Friday, October 30, 2009

रविवार सकाळ @ मातोश्री...



"जब वुई मेट' चित्रपटातलं "ते" दृष्य आठवतंय...? शाहिद कपूर करिनाला सोडून आल्यानंतर प्रथमच "शेअर होल्डर्स'ना सामोरा जातो. तेव्हा त्याच्या तोंडचे संवाद आठवतात...? ""आदित्य कश्‍यप अपने फादर की जगह नही ले सकता. कंपनी स्पिल्ट होनेवाली है. हमारे शेअर प्रायझेस ऑल टाईम लो है. सारे नये ब्रॅंड्‌स फ्लॉप हो चुके है. उपर से 572 क्‍लेम्स. इन आदर वर्डस अपनी हालत बहुत खराब हो गई है बॉस. अपनी तो बॅंण्ड बज गई है बॉस...'' इइ.

परिस्थिती अगदी तशीच्या तशी नसली तरी शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव यांची अवस्था काहीशी अशीच आहे. उद्धव हे अगदी चोहोबाजूंनी समस्या आणि अडीअडचणींनी घेरले गेले आहेत. राज-राणे यांच्या बंडखोरीतून शिवसेनेला बाहेर काढून सैनिकांमध्ये मनोधैर्य निर्माण करण्यात ते यशस्वी ठरले. पण लोकसभा निवडणुकीत मुंबईत बसायचा तो फटका बसलाच. त्यावेळी किमान मराठवाड्यानं तरी साथ दिली होती. पण विधानसभा निवडणुकीत मुंबईप्रमाणेच मराठवाड्यानंही पाठ फिरविली. त्यामुळं उद्धव यांच्या नेतृत्वाच्या क्षमतेबाबतच प्रश्‍नचिन्ह निर्माण केलं जातंय. मराठी मतदार आणि शिवसैनिकांमध्येही काही प्रमाणात कुजबूज सुरु झालीय.

च्या दिवशी उद्धव ठाकरे पत्रकारांना सामोरेही गेले नाहीत. त्यामुळं उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया काय, ते पराभवाचं विश्‍लेषण कसं करतात हे जाणून घेण्याची उत्सुकता होती. त्यामुळंच भेटण्याची इच्छा व्यक्त करणारा डचड उद्धव यांना टाकला. अनपेक्षितपणे उद्धव यांचा तातडीनं "रिप्लाय' आला, "उद्या दुपारी साडेबारा वाजता मातोश्री..." निमंत्रण स्वीकारलं आणि रविवारी मध्यान्हीला (पत्रकार परिषदेच्या आदल्या दिवशीच...) मी आणि माझा सहकारी हृषिकेश देशपांडे मातोश्रीवर पोचलो. उद्धव यांच्याशी सविस्तर चर्चा तर झालीच पण ठाकरे कुटुंबियांचा जिव्हाळा अनुभवण्याची संधीही मिळाली.

एखाद्या घरात गेल्यानंतर यजमानाकडनं होणारं स्वागत, नुकतीच दिवाळी झाल्यामुळं फराळासाठी होणारा आग्रह अथवा खास "सीकेपी' पद्धतीनं तयार केलेल्या "कानुल्या' किंवा पोहे खाण्यासाठी रश्‍मी वहिनींकडून होणारा आग्रह... हे सगळं अनपेक्षित तर होतंच पण त्यापेक्षाही आश्‍चर्यकारक होतं. मातोश्रीवर पोचलो तेव्हा उद्धव हे मनोहर जोशी यांच्याशी बोलत होते. त्यामुळं रश्‍मी वहिनींनी सुरवातीला आमचं आदरातिथ्य केलं. अगदी कोण कुठनं उभं होतं किंवा माध्यमं कशी एकांगी बातम्या देतात इथपासून ते "सीकेपी' खाद्यपदार्थ किंवा मराठीचा मुद्दा किती महत्वाचा आहे, इथपर्यंत सर्वच विषयांवर त्या मोकळेपणानं बोलत होत्या. माध्यमांवर त्यांची किती "नजर' आहे, हे त्या देत असलेल्या संदर्भांवरनं अगदी क्षणोक्षणी जाणवत होतं.

सरांशी "गुफ्तगू' झाल्यानंतर उद्धव आमच्याशी "शिवसंवाद' साधायला आले. तत्पूर्वी त्यांनी निखील वागळे यांच्या "आजचा सवाल'चं उत्तर दिलेलं होतं. गेल्या पाच वर्षांत उद्धव यांनी जितकी आंदोलनं केली तितकी राज्यातल्या एकाही नेत्यानं केली नाहीत. कापूस दिंडी, कर्जमुक्ती देता का जाता, ऊस दरासाठी आंदोलन किंवा "शिवसंवाद' दौरा... इतक्‍यांदा जनतेमध्ये गेलेला हा नेता निकालानंतर पुरता हताश झाला असेल किंवा खचून गेला असेल, असं आम्हाला वाटलं होतं. राजचा दबदबा वाढत जातोय. दुसरीकडे मुंबई आणि मराठवाड्यासारखे बालेकिल्ले पडताहेत. याची चिंता त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत होतीच. पण मी इतक्‍यानं खचून जाणाऱ्यातला नाही, हे देखील त्यांच्या बोलण्यातनं जाणवत होतं.

"मी महाराष्ट्र बोलतोय...'च्या निमित्तानं आम्ही राज्यात काय काय पाहिलं, याची माहिती ते आवर्जून घेत होते. शिवसेनेचे लोकप्रतिनिधी असलेला भागही कसा अविकसित आहे, हे आम्ही त्यांना सांगितलं. तसंच एकाच उमेदवाराला अनेकदा संधी दिल्यामुळंही काही ठिकाणी फटका बसला असावा, असं सांगितलं. त्यावर बरीच चर्चा झाली. त्यांनी मांडलेली बाजू कार्यप्रमुखातली माणुसकी दाखवणारी होती.

""नारायण राणे सेनेतून बाहेर पडले तेव्हा त्यांनी मराठवाड्यातल्या प्रत्येक आमदाराला चुचकारलं होतं. पण त्यांनी सेनेवरची निष्ठा ढळू दिली नाही. त्यात अनेक ज्येष्ठांचाही समावेश होता. सांदिपान भुमरें अथवा अण्णासाहेब माने यांना पुन्हा तिकिट मिळालं ते त्यांच्या निष्ठेमुळंच. त्यांचा पराभव झाला. पण सेनेत निष्ठावंतांनाच तिकिटं मिळतात, हे दाखवून देण्यासाठी त्यांना पुन्हा उमेदवारी दिली होती. सेनेत तिकिटं विकली जात नाहीत, हे दाखवून द्यायचं होतं,'' असं उद्धव यांचं स्पष्टीकरण वेगळा आयाम मांडणारं होतं.

दुसरीकडे अनुसूया खेडकर (कै. आमदार प्रकाश खेडकर यांच्या पत्नी) यांनी इच्छा नसताना पण सेनेला गरज असताना नांदेडमधून निवडणूक लढविली. मग आता दुसरा उमेदवार मिळाला म्हणून त्यांना उमेदवारी डावलणं मला माणूस म्हणून पटलं नाही, हे स्पष्टीकरणही शांत आणि संयमी नेत्याची आणखी एक बाजू दाखवणारं होतं. माध्यमांकडून दोन्ही बाजूनी होणाऱ्या टीकेला सामोरं जाताना उद्धव भूमिकेवर ठाम होते. ज्येष्ठांना तिकिटं द्या किंवा त्यांची तिकिटं कापा, टीका होतेच. शिवसेना राडेबाज, शिवराळ भाषा वापरणारी किंवा गुंडप्रवृत्तीची म्हणूनही टीका होत होती आणि आता संस्कृती बदलतोय तरीही टीका होतेच. त्यामुळं माध्यमं दोन्ही बाजूनं बोलतात आणि शिवसेनेवरच टीका करतात, हे त्यांनी सोदाहरण दाखवून दिलं. तसंच आम्ही आमचा मार्ग सोडणार नाही, हेही निक्षून सांगितलं.

""मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या जनतेमध्ये गेलो. इतर कोणीही गेलं नाही इतके वेळा गेलो. तरीही मला आणि शिवसेनेला अपयश का आलं,'' याचं उत्तर त्यांना जास्त सतावत होतं. कदाचित उद्धव जितके कार्यरत आहेत तितके त्यांचे आमदार-खासदार नाहीत, हेच त्याचं उत्तर आहे. आपल्या भागाचा विकास करण्यात शिवसेनेचे लोकप्रतिनिधी पुढे नाहीत आणि हे आम्ही प्रत्यक्ष पाहिल्यामुळं आम्हाला माहिती होतं. ते त्यांनाही सांगितलं. शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करत असताना सभागृहात मात्र, पक्ष तितका सक्षम वाटत नव्हता. अशा काही विधानांच्या वेळी त्यांचा चेहरा पुरेसा बोलका होता.

आता मुंबईतली पक्ष संघटना वॉर्ड स्तरापासून पुन्हा बांधून काढायची, मराठवाडा-विदर्भात फक्त आंदोलन न करता विधायक तसंच विकासकामंही सुरु करायची, पुन्हा एकदा त्याच तडफेनं स्वकीय तसंच परकीयांशी दोन हात करायचे आणि मुख्य म्हणजे या सर्वांच्या जोडीला पुन्हा एकदा ज्वलंत हिंदुत्व हातात घ्यायचं, अशा अनेक गोष्टींचे संकेत कळत नकळत मिळत होते. जवळपास तास दीडतासांच्या भेटीमध्ये उद्धव यांच्याशी अगदी मोकळेपणानं चर्चा झाली.

राज आणि राणे यांच्या तडाख्यामुळं शिवसेनेची पडझड होणार, हे माहिती होतंच. पण उद्धव पराभूत झाले असले तरी "फिनिक्‍स' पक्षाप्रमाणे उभं राहण्याची जिद्द त्यांच्यात आहे. शांत, संयमी आणि सुसंस्कृत आहेत. ते चिवट आहेत. लोकांमध्ये मिसळण्यात आणि आंदोलनांचं नेतृत्व करण्यात त्यांना शरम वाटत नाही. तरीही शिवसेनेचे 44 आमदार आहेत. त्यातला 26 तरुण आहेत. लोकांसाठी जनतेमध्ये जाऊन आंदोलनं करणारा आणि त्यांच्या व्यथा समजून घेणारा उद्धव यांच्या व्यतिरिक्त एकही नेता नाही. अशा त्यामुळंच त्यांच्या या प्रयत्नांना लोकांची आज ना उद्या साथ लाभणार का, याचीच उत्सुकता आहे.

लेखाच्या सुरवातीला "जब वुई मेट' या चित्रपटात वापरलेल्या संवादाचा उत्तरार्ध खालील बाजूस आहे. फक्त चित्रपटात शोभेल असाच तो आहे.

""... इससे बुरा और कुछ हो नही सकता. अब सिर्फ अच्छा हो सकता है और होगा. इन्सान जो कुछ रियली चाहता है ना, ऍक्‍च्युली... उसे हमेशा वोही मिलता है. और इस बार मे रियल मे चाहता हूँ. ऍक्‍च्युअल मे. हर प्रॉब्लेम को में सामने से फेस करु. हर इनकमप्लिट प्लॅन को कम्प्लिट करु. इस कंपनी को वहा तक ले जाऊ जहा खुद डॅड भी नही सोच सकते...''

चित्रपटाच्या उत्तरार्धात शाहिद कपूर त्याच्या वडिलांची कंपनी खूप मोठी करतो. त्याला खूप फायदा होतो वगैरे वगैरे... तुलना करण्याची इच्छा नाही. पण तरीही उद्धव यांच्या आयुष्यातही हा संवाद खरा ठरेल का... असा विचार करतच "मातोश्री'तून बाहेर पडलो... समाधानी मनानं!

12 comments:

Ashish said...

For power, congress people forget the difference among therselves, even after election congress and NCP are fighting with each other, but they know if we part apart we wont come back to power, so they forgot all differences at the time of elections and come together.

ha shahan pana sena bjp ani mns valyana ka suchat nahi. hi loke mhanje sade char varshe ekatra rahatat ani election ale ki ek mekachya payat pay ghalatat.. hi asla karbhar sagali kade.

ata ya saglyana ekatra yawech lagel, nahi tar nuksan tyanche hi ahe ani ultimately maharasthrachech ahe.

ashish saheb, lekh changala jhala Ahe

Ashish Kulkarni
Maharashtra Majha

Anonymous said...

Mulaat marathi maanusach shatke na shatak aatlya aat bhaandat aalaa aahe... mag pragati kuthun honaar? aani aazchi praja progressive politics madhye thaam pane vishwaas thevte... Sena aso ki Ma Na Se... langdya ghodyaanni race jinkli zaat nahi... aso... vachane na kim daridrata??? asech chaalnaar... I liked the way you put it, bro.

santosh gore said...

शिवसेनेचा मुंबईत पराभव झालाय तो मत विभागणीमुळे. तर मराठवाड्यात चुकीचे आमदार दिल्यामुळे. मात्र आंदोलनाच्या माध्यमातून शिवसेनेची सामान्य जनतेबरोबर नाळ जुळलेली आहे. त्यामुळे या पराभवातून बाहेर येत शिवसेना सत्तेचे सर्वोच्च स्थान गाठणार यात शंका नाही.

ds satara said...

kharokharach shivasenela bhavishyat,ahe tya peksha pudhe jayache aasel tar,"marathi manasane amachyashi gaddari keli",ha shahamrugi pavitra sodun dila pahile.bhampak,sandhisadhu netyanchi hakalpatti keli pahije.rada culturela kharech fata dila aahe he janavale pahije.manase peksha ha paksha ajun tari mothach aahe.udhavaji habakun gelele nahit he vachun anand zala.taripaan mumbaitil marathi kamgar deshodhadila lagala,communistana nestanabut karanyasathi konachya madatine,sanganyavarun,senene he paap kele he janata visarali naahi.yethun pudhe,janatela gruhit dharun political parties shahajogpana karat rahatil tar mukhabhang zalyashivay rahanar nahi.tyatalya tyat he bare vatale mhanun yana lokanni nivadun dile,tehi kathavar.tenvah naraz vhayache kahi karan nahi.fakt atireki dahashatvadakde zukanara hindutvavad sodavayas hava.rajyakaranapeksha samajkaran mahatwache.hindutvapeksha khup kaahi mulbhut samasya ya rajyapudhe aahet.pune pattern amalat aanata yeil aasha pudya sodun denare savang nete aani tyanchi bhampak rajyakarangiri band karun takayala havi.ya sarva lokanchya abhyashin netegirimule maharashtrachi kalaji vatate.aaso jayhind jay maharashtra.

Nima said...

थोडक्यात काय तर शिवसेना प्रतिमेच्या सापळ्यात सापडलीय.

भातु संवाद विषयी... said...

आपण सारे म्हणता शिवसेनेनं बरीच आंदोलने केली. मात्र शिवसेनेच्या आंदोलनाना धार नव्हती. आपण जर मागे वळून पाहिले तर डाळीचे आणि तेलाचे भाव वाढले म्हणून निलम गोरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्याना घेराव घातला होता. थाळी आंदोलन केले होते. शिवसेनेचे आंदोलन म्हटले की सत्ताधाऱ्यांना घाम फुटायचा...आज मात्र तशी परिस्थिती नाही. व्यासपीठावरुन आंदोलन होत नसतं. आंदोलनासाठी रस्त्यावरच उतरवं लागत. लोकांना रिजल्ट हवा असतो. शिवसेनेची आंदोलनं झाली पण तसा रिजल्ट मिळाला नाही. लोकांनी सेनेच्या आणि मनसेच्या आंदोलनाची तुलना केली. (मुंबईत तरी)...

दुसरे असं की उद्धव ठाकरे किती म्हणत असले तरी काही ठिकाणी नक्कीच पैसे देऊन उमेदवार दिले गेले. हे खरे आहे. त्यामुळे अशा ठिकाणी निष्ठावान कार्यकर्ता दुखावला गेला. निष्ठावान कार्यकर्ता हीच शिवसेनेची खरी ताकद आहे.

तिसरं असं की उद्धव ठाकरे मनसे नको तेवढ्या प्रमाणात घसरले..त्यामुळे राज ठाकरे आपोआप मोठे झाले. उद्धव ठाकरे यांनी मनसे पेक्षा सत्ताधाऱ्यांना फोकस करायला हवं होतं.

शिवसेनेनं एवढ्या वर्षाच्या राजकारणात फक्त आंदोलनं केली. मात्र सहकार किंवा इतर रोजगाराच्या आणि उत्पन्नाच्या क्षेत्राकडे दुर्लक्ष केलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येक नेत्याचं आपलं एक सहकारचं जाळं आहे. आणि या सहकार क्षेत्रात काम करणारा कामगार हे त्यांचं हक्ताचं मतदान आहे. या कामगारांना काँग्रेसही नको आहे मात्र फक्त पोटामुळे त्यांना मतदान करावं लागतं. याच जोरावर काँग्रेसची एक वोटबँक तयार झालीय.

आता राहिला मुंबईचा प्रश्न...शिवसेनेला हे मान्य करावं लागेल की झोपडपट्टी वाढवण्यात शाखाप्रमुख आणि नगरसेवकांचा हात आहे. पैशाच्या हव्यासापोटी झोपडपट्टीत कोण राहयला येतो याचा विचार केला गेला नाही. त्याच झोपडपट्टीत भय्यांचं प्रमाण वाढत गेलं आणि एक- एक करत सर्वच झोपडपट्ट्या या काँग्रेसची ओटबैख तयार झाल्या.

prashant.anaspure said...
This comment has been removed by the author.
prashant.anaspure said...

नेते, लेख नेहमीप्रमाणेच झकास आहे...पण...

युवराज उद्धवांचे 'आदेश' ऐनवेळी पुढे येतात. त्यामुळे अस्सल कार्यकर्त्या शिवसैनिकाला ते झेपत नाहीत. बाळासाहेबांच्या एका 'आदेशा'ने जनतेने मनोहरपंत जोशी, नारायण राणे यांना थेट मातोश्रीवर राज्य करायला पाठवलं होतं. फरक एवढाच आहे. आपल्या स्वतःच्या गल्लीतल्या मतदारसंघातही लोकांनी उद्धव यांनी दिलेला 'आदेश' जनतेनं धुडकावून दिलाय. याचा विचार कुठेतरी व्हायला पाहिजे की नको.

Ketaki said...

Hi Ashish,
You had left a few comments on the food blog I write. and your number!

Kahi mahiti havi asel tar jaroor comment taaka. I will respond back

-Ketaki

Unknown said...

Hi Aashish,
Good one. Keep it up. we are proud of you.
Uddhav thakare khupach Diplomatic aahet.

Anonymous said...

जय महाराष्ट्र आशिष,

तुझे उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्यावर लिहिलेले ब्लॉग वाचले, साम वाहिनीसाठी मुलाखत घ्यायला गेला होतास त्यामुळे लेखातला सहजपणा आवडला. एवढ्या मोठ्या नेत्यावर तुला आत्ताच अवघड प्रश्नांची सरबत्ती करता येणार नाही कदाचित, पण काही चांगले मुद्दे तू निदान ब्लॉग मध्ये तरी मांडले आहेस याचा आनंद झाला. पत्रकाराने आपले मुद्दे न घाबरता आणि आग्रहीपणे परंतु मुत्सद्दीपणे मांडावे (कसे हा ज्याच्या त्याच्या अनुभवाचा आणि प्रवृत्तीचा प्रश्न आहे!), ते वेळोपरत्वी तुला जमेल. तू एक चांगला आणि परखड पत्रकार व्हावास असे मला वाटते.

मतांच्या विभागणीमुले शिवसेना हरली हे खरेच पण भाजपमधील अनागोंदी कारभारामुळे सेनेला अनेक मतदारसंघात काही मदत झाली नाही हेही खरे! 'शिवशाही', 'मां' वगैरे वातावरणनिर्मिती ऐकायला ठीक वाटते. पण मागील खेपेस सत्तेत असताना ठाकरे कुटुंबाने स्वताचा आणि सेनेतील अनेकांनी त्यांचा फायदा कसा करून घेतला हे लोकांना दिसत असते. शिवाय मनोहरपंत राजबरोबर व्यवसायात आहेत, अनेक फालतू लोकांना सेनेने अकारण महत्व दिले आणि ते सेनेला सोडूनदेखील गेले हेही कळत असत. मग सेनेत वेगळे ते काय? हा विचार लोक करतात.

कॉंग्रेसचे राजकारण सत्वशील नसेल तरी राष्ट्रीय नेतृवाचा निस्पृह्पणा आणि उदारीकरणामुळे लोकांच्या रोजच्या जीवनात आलेल्या सुखसोयी हे जनतेला या प्रतीकात्मक आव्हानापेक्षा ज्यास्त भावत असावेत! भ्रष्टाचार सगळेच करतात अशी आजची परिस्थिती आहे त्याच्या विरुद्ध काही ठोस करायची उद्धव यांची तयारी दिसत नाही. "ठेविले अनंते तैशेची राहावे" ही आपल्या भारतीयांची मूळ प्रवृत्ती आहे हे उद्धव विसरतात. त्याग आणि साधेपणा हे गुण आपल्याला भावतात (मग ते खरे असोत वा नसोत!) पण तेही सेना-भाजपने १९९६ पासून गुंडाळून ठेवले आहेत. उद्धव यांची एक गोष्ट मात्र मला आवडते; ते कदाचित सेनेतली राडा संस्कृती संपवू शकतील. तू CKP पदार्थ वगैरे लिहिले आहेस, पण माझ्या माहितीनुसार रश्मीताई या मूळच्या पाटणकर आहेत (अर्थात त्यांनी सासरची खाद्यसंस्कृती अंगवळणी पाडली आहे हे मात्र छान!).

एक चांगला विधायक कार्यक्रम, त्यासाठी कष्ट करायची तयारी, काही नवीन उपक्रमांचे मुंबई-ठाणे महानगरपालिकेच्या मार्फत "टेस्टिंग" आणि महाराष्ट्रासाठी व्यापक विकास आराखडा हे जो पक्ष करेल तो भविष्यात सत्ता राखेल. असो, पुढे असेच पण ज्यास्त परखड विश्लेषणात्मक लेख लिहिशील याचीच अपेक्षा करतो!

तुझा NRI भाऊ,

रवी गोडबोले

Anonymous said...

Khup chaan lihilay... baryach divasapasun vachayche hote.. Aaj yog ala.. JAB WE MET link chaan jamliye..

All the best.

Regards,
S.K.