापासनं तिनं मला अभ्यासाची गोडी लावली. ती फार शिकलेली होती असं नाही. इंटरनंतर एखाद दुसरं वर्ष तिनं केलं असेल. पण तरीही तिला शिक्षणाचं महत्व पटलेलं होतं. "आपल्याकडे खूप पैसे नाहीत. बापजाद्यांची इस्टेट नाही. त्यामुळं चांगलं शिकलं तरच आपलं आयुष्य सुखात जाईल. तुला शिकायचं असेल तर वेळप्रसंगी मी माझे दागिने मोडेन पण तू खूप शिक,' हा संवाद तिच्या तोंडी कायम असायचा. सुरवातीला मला शिकण्याचा खूप कंटाळा होता. त्यामुळं माझं कसं होणार याची चिंता तिला कायम सतावत असायची. पण नंतर मात्र मला हळूहळू शिक्षणाचं महत्व पटू लागलं. आजच्या घडीला माझ्याकडे ज्या तीन-चार पदव्या आहेत, त्याचं श्रेयं आई-बाबांनाच जातं. आईचं हस्ताक्षर खूप सुंदर होतं. माझं अक्षर चांगलं असावं, यासाठी तिचा खूप आग्रह होता. या गोष्टीसाठी मी तिचा अनेकदा मार खाल्ल्याचं मला अजूनही आठवतंय.

हरामाचा पैसा नको...

पैसा आयुष्यात महत्वाचा आहे. पण पैसा म्हणजेच सर्वस्व नाही, हे मला तिच्याकडूनंच समजलं. वडील "महिंद्र ऍण्ड महिंद्र'मध्ये होते. पण पगार बेताचाच होता. पण अत्यंत परिस्थितीतही आईनं संसार अगदी नेटानं सुरु ठेवला. वडिलांच्या कंपनीमध्ये दोनवेळा "लॉक आऊट' जाहीर करण्यात आला होता. त्यामुळं तीन-चार महिने कंपनीतनं पगार येणार नव्हता. पण अशा परिस्थिततही पहिल्या वेळी शिवणकाम करुन आणि दुसऱ्या वेळी पाळणाघर सुरु करुन तिनं बाबांना आर्थिक हातभार लावला.
कुरियरसाठी लागणाऱ्या कापडी पिशव्या किंवा कव्हर्स ती शिवायची. एका कव्हरचे आकारानुसार चार आणे ते बारा आणे मिळायचे. दिवसभरात असे वीस-पंचवीस रुपये ती मिळवायची. पाळणाघर चालवायची तेव्हा तीन-चार मुलांचे पंधराशे ते दोन हजार रुपये दरमहिना ती कमवत असे. पण पैशाच्या चणचणीची धग आमच्यापर्यंत कधीच पोचली नाही. वास्तविक पाहता आईचे वडिल म्हणजे माझे दादा आजोबा सयाजीराव गायकवाड यांच्याकडे वरिष्ठ पदावर कार्यरत होते. त्यामुळं तिच्या घरात लक्ष्मी पाणी भरत होती, असं म्हटलं तरी चालेल. पण सासरी तशी परिस्थिती नव्हती. हल्ली ज्याला "ऍडजस्टमेंट' म्हणतात, ती आईंनं खूप केली. अर्थातच, कोणतीही कुरबूर न करता.

तिचं आणखी एक म्हणणं असायचं. "हरामाचा पैसा अजिबात पचत नाही. त्यामुळं फुकटचा एक रुपयाही आपल्याला नको.' एखाद्या दुकानदारानं गडबडीत जर सुटे परत देताना पैसे जास्त दिले तर प्रामाणिकपणे ती पैसे परत करायची. पाचवी-सहावीत असताना आम्ही एकदा आमच्या इथल्या काका हलवाईकडे गेलो होतो. आम्ही पाचशे रुपये दिले आहेत असं समजून त्यानं सुटे पैसे परत केले. आईनं मात्र, शंभर रुपयेच दिले होते. त्यामुळं तिनं उरलेले पैसे परत केले. दुकानदारालाही आईचं आश्‍चर्य वाटलं. पण आईचं उत्तर ठरलेलं होतं. हरामाचा पैसा पचत नाही. अशा छोट्या मोठ्या प्रसंगांमधून माझ्यावर झालेले संस्कार आयुष्यभरासाठी पुरणारे आहेत. कोणाचा एक रुपया तिनं घेतला नाही की बुडवला नाही.

"आपल्याला राजाचा राजवाडा नको. आपण खाऊन पिऊन सुखी आहोत आणि तेच बरं आहे.' सगळ्यांना येतात तशा अनेक अडचणी आल्या, अनेक संकटं आली. त्यातली काही आर्थिकही होती. पण दोनवेळच्या जेवणाची ददात आम्हाला कधीच जाणवली नाही. तसंच आईचं आदरातिथ्य इतकं होतं की, आमच्याकडे आलेला कोणीच न खाता-पिता गेला नाही. इतकंच काय तर अनेक छोटे प्राणी-पक्षीही आमच्याकडे रोज मेजवानी झोडायचे. रोज भाताच्या कुकरचं प्रेशर पडल्यानंतर सर्वात पहिल्यांदा ती कावळे आणि चिमण्यांना तो भात वाढायची. कावळे-चिमण्या देखील स्वयंपाकघराच्या खिडकीवर बसून त्याची वाट पाहायचे. हल्ली हल्ली तर कबुतरं, साळुंकी आणि छोटीशी खारुताई देखील नित्यनियमाने येतात. आई धार्मिक होती. प्रथा, परंपरा आणि रुढी पाळण्याची तिला जबर हौस. पण स्वयंपाक झाल्यानंतर नेवैद्य दाखवण्यापूर्वी ती पक्ष्यांसाठी भात वाढायची. तिची एकूणच धार्मिक वृत्ती पाहता हे मात्र, थोडंसं अजब होतं.

धार्मिक आणि देवभोळी

आई खूप धार्मिक आणि परंपरावादी होती. पण त्याचा जाच आम्हाला कधीच झाला नाही. उलट तिच्यामुळं अनेक स्तोत्र, मंत्र आणि आरत्या यांचं आमचं पाठांतर झालं. जोपर्यंत आई धडधाकट होती तोपर्यंत ती श्रावणी आणि कार्तिकी सोमवारचा उपास धरायची. सक्काळी सक्काळी नवी पेठेतल्या विठ्ठल मंदिरातल्या शंकराच्या पूजेला जायची. अनवाणी जायची. हरितालिकेचं आणि वटपौर्णिमेचं व्रत करायची, चैत्रगौर बसवायची, संक्रांत आणि चैत्राचं हळदी-कुंकू साजरी करायची. हल्ली क्वचितच ऐकू येणारं अविधवा नवमी तसंच धुरित्री पाडवा हे व्रतही तिनं शेवटच्या वर्षापर्यंत केलं.

गणपतीत मानाचे गणपती आणि नवरात्रीमध्ये महत्वाच्या देवींचं दर्शन अगदी रांगेत उभं राहून घेणं नित्याचंच! नवरात्रीत अष्टमीच्या दिवशी एखाद्या देवीची साडी-चोळीनं ओटी भरणं आलंच. गणपती विसर्जन मिरवणुकीत मानाच्या पहिल्या पाच आणि रात्री दगडूशेठ-मंडईच्या गणपतींचं दर्शन कधीच चुकलं नाही. चालती फिरती असताना प्रत्यक्ष आणि अर्धांगवायू झाल्यानंतर तिनं अगदी गेल्या वर्षीपर्यंत टीव्हीवर बाप्पांचं दर्शन घेतलं. अष्टविनायक, बारा ज्योतिर्लिंग, महाराष्ट्रातली देवीची साडेतीन पिठं, पंढरपूर, वाडी, अक्कलकोट, गाणगापूर आणि इतर बऱ्याच ठिकाणी तिनं धार्मिक पर्यटन केलं. इतकं करुनही काही वेळा अपयश आलंच तरी त्याचं खापर तिनं कधीच देवावर फोडलं नाही. कितीही बिकट परिस्थिती आली तरी तिचा देवावरचा विश्‍वास तसूभरही ढळला नाही. तितक्‍याच मनोभावे ती देवाची पूजा करतच राहिली.

द बेस्ट "कुक'

आईचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिचं सुगरण असणं. गोडाचा शिरा, आळूची भाजी, पोहे, छोट्या आणि बरोब्बर गोल पोळ्या, पुरणाची दिंडं, सांबार, पावभाजी, रव्या बेसनाचे लाडू, ओल्या नारळ्याच्या वड्या आणि करंज्या, ताक घालून पालकाची भाजी, थालिपीठ आणि असे असंख्य पदार्थ खावे तर फक्त तिच्या हातचे. आईच्या हाताला अशी काही चव होती की, विचारता सोय नाही. लहानपणापासून मी तिच्या हातचं खात असल्यामुळं मला असं वाटत असेलही कदाचित. पण काही पदार्थ करावे तर तिनंच.

नागपंचमीला पुरणाची दिंडं, दिव्याच्या अमावास्येला गोड दिवे, कोजागिरीला मसाला दूध, दिवाळीत ओल्या नारळाच्या करंज्या, पहिला पाऊस पडला की कांदा भजी याची इतकी सवय झाली होती की बस्स! दणगेलं, गवार ढोकळी, डाळ ढोकळी, सुरळीच्या वड्या, ढोकळा आणि पराठे हे खास गुजराती पदार्थही ती उत्तम करायची. तिचा जन्म आणि जवळपास निम्मं आयुष्य बडोद्यात गेलं होतं. त्यामुळं ओघानं हे आलंच. अर्थात, अर्धांगवायू झालापास्नं हे सारंच संपलं. ती एक नंबरची सुगरण होती. त्यामुळंच कदाचित मला चविष्ट आणि निरनिराळे पदार्थ खाण्याचं व्यसन लागलं असावं. माझी आई पण माझ्यासारखीच चवीनं खाणारी होती. पण साधं अंडही तिनं कधी खाल्लं नाही. आम्ही जर घरी ऑम्लेट केलं तरी ती भांडी आम्हालाच घासावी लागायची. तिनं त्यालाही हात लावला नाही.

जीव भांड्यात...

आईला स्वतःला आवड होती ती वेगवेगळ्या प्रकारची भांडी जमवायची. एकवेळ ती नवी साडी घ्यायची नाही. एखादा दागिना कमी घेईल. पण बाजारातलं नवं भांडं ती जरुर घ्यायची. तांबं, पितळ, स्टील, ग्लास आणि अगदी ऍल्युमिनियमपासून बनवलेली भांडी तिनं जमवली. वेगवेगळ्या प्रकारची ताटं, डिशेस, वाट्या-भांडी, पराती, पातेली, ग्लासेस, डब्बे इथपासून ते अगदी छोटे-मोठे चमचे व लहान डब्यादेखील. आज जर आमच्या घरातली सगळी भांडी एकत्र केली तर कदाचित एखाद-दुसरी खोली सहज भरुन जाईल. आतापर्यंत आमच्या घरी जी काही कार्य झाली त्यावेळी आम्हाला कधीही बाहेरुन एक भांड भाड्यानं आणावं लागलं नाही.

तिचा जीव भांड्यांमध्ये रमत होता, असं म्हटलं तरी चालेल. पण नुसती भांडी जमवून ती थांबली नाही. दोन-तीन महिन्यांनी किंवा दिवाळीसारखं निमित्त साधून त्यातली बहुतांश भांडी ती स्वतः घासायची आणि पुसायची. हा नियम अगदी अपवादानंच मोडला गेला. एखादं भांडं पडलं किंवा नीट घासलं गेलं नाही तरी तिचा जीव वरखाली व्हायचा. भांडी ठेवायची तिची स्वतःची एक पद्धत होती. त्यामुळं लहानपणी चोरून काही खाल्लं तर ते तिला अगदी सहजपणे कळायचं. राहून राहून एक आश्‍चर्य वाटतं की, त्यावेळी बाबांचा पगार फारसा नसतानाही आईनं इतकी भांडी जमविलीच कशी?

आईनं काही वर्षे पाळणाघरही चालवलं. अर्थात, तेव्हा गरज म्हणून तिनं हा व्यवसाय सुरु केला. पण आवाक्‍यपेक्षा अधिक मुलं तिनं कधीच सांभाळली नाही. एकावेळी दोन किंवा तीन. त्यापैकी सौरभ कट्टी आणि मीरा देशपांडे हे दोघे तर आमच्याकडे तीन महिन्यांचे असल्यापासून होते. आईनं त्यांचा सांभाळ स्वतःच्या मुलांपेक्षा म्हणजेच आमच्यापेक्षा अधिक काळजीपूर्वक केला असावा. सकाळी आठ-नऊ वाजल्यापास्नं ते संध्याकाळी सात- आठ वाजेपर्यंत ते आमच्या घरीच असायचे. आईचा त्यांना इतका लळा लागला की, आमची आई हीच त्यांची खरी आई आहे, असं त्यांना वाटायचं. त्यामुळंच ते तिला मिनाक्षी आई म्हणायचे. मिनाक्षी आईनं त्या दोघा-तिघांचे केलेले लाड पाहिल्यानंतर खरं तर आम्हाला त्यांचा खूप हेवा वाटायचा. जस्ट जोकिंग. पण आईचा त्यांच्यावर खूप जीव होता. आम्हाला त्यांचा तीन-चार वर्षांपर्यंत हे दोघेही आमच्याकडे असायचे. नंतर दोघेही आमच्या घरापासून दूर गेले. पण आजपर्यंत त्यांचे आणि आमच्या घराचे बंध जुळलेले आहेत.

तल्लख बुद्धी...

तिची बुद्धी आणि स्मरणशक्ती अगदी तल्लख होती. आईचे भाऊ-बहिण, भाचे-पुतणे आणि इतर अनेकांचे वाढदिवस तिचे तोंडपाठ होते. प्रत्येकाच्या वाढदिवशी ती आवर्जून त्यांना फोन करायची. आणखी एक म्हणजे पेपरमध्ये वाचलेली प्रत्येक गोष्ट आणि बातमी तिच्या लक्षात असायची. पूर्वी कधीतरी महाराष्ट्र केसरी जिंकणारा सईद चाऊस असो किंवा आजचा सोन्याचा भाव काय आहे, या गोष्टी तिच्या अगदी तोंडपाठ असायच्या. अखेरच्या दिवसांमध्ये तिला टीव्ही पाहण्यासाठी बाहेरच्या खोलीत येणं जमत नसे. त्यावेळी टीव्हीवर ती तिच्या आवडीच्या मालिका फक्त ऐकायची. पण आवाजावरुन कोण कलाकार आता बोलतो आहे, हे तिला समजायचं. अखेरच्या दिवसांमध्ये शरीरानं तिला साथ दिली नसली तरी तिची बुद्धी मात्र कायमच तिच्या बाजूनं होती (शेवटचे सहा-सात दिवस सोडले तर) ही खूपच दिलासादायक गोष्ट होती.

आयुष्यभरात माझ्या आई-बाबांनी एकवेळ इस्टेट कमी कमाविली असेल. पण त्यांनी माणसं खूप जोडली. नातेवाईक असो, मित्र-मैत्रिणी असो किंवा शेजारीपाजारी. मदतीच्या प्रसंगी धावून जाणं हे दोघांच्याही रक्तात भिनलेलं. अर्धांगवायूचा झटका आल्यानंतरचं सात-आठ वर्षांचं आयुष्य तिनं अगदी हसत हसत काढलं. पथ्य पाळली. पण पथ्य पाळतानाच ती अगदी मनसोक्त जगली. ती आयुष्याला कंटाळलीय, असं कधीही वाटलं नाही. "तू देवाचं इतकं करतेस. तरी मग तुला इतका त्रास का होतोय. देव बिव काही नाही...' असं तिला चिडवण्यासाठी मी म्हणायचो. त्यावेळी ती सांगायची की, "देवाचं करते म्हणूनच इतका कमी त्रास होतोय. देवधर्म केला नसता तर आणखी झाला असता.' हे पॉझिटिव्ह थिंकिंग थक्क करणारं होतं, ते देखील सगळं शरीर थकलं असताना.

ग्रेट फादर!
दुसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अखेरच्या काही वर्षांत बाबांनी आईची केलेली सेवा. एखाद्या पुरुषानं आपल्या पत्नीची इतकी सेवा केल्याचं मी तरी पाहिलेलं नाही. असणार यात शंका नाही. मी तर असं म्हणेन की शेवटची काही वर्ष आई जगली ती बाबांमुळेच. सकाळी उठल्यावर तिचं तोंड धुणं, संडास आणि बाथरुमला नेणं, आंघोळ घालणं, औषधं-गोळ्या यांचे डोस सांभाळणं आणि बरच काही. ते देखील कोणतीही चिडचिड न करता. अखेरच्या दिवसांमध्ये तर एखाद्या नर्सला लाजवेल इतकी काळजी ते आईची घ्यायचे. "हॅट्‌स ऑफ टू माय फादर टू!'
"आई-वडिलांची सेवा कर. आयुष्यात तुला कोणतीच गोष्ट कमी पडणार नाही,' हे वाक्‍य देखील तिच्या तोंडी कायम असायचं. अर्थात, तिनं तिच्या आईची खूप सेवा केली होती, हे आम्हाला माहिती होतं. माझ्या आईची तिच्या आईवर खूप श्रद्धा होती. खूप जीव होता. त्यामुळंच कदाचित आमची आजी ज्या दिवशी गेली बरोब्बर त्याच दिवशी माझ्या आईचं देखील निधन झालं. आठ मे रोजी. इतरांसाठी हा निव्वळ योगायोग असेलही किमान मला तरी त्याकडे योगायोग म्हणून पाहता येणार नाही. कारण आठ मे पूर्वी चार-पाच दिवस आई बऱ्यापैकी सिरीयस होती. तिला शुद्ध नव्हती, असं म्हटलं तरी चालेल. सात मे रोजी पण ती जाते की राहते अशी परिस्थिती होती. पण अखेर तिनं सात तारीख मागे टाकली आणि आठ मे हाच तिच्या आयुष्यातला शेवटचा दिवस ठरला. "मदर्स डे'च्या बरोब्बर दोन दिवस आधी.

आज आईला जाऊन महिन्यापेक्षा अधिक कालावधी उलटून गेला. पण आई गेली यावर अजूनही विश्‍वास नाही. मला अजूनही असं वाटतं की, शुक्रवारी रात्री बेलापूरहून घरी गेल्यानंतर आई माझी वाटत पाहत असेल. आत गेल्यावर आई विचारेल, ""जेवलास का?, काय जेवलास?'' किंवा घरातून निघताना सांगेल, ""नीट जा आणि पोचल्यावर फोन कर. रोज वेळेवर जेवत जा आणि नीट काम कर.'' टीव्हीवर जर एखाद्या बातमीला माझा व्हॉईस ओव्हर असेल किंवा माझं नाव असेल तर फोन करुन मला सांगेल, ""आशिष, आम्ही ऐकली आज तुझी बातमी.'' किंवा विचारेल, ""अरे, आज तू ऑफिसला नाही गेलास का? तुझा आवाज नव्हता?'' पेपरमध्ये काम करत असेन तर विचारेल की, आज तुझी काही बातमी किंवा लेख आहे का?

आपल्या सर्वात जवळचं माणूस गेल्यानंतर त्याची उणीव आपल्याला किता भासू शकते, हे माझ्या कल्पनेच्याही पलिकडचे होते. पण गदिमांनी गीत रामायणामध्ये लिहिलेलं अगदी खरं आहे.

"दोन ओंडक्‍यांची होते सागरात भेट,
एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ'

आई गेली तेव्हा सध्या "एनडीटीव्ही'त काम करणाऱ्या प्रसाद काथे या एका जुन्या सहकाऱ्याचा एसएमएस आला, ""आई आपल्या रक्तातच असते.'' थोडक्‍यात म्हणजे आई कायम आपल्या बरोबर असते. कधीही परत न येण्यासाठी गेली असली तरी! ही गोष्टही तितकीच खरी आहे.