Saturday, March 28, 2015

अॅथलिट्स ओन कंट्री… केरळ

अॅथलेटिक्स हा जीव की प्राण...

गुवाहाटी येथे पार पडलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी गेलो होतो तेव्हा केरळच्या अॅथलेटिक्स प्रेमाबद्दल बरीच माहिती मिळाली होती. केरळमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा नक्की कव्हर करायच्या, हे तेव्हाच ठरविलं होतं. त्यानुसार फेब्रुवारी महिन्यात केरळमध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी तिथं गेलो होतो. कव्हर करायला नाही, पण आनंद लुटायला…


राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला महिन्याभराचा कालावधी उलटल्यानंतर हा ब्लॉग का, असा प्रश्न सर्वांच्याच मनात येऊ शकतो. मात्र, हा ब्लॉग राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेबद्दल नाही. शिवाय क्रिकेटच्या फिव्हरमध्ये ब्लॉग लिहिण्यात मलाही रस नव्हता. म्हणूनच सर्वकाही संपल्यानंतर मुद्दाम ब्लॉग लिहित आहे.
‘गॉड्स ओन कंट्री’ ही केरळची खरी ओळख. तेच केरळ अॅथलिट्सची खाण आहे. भारतातील बहुतांश नावाजलेले अॅथलिट्स ही केरळची देण आहे. अगदी जुन्या काळातील टी. सी. योहोन्नन आणि सुरेश बाबू, माझ्या पिढीला माहिती असलेले पी. टी. उषा आणि शायनी विल्सन, अलिकडच्या काळातील के. एम. बीनामोल, टिंटू लुका, अंजू बॉबी जॉर्ज, प्रीजा श्रीधरन, रेंजित माहेश्वरी आणि ओ. पी. जैशा ही केरळची देण. नावं अजूनही निघतील. मात्र, ही अगदी पटकन सुचलेली आणि मिळालेली.
केरळमध्ये उद्योगधंद्यांची वानवा. इथला मुख्य उद्योग म्हणजे पर्यटन आणि पर्यटनाच्या अनुषंगानं चालत येणारे काही पूरक उद्योग. बाकी मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करणारे उद्योग केरळमध्ये नाही. त्यामुळंच कदाचित देशभरात आणि परदेशात (विशेषतः मध्यपूर्वेला) मल्याळी मंडळी कामासाठी स्थलांतर करत असतात. 

तिथं राहणाऱ्या लोकांनाही रोजगाराची विशेष उपलब्धता नाही. त्यामुळंच खेड्यापाड्यातील मुलं आणि मुली क्रीडापटू होण्याची मनिषा बाळगतात. केरळच्या छोट्या छोट्या गावांमध्ये राहणाऱ्या या मंडळींना प्रचंड चालण्याची, वेगाने पळण्याची नि डोंगरदऱ्यांमध्ये सहजपणे वावरण्याची सवय असते. ही मंडळी काटक असतात. शारिरीक मजबुती ही त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरते. खेडोपाड्यातील मुला-मुलींना लहानपणापासूनच खूप चालण्याची किंवा धावण्याची सवय असते. शाळेत जाण्यासाठी त्यांना अनेकदा पाच-सात किलोमीटरची पायपीट करावी लागते. कमीत कमी. अधिकाधिक दिवसाकाठी पंधरा-सोळा किलोमीटरही. त्यामुळं शारिरीक कष्टांची त्यांना सवय झालेली असते. शिवाय अॅथलिट म्हणून जर उत्तम करियर झालं, तर केरळ सरकार किंवा केंद्र सरकारमध्ये नोकरी मिळेल आणि आयुष्याचा रोजगाराचा प्रश्न सुटेल, असा दुसरा हेतूही त्यांच्या मनात असतो. केरळमधून सर्वाधिक अॅथलिट निर्माण होण्याचं ही दोन मुख्य कारणं आहेत.


आणि ही लोकं अॅथलेटिक्ससाठी किती करतात. ऐकाल-वाचाल तर थक्क व्हाल. केरळमध्ये शाळांनी घेतलेल्या मेहनतीमुळे, लोकांच्या प्रेमामुळे, माध्यमांनी केलेल्या वार्तांकनामुळे नि सरकारी मदतीमुळे अॅथलिट घडतात. त्यांच्या घडण्यामध्ये या सर्वांचा महत्त्वाचा वाटा असतो. त्यामुळंच अॅथलिट घडविणं आणि त्यांना सांभाळणं ही आख्ख्या केरळची जबाबदारी असते, असं तिथं गमतीनं म्हटलं जातं. 

शालेय स्तरावरील स्पर्धांमध्ये भविष्यात चकमू शकणारे अॅथलिट्स वेचले जातात. राज्यस्तरीय आंतरशालेय क्रीडा स्पर्धा ही केरळवासियांसाठी आणि अॅथलेटिक्स प्रेमींसाठी पर्वणी असते. इतर ठिकाणी स्थानिक पातळीवरील क्रिकेट सामन्यांना नसेल त्यापेक्षा कितीतरी पटीनं अधिक गर्दी आंतरशालेय क्रीडा स्पर्धांना असते. शाळांमधील क्रीडा शिक्षक तसेच इतर प्रमुख शिक्षकही स्पर्धांना आवर्जून उपस्थित असतात. स्थानिक वृत्तपत्रांमध्ये स्पर्धेच्या कालावधीत दोन विशेष पाने प्रसिद्ध होतात. त्यामध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची माहिती, त्यांच्या घरगुती पार्श्वभूमी, सर्व स्पर्धांचे निकाल असे विस्तृत वार्तांकन करण्यात येते. अनेक न्यूज चॅनल्सवरून आंतरशालेय क्रीडा स्पर्धांच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले असते. गुवाहाटीमध्ये मल्याळी माध्यमांचे जवळपास वीस ते पंचवीस प्रतिनिधी उपस्थित होते. गुवाहाटी आणि केरळात मराठी माध्यमांचे प्रतिनिधी किती? पाचच्या आत.

  (ओ. पी. जैशा आणि प्रिजा श्रीधरन.)
ही माहिती वाचून काही संस्था, कंपन्या किंवा सामाजिक संघटना छोट्या अॅथलिट्सना दत्तक घेतात. काही जण त्यांच्या खर्चाचा काही हिस्सा उचलतात. सर्वोत्तम खेळाडूंना आपल्या शाळेत ओढण्यासाठी शाळांमध्येही स्पर्धा असते. उदाहरणच द्यायचे तर एर्णाकुलम जिल्ह्यातील कोथमंगलम या ठिकाणी असलेल्या सेंट जॉर्ज आणि मार बॅसिल या दोन शाळांमध्ये खेळाडू आपल्याकडे आकर्षिक करण्यासाठी विशेष चुरस असते. या शाळांचे मुख्याध्यापक आणि ट्रस्टी वगैरे मंडळी चांगल्या कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या पालकांशी संपर्क करतात, त्यांच्याशी संवाद साधतात, त्यांना काय सुविधा देणार याची जंत्रीच सादर करतात. त्यांच्या राहण्याचा, खाण्या-पिण्याचा, शिक्षणाचा, ट्रेनिंगचा आणि सर्व खर्च ही शाळांची जबाबदारी असते. अशा पद्धतीने ही मंडळी चांगल्या अथॅलिट्सना आपल्या शाळेमध्ये खेचून आणतात आणि त्यांना ट्रेन करतात.

हा झाला एक भाग. शालेय किंवा महाविद्यालयीन स्तरावर पास झाल्यानंतर किंवा ते शिक्षण घेत असतानाच हे अॅथलिट्स राज्य सरकारच्या किंवा खासगी अकादमींमध्ये दाखल होतात. केरळमध्ये जवळपास प्रत्येक जिल्ह्यात क्रीडा अकादमी आहे. मुख्य म्हणजे ती सुस्थितीत आहे. अनेक खासगी अकादमीही आहेत. स्प्रिंट (धावपटूंसाठी), थ्रो (गोळा, हातोडा आणि भालाफेक) आणि जम्प (लांब, उंच आणि बांबूउडी) अशा वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांसाठी स्वतंत्र अकादमी आहेत. पी. टी. उषाची स्वतंत्र अकादमी आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत १० हजार मीटरची स्पर्धा विजेती ओ. पी. जैशा ही तिच्याच अकादमीची अॅथलिट आहे.


इतकं करून हे लोक स्वस्थ बसत नाहीत. जिथं जिथं अॅथलेटिक्सच्या स्पर्धा होतात तिथं तिथं ही चाहते मंडळी आवर्जून उपस्थिती लावतात. खेळाडूंना प्रोत्साहन देतात. अॅथलेटिक्स फॉलो करतात. त्यामुळं खेळाडू आणि अॅथलेटिक्स चाहते यांच्यात एक वेगळंच नातं निर्माण झालेलं असतं. अनेक चाहत्यांना खेळाडू अगदी पहिल्या नावानं ओळखत असतात. चाहते आणि अॅथलिट यांच्यातील हेच आगळवेगळं नातं केरळमधील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत अगदी जवळून पहायला मिळालं. अनुभवायला मिळालं.

स्पर्धेतील केरळच्या अॅथलिटला इतकं प्रोत्साहन देतील की विचारू नका. प्रत्येक सुवर्णपदक आणि प्रत्येक पदक केरळच्या खेळाडूनेच जिंकले पाहिजे, अशी त्यांची अपेक्षा असावी. धावण्याच्या स्पर्धेत केरळच्या अॅथलिटने आघाडी घेतली की मग विचारूच नका. आरडाओरडा, त्याच्या नावानं प्रोत्साहन, शिट्ट्या, घोषणा आणि मेक्सिकन व्हेव्ज तयार करण्याचा प्रयत्न… काय करतील भरवसा नाही. माध्यम प्रतिनिधींचीही सुवर्णपदक आणि चांगली कामगिरी बजाविणाऱ्या अॅथलिट्सच्या विशेष मुलाखती नि बाइट्ससाठी धावपळ. एक्सक्लुझिव्हसाठी पळापळ. प्रत्येक दिवसानंतर तासाभराचा स्पेशल प्रोग्रॅम. त्यामध्ये थेट स्टेडियमवरून खेळाडू, माजी खेळाडू लाइव्ह आणि बरंच काही. अॅथलेटिक्स हे केरळमधील लोकांच्या नसानसात भिनलंय, असं म्हणायला हरकत नाही.

स्पर्धा संपल्यानंतर काही वेळ ट्रॅकवर होतो तेव्हा खेळाडू आणि पत्रकार तसेच खेळाडू आणि चाहते यांच्यातील निकटचं नातं पहायला मिळालं. पी. टी. उषा, शायनी विल्सन-अब्राहम, अंजू बॉबी जॉर्ज आणि तेव्हा नुकतीच निवृ्त्त झालेली प्रिजा श्रीधरन यांच्यासोबत छबी टिपण्यासाठी आणि त्यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी अक्षरशः रांग लागली होती. सर्वाधिक लोकप्रिय अर्थातच, पायोली एक्स्प्रेस अर्थात, पीटी उषा. जवळपास दीड तास तिच्यासोबत फोटोसेशन सुरू होतं. 


 
दर दोन मिनिटांनी पाच-सात जणांचा नवा ग्रुप यायचा, कुटुंब यायचं आणि फोटो काढून घ्यायचं. मोठी माणसं सोबतच्या लहानग्यांना पीटी उषा म्हणजे नेमकी कोण, हे मल्याळममध्ये समजावून सांगत. काय सांगायचे ते कळत नव्हतं. पण लहानग्यांच्या चेहऱ्यावरचे भाव भारावून गेल्यासारखे असायचे. अनेकांना तर आपण देवासोबत फोटो काढून घेतला किंवा देवाशी हस्तांदोलन केलं, असंच वाटत होतं. अर्थातच, माझी भावना फार काही वेगळी नव्हती. शायनी विल्सन, अंजू बॉबी जॉर्ज आणि प्रिजा श्रीधरन यांच्यासोबत फोटो काढून घेण्यासाठीही लोकांची प्रचंड तारांबळ सुरू होती. 


 
पी. टी. उषाच्या अॅकॅडमीला भेट देण्याची आणि तिच्याशी निवांत गप्पा मारण्याची माझी खूप दिवसांपासूनची इच्छा आहे. भारतीय अॅथलेटिक्समध्ये पी. टी. उषानं केलेली कामगिरी कदाचितच भविष्यात कोणी करू शकेल. आणि केली तरी पीटीचं स्थान कोणीही घेऊ शकणार नाही. त्यामुळंच तिला भेटल्यानंतर मी तशी इच्छा व्यक्त केली. ‘अरे, आपण जरूर या. फक्त फोन करून मी आहे किंवा नाही, ते पाहून या. म्हणजे चुकामूक होणार नाही,’ असं निमंत्रण तिनं दिलं. जायचं निश्चित आहे. फक्त कधी आणि कसं ते पाहू. पण पीटी उषाशी संवाद साधून झाल्यानंतर मग थोडी टंगळ मंगळ करून मी स्टेडियममधून बाहेर पडलो.

तिरुवनंतपुरममध्ये ‘मी मराठी’
फोटोसेशन आणि गप्पा सुरू असतानाच एक फोन आला. फोनवर मराठी बोलणं ऐकून दोन तरुण माझ्याकडे ‘अरे, हा कोण इथं मराठीतून बोलतोय,’ असे भाव करून पहायला लागले. मला आधी वाटलं की खेळाडू किंवा प्रशिक्षक असतील. स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून  आलेले कोणीतरी. पण ते दोघे भलतेच निघाले आणि त्यांची भेट वेगळी माहिती देऊन गेली.

ते दोघे होते सांगलीच्या विटा तालुक्यातील खानापूरचे मालोजी चव्हाण आणि श्रीरंग चव्हाण. हे दोघे चुलत भाऊ गेल्या बारा वर्षांपासून तिरुवनंतपुरममध्ये आहेत. यांचा व्यवसाय सोनं शुद्ध करण्याचा. सोन्याची प्युरिटी तपासण्याचा आणि ते अधिक प्युअर करण्याचा. ‘नायट्रिक अॅसिड’चा वापर करून सोनं शुद्ध केलं जातं. संपूर्ण देशात या पद्धतीनं सोनं प्युअर करणारी मंडळी फक्त मराठीच आहेत आणि ते सर्व विट्यातील खानापूरचेच आहेत, ही नवी माहिती चव्हाण बंधूंकडून मिळाली. 



मालोजी आणि श्रीरंग यांचे चुलते मनोज चव्हाण हे १९८२ पासून तिरुवनंतपुरममध्ये आहेत. तिथं जवळपास १०० ते १२५ मराठी कुटुंब या व्यवसायात आहेत. तिथं त्यांनी दुकान थाटली आहेत आणि व्यवसायात चांगला जम बसविला आहे. श्रीरंग आणि मालोजी चव्हाण हे उत्तम मल्याळम बोलतात. वाचतात आणि लिहितातही. कारण सगळा व्यवसाय त्याच भाषेतून होतो. मल्याळम शिकायला त्यांना तीन वर्षे लागली. ‘मराठी माणूस जिथं जाईल, तिथला होऊन जातो. स्वतःचं वेगळेपण मुद्दामून दाखवून देत नाही,’ या म्हणण्याला पुन्हा एकदा पुष्टी मिळाली. 

सिद्धिनाथ गोल्ड रिफायनरी (एस एस ज्वेलरी वर्क्स) या नावानं त्यांनी तिथं दुकान थाटलं. छान व्यवसाय सुरूय. मला दुसऱ्या दिवशी पहाटेच निघायचं असल्यानं मला त्यांच्या दुकानाला भेट देता आली नाही. पुढच्या वेळी याल तेव्हा जरूर भेट द्या, असं आग्रहाचं निमंत्रण त्यांनीही दिलं. पुढच्या वेळी नक्की येतो, असं आश्वासन देऊन स्टेडियमला रामराम केला.

अॅथलिट बनल्या पत्रकार…
तिरुवनंतपुरमच्या प्रेसक्लबनं माध्यमकर्मींची उत्तम व्यवस्था केली होती. त्यांना वेळेत सर्व माहिती मिळेल, त्यांचं आदरातिथ्य उत्तम असेल अशी सर्व व्यवस्था प्रेसक्लबचे सदस्य आणि शिकाऊ पत्रकार यांनी चांगल्या पद्धतीनं पार पाडली होती. तिथं दोन-तीन युवा पत्रकार भेटल्या. इंटरनॅशनल अॅथलिट ज्युबी पिल्ले आणि स्वाती प्रभा. स्वाती प्रभा ही पी. टी. उषाच्या अकादमीमधून तयार झालेली. ज्युबी ही वायनाडची. कन्नूर स्पोर्ट्स अकादमीतून बाहेर पडलेली. तिघींमधील समानता आणि वैशिष्ट्य म्हणजे या तिघीही राष्ट्रीय स्तरावरच्या अॅथलिट्स. पण रोजगार नसल्यानं त्यांनी स्पोर्ट्स रिपोर्टर म्हणून करियर करण्याचा विचार केलाय. दोघी टीव्ही चॅनल्समध्ये रिपोर्टर आहेत. तर तिसरी (ज्युबी) पत्रकारितेचं शिक्षण पूर्ण करतानाच ट्रेनी म्हणून जॉब करतेय. आहे ना गंमत…


ज्युबीशी गप्पा मारताना तिनं एक गमतीशीर गोष्ट सांगितली. तिला विचारलं, ‘कसं वाटतं तुम्हाला केरळकडून खेळताना. अॅथलिट म्हणून वावरताना. इतक लोक सपोर्ट करतात. प्रेम करतात तुमच्यावर. काय भावना असते तुमची…’ तिनं दिलेलं उत्तर मस्त होतं. ती म्हणाली, ‘एकदा का तुम्ही केरळ असं लिहिलेली जर्सी अंगावर घातली ना की मग तुम्ही देखील सर्वोत्तम कामगिरीच कराल. केरळची जर्सी घातली की तुम्ही कुठलेही असा, आख्खा केरळ तुमच्या पाठिशी उभा राहील. त्या बळावर तुम्ही नक्कीच नेहमीपेक्षा अधिक चांगली कामगिरी कराल.’

Wednesday, January 14, 2015

हाताने ओढविलेला मृत्यू...

हे तर पत्रकारितेतील ‘व्यंग’

‘शार्ली हेब्दो’ या फ्रान्समधील व्यंग्यसाप्ताहिकाच्या पॅरिसमधील कार्यालयावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात व्यंगसाप्ताहिकाचे संपादक, तीन व्यंग्यचित्रकार आणि दोन पोलिसांसह एकूण बारा जण ठार झाले. या घटनेने साऱ्या जगाला हादरवून टाकले. कदाचित युरोपमधील देशांना अशा पद्धतीने प्रथमच दहशतवादी हल्ल्याला सामोरे जावे लागल्यामुळे सर्वांना जबरदस्त धक्का बसला असवा. किंवा अशा पद्धतीने पत्रकारांवर किंवा नियतकालिकावर हल्ला करून इतक्या मोठ्या प्रमाणावर हत्याकांड घडवून आणल्यामुळे सारे जग हादरून गेले असावे. 


‘शार्ली हेब्दो’वरील हल्ल्यानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मत स्वातंत्र्य, पत्रकारांचे स्वातंत्र्य अशा मुद्द्यांची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. मला याच मुद्द्यावर लिहायचं आहे. मला जो मुद्दा मांडायचा आहे, तो बहुधा कोणीच मांडलेला नाही किंवा मला जसा मांडायचा आहे, तसा कोणाकडूनही मांडला गेलेला नाही. त्यामुळेच मला लिहावंसं वाटतंय. लेखामध्ये विविध मुद्द्यांची चर्चा सुरू करण्यापूर्वीच एक गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते. ती म्हणजे, दहशतवाद्यांनी जे हत्याकांड घडवून आणले आणि प्रतिक्रिया दिली, ती पद्धती पूर्णपणे चूक आहे. त्याला समर्थन अजिबात नाही. अशा पद्धतीने हल्ले करून आणि हत्या करून आपली बाजू मांडण्याची वृत्ती घोर निंदनीय आहे. त्यामुळेच त्याचे समर्थन करण्यासाठी हे लिखाण आहे, असा अर्थ कोणीही काढण्याची आवश्यकता नाही.

हे निमित्त घेऊन मला वेगळा मुद्दा मांडायचा आहे. ‘शार्ली हेब्दो’चे सर्व व्यंग्यचित्रकार आणि संपादक वगैरे मंडळी खूप अत्युच्च दर्जाची व्यंग्यचित्रकार आहेत आणि त्यांच्या तोडीचे व्यंग्यचित्रकार जगात आजपर्यंत कोणीही कधीही झाले नाहीत, ही गोष्ट आपण सर्वप्रथम मान्य करून टाकू. असे असले तरीही आपल्या कलेची वा अभिव्यक्तीची खुमखुमी जिरविताना किंवा खाज भागविताना दुसऱ्या धर्माच्या, पंथाच्या किंवा समुदायाच्या भावनांवर आघात तर होत नाही ना, याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे, असे कोणासच वाटत नाही का? मग तो व्यंग्यचित्रकार असो, लेखक असो, कवी असो किंवा कोणत्याही प्रकारची कला सादर करणारा कलाकार असो...

‘शार्ली हेब्दो’ हे निधर्मी आणि डाव्या विचारसरणीचा कट्टर पुरस्कार करणारे व्यंग्यसाप्ताहिक आहे. कडव्या विचारसरणीवर रेषांचे फटकारे ओढणारे, सामाजिक-धार्मिक धारणेची व्यंग्यातून चिरफाड करणारे  निर्भीड साप्ताहिक ही ‘शार्ली हेब्दो’ची ओळख आहे. ‘आम्हाला कट्टरपंथीयांचे हसू येते. मुस्लिम असो, ज्यू किंवा कॅथलिक...धार्मिक असणे गैर नाही; पण कट्टर विचार आणि तशीच कृती आम्हाला मान्य नाही.’ हे त्या साप्ताहिकाचे ब्रीद होते. २००६मध्ये डेन्मार्कच्या जिलँड्स पोस्टेनचे प्रेषित महंमदावरील कार्टून शार्ली एब्दोने पुन्हा प्रसिद्ध केले होते. नोव्हेंबर, २०११मध्ये चेरिया एब्दो नावाने अंक काढून त्या अंकाचे पाहुणे संपादक म्हणून  प्रेषित महंमद यांचे नाव प्रकाशित केले. त्याच अंकात प्रेषिताचे कार्टूनही प्रसिद्ध केले होते. हत्याकांड घडवून आणल्यानंतर बाजारात आलेल्या नव्या अंकातही त्यांनी प्रेषित महंमद यांचे कार्टून प्रसिद्ध केले आहे.


आक्षेप याच गोष्टीला आहे. तुम्हाला जे काही लिहायचे आहे, व्यक्त व्हायचे ते व्हा. मात्र, दुसऱ्यांच्या भावनांवर आणि श्रद्धांवर आघात करण्याची परवानगी तुम्हाला कोणी दिली. जर इस्लाममध्ये मूर्तीपूजा मान्य नाही. मुस्लिमांना महंमद पैगंबर यांचे चित्र, व्यंग्यचित्र, मूर्ती किंवा कोणत्याही दृष्य स्वरुपातील रुप साकारणे मान्य नाही, तर त्या धर्माचा आणि त्या धर्माची उपासना करणाऱ्यांच्या श्रद्धेवर घाला घालण्याचा अधिकार कोणालाही नाही. अगदी तो कितीही मोठ्या ताकदीचा कलावंत असला तरीही नाही. दुसऱ्यांच्या श्रद्धा आणि देवदेवता हा टिंगलटवाळीचा, चेष्टेचा किंवा कुत्सितपणे थट्टा करण्याचा विषय कसा होऊ शकतो. मुस्लिमच नाही, तर कोणत्याही धर्माच्या, पंथाच्या किंवा मोठ्या समुदायाच्या श्रद्धेचा आदर करून जर अभिव्यक्त होता येत असेल तर अशा घटना घडणारच नाहीत. किंवा कमी प्रमाणात घडतील, असे मानायला हरकत नाही. 

त्यामुळे ‘शार्ली हेब्दो’च्या सर्व व्यंग्यचित्रकारांनी आपले मरण स्वतःहून ओढवून घेतलेले होते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आणि ज्यांनी स्वतःचे मरण किरकोळ आणि फालतू कारणासाठी ओढवून घेतले, त्यांच्यासाठी आख्ख्या जगाने शोक व्यक्त करायची गरज आहे असे वाटत नाही. पेशावरमध्ये दहशतवाद्यांनी कोवळ्या वयातील विद्यार्थ्यांचा जीव घेतला. ते सर्व मुस्लिमच होते. तरीही त्यांना निर्दयीपणे ठार मारले. भारतातल्या प्रत्येकाचा जीव त्या हत्याकांडामुळे हळहळला. बिचाऱ्या विद्यार्थ्यांचा अजिबात अपराध नसताना त्यांचा बळी गेला. इथे मात्र, व्यंग्यचित्रकारांच्या स्वतःच्या चुकीमुळे त्यांना प्राण गमवावे लागले. दहशतवाद्यांनी त्यांचा जीव घेतला, हे अगदी मान्य. त्याचा लाखो वेळा निषेध. मात्र, व्यंग्यचित्रकारांचे कृत्यच इस्लामी दहशतवाद्यांना उद्युक्त करणारे होते. त्यामुळे या संघर्षाकडे इस्लामी दहशतवादी आणि त्यांना आव्हान देणारे पश्चिमेकडील वा युरोपातील ख्रिश्चन धर्मीय अशा पद्धतीने का पाहू नये? हा हल्ला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि पत्रकारितेवरील हल्ल्यापेक्षाही मुस्लिम मूलतत्ववाद्यांना काहीही कारण नसताना डिवचल्यामुळे झालेला हल्ला आहे. मुद्दामून डिवचले नसते, तर कदाचित ही वेळच ओढविली नसती. मग स्वतःहून दुसऱ्याची खोडी काढणाऱ्याबद्दल इतका शोक आणि आक्रोश व्यक्त करण्याचे कारण काय? मला तरी हे पटत नाही.


आपल्याकडेही अशाच धर्तीवरचे एक बोलके उदाहरण आहे. एम. एफ. हुसेन हे भारतात जन्मलेले जागतिक किर्तीचे चित्रकार. अगदी आपल्या पंढरपुरात जन्मलेले कलावंत. आंतरराष्ट्रीय किर्तीचे चित्रकार ही त्यांची खरी ओळख. मात्र, त्यांची भारतीयांना असलेली त्यांची ओळख म्हणजे हिंदू देवदेवतांची आक्षेपार्ह नि नग्न छायाचित्रे काढणारे चित्रकार. अशी ओळख निर्माण होण्याचे कारण ते स्वतःच होते. त्यांनी हिंदू देवदेवतांची म्हणजे सरस्वती, हनुमान, राम-सीता वगैरे देवतांची नग्न आणि आक्षेपार्ह चित्रे काढली. भारतमातेचे नग्न चित्र काढून वाद निर्माण केला. मुद्दामून वाद निर्माण व्हावा, यासाठी तशी चित्रे काढली की त्यांच्यातील कलावंताला जसे स्फुरले तसे चित्र कॅनव्हासवर उतरत गेले, हा मुद्दा गौण वाटतो. 

चित्र म्हणून ही चित्रे कितीही जागतिक दर्जाची आणि अफलातून असली तरीही त्या चित्रांमुळे जर एखाद्या मोठ्या समुदायाच्या भावना दुखावल्या जाणार असतील, तर सर्वसामान्यांसाठी ती चित्रे कवडीमोल किंवा मातीमोल ठरतात. कलावंत म्हणून तो माणूस कितीही महान असला, तरीही त्याची समाजमान्यता आणि समाजातील लोकप्रियता शून्य असते. कुठेही गेले तरी त्यांना रोष आणि आंदोलनांचाच सामना करावा लागतो. जसा हुसेन यांना करावा लागला आणि आयुष्याचा शेवट भारताबाहेर करावा लागला. 


सुदैवाने त्यांनी फक्त हिंदू देवदेवतांचीच नग्न चित्रे चितारली. हिंदू समाज मुस्लिमांच्या तुलनेत बराच सहिष्णू आहे. त्यामुळे हुसेन यांच्या चित्रांचे प्रदर्शन उधळून लावण्याच्या घटना, जाळपोळ, हुसेन यांना धक्काबुक्की किंवा किरकोळ मारहाण एवढ्यावरच निभावले. त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला नाही.   हुसेन यांनी त्यांच्या चित्रांमधून मुस्लिम धर्माच्या श्रद्धास्थानाला धक्का लावला असता, तर कदाचित ‘शार्ली हेब्दो’च्या बाबतीत झालेली घटना हुसेन यांच्याबाबतही घडू शकली असती. मुस्लिम समाज सहिष्णू आहे किंवा असहिष्णू आहे, या वादात पडायचे नाही. मात्र, श्रद्धास्थानांवर हल्ला झाला किंवा इस्लामविरोधात कोणी बोलले किंवा लिहेले, तर ते कोणालाही सोडत नाहीत. सलमान रश्दी आणि तस्लिमा नसरीन यांची उदाहरणे पुरेशी बोलकी आहेत. तेव्हा हुसेन हे देखील ‘शार्ली हेब्दो’च्याच परंपरेतील होते, असे मानायला हरकत नाही. मुद्दाम एखाद्या समुदायाच्या श्रद्धास्थानांवर हल्ला करण्यात कसली आलीय निर्भिडता आणि कसले आलेय अभिव्यक्ती स्वातंत्र्य.

जाता जाता आठवलं म्हणून सांगतो. शीख पंथाचे लोक देखील तसे कर्मठ आणि कट्टर. भारताचे गृहमंत्रिपद भूषविलेल्या बुटासिंग यांना शीख पंथातून बहिष्कृत करण्याचे काम शीख गुरुद्वारा प्रबंधक कमिटीने (एसजीपीसी) केले होते. सुवर्णमंदिर परिसरात कारवाई करून अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आल्यानंतर सुवर्णमंदिराच्या डागडुजीचे काम केंद्र सरकारच्या वतीने करण्यात येत होते. अकाल तख्ताचा त्याला विरोध होता. हे काम करसेवेच्या माध्यमातून शीख समाजाच्या लोकांनी करावे, अशी त्यांची इच्छा होती. मात्र, सरकारने त्याला नकार दिला. त्यामुळे बुटासिंग आणि तत्कालीन राष्ट्रपती झैलसिंग यांच्यावर शीख समाज नाराज होता. त्यांना बहिष्कृत करण्यात आले. अखेर झैलसिंग यांनी माफी मागितली. मात्र, बुटासिंग यांनी माफी मागण्यास नकार दिला. त्यामुळे ते बहिष्कृतच राहिले. अखेर नंतरच्या काळात बुटासिंग यांनी माफी मागून गुरुद्वारात सेवा केल्यानंतर त्यांच्यावरील बहिष्कार मागे घेण्यात आला.

 
दुसरी उदाहरण अलिकडचे. अरुण जेटली यांच्या पराभवाचे… अमृतसर या अत्यंत सुरक्षित जागेवर अरुण जेटली यांना शीख पंथाच्या कट्टरपणामुळे हार पत्करावी लागली. आख्ख्या देशभरात मोदी लाट असताना अरुण जेटली थोड्या थोडक्या नव्हे लाखोंच्या फरकाने आपटले. कारण होते, अकाली दलाच्या मजिठिया नावाच्या मंत्र्याने ‘गुरुवाणी’मध्ये बदल करण्याचे महापाप करण्याचे. ‘निश्चय कर अपनी जीत करू’ ऐवजी ‘निश्चय कर अरुण जेटली की जीत करू’ असा बदल गुरुवाणीमध्ये केला आणि तशी पत्रके अमृतसरमध्ये घराघरात वाटली. त्यामुळे जेटली दणदणीत आपटले. तेव्हा आपल्या श्रद्धांवर आघात करणाऱ्यांना लोक धडा शिकविताच. प्रवृत्तीनुसार त्याचे स्वरुप बदलते. इतकेच.

आणखी एक म्हणजे सर्वश्रेष्ठ धर्म कोणता? याच प्रश्नावरून सध्याचे ‘धर्मयुद्ध’ पेटलेले आहे, असे मला वाटते. पश्चिम आशियात ‘श्रेष्ठ धर्म कोणता’ यावरूनच ‘इस्लाम वि. ज्यू’ आणि युरोपात ‘इस्लाम वि. ख्रिश्चन’ असा संघर्ष पेटलेला आहे. पॅलेस्टाइन विरुद्ध इस्रायल यामुळे इस्लाम आणि ज्यू संघर्षात ठिणगी पडली आहे. तर अमेरिकेने इराकवर दोनवेळा केलेले आक्रमण, सद्दाम हुसेन यांची घडवून आणलेली हत्या आणि अफगाणिस्तानमध्ये केलेली अनावश्यक लुडबूड यामुळे ख्रिश्चन आणि इस्लाम यांच्यात धर्मयुद्धाचा बॉम्ब पडला आहे. या मागील राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक अशी विविध गणितं कदाचित असतीलही. मात्र, सर्वसामान्यपणे दिसणारं एकमेव कारण हे ‘कोणता धर्म सर्वश्रेष्ठ’ या अहमहमिकेतून हा रक्तरंजित संघर्ष सुरू झाला आहे. 


‘शार्ली हेब्दो’ने येशू ख्रिस्त आणि ख्रिश्चन धर्मावरही व्यंग्यचित्राद्वारे आसूड ओढले होते, असे काही जण म्हणतील. मात्र, ख्रिश्चन समाज कोणतेही काम शांततेनेच करतो. म्हणजे सेवा नि शिक्षणाचे कामही शांतपणेच करतो, धर्मांतराचे कामही शांततेने करतो आणि निषेधही शांततामय मार्गांनीच करतो. ‘दा विन्सी कोड’ या पुस्तकाला तसेच चित्रपटालाही त्यांनी हिंसात्मक मार्गाने विरोध केल्याचे ऐकिवात नाही. ख्रिश्चन धर्मियांनी भारतातही ‘द सीन्स’ या ख्रिश्चन धर्मगुरुंवर ताशेरे ओढणाऱ्या चित्रपटालाही हिंसात्मक आंदोलन करून विरोध केला नव्हता. त्यामुळे ही मंडळी ‘शार्ली हेब्दो’च्या विरोधात काही करतील, असे वाटत नाही.

ज्यू धर्मावरही ‘शार्ली हेब्दो’ने आसूड ओढले होते. मात्र, ज्यू धर्मीय हे इस्रायलवर अधिक प्रेम करणारे आहेत. ज्यू धर्माचे गुरू किंवा धर्मप्रमुख वगैरे यांच्यापेक्षाही त्यांचा जीव इस्रायलमध्ये अधिक गुंतलेला आहे. इस्रायलवर हल्ला करणाऱ्यांचा ते मुडदा पाडतात. पॅलेस्टाइनला सर्व अरब देशांचे समर्थन आहे. मात्र, एकटा इस्रायल सर्वांना पुरून उरला आहे. नुसता उरला नाही, पॅलेस्टाइनच्या छाताडावर बसला आहे. तेव्हा प्रत्येक जण स्वभावानुसार विरोध, निषेध आणि प्रतिक्रिया व्यक्त करतो. 

प्रत्येक मुस्लीम हा पूर्णतः असहिष्णू नसला तरी मुस्लिम धर्मातील अनेक गट हे प्रचंड असहिष्णू आहेत. त्यांच्याकडे सहनशीलता अजिबात नाही. जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही मुस्लिमविरोधात काहीही झाले, तरी ही मंडळी आपापल्या देशात ‘इस्लाम खतरे में’ म्हणत एकत्र येतात. आसाममध्ये बांगलादेशी मुस्लिमांना ठार केल्यानंतर मुंबईत मुस्लिमांनी धुडगूस घातला. अमेरिकेने इराकवर आणि अफगाणिस्तानवर हल्ला केला म्हणून मुंबईत मोर्चे निघतात. ही त्याचीच उदाहरणे. त्यामुळे कोणी मान्य करो अथवा ना करो, मुस्लिम धर्मियांना तुम्ही जेवढे अधिक डिवचाल, तितके ते त्वेषाने पेटून उठतात आणि प्रतिक्रिया देतात. हा आजवरचा इतिहास आहे. तो इतिहास बदलणे बाप जन्मात शक्य नाही.


‘शार्ली हेब्दो’ नवा अंक बाजारात आला आहे. त्यावरही प्रेषित महंमद पैगंबर यांचे व्यंगचित्र रेखाटले आहे. त्याबाबत इजिप्तमधील एका सुन्नी संघटनेने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ती खूपच बोलकी आहे. ‘अल अझर’ या संघटनेचा पदाधिकारी म्हणतो,यापुढे आणखी व्यंगचित्रे छापण्यामुळे फक्त आणि फक्त द्वेषच वाढेल. फ्रान्समधील मुस्लिम संघटनांनी समाजबंधवांना शांत राहण्याचा आणि भावनिक प्रतिक्रिया देण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, फ्रान्समधील किंवा युरोपमधील मुस्लिम शांत राहिले, तरी पश्चिम आशियातील आणि आशियातील मुस्लिम शांत राहतील का? प्रतिक्रिया कुठे ना कुठे उमटतच राहील. कदाचित ती यापेक्षाही भयंकर आणि तीव्र असेल…

तेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आणि पत्रकारांच्या स्वातंत्र्याखाली उगाच मुस्लिमांना डिवचणे पहिल्यांदा थांबविले पाहिजे. विशेषतः युरोप आणि पश्चिम आशियात. हे कोणी ‘शार्ली हेब्दो’च्या वारसांना सांगणार आहे का? कारण असे डिवचण्यात कोणताही पुरुषार्थ नाही, ना पत्रकारितेचा कोणता मोठा धर्म तुम्ही निभावत आहात. तेव्हा उगाच मरणाला साद घालण्यात हशील नाही, हे वेळीच ओळखलेले बरे.

Sunday, January 04, 2015

पैशांची भाषा...

कोणत्याही भाषेपेक्षा प्रभावी भाषा...


दक्षिण भारतातील लोकांमध्ये भाषेविषयीचा स्वाभिमान अगदी ठासून भरलाय. म्हणजे प्रत्येक राज्याला आपल्या भाषेबद्दल जाज्वल्य अभिमान आहे. अतिजाज्वल्य अभिमान आहे. प्रत्येक नागरिक आपल्याच मातृभाषेमधून अधिकाधिक बोलण्याचा प्रयत्न करीत असतो. इंग्रजी आणि हिंदीला अजिबात धूप घालत नाही. एकवेळ इंग्रजी चालेल, पण हिंदी अजिबात नको, अशीच त्यांची मनोभूमिका असते. जेव्हा केव्हा  आपण दक्षिण भारतात जातो, तेव्हा तेव्हा अनेकदा आपल्याला याचा अनुभव कधी ना कधी आलेला असतो.

दक्षिण भारतातील भाषाभिमानाचा असाच काहीसा अनुभव मलाही आहे. थोडासा वाईट पण बराचसा चांगला. म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या कव्हरेजसाठी तमिळनाडूमध्ये गेलो होतो. तेव्हा तंजावूरला जाणं झालं होतं. तिथं एका इडली हाऊसमध्ये बसलो असताना समोर एक व्यक्ती येऊन बसली. पांढरी लुंगी, पिवळसर शर्ट आणि कपाळावर भस्म ओढलेली. अस्सल तमिळ. मला थोडी माहिती हवी होती, की एका ठिकाणचा पत्ता वगैरे हवा होता. त्याला मी आधी हिंदीत विचारलं. तो काहीच बोलला नाही. नंतर मग इंग्रजीतून विचारलं. त्यावेळीही तो काही बोलला नाही नि चक्क त्याचं केळीचं पान घेऊन दुसऱ्या टेबलवर जाऊन बसला. ही एकमेव अपवादात्मक घटना सोडली, तर दक्षिण भारतात कोणताही वाईट अनुभव मला नाही. लोक त्यांच्या परीनं हिंदीतून, इंग्रजीतून अथवा हातवारे करून खाणाखुणा करून आपल्याला मदत करण्याचा प्रयत्न करतात, असाच माझा अनुभव आहे. मध्यंतरी पुदुच्चेरीला (पाँडिचेरी) गेलो होतो. त्यावेळीही नेहमीपेक्षा थोडा वेगळा अनुभव आला. 

पहिला अनुभव एका रिक्षावाल्याचा. त्याचं नाव इब्राहिम. नुसतं इब्राहिम आडनाव वगैरे काही नाही. पहिला दिवशी भेटला, तो पुढचे दोन दिवस आमच्याबरोबरच राहिला. सातवी की आठवीच शिकलेला. आधी ट्रक ड्रायव्हर होता. त्यामुळं पश्चिम आशियातील एक-दोन देश आणि केरळ, मुंबई, हैदराबादसह बऱ्याच शहरांमध्ये फिरलेला. अर्थात, हिंदीचा पत्ता नव्हताच. पण इंग्रजी मात्र, तोडकं मोडकं येत होतं. त्यानं स्वतःहूनच आमच्याशी तोडक्या मोडक्या इंग्रजीतून संवाद साधला. कुठं जाणार? काय पाहणार? कसे जाणार? पुढचे दोन-तीन दिवस तुम्हाला रिक्षा लागेल का? इ.इ. आमचा सौदा पक्का झाला आणि मग काय पुढचे दोन दिवस तोच आमचा ड्रायव्हर कम गाइड बनला.


नाश्त्याला, जेवणाला कुठं काय चांगलं मिळतं? फिश कुठे चांगले मिळतात? आणखी काही पहायचं राहिलं आहे का? वगैरे गोष्टींचं मार्गदर्शन तो त्याच्या तोडक्या मोडक्या इंग्रजीतून करीत होता. वेट सर, नो प्रॉब्लेम, ‘यू गो आय स्टे’ यासह अनेक छोट्या छोट्या इंग्रजी शब्दांची जुळवणी त्यानं करून ठेवली होती. ऑटोचं भाडं किती झालं, ते पॅसेंजरला इंग्रजीमधून सांगण्याची कलाही त्यानं आत्मसात केली होती. म्हणजे सेव्हन्टी, एटी किंवा वन हर्ड्रेंड वगैरे आकडे त्याला तोंडपाठ होते. इंग्रजीतून संवाद साधल्यानंतरच त्याला कदाचित अधिक ग्राहक किंवा पॅसेंजर मिळत असावेत. 

दुसरा अनुभव चेन्नईतल्या तिरुवनमियूर एसटी स्टॅंडजवळच्या टी स्टॉलवरचा. इथली चहा करण्याची पद्धत मोठी गमतीशीर. कुठं पाणी तापविण्याच्या बंबामधून चहा दिला जातो. तर काही ठिकाणी चहा पावडर टाकलेली कापडी गाळणी एका भांड्यातल्या उकळत्या पाण्यात बुडवून ठेवलेली असते. त्यातला चहा आणि गरम दूध एकत्र करून चहा दिला जातो. दोन्ही चहाची चव एकदम मस्त. स्ट्राँग आणि तलफ भागविणारा. तर असा मस्त फक्कड चहा घेतल्यानंतर आम्हाला त्यानं पैसे सांगितले. आठ रुपयांना चहा मिळतो, हे आम्हाला माहिती होतं. म्हणजे सोळा रुपये झाले असणार, हे उघड होतं. तरीही आम्ही किती झाले, हे त्याला विचारत होतो. म्हणजे इंग्रजीतून किंवा हिंदीतून सांगतो का, पाहण्यासाठी. गल्ल्यावर बसलेल्या माणसाला हिंदी आणि इंग्रजीचा गंधही नव्हता. त्यामुळं तो तमिळमधूनच आकडा सांगत होता. मात्र, त्याच्या दुकानात वेटरचं काम करणाऱ्या एका तमिळच मुलानं ‘सोला रुपये बोल रहा है वो…’ असं दाक्षिणात्य टोनमध्ये सांगून आम्हाला मोकळं केलं.

तिसरा अनुभव यापेक्षाही भन्नाट. नटराजाचं मंदिर असलेल्या चिदंबरममध्ये गेलो होतो. खूप मोठ्या परिसरात अतिशय भव्य मंदिर. इतर देवदेवतांची छोटी-मोठी मंदिर. बारीक नक्षीकाम केलेले खांब आणि प्राचीन स्थापत्य शैलीचं दर्शन घडविणारं नटराज मंदिर. दुपारी एक ते चार मंदिर बंद असतं. तशी दक्षिणेतली बरीचशी मंदिरं दुपारी बंदच असतात. किमान तमिळनाडू आणि केरळमधली तरी. (लोक उगाच चितळेंना नावं ठेवतात.) तर नटराजाचं दर्शन घेण्यासाठी चिदंबरमला गेलो, तेव्हा एसटी स्टँडवर चहा घेतला. अर्थातच तिथेही चहाचे सोळा रुपयेच झाले. चहावाल्याला फक्त तमिळच येत होतं. ना इंग्रजी आणि हिंदीचा गंधही नाही. आम्हाला त्याच्याकडून आकडा माहिती करून घ्यायचा होता. पण त्याला सांगता येत नव्हता. अखेर त्यानं त्याच्या हातावर बोटानंच इंग्रजी सोळा आकडा काढून दाखविला आणि आम्ही त्याला पैसे देऊन निघालो.  

पुदुच्चेरी सरकारनं राज्यात २५ ते ३० ठिकाणी मिल्क पार्लर्स उघडली आहेत. (आणि मुख्य म्हणजे सुरू आहेत आणि प्रतिसादही उत्तम आहे.) फ्लेवर्ड मिल्क, गरम दूध, कॉफी, दही, ताक, लस्सी, मलई पेढा, आइस्क्रिम आणि बरेचसे दुग्धजन्य पदार्थ या ठिकाणी असतात. तिथं काम करणारा कृष्णमूर्तीही चांगल्या पद्धतीनं इंग्रजीतून संवाद साधणारा. मध्येच एखाद दुसरा हिंदी शब्दही हिंदीतून बोलणारा. दूध कुठनं येतं, सरकार दोन महिन्यांनी एका महिन्याचा पगार देतं, कोणत्या प्रॉडक्टला किती रिस्पॉन्स आहे, वगैरे अगदी उत्तम रितीनं सांगत होता. 

चेन्नई किंवा पुदुच्चेरीतील बसमध्येही तिकिटाचे किती रुपये द्यायचे हे कंडक्टर मंडळी गरज पडल्यास इंग्रजीमध्ये जरूर सांगायचे. पुढची बस कुठं मिळेल, स्टॉप कधी येईल किंवा स्टॉप आल्यानंतर उतरा वगैरे या गोष्टी ते इंग्रजीतून किंवा खुणेनं सांगायचे. चहा आणि मिरची नि केळ्याची भज्जी विकणारे ठेलेवाले, दुकानदार, इडली-वडे मिळणारे फूड जॉइंट्स आणि अनेक व्यावसायिक तुमच्याशी तुम्हाला समजेल अशा पद्धतीनं इंग्रजी आणि क्वचित प्रसंगी हिंदीतून संवाद साधू शकतात. गंमत सांगतो. मागे निवडणुकीच्या निमित्ताने गेलो असताना, एका रिक्षावाल्यानं ए. राजा आणि करुणानिधी हे कसे भ्रष्टाचारी आहेत, हे सांगताना हिंदीतून कचकचीत शिवी हासडून त्यांचा उद्धार केला होता. 

हे सोडा. ही झाली अगदी साध्या साध्या लोकांची आणि हातावर पोट असलेल्या लोकांची उदाहरणं. ‘नल्ली’ किंवा ‘पोथीज’ या हायफाय वस्त्रदालनांमध्ये गेल्यानंतर तिथले सेल्समन आणि सेल्सवूमन तमिळनाडूबाहेरील ग्राहकांशी हिंदीतूनही संवाद साधतात. म्हणजे तुम्ही जर एखादा प्रश्न हिंदीतून विचारला, तर ते त्यांच्या तोडक्या मोडक्या हिंदीतून का होईना पण तुमच्या प्रश्नाला योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करतात. 

मागं केरळमध्ये गेलो होतो, तेव्हाही डी बुक करताना रहीम नावाचा बहुभाषिक ड्रायव्हर आम्हाला मिळाला होता. तिथल्या प्रत्येक टूरिस्ट कंपनीमध्ये किमान तीन ते चार ड्रायव्हर्स हे इंग्रजीप्रमाणेच थोडंबहुत हिंदी बोलू शकणारे असतात. म्हणजे जर तुम्हाला इंग्रजीची अडचण असेल आणि त्याला फक्त मल्याळमच येत असेल, तर गडबड होऊ शकते. हा गोंधळ टाळण्यासाठी अनेक टूरिस्ट एजन्सीज जुजबी हिंदी येणारे ड्रायव्हर्सही आवर्जून नेमतात आणि तुम्हाला हवा असल्यास तसा पर्यायही उपलब्ध असतो. 

सर्व अनुभवांचा निष्कर्ष आपण काय काढू शकतो? दक्षिणेत विशेषतः केरळ किंवा तमिळनाडूमध्ये त्यांच्या मातृभाषेबद्दलचं प्रेम कमी होऊ लागलंय का? किंवा इंग्रजी-हिंदीमध्ये बोलण्याचं प्रमाण वाढलं आहे का? तर अजिबात नाही. असं अजिबात नाही. त्या लोकांचं मातृभाषेवरचं प्रेम तितकंच असून अभिमानही तितकाच जाज्वल्य आहे. निष्कर्ष इतकाच, की कोणत्याही भाषेपेक्षा पैशाची भाषा अधिक प्रभावी असते. पैसा मिळणार असेल, तर लोक चार नव्या् गोष्टी किंवा एखादी भाषा जुजबी प्रमाणात का होईना, पण जरूर आत्मसात करतात. चेन्नई आणि पुदुच्चेरीत फिरल्यानंतर अधिक व्यापक प्रमाणात आम्हाला त्याची अनुभूती आली. 

(पूर्वप्रसिद्धी, महाराष्ट्र टाइम्स ‘संवाद’ पुरवणी ४ जानेवारी २०१५.)

Sunday, November 16, 2014

नाही, नाही, नाही म्हणजे हो...

भाजप-‘भ्रष्टवादी’ युतीचा विजय असो...

नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यामुळे सध्या भारतीय जनता पक्षाला आणि भारतालाहीअच्छे दिनआल्याची चर्चा आहे. सध्याच्या घडीला देशात आणि भाजपमध्येहीमोदी म्हणतील तीच पूर्व दिशाआहे. मोदींचा शब्द सगळीकडे अंतिम आहे. ‘विकासपुरुषमोदी यांच्याकडे सर्व समस्यांवरअक्सिर इलाजअसल्याचे चित्र असून, त्यांच्याविरोधात बोलण्याची काही सोय उरलेली नाही. मोदी यांच्या विरोधात बोललात किंवा त्यांच्या विरोधात गेलात, तर परिस्थिती कोणत्या थराला जाऊ शकते, याचा प्रत्यक्ष अनुभव सध्या शिवसेना आणि मुख्यतः उद्धव ठाकरे घेत आहेत.



महाराष्ट्राला आणि शिवसेनेला हा अनुभव नवा असला, तरीही गुजरातला हा प्रकार नवा नाही. ‘तुम्ही एकतर माझ्या बाजूने असाल किंवा नसाल,’ हा नरेंद्र मोदी यांच्या राजकारणाचा मंत्र आहे. त्यांच्या विरोधात राहण्याची सोय नाही. मोदी यांनी त्यांच्या राजकीय विरोधकांची, गुजरातमध्ये आणि देशात काँग्रेसची जी अवस्था झाली आहे, त्यातून याचा नेमका अंदाज येतो. नेमक्या त्या घटना कशा घडतात, कोणाचा त्यामागे हात असतो, याचा थांगपत्ताही लागत नाही. मात्र, सर्व गोष्टी योग्य पद्धतीने आणि योग्यवेळी घडत जातात.

गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल, सुरेश मेहता आणि त्यांच्या समर्थकांची नरेंद्र मोदी यांनी केलेली अवस्था पाहिली, तर मला नेमके काय म्हणायचे आहे, ते आपल्याला कळेल. एकेकाळी गुजरात भाजपावर हुकुमत गाजविणाऱ्या संजय जोशी यांची अचानक एका महिलेबरोबर सीडी कशी सापडते, याचा उलगडा भल्याभल्यांना झालेला नाही. पुढे संजय जोशी यांचे निर्दोषत्व सिद्ध झाले असले, तरी त्यांची राजकीय कारकीर्द तूर्त संपलीच आहे.  

काही वर्षांपूर्वी गुजरातचे माजी गृह राज्यमंत्री हरेन पंड्या यांची संशयास्पदपणे हत्या झाली आणि त्यांच्या मारेकऱ्यांना आजपर्यंत शिक्षा होऊ शकली नाही. यामागे कोण आहेत, याबद्दल काहीही दावा करणे अवघड आहे. अशक्य आहे. पण मग प्रशासनावर घट्ट पकड असलेल्या नरेंद्र मोदी यांच्या सरकारने मारेकऱ्यांचा छडा का लावला नाही, हा प्रश्न राहून राहून पडतोच. नितीन गडकरी यांना दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची टर्म मिळण्याची शक्यता असतानाच अचानक त्यांच्यावर माध्यमांमधून आरोपांचा भडिमार सुरू होतो नि अध्यक्षपद हुकते. भाजपमधील काही नेतेच या पाठीमागे असल्याची चर्चा माध्यमांमध्ये रंगते. सर्व घटनांचेटायमिंगअचूक असते आणि त्यांचे कर्ते-करविते मात्र अजूनही सापडत नाहीत. त्यामुळे संशयाचे मोहोळ कायम राहते.

एकच विचारधारा असलेल्या शिवसेनेवर मोदींचा राग का असावा बुवा? २००२ च्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुखांनी मोदींची पाठराखण केली होती. ‘टग्या सगळ्यांना पुरून उरला,’ अशा शब्दांत गोध्राच्या दंगलप्रकरणी नरेंद्र मोदी यांचे बाळासाहेब ठाकरे यांनी समर्थन केले होते. ‘मोदींना हटवू नका,’ अशी विनंती त्यांनी भाजपकडे केली होती. कठीण प्रसंगात शिवसेना बाजूने उभी होती, हे मोदी विसरले आणि नंतर घडलेल्या गोष्टी मात्र त्यांनी चांगल्याच लक्षात ठेवल्या. म्हणजे कोणत्या, तर शिवसेनेने पंतप्रधानपदासाठी सुषमा स्वराज यांचे पुढे केले. त्याचा राग मोदी यांच्या मनात असावा. शिवायसामनातून अधूनमधून मोदींनाही चिमटे काढले जाऊ लागले. लालकृष्ण अडवाणींची महती गायली जाऊ लागली. त्याचाही परिणाम मोदींचा राग तीव्र होण्यात झाला असावा.


एकतर भाजपकडे नरेंद्र मोदी यांच्यासारखा हुकुमाचा एक्का होता. त्यामुळे मोदी आणि अमित शहा यांच्या निवडणूक कौशल्यांच्या जोरावर भाजपाला एकहाती सत्ता मिळेल, अशी आशा भाजपचे धुरीण बाळगून होते. त्यामुळेच भाजपने ठरवून युती तोडली. कोणी कितीही काही म्हणो, ‘शत प्रतिशतभाजपचे धोरण राबविण्यासाठी पद्धतशीरपणे युती तोडण्यात आली. नंतरआम्ही टीका करणार नाही आणि त्यांनी टीका केली, तरी उत्तर देणार नाही,’ ही खेळीही सेनेला अडचणीत आणण्यासाठीच रचण्यात आली होती. तसे झाले असते तर सेना २५-३० च्या घरातच अडकली असती नि भाजपला कदाचित एकहाती सत्ता मिळाली असती. मात्र, उद्धव यांनी मोदी आणि भाजप यांना अंगावर घेण्याचा निर्णय घेतला. मराठी विरुद्ध गुजराती अस्मितेचा मुद्दा उपस्थित केला. भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले. जोरदार प्रहार केले. एकीकडे मोदी यांच्या २७ सभा, भाजपाचे देशातील विविध मुख्यमंत्री, मंत्री, नेते आणि कार्यकर्ते प्रचारासाठी आलेले. प्रचंड मोठ्या प्रमाणावर पैसा ओतण्यात आला होता. इतके सगळे असूनही शिवसेना ६३ पर्यंत पोहोचली. ती उद्धव यांनी भाजपला अंगावर घेतल्यामुळेच. म्हणजे टीका करता जितक्या जागा मिळाल्या असत्या, त्याच्या दुप्पट.
तेव्हाउद्धव यांनी उगाच टीका केली, अशी टीका करायला नको होती,’ वगैरे म्हणण्यात काही हशील नाही. ‘मला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आदर आहे. मी त्यांच्याविरुद्ध एकही शब्द बोलणार नाही,’ असे म्हणणाऱ्या मोदींच्या पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेला उंदीर करण्याची भाषा नव्हती का केली? तेव्हा पातळी दोन्हीकडून सोडली गेली होती, हे मान्य केले पाहिजे.

उद्धव ठाकरे यांनी भाजप नेत्यांच्या फौजेला अफझलखानाची पलटण अशी उपमा दिली आणि मोदी भलतेच दुखावले. प्रखर हिंदुत्ववादी म्हणून तयार झालेल्या प्रतिमेला शिवसेनेने नख लावले. हा घाव मोदींच्या वर्मी लागला. शिवसेनेशी पुन्हा समझोता नाही, हे त्याच वेळी निश्चित झाले असावे. ‘दोपहर का सामनातून मोदींचे वडील दामोदरदास यांचा वाईट पद्धतीने उल्लेख करण्यात आला. (ही सर्वस्वी चूक होती, हे मान्य केलेच पाहिजे.) या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणजे भाजपने शिवसेनेला त्यांची जागा दाखवून देण्याचा चंग बांधला. कोणत्याही परिस्थिती शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घ्यायचे नाही, हे भाजपने पहिल्या दिवसापासूनच ठरविले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने मागता पाठिंबा जाहीर करून टाकला. ही खेळी देखील भाजपच्या निर्देशावरूनच झाली, असे म्हणण्यास पुरेपूर वाव आहे.

वास्तविक जनतेने कौल भाजप-शिवसेना युतीच्याच बाजूने दिला होता. म्हणजे दोघांनी मिळून सरकार स्थापावे, हा जनादेश होता. त्यात मोठा भाऊ भाजप असेल आणि शिवसेना छोटा भाऊ हेही जनतेने स्पष्टपणे सांगितले होते. मंत्रिमंडळात दोनास एक या प्रमाणात मंत्रिपदे हा तोडगा अत्यंत योग्य होता. मात्र, भाजपला शिवसेना बरोबर नकोच होती. त्यामुळे त्यांनी शिवसेनेला झुलवत ठेवले. कधी मंत्रिपदाच्या संख्येचे, तर कधी शिवसेनेकडून होणाऱ्या मागण्यांचे कारण पुढे करून. दुसरीकडे राष्ट्रवादीचा पाठिंबा घेण्याऐवजी भाजप आपला पाठिंबा घेईल आणि त्यानिमित्ताने आपल्याला काही मंत्रिपदांवर दावा ठोकता येईल, अशा भ्रमात उद्धव ठाकरे राहिले. पंचवीस वर्षांची युती आणि हिंदुत्वाचा विचार वगैरे मुद्दे पुढे करण्यात आले; पण भाजपला शिवसेनेची साथ नकोच होती आणि इथून पुढेही नकोय. मात्र, तरीही चर्चेच्या फेऱ्यांमध्ये शिवसेनेला अडकवायचे, हेलपाटे मारायला लावायचे, शिवसेना मंत्रिपदासाठी कशी लाचार आहे, हे माध्यमांमधून चित्र रंगवायचे या रणनीतीमध्ये भाजपचे नेते यशस्वी झाले.


या रणनीतीचा एक भाग म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसेनेला दोन जागा देण्याचा केलेला दिखावा. राज्याचे चित्र स्पष्ट नसतानाआम्ही मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही,’ हे उद्धव यांनी आधीच स्पष्ट करायला हवे होते. मात्र, त्यांनी तसे केले नाही. त्यामुळे अनिल देसाई यांचे हसे झाले. अर्थात, वाईटातही चांगले घडते तसे झाले. देसाई यांनी शपथ घेतली नाही, हे एकप्रकारे बरेच झाले. अन्यथा राज्यात शिवसेनेला भाजपाच्या मागे मुकाटपणे उभे रहावे लागले असते.

सुरेश प्रभू यांचा ऐनवेळी फेकलेला पत्ता हा देखील भाजपाच्या रणनीतीचाच एक भाग होता. नरेंद्र मोदी यांना सुरेश प्रभू यांच्याबद्दल विशेष ममत्व आहे. मग त्यांनी पहिल्याच शपथविधीत प्रभूंना मंत्रिमंडळात घ्यायला हवे होते. तसे करताही आले असते. मात्र, नेमकी संधी साधून त्यांनी शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. ‘तुम्हाला दोन मंत्रिपदे देतो. मात्र, त्यापैकी एक मंत्री मी सांगतो, तोच असेल,’ ही कोणीही स्वीकारणार नाही, अशी अट भाजपाने शिवसेनेसमोर ठेवली. म्हणजेसुरेश प्रभू यांना राज्यसभेवर पाठविण्याची सोय तुम्हीच करा आणि शिवाय तुमचे हक्काचे एक मंत्रिपदही गमावून बसा.’ सुदैवाने शिवसेना त्यात अडकली नाही आणि सुरेश प्रभू यांनी भाजपाची वाट धरली.

एकीकडे भाजपचे नेते म्हणतात, ‘विनाशर्त पाठिंबा द्या. बहुमत सिद्ध झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचे बघू.’ तोच भाजप केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात सहभागी होण्यासाठी शिवसेनेला मात्र, अटी आणि शर्ती घालतो. वास्तविक, शिवसेनेला दोन मंत्रिपदे देऊन प्रभूंना भाजपच्या कोट्यातून मंत्री करता आले असते. तसे त्यांनी आता केलेही. मात्र, दिलदारपणा दाखवित असल्याचे नाटक करायचे आणि शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी राजकीय खेळी खेळायची, हीच भाजपची रणनीती आहे.

चर्चेच्या कितीही फेऱ्या पार पडल्या, तरीही एक निश्चित आहे, की शिवसेनेला सरकारमध्ये सामावून घ्यायचे नाही, हे भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी ठरविले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाहेरून मिळणाऱ्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करायचे. वर्षभरानंतर वातावरण निवळले की राष्ट्रवादीला केंद्रात आणि राज्यात सत्तेत सहभागी करून घ्यायचे आणि पाच वर्षे सत्ता उपभोगायची, हा भाजपचा डाव आहे. त्यांचा हा निर्णय राज्यातील बहुतांश नेत्यांना मान्य नसावा, असे वाटते. मात्र, सत्तेपुढे नि मोदींपुढे शहाणपण नाही. शिवाय त्यांच्याच कृपेमुळे अनेक आमदार निवडून आलेले असल्यामुळे विरोधात शब्दही काढण्याची कुणाची हिंमत नाही.


एवढा अपमान होऊनही उद्धव ठाकरे यांनी स्वाभिमान का दाखविला नाही, अशी टीका उद्धव आणि शिवसेना यांचे समर्थकही आता करू लागले आहेत. मात्र, सत्तेविना पंधरा वर्षे बाहेर राहिल्यानंतर आणि पुढे काही वर्षे रहावे लागणार, असे दिसत असताना संघटना टिकवून ठेवणे आणि वाढविणे अवघड आहे. उद्धव यांना त्याची पुरेपूर जाण आहे. त्यामुळेच त्यांनी सत्तेत सहभागी होण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले. अर्थात, सत्ताच अधिक प्यारी असती, तर भाजप फेकेल त्या मंत्रिपदाच्या तुकड्यावर त्यांनी समाधान मानले असते. मात्र, तसे झाले नाही. तेव्हा उद्धव यांनी सत्तेसाठी स्वाभिमानाशी तडजोड केली, हे विधान पूर्णपणे चूक आहे.

महाराष्ट्राच्या इतिहासात भाजप आणि राष्ट्रवादी अशी नवी युती साकारण्याच्या मार्गावर असून, शिवसेनेला कणखर विरोधी पक्ष म्हणून भूमिका निभावावी लागेल. संघटना मजबूत करावी लागेल. निर्णयावर आणि कृतीवर ठाम रहावे लागेल. तर नि तरच भाजपच्या अजस्त्र सामर्थ्यासमोर त्यांचा निभाव लागू शकेल. दुसरीकडे भाजपचा नव्याने होऊ घातलेला घरोबा पाहिला, तर त्यांनी विचारांना तिलांजलीच दिली आहे. ‘देश किंवा महाराष्ट्रहाफचड्डीवाल्यांच्या हातात देणार काकिंवाभाजप म्हणजे शेटजी-भटजींचा पक्षअशी टीका करणारे शरद पवार, संभाजी ब्रिगेडच्या विचारांना खतपाणी घालणारी आणि अनेक घोटाळ्यांचे आरोप असलेली राष्ट्रवादी काँग्रेस, ‘महात्मा गांधींच्या हत्येमध्ये संघाचा सहभाग होता,’ असा आरोप करणारे जितेंद्र आव्हाडयांच्याबरोबर संसार थाटण्यासाठी भाजप सज्ज झाला आहे. (भगवा आतंकवाद आणि इशरत जहाँ हे मुद्दे उद्धव ठाकरे यांनीच उपस्थित केले आहेत. त्यांचा पुन्हा उल्लेख नको.)


सरकार टिकविण्यासाठी सरकार चालविणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस अभिमानाने सांगत आहेत. मग संघाबद्दल पराकोटीचा द्वेष असलेल्या राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन सरकार चालविणे फडणवीसांना योग्य वाटते का? की ही राजकीय तडजोड योग्य असल्याचा आदेश नरेंद्र मोदी यांनी फडणवसींना दिला आहे. निवडणूक निकालांनंतरनाही, नाही, म्हणजे नाहीअसे त्रिवार नाही, म्हणणाऱ्या फडणवीस यांनी अखेर राष्ट्रवादीच्याच पाठिंब्यावर सरकार तरविले. कदाचित शरद पवार यांच्याप्रमाणेचनाही म्हणजे होही वृत्ती फडणवीस यांनी आत्मसात केल्याचेच तर हे द्योतक नाही ना? असो.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणजेचन्यॅचरली करप्ट पार्टीच्या पाठिंब्यावर (तूर्त बाहेरून आणि नंतर आतून) भाजपचे सरकार स्थापन होणार, हे उघड सत्य आहे. उठता-बसता संघावर टीका करणाऱ्यांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापणाऱ्या भाजपला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!